सप्तशती (मोरोपंत)/तृतीय चरित्र - अध्याय पांचवा

शुंभनिशुंभ क्षोमे श्रवन करुनि रक्तबीजनाशातें, खळबळ सर्वहि खवळे, कीं वश होणार काळपाशातें. १


वाटे, देवीस, करुनि कळहा, खळ हा निशुंभ करिल गट, त्यामागूनि, कराया दुर्गाबलहानि, शुंभ करि लगट. २


करि शुंभनिशुंभांसी ती शक्ति परा सुसंगार, हितातें साधुनि द्याया शक्रा, त्यात्याहि परा सुसंग - रहितातें. ३


करिती जगदंबेवरि ते दारुणबाणवृष्टि अहित रणीं, सोडी देवी शर जे असुहरतापद जसेचि अहि - तरणी. ४


छेदुनि शरजाळातें, द्याया, मद हरुनि, कंप दोघांतें, सर्वांगीं शर हाणी देवी त्या असुरसंपदोपांतें. ५


देवीच्या सिंहशिरीं, कोपें चावूनि अधर, अरवाळें असुराधिपें निशुंभें धांवुनि, केला प्रहार करवाळें. ६


देवी स्वमनांत म्हणे, ‘ शीघ्रचि हा निकर वाळविल यातें, ने, बाणें व्हाया मदतेजोहानि, करवाळ विलयातें. ’ ७


तो शक्ति पुन्हा टाकी, भ्यावें समरांगणीं जिला शक्रें, तत्काळ भगवतीनें केली तैसीहि ती द्विधा चक्रें. ८


शूल निशुंभ क्षेपी, तो ये जैसा मदांध तूर्ण करी, त्यासि, जसा सिंहीचा, देवीचा मुष्टिपात चूर्ण करी. ९


टाकी निशुंभ योजुनि जें साधिल काय हो ! गदा ती तें ? तत्काळचि भस्म करी निजशूलें मोक्षभोगदा तीतें. १०


न विचारी जड कीं, ‘ जय साधिल देवीरणांत परशु कसा ? ’ केला भग्न शिवेनें, दिव्यशुकीनें क्षणांत परसुकसा. ११


दुर्गेनें तो मूर्च्छित करितांचि, करुनि पराभव, निशुंभ, युद्ध करी आपणही जायासि मरुनि परा भवनि शुंभ. १२


ज्याचे दिव्यायुधधर विश्वांत ख्यात आठ भुज गानीं, ज्यांसि दिली आकारें, क्रौर्येंही, स्पष्ट पाठ भुजगांनीं, १३


दिव्यरथावरि बैसुनि सर्वासुरराज शुंभ आला जो, त्या पाहुनि शंख शिवा वाजवि, त्या कां न चंद्र - भा लाजो ? १४


चापगुणध्वनिहि करुनि, बहु आद्या शक्ति कांपवी जगती, सर्वासुरतेजोवधर घंटानादही करी मग ती. १५


हरिनेंहि नादा केले, परभटनादासि जे अनादरिते, ज्यांहीं मदपूर्ण महागज झाले तत्क्षणीं अनाद रिते. १६


काळी उडोनि गगनीं स्वकरतळांनीं महीतळा ताडी, त्या नादें पहिले जे शंखदिनिनाद ते उणे पाडी. १७


ती शिवदूतीहि करी भीषण अत्युच्च हास, सुरथा ! रे ! तेव्हां केले असुरत्रासें सोडूनि सर्व सुर थारे. १८


अतिशयितक्रोधातें त्या समयीं शुंभ दैत्य तो पावे; चित्तीं म्हणे, ‘ शिवेचे घ्यावे कीं, स्वासु तीस ओपावे ? ’ १९


त्यासि म्हणे जगदंबा, " असुरापसदा ! रहा, रहा, नीचा ! दिधला तुला वराया, हस्तांत उदार हार हानीच्या " . २०


तेव्हां ‘ जय जय ’ ऐसें म्हणती गगनस्थ अमर परमेला, ‘ हाहि मरो शीघ्र, जसा तो तुजसीं करुनि समर पर मेला. ’ २१


शुंभ ज्वाळामाळाकुलवदना शक्ति भीषणा, धाडी, करुनि निरास महोल्कघातें, परमेश्वरी तिला पाडी. २२


राजा ! तेव्हां व्यापी शुंभाचा सिंहनाद विश्वास, तेचि न भ्याले, बहु दृढ ज्यांसि महाशक्तिपाद्विश्वास. २३


निर्घातनिस्वनानें शुंभाचा सिंहनाद लोपविला. जो पविला हुंकारें भंगद, तो दैत्यराज कोपविला, २४


शुंभाच्या बाणांतें निजबाणांच्या शिवा महानिकरें हा निकरें तीच्याही छेदी असुरेंद्र शत्रुहानिकरें. २५


मग जगदंबा मूर्च्छित पाडी शूळें तयासि विंधून, देवीप्रताप गमला तिळहि न घटजोन, तोहि सिंधून. २६


तों तो निशुंभ सुररिपु उठला सोडुनि असावधानपण, करिता इतर, शिवेच्या, प्रत्यय येतां असा, वधा न पण. २७


देवीतें, काळीतें, हरितें, शर, व्हावयासि यश, हाणी; संपन्मदांधमति निजपरिणामनिरीक्षणींच न शहाणी. २८


होउनि अयुतभुज असुर, झांकी देवीस अयुतचक्रांहीं, भ्यावें ज्यांसि यमवरुणयक्षपवातार्कवह्रिशक्रांहीं. २९


सुरमति सहसा मोहीं, चक्रसमूहीं जसीच ती, लोपे; तेव्हां बहुतचि समरीं दुर्गा दुर्गार्तिनाशिनी कोपे. ३०


छेदी त्या चक्रातें स्वशराहीं, त्याहि बाणजाळातें; देवांतें स्वोत्कर्षें हृष्ट करी, तप्त दैत्यपाळातें. ३१


कुपित निशुंभ, शिवेचें चूर्ण करायासि उर, गदा हातें पडताळुनि, धांवे तो, जैसा धृतवैर उरग दाहातें. ३२


समरांत निशुंभा जी, होउनि तदरातियम, गदा पावे, तीतें खड्गें खंडुनि, देवीनें कोण न मग दापावे ? ३३


तरि मूढ शूळ घेउनि धांवे, कीं जीस काळ घेरी, ती मति नुमजे; बाळाची प्राज्ञाहि, होऊनि बाळ, घे रीती. ३४


दुर्गा मनीं म्हणे, ‘ मम शूळचि या शत्रुचें उर विदारु, कीं हा अरातिजीवन, दृढही न दहन जसा उरवि दारू. ’ ३५


शूळ धरुनि शुंभहृदय शूळेंचि विदारितां अगा ! राया ! पुरुष निघे त्या भग्ना हृदया सोडुनि, जसा अगारा या. ३६


भग्ननिशुंभहृदुद्रत, सुमहाबळ, पुरुष युद्धदृढनिष्ठ, श्रीमज्जगदंबेतें बाहिर निघतांचि तो म्हणे ‘ तिष्ठ. ’ ३७


तों हांसुनि मस्तक हरि देवी, न करूनि एक पळ उशिर, दुर्गासिपुढुनि अरि तरि, अहिपुढुनिहि बाळभेक पलउ शिर. ३८


ऐसा जगदंबेनें सुरशत्रु निशुंभ, हरुनि मद, वधिला जो मत्त म्हणत होता, ‘ कोण करिल शस्त्र धरुनि मदवधिला. ’ ३९


जें सैन्य निशुंभाचें सुरदु:सह बहुत मातलें होतें, काळीनें काळमुखीं, बाळमुखीं तेंवि, घातलें हो ! तें. ४०


कांहीं शिवदूतीनें, कांहीं सिंहें रणांत लोळविलें, कांहीं त्या मातृगणें स्वर्गाप्रति गौरवूनि बोळविलें. ४१


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.