श्री जोगेश्वरी मातेची कहाणी
<poem> ऐका, जोगेश्वरी माते तुमची कहाणी. आटपाट नगर होते. त्या नगरात एक गरीब ब्राह्मण रहात होता. त्याची बायको महान पतिव्रता होती. त्यांना एक मुलगा होता. पण दैवाची करणी ! देशात भयंकर दुष्काळ पडला. तिचा पति धान्य मिळविण्याकरिता गेला. तो वर्षभर घरी परतलाच नाही. बाई अन्नाला महाग झाली. एकुलत्या एक मुलाचे दोन महिन्यानी डोळे गेले व बिचार्या बाईला भयंकर अशा कुष्ट रोगाने पछाडले. एका पाठोपाठ संकटे कोसळली. गावकर्यांनी गावात कुष्टरोग झालेली बाई नको म्हणून तिला गावाबाहेर राहण्यास सांगितले. गावाबाहेर नदी वहात होती. तिचे नाव मुश्यला. नदीकाठी पुण्येश्वराचे देऊळ होते. ती बाई तिथे राहू लागली. भीक मागून पोट भरू लागली. दारिद्रयाने पिडली, दुःखाने पोळली. रोज संध्याकाळी बिचारी पुण्येश्वराजवळ जाई. बेलाचे पान वाहून मनोभावाने पूजा करी. एकदा काय झाले. श्रावणमास आला. पुण्येश्वराच्या देवळात मोठा यज्ञ होता. होमकुंड पेटलं होतं. ब्राह्मण मंत्रघोष करीत होते. बाईला सर्व दुःखाचा वीट आला होता. तिने मनात निश्चय केला की पेटलेल्या होमकुंडात मुलासह उडी घ्यावी. दुःखाचा कायमचा शेवट करावा. नको हा जीव. तिने आंधळ्या मुलाला बरोबर घेतले व यज्ञकुंडाचे अगदी जवळ आली. तेवढयात काय चमत्कार झाला. यज्ञकुंडातून एक तेजस्वी साधु प्रकट झाला व बाईला म्हणाला, "बाई, नरबळीने हे पुण्येश्वराचे यज्ञकुंड अपवित्र करु नकोस." तेव्हा जीवास कंटाळलेली ती साध्वी साधूस म्हणाली "मग साधु महाराज, मी काय करु? माझे पति वर्षापासून नाहीसे झाले आहेत. मुलगा दोन महिन्यापासून आंधळा झाला आहे, व मी कुष्टरोगाने पिडले आहे." तेव्हा तो तेजस्वी साधु म्हणाला, "बाई, घाबरु नकोस. गेल्या जन्मी तुझ्या हातून श्री जोगेश्वरी मातेचा घोर अपमान झालेला आहे. तू गेल्या जन्मी एका श्रीमंत व्यापार्याची बायको होतीस. ऐश्वर्या असे तुझे नाव होते. तुझ्याकडे एक स्वयंपाकीण होती. ती जोगेश्वरीचे व्रत करीत होती. पण तू श्रीमंतीच्या गर्वाने श्रीजोगेश्वरी मातेची प्रतिमा फाडून मातेची विटंबना केली होतीस. तुला प्रायश्चित म्हणून हे दुःख भोगावे लागत आहे. यावर एक उपाय आहे. पुण्येश्वराचे देवळाजवळ ओढा वहात आहे. शुक्रवारी मध्यरात्री तू तिथे जा, जाताना दुधाची वाटी घेऊन जा. रातराणीच्या वेलाजवळ मध्यरात्री नागकन्या, जलकन्या, देवकन्या येतील. त्याना दूध दे व तुझे दुःख सांग." असे म्हणून तो तेजस्वी साधु गुप्त झाला.
बाईने शुक्रवारी वाटीभर दूध घेतले व ती मध्यरात्री पुण्येश्वराचे मंदिराजवळून वाहणार्या ओढयाजवळ गेली. दूधासारखे चांदणं पडलं होतं. मध्यरात्र होऊन गेल्यावर एकदम रातराणीचा सुगंध घमघमू लागला व नागकन्या, जलकन्या, देवकन्या बाहेर आल्या. बाईने त्यांचे समोर जाऊन हात जोडले नागकन्य़ानी आश्चर्याने विचारले, "बाई, तू कोण ?" त्यावर बाई म्हणाली, "मी एक अभागी बाई आहे. माझा पति वर्षापासून नाहीसा झाला आहे. मुलगा दोन महिन्यापासून आंधळा झालेला आहे व मी कुष्टरोगाने पिडले आहे. मला उपाय सांगा." त्यावर नागकन्या म्हणाल्या, "तू जोगेश्वरी मातेचा वसा घे." कसला वसा तो मला सांगा." बाईने विचारले. वसा सांगतो. पण तू उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. "उतत नाही, मातत नाही. घेतला वसा टाकीत नाही." मग नागकन्या म्हणाल्या, "शुक्रवारी किंवा मंगळवारी पहाटे मुकाटयाने उठावे. सचैल स्नान करावे. श्रीजोगेश्वरी मातेची प्रतिमा पुढे ठेवावी. समोर उदबत्ती, निरांजन लावावे. नारळ ठेवावा. बारा हिरव्या बांगडया ठेवाव्या. शुभ्र वस्त्र परिधान करावे. धुतलेल्या पातळाची घडी पसरावी व त्यावर बसावे. डोळे मिटून घ्यावेत व मन एकाग्र करुन "श्रीजोगेश्वरी भगवती" या नवाक्षरी मंत्राचा ८१ वेळा जप करावा. दिवसभर उपवास करुन, रात्री जेवण करावे. असे वर्षभर अतिशय श्रध्देने करावे. उद्यापन कराव. सवाष्ण बाईला हिरव लुगड द्याव. बारा बांगडया द्याव्यात. यथाशक्ति गरिबाना दान कराव. नवरात्रात नऊ दिवस जोगेश्वरी मातेचे दर्शन घ्यावे, दर शुक्रवारी, मंगळवारी देवीला जावे." असे सांगून नागकन्या, देवकन्या जलकन्या गुप्त झाल्या. बाईने शुक्रवारी वसा केला. सकाळी उठली. जोगेश्वरीची प्रतिमा जमिनीवर काढून उदबत्ती, निरांजन लावले मनोभावे देवीचे ८१ वेळा नामस्मरण करुन ८१ फुले वाहिली. उपवास केला. देवीपुढे बारा बांगडया ठेवल्या. असे वर्षभर व्रत केले. एका रात्री तिला स्वप्नात एक सवाष्ण दिसली. हिरव लुगड, हिरव्या बांगडया घातलेली ती बाईला म्हणाली, "बाई पुण्येश्वराचे देवळापासून दक्षिणेस गावाबाहेर चालत ये. तेथे घनदाट झाडी आहे आंबे, आवळी, बकुळीची झाडे आहेत. स्फटिकासारख्या पाण्याचा झरा वहात आहे. सतीच्या शीला आहेत. त्या दाट जंगलात एक महान देवीभक्त साधु तपश्चर्या करताना तुला दिसेल, त्याला नमस्कार कर तो जी जागा दाखवील तेथे हळदीकुंकवाचा सडा टाक व नंतर खण. माझे मंदिर तुला दिसेल. स्वप्नातल्या सवाष्णीन सांगितल्याप्रमाणे बाई उठली. दक्षिणेस चालत गेली. दाट झाडी लागली. स्वच्छ झुळझुळणारा ओढा लागला. सतीच्या शीला लागल्या. एका बकुळीच्या झाडाखाली एक साधु तपश्चर्या करीत होता. त्याला बाईने नमस्कार केला. त्याने तिला जागा दाखविली. तिने हळदीकुंकवाचा सडा घातला व खणले. तो काय चमत्कार ! जोगेश्वरी मातेच सुवर्णाच देऊळ दिसल. त्याला रत्नजडित खांब होते. गाभार्यात रत्नांचे दिवे तळपत होते. माणिकांच्या वाती उजळल्या होत्या. हिर्यांचे कळस होते. जोगेश्वरी मातेच्या अंगावर भरजरी शालू होता. हिरे, मोती, माणके यांचे दागिने होते, हिरेजडित मुगुट होता, मोत्यांचा सातपदरी कंठा, मोती व हिरे यांची कुंडले, नथ, हिर्याच्या पानडया, रत्नजडित लफ्फा, हातात सोन्याची गदा व सोन्याचे महाळुंग होते. हातात (डमरू, त्रिशूल, गदा) घेऊन देवी सिंहावर बसली होती. बाईने मातेचे पाय धरले व कळवळून म्हणाली जोगेश्वरी माते, कृपा करा माझ्या मुलाला पुन्हा दृष्टी दे. माझा पति मला परत मिळू दे व माझा कुष्ट रोग बरा कर. माझे अपराध पोटात घाल. जोगेश्वरी मातेने तिच्या मुलाच्या डोळयावर हात फिरवला व तिच्या पाठीवरुन हात फिरविला तो काय चमत्कार ! मुलाला पुन्हा दृष्टी आली व तिच्या अंगचा कुष्ट रोग निघून गेला. बाईने देवळाला श्रध्देने प्रदक्षिणा घातली व अतिशय आनंदाने ती पुण्येश्वराच्य़ा देवळात आली. तिथे तिचा पति तिला भेटला. दुसर्या दिवशी राजाची राणी देवळात आली राणीने विचारले, "बाई तुझा रोग कशाने गेला ?" त्यावर बाई म्हणाली, "मी जोगेश्वरीचा वसा वसला." जोगेश्वरीचा वसा कसा वसला ते मला सांग." राजाच्या राणीने विचारले. बाई म्हणाली, शुक्रवारी किंवा मंगळवारी पहाट मुकाटयाने उठावे, सचैल स्नान करावे, जोगेश्वरी मातेची प्रतिमा पुढे ठेवावी समोर निरांजन, उदबत्ती लावावी नारळ ठेवावा, बारा बांगडया ठेवाव्या व प्रतिमेवर ८१ फुले वाहून "श्रीजोगेश्वरी भगवती" असे ८१ वेळा देवी जोगेश्वरीचे नामस्मरण करावे. असे वर्षभर अतिशय श्रध्देने करावे. उद्यापन कराव गरिबाना यथाशक्ती दान कराव. राजाच्या राणीने वर्षभर श्रध्देने मनोभावे जोगेश्वरीचा वसा वसला. तो काय चमत्कार झाला शुक्रवारी रात्री जोगेश्वरी माता तिच्या स्वप्नात आली. हातात डमरु, त्रिशुल, गदा होती. ती म्हणाली, जोगेश्वरीच्या मंदिरासमोर तीन सहस्त्र पावलावर सर्व जमीन सोन्याचे नांगराने नांगरुन घे. जमिनीत जुन्या कोनाडयात गणपती सापडेल तेथे एक गणपतीचे मंदिर बांध. तुझ्या पोटी सूर्यनारायणासारखा पुत्र जन्मास येईल. तो शककर्ता होऊन देशावर राज्य करील माझा सतत या भूमित गुप्त निवास राहील." असे म्हणून जोगेश्वरी माता अंतर्धान पावली. राणीने श्रध्देने व्रत केले तिला सूर्यनारायणासारखा पुत्र झाला व त्याने देशावर राज्य केले. असे श्री जोगेश्वरी मातेचे पवित्र व्रत जी करील. तिला वैधव्य प्राप्त होणार नाही. इच्छित फळ प्राप्त होईल. सर्व कार्यात यश मिळेल.
जशी जोगेश्वरी माता त्यांच्यावर प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा होवो ही साठा उत्तराची कहाणी पाना उत्तरी सुफळ संप्रूण ( संपूर्ण )
<poem>
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |