पुण्यात्मा यशवंत


"त्या दिवशी शनिवार होता, एकादशी होती.' श्यामने गोष्ट सांगावयास सुरूवात केली.

"जरा थांब. बारकू यावयाचा आहे. काल तो भाकर न खाताच आला होता.' शिवा म्हणाला.

"तो पहा आलाच. ये बारकू ये; माझ्याजवळ बैस.' असे म्हणून गोविंदाने बारकूस आपल्याजवळ बसविले.

श्याम सांगू लागला:

"ते पावसाळयाचे दिवस होते. कोकणातील पाऊस तो. मुसळधार पाऊस ओतत होता. जिकडे तिकडे पाण्याचे लोट खळखळाटत वहात होते. पावसातून डोक्यावर इरली घेऊन कुडकुडत आम्ही शाळेत गेलो. त्या वेळेस कोकणात छत्र्या फार बोकाळल्या नव्हत्या. इरली फारच सुंदर व साधी असतात. आमचा धाकटा भाऊ जरा आजारी होता म्हणून तो आमच्या बरोबर शाळेत आला नाही. दादा व मी शाळेत गेलो.

आम्ही शाळेत गेलो; परंतु घरी यशवंताचे दुखणे एकाएकी वाढले. तो दोन दिवस नालगुदाने आजारी होता; परंतु ते दुखणे बरे झाले होते. दुसरेच दुखणे उत्पन्न झाले. पहाटे त्याचे पोट दुखण्याचे निमित्त झाले. पोट जास्त दुखू लागले. पोट फुगू लागले. त्याला शौचास होईना व लघ्वीसही होईना. खेडयात कोठला डॉक्टर, कोठला एनिमा! घरगुती उपाय चालले होते. आमचा गडी गोविंदा आम्हास शाळेत बोलाविण्यासाठी आला. अण्णा, दादा, अशी यशवंता आमची आठवण करीत होता.

आम्ही शाळेतून घरी आलो तर कितीतरी गर्दी! गावातील काही वैद्य आले होते. पितांबरभाई, कुशाआप्पा आले होते. माझा भाऊ गडबडा लोळत होता. पोट फुगत चालले तरी त्याला अतिशय तहान लागली होती. त्याला पाणी देत नव्हते. पाण्याच्या भांडयाकडे तो गडबडा लोळत सुटे. त्याला पुन्हा धरून ठेवीत.

त्याचे वय सहा वर्षांचे असेल तेव्हा. आदल्या दिवशीच आई त्याला रागे भरली होती. अंगणात चण्याची डाळ वाळत घातली होती. शेळी येऊन डाळ खाऊ लागली तर यशवंताने ती हाकलली. शेळीने तोंड घालून डाळ उडविली होती. ती तो सारखी करीत होता. गोळा करुन ठेवीत होता. इतक्यात आजीने पाहिले व ती म्हणाली, 'डाळ खातोस का रे चोरा, आणि कळू नये म्हणून नीट सारखी करून ठेवतो आहेस वाटते? बराच की रे आहेस!'

'नाही ग आजी, मी नव्हतो खात; उगीच आपला माझ्यावर आळ!' रडकुंडीला येऊन यशवंता म्हणाला. घरात आई सांधे दुखण्याने त्या वेळेस आजारी होती. तिला चालता येत नसे. ती फार अशक्त झाली होती. खोलीत पडलेली असे. यशवंत आत आईजवळ गेला तो आईही त्याला रागे भरली. 'डाळ खात होतास का रे? कितीदा सांगितले वस्तूस हात लावू नये म्हणून?'

'आई ! मी देवाशपथ नाही हो खाल्ली डाळ, का सारीजणं मला बोलता?' असे म्हणत यशवंता बाहेर गेला व काळांब्याखाली रडत बसला.

आदल्या दिवशीचा तो प्रकार; परंतु आता तर यशवंता मरणाच्या दारी पडला होता. सत्याची परीक्षा मरणाच्या दरबारात होत असते. यशवंता निकाल मागण्यासाठी का देवाकडे निघाला? इतके का त्याच्या मनास ते लागले?

यशवंत वाचणार नाही, असे वाटले. नऊच्या सुमारास तर जास्तच झाले दुखणे. 'आई! मला ठेवा!' तो क्षीण आवाजात म्हणाला.

'माझ्याजवळच आहेस बाळ तू!' आई म्हणाली. अशक्त व आजारी आईने मरणोन्मुख यशवंताचे डोके मांडीवर घेतले होते. तिच्या डोळयांत पाणी आले होते.

'आई, माझे डोके खाली ठेव हो. तुझी मांडी दुखेल. तुझे सांधे दुखतात.' यशवंत खोल आवाजात म्हणाला.

आईचे हृदय गहिवरले. 'नाही हो बाळ दुखत सांधे, मला काही होत नाही. मुलाच्या दुखण्यापुढे आईचे दुखणे टिकत नाही हो, मुलाला बरे करण्यासाठी आईच्या अंगात नसलेली शक्ती येते, माझी मांडी नाही हो दुखत. तुलाच ही माझ्या मांडीची हाडे खुपत असतील.' आई म्हणाली.

आईकडे शेवटच्या प्रेमळ दृष्टीने बघत तिचा हात हातांत घेऊन यशवंत म्हणाला, 'आई! तू आपली माझ्याजवळ बस, म्हणजे पुरे, तू जवळ असलीस म्हणजे झाले.'

यशवंताचा एकेक शब्द आईच्या व आम्हा सर्वांच्या हृदयास घरे पाडीत होता. आईला आदल्या दिवशीची आठवण झाली. भरून आले तिचे डोळे. भरून आला ऊर. तिने एकदम त्या मरणोन्मुख बाळाचे चुंबन घेतले. त्या म्लान होणा-या मुखकमलावर अश्रुसिंचन केले. 'ते पहा', प्रेमळ डोळे यशवंताने उघडले व आईकडे परमभक्तीने व प्रेमाने त्याने पाहिले.

त्यानंतर थोडा वेळ गेला व तो आमचा यशवंत 'राम राम' म्हणत आम्हांस सोडून गेला!

आई नेहमी म्हणायची, 'यशवंत पुण्यात्मा होता, म्हणून तो एकादशीच्या दिवशी देवाकडे गेला,' लहानपणी आम्ही आकाशाकडे पहात असू व तो तारा यशवंताचा असेल, असे एकमेकास दाखवून म्हणत असू. पुण्यात्म्यांचे आकाशात तारे होतात, असे वडील आम्हास सांगत. आम्हालाही ते खरे वाटे.

आज यशवंत नाही व आईही नाही; परंतु त्या मरण-प्रसंगीचे खरे उभयतांचे प्रेम, ते अमर आहे. असा थोर भाऊ व अशी थोर माता मला मिळाली होती. या विचाराने मला धन्यता वाटते. त्यांच्या नखांची सर मला नाही; मी पामर किडा; परंतु माझ्यातही काही चांगुलपणा, काही प्रेम असले तर त्याचे श्रेय त्या मातृनिष्ठ भावास व मुलांच्या शीलांस जपणा-या त्या थोर मातेस आहे. अशी आई व असे भाऊ लाभावयाला पूर्वसुकृतच लागते. 'बहुता सुकृतांची जोडी' पदरी असावयास हवी. सत्संगती लाभावयास जशी पुण्याई लागते, त्याप्रमाणे थोर मातापितरे, थोर भावंडे मिळावयासही पुण्याई लागते; परंतु माझी असेल असे मला वाटत नाही. ईश्वराच्या कृपेची ती देणगी होती.'


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.