श्रीदत्तप्रभूची भूपाळी

दत्तदिगंबरा, ऊठ करुणाकरा

संपादन

दत्तदिगंबरा, ऊठ करुणाकरा । पहाट झाली पुरे झोप आता ।
भक्तजन हे उभे वाट पाहती सभे । दर्शने देई त्या शीघ्र शांता ॥ध्रु.॥

अरुण तम दूर करी कुंकुमे नभ भरी । बापडी ही उषा पदर पसरी ।
गंग खळखळ करी त्वद्यशे जगभरी । मंद वाहे कशी अनिललहरी ॥१॥

वनगंधर्व हे सुस्वरे गाइती । मोर केकारवे नृत्य करिती ।
मुनिकुले गर्जती वेदमंथगिरा । ऊठ बा श्रीधरा राधु पठती ॥२॥

षट्‌पदे पद्मदली गुंजती प्रियकरा । भेटती ही मुद्रा चक्रपिल्ली ।
रंग कष्टी उभा पाहू दे मुखप्रभा । लोळू दे सतत बा चरणकमळी ॥३॥

पहाटेसी उठोनि भक्त

संपादन

पहाटेसी उठोनि भक्त हर्षुनिया चित्ती ।
दत्तगुरुप्रति भेटूं येती सह्याद्रीवरती ॥ध्रु.॥

कृतवीर्यात्मज सहस्त्रबाहू अर्जुन तो पुढती ।
कयाधुसुत जो भागवतोत्तम प्रहलाद सुमती ॥१॥

ययातिसुत यदु ज्याच्या वंशा देवही वंदीती ।
मदालसेचा नंदन चौथा अलक जया म्हणती ॥२॥

सुरतपानामक भूसुर मुनिवर विष्णुदास सुमती ।
अन्यहि येती सुरमौनितती करिती ते प्रणती ॥३॥

अनसूयेच्या बाळा दत्ता करितो तुज विनती ।
उठी उठी विमला, अरुण उदेला सरली हे राती ॥४॥

मंगलधामा मेघश्या,मा, उठी उठी तु निगुती ।
अरुण उदेला, प्रकाश पडला पक्षी गलबलती ॥५॥

कुंकुंम माखुनि प्राचीकामिनी हर्षुनि आत्मपती ।
येतो म्हणुनि ये लगबगुनी लाटीनम पुढती ॥६॥

द्विजाती उठती वेदा पुढती वासुदेव प्रार्थी ।
उठी उठी दत्ता श्रीगुरुनाथा दावी सुखदीप्ती ॥७॥

उठि उठि बा दत्तात्रेया

संपादन

उठि उठि बा दत्तात्रेया । भानु करु पाहे उदया ।
करणे दीनांवरती दया । चरण दावे वेगेसी ॥ध्रु.॥

मंद वायूही सूटला । पक्षी करिताती किल्बिला ।
दीपवर्ण शुभ्र जाला । पूर्व दिशा उजळली ॥१॥

करुनि कृष्णेचे सुस्नान । घेऊनि पूजेचे सामान ।
सकळा लागले तव ध्यान । कपाट केव्हा उघडेल ॥२॥

आले देवादिक दर्शना । त्यांच्या पुरवाव्या कामना ।
संतोषोनि आपल्या मना । तीर्थप्रसाद अर्पावा ॥३॥

गुरु त्रैमूर्ति साचार । करिसी पतितांचा उद्धार ।
म्हणुनि धरिसी हा अवतार । संकटीं भक्तां रक्षिसी ॥४॥

रामदास लागे पायी । मागे इच्छा हेचि देई ।
तूचि माझी बाप मायी । प्रतिपाळावे भक्तां।सी ॥५॥

उठी उठी बा मुनिनंदना

संपादन

उठी उठी बा मुनिनंदना । भक्त पातले दर्शना ।
त्यांची पुरवी तू कामना । पाही नयन उघडूनी ॥ध्रु.॥

उघडुनिया करुणादृष्टी । दासा धरी आपुले पोटी ।
नको येऊ देऊ हिंपुटी । घाली कंठी मिठी हर्षें ॥१॥

हर्षे तुझे पदी रंगले । दारागारा विसरले ।
निजदेहा न भुलले । विनटले निजभावे ॥२॥

निजभावे येता शरण । लपविसी का बा चरण ?
जेणे तरती दुष्टाचरण । मग मरणभय कैचे ? ॥३॥

नको करु निष्ठुर मन । शीघ्र देई आश्वासन ।
तू अससी करुणाघन । तापशमन करि शीघ्र ॥४॥

उठी उठी बा सद्‌गुरुराया । उठी उठी करुणालया ।
उठी उठी वा चिन्मया । निजमाया आवरी ॥५॥

उठी उठी श्रीदत्तात्रेया, श्रीपादश्रीवल्लभा सदया

संपादन

उठी उठी श्रीदत्तात्रेया । श्रीपादश्रीवल्लभा सदया ।
श्रीनृसिंहसरस्वती गुरुवर्या । दर्शन देई भक्तांदसी ॥ध्रु.॥

पंच पंच उषःकाल जाहला । अरुणोदय सप्तपंच धाटिला ।
अष्टपंच प्रातःकाला । उदया पावे रवि पूर्ण ॥१॥

आले अमरेंद्रादि अमर । संत साधु मुनिवर ।
समग्र आले नारीनर । कांकड आरती पहावया ॥२॥

नमिता पूर्ण मनोरथ होती । त्रिविध ताप समूळ हरती ।
पूर्वज समस्त उद्धरती । कांकड आरती देखिलिया ॥३॥

वेगे उठती सद्‌गुरुमूर्ती । सकळिक पदांबुज वंदिती ।
स्तवनी ध्यानी ओवाळिती । विश्वव्यापक परमात्मा ॥४॥

गुरुत्रैमूर्ति आश्रम घेऊन । तरुवरीं ब्रीदरक्षणार्थ राहुन ।
स्मरता तारिसी जन संपूर्ण । रक्षिसी गुरुभक्त सर्वदा ॥५॥

उठी उठी बा आत्मया

संपादन

उठी उठी बा आत्मया । चिन्मया दत्तात्रेया ।
सोडुनिया गुणमय शय्या । जागृत हो अपसैय्या ॥ध्रु.॥

झाली बा प्रबोध पहांट विवेक हा अरुण ।
आला उजळित आशा आता उगवे चित्किरण ॥१॥

फिक्कट पडला व्यवहारेंदु वैरि निशाचर ।
कामादि हे लपले पाहुनि प्रकाश हा थोर ॥२॥

दुस्तर्कादिक दिवाभीत दडले ते ह्या वेळी ।
दुर्वृत्ती ह्या तारा गगनी मावळल्या सकाळी ॥३॥

शमादि विप्र पुढे सादर राहति सांडुनिया दर ।
उठी उठी बा तू निजरुपा दावी ह्या सादर ॥४॥

रागद्वेष मलोत्सर्गा करुनि आला पुढती ।
वासुदेवा भेट दे हा करिताहे प्रणती ॥५॥

उठी सत्त्वर प्रभुवरा यतिवरा

संपादन

उठी सत्त्वर प्रभुवरा यतिवरा । स्नानासी उशीर जाहला ।
देवा स्नानासी उशीर जाहला । पाहे स्वामि दयाळा ।
त्रिभुवन पाळा । अरुणोदय जाहला ॥ध्रु.॥

कर जोडुनी सुरनर मुनिवर उभे महाद्वारीं । देवा उभे महाद्वारी ।
द्यावे दर्शन श्रीहरि नरहरी । सद्‌गुरु अवधारी ॥१॥

सद्‌गुरु मूर्ती अनंत कीर्ति श्रुति वर्णिती पाही ।
देवा श्रुति वर्णिती पाही ।
स्मरणी तारक निज सुखदायक । भक्तांत लवलाही ॥२॥

ऐकुनी वाणी चिन्मय खाणी । उठता विश्वात्मक तारु ।
सद्‌गुरु विश्वातमक तारु ।
सर्वही ध्यानी वंदन करिती । गुरुवर कल्पतरु ॥३॥

काषायांवर भस्मभूषणे धारण रुद्राक्षाभरणे ।
विलसती रुद्राक्षाभरणे ।
दंडकमंडलु, गदा, पद्म, । शंख, चक्र, शोभती पूर्णें ॥४॥

किरीटकुंडलमंडित षड्‌भुजमूर्ती कीर्ति सांवळी ।
प्रभूची मूर्ती कांति सांवळी ।
नमिता श्रीगुरु भक्त दत्त सतत पदी । नांदवि तात्काळी ॥५॥

पाहे पाहे सद्‌गुरुमूर्ती

संपादन

पाहे पाहे सद्‌गुरुमूर्ती । त्रिगुणात्मका त्रैमूर्ती ।
परमात्मया त्रैमूर्ती ।
विश्वजीवना अनादिमूर्ती । कृपादृष्टीने पहावे ॥ध्रु.॥

श्रीगणपति शिव विश्वेतश्वर । चिदंबरेश्वर परमेश्वर ।
चिदंबरेश्वर परमेश्वर ।
श्रीअविमुक्तेरश्वर कोटेश्वर । संगमेश्वर योगिनी निष्ठती ॥पाहे॥१॥

श्रीअमरेश्वर शक्तीवश्वर । प्रयागेश्वर वरदेश्वर ।प्रया०।
श्रीसिद्धेश्वर कामेश्वर । शिवपंचायतन विराजे ॥पाहे॥२॥

श्रीपापविमोचनेश्वर । शुक्लेिश्वर नंदिकेश्वर ।शुक्ले०।
द्विशक्तीम पन्नग मारुती । चक्र आदिमाया श्रीजाह्नवी ॥पाहे॥३॥

महाकाळेश्वर सर्वेश्वर । अन्नपूर्णा सुरतरुवर ।अन्नपू०।
श्रीरामचंद्र योगेश्वर । रामेश्वर श्रीकमला ॥पाहे॥४॥

श्रीनारायणस्वामी यतीश्वर । गोपाळस्वामी अखिलेश्वर ।गोपा०।
कृष्णानंद यतिपति खगेश्वर । लक्ष्मीनारायण सहित ॥पाहे॥५॥

श्रीविठ्ठराई रुक्मिणी । हरिहरब्रह्मेश्वर सगुणी ।हरिहर०।
वसे मृत्युंजय सुरादि शशीतरणी । भूत्रिभूवनीं अनुपम्य ॥पाहे॥६॥

श्रीब्रह्मदेव माधवेश्वर । विश्वंूभरेश्वर सर्वभूतेश्वर ।विश्वंं०।
श्रीउमामहेश्वर स्वामीकार्तिकेश्वर । काळभैरव क्षेत्रपाळ ॥पाहे॥७॥

श्रीकृष्णानदी संगमी । कामधेनु सिद्धवरदभूमि ।काम०।
वसतीस्वामी कल्पद्रुमी । प्रबलाश्रय तो अखिलांचा ॥पाहे॥८॥

सुरेंद्रादि निर्जर प्रीती । ऋषि योगी मुनिजन तप तपती ।ऋषि०।
श्रीप्रभु देती चतुर्विध मुक्तीि । आरती करितां गुरुभक्त ॥पाहे॥९॥

उठी उठी बा श्रीगुरुवरा

संपादन

उठी उठी बा श्रीगुरुवरा । श्रीशेषशायी श्रीधरा ।
श्री विधि हरिहरा सुरवरा । श्रीदत्तात्रेयमूर्ती यतिवरा ॥ध्रु.॥

आले संत सनकादिक । सनकनंदन श्रीशुक ।
सनत्कुमार पुंडरिक । सनत्सुजात सनातन आले शौनक ॥उठी०॥१॥

अलर्क यदुवर प्रह्लाद । श्रीव्यास सप्तनऋषि नारद ।
रैवतकाची मैत्री रुक्मांगद । आले जयविजय कुमुदनंद सुनंद हो ॥उठी०॥२॥

आले अंबऋषी प्रह्लादन । श्रीभीष्मदा लभ्य सुबिभीपण ।
पराशर योगी मुनी सिद्ध पूर्ण । आले चतुर्दिशेचे भक्त संपूर्ण हो ॥उठी०॥३॥

गंधर्व अप्सरा किन्नर करितां नृत्य सुस्वरें तुंबर ।
उठवुनि प्रार्थी गुरुभक्त प्रभुवर । प्रेमालिंगन देई सर्वां अभयवर हो ॥उठी०॥४॥

उठि उठि दत्तात्रेया, करुणासिंधु कृपालया

संपादन

उठि उठि दत्तात्रेया । करुणासिंधु कृपालया ।
उठवि माता अनसूया । प्रेमें टाळ्या पिटूनियां ॥ध्रु.॥

सप्त पंचम अरुणोदय । जाला स्नानाचा समय ।
भानुप्रकाश होऊ पाहे । रविरश्मिा दाटल्या ॥१॥

उठले साधकांचे वृन्द । करिति तव नामाचा छंद ।
हृदयी ध्याती ब्रह्मानंद । प्रेमभावे करुनी ॥२॥

व्यास वाल्मिकि नारदमुनि । आदि करोनि सर्व मुनी ।
उभे राहिले आंगणी । दर्शनासी पातले ॥३॥

गंगा यमुना सरस्वती । तुंगभद्रा भागीरथी ।
मणिकर्णिका भीमरथी । स्नान घालूं पातल्या ॥४॥

इंद्रचंद्रादि सुरगण । आले दर्शनालागून।
करिती स्तोत्र अनुवादन । कीर्ति तुझिया नामाची ॥५॥

ऐकुनि मातेची करुणा । उठला साधकांचा राणा ।
निरंजनाचिये मना । प्रेमानंद दाटला ॥६॥

ऐका भोळे भाविकजन

संपादन

ऐका भोळे भाविकजन । नित्य करा गुरुचिंतन ।
महादोष होती दहन । स्मरणमात्रें करुनिया ॥ध्रु.॥

गुरुसेवा घडेल ज्यासी । काळ दंडीना तयासी ।
अंती जाय मोक्षपदासी । गुरुस्मरण केलिया ॥१॥

गुरु भक्तीमचा दाता । गुरु देहासी चालविता ।
हरे पातकाची व्यथा । गुरुस्मरण केलिया ॥२॥

गुरु ज्ञानाचा सागरु । गुरु धैर्याचा आगरु ।
गुरु नेईल पैल पारु । नामस्मरण केलिया ॥३॥

गुरु मायेचे निरसन । गुरु मायेचे अंजन ।
गुरुचे अगाध महिमान । मुखे कित्येक वदावे ॥४॥

गुरु संतांचे निजगुज । गुरु मंत्रांचे निजबीज ।
गुरुचे घ्यावे चरणांबुज । अनेक तीर्थें त्या ठायी ॥५॥

जयजय गुरु मायबापा । चुकवी चौर्‍यांशीच्या खेपा ।
भक्तराज ध्यातो गुरुबापा । ब्रह्मी लय लावुनिया ॥६॥


  हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.  
 
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.