शुभ्र बुधवार व्रत/व्रत शुभ्र बुधवारचे
<poem> बुध ग्रहाला भाग्याचा म्हणजे नशिबाचा अधिपती असे म्हणतात, म्हणून या बुधग्रहाची भक्ती करावी. भक्ती किंवा उपासना मनापासून केल्याने अगदी अशक्य असलेल्या गोष्टीही शक्य होतात. आणि मग आपले आयुष्य पद्धतशीर घालविता येते. चांगले भाग्य येण्यासाठी बुधाची उपासना करावी. समजा, तुम्हाला नोकरी नाही, बुधाची उपासना करा, नोकरी लागेल. तुमच्या व्यापारधंद्यात तुम्हाला भरभराट पाहिजे असेल तर बुधाची उपासना करा. यासाठी आणि कोणतेही चांगले काम सिद्धीस जाण्यासाठी अकरा (११) शुभ्र बुधवार करावेत. लग्न जमण्यासाठीही अकरा (११) शुभ्र बुधवार करावेत.
१. बुधवार हा महालक्ष्मीचा वार आहे. अकरा बुधवरी पांढरी फुले वाहा व महालक्ष्मीची पूजा करा. देवीसमोर तुपाचे निरांजन लावावे व उदबत्ती पेटवून ठेवावी. नारळ ठेवावा व बुधस्तोत्र म्हणावे.
२. हे व्रत करणार्या व्यक्तीने अंघोळ केलीच पाहिजे. गार पाणी सोसत नसल्यास उन्ह पाण्याने अंघोळ करावी. देवघरात ठेवलेल्या श्रीलक्ष्मीच्या आणि बुधाच्या तसबिरीची पूजा करावी.
३. त्याने मांस खाऊ नये, मद्य (दारू) पिऊ नये आणि अकरा बुधवारी स्त्रीशय्या वर्ज्य करावी. व्रत करणारी स्त्री असेल तर तिने पुरुषशय्या वर्ज्य करावी. थोडक्यात म्हणजे ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे.
४. अकरा बुधवारच्या काळात भांडू नये अगर भांडण उकरून काढू नये.
५. बुधाची कहाणी दुसर्यास सांगावी अगर आपण स्वतः दुसर्यास ऐकू जाईल अशी वाचावी.
६. पांढर्या वस्तूचा नैवेद्य दाखवावा. म्हणजे दूध, साखर, खडीसाखर अशा प्रकारचा.
७. बुधवारी कमी बोलावे. शक्य तर मौन पाळावे.
८. बुधवारी उपवास करावा. त्या दिवशी मीठ व मिरची वर्ज्य करावी. आळणी बुधवार करावा. साबूदाण्याची खीर, केळ्याचे शिकरण खावे. तांदळाचा भात खाऊन उपवास सोडावा.
९. सुतक (भाऊबंदातली कोणी व्यक्ती अगर आजोळचा मामा, आजा, आजी वारले) असल्यास बुधवार करा; पण तो अकरांत मोजू नका.
१०. अकरा बुधवार पुर्ण झाल्यावर बाराव्या बुधवारी ऐपतीप्रमाणे सुवासिनीला भोजन व दक्षिणा द्यावी. आणि या व्रत कथेचे एक-एक पुस्तक द्यावे. मग आपण भोजन करावे. पक्वान्न खिरीचे करावे.
<poem>
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |