श्री संतोषीमाता व्रतकथा

<poem> एका नगरात एक म्हातारी राहत होती. तिला सात मुलगे आणि सात सुना होत्या. सर्व जण एकत्र राहत होते. सहा जण पैसे मिळवीत असत. सातवा मात्र बेकार होता. म्हातारी आपल्या सहा मुलांना चांगले-चांगले करुन खायला घालायची व उरलेसुरले सातव्याला द्यायची. तो बिचारा गरीब भोळा होता. जे मिळेल ते खायचा.

थोड्या दिवसानंतर एक मोठा सण आला. त्या दिवशी सहा भावांचे जेवण झाल्यावर त्यांच्या पानांतील राहिलेल्या उष्ट्या लाङवांच्या कण्यांचा आईने एक लाडू केला आणि तो सातव्याकरिता ठेवला. तो घरी आल्यावर त्याच्या बायकोने त्याला ते सांगितले. तेव्हा तो रागावून घर सोडायला निघाला. तो दरिद्री म्हणून आईनेही 'जा' म्हणून सांगितले. त्याबरोबर कपडे गोळा करून तो बायकोकडे गेला व तिला त्याने आपली अंगठी खूण म्हणून दिली. त्याची बायको त्या वेळी शेणी घालत होती. ती म्हणाली, "तुम्हांला द्यायला माझ्याजवळ काहीच नाही. हे शेण आहे असं म्हणून आपला शेणानं भरलेला हात त्याच्या पाठीवर उमटवला. तीच आपल्या प्रिय पत्‍नीची खूण असे समजून तो निघाला.

मजल दर मजल करीत तो दुसर्‍या देशातील एका मोठ्या शहरात गेला. तेथे एका व्यापार्‍याकडे नोकरीला राहिला. रात्रंदिवस नेकीने काम केल्यामुळे मालक त्याच्यावर खूष झाला. अशी बारा वर्षे निघून गेली. मालकाने त्याला भागीदार केले. नंतर मालक त्याच्यावर दुकान सोपवून तीर्थयात्रेला गेला.

इकडे घरी त्याची बायको मात्र फार दुःखी होती. सासू वगैरे तिचा छळ करीत. तिला कोंड्याची भाकरी देत आणि पाणी प्यायला नारळाची करवंटी देत. ती रोज रानात जाऊन लाकडे आणी. घरातील सर्व कामे तीच करीत असे. एक दिवस अशीच ती रानात लाकडे गोळा करण्याकरिता गेली असता तिथे काही स्त्रिया श्रीसंतोषीमातेचे व्रत करीत असलेल्या दिसल्या. ते पाहून तिने विचारले, "बायांनो, तुम्ही हे काय करत आहात? ही कोणत्या देवीची पूजा?"

ते ऐकून त्यातील एक स्त्री म्हणाली, "आम्ही हे श्रीसंतोषीमातेचे व्रत करीत आहोत. हे व्रत केल्याने दुःखदारिद्रय नाहीसे होते. मनातील चिंता नष्ट होते. घर लक्ष्मीने भरून जाते. नवरा परदेशी गेला असेल तर लवकर परत येतो. कुमारीला मनपसंत नवरा मिळतो. कोर्टात आपल्यासारखा निकाल लागतो. रोग बरे होतात. पैसा आणि आरोग्य मिळते. मनाला शांती मिळते. आवडत्या लोकांच्या भेटी होतात. सर्व प्रकारच्या कामना पूर्ण होतात."

ती म्हणाली, "मग हे व्रत कसं करायचे ते मला सांगा."

तेव्हा ती म्हणाली, "आपल्या ऐपतीप्रमाणे दहा पैसे, पन्नास पैसे, सव्वा रुपया यांचे गूळ व हरभरे आणावेत. दर शुक्रवारी संतोषीदेवीची मनोभावे पूजा आणि प्रार्थना करावी. त्या दिवशी उपास करावा. गूळ व हरभरे प्रसाद म्हणून वाटावा. श्रीसंतोषीमातेची कहाणी ऐकणारा कोणी न भेटल्यास आपणच तुपाने निरांजन लावून कहाणी सांगावी. मनोभावे प्रार्थना करावी. आपले काम सिद्धीस जाईपर्यंत प्रत्येक शुक्रवारी याप्रमाणे श्रीसंतोषीमातेचे व्रत करावे. काम झाले की व्रताचे उद्यापन करावे. चार महिन्यांत श्रीसंतोषीमातेचे आपले मनोरथ पूर्ण करते उद्यापनाचे दिवशी आपल्या शक्तीप्रमाणे सव्वा पटीने रवा, तूप घ्यावे. त्याची खीर करावी. हरभर्‍याची उसळ करावी. आपल्या घरातील आठ मुलांना जेवण घालावे. आपल्याकडे आठ मुले नसतील तर शेजारचे बोलावून आणून त्यांना जेवायला घालावे. आपल्या शक्तिप्रमाणे दक्षिणा द्यावी. असे उद्यापन करावे. फक्त त्या दिवशी घरातील कोणीही आंबट खाऊ नये."

ते ऐकल्यावर तिने नेहमीप्रमाणे लाकडे गोळा केली आणि ती नगरात गेली तिने लाकडे विकली आणि आलेल्या पैशातून तिने दहा पैशांचा गूळ आणि हरभरे घेतले. मनाशी निश्चय करून ती फिरली. वाटेत तिला श्रीसंतोषीमातेचे मंदिर दिसले. आत जाऊन तिने देवीला नमस्कार केला आणि म्हाणाली, "माते, मी अबला आहे, अज्ञानी आहे. माझे दुःख दूर कर. मी तुला शरण आले आहे" याप्रमाणे तिने चार शुक्रवारी व्रत केले. श्रीसंतोषीमातेला तिची दया आली. तिच्या पतीचे पत्र आले, पैसेही आले. तिला फार आनंद झाला. पण तिचे दीर वैगरे मात्र तिची चेष्टाच करीत होते.

इकडे रात्री तिच्या नवर्‍याच्या स्वप्नात देवी गेली आणि म्हणाली, "मुला इकडे येऊन तुला बारा वर्षे झाली. तुझ्या पत्‍नीची घरी काय अवस्था झाली असेल, याचा कधी विचार केलास काय? मूर्खा, तू तिला विसरलास. पण ती मात्र तुझ्यासाठी, तू परत यावेस म्हणून हाडांची काडे करीत आहे. ती तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे."

तो म्हणाल, "माते, मला हे सर्व समजते. पण मी काय करणार? मी इकडे परदेशात आहे. इथे देण्याघेण्याचा व्यवहार आहे. तो पुरा झाल्याशिवाय मी घरी परत कसा जाणार?"

ते ऐकून देवी म्हणाली, "मुला, उद्या सकाळी उठल्यावर तू स्नान कर आणि दुकानात जा. माझी प्रार्थना कर. तुपाचे निरांजन लाव. बघता-बघता दुकानाचे देण्याघेण्याचे व्यवहार पुरे होतील."

देवीच्या स्वप्नातील दृष्टान्ताप्रमाणे त्याने सर्व केले. दुसर्‍या दिवशी त्याने अंघोळ केली, तुपाचा दिवा लावला. श्रीसंतोषीमातेची प्रार्थना केली आणि तो दुकानात गेला. थोड्याच वेळात देण्याघेण्याचे सर्व व्यवाहार पूण झाले. पैशांच्या थैल्या भरून गेल्या. श्रीसंतोषीमातेची स्तुती करून त्याने रात्री दुकान बंद केले आणि सकाळ आपल्या देशास निघाला.

तो आपल्या गावाजवळ आला. त्या दिवशी त्याची पत्‍नी नेहमीप्रमाणे लाकडे गोळा करण्यासाठी रानात आली होती. वाटेत देवीच्या मंदिरात जात असता तिला दुरून येणारे धुळीचे लोट दिसले. तिने देवीला विचारले, "माते कोण येत आहे?"

देवी म्हणाली, "मुली, तुझा नवरा येत आहे. आता मी सांगते तसे कर. जवळच्या लाकडाच्या तीन मोळ्या कर. एक माझ्या मंदिराजवळ ठेव. दुसरी नदीकिनार्‍यावर ठेव आणि तिसरी आपल्या डोक्यावर घे. तुझ्या डोक्यावरची मोळी पाहून तुझ्या नवर्‍याला जेवणाची आठवण होईल. तो तुझ्याकडून ती मोळी विकत घेईल, जेवण करील व मग पुढे घरी जाईल. मग तू माझ्या मंदिराजवळची मोळी घेऊन घरी जा आणि अंगणात मोळी टाकून मोठ्याने म्हण "सासूबाई, सासूबाई लाकडे घ्या आणि मला कोंड्याची भाकरी द्या. करवंटीत पाणी द्या. पण आज घरी पाहुणे कोण आलेत?"

देवीच्या सांगण्याप्रमाणे तिने केले. इतक्यात तिचा नवरा तेथे आला. त्याने मोळी विकत घेतली, जेवण केले आणि तो घरी गेला. थोड्याच वेळात ती घरी आली आणी मोळी टाकून म्हणाले, "सासूबाई, सासूबाई, लाकडे घ्या आणि मला कोंड्याची भाकरी द्या. करवंटीत पाणी द्या. पण आज घरी पाहुणे कोण आलेत?"

बायकोचा आवाज ऐकून नवरा बाहेर आला. जिच्याकडून मोळी विकत घेतली होती ती त्याला दिसली. तिच्या उजव्या हातात त्याने दिलेली अंगठी होती, त्याला खूण पटली. तो बायकोला भेटला व शेजारीच खोली होती, ती त्याने ताब्यात घेतली.

खोली साफसूफ करून त्यांनी सर्व सामान आणले व ते दोघे जण आनंदात तेथे राहून लागले, इतक्यात शुक्रवार आला. तिने नवर्‍याच्या परवानगीने त्या दिवशी संतोषीमातेच्या व्रताचे उद्यापन केले. जावेच्या मुलांना व सर्व नातेवाइकांना जेवायला बोलविले, जावांनी आपल्या मुलांना शिकवून ठेवले की, काकूजवळ आंबट खायला मागा.

सर्वांची जेवणे झाल्यावर मुले म्हणली, "काकू, गोड-गोड खाऊन वीट आला. काहीतरी आंबट खायला दे."

त्यावर ती म्हणाली," बाळांनो हे श्रीसंतोषीमातेच्या व्रताचे उद्यापन आहे. आज कोणाला आंबट वस्तु खायला मिळणार नाही."

मुले जेवूण उठली आणि पैसे मागू लागली. तिच्या लक्षात आले नाही. तिने मुलांना पैसे दिले. मुलांनी चिंचा, आवळे आणून खाल्ले. त्यामुळे देवीच्या व्रताचा भंग झाला. देवी कोपली राजाचे दूत आले आणि त्यांनी तिच्या नवर्‍याला धरून नेले. ती रडत-रडत संतोषीमातेच्या मंदिरात गेली. नमस्कार करून ती म्हणाली, " माते, तू काय केलेस? आधी हसवलेस आणि आता का रडवतेस?"

देवी म्हणाली, " मुली, माझ्या व्रताचा भंग झाला आहे. पण तू मुद्दाम काही केलं नाहीस. आता पुन्हा उद्यापन कर. आता जराही चूक करू नकोस. जा आता."

त्याबरोबर ती आनंदाने घरी परतली. रस्त्यात तिचा नवरा तिला भेटला. तो म्हणाला, "मी एवढे पैसे मिळवले, त्याबद्दल राजाला कर नको का द्यायला? राजाकडे कर भरूनच मी येत आहे."

ते ऐकून तिला फार आनंद झाला ती दोघे घरी गेली. फिरून शुक्रवार आला. तिने उद्यापनाची तयारी केली. सर्वांना जेवायला बोलाविले. मुले जेवायला आली; पण म्हणाली, "काकू, आम्हांला गोड खीर नको. काहीतरी आंबट दे, नाहीतर चाललो आम्ही घरी,"

"आंबटचिंबट काही मिळणार नाही. सरळ जेवायचं तर जेवा. नाहीतर चालायला लागा. आंबट काही मिळणार नाही." तिने सांगितले.

मुले निघून गेली. मग तिने ब्राह्मणांना बोलावले. पोटभर वाढले. दक्षिणेच्या ऐवजी त्यांना एक एक फळ दिले. अशा तर्‍हेने उद्यापन निर्विघ्नपणे पार पडले. व्रत यथासांग पुरे झाले. श्रीसंतोषीमाता प्रसन्न झाली. लक्ष्मीच्या प्रसादाने तिला एक तेजस्वी मुलगा झाला. ती आपुल्या मुलाला घेऊन रोज देवळात जात असे.

एके दिवशी देवीच्या मनात आले की, आपण हिच्या घरी जावे आणि हिची सासू, दीर, जावा कशा आहेत ते पाहावे. मग देवीने अक्राळविक्राळ रूप घेतले. काळाकुट्ट रंग, चपटे नाक, बटबटीत डोळे, मोठे-मोठे रुंद ओठ, तोंडाभोवती माशा घोंघावताहेत, स्थूल शरीर, स्तन खाली लोंबताहेत, कपड्याच्या चिंध्या, आणि सर्व अंगाला दुर्गंधी सुटली आहे, अशा थाटात देवी तिच्या घराच्या देवडीत गेली. तिला पाहून सासूची बोबडीच वळली. ती मोठ्याने ओरडू लागली, "धावा, धावा, मुलांनो धावा. कोणी पिशाच्च, डाकीण, शाकीण घरात येते आहे. तिला हाकलून लावा. नाहीतर ती आपणा सर्वांना खाऊन टाकणार."

तो आरडाओरडा ऐकून मुले तिला हाकलायला धावली, पण देवीचे रूप पाहून तीही घाबरली. घरात जाऊन त्यांनी दरवाजे, खिडक्या घट्ट लावून घेतल्या. धाकटी सून हे सर्व खिडकीतून पाहत होती. ती आनंदाने म्हणाली, "आज माझी आई माझ्याकडे येत आहे."

असे म्हणत असताच तिने अंगावर पीत असलेला आपल्या मुलाला बाजुला ठेवले आणी ती घरभर आनंदाने नाचू लागली. ते पाहून सासू संतापली, तिला वाटेल ते बोलू लागली, शिव्या देऊ लागली, सून म्हाणाली, "सासूबाई, घरात येत आहे ती कोणी डाकीण किंवा पिशाच नाही. मी जिचे व्रत करते ती देवी आहे."

असे म्हणून तिने सर्व दरवाजे, खिडक्या उघडल्या. श्रीसंतोषीमाता घरात आली. सर्व जण तिच्या पाया पडले. तिची क्षमा मागितली. " हे माते, आम्ही सर्व मूर्ख आहोत. अज्ञानी आहो, पापी आहोत. तुझे व्रत कसे करावे हे आम्हांला समजत नाही. तुझ्या व्रताचा आमच्याकडून जाणूनबुजून भंग झाला. आम्ही तुझा फार मोठा अपराध केला. माते, आम्हांला क्षमा कर. आमच्यावर दया कर."

याप्रमाणे सर्वांनी प्रार्थना केली. श्रीसंतोषीमाता प्रसन्न झाली. तिने सर्वांना आशीर्वाद दिले आणि ती अंतर्धान पावली. ज्याप्रमाणे त्या सुनेला श्रीसंतोषीमातेचे वरदान मिळाले तसे वरदान ही कहाणी ऐकणारालाही मिळो.

<poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.