सत्यार्थ प्रकाश/७. सहावा समुल्लास

सहावा समुल्लास राजधर्म

राजधर्मान्प्रवक्ष्यामि यथावृत्तो भवेन्नृपः । संभवश्च यथा तस्य सिद्धिश्च परमा यथा ।। १ ।। मनु०।। अ०७ ।। श्लो० १।।

मनु महाराज ऋषींना सांगतात की, "चार वर्ण व चार आश्रम यांच्या व्यवहारांसंबंधी माहिती दिल्यानंतर आता मी राजधर्माचे विवेचन करतो. राजा कसा असला पाहिजे त्याची नियुक्ति कशी होते, त्याला परमसिद्धी कशी प्राप्त होते, हे सर्व मी सांगणार आहे॥१॥

ब्राह्मं प्राप्तेन संस्कारं क्षत्रियेण यथाविधि । सर्वस्यास्य यथान्यायं कर्तव्यं परिरक्षणम् ।। २ ।। मनु०।। अ०७ ।। श्लो०२।।

जसा परमविद्वान ब्राह्मण असतो तसे विद्वान व सुशिक्षित होऊन क्षत्रियांना उचित आहे की या सर्व राज्याचे रक्षण न्यायाने योग्य प्रकारे करावे. त्याचा प्रकार असा आहे.॥२॥ राजाने आपले कर्तव्य अशा प्रकारे पार पाडावे:

तीन सभची योजना

त्रीणि राजाना विदथे पुरूणि परि विश्वानि भूषाथः सदांसि ।।– ऋ० मं० ३। सू० ३८। मं० ६।।

ईश्वर उपदेश करतो की, (राजाना) राजा व प्रजेतील पुरुष मिळून (विदथे) सुखप्राप्तिकारक व विज्ञानवृद्धिकारक, राजा व प्रजा यांच्यातील संबंधरुप व्यवहारामध्ये (त्रीणि सदांसि) तीन सभा म्हणजे विद्यार्य सभा, धर्मार्थ सभा, राजार्य सभा स्थापन करून (पुरुर्णि) पुष्कळ प्रकारच्या (विश्रानि) समग्र प्रजासंबंधी, मनुष्यादी प्राण्यांना (परिभूषथः) सर्वप्रकारे विद्या, स्वातंत्र्य, धर्म, सुशिक्षण व धन इत्यादींनी अलंकृत करावे.

तं सभा च समितिश्च सेना च ।।१।।-अथर्व० कां० १५। अनु० २। व० ९। मं० २।।

(तम्) त्या राजधर्माचे (सभा च) त्या तीनही सभांनी (समितिश्च) संग्रामादि व्यवस्था आणि (सेना च) सैन्य यांनी मिळून पालन करावे. ।।१।।

सभ्य सभां मे पाहि ये च सभ्याः सभासदः ।।२।।-अथर्व० कां० १९। अनु० ७। व० ५५। मं० ६।।

    सभासद व राजा यांना उचित आहे की राजाने सर्व सभासदांना अशी आज्ञा करावी की हे (सभ्य) सभे

योग्य मुख्य सभासदा, तू (मे) माझ्या सभेच्या धर्मयुक्त व्यवस्थेचे (पाहि) पालन कर आणि (ये च)जे (सध्याः) सभी योग्य असे (सभासदः) सभासद आहेत त्यांनीही सभेच्या व्यवस्थेचे पालन करावे. ॥२॥

    याचा अर्थ असा की कुणा एका विशिष्ट व्यक्तीला राज्याचा स्वतंत्र अधिकार देता कामा नये. परंतु

सभापती राजाच्या आधीन सभा असावी, सभेच्या आधीन राजा, राजा व सभा यांनी प्रजेच्या आधीन रहावे आणि प्रजेने राजसभेच्या आधीन रहावे. असे केले नाही तर,

राष्ट्रमेव विश्या हन्ति तस्माद्राष्ट्री विशं घातुकः।। विशमेव राष्ट्रायाद्यां करोति तस्माद्राष्ट्री विशमत्ति न पुष्टं पशुं मन्यत इति ।।१।। -शत० कां० १३। अनु० २। ब्रा० ३।।

    जो प्रजेपासून स्वतंत्र स्वाधीन राजवर्ग असतो, (राष्ट्रमेव विश्याहन्ति) तो राज्यामध्ये प्रवेश करून प्रजेचा

नाश करतो. अर्थात एकटा राजा स्वाधीन किंवा उन्मत्त होऊन ( राष्ट्री विशं घातुकः) प्रजानाशक होतो. (विशमेव राष्ट्रायाद्यां करोति) म्हणजे तो राजा प्रजेला खाऊन टाकतो म्हणून राज्यामध्ये कोणीही एकाला स्वाधीन करू गये. ज्याप्रमाणे सिंहव्याघ्रादी हिंस्र पशू (पुटं पशूं न मन्यते) इतर धष्टपुष्ट पशूना मारून खातात त्याचप्रमाणे अनियंत्रित उन्मत्त राजा (राष्ट्री विशम् अत्ती ) प्रजेचा नाश करतो. तो आपल्या राज्यात कोणालाही वरचढ होऊ देत नाही; श्रीमंतांना लुटतो, अन्यायाने दंड करून लुबाडतो आणि आपला हेतू साध्य करतो. म्हणून,

इन्द्रो जयाति न परा जयाता अधिराजो राजसु राजयातै । चर्कृत्य ईड्यो वन्द्यश्चोपसद्यो नमस्यो भवेह ।। -अथर्व० कां० ६। अनु० १०। व० ९८। म० १।।

    हे मनुष्यांनो ! जो (इहा) या मनुष्य समाजात (इन्द्रः) परम ऐश्वर्याचा कर्ता व शत्रुंना (जयाति ) जिंकू

शकणारा, (न पराजयाता) शत्रूंकडून पराभूत न होणारा, (राजसु) राजांमध्ये, (अधिराजः) सर्वश्रेष्ठ विराजमान (राजयातै) प्रकाशमान होतो. (चर्कृत्य:) सभापती होण्यास अत्यंत योग्य, (ईड्यः) प्रशंसनीय गुणकर्मस्वभावयुक्त, (वन्द्यः) सत्कर्म करण्यास योग्य, (चोपसद्यः) जवळ जाण्यास व शरण देण्यास योग्य, (नमस्यः) सर्वांनी नमस्कार करण्यास योग्य असतो. त्यालाच सभापती (भव) राजा करावा.

राजाची लक्षणे

इमं देवाऽ असपत्नँ् सुवध्वं महते क्षत्रय महते ज्यैष्ठ्याय महते जानराज्यायेन्द्रस्येन्द्रियाय ।।१।। -यजुः० अ० ९। मन्त्र ४०।।

    हे (देवाः) विज्ञान, राज प्रजाजनहो, तुम्ही (इमम्) अशा प्रकारच्या पुरुषाला (महते क्षत्राय) मोठ्या

चक्रवर्ती राज्यासाठी (महते ज्यैष्ठ्याय) सर्वांहून मोठे होण्यासाठी (महते जानराज्याय) मोठमोठ्या विद्वानांनी युक्त अशा राज्याचे पालन करण्यासाठी (इन्द्रस्य इन्द्रियाय) परम ऐश्वर्ययुक्त राज्याचे व धनाचे रक्षण करण्यासाठी (असपत्नँ्सुवध्वम्) सर्वसंमती करून सर्वत्र पक्षपातरहित, पूर्ण विद्यायुक्त, विनयशील, सर्वांचा मित्र, अशा लोकनियुक्त सभापतीला, राजाला सर्वसत्ताधीश मानून सारा भूगोल म्हणजे सारे जग शत्रुरहित करा आणि

स्थिरा वः सन्त्वायुधा पराणुदे वीळू उत प्रतिष्कभे । युष्माकमस्तु तविषी पनीयसी मा मर्त्यस्य मायिनः ।। – ऋ० मं० १। सू० ३९। मं० २।।

     ईश्वर उपदेश करतो की हे राजपुरुषांनो (वः) तुमची (आयुधा) आग्नेयादी अस्त्रे शतघ्नी (तोफा) भृगुंडी

(बंदुका), धनुष्य-बाण, तलवार आदी शस्त्रे शत्रूंचा (पराणुदे) पराजय करण्यासाठी व (उत प्रतिष्कभे) त्यांना रोखण्यासाठी (वीळू) प्रशंसित आणि (स्थिरा) दृढ (सन्तु) असावीत. (युष्माकम्) तुमची (तविषी) सेना (पनीयसी) प्रशंसनीय (अस्तु) असावी जेणे करून तुम्ही नेहमी विजयी व्हावे. (मा मर्त्यस्य मायिनः) परंतु जो निंदनीय व अन्यायरूपी काम करीत असेल त्याच्यासाठी वर सांगितलेली शस्त्रास्त्रे नसावीत. याचा अर्थ असा की जोपर्यंत माणसे धार्मिक असतात तोपर्यंतच त्यांच्या राज्याची वृद्धी होत असते. पण जेव्हा ती दुराचारी बनतात तेव्हा त्यांचे राज्य नष्टभ्रष्ट होते.

     महाविद्वानांना विद्यासभेचे अधिकारी, धार्मिक विद्वानांना धर्मसभेचे अधिकारी, प्रशंसनीय धार्मिक पुरुषांना राजसभेचे सभासद बनवावे; आणि त्यांमध्ये सर्वोतम गुणांनी, कमन व स्वभावाने युक्त महान पुरुष असेल तर त्याला राजसभेचा सभापती मानून सर्व प्रकारे सवांनी आपली उन्नती करावी. तिन्ही सभांच्या संमतीने राजनीतीचे उत्तम नियम करावेत आणि त्या नियमांनुसार सर्व लोकांनी वागावे. सर्वांच्या संमतीने सार्वजनिक हिताची कामे करावीतमाणसाने सर्वांचे हित करण्यासाठी परतंत्र असावे आणि धर्मयुक्त कामांत जी जी स्वत:ची कामे आहेत त्यात्या साठी स्वतंत्र असावे. पुनः त्या सभापतीचे गुण कसे असले पाहिजे?

सभापतीचे लक्षण

इन्द्रानिलयमार्काणां अग्नेश्च वरुणस्य च । चन्द्रवित्तेशयोश्चैव मात्रा निर्हृत्य शाश्वतीः ।। १ ।। मनु०।। अ०७ ।। श्लो० ४।।

    तो सभाधीश राजा इन्द्र विजेप्रमाणे शीघ्र ऐश्वर्य संपादन करणारा, वायूप्रमाणे सर्वांना प्राणांसारखा प्रिय

असणारा व अंत:करणातील गोष्ट जाणणारा, यम म्हणजे निष्पक्ष न्यायाधीशाप्रमाणे वागणारा, सूर्याप्रमाणे न्याय, धर्म, विद्या, यांचा प्रकाशक आणि अन्धकार म्हणजे अविद्या व अन्याय यांचा निरोधक, अग्नीप्रमाणे दुष्टांचे भस्म करणारा, वरुण म्हणजे बांधणाऱ्या सारखा, दुष्टांना अनेक प्रकारे बांधणारा, चंद्रासारखा श्रेष्ठ पुरुषांना आनंद देणारा, कुबेराप्रमाणे खजिने भरून ठेवणारा असा (तो सभापती) असावा. ॥१॥ |

तपत्यादित्यवच्चैष चक्षूंषि च मनांसि च । न चैनं भुवि शक्नोति कश्चिदप्यभिवीक्षितुम् ।। २ ।। मनु०।। अ०७ ।। श्लो० ६।।

तो सूर्याप्रमाणे प्रतापी, आपल्या तेजाने सर्वांना बाहेरून व आतून मनाला तापविणारा असतो. पृथ्वीच्या पाठीवर त्याच्याकडे करड्या नजरेने पाहण्यास कोणीही समर्थ नसतो.॥२॥

सोऽग्निर्भवति वायुश्च सोऽर्कः सोमः स धर्मराट् । स कुबेरः स वरुणः स महेन्द्रः प्रभावतः ।। ३ ।। मनु०।। अ०७ ।। श्लो० ७।।

जो आपल्या प्रभावाने अग्नी, वायु, सूर्य व सोम यांच्यातील गुणांनी युक्त, धर्म प्रकाशक, धन वर्धक दुष्टांना वठणीवर आणणारा मोठा ऐश्वर्यशाली असावा तोच सभाध्यक्ष किंवा सभेश होण्यास योग्य असतो. ॥३॥

आता खरा राजा कोण ते पाह :-

शिक्षे संबंधी विवेचन

स राजा पुरुषो दण्डः स नेता शासिता च सः । चतुर्णां आश्रमाणां च धर्मस्य प्रतिभूः स्मृतः ।। १ ।। मनु०।। अ०७ ।। श्लो० १७।।

जा दंड आहे तोच पुरुष राजा, तोच न्यायाचा प्रचारक, तोच सर्वांचा शासक व तोच चार वर्ण व चार आश्रम यांच्या धर्माचा प्रतिभू म्हणजे जामीन आहे. ॥१॥

दण्डः शास्ति प्रजाः सर्वा दण्ड एवाभिरक्षति । दण्डः सुप्तेषु जागर्ति दण्डं धर्मं विदुर्बुधाः ।। २।। मनु०।। अ०७ ।। श्लो० १८।।

दंड हाच प्रजेचा शासनकर्ता, सर्व प्रजेचा रक्षक, सारी प्रजा झोपली असता जागणारा आहे. म्हणून बुद्धिमान लोक दंडालाच धर्म म्हणतात. ॥२॥

समीक्ष्य स धृतः सम्यक्सर्वा रञ्जयति प्रजाः । असमीक्ष्य प्रणीतस्तु विनाशयति सर्वतः ।। ३ ।। मनु०।। अ०७ ।। श्लो० १९।।

जो दंड योग्य प्रकारे विचार करून धारण केला जातो तो साऱ्या प्रजेला आनंदित करतो आणि जो दंड अविचाराने वापरला जातो तो सर्व बाजूनी राजाचा विनाश करतो आहे. ॥ ३॥

दुष्येयुः सर्ववर्णाश्च भिद्येरन्सर्वसेतवः । सर्वलोकप्रकोपश्च भवेद्दण्डस्य विभ्रमात् ।। ४ ।। मनु०।। अ०७ ।। श्लो० २४।।

दंड नसेल तर सर्व वर्णदूषित होतील आणि सर्व मर्यादा छिन्नभिन्न होती. लदंडाचा योग्य वापर न झाल्यास सर्व लोकांवर प्रकोप होत असतो. ॥४॥

यत्र श्यामो लोहिताक्षो दण्डश्चरति पापहा । प्रजास्तत्र न मुह्यन्ति नेता चेत्साधु पश्यति ।। ५ ।। मनु०।। अ०७ ।। श्लो० २५।।

जेथे कृष्णवर्ण, रक्तनेत्र, भयंकर पुरुषासमान पापांचा नाश करणारा दंड सर्वत्र संचार करतो तेथे प्रजा मोहवश न होता आनंदित होते. मात्र जेथे दंड चालविणारा शासक पक्षपातरहित विद्वान असेल तरच असे घडते. ॥५॥

तस्याहुः संप्रणेतारं राजानं सत्यवादिनम् । समीक्ष्यकारिणं प्राज्ञं धर्मकामार्थकोविदम् ।। ६ ।। मनु०।। अ०७ ।। श्लो० २६।।

जो शासक सत्यवादी, विचार करणारा, बुद्धिमान आणि धर्म, अर्थ व काम सिद्ध करण्यात पंडित असतो तोच दंड देण्यास योग्य आहे, असे विद्वान लोक म्हणतात.६॥

तं राजा प्रणयन्सम्यक्त्रिवर्गेणाभिवर्धते । कामात्मा विषमः क्षुद्रो दण्डेनैव निहन्यते ।। ७ ।। मनु०।। अ०७ ।। श्लो० २७।।

जो राजा उत्तम प्रकारे दंड चालवितो तो धर्म, अर्थ आणि काम यांची सिद्धता वाढवितो आणि जो विषयलंपट, वाकड्या मार्गानि जाणारा, ईष्य करणारा, क्षुद्र व नीच बुद्धीचा न्यायाधीश असतो तो त्या दंडानेच मारला जातो. ||७॥ |

दण्डो हि सुमहत्तेजो दुर्धरश्चाकृतात्मभिः । धर्माद्विचलितं हन्ति नृपं एव सबान्धवम् ।। ८ ।। मनु०।। अ०७ ।। श्लो० २८।।

अशा प्रकारे दंड हा अत्यंत तेजोमय असल्यामुळे त्याला अविद्वान अधर्मात्मा धारण करू शकत नाही. तेव्हा तो दंड अधार्मिक राजाचा त्याच्या कुटुंबासह नाश करतो. ॥ ८॥

सोऽसहायेन मूढेन लुब्धेनाकृतबुद्धिना । न शक्यो न्यायतो नेतुं सक्तेन विषयेषु च ।। ९ ।। मनु०।। अ०७ ।। श्लो० ३०।।

कारण ज्याला आप्त पुरुषांचे साह्य नाही, जो अशिक्षित, अविद्यावान, विषयलंपट व मूढ आहे तो न्याययुक्त दंड देण्यास कधीही समर्थ होऊ शकत नाही. ॥१॥

शुचिना सत्यसंधेन यथाशास्त्रानुसारिणा । प्रणेतुं शक्यते दण्डः सुसहायेन धीमता ।। १० ।। मनु०।। अ०७ ।। श्लो० ३१।।

आणि जो पवित्रात्मा, सत्याचरण करणारा, सत्पुरुषांच्या सहवासात राहणारा, नीतिशास्त्राप्रमाणे यथायोग्य चालणारा, श्रेष्ठ पुरुषांकडून साह्य प्राप्त होणारा व बुद्धिमान असतो तोच न्यायरूपी दंडाचा वापर करण्यास समर्थ असतो. ॥१०॥ म्हणून,

राजाची कर्तव्ये

सेनापत्यं च राज्यं च दण्डनेतृत्वं एव च । सर्वलोकाधिपत्यं च वेदशास्त्रविदर्हति ।। १ ।। मनु०।। अ०१२ ।। श्लो० १००।।

    सर्व सैन्य आणि सेनापतीच्या वर राजाधिकार दंड देण्याच्या व्यवस्थेचे सर्वोच्च अधिपत्य आणि या सर्वावर विद्यमान सर्वाधीश राज्याधिकार अशा चार सर्वोच्च अधिकारस्थानांवर संपूर्ण वेदशास्त्रांमध्ये प्रवीण, पूर्ण विद्यायुक्त, धर्मात्मा, जितेंद्रिय व सुशील अशा लोकांचीच स्थापना केली पाहिजे. याचा अर्थ असा की मुख्य सेनापती, मुख्य राज्याधिकारी, मुख्य न्यायाधीश, प्रधान आणि राजा हे । चौघे सर्व विद्यांमध्ये पूर्ण विद्वान असले पाहिजेत. ॥१॥

दशावरा वा परिषद्यं धर्मं परिकल्पयेत् । त्र्यवरा वापि वृत्तस्था तं धर्मं न विचालयेत् ।। १ ।। मनु०।। अ०१२ ।। श्लो० ११०।।

कमीत कमी दहा विद्वानांची किंवा निदान पक्षी तीन विद्वानांची, एक सभा किंवा समिती जशी व्यवस्था करील त्या धर्मसभेच्या अथवा विद्वत सभेच्या व्यवस्थेचे उल्लंघन कोणी करू नये. ॥२॥

त्रैविद्यो हेतुकस्तर्की नैरुक्तो धर्मपाठकः । त्रयश्चाश्रमिणः पूर्वे परिषत्स्याद्दशावरा ।। ३ ।। मनु०।। अ०१२ ।। श्लो० १११।।

या सभेमध्ये चारही वेद, न्यायशास्त्र, निरुक्त, धर्मशास्त्र यांचे ज्ञान असलेले विद्वान सभासद असावेत परंतु ते ब्रह्मचारी, गृहस्थ अथवा वानप्रस्थी असावेत तेव्हा अशा सभेमध्ये दहाहून कमी विद्वान असू नयेत. ॥३॥

ऋग्वेदविद्यजुर्विच्च सामवेदविदेव च । त्र्यवरा परिषज्ज्ञेया धर्मसंशयनिर्णये ।। ४।। मनु०।। अ०१२ ।। श्लो० ११२।।

आणि त्या सभेमध्ये ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद जाणणारे किमान तीन सभासद तरी असावेत. त्यांनी व्यवस्था करावी. त्या सभेने केलेल्या नियमांचे उल्लंघन कोणी करू नये. ॥४॥

एकोऽपि वेदविद्धर्मं यं व्यवस्येद्द्विजोत्तमः । स विज्ञेयः परो धर्मो नाज्ञानां उदितोऽयुतैः ।। ५ ।। मनु०।। अ०१२ ।। श्लो० ११३।।

जरी एकच पण सर्ववेद जाणणारा, द्विजांमधील उत्तम संन्यासी ज्याधर्माची व्यवस्था (चमा) करील तोच सर्वश्रेष्ठ धर्म होय. कारण हजारो, लाखो, करोडो, अज्ञानी लोकांनी एकत्र येऊन जी काही व्यवस्था केली असेल ती मुळीच मानता कामा नये. ॥५॥

अव्रतानां अमन्त्राणां जातिमात्रोपजीविनाम् । सहस्रशः समेतानां परिषत्त्वं न विद्यते ।। ६ ।। मनु०।। अ०१२ ।। श्लो० ११४।।

जे लोक ब्रह्मचर्य, सत्यभाषण आदी व्रत, वेदविद्या व विचार रहित, जन्मापासूनच जे शूद्राप्रमाणे वर्तन करतात असे हजारो पुरुष जमले तरी देखील सभा म्हणविली जाणार नाही. ॥६॥

यं वदन्ति तमोभूता मूर्खा धर्मं अतद्विदः । तत्पापं शतधा भूत्वा तद्वक्तॄननुगच्छति ।। ७ ।। मनु०।। अ० १२।। श्लो० ११५।।

    जे अविद्यावान, वेदांचे ज्ञान नसणारे मनुष्य ज्याला धर्म म्हणतील त्याला मुळीच मान्यता देऊ नये.

कारण जे लोक मूर्खांनी सांगितलेल्या धर्मानुसार चालतात त्यांचेमागे शेकडो प्रकारची पापे लागतात. ॥७॥

    म्हणून विद्यासभा, धर्मसभा व राज्यसभा या तीन्ही संस्थांमध्ये मुर्खांना कधीही भरती करू नये. तथापि

त्यांमध्ये नेहमीच विद्वान व धार्मिक पुरुषांना नियुक्त करावे. त्यात असणारे सर्व लोक असे असावेत:-

राजा व सभासदांची योग्यता

त्रैविद्येभ्यस्त्रयीं विद्यां दण्डनीतिं च शाश्वतीम् । आन्वीक्षिकीं चात्मविद्यां वार्तारम्भांश्च लोकतः।।१।। मनु०।। अ०७।। श्लो० ४३।।

ज्यांना चारही वेदांतील कर्म, उपासना व ज्ञान या तीन विद्या अवगत असतील, सनातन दंडनीती, न्यायविद्या व आत्मविद्या म्हणजे परमात्म्याचे गुण, कर्म व स्वभाव यथावत जाणण्याची ब्रह्मविद्या यांचे ज्ञान असेल तसेच लोकांशी संभाषणाचा प्रारंभ (सांगणे व विचारणे) ज्यांनी शिकून घेतला असेल तेच राजा, राजसभेचे सभासद किंवा सभापती होऊ शकतात. ॥१॥

इन्द्रियाणां जये योगं समातिष्ठेद्दिवानिशम् । जितेन्द्रियो हि शक्नोति वशे स्थापयितुं प्रजाः ।। २ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ४४।।

सर्व सभासद व सभापती यांनी जितेन्द्रिय अर्थात इंद्रियांवर ताबा मिळवून सदैव धर्माप्रमाणे वर्तन करावे आणि अधर्मापासून दूर राहावे, दूर राहविल्या जावे त्यासाठी त्यांनी रात्रंदिन ठरलेल्या वेळी योगाभ्यास सुद्धा करावा. कारण जो जितेन्द्रिय आपल्या इंद्रियांना म्हणजे मन, प्राण व शरीररूपी प्रजेला जिंकल्याशिवाय तो आपल्या राज्यातील बाहेरील प्रजेला ताब्यात ठेवण्यास कधीही समर्थ होऊ शकणार नाहीश

अठरा व्यसनांचा निषेध

दश कामसमुत्थानि तथाष्टौ क्रोधजानि च । व्यसनानि दुरन्तानि प्रयत्नेन विवर्जयेत् ।। ३ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ४५।।

कामापासून दहा व क्रोधापासून आठ दुष्ट व्यसने की ज्यामध्ये अडकलेला माणूस दृढोत्साही होऊन त्यांतून मोठ्या मुष्किलीने स्वत:ची सुटका करू शकतो. म्हणून त्यांना माणसाने प्रयत्नपूर्वक सोडावे व

कामजेषु प्रसक्तो हि व्यसनेषु महीपतिः । वियुज्यतेऽर्थधर्माभ्यां क्रोधजेष्वात्मनैव तु ।। ४ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ४६।।

कारण जो राजा कामवासनेतून निर्माण होणाऱ्या दहा दुष्टव्यसनांत फसतो तो अर्थाला म्हणजे राज्य, धन इत्यांदींना मुकतो व धर्माला पारखा होतो; आणि जो क्रोधापासून उत्पन्न होणाऱ्या आठ वाईट व्यसनांत गुंततो त्याला तर शरीरालाही मुकावे लागते. ॥४॥

मृगयाक्षो दिवास्वप्नः परिवादः स्त्रियो मदः । तौर्यत्रिकं वृथाट्या च कामजो दशको गणः ।। ५ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ४७।।

कामापासून उत्पन्न होणारी व्यसने अशी आहेत :- मृगया म्हणजे शिकारीचा खेळ, (अक्ष ) म्हणजे फाशांचा खेळ, जुगार, दिवसा झोपणे, कामविषयक गोष्टी करणे किंवा इतरांची निंदा करणे, अत्यधिक स्त्रीसंग करणे, मादक द्रव्यांचे म्हणजे दारूअफू, भांग, गांजा, चरस इत्यादींचे सेवन करणे, गाणे-बजावणे, नाचणे, नाच करविणे, पाहणे व ऐकणे, निष्कारण इकडे तिकडे भटकणे ही दहा कामोत्पन्न व्यसने आहेत. ।।५।।

पैशुन्यं साहसं द्रोह ईर्ष्यासूयार्थदूषणम् । वाग्दण्डजं च पारुष्यं क्रोधजोऽपि गणोऽष्टकः ।। ६।। मनु०।। अ०७।। श्लो० ४८।।

क्रोधापासून उत्पन्न होणारी आठ व्यसने अशी आहेत:- 'पैशुन्यम्' म्हणजे चुगली करणे, विचा रन करता बळजबरीने एखाद्या स्त्रीशी कुकर्म करणे, द्रोह करणे, ‘ईष्य' म्हणजे दुसऱ्याची उन्नती पाहून जळफळणे, 'असूया' म्हणजे दोषांना गुण व गुणांना दोष समजणे, 'अर्थदूषण' म्हणजे अधर्मयुक्त दुष्कृत्यांमध्ये धनादीचा व्यय करणे, कठोर वचन बोलणे, अपराधावाचून टाकून बोलणे अथवा विशेष शिक्षा करणे, हे आठ दुर्गुण क्रोधापासून उत्पन्न होतात. ॥६॥

द्वयोरप्येतयोर्मूलं यं सर्वे कवयो विदुः । तं यत्नेन जयेल्लोभं तज्जावेतावुभौ गणौ ।। ७ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ४९।।

लोभापासून हि कामज व क्रोधज व्यसने निर्माण होतात हो गोष्ट सर्व विद्वान लोक जाणतातम्हणून या सर्व दुर्गुणांच्या मुळाशी असलेल्या लोभाचा सर्वांनी प्रयत्नपूर्वक त्याग करावा. ॥७॥

पानं अक्षाः स्त्रियश्चैव मृगया च यथाक्रमम् । एतत्कष्टतमं विद्याच्चतुष्कं कामजे गणे ।। ८ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ५०।।

कामापासून उत्पन्न होणाऱ्या दहा दुर्गुणापैकी चार फारच भयंकर आहेत:(१) मद्यादि मादक द्रव्यांचे सेवन (२) फाशांचा खेळ किंवा जुगार (३) स्त्रियांशी अति संग करणे. (४) शिकार खेळणे. ही चार महादुष्ट व्यसने आहेत. ॥८॥

दण्डस्य पातनं चैव वाक्पारुष्यार्थदूषणे । क्रोधजेऽपि गणे विद्यात्कष्टं एतत्त्रिकं सदा ।। ९ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ५१।।

क्रोधापासून उत्पन्न होणार्या आठ दुग्णापैकी (१) अपराधावाचून शिक्षा करणे, (२) कठोर वचन बोलणे व (३) अन्यायत कामी द्रव्य खर्च करणे हे तीन दुर्गुण अत्यंत दु:खदायक आहेत. ॥९॥

सप्तकस्यास्य वर्गस्य सर्वत्रैवानुषङ्गिणः । पूर्वं पूर्वं गुरुतरं विद्याद्व्यसनं आत्मवान् ।। १० ।। मनु०।। अ०७।। श्लो० ५२।।

या सात दुर्गुणांमध्ये पहिल्यापेक्षा दुसरा जास्त भयंकर आहे. द्रव्याच्या अपव्ययापेक्षा कठोर वचन, कठोर वचनापेक्षा अन्यायाने शिक्षा करणे, त्याहून शिकार खेळणे, त्याहून अधिक स्त्रियांशी जादा संग, त्याहून जुगार आणि त्याहून मद्यादी मादक पदार्थाचे सेवन करणे हे अत्यंत वाईट व्यसन आहे. ॥१०॥

व्यसनस्य च मृत्योश्च व्यसनं कष्टं उच्यते । व्यसन्यधोऽधो व्रजति स्वर्यात्यव्यसनी मृतः ।। ११ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ५३।।

      वाईट व्यसनात रुतण्यापेक्षा मरणे जास्त चांगले, यात हाच निश्चय आहे. कारण दुराचारी पुरुष जास्त

जगला तर तो अधिकाधिक पाप करून अधोगतीला जाणार व अधिकाधिक दुःखी होणार पण जो कोणत्याही व्यसनात गुंतत नाही तो मरून गेला तरी त्याला सदैव सुखच मिळत राहील. म्हणून विशेषतः राजा व सर्व मनुष्यांना उचित आहे की सर्वांनी शिकार, मद्यपान वगैरे दुष्ट व्यसनांपासून दूर राहून चांगली धर्मयुक्त सत्कृत्ये आपापल्या गुण-कर्म-स्वभावानुसार नेहमी करीत राहावे॥११॥

राजसभासद व मंत्री कसे असावेत ?

राजसभासद व मंत्री यांचे लक्षण

मौलाञ् शास्त्रविदः शूरांल्लब्धलक्षान्कुलोद्भवान् । सचिवान्सप्त चाष्टौ वा प्रकुर्वीत परीक्षितान् ।। १ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ५४।।

स्वराज्यात,स्वदेशात जन्मलेले, वेदादी शास्त्रे जाणणारे, शूरवीर, ज्यांचे लक्ष व विचार निष्फळ होत नाही आणि कुलीन, ज्यांची सर्व प्रकारे उत्तम परीक्षा करण्यात आलेली आहे, असे सात किंवा आठ उत्तम, धार्मिक, चतुर 'सचिवान्' म्हणजे मंत्री करावेत. ॥१॥

अपि यत्सुकरं कर्म तदप्येकेन दुष्करम् । विशेषतोऽसहायेन किं तु राज्यं महोदयम् ।। २।। मनु०।। अ०७।। श्लो० ५५।।

कारण, अगदी सोपे काम असले तरी इतरांच्या विशेष मदतीशिवाय एकट्याने ते करणे अवघड जाते असे असल्याने एवढा मोठा राज्य कारभार एकटयाला कसा चालविता येईल? म्हणून एका माणसाला राजा बनविणे आणि त्याच्या एकट्याच्याच बुद्धीवर सारा राज्य कारभार सोपविणे अत्यंत वाईट आहे॥२॥

तैः सार्धं चिन्तयेन्नित्यं सामान्यं संधिविग्रहम् । स्थानं समुदयं गुप्तिं लब्धप्रशमनानि च ।। ३ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ५६।।

    म्हणून सभापतीने नियमितपणे राज्यकारभारात कुशल अशा विद्वान मंत्र्यांशी विचार विनिमय करावा.

कोणाशी (सन्धि) मैत्री, कोणाशी (विग्रह) संघर्ष करावा, (स्थान) परिस्थिती व काळवेळ पाहुन केव्हा गप्प बसावे, आपल्या राज्याचे रक्षण करून कसे स्वस्थ राहावे, (समुदयम्) आपली बाजू वरचढ असेल अशावेळी दुष्ट शत्रूवर कशी चढाई करावी, (गुप्तिम्) मूळ राजसेना व खजिना आदीचे रक्षण कसे करावे, (लब्धप्रशमनानि) जे-जे प्रदेश मिळविले असतील तेथे उपद्रव देणाऱ्यांचा बंदोबस्त करून शांतता कशी स्थापन करावी या सहा गोष्टींचा दररोज मंत्र्यांशी विचार विनिमय करावा. ॥३॥

तेषां स्वं स्वं अभिप्रायं उपलभ्य पृथक्पृथक् । समस्तानां च कार्येषु विदध्याद्धितं आत्मनः ।। ४ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ५७।।

विचारानेच प्रत्येक सभासदाशी वेगवेगळी सल्लामसलत करावी आणि सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर बहुमतानुसार जे काम आपल्या व इतरांच्या हिताचे असेल ते करू लागावे. ॥४

अन्यानपि प्रकुर्वीत शुचीन्प्राज्ञानवस्थितान् । सम्यगर्थसमाहर्तॄनमात्यान्सुपरीक्षितान् ।। ५ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ६०।।

याचप्रमाणे आणखीही पवित्रात्मा, बुद्धिमंत, निश्चयात्मक बुद्धचे,अनेक वस्तूंचा संग्रह करण्यात अत्यंत चतुर अशा लोकांची पारख करून त्यांना मंत्री बनवावे. ॥५॥

निर्वर्तेतास्य यावद्भिरितिकर्तव्यता नृभिः । तावतोऽतन्द्रितान्दक्षान्प्रकुर्वीत विचक्षणान् ।। ६।। मनु०।। अ०७।। श्लो० ६१।।

कार्यसिद्धीसाठी जितक्या माणसांची आवश्यकता असेल तेवढ्यांना उद्योगी, बलवान व अत्यंत चतुर अशा मुख्य मुख्य पुरुषांना अधिकारी म्हणजे गोकर करावे. ॥६॥

तेषां अर्थे नियुञ्जीत शूरान्दक्षान्कुलोद्गतान् । शुचीनाकरकर्मान्ते भीरूनन्तर्निवेशने ।। ७ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ६२।।

त्यांच्या हाताखाली शूरवीर, बलवान, कुलीन, पवित्र नोकरांना मोठमोठ्या कामासाठी सोपवावीत आणि भिती बाळगणाऱ्या लोकांना घरातील कामांवर नेमावे. ॥७॥

दूताचे लक्षण

दूतं चैव प्रकुर्वीत सर्वशास्त्रविशारदम् । इङ्गिताकारचेष्टज्ञं शुचिं दक्षं कुलोद्गतम् ।। ८ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ६३।।

जो प्रतिष्ठित कुळात जन्मला आहे, जो चतुर व पवित्र आहे, जो हावभाव व हालचाली यांवरून त्यांच्या अंत:करणातील भाव ओळखतो व भावी काळात काय होणार ते जाणतो जो सर्व शाखांमध्ये विशारद चतुर आहे त्या दूतालाही नोकरीवर ठेवावे. ॥८॥

अनुरक्तः शुचिर्दक्षः स्मृतिमान्देशकालवित् । वपुष्मान्वीतभीर्वाग्मी दूतो राज्ञः प्रशस्यते ।। ९ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ६४।।

    हा राजदूत असा असावा की जो राज्य कारभारात स्वारस्य असणारा, अत्यंत उत्साही, निष्कपटी, पवित्रात्मा, चतुरखूप जुन्या काळच्या गोष्टी न विसरणारा, देशकाळावर्तमानाप्रमाणे वर्तमानुसार वर्तमान कार्यकर्ता, सुंदर, देखणा, निर्भय व मोठा वक्ता असावा. तोच राजाचा दूत होण्यास प्रशस्त आहे॥१॥
    कोणाला कोणते अधिकार देणे योग्य आहेत?

मंत्र्यांचे कार्य

अमात्ये दण्ड आयत्तो दण्डे वैनयिकी क्रिया । नृपतौ कोशराष्ट्रे च दूते संधिविपर्ययौ ।। १ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ६५।।

अमात्याला दंडाधिकार असावा. दंड म्हणजे शिक्षा देताना विनयता अर्थात कोणावरही अन्याय रुपदंड होता कामा नये राजाचे अधिनस्थ राज्याचा खजिना व सर्व कामे राजसभेच्या आधीन असावीत आणि कोणाशी मैत्री किंवा वैर करण्याचा अधिकार दूताला द्यावा. ॥१॥

दूत एव हि संधत्ते भिनत्त्येव च संहतान् । दूतस्तत्कुरुते कर्म भिद्यन्ते येन मानवः ।। २ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ६६।।

ज्यांच्यात फूट पडली आहे त्यांच्यात मेळ आणि एकी झालेल्या दुष्टांमध्ये फाटाफूट निर्माण करावी दूताने असे कार्य करावे जेणेकरून शत्रुमध्ये फूट पडावी हे कार्य करणाऱ्यास दूत असे म्हणतात॥२॥

बुद्ध्वा च सर्वं तत्त्वेन परराजचिकीर्षितम् । तथा प्रयत्नं आतिष्ठेद्यथात्मानं न पीडयेत् ।। ३।। मनु०।। अ०७।। श्लो० ६८।।

सभापती व सर्व सभासद किंवा दूतादी यथायोग्याकडून दुसऱ्या विरोधी राजाचा हेतू ओळखून त्या राजापासून आपल्याला त्रास होणार नाही, असा प्रयत्न करावा. ॥३॥

राजरक्षणाचे उपाय

दुर्गाची लक्षणे

धन्वदुर्गं महीदुर्गं अब्दुर्गं वार्क्षं एव वा । नृदुर्गं गिरिदुर्गं वा समाश्रित्य वसेत्पुरम् ।। ४ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ७०।।

यासाठी जेथे सुंदर जंगल आहे व धनधान्य उत्तम प्रकारे उत्पन्न होऊ शकते अशा ठिकाणी (धनुर्दुर्गम्) धनुर्धारी पुरुषांनी वेढलेला (महीदुर्गम्) भुईकोट किल्ला बांधावा. त्याच्या सभोवती (अब्दुर्गम्) पाण्याने भरलेला खंदक असावा. तसेच (वाई) चारही बाजूंना वन असावे, (निदुर्गम्) चारी बाजूंना सेना रहावी, (गिरिदुर्गम्) सभोवती डोंगर असून मध्ये परकोट बांधून त्याच्या आत नगर बसवावे. ॥४॥

एकः शतं योधयति प्राकारस्थो धनुर्धरः । शतं दशसहस्राणि तस्माद्दुर्गं विधीयते ।। ५ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ७४।।

नगराच्या चारी बाजूना (प्राकार) प्रकोट बांधावेत. कारण प्राकारात असणारा एक वीर धनुर्धारी शस्त्रसज्ज पुरुष शंभर माणसांशी लढू शकतो आणि असे शंभर वीर दहा हजारांशी युद्ध करू शकतात. म्हणून दुर्ग किंवा किल्ले बांधणे उचित आहे॥५॥

तत्स्यादायुधसंपन्नं धनधान्येन वाहनैः । ब्राह्मणैः शिल्पिभिर्यन्त्रैर्यवसेनोदकेन च ।। ६ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ७५।।

त्या दुगांमध्ये शस्त्रास्त्रे, धन-धान्य, वाहने, अध्यापन व उपदेश करणारे ब्राह्मण, कारागीरयंत्रे, नाना प्रकारच्या कला, (यवसेन) चारा, गवत व पाणी इत्यादींचा साठा संपन्न अर्थात परिपूर्ण असावा. ॥६॥

तस्य मध्ये सुपर्याप्तं कारयेद्गृहं आत्मनः । गुप्तं सर्वर्तुकं शुभ्रं जलवृक्षसमन्वितम् ।। ७ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ७६।।

त्याच्या मध्यभागी जल, वृक्ष, पुष्प आदी सर्वप्रकारे सुरक्षित, सर्व ऋतूंमध्ये सुखकारक, श्वेतवर्ण आणि सारा राज्यकारभार चालविण्यास पुरेल असे विशाल भवन आपल्यासाठी राजाने बनवावे. ॥७॥

तदध्यास्योद्वहेद्भार्यां सवर्णां लक्षणान्विताम् । कुले महति संभूतां हृद्यां रूपगुणान्वीताम् ।। ८ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ७७।।

त्याप्रमाणे ब्रह्मचर्याश्रमात विद्या शिकून इतके राजकार्य केल्यानंतर सौंदर्यवती, गुणवान, हृदयाला प्रिय वाटणारी, उत्तम कुळात जन्मलेली सुंदर लक्षणांनी युक्त, क्षत्रिय कुळातील आणि आपल्या सारख्याच विद्यादी गुणकर्म स्वभावाने युक्त असणाऱ्या या एकाच कन्येशी विवाह करावा इतर सर्व स्त्रियां अगम्य समजून त्यांच्याकडे नजरेनेही पाह नये. ॥८॥

पुरोहितं च कुर्वीत वृणुयादेव च र्त्विजः । तेऽस्य गृह्याणि कर्माणि कुर्युर्वैतानिकानि च ।। ९ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ७८।।

राजघरातील अग्निहोत्र व पक्षी वगैरे धार्मिक कृत्ये करण्यासाठी पुरोहित व ऋत्विज यांचा स्विकार करावा आणि आपण सदैव राज्यकारभारात तत्पर राहावे. रात्रंदिवस राजकार्यामध्ये गढून जाणे आणि कोणतेही राजकार्य बिघडू न देणे हेच राजाचे संध्योपासनादी कर्म आहे॥१॥

राज्यकारभाराचे सामान्य नियम

सांवत्सरिकं आप्तैश्च राष्ट्रादाहारयेद्बलिम् । स्याच्चाम्नायपरो लोके वर्तेत पितृवन्नृषु ।। १ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ८०।।

राजाने प्रजेकडून वार्षिक कर आप्त-विद्वान् पुरुषांद्वारे ग्रहण करावा. सभापतीरूपी राजाने व इतर प्रमुख मंडळींनी वेदानुकूल वागावे व प्रजेचे पित्याप्रमाणे पालन करावे. ॥१॥

अध्यक्षान्विविधान्कुर्यात्तत्र तत्र विपश्चितः । तेऽस्य सर्वाण्यवेक्षेरन्नृणां कार्याणि कुर्वताम् ।। २।। मनु०।। अ०७।। श्लो० ८१।।

राज्य कारभारासाठी विविध प्रकारच्या विद्वान अध्यक्षांची नेमणूक करावी. राज्यकारभार चालविण्यासाठी नेमलेले पुरुष आपापली कामे नियमानुसार करतात की नाही ते पाहणे, जे योग्य प्रकारे कामे करीत असतील त्यांचा सत्कार करणे व जे आपले काम नीट करीत नसतील त्यांना यथोचित शिक्षा करावी.॥२॥

आवृत्तानां गुरुकुलाद्विप्राणां पूजको भवेत् । नृपाणां अक्षयो ह्येष निधिर्ब्राह्मोऽभिधीयते ।। ३।। मनु०।। अ०७।। श्लो० ८२।।

सदैव वेदप्रचार हे राजाचे मुख्य काम आहे. तो त्यांचा अक्षय कोष आहे. जो कोणी यथावत ब्रह्मचर्याचे पालन करून वेदादी शास्त्रे शिकून गुरुकुलातून येईल त्याचा सत्कार राजा व सभा यांनी योग्यप्रकारे करावा. त्याचप्रमाणे उत्तम प्रकारे शिकवून आपल्या विद्याध्यना विद्वान बनविणाऱ्यांचाही सत्कार करावा. असे केल्याने राज्यामध्ये विद्येचा प्रसार होऊन सर्व प्रकारे उन्नती होते.॥३

समोत्तमाधमै राजा त्वाहूतः पालयन्प्रजाः । न निवर्तेत संग्रामात्क्षात्रं धर्मं अनुस्मरन् ।। ४ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ८७।।

आपल्या प्रजेचे यथायोग्य पालन करणाऱ्या राजाला त्याच्यापेक्षा लहान, बरोबरीचा किंवा मोठा राजा। युद्धाचे आव्हान देईल तेव्हा क्षात्रधर्माला स्मरून त्याने युद्धापासून कधी परावृत्त होऊ नये. त्याने मोठ्या चातुर्याने युद्ध करून जय मिळवावा. ॥४॥

आहवेषु मिथोऽन्योन्यं जिघांसन्तो महीक्षितः । युध्यमानाः परं शक्त्या स्वर्गं यान्त्यपराङ्मुखाः।। ५ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ८९।।

संग्रामांमध्ये एकमेकांना ठार मारण्याची इच्छा बाळगणारे जे राजे लोक आपले सारे सामर्थ्य पणाला लावून, निर्भयपणे, शत्रूला पाठ न दाखविता, युद्ध करतात त्यांना सुख प्राप्त होते. म्हणून युद्धापासून कधीही विमुख होऊ नये. मात्र कधी-कधी शत्रुवर जय मिळविण्यासाठी त्याला हुलकावणी देणे, त्याच्या नजरेआड होणे योग्य असते. कारण कसेही करून शत्रुवर जय मिळविण्याचेच कार्य करावे. एखादा क्रुद्ध सिंह पुढे येऊन शस्त्राग्निमध्ये झटकन भस्म होऊन जातो. तसे मूर्खपणाने नष्ट होऊ नये. ॥५॥

युद्धाचे नियम

न च हन्यात्स्थलारूढं न क्लीबं न कृताञ्जलिम् । न मुक्तकेशं नासीनं न तवास्मीति वादिनम् ।। ६ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ९१।।

युद्धाच्या वेळी इकडे-तिकडे उभे असणारे, नपुंसक, हात जोडणारे, ज्यांच्या डोकीचे केस विस्कटले आहेत असे, बसलेले, 'मी तुला शरण आलो' असे म्हणणारे॥६॥

न सुप्तं न विसंनाहं न नग्नं न निरायुधम् । नायुध्यमानं पश्यन्तं न परेण समागतम् ।। ७ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ९२।।

निजलेले, मूर्च्छित झालेले, नग्न, नि:शस्त्र, युद्ध करणाऱ्यांकडे पाहात असलेले, शत्रूच्या बरोबर आलेले (पण त्याला प्रत्यक्ष साह्य न करणारे) ॥७॥

नायुधव्यसनप्राप्तं नार्तं नातिपरिक्षतम् । न भीतं न परावृत्तं सतां धर्मं अनुस्मरन् ।। ८ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ९३।।

आयुधांच्या प्रहाराने जखमी झालेले, दुखी, अत्यंत घायाळ झालेले, घाबरलेले व पळून चाललेले अशा प्रकारच्या लोकांना, सत्पुरुषांच्या धर्माचे स्मरण करून वीर पुरुषांनी कधी मारू नये. पण त्यांना पकडून त्यांच्यापैकीजे चांगले असतील त्यांना तुरुंगात ठेवावे व त्यांच्या खाण्यापिण्याची नीट व्यवस्था ठेवावी ; आणि जे घायाळ झाले असतील त्यांच्यावर विधिप्रमाणे औषधोपचार करावेत. त्यांना हिणवू नये अथवा दुःख देऊ नये. त्यांच्याकडून करवून घेण्यासारखी कामे करवून घ्यावीत. स्त्रिया, मुले, म्हातारे आणि आतुर व दुःखी पुरुष यांच्यावर कधीही शस्त्र चालवू नये. या गाष्टींवर विशेष लक्ष द्यावे. कैद केलेल्या लोकांच्या मुलाबाळांचे पालन पोषण स्वत:च्या मुलाप्रमाणे करावे आणि त्यांच्या स्त्रियांचेही पालन पोषण करावे. त्या आपल्या आया-बहिणी किंवा मुलीबाळी आहेत असे समजावे. त्यांच्याकडे कधी वैषयिक नजरेने पाहू नये. जेव्हा राज्यात पूर्ववत शांतता प्रस्थापित होईल आणि पुनः युद्ध होण्याची शक्यता दिसणार नाही तेव्हा पकडलेल्या लोकांना सन्मानपूर्वक सोडून द्यावे आणि त्यांच्या घरी अथवा देशाला पाठवून द्यावे. ज्यांच्यापासून भावी काळात धोका संभवणार असेल त्यांना कायमचे तुरुंगात डांबून ठेवावे. ॥८ ॥

यस्तु भीतः परावृत्तः संग्रामे हन्यते परैः । भर्तुर्यद्दुष्कृतं किं चित्तत्सर्वं प्रतिपद्यते ।। ९।। मनु०।। अ०७।। श्लो० ९४।।

जो समरांगणातून पळून जातो आणि घाबरून पळत असता शत्रूंकडून मारला जातो त्याला त्याच्या मालकाचे अपराध लागल्यामुळे तो शिक्षा भोगण्यास पात्र होतो. ॥९॥

यच्चास्य सुकृतं किं चिदमुत्रार्थं उपार्जितम् । भर्ता तत्सर्वं आदत्ते परावृत्तहतस्य तु।। १० ।। मनु०।। अ०७।। श्लो० ९५।।

त्याच्या ज्या सुकृतामुळे किंवा प्रतिष्ठेमुळे त्याला इहलोकी व परलोकी सुख मिळाले असते ते सुकृत त्याच्या धन्याला प्राप्त होते. अर्थात जो पळून जातो किंवा मारला जातो त्याला कसलेच सुख मिळत नाही. त्याचे सारे पुण्यफळ नष्ट होते. मात्र ज्याने धर्मयुद्ध केले असेल त्याला प्रतिष्ठा प्राप्त होते॥१०॥

रथाश्वं हस्तिनं छत्रं धनं धान्यं पशून्स्त्रियः । सर्वद्रव्याणि कुप्यं च यो यज्जयति तस्य तत् ।। ११ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ९६।।

लढाईमध्ये रथ, घोडे, हत्ती, छत्र, धन-धान्य,गाय वगैरे पशू आणि स्त्रिया तसेच इतर सर्व प्रकारची द्रव्ये, तूप, तेल यांचे साठे इत्यादी ज्या काही गोष्टी नोकराने अथवा अध्यक्षाने जिंकून घेतल्या असतील त्यांचा स्वीकार त्यांनी करावा. हा नियम केव्हाही मोडू नये. ॥११॥

राज्ञश्च दद्युरुद्धारं इत्येषा वैदिकी श्रुतिः । राज्ञा च सर्वयोधेभ्यो दातव्यं अपृथग्जितम् ।। १२ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ९७।।

परंतु सैन्यातील लोकांनीही स्वतः जिंकलेल्या वस्तूंपैकी सोळाव भाग राजाला द्यावा. त्याचप्रमाणे जे धन सर्वाना मिळून जिंकून आणले असेल त्याचा सोळावा भाग सैन्यातील योद्धयांना द्यावा. तसेच जो कोणी युद्धात मारला गेला असेल त्याची पत्नी व मुले यांना त्यांचा भाग द्यावा; आणि त्याच्या पत्नीचे व अज्ञान बालकांचे यथायोग्य पालनपोषण करावे. जेव्हा ती मुले मोठी होऊन सज्ञान बनतील तेव्हा त्यांना त्यांच्या योग्यते प्रमाणे अधिकार द्यावेत. जो कोणी आपल्या राज्याचे रक्षण, वृद्धी, प्रतिष्ठा, विजय व आनंदवृद्धी व्हावी अशी इच्छा बाळगत असेल त्याने या मर्यादिचे उल्लंघन कधीही करू नये. ॥१२॥

राज्य रक्षणाचे उपाय

अलब्धं चैव लिप्सेत लब्धं रक्षेत्प्रयत्नतः । रक्षितं वर्धयेच्चैव वृद्धं पात्रेषु निक्षिपेत्।। १ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ९९।।

राजा आणि राजसभा यांनी अलब्ध वस्तूच्या प्राप्तीची इच्छा, जे प्राप्त होईल त्याचे प्रयत्नपूर्वक रक्षण, रक्षित गोष्टींमध्ये वाढ आणि वाढलेल्या धनाचा उपयोग वेदविद्याप्रसार, धर्माचा प्रचा, रविद्यार्थी, वेदमार्गोपदेशक तसेच असमर्थ अनाथ यांचे पालनपोषण करण्यासाठी करावा. ॥१॥

अलब्धं इच्छेद्दण्डेन लब्धं रक्षेदवेक्षया । रक्षितं वर्धयेद्वृद्ध्या वृद्धं पात्रेषु निक्षिपेत् ।। २।। मनु०।। अ०७।। श्लो० १०१।।

हे चार प्रकारचे पुरुषार्थाचे प्रयोजन जाणून घ्यावे आणि आळस सोडून त्यांचे उत्तम प्रकारे सदा अनुष्ठान करावे. दंडाच्या साह्याने अप्राप्त वस्तू प्राप्त करून घेण्याची इच्छा, प्राप्त वस्तूवर नेहमी लक्ष ठेवून तिचे रक्षण, रक्षित वस्तूची वृद्धि म्हणजे व्याज वगैरे उपायांनी धन वाढवावे आणि वाढविलेल्या धनाचा विनियोग वर सांगितलेल्या कामांसाठी नेहमी करावा. ॥२॥

अमाययैव वर्तेत न कथं चन मायया । बुध्येतारिप्रयुक्तां च मायां नित्यं सुसंवृतः।। ३ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १०४।।

केव्हाही कोणाशीही कपट करू नये परंतु सर्वाशी निष्कपटपणे वागावे. सदैव आपले रक्षण करून शत्रुने केलेले छल कपटाचे डावपेच ओळखून ते निरस्त काढावेत. ॥३॥

नास्य छिद्रं परो विद्याद्विद्याच्छिद्रं परस्य च । गूहेत्कूर्म इवाङ्गानि रक्षेद्विवरं आत्मनः ।। ४ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १०५।।

कोणी शत्रु आपली छिद्र म्हणजे कमजोरी जाणू शकणार नाही आणि आपण मात्र शत्रुची छिद्रे जाणत राहावे. ज्याप्रमाणे कासव आपली अंगे झाकून ठेवतो त्याप्रमाणे ज्या छिद्रांतून शत्रुला प्रवेश करता येईल अशी छिद्रे गुप्त ठेवावीत॥४॥

बकवच्चिन्तयेदर्थान्सिंहवच्च पराक्रमे । वृकवच्चावलुम्पेत शशवच्च विनिष्पतेत् ।। ५ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १०६।।

बगळा जसा ध्यानस्थ होऊन मासळी पकडण्यासाठी टपून असतो तसा धनसंग्रहाचा सतत विचार करावा. द्रव्यादी गोष्टींची व सामध्यची वृद्धी करून शत्रुला जिंकण्यासाठी सिंहाप्रमाणे पराक्रम करावा. चित्याप्रमाणे दबा धरून शत्रुला पकडावे. बलवान शत्रुपासून सशाप्रमाणे दूर पळून जावे आणि मग डावपेच करून त्याला पकडावे.॥५॥

एवं विजयमानस्य येऽस्य स्युः परिपन्थिनः । तानानयेद्वशं सर्वान्सामादिभिरुपक्रमैः ।। ६ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १०७।।

अशा प्रकारे विजयी होणाऱ्या सभापतीच्या राज्यात जे कोणी परिपंथी म्हणजे वाटमार्ये , दरोडेखोरे, लुटारू असतील त्यांना साम, दाम, भेद व दंड या उपायांनी वश करून घ्यावे. साम म्हणजे मिळवून घेणे, दाम म्हणजे पैसा वगैरे देणे, भेद म्हणजे फंदफितुरी करणे आणि दंड म्हणजे शिक्षा किंवा युद्ध करणे. पहिल्या तीन उपयांनी आपले अधिकारात करावे आणि जर यामुळे अधीन झाला नाही तरच अति कठीण दंडाचा चौथा उपाय करावा. ॥६॥

यथोद्धरति निर्दाता कक्षं धान्यं च रक्षति । तथा रक्षेन्नृपो राष्ट्रं हन्याच्च परिपन्थिनः ।। ७ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ११०।।

ज्याप्रमाणे धान्य निसविणारा धान्याची टरफले काढून धान्याचे रक्षण करतो, म्हणजे धान्याचे दाणे तुटू देत नाही त्याप्रमाणे राजाने चोर व दरोडेखोर यांना मारून राज्याचे रक्षण करावे. ॥७॥

मोहाद्राजा स्वराष्ट्रं यः कर्षयत्यनवेक्षया । सोऽचिराद्भ्रश्यते राज्याज्जीविताच्च सबान्धवः ।। ८ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १११।।

जो राजा मोहाने, अविचाराने आपले राज्य दुर्बळ करतो तो आपले राज्य घालवून बसतो आणि आपल्या बांधवांसह जिवंतपणीच बघता बघता नष्टभ्रष्ट होऊन जातो.॥८॥

शरीरकर्षणात्प्राणाः क्षीयन्ते प्राणिनां यथा । तथा राज्ञां अपि प्राणाः क्षीयन्ते राष्ट्रकर्षणात् ।। ९ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ११२।।

ज्याप्रमाणे प्राण्यांचे प्राण शरीराला कृश केल्याने क्षीण होतात त्याप्रमाणे प्रजेला दुर्बळ बनविल्याने राजांचे प्राण म्हणजे सामर्थ्य आदी बंधुसहनष्ट होऊन जातात॥९॥

राष्ट्रस्य संग्रहे नित्यं विधानं इदं आचरेत् । सुसंगृहीतराष्ट्रे हि पार्थिवः सुखं एधते ।। १०।। मनु०।। अ०७।। श्लो० ११३।।

म्हणून ज्यायोगे राज्यकारभार नीट चालत राहील असा प्रयल राजा व राजसभा यांनी राजकार्याच्या सिद्धीसाठी करीत राहावे. जो राजा राज्यपालनाच्या बाबतीत सर्व प्रकारे तत्पर असतो त्याचे सुख सदैव वाढत राहते. ॥१०॥

द्वयोस्त्रयाणां पञ्चानां मध्ये गुल्मं अधिष्ठितम् । तथा ग्रामशतानां च कुर्याद्राष्ट्रस्य संग्रहम् ।। ११ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ११४।।

म्हणून दोन, तीन, पाच आणि शंभर गावांमध्ये एक राजस्थान म्हणजे प्रशासकीय कार्यालय स्थापन करावे. त्यामध्ये यथायोग्य नोकर म्हणजे कामदार वगैरे राजपुरुषांची नियुक्ती करून साऱ्या राज्याचा कारभार चालवावा. ॥११॥

ग्राम-प्रमुखाचे वर्णन

ग्रामस्याधिपतिं कुर्याद्दशग्रामपतिं तथा । विंशतीशं शतेशं च सहस्रपतिं एव च ।। १२ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ११५।।

प्रत्येक गावात एकेक प्रधान पुरुष नेमावा. दर दहा गावांवर आणखी एक अधिकारी, वीस गावांवर तिसरा अधिकारी, शंभर गावांवर चौथा व हजार गावांवर पाचवा अधिकारी नेमावा. आजकाल एका गावासाठी एक तलाठी (पटवारी), दहा गावांसाठी एक ठाणेदार, दोन ठाण्यांवर एक मोठा ठाणेदार, पाच ठाण्यांवर एक तहसीलदार (मामलेदार) असतो आणि दहा तहशिली मिळून एक जिल्हा बनतो. ही सारी व्यवस्था मनुस्मृती आदी धर्मशास्त्रांतील राजनीतीचा प्रकार घेतला आहे. ॥१२॥

ग्रामदोषान्समुत्पन्नान्ग्रामिकः शनकैः स्वयम् । शंसेद्ग्रामदशेशाय दशेशो विंशतीशिने ।। १३ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ११६।।

या संबंधात अशी व्यवस्था करावी व आज्ञा देऊन ठेवावी की प्रत्येक गावाच्या सभापतीने आपल्या गावात नेहमी जे दोष उत्पन्न होतील ते गुप्तपणे दहा गावांच्या सभापतीला कळवावेत. त्या दह गावांच्या सभापतीने याच प्रकारे वीस गावांच्या अधिपतीला आपापल्या गावांतील दररोजचे वर्तमान कळवावे.॥१३॥

विंशतीशस्तु तत्सर्वं शतेशाय निवेदयेत् । शंसेद्ग्रामशतेशस्तु सहस्रपतये स्वयम् ।। १४ ।। मनु०।। अ०७।। श्लो० ११७।।

वीस गावांच्या अधिपतीने आपल्या वीस गावांची बातमी शतग्रामाधिपतीला दरदिवशी नियमितपणे कळवावी; त्या शंभर गावांच्या अधिपतींनी सहस्त्राधिपतीला आपापल्या शंभर गावांची हकीगत दररोज कळवाव. वीस-वीस ग्रामांचे पाच अधिपती शंभर गावांच्या अध्यक्षाला व शंभर गावांच्या अध्यक्षांनी सहस्र गावांच्या अधिपतीला, सहस्त्र गावांच्या दहा अधिपतींनी दहा हजार गावांच्या अधिपतीला आणि त्या प्रत्येकी दहा हजार गावांच्या दहाअधिपतींनी लक्षग्रामांवर नियंत्रण ठेवणाऱ्या राजसभेला रोजची हकीगत कळवावी. अशाच प्रकारे सर्व राजसभांनी महाराजसभेला म्हणजे सार्वभौम चक्रवर्ती महाराज सभेला साऱ्या भूमंडळाचे वृत्त कळवावे.१४ ||

तेषां ग्राम्याणि कार्यानि पृथक्कार्याणि चैव हि । राज्ञोऽन्यः सचिवः स्निग्धस्तानि पश्येदतन्द्रितः ।। १५ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १२०।।

दहा हजार गावांच्या एकेका गटावर दोन सभापतींची नेमणूक करावी. त्यांतील एक जण राजसभेचा प्रतिनिधी असावा व दुसरा अध्यक्ष असावा. त्याने आळस सोडून न्यायाधीश आदि सर्व राजपुरुषाच्या कामाची नेहमी फिरत राहून पाहणी करावी, आपापली कामे नीट करतात की नाही ते पाहावे॥१५॥

नगरे नगरे चैकं कुर्यात्सर्वार्थचिन्तकम् । उच्चैःस्थानं घोररूपं नक्षत्राणां इव ग्रहम्।। १६ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १२१।।

मोठमोठ्या शहरांमध्ये कामासंबंधी एक एक विचार करणारी सभा असावी. त्या एकेका सभेचे भवन उंचविशाल, भव्य व चंद्रासारखे देखणे असावे. त्या सभेमध्ये मोठमोठया ज्ञानवृद्ध ज्यांनी विद्येद्वारा सर्व प्रकारची परीक्षा केली असेल त्यांनी बसून विचारविनिमय करावा. ज्या नियमांनी राजा व प्रजा यांची उन्नती होईल तसे तसे नियम आणि विद्येचा प्रचार-प्रसार करावा. ॥१६

स ताननुपरिक्रामेत्सर्वानेव सदा स्वयम् । तेषां वृत्तं परिणयेत्सम्यग्राष्ट्रेषु तच्चरैः ।। १७ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १२२।।

नित्य फिरणारा असेल त्याच्या हाताखाली सर्व गुप्तचर म्हणजे दूत ठेवावेत. ते राजपुरुष व प्रजापुरुष यांच्याशी नित्य संबंध ठेवणारे व वेगवेगळ्या योग्यतेचे असावेत. या हेरांकडून त्याने राज व प्रजापुरुषांचे सर्व गुणदोष गुप्तपणे जाणून घ्यावेत. जे अपराधी असतील त्यांना शिक्षा करावी आणि जे गुणी असतील त्यांचा नेहमी सन्मान करीत जावा. ॥१७॥

राज्ञो हि रक्षाधिकृताः परस्वादायिनः शठाः । भृत्या भवन्ति प्रायेण तेभ्यो रक्षेदिमाः प्रजाः ।। १८ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १२३।।

राजाने धार्मिक वृत्तीच्या, कुलीन, नीट पारख करण्यात आलेल्या विद्वानलोकांनाच प्रजेच्या रक्षणाचा अधिकार द्यावा. त्यांच्या हाताखाली बहुधा लबाड, पर पदार्थ हरण करणारे चोर, दरोडेखोर यांनाही नोकर म्हणून नेमा. वेत्यांना दुष्कृत्यांपासून परावृत्त करण्यासाठी त्यांना राजाचे नोकर बनवून जनतेचे रक्षण करणाऱ्या विद्वानांच्या स्वाधीन करावे. अशा प्रकारे त्यांच्यापासून या प्रजेचे रक्षण यथायोग्य करावे. ॥१८॥

ये कार्यिकेभ्योऽर्थं एव गृह्णीयुः पापचेतसः । तेषां सर्वस्वं आदाय राजा कुर्यात्प्रवासनम् ।। १९ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १२४।।

जे राजपुरुष अन्यायाने वादी व प्रतिवादी यांच्याकडून गुप्तपणे लाच घेतात व पक्षपात करून अन्याय करतात, त्यांचे सर्वस्व हरण करून त्यांना यथायोग्य शिक्षा करून त्यांना अशा ठिकाणी ठेवावे की जेथून ते परत येऊ शकणार नाहीत कारण जर अशा लाचखाऊ नोकरांना कडक शिक्षा दिली गेली नाही तर त्यांचे पाहून इतर राजपुरुषही तशीच दुष्कृत्ये करतील. परंतु त्यांना शिक्षा दिल्यास इतर लोक लाचलुचपतीपासून दूर राहतील परंतु जितक्या पैशांनी राजपुरुषांचा योगक्षेम उत्तम प्रकारे चालेल व ते बऱ्यापैकी धनाढ्यही बनू शकतील एवढे धन अथवा भूमी शासनातर्फ त्यांना दिली जावी. त्यांचे वेतन मासिक अथवा वार्षिक असावे किंवा एकाच हप्त्यात दिले जावे आणि राजपुरुष वृद्ध झाल्यानंतर त्यांना त्यांचा निम्मा पगार जीवंत असेपर्यंत उदर भरण्यासाठी मिळावा. त्यांच्या निधनानंतर तो बंद व्हावा. मात्र त्यांच्या मुलांचा सत्कार त्यांच्या गुणानुसार करावा अथवा त्यांच्या लायकीप्रमाणेनोकरी अवश्य द्यावी. मृत राजपुरुषांची मुले लहान असतील व पत्नी जिवंत असेल त त्या सर्वांच्या पोटापाण्याची योग्य ती व्यवस्था शासनाकडून व्हावी. मात्र मृत राजपुरुषांची मुले अथवा स्त्री दुराचारी असतील तर त्यांना काहीही देऊ नये. अशी नीति राजाने बरोबर ठेवावी. ॥१९॥

कर वसूली

यथा फलेन युज्येत राजा कर्ता च कर्मणाम् । तथावेक्ष्य नृपो राष्ट्रे कल्पयेत्सततं करान्।। १ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १२८।।

राजा व कर्मचारी राजपुरुष आणि प्रजा यांना सुख व्हावे म्हणून राजा व राजसभा यांनी आपसात विचार विनिमय करून कर बसवावा. ॥१॥

यथाल्पाल्पं अदन्त्याद्यं वार्योकोवत्सषट्पदाः । तथाल्पाल्पो ग्रहीतव्यो राष्ट्राद्राज्ञाब्दिकः करः ।। २ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १२९।।

ज्याप्रमाणे जळू, वासरू व भुंगा हे आपल्या भोग्य पदार्थाचे (म्हणजे रक्त, दूध व मध यांचे) थोडे-थोडे ग्रहण किंवा शोषण करतात त्याप्रमाणे राजाने प्रजेकडून थोडा-थोडा वार्षिक कर घ्यावा. ॥२॥

नोच्छिन्द्यादात्मनो मूलं परेषां चातितृष्णया । उच्छिन्दन्ह्यात्मनो मूलं आट्मानं तांश्च पीदयेत् ।। ३।। मनु०।। अ०७।। श्लो० १३९।।

अतिलोभाने आपल्या व इतरांच्या सुखाचे मूळच कधीही नष्ट करू नये. कारण जो व्यवहार व सुख यांची मुळेच उपटून टाकतो तो स्वत:ला व इतरांना दु:खात लोटतो.॥३॥

तीक्ष्णश्चैव मृदुश्च स्यात्कार्यं वीक्ष्य महीपतिः । तीक्ष्णश्चैव मृदुश्चैव राज भवति सम्मतः।। ४ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १४०।।

जो महीपती कार्यानुसार कठोर किंवा कोमल बनतो तो दुष्टांशी कठोर व सज्जनांशी सौम्य वागणूक ठेवल्याने सर्वांना प्रिय होतो.४।।

प्रजेचे रक्षण

एवं सर्वं विधायेदं इतिकर्तव्यं आत्मनः । युक्तश्चैवाप्रमत्तश्च परिरक्षेदिमाः प्रजाः ।। ५ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १४२।।

अशा प्रकारे सर्व राज्याची व्यवस्था लावून सदैव लक्ष देऊन राजाने प्रमादरहित होऊन प्रजेचे निरंतर पालन करावे. ॥५॥

विक्रोशन्त्यो यस्य राष्ट्राद्ह्रियन्ते दस्युभिः प्रजाः । संपश्यतः सभृत्यस्य मृतः स न तु जीवति ।। ६ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १४३।।

ज्या राजाच्या राज्यात त्याच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्या देखत चोर व लुटारू आक्रोश करणाऱ्या प्रजेचे वित्त व प्राण हरण करतात. तो राजा आपले नोकर-चाकर व मंत्री-अमात्य यांच्यासह जिवंत असून मेलेलाच आहे व महादुःख भोगण्याच्या लायकीचा आहे॥६॥

क्षत्रियस्य परो धर्मः प्राजानां एव पालनम् । निर्दिष्टफलभोक्ता हि राजा धर्मेण युज्यते ।। ७ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १४४।।

म्हणून प्रजेचे पालन करणे हाच राजांचा परम धर्म आहे. मनुस्मृतीच्या सातव्या अध्यायामध्ये ज्याप्रकारे कर घ्यावा असे लिहले आहे त्या प्रकारे व राजसभा ठरवील तेवढाच कर घेणारा राजा धर्माने युक्त होऊन सुख होतो आणि याविरुद्ध वर्तन केल्यास दु:खी होतो. ॥७॥

राजाची दिनचर्या

उत्थाय पश्चिमे यामे कृतशौचः समाहितः । हुताग्निर्ब्राह्मणांश्चार्च्य प्रविशेत्स शुभां सभाम् ।। १ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १४५।।

एक प्रहर रात्र शिल्लक राहिली असता उठून शौचमुखमार्जन आदी उकून स्नान करावे आणि सावध चित्ताने परमेश्वराचे ध्यान, अग्निहोत्र, धार्मिक विद्वानांचा सत्कार व भोजन करून राजाने राजसभेत प्रवेश करावा.॥१॥

तत्र स्थितः प्रजाः सर्वाः प्रतिनन्द्य विसर्जयेत् । विसृज्य च प्रजाः सर्वा मन्त्रयेत्सह मन्त्रिभिः ।। २ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १४६।।

तेथे त्याने उभे राहून उपस्थित प्रजाजनांना मान द्यावा आणि मग त्यांना निरोप देउन मुख्य मंत्र्याशी राज्यकारभाराविषयी विचार विनिमय करावा. ॥२॥

गिरिपृष्ठं समारुह्य प्रसादं वा रहोगतः । अरण्ये निःशलाके वा मन्त्रयेदविभावितः ।। ३ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १४७।।

त्यानंतर त्याने मुख्य मंत्र्यांसह फिरायला जावे. यावेळी डोंगरावर जावे, अरण्यात जावे अथवा एकांतात बसावे. जेथे गवताची एक काडीही असणार नाही अशा निर्जन ठिकाणी बसून अविरुद्ध भावनेने मंत्र्यांशी विचार विनिमय करावा . ॥३॥

यस्य मन्त्रं न जानन्ति समागम्य पृथग्जनाः । स कृत्स्नां पृथिवीं भुङ्क्ते कोशहीनोऽपि पार्थिवः ।। ४ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १४८।।

अनेक लोक एकत्र येऊन सुद्धा ज्या राजाचे गुप्त विचार जाणू शकत नाहीत, ज्याचे विचार गंभीर, शुद्ध, परोपकारी असून सदैव गुप्त राहातात तो राजा धनहीन असला तरी सर्व पृथ्वीवर राज्य करण्यास समर्थ असतो. म्हणून त्याने आपल्या एकट्याच्या विचाराने एकही काम करू नये जोपर्यंत सर्व सभासदांची संमती असत नाही.||४||

संधि व विग्रह

आसनं चैव यानं च संधिं विग्रहं एव च । कार्यं वीक्ष्य प्रयुञ्जीत द्वैधं संश्रयं एव च ।। १ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १६१ ।।

राजादी सर्व राजपुरुषांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की (आसनम्) स्थिरता बसणे, (यानम्) शत्रूशी लढायला जाणे, (सन्धिम्) त्याच्याशी तह करणे, विग्रहम्) दुष्ट शत्रूशी लढाई करणे, (द्वैधम्) सैन्याचे दोन भाग करून स्वतःचा विजय होणे, (संश्रयम्) स्वत: दुर्बळ असता दुसऱ्या प्रबळ राजाचा आश्रय घेणे, या सहा प्रकारची कामे उपायांचा योग्य प्रसंगाचा विचार करून करणे उचित असते.॥१॥

संधिं तु द्विविधं विद्याद्राजा विग्रहं एव च । उभे यानासने चैव द्विविधः संश्रयः स्मृतः ।। २ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १६२।।

संधी, विग्रह, यान, आसन, द्वैधीभाव व संश्रय यांचे २-२ प्रकार होतातते राजाने नीट जाणून घ्यावेत. ॥२॥

समानयानकर्मा च विपरीतस्तथैव च । तदा त्वायतिसंयुक्तः संधिर्ज्ञेयो द्विलक्षणः ।। ३ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १६३।।

(संधिः) शत्रूशी मैत्री करावी किंवा त्याच्याशी विरोध करावा. परंतु वर्तमानकाळी व भविष्यकाळी करावयाची कामे राजाने बरोबर करीत राहावे. याला द्विविध संधी म्हणतात. ॥३॥

स्वयंकृतश्च कार्यार्थं अकाले काल एव वा । मित्रस्य चैवापकृते द्विविधो विग्रहः स्मृतः ।। ४ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १६४।।

(विग्रहः) कार्यसिद्धीसाठी उचित किंवा अनुचित वेळी आपल्या शत्रूला किंवा आपल्या मित्राचा अपराध करणाऱ्या शत्रूबरोबर विरोध हे दोन प्रकारचे विग्रह केले पाहिजेत. ॥४॥

एकाकिनश्चात्ययिके कार्ये प्राप्ते यदृच्छया । संहतस्य च मित्रेण द्विविधं यानं उच्यते ।। ५ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १६५ ।।

(यानम्) अकस्मात काही कारण घडले असता आपण एकट्याने किंवा मित्राच्या बरोबर शत्रूकडे जाणे चाल करणे, ही दोन प्रकारची गमने किंवा याने म्हटली जातात॥५॥

क्षीणस्य चैव क्रमशो दैवात्पूर्वकृतेन वा । मित्रस्य चानुरोधेन द्विविधं स्मृतं आसनम् ।। ६ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १६६ ।।

काही प्रकाराने हळूहळू (आसनम्) स्वत: क्षीण झाल्याने किंवा निर्बळ झाल्याने, अथवा मित्रांनी रोखल्यामुळे आपल्या ठिकाणी स्वस्थ बसणे, ही दोन प्रकारची आसने म्हटली जातात.

बलस्य स्वामिनश्चैव स्थितिः कार्यार्थसिद्धये । द्विविधं कीर्त्यते द्वैधं षाड्गुण्यगुणवेदिभिः ।। ७ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १६७।।

(द्वैधम्) कार्यसिद्धीसाठी सेनापती व सेना यांचे दोन विभाग करून विजय मिळविणे याला दोन प्रकारचे द्वैध म्हणतात. ॥७॥

अर्थसंपादनार्थं च पीड्यमानस्य शत्रुभिः । साधुषु व्यपदेशश्च द्विविधः संश्रयः स्मृतः ।। ८ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १६८।।

(संश्रयः) एखादा आपला हेतू सफल व्हावा म्हणून एखाद्या बलवान राजाचा किंवा एखाद्या महात्म्याचा आश्रय घेणे व त्यामुळे शत्रूच्या त्रासातून सुटणे, हा दोन प्रकारचा आश्रय होय. ॥८॥

यदावगच्छेदायत्यां आधिक्यं ध्रुवं आत्मनः । तदात्वे चाल्पिकां पीडां तदा संधिं समाश्रयेत्।। ९ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १६९।।

यावेळी शत्रूशी युद्ध केल्यास आपली हानी होण्याची शक्यता आहे आणि नंतर युद्ध केल्यास आपला लाभ व विजय नक्की होईल, असे लक्षात आल्यास शत्रूशी तह करून योग्य संधीची वाट पाहावी. ॥९॥

यदा प्रहृष्टा मन्येत सर्वास्तु प्रकृतीर्भृशम् । अत्युच्छ्रितं तथात्मानं तदा कुर्वीत विग्रहम् ।। १० ।। मनु०।। अ०७।। श्लो० १७०।।

जेव्हा आपली सारी प्रजा व सेना अत्यंत प्रसन्न, उन्नत व श्रेष्ठ असल्याचे आढळून येईल व आपणही तसेच असल्याचे वाटेल त्याचवेळी शत्रूशी विग्रह (युद्ध) करावे.।।१०।।

यदा मन्येत भावेन हृष्टं पुष्टं बलं स्वकम् । परस्य विपरीतं च तदा यायाद्रिपुं प्रति ।। ११ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १७१।।

जेव्हा आपले सैन्य आनंदी, प्रबळ व प्रसन्न असेल आणि याउलट शत्रुचे बळ दुबळे आहे असे समजेल तेव्हा शत्रूवर चाल करून जावे. ॥११॥

यदा तु स्यात्परिक्षीणो वाहनेन बलेन च । तदासीत प्रयत्नेन शनकैः सान्त्वयन्नरीन्।। १२ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १७२।।

जेव्हा आपले सैन्य, बळ वाहने यांच्यामुळे क्षीण झाले असेल तेव्हा सावकाश प्रयत्नाने शत्रुला शांत करीत राजाने आपल्या जागी स्वस्थ बसून राहावे. ॥१२॥

मन्येतारिं यदा राजा सर्वथा बलवत्तरम् । तदा द्विधा बलं कृत्वा साधयेत्कार्यं आत्मनः ।। १३ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १७३।।

जेव्हा शत्रू अत्यंत बलवान आहे असे आढळून येईल तेव्हा आपल्या सैन्याचे दोन भाग करून आपले कार्य साधावे. ॥१३॥

यदा परबलानां तु गमनीयतमो भवेत् । तदा तु संश्रयेत्क्षिप्रं धार्मिकं बलिनं नृपम् ।। १४ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १७४।।

आपल्यावर शत्रु लवकरच चाल करून येईल असे वाटल्यास ताबडतोब कोणत्याही धार्मिक व बलवान राजाचा आश्रय घ्यावा. ॥१४॥

निग्रहं प्रकृतीनां च कुर्याद्योऽरिबलस्य च । उपसेवेत तं नित्यं सर्वयत्नैर्गुरुं यथा ।। १५ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १७५।।

जो राजा आपली प्रजा व आपली सेना व शत्रुचे सामर्थ्य यांच्यावर नियंत्रण ठेवतो त्याची गुरूप्रमाणे सर्व प्रकारे नित्य सेवा करीत असावे. ॥१५॥

यदि तत्रापि संपश्येद्दोषं संश्रयकारितम् । सुयुद्धं एव तत्रापि निर्विशङ्कः समाचरेत् ।। १६ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १७६।।

ज्याचा आपण आश्रय घेतला असेल त्या पुरुषाच्या कृतीमध्ये काही दोष दिसून आले तर त्याच्याशीही नि:शंकपणे जोरदार युद्ध करावे. १६॥

    जो राजा धार्मिक असेल त्याला कधीही विरोध न करता त्याच्याशी नेहमी मैत्री ठेवावी; आणि जो दुष्ट प्रबळ असेल त्याला जिंकण्यासाठी वर सांगितलेले उपाय करणे योग्य आहे.

मित्र, तटस्थ व शत्रूबाबतीत दक्षता

सर्वोपायैस्तथा कुर्यान्नीतिज्ञः पृथिवीपतिः । यथास्याभ्यधिका न स्युर्मित्रोदासीनशत्रवः ।। १ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १७७।।

राजनीती जाणणाऱ्या पृथ्वीपती राजाने आपले मित्र, उदासीन (तटस्थ) वश आपणांहून अधिक होणार नाहीत, या दृष्टीने सर्व उपायांनी आचरण करावे. ॥१॥

आयतिं सर्वकार्याणां तदात्वं च विचारयेत् । अतीतानां च सर्वेषां गुणदोषौ च तत्त्वतः ।। २ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १७८।।

सर्व कामांच्या बाबतीत वर्तमानकाळी काय केले पाहिजे. भविष्यकाळी काय केले पाहिजे आणि भूतकाळी केलेल्या कामांमध्ये कोणते गुण-दोष आहेत याचा यथायोग्य विचार राजाने करावा. ॥२॥

आयत्यां गुणदोषज्ञस्तदात्वे क्षिप्रनिश्चयः । अतीते कार्यशेषज्ञः शत्रुभिर्नाभिभूयते ।। ३।। मनु०।। अ०७।। श्लो० १७९।।

त्यानंतर दोष काढून टाकण्याचे व गुणाची स्थिरता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. जो राजा भावी काळात करावयाच्या कामांचे गुणदोष जाणतो, वर्तमानकाळी करावयाच्या कामांच्या बाबतीत चटकन निर्णय घेतो आणि पूर्वी केलेल्या कामांमध्ये काम करावयाचे राहून गेले आहे, हे ओळखतो तो कधीहो शत्रूकडून पराजित होत नाही. ||३||

यथैनं नाभिसंदध्युर्मित्रोदासीनशत्रवः । तथा सर्वं संविदध्यादेष सामासिको नयः ।। ४ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १८०।।

राजपुरुषाने, विशेषतः राजसभेच्या सभापतीने आपले मित्र, उदासीन (तटस्थ) व शत्रू यांना वश करून घ्यावे. शत्रू आपल्या विरुद्ध काही करणार नाहीत अशा मोह भ्रमतेत कधी ते फसणार नाहीत या बाबतीत कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष किंवा हेळसांड करू नये. यालाच थोडक्यात 'विनय' म्हणजे राजनीती असे म्हटले जाते.॥४॥

लढाईची तयारी

कृत्वा विधानं मूले तु यात्रिकं च यथाविधि । उपगृह्यास्पदं चैव चारान्सम्यग्विधाय च ।। १ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १८४।।

जेव्हा राजा शत्रूशी युद्ध करण्यास जाईल तेव्हा त्याने प्रथम आपल्या राज्याच्या रक्षणाची व्यवस्था करावी आणि प्रवासाची जय्यत तयारी करून सेना, याने, वाहने, शस्त्रास्त्रे वगैरे भपूर बरोबर घ्यावीत. सगळीकडच्या बातम्या आणण्यासाठी गुप्त हेरांची नेमणूक करावी आणि मगच शत्रूवर चढाई करण्यास निघावे.॥१॥

संशोध्य त्रिविधं मार्गं षड्विधं च बलं स्वकम् । सांपरायिककल्पेन यायादरिपुरं प्रति ।। २ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १८५।।

स्थल (जमिनीवरील) जल (समुद्रातील व नद्यांवरील) आणि आकाश हे तीन्ही मार्ग निर्विघ्न व सुरक्षित करून भूमार्गावर रथ, घोडे, हत्ती; जलमार्गावर नौका व आकाश मार्गावर विमाने यांचा वापर करावा. पायदळ, रथी, हत्तीस्वार, घोडेस्वार, या सर्वांना लागणारी शस्त्रास्त्र व खाण्यापिण्याची सामग्री भरपूर प्रमाणात बरोबर घ्यावी. अशा प्रकारे पूर्णपणे सामर्थशाली बनून काहीतरी कारण प्रसिद्ध करून सांगून हळूहळूशच्या नगरजवळ जावे. ॥२॥

शत्रुसेविनि मित्रे च गूढे युक्ततरो भवेत् । गतप्रत्यागते चैव स हि कष्टतरो रिपुः ।। ३ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १८६।।

जो आतून शत्रूला सामील झालेला असतो पण वरून आपल्याशीही मैत्री असल्याचे भासवतो आणि गुप्तपणे शत्रूला माहिती पुरवितो त्याच्या येण्याजाण्यावर नजर ठेवावी आणि त्याच्याशी बोलताना अत्यंत सावधगिरी बाळगावी. कारण आतून शत्रू व वरून मित्र असणारा माणूस हा फार मोठा शत्रू समजला पाहिजे. ॥३॥

व्यूहाचे प्रकार

दण्डव्यूहेन तन्मार्गं यायात्तु शकटेन वा । वराहमकराभ्यां वा सूच्या वा गरुडेन वा ।। ४ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १८७।।

सर्व राजपुरुषांना युद्ध करण्याची विद्या शिकवावी. तसेच ती स्वतः शिकावी आणि प्रजाजनांनाही शिकवावी. ज्या योद्ध्यांनी युद्धाचे शिक्षण घेतलेले असते तेच उत्तम प्रकारे लढणे व लढविणे जाणतात. सैनिकांना प्रशिक्षण देताना (दण्डव्यूह) दंडाप्रमाणे सरळ रांगेत सैन्य चालवावे, (शकट) शकट म्हणजे गाडी प्रमाणे, (वराह) डुकराप्रमाणे एका मागून एक याप्रमाणे धावत जाणे किंवा कधी-कधी सर्वांनी मिळून कळप केला जाणे, (मकर) मगरी पाण्यात संचार करतात तशी सैन्याची रचना करणे, (सूचीव्यूह) सुई जशी टोकाला अत्यंत सूक्ष्म असून मागच्या बाजूला जाड होत जाते आणि तिच्यात ओवलेला दोरा त्याहून जाडजूड असतो. त्या धर्तीवर सैन्यास शिकवावे, (गरुड) ज्याप्रमाणे गरुड हवेमध्ये वर खालीझेप घेऊन झडप घालतो त्याप्रमाणे सेन्याची तयारी करून त्यांना लढवावे. ॥४॥

यतश्च भयं आशङ्केत्ततो विस्तारयेद्बलम् । पद्मेन चैव व्यूहेन निविशेत सदा स्वयम् ।। ५ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १८८।।

ज्या बाजूने भय वाटेल त्याच बाजूला सैन्य पसरून ठेवावे. सर्व सेनापतींना चारी बाबून ठेवावे आशि (पद्मव्यूह) कमळाप्रमाणे चारी बाजूना सैन्य ठेवून मध्यभागी आपण स्वतः राहावे॥५॥

सेनापतिबलाध्यक्षौ सर्वदिक्षु निवेशयेत् । यतश्च भयं आशङ्केत्प्राचीं तां कल्पयेद्दिशम् ।। ६ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १८९।।

सेनापती व बलाध्यक्ष म्हणजे आज्ञा देणारे व सैन्याबरोबर स्वत: लढणारे आणि लढविणारे अशा वीरांना आठही दिशांना जय्यत तयारीने ठेवावे. जिकडे लढाई चालू असेल त्या दिशेला सर्व सैन्याचे मुख असावे. परंतु इतर बाजूंचाही पक्का बंदोबस्त ठेवावा. नाहीतर शत्रुचा हल्ला मागून अथवा आजूबाजूनी होण्याचा धोका असतो.॥६॥

गुल्मांश्च स्थापयेदाप्तान्कृतसंज्ञान्समन्ततः । स्थाने युद्धे च कुशलानभीरूनविकारिणः ।। ७ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १९०।।

गुल्म म्हणजे दृढ स्तंभाप्रमाणे युद्ध-विधेत निष्णात, धार्मिक स्थिर वृत्तीचे, युद्ध करण्यात चतुर, निर्भय आणि ज्यांचे मनात कसलाही विकार उत्पन्न होत नाही अशा वीरांना सैन्याच्या चारही बाजूंना नियुक्त करावे. ॥७॥

संहतान्योधयेदल्पान्कामं विस्तारयेद्बहून् । सूच्या वज्रेण चैवैतान्व्यूहेन व्यूह्य योधयेत् ।। ८ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १९१।।

थोड्या सैन्यानिशी फार मोठया सेनेशी युद्ध करावयाचे असेल तर एकजुटीने लढावे; आणि वेळ पडल्यास त्यांना झटकन विखरून टाकावे. नगरात, दुर्गात किंवा शत्रूच्या सैन्यात घुसून युद्ध करावयाचे असेल तेव्हा 'सूचीव्यूह' किंवा 'वज्रव्यूह' रचून युद्ध करावे दुधारी तलवारीप्रमाणे दोन्ही बाजूनी युद्ध करीत जावे आणि शत्रूच्या सैन्यात प्रवेश घेत चलावे तशी अनेक प्रकारची व्यूह रचना करून युद्ध करावे. समोरून शत्रुची ((शतघ्नी) तोफ अथवा (भुशुण्डी) बंदूक मारा करीत असेल तर सर्वव्यूहाची रचना करावी म्हणजे सापाप्रमाणे सरपटत जावे आणि तोफांजवळ पोहचून गोलंदाजांना मारून अथवा पकडून तोका-बंदूका ताब्यात घ्याव्यात आणि त्यांची तोंडे शत्रूकडे फिरवून त्यांचा मारा शत्रुवर करावा किंवा तोफांच्या समोर वृद्ध पुरुषांना घोड्यावरून धावावयास लावावे व मारावे. त्यांच्या मध्यभागी उत्तम योद्धे असावेत. त्यांनी शत्रूवर हल्ला करून शत्रुचे सैन्य उध्वस्त करून त्यांच्या सैनिकांना पकडावे किंवा पिटाळून लावावे॥८॥

स्यन्दनाश्वैः समे युध्येदनूपे नौ द्विपैस्तथा । वृक्षगुल्मावृते चापैरसिचर्मायुधैः स्थले।। ९ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १९२।।

समतल सपाट भूमिवर युद्ध करावयाचे असेल तर रथ, घोडे व पायदळ यांद्वारा करावे. समुद्रावरचे युद्ध असेल तर नौकाद्वारा व थोडे पाणी असल्यास हत्तीद्वारा, वृक्ष व झाडे झुडुपे असल्यास बाणांच्याद्वारा आणि वाळवंट असल्यास ढाल-तलवारीद्वारा युद्ध करावे, करवावे॥९॥

प्रहर्षयेद्बलं व्यूह्य तांश्च सम्यक्परीक्षयेत् । चेष्टाश्चैव विजानीयादरीन्योधयतां अपि ।। १०।। मनु०।। अ०७।। श्लो० १९४।।

युद्ध चालू असताना लढणाऱ्यांना उत्साहित व हर्षित करावे. युद्ध थांबल्यावर सैनिकांचे शौर्य वाढेल व लढण्यास प्रोत्साहन मिळेल अशी भाषणे करून सर्वांची मने उल्हासित करावीतआणि सर्वांना खाणे-पिणे, अन्न-वस्त्र, औषधपाणी इत्यादींची उत्तम सोय करून सवना प्रसन्न ठेवावे. व्यूहरचना केल्याशिवाय युद्ध करू नये अथवा करवू नये. आपल्या लढणाऱ्या सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून ते योग्य प्रकारे लढत आहे की छल कपट करीत आहे हे पाहावे. ॥१०॥

उपरुध्यारिं आसीत राष्ट्रं चास्योपपीडयेत् । दूषयेच्चास्य सततं यवसान्नोदकेन्धनम् ।। ११ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १९५।।

एखादे वेळी योग्य वाटल्यास शत्रुला चारी बाजूनी घेऊन कोंडीत पकडावे; आणि त्याच्या राज्याला सतवावे. त्याचे चारा, अन्न, पाणी व इंधन यांचे साठे नष्ट किंवा दूषित करावेत. ॥११॥

भिन्द्याच्चैव तडागानि प्राकारपरिखास्तथा । समवस्कन्दयेच्चैनं रात्रौ वित्रासयेत्तथा ।। १२ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १९६।।

शत्रुचे तलाव,नगराचे परकोट व खंदक तोडून-फाडून टाकावेत, रात्री अपराघी त्यांना घाबरवून सोडावे आणि आपला जय होण्यासाठी उपाय योजावेत. ॥१२॥

पराजित शत्रु संबंधी व्यवहार

प्रमाणानि च कुर्वीत तेषां धर्मान्यथोदितान् । रत्नैश्च पूजयेदेनं प्रधानपुरुषैः सह।। १३ ।। मनु०।। अ०७।। श्लो० २०३।।

शत्रुला जिंकल्यावर त्याच्याशी करारनामे व प्रतिज्ञापत्रे करावीत आणि योग्य वाटल्यास त्याच्याच वंशातील एखाद्या धार्मिक वृत्तीच्या पुरुषाला राजा करावे आणि त्याच्याकडून असे लिहून घ्यावे की तुम्हांला आमच्या आज्ञेप्रमाणे म्हणजे जी धर्मयुक्त राजनीती आहे त्याप्रमाणे वागून न्यायाने प्रजेचे पालन करावे लागेल. असा उपदेश करावा. त्याच्याजवळ आपली अशी माणसे नेमावीत की ज्यायोगे पुनः त्याच्याकडून उपद्रव होणार नाही. जो पराभूत झाला असेल त्याचा सत्कार प्रधान पुरुषांसह रत्ने आदी उत्तम वस्तू त्याला भेट देऊन करावा मात्र त्याचा योगक्षेमही नीट चालणार नाही, असे करू नये. त्याला तुरुंगात टाकले तरी त्याची योग्य बडदास्त ठेवावी. ज्यायोगे तो पराभवाचे दुःख विसरून आनंदात राहील. ॥१३।।

आदानं अप्रियकरं दानं च प्रियकारकम् । अभीप्सितानां अर्थानां काले युक्तं प्रशस्यते ।। १४ ।। मनु०।। अ०७।। श्लो० २०४।।

कारण या जगामध्ये दुसऱ्याची वस्तू घेणे हे अप्रीती व दुसऱ्याला काही देणेही प्रेम निर्माण करणारे असते. योग्य वेळ पाहून उचित व्यवहार करणे आणि पराजित राजाला मनोवांछित वस्तू देणे हे अत्यंत उत्तम असते. त्याला कधी चिडवू नये, हसू नये किंवा त्याची थट्टामस्करी करू नये. आम्ही तुला पराभूत केले आहे, असे त्याच्या तोंडावर म्हणू नये. उलट तुम्ही आमचे भाऊच आहात, इत्यादि गोड बोलून त्याची प्रतिष्ठा नेहमी ठेववी. ॥१४॥

मित्राचे महत्त्व

हिरण्यभूमिसंप्राप्त्या पार्थिवो न तथैधते । यथा मित्रं ध्रुवं लब्ध्वा कृशं अप्यायतिक्षमम् ।। १ ।। मनु०।। अ०७।। श्लो० २०८।।

मित्राचे हे लक्षण आहे:- अढळ प्रेमयुक्त, भावी काळात घडणाऱ्या गोष्टींचा विचार करणारा आणि कार्य सिद्ध करण्यास समर्थ असा सबळ किंवा दुर्बळ मित्र लाभल्यास राजाची जशी उन्नती होते तशी सुवर्ण किंवा भूमी प्राप्त झाल्यानेही होत नाही. ॥१॥

धर्मज्ञं च कृतज्ञं च तुष्टप्रकृतिं एव च । अनुरक्तं स्थिरारम्भं लघुमित्रं प्रशस्यते ।। २ ।। मनु०।। अ०७।। श्लो० २०९।।

धर्म जाणणारा, कुतज्ञ, म्हणजे केलेले उपकार सदा स्मरणारा, प्रसन्न वृत्तीचा स्थिर अनुरागी लहान मित्राकडून तो प्रशंसनीय होत असतो. ॥२॥

शत्रूपासून दक्षता

प्राज्ञं कुलीनं शूरं च दक्षं दातारं एव च । कृतज्ञं धृतिमन्तं च कष्टं आहुररिं बुधाः ।। ३ ।। मनु०।। अ०७।। श्लो० २१०।।

बुद्धिमानकुलीन, शूरवीरचतुरदाता, कृतज्ञ आणि धैर्यवान अशा पुरुषाला कधीही शत्रु बनवू नये. कारण अशा माणसाला जो शत्रू बनवील त्याला दुःख भोगावे लागते, ही सदैव खूणगाठ ठेवावी. ॥३॥

तटस्थाचे लक्षण

आर्यता पुरुषज्ञानं शौर्यं करुणवेदिता । स्थौललक्ष्यं च सततं उदासीनगुणोदयः।। ४ ।। मनु०।। अ०७।। श्लो० २११।।

उदासीनाचे (तटस्थाचे) लक्षणः- जो प्रशंसनीय गुणयुक्त आहे, बऱ्या व वाईट माणसांची पारख ज्याला आहे जो शुरुवीर व दयालू आहेपरंतु जो नेहेमी वरवरच्या गोष्टीच बोलत राहतो, त्याला उदासीन किंवा तटस्थ असे म्हणतात.॥४॥

एवं सर्वं इदं राजा सह सम्मन्त्र्य मन्त्रिभिः । व्यायम्याप्लुत्य मध्याह्ने भोक्तुं अन्तःपुरं विशेत् ।। १ ।। मनु०।। अ०७।। श्लो० २१६।।

पूर्वी सांगितल्याप्रमाणे पहाटे उठून शौचमुखमार्जन,लान, संध्योपासना, अग्निहोत्र वगैरे करून अथवा करवून, सर्व मंत्र्यांशी विचार विनिमय करून, सभेत जाऊन सर्व कर्मचाऱ्यांना व सेनाध्यक्षांना भेटून, त्यांना आनंदित करून विविध प्रकारची व्यूहरचना म्हणजे कवाईत करून घेऊन, घोडे व हत्ती यांचे तबेले व गायींचे गोठे यांची तपासणी करून, शस्त्रास्त्रांची भांडारे, वैद्यालय, संपत्तीचे खजिने वगैरे सर्वांचे दररोज नियमाने निरीक्षण करून, त्यांत काही दोष असतील तर ते काढून टाकण्याचे उपाय सुचवून राजाले व्यायामशाळेत जावून तेये व्यायाम केल्यावर भोजनासाठी अंत:पुरात म्हणजे जेथे पत्नी राहत असेल तेथे जावे आणि सुपरिक्षित भोजन करावयाचे ते बुद्धिबळ पराक्रमवर्धक व रोगनाशक असावे नानाप्रकारचे अन्न व्यंजनादि त्यातील खाण्याचे व पिण्याचे पदार्थ सुगंधित, मिष्टादी अनेक रसांनी युक्त असावेत. अशा अन्नाच्या सेवनाने सदा सुखी राहावे. अशा प्रकारे राजाने राज्याच्या सर्व कार्याची उन्नति करीत असावे. ॥१॥

करांचे प्रमाण

प्रजेकडून करघेण्याचे प्रकार- पञ्चाशद्भाग आदेयो राज्ञा पशुहिरण्ययोः । धान्यानां अष्टमो भागः षष्ठो द्वादश एव वा ।। १ ।। मनु०।। अ०७।। श्लो० १३०।।

व्यापारी किंवा कारागीर यांना सोने व चांदी यांच्या रूपाने जेवढा नफा मिळत असेल त्याचा पन्नासावा भाग कर म्हणून राजाने घ्यावा. तांदूळ वगैरे धान्याचा सहावा, आठवा किंवा बारावाभाग घ्यावा. शेतकऱ्यांकडून तो पैशाच्या रूपात घ्यावयाचा कर अशाप्रकारे घ्यावा की ज्यायोगे शेतकऱ्यांना खाण्यापिण्याची टंचाई होणार नाही आणि ते निर्धन बसून दु:खी होणार नाहीत.॥१

     कारण प्रजा धनाढ्य व आरोग्यसंपन्न व खाऊनपिऊन सुखी असेल तरच राजाची मोठी उन्नति होते. राजाने प्रजेला आपल्या मुलांबाळांप्रमाणे सुखी ठेवावे आणि प्रजेने राजाला व राजपुरुषांना पित्याप्रमाणे मागावे. ही गोष्ट उचित आहे की परिश्रम करणारे शेतकरी राजांचे राजे असतात आणि राजा त्यांचा रक्षणकर्ता असतो, प्रजाच नसेल तर राजा कुणाचा? आणि राजा नसेल तर प्रजा कुणाची? राजा आणि प्रजा दोघेही आपापल्या कामात स्वतंत्र आणि परस्परांशी मिळालेल्या प्रेमयुक्त कामात परतंत्र असतात. प्रजेच्या सर्वसाधारण संमतीच्या विरूद्ध राजाने किंवा राजपुरुषांनी वाणू नये. राजाच्या आतंविरुद्ध प्रजेने किंवा राजपुरुषांनी आचरण करू नये. अशा प्रकारे राजाचे राजकीय मुख्य काम म्हणजे ज्याला 'पोलिटिकल' म्हणतात ते थोडक्यात सांगितले आहे.
    या विषय विशेष पहावयाचे ज्यांना असतील त्यांनी चारही वेद, मनुस्मृती, शुक्रनीती, महाभारत वगैरे ग्रंथांचे परिशीलन करून प्रजेला योग्य न्याय मिळवून देण्याचे काम आहे ते मनुस्मृतीच्या आठव्या व नवव्या अध्यायात सांगितलेल्या रीतीनुसार केले पाहिजे. तरीपण ते संक्षेपाने येथे नमूद करतो.

न्यायव्यवस्था

प्रत्यहं देशदृष्टैश्च शास्त्रदृष्टैश्च हेतुभिः । अष्टादशसु मार्गेषु निबद्धानि पृथक्पृथक् ।। १ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ३ ।।

सभा, राजा व राजपुरुष यांनी देशाचार (देशाचे कायदे) व शास्त्रव्यवहार यांच्या आधाराने खाली दिलेल्या अठरा विवादास्पद गोष्टींचा न्यायपूर्ण निर्णय दरोज करावा. तसेच जे नियम शास्त्रोक्त नसतील आणि ज्यांची आवश्यकता भासेल असे नवे उत्तमोत्तम नियम तयार करून राजा आणि प्रजा यांची उन्नती व्हावी. ॥१॥

तेषां आद्यं ऋणादानं निक्षेपोऽस्वामिविक्रयः । संभूय च समुत्थानं दत्तस्यानपकर्म च ।। २ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ४ ।।

विवादाचे अठरा मुद्दे असे आहेत:-(१)(ऋणादान) कोणाकडून कर्ज घेणे व देणे यासंबंधीचा विवाद (२) निक्षेप) एखाद्याकडे ठेव ठेवणे अथवा एखादी वस्तू गहाण ठेवणे आणि त्याने ती मागितल्यावर परत न देणे. (३) (अस्वामि विक्रय) एकाची वस्तू दुसर्याने विकून टाकणे. (४) (संभूय च समुत्थानम्) काही लोकांनी मिळून एखाद्यावर अत्याचार करणे. (५) (दतस्यानपकर्म च) दिलेल्या वस्तूंना परत न देणे ॥२ ॥

वेतनस्यैव चादानं संविदश्च व्यतिक्रमः । क्रयविक्रयानुशयो विवादः स्वामिपालयोः।। ३ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ५ ।।

(६) (वेतनस्यैव चादानम्) वेतन अर्थात पणारातून घेणे किंवा तो किंवा काही देणे. (७) (प्रतिज्ञा) प्रतिज्ञेच्या विरुद्ध  वर्तन करणे. (८) (क्रयविक्रयानुशय) खरेदी व बिक्रीतील देण्या-घेण्या बाबतीतील भांडण. (९) गुराचा मालक व पालक यांच्यातील भांडण. ॥३॥

सीमाविवादधर्मश्च पारुष्ये दण्डवाचिके । स्तेयं च साहसं चैव स्त्रीसंग्रहणं एव च ।। ४ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ६।।

(१०) सीमा विवाद. (१३) एखाद्याला कठोर शिक्षा देणे. (१२) कठोर शब्द बोलणे(१३) चोरी, दरोडा घालणे. (१४) बळजबरीने एखादे कृत्य करणे. (१५पत्रीशी अथवा पपुरुषाशी व्यभिचार. ॥४॥

स्त्रीपुंधर्मो विभागश्च द्यूतं आह्वय एव च । पदान्यष्टादशैतानि व्यवहारस्थिताविह ।। ५ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ७ ।।

(१६) स्त्री व पुरुष यांच्या धर्मात व्यतिक्रम म्हणजे उलटा पालट होणे(१७) वारसा हक्कासंबंधीचा बाद (१८) बूत म्हणजे जड़पदार्थ (शेत, घर व संपत्ती) व समाह्य म्हणजे चेतन पणास लावून जुगार खेळणे. ही अठरा प्रकारची परस्परांविरुद्ध व्यवहारांची विवादस्थाने आहेत. ॥५॥

एषु स्थानेषु भूयिष्ठं विवादं चरतां नृणाम् । धर्मं शाश्वतं आश्रित्य कुर्यात्कार्यविनिर्णयम् ।। ६ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ८।।

या व्यवहारांमध्ये अनेक विवाद करणात्या पुरुषांना सनातन धर्माच्या आधाराने न्याय द्यावा; म्हणजे कोणाच्याही बाजूने पक्षपात करू नये. ६

धर्मरक्षण

धर्मो विद्धस्त्वधर्मेण सभां यत्रोपतिष्ठते । शल्यं चास्य न कृन्तन्ति विद्धास्तत्र सभासदः।। 7 ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० १२।।

ज्या सभेमध्ये अधर्माकडून घायाळ झालेला धर्म विद्यमान होतो व जेथील सभासद त्या धर्माचे शल्य म्हणजे बाणासारखा असलेला कलंक काढून टाकीत नाहीत व अधर्माचा उच्छेद करीत नाहीत, म्हणजे जेथे धर्माने चालणाऱ्याचा सन्मान व अधर्माने वावागणाऱ्याला शिक्षा होत नाही त्या सभेतील सर्व सभासद घायाळ झाले आहेत असे समजले जाते. ॥|७॥

सभां वा न प्रवेष्टव्यं वक्तव्यं वा समञ्जसम् । अब्रुवन्विब्रुवन्वापि नरो भवति किल्बिषी ।। ८ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० १३।।

धार्मिक माणसाने कधीही राजसभेत पाऊल टाकू नये. पण एकदा प्रवेश केल्यावर सत्य असेल तेच बोलावे. जर कोणी सभेमध्ये अन्याय होत असलेला पाहून ही मौन राहतो अथवा सत्य व न्याय यांच्या विरुद्ध बोलला तर तो महापापी होतो. ॥८॥

यत्र धर्मो ह्यधर्मेण सत्यं यत्रानृतेन च । हन्यते प्रेक्षमाणानां हतास्तत्र सभासदः ।। ९ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० १४।।

ज्या सभेमध्ये सर्व सभासदांच्या देखात अधर्मांकडून धर्माची व असत्याकडून सत्याची हत्या केली जाते त्या सभेतील सर्व सभासद जणू जिवंत असून मेल्यासारखेच असतात. त्यांच्यापैकी कुणीच जिवंत नसतो.

धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः । तस्माद्धर्मो न हन्तव्यो मा नो धर्मो हतोऽवधीत् ।। १० ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० १५।।

मेलेला धर्म मारणाऱ्याचा नाश करतो आणि रक्षण केलेला धर्म रक्षण करणाऱ्याचे रक्षण करतो. म्हणून मारल्या गेलेल्या धर्माकडून आपण कधी मारले जाऊ या भीतीने धर्महनन कधीही करू नये. ॥१०॥

वृषो हि भगवान्धर्मस्तस्य यः कुरुते ह्यलम् । वृषलं तं विदुर्देवास्तस्माद्धर्मं न लोपयेत् ।। ११ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० १६।।।

सर्व एश्वर्य देणाऱ्या आणि सुखाची वर्षा करणाऱ्या धर्माचा जो कोणी लोप करतो त्याला विद्वान लोक वृषल म्हणजे शुद्ध बीव नीच समजतात. म्हणून कोणीही धर्माचा लोप करणे योग्य नाही. ॥११॥

एक एव सुहृद्धर्मो निधानेऽप्यनुयाति यः । शरीरेण समं नाशं सर्वं अन्यद्धि गच्छति ।। १२ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० १७।।।

या जगामध्ये केवळ धर्म हाच असा एक मित्र आहे की जो मृत्युनंतरही बरोबर राहतो. इतर सर्व पदार्थ अथवा सोबती-मित्र शरीराच्या नाशा बरोबरच नाश पावतात. म्हणजे मृत्यू होताच सर्वांचा संग सुटतो. पण धर्माचा संग कधीच सुटत नाही. ॥१२॥

पादोऽधर्मस्य कर्तारं पादः साक्षिणं ऋच्छति । पादः सभासदः सर्वान्पादो राजानं ऋच्छति ।। १३ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० १८।।

जेव्हा राजसभेत पक्षपात व अन्याय केला जातो तेथे अधर्माचे चार विभाग होतात. त्यातील एक भाग अधर्म करणाऱ्याला, दुसरा त्याचा साक्षीदार असणाऱ्याला, तिसरा सभासदांना व चौथा भाग अथर्मा सभेच्या सभापतीला म्हणजे राजाला प्राप्त होतो.॥१३॥

राजा भवत्यनेनास्तु मुच्यन्ते च सभासदः । एनो गच्छति कर्तारं निन्दार्हो यत्र निन्द्यते ।। १४ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० १९।।

ज्या सभेमध्ये निंदनीय मनुष्याची निंदा व स्तुत्य माणसाची स्तुती केली जाते आणि दंडनीय माणसाला शासन व माननीय व्यक्तीला सन्मान दिला जातो तेथील राजा व सर्व सभासद निष्पाप व पवित्र होतात. पाप करणाऱ्यालाच पाप लागते. ॥१४॥

आता साक्षी कसे असावेत?

साक्षीचे लक्षण

आप्ताः सर्वेषु वर्णेषु कार्याः कार्येषु साक्षिणः । सर्वधर्मविदोऽलुब्धा विपरीतांस्तु वर्जयेत् ।। १ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ८३।।

सर्व वर्णामध्ये जे धार्मिक, विद्वान, निष्कपटी, सर्व प्रकारे धर्म जाणणारे निर्मोभी व सत्यवादी त्यांना न्यायव्यवस्थेत साक्षीदार बनवावे. याहून विपरीत गुण असणाऱ्यांना साक्षीदार करू नये. ॥१॥

स्त्रीणां साक्ष्यं स्त्रियः कुर्युर्द्विजानां सदृशा द्विजाः । शूद्राश्च सन्तः शूद्राणां अन्त्यानां अन्त्ययोनयः ।। २ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ६८।।

स्त्रियांसाठी स्त्रिया, द्विजांसाठी द्विज, शूद्रांसाठी शुद्ध, अंत्यजांसाठी अंत्यज साक्षीदार असावेत.॥२॥

साहसेषु च सर्वेषु स्तेयसंग्रहणेषु च । वाग्दण्डयोश्च पारुष्ये न परीक्षेत साक्षिणः ।। ३ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ७२।।

बलात्कार, चोरी, व्यभिचारकठोर भाषण, लाठी प्रहार यांसारख्या अपराधांमध्ये साक्षदाराची फेर तपासणी करू नये; व तशी साक्ष अत्यावश्यकही समजावी. कारण ही सारे कामे गुप्तपणे होत असतात. ॥३॥

बहुत्वं परिगृह्णीयात्साक्षिद्वैधे नराधिपः । समेषु तु गुणोत्कृष्टान्गुणिद्वैधे द्विजोत्तमान् ।। ४ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ७३।।

दोन्ही बाजूच्या साक्षीदारांमध्यणे बहुमतानुसार सारखेच साक्षीदार असतील तर त्यांपैकी उत्तम, गुणी पुरुषाच्या साथीला अनुकूल असा निर्णय करावा. दोन्ही बाजूना उत्तमवगुणी असे तुल्यबळ साक्षीदार असतील तर त्यांच्यात जे द्विजोत्तम म्हणजे ऋषी, महर्षी व यती असतील त्यांच्या साक्षीप्रमाणे न्याय करावा. ॥४॥

समक्षदर्शनात्साक्ष्यं श्रवणाच्चैव सिध्यति । तत्र सत्यं ब्रुवन्साक्षी धर्मार्थाभ्यां न हीयते ।। ५ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो०७४ ।।

साझीदार दोन प्रकारचे असतातएक प्रत्यक्ष पाहणारा व दुसरा ऐकलेले सांगणारा. सभेमध्ये प्रश्न विचारण्यात आले असता जे साक्षीदार खरे बोलतात ते धर्महीन व दंडनीय नसतात. पण जे खोटे बोलतात ते यथायोग्य शिक्षेस पात्र असतात. ॥५॥

साक्षी दृष्टश्रुतादन्यद्विब्रुवन्नार्यसंसदि । अवाङ्नरकं अभ्येति प्रेत्य स्वर्गाच्च हीयते ।। ६ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ७५।।

राजसभेमध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या उत्तम विद्वत्सभेमध्ये जे साक्षीदार पाहिलेल्या व ऐकलेल्या गोष्टी जशाच्या तशा न सांगता त्याविरुद्ध म्हणजे खोटे बोलतात त्यांना (अवाङ्नरक) जीभ छाटून टाकल्यामुळे होणऱ्या दुःखाच्या रूपाने जीवंतपणी नरक प्राप्त होतो आणि मेल्यानंतरही ते सुखापासून वंचित होतील. ॥६॥

स्वभावेनैव यद्ब्रूयुस्तद्ग्राह्यं व्यावहारिकम् । अतो यदन्यद्विब्रूयुर्धर्मार्थं तदपार्थकम् ।। ७ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ७८।।

साक्षीदार जे काही स्वाभाविक रीतीने व्यवहारिक बोलेल तेच खरे मानावे आणि त्याविपरीत जे काही ते सर्व खोटे व निरर्थक आहे असे न्यायाधीशाने समजावे. ॥७॥

सभान्तः साक्षिणः प्राप्तानर्थिप्रत्यर्थिसंनिधौ । प्राड्विवाकोऽनुयुञ्जीत विधिनानेन सान्त्वयन् ।। ८ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ७९।।

जेव्हा अर्थी (वादी) व प्रत्यर्थी (प्रतिवादी) यांच्या समक्ष साक्षीदार न्यायसभेपुढे येतील तेव्हा न्यायाधीश व प्राड्विवाक म्हणजे वकील किंवा बॅरिष्टर यांनी त्यांना शांतपणे असे विचारावे. ॥८॥

यद्द्वयोरनयोर्वेत्थ कार्येऽस्मिंश्चेष्टितं मिथः । तद्ब्रूत सर्वं सत्येन युष्माकं ह्यत्र साक्षिता ।। ९ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ८०।।

हे साक्षीदारांनो! या दोघांच्या परस्पर कृत्यांच्या बाबतीत तुम्ही जे काही जाणता ते खरे खरे सांगा. कारण या बाबतीत तुमची साक्ष आहे॥९॥

सत्यं साक्ष्ये ब्रुवन्साक्षी लोकानाप्नोति पुष्कलान् । इह चानुत्तमां कीर्तिं वागेषा ब्रह्मपूजिता ।। १० ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ८१।।

जो साक्षीदार खरे बोलतो त्याला पुढील जन्मी उत्तम लोकात उत्तम जन्म प्राप्त होतो व तो सुख भोगतो. या जन्मी व पुढील जन्मी त्याला उत्तम कीर्ती मिळते. कारण ही वाणीच सत्काराचे व तिरस्काराचे कारण आहे असे वेदांमध्ये लिहिले आहे. जो सत्य बोलतो त्याची प्रतिष्ठा होते आणि जो खोटे बोलतो त्याची निंदा होते. ॥१०॥

सत्येन पूयते साक्षी धर्मः सत्येन वर्धते । तस्मात्सत्यं हि वक्तव्यं सर्ववर्णेषु साक्षिभिः ।। ११ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ८३।।

सत्य बोलण्याने साक्षीदार पवित्र होतो आणि सत्य बोलण्यानेच धर्म वाढतो. म्हणून सर्व वर्णांच्या साक्षीदारांनी खरे बोलणेच योग्य होय॥११॥

आत्मैव ह्यात्मनः साक्षी गतिरात्मा तथात्मनः । मावमंस्थाः स्वं आत्मानं नृणां साक्षिणं उत्तमम् ।। १२ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ८४।।

आत्म्याचा साक्षीदार आत्मा आणि आत्म्याची गतीही आत्माच आहे. हे जाणून, हे मनुष्य ! तू सर्व मनुष्यांमधील उत्तम साक्षीदार आहेस. तू आपल्या आत्म्याचा अपमान करू नकोस. अर्थात तुझ्या आत्म्यात, मनात व वाणीत जे आहे ते सत्य आहे आणि त्याच्या उलट बोलणे म्हणजे मिथ्याभाषण होय. ॥१२॥

यस्य विद्वान्हि वदतः क्षेत्रज्ञो नाभिशङ्कते । तस्मान्न देवाः श्रेयांसं लोकेऽन्यं पुरुषं विदुः ।। १३ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ९६।।।

ज्या बोलणाऱ्या पुरुषाचा विद्वान क्षेत्रज म्हणजे शरीराला जाणणारा आत्मा आतून साशंक होत नाही तोच उत्तम पुरुष होय. विद्वान लोक त्याहून भिन्न माणसाला उत्तम पुरुष समजत नाहीत॥१३॥

एकोऽहं अस्मीत्यात्मानं यस्त्वं कल्याण मन्यसे । नित्यं स्थितस्ते हृद्येष पुण्यपापेक्षिता मुनिः ।। १४ ।। मनु०।। अ०८।। श्लो० १९१।।

हे कल्याणाची इच्छा बाळगणाऱ्या पुरुषा ! मी एकटा आहेअसे आपल्या मनात समजून जो तूर खोटे बोलतोस ते बरे नाही. परंतु जो दुसरा तुझ्या हृदयामध्ये अंतर्यामी रूपाने वास करणारा, पाप-पुण्य पाहणारा मुनी परमेश्वर आहे, त्या परमेश्वराला भिऊन तु सदैव सत्य बोलत रहा. ॥१४॥

खोट्या साक्षीसाठी शिक्षा

लोभान्मोहाद्भयान्मैत्रात्कामात्क्रोधात्तथैव च । अज्ञानाद्बालभावाच्च साक्ष्यं वितथं उच्यते ।। १ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ११८।।

जो कोणी लोभ, मोह, भय, मैत्री, काम, क्रोध, अज्ञान व पोरकटपणाने साक्ष देईल तर ती सर्व खोटी आहे असे समजावे. ॥१ ॥

एषां अन्यतमे स्थाने यः साक्ष्यं अनृतं वदेत् । तस्य दण्डविशेषांस्तु प्रवक्ष्याम्यनुपूर्वशः ।। २ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ११९।।

यांपैकी कोणत्याही कारणास्तव खोटी साक्ष देणाऱ्याला त्या-त्या कारणानुसार पुढील प्रमाणे विविध प्रकारची शिक्षा देत जावी. ॥२॥

लोभात्सहस्रं दण्ड्यस्तु मोहात्पूर्वं तु साहसम् । भयाद्द्वौ मध्यमौ दण्डौ मैत्रात्पूर्वं चतुर्गुणम् ।।३।। मनु०।। अ०८ ।। श्लो० १२०।।

लोभाने खोटी साक्ष देणाऱ्याकडून पंधरा रुपये दहा आणे दंड घ्यावा. मोहाने खोटी साक्ष देणाऱ्याकडून तीन रुपये दोन आणे, भीतीने खोटी साक्ष देणाऱ्याकडून सव्वा सहा रुपये, मैत्रीसाठी खोटी साक्ष देणाऱ्याकडून साडेबारा रुपये दंड घ्यावा. ॥३॥

कामाद्दशगुणं पूर्वं क्रोधात्तु त्रिगुणं परम् । अज्ञानाद्द्वे शते पूर्णे बालिश्याच्छतं एव तु ।।४।। मनु०।। अ०८ ।। श्लो० १२१।।

वासनेपोटी खोटी साक्ष देणाऱ्याकडून पंचवीस रुपये, क्रोधाने खोटी साक्ष देणाऱ्याकडून शेहेचाळीस रुपये चौदा आणे, अज्ञानाने खोटी साक्ष देणाऱ्याकडून तीन रुपये आणि पोरकटपणाने खोटी साक्ष देणाऱ्याकडून एक रुपया नऊ आणे दंड घ्यावा. ॥४॥

अपराध्यास दण्ड

उपस्थं उदरं जिह्वा हस्तौ पादौ च पञ्चमम् । चक्षुर्नासा च कर्णौ च धनं देहस्तथैव च ।। ५ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० १२५।।

दंडासाठी जननेंद्रिय, उदर, जिव्हा, हात, पाय, डोळे, नाक, कान, धन व देह ही दंड देण्याची दहा स्थाने आहेत की त्यांच्यावर दंड केला जात असतो. ॥५॥

अनुबन्धं परिज्ञाय देशकालौ च तत्त्वतः । सारापराधो चालोक्य दण्डं दण्ड्येषु पातयेत् ।। ६ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० १२६।।

देश, काल, गुन्हेगाराची अर्थिक स्थिती व अपराधाचे स्वरूप लक्षात घेऊन योग्य तो दंड करावा. जसे लोभाने खोटी साक्ष देणाऱ्यास पंथरा रुपये दहा आणे दंड लिहिला आहे व पुढे लिहिल्याप्रमाणे जर गुन्हेगार अत्यंत निर्धन असेल तर त्याच्याकडून कमी दंड घ्यावा आणि तो श्रीमंत असेल तर त्याच्याकडून दुप्पट, चौपट दंड घ्यावा.l६।।

अधर्मदण्डनं लोके यशोघ्नं कीर्तिनाशनम् । अस्वर्ग्यं च परत्रापि तस्मात्तत्परिवर्जयेत् ।। ७ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० १२७।।

कारण या जगात जो कोणी अधर्माने दंड करतो त्यामुळे त्याची भुतकालीन प्रतिष्ठा व वर्तमानकाळी प्रतिष्ठा आणि भविष्यकाळी व पुढील जन्मी त्याची होणारी कीर्ति नाश पावते. शिवाय पुढील जन्मी दुःख होते. म्हणून कोणालाही अधर्मयुक्त दंड करू नये. ॥७ ॥

अदण्ड्यान्दण्डयन्राजा दण्ड्यांश्चैवाप्यदण्डयन् । अयशो महदाप्नोति नरकं चैव गच्छति ।। ८ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० १२८।।

जो राजा अपराध्यांना शिक्षा करीत नाही व निरपराध्यांना शिक्षा करतो अर्थात दंडास पात्र असणाऱ्यास सोडून देतो आणि ज्याला दंड देणे नको त्यास दंड देतो तो जिवंतपणी मोठ्या निदेस आणि मृत्युनंतर मोठ्या दुःखास पात्र ठरतो म्हणून अपराध्याला नेहमी शिक्षा करावी व निरपराध्याला कधीही शिक्षा करू नये. ॥८॥

वाग्दण्डं प्रथमं कुर्याद्धिग्दण्डं तदनन्तरम् । तृतीयं धनदण्डं तु वधदण्डं अतः परम् ।। ९ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० १२९।।

प्रथम वाणीने शिक्षा म्हणजे त्याची भर्त्सना हा वाग्दंड होय. दुसरा धिग्दंड म्हणजे त्याचा धि:कार की तु हे दुष्कृत्य का केले. तिसरा त्याला पैशाच्या रूपातील दंड आणि शेवटी वधदंड द्यावा. म्हणजे त्याला फटके मारावेत किंवा त्याचे डोके छाटावे. ॥९॥

चोरीसाठी शिक्षा

येन येन यथाङ्गेन स्तेनो नृषु विचेष्टते । तत्तदेव हरेत्तस्य प्रत्यादेशाय पार्थिवः ।। १ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ३३४।।

चोर आपल्या ज्या-ज्या अवयवांनी समाज विघातक कृत्य म्हणजे चोरी करतो त्याचे ते-ते अवयव, इतरांना धडा मिळावा म्हणून, राजाने हरण अर्थात छाटून टाकावेत. ॥१॥

पिताचार्यः सुहृन्माता भार्या पुत्रः पुरोहितः । नादण्ड्यो नाम राज्ञोऽस्ति यः स्वधर्मे न तिष्ठति ।। २ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ३३५।।

किंबहुना पिता, आचार्य, मित्र, पत्नी, पुत्र व पुरोहित यांपैकी कोणीही का असेनात, जे स्वधर्माचे पालन करीत नसतील तर त्यांना राजाने अदण्ड ठरवू नये . याचा अर्थ असा की राजा जेव्हा न्यायासनावर बसून न्याय करतो तेव्हा त्याने कुणाचाही बाबतीत पक्षपात करू नये किंतु योग्य न्याय शिक्षा द्यावी. ॥२॥

कार्षापणं भवेद्दण्ड्यो यत्रान्यः प्राकृतो जनः । तत्र राजा भवेद्दण्ड्यः सहस्रं इति धारणा ।। ३ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ३३६।।

ज्या अपराधाबद्दल सामान्य माणसाला एक पैसा दंड होतो त्याच अपराधाबद्दले राजाला हजार पैसे दंड व्हावा. म्हणजे सामान्य माणसाच्या हजार पट शिक्षा राजाला झाली पाहिजे मंत्री किंवा दिवाण यांना आठशे पट, त्याहून खालच्या पातळीवरील व्यक्तींना सातशे पट, त्याहून खालच्या दर्जाच्या लोकांना साहशे पट, याप्रमाणे ज्याची जी योग्यता असेल त्याच्याप्रमाणे त्याला कमी कमी शिक्षा करण्यात यावी. सर्वात खालचा कर्मचारी म्हणजे पट्टेवाला होय. त्याला सामान्य माणसापेक्षा किमान आठपट शिक्षा झाली पाहिजे. याचे कारण असे की सामान्य प्रजाजनापेक्षा राजपुरुषाला म्हणजे सरकारी नोकराला जास्त शिक्षा झाली नाही तर हे राजपुरुष प्रजाजनांचा नाश करून टाकतील जसे सिंहाला ताब्यात ठेवावयाचे असेल तर त्याला कडक शिक्षा करावी लागते परंतु शेळीला थोडीशी शिक्षा पुरे होते. तसेच हे आहे. म्हणून राजापासून अगदी तळागाळाच्या नोकरापर्यंतच्या राजपुरुषांना त्यांच्या अपराधाबद्दल सामान्य जनतेपेक्षा जास्त शिक्षा करण्यात आली पाहिजे. ॥३॥

अष्टापाद्यं तु शूद्रस्य स्तेये भवति किल्बिषम् । षोडशैव तु वैश्यस्य द्वात्रिंशत्क्षत्रियस्य च ।। ४ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ३३७।।

याच प्रमाणे जो कोणी विवेकी असून चोरी करतो त्या शूद्राला त्याने चोरी केलेल्या वस्तूच्या किमतीच्या आठपट, वैश्याला सोळापट व क्षत्रियाला बत्तीस पट दंड केला पाहिजे. ॥४॥

ब्राह्मणस्य चतुःषष्टिः पूर्णं वापि शतं भवेत् । द्विगुणा वा चतुःषष्टिस्तद्दोषगुणविद्धि सः ।। ५ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ३३८।।

ब्राह्मणाला चौसष्ट पट किंवा शंभर पट किंवा एकशे अठ्ठावीस पट दंड झाला पाहिजे. म्हणजे ज्यांची जितके अधिक ज्ञान व प्रतिष्ठा असेल त्याला त्या प्रमाणात त्याच्या अपराधाबद्दल जास्त शिक्षा झाली॥५॥

ऐन्द्रं स्थानं अभिप्रेप्सुर्यशश्चाक्षयं अव्ययम् । नोपेक्षेत क्षणं अपि राजा साहसिकं नरम् ।। ६ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ३४४।।

राज्याचे अधिकारी आणि धर्म व ऐश्वर्य यांची इच्छा बाळगणारा राजा यांनी बळजबरीचे काम करणाऱ्या डाकूंना शिक्षा देण्यात एका क्षणाचाही विलंब करू नये. ॥६॥

वाग्दुष्टात्तस्कराच्चैव दण्डेनैव च हिंसतः । साहसस्य नरः कर्ता विज्ञेयः पापकृत्तमः।। ७ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ३४५।।

जो दुष्ट वचन बोलणारा, चोरी करणारा, अपराध नसताना शिक्षा करणारा या सर्वापेक्षा साहसाने बळजबरी करणारा माणूस अत्यंत पापी व दुष्ट आहे॥७॥

साहसे वर्तमानं तु यो मर्षयति पार्थिवः । स विनाशं व्रजत्याशु विद्वेषं चाधिगच्छति ।। ८ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ३४६।।

जो राजा अशा जुलमी माणसाला शिक्षा न करता त्याचे अत्याचार सहन करतो तो लवकरच नाशास कारणीभूत ठरतो आणि राज्यात वैमनस्य निर्माण होते. ॥८॥

न मित्रकारणाद्राजा विपुलाद्वा धनागमात् । समुत्सृजेत्साहसिकान्सर्वभूतभयावहान् ।। ९ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ३४७।।

मैत्रीमुळे अथवा पुष्कळ धन मिळते म्हणून राजाने सर्व प्राणीमात्रासदुःख देणाऱ्या अत्याचारी माणसाला पकडणे, मारणे इत्यादि शिक्षा केल्याशिवाय राहू नये.॥९॥

गुरुं वा बालवृद्धौ वा ब्राह्मणं वा बहुश्रुतम् । आततायिनं आयान्तं हन्यादेवाविचारयन् ।। ११० ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ३५० ।।

गुरू, पुत्रादी बालक, पिता वगैरे वृद्ध किंवा ब्राह्मण आणि पाहिजे तर बहुश्रुत विद्वान यांच्यापैकी कोणीही असो, जो धर्म सोडून अधर्माने जात असेल इतरांना विनाकरण मारीत असेल तर त्याला विचार न करता ठार मारावे. म्हणजे आधी ठार मारावेव मग विचार करावा.॥१०॥

नाततायिवधे दोषो हन्तुर्भवति कश्चन । प्रकाशं वाप्रकाशं वा मन्युस्तं मन्युं ऋच्छति ।। ११ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ३५१ ।।

दुष्ट लोकांना मारल्याने मारणाऱ्या ला पाप लागत नाही. मग त्यांची हत्या उघडपणे की गुप्तपणे झालेली असो कारण क्रोधी माणसाला क्रोधाने मारणे म्हणजे क्रोधाची क्रोधाशी लढाई असते. ॥११॥

यस्य स्तेनः पुरे नास्ति नान्यस्त्रीगो न दुष्टवाक् । न साहसिकदण्डघ्नो स राजा शक्रलोकभाक् ।। १२ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ३८६ ।।

ज्या राजाच्या राज्यात चोर, परस्त्रीगामी, दुर्वचन बोलणारे, दरोडेखोर व मिढविलेले गुन्हेगार शिक्षेची अवज्ञा करणारे म्हणजे राजाज्ञेचा भंग करणारे नसतात तो राजा अत्यंत श्रेष्ठ होय. ॥१२॥

भर्तारं लङ्घयेद्या तु स्त्री ज्ञातिगुणदर्पिता । तां श्वभिः खादयेद्राजा संस्थाने बहुसंस्थिते ।। १ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ३७१ ।।

जी स्त्री आपल्या जाति व गुणांच्या घमेंडीने नवणऱ्याला सोडून देऊन व्यभिचार करते तिला स्त्रीपुरुषांच्या जमावासमोर जिवंतपणीच कुत्र्यांकडून लचके तोडून राजाने मारुन टाकावे॥१॥

पुमांसं दाहयेत्पापं शयने तप्त आयसे । अभ्यादध्युश्च काष्ठानि तत्र दह्येत पापकृत् ।। २ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ३७२ ।।

त्याचप्रमाणे जो पुरुष आपल्या बायकोला सोडून देऊन परस्त्रीगमन अथवा वेश्यागमन कतो त्या पापी माणसाला तापून लाल झालेल्या लोखंडी पलंगावर झोपवून पुष्कळ स्त्रीपुरुषांसमोर जिवंतपणी जाळून भस्म करून टाकावे॥२॥

(प्रश्न) जर राजा ,राणी, न्यायाधीश अथवा त्याची पत्नी व्यभिचारादी दुष्कृत्ये करतील तर त्यांना कोणी शिक्षा द्यावी? (उत्तर) राजसभेने शिक्षा द्यावी, मात्र त्यांना तर सामान्य प्रजाजनांपेक्षा जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे. (प्रश्न) राजा वगैरे प्रजेकडून होणारी शिक्षा कशी स्वीकार करतील? (उत्तर) राजाही एक पुण्यात्मा व भाग्यशाली मनुष्य आहे. त्यालाच शिक्षा केली गेली नाही आणि ती त्याने मान्य केली नाहीतर इतर लोक राजदंडाला का मानतील? आणि जेव्हा सारी प्रजा, प्रधान राज्याधिकारी व राज्यसभा राजाला धार्मिकपणे शिक्षा देऊ इच्छितात तेव्हा एकटा राजा काय करू शकणार? अशाप्रकारे व्यवस्था नसेल तर राजा, प्रधान व सर्व समर्थ पुरुष अन्यायात बुडून, न्यायधर्माला बुडवून टाकतील आणि साऱ्या प्रजेचा नाश करून स्वतः ही नष्ट होतील. न्याययुक्त दंड ह्याचेच नाव राजा व धर्म आहे आणि जो त्याचा लोप करतो त्याच्याहून नीच पुरुष दुसरा कोण असेल ? या अर्थाचा जो श्लोक आहे त्याचे स्मरण करा. (प्रश्न) एवढी कडक शिक्षा देणे योग्य नाही. कारण मनुष्य शरीराचा कोणताही अवयव बनवू शकत नाही, जिवंत करू शकत नाही. म्हणून प्राणदंडाची शिक्षा देता कामा नये, हे योग्य नाही काय? (उत्तर) जे लोक याला कडक शिक्षा असे समजतात त्यांना राजनीती कळत नाही, कारण एका माणसाला अशी कडक शिक्षा दिली गेल्याने शिक्षेच्या भीतीने इतर सर्व लोक दुष्कर्म करण्यापासून दूर राहतील आणि अधर्माचा त्याग करून धर्म मार्गाचा अवलंब करतील. खरे म्हणाल तर ही शिक्षा सर्व लोकांच्या वाट्याला कणभरही येणार नाही आणि जर सौम्य शिक्षा दिली तर दुष्कृत्यांना ऊत येईल. जिला तुम्ही सौम्य शिक्षा म्हणता ती लाखो पट अधिक असल्यामुळे लाखो पट कडक होत असते. कारण जेव्हा अनेक माणसे दुष्कृत्ये करतील तेव्हा त्यांना दिलेली थोड़ी-थोडी शिक्षा देखील द्यावी लागेल उदाहरणार्थ एकाला मणभर शिक्षा झाली व दुसऱ्याला पावशेर शिक्षा झाली तर दोघांची मिळून एकूण एक मण अधिक पावशेर शिक्षा झाली. म्हणजे प्रत्येकाच्या वीसशेर व अदपाव शिक्षा आली. अशा सौम्य शिक्षेला दुष्ट लोक काय चुमानणार? जसे एका माणसाला मणभर शिक्षा झाली व हजार माणसांना प्रत्येकी पावशेर शिक्षा झाली तर एकूण सव्वासहा मण शिक्षा सर्व माणसांना होईल. म्हणजे तीच अंतिमत: अधिक आणि कडक होईल म्हणून एकाला एक मण दिलेली शिक्षा अगदीच कमी व सौम्य होईल.

जलमार्गाची नाकेबंदी आणि कर

दीर्घाध्वनि यथादेशं यथाकालं तरो भवेत् । नदीतीरेषु तद्विद्यात्समुद्रे नास्ति लक्षणम् ।। ३ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ४०६ ।।

लांब मार्गामध्ये ज्याप्रमाणात समुद्राच्या खाड्या, नद्या अथवा महानद यात जितके क्षेत्र येत असेल त्याप्रमाणात नाकेबंदी करून कर बसवावा. महासमुद्रात निश्चित स्वरूपाचा कर बसवता येणार नाही. परंतु त्याबाबतीत राजा आणि समुद्रावर मोठमोठ्या नौका चालविणारे या दोघांना सोयीची होईल अशी व्यवस्था करावी. देशदेशांतरी व द्विपद्वीपांतरी नौका घेऊन जाणाऱ्या आपल्या प्रजेचे सर्वप्रकारे उत्तम रक्षण होईल आणि त्यांना कोठेही कोणाकडूनही त्रास होणार नाही असा बंदोबस्त राजाने करावा. येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की या देशात पूर्वी जहाजे नौकानयन नव्हते असे जे लोक म्हणतात ते खोटे आहेत.

राजाचे दैनंदिन कार्य

अहन्यहन्यवेक्षेत कर्मान्तान्वाहनानि च । आयव्ययौ च नियतावाकरान्कोशं एव च ।। ४।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ४१९ ।।

राजाने दररोज कोणती कामे पुरी झाली आहेत ते पाहावे तसेच हत्ती, घोडे वगैरे वाहने, झालेला जमाखर्च आयकर रत्नादिकांच्या खाणी व खजिना यांची तपासणी करावी.॥४॥

एवं सर्वानिमान्राजा व्यवहारान्समापयन् । व्यपोह्य किल्बिषं सर्वं प्राप्नोति परमां गतिम् ।। ५ ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ४२० ।।

जो राजा अशा प्रकारे सर्व व्यवहार योग्य प्रकारे पुरे करतो व करून घेतो. तो पापापासून दूर होऊन त्याला परमगती मोक्ष सुख प्राप्त होते (प्रश्न) संस्कृतविद्युत संपूर्ण राजनीती आहे की अपूर्ण? (उत्तर) संपूर्ण आहे. कारण या जगात जी राजनीती चालत आली आहे व यापुढे चालणार आहे ती सर्व संस्कृत ग्रंथांतून घेतलेली आहे आणि ज्या विषयांची प्रत्यक्ष नोंद झालेली नाही त्यांच्यासाठी

    प्रत्यहं देशदृष्टैश्च शास्त्रदृष्टैश्च हेतुभिः ।। मनु०।। अ०८ ।। श्लो० ३ ।।
    म्हणजे जे-जे नियम राजा व प्रजा यांच्यासाठी सुखकारक व धर्मयुक्त समजले जातील असे नियम पूर्ण विद्वानांच्या राजसभेने नियत करावेत. मात्र ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की शक्यतोवर बालपणी विवाह करू देऊ नयेत. तरुणपणीही पतिपत्नींच्या संमतीशिवाय विवाह करू नये ना होऊ द्यावेत. ब्रह्मचर्याचे यथावत पालन झाले पाहिजे.व्यभिचार व बहुविवाह बंद झाले करावेत. यायोगे शरीर व आत्मा यांचे पूर्ण सामर्थ्य सदा रहावे जर कोणी केवळ आत्म्याचे बळ म्हणजे विद्या व ज्ञान वृद्धिंगत करील आणि शारीरिक सामर्थ्याकडे दुर्लक्ष करील तर कारण एकटा बलवान पुरुष शेकडो ज्ञानी व विद्वान लोकांना जिंकू शकतो. या उलट जर फक्त शारीरिक बळच वाढविले आणि आत्म्याचे बळ वाढविले नाही तरीही विद्येच्या अभावी उत्तम राज्यकारभार चालू शकत नाही. राज्यव्यवस्था नीट नसेल तर सगळे जण आपापसात भांडणे, दुफळी विरोध व लढाई करून नष्ट होऊन जातील म्हणून नेहमी शरीर व आत्म्याचे बळवाढवीत राहिले पाहिजे. व्यभिचार व अति विषयासक्ती यांच्या सारखी बळ व बुद्धी नाशक व्यवहार करणारी दुसरी गोष्ट नाही.
   विशेषतः क्षत्रियांनी सुदृढ़ व सबळ असले पाहिजे. कारण तेच विषयासक्त झाले तर राज्यधर्मच नष्ट होईल. हेही लक्षात ठेवावे की 'यथा राजा तथा प्रजा' म्हणजे जसा राजा असेल तशीच त्याची प्रजा असते. म्हणून राजा व राजपुरुष यांना आवश्यक आहे की त्यांनी कधीही दुराचार करू नये. त्यांनी सदैव धर्माने व न्यायाने वागून सर्वांच्या उन्नतिसाठी आदर्श बनावे.
    येथे संक्षेपाने राजधर्माचे वर्णन केले आहे. याविषयाची सविस्तर चर्चा वेद, मनुस्मृतीचे सात, आठ व नऊ हे अध्याय, शुक्रनीती, विदुरप्रजागर, महाभारतातील शांतिपवतर्गत राजधर्म व आपद्धर्म वगैरे ग्रंथात किंवा पाहुन पूर्ण राजनीती जाणून व धारण करून मांडलिक किंवा सार्वभौम, चक्रवर्ती राजांनी राज्य करावे आणि सवांनी हे ओळखावे की ‘वयं प्रजापतेः प्रजा अभूम’ ।। यजु० अ०१८ ।। मं० २९ ।।
    आम्ही प्रजापतीची म्हणजे परमेश्वराची प्रजा असून परमात्मा आमचा राजा आहे. आम्ही त्याचे किंकर, सेवकवत आहोत. त्याने कृपावंत होऊन आपल्या सुटीत आम्हाला राज्याधिकारी करावे, आणि आमच्या हातून आपल्या सत्याची व न्यायाची प्रवृत्ति करावी. आता पुढील प्रकरणात ईश्वर व वेद यांविषयी लिहिण्यात येईल.

इति श्रीमद्दयानन्दसरस्वतीस्वामिकृते सत्यार्थप्रकाशे सुभाषाविभूषिते राजधर्मविषये षष्ठः समुल्लासः सम्पूर्णः ॥६॥