सत्यार्थ प्रकाश/१४. अनुभूमिका-२
बारावा समुल्लास
अनुभूमिका (२)
जेव्हा आर्यावर्त्तातील लोकांमध्ये सत्यासत्याचा यथायोग्य निर्णय करणान्या वेदविद्येचा प्रसारबंद झाला आणि अविद्येचा पगडा बसून मतमतांतरे उत्पन्न झाली तेव्हा ज्ञानविरोधी जैन वगैरे मतांचा प्रचार सुरू झाला. वाल्मीकींचे रामायण व व्यासांचे महाभारत वगैरे प्राचीन ग्रंथांमध्ये जैनांचा नाममात्र देखील उल्लेख आढळत नाही. उलट जैनांच्या ग्रंथांमध्ये रामायण-महाभारतातील राम, कृष्ण वगैरे महापुरुषांच्या जीवन-गाथा विस्तारपूर्वक आलेल्या आहेत. यावरून असे सिद्ध होते की, हा जैन संप्रदाय पुष्कळच नंतरचा आहे. आपला पंथ फार प्राचीन आहे, असे जैन मंडळीचे म्हणणे आहे. तसे असते तर रामायण-महाभारतादी ग्रंथांमध्ये जैन मताचा उल्लेख अवश्य आला असता. तसा तो आलेला नसल्यामुळे जैन पंथ (मत) या ग्रंथांच्या निर्मितीनंतर उदयास आला असला पाहिजे हे उघड होते.
कोणी असे म्हणतील की, जैनांच्या ग्रंथातून कथा घेऊन रामायण-महाभारतादी ग्रंथांची रचना करण्यात आली असावी. त्यांना असे विचारले पाहिते की, रामायणादी ग्रंथांमध्ये तुमच्या ग्रंथांचा उल्लेखही का नाही? उलट तुमच्या ग्रंथांमध्ये त्यांचे उल्लेख आहेत. हे कसे ? पित्याच्या जन्माला पुत्र हजर असतो काय? मुळीच नाही. यावरून हेच सिद्ध होते की, जैन व बौद्ध हे संप्रदाय शैव, शाक्त इत्यादी संप्रदायांच्या नंतर उदयास आले.
आम्ही या बाराव्या समुल्लासामध्ये जैन पंथाविषयी जे काही लिहिले आहे, ते सर्व त्यांच्या ग्रंथांतील पुराव्यांनिशी लिहिले आहे. त्याबद्दल जेन बंधूनी राग मानू नये. कारण त्यांच्या संप्रदायाविषयी आम्ही जे काही लिहिले आहे, ते केवळ सत्यासत्याचा निवाडा करण्यासाठी लिहिले आहे. त्यांना विरोध करावा किंवा त्यांचे नुकसान करावे, अशी आमची भूमिका मुळीच नाही. आमचे हे विवेचन जेव्हा जैन, बौद्ध अथवा इतर लोक वाचतील तेव्हा सर्वांना सत्यासत्याचा निर्णय घेण्याच्या दृष्टीने विचार करता येईल व लिखाणही करता येईल. त्यापासून त्यांना योग्य तो बोधही घेता येईल. जोपर्यंत वादी-प्रतिवादी बनून प्रेमाने वादविवाद किंवा लिखाण केले जात नाही तोपर्यंत सत्यासत्याचा निवाडा होऊ शकत नाही.
जेव्हा विद्वान लोकांमध्ये सत्यसासत्याचा निर्णय होत नाही तेव्हा अज्ञ जनांना महाअंध:कारात पडून फार दुःख सहन करावे लागते. म्हणून सत्याचा जय व असत्याचा क्षय व्हावा यासाठी मैत्रीपूर्ण वादविवाद किंवा लिखाण करणे हे मानवजातीचे मुख्य काम आहे. ते काम कोणी केले नाही तर मानवांची प्रगती कधीच होणार नाही.
तसेच बौद्ध व जैन संप्रदायासंबंधी आम्ही येथे जे विवेचन केले आहे त्यावरून बौद्ध व जैन यांच्याप्रमाणेच इतर पंथांच्या लोकांचाही अपूर्व लाभ होईल आणि त्यांना खूप बोध मिळेल. कारण जैन लोक आपले ग्रंथ इतर पंथांच्या लोकांना पाहायला, वाचायला अथवा लिहायला देत नाहीत. आम्ही स्वतः या बाबतीत खूप खटपट केली. आणि मुंबईच्या आर्य समाजाचे मंत्री सेठ सेवकलाल कृष्णदास यांनीही पुष्कळ धडपड केली. त्यामुळे आम्हाला जैनांचे ग्रंथ पहायला मिळाले. अलीकडेच काशी येथील जैन प्रभाकर यंत्रालय (छापखाना) या संस्थेतर्फ जैगपंथासंबंधी काही ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. आणि मुंबईतून 'प्रकरणरत्नाकर' नावाचा ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे सर्व लोकांना जैन पंथासंबंधी माहिती मिळविणे सुलभ झाले आहे.
आपल्या पंथाचे ग्रंथ फक्त आपल्यालाच वाचायला मिळावेत, इतरांच्या हातीते पडूनयेत असे समजणाऱ्या विद्वानांना काय म्हणावे ? ते कसले विद्वान ? त्यांच्या या भूमिकेवरूनच लक्षात येते की. हे ग्रंथ रचणाऱ्यांना आधीपासूनच शंका वाटत असावी की, या ग्रंथांमध्ये ज्या असंभव गोष्टी आपण लिहिल्या आहेत त्या जेव्हा इतर पंथांचे लोक वाचतील तेव्हा ते त्यांचे खंडन करतील. त्या लोकांना बहुधा अशीही भीती वाटत असावी की, आपल्या पंथाचे लोक जेव्हा इतरांचे ग्रंथ वाचतील तेव्हा त्यांची आपल्या पंथावरची श्रद्धा उडून जाईल. म्हणून आपल्या पंथाच्या लोकांनी इतरांचे ग्रंथ वाचू नयेत असा निबंध त्यांनी घेतला असावा ! ते कसेही असो, सांगावयाचे तात्पर्य एवढेच की, अनेक लोकांना आपल्यातील दोष दिसत नाहीत. परंतु इतरांचे दोष काढण्यात मात्र ते पटाईत असतात. हे योग्य नाही. माणसाने प्रथम आपले दोष पाहून ते काढून टाकावेत आणि मग इतरांचे दोष पहावेत व ते काढून टाकण्याच्या कामी त्यांना मदत करावी. आता या बौद्ध व जैन लोकांच्या संप्रदायांचा विषय आम्ही सर्व सज्जनांसमोर मांडतो. त्यांनी स्वत: विचार करून त्यासंबंधी निर्णय घ्यावा.
किमधिकलेखेन बुद्धिमद्वर्य्येषु ।।