रात्र चोविसावी : सोमवती अवस <poem> ज्या सोमवारी अवस येते, तिला सोमवती अवस म्हणतात. त्या दिवशी सोमवतीचे व्रत घेतलेल्या ब्राम्हणांच्या सुवासिनी बायका पिंपळाची पूजा करतात. सोमवारी अवसेला कोणत्या तरी १०८ वस्तू देवाला वाहावयाच्या असतात. मग पुढे १०८ विडे, १०८ आंबे, १०८ रुपये, १०८ दिडक्या, १०८ केळी, १०८ खण, १०८ पेढे, १०८ नारळ, १०८ लुगडी ज्याला जशी ऐपत असेल, त्याप्रमाणे देवाला द्यावयाचे. दान करावयाचे, अशी घटना आहे. ज्याचा जो उपाध्याय असेल, त्याला हे सारे मिळते. परंतु तो उपाध्यायही सर्व स्वतःच्या घरीच ठेवीत नाही. पारावर इतर उपाध्येमंडळींत तो ते वाटतो. ही पद्धत फारच सुंदर आहे. त्यागावर ती उभारलेली आहे व तीमुळे उपाध्येमंडळींत परस्परांचा द्वेष-मत्सरही करण्याला अवकाश राहात नाही.

माझी आई जेव्हा एकत्रात होती, भरल्या घरात श्रीमंतीत होती, तेव्हाच तिने सोमवतीचे व्रत घेतले होते. १०८ पावल्या, १०८ विडे, १०८ पेढे अशा चांगल्या सोमवती तिने त्या वेळेस घातल्या होत्या; परंतु आता गरिबी आली होती. तिलाच नेसावयास लुगडे नव्हते; तर १०८ लुगडी कोठून देणार? तिलाच खावयास नव्हते, तर ती काय देणार? सोमवतीचे व्रत एकाएकी सोडता येत नाही. घरात पतीजवळ तरी कोणत्या तोंडाने ती मागणार? पतीजवळ काय होते?

नाताळची सुट्टी असल्यामुळे मी घरी होतो. सोमवती आली होती. मी आईला विचारले, "या सोमवतीला तू काय घालणार? काय ठरविले आहेस? जानकीवयनी १०८ सुपाऱ्या-ओल्या सुपाऱ्या घालणार आहेत." आई म्हणाली, "बाळ, १०८ पोफळे माझी घालून झाली आहेत. मागे सीता आत्याने पाठविली होती." "मग तू काय घालणार आहेस? दोन दिवस तर राहिले सोमवतीला. काही ठरवावयास हवे ना! आई! १०८ गूळ म्हणजे का १०८ गुळाच्या ढेपा वाहावयाच्या! १०८ तेल म्हणजे का १०८ तेलाचे डब द्यावयाचे!" आई म्हणाली, "कोणी १०८ डबे दिले, तरी हरकत नाही. परंतु गरीब असला, तर तो ठरवितो, की १०८ अदपाव देईन; १०८ पावशेर देईन किंवा एकदम सवा मण गूळ, सवा मण तेल असेही देतात. त्यात वाटेल तसे १०८ भाग बसवावे." मी विचारले, "आई! तू १०८ अदपाव गूळ घातलेस, तर?" आई म्हणाली, "श्याम! घरात विष खावयास दिडकी नाही, गळफास लावायला सुतळीचा तोडा नाही. कोठून आणावयाचे पैसे? झाड का आहे आपल्या अंगणात? हलविले की पडले पैसे! आपण गरीब आहोत, श्याम!" मी म्हटले, "# आवळे घातलेस, तर?" "बाळ १०८ आवळे एकदा मी घातले होते. सोवलीहून त्यांनी आणले होते. आपला सोवलीचा तुकाराम नव्हता का, त्याने दिले होते." आई म्हणाली. "आई! १०८ चिंचोके घातले, तर नाही का चालणार?" मी हसत हसत विचारले. आई म्हणाली, "हो, चालतील तर काय झालं! पण-" "पण काय लोक हसतील, होय ना? हसतील त्यांचे दात दिसतील! त्यांचे हसायला काय जाते? द्यायला थोडेच कोणी येते आहे? हसायला सारे, मदत करायला कोणी नाही. देव तर हसणार नाही ना? देव रागावणार नाही ना?" मी विचारले. आई म्हणाली, "श्याम! देव नाही रागावणार. अरे, देवाला विदुराघरच्या कण्यासुद्धा आवडल्या; मिटक्या मारमारून त्याने खाल्ल्या. सारखे ताट चाटीत होता, तरी त्याची तृप्ती होईना. देवाने सुदाम्याचे पोहे कसे खाल्ले, जसा अधाशी व उपाशी! रुक्मिणीला एक मूठ देण्यास तयार होईना. देव उपाशीच असतो. प्रेमाने त्याला कोण देतो? लाखांत एखादा! प्रेमाने दिलेलेच त्याच्या पोटात जावयाचे. भुकेल्या देवाला द्रौपदीचे पान खाऊन ढेकर आली. देवाला प्रेमाने द्या. ते त्याला दुधाच्या समुद्रापेक्षा थोर आहे. शबरीची उष्टी बोरे. ती कशी खाल्ली रामाने? तू वाचले आहेस ना? देवाला सारे चालते. त्यात भावभक्तीचे तूप ओतलेले असले म्हणजे झाले. त्यात हृदयाचा ओलावा असला, म्हणजे झाले. मग चिंचोकेच काय, पण १०८ दगड जरी देवाला दिलेत, तरी त्याला खडीसाखरेप्रमाणे गोड लागतील! ते प्रेमाने दिलेले दगड तो चघळीत बसेल, शतजन्म चघळीत बसेल व म्हणेल, भक्ताने फारच अप्रतिम मेवा दिला. पटकन फुटत नाही. विरघळत नाही. एकेक खडा तोंडात धरून ठेवावयास वर्ष पुरेल. श्याम! देवाला रे काय? त्याला काहीही द्या; परंतु आपण जे देऊ ते देताना त्यात हृदय ओतून दिले पाहिजे. श्याम! द्रौपदी, शबरी यांच्या भक्तीइतकी माझी कोठे आहे भक्ती? मला कोठे तशा भक्तीने चिंचोके भरून देता येणार आहेत? आपली नाही हो तितकी लायकी." "मग तू काय घालणार आहेस, सांग ना. ठरविले असशील काही तरी." मी विचारले. आई म्हणाली, "मी १०८ फुले वाहणार आहे. फुलासारखे निर्मळ व शुद्ध दुसरे काय आहे? फुले वाहीन, हो, मी." आई म्हणाली, "श्याम! जे वाहावयाचे, ते देवासाठी असते. ते भटजीसाठी नसते. देवाच्या पायांवर वाहिलेले फूल राहील. आपणांस दुसरे काही देता येत नाही, तर काय करावयाचे? देता येईल, ते देवाला द्यावे." "मग कोणती १०८ फुले वाहणार आहेस? आपणांकडे फुले तरी चांगली कोठे आहेत? नाही तर, आई! १०८ पानेच वाहा. १०८ तुळशीची पाने, १०८ बेलाची पाने, १०८ दूर्वा, आई! देवाला फुलांपेक्षा पानेच का, ग, जास्त आवडतात? कितीही फुले असली, तरी तुळशीपत्र, दूर्वा, बेल यांच्याशिवाय पूजा पुरीच होत नाही. विष्णूला तुळशीपत्र, गणपतीला दूर्वा, शंकराला बेल. त्यांना फुलांपेक्षा यांचीच आपली जास्त आवड कां, ग, आई?" असे मी विचारले. आई म्हणाली, "तुळशीपत्र, दूर्वा वगैरे मिळावयास त्रास नाही पडत. वाटेल तेथे होतात. थोडे पाणी घातले, की झाले. फुले म्हणजे ठरलेल्या ऋतूतच फुलावयाची. परंतु पाने आपली नेहमी आहेत. झाड जिवंत आहे, तोपर्यंत पाने आहेतच. पानांचा दुष्काळ फारसा नाही. म्हणून ऋषींनी, संतांनी देवाला पानच प्रिय आहे, असे सांगून ठेवले. ते तरी नेहमी देवाला भक्तीने वाहावयास माणसाला अडचण पडू नये. माझ्यासारख्या गरीब बाईला देवाला साधे पान वाहावयासही लाज वाटू नये. दुसऱ्यांनी देवाला वाहिलेले रुपये, खण, नारळ पाहून मला त्यांचा मत्सर वाटू नये, म्हणून देवाला पान प्रिय आहे, असे संतांनी ठरविले. श्रीमंताला आपल्या संपत्तीची ऐट वाटावयास नको व गरिबाला गरिबीची लाजही वाटावयास नको, असा या पत्रपूजेत अर्थ आहे. श्रीमंताने केवढीही मोठी दक्षिणा दिली, तरी वरती तुळशीपत्र ठेवून ती दक्षिणा द्यावयाची. हेतू हा, की श्रीमंताला आपण फार दिले, असे वाटू नये. आपण एक पान दिले, असेच त्याला वाटावे. गणपतीच्या पूजेला, हरताळकांना, मंगळागौरीला ही पत्री आधी पाहिजे. ही साधी, सुंदर पाने आधी हवीत. १०८ तुळशीची दळे मी पुढे केव्हा तरी वाहणार आहे." "मग या वेळेस कशाची फुले घालणार? तू तर सांगतच नाहीस!" मी अधीर होऊन म्हटले. आई म्हणाली, "मी परवा रात्री त्यांना सांगितले, की सोमवतीला चांगलीशी फुले घालावयाचे ठरविले आहे. झेंडू, पांढऱ्या चाफ्याची फुले ही आहेतच. परंतु जर चांगली सुवासिक आणता आली कोठून, तर आणावी." मी एकदम म्हटले, "म्हणून भाऊ गावाला गेले आहेत, होय." "होय, ते जालगावला गेले आहेत. तेथे बर्व्यांची मोठी बाग आहे. त्या बागेत नागचाफ्याची फुलझाडे आहेत. ती १०८ फुले मिळाली तर पाहावी, म्हणून ते लांब गेले आहेत. "आपल्याजवळ पैसे नाहीत; परंतु चालण्याचे श्रम करावयास पाय आहेत" असे ते म्हणाले." आई म्हणाली.

मित्रांनो! चाफ्याचे अनेक प्रकार आहेत. पांढरा चाफा, हिरवा चाफा, सोनचाफा व नागचाफा. पांढऱ्या चाफ्याशिवाय बाकीच्या सर्वांस सुगंध आहे. सोनचाफ्याचा वास फार असतो; परंतु नागचाफ्याचा गोड असतो. चार बाजूंना चार चार शुभ्र स्वच्छ रुंद अशा पाकळ्या व मध्ये पिवळा परागपंज असे हे फूल असते. फारच सुंदर दिसते हे फूल. गरिबीत राहूनही ध्येयवाद दाखवणारी व आचरणारी माझी आई होती. पतीला देता येणार नाही, ते त्याच्याजवळ मागून त्याला रडविणारी, खिन्न करणारी ती नव्हती. त्याला लाजविणारी, खाली मान घालावयास लावणारी ती नव्हती. त्याच्या जवळ साधी फुलेच मागणारी, परंतु ती खटपट करून दूरवर जाऊन चांगली पाहून आणा, असे सांगणारी, पतीलाही ध्येयवाद शिकविणारी, देवासाठी झिजावयास लावणारी अशी ती साध्वी होती.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.