संपत शनिवारची कहाणी
आटपाट नगर होतं. तिथं एक आपला गरीब ब्राह्मण राहात होता. त्याला तीन सुना होत्या. पावसाळ्या दिवशीं तो लवकर उठे. सकाळींच जेवी, लेकी सुनांसुद्धां शेतावर जाई. धाकट्या सुनेला मात्र घरीं ठेवीं. याप्रमाणं आपला नित्याप्रमाणं शेतावर गेला. जातांना घरी सुनेला सांगितलं. “मुली मुली, आज शनिवार आहे. माडीवर जा. घागरीमडक्यांत कांहीं दाणे पहा. थोडेसे काढ. दळून त्याच्या भाकर्या कर. केनीकुर्डूची भाजी कर. तेरड्याचं बीं वाटून ठेव.” सुनेनं बरं म्हटलं. माडीवर दाणे पाहूं लागली. अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले तेवढेच तिनं दळले. त्याच्या लहान लहान भाकर्या केल्या. केनीकुर्डूची भाजी केली. तेरड्या टाकळ्याचं बीं वाटलं नि सासूसासर्यांची वाट पहात बसली.
इतक्यांत तिथं शनिदेव कुष्ठ्याच्या रूपानं आले आणि म्हणाले, बाई बाई, माझं सर्व अंग ठणकत आहे, माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्यांनं आंघोळ घाल. घरांत गेली, चार तेलाचे थेंब घेतले, त्यांच्या अंगाला तेल लावलं. वांटलेले बीं लावून ऊन पाण्याने आंघोळ घातली. भाकरी खाऊ घातली. त्याचा आत्मा थंड केला. तसा कुष्ठ्यानं तिला आशीर्वाद दिला, तो काय दिला?” तुला कांहीं कमी पडणार नाहीं” म्हणून म्हणाला. आपलं उष्टं वळचणीला खोंचलं, शनिदेव अदृश्य झाले. काहीं वेळानं घरीं सासूसासरे, दीरजावा आल्या. त्यांनीं सर्व तयाई उत्तम पाहिली, संतोषी झालीं. आपल्या घरांत तर कांहीं नव्हतं. हें असं कशानं आलं, म्हणून आश्चर्य करूं लागली.
दुसर्या शनिवारीं ब्राह्मणानं दुसर्या सुनेला घरी ठेवलं. सगळीं माणसं घेऊन शेतावर गेला. इकडे काय मौज झाली? शानिदेवांनी मागच्यासारखंच कुष्ठ्याचं रूप घेतलं, ब्राह्मणाच्या घरीं आले. मागच्या सारखंच मला न्हाऊं घाल, मांखू घाल, म्हणून म्हणूं लागले. ब्राह्मणाची सून घरीं होती ती त्याच्याशीं बोलूं लागली, “बाबा, आम्हीं काय करावं! आमच्याजवळ कांहीं नाहीं.” देव म्हणाले, “ जे असेल त्यांतलंच थोडंसं मला दे.” ब्राह्मणाची सून मजजवळ कांहीं असलं तरी नाहीसं होईल.” असा त्यांनीं शाप दिला नि आपण अंतर्धान पावले. ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हांडीमडकीं पाहूं लागली. तिला कांहीं सापडलं नाहीं. संध्याकाळ झाली, सासूसासरा घरीं आलीं. सर्व तयारी पाहू लागलीं. तो त्यांना कांहींच दिसेना. मग सुनेला रागं भरलीं. सुनेनं झालेली हकीकत सांगितलेली.
पुढं तिसरा शनिवार आला. ब्राह्मणानं तिसर्या सुनेला घरीं ठेवलं. जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं. आपण उठून शेतावर गेला. इकडे मागच्यासारखे शनिदेव आले. ब्राह्मणाच्या सुनेला, अंगाला तेल लाव म्हणून म्हणूं लागले. तिनं दुसर्या जावेसारखा जबाब दिला. देवांनीं तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले. पुढं काय झालं? कांहीं वेळानं सासुसासरा घरीं आलीं, जेवणाची तयाई पाहूं लागलीं, तों तिथं कांहीं दिसेना. मग त्यांनीं सुनेला विचारलं, मागच्यासारखीच हकीकत ऐकली. सगळ्यांना उपवास पडला, मनांत फार खिन्न झालीं.
पुढं चौथ्या शनिवार आला. ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरीं ठेवलं. पहिल्यासारखीच आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेला. इकडे शनिदेवानं काय केलं? गलितकुष्ठ्याचं रूप धरलं. ब्राह्मणाचे घरीं आला. सुनेला म्हणूं लागला. “बाई बाई, माझं अंग ठणकत आहे, त्याला थोडं तेल लाव.” तिनं बरं म्हटलं. अंगाला तेल लावलं, ऊन पाण्यानं आंघोळ घातली. भाजीभाकर खायला दिली. त्याचा आत्मा थंड झाला. तेव्हां देवानं तिला आशीर्वाद दिला. तो काय दिला? असाच तुझाच आत्मा देव थंड करील म्हणून म्हणाला. आपलं उष्टं वळचणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावला. पुढं ब्राह्मणाची सून माडीवर गेली. हांडींमडकीं पाहूं लागली. डाळदाणा दृष्टीस पडला. तो काढला, तिनं चांगला स्वयंपाक केला, आणि सासूसासर्यांची वाट पहात बसली. इतक्यांत सासूसासरा तिथं आलीं. सुनेला विचारूं लागली. “मुली मुली, आज तूं काय केलं आहेस?” सुनेनं सांगितलं, “सगळी तयारी आहे. न्हायला तेल आहे. टाकळ्याची चोखणी आहे. आंघोळीला ऊन पाणी आहे. जेवायला बाजरीची भाकरी आहे. तोंडीं लावायला केनीकुर्डूची भाजी आहे.” सासूसासर्यांस आनंद झाला. “आपल्या घरांत तर कांहीं नव्हतं आणि इतकं सामान कुठुन आणलसं?” म्हणून तिला विचारलं. तिनं कुष्ठ्याची हकीकत सांगितली. दिलेला आशिर्वाद सांगितला. सासर्याला आनंद झाला.
इतक्यांत काय चमत्कार झाला? सासर्यांची दृष्टी वळचणीकडे गेली. तिथं कांहीं खोचलेलं दृष्टीस पडलं. त्यांनी तें सोडून पाहिलं तॊ, पत्रावळींवर हिरेमोत्यें दृष्टीस पडलीं सुनेला दाखविलीं, ह्याच पत्रावळींवर तो कुष्टी जेवला म्हणून तिनं सांगितलं सासरा म्हणाला, “देवानं मुलीला दर्शन दिलं.” पुढं दुसर्या सुनांस हकीकत विचारली, त्यांनीं दोन वेळां आला होता म्हणून सांगितलं, “आम्ही त्याला कांहीं दिलं नाहीं, त्याचा त्याला राग आला. नंतर त्यानं तुमच्याजवळ कांहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हांड्यामडक्यांत दाणे नाहींसे झाले. म्हणून दोन शनिवार आपणाला उपवास पडला.” पुढं सासुसासर्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली. मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करूं लागली.
जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला. तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.
तात्पर्य : कोणी कांही मागण्यास आला तर त्याला संतुष्ट करावें.
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |