आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण रहात असे. तो दारिद्र्याने फार पिडला होता. त्याची बायको शेजारणीच्या घरीं एकें दिवशी बसायला गेली. आपल्या गरिबीचं गाणं गाइलं. शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं.

ती म्हणाली, “बाई बाई, शुक्रवारचं व्रत कर. हे शुक्रवार तूं श्रावणापासून धर. सारा दिवस उपास करावा, संध्याकाळीं सवाष्णीला बोलवावं. तिचे पाय धुवावे. तिला हळदकुकूं द्यावं. तिची ओटी भरावी.साखर घालून दूध प्यायला द्यावं. भाजलेल्या हरभार्‍यांची खिरापत द्यावी. नंतर आपण जेवावं. याप्रमाणं वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं” असं सांगितलं. ती घरीं आली. देवीची प्रार्थना केली व शुक्रवारचं व्रत करूं लागली.

त्याच गावांत तिचा भाऊ रहात असे. तो एके दिवशीं सहस्त्र भोजन घालूं लागला. सार्‍या गावाला आमंत्रण केलं पण बहिणीला कांहीं बोलावलं नाहीं. ती गरीब, तिला बोलावलं तर लोक हंसतील.

पुढं दुसरे दिवशीं भावाकडे ब्राह्मणांचे मारे थवेच्या थवे येत आहेत. पोटभर जेवीत आहेत. बहिणीनं विचार केला, आपला भाऊ सहस्त्रभोजन घालतो आहे. बोलावणं करायला विसरला असेल. तर आपल्याला भावाच्या घरी जायला कांहीं हरकत नाहीं. असा मनांत विचार केला. सोंवळें नेसली, बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरीं गेली. पुष्कळ पानं मांडली होतीं. एका पानावर जाऊन बसली. शेजारच्या पानावर मुलांना बसवलं. सर्व पानं भरली. सारं वाढणं झालं. तेव्हां तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं. वाढतां वाढतां तिच्या पानाशीं आला. ती खालीं मान घालून बसली होतीं.

तिला हांक मारली, “ताई ताई, तुला वस्त्र नाहीं, पात्र नाहीं, दाग नाहीं, दागिना नाहीं, तुझ्याकडे पाहून सगळे लोक मला हंसतात, ह्यामुळं मी तुला कांहीं बोलावलं नाहीं. आज तूं जेवायल आलीस ती आलीस. आतां उद्या कांहीं येऊं नको.” असं सांगून पुढं गेल. ही आपली तशीच जेवली, हिरमुसलेलं तोंड केलं. मुलांना घेऊन घरीं आली.

दुसरे दिवशी मुलं म्हणूं लागलीं, “आई आई, मामाकडं जेवायला चल.” बहिणीनं विचार केला, कसा झाला तरी आपला भाऊच आहे. बोलला म्हणून काय झालं? आपली गरीबी आहे. तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे. आजचा दिवस आपला बाहेर पडाला, तितकाच फायदा झाला, असं म्हणून त्याही दिवशी भावाकडे जेवायला गेली. भाऊ तूप वाढतां वाढतां तिच्या पानाशीं आला. ती खालीं मान घालून बसली होती. भावानं तिला हांक मारली, “ताई ताई, भिकारडी ती भिकारडी आणि सांगितलेलं ऐकत नाहीं. तूं जेवायला येऊं नको म्हणून काल सांगितलं, आज आपली डुकरिणीसारखी पोरं घेऊन आलीस. तुला लाज कशी नाहीं वाटली? आज आलीस तर आलीस. उद्या आलीस तर तुला हात धरून घालवून देईन.” तिनें तें मुकाट्यानं ऐकून घेतलं. जेवून उठून चालती झाली.

पुन्हां तिसरे दिवशी जेवायला गेली. भावानं पाहिलं, हात धरून घालवून दिलं. फार दुःखी झाली, देवीची प्रार्थना केली. सारा दिवस उपास पडला. देवीला तिची दया आली. दिवसानुदिवस सुखाचे दिवस दाखवूं लागली. असं करतां करतां वर्ष झालं. बाईचं दळिद्र गेलें पुढं एक दिवशीं ती शुक्रवारचं उद्यापन करूं लागली. भावाला जेवायला बोलावलं. भाऊ मनांत ओशाळा झाला. बहिणीला म्हणूं लागला, “ताई ताई, तूं उद्या माझ्या घरीं जेवायला ये. नाहीं कांहीं म्हणूं नको. घरीं कांहीं जेवूं नको. उद्या तूं आलीस नाहीं तर मी कांहीं तुझ्या घरीं येणार नाहीं.” बहिणीनं बरं म्हटलं. भावाच्या मनांतलं कारण जाणलं.

दुसर्‍या दिवशीं लौकर उठली, वेणीफणी केली. दागदागिने ल्याली, उंची पैठणी नेसली, शालजोडी घेतली आणि भावाकडे जेवायला गेली. भाऊ वाट पहातच होता. ताई आली तसा तिचा हात धरला, पाटावर बसवली, पाय धुवायला ऊन पाणी दिलं. पाय पुसायला फडकं दिलं.

इतक्यांत जेवायचीं पानं वाढलीं. ताईचं पान आपल्या शेजारीं मांडलं. भाऊ जेवायला बसला. ताईनं आपली शालजोडी काढून बसल्यापाटीं ठेवली. भाऊ पाहूं लागला. मनांत कल्पना केली, शालजोडीनं उकडत असेल म्हणून काढीत असेल. नंतर ताई आपले दागिने काढू लागली. बसल्यापाटीं ठेवूं लागली. भावानं विचार केला, जड झाले, म्हणून काढीत असेल, नंतर ताईनं भात कालवला, मोठासा घांस केला, तो उचलून सरीवर ठेवला, भाजी उचलून ठुशीवर ठेवली. लाडू उचलून चिंचपेटीवर ठेवला. जिलबी उचलून मोत्यांच्या पेंद्यावर ठेवली.

भावानं विचारलं, “ताई ताई, हें काय करतेस?” ती म्हणाली, “दादा, मी करतें हेंच बरोबर आहे. जिला तूं जेवायला बोलावलंस तिला भरवतें आहे.” भाऊ कांहीं हें समजेना. त्यानं तिला पुन्हां सांगितलं, “अग ताई, तूं आतां जेवू तरी.” तिनं सांगितलं, “बाबा, हें माझे जेवण नाहीं, हें या लक्ष्मीचं जेवण आहे. माझं जेवण होतं तें मी सहस्त्रभोजनाच्या दिवशीं जेवलें.” इतकं ऐकल्यावर भाऊ मनांत ओशाळला. तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले. झाल्या अपराधाची क्षमा मागितली. बहिणीनं क्षमाकेली. नंतर दोघंजणं जेवलीं. मनांतली अढी काढून टाकली. दोघांनी देवीचे आभार मानले. भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला.

देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं, तसं तुम्हां आम्हां करो, ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.