शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख/गावगाडा विरुद्ध लुटारू





 गावागाडा विरुद्ध लुटारू


 गावगाड्याची मुक्तता

 सुलतान, त्यांचे सरदार, मनसबदार आणि देशमुख एकमेकांशी शेतकऱ्यांना लुटण्याच्या हक्काकरिता लढाया करीत होते. त्याचवेळी गावगाड्यातील बांधणी परंपरागत रीतीने चालून राहिली. गावगाड्याची रचना चार टप्प्यांची होती. राजातर्फे सत्ता बजावणारी, कारभार चालवणारी, हवालदार, कारकून इत्यादी राज्याधिकारी मंडळी यांचा गावातील अंर्तगत कारभारावर फारसा ताबा नसे. ती सत्ता ग्रामाधिकाऱ्यांकडे किंवा चाकरी वतनदारांकडे असे. गावचा पाटील आणि कुलकर्णी हे सारा वसूल करणे, त्याच्या हिशोब ठेवणे, भरणा करणे, न्यायनिवाडा करणे ही कामे बघत व त्याबद्दल त्यांना 'हकलाजिमा' मिळत असे. वतनदारानंतरचा गावातील प्रमुख वर्ग म्हणजे वंशपरंपरेने जमिनीची मालकि उपभोगणाऱ्या शेतकऱ्यांचा कींवा मिरासदारांचा. ज्यांना गावात जमीन नसे त्यांना कसल्याही प्रकारचे सामाजिक अथवा पंचायतीचे हक्क नसत. त्यांना 'उपरे' म्हणत. शेतावर अथवा गावात मोलमजुरी करून अथवा मुदतीने जमीन कसण्यास घेऊन ते उपजीविका करत.उत्पादनातील शेवटचा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे सुतार, लोहार, चांभार, महार, मांग, कुंभार, न्हावी, धोबी, गुरव, जोशी, भट, मुलाणी इत्यादी बलुतेदार. बलुतेदारांना मिरासदारांकडून सुगीच्या काळात तयार झालेल्या धान्याचा काही भाग बलुतं म्हणून दिला जात असे. त्यांना पंचायतीच्या कामकाजात पूर्ण हक्काने भाग घेता येई. थोडक्यात, वतनदार, मिरासदार, बलुतेदार आणि उपरे ही गावगाड्याची प्रमुख चाके होती. याखेरीज धर्मसत्ता, ज्ञातिसत्ता आणि व्यापारी सत्ता स्वतंत्रपणे अस्तित्वात होत्या.

 गावागाड्यातील या वेगवेगळ्या घटकांनी प्रत्यक्ष उत्पादन करावे वा उत्पादनास हातभार लावावा आणि जागोजागी हत्यारी माणसे पदरी बाळगणाऱ्यांनी त्यांच्या मेहनतीचे फळ लुटून न्यावे हे हजारो वर्षे चालले. मुसलमान आल्याने लुटारूंच्या थरात आणखी एक भर पडली. मोकासदार-बलुतेदार उत्पादन करणार, गावापुरते

प्रशासन चालविण्यासाठी पाटील कुलकर्णीसारखे चाकरी वतनदार त्याला थोडी चोच लावणार व गावाबाहेरील वतनदार जहागीरदार, सरदार आणि प्रदेशातील राजांची शासनसत्ता त्यावर हात मारणार अशी महाराष्ट्रातील परिस्थिती होती. सुलतानापर्यंत दोनशे रुपये पोहोचण्याकरता शेतकऱ्याकडून हजारावर रुपये वसूल होत. अंदाधुंदीच्या काळात संरजामशाही अवस्थेत या मधल्या बांडगुळांचे चांगलेच फावले.

 राजे मुरार पंत, शहाजी यासारख्या दरबारातील बड्या प्रस्थांनी बदल घडवून आणायचा प्रयत्न केला तो सरदारांच्या पातळीवर. सरदारांच्या आघाड्या बांधून राजसत्तेत म्हणजे सुलतानाच्या सत्तेत बदल घडवून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

 शिवाजीराजांनी वापरलेली वेगळी रणनीती

 गावागाड्यातील सर्व थराची माणसे एकत्र करणे हा त्याच्या रणनीतीचा पाया होता. गावगाड्यातील पुंड आणि नाठाळ पाटील मंडळींवर त्याने कठोरपणे जरब बसवली. याची अनेक उदाहरणे वर दिलेली आहेतच.

 'मातबर चहू जागचे मराठे यांसी आप्तपणा करावा; पत्रे लिहावी; त्यास आणून भेट घ्यावी, आपण त्यांजकडे जाऊन आम्हांस अनुकूल असावे असे बोलावे.' या धोरणाने गावोगावची निवडक मंडळी त्याने आपलीशी करून घेतली.

 याखेरीज 'मावळे, देशमुख बांधून दस्त करून पुंड होते त्यास मारिले.' बारा मावळांतून अनेक सवंगडी शिवाजीराजास लाभले. नारायण, चिमणाची, बाळाजी मुदगल देशपांडे, तानाजी व सूर्याजी मालुसरे, भिकोजी चोर, सूर्यराव काकडे, बाजी जेधे, त्र्यंबक सोनदेव, दादाजी नरसप्रभू गुप्ते ही त्यांची मित्र मंडळी खरी, पण राजावर त्यांची निष्ठा इतकि की त्याच्या शब्दाखातर प्राण टाकण्यास त्यांनी हयगय केली नसती. पण ही सगळी मंडळी गावगाड्यातली. गावगाड्याबाहेरील कोणीही मंडळी स्वराज्याच्या कामात सहभागी होण्यास राजीखुशीने तयार नव्हती. कान्होजी नाईक जेधे आणि त्यांचे पाहुणे मोसे खोऱ्याचे बाजी पासलकर हे दोघेच काय ते अपवाद. कृष्णाजी बांदलाची पुंडाई मोडून काढल्यानंतर बारा मावळांतील देशमुख मंडळी हळूहळू दादोजी कोंडदेव व शिवाजी राजाकडे रुजू होऊ लागली. कानंद खोऱ्यातील मरळ खेडेबाऱ्याचे कोंडे, मुठे खोऱ्यातील पायगुडे, कर्यात मावळचे शितोळे, रोहिडे खोऱ्यातील जेधे, खोपडे तसेच गुंजण मावळचे शिळमकर ही सारी देशमुख मंडळी स्वराज्याला जोडली गेली. पण मावळाबाहेरच्या देशमुख सरदारांपैकी सर्वांशी शिवाजीस संघर्षच करावा लागला.

 ऐतिहासिक दाखल्यांवरून असे दिसून येते की, शिवाजी व त्याचे सहकारी हे

स्वराज्याची उभारणी करताना त्यांना जास्तीत जास्त त्रास दिला, मनस्ताप दिला, तो स्वकियांनीच. अगदी रक्ताच्या नात्याच्या आणि जवळच्या लोकांनीसुद्धा हयगय केली नाही. राजाला स्वराज्यरचनेच्या कामी परकियांविरुद्ध जितके जास्त वेळा लढावे लागले त्यापेक्षा जास्त वेळा त्यांना स्वकियांविरुद्ध हत्यार उपसावे लागले. स्वकियांनी आपले राज्य, स्वराज्य असावे या भावनेपेक्षा आदिलशहाच्या दरबारात निजामशहाकडे किंवा दिल्लीश्वराच्या मोगल तख्तातील एखादी मनसब, जहागिरी, वतनदारी, देशमुखी आपल्याला मिळाली पाहिजे या एका आकांक्षेपोटी स्वराज्याशी सतत बेईमानी केली. सनदांच्या तुकड्यासाठी स्वजनांचा विरोध अन् परकियांपुढे लाचारी व लांगूलचालन केले. स्वकीयांच्या, आप्तांच्या, स्वजातिधर्माच्या या लोकांमुळे राजाचे उभे आयुष्य स्वराज्याची उभारणी करीत असताना स्वकियांशी लढून त्यांच्या बंदोबस्त करण्यातच गेले. यासाठी प्रसंगी त्याला अतिशय कठोर व्हावे लागले. त्यातून त्याचे मामा, सुपे परगण्याचे वतनदार संभाजीमामा मोहिते हेसुद्धा सुटले नाहीत. सुपे परगणा शहाजीराजांची जहागिरी होती. ती राजांनी व्यवस्थेसाठी संभाजी मामा मोहितेकडे सोपविली होती. संभाजी मोहिते सुप्याच्या गढीवरूनच जहागिरीचा कारभार चालवत. चिमाजी गुंडो कुलकर्णी नावाच्या माणसाचे वतन विसाजी व रामजी पणदरकर नावाच्या भावांना दांडगाईने, अन्याय्यमार्गाने मिळवून देण्याकरिता विसाजी व रामजी यांनी या मोहितेमामांना एक घोडी व १५७/- रुपये लाच दिली होती. मोहितेमामांनी चिमाजी गुंडो कुलकर्णी हा आपले वतन आपण सांगेल तसे बदलून देत नाही म्हणून त्यास तीन महिने तुरुंगात डांबून ठेवले. तुरुंगात छळ करून जबरदस्तीने वतनाची सोडचिठ्ठी लिहून घेतली. चिमाजी सुटकेनंतर सरळ गेला तो कर्नाटकात शहाजीराजांकडे. शहाजीराजांनी राजाच्या नावाने पत्र लिहून चिमाजीच्या फिर्यादीची चौकशी व्हावी असे लिहिले. पण शहाजीराजांचे हे पत्र येण्याआधीच शिवाजी आपल्या निवडक सहकाऱ्यांना घेऊन सुप्यास पोहोचला होता. राजाने मामांना सरळे सांगितले, "सुपे ठाणे परगणा आमच्या स्वाधीन करा." मामांनी साफ इन्कार केला. "आमचे मालक शहाजीराजे. आपण कोण हुकूम करणार?" आपल्या मामाचा बेत सुभ्याचा ताबा देण्याचा नाही असे दिसताच राजाने मावळ्यांना हुकूम केला आणि मामा कैद झाले. सुप्याच्या गढीचा ताबा घेतला (२४ सप्टेंबर १६५६).

 जावळीचे चंद्रराव मोरे असेच. चंद्रराव मोऱ्यांकडे दहा बारा हजार फौज होती. महाबळेश्वरापासून महाडपर्यंतचा डोंगर भाग व बव्हंशी सातारा जिल्हा त्यांच्या ताब्यात होता. जावळीसारख्या मोक्याच्या भागावरील सत्तेमुळे जावळीचे मोरे वाईचा

उभा पश्चिम किनारा व काही भाग यावर हुकमत गाजवत. कोकण व घाटमाथ्यावरील रस्ते मोऱ्यांच्याच ताब्यात होते. १६२७ साली माणकाईने दत्तक घेतलेले कृष्णाजी बाजी निपुत्रिक वारले. चंद्ररावास राजाने जावळीच्या सिंहासनावर बसविले. हिंदवी स्वराज्य स्थापनेत त्यांच्याकडून सहकार्य मिळेल या अपेक्षेने. मावळे संघटित करून स्वराज्याच्या झेंड्याखाली एकत्र आणण्याचे काम सुरू असतानाच मोऱ्यांच्या जावळीच्या सत्तेला नकळत धोका उत्पन्न झाला. यामुळे चंद्रराव मोऱ्यांनी राजाशी सरळ संघर्ष आरंभिला. जावळीच्या गादीवर बसविण्याचे वेळी राजाचे उपकार विसरून चंद्रराव मोऱ्याने इमान जाहीर केले ते विजापूरच्या आदिलशहाशी. बाजी पाटील व मालोजी पाटील यांच्याकडील बिरवाडी व काही गावांचे अधिकार चंद्ररावांनी त्यांना हुसकावून आपल्या ताब्यात घेतले. दुर्बळ पाटील राजाकडे आले. राजाने पाटलांची त्यांच्या वतनावर पुनर्स्थापना केली. त्यामुळे चंद्रराव मोरे चिडला तर नवल नाही. चंद्रराव मोरे दिवसेंदिवस शिरजोर होऊन स्वराज्यावर आक्रमण करू लागला. चिखलीचे रामजी वाडकर यांचे व चंद्ररावाचे वैर. चंद्ररावांनी त्यास ठार मारले. रामजीचा पुत्र लुमाजी हा स्वराज्यातील रोहिड खोऱ्यातील पळसोसी या गावी जीव लपवून बसला. चंद्रराच मोरे पाठलाग करीत रोहिडखोऱ्यावर स्वारी करून आला. व स्वराज्याच्या हद्दीतील रोहिडखोऱ्यात त्याने लुमाजीस ठार मारले. गुंजण मावळची देशमुखी शिळीमकरांकडे. पण चंद्रराव मोऱ्यांनी या गुंजण मावळच्या देशमुखीवर आपला हक्क सांगण्यास सुरूवात केली. राजाने शिळीमकरांनी बाजू उचलून धरली. शिळीमकर शिवाजीच्या बाजूला जाऊन मिळालेले पाहून चंद्ररावांनी 'शिवाजी तुमची जहागिरी बळकावील' अशी शंका शिळीमकराच्या मनात निर्माण करण्यास सुरूवात केली. चंद्रराव हे शिळीमकराचे मामा. शिवाजीला हे वृत्त कळताच त्याने शिळीमकरांना अभयपत्र पाठविले आणि 'लोक काही सांगत असतील तरी त्यावर विश्वास न ठेवता आपण कोणत्याही गोष्टीची चिंता करू नये' असे कळविले. त्याचवेळी मोऱ्यांना मात्र जबरेचे पत्र पाठविले. त्या पत्रात राजा लिहितो.

 "तुम्ही मुस्तफद राजे म्हणविता. राजे आम्ही. आम्हा श्री शंभूने राज्य दिधले आहे, तर तुम्ही राजे न म्हणावे. आमचे नौकर होऊन आपला मुलूक खाऊन, हामराह चाकरी करावी नाही तर बदफैल करून फंद कराल, तर जावली मारून तुम्हांस कैद करून ठेवू."

 उत्तरादाखल चंद्ररावाने शिवाजीराजास उद्धटपणे लिहिले की, "तुम्ही काल राजे जाहला, तुम्हांस राज्य कोणे दिधले? मुस्तफद राजा आपले घरी म्हटलीयावर

कोण मानितो? येता जावली, जाता गोवली. पुढे एक मनुष्य जिवंत जाणार नाही. तुम्हामध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक याल तर आजच यावे-आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा श्रीमहाबळेश्वर, त्याचे कृपेने राज्य करितो. आम्हा श्रीचे कृपेने, बादशहाने राजे किताब, मोरचेल. सिंहासन मेहेरबान होऊन दिधले. आम्ही दाईमदारी दर पिढी राज्य जावलीचे करितो. तुम्ही आम्हांसी खटखट कराल तर स्पष्ट समजून करणे. आणखी वरकड मुलूख तुम्हांस आहे. येथे उपाय कराल तर तो अपाय होईल. यश न घेता अपयशास पात्र होऊन जाल."

 संतप्त झालेल्या राजाने मोऱ्यांना अखेरचे पत्र पाठविले,

 "जावली खाली करून, राजे न म्हणोन, मोरचेल दूर करून, हात रुमाले बांधून, भेटीस येऊन हुजूरची काही चाकरी करणे. इतकियावर बदफैली केलीया मारले जाल."

 अखेर राजाने जावळीवर स्वारी केली. महिनाभर लढाई चालली. युक्तद्द करून मोऱ्यांनी खूद रायगडच काबीज केला. रायगड परत हाती येण्यासाठी राजाला तीन महिने लागले. अखेर १५ जानेवारी १६५६ ला त्याने जावळी ताब्यात घेतली. चंद्ररराव मोरे बायकांमुलांसह जीव घेऊन रायरीला किल्ल्यावर लपून बसला. राजाने रायरी कील्ला ताब्यात घेतला. पण चंद्रराव मोऱ्यांना मदत केली ती त्यांचे भाचे बालाजी नाईक व हैबतराव शिळीमकर यांनी. चंद्रराव मोरे यांचे सर्व गुन्हे पोटात घालून मोजकी शिबंदी ठेवून जावळीचे वैभव भोगावे हे समजावण्यासाठी राजाने मोऱ्यांना चाकणला आणले. मोरे राजाच्या कैदेत होते. वरकरणी चंद्ररावाने राजाचा सल्ला आपण मानतो आहेत असे दाखविले. पण चंद्रराव मोऱ्याने सुटकेसाठी मुघोळकर घोरपड्यांना गुप्त पत्रे लिहिली होती. या फितुरी संबंधीचे कागद राजाच्या हाती पडले. तेव्हा मोरे बेईमान आहे म्हणून चाकण येथे त्याची गर्दन मारली आणि जावळी स्वराज्यात सामील झाली.

 मोऱ्याप्रमाणेच घोरपडे हेही त्या काळातील एक मातब्बर वतनदार होते. घोरपडे हे खरे तर भोसल्यांचे सख्खे भाऊबंदच. परंतु भोसल्यांचा त्यांनी आयुष्यभर द्वेषच केला. मानी शहाजी महाराजांविरुद्ध आयुष्यभर विजापूरच्या दरबारात तक्रारी केल्या. तक्रारीसुद्धा अशा की, शहाजीराजे हे दक्षिण भारतातील ऐतद्देशीय राजांशी सहानुभूतीने वागतात या स्वरूपाच्या. शहाजीराजांविरुद्ध विजापूर दरबाराचे मत कलुषित करण्यात आणि शहाजी राजांना गफलतीत, बेसावध असताना कैद करण्यात बाजी घोरपड्यांनी पुढाकार घेतला. घोरपड्यांचे वतन तसे शिवाजीच्या स्वराज्यापासून खूप दूर. मुघोळ आणि कुडाळ या परिसरात. कर्नाटक तळ कोकणात.

राजाने ज्यावेळी तळ कोकणावर स्वारी केली तेव्हा सिद्दी खवासखान यास विजापूर दरबाराने शिवाजीशी लढायला पाठविले. खवासखानाच्या सैन्यात घोरपड्यांनी दाखल व्हावे असा विजापूर दरबाराचा हुकूम होता. घोरपडे सैन्यासह मदतीस येण्याआधीच राजाने त्यांच्या जहागिरीवर छापा घातला आणि स्वत: घोरपड्यास ठार केले.

 जावळीजवळील हिरडसचा देशमुख असाच शिरजोर झाला होता. त्याच्या ताब्यात रोहिडा नावाचा मजबूत कील्ला होता. त्यावर राजाने एकाएकि हल्ला करून तो हस्तगत केला आणि लढाईत देशमुख मारला गेला.

 राजावर वेळोवेळी चाल करून येणाऱ्या विजापूरच्या सैन्यात तर अगणित मराठे सरदार असायचेच. केवळ दरबारात मनसबदारी मिळावी, वतन मिळावे, शेतकऱ्यांना आणि येथील मुलखाला लुटून सजवलेल्या दरबारी श्रीमंतीत आपला वाटा असावा या पलीकडे त्यांची दृष्टी नव्हती. सर्जेराव घाडगे, घोरपडे हे रुस्तुमेज खानाबरोबर राजावर चालून आले तर वाडीकर, सावंत भोसले आणि शिवाजीचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे हे खवासखानाबरोबर राजावर चालून आले. सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव पालीकर हे कोकणातील सरदार सिद्दी जोहारच्या पन्हाळ्याच्या वेढ्यातून राजा निसटलाच आणि विशाळगडाकडे आला तर त्याला रोखण्यासाठी, पकडण्यासाठी विशाळगडाच्या पायथ्याशी दबा धरून बसले होते. एकिकडे मावळातील ३०० शेतकरी, धारकरी शिवाजीचे प्राण वाचावे, स्वराज्याचे अस्तित्व राहावे म्हणून मरणाची खात्री असताना पावनखिंडीत उभे होते. तर सूर्यराव आणि जसवंतराव स्वराज्याचे अस्तित्व मोडण्यासाठी विशाळगडच्या पायथ्याशी उभे होते. विशाळगडावरून स्वराज्यात परत आल्यानंतर काही दिवसांतच १६६० मध्ये राजा सूर्याजीराव सुर्व्याच्या शृंगारपुरावर चालून गेला. संगमेश्वर परिसर ही सुर्व्याची जहागिरी ताब्यात घेतली. सूर्यराव सुर्वे यांनी जरी अपराध केला असला तरी आपल्या स्वराज्याच्या कार्यात शिवाजीने त्यांना सामावून घेतले. तेथून पुढे राजा जसवंतरावावर चालून गेला. जाताना संगमेश्वराजवळ तानाजी मालुसरे व पिलाजी सरनाईक यांना व्यवस्थेसाठी ठेवून गेला. नव्यानेच ताब्यात घेतलेल्या या जहागिरीतील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम त्याने तानाजीला सांगितले होते. सुर्व्यानी गद्दारी करून रात्रीच्या वेळी तानाजीच्या सैन्यावर हल्ला केला. यानंतर मात्र सुर्व्याकडे राजाने शृंगारपूरचे वतनसुद्धा ठेवले नाही. सर्व मुलूख खालसा केला. त्याचबरोबरीने बरीच लहान मोठी वतनेही बंद करून टाकली.

 ऐन लढाईच्या वेळेला पूर्ण स्वराज्यावर संकट उद्भवले असतानासुद्धा एतद्देशीय

आणि मराठेसुद्धा शिवाजीच्या बाजूने उभे राहिले नाहीत. खेळोजी भोसल्यांचे उदाहरण फार महत्त्वाचे आहे. मिर्झा राजांनी आमिष दाखवून काही सरदार फोडण्याचा प्रयत्न सुरू केला. जावळीचे खेळोजी भोसले ५०० पायदळासह मिर्झा राजेंना फितूर झाले. पण राजाचे जवळचे सहकारी कान्होजी नाईक हे खंडोजी खोपड्यांना क्षमा करावी म्हणून शिवाजीकडे आले. कान्होजी नाईकांनी खूप रदबदली केली. खंडोजी खोपड्यांना जिवानिशी मारणार नाही असे वचन राजाने त्या कान्होजीना दिले. पण खंडोजीच्या दगलबाजीचा संताप त्याच्या मनातून यत्किंचितही कमी झाला नव्हता. राजाने खंडोजीचा उजवा हात आणि डावा पाय कलम केला. ज्या पायाने चालत गेला तो पाय आणि ज्या हाताने फितुरी केली तो हात त्यांनी निष्ठुरतेने कलम केला. त्याचवेळी कान्होजी नाईकांना जिवानिशी ठार मारणार नाही हे दिलेले वचनही पाळले.

 स्वराज्याविरुद्ध असलेल्या वतनदारांविरुद्ध राजाला नेहमीच संघर्ष करावा लागला. पण त्यावेळी राजाचा द्वेष करणारे लोक किती खालच्या थराला गेले होते याचे उदाहरण म्हणून तुळजाभवानीचे मंदिर अफझलखानाने तोडले त्यावेळी दिसून येते. अफझलखानाबरोबर पिलाजी मोहिते, शंकरजी मोहिते, कल्याणकर यादव, नाईकजी सराटे, नागोजी पांढरे, प्रतापराव मोरे, झुंजारराव घाटगे, काटे, बाजी घोरपडे आणि प्रत्यक्ष राजाचे चुलते संभाजीराव भोसले हे उपस्थित होते. शाइस्तेखान स्वराज्यावर चालून आला. त्याच्याबरोबर औरंगजेबाचे उत्तरेतील इतर हिंदू सरदार असणे हे स्वाभाविकच आहे, पण महाराष्ट्रातील सुखाजी गायकवाड, दिनकरराव काकडे, रंभाजीराव पवार, सर्जेराव घाटगे, कमलोजीराव काकडे, जसवंतराव काकडे, त्र्यंबकराव खंडागळे, कनकोजीराव गाडे, अंताजीराव खंडागळे आणि दत्ताजीराव खंडागळे, हे मराठे सरदारसुद्धा होते. आणि यापेक्षा भयानक गोष्ट म्हणजे त्र्यंबकरावजी भोसले, जिवाजीराव भोसले, बालाजी राजे भोसले, परसोजी भोसले ही मंडळी शिवाजीच्या रक्ताची, नात्याची अगदी सख्खे चुलत-चुलत असेच नातलग होते. यापेक्षा शाइस्तेखानाच्या सरदारांत सिंदखेडचे दत्ताजी राजे जाधव आणि रुस्तुमराव जाधव ही जिजाऊंच्या माहेरची मंडळी स्वराज्याचा नाश करण्यासाठी सर्वस्व पणाला लावून उतरली होती. पुण्याची देशमुखी आपल्याला मिळावी एवढ्या अपेक्षेवर लोणीचे कृष्णाजी काळभोर खानाला सामील झाले. खानाने शितोळ्याची देशमुखी जप्त करून काळभोरांना दिली होती. बाळाजीराव होनप हे पुण्याच्या राजाच्या लाल महालाच्या शेजारीच राहात. शिवाजीचे बालपण हे कदाचित बाळाजींच्या अंगाखांद्यावर, मांडीवर गेलेले असेल. स्वराज्याच्या छत्र-

छायेत आणि सावलीत राहूनही बाळाजी होनप देशपांडे याना शिवाजीराजापेक्षाही शाइस्तेखान जवळचा वाटला. असे हे एतद्देशीय !

 तत्कालीन राजकिय परिस्थितीनुसार वतनदार आणि देशमुख यांचे राज्य चालत असे. आपल्या वतनातील गावांचा महसूल गोळा करायचा आणि पदरी सैन्य ठेवायचे ते महसूल गोळा करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी, आपल्या वतनाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यासाठी. पण हे स्वतंत्र अस्तित्व कोठल्या तरी वतनदाराची बांधीलकि राखत असे. त्यामुळे हे वतनदार आणि देशमुख फार शिरजोर झाले होते. राजाने त्यांचा फौजफाटा बाळगण्याचा अधिकारही काढून घेऊन त्यांना ताब्यात आणले आणि सैन्य बाळगण्याचा अधिकार हा पहिल्यांदाच स्वराज्याकडे घेतला. सैन्य स्वराज्याचे, घोड्यांच्या पागा स्वराज्याच्या, हत्यारे स्वराज्याची ही कल्पनाच सबंध इतिहासात पहिल्यांदा आली.

 राजाला ज्या स्वकियांविरुद्ध लढावे लागले, आपल्याच माणसांविरुद्ध हत्यार उपसावे लागले याची काही निवडक आणि फक्त ठळक उदाहरणे वर दिली आहेत.

 याशिवाय राजाच्या चरित्रामध्ये अशी अगणित उदाहरणे स्वकियांविरुद्ध लढावे लागण्याची देता येतील. स्वराज्याच्या निर्मितीसाठी त्याला आपल्याच माणसाविरुद्ध लढावे लागले हे केवढे दुर्दैव!

 इ.स.१६४८ च्या सुमारास विजापूरच्या नोकरीतील पाचसातशे पठाण शिवाजीकडे चाकरीस राहण्यास आले. गोमाजी नाईक पानसंबळ यांनी स्पष्ट सल्ला दिला,

 "तुमचा लौकीक ऐकून हे लोक आले आहेत त्यांस विन्मुख जाऊ देणे योग्य नाही. हिंदूंचाच संग्रह करू, इतरांची दरकार ठेवणार नाही अशी कल्पना धरली, तर राज्य प्राप्त होणार नाही. ज्यास राज्य करणे त्याने अठरा वर्ण, चारही जाती यांस आपापले धर्माप्रमाणे चालवून त्यांचा संग्रह करून ठेवावे."

 शिवाजीने हा सल्ला मानला आणि गोमाजी नाईकास निसबतीस ठेवून घेतले.

 या पार्श्वभूमीवर स्वराज्याच्या निर्मितीसाठी परधर्मीयांनी शिवाजीला केलेली मदत किंवा अगदी जीवघेण्या प्रसंगातसुद्धा ज्या खंबीरतेने ते त्याच्या पाठीशी उभे राहिले त्याचा उल्लेख राजाच्या सबंध कर्तुत्वाचा उच्चांक गाठणारा ठरावा. खवासखानाची मोहीम मोडून काढल्यानंतर राजे कुडाळवर चालून गेला. कुडाळचे लखम सावंत १२ हजार हशमांसह ठाण मांडून बसले होते. राजाने त्यांचा दारुण पराभव केला आणि सावंताला तोंड लपवून पोर्तुगीजांच्या आश्रयाला पळून जावे लागले. याचवेळी "फोंडा" या आदिलशहाच्या बळकट किल्ल्याला शिवाजीने

वेढा घातला. महाबतखान या आदिलशहाच्या सरदाराने कील्ला शर्थीने लढविला. पण यात त्याचा पराभव झाला. राजाने मात्र महाबतखनास अभय देऊन त्याच्या इच्छेनुसार विजापुरी जाण्यास परवानगी दिली.पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, या लढाईत राजाच्या लष्करातील हजाऱ्या इब्राहीम याने फार मोठा पराक्रम गाजविला. स्वराज्याचा पहिला सेनापती म्हणून नेताजी पालकर याचे नाव सहजच जिभेवर येते. पण पायदळचा पहिला सरनोबत हा नूरखान बेग होता याची नोंद घेणे अत्यंत आवश्यक आहे. अफजलखानाच्या वधाचा प्रसंग थरारकच. शिवाजीने आपला जीव धोक्यात घातला होता. कोठल्याही क्षणी जिवास दगाफटका होण्याची शक्यता असतानासुद्धा शिवाजीच्या जिवाचे रक्षण करण्यासाठी जे अत्यंत विश्वासातील १० लोक शिवाजीबरोबर होते त्यात सिद्दी इब्राहीम हा मुसलमान त्यांच्या अगदी जवळ होता. अफजलखानाच्या वधानंतरचा सर्व नाट्यपूर्ण रोमांचकारी प्रसंग डोळ्यांपुढे आणला असता अफजलखानासकट त्यांच्याबरोबर आलेले वकिल कृष्णाजी भास्कर यांच्यासह दहा लोक ठार मारले गेले. आणि शिवाजी व त्याचे सर्व सहकारी सुरक्षितपणे प्रतापगडावर परत आले ही इतिहासातील नोंद टाळता येणार नाही. आग्र्याच्या तुरुंगातून राजे सुटेल की नाही अशा चिंतेत स्वराज्य होते, स्वराज्यावर संकट होते. औरंगजेबसारख्या करड्या, धर्मवेड्या मोगल सम्राटाच्या तावडीतून सहिसलामत सुटून बाहेर येणे म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेतून परत येणे होय. ही घटना खरेच अतुलनीय आहे. पण अशा प्रसंगी जी जिवाभावाची माणसे प्राणाची बाजी लावून उभी राहतात त्यात त्यांचा धर्म, जातपात काही शिल्लक राहत नाही. राजे औरंगजेबाच्या कैदेतून बाहेर तर पडला खरा, पण बराच काळ तो तेथेच आहे हे नाटक वठवून मोगली पहारेदारांना गाफद्दल ठेवण्याचे काम हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर यांनी केले. मदारी मेहतर हा मुसलमान. परंतु नात्यागोत्याचा, रक्ताचा तर सोडाच पण तेथे धर्माचासुद्धा राजाशी त्याचा संबंध नव्हता. त्याचे इमान होते ते शिवाजीराजाच्या पायाशी, स्वराज्याच्या सिंहासनाशी.

 पन्हाळगडावर विजापूरकरांचा सरदार सिद्दी जोहर वेढा घालून बसला होता. वेढा पडून तीन महिने झाले. राजाच्या सुटकेचे काही चिन्ह दिसेना. त्याचा सेनापती नेताजी पालकर याच्या फौजेत सिद्दी हिलाल व त्याच्या तरुण मुलगा सिद्दी वाहवाह हे होते. अफजलखानाच्या वधानंतर सतत सात महिने नेताजी पालकरचे सैन्य स्वराज्याच्या सीमा रुंदावत दौडत होते. प्रचंड थकवा, ताण असतानासुद्धा.पण राजाची सुटका करण्याच्या एकमेव हेतूने नेताजी पालकराने सिद्दी जौहरच्या फौजेवर हल्ला केला. या लढाईत नेताजी पालकराला यश मिळाले नाही, पण सिद्दी हिलालचा

मुलगा वाहवाह हा मात्र कामी आला. शिवाजीबरोबर सजातीय झगडत असताना, परधर्मीयांनी गाजविलेल्या पराक्रमाची याशिवाय अनेक अगणित नोंद न झालेले, स्वराज्याच्या पायांतील दगड असतील, पण मुद्दा महत्त्वाचा येतो तो हा की, आज राजाच्या नावाचा, धर्माचा, जातीचा वारसा सांगणाऱ्यांनी एकदा तरी अंतर्मुख होऊन विचार करावा. खरोखरीज आपणास राजाच्या रक्ताचा, जातीचा, धर्माचा वारसा सांगण्याचा काडीइतका तरी अधिकार आहे काय? हा पराक्रम गाजविणाऱ्यांची घेतलेली इतिहासातील ही नोंद पूर्ण असेलच असे नाही. राजाच्या नौदलाचे अधिकारी इब्राहीमखान, दौलतखान होते आणि त्यांच्या भरवशावर आणि विश्वासावरच राजाने आपले आरमान उभे केले होते. राजाला परधर्मीयांनी दिलेली ही साथ स्वराज्याच्या निर्मितीत फार मोलाची ठरली.

 शिवाजी महाराजांचा धार्मिक दृष्टिकोन

 राजाचा स्वत:चा धार्मिक दृष्टिकोन हा अतिशय उदार होता. राजाने उभ्या हयातीत कधीही ती फक्त हिंदुचाच राजा आहे अशी भावना ठेवलेली ऐतिहासिक कागदपत्रात कोठेही दिसत नाही. किंबहुना राजा हा खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राजा होता. नि:संशय त्याला स्वत:ला हिंदू धर्माचा जाज्वल्य अभिमान होता. स्वाऱ्यांवर मोहिमांवर असतानासुद्धा तो आपल्याबरोबर एक स्फटिकाचे शिवलिंग बाळगी. शिवलिंगाची पूजा तो नेमाने करी. त्याचे कुलदैवत शंभू महादेव होते. राजा स्वत: हे राज्य आम्हास शिवशंभूने दिले आहे असे मानत असल्याचा उल्लेख कागदपत्रांमध्ये आहे. शिवशंभू हे त्यांचे कुलदैवत. सामर्थ्य आणि शक्तद्दचे दैवत म्हणून तो तुळजाभवानीचाही उपासक होता. परंतु आपल्या धर्मभावनेचा जाच परधर्मीयांना होऊ देत नसे. पुण्याची नवी उभारणी करीत असताना पुण्यातील कसबा गणपतीच्या स्थापनेबरोबरच पुण्याच्या तांबड्या जोगेश्वरीची स्थापना झाली. त्याप्रमाणे पुण्यातील दर्यांची व मशिदींची व्यवस्था पूर्ववत चालू करण्यात आली. काझी मुजावर किंवा परधर्मीय सेवेकऱ्यांना लहानमोठे उत्पन्नाचे साधन करून देण्यात आले. मता नायकीण या मुसलमान कलावंतीणीस शहाजीराजांनी अर्धाचावर जमीन इमान दिली होती. नंतर मातोश्री जिजाऊ आणि दादोजी कोंडदेव जहागिरीदारीचा कारभार पहायला लागल्यांनतरही हे इमान तसेच चालू ठेवण्यात आले होते.

 राजाच्या फौजांमध्ये आणि मुलकी अधिकाऱ्यांमध्ये सर्व जातीधर्माचे लोक होते. आपल्या प्रजेला ज्या ज्या देवस्थानाबद्दल, प्रार्थनास्थळाबद्दल, साधू संत, तसेच फकिरांबद्दल आदर वाटत होता व प्रेम वाटत होते त्या सर्वाबद्दल राजाने स्वराज्यात आदरच दाखविलेला आहे.

 राजाच्या धार्मिक उदारतेची प्रशंसा करताना खाफीखान हा शत्रूपक्षीय इतिहासकार, औरंगजेबाचा चरित्रकर्ता लिहितो, "शिवाजीने आपल्या सैनिकांकरिता असे सक्त नियम घालून दिले होते की, सैनिक ज्या ठिकाणी लुटालूट करण्यासाठी जातील तेथे त्यांनी मशिदी, कुराणग्रंथ किंवा कोणत्याही स्त्रीस त्रास देऊ नये. जर एखादा कुराणाचा ग्रंथ त्याच्या (शिवाजी) हाती आला तर त्याबद्दल पूज्य भाव दाखवून तो (शिवाजी) हाती आपल्या मुसलमान नोकराच्या स्वाधीन करीत असे."

 राजाचा असा गौरवपूर्ण उल्लेख औरंगाजेबाच्या चरित्रकारास करावा लागतो. कारण त्याने परधर्मीयांबद्दल दाखविलेली आत्मीयतेची भावना. राजाने आज्ञापत्रे देत असताना मौजे कारी तालुका इंदापूरच्या काझी सैतला खिजमती मशिदीच्या व्यवस्थेबद्दल इनामपत्र दिले आहे. (२५ ऑक्टोबर १६४६) म्हणजे वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षीच राजाने परधर्मीयांकडे बघण्याचा हा दृष्टिकोन स्वीकारला होता हे या पत्रावरून दिसून येते. १६४७ मधील पत्रात भांबुर्डे येथील मुल्लाअली, मुल्ला अब्दुला यांच्या मशिदीच्या दैनंदिन खर्चासाठी भांबुर्डे येथे जमिन इनाम दिलेली आहे. २० नोव्हेंबर १६५३ रोजी इंदापूर येथील मशिदीच्या व्यवस्थेसाठी १ चावर जमीन व तेल स्वराज्याच्या खजिन्यातून देण्यात आले आहे. १६५६ च्या एका पत्रात मशिदीमध्ये खुद्बा वाचणारा काझी इब्राहीम व शरिफ यास त्याच्या वडिलांपासून चालत आलेले इनाम मलिक अंबर खुर्दखत वजिराच्या कारकिर्दीपासून चालत आले होते. हे इनाम मुरारपंतांच्या स्वारीच्या वेळी तुटले. सदर इनाम राजाने पुन्हा सुरू केले. एवढेच नव्हे तर फुरसुंगी येथील मशिदीच्या व्यवस्थेत मुकादम चांदखान हा ढवळाढवळ करतो अशी मशिदीचा काझी कासिम याची तक्रार होती. राजाने आपल्या हवालदारामार्फत चांदखानास ताकिद देऊन अशा पद्धतीने ढवळाढवळ होऊ न देण्याबद्दल फार कठोरपणे बजावले आहे. राजा परधर्मीयांच्या देवस्थानबद्दल कसे वागत याचा हा महत्त्वाचा धावता उल्लेख आहे. राजाचे हिंदू धर्मावर नितांत प्रेम होते याबद्दल शंका असण्याचे कारण नाही. पण दर्गा, मशिदी आणि प्रार्थनास्थळे यांचासुद्धा तो तितकाच आदर करीत असे.

 सुरत लुटीच्यावेळी दि. ६ जानेवारी १६६४ ला सायंकाळी रेव्हरंड फादर ॲम्ब्रॉस हा ख्रिश्चन मठाधिपती राजाला भेटायला आला होता. सुरतेतील गरीब ख्रिश्चनांच्या रक्षणाबद्दल तसेच सैन्याच्या हिंसेला बळी पडावे लागू नये अशी विनंती त्याने राजाला केली. राजाने त्याला सर्वतोपरी अभय दिले. सुरतेच्या प्रचंड लुटालुटीत आणि जाळपोळीत ॲम्ब्रॉसच्या मठाला केसाइतकासुद्धा धक्का लागला नाही.

सुरतेच्या लुटीत मठालाच नव्हे तर कोणत्याही प्रार्थनास्थळाला स्वराज्याच्या सेनेने धक्का लावला नाही. इग्रंजांनी नेहमीच्या हुशारीप्रमाणे आपल्या वखारीच्या रक्षणासाठी एक मशीद व एक मंदिर आपल्या ताब्यात घेतले. ते बिधास्तपणे आणि अगदी सुरक्षितपणे तेथे राहिले. राजाच्या कोणत्याही सैनिकाने तेथे प्रवेश केला नाही किंवा काडीचाही त्रास दिला नाही. डचांचा एक हेर सुरतेच फिरून आला. प्रत्यक्ष शिवाजीची छावणीसुद्धा न्याहाळून आला. तरी त्याला कोणी हटकले नाही. कारण त्याने फकिराचा वेश धारण केला होता.

 स्वराज्यावर आक्रमण करणारे कींवा चालून येणारे सुभेदार व सरदार कसे वागत याचाही विचार केला तर शिवाजीचा हा परधर्मीयाबद्दलचा धार्मिक उदारतेचा दृष्टिकोन त्या काळात अद्भुतच वाटतो. अफजलखान विजापूरहून निघाला तो मंदिर आणि हिंदूंची देवस्थाने फोडतच. तो स्वत:ला बिरुदे लावताना "कातिले मुतमीरंदाने व काफिरान। शिकंदर बुनियादे बुतान ॥" असे संबोधतो. म्हणजे "मी काफिर व बंडखोराची कत्तल करणारा व मूर्तीचा पाया उखडून टाकणारा आहे" असे तो सांगतो. याशिवाय "दीन दार बुतशिकन्" व "दीन दार कुफ्रशिकन्" (म्हणजे धर्माचा सेवक आणि मूर्तीचा विध्वंसक व धर्माचा सेवक आणि काफिराचा विध्वंसक) अशीही विशेषणे तो स्वत:ला लावताना दिसतो. असे विजापुरातील अफजलपुरात कोरलेल्या एका शिलालेखात म्हटले आहे. हा अफजलखान स्वराज्यात आला तो विध्वंस करतच. तुळजापूर, पंढरपूर, माणकेश्वर ही देवळे प्रत्यक्ष विजापूरच्या आदिलशहाच्या अमलाखाली होती. पण तरीसुद्धा ती फोडली. मूर्ती भ्रष्ट केल्या. तुळजाभवानी तर साक्षात शक्तिदेवता. राजाचे कुलदैवत. तुळजाभवानीची मूर्ती अफजलखानाने फोडली म्हणून अफजलखानाचा वध झाल्यानंतर राजाने त्या प्रेताचा सूड घेतला नाही. खानाचे शीर राजगडावर पाठविताना त्याचा योग्य तो मान ठेवला एवढेच नव्हे, तर त्याची पूजाअर्चा व नैवेद्यव्यवस्था नीट चालवली. अफजलखानाचे शीर राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या दरवाजातील कमानीत बसवले. खानाच्या प्रेताचा सन्मानपूर्वक अंत्यविधी प्रतापगडाच्या पायथ्याशी त्यावेळी केला याची साक्ष आजही तेथे आहे. डॉ. हेलन इ.स. १६७० मध्ये राजापुरात आला होता. तो लिहितो, "शिवाजीची प्रजा त्याच्याप्रमाणे मूर्तिपूजक आहे; परंतु तो सर्व धर्माचा प्रतिपाल करतो. या भागातील अतिशय धोरणी मुत्सद्दी राजकारणी पुरुष म्हणून तो विख्यात आहे."

 औरंगजेबाने जेव्हा जिझिया कर लावला तेव्हा शिवाजीने त्याला पत्र लिहिले आहे. त्यातील काही वाक्ये अशी:

 "...अस्मानी किताब म्हणजे कुराण. ते ईश्वराची वाणी आहे. त्यात आज्ञा केली ती ईश्वर जगाचा व मुसलमानाचा आहे. वाईट अथवा चांगले दोन्ही ईश्वरचे निर्मित आहे. कोठे महेजतीत यवन लोक बांग देतात, कोठे देवालय आहे तेथे घंटा वाजवतात. त्यास कोणाचे धर्मास विरोध करणे हे आपले धर्मापासून सुटणे व ईश्वराचे लिहिले रद्द करून त्याजवर दोष ठेवणे आहे... न्यायाचे मार्गाने पाहता जजिया पट्टीचा कायदा केवळ गैर...ज्यावर जुलूम झाला त्याने हाय हाय म्हणून मुखाने धूर काढल्यास (तळतळाट केल्यास) त्या धुराने जितके लवकर जळेल तितके जलद अग्नीही जाळणार नाही...याजवर हिंदू लोकास पीडा करावयाचे मनात आले तर आधी राजा जयसिंगाकडून जजिया घ्यावा...गरीब अनाथ मुंग्या चिलटासारखे आहे त्यास उपसर्ग करण्यात मोठेपणा नाही..."

 शिवाजीने कर लावताना धर्माच्या नावावर कोणताही भेद केलेला नाही. तुलनेत इस्लामी राज्यातील बूत फरोशी जकात हे कर होते. हिंदु मूर्तिपूजक आहेत म्हणून त्यांना बूत फरोशीचा कर भरावा लागे, तर मुसलमानांना २.५% व हिंदूना ५% जकात इस्लामी राज्यामध्ये होती. अशा पद्धतीची स्वतंत्र करव्यवस्था स्वराज्यात नव्हती.

 राजा स्वत: तर मौनीबाबा पाटगावकर, केळशीचे बाबा याकूब या मुसलमान संतांच्या दर्शनासाठी गेल्याचा उल्लेखही ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आहे. राजाचे आजोबा मालोजी भोसले हे शंभू भवानीचे नि:स्सीम भक्त होते. कठोर व्रते ते करीत. पूजाअर्चा केल्याशिवाय मुखात अन्नाचा कण वा पाण्याचा थेंब घालीत नसत. श्रीगोंद्याच्या शेख महंमदवर त्यांची निष्ठा होती. त्यांनी शेख महंमदाचा गुरुपदेश घेतला होता. शहाजी राजांच्या जन्माबद्दलही नवसाला पावला अशी श्रद्धा असल्यामुळे मालोजीराजांनी एका मुलांचे नाव शहाजी व दुसऱ्याचे नाव शरीफजी असे ठेवले होते.

 स्वराज्यामध्ये सर्व धर्मीयांना अभय असल्यामुळे व सैन्यात पराक्रम गाजवल्यानंतर सन्मान करण्यात शिवाजी कधीही मागेपुढे पाहात नसल्यामुळे सैन्यात भरती होणाऱ्यामध्ये मुस्लिमही बहुसंख्येने हिंदवी स्वराज्याच्या फौजेमध्ये होते. काही अगदी उच्चपदस्थ होते. त्यांच्या नामोल्लेख करता येईल. नूरखान बेग हा पायदळाचा पहिला सरनौबत इब्राहीमखान व दौलतखान कारभारी अधिकारी. काझी हैदर हा वकिल, तर मदारी मेहतर हा शिवाजीच्या अतिशय अंतस्थ गोटातील विश्वासू सहकारी होता. विजापूरला बड्या बेगमेने ज्यावेळेला बेहलूखान वगैरे पठाणी सरदारांना ठार केले त्यावेळी आदिलहाकडील ७०० पठाण राजाकडे नोकरी

मागण्यासाठी आले व राजांनी त्यांना आपल्या सैन्यामध्ये दाखल करून घेतले. हे राजांच्या धार्मिक धोरणाचे ठळक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

 राजा धर्माभिमानी होता, विष्ठावंत होता पण अंधश्रद्ध नव्हता. २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर राजारामाचा जन्म झाला. मुलगा झाला या वार्तेने गडावर जो आनंद व्हावयास पाहिजे होता तो कोठे दिसत नव्हता कारण मूल पालथे उपजले होते. पालथे उपजणे हा त्याकाळी अपशकुन समजला जाई. राजारामाच्या मागे जन्मापासून अपशकुनाचे वलय चिकटले तर प्रत्येक वाईट गोष्टीचे खापर त्याच्या माथ्यावर फोडले जाईल याची जाणीव राजाला झाली. तो म्हणाला, "पुत्र पालथा उपजला, दिल्लीची पातशाही पालथी घालेल." मग हुजरेपाजरे सर्व म्हणू लागले. "थोर राजा होईल शिवाजी राजियाहून विशेष किर्ती होईल." या प्रागतिक धार्मिक धोरणामुळे बजाजीराव निंबाळकर यांचे शुद्धिकार्य, नेताजी पालकर यांचे शुद्धिकार्य इत्यादी शुद्धीकरण होऊ शकले. मात्र भोंगळ पुरोगामीपणाच्या आहारी जाऊन त्याने स्वराज्यातील जनतेच्या भावना दुखावतील असा अतिरेकि उत्साह मात्र कधी दाखविला नाही. स्वत: स्वधर्मीयांबद्दलसुद्धा तो अतिशय कठोरतेने वागे. धर्मक्षेत्रात पूज्य मानलेल्या सत्पुरुषांनी मर्यादेपलीकडे राजकारणात लुडबूड केलेली त्याला अजिबात आवडत नसे.

 चिंचवडकर देवांना त्यांने 'तुमची बिरदे आम्हास द्या व माझी तुम्ही घ्या.' या शब्दात फटकारले आहे. म्हणजे तुम्ही छत्रपती व्हा आणि आम्ही पूजाअर्चा करतो असा याचा अर्थ. हे घडले कोणत्या गोष्टीमुळे? जेजुरीच्या धाडशी व गुरव मंडळीत उत्पन्नाच्या हप्त्याबद्दल भांडण होते. चिंचवडकर देवांना हे समजले. त्यांनी गुरव व धाडशी मंडळींना निवाड्यासाठी बोलाविले. देवांनी धाडशांचे अधिकार गुरवाना देऊन टाकले. विरुद्ध गेलेल्या निकालास भिऊन पळून जाणाऱ्या धाडशांना किल्ल्यात बंदी घातले. चिंचवडकर देवांना वाटले आपण छत्रपतींचे गुरू त्यामुळे हे अधिकार आपोआपच मिळाले आहेत. देवांच्या प्रतिष्ठेमुळे सिंहगडच्या कील्लेदारांनी त्यांच्या आज्ञेचे पालन केले. राजाने सिंहगडच्या गडकऱ्याला फटकारले. परस्पर कोणालाही बंदीत टाकण्याचा तुला अधिकार काय ? चाकर आमचा की देवांचा? पत्र पाहताच धाडशांना सोडून द्यावे लागले. चिंचवडकरांची प्रतिष्ठा व त्यांच्या स्वधर्मियांमधील मान व सन्मान यापेक्षा स्वराज्यातील शिस्त पाळली गेली पाहिजे हा शिवाजीराजांचा दंडक होता.

 राजाने वतनदारांचे परस्परवसुलीचे अधिकार काढून घेतले. तसेच देवस्थानांचे घेतले. चिंचवडकर देवांना बादशाहीतसुद्धा कोकणातून पडत्या भावाने भात, मीठ

इत्यादी खरेदी करण्याचा अधिकार होता. शेतकऱ्यांचे यात नुकसान होते आहे हे ध्यानात घेऊन राजाने देवांचा हक्क तात्काळ काढून घेतला. राजांनी २२ जून १६७६ रोजी देवांना कळविले की की की तुम्ही रयतेपासून कमी भावाने धान्य घेऊ नये. तुम्हाला देवस्थानासाठी लागेल ते सर्व धान्य स्वराज्याच्या खजिन्यामधून दिले जाईल. दैनंदिन खर्च होईल तो लिहून ठेवणे व खर्च खजिन्यातून दिला जाईल. आपले देवस्थान आहे म्हणून त्यांना खास अशी सवलत राजाने दिलेली नाही.

 राजाचे धार्मिक धोरण हे स्वधर्माबद्दल प्रेम व आदरभाव दर्शविणारे असे होते. शिवाजी केवळ हिंदू धर्माचा राजा आहे असा स्वार्थी प्रचार काही लोक आपल्या राजकिय स्वार्थासाठी राजाचे खोटे व हीन रूप मांडत आहेत. यातून काही क्षणापुरता कदाचित त्यांच्या राजकिय स्वार्थ साधेलही, परंतु राजाचे असे विकृत रुप मांडणे हा शिवाजीचा घोर अपमान आहे. राजाच्या उत्तुंग व विशाल व्यक्तिमत्वाला हे कमीपणा आणणारे आहे.

 शिवाजीराजांचा स्त्रीविषयक दृष्टीकोण

 राजाचा परस्त्रीविषयीचा दृष्टीकोन हा तत्कालीन स्थितीत अनन्यसाधारण होता यात काही वाद नाही. सुलतान दरबाराचे सरदार आणि वतनदार यांच्या स्त्रियांवर अत्याचार होत, त्यांना पळवून नेणे, अब्रू लुटणे हा जणू आपला हक्कच आहे असे लुटारू सैन्य माने. स्वराज्याच्या सैन्याची स्त्रियांबाबतची वागणूक अगदी वेगळी असे हे सर्वमान्य आहे. खाफीखान वगैरे अनेक लेखकांनी मराठा सैन्याच्या या गुणाबद्दल व शिवाजीच्या स्त्रियांबद्दलच्या धोरणाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. स्वत: मोगल सम्राट औरंगजेब राजाच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर म्हणाला, 'आपल्या हातात पडलेल्या शत्रूच्या स्त्रियांच्या अब्रूची कदर करणारा एक महावीर मरण पावला.' राजाच्या चरित्रात स्त्रीयांविषयक उदार धोरणाची अनेक उदाहणे मिळतात.

 मुरजे येथील रंगो त्रिमल वाकडे कुलकर्णी ब्राह्मण यांच्याकडील लग्नाचे वऱ्हाड

आले. वऱ्हाडात एक विधवा महिला होती.रंगो त्रिमल यांनी त्या विधवेशी बदवर्तन केले. राजांच्या कानावर ही गोष्ट केली. रंगो त्रिमल वाकडे यांच्या पूर्वी एका पाटलाने बदअंमल केला म्हणून त्याचे हातपाय तोडल्याची शिक्षा राजानी केल्याचे त्याला माहीत होते. रंगो कुलकर्णी घाबरला. आता शिवाजीराजे आपल्याला जीवानिशी मारतील या भयाने राजांच्या शत्रुपक्षाकडील चंद्रराव मोरे यांच्याकडे आश्रयाला गेले. चंद्ररावाने त्यांना आश्रय दिला. पण हे फार काळ टिकले नाही, कारण रंगोबा लवकरच मरण पावले. राजे आपल्या सैन्याला हुकूम देताना कोणत्याही परिस्थितीत

महिलांशी वर्तणूक पूर्णपणे सभ्यतेची असली पाहिजे याची काळजी घेई. बेलवाडीच्या देसाईणीची बेअब्रू केल्याच्या आरोपावरून राजाने सखोजी गायकवाड याचे डोळे काढले आणि त्याला जन्मभर अंधारकोठडीत ठेवले हे लक्षात घेतले पाहिजे.

 याबाबतीत राजाने संभाजीराजांचीसुद्धा गय केली नाही याचे उदाहरण फार बोलके आहे. चिटणीसांची बखर हा एकमेव पुरावा असता तर तो ग्राह्य मानता आला नसता. परंतु मुंबईकर इंग्रजांच्या पत्रातही या घटनेस दुजोरा आहे. १६ जानेवारी १६८६ च्या पत्रात इंग्रज लिहितात की, संभाजीने एका ब्राह्मणाच्या मुलीला वाईट मार्गाला लावले होते. रायगडच्या पहारेकऱ्याला शिवाजीराजांनी आज्ञा केली की रोज संध्याकाळनंतर संभाजीने तिच्या भेटीस जाण्याचे सोडले नाही तर त्याचा कडलोट करण्यात यावा. शंभुराजाचे वय त्या वेळी १८ वर्षाचे होते हे विसरता येत नाही. स्वत:च्या पोटच्या मुलाशीसुद्धा राजा किती कठोरपणे वागत होता हे वरील उदाहरणावरुन दिसून येईल. खाफीखान हा राजांबद्दल लिहितो की, शिवाजीच्या सैनिकांसाठी असा नियम होता की लुटीसाठी गेले असता त्यांनी 'मशिदीस, कुराणास किंवा कोणत्याही स्त्रीस त्रास देऊ नये.' त्यावेळच्या युद्धनीतीमध्ये स्त्री-पुरुष लहान मुले यांना पकडून गुलाम म्हणून विकण्याची त्यावेळी सर्वमान्य झालेली प्रथा राजांनी प्रथम धुडकावून लावली.युद्धांतील स्त्री-कैदी उपभोग्य वस्तू म्हणून त्यांनी कधीही सैनिकाला वाटू दिले नाही. युद्धात स्त्री-कैद्यांना उपभोगून आपले सवंग सूडाचे समाधान मानून घेण्याची वृत्ती त्यावेळच्या इतर मोगल सरदारामध्ये दिसून येते. पण राजांनी याबाबतीत अतिशय प्रखर कटाक्ष ठेवला आणि 'परस्त्री ना नीती दृष्टी' असाच लौकीक कायम राखला. पराभवापेक्षा विजयाचा आनंद पचवणे हे अवघड. या आनंदाच्या क्षणीच पाऊल घसरण्याची शक्यता असते पण आपल्या संयमशील वागणुकिने शिवाजीराजे एका आदर्श महापुरुषाच्या रांगेत अगदी उच्चपदी बसले. युद्धकाळातच राजे असे वागत असे नाही तर सर्वसामान्य परिस्थितीतही राजाची वागणूक अशीच होती.

 'रायरीच्या कील्ल्याला (रायगडला) लागूनच शिवाजीने एक वाडा (पाचाडला) बांधला होता. उन्हाळ्यात पाण्याची फार टंचाई भासे त्यामुळे तेथील लोकांना अतिशय त्रास होता. शिवाजीने बांधलेल्या वाड्यात एक दिवस राहण्याचा मला (खफीखानला) प्रसंग आला. शिवाजीने आपल्या वाड्याला लागूनच एक विहीर बांधलेली होती. विहिरीला लागूनच त्याने दगडाची एक बैठक तयार करवली होती. त्यावर टेकून बसण्यासाठी दगडाचा लोड तयार केला होता. तेथे तो (शिवाजी)

बसत असे. विहीरीवर सावकाराच्या बायका आणि इतर गरीब स्त्रिया पाणी भरण्यासाठी येत असत. त्यांच्या मुलांना तो त्या त्या मोसमातील फळे देत असे. आपण आपल्या आई किंवा बहिणीशी ज्या प्रकारे बोलतो त्या प्रकारे तो त्या बायकांशी बोलत असे.' असे वर्णन खाफीखानाने केलेले आहे. या पार्श्वभूमीवर त्या काळातील बादशहा सुलतानाच्या वागणुकिचे एक ठळक उदाहरण म्हणून अफझलखानाचे देता येईल. फ्रेंच प्रवासी अब्रे कॅरे यानी असे लिहून ठेवले आहे की, शिवाजीवर चालून जाण्यास खान निघाला व आपल्या स्त्रियांचा त्याग करावयाची वेळ आली त्यावेळी त्याचा द्वेषाग्नी एकदा भडकला की त्यास तो आवरता आला नाही व त्या भरातच एक असे अमानुष कृत्य करण्याची प्रेरणा त्याला झाली, जे फक्त उलट्या काळजाचाच मनुष्य करू शकेल. खानाने सात दिवस स्वत:ला जनानखान्यात कोंडून घेतले व हा काळ उपभोग व चैनीत घालवला. पण त्याचा शेवट मात्र करूण झाला. कारण शेवटच्या दिवशी खानाने आपल्या नजरेसमोर त्या दुर्दैवी २०० स्त्रियांना सैनिकांकडून भोसकून ठार मारले. आपल्या माघारी त्या परपुरुषाशी रत होतील या भयाण व काल्पनिक भयाने तो पछाडला गेला होता. त्या बिचाऱ्यांना असा काही प्रसंग घडेल याची कल्पनाही नव्हती.

 स्वराज्याचे सैनिक आणि लुटारूंच्या फौजा यांच्या वर्तणुकित हा फरक कसा काय झाला? बहुतेक इतिहासकारांनी याचे सर्व श्रेय शिवाजीच्या व्यक्तिगत नीतिमत्तेला आणि चारित्र्याला दिले आहे. आणि शिवाजीमध्ये ही आदर्श नैतिकता उद्भवली कोठून तर आई जिजाबाई आणि दादोजी कोंडदेव यांच्या सुसंस्कृत, धर्मपरायण शिकवणीमुळे आणि प्रभावामुळे. लहानपणापासूनच्या शिकवणीमुळे, सुसंस्कृत वातावरणामुळे संबंधित व्यक्तद्दच्या चारित्र्यावर दीर्घकाळ प्रभाव राहू शकेल हे शक्य आहे. पण अशा शिकवणुकीच्या अपघाताने स्वराज्याच्या सैनिकांची नीतिमत्ता ठरली असे म्हणणे तर्काला सोडून होईल.

 सुलतान वतनदारांच्या लुटारू फौजा व स्वराज्याचे सैनिक यांच्या उद्दिष्टात आणि मूलभूत प्रकृतीतच मोठा फरक होता. स्त्रियांविषयीच्या वागणुकितील फरक हा चमत्कार नाही. अपघात नाही. शिवाजीराजाच्या स्वराज्याच्या थोरवीचा तो मोठा सज्जड पुरावा आहे.

 लुटारूंच्या फौजांतील सैनिक कुटुंबवत्सल असू शकत नव्हते. शादीसुदा असणाऱ्यांचेसुद्धा घराशी संबंध जुजबीच असणार. लुटारू फौजा पूर्णवेळ व्यावसायिक सैनिकांच्या असत. साहजिकच लुटीच्या प्रदेशात गेल्यानंतर त्यांची प्रवृत्ती अगदी वेगळी राही. स्वराज्यातला सैनिक हा मुख्यत: अर्धवेळ शेतकरी व

अर्धवेळ सैनिक होता. जे पूर्णवेळ सैनिक झाले त्यांचेही शेतीशी आतड्याचे नाते सुटलेले नव्हते, कुटुंबवत्सलता संपलेली नव्हती. जमिनीशी नाते असणारे सैन्यच काय पण दंगेखोरसुद्धा स्त्रियांवर हात उचलीत नाहीत. म. गांधींच्या वधानंतर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मोठ्या दंगली उसळल्या. पण अगदी अपवादादाखलदेखील स्त्रियांवर अत्याचार घडले नाहीत. याउलट इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीसारख्या शहरात झालेल्या दंग्यात महिलांवरील अत्याचाराचे अनेक प्रकार घडले. स्वराज्याचे सैन्य म्हणजे सरदारांच्या फौजांची घडवून आणलेली संधिसाधू आघाडी नव्हती. अशा तऱ्हेची आघाडी घडवून आणून त्यातून स्वराज्य संस्थापना करण्याचा प्रयत्न राजाने केला असता तर त्याला यश आले असते किंवा नाही हा मुद्दा अलाहिदा. पण त्या सैन्याची स्त्रियांबद्दलची वागणूक स्वच्छ ठेवणे शिवाजीराजासारख्या चारित्र्यवान नेत्याच्याही आटोक्याबाहेरचे झाले असते. शहाजीराजांनी लुटारू फौजांची आघाडी बांधली. त्यांच्या सैन्याची स्त्रियांविषयी काही धवल कीर्ती नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे.

 स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन उदार की अनुदार याचा संबंध सैनिक कोणत्या धर्माचे आहेत, कोणत्या जातीचे आहेत, याच्याशी नाही. औरंगजेबालाही ज्याची वाहवा करावी लागली त्या सैन्याच्या स्वरूपात पुढे फरक पडला. पेशवाईच्या काळात ते उत्तरेकडे, पूर्वेकडे स्वाऱ्या करू लागले. त्यावेळी त्यांच्याही प्रकृतीत मोठा फरक पडला. पावसाळ्याच्या आधी घरी पतरण्याची पद्धत कायम राहिल्यामुळे मराठा फौजांचे स्त्रियांवरील अत्याचार हे मुसलमानी नीचांकापर्यंत कधी गेले नाहीत हे खरे, पण उत्तर पेशवाई तमाशे लावण्याच्या फडांना जो ऊत आला तो पुष्कळ काही सांगून जातो.

 लुटारु फौजांची भूमिकाच वेगळी असतेक लुटीच्या प्रदेशात ज्या गोष्टीवर हात टाकता येईल त्यावर टाकावा, अन्नधान्य लुटावे, गुरे पळवावीत, कापावीत, पुरुषांच्या कत्तली कराव्यात आणि त्याच्या राहिला साहिला अभिमान धुळीत मिळवून प्रतिकाराची सर्वबुद्धी खलास करण्यासाठी त्यांच्या स्त्रियांवरही अत्याचार करावेत ही लुटारूंची रणनीती असते. लुटीच्या हल्ल्याचा अनुभव घेतलेले समाजचे समाज नपुंसक होऊन जातात आणि लुटारूंच्या सैतानी राज्यापुढे मान तुकवतात. लुटारूंना नेमके हेच अभिप्रेत असते. लोकांकडून प्रेम मिळविण्याची त्यांची इच्छाही नसते आणि अपेक्षाही नसते. हा अनुभव प्रत्येक युद्धात येतो. सुसंस्कृत जर्मन व जपानी सैनिक दुसऱ्या महायुद्धाच्या काळात असेच वागले. अमेरिकन सैनिकांची वर्तणूक व्हिएटनामसारख्या प्रदेशात अशीच राहिली.

 स्वराज्याच्या सैनिकांची भूमिकाच वेगळी असते. राज्य स्थापण्याकरिता, सैन्याकरिता साधनांची गरज असतेच. ती साधने सर्वसामान्य जनतेकडूनच मिळवायची असतात. पण त्यासाठी अत्याचारांचा वापर त्यांना परवडूच शकत नाही. सर्वसामान्य लोकांतून, गावागावांतून, दऱ्याखोऱ्यातून पाण्यातील माशाप्रमाणे सहज संचार करणे त्यांना आवश्यक असते. धनधान्य मिळविणे हे त्यांचे साधन असते, साध्य नाही. ज्या प्रदेशात त्यांचा संचार त्याच प्रदेशात त्यांना सुव्यवस्थित समाज आणि प्रशासन तयार करायचे असते. आणि शेवटी आसपासची सगळी माणसे ही त्यांची आपली, जवळची, लागेबांध्याची अशी असतात. अशा परिस्थितीत स्त्रियांवरील अत्याचार संभवतच नाहीत.

 राजाच्या सैन्याचा स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन हा कोण्या व्यक्तीच्या महात्म्याचा प्रश्न नाही.असे माहात्म्य आणि चारित्र्य शिवाजीकडे होते म्हणूनच तो अशा स्वातंत्र्यसेनेचा नेता बनू शकला. स्वराज्याच्या सैन्याचा स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन एवढेच सिद्ध करतो की ही काही लुटारूंची फौज नव्हती; आपल्याच देशातील सर्वसामान्य कुटुंबवत्सल माणसे लुटीचा प्रतिकार करून निर्भयपणे जगता यावे यासाठी हातात तलवार घेऊन लुटारूंच्या विरुद्ध उभी ठाकली होती.

 वस्तुनिष्ठ दृष्टीने राजाच्या सर्व चरित्राचा अभ्यास केला तर तो हिंदूंच्या रक्षणासाठी लढला किंवा मुसलमानांना बुडविण्यासाठी लढला असे म्हणण्याला काहीही आधार सापडत नाही. गावगाड्याच्या व्यवस्थेची लूट करणाऱ्या सर्व पुंडांविरुद्ध तो लढला. मग त्यांचा धर्म हिंदू असो का मुसलमान; कॅथॉलिक असो का प्रॉटेस्टंट. त्याच्या सहकाऱ्यांत हिंदू होते, मुसलमान होते. मुसलमानांशी लढायांनी शिवाजीला जितके थकवले तितके भाईबंदांतील लढायांनी त्याला जेरीस आणले. शिवाजीने मांडलेला संघर्ष हा धर्माधर्मातील नव्हता. एका बाजूला गावगाडा आणि दुसऱ्या बाजूला गावगाड्याला लुटणारे अशी संघर्ष रेषा त्याने आखली. राजकारण आणि राज्यसत्ता शेतीच्या लुटारूंच्या हातून काढून काढून घेऊन ती गावगाड्याच्या दृष्टीने कल्याणकारी बनावी असा प्रयत्न केला. शिवकालीन स्वराज्य आणि मोगलाई म्हणजे १७ व्या शतकातील भारत व इंडिया यांचेच रूप होते.