पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे-वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्यावाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. पाळण्यात असतानाच, आईच्या खांद्यावर खेळत असतानाच, पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते. मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठांवर आपले नाव काही काळ नाचणे, असा मी करीत नाही. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील, की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत; रानावनांतील कानाकोप-यात असे एखादे रमणीय व सुगंधी फूल फुललेले असेल, की, ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही. समुद्राच्या पोटात अशी गोलबंद व पाणीदार मोत्ये असतील, की ज्याची जगास वार्ता नाही. पृथ्वीच्या पोटात ता-यांसारखे तेजस्वी हिरे असतील; परंतु मानवजातीस त्यांचे अद्यापि दर्शन नाही. वर अनंत आकाशात असे अनंत तारे असतील, की जे पल्लेदार दुर्बिणीतूनही अजून दिसले नाहीत. मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे, असा मी करीत नाही. मी निर्दोष होत आहे. हळूहळू उन्नत होत आहे, ही ज्याला जाणीव आहे, तो मोठाच होत आहे. मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करितात. आईबापांकडून मिळालेली ही ईश्वरी देणगी होय. मायबापच कळत वा नकळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात.

मनुष्य जन्मतो त्याच्यापूर्वीच त्याचे शिक्षण सुरू झालेले असते. आईच्या पोटात गर्भरूपाने जीव आला. त्याच्यापूर्वीच त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते. गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपापल्या जीवनात जे विचार केले असतील, ज्या भावना हृदयात खेळविल्या असतील, जी कर्मे केली असतील, त्या सर्वांतून नवबालकाच्या शिक्षणाचीच पुस्तके तयार केली जात असतात. जगात फक्त आईबापच शिकवतात, असे नाही; आजूबाजूचे सारे जग, सारी सजीव-निर्जीव सृष्टी शिकवीत असते; परंतु या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावे, हे आईबापच शिकवितात. मुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आईबापांचा असतो व त्यातही आईचा अधिक. आईच्या पोटातच मुळी जीव राहिला; आईशी एकरूप होऊनच जीव बाहेर पडला; जणू तिचाच होऊन बाहेर आला. बाहेर आल्यावरही आईच्याच सान्निध्यात त्याचा लहानपणी तरी बहुतेक वेळ जातो. तो आईजवळ हसतो; आईजवळ रडतो; आईजवळ खातोपितो; आईजवळ खेळतो-खिदळतो, झोपतो, झोपी जातो, आईजवळ त्याची ऊठबस सुरू असते. म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईच होय.

आई देह देते व मनही देते. जन्मास घालणारी तीच व ज्ञान देणारीही तीच. लहानपणी मुलावर जे परिणाम होतात, ते दृढतम असतात. लहानपणी मुलाचे मन रिकामे असते. भिका-याला, चार दिवसांच्या उपाश्याला, ज्याप्रमाणे मिळेल तो बरावाईट घास घेण्याची धडपड करावीशी वाटते, त्याप्रमाणेच बालकाचे रिकामे मन जे जे आजूबाजूला असेल, त्याची निवडानिवड न करता अधाशासारखे भराभर त्याचा संग्रह करीत असते. अगदी लहान दोनचार महिन्यांच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवले, तर आजूबाजूच्या हिरव्या हिरव्या झाडामाडांचा त्याच्या मनावर, त्याच्या शरीरावर इतका परिणाम होतो, की त्याच्या मनासही रंग येतो, असे बायका म्हणतात.- याचा अर्थ एवढाच, की लहानपणी मन फारच संस्कारक्षम असते. मातीसारखे, मेणासारखे ते असते. द्यावा तो आकार त्याला मिळेल.

आईने तेलकट खाल्ले, तर मुलाला खोकला होईल, आईने उसाचा रस, आंब्याचा रस खाल्ला, तर मुलाला थंडी होईल, त्याप्रमाणे आईने मुलादेखत आदळआपट केली, भांडणतंडण केले, तर मुलाच्या मनास खोकला होईल. परंतु ही गोष्ट आया विसरतात. आईचे बोलणे, चालणे, हसणेसवरणे, मुलाच्या आसमंतात होणा-या आईच्या सर्व क्रीया, म्हणजे मुलाच्या मनाचे, बुध्दीचे, हृदयाचे दूध होय. मुलाला दूध पाजताना आईचे डोळे मत्सराने लाल झालेले असतील, तर मुलाचे मनही रागीट होईल.

अशा प्रकारे मुलाचे शिक्षण हे मातेवर, पित्यावर, आप्तेष्टांवर, सभोवतालच्या सर्व सजीव-निर्जीव सृष्टीवर अवलंबून आहे. मुलांच्या समीप फार जपून वागावे. वातावरण स्वच्छ राखावे. सूर्यचंद्रांना माहीत असो वा नसो; त्यांच्या किरणांनी कमळे फुलतात, ही गोष्ट खरी. आईबापांना व इतर लोकांना माहीत असो वा नसो; त्यांच्या कृत्यांनी मुलांच्या जीवनकळया फुलत असतात, हे खरे. सूर्यचंद्रांच्या किरणांप्रमाणे मनुष्याचे मनुष्याचे व्यवहार, आई-बापांची कृत्ये, स्वच्छ, सतेज व तमोहीन अशी असतील, तर मुलांची मने कमळांप्रमाणे रसपूर्ण, सुगंधी, रमणीय व पवित्र अशी फुलतील; नाहीतर ती किडींनी खाल्लेली, रोगट, फिक्कट, रंगहीन व पावित्र्यहीन अशी होतील.

मुलांचे जीवन बिघडविणे यासारखे पाप नाही. स्वच्छ झ-याचे पाणी घाण करणे यासारखे पाप नाही. मुलांजवळ राहणा-यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावी. वसिष्ठऋषी वेदामध्ये वरूणदेवाला म्हणतात, "हे वरूणदेवा ! माझ्या हातून जर काही वाईट झाले असेल, तर त्याबद्दल माझ्या वडील मंडळीस जबाबदार धर.'

"अस्ति ज्याजान् कनीयस उपारे"

कनिष्ठाच्या जवळ ज्येष्ठ असतो. या ज्येष्ठाने आपली जोखीम ओळखून वागले पाहिजे. आईबापांनी, शेजा-यांनी, गुरूजींनी-सर्वांनी लहान मुलांचा विकास सदैव डोळयांसमोर ठेवून त्यांच्याजवळ वागावे.

श्यामला त्याच्या भाग्याने थोर माता मिळाली होती. दररोज तो आपल्या आईला मनात धन्यवाद देत असे. कधी कधी चार अश्रूंनी तिचे तर्पण करीत असे. आश्रमातील मित्र त्याची जीवनकथा पुष्कळ वेळा विचारीत; परंतु श्याम सांगत नसे. आश्रमातील इतर सारे सवंगडी आपापल्या जीवनातील नानाविध बरेवाईट अनुभव परस्परांना सांगत असत. आपल्या सोबत्यांच्या जीवनकथा ऐकताना कधी कधी एकाएकी श्यामचे डोळे भरून येत असत. त्या वेळी स्वत:च्या जीवनातील तसल्याच स्मृती त्याला येत असत. 'श्याम, तू सर्वांचे ऐकून घेतोस; पण स्वत:चे मात्र का, रे, काहीच सांगत नाहीस ?' असे त्याचे मित्र पुष्कळदा त्याला म्हणत.

एके दिवशी असाच आग्रह चालला होता. श्याम भरल्या आवाजाने म्हणाला, 'माझ्या स्वत:च्या पूर्वजीवनाची स्मृती करणे मला फार शोकदायक वाटते, कारण गतायुष्यातील चांगल्याबरोबर वाईट आठवते, पुण्याबरोबर पापही आठवते. मी माझ्या एकेका दुर्गुणाला खोल खड्डे खणून गाडून टाकीत आहे. ही पिशाच्चे पुन्हा वर उठून माझ्या मानगुटीस बसू नयेत, म्हणून माझी ही धडपड आहे. जीवन निर्दोष व निर्मळ व्हावे, ही माझी तळमळ, हेच माझे ध्येय, हेच माझे स्वप्न ! कशाला मागची सारी आठवण मला करायला लावता ?'

"केव्हा होईल जीवन माझे निर्मळ ता-यापरी । हुरहुर हीच एक अंतरी । ' "परंतु आम्हांला तुमच्या चांगल्याच गोष्टी सांगा. चांगल्या गोष्टींचे चिंतन केल्याने मनुष्य चांगला होत जातो, असे तुम्हीच नेहमी म्हणता.' लहान गोविंदा म्हणाला.

"परंतु आपण चांगलेच आठवले व ते सांगितले, तर आपण निर्दोष आहोत, असा अहंकारही जडावयाचा.' भिका म्हणाला.

श्याम गंभीर होऊन म्हणाला, 'मनुष्याला स्वत:चे अध:पतन सांगावयास जशी लाज वाटते, त्याप्रमाणे आपण कसे चढलो व चढत आहोत, हे सांगावयासही लाज वाटते. आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येवो, अशी देवाला माझी प्रार्थना असते.'

नारायण जरा हसत म्हणाला, 'मी निरहंकारी आहे. याचाच एखादे वेळेस अहंकार व्हावयाचा, मी आत्मप्रौढी सांगत नाही, असे म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जावयाची !'

श्याम म्हणाला, 'या जगात जपावे तेवढे थोडेच. ठायी ठायी मोहक मोह आहेत. कोसळावयास कडे आहेत. शक्यतोवर जपावे, यत्न करावे, प्रामाणिकपणे झटावे, आत्मवंचना करू नये. अहंकाराचे रूप फार सूक्ष्म असते. सदैव सावध राहिले पाहिजे.'

श्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला, 'आपण का एकमेकांस परके आहोत ? तू व आम्ही अद्यापि एकरूप नाही का झालो ? आपल्या आश्रमात आता खाजगी असे काहीएक नाही. आपण एक. जे आहे, ते सर्वांच्या मालकीचे, तू आपली अनुभवसंपत्ती का बरे चोरून ठेवतोस ? तुझ्याजवळ वादविवाद आम्हांला करावयाचा नाही. आम्हाला सांगण्यात कसली आहे प्रौढी ! कसला आहे गर्व ? तुझ्या जीवनात ही माधुरी, ही सरलता, ही कोमलता, हे प्रेम, हे गोड हसणे, ही सेवावृत्ती, ही निरहंकारिता, कोणतेही काम करण्यास लाज न वाटण्याची वृत्ती हे सारे कोठून आले ? ते सांग. आम्ही आजा-याची शुश्रूषा करतो, तूही करतोस; परंतु तू आजा-याची आई होतोस, आम्हांला का होता येत नाही ? तू आपल्या नुसत्या गोड हसण्याने दुस-याला आपलासा करतोस; परंतु त्याच्याजवळ चार चार तास बसून, बोलूनही त्याचे मन आम्हांला ओढून का घेता येत नाही ? सांग, ही जादू कोठून पैदा केलीस ? सांग, तुझ्या जीवनात हा सुगंध कोणी मिसळला ? ही कस्तूरी कोणी ओतली ? श्याम, व-हाडातील एक दंतकथा तुला माहीत आहे का ? एकदा व-हाडात एका श्रीमंत व्यापा-याचे टोलेजंग घर बांधले जात होते. त्या वेळेस एक नेपाळी कस्तूरीविक्या तेथे कस्तूरी विकावयास आला. श्रीमंत व्यापा-याने त्या कस्तूरीविक्यास भाव विचारला. तो कस्तूरीविक्या तिरस्काराने म्हणाला, 'तुम्ही दक्षिणेतील गरीब लोक काय घेणार कस्तूरी ? पुण्याला जाऊन काही खपली, तर पाहावयाचे !' त्या श्रीमंत व्यापा-यास राग आला. तो म्हणाला, 'तुझी सारी कस्तूरी मोज. त्या मातीच्या गा-यात मिसळून देतो. कस्तूरीच्या भिंती दक्षिणेतील लोक बांधतात असे, उत्तरेस जाऊन सांग.' त्या व्यापा-याने सारी कस्तूरी खरेदी केली व गा-यात मिसळून दिली. व-हाडातील त्या घराच्या भिंतींना अजून कस्तूरीचा वास येतो, असे सांगतात. श्याम, तुझ्या जीवनाच्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या, त्या वेळेस कोणी रे, तिथे कस्तूरी ओतली ? आमच्या जीवनाला ना वास, ना रूप, ना गंध ! तुझ्या जीवनाला हा वास कोठून आला ? हा रंग कोणी दिला, सांग.

श्यामच्याने आता राहवेना. तो गंभीरपणे व गहिवराने म्हणाला, 'माझ्या आईचे हे देणे. गडयांनो ! माझ्यात जे काही चांगले आहे, ते माझ्या आईचे आहे. आई माझा गुरू, आई माझी कल्पतरू, तिने मला काय काय तरी दिले ! तिने मला काय दिले नाही ? सारे काही दिले ! प्रेमळपणे बघावयास, प्रेमळ बोलावयास तिनेच मला शिकविले. मनुष्यावर नव्हे, तर गाईगुरांवर, फुलांपाखरांवर, झाडामाडांवर, प्रेम करावयास तिनेच शिकविले. अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्य तो आपले काम उत्कृष्टपणे करीत राहणे, हे मला तिनेच शिकविले. कोंडयाचा मांडा करून कसा खावा व दारिद्रयातही स्वत्व व सत्त्व न गमविता कसे राहावे, हे तिनेच मला शिकविले. आईने जे शिकविले, त्याचा परार्धांशही माझ्या जीवनात मला प्रकट करता आला नाही. अजून माझ्या मनोभूमीत बीज फुगत आहे. त्यातून भरदार जोमदार अंकुर केंव्हा बाहेर येईल, तो येवो. माझ्या आईनेच जीवनात अत्तर ओतले. मी मनात म्हणत असतो,

"मदंतरंगी करूनी निवास सुवास देई मम जीवनास"

तीच वास देणारी, रंग देणारी, मी खरोखर कोणी नाही. सारे तिचे, त्या थोर माउलीचे. सारी माझी आई!आई!!आई!!!'

असे म्हणता म्हणता श्यामला गहिवरून आले. त्याच्या डोळयातून घळघळा अश्रुधारा गळू लागल्या. भावनांनी त्यांचे ओठ, त्यांचे हात, हाताची बोटे थरथरू लागली. थोडा वेळ सारेच शांत होते. ता-यांची थोर शांती तेथे पसरली होती. नंतर भावनापूर थोडा ओसरला व श्याम म्हणाला, 'गडयांनो! माझे असे काही सांगण्यासारखे नाही; परंतु माझी आई कशी होती, ते मी तुम्हाला सांगेन. आईचे गुणगान करून हे ओठ पवित्र करीन. आईच्या आठवतील, त्या त्या गोष्टी सांगेन. तिच्या स्मृती आळवीन. रोज रात्री एकेक प्रसंग मी सांगत जाईन. चालेल का?'

"हो, चालेल!' सारे म्हणाले.

राम म्हणाला, 'देवाला मागितला एक डोळा, देवाने दिले दोन!'

गोविंदा म्हणाला, 'रोजच सुधारस प्यावयास मिळणार. रोजच पावनगंगेत डुंबावयास मिळणार!'


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.