सप्तशती (मोरोपंत)/द्वितीय चरित्र - अध्याय पहिला
श्रीमद्विष्णुप्रभुची नमिली वरदा असी महामाया, ब्रह्मांडशतांत जिचा योग्य न महिमा असीम हा माया. १
देवांचा शक्र अधिप, असुरांचा महिष, करिति हे कळहा,
शतवर्षांतीं पावुनि परिभव, शतमन्युचें म्हणे बळ ‘ हा. ’ २
झाला इंद्र, स्वबळें समरीं पावोनि सैरिभ यशातें.
शक्रप्रमुख सुरांचीं विलया ने उग्र वैरिभय शातें. ३
सुर कथिति दु:ख विधितें; तो त्यांसह जाय हरिहरांजवळ,
यच्चरणांहीं केला शरणागतजनविपत्तिचा कवळ. ४
ते कथिति ‘ कीद्र झाला महिष, हरुनिया सुराधिकारा हो !
प्रभुजी ! असुरीं न श्री बहुमोहकरी सुराधिका राहो. ५
लोकत्रयपति झाला, बहु मोट्या महिष तो कपाळाचा,
विधिचाहि करितसे अधिकार, न शक्रादि लोकपाळाचा. ६
आलों शरण तुम्हां, कीं भवदितर न यश, उपाय चिंतुनि, घे,
तुमच्याचि दयेनें नतहृदयींचा क्षिप्र सर्व किंतु निघे. ’ ७
तुमच्याचि दयेनें नतहृदयांत कोप ये राज्या !
प्रभु साहतिल कशा श्रितजनकुदशा ? सोसती न येरा ज्या. ८
प्रभुवरहरिहरवदनें झालीं सुरपरिभवें भ्रुकुटिकुटिलें,
कीं महिषतस्करें यश, सर्वस्व हरुनि बळें, स्वबळ कुटिलें. ९
प्रकुपित हरिहरशतधृति जे, यां सुरनायकाननांतून
सुमहत्तेज निघालें, दहनाचें काय काननांतून. १०
शक्रादि सुरांच्याही देहांतुनि दिव्य तेज बाहे.
तैसेंचि निधे, जें शुचिकीर्तीचें भाग्यवंत माहेर. ११
तें एकवटे, त्याची होय हराया सुरारिमद नारी,
तीतें पाहुनि, ‘ जय, जय, ’ वदले विधिविष्णुवृत्रमदनारी. १२
तीचें मुख हरतेजें, यमतेजें केश मस्तकीं झाले,
हरितेजें भुज, ज्यांच्या सज्जन सेउनि यशोमृता धाले. १३
स्तनयुग्म सोमतेजें, मध्यहि ऐंद्रेंकरूनियां होय;
तत्तेजें जंघोरू, ज्याच्या स्वाधीन सर्वही तोय. १४
गुरुतर नितंब भैमें; ब्रह्मयाच्या दिव्य चरण तेजानें;
तें सौर, शोभति करुनि रक्तांगुलिदशकवरण ते ज्यानें. १५
हस्तांगुलि वसुतेजें; जीसम अवयव न आन, नासा जे,
झाली कुबेरतेजें, बहुतचि शोभवुनि आनना, साजे. १६
प्राजापत्यें झाले रुचिनें लाजविति अमृतरस दंत,
पावकतेजें नयनत्रय, होय, करावयासि असदंत. १७
भ्रूयुग संध्यातेजें; मारुततेजें करूनि कर्ण, ‘ न हो - ’
जे ह्मणती, ‘ श्रितदु:खश्रवण, सदा तत्सुकीर्तिवर्णन हो ! ’ १८
यापरि पावे तेजें अन्य सुरांच्याहि संभवा, राया !
जीचें क्षम यश पंका, गंगेचें जेंवि अंभ, वाराया. १९
जें धरित्याच्या अरिला न स्वप्रामाजिही शिव शिवे, तें
निजशूळप्रभव, विजयमूळ, अतुळ, शूळ दे शिव शिवेतें. २०
प्राणव्यसनीं जेणें गजवर रक्षूनि, निवटिला नक्र,
त्या निजचक्रापासुनि निर्मुनियां, चक्रपाणि दे चक्र. २१
त्या भगवतीस भावें गोक्षीरधवल जलेश दरवर दे;
प्रार्थुनि म्हणे, ‘ अरींचा बाधों द्यावा न लेश दर वरदे ! ’ २२
दहनहि दे शक्ति तिला, जी तेजेंकरुनि लाज दे वीजे;
विनउनि म्हणे, ‘ तुझे ते, वांछील पदार्थ आज देवी जे ’. २३
दे दिव्य चाप मारुत, शरपूर्ण तसेच देव तो भाते;
स्वीकारितां शिवेनें, बहु लोकीं पावलेचि शोभा ते. २४
प्रतिपक्षकरिघटेला ज्याचा, ‘ दूरूनि भाविं, ’ वास वदे,
त्या स्वगजाची घंटा, निजवज्रोत्पन्न वज्र, वासव दे. २५
यमधर्म काळदंडापासुनि दे दंड, वरूण पाशातें,
जे आपणासि दुर्जय दुर्जन, त्या सर्वशत्रुनाशातें. २६
माळा प्रजापतिप्रभु दे त्या जगदंबिकेसि अक्षांची,
बेह्मार्पित सुकमंडलु घे राज्ञी दुष्टदमनदक्षांची. २७
निजकिरणांतें स्थापी भानु तिच्या सर्वरोमकूपांत;
दे खड्ग - चर्म काळ, क्षय व्हाया देवशत्रुभूपांत. २८
क्षीरोदधि दे अजरें वस्त्रें, तैसाचि अमल हार, तिला;
म्हणवी, रुचिनें जिंकुनि, बहु जीचें वदनकमल ‘ हा ’ रतिला. २९
जो देव विश्वकर्मा, त्या चतुरें दिव्य वस्तुच्या घटकें,
दिधलीं चूडामणिसह सुमणिकनकखचित कुंडलें, कटकें. ३०
धवलार्धचंद्रकंठाभरण चरनावाहुभूषणें दे हा,
मणिमुद्रिकाहि; आनखशिख भावेंकरुनि भूषवी देहा. ३१
विमळ परशु, विविधास्त्रें, तैसेंचि कवच अभेद्य, देवीतें
जीचें कृपानिरीक्षण अत्यद्भुतसर्वसंपदे वीतें. ३२
अम्लानद्ममाळा दे सिंधु उरीं, शिरीं, धरायास,
तो आपणासि दुस्तरजाड्यांभोधींत उद्धरायास. ३३
रत्नें देउनि, दिधला मृगराज बसावया हिमनगानें.
जाया जाड्य, यशाच्या चरणींच वसावयाहि मन गानें. ३४
दे पानपात्र धनपति, वीर्योत्साहें वधावया अरितें,
न रितें व्हावें तिळहि, प्राशन केलें क्षणक्षणीं, तरि तें. ३५
अर्पी, प्रमप्रेमें पूजुनि, सविशेष नागहार तितें,
भूभारासुरशमनें मागे कवि शेष नाग हा रतितें. ३६
अन्य त्रिदशानींही सर्वस्वविभूषणायुधानीं ती
सम्मानिली बहुमता, जैसी प्राणाधिका बुधां नीती. ३७
मग साट्टहास वारंवार शिवा गर्जना करी, राज्या !
म्यां किति वर्णाव्या त्या ? बहु कांपविती विराट्शरीरा ज्या. ३८
त्या सिंहवाहिनीतें ‘ जय, ’ ऐसें सर्व देवता म्हणती.
स्तविती मुनिवर, करिती, बहु भक्तिविनम्र होउनि, प्रणती. ३९
ऐकोनि ‘ आ: ! किमेतत् ? ’ कुपित खळ म्हणे, ससैन्य तो धांवे,
आले सर्व न लागति दीपद्युतिला पतंग शोधावे. ४०
महिषासुरें भगवती, धावुनि येवूनि, देखिली हो ! ती.
सुरविभवचित्रकारें जी गगनपटांत रेखिली होती. ४१
जीणें श्रीचरणाहीं करितां आक्रमण, भूमिका लवली;
गगनीं जिच्या किरीटें सग्रहनक्षत्रराजि कालवली; ४२
जीच्या बाहुसहस्त्रें व्यापुनि दिक्चक्र सर्व शोभविलें;
क्षोभविलें चापरवें कांड, यशें देववृंद लोभविलें. ४३
मग त्या श्रीदुर्गेसीं असुरभटांसीं प्रवर्तलें युद्ध;
होय दिगंतर शस्त्रास्त्रविदीपित ज्यांत, तें असें शुद्ध. ४४
महिषासुरसेनानी चिक्षुरनामा महासुर, तसाच
चामर चतुरंगबळें युक्त रणमखीं महासुरत साच. ४५
तैसाच ईश्वरीसीं षडयुतरथयुत उदग्र युद्ध करी,
परि तो आला, व्हाया देवीशरनिकरसिंह्रूद्ध करी. ४६
असुर महाहनुहि करी समर रथायुतसहस्त्र आणून,
असिलोमा रथप्म्चाशन्नियुतयुत, स्वविजय जाणून. ४७
बाष्कळहि, निजजयाचीं श्रवण करित बंदिगणमुखें गाणीं,
रथ एक कोटि, षट्शत अयुतें गजहय, असेचि बहु आणी. ४८
पंचाशत्कोटिमितस्यंदनपरिवृत सुरारि मत्त महा
वीर बिडालाक्ष करी दुर्गेसीं युद्ध असुरसत्तम हा. ४९
रथगजहयपरिवृत सुररिपु अन्यहि अयुतसंख्य जे क्रूर,
ते चंडमुंडशोणितबीजादिक करिति रण महाशूर. ५०
तुरग परार्ध, परार्ध स्यंदन, गजही परार्ध, यापरि तें
निजबळ आणी समरीं, पाडाया, तो लुलाय पाप, रितें. ५१
करिते झाले, सोडुनि शस्त्रास्त्रें स्वैर, असुर समरा या,
त्यजुनि भजन सुरस, कुमति ते प्याले वैर - असुरस मराया. ५२
तोमर, मुद्रर, मुसल, प्रास, परशु, पट्टिशासि, शर, शक्ति,
परशस्त्रें निजशस्त्रें खंडी लीलेंकरूनि परशक्ति. ५३
तम रविरुचितें, किंवा सद्विद्येतें महाघ न शिवे, तें
तैसें त्या असुरांचें शस्त्रपटळ जितमहाघन शिवेतें. ५४
तोहि शिवावाहन हरि बहु कोपे, कंपवुनि सटा; याला
साहे न, दव वनसें, सैन्य, कसें संपवु निसटायाला ? ५५
जे सोडिले शिवेनें, संगर करितां, सुगंध निश्वास;
तेचि अमितगण झाले रक्षाया, असुर वधुनि, विश्वास. ५६
करितील परनगशिर:शिखरीं ते अशनि कां गण न टांचा ?
वाढवि हर्ष तयांचा तें, प्रभुचें जेंवि आंगण नटांचा. ५७
कितिएक युद्ध करिती ते गण, वाद्यें कितीक वाजविती,
गाजविति ब्रह्मांड, ध्वांतहराच्या करांसि लाजविती. ५८
परमेश्वरी विदारी, जो त्यजिना योध आयुधा, त्यातें;
ते काय तीपुढें ? जी देणारी बोध, आयु, धात्यातें. ५९
खड्मेंकरूनि तोडी अरिस फ़ळसमान बा ! धसाधस ती,
त्यात्यास म्हणे चित्तीं, ‘ जा, लोक सुखें अबाध साध, ’ सती. ६०
शूळें, चक्रें, वज्रें, करि परमारण महागदाघातें,
विश्वाच्या वाराया, वरि परमा रणमहा, गदाघातें. ६१
असुर वधुनि रणरंगीं, शोणिततटिनी उदंड वाहविल्या,
त्यांत खळचमू, त्यांतहि नच कांहीं पापमतिहि राहविल्या. ६२
लवी सतत शरांचीं द्यायास परा शरासना दानें,
खळ किति ? निजघंटेच्या मोहितिच पराशरास नादानें. ६३
उगवी महाभयतिमिरसागरपरपारदा दिना; कर्षी,
पाशें बांधोनि, असुर; बहु सुखवी नारदादि नाकर्षी. ६४
पाडी ढासळुनि विशिखवर्षें ती घनघटा कितेकांतें,
सल्लंघन घातक जरि नसतें, तरि अनघ टाकिते कां तें ? ६५
पाहति रणीं कराया त्या देवीसीं बराबरि कबंध,
नाचति हर्षें, जाणों म्हणती, ‘ तुटला बरा बरिक बंध. ’ ६६
बाळभय हरुनि, ऐसी कोणीही हर्षली प्रसू नाहीं;
त्या श्रीजगदंबेवरि सुरसंहति वर्षली प्रसूनांहीं. ६७
क्षणमात्रें सर्व महिषसैन्य शिवागणसमूह - हरि खरची,
घन जेंवि मयूरमनीं, देवमनीं तो प्रताप हरिख रची. ६८
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |