श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर

[ काव्येतिहास-संग्रह. ]

[२१.]

श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर,



कारभारीपक्षांच्या हकीगतीसुद्धां.

हे प्रकरण

अर्थ निर्णायक व अवांतर माहितीच्या टीपांसह

काशिनाथ नारायण साने बी. ए. (डेक्कनकॉलेज.)

यांणीं

प्रकाशित केले.

पुणे येथें

'ज्ञानप्रकाश ' छापखान्यांत छापिले.



शालिवाहन शके १८०९.

काव्येतिहास-संग्रह. ]
[२१.]
श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर.
कारभारीपक्षांच्या हकीगतीसुद्धां.
हैं प्रकरण
अर्थनिर्णायक व अवांतर माहितीच्या टीपांसह
काशिनाथ नारायण साने, बी. ए. (डेक्कन कोलेज.)
यांणीं
प्रकाशित केले,
________
शालिवाहन शके १८०९.




महाराष्ट्राच्या भाषेचा व इतिहासाचा आस्थापूर्वक

अभ्यास करूं पाहणान्या सज्जनांस

हा ग्रंथ अर्पण करितों.


ग्रंथप्रकाशक.





॥ श्री ॥
श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर
कारभारी पक्षाच्या हकीगती सुद्धा.

*[]



 श्रीगणेशायनमः॥ श्रीमंत कैलासवासी नारायणराव साहेब यांची हकीगत कशी काय जहाली, याचा मजकूर. श्रीमंत कैलासवासी थोरले माधवराव साहेब राज्य करीत असतां पुढे काही दिवसांनी त्यांची प्रकृति बिघडली म्हणून थेऊरचे णपतीस आराम होण्या करितां गेले. त्यांचे बराबर नारायणराव साहेब सर्व मुत्सद्दी तमाम सारे गेले होते. तेथे गेल्यावर प्रकृति अति अवस्था बिघडली. राजश्री खाराम बापू व त्रिंबकराव मामा व नाना फडणीस यांस बोलावून सांगितले की, या विकृतींतून पार पडतो असे दिसत नाही. त्यास श्रीमंत राजश्री दादासाहेब यांचा बंदोबस्त आम्ही आज पावेतों ठेविला होता. आतां आमचे पश्चात् कसा राहील? त्यांत चिरंजीव राजश्री बाळासाहेब यांचा कारभार फारच भोळवट याजकरितां त्यांस लहानपणी नारायणराव साहेब म्हणत होते [?] तो नेत्रांस पाणी आले. मग खाराम बापू याणी विनंती केली की, आपण तिळप्राय चिंता न करावी. हे कर्मट प्रायश्चित [?] एतद्विषयी मनांत न आणावें. श्वर आपल्यास पार पाडील. कदाचित् तशी गोष्ट जहाली तर आम्ही चार मुत्सद्दी आहोत. सरकारचे आज्ञे प्रमाणे सर्व बंदोबस्त राखूं. श्रीमंत राजश्री नारायणराव साहेब यांजकडून राज्य असेच चालवूं.
 असे बोलल्यावर दोन चार रोजांनी रावसाहेब कैलासवासी जाल्याउपर बारा दिवस होऊन नंतर श्रीमंत राजश्री नारायणराव साहेब यांस साताऱ्याहून वस्त्रे आली. [ त्या वरून ] श्रीमंत नारायणराव साहेब यांचे मनांत आपणच धणी [ असे आलें.] सर्व मुत्सद्दी सुद्धां पुण्यास स्वारी आली. कारभार करूं लागले. त्यांजपाशी लहान पणापासून बाबाजी र्वे या नामें होता तो मोठ्या कारभारांत नेमला. तो जे करील तें प्राधान्य. मुत्सद्दी यांचे नारायणराव साहेब यांचे मनांत नी [?] ऐकूं नये. श्रीमंतांची मर्जी बाबाजीवर पूर्ण. चार महिने बरा वाईट कारभार केला. मग सौ। आनंदी बाई साहेब यांस वैषम्य शल्य जहालें कीं, नारायणराव साहेब राज्य करितो हें ठीक नाहीं. सबब नारायणराव साहेब यास ठार मारण्याची मसलत करावी. सबब खरगसिंग व सुमेरसिंग जमादार परदेशी सरकारचे वाड्यांत पांच हजार गारदी चौकी पहाऱ्यांत श्रीमंततांपाशी होते व खिजमतगार हुजरे तुळाजी पंवार व चापाजी टिळेकर दोनशे हुजऱ्यांत मुख्य होते, त्यां पैकीं पवार व दोन जमादार यांस बोलावून आणून विचारलें कीं, "तुम्हांस मनसोबा सांगतें. बाहेर बातमी फुटूं देऊ नये. तुम्हांस बक्षीस जे मागाल तें देईन. तुमची खबरदारी समजली पाहिजे मग मी सांगेन." त्याणी विनंती केली की, आम्ही अगोदर काय सांगावें? आपले मनांत काय आहे ते समजले पाहिजे. त्या सारखी विनंती करूं. मग आणभाष, बेलभंडार घेऊन सांगितले की, नारायणराव साहेब यांस मारावयाचा मनसोबा आहे. मग खरगसिंग व सुमेरसिंग व तुळाजी पवार यांची नांवें घातली. तिघांनी विनंती केली की, आम्हांस दादासाहेब यांची स्वदस्तुरची याद मारावा अशी आणून द्यावी. म्हणजे आम्ही त्याची तजवीज करूं. मग आनंदी बाईंनी याद लिहिली. दोघे जमादार व तुळाजी पवार यांची नांवें घातली. एके दिवशीं याद घेऊन देवघरांत दादासाहेब ध्यानस्थ बसले होते, त्यांची स्नान संध्या तपश्चर्या विसर्जन होतांच याद पुढे ठेविली. ती दादासाहेब यांनी वाचून पाहून बोलले की, तूं काय म्हणतेस? आनंदी बाई यांजला सांगितले की, तो परकी नाहीं. प्रत्यक्ष पुतण्या! तो पुत्राप्रमाणेच आहे. कांहीं गैर रीतीची वागणूक होईल आणि राज्यास अपाय होत असल्यास बंदोबस्त करावा. परंतु मारावा अशी अक्षरें कदापि घालणार नाही. या खेरीज कोणती गोष्ट असल्यास बोलावी. तुझे मनांत राज्य करावे असे असल्यास धरावें अशी अक्षरें घालितों. मग आनंदी बाई बोलली की, आडवें पोर आल्यास त्यास कापून टाकावे लागतें. अशा गोष्टी रागे भरून बोलली. मग धरावा अशी अक्षरे बाईचे आग्रहास्तव घातली. मग ती याद आनंदी बाई याणी घेऊन देवघरा बाहेर वाचली. कलमदान बराबरच होतें. एक अक्षर फिरवावयाचे [ होतें.] 'ध' चा 'मा' केला. 'मारावा' अशी आक्षरें स्पष्ट जहाली. ती याद जमादार व पंवार यांजपाशी दिली. आणि सांगितले की, "अक्षरें खुद्द खाशांचे हातची आहेत." मग ती याद घेऊन मसलतीस लागले.
 पुढे नारायणराव कारभार करूं लागल्यास सहा महिने झाले. अवघा कारभार नऊ महिने जहाला. मग जमादार व पवार यांणी झाडून वाड्यांत फितूर केला. पांच हजार गारदी लोक चौकी पाहाऱ्याचे तामाम सारे परदेशी होते. तो फितूर होतांच हे वर्तमान चापाजी टिळेकर व दुसरे आणखी हुजरे यांस समजलें की, "वाडयांत आनंदीबाईसाहेब यांचा फितूर दिसतो. फितुरांत तुळाजी पवार व दोन जमादार आहेत." त्याचा अगोदर बंदोबस्त करावा. म्हणोन नारायणराव यांस विनंती केली. तेव्हां बोलिले की, "बंदोबस्त करूं. त्यांनी काय करावयाचे आहे.?" हे वर्तमान फितुराचे सखारामबापू व त्रिंबकरावमामा व नानाफडणीस व हरीपंत फडके यांनी [ ऐकून ] नारायणराव यांस विनंती केली की, "वाड्यांत फितूरच दिसतो. आमचे स्वामी ऐकत नाहीत. बाबाजी जें करतील तें प्रमाण. परंतु आधी बंदोबस्त करावा." इतके सुचविले असतां दोघांनी[] मनावर घेतले नाहीं. पुढे आठ चार दिवशीं मारणार तो सगळे गारदी दरवाज्या बाहेर येऊन बोलले की, आमचे तरफेचा[] सर्व हिशोब करावा. आम्हांस चाकरी करावयाची नाहीं." अशी बोलणी घातली. मग चापाजी टिळेकर यांणी पुन्हा विनंती केली की, गारदी लोक सर्व एकेठिकाणी जमले असा अर्थ नाहीं. परंतु फितूर खास आहे. याची उपेक्षा करूं नये. याचा बंदोबस्त करावा. पुढे ज्या दिवशी मारणार ते दिवशी प्रातःकाळी स्वारी नारायणराव साहेब यांची पर्वतीस गेली होती, तेथें स्नानसंध्या भोजन वगैरे करून स्वारी गणेशखिंडीत कुलाबकर राघोजी आंग्रे सरखेल त्यांस पूर्वापार सामोरे जावयाचा शिरस्ता म्हणोन गेले. तों तेथे आंग्रे यांची भेट जहाल्यानंतर श्रीमंत व आंग्रे हे लकडी पुलापर्यंत आले. तेथें चापाजी टिळेकर याना विनंती केली की, "आज स्वारी बाहेर आली. तर आपणांस ठार वाडयांत मारण्याचा बेत केला आहे, सबब स्वारी पर्वतीस जावी, आणि वाड्यांत बंदोबस्त करावा. नंतर वाड्यांत स्वारी जावी. हे नीट असे." इतके सांगितले असतां मनावर घेतले नाहीं. "तिसरे प्रहरीं बंदोबस्त करूं" म्हणोन बोलले. स्वारी आली. आंग्रे आपले वाडघांत गेले.
 दोन प्रहरीं दिवाणखान्यांत जाऊन झोपाळ्यावर बसले आणि विडा खाऊं लागले. तो जमादार यांणी गारदी शिपाई वाड्यांत घेऊन दरवाजे लाविले. आणि जिकडे तिकडे "दीन दीन" केली. हे वर्तमान नारायणराव साहेब यांजला लागतांच घाबरे जाहाले. आतां कसे करावे? चापाजी टिळेकर यांणी विनंती केली कीं, "या मागे मी आपल्यास आजपर्यंत विनंती करितां दमलो. परंतु स्वामींनी मानिले नाही. अजून तरि विनंति करितो ती ऐकावी. वाड्यांत भुयार आहे. भुयारांतून माझा हात धरून चलावें. मी आपल्यास बाहेर काढितो. मग श्रीमंत नारायणरावसाहेब बोलले की, "भुयारांत शिरावयास आम्हांस धीर होत नाहीं. दादासाहेब यांचा फितूर आहे. त्यांजकडेसच जाऊं. म्हणजे ते मारूं देणार नाहीत. कदाचित ते धरतील." मग तेथून नारायणरावसाहेब व चापाजी टिळेकर हे दोघेजण दिवाणखान्यांतून उतरून थोरले चौकांत आले. तो त्यांची पूजेची गाय मध्ये आली. तो तिकडून खरगसिंग व सुमेरसिंग व तुळाजी पवार हे तिघेजण पाठीमागे तरवारा नागव्या करून धावत आले. तो पुढे गाय देखिली आणि गाय ठार मारिली. तो इतक्यांत धांवत नारोबा फाटक[] पुढे आला. त्याजला तोडून टाकतात तो पर्यंत नारायणरावसाहेब जेथे दादासाहेब बसले होते तेथें धांवत जाऊन गळ्यांत मिठी घातली. आणि बोलूं लागले की, "आतां मला वांचवावें." इतक्यांत पवार व जमादार जवळ येऊन भिडले. दादासाहेब यांणी 'थांबा' म्हणोन हात केला. मग ते बोलले की, "आतां याला वाचवूं! हा उद्यां आमची मुले माणसे ठार मारील. 'मारावा' अशी अक्षरें तुमचे हातची आहेत. आतां थांबा कसे म्हणतां? पुढे लोटून द्यावा नाही पेक्षां दोघांस ठार मारूं." असे बोलून नारायणराव साहेब यांजवर हात टाकिला. तो दादासाहेब याची पागोट्याची कंगणी[] तुटली. हे पाहून दादासाहेब भयाभीत जहाले. गळ्याजवळचा हात सोडून पुढें लोटून दिला. तो चापाजी[] टिळेकर याने नारायणराव साहेब यांचा बंदोबस्त करावा म्हणोन आंगरख्यासुद्धां आंगावर पडला. मग बोलला की, "आधीं मला मारावें." असे ह्मणतांच तुळाजी पंवार यांणे दोघांचेही तीन तुकडे केले. इतक्यांत राजश्री इच्छाराम ढेरे हुजूरचे पागेदार पुढे आले. त्यास तेथेच ठार मारले, गर्दी वाड्यांत जाली.
 हे वर्तमान शहरीत कळले की, नारायणराव साहेब यांस गर्दी करून धरिले. मग सखाराम बापू व त्रिंबकराव मामा व नाना फडणीस व हरिपंत फडके व राघोपंत सीतकार [?] व राघोजी आंग्रे असे एकत्र मिळून दरवाज्यापाशी आले. तो फौज फार दरवाज्यापाशी जमली. तो दरवाजे बंद. वाड्यांत जाण्यास रस्ता नाही. आंग्रे यांणी सांगितले मोठी शिडी लावून दरवाजा पाडावा आणि नारायणराव साहेब यांस सोडवावें. इतक्यांत दरवाजेकरी याणें हाक मारली कीं, "दरवाजे कशास फोडतात. नारायणराव यास ठार मारिलें." हे ऐकतांच सर्व मुत्सद्दी व आंग्रे श्रमित[] होऊन आतां वाडयांत जाऊन काय करावें? दादासाहेब यांस कसेही करून धरावें.
 मग झाडून सारे तमाम मुत्सद्दी एक ठिकाणी बसून विचार केला की, आत दादासाहेब यांस रक्ताचा टिळा लावून गादीवर बसवावे[]. असे बोलून फडावर जाऊन मुत्सद्दी वगैरे यांची कचेरी केली. आणि चौघडे वगैरे वाद्ये सुरू जहाली. अशी खुषी वाड्यांत मंडळीस जहाली. व सौा आनंदीबाई यांणी साखरा वाड्यांत वांटिल्या. नंतर चार घटकांनी दिल्लीदरवाजा उघडला. ते वेळेस कैलासवासी यांची स्त्री सौ गंगाबाईसाहेब प्रातःकाळी आपले माहेरी[] गेली होती. ती दरवाजा उघडतांच धावत आली. आणि नारायण राव साहेब पडले होते तेथे येऊन बसली. आणि सती जाण्याचा मनोदय दिसून आला. तो इतकियांत भवानराव प्रतिनिधीही वाड्यांत आले. तो सरकारचे बरोबर प्रतिनिधी सहीत हजार माणसें नागव्या तरवारी करून फडावर[१०] आले. आणि दादासाहेब यांस बोलले की, "तुम्ही पेशव्यांचे कुळीं जन्म घेऊन हें कर्म अघटित केलें. हे फार वाईट!" असे नाना प्रकारचें बोलून म्हणाले की "तुमचें तोंड पहावयाचें नाहीं." इतकें बोलून माघारी आले. नंतर त्रिंबकराव मामा हे वाड्यांत येऊन दादासाहेब यांस पुसलें कीं, "नारायणराव याचा मुर्दा आहे त्याचा विचार काय आपण धरिला! व आपण जे केले ते चांगले केले!" तेव्हां दादासाहेब यांणी सांगितले, "याचे दहन करावें." त्यावेळेस कोणी ब्राम्हण येईना१०[११]. दहशतीमुळे भयाभीत जाले. तेव्हां दादासाहेब बोलिले की, "कसेही करून याचें दहन करावे." मग मामा बाहेर येऊन पांच तेलंग बोलावून पांच रुपये हातावर ठेविले, वाड्यांत घेऊन आले. तो गंगाबाईचा निश्चय बरोबर जाण्याचा पाहून आनंदीबाई यांस बहुत संतोष जहाला. नंतर गंगाभागिरथी पार्वतीबाईसाहेब, भाऊसाहेब यांची बायको, यांजला विचार कळतांच गंगाबाईस बोलली की, "तुजला वेड लागले! बहुत करून कुळक्षय गर्दीत जहाला. तुझी पाळी चुकली आहे. ईश्वर करूं लागल्यास राईचा पर्वत करील." अशा गोष्टी नाना प्रकारे करून सांगितल्या. परंतु मानीना. तेव्हां हाती धरून खोलीत घातली. आणि बाहेरून कडी लावली. आणि जवळ आपण बसली. मामांस सांगितले की, "मुर्दा न्यावा." या प्रमाणे काकूबाईंनी सांगितले. कारण पार्वती काकूबाई ही लहानपणापासून नारायणराव साहेब यांचा लाड बहुत करीत होती. याचे कारण की, भाऊसाहेब हे गिलच्यांचे लढाईत गर्द जहाले म्हणोन त्यांची स्त्री पार्वतीबाई पोटी संतान नाही म्हणोन बहुत श्रमी होऊं लागली. याजकरितां नानासाहेब यांणी सांगितले, "तुम्ही कष्टी होऊं नये. नारायणराव साहेब हा तुमचा मुलगा! याचे संरक्षण तुम्ही करावें. सर्व राज्यकारभार तुमचा आहे." म्हणोन पार्वतीबाईकाकू बहुत विचारवंत होती. नंतर त्रिंबकराव मामांनी झोळी करून नारायणराव साहेब यांचा मुर्दा घालून तेलंग यांच्या खांद्यावर देऊन बाहेर काढिला. पूर्वी मुत्सद्यांनी सर्व तयारी करून बसले होते. मग सर्वांनी मिळोन साहेब मजकूर यांचे दहन केले. दादासाहेब गादी सोडून दूर बसले. सुतक धरिलें.
 मग दुसरे दिवशी सर्व मुत्सद्दी येऊन दादासाहेब यांस भेटले. दादासाहेब यांणी बारा दिवस जहाल्यावर मग दादासाहेब कारभार करूं लागले. नंतर दादासाहेब यांणी वेदशास्त्र संपन्न राजमान्य रामशास्त्री यांस बोलावून विचार केला की, "कांही संगतीच्या योगे करून मजवर अभिश्राप व जनअपवाद होऊन अपकीर्ति जहाली की, निमित्य आले. आतां याचे प्रायश्चित काय?" त्याजवरून शास्त्रीबोवा यांणी साफ उत्तर केलें कीं, एतद्विषयी प्रायश्चित दुसरे नाहीं. देहांत [प्रायश्चित्त] आहे." याप्रमाणे बोलोन कुटुंबसुद्धां पुण्याहून निघोन बाईक्षेत्रापासोन तीन चार कोसांवर भुगावीं कृष्णा तीरी स्नानसंध्यादिक षट्कर्मे करून राहिले.
 नंतर दादासाहेब यांणी दोन महिने कारभार केला. गंगाबाईसाहेब गरोदर खरी, त्याजवरून आनंदी बाईसाहेब यांणी सातखणीत गंगाबाई व पार्वतीबाई यांचा बंदोबस्त करून ठेविल्या. एक दिवशी नानाफडणीस सातखणी वरून गणेश दरवाज्याकडेस जात होते. तो गंगाबाई व पार्वतीबाई काकू सातखणीच्या खिडकीत उभयतां बसल्या होत्या. त्यांणी फडणीस यांस खुणावून जवळ बोलाविलें. आणि पार्वतीबाईनें सांगितलें कीं, "गंगाबाईस दोन महिने होऊन तिसरा महिना लागला आहे. हिच्या पोटी अवतार होईल. आतां तुम्ही चार मुत्सदी आहां. याचा विचार करावा." नानांनी विनंती केली की, "कोणता विचार करावा?" मग पार्वतीबाई काकू बोलिल्या की, "दादासाहेब यांस धरावयाचा मनसोबा करावा." हे ऐकून नानांनी विनंती केली की, "आम्ही या मनसोब्यांत आहोत व आपलीही आज्ञा होत आहे. त्यापेक्षां याचा विचार होईल." अशी विनंती करून लौकर बाहेर निघोन गेले. त्या वेळेस पहारेकरी कोणी जवळ नव्हते. नाना वाड्यांत जाऊन तेच दिवशी रात्री नानांचे वाड्यांत अकरा जण मुत्सद्दी जमले होते. ते नांवनिशीवार:-

१ नानासाहेब फडणीस. १. त्रिंबकरावमामा. १ हरीपंत तात्या.
१ नारो आपाजी १ आपाजी बळवंत. १ आनंदराव पानसे.
१ बाबूराव केशव. १ कृष्णाजी बहिरव थत्ते. १ खासगीवाले.
१ विसाजी कृष्ण बिनीवाले. १ आपाजी पुरंदरे. ० लग.
--
--
--

११

 या प्रमाणे मुत्सद्दी जमा होऊन दादासाहेब धरावे असा निश्चय होऊन अकराजणांनी यादी लिहिल्या. मग त्रिंबकराव मामा यांनी सांगितले की, "पूर्वी सखाराम बापू यांचा रुकार प्रथम पाहिजे. आणि या खेरीज कोणी रुकार घालू नये." मामा वगैरे मुत्सद्दी आपआपले वाड्यांत गेले. दुसरे दिवशी सर्व मुत्सद्दी नानांच्या वाड्यांत आले. तेव्हां नानासाहेब यांणी सर्वांस विचारिले की, "यांतून कोणी फुटला असतां दादासाहेब सर्वांचे पारिपत्य करील. त्या पेक्षां गीता गंगाजळी "व फुले तुळशी सर्वांनी एक मेकांस उचलून द्यावी" आणि सांगितले की, "कोट्यावधि रुपये खर्च जहाला तरि सर्वांस करावा लागेल. " ते सर्वांनी मान्य केले. व कोणी फुटला असतां पारपत्ये करून पायांत बिड्या घालाव्या असे ठरले. नंतर नानांनी सांगितले की, "सखाराम बापू या मनसब्यात पाहिजे. तर तुमची मसलत शेवटास जाईल. त्याचे आंग दादासाहेब यांजकडे आहे." मग मामांनी उत्तर केले की, तुमचा अकरा जणांचा खंबीरपणा जहाला. त्यापेक्षां बापूंचा जिम्मा मी करितो. असे उतर मामांचें ऐकून नानांनी उतर केले कीं, "तो सगळा शहाणा, त्याचा जिम्मा तुम्हांकडेस आल्यास माझा जिम्मा बापूपाशी द्यावा." पुन्हा मुत्सद्दी आपआपल्या वाड्यांत गेले.
 दुसरे दिवशीं मुत्सद्दी सखाराम बापू सरकार वाड्यांत आले. कारभार जाहला. बापूंचा व मामांचा बेबनाव होता. सरकारचे कामाविशी मात्र बोलावे [ते] कार्या कारण. फारच वांकडेपणा होता११[१२]. कचेरी बरखास्त जहाल्यावर रात्रौ भोजन मामांनी करून सखारामबापू यांचे वाड्यांत गेले. पहारेकरी [यांणीं] बापू दिवाणखान्यांत बसले होते तेथे जाऊन सांगितले की, "मामा खाली उभे राहिले आहेत." बापू बोलले कीं, "अशी गोष्ट कशी घडेल? पूर्वेचा सूर्य पश्च मेस कसा येईल? मामा आमचे वाड्यांत कधी येणार नाहीत. पुन्हा" पहारेकरी बोलले की, "आपण म्हणतां खरें पण मामा खाली उभे आहेत." इतकें ऐकून बापू दिवाणखान्यांतून उठोन धांवत आले. तो मामांनी नमस्कार केला. मग बापू म्हणों लागले की, "मामा, सूर्योदय पूर्वेचा पश्चिमेस कसा उगवला?" मग मामांनी उत्तर केले की, "ईश्वर कृपेचा खेळ कोणास समजण्याचा नाही. कांहीं काले करून पश्चिमेसही सूर्योदय होईल यांत संशय नाहीं. ही ईश्वरी माया कोणास समजण्यासारखी नाही. आम्ही आलो खरे. तुम्हांशी चार गोष्टी बोलावयाच्या आहेत. एकांत स्थळी मक्षिकेचा सुद्धां प्रवेश नाहीं तेथें चलावें." मग बापूंचा हात धरून दिवाणखान्यांतून खोलीत गेले. मग मामा बोलिले की, "आम्ही तुम्हापाशी मागणे मागावयासि आलो आहोत. मागूं ते बक्षीस द्यावे." मग बापू बोलले की, बक्षीस मागावयाची गोष्ट निटोप्याची असल्यास बक्षीस आहे. "तर याप्रमाणे वचन द्यावे. थोरांचें वचन पाहिजे. थोर आहेत ते वचनाचे बेवचन करीत नाहीत." मग बापूंनी वचन दिल्हें. मग मामा बोलिले की, "दुसऱ्याच गोष्टी बोलावयच्या आहेत. आपणास ग्रहण करावयाचे असल्यास करावें. नाही तर आम्ही बोललों नाहीं व तुम्हीं ऐकिले नाही. या गोष्टीचे वचन असावें." मग बापू बोलले की, "आम्हांस ग्रहण जहाल्यास करूं. नाहीं तर आम्ही कांहीं ऐकिले नाहीं." याप्रमाणे दुसरे वचन दिले. मग मामा बोलले की, "ही याद आणिली आहे ती वाचून पहावी." मग बापूंनी याद पुढे वाचून पाहिली आणि बोलले कीं, "तुम्ही काय बोलतां?" त्रिंबकरावमामा बोलिले की, "या यादीवर रुकार घालावा." तेव्हां बापू बोलले की, "आम्ही रुकार कसा घालावा? आम्ही दादासाहेब यांजकडील. तुम्ही आम्हांस वचनांत घेऊन फसविलें. आमचे ध्यानांत हा मजकूर काहीच नाही." इतकें बोलोन पावघटकापर्यंत उगीच बसले. मग मामांनी उत्तर केले की, "आपली मर्जी असल्यास रुकार घालावा. आमचा आग्रह नाही. याद फाडून टाकितों. आणि आपले घरास जातो. आमचा तरी काय खोळंबा आहे? आम्ही काही बोललो नाही व तुम्ही कांही ऐकिलें नाहीं. परंतु बोलतों तें ऐकावें. बापूनी वचनाचे बेवचन केले असे होईल. थोरास वचनांत धरावे. तुम्हीं वचन दिल्हें कीं, मागाल तें देईन. याप्रमाणे करार केला, तर रुकार घालावा." मग बापू बोलले की, "आम्ही दादासाहेब यांजकडील आहो तर रुकार कसा घालावा?" मग मामा बोलले की, "तुम्ही दादासाहेब यांजकडील आहां म्हणोनच रुकार पाहिजे. आम्हांस अकराजणांस मसलती करितां येत नाहींत की काय?" मग बापू बोलले की, "वचनाचें बेवचन केले तर बापूंचे बोलण्याचे प्रमाण नाही. असा लौकिक कराल यास्तव रूकार घालतो. परंतु दादासाहेब यांस तुम्ही कसे धराल?" मामा बोलले की, "रुकार घालावा. मग सांगूं." नंतर बापूंनी खिजमतगार याजपासून कलमदान आणवून यादीवर रुकार घातला. व गीतागंगाजळी व फुलें, तुळशी, बेलभंडार मामांनी आणवून बापुंचे हातांनी उचलून घेतली. बापू बोलले की, "गंगाजळी सुद्धां जहाली. आतां दादासाहेब यांस कसें धरणार हे सांगावें." मग मामा बोलले कीं, आजच तुम्ही पुसूं नये. आमची मसलत जेथे होईल तेथें उदईक आपणांस बोलावणे येईल. तेथें यावें म्हणजे उत्तर सांगूं." इतके बोलले व मामा घरी निघोन गेले. ही बातमी दादासाहेब यांस काहीच लागली नाहीं.
 दुसरे दिवशी रात्रौ नानांचं वाड्यांत अकराजण जमले आणि बापूंसही बोलावणे पाठविलें. आणि बापूही आले. नंतर मनसोबा केला कीं, दादासाहेब वाडयांत सांपडणार नाहीत. बापू बोलले कीं, बाहेर काढिले पाहिजेत. आणि हैदराबादेस निजाम अल्ली मोंगल याची दोस्ती बंधूप्रमाणेच होती, त्यास पत्रे लिहिली की, "दादासाहेब यांणी नाराणराव साहेब यांस ठार मारिलें. हा पुत्र त्या नानासाहेब यांचा मारला नाहीं, तुमचा मारला, असे समजावे. आणि लाख फौज घेऊन आपण पुण्यावर यावें." याप्रमाणे त्यांस पत्रे लिहावी. म्हणोन बोलिले. ही मसलत अवघ्यांचे मनास आली. मग गंगाभागीरथी पार्वतीबाई काकूसाहेब यांचे नांवची पत्रे मोंगलास एक [व] पेशवे यांजकडील वकील राजश्री कृष्णराव काळे यांस एक अशी पत्रे लिहिली. वकील यांचे पत्रांत लिहिले की, "नबाबास दर कुचास लाख रुपये कबूल करून लाख फौज बालेघाटाचे सुमारे घेऊन यावें." या प्रमाणे दोन पत्रे लिहिली. रातोरात लखोटे रवाना केले. दररोज वाड्यांत येऊं जाऊं लागले.
 याजवर महिना पंधरा दिवशी जासुदाने दाखल केली. वकीलाने पत्र पाहून निजाम अल्ली यांस पाठविले, मग नबाब बोलले कीं, "नानासाहेब याचा मुलगा मारला नाहीं. आमचा मुलगा मारिला. सबब आम्हांस जरूर जाण्याची." याजवरून नबाब याणे आपली लाख फौज पुण्यावर तयार करून बाहेर डेरे दिले आणि उतरले. मग कृष्णराव काळे वकील यानें दादासाहेबांस पत्र लिहिले, "निजाम अल्ली आपलेकडेस लाख फौजेनिशी निघणार आहे. पुण्यावर मोहीम आहे." आंतून पत्रे मुत्सदी यांस पत्रे निराळी व सरकारांस निराळी. या प्रमाणे पत्रे लिहीत गेले. एका महिन्यांनी वकील यांची पत्रे घेऊन पुण्यास दादासाहेब यांस दाखल केली. दादासाहेब यांणी पत्रे वाचून पाहून सखाराम बापू व त्रिंबकराव मामा व नाना फडणीस, हरिपंत फडके यांस बलावून आणून सांगितलें कीं, वकील यांची पत्रे आली आहेत की, "निजाम अल्ली बाहेर निघाले आहेत. पुण्यावर मोहीम आहे. हे वर्तमान काय?" मग सखाराम बापू बोलले की, "वकील खोटे लिहिणार नाहीं. इकडे येण्याची बातमी खास आहे. त्यांस समजलें असेल म्हणोन लिहिले आहे. आपण काळजी करूं नये. पेशवे यांचे वेळेस मोंगल आले त्यांनी येऊन काय केले? आपण खांशी स्वारी फौज सुद्धां तयार करून तोंडावर चलावे. विपर्यास दिसल्यास पारिपत्य करूं. काय चिंता आहे?" असें बापू बोलले.
 मग हुजुरात मानकरी पन्नास हजार फौज तयार करून दादासाहेब चिरंजीव अमृतराव हे दत्तपुत्र होते ते, आनंदीबाई व सर्व मुत्सदी झाडून [बरोबर घेऊन] गारपिरावर जाऊन उतरले. जिकडे तिकडे सरंजामी व शिंदे होळकर यांस पत्रे पाठविली कीं, निजाम अल्लीवर मोहीम आहे. तुम्ही सर्वांनी फौजेनिशी यावे. तो नबाब कूच दरकूच बालेघाटाचे सुमारे आला. तो दादासाहेब कूच करून कोरेगांवचे मुक्कामी गेले. तेव्हां दादासाहेब बोलले की, "पुण्यास बाया घरी दोघी जणी आहेत. पार्वतीबाई व गंगाबाई यांचे रखवाली करितां कोण ठेवावें. कारण गंगाबाई गरोदर तीन महिन्यांची आहे." मग धोंडो खंडाजी पट्ट शिष्य होते. त्यांस मुतालकीचीं वस्त्रे शिक्के कट्यार दिल्ही. आणि सांगितले की, तुम्ही पुण्यास जाऊन वाड्याचा बंदोबस्त व शहरचा बंदोबस्त राखावा. या प्रमाणे सांगितलें. मग धोंडो खंडाजी कारभारी हे निघोन पुण्यास आले. वाडयाचा व शहरचा बंदोबस्त केला. दादासाहेब यांस मुत्सद्दी यांणी पुढे शहास गुंतविले व नबाब यांस मुत्सद्दी यांणी आंतून पत्रे पाठविली की, तुम्हीं बालेघाटावर रहावें. आमचे इकडून जशी पत्रे येतील या प्रमाणे करावें. यावर एक दिवशी रात्री मुत्सद्दी जमले. आणि यांस बापू बोलले की, "आतां बायांची मसलत कशी करावी?" दोन्ही बाया पुण्याहून पुरंदरास न्याव्यात. तो नारो आपाजी याजकडेस किल्ला आहे. तेव्हां सखाराम बापू यांणी नारो आपाजी यांस सांगितले की, तुम्हांस निरोप देववितों. तुम्ही पुरंदरास जावें आणि किल्यावर बायांस पळवून न्याव्यात. या प्रमाणे विचार करून दादासाहेब यांस मुत्सद्दी यांणी सांगितले की, "पुरंदरास खाली रामोशांचा फार दंगा जहाला आहे. त्यास नारो आपाजी यांस माघारे पाठवावें. म्हणजे नारो आपाजी बंदोबस्त करतील." त्याजवरून नारो आपाजी यांस निरोप देवविला. ते पुरंदरास आले. दुसरे दिवशी अकरा जण मुत्सद्दी एके ठिकाण जमून विचार केला कीं, "आपल्यांतून दहा जणांनी मागे फिरावें. आणि एकानें येयें रहावें. त्याने मागची मसलत करावी. येथे कोण रहातो ते बोलावे. येथे जो राहील तो आजच मेला असे समजावें." मग बापू बोलले की, "मागची मसलत आम्ही करूं. आम्हांस येथे रहाणें." तेव्हां मामा बोलले की, "तुम्हांस आम्ही निरोप देववितो. आणि आम्ही येथे रहातो. आम्ही आजच मेलों म्हणून समजावें. परंतु तुम्ही मसलत शेवटास न्यावी." दुसरे दिवशी बापूंनीं कपाळ बांधिलें. आमांश ज्वर भारी जहाला. आणि निरोप मागूं लागले की, "आमचे शरीरास समाधान नाही. आम्ही पुणे मुक्कामी जातो. बरे जहालों ह्मणजे येऊं." मग मामांनी दादासाहेब यांस विनंती केली कीं, "बापूंच्या शरीरास समाधान नाहीं. त्यांस निरोप द्यावा. बरे जहाले म्हणजे येतील." त्याजवरून दादासाहेब यांणी निरोप दिला. बापू निघोन पुण्यास आले. व नाना फडणीस यांची प्रकृती बिघडली. व हरीपंत तात्या यांच्या पोटांत पोटशूळ उठून फार हैराण जहाले. या प्रमाणे सोंगे करून निरोप मागतात. ही लबाडी दिसते [असे दादा बोलले.] तेव्हां मामांनी उत्तर केले की, "रडतराव घोड्यावर बसविला असतां तो तरवार मारणार काय आहे? त्यांचे शरीरास समाधान नाहीं. तेव्हां बराबर घेतल्याचा उपयोग काय? तर त्यांस निरोप द्यावाच. पुणे मुक्कामी जाऊन आठ चार दिवसांनी बरे जहाले म्हणजे येतील. आम्ही आपले बराबरच आहों. आपण काही काळजी करूं नये." अशी भुलथाप देऊन मुत्सद्दी यांस निरोप देवविले. ते निघोन पुण्यास आले. दादासाहेब यांस तेथून कूच करून एक मजल पुढे नेले. तेथे शहास गुंतविलें. दहा जण मागे गेले.
 मग मुत्सद्दी यांणी ताईबाई साठी ही गंगाबाईची आई यांजला बोलावून आणून सांगितलें कीं, "गंगाबाईस दुखवट्या करितां म्हणून माहेरी आणावी. मग ताईबाई साठी ही वाड्यांत जाऊन राजश्री धोंडो खंडाजी कारभारी यांजला मजकूर सांगितला. त्याजवरून कारभारी यांचा निरोप जाहला. पार्वतीबाई काकू व गंगाबाई यांजला बुरखे बांधून स्वारी ताईबाई साठी यांचे वाड्यांत आली. दोघीजणी गेल्या हें कारभारी यांजला ठाऊक नाही. तो नारो आपाजी हे पांचशे स्वार बरोबर घेऊन पर्वतीस बसले होते. तो प्रहर रात्रीस साठे यांचे वाड्यापर्यंत येऊन, पुरंदरा पावेतों डांक बसवून, दोघी बायांस पालखीत घालून, मध्यान रात्रीस पुरंदरास घेऊन गेले. मग प्रातःकाळी सखाराम बापू व नानाफडणीस व हरिपंततात्या वगैरे मुत्सद्दी पळोन गेले. हे वर्तमान कारभारी धोंडो खंडाजी यांस कळले. त्यांनी दादासाहेब यांस कळविले की, दोघी बायांस सर्व मुत्सद्दी मिळोन घेऊन पळोन गेले. मग दादासाहेब यांणी पत्र पाहून त्रिंबकराव मामा यांस बलावून विचारले की, "तुम्ही मुत्सद्दी यांस निरोप देवविले. त्यांनी पाठी मागे पुरंदरास बंड केले" तेव्हां मामांनी विनंती केली की, "ते असे करतील असे मात्रागमनपणा मला काय माहीत? त्यांच्या शरीरास समाधान नाही म्हणोन निरोप देवविले. आणि ते पळोन गेले. काय चिंता आहे? आम्ही आपले जवळ आहोत. आपण काही काळजी करूं नये." अशा गोष्टी सांगोन समाधान केलें. मग दादासाहेब म्हणाले की, आम्ही माघारे फिरतों. तेव्हां मामांनी उत्तर केले की, "गलीम उरावर आला आहे. त्याचे पारपत्य करूं. मग मुत्सद्दी यांणी घरफितूर केला तो पाहून घेऊं. परंतु परशत्रूचे घरांत राज्य गेले तर मग कठीण." याप्रमाणे दादासाहेब यांस सांगितले. तेथून कूच करून काष्टीतापळीचे मुक्कामी गेले. तेथे शहास गुंतविलें. मागें इकडे मुत्सद्दी पुरंदरास गेले होते त्यांनी विचार केला की, "गंगाबाईस कन्या जहाली तर कसे करावे?" असे बापू बोलले. तेव्हां नाना बोलले की, "चितपावनाच्या बायका, यांच्या बरोबरीच्या गरोदर, नऊ महिन्यापर्यंत किल्यावर ठेवाव्या" याप्रमाणे बाया किल्यावर दहा आणोन ठेविल्या. परंतु हें वर्तमान दादासाहेब यांस कळले तर कसें करावे ? प्रत्यक्ष अवतार जहाला तत्रापि संशय घेतील. त्यांस खरें वाटणार नाहीं. म्हणोन दादासाहेब यांची मुलगी दुर्गाबाई, तिजला बारामतीकरांकडे दिली आहे, तीस आणोन किल्यावर ठेवावी. जेव्हां गंगाबाई प्रसूत होऊं लागतील तेव्हां खोलीत नेऊन प्रत्यक्ष दाखवावें, म्हणजे दादासाहेब यांची खात्री होईल. कदाचित मुलगी जहाली तर बदलाबदली करीतच आहो. मग कसे होईल ते पाहूं." असे पार्वतीबाई काकू यांनी सांगितले. मग मसलत चार महिने लांबविली. पुढे गंगाबाईसाहेब नव मास भरल्यावर प्रसूत जहाल. मुलगा दृष्टीस पडला, त्यावेळेस दुर्गाबाई यास पार्वतीबाई काकूसाहेब यांणीं खोलीत आणून दुर्गाबाई यांस आणून बसविलें. तो तिच्या देखत अवतार जहाला.
 आतां पुरंदरा खालची फौज व तिकडून मोंगल असे येऊन दादासाहेब यांस धरावा याची चिठ्ठी अशा फितुराची त्रिंबकराव यांस पाठविली. ती चिठ्ठी दादासाहेब यांस सांपडली, मग मामासाहेब यांस बोलावून पुसलें कीं, "तुमचें पारिपत्य काय करावे," त्यांणी उत्तर केले की, "स्वामींस चिठ्ठी फितुराची सांपडली त्यापेक्षां मोंगलाच्या फितुरांत नाहीं असे बोलल्यास सत्य कसें वाटेल? मर्जीस येईल तसे पारिपत्य करावे. एक मामा मेला तरी चिंता काय आहे? मागें मुत्सद्दी स्वामीसेवेत अकराजण आहेत. मामापेक्षां चांगले आहेत." दादासाहेब यांस परम राग आला. आणि तवे तापत घातले. ते लाल करून मामांस वर उभे केले. नंतर मामांचे पायां खालून बहुत धूर निघू लागला. मग मामांनी शंखध्वनी केली. मग तव्यावरून खाली उतरले. आणि दुखणे लागले. तसेच शिकस्त स्वारी बराबर होते.
 तो इकडे सवाई माधवराव यांस बारा दिवस जहाले. पाळण्यांत घातले. नांव सवाई माधवराव ठेविलें. आणि गादीवर बसविलें. तो साताऱ्याहून पत्रे व वस्त्रे आली ती पुढे ठेविली. पार्वतीबाई काकू यांनी सवाईचे शिक्के, कटारी, सनदा वगैरे ठोकिल्या. सनदा व साखरा महालों महाली सरदार व नबाब मोंगल व टिपू सुलतान [सुद्धां] सर्वांस पाठविल्या. इकडे दादासाहेब यांस साखरा पाठविल्या. मनांत खुषी जहाली.
 दुसरे दिवशीं बापू व हरीपंततात्या फौजे सुद्धां तयार जहाले. तिकडे नबाब यांस सूचना केली कीं, तुम्ही तिकडोन यावें आम्ही इकडोन येतो. आणि मध्येच दादासाहेब यांस धरावें. अशी बातमी दादासाहेब यांस समजली. आणि बातमीदार यानेंही सांगितली. त्याजवरून दादासाहेब ज्या मुक्कामों होते तेथून पळोन गेले. आणि बापू व हरीपंत तात्या पाठीस लागले. ते पळून नाशिकास गेले. निजामअल्ली व मोंगल पुढे नाशिकावर सामोरे गेले. दादासाहेब धोडपच्या किल्यावर गेले. पुढे बापू व हरीपंत येऊन पोचले. आणि किल्यांत फितूर करून दादा साहेब यांस धरिलें.१२[१३] मग नबाब यांच्या व सखाराम बापू व हरीपंत तात्या यांच्या भेटी जहाल्या. नबाब यांचा इतमाम बहुत राखला. व त्याच्या जवळ खर्चास राहिले नाही कारणाने मनास आणून जागीर पासष्ट लक्षांची व दौलताबादचा१३[१४] किल्ला दिल्हा. आणि मेजवानी केली. नंतर नबाब यांस निरोप दिल्हा. मग दादासाहेब यांस घेऊन पुण्यास आले. आणि वाड्यांत बंदोबस्त करून ठेविलें. नंतर बापू व हरीपंत तात्या पुरंधरास गेले आणि कारभार झाडून पुरंधरासच चालू लागला.
 पुढे सहा महिन्यांनी दादासाहेब फितूर करून निघाले. फौज घेऊन हरीपंत तात्या पाठीस लागले. दादासाहेब हे पळत पळत बऱ्हाणपुरास गेले. तो तेथेंही पाठीस लागले. दादासाहेब हे उज्जनीस गेले. तेथे पवार यांचे गांव धारा म्हणोन शहर आहे. तेथे आनंदीबाई प्रसूत जहाली. बाजीराव साहेब यांचा जन्म जहाला. मग बारा दिवस जहाल्यानंतर तेथून कूच करून सुरतेस आले. तेथें पंधरा दिवस मुक्काम केला. तो इतक्यांत हरीपंत तात्यांनी फौजेत फितूर केला कीं, दादासाहेब यांस धरावें. तो दादासाहेब व आनंदीबाई साहेब व अमृतराव व बाजीराव साहेब सुद्धां निघून गलबतांत बसून मुंबईस गेले. तो तेथे इष्टुर फांकडा म्हणोन गोरा जहाला१४[१५] होता, तो भेटला. आणि धीर दिला. नंतर दादासाहेब यांनी आपली हकीगत सांगून चौथाई राज्यांत देण्याची लिहून दिली. इष्टुर साहेब यांस दादासाहेब बोलले की, "तुम्ही आम्हांस राज्यावर नेऊन बसवावें" याप्रमाणे सांगून दोन वर्षे दादासाहेब यांस आपले जवळ मुंबईत ठेविलें. तेव्हां हरीपंत तात्या हे सुरतेहून निघोन पुरंदरास आले.
 मग इंग्रज याणे पलटणे गोऱ्यांची पंचवीस हजार जमा करून बरोबर तोफा शंभर व दहा हजार घनतुरुप या प्रमाणे फौज जमा करून दादासाहेब यांस बरोबर घेऊन दाभाड्याचे तळेगांवी आले. तेथे मुक्काम केला. पेशवे यांणी पुण्यावर फौजेचा जमाव करून शहर ओस केलें. नारो आपाजीनों दरोबस्त कडबा भरला. त्याचे कारण की, शहर गलीमाचे हाती द्यावयाचें नाहीं. मग एके दिवशी सवाई माधव साहेब पुरंदराचे किल्यावर प्रातःकाळी प्रहर दिवसास तिरंबाजी खेळत होते. त्या समयी वर्ष पांचवें होतें. तेव्हां दादासाहेब यांची मसलत सिद्धीस गेल्यास आपल्यास पृथ्वीत जागा नाहीं सारखी होईल म्हणोन [कारभारी] विचारांत निमग्न होते. तेव्हां सखाराम बापू यांणी उत्तर केले की, आपले यजमान तिरंबाजी करीत आहेत त्यांजला विनंती करूं. त्यांचे मुखांतून काय अक्षरें निघतात त्या प्रमाणे पुढे करावे. सर्वांचे मर्जीस उतरून रुकार दिल्हा. तेव्हां सखाराम बापूंनी विनंती केली कीं, "दाभाड्यांचे तळेगांवावर दादासाहेब हे इंग्रज यांजला घेऊन उतरले आहेत. आणि आपल्या फौजा अद्याप पुण्यावर आहेत. इंग्रज तर भारी दिसतो. आमची मति चालत नाही. आपण अवतारी आहांत. मुखाने जे निघेल तें खरें." श्रीमंत सवाई माधवराव साहेब यांणी सांगितले की, माझा दुसरा तीरकमठा आणून द्यावा. त्या प्रमाणे आणून देतांच डोळे वटारून कमानीस तीर लाविला. आणि बोलले की, उदईक इंग्रजांचा मोड होतो. तुम्ही तयार होऊन हल्ला करावी." तें बापूनी ऐकून हरीपंत तात्यास व पाटील बावांस चिठ्ठी लिहिली कीं, "महाराज धणी यांचा हुकूम जहाला की, तुम्ही उदईक तळेगांवावर हल्ला करावा. इंग्रजांचा मोड होईल." ती चिठ्ठी हरीपंत तात्या व पाटील बावा यांणी वाचून पाहून फौज तयार करून तळेगांवावर दुसरे दिवशी येऊन ज्या ठिकाणी इंग्रज उतरला होता त्याजवर मोठे युक्तीनें जाऊन दोन फेरा केल्या व त्यांजकडील दोन फेरा होतांच इंग्रजांचे स्वार दहा हजार गर्द जहाले. हे पाहून एकदांच उड्या घातल्या. आणि पलटणीत घोडे घालून तरवार चालविली. आणि तोफा बंद केल्या. व तोफांच्या सांखळ्या तोडून वीर आंत मिसळले. तरवार चालविली. नंतर हातघाई झाली. ते समयी इष्टुर फांकडा हा एका झाडावर चढून दुरभिण लावून सरकारचा सरंजाम पहात होता. तो ते समयी पानशे यांजकडील गोलंदाज उभा होता. त्याची नजर त्या झाडावर गेली. हे पाहून मनांत म्हणतो की, "हा कोणी तरी खांसा आहे. म्हणोन त्याजवर शिस्त धरून लावून तोफेस बत्ती दिली. त्या गोळ्याने इष्टुर फांकडा इंग्रज ठार जहाला. खांसा पडतांच इंग्रजांचा मोड जहाला. नंतर दादासाहेब पळों लागले. पाटीलबावा व हरीपंततात्या त्या सर्व फौजेसुद्धां पाठीस लागले. पळतांपळतां खंडाळे म्हणोन गांव आहे तेथें दादासाहेब यांस धरिलें. इंग्रजांचे पलटणीची खात्री जहाली. व कांही पलटण राहिली ती पनवेलीस राहिली. मग पाटीलबोवा फौजेसुद्धां कोंकणपट्टी लुटून मागते परत पुण्यास आले. हरीपंततात्या यांणी दादासाहेब यांस धरून नाशिकाजवळ आनंदवल्ली म्हणोन गांव तेथे नेऊन उभे केले आणि गंगेचें उदक हातावर ठेविलें. आणि पुसले की, "नारायणरावसाहेब यांस मारावा ही अक्षरें कोणी घातली तें खरें बोलावे." मग दादासाहेब बोलले की, 'मारावें' ही अक्षरें बोललो नाहीं व आमचे हातची ही आक्षरे नाहीत. 'धरावें' ह्मणोन लिहिली. 'ध' चा 'मा' [कोणीं] केला. ही बातमी मजला ठाऊक नाही." अशी आक्षरे बोलले. ते सर्व समजले. मग दादासाहेब यांचा बंदोबस्त करून आनंदवल्लीचे वाड्यांत ठेविलें. आणि दानधर्माचा बंदोबस्त यथास्थित ठेविला. सर्व कारखाने सुरू जहाले. दोन हजार स्वार व पायदळ पांच हजार व हत्ती दहा पंधरा असा सरंजाम कारभारी गोविंदपंत गोडबोले यांस ठेविले. आणि तात्या निघोन पुण्यास आले.
 मग श्रीमंत सवाईमाधवराव साहेब यांस पर्वतीस आणोन राज्य करूं लागले. मोठया समारंभानें पुण्यास आणिले. पुढे वर्ष सहामहिनें बापू व नाना फडणीस एक विचारें कारभार करीत होते. तो बापूंचे मनांत आले की नानांस व हरीपंत तात्यांस धरावें. असे मनांत आणून मोरोबा दादा फडणीस यांस सांगून फितूर केला. मोरोबादादानी फडणीशी करावी. आपण कारभार करावा. या प्रमाणे फितूर केला. ती चिठ्ठी नानांस सांपडली. त्यावेळेस महादजी शिंदे हिंदुस्थानांत जाण्याकरितां गेले तो नाशिकावर मुक्काम केला. मग नानांनी पाटीलबावा यांस चिट्ठी पाठविली की, "आपले भेटीचें प्रयोजन आहे, तर लवकर यावे." ती चिठ्ठी पावतांच पाटीलबोवा माघारे परतले. पाटीलबोवा यांचा व नानांचा घरोबा बहुत होता. म्हणोन पाटीलबोवा पुण्यास आले. त्यांजला भेटा वयास सर्व मुत्सद्दी गेले. तो पहिल्याने नाना भेटले. व बापूंची चिट्ठी सांपडली होती ती पाटीलबोवा यांचे स्वाधीन केली. ती चिठ्ठी वाचून पाहोन आपले पागोटयांत ठेविली. मग हरीपंत तात्यांस व सर्व मुत्सद्दींस भेटले. व बापूंसही भेटले. अंबारीशी अंबारी भेटविली. आणि भेटी जहाल्या. मग पाटीलबावा यांनी चिठ्ठी पागोट्यांतून काढोन बापूंस दिली. मग बापू बोलले कीं, "हीं अक्षरे माझी आहेत नानांस व हरीपंत तात्यांस धरावें" मग पाटीलबोवा बोलले कीं, "याचे पारिपत्य काय करावें?" "आतां हे पुसणे काय?" असे बापू बोलले. व पूर्वी बाराभाईची १५[१६]याद जहाली त्याजवर सर्वांचे व माझा रुकार आहे. त्याप्रमाणे व्यवस्था व्हावी. असे उत्तर बापूंनी केले. मग पाटीलबावांनी बापूंचे पायांत रुप्याची बेडी घातली आणि सिंहगडावर चढविले. मोरोबा दादा यांस नगरावर रवाना केले. याप्रमाणे बंदोबस्त केला व नाना फडणीस हे कारभार मुख्यत्वें करीत होते. त्यांस सोळा वर्षे एक छत्री राज्य सवाई माधव साहेब यांनी व राज्याचा कारभार ही एकछत्री नानांनी केला. फडणीस जे करतील तें मान्य. पुढे श्रीमंतांचे प्रतापे करून पाटीलबोवांची मर्जी खुषी करून किताब दिला. व नवगत वस्त्रे देऊन शिक्के कटार व मोहोर श्रीमंतांनी दिल्हीं. याप्रमाणे श्रीमंतांचे प्रताप करून यशच मिळत गेले. पाटीलबावा हे मृत्यु पावल्यावर दौलतराव याचे कारकीर्दीत मोंगल शिकस्त करून मस्करी म्हणाल तरी श्रीमंतांची सोंगे वगैरे आणून वकीलांस दाखवून चलबिचल करीत होते त्यांचे ही पारपत्य होऊन पुण्यांत कैदेत ठेविला. मग श्रीमंत सवाई माधवराव साहेब हे उडी टाकून कैलासवासी जहाले. मशरूल मुलुख यास सोडून दिल्हें. अशी कथा जहाली.

समाप्त.





THE KAVYETIHASA-SANGRAHA.

 THE object of the Kavyetihasa- Sangraha, a monthly Magazine edited with notes critical and explanatory by Messrs J. B. Modak B. A. and K. N. Sane B. A. is to publish in extenso (First) the old Maratha chronicles (Bakhars) and other documents bearing on the History of the Maratha chiefs and other princes of the Deccan, and (Secondly) all the Marathi poems that were not published in the late Sarva-Sangraha and all Sanskrit poems included neither in the Bombay Sanskrit Series nor in the books published at Calcutta or Benares. Each number consists of 48 pages, Rooyal 8vo which are distributed among the three branches As to the utility and importance of such a work and the manner in which it has been conducted we beg to refer the public to the favourable opinions of some of the best Scholars of this presidency published from time to time on the fly-leaves of this Mgazine. It is priced at Rs. 4 As. 6 per annum (advance rate) including postage. All communications to be addressed to 'The Manager, Kävyetihāsa- Sangraha, Thana.

काव्येतिहास-संग्रह.

 हे उपयुक्त पुस्तक दर महिन्यास निघत असते. यांत जुन्या बखरी व दुसरे इतिहाससंबंधी कागद पत्र, माजी सर्व संग्रहांत प्रसिद्ध न झालेली जुनी मराठी काव्ये, व कलकत्ता, मुंबई वगैरे ठिकाणी प्रसिद्ध झाल्या खेरीज मिळणारे संस्कृत ग्रंथ, यांचा संग्रह होत असतो. प्रत्येक प्रकरणावर कठीण स्थली टीपा, अवांतर माहिती, व निरनिराळ्या प्रतींचे पाठ दिलेले असतात. या पुस्तकाची रायल सांच्याची ४८ पृष्ठे असून १६,१६,१६ अशी पृष्ठे प्रत्येक विषयाकडे दिलेली असतात. हे जीर्ण ग्रंथांचा उद्धार करण्याचे काम किती उपयोगाचें व महत्वाचे आहे व ते कोणत्या रीतीने चालविले जात आहे अशा बद्दल पुष्कळ विद्वान मंडळीचे अभिप्राय वेळोवेळी प्रसिद्ध झाले आहेत.
 हे पुस्तक सर्वांस घेण्यास सुलभ पडावे म्हणून याची किंमत येणेंप्रमाणे ठेविली आहे.

ऐन किंमत ट. ह.
वर्षास आगाऊ........................ ४ रुपये σ ६
" मागाहन........................ ५ रुपये σ ८

 आगाऊची मुदत पुस्तक घेऊं लागल्यापासून दोन महिन्यांचे आंत समजावी.
 या पुस्तकासंबंधे हरएक प्रकारचा पत्रव्यवहार ठेवणें तो :- काव्येतिहास-संग्रह व्यवस्थापक, ठाणें या पत्त्यावर ठेवावा.

  1. हे प्रकरण आम्हांस कै. नारायण अनंत उकिडवे यांनी बडोद्याहून मूळ प्रतीचो नक्कल करून पाठविलें. अस्सल कोठील, कोठें आहे व कोणी, केव्हां लिहिले त्याजबद्दल माहिती नाही.
  2. दोघांनी= श्रीमंत व बर्वे
  3. तरफेचा= तलबेचा? राहिलेला पंगार.
  4. नारोबा हा शिष्या होता.
  5. कंगणी= वरल्या पट्या.
  6. टिळेकर यांस यखतपूर ता. पुरंदर हा गांव इमाम आहे.
  7. श्रमित= श्रमी= दुःखित.
  8. रक्ताचाटिळा लावण्याची वहिवाट उदेपुरास आहे. असो. दादांस टिळा गारद्यांनी लाविला असे दुसऱ्या ग्रंथांत आढळते.
  9. साठे तपकीर गल्लीतील.
  10. सरकारी काम चालण्याची जागा. सेक्रेटारिअट.
  11. खांसे श्रीमंत अशा तऱ्हेने पडले असतां त्यांस वाहून नेण्यास त्यांचे अन्न खादलेल्या ब्राम्हणांतून वेळीं एकही उपयोगी पडूं नये या उपर आणखी लज्जेची गोष्ट कोणती? असो. पिठाचा नारायणराव करून त्याजबरोबर एक महत्वाचा कागद प्रथम जाळला, नंतर नारायणरावाचे शव नदीवर नेलें, असें ऐकिवांत आहे त्यास येथें आधार नाहीं.
  12. वाकडेपणा माधवरावानें बापूंस काढून मामांस कारभारी नेमिलें तेव्हांपासून पडला असावा. वांकडेपणा असण्याचें दुसरें कारण काय?
  13. धोडपच्या किल्यांत माधवरावाच्या वेळी दादांस धरिलें होते.
  14. भाऊसाहेबांनी उदगीरची लढाई मारून घेतलेला मुलुख.
  15. मुंबईचा गव्हरनर हार्नबी साहेब होता- इष्टुर= स्टुअर्ट हा एक त्याचा सरदार होता.
  16. 'बाराभाई' हा शब्द त्या काळापासूनच प्रचारांत आला काय?