शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख/शिवपूर्व राजांचा इतिहास




 शिवपूर्वकालीन राजांचा इतिहास


 शिवाजी महाराजांनी मावळ्यांना हाताशी धरून ज्या गुलामगिरीला जबरदस्त हिमतीने धक्का दिला ती गुलामगिरी मुसलमानी आक्रमणापासून सुरू झाली अशी सर्वसाधारण समजूत आहे.

 इ.स.७११ पासून भारतावर मुसलमानी आक्रमकांचे हल्ले झाले तरी महाराष्ट्रावरचे पहिले मुसलमानी आक्रमण इ.स.१२९५ मध्ये अलाउद्दीन खिलजीने केले. तोपर्यंत महाराष्ट्रावर सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट घराण्यांनी राज्य केले. त्याखेरीज अभीर (खानदेश), त्रैकूट ( नाशिक), शतक्षत्रप (प. महाराष्ट्र ), शिलाहार (कोकण)अशाही काही छोट्या राजवटी ठिकठिकाणी सत्ता गाजवत होत्या.

 या काळात देशाची स्थिती कशी होती याची कल्पना काही त्रोटक पुराव्यांच्या आधारे करावी लागते. सातवाहन काळात प्रजा आनंदात जीवन जगत होती, स्त्रियांना भरपूर स्वात्रंत्र्य व प्रतिष्ठा होती, सतीची चाल सुरू झाली नव्हती, वेगवेगळ्या व्यवसायांना सुरूवात झाली होती असे शिलालेख सांगतात.

 राष्ट्रकूटांच्या काळात मुसलमान व्यापारी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर उतरले, त्यांनी सागरी व्यापारावर ताबा मिळवला, किनारपट्टीवर आरमारी प्रभुत्व कायम केले. राष्ट्रकूटांच्या काळात चातुर्वर्ण्याला विकृत स्वरूप येऊ लागले, सोवळे ओवळे, विधवांचे केशवपन अशा चाली रूढ होऊ लागल्या असे दिसते.

 यादव राज्याची सुरूवात नाशिक जिल्ह्यात झाली. ११८७ मध्ये देवगिरीची स्थापना झाली. कोकणातील शिलाहारांचे राज्य पूर्णत: नष्ट करून महादेवराय यादव याने कोकणावर ताबा बसवला. या घराण्यातील वेगवेगळ्या राजांनी स्वत:लाच ज्या पदव्या लावून घेतल्या आहेत त्या पाहता त्यांचा पराक्रम नाही, तरी महत्त्वाकांक्षा दिसून येते 'सपस्त भुवनाश्रय' , 'पृथ्वीवल्लभ', 'सकलपृथ्वी आश्रय', 'राजाधिराज' वगैरे. प्रसिद्ध हेमाडपंडित हा महादेवरायाच्याच दरबारात होता. त्याच्या 'चतुर्वर्ग चिंतामणी' हा ग्रंथ पाहिला म्हणजे तत्कालीन समाजाची काही कल्पना येते. अगदी क्षुल्लक व किरकोळ गोष्टीतही मुहूर्त आणि शुभाशुभ

पाहणे, संकटाच्या निर्वर्तनासाठी वेगवेगळे विधी आणि यज्ञयाग करणे याबद्दल हेमाडपंताने जी माहिती दिली आहे ती पाहता त्या वेगळ्या समाजाची किव व समाजधुरीणांविषयी चीड आल्याशिवाय राहत नाही. महादेवारायानंतर त्याचा मुलगा अम्मन हा राजा झाला. पण रामचंद्रदेवाने त्याला कपटाने कैदेत टाकले. एवढेच नव्हे तर त्याचे डोळे काढले आणि राज्य ताब्यात घेतले. रामचंद्राने बनारसपर्यंत स्वाऱ्या केल्या असे म्हटले जात असेल तरी त्याच्या कारकिर्दीपर्यंत इस्लामी आक्रमकांनी पंजाबपासून बंगालपर्यंत व हिमालयापासून विंध्यापर्यंत समग्र भारत व्यापला होता. हे पाहता या बढाईत फारसा अर्थ वाटत नाही.

 अलाउद्दीनचा हल्ला व देवगिरीचा पाडाव

 अशा या यादवांच्या राज्यावर अलाउद्दीन खिलजी ४००० घोडस्वार, २००० पायदळ सैन्य घेऊन चालून आला. पहिल्याच लढाईत रामदेवरायाचा पराभव झाला. त्यानंतर शंकरदेवाचाही पराभव झाला आणि अलाउद्दीन देवगिरीची प्रचंड संपत्ती घेऊन दिल्लीला परतला व त्याने दिल्लीचे तख्त ताब्यात घेतले.१३०६ साली मलिक काफूर ३०,००० फौजेसह देवगिरीवर ३ वर्षाच्या खंडणीची थकबाकी वसूल करण्याकरिता आला. लढाई पुन्हा देवगिरीलाच झाली. फिरून पुन्हा यादवांचा पराभव झाला. मलिक काफूर रामदेवाला कैद करून दिल्लीला घेऊन गेला. अलाउद्दीनने त्याला लालछत्र देऊन 'रायेरायान' हा किताब देऊन बरोबर विपुल द्रव्य व गुजराथेतील नवसारी जिल्हा बहाल करून परत पाठवून दिले. मरेपर्यंत रामदेवाने निष्ठावान मांडलिक म्हणून अलाउद्दीनची सेवा केली.

 रामदेवाच्या मृत्यूनंतर शंकरदेव यादव याने पुन्हा एकदा बंड उभारण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा मलिक काफूर सैन्य घेऊन दिल्लीहून निघाला आणि विनासायास देवगिरीला पोचला. युद्धात पुन्हा शंकरदेवाचा पराभव झाला. एवढेच नव्हे स्वत: शंकरदेव ठार झाला.

 अलाउद्दीनच्या मृत्यूची बातमी कळताच मलिक काफूर दिल्लीला पोचला. त्यावेळी रामदेवाचा जावई हरपालदेव याने पुन्हा एकदा स्वतंत्र होण्याचा प्रयत्न केला. दिल्लीचा नवा बादशहा मुबारक शहा याने एकाच वर्षात आपल्या राज्यात स्थिरता आणली आणि १३१८ मध्ये देवगिरीवर स्वत: चालून आला. पुन्हा एकदा युद्ध देवगिरीच्या आसमंतातच झाले. पुन्हा एकदा हरपालदेवाचा पराभव झाला आणि त्याला हालहाल करून मारण्यात आले. मुबारक शहा देवगिरीस ठाण मांडून राहिला आणि त्याने यादवांचे राज्य फिरून उभे राहून शकणार नाही अशा तऱ्हेने नष्ट करून टाकले.

 देवगिरीच्या पराभवाची कारणमीमांसा

 देवगिरीच्या पहिल्या पाडावाची अनेक कारणे सांगितली जातात.देवगिरीचे सैन्य जागेवर नसणे, किल्ल्यात धान्याऐवजी मिठाची पोतीच भरलेली सापडणे, दिल्लीहून मागाहून मोठी फौज येत आहे अशी अफवा अलाउद्दीनाने मुद्दाम सोडून दिली होती, त्या अफवेने देवगिरीच्या सैन्याने घाबरून जाणे अशी त्यातील काही कारणे सांगितली जातात.

 पण हा पराभव आक्रमणाच्या आकस्मिकपणामुळे आलेला दुर्दैवी पराभव होता असे मानण्याचे काहीच कारण नाही. संपूर्ण उत्तर भारतात मुसलमानी राजवट असताना मुसलमान दक्षिणेत उतरणारच नाहीत असे जबाबदार राजकर्ता मानूच शकत नाही. उत्तरेहून स्वारी निघाली आहे. ती लवकरच येऊन थडकणार आहे याची अगोदर बातमी न लागणे म्हणजे हेरखाते बिलकुल अस्तित्वात नसण्याचा पुरावाच आहे. एवढेच नव्हे तर राजाला प्रजेच्या, राज्याच्या संरक्षणाच्या जबाबदारीची जाणीव नसण्याचे द्योतक आहे. उत्तरेत सर्वत्र मुसलमानी राज्य आहे. दक्षिणेत केव्हातरी आक्रमण होईल याची जाणीव ठेवून दक्षिणेतील सत्तांची, सैन्याची एकसंध फळी उभी करण्याऐवजी ऐन मुसलमानी स्वारीच्या वेळीच युवराज शंकरदेव यादव ससैन्य दक्षिणेत स्वारीसाठी गेला होता. यातून देवगिरीच्या यादवराजांच्या मनात काही व्यापक राष्ट्रीय किंवा धार्मिक भावना नव्हती असे मानता येईल. याशिवाय देवगिरीच्या राजदरबारातही बेबनाव होता असे मानायला जागा आहे. रामदेवराय याने स्वत: राज्याचा अधिकारी वारस अम्मन याचा वध केला होता व राज्य बळकावले होते. महानुभावांच्या 'भानुविजय' ग्रंथात तर खुद्द हेमाडपंताने यादवांचे राज्य नष्ट करण्यासाठी तुर्कास बोलावले असा समज दिसतो.

 देवगिरीच्या पहिल्या पराभवाची कारणे अशी अनेकविध आहेत, तरी पण पहिल्या पराभवानंतर तीनदा देवगिरीचा पराभव झाला व शेवटी पूर्ण पाडाव झाला हे सत्य नजरेआड करता येणार नाही. महाराष्ट्राची लक्ष्मी खंडणीच्या रूपाने दिल्लीला जात होती याचा शंकरदेवाला आणि हरपाळदेवाला राग जरूर आला पण महाराष्ट्राच्या प्रजेला जर हा राग आला असता तर नंतरच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी शंकरदेवाला किंवा हरपालदेवाला सैन्यबळ वाढवणे शक्य झाले असते. समाजाला गनिमी काव्याला अनुकूल करून घेणे सहज शक्य झाले असते. मुसलमानी सैन्य उत्तरेतून देवगिरीवर चालून येताना जागोजागी त्यांना अडवण्याची मोर्चेबांधणी करता आली असती. पण यादवराजांचे दुःख शेतकऱ्यांकडून लुटलेली संपत्ती दिल्लीला पाठवावी लागते या गोष्टीपुरते मर्यादित राहिले असेल तर केवळ

पगारी सैन्याच्या आधारावर आक्रमण थोपवणे अशक्य होणे स्वाभाविकच आहे.

 यादवांचा पाडाव झाला. नंतर महंमद तुघलकाने राजधानी दिल्लीहून देवगिरीला आणण्याचा प्रयत्न करून पाहिला आणि नंतर बरीच वर्षे महाराष्ट्रावर पहिल्यांदा बहामनी आणि नंतर आदिलशाही, निजामशाही मुसलमान सत्ताधीशांची सत्ता राहिली. बहामनी राजाच्या सुमारे अठरा सुलतानांतले सात आठजण तर घातपातात ठार झाले. आंधळे झाले, पांगळे झाले. दरबारी कारस्थानांना बळी पडले. उरलेल्यांतील चार-पाच बहामनी सुलतानांनी शेतीभातीची व्यवस्था लावण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. पण त्याचबरोबर हजारहजार लोकांच्या कत्तली करून दहशत बसवणेही चालू ठेवले होते. बहामनी राज्य फुटून त्याच्या पाच सुलतानशाह्या झाल्या. त्यावेळी मात्र मराठा जहागीरदार वतनदारांचा उपयोग सुलतानांनी सुरू केला. थेट प्रजेला लुटायचे काम वतनदार जहागीरदारांनी करायचे, त्यांच्याकडून लुटीचा काही भाग सुलतानांनी वसूल करायचा आणि आपल्या युद्धासाठी जहागीरदार, वतनदारांनी पदरी बाळगलेले सैन्य वापरायचे अशी लुटीची उतरंडीची व्यवस्था सुलतानांनी राबवायला सुरूवात केली. यातून वतनदार जहागीरदार शिरजोर तर झालेच, पण सरशी होणाऱ्या सुलतानाकडे तातडीने जायच्या वृत्तीमुळे प्रजेचीही वाताहत सुरू झाली.

 हिंदू राजाची सत्ता जाऊन मुसलमानी सत्ता महाराष्ट्रावर आली. स्थिर झाली याची कारणमीमांसा अनेकांनी केली आहे. 'राधामाधव विलास चंपू'च्या प्रस्तावनेत इतिहासकार राजवाडे म्हणतात,

 "हिंदू राजवटीतील महाराष्ट्र संस्कृतीची व्याप्ती अत्यल्प ब्राह्माणांपुरती आणि उत्तरेकडील क्षत्रियांपुरती होती. बहुसंख्य नागवंशी आदी मराठे अत्यंत मागासलेले असून त्यांच्यात राष्ट्रभावनेचा उदय झालेला नसल्यामुळे ते अभिमानाने लढण्यास पुढे येऊ शकले नाहीत आणि त्यामुळे अल्पसंख्य आर्य क्षत्रियांचा पराभव होताच महाराष्ट्रात मुसलमानी झाली."

 राज्यकर्ते क्षत्रिय आणि त्यांच्या आश्रयाने 'नागवंशीय आदी मराठा शेतकऱ्यांच्या' लुटीत सहभागी होणारे आर्य ब्राह्मण यांच्या बाजूने अभिमानाने लढायला शेतकरी तयार होतील ही अपेक्षा करणेच वास्तविक चूक ठरेल.

 इतिहासकार शेजवलकरांनी राष्ट्रीयतेचा अभावाचे विश्लेषण अधिक शास्त्रीयतेने केले आहे.

 "एतद्देशीय अल्पसंख्याक ब्राह्मण क्षत्रियांना इतर आडमुठ्यांच्या साहाय्याने स्वातंत्र्य का टिकवता येऊ नये? तर त्यांच्या सामाजिक उच्चनीचतेच्या मूर्ख

भावनांमुळे समाज दुभंगलेला आणि धार्मिक होता. आपापसात द्वेषबुद्धी आणि कदाचित सूडाचे वातावरण निर्माण झाले होते. आपले वर्चस्व टिकावे म्हणून इतरांना सर्व बाजूने दुबळे ठेवण्याची पद्धत उच्चवर्णीयांच्या अंगलट आली होती."

 अल्पसंख्यांच्या फायद्याच्या सामाजिक रचनेला राष्ट्र कसे म्हणता येईल? बहुसंख्यांना राष्ट्र आपले वाटतच नव्हते आणि अल्पसंख्यांना सुद्धा राष्ट्रभावना होती की स्वार्थ भावनाच होती? याचा अर्थच हा की या ठिकाणी एक राष्ट्रच नव्हते.

 १८५३ साली मार्क्सने एंगल्सला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे,

 "खेड्यात राहणाऱ्यांना राज्ये फुटली, मोडली याचे काहीच दुःख नाही. खेड्याला धक्का लागला नाही तर ते कोणत्या राजाकडे जाते व कोणत्या सुलतानाची अधिसत्ता चालते याची काहीच चिंता नसते. गावगाडा अबाधित चालत राहतो."

 इतिहासाचार्य राजावाडे यांनी महिकावतीची बखर' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत हा विचार अधिक स्पष्ट केला आहे.

 "गेल्या तीन हजार वर्षांत हिंदुस्थानात जी देशी आणि परदेशी सरकारे होऊन गेली ती सर्व एक प्रकारच्या पोटभरू चोरांची झाली व सरकार म्हणजे उपटसुंभ चोरांची टोळी आहे अशी हिंदू गावकऱ्याची अंत:स्थ प्रामाणिक समजूत आहे."

 शिवपूर्वकालीन राजांचा इतिहास हा या प्रकारचा आहे. तो राष्ट्राचा इतिहासच नाही. तो राजवंशाचा आणि त्यांच्याभोवतालच्या भाऊगर्दीचाच इतिहास आहे.