शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती



शेतकरी संघटना
विचार आणि कार्यपद्धती



शरद जोशी



शब्दांकन
प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे
प्रा. सुरेश घाटे







शेतकरी आंदोलनात
बळी पडलेल्या
हुतात्म्यांना
प्रकाशकाचे मनोगत


 शरद जोशी यांची तीन पुस्तके 'स्वातंत्र्य का नासले?', 'अंगारमळा', 'खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने' आम्ही प्रकाशित केली. शेतकरी प्रकाशनाने त्यांची पूर्वी प्रकाशित केलेली पुस्तकेही आपण पुनर्प्रकाशित करावी हा आमचा मानस होता. त्या अनुषंगाने यापूर्वी प्रकाशित झालेले आणि अतिशय महत्त्वाचे ठरलेले शरद जोशी यांचे पुस्तक 'शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती' नवीन स्वरुपात सिद्ध करीत आहोत. भारतीय शेतीची पराधीनता हा लेख या पुस्तकास परिशिष्ट म्हणून जोडला आहे. आदरणीय सुरेशचंद्र म्हात्रे सरांच्या सुचनेनुसार जुन्या पुस्तकाची मांडणी तशीच ठेवलेली आहे. त्यात शब्दाचाही बदल केलेला नाही. तसेच पूर्वीच्या दोन्ही पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तवना तशाच ठेवलेल्या आहेत. पुस्तकातील आडकेवारी त्या काळातील आहे. इतका मुद्दा सोडला तर सर्व विवेचन आजच्या काळातही महत्त्वाचे ठरते हे वेगळे सांगावयाची गरज नाही.
 आमच्या प्रकाशन संस्थेवर विश्वास ठेवून सुरेशचंद्र म्हात्रे सरांनी शेतकरी प्रकाशनाची पुस्तके पुनर्प्रकाशित करण्याची परवानगी दिली त्या बद्दल त्यांचे आभार. संसदेच्या समितीपुढे खासदारांनी लिहिलेली पुस्तके सादर करण्यास सांगण्यात आले आणि शरद जोशी यांच्या असे लक्षात आले की आपण यादी तर दिली पण प्रत्यक्षात पुस्तके मात्र उपलब्ध नाहीत. ही खंत त्यांनी दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी बोलून माझ्याजवळ दाखवली होती. त्यांची सर्व पुस्तके प्रकाशीत करून त्यांची खंत दूर करण्याचा हा आमचा छोटासा प्रयास.
 औरंगाबाद येथे संपन्न होणाऱ्या ११ व्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हे पुस्तक प्रकाशित होत आहे याचा मला विशेष आनंद होत आहे. माझे सहकारी प्रविण योगी, श्रीकांत झाडे, संभाजी वाघमारे, भिमराव वाघमारे तसेच चित्रकार सरदार यांनी दिलेल्या सहकार्यामुळेच पुस्तक अल्पकाळात देखण्या स्वरूपात प्रकाशित होऊ शकले.

श्रीकांत अनंत उमरीकर.

दि. ०३ नोव्हेंबर २००८
औरंगाबाद
 
 सप्रेम नमस्कार.... विनंती विशेष,

 नोव्हेंबर १९८० मध्ये उसाचं आंदोलन नासिक भागात सुरू होऊन मुंबई - आग्रा हमरस्ता अक्षरशः रोखला गेला तेव्हाच प्रथमतः बड्या वर्तमानपत्रांतून त्याअगोदर दोन वर्षे शेतकऱ्यांत सुरू झालेल्या जागृतीसंबंधी वाचावयास मिळू लागले. त्याचबरोबर शरद जोशी हे नाव वाचावयास मिळू लागले. शेतकऱ्यांत नव्याने मूळ धरू लागलेली आणि प्रथमच आर्थिक पायावर उभी असलेली शेतकरी चळवळ कशी चालली आहे हे पाहावे या कुतुहलापोटी माझे एक जेष्ठ मित्र प्रा. डॉ. अरविंद वामन कुलकर्णी यांच्या प्रेरणेने आणि सोबतीने मी नासिक भागात एक फेरफटका मारला. तेव्हा सर्व नेते मंडळी अटकेत असल्यामुळे शेतकरी संघटनेच्या तत्त्वज्ञानाशी फारसा परिचय झाला नाही; परंतु इतकी दडपशाही होऊनही अजूनही तुरुंगाबाहेर असलेले अडाणी (?) शेतकरी रस्त्यावर येत होते, त्यानंतर बायकामुलेही घरच्या गुराढोरांसह रस्त्यावर येण्याचा निर्धार करून बसले होते. हे पाहून संघटनेने दिलेला विचार तितकाच मौलिक असला पाहिजे याची खात्री पटली आणि संघटनेबद्दल एक आकर्षण निर्माण झाले.
 पुढे मार्च १९८१ मध्ये निपाणी येथे तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना डॉ. कुळकर्णीबरोबर जाण्याची संधी मिळाली आणि तेथे शेतकरी नेते श्री. शरद जोशी यांची प्रत्यक्ष भेट झाली आणि मग हा परिचय वाढतच राहिला.
 २० सप्टेंबर १९८१ रोजी म्हणजे नासिक विभागातील ऊस-आंदोलन संपल्यानंतर जवळ जवळ वर्षभराने पिंपळगाव-बसवंत येथे शेतकऱ्यांचा एक मेळावा झाला. या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा प्रचार केवळ वर्तमानपत्रांत जाहिराती देऊन केला होता. त्यामुळे दुपारी बारा वाजेपर्यंत श्री. माधवराव मोऱ्यांसारखा निधडा माणूसही किती शेतकरी जमा होतील याबद्दल साशंक होता. पण दुपारी बारानंतरच्या रणरणत्या उन्हात तेथे सतत येत राहिलेला शेतकऱ्यांचा लोंढा आणि त्यांचा उत्साह अवर्णनीय होता.
 जानेवारी १९८२ च्या १।२।३ तारखांना सटाणा येथे शेतकरी संघनेचे पहिले अधिवेशन भरले. या अधिवेशनात पंधरा रुपये प्रतिनिधित्व शुल्क भरून साऱ्या महाराष्ट्रातून तीस हजार शेतकरी स्वखर्चाने आणि आपली आपली शिदोरी बांधून आणून सामील झाले होते. इतका या संघटनेच्या विचारांचा अभ्यास आणि प्रसार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून व्हावा असे वाटू लागले.
 फेब्रुवारी १९८२ मध्ये श्री. शरद जोशी यांनी रायगड जिल्ह्याच्या पेण आणि अलिबाग तालुक्याचा दौरा केला त्यावेळी त्यांनी त्यांच्या अंबाजोगाईच्या कार्यकर्ताप्रशिक्षण- शिबिराच्या ध्वनिमुद्रित कॅसेट्स नकलून काढण्यासाठी माझ्याजवळ दिल्या. त्यातूनच हे पुस्तक निर्माण झाले आहे.
 अंबाजोगाई (बीड) येथे २६ आणि २७ फेब्रुवारी १९८१ असे दोन दिवस मोरेवाडीचे श्री. श्रीरंग मोरे यांच्या साहाय्याने श्री. शरद जोशी यांनी घेतलेल्या या शिबिरास पन्नासेक प्रशिक्षणार्थी कार्यकर्ते हजर होते. ते सर्वच ग्रामीण भागातून आलेले आणि मुख्यतः कोरडवाहू शेतकऱ्यांपैकी असल्यामुळे त्यांच्यात बरेचजण अल्पशिक्षित होते. त्यामुळे या शिबिरात शेतकरी संघटनेच्या विचारांची आणि कार्यपद्धतीची जी चर्चा झाली ती अगदी सोप्या भाषेत आणि सुटसुटीतपणे झाली. या सर्व चर्चेचे शब्दांकित स्वरूप म्हणजेच हे पुस्तक आहे. अर्थात् ही चर्चा केवळ दीड दोन दिवसांतच झाल्यामुळे पुस्तकाला काही मर्यादा आहेत. या पुस्तकाची हस्तलिखित प्रत श्री. शरद जोशींकडून तपासून घेत असताना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवून गेली.
 तरीही जाहीर सभांतून श्री. शरद जोशी किंवा अन्य नेत्यांची भाषणे ऐकून शेतकरी संघटनेचे कार्य करण्याची प्रेरणा मिळालेल्या कार्यकर्त्यांना हे पुस्तक निश्चितपणे उपयुक्त मार्गदर्शन करू शकेल अशी खात्री वाटते. आतापर्यंत शेतकरी संघटनेच्या विचारसरणीबद्दल आणि कार्याबद्दल अनेक नियतकालिकांतून लिहून आलेले आहे पण त्याचा सलगपणे अभ्यास करता येईलच असे नाही. काही ठिकाणीतर संघटनेच्या अतिशयोक्त विपर्यस्त मजकूरही छापून आलेला आहे. त्यादृष्टीने हे पुस्तक संघटनेचे तत्त्वज्ञान अधिक सलग आणि व्यापक स्वरूपात देणारे ठरेल. अर्थात हे पुस्तक १९८१ च्या फेब्रुवारी महिन्यातील शिबिरावर आधारलेले असल्यामुळे यातील उत्पादनखर्च, बाजारभाव वगैरेची आकडेवारी आणि संदर्भ १९८० मधील आहे हे लक्षात घ्यावयास हवे.
 शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गावागावांतून या पुस्तकाचे सामुदायिक वाचन जरी केले तरी शेतकरी संघटनेचे प्रचारकार्य जोमाने पुढे जाईल आणि म्हणूनच या पुस्तकाची किंमत ना नफा ना तोटा या विचाराने अगदी कमी ठेवली आहे. तसेच स्वतः श्री. शरद जोशींनी या पुस्तकाचे सर्व स्वरूपाचे हक्क सर्व जनतेच्या स्वाधीन केले आहेत. अर्थात अपेक्षा अशी आहे की, यातील कोणत्याही भागाच्या पुनर्मुद्रणाच्या बाबतीतील माहिती मुद्रित प्रतींसह त्यांच्याकडे पोहोचावी.
 या पुस्तकाच्या कामात डॉ. अरविंद वामन कुळकर्णी यांचे तसेच माझ्या ज्या इतर अनेक मित्रांचे सहकार्य मिळाले त्यांच्या आणि तपस्या मुद्रणालयाचे श्री. चिंतामण जोशी, मुद्रणालयाचा कामगार वर्ग आणि प्रकाशिका सौ. सुमित्रा अरविंद कुळकर्णी यांच्या ऋणाचा निर्देश न करणे चुकीचे ठरेल.
 श्री. शरद जोशींकडून मिळालेले विचारांचे हे विशुद्ध बियाणे एका दाण्यातून शंभर दाणे काढण्याची शक्ती असलेल्या शेतकरी भावाबहिणींच्या हाती देताना एक विशेष आनंद होत आहे. या पुस्तकाच्या प्रत्येक प्रतिमागे शेतकरी संघटनेचा एक एक कार्यकर्ता जरी तयार झाला तरी श्रमाचे सार्थक झाल्यासारखे होईल.

 अलिबाग २३-११-१९८२

आपला

सुरेशचंद्र म्हात्रे