सामाजिक विकासवेध
सामाजिक विकासवेध
या ग्रंथाच्या लेखकाला कोणा एका पठडीत बसवणं अवघड. शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, समीक्षक, संशोधक, संपादक, वस्तुसंग्रहालय तज्ज्ञ,वक्ता, संघटक, सामाजिक कार्यकर्ता,कवी,कथाकार,भाषांतरकार,शिक्षण तज्ज्ञ,कुशल प्रशासक या सर्वांपलीकडे हा एक समाजसंवेदी अश्वत्थामा आहे, पण आधुनिक काळातला! महाभारतातल्या अश्वत्थाम्याला स्वतःचं गमावलेलं तेज परत मिळवण्यासाठी नि जखम भरून निघण्यासाठी वणवण करावी लागली होती. काही अश्वत्थामे सामाजिक जखमा भरून निघाव्यात म्हणून जीवनभर भटकत राहतात. त्यांच्या हाती येतात समाजाचे कूटप्रश्न. सापासारखे असतात ते, धरले तर चावतात,सोडले तर पळतात.काही समाजलक्ष्यी माणसं सर्पमित्रांच्या कौशल्याने प्रश्नांचे साप आपल्या पोतडीत पाळतात. दात न काढता,माणसाळतात त्यांना. विषाचं अमृत करून चुकलेल्या माणसांना ताळ्यावर आणत ते त्यांना परत समाजात विसावतात कसे कळतसुद्धा नाही.अशा सर्व प्रश्नांचा हा ‘सामाजिक विकासवेध'.
सामाजिक विकासवेध
डॉ. सुनीलकुमार लवटे
सामाजिक विकासवेध
डॉ. सुनीलकुमार लवटे
सामाजिक विकासवेध
(सामाजिक लेखसंग्रह)
संपर्क
‘निशांकुर', अयोध्या कॉलनी,
राजीव गांधी रिंग रोड, सुर्वेनगरजवळ,
पोस्ट- कळंबा, कोल्हापूर - ४१६ ००७,
मो. नं. ९८ ८१ २५ 00 ९३
drsklawate@gmail.com
www.drsunilkumarlawate.in
दुसरी आवृत्ती २०१८
© डॉ. सुनीलकुमार लवटे
प्रकाशक
अक्षर दालन,
२१४१, बी वॉर्ड, मंगळवार पेठ,
कोल्हापूर.
फोन : ०२३१-२६४६४२४
email- akshardalan@yahoo.com
मुखपृष्ठ
गौरीश सोनार
अक्षर जुळणी
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
मुद्रक
प्रिमिअर प्रिंटर्स, कोल्हापूर
मूल्य ₹ २५0/-
भूमिका
समाजबदलाचे वास्तव
आपला भारत १५ ऑगस्ट, १९४७ रोजी स्वतंत्र झाला. तदनंतर आपण राज्यघटना तयार केली. त्यानुसार २६ जानेवारी, १९५० रोजी आपला देश प्रजासत्ताक भारत झाला. स्वातंत्र्याचे रूपांतर स्वराज्यात आणि समृद्ध राष्ट्रात करण्याच्या उद्देशाने आपण स्वातंत्र्याच्या गेल्या सात दशकांच्या कालावधीत समाजातील अनेक वंचित घटकांना मध्यप्रवाहात आणण्याच्या हेतूने सामाजिक न्याय संकल्पनेच्या आधारे आरक्षण नीतीचा अवलंब करून अनुसूचित जाती, भटके व विमुक्त, आदिवासी वर्गाच्या दलित समाजास शिक्षण, सेवा, आरोग्य, निवास, विवाह इ. कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करून त्यांच्या सर्वंकष विकासाचे धोरण अवलंबिले. त्यामुळे सत्तरएक वर्षांपूर्वी समाजजीवनात दलित बांधवांना जी अस्पृश्यता सोसावी लागायची ती बंद झाली. पण तिचे समूळ उच्चाटन झाले, असा कोणीही वास्तववादी, समाजसंवेदी मनुष्य म्हणणार नाही.
स्त्री व शेतकरी आपल्या समाजात दलितांइतकेच वंचित व अपेक्षित घटक होत. स्वातंत्र्योत्तर विकासाच्या कालखंडात आपण महिला आरक्षणाचे धोरण स्वीकारले तरी त्याला पूर्णांशाने यश आले, असे म्हणणे धाडसाचे ठरावे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आपण महिला आरक्षण आणले तरी निवडून आलेल्या महिला प्रतिनिधींचे काम त्यांचे पती करताना दिसतात. त्यामुळे वास्तवात स्त्री कर्ती झालेली दिसत नाही. नोकरीच्या ठिकाणी क्षमता असून दुय्यम दर्जाची वागणूक सहन करणा-या स्त्रियांची स्थिती पाहिली की भारतातील स्त्री-पुरुष समानतेपुढील दीर्घ पल्ल्याचे आव्हान लक्षात यायला वेळ लागत नाही. जी स्थिती स्त्रियांची तिच शेतक-यांची पण. शेतमालाला हमी भाव मिळाल्याशिवाय भारतातील शेती कधीच किफायतशीर होणार नाही, हे कळायला ना कोण्या ज्योतिषाची गरज ना अर्थतज्ज्ञाची. आपल्या देशातील कृषी शिक्षण व शेती यांचा व्यवहारी
संबंध न राहणे, कृषी शिक्षण पदवीधरांचे शेतीत न जाता प्रशासकीय सेवेत जाणे, शेती संशोधनाचा सुमार दर्जा, शेती गुंतवणुकीतील वाढता खर्च (बी-बियाणे, खते, जंतुनाशके इ.) यामुळे शेतीपुढचे संकट रोज वाढते आहे. परिणामी येथील शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत.
वर्तमान शिक्षणाचा प्रसार सपाट आहे. गुणवत्तेच्या निकषांचे आलेख आकाशस्पर्शी होताना दिसत नाहीत. आजवर आंतरराष्ट्रीय मानांकनात भारतीय शिक्षण संस्थांना मानाचे स्थान मिळविता आले नाही; कारण येथील विद्यापीठे पारंपरिक अभ्यासक्रमातून बाहेर पडू इच्छित नाहीत. शिक्षणातील संशोधन शिक्षकांच्या नोकरी व पदोन्नतीस पूरक असे स्वयंमोपयोगीच राहिल्याने समाजोपयोगी उत्पादक व कौशल्यधारी शिक्षणाची मुळे येथे रुजू शकलेली नाहीत. परिणामी युवक शिक्षित होताहेत हे जरी खरे असले तरी ते बेरोजगार राहतात. एकतर उद्योग, व्यापारासारखी धोका पत्करणारी क्षेत्रे निवडण्याविषयी युवकांचा निरुत्साह व नोकरदार होण्याची त्यांची मनीषा अशा दुहेरी पिछेहाटीमुळे वर्तमान काळातला तरुण भविष्यविषय स्वप्नरंजनात तरंगत राहतो. तो जीवनात तरतो असे सर्रास दिसत नाही. विवाहाचे वाढते वय, स्पर्धेच्या जगातील वाढता संघर्ष, नोकरीतील अशाश्वती यामुळे आजची तरुण पिढी क्षमता असून सुयोग्य शिक्षण व संधीअभावी निराश, निरुत्साही, तद्वतच तणावाखाली वाढते, जगते आहे. परिणामी अकाली प्रौढत्व व प्रौढ वयातच स्वेच्छानिवृत्ती अशांमुळे जीवनाच्या मोठ्या कर्तृत्वकाळातच ‘पुढे काय हे प्रश्नचिन्ह घेऊन जगण्याची नामुष्की यावी हे तिचे खरे शल्य व समस्या आहे.
विवाह ही जातीयतेच्या विळख्यात अडकलेल्या आधुनिक भारताची समस्या नवा चेहरा घेऊन पुढे येत आहे. शिक्षित पिढी जागतिकरणाच्या खुल्या क्षितिजाचे जे जग पाहते ते जात, धर्म, पंथ, लिंग, वंश, भाषा, प्रांत भेदापलीकडील मुक्त जगाचे. येथील पालकांची पिढी अद्याप जात, धर्म मुक्त होऊ पाहत नाही. केवळ शिक्षित झालेली पिढी आधुनिक व पुरोगामी न झाल्याने उच्चशिक्षित मुला-मुलींपुढे आयुष्यावर गंभीर व दीर्घ परिणाम करणाच्या विवाहाचा निर्णय, विवाहस्वातंत्र्य, स्वयंवर मागणारी ही पिढी भावनिक नाते व भविष्यचिंता यांच्या संघर्षात स्व अस्तित्व गमावते आहे. त्यासाठी समाजजाणिवांमध्ये परिवर्तन ही नव्या शतकाची अनिवार्य गरज म्हणून पुढे येत आहे.
जे प्रौढांचे, तेच मुलांचे. माहिती व तंत्रज्ञान क्रांतीने संगणक, टी. व्ही., मोबाईल्स इ. दृक्-श्राव्य साधनांमुळे मुलांचे भावविश्व उपजत
जागतिक केले आहे. भारतीय कुटुंबव्यवस्था विभक्तपणाकडे वळल्याने, शिवाय ती नगरमुखी झाल्याने नवी मुले उपजत प्रौढ आहेत. ती तंत्रकुशल
आहेत. संपर्क, संवाद, दळणवळण सर्व प्रकारच्या साधनांत तरबेज पिढीस बालकहक्कांचे वरदान या शतकाने बहाल केले आहे. नागरी व ग्रामीण मुलांचे जीवनमान व जाणिवांचे जग यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. तरी पूर्वीची मुले व आजची मुले यांत महदंतर आहे. ती धीट, धाडसी, बोलकी आहेत. आविष्कार व अभिव्यक्तीचे खुले व्यासपीठ त्यांना लवकर लाभत असल्याने ती मत व्यक्त करताना दिसतात. त्यांचे ऐकणे काळाची गरज होऊन बसली आहे. मुलांचे कायदे क्षणिक उद्रेकापोटी बदलण्यात हाशिल नसते, हे केव्हातरी आपण समजून घ्यायला हवे. त्या दृष्टीने सन २०१३ च्या दरम्यान भारतात केंद्र व राज्य दोन्ही स्तरांवर बालके, युवक, महिला व वयोश्रेष्ठ नागरिक यांचे धोरण व योजना बनवित असताना त्यांचा सदस्य कार्यकर्ता म्हणून मला भारतीय समाजातील होत असणारे बदल, परिवर्तने, शासकीय धोरण व योजना यांची संगत व मेळ घालताना लक्षात आलेली गोष्ट अशी की आपण स्वप्नरंजने मोठी करतो; पण आर्थिक तरतुदीविषयक आपली अनुदारता ही येथील सामाजिक बदलांतील मोठा अडथळा व अडसर आहे. राजकीय इच्छाशक्ती ही लोकशाही शासनव्यवस्थेतील दूरगामी परिणाम करणारा घटक असतो. राजकर्ते, मग भले ते कोणत्याही राजकीय पक्षांचे असोत लोकानुरंजन ही त्यांची मजबुरी असल्याने ते हितवर्धकपेक्षा लोकप्रिय निर्णयाकडे निरंतर झुकलेले राहतात. परिणामी इथे मूलभूत बदल अपवादाने होतात. भारतीय समाजाचा विकासवेध घेताना हे जे वास्तव पुढे येते, तिथे आपल्या परिवर्तन व पुरोगामी विकासाला खीळ बसते, हे आपण लक्षात घ्यायला हवे. हा लेखनप्रपंच खरे तर तशा प्रगल्भ समाजघडणीच्या ध्यास व ध्येयातून केलेला खटाटोप होय.
भारतीय समाज निर्माणकाळापासूनच बहुवंशीय, बहुसांस्कृतिक राहिला आहे. अशा समाजातील समस्या गुंतागुंतीच्या असतात, हे खरेच आहे; पण ते सोडवायचे उपाय मात्र व्यामिश्र करून चालत नाहीत. प्रश्नांचा निरास करणाच्या कल्पनांमध्ये स्पष्टता नसेल तर ‘धरले तर चावते, सोडले तर पळते' अशी स्थिती होऊन जाते. परंपरा जपत आधुनिक होता येत नसते. या दोन्हींचा प्रवासच उपजत उलट दिशांचा असतो. आपण प्रतिगामी राहायचे का पुरोगामी व्हायचे हे ठरवावेच लागते. 'गंगा गये गंगादास, जमना गये जमनादास' अशा मनोवृत्तीने समाज स्थितिशील बनून रहातो. विशेषतः शिक्षणाने आधुनिक व भौतिकदृष्ट्या संपन्न होऊ पाहणा-या
समाजाने ‘भौतिक ऐश्वर्य म्हणजेच जीवन' असा समज करून घेतला की त्या समाजाचा विकास कुंठित झाला असे समजावे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा ही जर आपली घटनामान्य मूल्ये असतील, समाजवादी समाजरचना हे जर आपले ध्येय असेल तर आपला विकासाचा नकाशा हा सर्वसमावेशक असायला हवा. 'सर्वजन सुखाय' हे 'बहुजन सुखाय'चे उन्नत रूप होय. त्यामुळे जात, धर्म, लिंगाधारित विषमतेइतकीच विविध प्रकारची समाजवंचितता महत्त्वाची. ज्यांना अद्याप विकासाची फळे चाखायला मिळाली नाहीत, त्यांना ती अग्रक्रमाने देणे क्रमप्राप्त आहे, तसे सामाजिक न्यायाच्या प्राधान्यतत्त्वानुसार ते अनिवार्यही ठरते. म्हणून मग वर्तमान समाजाचे विश्लेषण विद्यमान बदलाच्या पार्श्वभूमीवर करणेच दूरदर्शीपणाचे ठरते. प्रश्नाकडे डोळेझाक करण्याने प्रश्नाचे गांभीर्य वाढत जाऊन समस्या अधिक गुंतागुंतीची होत राहते, याचे राजकीय चित्र आपण काश्मीरच्या प्रश्नात पाहतो आहोत. तसेच ते वर्तमान पटेल, मराठा समाज आंदोलनांतही दिसते. परिवर्तित प्रश्न सोडविण्याचे मार्ग पुरातन कधीच असत नाहीत. त्याग, समर्पण, वर्जन, आरक्षण, समावेशन असे अनेकविध उपाय आजमावूनच आपणास समाजाच्या आकांक्षा नि अपेक्षांची तोंडमिळवणी करावी लागते. जपान, अमेरिका, आफ्रिका इत्यादी देशांत आपल्यासारखेच प्रश्न व समस्या होत्या. त्या त्यांनी कशा सोडविल्या, हे पाहणे अनुकरणीय होईल.
‘सामाजिक विकासवेध' हा सन २०१३ ते २०१७ या गेल्या तीनचार वर्षांत लिहिलेल्या विविध सामाजिक लेखांचा संग्रह होय. हे लेख मी वेळोवेळी विविध दैनिके, मासिके, वार्षिके (दिवाळी अंक) यांसाठी केलेले लेखन होय. ते ज्या क्रमाने प्रसिद्ध झाले, त्या क्रमानेच या ग्रंथात समाविष्ट केले आहेत. त्यामुळे कालसंगती आपसूक साधली गेली आहे. या तीस लेखांत विषय व प्रश्नवैविध्य आहे. त्यातून आपोआपच एक समाजसमग्रता निर्माण झाली आहे. दलित, वंचित, स्त्रिया, शेतकरी, युवक, वयोश्रेष्ठ यांचे प्रश्न व समस्या आहेतच. शिवाय समाजाचे सार्वत्रिक प्रश्नही यात आहेत. म्हणजे भारत भौतिकसंपन्न झाला; पण तो चरित्रसंपन्न झाला का? राष्ट्रीय कर्तव्याचे त्याला भान आहे का? कायदापालनाचा संस्कार येथील शिक्षणाने त्याला दिला का? येथील शिक्षण जबाबदार नागरिकांची घडण करते का? येथील कार्यसंस्कृती काय? आपले राजकीय चरित्र काय सांगते ? हे नि असे अनेक प्रश्न आपणापुढे आहेत. ते सोडवायला, सुटायला मदत व्हावी, या उद्देशाने केलेले हे लेखन होय. ते
वाचकांनी वाचून भारतीय समाज सर्वसमावेशी, सहिष्णू व समान करणे म्हणजेच भारताचे खरे समाजवादी प्रजासत्ताक! ते अंधश्रद्धामुक्त, विवेकवादी, विज्ञाननिष्ठ करणे म्हणजे भौतिकसंपन्न समाजाचे रूपांतर प्रबोधक, बुद्धिवादी, प्रगल्भ समाजात करणे होय.
सदर ग्रंथातील लेख प्रसिद्ध करणा-या सर्व संपादकांचे आभार. तसेच हा ग्रंथ प्रकाशित करणाच्या प्रकाशकांचेही. हे पुस्तक वाचकांप्रत निर्दोषपणे पोहोचविण्याचे कष्ट घेणारे टंकक, मुद्रितशोधक सौ. शिल्पा पराग कुलकर्णी, श्री. विवेक जोशी, श्री. विश्वनाथ यादव, मुखपृष्ठकार श्री. गौरीश सोनार यांचे आभार. यापूर्वी 'एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न' या शीर्षकाचा एक ग्रंथ मी सन २०१३ मध्ये प्रकाशित केला होता. त्यांची ही एका अर्थाने उत्तर आवृत्ती होय. वाचक तिचे स्वागत करतील, अशी आशा आहे.
२८ एप्रिल, २०१७
-डॉ. सुनीलकुमार लवटे
महात्मा बसवेश्वर जयंती अनुक्रम
१. विकास निर्देशांकावर आधारित सामाजिक न्यायाची
गरज/११
२. युवक हो, तुम्हाला तरायचंय की तरंगायचंय?/१६
३. वंचितविकास हीच खरी प्रगती/२१
४. यंदा कर्तव्य आहे; पण... /२६
५. नवसमाजनिर्मितीचा ‘सिंगापूर आदर्श'
अनुकरणीय /३२
६. मुलं बोलू लागलीत, चला त्यांना ऐकूया!/३९
७. 'बाल न्याय विधेयक - २०१४' : रोगापेक्षा इलाज
भयंकर!/४४
८. प्रेरक बदलाच्या प्रतीक्षेतील भारतीय स्त्री/४९
९. अंधार झाला हे खरं; तरीपण.../५५
१०. हरवलेले... गवसलेले.../६२
११. भारतीय युवा धोरण - २०१४/७0
१२. कुटुंब नसलेल्यांची कुटुंबे/७४
१३. अधश्रद्धामुक्त जीवनाची गरज/८३
१४. नवे ज्येष्ठ नागरिक धोरण व योजना/८८
१५. दुर्लक्षित अल्पसंख्याकांचे प्रश्न/९४
१६. सुजाण नागरिकाच्या प्रतीक्षेतील भारत/९८
१७. हसा, हसवा, हसत रहा !/१०४
१८. भारत हे सहिष्णूच राष्ट्र हवे !/१०९
१९. धर्म आणि विश्व एकता/१११
२०. बदलती जीवनशैली व समाजजीवन /११६
२१. नातेसंबंध : गोफ की गुंता ?/१२१
२२. बळिराजाच्या आत्महत्या मुक्तीचा शाश्वत
विचार /१२८
२३. पैसा झाला मोठा, माणूस छोटा/१३४
२४. न उमललेल्या कळ्यांचे नि:शब्द नि:श्वास/१४0
२५. सामान्यांचे ‘स्मार्ट’ समाजकार्य/१४६
२६. नातेसंबंधांचे प्रेक्षकीकरण/१५४
२७. आकाश घेऊन कोसळलेल्या स्त्रिया/१५९
२८. ग्रामीण, असंघटित वयोश्रेष्ठांच्या सामाजिक
समस्या/१६६
२९. जग तसे, आपण असे कसे?/१७२
३०. चोचीतील पाण्यातील वणवा विझविण्याचे
सामर्थ्य/१७८
• पूर्वप्रसिद्धी सूची/१८३
विकास निर्देशांकावर आधारित सामाजिक न्यायाची गरज
भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अलीकडे ‘शाळेच्या दाखल्यावर फक्त धर्म व राष्ट्रीयता यांची नोंद करावी जातीचा उल्लेख काढून टाकावा', असे आवाहन केले आहे. आपली यासंबंधीची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी पुढे म्हटले आहे की ‘आजची तरुण पिढी जातीवर आधारित राष्ट्रीयत्व व निखळ राष्ट्रीयत्व अशा मानसिक संघर्षात सापडली आहे. त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी आज कुठलीही व्यवस्था अस्तित्वात नाही. जुनी व्यवस्था तिला पुन्हःपुन्हा जातीच्या परिघातच ढकलण्याचा प्रयत्न करीत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ‘अॅनिहिलेशन ऑफ कास्ट या देऊ न शकलेल्या परंतु नंतर प्रकाशित झालेल्या भाषणात जातीच्या उच्चाटनाचे विस्तृत विश्लेषण व समर्थन केले आहे. त्यांच्या मतानुसार ‘जातीमुळे समाजाचे विघटन व नैतिक अध:पतन होते... जातीयतेने सामाजिकतेची जाणीव मरून गेली आहे... जातिविच्छेद म्हणजे मनोवृत्तीतील परिवर्तन... मनात जातीय वृत्ती रुजविणारा धर्म हाच याला जबाबदार आहे... खरे शत्रू जातिभेद पाळणारे लोक नसून त्यांना जातिभेद पाळावयास शिकवणारी शास्त्रे आहेत... लोकांची शास्त्रप्रामाण्यावरील श्रद्धा प्रथम नष्ट करणे हाच खरा उपाय आहे. बुद्ध व नानक यांच्याप्रमाणे ‘शास्त्रप्रामाण्य धुडकावले पाहिजे. हिंदू समाज हा जेव्हा जातिविहीन समाज बनेल, केवळ तेव्हाच त्याला त्याचे स्वत:चे संरक्षण करण्याइतपत सामर्थ्य प्राप्त होण्याची आशा करता येऊ शकेल. यासाठी त्यांनी सहभोजन व आंतरजातीय विवाहाचे समर्थन या भाषणात केल्याचे आढळते. हे भाषण १९३६ चे आहे.
त्यानंतर भारत स्वतंत्र झाला. भारताच्या स्वातंत्र्यामागे स्वातंत्र्य, समता व बंधुता या प्रमुख प्रेरणा होत्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण जी राज्यघटना स्वीकारली, तिच्या उद्देशिकेत (Preamble) वा सरनाम्यात सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, दर्जा व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा व त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता (Solidarity and Integrity) यांची शाश्वती देणारी बंधुता यांचे स्पष्ट आश्वासन देण्यात आले आहे. कोणत्याही न्यायाचा मूलाधार हा नैसर्गिक कायदा असतो व तो फक्त, नीती व ज्ञानावर आधारित असतो. नैसर्गिक न्यायाच्या कल्पनेतून सामाजिक न्यायाची कल्पना विकसित झाली. त्यातून आपण देशास कल्याणकारी राष्ट्र (Welfare State) घोषित केले. आरक्षण नीती या संकल्पनेचे अपत्य होय.
सामाजिक न्यायाची व्याख्या करताना म्हटले आहे, ‘सामाजिक न्याय म्हणजे पूर्वग्रहमुक्त समानतेने व्यक्तीच्या वंश, लिंग, स्थान, जात, धर्म इत्यादींचा विचार न करता नैसर्गिक कायद्याची न्याय्य व योग्य अंमलबजावणी होय.' (The fair and proper administration of law conferming to the natural law that all persons irrespective of ethnic origin, gender, possessions, race, religion etc. are to be treated equally and without prejudice.) प्रश्न आहे तो या कसोटीवर गेल्या सुमारे सात दशकात समाजातील सर्व दुर्बल घटकांना संगोपन, शिक्षण, संरक्षण, नोकरी, पुनर्वसन, विकास, आरोग्य इत्यादी विषयक दर्जा व संधीची समानता दिली का? गेल्या पंचवार्षिक योजनांचा आढावा घेता असे लक्षात येते की, या देशातील कल्याण व विकास योजनांवर होणारा खर्च हा सामाजिक न्यायाच्या तत्त्वावर न होता मतदान, राजकीय विचारसरणी, धोरण, निवडणूक इत्यादींविषयक सत्तागणितांच्या उत्तरावर नि आडाख्यांवर होत आला आहे. परिणामी या देशात जात नि धर्माची विषमता व त्या आनुषंगिक असंतोष वाढतो आहे.
भारतासारखे जात, वंश, धर्म, भाषा, लिंग, प्रांत, विचारसरणीचे वैविध्य असलेले अनेक देश आहेत, जे सर्वंकष समाजहिताचे ते स्वीकार्य असे व्यापक धोरण स्वीकारून अमेरिका, जपानसारखे देश पुढे गेले. आपल्यासारखेच प्रश्न त्यांच्यापुढेही होते. त्यांनी कालबद्ध धोरण व कार्यक्रम आखून त्यावर मात केली. जपानने सामान्यीकरण (Normalization) चे धोरण स्वीकारले. विशेषाधिकार (Previlages) रद्द केले. तेथील सामुराईंनी तर विशेषाधिकार व स्वेच्छा सोडले. अमेरिकेत वंशभेदाचा प्रश्न होता.
त्यांनी सकारात्मक कृती कार्यक्रम (Affirmative Action) स्वीकारला व दुर्बलांना विकासाची संधी दिली. ते देताना ते कोणत्या देशाचे पूर्व नागरिक होते हे गौण मानून नागरिकत्व धारण करणा-यांसाठी समान दर्जा व संधीचे धोरण अंगीकारले. युरोपमधील अनेक देशांत सामाजिक सुरक्षा योजनांद्वारे (Social Security System) समानता आणण्याचे प्रयत्न अव्याहतपणे सुरू आहेत.
भारतासारख्या देशात प्रश्नांचा निरास होत नाही त्याचे कारण आपण आपले धोरण व्यापक करीत नाही. एक काळ असा होता की, आपल्या देशात दलितांना समाजाच्या मध्य प्रवाहात आणणे हा आपला ऐरणीवरचा प्रश्न होता. जागतिकीकरणाच्या परिणामांमुळे समाजात विविध प्रकारच्या विषमतेत वाढच झाली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात जातीय विषमता तीव्र होती म्हणून आपण स्वातंत्र्यानंतर आरक्षण धोरण स्वीकारून दलित समाजास मध्य प्रवाहात आणण्याचे धोरण स्वीकारले. गेल्या काही वर्षांत आपण दलित समाजाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय विकासाचे जे चित्र पाहतो ते अभिमानास्पद आहे. अंतिम दलित विकासापर्यंत आरक्षणाचे धोरण राहिले पाहिजे; पण ते कालपरत्वे व्यापक होण्याची गरज आहे. त्यासाठी या देशाने दाखल्यावर जातीची नोंद न करणे ही माझ्या मते प्रतीकात्मक गोष्ट होय. खरे तर धर्माचीही नोंद काढून टाकली पाहिजे. भारतात राहतो व शासनाने ज्याला नागरिकत्व बहाल केले तो भारतीय नागरिक. प्रत्येक नागरिकास दर्जा व संधीची समानता हे येथून पुढे आपले धोरण हवे. त्यासाठी प्रत्येकाचा विकास निर्देशांक' (Developmental Index) निश्चित केला जावा. तो जात, धर्म यांच्याऐवजी व्यक्तीचे अर्थमान, सामाजिक, आर्थिक स्थिती, स्थावर-जंगम संपत्ती, शिक्षण, कुटुंब, घर, भौतिक साधनयुक्तता इत्यादींच्या आधारांवर निश्चित केला जावा आणि त्या आधारे व्यक्तीस सवलत, संधी, आरक्षण इ. सामाजिक सुरक्षांचे फायदे दिले जावेत. आपल्या समाजात दलितांइतकीच दुरवस्था असंघटित, अनाथ, अंध, अपंग, मतिमंद, वेश्या, कुष्ठरोगी, देवदासी, परित्यक्ता, वृद्ध मोलकरणी, धरणग्रस्त, शेतमजूर, कामगार, शेतकरी, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे यांची आहे. त्यांना गेल्या काही वर्षांत त्यांच्या हक्काचे काय दिले याचा विचार करण्याची वेळ अजून आली नाही का? सामाजिक न्यायाचे ते हक्कदार नाहीत का?
स्वातंत्र्याच्या गेल्या वर्षात जे संघटित आहेत त्यांच्याच पदरात विकासाची फळे पडली, हे वास्तव आहे की नाही ? संघटित शासकीय
कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षक, कामगार यांना नियमितपणे वेतनवाढ, महागाई भत्ता, भविष्यनिधी, निवृत्तिवेतन यांचे लाभ मिळून त्यांचा जसा आर्थिक विकास झाला, सामाजिक प्रतिष्ठा वाढली, तशी वरील असंघटित, वंचित, उपेक्षित वर्गांना कधी मिळणार ? ते दलितच आहेत हे आपण स्वीकारले की नाही ? मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती, भटके-विमुक्त, माधव (माळी, धनगर, वंजारी), आदी अन्य मागासवर्गीयांसह वरील असंघटित, वंचित व उपेक्षित वर्ग यांच्या विकासाची जात-धर्मनिरपेक्ष विकास नीती हेच या प्रश्नाचे कालसंगत उत्तर होय. जात, धर्मांचे उल्लेख व त्यावर आधारित सामाजिक न्यायापेक्षा विकास निर्देशांकाधारित सुरक्षा व आरक्षण धोरण राबविले गेले तर सर्वजन सुखाय । सर्वजन हिताय' हा सामाजिक न्याय अमलात येईल. शेतक-यांच्या आत्महत्या आपणास दिसतात; पण वरील असंघटित वर्गाची रोजची फरफट, वणवण आपल्याला केव्हा कळणार ? 'एक गाव, एक पाणवठा', 'एक गाव, एक वस्ती' यापुढे जाऊन 'एक देश, एक नागरिक' अशी व्यापक विकासनीती स्वीकारण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जात निर्मूलनाचा विचार व्यक्त केला असल्याने त्याचे उदारपणे स्वागत केले पाहिजे.
अलीकडे ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापले यांचे मूळ समग्र भाषण माझ्या वाचनात आले. त्यात त्यांनी जातजाणिवांचे रूपांतर जातीय अहंतेत होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करून तरुण लेखकांना यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. तद्वतच नुकत्याच संपन्न झालेल्या तिस-या सम्यक साहित्य संमेलन २०१२ च्या अध्यक्षपदावरून नाटककार जयंत पवार यांचे विचारही महत्त्वाचे वाटतात. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे की, “नव्या समाजरचनेतील नवी वर्ग-वर्ण व्यवस्था नव्या पिढीला समजावून सांगावी लागेल. धर्माच्या नावाने चालविलेली अस्मितेची व मनशांतीची नौटंकी निव्वळ मनोरंजन
आहे, हे सप्रमाण दाखवावे लागेल. अर्थनियंत्रणातून संपूर्ण मानवी जीवनावर नियंत्रण करू पाहणा-या पैशाचे चलनी महत्त्व आणि विचारांचेही विनिमयन होऊ शकते हेही दाखविणे जरुरीचे आहे. दूरसंचार आणि माध्यमक्रांतीतून बनत असलेल्या जागतिक खेड्यांत देश, धर्म, जात, प्रांत यांच्या सीमारेषा सहज ओलांडता येतील, प्रसंगी पुसतादेखील येतील.' हे मला अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या विचारांशी जोडणारं वाटतं. (खरं तर अॅड. प्रकाश आंबेडकरांचे विचार वरील दोन साहित्यिकांच्या पूर्वविचारांचे समर्थन होय.) उद्याचा भारत हा जात, धर्मनिरपेक्ष राहणार याच्या पाऊलखुणा आता घरोघरी उमटत आहेत. मोठ्या प्रमाणावर होणारे आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह, आडनाव लिहिण्याचे टाळणारी नवी पिढी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत जात, धर्माचे उच्चाटन करीत माणूसकेंद्री समाज घडवित आहेत. माझी मुलं, माझे विद्यार्थी जेव्हा असे विवाह करतात तेव्हा मी जो विचार सांगितला, आचरला तो काही वाच्यावर उडून गेला नाही, याचं समाधान या उत्तरायुष्यात मला अधिक आश्वासक नि आशादायी वाटतं. उद्याचा भारत जात, धर्मनिरपेक्षच होणार याची मला खात्री पटली आहे. राजकारणी मतांसाठी कितीही उपद्व्याप करीत राहोत; येणारी पिढी त्यांना आपल्या कृती, व्यवहार, आचरणाने उत्तर देत नवा समाज घडवित राहणार आहे. त्यांनी आता स्वत:च स्वत:चं नेतृत्व करण्याचा प्रघात अण्णा हजारेंच्या जनलोकपाल विधेयक प्रसंगी व दिल्लीतील बलात्कारविरोधी आंदोलनात दाखवून दिला आहे. आता एका मशालीचे काम अनेक मेणबत्यांनी आपल्या हाती घेतलं असल्यानं ‘खुशाल वाहू दे वारा, ज्याला गरज त्यावर धारा' अशी सामाजिक न्यायाची नवी मांडणी अटळ आहे.
युवक हो, तुम्हाला तरायचंय की तरंगायचंय?
आज ३० मे, २०१३. एच. एस. सी. निकाल लागला. अनेक परिचित, पाहुणे, मित्र, स्नेह्यांचे फोन येत राहिले.
शिल्पाला ८२ टक्के गुण मिळाले. आई थोडीशी नर्व्हसच होऊन बोलत होती. पनवेलहून वडील मात्र समाधानी होते. मुलगी बेहद्द खूश होती. कारण ऐन परीक्षेच्या काळातच घरी आई-बाबांमध्ये शीतयुद्ध, गृहयुद्ध, गृहकलह सारं सुरू होतं ... त्या वेळी मी तिला एकच गोष्ट समजावत राहायचो. आई-बाबांकडे लक्ष देऊ नको. तू नि तुझा अभ्यास. शिल्पा सांगत होती,... आजोबा, तुमचा फंडाच उपयोगी पडला. मी बी. कॉम. करणार. सायमलटनस्ली सी. एस.ची एक्झाम देत राहणार.'
कपिलची आई सुनीताचा फोन कोल्हापुरातूनच. ‘दादा, कपिलला ५५ % मार्क्स पडले बगा. मार्काला काय पुजायचंय... त्यापेक्षा तो भाषण करतो, कविता लिहितो, मंडळाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतो, माणसांत असतो हेच मला आवडतं. कपिलच्या पप्पांना सांगा जरा समजावून. दुस-याच्या मुलांच्या मार्काची तुलना करून आपला कमीपणा का मानायचा?'
शिरोड्याहून लिनूची मम्मी बोलत होती... लिनूला ६० परसेंटेज पडलं. ती इंटिरिअर डिझायनर होणार. तिच्या बाबांची प्रतिक्रियाच नव्हती. त्यांच्या लेखी हे खातं गृहमंत्र्यांकडे... हे नामानिराळे.
हे नि असे अनेक फोन. त्यातली चर्चा, संवाद यातून माझी स्थूल निरीक्षणे अशी ... घरी निर्णयाचं होकायंत्र आईच्या हाती आलंय. मुलांच्या करिअर्सच्या कल्पना बदलू लागल्यात. त्या नोकरीकडून व्यवसायाकडे झुकू लागल्यात. मुलांना मार्काचं वैयर्थ उमजू लागलंय. जीवघेण्या स्पर्धेत शहाणपणाची सरशी त्यांना समजू लागली आहे. पुरुष पालक ‘पालक भूमिकेत बॅकफूटवर गेलेत. शाळा, शिक्षकांचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या लेखी
कमी होतंय. मी सुधनला खोदून विचारल्यावर तो म्हणाला, “अंकल, टीचिंग, टीचर्स सब फॉर्मल हो गया है। कोचिंग क्लास तो बक्वास है अंकल । जो सेल्फ स्टडी करेगा, वही सिकंदर होगा।' मला हे जास्त अॅप्ट वाटलं नि फॅक्चुअल पण ! सी. बी. एस. सी.ला बसलेली नगिना ... तिचे पालक त्यांनी ठरवूनच टाकलंय. प्रायव्हेट कॉलेजला घालायचं. कॅश कोर्सेस करीत करिअर, कॉन्फिडन्स व क्वालिफिकेशन अचीव्ह करायचं. हा फंडा मला 'लई भारी कोल्हापुरी/सोलापुरी'... काही म्हणा भिडला, भावला खरा!
मी उगीच या निमित्तानं इतिहासात, भूतकाळात जाऊन स्मरणरंजन करून पाहिलं... मी १९६७ साली एस. एस. सी. (अकरावी) झालो. असाच ३०, ३१ मे ला रिझल्ट लागला. मी पंढरपूरला होतो. त्या वेळी वर्तमानपत्रांत रिझल्ट छापून यायचा. विशेष म्हणजे लंगोटी वर्तमानपत्रांतही आख्ख्या महाराष्ट्रातील पास विद्यार्थ्यांचे नंबर केंद्रनिहाय छापून यायचे. पेपर दोन आण्यांचा. तो आदल्या रात्रीच प्रसिद्ध व्हायचा. किंमत मात्र दुप्पट, साप्ताहिक ‘गोफण'च्या कचेरीत आम्ही चार आण्यांत निकाल बघितला. त्या वेळी ‘परीक्षेचा निकाल' असाच शब्द रूढ होता. त्याचंही एक कारण होतं. त्या काळात ‘निकाल लागणा-यांची (नापासांची) संख्या अधिक होती! परीक्षा नि निकाल दोन्हींचे प्रचंड टेन्शन असायचे. निकालात जी एक्साईटमेंट होती ना, ती आजच्या रिझल्टमध्ये नाही. सब घोडे बारा टक्के पास अधिक ... नापास कमी. ही सारी मायबाप सरकारची किमया... विनापरीक्षा सगळ्यांना पुढे ढकलायचं. आमच्या वेळी परीक्षा निकालावर तीन शेरे असायचे. पास।। वर चढवला/ढकलला ? नापास. गुरुजी नापास निकालावरील ‘नापास' शब्दाखाली आठवणीने ठेवणीतल्या लाल पेनाने अधोरेखित करायचे. नापास मुलं केव्हा गुल व्हायची कळायचंदेखील नाही.
त्यानंतरचा उत्सव मार्क्सलिस्ट पाहण्याचा असायचा. त्या वेळी मार्क्सलिस्ट पुण्याहून यायचं. ते यायचं लहरीने... म्हणजे दिलेल्या तारखेला कधीच यायचं नाही. सारी पोस्टाची मर्जी. मला गणित, इंग्रजीत ३६ मार्क्स मिळाल्याचे पाहून काय आनंद झाला होता म्हणून सांगू! त्या काळात
आमची माफक अपेक्षा असायची, सर्व विषयांत पास म्हणजे झिंदाबाद ! अटकेपार झेंडा ! मला ४९ टक्के गुण मिळाले होते. त्या वेळी एस. एस. सी.त नंबर मिळवणारे पी. डी.त गचकायचे आणि एस.एस. सी. त ५0% गुण मिळविणारे कॉलेजात फर्स्ट क्लास यायचे. मी त्याचं जिवंत उदाहरण ! सन १९७०-८0 चा काळ हा बँकिंग, डॉक्टर, इंजिनिअर्स होण्याचा. सन १९८०-९० ला आय.टी., इंजिनिअरिंग, मेडिकल फॉर्मात होतं. सन २000 ला स्पर्धा परीक्षांची क्रेझ वाढली. आज नवी पिढी या साच्या क्रे झमधील झिंग उतरवून जमिनीवर पाय ठेवत स्वतः करिअर ठरवते, हे माझ्या दृष्टीनं जास्त समजदारीचं, शहाणपणाचं वाटू लागलंय. पालक मदतनीस, मार्गदर्शक होताहेत, मित्र होताहेत हेही मला अधिक सकारात्मक, आश्वासक वाटतंय!
या रिझल्ट, परीक्षा, शिक्षण इत्यादी संदर्भात आजच्या तारखेला मी विचार करतो तेव्हा कष्टाची कामं करून वर येणारे उद्याचे जनक होणार असं का वाटू लागलंय कोण जाणे. पण आतला आवाज मला वर्तमान शिक्षणाच्या वैभवीकरणाचे (Glorification) वैयर्थ, व्यर्थपण प्रकर्षानं, प्रभावानं समजून देऊ लागले आहे. माझ्या घरासमोर गेली १० वर्षे एक पत्र्याची शेड होती. तिथे पारंपरिक कुंभार कुटुंब गणपतीचा कारखाना चालवायचं. मे ते ऑगस्ट, सप्टेंबर असे जेमतेम पाच-सहा महिने कारखाना चालायचा. मे, जून, जुलै मूत्र्या ओतल्या जायच्या. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये रंगकाम, पॅकिंग, डिपॅच, सेल, मे ते जुलै कुंभारकाका एकटेच काम करायचे. ऑगस्टमध्ये सारं घर म्हणजे पत्नी व दोन मुलं (मुलगा/मुलगी) रंगवायचं काम दिवसरात्र करायचे. या वर्षी शेड काढली म्हणून चौकशी केली तेव्हा समजलं की कुंभारकाकांनी स्वत:चं घर बांधलं. शेजारीच शेड मारली आहे. कारखाना, घर स्वत:चं ! मुलांना शिक्षण, लग्नासाठी फिक्स डिपॉझिटस् केल्यात. कुंभारकाका सांगत होते, “सर, जगायला फक्त तीनच गोष्टी लागतात. १) रुपये, आणे, पैसे ओळखता आले पाहिजेत. २) ते मिळवता आले पाहिजेत. ३) खर्च करायची अक्कल आली की झालं.' कुंभारकाका ९ वी नापास झाले नि त्यांनी शिक्षण सोडलं.
माझ्या घरासमोर नगरोत्थान योजनेतून रस्ता करायचं काम सुरू होतं. मी काम करणा-यांशी बोलत राहायचो. इंजिनिअर साहेब यायचे. साईट इंजिनिअर. त्यांना पगार होता रु. ७000/- म्हणजे साधारणपणे २५0 रोज. रस्त्यावर पसरायला खडी करण्यासाठी डंपर फाडी उतरवायचा. एक डंपर फाडी (मोठे दगड) नवरा-बायकोची जोडी फोडून दिवसात फडशा पाडायची. सकाळी सूर्योदय ते सायंकाळी सूर्यास्त अशी अविश्रांत कामाची वेळ. शेजारच्या झाडाच्या सावलीत मूल झोपलेलं... झाकलेलं... खडी पडून लागू नये म्हणून. आई मूल पाजताना मिळेल तितकीच विश्रांती घ्यायची. बाप पाणी पिताना मिळेल तितकीच. सकाळी जेवण म्हणजेच
नाष्टा. दुपारी उरलेलं जेवण स्वाहा व्हायचं. जोडी घरी जाताना ८५0 रुपये रोज घेऊन जायची. चुकून नवरा निर्व्यसनी होता. म्हणाला, “साहेब, गावाकडे शेत, घर, विहीर, जनावरं समदं हाय. पावसाळ्यात शेती करतो. पाऊस संपला की मजुरी. जानेवारी ते मार्च भावकी, जत्रा, लग्नं समदं असतं. तीन-तीन महिन्यांच्या पाळ्या पाळतो. आमच्या वस्तीचा पंचबी मीच हाय. मोबाईलवरून गाव चालवतो.
बाळ नावाचा माझा भाचा आहे. एस. एस. सी. पास. गेली पंचवीस वर्षे एका हॉस्पिटलमध्ये क्लार्क होता. २0,000/- पगार होता. ग्लोबलायझेशनमध्ये हॉस्पिटल टेकओव्हर झालं. नव्या मॅनेजमेंटने त्याला घेतलं नाही कारण त्याला इंग्रजी व कॉम्प्युटर येत नाही. आजवर प्रामाणिकपणा हे त्याच्या जगण्याचं भांडवल होतं. आता मूल्य' संपलं. 'किंमत' महत्त्वाची ठरू लागली. 'किमती'चा आधार ‘कौशल्य' ठरू लागलं आहे, शिक्षण नाही.
माझा लहान मुलगा तीन महिने कामावर असतो, तीन महिने घरी. त्या पाथरवटासारखाच. तीन महिने तो दिवसरात्र ऑन ड्यूटी असतो. घरी आला की तीन महिने फक्त इश्शी, मम्म, जई (खाणं, पिणं, झोपणं) करतो. (पीत नाही हं!) तो जे मिळवतो ते सांगून खरं वाटणार नाही, म्हणून सांगत नाही. मिळकतीवर एक पैसा टॅक्स नाही. मिळकतीचा एक पैसा मिळकतीच्या काळात खर्च नाही. नेट सेव्हिंग... फक्त शेव्हिंगलाही वेळ मिळत नाही। इतकच.
असं बदलणारं जग समजून घेणारे तरतील... बाकी सारे तरंगत राहतील. कोणी स्वप्नांच्या दुनियेत... कोणी रेसचे घोडे होण्याच्या धुंदीत... जे जमिनीवर पाय ठेवून कष्ट करतील तेच उद्याचे किमयागार ठरतील. सहज आठवलं म्हणून सांगतो... बाटा कंपनीचा मूळ मालक रस्त्याकडेला बसणारा, बूट शिवणारा चांभार होता म्हणणे! त्याची कंपनी जगभर पसरल्यावर बाटा इंटरनॅशनल, अँड, मल्टिनॅशनल कंपनी झाल्यावर त्याला विचारलं होतं, '... तुझ्या यशाचे रहस्य काय?' त्यानं उत्तर दिलं होतं, 'मी माझी नजर सतत रस्त्यावरच्या पायांवर ठेवतो. ज्याची नजर जमिनीवर असते तोच आकाश कवेत घेऊ शकतो. अन् मला मग अर्जुन आठवतो... मत्स्यभेद करणारा... त्याला फक्त माशाचा डोळाच दिसायचा. अभिनव बिंद्राला फक्त म्हणे ‘बुल' (टार्गेट) दिसायचं ! असं लक्ष्यभेद करणारेच ‘मुकद्दर का सिकंदर' होतात... तुम्ही ठरवा... तुम्हाला रेसचा घोडा होऊन जीवनाचा जुगार खेळायचा आहे की कष्टानं दगडाला पाझर फोडून स्वेदगंगेनं...
निढळाच्या घामानं स्वावलंबी, सुखी व्हायचंय! राजा मिडास होऊन जीवनाचा कांचनमृग करून घ्यायचा आहे की कस्तुरीमृगाची धुंदी लेवून आत्मगंधाचा, आत्मिक वृत्तीचा माझ्यात काय आहे... काय नाही हे न्याहाळत, सिंहावलोकन करीत जीवनावर मांड ठोकायची आहे?
स्पर्धा परीक्षांच्या चक्रव्यूहात सापडलेली पिढीही मला अस्वस्थ करीत राहते. जागा तीनशे. विद्यार्थी बसतात तीन लाख. यूपीएससीसाठी आपली मुलं दिल्ली, पुणे, डेहराडूनला ठेवणारे पालक मी पाहतो. मुलांवर अक्षरशः हजारो रुपये खर्च करतात, तेही वर्षानुवर्षे, एज बार होईपर्यंत. असं नाही का करता येणार की, दोन-तीन वर्षे संधी द्यायची अन् त्याला म्हणायचं आता तू नोकरी करीत करिअर कर. होतं असं की, दिल्लीत राहायला चाललेला मुलगा, मुलगी त्याला गावाकडे अपयश घेऊन येणं कमीपणाचं वाटू लागतं. कष्ट करणा-या आई-वडिलांवर कृतघ्नपणे डाफरणारी मुलं जनतेची कोणती नि कशी सेवा करणार ?
पालकांनी मुलांना स्वप्नं जरूर द्यावी; पण काळ, काम, वेगाचे संस्कारही द्यायला हवेत. लातूर पॅटर्नमध्येही हजारो मुलं-पालक असेच ‘घाशीराम' होतात. या वर्षी तो फुगा फुटला. वाय.डी. घेऊन करिअर होत नसते हे मुला-पालकांना समजवायची वेळ येऊन ठेपली आहे. डॉक्टर्स, इंजिनिअर्स, आर्किटेक्चरना आपली मुलं बस्तान बसलेल्या धंद्यात यावी असं वाटण्यात गैर काहीच नाही. प्रश्न असतो मुला-मुलींच्या क्षमता व वकुबाचा. अपेक्षांचं ओझं तर आपण आपल्या मुलांवर लादत नाही ना ? माझ्या मोठ्या मुलाला आर्किटेक्ट व्हायचं होतं. बारावी सायन्स झाला. ७५टक्के गुण होते. प्रयत्न केले. मिळाला नाही प्रवेश, देणगी मला भरायची नव्हती. मुलानेच पर्याय निवडला. साइड बदलली. कॉमर्सला गेला. बी. कॉम. करीत सी.ए. इंटर झाला. सी. ए. पूर्ण न करताही कर सल्लागार, गुंतवणूक सल्लागार होऊन स्वावलंबी. गाडी, घोडे (पत्नी) स्वत:चं स्वतः घेऊन आनंदी ! खलील जिब्राननी ‘प्रोफेट' या आपल्या महाकाव्यात म्हटलेलं अधिक महत्त्वाचं नि मार्गदर्शक आहे. तो म्हणतो, “तुम्ही तुमच्या मुलांना तुमचे प्रेम द्या; पण आपले विचार मात्र देऊ नका; कारण त्यांना स्वत:चे विचार नि स्वप्नं असतात.
वंचितविकास हीच खरी प्रगती
गेल्या शतकाच्या उत्तरार्धात विकासाचा संबंध भौतिक समृद्धीशी जोडला जायचा. एकविसाव्या शतकातील विकास परिमाणे ही मानव संसाधन विकासावर आधारित आहेत. त्यातही तुम्ही समाजातील वंचित घटकांबद्दल, सर्वसामान्य माणसाबद्दल विकासात काय विचार करता, यावर तो देश प्रगत मानला जातो. त्यामुळे इथून पुढे एखाद्या शहर वा जिल्ह्याचा विकास आराखडा वा आलेख हा वंचित विकास निर्देशांकावर
आधारित राहणार आहे. विकासाच्या झंझावातात आपण अमानुषपणे केवळ झाडेच तोडली नाहीत तर झोपडपट्टयाही उद्ध्वस्त केल्या... मनुष्यवस्त्यांवर बुलडोझर फिरवताना विकासकांनी आधी पुनर्वसन नि मग विध्वंसन' हे साधे सूत्रही पाळले नाही. एकविसावे शतक हे माहिती
अधिकार, मानव अधिकार, वंचितांचे विशेषाधिकार, मानव संसाधन विकासाचे शतक राहणार असल्याने विकासात केवळ बहुसंख्यांकांच्या सोयीचा विचार करता येणार नाही, तर अगोदर अल्पसंख्याक वंचितांचा विकास व मग संरचनात्मक विकास योजना असा विकासाचा पट मांडावा लागणार असल्याने महानगरांची विकास योजना ही वंचित विकासाच्या पायावर उभी केल्याशिवाय ना तिला अनुदान मिळेल, ना मंत्रालय मान्यता ना विश्व बँक व नियोजन मंडळाचे अर्थसाहाय्य.
वंचितविकासात शिक्षण, संगोपन, संरक्षण, संस्कार, पुनर्वसन, प्रशिक्षण, निवास, सेवायोजन, सुस्थापन इत्यादी घटकांचा विचार करावा लागतो. घरात वाढणाच्या मुलास घर व समाजाचे भक्कम छत व आधार असल्याने केवळ शिक्षण दिले की त्याचा विकास होतो. वंचितांचे तसे नाही. शिक्षणाबरोबर सुस्थापनाचा विचार केल्याशिवाय वंचितविकास साधता येत नाही. आपल्याकडे वंचित वर्ग दोन प्रकारचा आहे. १) दलित, २)
दलितेतर वंचित. दलितेतर वंचितांत अनाथ, निराधार, बालगुन्हेगार, अंध, अपंग, मतिमंद, मूक, बधिर, परित्यक्ता, कुमारी माता, वेश्या, देवदासी, वृद्ध, भिक्षेकरी, बंदीबांधव, एड्सग्रस्त, धरणग्रस्त, आपत्तीग्रस्त, स्थलांतरित कुटुंबे, बालमजूर असा मोठा समाज दुर्लक्षित वर्ग आहे. त्यांची संख्या लोकसंख्येच्या ९०टक्के भरेल इतकी मोठी आहे; पण आपल्याकडे जिल्हा वा महानगर विकासाचा भविष्यलक्षी विचार करताना त्यांच्या विविध प्रकारच्या विशेष हक्क नि गरजांचा विचार होत नसल्याने विकासाच्या नावावर आपण केवळ मलमपट्टी लावतो, गरज आहे मूलभूत शस्त्रक्रियेची व विकासाच्या नवसंकल्पना आत्मसात करण्याची.
कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता वंचितांच्या विकासार्थ कार्यरत संस्था दोन खात्यांच्या अखत्यारीत कार्यरत आहेत : १) सामाजिक न्याय विभाग, २) महिला व बालविकास सामाजिक न्याय विभागात दलित व अपंगांचा विचार केला जातो, तर महिला व बालविकासात प्रामुख्याने अनाथ, निराधार मुले, मुली व महिलांचा. कोल्हापूर जिल्ह्यात महिला व बालविकास अंतर्गत राज्य व केंद्र पुरस्कृत योजना आहेत. संस्थाही दोन प्रकारच्या आहेत : १) स्वयंसेवी संस्था संचालित, २) शासकीय. त्यातही अनुदानित, विनाअनुदानित असा पंक्तिप्रपंच करून महाराष्ट्र शासनाने आपले राज्य कल्याणकारी व पुरोगामी असल्याचे नकारात्मकतेने सिद्ध केलेच आहे. हे कमी म्हणून की काय आता अपंग व अनाथांच्या संस्था ‘स्वयंअर्थशासित करण्याचा घाट घातला गेला आहे. तसे झाल्यावर मात्र महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकरांचा न राहता तो टाटा-बिर्ला-अंबानींचा म्हणून ओळखला जाईल हे निश्चित. महिला व बालविकास विभागामार्फत कोल्हापूर जिल्ह्यात निरीक्षणगृह, बालगृह, शिशुगृह, महिला आधारगृह, अनुरक्षणगृह, सेवारत महिला वसतिगृह, महिला समुपदेशन केंद्र अशा विविध ४० शासकीय/स्वयंसेवी संस्था कार्यरत असून तेथील वंचित लाभार्थ्यांची संख्या २५०० आहे. सामाजिक न्याय विभागातर्फे अपंग विकासाच्या निवासी, अनिवासी शाळा/वसतिगृहे अशा ४० संस्था असून त्या सर्व स्वयंसेवी संस्था चालवितात. पैकी केवळ १५ संस्था अनुदानित असून उर्वरित २५ विनाअनुदानित (नव्या भाषेत स्वयंअर्थशासित) आहेत. येथील वंचित लाभार्थी (अंध, मतिमंद, मूक, बधिर इ.) यांची संख्या २५००च्या घरात आहे. या संख्येशिवाय जिल्ह्यात संस्थाबाह्य वंचितांची संख्याही मोठी आहे.
कोल्हापूर हे नजीकच्या काळात उद्योग, शिक्षण, व्यवसाय, सेवाक्षेत्रे, इ. क्षेत्रांत मेट्रो शहरांशी स्पर्धा करणारे ‘डेव्हलपमेंटल हब' म्हणून ओळखले जाते. जिल्ह्याच्या विकासात प्रत्येक तालुक्यात औद्योगिक वसाहती, शैक्षणिक सेझ, क्लस्टर, कॉरिडॉर अशा योजना आखल्या जात आहेत. महामार्ग चौपदरी, सहापदरी केले जात आहेत. विमानतळ विकास, रेल्वेचे मार्ग कोकण रेल्वेशी जोडून गतिशील करण्याचे संकल्प आहेत. हे असायलाच हवेत; पण त्याचबरोबर मानव संसाधन विकास योजनेचा भाग म्हणून विद्यमान वंचित विकासाचे जाळे सुविधायुक्त करून तेथील सेवा दर्जा उंचावणे अनिवार्य आहे. त्यासाठी पुढील बाबींची अंमलबजावणी आवश्यक आहे.
महाराष्ट्र शासन नजीकच्या काळात बालविकास, युवक विकास, महिला विकास, ज्येष्ठ नागरिक विकासाची धोरणे जाहीर करणार आहे, ही स्वागतार्ह बाब असून शासन खचीतच अभिनंदनास पात्र आहे. त्यात वंचित समुदायासाठी (अनाथ, अंध, मतिमंद, मूक, बधिर, परित्यक्त इ.) ६टक्के आरक्षण द्यायला हवे. शिवाय दलित वर्ग विकासार्थ सामाजिक न्यायाच्या तत्त्वावर ज्या सर्व सोयी, सवलती, सुविधा, योजना शिष्यवृत्ती आहेत, त्या जशाच्या तशा वंचितांना लागू करायला हव्यात. कोल्हापुरातील वंचित विकास संस्थांतील मंजूर लाभार्थ्यांची संस्था लोकसंख्येच्या प्रमाणात वाढवित नेणे आवश्यक असल्याने सामाजिक न्याय व महिला आणि बालविकास विभागाने आगामी २५ वर्षांचा अपेक्षित विस्तार लक्षात घेऊन योजना विकास लक्ष्य निश्चित करायला हवे. वंचितांच्या निवासी संस्था / शाळांना मान्यतापत्रे (लायसेन्स) असतात. दर तीन वर्षांनी त्याचे नूतनीकरण होत असते. ते नूतनीकरण केवळ मुदतवाढ देते. त्याचा संबंध सेवाविस्तार व दर्जा उंचावण्याशी जोडायला हवा. संस्थांच्या सुविधा व सेवांचा अपेक्षित किमान दर्जा (डिझायरेबल मिनिमम स्टैंडर्ड) निश्चित करणे व त्यांचे निरीक्षण, नियंत्रण नियमित होणे अनिवार्य केले जावे. ते अनुदानित, विनाअनुदानित, शासकीय, स्वयंसेवी, स्वयंअर्थशासित असा भेद न करता सर्वांना समान हवे. वंचित संस्थांतील कर्मचारी, अधिकारी, शिक्षक, तंत्रज्ञ, समुपदेशक यांच्या किमान पात्रतेचा दर्जा वाढविणे अपेक्षित आहे. काळजीवाहक चौथी पास, साक्षरता शिक्षक सातवी पास अशा आर्हता इंग्रजांच्या काळात ठीक होत्या. किमान पदवीधर पात्रता धारण करणारे कर्मचारी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले शिक्षक, अधिकारी असणे
अनिवार्य आहे. संस्थांचा सेवादर्जा उंचावण्यासाठी वेतनेतर अनुदान ८ टक्के आहे. ते १५ टक्के करणे अनिवार्य आहे. संस्था व शाळांत संगणक, इंटरनेट, मल्टिमीडिया, एल. सी. डी., टी.व्ही. टेलिफोन अनिवार्य हवे. निवासी खोल्या, प्रसाधनगृहे इ. सोयी लाभार्थी संख्या प्रमाणावर आधारित आहेत; पण त्यांचे पालन होत नसल्याने वंचित मुले-मुली मुक्या मेंढरांसारखी कोंबली जातात. विनाअनुदानित संस्थांतील आहार, आरोग्य सुविधा कागदावर असतात. यंत्रणेचे संवेदीकरण (सेन्सेटायझेशन) झाल्याशिवाय शक्य नाही. विनाअनुदानित संस्थेतील शिक्षक, कर्मचा-यांना वेतन व सेवाशाश्वती मिळायला हवी. शाळांमध्ये ग्रंथालये अनिवार्य हवीत. समुपदेशक, डॉक्टर, सर्व संस्था, शाळेत अनिवार्य व पूर्णवेळ असावा. व्यावसायिक प्रशिक्षण ट्रेड्स बाबा आदमच्या जमान्यातील आहेत. ती कालसंगत व आधुनिक गरजांवर आधारित हवेत.
महाराष्ट्र शासनाने ६ ते १४ वर्षे वयोगटातील बालकांसाठी सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा अमलात आणून एक पाऊल पुढे टाकले आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राथमिक शाळांत वंचित मुलांसाठी विशेष शिक्षक नेमलेत; पण ते हंगामी व फिरते (मोबाईल) आहेत. दर आठ मुलांमागे एक शिक्षक असे सूत्र ठेवून शिक्षक व विद्यार्थी दोघांची चेष्टा व हेळसांड सुरू केली आहे. अशा मुलांसाठी केंद्रशाळा केंद्रशिक्षक, केंद्र वसतिगृह अशी क्लस्टर्स प्रत्येक तालुक्यात विकसित केली तर त्या त्या तालुक्यातील वंचित बालके आपल्या परिसरात शिकतील. शिवाय कुटुंबांचे त्यांना स्थानिक पाठबळ लाभून विकासात गती येईल.
वंचित विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचे सरासरी मान उंचावते आहे व विस्तारसंख्या वाढही होते आहे. हे लक्षात घेऊन सर्व शैक्षणिक संस्था या अपंग सुविधांनी युक्त करणे अनिवार्य आहे. रॅप, ग्रिप्स, प्रसाधनगृहे, बेचीस, व्हरांडे, वर्ग हे अपंगानुकूल हवेत. त्या सुविधा शास्त्रोक्त पद्धतीने केल्या जाव्यात. त्यांच्या देखभालीची अनास्था सार्वत्रिक आहे. त्या समाजाच्या वंचितांप्रती असलेल्या साक्षरतेचा अभाव व्यक्त करणाच्या जशा आहेत, तशा त्या समाजास असंवेदनक्षम सिद्ध करणा-या आहेत. वंचितांवर दया करण्याचा काळ इतिहासजमा झाला असून, तो त्यांच्या मानवी विशेष हक्काचा भाग आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे.
जगात कोणत्याही शहराच्या विकासाचा रोड मॅप करीत असताना वरील गोष्टींची काटेकोर अंमलबजावणी होत असते. भारत हा विकसित
देश मानला जाऊ लागला आहे. नगरोत्थान म्हणजे रस्तेविकास, संरचना विस्तार नाही तर वंचितविकास, मानव संसाधन विकास, मनुष्यवस्ती विकास होय. हे लक्षात घेऊन कोल्हापूरच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे. संस्थानी काळात ज्या गोष्टी पाहिल्या जात होत्या, तितक्या जरी वंचितांसंबंधी पाळल्या तरी ‘रायझिंग कोल्हापूर' हे कोल्हापूर शायनिंग ठरेल. त्यासाठी प्रत्येक कोल्हापूरकराचं मन राजर्षी शाहू छत्रपतींसारखं उदार, पुरोगामी, सर्वसमावेशक हवं आणि संवेदनक्षम भविष्यलक्ष्यीही!
यंदा कर्तव्य आहे; पण...
‘विवाह' शब्दाचा पर्याय ‘कर्तव्य’ केव्हा झाला मला माहित नाही पण हा शब्द मला आवडला खरा. किंकर्तव्यमूढच्या द्वंद्वातून तो आला असावा. ‘करू की नको' असं द्वंद्व विवाहाच्या संदर्भात सा-यांनाच असतं. ज्यांचा विवाह असतो त्यांना..., ज्यांना आपल्या पाल्यांचे विवाह करायचे असतात त्या पालकांना, विवाहाची मध्यस्थी करणाच्या काका, मामांना; पण असं द्वंद्व विवाहसूचक मंडळाच्या संचालकांत मात्र खचीतच नसतं. त्यांची मन:स्थितीच वेगळी असते. ती थोडीशी भटा-ब्राह्मणासारखी असते. नवरा मरो की नवरी; दक्षिणा मिळाल्याशी कर्तव्य ! कमिशन मिळालं की हे झाले मोकळे... आपल्या काखा वर करायला. प्रत्यक्ष ज्यांचा विवाह असतो त्यांची मन:स्थिती मात्र बळी जाणाच्या बकरी किंवा बोकडासारखी असते. विवाह त्यांच्या जिवाचा, आयुष्याचा खेळ असतो. तो असतो जुगार. जे विवाह ठरवतात ते बहुधा वधू-वरांना वधस्तंभाकडे नेत असतात. वधू-वरांचे चेहरे पाहिले की ते लक्षात येतं. वधूचा चेहरा मोले घातले रडाया... वर महाराजांचा आविर्भाव युद्ध, शिकारीवर निघाल्यासारख ... पाहुणे-रावळे यांना कशाचं काही देणं-घेणं नसतं... पंगत उठली की झाले रिकामे कपड्याला हात पुसून नावं ठेवायला. भाजीत मीठच जास्त होतं, भात जरा कच्चाच होता, उरकलं एकदाचं लग्न, मानपान काय केलं? आम्ही आमच्याकडच्या लग्नात असा फडतूस आहेर बलुतेदारांनापण नाही करत. अख्ख्या लग्नात पाहुणे खरेच पाहुणे असतात. पुरुष हाताची घडी घालून, तर बायका कमरेवर हात ठेवून मापं काढण्यात गढलेले. नाही म्हणायला ज्यांच्या मुला-मुलींची लग्नं तोंडावर आलेली असतात त्यांची लगबग मात्र मांडव, कार्यालयात थोडी उत्साही असते खरी. अंतस्थ हेतू तो न्यारा! आपण हालचाल केली नाही तर स्थळ हातून जाईल म्हणून
पोरा-पोरींना ते नटून आणायला विसरत नाहीत. पै-पाहुण्यांशी बोलणं अंमळ प्रेमाचं नि सबुरीचं. जिभेवर साखर. वागण्यात नव्वद अंशांचा काटकोन तीस अंशाचा. कधी कधी तर शून्य अंश होऊन पायधरणीसुद्धा! प्रत्येकाचं लग्नातील कर्तव्य, उद्देश, उपस्थिती, वावर पाहण्यासारखा असतो!
याला लग्न का म्हणतात तेच मला कळत नाही. हा शब्द आपण जसा घुटमळून लिहितो ना तसंच असतं लग्न ! एकेकाळी लग्न म्हणे दोन गरोदर बायकांचीच व्हायची. मुलगा-मुलगी झाली तर ठीक नाही तर
आपोआप तलाक, काय ग्रेट होते हो आपले पूर्वज ! मग सुधारणा झाली. मुलं-मुली झाली की ठरवून विवाह होऊ लागले, ते मुला-मुलींना कळण्याआधीच ! म्हणजे असं की अंगणा-सोप्यात पोरं भातुलकीचा खेळ करू लागली किंवा नवरा-नवरी खेळू लागली की आई-वडिलांच्या मनात तो खेळ जिवंत करायचा संचार व्हायचा. द्यायचे बार उडवून. नवरी इतकी लहान असायची की, मामा कडेकर बसूनच तिला मांडवात आणायचा. नवरा इतका छोटा असायचा की काकाच्या खांद्यावर बसून त्याचं डोकं धरून बसायचा (आणि नंतर मग डोक्यावरच बसायचा!) आत्ता नवरानवरी इतके मोठे झालेले असतात तरी मामाचा उत्साह मात्र तोच! भाचीला दिलं नाही ना? उचलतोच असा सारा पोरखेळ! त्यात आता हार घालण्यावरून वाढत चाललेली ईर्ष्या तर नवरा-नवरीचा चेंदामेंदा करू लागलीय!
पूर्वी कळायच्या आधी लग्न व्हायचं! आता कळून उलटलं तरी लग्न वळता वळत नाही. मुलं-मुली शिकत राहतात. रोज शिक्षणाचं तोरण झोक्यासारखं उंच जातंय! पोस्ट-ग्रॅज्युएट झालंच पाहिजे. करिअरमध्ये पर्मनंट झाल्याशिवाय नो लग्न! मग बघा-बघीत शादी डॉट कॉमवर प्रोफाइल, बायोडाटा, अॅड्स, मग प्रपोज करायचं. चॅटिंग, डेटिंगशिवाय नो सिग्नल. तोपर्यंत आख्खा दहा वर्षांचा पूर्ण बहार निघून जातो. स्वप्नामागून स्वप्नं पाहत रात्रीच्या रात्री बिननिजेच्या आणि भिजेच्या ! नोकरी डॉट कॉम होतं तोपर्यंत सारं आलबेल होतं. हे शादी डॉट कॉम प्रकरण जरा दमछाक करणारंच ठरू लागलंय. ‘पहले नोकरी, बाद में छोकरी' ठीक होतं. आता दिवस गेल्यावर पळापळ. काही खरं नाही. विवाह हे बंधन होता कामा नये. ते असायला हवं कर्तव्य! कर्तव्य म्हणजे जबाबदारी! जबाबदारी म्हणजे खबरदारी! खबरदारी का दूसरा नाम सबुरी! श्रद्धा और सबुरी जीवनातपण हवी. विवाहाकडे कर्तव्य म्हणून पहा. जीवन तुम्हाला इंद्रधनुष्याचे सात रंग दाखवील!
अलीकडे मी मोठ्या इंग्रजी वर्तमानपत्रांत अॅड्स वाचतो. Wanted Evening Companionship, Escorts ! Do you want? शरीरसंबंध - माणसाचे नि प्राण्यांचे यांत मूलभूत अंतर आहे. प्राण्याला आपण काय, कुणाशी करतो याचं भान, जाणीव नसते! म्हणून तर तो प्राणी ना? मनुष्य म्हणजे विचार, सारासार, नैतिकता, विवेक, विधिनिषेध सारं सारं! शिकणं म्हणजे समजदार होणं! अलीकडे शिकणं म्हणजे शेफारणं असा काहीसा अर्थ रूढ होऊ पाहतो आहे. स्थळ, काळ, काम, वेग या सा-यांचं एक टायमिंग नि टाईप ठरलेला आहे. तो काळाबरोबर बदलत असतो, पण काही गोष्टी काळापुढे नेणं म्हणजे घाई... नेई खाई!
लग्न आणि स्वातंत्र्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत. व्यक्तीस्वातंत्र्याचा नि लग्नाचा घनिष्ठ संबंध आहे; पण त्याचा एक तिसरा कोन आहे समाज. स्त्री-पुरुष हे काही बेटावर राहत नाहीत. स्त्रियांचं बेट वेगळं अन् पुरुषांचं वेगळं असं काही अतिरेकी स्त्रीवादी म्हणत! तो काळ विसाव्या शतकाच्या शेवटच्या २५ वर्षांचा होता खरा! आता परत आपण माणूस नावाच्या बेटाकडे प्रवास करू मागतो आहोत. स्त्री ही माणूस
आहे. स्त्री-पुरुषांच्या समभावाशिवाय दोन्ही आधे-अधुरे! पूर्ण-अपूर्णाच्या द्वंद्वाचाही काळ आता इतिहासजमा होईल! ‘मी नि माझं'ची मजा चाखून झाली. एकटा, एकटी राहून झालं. “अंधेरे बंद कमरे में आयुष्य नाही काढता येत. बंद दरवाजांची घरं माणूसच नाही थोपवत. माणुसकीपण थोपवत असतात. तेरी भी चूप और मेरी भी... आपण स्मशानात रहातो कळल्यावर हास्यक्लब उदयिले ! रामदेवबाबांनी काही नाही केलं तरी स्वत:च्या आरोग्याकडे त्यांनी लक्ष वेधलं ! महानगरी माणसं पैशांच्या गुर्मीत जगत. आता त्यांना एस.एम.एस. पाठवून, शुभेच्छा देऊन, कुशलक्षेम कळवून जगता येत नाही कळलं. आता ज्येष्ठ नागरिक विरंगुळा शोधते झालेत. पहिले एकटेच प्रभातफेरीवर निघायचे. आता जथ्थेच्या जथ्थे, थवेच्या थवे यंग सीनिअर्सचे ! म्हाताच्याला आलं बाळसं असा सारा नवोत्साह ! अॅडिडास बूट, टी-शर्ट, कॅप, सँक, शॉट अन् तिकडे पंप शू, चुडीदार, जीन्स, गॉगल्स... मृत्युंजयी जीवन ! जय पेन्शन ! एनआरआय झिंदाबाद !! असा सर्वत्र माहौल.
जीवन सरकता रंगमंच असतो. काळ गुजरेल तशी दृश्यं, पात्रं, प्रसंग, संगीत, नेपथ्य, दिग्दर्शन, ट्रिक्स, टेक्निक्स बदलत असतात. बघता-बघता पहिलं दृश्य ओझरतं. नवं झुंजूमुंजू दिसू लागतं ... भगाटतं ... जुनी पात्रं
काळाच्या उदरात बंदिस्त ... तिकडे नवी मिसरुंड फुटू लागतात... नवे ऋतु झरू लागतात. झुरायचं वय येतं, झुलायच्या वयापाठोपाठ. मागोमाग... शहाणी पिढी ती, जी पुढच्यास ठेच मागचा शहाणा म्हणत शिकत राहते. शिकते, सवरते, शहाणी-सुरती होते, सावरते ती! यंदा तुमचं कर्तव्य असेल तर हे सारं इतिहासभान हवं !
मी पाहतो आहे, व्यक्तिस्वातंत्र्य, सोशल नेटवर्किंग, शिक्षणाचं लांबणं अन् शिक्षणासाठी लांब जाणं, राहणं या सर्वांतून जीवनजोखीम रोज वाढते आहे. टू व्हीलर्सवर पर अवर एटी केएम पळताना ... रेस करताना परिसरावर ट्रेसिंग पेपर ओढला जातोय ! बाईकस्वार हेल्मेट घालून तर बँक सिटर स्कार्फ, सनकोट लेवून आइडेंटिटी चेंज करून जगाला चेंजिंग रूम बनवू पाहते आहे. मी त्यांना सांगू इच्छितो, तुम्ही जितक्या गतीनं जगाला मागे टाकून पुढे सरसावू पाहता तेवढा धोका वाढतो आहे. मागे पडणारे विजेचे खांब १००० वॅटचा विजेचा दाब घेऊन कवटी दाखवत, दात बिचकत ‘सावधान ऽऽ'तेचा इशारा देत असतात, तो इग्नोर करू नका. ओव्हरटेक नुसतं तुम्ही वाहनांचं नसता करत. घेतलेले संस्कार, जपलेली नाती, वाट पाहणारी घरं, आपली माणसं... सारं सारं तुम्ही भन्नाटपणे ओव्हरटेक करत ओन्ली व्हायला सरसावता; पण लक्षात ठेवा... हे। ओन्ली होणं शेवटी लोन्ली होणं असतं. मग फक्त म्युनिसिपालिटीची शववाहिकाच ती काय तुमच्या पाठीशी किंवा हायवेची इमर्जन्सी अॅम्ब्युलन्स... पोलीस पंचनाम्यात नोंद असते, “वीस वर्षांचा एक पुरुष । जीव व अठरा वर्षांचा स्त्री जीव अपघाती मृत सापडला. मोबाईलवरून आप्तेष्टांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सर्वजण नॉट रिचेबल होते. सबब, जीवनमुक्ती संघटनेस अंत्येष्टीची वर्दी दिली. मेहरबानास हुकुमार्थ सादर !' म्हणून तर जागोजागी असतात. स्पीड ब्रेकर ... ते न पाहता मारुती उड्डाण केलं की हीच गत होणार ना !
रस्त्यावरच चेक नाके असतात असे नाही. चेक नाके घरी, दारी, बाजारी सर्वत्र असतात. ते स्कार्फ ओढून किती चुकवणार? दुस-याला फसवायला जाऊन आपलीच फसगत होते ना? माला डी, मूडस्नी कामसूत्र सांभाळता येत नाही. त्यासाठी तर ‘मंगळसूत्र' जन्मलं होतं. लाईफ कधीच टोल फ्री असत नाही, नव्हतं नि होणारही नाही ! स्वयंवर, संवाद, देवघेव, इंटरेक्शननी शक्य असतं. प्रत्येक वेळी पळून, चोरून लग्न करायची गरज नसते. सांगा, ऐका, सहन करा. जर पालक जात, धर्माच्या हत्ती-घोड्यांवरून
उतरायलाच तयार नसतील तर अर्थस्वावलंबी व्हा. त्यांना खलील जिब्रानची ‘बालके' कविता वाचायला द्या. समजवा-
मुलं तुमचीच आहेत
ती तुमच्याच हाडामांसाची
पण वेगळी मनं, स्वप्नं ल्यालेली
त्यांना सर्व द्या फक्त तुमचे विचार नका देऊ
कारण ती त्यांचे स्वत:चे' घेऊन
जन्मलेली असतात.
घरी यंदा कर्तव्य असेल तर पालकांनी मार्गदर्शक व्हावं. पाहावं खड्डयात तर उडी मारत नाही ना ? सरळ जात असतील तर गार्ड बनून ग्रीन सिग्नल द्या. गाडीला अपघात होईल असं वाटलं तर लाल झंडी दाखवा.आयसीयूमध्ये जाईपर्यंत बघे बनू नका. डिझास्टर मॅनेजर बनण्यापेक्षा डिझास्टर प्रिव्हेंटर, कंट्रोलर बना. हस्तक्षेपही जिम्मेदार हवा. ऐकलं तर ठीक... मला कपाळमोक्षच करून घ्यायचाय म्हटले तर तटस्थपणे शुभेच्छा द्या! प्रसंगी थर्ड अंपायर बना. जग काही म्हणो. आतला आवाज प्रमाण माना.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, लाईफ इज नॉट एंजॉयमेंट, इट्स ए एंगेजमेंट! विवाहापूर्वी एंगेजमेंट का असते ? अक्षतेपूर्वी ‘सावधानऽऽ' का असतं? तर तो वादळापूर्वीचा इशारा, बावटा असतो! क्षणभर थांबून, थबकून विचार करायचा असतो. मी कुणाची प्रतारणा तर करीत नाही ना ? मी नुसतं शरीर नाही, मनपण समर्पण करू शकते ना ? अलीकडे स्त्री-पुरुष समानता, स्वातंत्र्य, माध्यमप्रसार, जागतिकीकरण, नवतंत्रज्ञान यामुळे गात्रं लवकर ढिली पडू लागलीत. शरीरसुखाला विवाहाची पूर्वअट राहिली नाही. विवाहपूर्व गुंतवणूक कॉमन व्हायच्या काळात आपण कर्तव्य करीत असताना पुरुषांनी स्त्रीकडे, पत्नीकडे संशयानं पाहायचं, पहारा ठेवायचा व आपण मात्र कृष्ण, रावण बनत रोज नवं सीताहरण, वस्त्रहरणाची नाटकं खेळायची ... हा इकतर्फ गेम आता जमणार नाही. तुम्ही पाक-साफ असाल तर राम, सत्यवान असाल तर सीता, सावित्रीचा आग्रह धरायचा तुम्हाला नैतिक अधिकार! स्त्रीस एक व पुरुषास दुसरी मोजपट्टी चालणार नाही. बायकोचा मोबाईल पाहायचा असेल तर तुमचा फेसबुक अकाउंट पाहायचा अधिकार बायकोला दिला पाहिजे! प्रेयसीचा ई-मेल पासवर्ड मागून तिच्या
प्रेमाची सत्त्वपरीक्षा घेणार असाल तर तुमचे मिसकॉल तिला कळायला हवेत!
असं यंदा कर्तव्य असणा-या सर्वांनी स्वत:ला एकदा उसवून, तपासून पाहायला हवं ! आपण एकविसाव्या शतकातील जागतिक ज्ञानसमाजाचे विश्व नागरिक होत आहोत तर विवाहाच्या कल्पना लोकल राहून चालणार नाहीत. मुलानं शिकून डॉलर कमावले पाहिजेत; पण बायको डोलीतलीच केली पाहिजे अशी विसंगत कल्पना कालबाह्यच ठरणार! मुला-मुलींचे मित्र, मार्गदर्शक बनणारे पालकच येथून पुढे सुखी उत्तरायण कंठू शकणार; अन्यथा वृद्धाश्रम ठरलेला! “तू नहीं तो और सही' म्हणत बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड बदलत राहायचा काळ गेला. निष्ठाच तुम्हास सुखी करील. निष्ठा म्हणजेच नैतिकता. ज्यांना विवाहामागचं कर्तव्य समजत नाही ते तोंडघशी पडतात. जे कर्तव्य निभावतात तेच ताठ मानेनं जगू शकतात. विवाह अपत्यसुखासाठी असतो खरा! पण कधी-कधी भांडं रिकामं निघतं. रुसू, रागावू नका. देवकी नाही, यशोदा बना. वासुदेव नाही बनायला जमलं, नंद बना. नंदनवन निर्माण करा! जीवन अमृतघटासारखं असतं. अमृतघट घरच्या प्रेमानेच भरतो. बाजारी वणवण फिरून तो भरता येत नाही. भरेल पण त्यात अमृत असणार नाही. भौतिक संपन्नता म्हणजे जीवन नव्हे. जीवन म्हणजे एकमेकाचं होणं, एकमेकाचं असणं, एकमेकांसाठी जगणं अन् मरणंही! जुने जाऊ द्या मरणालागुनी... ध्यास नव्याचा धरा! यंदा कर्तव्य असेल तर हे वाचा, विचार करा. पटलं तर कृती करा. अमृतघट भरून वाहत राहील.
नवसमाजनिर्मितीचा 'सिंगापूर आदर्श' अनुकरणीय
भारत खंडप्राय देश आहे; तर सिंगापूर एक छोटंसं बेट. भारताप्रमाणे सिंगापूर बहुधर्मीय, बहुभाषी देश आहे. भारत गरीब देश, तर सिंगापूर श्रीमंत. पन्नासपट श्रीमंत. आपले पन्नास रुपये दिले की आपणास एक सिंगापुर डॉलर मिळतो. मला या देशाची मोठी गंमत वाटते नि आश्चर्यही! देशाच्या जमिनीचा १.५ टक्के भागच शेतीचा. चारीही दिशांनी (खरं तर संपूर्ण देश!) समुद्राने वेढलेला. लोकसंख्या अवघी ५४ लक्ष. क्षेत्रफळही अवघे ६८२ चौरस मीटर (गोव्यापेक्षा छोटा, एक षष्ठांश) एका अक्षांश, रेखांशात सामावलेला देश. बारमाही पाऊस. एकमेव नदी. प्यायचं पाणी देशात नाही. ते शेजारच्या मलेशियातून येतं. धान्य म्यानमार (ब्रह्मदेश), थायलंडमधून. पेट्रोल अरब देशातून. हा देश दुसरंतिसरं काही नसून ते एक बेट आहे. खोल समुद्राचं वरदान लाभल्यामुळे ते एक नैसर्गिक बंदर आहे. केवळ याच एका वरदानावर हा देश उभा आहे. अमेरिका, जपान, युरोपची ती महत्त्वाची उतारपेठ असून आशियाला लागणारा ८0टक्के माल एकटा सिंगापूर निर्यात करतो. तेल उत्पादन होत नाही; पण तेलशुद्धीकरण करून जगभर पाठविणारा प्रमुख देश. करमुक्त बंदर व पर्यटन केंद्र म्हणून हा देश विकसित झाला तो त्या देशाच्या स्वातंत्र्यानंतर. ९ ऑगस्ट, १९६५ रोजी स्वतंत्र झालेला हा देश. तिथे स्वातंत्र्यापासून आजअखेर एकाच पक्षाचं ‘पीपल्स अॅक्शन पार्टीचे राज्य आहे. ली क्वान यू हा या देशाचा पहिला पंतप्रधान. सलग २५ वर्षे (पाच निवडणुका) त्यानंच जिंकल्या. सन १९९० ला राजकारण निवृत्ती घेऊन त्याने मुलाकडे राज्यकारभार सोपविला. गेली २३ वर्षे तोच मुलगा पंतप्रधान. निवडून यायचं रहस्य काय ? गतिमान विकास, कायद्याचे कठोर पालन, भ्रष्टाचारमुक्त शासन (जगातला तो सर्वांत कमी भ्रष्टाचार असलेल्या देशांच्या यादीत पाचवा आहे, तर भारत
९४ वा २०१२). देशातील ९६ टक्के लोक साक्षर आहेत. ७७ टक्के लोक चिनी, १३ टक्के मलेशियाई, भारतीय ९ टक्के, इतर ३टक्के आहेत. इंग्रजी, चिनी, मले व तमीळ तेथील राष्ट्रभाषा होत. धर्मस्वातंत्र्य आहे; पण धार्मिक एकात्मता अधिक महत्त्वाची मानली जाते. जगातील दळणवळण, दूरसंचार समृद्ध देश म्हणून सिंगापूरची ख्याती आहे. जगातील गतिमान विकसनशील देशांच्या श्रेणीत त्याचा अंतर्भाव होतो.
सिंगापूरला मी गेल्या पंधरा वर्षांत तीनदा गेलो. एकदा भारताच्या शासकीय शिष्टमंडळातून, एकदा पर्यटक म्हणून आणि गेल्याच महिन्यात पाहुणा म्हणून. प्रत्येक वेळी मला नवं सिंगापूर पाहायला मिळालं. प्रत्येक वेळी मी सिंगापूरहून भारतात आलो की प्रचंड अस्वस्थ असतो. तो देश व आपला देश अशी तुलना करताना तर निराशाच पदरी येते.
जनजीवन
सिंगापूरची माणसं चिनी अधिक; कारण ते मुळात चिनी लोकांचंच. ब्रिटिशांनी या देशावरही भारताप्रमाणेच राज्य केलं. सिंगापूर ब्रिटिशांची क्राऊन कॉलनी होती. व्यापार, उद्योग, नोकरीकरिता सिंगापूरमध्ये पहिल्यापासून मलेशियाई, भारतीय, थाई, फिलिपाई लोक येत राहिले. येणा-या प्रत्येकाला त्यांची संस्कृती, परंपरा, पोशाख, भाषा, भोजन, शिक्षण, धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य राहिलं आहे. त्यामुळे इथे बहुविध संस्कृती आढळते. चर्च, मशीद, मंदिर, सिनॅगॉग इथे आहेत. चायना टाउन, लिटल इंडिया या नावांवरून असलेली उपनगरे म्हणजे त्या त्या देशवासियांच्या जुन्या वस्त्या, वसाहती; पण देश स्वतंत्र झाला. परदेशातून लोक मोठ्या प्रमाणात येऊ लागले. तशी त्यांनी नवी नगरविकास नीती अवलंबिली. राष्ट्रीय एकात्मतेचं धोरण त्यांनी अवलंबलं. तिथे शासकीय गृहनिर्माण योजना आहे. ते गृहनिर्माण मंडळ उत्पन्नगटांनुसार घरकुल उभारतं. पण प्रत्येक घरकुलात (अपार्टमेंट) मध्ये लोकसंख्येप्रमाणे घरे वितरित केली जातात. प्रत्येक घरकुल, वसाहतीमध्ये तुम्हाला सर्व देश, वंश, भाषांचे नागरिक लोकसंख्येच्या प्रमाणात दिसणार, असणार हे ठरलेलंच; त्यामुळे एकाधिकारातून निर्माण होणारे प्रश्न इथे नाहीत. म्हणजे मुंबई मराठी माणसाची, तर सुरत गुजराथ्यांचे असा प्रकार नाही. देशात दिवाळी, ख्रिसमस, ईद, बुद्धपौर्णिमा, लुनार न्यू इअर, सारे सण साजरे होतात. कधी धार्मिक तणाव नाही, हे विशेष.
लोकजीवन अत्यंत शिस्तबद्ध व सुसंस्कृत, कुठेही दंगा, धोपा, गोंधळ, धावपळ, ढकलाढकली दिसणार नाही. प्रत्येक घरकुल, परिसर स्वच्छ,
हिरवाईनं नटलेला. सर्वत्र पॅसेज, गार्डन, बालक्रीडांगण, कॉमन प्लेस असतेच. प्रत्येक सेक्टरमध्ये शाळा, ग्रंथालय, व्यापार संकुल, मेट्रो स्टेशन असतंच. सारा विकास सुनियोजित व कालबद्ध.
वाहतूक व्यवस्था
जागोजागी आखीव-रेखीव रस्ते. रस्त्यांच्या दुतर्फा झाडी, हिरवळ, फुलांचे ताटवे. अंतराअंतरावर दिशादर्शक फलक. सर्वच सिग्नल चोवीस तास. पोलीस कुठेच नाहीत. हिरवा दिवा असल्याशिवाय कोणी चौक वा रस्ता ओलांडत नाही. पायी चालणान्याचा कोण आदर ! रस्त्यांची आखणी व बांधणी भविष्यलक्ष्यी असते, त्याचं एकच उदाहरण देतो. चॅगी हा सिंगापूरचा एकमेव विमानतळ. तोही आंतरराष्ट्रीय दर्जाचा व मानांकन मिळविणारा. त्या विमानतळाकडे जाणारा रस्ता विशाल, चौपदरी आहे. तो मध्ये फुलांच्या कुंड्या ठेवून दुभागला आहे. याच रस्त्यावर कुंड्या कशा ? असं ड्रायव्हरला विचारल्यावर त्यानं सांगितलं की, विमानतळावर काही आणीबाणी निर्माण झाली तर कुंड्या कडेला ठेवल्या की क्षणात रस्त्याचं रूपांतर रनवेमध्ये करता येतं व आजूबाजूला रिकाम्या जागेत तात्पुरतं विमानतळ चालविता येऊ शकतं.
सिंगापूरला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेस महत्त्व आहे. इथे विमान, बस, रेल्वे, मोनोरेल, रोप वे, जहाज, टॅक्सी व खासगी वाहने आहेत. खासगी मोटारी कमी. व्यक्तिगत मोटारी वापरणं तिथं डिलक्स सिंबॉल ! खासगी मोटारीवर भारी कर अशासाठी की रस्त्यावर भाऊगर्दी होऊ नये. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अनेक वैशिष्ट्यांनी युक्त आढळली.
तिथे सिंगापूरभर फिरणारी लोकल मेट्रो आहे. ती देशाला (शहर म्हणजेच देश आहे!) उभी आडवी चार-पाच मार्गांनी जोडलेली. गाडी पाच-सहा डब्यांचीच. स्वच्छ, सुंदर, वातानुकूलित. येणा-या स्टेशनची उद्घोषणा होते. चार भाषांतून स्टेशन कुठल्या बाजूला येणार ते दिव्यावरून कळतं. अधिकांकडे प्री-पेड स्मार्टकार्ड असतं. ते बस, रेल्वेत सर्वत्र चालतं. ते तुमचं तुम्ही टॅप करायचं. रेल्वे, बसमध्ये कंडक्टर असत नाही. लोक तिकिटाशिवाय प्रवास करीतच नाहीत. ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, बालकधारी माता, अपंगांना प्रत्येक दाराजवळच्या चार कोप-यांची चार आसने आरक्षित; विशेष म्हणजे तेथील लोक स्वत: उठून आरक्षण पाळतात. मला मेट्रो, बसमध्ये एकदाही उभं राहावं लागत नाही. तरुण हे आरक्षण
अधिक तत्परतेनं व सुहास्यवदने पाळतात. प्रवासात जो तो मोबाईलमध्ये गर्क असतो.
बसेस रेल्वेप्रमाणेच वातानुकूलित. स्त्रियाही ड्रायव्हर. बस वेळेवर येणार म्हणजे येणार. बसस्टॉप विकासकामासाठी बदलायचा तर आगाऊ सूचना, जनजागृतीवर भर. तात्पुरता बसथांबा, पण मूळ सोईंचाच. प्रत्येक बस ‘जी. पी. एस.'वर नियंत्रित. तुम्हाला बस रुट व क्रमांक माहीत असेल तर येणारी बस कुठे आहे ते मोबाईल वर कळतं. तुम्हाला हव्या त्या बसस्टॉपवर उतरण्यासाठी प्रत्येक प्रवाशाजवळ असलेल्या बसमधील खांबावर रोधक बटण असतं. ड्रायव्हरच कंडक्टरचं काम करतो. बस ठरावीक वेगाने, ठरावीक मार्गाने, ठरावीक वेळी धावणार हे इथलं गृहीतकं. सर्व रेल्वे, बस स्टेशन स्वच्छ, सुंदर, वातानुकूलित. दमट हवेमुळे घरंही वातानुकूलित असतात. कार्यालयं, हॉटेल्स, शाळा, ग्रंथालयं सारं वातानुकूलित ठेवण्यावर भर असतो. एवढी वीज कुठून आणतात कुणास ठाऊक!
टॅक्सीपण वातानुकूलित असतात. त्या साध्या, डिलक्स, मर्सिडिज सर्व प्रकारच्या. दरही वेगवेगळे; पण फसवाफसवी नाही. ओव्हरटेक नाही. हॉर्न, अपघात, वेगमर्यादा तोडणे यांना जबर शिक्षा आहेत. कायदा मोडला की शिक्षा होणारच. सार्वजनिक व्यवस्थेत कायद्याचं पालन अधिक काटेकोरपणे । केलं जातं. टॅक्सी ड्रायव्हर जवळच्याच रस्त्याने नेतो; कारण जीपीएस सिस्टीमचा त्याच्यावर वॉच असतो.
इथल्या काही रस्त्यांना टोल आहे; पण टोल भरायला थांबावे लागत नाही. गाडीत टोल आकारणी यंत्रणा बसविलेली असते. तुमच्या स्मार्ट कार्डवरून तो वसूल होतो. त्यामुळे वाहतूक ठप्प कधीच नाही. तीच गोष्ट पार्किंग स्लॉटची. आम्ही युनिव्हर्सल स्टुडिओ पाहण्यासाठी गेलो होतो. पार्किंग स्लॉटवर बोर्ड पाहिला. किती बसेस, मोटारी, टू व्हीलर पार्किंग उपलब्ध आहे. इथंही पार्किंग चार्ज स्मार्ट कार्डमधून कापून घेतात. जा, कूपन घ्या, असला प्रकार नाही.
मोनो रेलमध्येही माणसं रांगेनं उभी राहतात, चढतात, उतरतात. गर्दी असते; पण गोंधळ नसतो. वृद्ध, अपंग, गरोदर, बालकधारींसाठी लिफ्ट. लिफ्टमधून येणा-यांना प्रथम प्रवेश. अशा छोट्या-छोट्या गोष्टींतून इथं समाजभान, सामाजिक सुरक्षा, शिस्त जपली जाते. विशेष म्हणजे जगभरातून येणारे प्रवासी पण इथल्या चॅनलमध्ये चपखलपणे क्षणात अॅडजस्ट होतात.
आर्थिक सुविधा
सिंगापूर काय पिकवितो, असं जर तुम्ही मला विचाराल तर हा देश पैसा पिकवितो. व्यापार, उद्योग व बँकिंग या तीन मार्गांनी सिंगापूरला पैसा मिळतो. बंदर, विमानतळ बारमाही गजबजलेलं असतं. ही मालाची उतारपेठ तशी माणसांची पण; पर्यटक इथे बारमाही येत-जात असतात. उद्योगात म्हणाल तर तेलशुद्धी, जहाजबांधणी असे खर्चिक उद्योग उभारल्याने मार्जिन
ऑफ प्रॉफिट मोठे. इथे श्रीमंत कमी, नोकरदार जास्त. त्यामुळे पैशाचं चलनवलन वाहतं ठेवण्यासाठी यांनी बंदर करमुक्त ठेवलं व कर्जाला व्याज नामधारी म्हणजे केवळ १ टक्का आहे. त्यांच्या पैसा, श्रीमंती, गंगाजळीचं रहस्य ! सिंगापूरमधील सारे भारतीय तिथं एक टक्क्याने कर्ज घेऊन भारतात १० टक्के ते १८ टक्के किमान फायदा केवळ आर्थिक उलाढालीतून कमावतात, हे सांगून कुणाला खरं वाटणार नाही.
सिंगापूरमध्ये आलेला विदेशी नागरिक व स्थानिक नागरिक यांत त्यांनी सोयी, सवलतींत फार अंतर ठेवलेलं नाही. तेथील विदेशी नागरिक विद्यार्थी, नोकरी परवानाधारक, अवलंबित पालक, कायम निवास परवानाधारक, हंगामी परवानाधारक असे असतात; पण तुम्हाला कायम परवाना मिळाला की तुम्हाला तिथल्या स्थानिकांच्या सर्व सुविधा, सोयी लागू होतात. त्यामुळे विदेशी नागरिकांचे सिंगापूरला स्थायिक व्हायचे प्रमाण जवळजवळ ४0 टक्क्यांपर्यंत जाते.
सिंगापूरच्या आर्थिक विकासाची गोम तेथील राजकीय व संविधान पद्धतीत आहे. तिथे प्रजासत्ताक राज्यपद्धती आहे. लोकप्रतिनिधी, पंतप्रधान, राष्ट्रपती सरळ मतदानाने निवडले जातात. मतदान तिथे सक्तीचे आहे. दुर्धर आजारी अपवाद केले जातात. शिवाय तिथे सैन्यशिक्षण सक्तीचे आहे. सर्वसाधारण शिक्षणही इथे सक्तीचे आहे. त्यामुळे सर्वसाधारण नागरिक सुशिक्षित असतात, तसेच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. अवैध धंद्यांना प्रतिबंध असल्याने व्यसनांचा सुळसुळाट नाही. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य व समाजसद्भाव दोन्हींचा विकास येथील लोकजीवनात आढळतो. उत्पन्नाच्या मानाने काटकसरीने राहणे इथल्या लोकांचा स्थायीभाव असल्याने कर्जबाजारी वृत्ती नाही. म्हणूनही देशाचा सतत अर्थोत्कर्ष पाहण्यास मिळतो. तिथली समृद्धी शासन योजना व लोकजीवन यांची ही संयुक्त फलनिष्पत्ती होय.
भारत : काही निरीक्षणे
सिंगापूरसारखा देश, तेथील प्रगती, संस्कृती, शिस्त, कायदा व शांतता, शिक्षण, वाहतूक, सुविधा सार्वजनिक जीवन पाहत असताना मनात भारताची तुलना होत असते. त्यातून काही निरीक्षणे हाती येतात, ती अशी -
१. आपल्याकडे लोकसंख्या नियंत्रणाकडे अधिक लक्ष पुरविणे व सोई सवलतींचा संबंध अपत्यसंख्येशी जोडणे आवश्यक आहे. लोकसंख्या शिक्षण व प्रबोधनही तितकेच गरजेचे आहे.
२. आपण २00९ साली सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा आणला. अद्याप शाळाबाह्य मुला-मुलींची संख्या लक्षावधीच्या घरात आहे.
३. आपले दरडोई उत्पन्न कमी आहे.
४. आपल्या नागरिकांच्या मिळकतीतील मोठी रक्कम सण, समारंभ, देवधर्मसारख्या अनुत्पादक कार्यात खर्च होते. त्याचा परिणाम राहणीमान, शिक्षण, विकासावर होतो हे आपल्या लक्षात येत नाही.
५. समाजजीवनात कायद्याचे भय नाही. कायदे मोडणे, गुन्हे करणे यांना अप्रत्यक्ष राजकीय वदरहस्त मिळतो आहे.
६. समाज जीवनात वेळेचे पालन, रांग, कर भरणे, कर्ज भागविणे, शिस्त पाळणे या प्रतिष्ठेच्या व मूल्यवर्धक बाबी म्हणून त्याकडे पाहिलं जात नाही. शिक्षणातूनही ते परिणामकारकपणे बिंबवलं जात नाही.
७. स्त्री-पुरुष समानता, विज्ञाननिष्ठा, जातिधर्म निरपेक्षता व सहिष्णुता, बंधुता, स्वातंत्र्य ही मूल्ये भाषणात, चर्चेत ठळक असतात. कृतीत मात्र विसंगत व्यवहार असतो.
८. अध्यात्म, योग, अंधश्रद्धा, रूढी, बुवाबाजी यांना वाढत्या समृद्धीत मोठी जागा मिळते आहे. त्यात माध्यमांची भूमिका समर्थनाचीच दिसते. सन्मान्य अपवाद आहेत;
९. लोकांचं सामाजीकरण न होता राजकीय ध्रुवीकरण होताना दिसतं.
आपल्या लोकशाही व पंचायत राज्यव्यवस्थेत जबाबदारी, नकार, परत बोलावणे, निवडणूक बंदीसारखे उपाय प्रभावी करणे आवश्यक.
१०. पैसे देऊन सरकारी काम, योजना, अनुदान मंजुरी, गुन्हा माफी,मतदान, कर्जमंजुरी, कागदपत्रे, प्रमाणपत्र प्राप्ती, पदव्या, पुरस्कार हे आपले सर्वसाधारण चरित्र होते आहे. ते बदलणे तितकेच महत्त्वाचे आहे.
सिंगापूरला जे भारतीय जातात, ते तिथे असेपर्यंत तेथील लोकजीवन अनुसरतात. इथे आले की इथले होतात. हा दोष व्यक्तिगत घडणीचा असतो. सार्वजनिक जीवन व वैयक्तिक जीवन यांत जितकी अद्वैतता येईल, तितके आपण लवकर प्रगती व विकासाकडे जाऊ. प्रत्येक प्रगतीला पैसे लागतात असे नाही. भौतिक विकासाला अर्थबळ लागते. चरित्रविकासाला विचाराचं रूपांतर कृतीत होणं आवश्यक असतो. समाज परिवर्तन समूह, झुंडीनं होतं हे खरं आहे; पण मूलभूत परिवर्तने ही वृत्ती विकासातूनच संभवतात. हे लक्षात घेऊन मी मूल्य व निष्ठांच्या पातळीवर अल्पसंख्य वर्गाचा प्रतिनिधी (जात, धर्म नव्हे, अपवाद या अर्थाने) असलो तरी मी त्याशी बांधील राहायला जोवर दृढप्रतिज्ञ होणार नाही, तोवर विकास, प्रगती, गुणात्मक वृद्धी या गोष्टी असंभवनीय, अशक्यच ठरतात.
◼◼
एकविसावे शतक हे मानव अधिकारांचे आणि वंचित विकासाचे मानण्यात येते; त्यामुळे जगभर वंचित विकासाचा विचार जात, धर्म, लिंग, भाषा, राजकीय विचारसरणी, इत्यादी भेदांच्या पलीकडे जाऊन विशुद्ध मानवकल्याणाच्या सामाजिक न्याय तत्त्वावर आधारित निकषांवर केला जातो आहे. वंचना, शोषण, अत्याचार, भेद हेच सामाजिक सुरक्षेचे आधार बनत आहेत. अमेरिकेत सकारात्मक कृती कार्यक्रम (अफरमेटिव्ह अॅक्शन) राबवून वंशभेद गाडून टाकण्याचा प्रयत्न होतो आहे. जपानमध्ये वंचितांना विकासाच्या मध्यप्रवाहात आणण्यास ते माणसाचे सामान्यीकरण (नॉर्मलायझेशन) म्हणतात. त्याखाली अनेक विकास व संधी योजना सुरू आहेत. युरोप खंडात तर सर्व लोकांसाठी सामाजिक सुरक्षा (सोशल सिक्युरिटी सिस्टीम) राबवून विकासाचे सार्वत्रिकीरण करण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय, महिला व बालविकास विभाग बालक, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी चार स्वतंत्र धोरणे आखत असून त्यांच्या मसुद्यावर त्या-त्या क्षेत्रांतील तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था व त्यांचे कार्यकर्ते, युनिसेफ, ‘यशदा'सारख्या मान्यवर संघटना यांत गेले वर्षभर प्रदीर्घ विचारविनिमय होऊन अंतिम मसुदे तयार असून लवकरच त्यांना शासन मान्यता देईल. सन २०१४ हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी वंचितविकास साधणारे देशातील पहिले राज्य ठरेल. यापूर्वीच महाराष्ट्र शासनाने राज्याचे सांस्कृतिक धोरण निश्चित केले असून विकासास सकारात्मक प्रारंभ केला आहे. साहित्य, संस्कृती, भाषा, चित्रपट, कला, क्रीडा या क्षेत्रांतही नवे वारे वाहू लागले आहेत.
महिला व बाल विकासाच्या तरुण, तडफदार मंत्री भगिनी प्रा. वर्षा गायकवाड व श्रीमती फौजिया खान यांना तसेच सर्व महिला आमदार भगिनींना मी पक्षभेदापलीकडे विकासकेंद्री एकवाक्यतेने कार्य, विचारविनिमय करताना गेले वर्षभर जवळून अनुभवले आहे. आम्ही ‘बाल धोरण
२०१३'चा जो मसुदा ठरविला आहे, त्यात ज्यांच्यासंबंधी धोरण आहे त्या मुलांची मते जाणून घेऊन त्याला अंतिम रूप दिले आहे. आज बालक दिन सर्वत्र साजरा होत आहे. त्या निमित्ताने राज्यातील मुले वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांकडे कशी पाहतात, कशी व्यक्त होतात हे पाहणे अशासाठी आवश्यक आहे की शासन, समाज, पालक, शिक्षक सर्वांनी मुलांना गृहीत धरणे चुकीचे ठरेल इतकी ती प्रगल्भ झाली आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘बाल धोरण २०१३'चा मसुदा तयार झाल्यानंतर अंतिम रूप देणाच्या कार्य समितीने असा निर्णय घेतला की मसुदा घेऊन आपण मुला-मुलींपुढे सादर करायचा, चर्चा करायची, त्यांचे म्हणणे समजावून घ्यायचे व मगच मसुदा अंतिम करायचा. त्यानुसार युनिसेफ, बाल हक्क संरक्षण प्रकल्प, कुतूहल फाउंडेशन, डोरस्टेप स्कूल, कमिटेड कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट, फॉर देअर बेटर टुमॉरोसारख्या संस्थांनी पुणे, मुंबई, नंदुरबार, जालना, लातूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, कोल्हापूर, सोलापूर इत्यादी ठिकाणी औपचारिक, अनौपचारिक चर्चा केली. त्यात सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक शिक्षक सहभागी असले तरी मुलांना बोलते करणे व त्यांची मते विविध प्रश्न व पैलूंवर जाणून घेणे याला महत्त्व देण्यात आले होते. मसुद्यात मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे अग्रक्रम निश्चित करण्यात आला असून त्यात बालसंगोपन, बालविकास, जीवन व आरोग्य, पोषण, शिक्षण, बालक हक्क, बालक कायदे, बालक संरक्षण, विशेष बालकांची विशेष काळजी इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आला आहे. चर्चेत महानगर, तालुके, वाडी, वस्ती, पाडे इत्यादी सर्व ठिकाणची, सर्व स्तरांची सर्व मुले सहभागी होतील, अशी काळजी घेण्यात आली होती.
मुलांच्या मते घरोघरी मुलामुलींत अजून खाणे, खेळणे, बोलणे, वागणे, शिक्षण यात भेदभाव केला जातो. मुलींचे शिक्षण मुलांच्या शिक्षणाआधी थांबविले जाते. मुलांना शाळा आपल्या गावा-घराजवळ असाव्यात असे वाटते. मुलांना शाळेसाठी अजून पायपीट करावी लागते. वाडी-वस्तीवरील शाळांत शिक्षक व साधने नसतात. सर्व सुविधा शहरातच होतात, असे खेड्यातील मुलांचे म्हणणे आहे.
स्त्रीभ्रूण हत्या, स्त्रियांवरील लैंगिक अत्याचारांबद्दल मुलांत मोठी जागृती आढळून आली. हेही लक्षात आले की, मुले अकाली प्रौढ होत आहेत. माध्यमांची आक्रमकता, विधिनिषेध मुक्त प्रसारण, टी. आर. पी.च्या मोहाने सोशल ब्रेन वॉश (ब्रेन स्टॉर्मिंग नव्हे !) या गोष्टी चिंतेचा
विषय म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांपुढे आल्या आहेत. मुले, मुली अल्पवयात लैंगिक साक्षर झाल्याचे लक्षात आले. अल्पवयीन मुली लैंगिक छळास बळी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. बाल्यावस्थेतील मुले आता लैंगिक चाळे करण्यास उद्युक्त होत आहेत. पूर्वी हे पौगंडावस्थेत (कुमार, किशोर गटात) व्हायचे. मुले-मुली बालवयातच स्त्री-पुरुष भेद जाणू लागली आहेत. मुलींना घर, गल्ली, गाव, शाळा कुठेच सुरक्षित वाटत नाही. लैंगिक अत्याचार व्यक्त करण्यात मुलींना संकोच, लज्जा वाटण्यापलिकडे लैंगिक अत्याचार सार्वत्रिक व सर्वत्र होत आहेत, ही गंभीर गोष्ट म्हणून पुढे आली आहे. लैंगिक छळास कठोर शिक्षा असली पाहिजे असे मुलींना वाटते; पण त्यापेक्षा शिक्षणात लैंगिक शिक्षणाचा अंतर्भाव करणे, परलिंगी व्यक्तीविषयीची भावसाक्षरता व जाणीवजागृती, भेदातीत समाजनिर्मिती हे कळीचे मुद्दे नव्या पिढीसाठी बनत असल्याचेही प्रकर्षाने पुढे आले आहे. मुलांना छेडछाडमुक्त गाव हवे आहे.
गरीब स्तरातील मुला-मुलींना कष्टाची कामे करावी लागतात. त्यांचे शिक्षण आर्थिक वंचिततेमुळे होत नाही. दोन वेळचे भोजन, कपडे, दप्तर न मिळणारा मोठा वर्ग महानगरात आहे नि डोंगरकपारीत, वाडी-वस्ती व जंगलात, आदिवासी पाड्यांवरही आहे. बालमजुरीची समस्या सार्वत्रिक असून तिचे चेहरे, पैलू वैविध्यपूर्ण आहेत. ऊसतोडणी, सेंटरिंग, वीटभट्टी, विकासकामे, उद्योग, सर्वत्र बालकामगारांचा प्रश्न असून मुले म्हणतात की, काम बंद करून आम्हांला जगता येत नाही. काम करीत शिकलो तरच आम्ही सावरू, सुधारू शकू; हे वास्तव अधिक भयानक आहे. येथून पुढच्या काळात जाती, धर्मापेक्षा दारिद्य, वंचिततेच्या निकषांवरच आपणास आरक्षण, संधी, सुविधांचा, सामाजिक न्यायाचा डोलारा उभा करावा लागेल, असे मुलांच्या संवादातून स्पष्ट होते.
व्यसनाधीनतेचे बळी म्हणून आपण जगत असल्याची मुला-मुलींची भावना पालक, शिक्षकांना अंतर्मुख करण्यास भाग पाडते. पालक शिक्षक आपणास तंबाखू, बिडी, सिगारेट, गुटखा, दारू सारखे अमली व व्यसनी पदार्थ आणायला लावतात, असे मुले सहज सांगतात. घरोघरी व्यसनाधीन पालकांची संख्या वाढते आहे, हे मुलांच्या संवादातून पुढे आलेले सत्य म्हणजे आपल्या समाजवास्तवावरचे मुलांचे जळजळीत भाष्य होय. पालकांपेक्षा शिक्षकांबद्दल मुले-मुली तक्रारीचा स्वर उच्चस्वरात आळवतात, हे कार्यकत्र्यांचे निरीक्षण विचारास भाग पाडते. शाळेच्या परिसरात गोळ्या, बिस्किटांच्या बरोबरीने शिक्षकांसाठी गुटखाही ठेवला, विकला जातो हे
मुले बिनधास्तपणे सांगत होती. त्यामुळे शिक्षक-पालकांच्या आचारसंहितेचा प्रश्न ऐरणीवर असून शिक्षक-विद्यार्थी, पालक-पाल्य संदर्भ धोक्याची घंटा वाजवीत आहेत.
मुला-मुलींची गंभीर तक्रार आहे की, घरी, शाळेत व समाजात सर्वत्र आम्हास गृहीत धरले जाते. आमचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. आमच्यावर अनेक गोष्टी शिक्षक-पालक लादतात. आमच्या स्वातंत्र्यावर आक्रमण होते. आम्हाला खेळू दिले जात नाही. घराबाहेर खेळणे म्हणजे बिघडणे असे पालकांना वाटते. आम्हाला टी. व्ही. बघू देत नाहीत. स्वतः मात्र तासन्तास टी. व्ही. बघतात. कपडे, खेळणी, खाणे, फिरणे सर्व आईबाबांच्या पसंतीने व सवडी-सोईने करावे लागते. त्यांना फक्त अभ्यास करणारी मुले हवी आहेत. हसणारी, खेळणारी मुले त्यांना आवडत नाहीत. ‘हाताची घडी, तोंडावर बोट' अशी मुले त्यांना आज्ञाधारक वाटतात. टॅब, मोबाईलवर गेम खेळू देत नाहीत. स्वतः मात्र हवे ते करतात. या नि अशा असंख्य तक्रारींतून मुले पालकांना आरोपीच्या पिंज-यात उभी करताना आढळली. शहरी पालक यात आघाडीवर आढळले. खेड्यांचे वाढते शहरीकरण हा मुद्दाही यातून प्रकर्षाने पुढे आला आहे. सामाजिक प्रश्नांसंदर्भात महानगर, नगर, तालुका यांतील अंतर संपले आहे. जे मुंबईत तेच मुळामुठाच्या किनारी, मांड नद्यांच्या गावी असे चित्र पुढे आले आहे.
मुला-मुलीत लिंगभेदांवर आधारित छेडछाड, शारीरिक व्यंगांवर आधारित चिडवाचिडवी, मोठ्या मुला-मुलींद्वारा लहानांचे वेगवेगळे शोषण (काम करून घेणे, होमवर्क करायला लावणे, दमदाटी, मार, शिव्या, लैंगिक छळ इ.) याबाबत दुर्बल व लहान मुले-मुली बळीच्या बक-याचे जीवन जगत असल्याचे लक्षात आले. शाळेत याबाबत तक्रारी करूनही शिक्षक, मुख्याध्यापक लक्ष देत नाहीत. शाळेत सुविधांचा अभाव संवादातून सर्वत्र दिसून आला. पिण्याचे पाणी, संडास-मुतारी स्वच्छता, वर्गसफाई, परिसर स्वच्छता इत्यादींबाबत मुलांची नाराजी टोकाची असल्याचे संवादातून स्पष्ट झाले. शिक्षक, पालकांच्या धाकात मूक असलेली मुले-मुली बोलण्यास आसुसलेली, व्यक्त होण्यास अधीर असलेली आढळली. यातून वर्तमान बाल्य हे दबावाखाली वाढत असल्याने त्याची सर्वांगीण वाढ खुटते आहे. आपण खुजी, कुबड आलेली, छाती आत-आत जाणारी पिढी वाढवत आहोत हे लक्षात आलेले शल्य अधिक वेदनामय व विदारक असून आपण यात अविलंब हस्तक्षेप केला पाहिजे, याची झालेली जाणीव आपणास लवकर सक्रिय करण्यास भाग पाडते.
या सर्व प्रक्रिया उपक्रम, संवाद, सहभागातून बालक दिनाच्या निमित्ताने शासन, समाज, पालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी ‘बालकविषयक आचार संहिता' सुचवावीशी वाटते, ती अशी -
१. मुलांना जन्म देण्यापूर्वी दहा वेळा विचार करा.
२. मुलांना जन्म द्यायचा ठरल्यावर त्यांच्या भविष्याचे नियोजन करून त्यांना जन्म द्या.
३. मुलांची काळजी जन्मापूर्वीही ती गर्भात असतानाही घ्या.
४. गरोदर मातेच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्याची काळजी घ्या.
५. बाळंतपूर्व चिकित्सा, उपचार, आहार, पोषण महत्त्वाचे माना.
६. जन्मजात बालकांच्या औषधोपचार, लसीकरण, स्तनपानाची काळजी घ्या .
७. मुलांच्या वाढीबरोबर त्यांचे सामाजीकरण होईल असे पहा.
८. वाढत्या वयात मुलांचे ऐका, त्यांना बोलू नका.
९. मुलांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका. त्यांना विचारण्यास प्रोत्साहन द्या. त्यांच्या प्रश्नांना बगल देणारी उत्तरे देऊ नका. उत्तरे वस्तुनिष्ठ, व्यवहारी, वैज्ञानिक द्या.
१०. वाढत्या वयात मुलांमध्ये जात, धर्म, लिंग, भाषा, प्रांत, भेद रुजवू नका. त्यांना व्यापक, उदार, सहिष्णू, परहितदक्षतेचे संस्कार द्या.
११. देव, दैव, भूत, खेत, प्रेत यापासून मुलांना दूर ठेवून त्यांना श्रम, स्वावलंबन, सदाचार, प्रामाणिकपणा स्वत:च्या आचारणातून शिकवा.
१२. घरात आई-वडील, नातलग, भावंडे यात सुसंवाद, आदर, प्रतिष्ठा इत्यादींची जपणूक म्हणजेच समाजशील देशनिर्मितीचा पाया माना.
१३. स्वातंत्र्य, समता, बंधुता, जाती-धर्म निरपेक्षता, लोकशाही,
विज्ञाननिष्ठा ही जीवनमूल्ये प्रमाण मानून मुलांची घडण करा.
१४. मुला-मुलींच्या आहार, आरोग्य, शिक्षण, संधी, सुविधात भेदभाव करू नका.
१५. मुले-मुली तुमचीच असली तरी लाडाबरोबर जबाबदारीचा पासंग ठेवाल तर मुले तुमची होतील, तुमच्या हाती लागतील व तुमच्या वृद्धापकाळात तुम्हास हात देतील.
◼◼
सध्या आपल्या देशातील १८ वर्षांखालील मुलांची संख्या सुमारे बेचाळीस कोटी आहे. म्हणजे आपल्या लोकसंख्येपैकी ४० टक्के मुले आहेत. त्यापैकी काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांची संख्याही काळजी करण्यासारखी असल्याने त्यांच्या कल्याण, विकास, संगोपन, संरक्षण इत्यादींचा विचार करणारा एक राष्ट्रीय कायदा आहे. 'बाल न्याय कायदा - २000' या नावाने तो ओळखला जातो. त्यात २00६ आणि २०११ मध्ये काही दुरुस्त्या करण्यात आल्या होत्या. मध्यंतरी दिल्लीत बलात्काराची जी दुर्दैवी घटना झाली, त्यात अपराधी ठरलेली काही मुले अल्पवयीन होती. मुलांसंबंधीच्या कायद्याच्या चौकटीत त्यांना जी शिक्षा झाली, ती पुरेशी नसल्याने समाजातील काहींचे म्हणणे असल्याचे त्यातून मुलांचे कायद्यानुसार सज्ञानतेचे वय १८ वरून १६ करावे, अशी मागणी समाजातून होऊ लागली. त्याचा विचार करून केंद्र सरकारने विद्यमान बाल न्याय कायद्याचा पुनर्विचार करून त्याची पुनर्रचना करायचे ठरवले. त्यानुसार तयार करण्यात आलेले ‘बाल न्याय विधेयक २०१४' नुकतेच वाचनात आले. ते पाहता रोगापेक्षा इलाज भयंकर' अशी त्याची स्थिती आहे. या विधेयकाचा संबंध काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या लक्षावधी बालकांच्या भविष्याशी निगडित असल्याने ते घाईघाईने संमत करू नये, असे प्रारंभीच शासनास कळकळीचे आवाहन आहे.
असे आवाहन करण्याची दोन कारणे आहेत. एक असे की, मुलांचे हक्क, कायदे, मानवाधिकार यासंबंधी आंतरराष्ट्रीय असे जे सार्वमत आहे व भारत त्या सार्वमताचा भागीदार देश असल्याने एका घटनेच्या आधारावर कायदा बेतला गेला असे होऊ नये. दुसरे असे की, मूल/बालक म्हणून एक वैधानिक चौकट आहे, तिला धक्का बसू नये. मार्च २०१३मध्ये दिल्ली बलात्काराच्या अनुषंगाने दाखल झालेल्या लोकहित याचिकेचा निकाल
देताना सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने अल्पवयीन मुलांना झालेल्या कायदेशीर शिक्षेत बदल न करण्याची भूमिका घेतली होती, ती स्पष्ट करताना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पी. सथाशिवम, न्यायमूर्ती रंजन गोगोई व न्यायमूर्ती कीर्तिसिंग यांनी कायद्याचे पावित्र्य आणि ‘अपरिहार्यता (लिजिटीमसी आणि इनएव्हिटॅबिलिटी) शब्दांचा केलेला निकालातील वापर पाहता, विद्यमान विधेयक बालकांच्या भवितव्यापुढे प्रश्नचिन्ह उभारणारे ठरत आहे. या संदर्भात आणखी एका गोष्टीची नोंद घेणे आवश्यक ठरते ती अशी की, बालकांच्या सज्ञानतेचे वय १८ वर्षांवरून १६ वर्षे करण्यास ‘राष्ट्रीय बालहक्क आयोगा'चा विरोध आहे. मुलांच्या अपराधीपणाचा विचार करताना त्यांना अपराधी बनविणाच्या सामाजिक स्थिती बदलाची, त्यासंबंधाच्या गांभीर्य व जबाबदारीकडे आपण पूर्ण कानाडोळा करतो, हेही लक्षात घ्यायला हवे.
‘बाल न्याय विधेयक २०१४'मधील रचना, संकल्पना, व्याख्या, अधिकारक्षेत्र, कार्यपद्धतीसंदर्भात अधिक चर्चा, विचार होणे आवश्यकच नाही तर अनिवार्य आहे, हे स्पष्ट केले पाहिजे.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वीच्या कायद्यातील 'बालक' (Juvenile) च्या जागी ‘मूल' (Child) शब्द हेतुपूर्वक वापरला आहे. तीच या कायद्यातील खरी ग्यानबाची मेख आहे. 'बालक' शब्दात कुमार, किशोरवयीन मुलांचा समावेश होतो, तो 'मूल' शब्दात नाही.
ही गंभीर गोष्ट व या विधेयकाचा खरा इरादा स्पष्ट करणारे कलम १४ पाहण्यासारखे आहे. जगात मुलांचे कायदे, संस्था सन १८७६ पासून अस्तित्वात येण्यास प्रारंभ झाला. भारतात मुलांचा कायदा व्हायला पहिले महायुद्ध व्हावे लागले. सन १९२४ चा मुंबई मुलांचा कायदा अमलात यायला १९२७ साल उजाडावे लागले व त्यात सुधारणा व्हायला देश स्वतंत्र व्हावा लागला. या साच्या कायद्यांचा इरादा स्पष्ट करताना मुलांच्या कल्याणापेक्षा मुलांचा समाजाला उपद्रव कसा होणार नाही, हे पाहिले जाई. संमतीवयाचा कायदा करण्याचा आग्रह समाजसुधारकांनी धरला तो सज्ञानतेच्या हक्कापोटी. ‘बाल न्याय विधेयक २०१४'मध्ये गेल्या दीडशे वर्षांची ‘बालक' व्याख्या मोडीत काढून १ ते १६ वर्षांच्या मुलांबद्दल वेगळा विचार आणि १६ ते १८ वर्षांपर्यंतच्या मुलांबद्दल वेगळा विचार होतो
आहे. विधेयकातील कलम १४ म्हणजे मागच्या दाराने बालकांचे वय अप्रत्यक्षरीत्या १६ करण्याचाच घाट आहे. ही तरतूद घटना, इंडियन पीनल
कोड, बालहक्क, मानवाधिकार इत्यादी वैधानिक तरतुदींविरुद्ध व विसंगत आहे.
यापेक्षा गंभीर गोष्ट अशी की, मुलांसंबंधी गुन्हे इत्यादींसंदर्भात बाल न्याय मंडळ (ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्ड) नव्या विधेयकानुसार इंडियन पीनल कोडमधील कलम ३०२ (खून), कलम ३२६ (हत्यारांनी हल्ले करणे), कलम ३७६ (बलात्कार), कलम ३५४ (विनयभंग), कलम ३६३ (अपहरण), कलम ३७२ (अल्पवयनांची विक्री), कलम ३९२ (दरोडा) इत्यादी प्रकरणी चौकशी व शिक्षा देण्यास पात्र होणार आहे. हे कलम वाचताना असे लक्षात येते की, भारतातील १६ ते १८ वयोगटातील मुले बहधा ‘सोमाली' झाली आहेत. अशा तरतुदी कायद्यात करणे म्हणजे भारतीय बाल्य अपराधी ठरविण्यासारखे, जाहीर करण्यासारखे आहे.
आणखी एक गोष्ट अशी की, वरील कलमे सर्वसामान्य न्यायालयात सिद्ध होण्यास जीवघेणी कसरत करावी लागते. इथे एक पात्र न्यायाधीश व अन्य दोन समाजसेवकांचे मंडळ असते. समाजसेवक सदस्यांना इंडियन पीनल कोड, त्यातील तरतुदी, अन्य कायदे यांची माहिती, कलमे, बारकावे, शिक्षा इत्यादींसंबंधी स्थूल ज्ञानही अपवादाने असते. तिथे खून, बलात्कार, अपहरण, दरोडे, हल्ले, विनयभंग यांचे निर्णय व अधिकार देणे म्हणजे छोट्या भीमाला शिवधनुष्य उचलावयाला लावण्यासारखे तर ठरणार नाही ना, याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा.
शिवाय बालन्यायालयात पूर्वीपासून बालकांची निष्पापता जपणे आवश्यक मानून अशा न्यायमंडळांत (ही मंडळे, त्यांचे कार्य, बैठका बालकल्याण संस्थांत चालते.) न्यायमूर्ती, वकील, पोलीस यांना गाउन, गणवेश परिधान न करण्याचे पूर्वापर संकेत नव्या तरतुदींनी लयाला जाण्याचा, बाल्य असुरक्षित होण्याचा धोका संभवतो. मात्र विद्यमान ‘बाल न्याय विधेयक २०१४' भाग दोन हा नव्या कायद्याचे बलस्थान ठरावा असा आहे. यात प्रथमच ‘बालकांच्या काळजी, संरक्षण, पुनर्वसन आणि न्यायाची मूलभूत तत्त्वे' स्वीकारण्यात आली असून ती स्वागतार्ह आहेत. ही तत्त्वे म्हणजे मुलांचा जागतिक हक्कांचा जाहीरनामा, जागतिक, मानवाधिकार यांची मान्यता असून या कायद्याने अस्तित्वात येणा-या यंत्रणा व प्रक्रियेत ही तत्त्वे मार्गदर्शक ठरणार आहेत. त्यानुसार बालकांची निष्पापता, प्रतिष्ठा, सहभाग, कौटुंबिक जबाबदारी, संरक्षण, सकारात्मक दृष्टी, कलंकरहित जीवन, हक्कशाश्वती (उल्लंघनबंदी) विषमता विरोध, खासगीपणाची जपणूक, संस्थात्मक संगोपनाची अंतिम पर्यायता, पुनर्वसन अधिकार, नवे
जीवन सुरू करण्याची हमी, समुपदेशन, नैसर्गिक न्याय इत्यादींची हमी आणि शाश्वती भारतातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या, विधीसंघर्षित बालकांना मिळणार आहे.
नवा कायदा बालकल्याण संस्थांतील अपु-या सुविधा, संगोपनाची गुणवत्ता, पुनर्वसन इत्यादींसंदर्भात महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा आहे. तशा तरतूदी विधेयकात आहेत.
कायद्यातील प्रक्रियांना लागणारा कालावधी पूर्वीच्या कायद्यात तीन ते सहा महिने होता, तो महिन्यावर आणून प्रक्रिया व यंत्रणा गतिमान करण्याचा उद्देश स्तुत्य आहे; पण महाराष्ट्रासह अन्य राज्यांत देशभर बालकल्याण संस्थांतील अल्प मनुष्यबळ, किमान सुविधा, अत्यल्प आर्थिक तरतूद, इत्यादी वास्तवाच्या पाश्र्वभूमीवर कायद्याचा हेतू कितपत साध्य होईल याबाबत साशंकता आहे. जगभर कायद्यातच आर्थिक तरतुदीचे आश्वासन, यंत्रणा आराखडा, मनुष्यबळ तरतूद, किमान वा अपेक्षित दर्जा, योजना इत्यादींची सोय असते. नव्या सरकारने त्याची सुरुवात मुलांसाठीच्या कायद्यापासून करावी व 'अच्छे दिन, अच्छे बच्चे, अच्छे भविष्य'ची घोषणा करावी.
नव्या कायद्यात दत्तक प्रक्रिया गतिमान करण्याचा हेतू असून त्यानुसार काही बदल सुचविण्यात आले आहेत. अनधिकृत दत्तक देण्यास बंदी, दत्तक माध्यमातून देणग्या, निधी कमावण्यास बंदी अशा काही तरतुदींमुळे दत्तकत्वाच्या व्यापारीकरणास चाप बसेल, केंद्रीय नियंत्रक संस्थेस (कारा) अनुदान देण्याचा विचार स्वागतार्ह आहे.
अनाथ मुलांची व्याख्या व्यापक करणे, अनाथ मुलांचा पुनर्वसन कार्यक्रम (आफ्टर केअर) समर्थ करणे यासंबंधीचे कायद्यातील कलम, तरतूद मोघम असून ती नीट, स्वयंस्पष्ट होऊन या मुला-मुलींचे भविष्य उज्ज्वल करण्याचे ठोस उपाय हे विधेयक सुचवित नाही, ही या विधेयकातील मूलभूत स्वरूपाची त्रुटी म्हणून नोंदविणे आवश्यक आहे. या मुलांसाठी या कायद्यात शिक्षणहक्क, शिक्षकप्रवेशात प्राधान्य व आरक्षण, नोकरीत आरक्षण, पुनर्वसनार्थ विवाह, अनुदान, गृहनिर्माण सुविधा, बीज भांडवल तरतूद (उद्योग/व्यवसायार्थ) असणे अनिवार्य आहे.
नव्या ‘बाल न्याय विधेयक २०१४'चे महाराष्ट्रावर होणारे परिणाम पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सध्या महाराष्ट्रात ‘बाल न्याय अधिनियम २000' त्यातील २००६ आणि २०११ च्या दुरुस्त्यांसह अस्तित्वात
आहे. याच्या अंमलबजावणीची जबाबदारी महिला व बालकल्याण मंत्रालय, महिला व बाल आयुक्तालयावर आहे. राज्यातील बालकल्याण संस्था या बालसुधारगृहे, बालगृहे, विशेष गृहे, अनुरक्षण गृहे या रूपांत कार्य करतात. त्यांचे कार्य कसे चालते, त्यांची स्थिती कशी आहे याबाबत यापूर्वी लिहिले होते. त्यात कोणताही बदल नाही. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील असे म्हणाले होते की, “ राज्यातील बालसुधारगृहांची अवस्था अतिशय भयावह असून मुलांची रवानगी या बालसुधारगृहांत करण्यापेक्षा ती मुले गुन्हेगारांच्या तावडीत असलेली परवडली." ते अक्षरश: खरे आहे. महिला व बाल आयुक्तालय, आयुक्त, विभागीय अधिकारी, परिवीक्षा अधिकारी, संस्थांना मी सन १९८० पासून पाहता आलो आहे, कार्य करीत आहे. गेल्या वर्षी आपल्या राज्याने बालधोरण २०१३' मंजूर केले; पण सुधारणा शून्य. या संस्थांतून शिकून स्वावलंबी झालेली माझ्यासारखी मुले-मुली राज्यातील या संस्थांची स्थिती बदलावी म्हणून जिवाचे रान करतात; पण शासकीय यंत्रणेस त्याच्या काही देणे-घेणे नाही. ती देण्याघेण्यातच गुंतून आहे. या संस्थांतील सुमारे एक लक्ष मुले-मुली सरासरीखालचे जीवन जगत आहेत. संस्थांतील अनाथ मुला-मुलींना ‘अनाथ प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेऊन दोन वर्षे उलटली. महिला व बाल आयुक्तालये एकाही मुलाला अद्याप प्रमाणपत्र देऊ शकली नाहीत. पुनर्वसनक्षम मुलांची सांख्यिकी माहिती गेले वर्षभर शासन जमा करीत ‘सरकारी काम, किमान दोन वर्षे थांब' हे आपले अघोषित ब्रीद सार्थ करीत आहे. याचे कारण कोटा भरण्यासाठी मंत्री नेमणे, आयुक्तपदी नेमणूक म्हणजे साइड पोस्टिंगची सनदी अधिका-यांची मानसिकता यांमुळे यंत्रणा निर्जीव. मग अनाथ मुलांचे भविष्य सोनेरी व उज्ज्वल कसे होणार ? महाराष्ट्र शासनाने काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांसाठी कर्मवीर योजना, सुकन्या योजना, एकलव्य... अशा योजनांमागून योजनांची घोषणा केली. प्रत्यक्ष लाभार्थ्यांना लाभ मिळाला का हे पाहण्याची तसदी न घेणारा महिला व बाल विकास विभाग म्हणजे सलाईनवर असलेला सामाजिक न्याय होय. तो जिवंतही नाही, मरतही नाही...
┅
संयुक्त राष्ट्रसंघ (युनो) तर्फे दरवर्षी एक विषय केंद्रित करून ‘आंतरराष्ट्रीय वर्ष साजरे केले जात असते. सन १९७५ हे वर्ष त्या वेळी ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्ष' म्हणून साजरे केले होते. तेव्हापासून ८ मार्च' हा प्रतिवर्षी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन' म्हणून साजरा केला जातो. महिला संघटना याबाबत पुढाकार घेऊन सक्रिय होत असतात. समाज व प्रसारमाध्यमे त्यास महत्त्व व समर्थन देत आली आहेत कारण महिलांवरील अत्याचार; अद्याप थांबलेले नाहीत. महिलांबाबत पुरुषी मानसिक असमानता संपलेली नाही. अगदी आपल्या गेल्या लोकसभेचं हिवाळी अधिवेशन (फेब्रुवारी, २०१४) संपलं तरी त्यात महिला आरक्षण विधेयक संमत होऊ शकलेलं नाही. या संदर्भात १५ फेब्रुवारी, २०१४ रोजी युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलेलं स्पष्टीकरण महत्त्वाचं आहे. त्या वेळी त्या म्हणाल्या, “सर्वपक्षीय सहमती न झाल्यानं हे विधेयक संमत होऊ शकलेलं नाही. स्त्रीप्रश्नविषयक समाजातील सर्व थरांतील संमती, एकवाक्यता हेच विश्व समुदायापुढचं खरं आव्हान आहे.
संयुक्त राष्ट्रसंघ आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे एक घोषवाक्य (Slogan) दरवर्षी प्रसिद्ध करीत असतो. त्या त्या वेळी स्त्रीविषयक कोणत्या प्रश्नावर भर द्यावा हे त्यातून सुचवलं जातं. यापूर्वी ‘भूतकालीन पार्श्वभूमीवर स्त्रियांचं भविष्य नियोजन' (१९९६), ‘मानवाधिकार व स्त्री' (१९९८), ‘स्त्रियांवरील अत्याचार' (१९९९), 'शांतीसाठी स्त्री-संघटन' (२०00), ‘स्त्रीविषयक लिंग समभाव' (२००३), ‘निर्णयप्रक्रियेत स्त्रीसहभाग (२००६), ‘मुली व महिलांत गुंतवणूक' (२००८), ‘सर्वांची प्रगती (२०१०) या घोषवाक्यांच्या पार्श्वभूमीवर या वर्षी (२०१४) चं जे घोषवाक्य जाहीर झालं आहे, ते म्हणजे प्रेरकबदल' (Inspiring Change). असे बदल समाजामध्ये घडावेत, जेणेकरून स्त्रियांत परिवर्तन घडून येईल.
ते प्रेरक बदल समाजात घडणे जसे आवश्यक आहेत तसेच ते पुरुष आणि स्त्रियांतही आपापल्या पातळीवर घडणे गरजेचे आहे. गेल्या शतकात साजऱ्या केलेल्या आंतरराष्ट्रीय महिला वर्षांतील उपक्रमात पुरुषी मानसिकतेवर आघात केले जात. स्त्रीस्वातंत्र्याबाबत कधी-कधी टोकाची भूमिका घेतली जायची (जग नुसतं स्त्रियांचं हवं असा त्याचा आशय असायचा.) पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यावर आज आपण स्त्री-पुरुष समानतेकडून स्त्रीस 'माणूस' समजण्यापर्यंत, तिला तसं वागवणं, तिची तशी घडण व्हावी या विचारापर्यंत येऊन पोहोचलो आहोत.
हे घडणं कसं शक्य आहे याचा मी जेव्हा विचार करू लागतो तेव्हा माझ्या मनात छोटे-छोटे प्रेरक बदल करण्याच्या शक्यता डोकावू लागतात. आपणाला शहाजहानसारखा भव्य ताजमहाल नाही बनवता येणार; पण आपल्या कल्पना, क्षमतेचा छोटा ताजमहाल (मनातील मुमताजसाठी...) बनवणं शक्य आहे. नुकतेच निधन झालेल्या हिंदी कथाकार, संपादक डॉ. राजेंद्र यादव यांची एक सुंदर कथा आहे. 'छोटे छोटे ताजमहल'. टीकात्मक कथा ती. आपणास अंतर्मुख करते. तसंच अलिकडे काही अपंग स्त्रिया ताजमहाल पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना तिथल्या सुरक्षारक्षकांनी अटकाव केला होता. मी स्वत: ताजमहाल पाहण्यासाठी गेलो होतो. तेव्हा एक अंध स्त्री स्पर्शानं ताजमहाल पाहत, अनुभवत होती. तिलाही रक्षकांनी हटकलं होतं, असं आज इतक्या वर्षांनंतरही (१९७३) ... चाळीस वर्षांनंतरही आठवतं याचं कारण स्त्रियांचं आपल्या समाज मनीमानसी असलेलं एक अदृश्य अस्पृश्यत्वच !
साधा घरात होणारा मुलीचा जन्म काय अवकळा पसरवून जातो... स्त्रीसही स्त्रीजन्माचं दु:ख, स्त्री-भ्रूणहत्येस स्त्रीची संमती 'Charity begins at home' न्यायानं स्त्रीमनानं आपलं दुय्यमत्व झुगारायला हवं. हा प्रेरक बदल स्त्रीत होईल तर जगाचा चेहरा बदलायला मूलभूत स्वरूपाचं साहाय्य होईल. मुलगा/मुलगी वाढीतला घरातला भेदभाव, पक्षपातीपणा नाही का आपणास कमी करता येणार? घरातल्या कामांचं स्त्री-पुरुषी विभाजन विषमता व अत्याचार म्हणून जोवर आपण पाहणार तोवर प्रेरक बदल कसे होणार? पूर्वी स्त्री उंब-याच्या आत होती, अशिक्षित होती, मिळवती नसायची तोवर घरातलं स्त्रीनं करणं आणि बाहेरचं पुरुषांनी करणं असं विभाजन एकवेळ न्यायसंगत मानू (स्त्रीला तसं ठेवणं हा मुळात अन्यायच!) पण स्त्री शिक्षित, मिळवती झाली तरी घरकामातून, रांधा, वाढा, उष्टी
काढा यातून जर तिची सुटका होणार नसेल तर शिक्षणाने आपण काय शिकलो? बायकांची पंगत मागची, उरलेलं स्त्रीनं खाणं (खरं तर उरलं तर खाणं!) कितपत समानतेचं? स्त्री मिळवू लागली तरी तिला खर्चाचा अधिकार नसणं, स्त्री निवडून आली तर सरपंच, सभापती, नगराध्यक्ष, आमदार अगदी खासदार झालेल्या स्त्रीचा पती पण तिची पाठराखण करीत राज्यकारभार करीत असेल तर याला का स्त्री सबलीकरण म्हणायचं ? हिंदीत मैत्रेयी पुष्पांची ‘फैसला' कथा आहे. त्यावर ‘बसुमती की चिट्ठी' ही टेलीफिल्म बनलीय ... त्यातली नायिका वसुमतीच्या एका मतामुळे तिचा नवरा हरतो दाखवून कथा लेखिकेनं स्त्री मानसिकतेतला अपेक्षित प्रेरक बदल नेमकेपणानं चित्रित केला आहे.
स्त्रियांबद्दल आपल्या समाज मनात किती दुजाभाव असतो याचं विषण्ण करणारं एक आंदोलन माझ्या वाचनात आलं आहे. आंदोलनाचं नावच आहे मुळी 'Right to pee'. लघवी करायच्या हक्काचं आंदोलन. भारतातील सर्व गावा-शहरांतून फेरफटका मारा; तुम्हाला पुरुष मुताच्या दिसतील. पुरुषांप्रमाणेच स्त्रीलापण लघवीस लागते, लघवी करावी लागते हे पुरुषप्रधान शहर नियोजनात आपल्या लक्षातच येत नाही, आलेलं नाही. पुरुषाला लघवीला अर्धा आडोसा पुरा होतो. स्त्रीस पूर्ण आडोसा लागतो. रेल्वे स्टेशन, बस स्टॅडवर असलेली सुलभ शौचालयेच काय तो स्त्रियांचा सार्वजनिक आधार. तिथली स्वच्छता म्हणाल तर उलटी, ओकारी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मुंबईतल्या महिला मंडळ फेडरेशन, कोरो, एकल महिला आंदोलन, युवा, स्त्रीमुक्ती संघटना, लर्न महिला संघटना, निर्मिती फाउंडेशन, आवाज-ए-निस्वाँ, प्रथम, अपनालय, राजर्षी शाहू कला अकादमी, विश्वास सांस्कृतिक कला मंच, प्रागतिक विद्यार्थी संघ, शहर विकास मंच, महाराष्ट्र महिला व्यासपीठ, डॉन बॉस्को, स्नेहा, आशांकुर, लोकसेवा संघ, सी. एस्. एस्. सी. महिला संघटना मुंबईत एकत्र आल्या आणि त्यांनी आपल्याला लघवीचा हक्क मिळावा म्हणजे सार्वजनिक मुतारी, शौचालयाची सोय असावी म्हणून मागणी केली. सन २००५ ला त्यांनी मुंबई महापालिकेकडे मागणी केली की स्त्री-मुतारी, संडासांची माहिती द्या. महापालिकेच्या लक्षात आलं की, अशी माहितीच आपल्याकडे नाही. मग माहिती गोळा करण्यात वर्षेच्या वर्षे उलटली. माहिती मिळाली ती भयावह होती. ‘जनस्वास्थ्य' नावाची संकल्पना गावी नसल्याचा पुरावा!
मुंबई महिला लोकसंख्या (सन २०११ जनगणना) ५७,४२,६३२ | ||
---|---|---|
शौचालये (Latrines) | पुरुषांची स्त्रियांची | ६५६८ ३८१३ |
मुताऱ्या (Urinals | पुरुषांची स्त्रियांच्या | २८४९ एकही नाही |
(* संदर्भ-प्रेरक ललकारी (स्त्रीमुक्ती संघटना मुखपत्र) ऑक्टोबर २०१३, पृ. १६.) |
मान्य संकेतांनुसार मुंबईत २७०० महिला शौचालय/मुता-यांची गरज आहे. एका सुविधा केंद्रास तीन लाख खर्च अपेक्षित आहे. ८१ कोटी रुपये हवेत. महापालिका ‘सुनियोजित जागा उपलब्ध झाल्यावर नियोजन करणार आहे', हे माहिती अधिकारातून महिलांच्या हाती आलेलं सत्य. म्हणजे पुरुषी बेमूर्वतपणाचा मुर्दाड नमुनाच! स्त्रियांत कसे प्रेरक बदल होणार?
स्त्रीस आपण लघवीचा अधिकार दिला नाही तसा तिला तिचं खासगी आयुष्य जगण्याचाही अधिकार दिला नाही. आपलं आख्खं घर आई, पत्नी, बहिणीनं व्यापलेलं असतं. त्या घरात तिचा कोपरा, खोली कोणती? स्त्रीला तिची म्हणून घरात जागा असते का? पंजाबी कवयित्री अमृता प्रीतम यांनी म्हटलं होतं, ‘आख्खं घर स्त्रीचं असतं... माजघर, शयनघर, स्वयंपाकघर ... नसतं स्त्रीघर.' म्हणून त्यांनी घर कल्पनेत ‘चौथा कमरा जोडला होता. स्त्रीची स्वत:साठीची स्वतंत्र खोली, कोना, कोपरा. मी घरोघरी पाहतो मुलं, मुली मोठी होतात. त्यांच्या हातात बाईक येते नि कानाला मोबाईल लागतो. मुलाचा मोबाईल पोस्टपेड. मुलीचा प्री-पेड. मुलाच्या मोबाईल्सवरील मिसकॉलकडे दुर्लक्ष. मुलीला मात्र मिसकॉल येता कामा नये. मिस कॉल आला की घर पंचायत बसलीच समजा. बायकोनं नव-याच्या मोबाईलला हातपण लावायचा नाही. नवरा मात्र बायकोचे इनकमिंग, आउटगोईंग, एस.एम.एस. सगळे चेक करीत राहणार. रेकॉर्डिंग करणार. ऐकणार. तिनं मिळवून आणायचं ... घरची, नव-याची भर करायची; पण तिला खर्चाचं स्वातंत्र्य नाही. अशी संशयी वृत्ती आपल्या मनातून जात नाही तोवर स्त्रीला खासगीपणाचा हक्क कसा मिळणार? ती शरीरानं घरची, पण मनानं बाहेरची. याला काय घर म्हणायचं? मुलानं प्रेम केलं तर पुरुषार्थ, मुलीनं प्रेम केलं तर जगबुडी! हा कोणता न्याय?
संशयावरून अलीकडेच वाचलेलं एक पुस्तक आठवलं. वारीस डीरी या सोमालियन मुस्लीम स्त्रीचं आत्मकथन ‘डेझर्ट फ्लॉवर'. निवडुंगाचं फूल. ती अवघ्या पाच वर्षांची असताना तिची सुंती केली होती. मी आजवर अशा समजुतीत होतो की, ती केवळ पुरुषाची असते; पण स्त्री सुंता हा सर्वांत जघन्य पुरुषी अत्याचार होय. सोमालिया, सुदान, इथियोपिया, इजिप्त, माली, जुबटी इ. देशातील ८० टक्के स्त्रियांची सुंता केली जाते. त्याशिवाय ती स्त्री पवित्र (हलाल) मानली जात नाही. सुंता म्हणजे स्त्रीच्या योनीचा उंचवटा छाटून योनिमुख शिवणे. केवळ लघवी वा मासिक स्राव जाण्यासाठी छिद्र ठेवणे. या अत्याचाराने पीडित वारीस डीरी स्वकर्तृत्वाने जगप्रसिद्ध मॉडेल बनते... आयुष्याच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यावर आपल्या अंतरंगाचं शल्य उघडं करते... लढा देते... अॅम्नेस्टी इंटरनॅशनल, युनोसारख्या आंतरराष्ट्रीय संघटना तिच्या पाठीशी उभारतात. ती युनो। अॅम्बॅसडर बनते... स्त्रीमुक्तीचे रणशिंग फुकते... धर्म, जातीच्या परंपरातून स्त्रीमुक्ती म्हणजे स्त्रीचे स्वातंत्र्य, तिच्या अंतर्मनाचा, खासगी आयुष्याचा अधिकार म्हणजे जगणं ना ?
भारतात अजून स्त्रियाच घसरतात. पुरुष असतात सहीसलामत. ही परंपरा दुष्यंत-शकुंतला, कुंती-सूर्य, विश्वामित्र-मेनका इतकी जुनी-पुराणी. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांना काही दिवसांपूर्वीच दहा लाखांचा दंड ठोठावला. का तर ते आपल्यापासून झालेल्या मुलाच्या । वैधतेसंबंधी खटल्यात हजर राहत नाहीत. डी. एन. ए. टेस्टचा शोध लागून दशक उलटून गेलं; पण आपणाकडे एकाही विश्वामित्राला अपराधी घोषित करण्यात आलेलं नाही, याला काय समान न्याय म्हणायचा? कुमारी मातेनंच, अनौरस अपत्यानंच वनवास का सोसायचा असा प्रश्न समाजाला का अस्वस्थ करीत नाही ?
'स्त्रीचा सर्वठायी समान सन्मान' अशी सामाजिक स्थिती निर्माण करणं भारतीय समाजापुढचं खरं आव्हान आहे. ते वरवरची मलमपट्टी महिला आरक्षण, महिला राज, महिला सबलीकरण, महिला बचत गट अशा सवंग योजना वा घोषणांनी ना स्त्रीस्वतंत्र, स्वप्रज्ञ, स्वावलंबी होणार; ना मुक्त. स्त्रीस्वातंत्र्य हे कोणी देऊन येणार नाही. ते स्त्रीस स्वत:च मिळवावं लागेल. विकासात बाह्य प्रेरणा, प्रबोधने ही उत्प्रेरकासारखी उत्तेजक असतात. खरा विकास व्हायचा तर अंतर्भान महत्त्वाचं. ते शिक्षणापेक्षा शहाणपणातून यावं लागतं. शहाणपण ही स्वानुभवाची निर्मिती असते. ती स्वसंवादातून येते. तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारायचा. वाट शोधायची. स्वविवेकाच्या
आधारावर निर्णय घ्यायचा. अंतःस्फूर्त ते नैतिक असतं. अंत:प्रेरणेत विकास ऊर्जा अधिक; म्हणून मनाचा पिंगा महत्त्वाचा.
स्त्रीस प्रेरक बदलाचं पर्यावरण द्यायचं तर पालकांनी मालक व्हायचं थांबवायला हवं. नवरा मित्र होईल तो सुदिन ! स्त्री अगोदर 'माणूस' असते. नाती नंतर येतात. आपण तिला वेगवेगळ्या चक्रात गुंतवून... जात, धर्म, भावना, बंधन, नाती, कर्तव्य यांत अडकवून तिला ‘हक्कवंचित' करत असतो, हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हाच तिच्यात प्रेरक बदलांचा न संपणारा प्रवास, प्रवाह सुरू होईल. त्यासाठी गरज आहे स्त्रीविषयक पारंपरिक संकल्पना पुसून तिच्याठायी ममत्वपूर्ण जीवन, पाशमुक्त जगणं काय असतं हे रुजवणं आवश्यक. या तर प्रथम आपण बदलू, मग ती आपण होऊनच बदलेल. प्रेरक बदल म्हणजे अंत:स्फूर्त प्रेरणांनी झालेला कायाकल्प ! तो स्त्रीस स्वतः करू द्या. तुम्ही बना मूक निरीक्षक !
┅
काही वर्षांपूर्वी एका नियतकालिकाने एक चित्रमाला प्रकाशित केली होती. तिचं शीर्षक होतं - 'Ugly Indians' चित्रांतून दाखवलं होतं की भारतीय लघवी कशी करतात? (कुठेही, कशीही, आडोसा पुरे अन् कधी कधी तरी आडोशाशिवायही बिनदिक्कपणे!) कचरा कसा टाकतात? थुकतात कसे? सार्वजनिक ठिकाणी ओळीची शिस्त कसे पाळत नाहीत? वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर कसे बसतात? नद्यांचे प्रदूषण कसं झालंय? (नद्यांत प्रेतं तरंगतात), रस्ते सर्रास खाचखळग्यांनी कसे भरलेले असतात, सार्वजनिक प्रसाधनगृहे अस्वच्छ व दुर्गंधीने कशी भरलेली असतात... ही सारी दृश्यं शिसारी आणणारी होती. खरं तर तो आपल्या सार्वजनिक चारित्र्याचा आरसाच होता.
मी अनेकदा, अनेक देशांना सामाजिक कामाच्या निमित्ताने जाऊन आलो. परतीच्या क्षणी, भारतात पाय ठेवल्यावर एक जाणीव प्रकर्षाने होते की, आपण गर्दीत राहतो नि घाणीत. विदेशात गेले की भारतीय शिस्त, स्वच्छता, ओळ, नियम सारं पाळतात. भारतात आले की 'येरे माझ्या मागल्या...' आपलं असं का होतं? विचार करताना लक्षात येतं की, खोट आपल्या माणूस घडणीत आहे. आपण माणूस ‘शिक्षित करतो, ‘नागरिक नाही बनवत. नागरिक म्हणजे जबाबदार नागरिक !
जबाबदार नागरिक घडवणं काय असतं त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो. सन १९९० मध्ये मी फ्रान्सला गेलो होतो. एका मतिमंद मुलांच्या शाळेस मी भेट दिली होती. भेट अचानक दिली होती. तसा तिथे अचानक भेट देण्याचा प्रघात नाही. मी गेलो तेव्हा बाई वर्ग तयार करीत होत्या. म्हणजे कागद, कपटे सर्वत्र टाकत होत्या. मी न राहवून त्यांना विचारलं की, “तुम्ही काय करत आहात?' त्या उत्तरल्या की, 'मी शिकवण्यासाठी वर्ग तयार करत आहे. मला काहीच कळलं नाही. मी परत विचारलं की, “काय
शिकवणार आहात?' त्या म्हणाल्या, ‘स्वच्छता.' मी चकितच झालो. त्यांना स्वच्छता शिकविण्यासाठी वर्ग घाण करायला लागला. आपणाकडे तो मुळात घाणच असतो (बहुधा). खरी गंमत पुढे आहे. आमची ही प्रश्नोत्तरे चालली होती, तेवढ्यात दुस-या शिक्षिका वर्गात मुलं घेऊन आल्या. बाईंनी मुलांना प्रत्येकी एक-एक चॉकलेट खायला दिलं. खायला सांगितलं. मुलांनी मिटक्या मारत खाल्लं. बाईंनी चॉकलेट संपल्यावर विचारलं, 'चॉकलेट संपलं, उरलं काय?' मुलांनी उत्तर दिलं, 'वेष्टण (रॉपर), ‘त्याचं काय करणार? मुलं एकमेकांकडे, बाईंकडे हलत, डुलत, लाजत बघत होती. बाईंनी समजावलं. राहिलं ते टाकाऊ, ते टाकायचं कचरा कुंडीत. सर्वांना वेष्टनं कचरा कुंडीत टाकायला लावली. मग वर्गातील इतर घाण गोळा करून ती कचरा कुंडीत टाकायला लावली. पुढे त्यांनी मुलांना जे सांगितलं ते मला महत्त्वाचं वाटलं. त्या सांगत होत्या, ‘कचरा करून मग तो गोळा करून स्वच्छता करण्यात काहीच शहाणपण नाही. कचरा न करणं म्हणजे स्वच्छता.' ही व्याख्या, ही शिकवण मी तिथे पहिल्यांदा ऐकली, पाहिली आणि मग मला युरोपच्या स्वच्छतेचं रहस्य उमगलं आणि आपल्या गांधीजयंतीचं वैयर्थही !
माणूस असण्याची खरी कसोटी त्याचं सामाजिक असणं होय. निसर्गात मुंग्या, मधमाश्या, माकडांच्या झुंडी, पुंजक्यानं असतात. पैकी मुंग्या नि मधमाश्यांमध्ये शिस्त व सामाजिकता असते. अपवाद असतात माकडं. आपल्यात शिस्त व संयम नसण्याचं एक कारण आनुवंशिकता आहे; पण जगातील प्रगल्भ समाज जबाबदार नागरिक व समाज घडवतात, त्याची सुरुवात त्यांच्या घरापासून होते. तिथे घरी मुलांचं स्वावलंबन पहिल्या दिवसापासून सुरू होतं. तान्ह्या बाळाला आई कुशीत न झोपविता पाळण्यात झोपविते. मुलं मोठी होतील तशी ती सर्व कामे, अभ्यास स्वत:चा स्वतः कसा करतील हे पाहिलं जातं. घरात स्त्री-पुरुष भेद असत नाही. घरकामातही स्त्री-पुरुष विभागणी नाही. जेवल्यानंतर स्वत:चं ताट (प्लेट्स) स्वतः धुऊन, पुसून ठेवण्याचा प्रघात आहे. खरकटं टाकताना, कचरा टाकताना ओला, सुका वेगवेगळ्या कचराकुंडीत टाकला जातो. सारा कचरा पिशवीत बंद करून कचरा डेपोत टाकला जातो. कागद, पुस्तके, रद्दी, प्लास्टिक, काचसामान, अडगळीतल्या वस्तू टाकण्याचे दिवस ठरलेले असतात. अशा छोट्या-छोट्या व्यवस्थेतून तिथली सार्वजनिक शिस्त व जीवन आकारते. घरोघरी कामं स्वतः करण्याकडे कल आहे. त्यातून स्वावलंबन आकारतं.
शाळेत वेगवेगळ्या कृतींतून समूहजीवनाचे धडे गिरविले, शिकविले जातात व समाजजीवनात ते पाळण्यावर कटाक्ष असतो. आई-वडील तो पाळतात. मुलं त्यांचं अनुकरण करतात. आपल्याकडे आई-वडिलांनी शिकण्यासारख्या ब-याच गोष्टी आहेत. 'खोटं बोलू नये' असं शिकविण्यापेक्षा खोटं न बोलण्याची जाणीवपूर्वक काळजी घेणं. ‘दुटप्पी न वागणं' या एका व्यवहारात आपण कितीदा नापास होऊ ? असा नुसता विचार केला तरी मोठी यादी तयार होऊ शकते. ‘ओळ' हा एक छोटा संस्कार लक्षात घेतला तर लक्षात येईल की, लागणारी बस पन्नास प्रवाशांची बसण्याची व्यवस्था असणारी आहे. जाणारे प्रवासी दहा-पंधराच आहेत तरी आपण रेटारेटी करत कां चढतो हे मला न उमगलेलं कोडं आहे. संयम, विवेक, विचार, तर्क इत्यादींचा अभाव हेच त्याचं कारण. रेटारेटी, घुसणं यात शहाणं, अडाणी असा भेद नसतो हे विशेष ! बसमध्ये बसल्यावर साहित्य ठेवून जागा अडवणं, सहप्रवाशाचं वर्तमानपत्र वाचायला मागणं, सीटवर पाय ठेवणं, वृद्ध, अपंग, माता-बालक पाहून दुर्लक्ष करणं या साच्या आपल्या नागरिकत्व नसल्याचा आणि खरं तर माणूसपण नसलेल्याच खुणा नाहीत कां ?
रहदारीचे नियम न पाळण्यात आपण कायदेभंग करतो याचं भान नसणं केवळ अक्षम्य ! रहदारी पोलिसाशी हुज्जत घालणं हा अडाणीपणा ना ? दुचाकीवर तीन लोकांनी स्वार होणं यात कमीपणा न वाटणं याला काय म्हणावं ? दंड भरणे, कर भरणे, पार्किंग फी भरणे कटाक्षाने नको का करायला ? एकमेकांचा आदर, एकमेकांना साहाय्य, हा सामाजिक आचारधर्म व्हायला हवा. अपघातात सामान्य माणूस मदत करीत नाही त्याचं खरं कारण आपल्या पोलिसांचा उलटा व्यवहार, वर्दी देणा-याला अपराधी ठरविण्याची त्यांची संस्कृती सामान्य माणसास तिन्हाईत बनविते. शिवाय ‘कायद्यापुढे सारे समान' याची प्रचिती व्यवहारात न येणंही आपल्या कायदाभंगाचं एक कारण आहे. लोकप्रतिनिधी म्हणजे कायदा, कर, दंड, शिस्त यांना फाटा हे समीकरण बदलायला हवं. पूर्वी बसमध्ये आमदार भेटत. आता हे चित्रच राहिलं नाही. लोकप्रतिनिधींचा व्यवहार हा सार्वजनिक जीवनाचा आदर्श मानायचा झाला तर आपल्याकडे त्याची गोचीच आहे. आगापिछा नसलेली माणसंच नियम पाळतात, दंड भरतात. त्यातून समाजजीवनात काय संदेश जातो?
आपले सार्वजनिक समारंभ वेळेवर सुरू होत नाहीत याचं कारण प्रेक्षकांचं वेळेवर न येणं यापेक्षा पाहणे वेळेवर न येणं, संयोजकांचा वेळेवर कार्यक्रम सुरू न करण्याकडे कल (वेळेत पूर्वतयारी न होणं) अशी अनेक
कारणं सांगता येतील. सार्वजनिक समारंभातून कितीतरी उपचारांना फाटा देणं शक्य आहे. ते देत नाहीत. आपण परंपरावादी आहोत. पाहुण्याला एकाच वेळी शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, पान, सुपारी, गुच्छ, हार, पुस्तक, मानपत्र सारं देतो... त्याला घेण्यासाठी दोनच हात असतात. एखादी गोष्ट प्रतीकात्मक देऊन सन्मान नाही का सूचित होत? अध्यक्षीय भाषण, आभार प्रदर्शन यांना फाटा देणं, ते सूचक करणं नाही का शक्य? प्रार्थना, स्वागतगीत, पसायदान या सर्वांना फाटा देऊन प्रारंभी राष्ट्रगीत म्हणून प्रत्येक कार्यक्रम धर्मनिरपेक्ष, राष्ट्रीय करणं नाही का शक्य? कार्यक्रम ठरावीक वेळेत पार पाडणं अशक्य आहे का? आपण केव्हा तरी सार्वजनिक जीवन शिस्त व संयम यावर आधारित करण्याकडे लक्ष द्यायला हवं.
रस्त्यावरून वाहन चालविताना चालणा-याचा सन्मान करणं म्हणजे त्याला प्रथम जाऊ देणं, रस्ता ओलांडायला अवकाश देणं, अपघात होणार नाही अशी काळजी घेणं अशा गोष्टी आपल्या जबाबदार नागरिक असण्याच्या खुणा व्हायला हव्यात. हॉर्न न वाजवायची शिस्त बाळगून घेऊ त्या दिवशी ध्वनिप्रदूषण कमी होईल. वाहतुकीत संयमित दिवा, प्रकाश, वेग यांचे नियम पाळणं, ओळीची शिस्त मानणं, गाडी पुढे न दामटणं (ओव्हरटेक न करणं) हे सर्व कटाक्षाने पाळायला हवं. पोलिसांचा आदर करणंही आपण शिकायला हवं. जगात पोलिसाला 'हॅलो' केल्याशिवाय माणूस पुढे जात नाही; कारण तो आपल्यासाठी उभा आहे, याची खात्री असते. आपल्याकडे मंत्री येणार म्हणून जी सतर्कता दिसते, ती रोजच्या जीवनात का नाही असा आपण व्यवस्थेस प्रश्न करू तेव्हा येथील प्रशासन, व्यवस्था जनकेंद्री होईल. लोकशाहीत सरंजामी आपणास विसंगत वाटत नाही. त्यासाठीही नव्या जागृती व नव्या समाजशिक्षणाची गरज आहे.
नागरी समाजभान (Civic sense) निर्माण झाल्याशिवाय जबाबदार कर्तव्यपरायण समाज (Civil society) आकारायला येत नसतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. भारतीय समाजाचं व्यक्तिकेंद्रित असणं हा आपल्या समाजजीवनातला जसा अडथळा आहे, तसं व्यक्ती पूजकताही व्यापक समाजहितापुढील एक मोठे आव्हान आहे. सामाजात सर्वोपरी अशी सार्वजनिक नैतिकता रुजवणं आणि ती क्रमाक्रमाने वाढवत नेण्यानेच आपले प्रश्न सुटायला मदत होणार आहे. न बोलता कृतिशील आदर्श आपण व्यक्तिशः पाळणे ही या देशातील भविष्यातील शांत क्रांती ठरेल. क्रांती सीतेच्या पावलासारखी चाहूल न देता येत राहायला हवी, तर ती चिरस्थायी बनते असं बाबा आमटे यांनी 'ज्वाला आणि फुले' मधील एका कवितेत म्हटलं
होतं, त्यात मोठं तथ्य आहे. सार्वजनिक जीवनात दुस-याचा विचार प्रथम करणं, सहनागरिकांचं भान ठेवणं, त्यांना प्राधान्य देण्याची मानसिकता ठेवणं म्हणजे त्यांचा आदर करणं असा आचार आपण कटाक्षाने करायला हवा. सार्वजनिक ठिकाणी शांतता पाळणं, आदळ, आपट, मस्ती, खिदळणं होणार नाही याची काळजी घेणं म्हणजे नागरी सभ्यता व संस्कृती. घरं आणि शाळांनी यात मोठी गुंतवणूक, प्रयत्न करणं आवश्यकच नाही, तर अनिवार्य आहे. अन्य करतात ... मी एकटा करून काय जग बदलणार ?' या धारणेतूनही आपण मुक्त व्हायला हवं. ‘जग कसंही वागू दे, मी सभ्यता, शिस्त, संयम सोडणार नाही', अशी वैयक्तिक प्रतिबद्धता व नैतिकताच उद्याच्या बदलाचा प्रारंभ म्हणून प्रत्येक वागेल तो सुदिन !
भारतीय समाज उभारणीसाठी दुहेरी वागणं टाळणे, भ्रष्टाचार न करणे, पारदर्शी वर्तन, वेळेचे नियोजन व पालन, सार्वजनिक व्यवहारात शिस्त व संयम, अन्यांचा आदर, कायदा पालन, कर भरण्यातील कटाक्ष, जात, धर्म, लिंग भेद मुक्त व्यवहार व जीवनपद्धती, स्त्री-पुरुष समान व्यवहार व मानसिकता, चंगळवादी वृत्ती टाळणे, कर्जबाजारी वृत्तीचा त्याग, स्वकष्टार्जित कमाईस प्रतिष्ठा, भ्रष्टास अमान्यता अशा गोष्टींतूनच भारतीय समाज जबाबदार बनविणे शक्य आहे.
भारतीय नागरी समाजविकासातला एक भाग आपला शासकीय कारभार आहे. दप्तर दिरंगाई, लाच, कागदपत्रे गहाळ होणे, न्यायव्यवस्थेची ढासळत जाणारी प्रतिमा, पोलीस खात्यावरील अविश्वास यांच्या दोषांचे सारे खापर शासकीय अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधींवर फोडून जनतेस नामानिराळे राहता येणार नाही. टाळी एका हाताने वाजत नसते. वरील साच्या दोषांचा पूर्वार्ध जनता आहे, नागरिक आहेत. तलाठी पैसे घेतल्याशिवाय सातबारा उतारा देत नाही. तुम्ही रीतसर अर्ज करा. शुल्क भरा. पोहोच घ्या. नियमानुसार वेळेपर्यंत थांबा. न मिळाल्यास वरिष्ठांकडे तक्रार करा. माहिती अधिकाराचा वापर करा. संयम ठेवा. शिस्त पाळा. तलाठी दाखला देईल. न देऊन तो काय करील ? त्यालाही नोकरी करायची आहे. तुम्ही गैर मागणी करू नका. अवाजवी नोंदीचा आग्रह धरू नका. ‘सरकारी काम, सहा महिने थांब' हे आपलं चरित्र बदलू शकेल, ते आपण बदलल्यावरच. चांगल्या कामाची सुरुवात स्वत:पासून करा. प्रश्न लावून धरा. ताणा, पण तुटू देऊ नका. तीच गोष्ट पोलिसांची. जे लोकप्रतिनिधी भ्रष्ट वाटतात, त्यांना समारंभास बोलवून सन्मान करू नका. अशांवर जाहीर समाज बहिष्काराचे (अघोषित) पथ्य पाळा. अशांकडे काम घेऊन जाऊ नका.
अवास्तव मागण्या करू नका. त्यांच्या प्रलोभनास बळी पडू नका. अमान्यता हे मोठे सामाजिक हत्यार आहे. त्याचा विवेकी वापर करा. जनलोकपाल विधेयकाचा आग्रह धरा; पण संसदेपेक्षा कोणी मोठा नाही हे घटनात्मक तथ्य विसरू नका. मी म्हणेन ती पूर्व असं लोकशाहीत असत नाही. बदल सावकाशीने होतात, ही लोकशाहीची रीत मान्य करा. रात्रीत बदलाची अपेक्षा केवळ हुकूमशाहीतच करता येते. भावनेने प्रतिक्रिया व्यक्त करणे थांबवून विचारपूर्वक प्रतिसादाचे पथ्य जनतेने पाळायला हवे. हिंसा वयं मानायलाच हवी. बंद, हरताळात सार्वजनिक तोडफोड म्हणजे आपल्याच पायावर कु-हाड मारून घेणे, हे एकदा जाणतेपणाने समजून घ्यायला हवे. “मी कर भरणार नाही' म्हणण्यापेक्षा कर भरीन' पण हिशेबाचा आग्रह धरीन, म्हणणे अधिक प्रगल्भ व जबाबदार व्यवस्था निर्माण करण्याचा मार्ग. परपीडेपेक्षा आत्मक्लेश प्रभावी हत्यार आहे, हे महात्मा गांधी वाचून कळत नसते. गांधी हा आचार आहे, विचार नंतर !
जॉर्ज कॉनरॅडचं एक सुंदर पुस्तक आहे, ‘अँटी पॉलिटिक्स : अॅन एसे' नावाचं. त्याचा शेवट त्याने पुढील अवतरणाने केलेला आहे. माझ्या या लेखाच्या उपसंहाराला त्यासारखे प्रभावी विधान आठवत नाही. त्यांनी लिहिलंय, “हे खरं आहे की मी थोरांपुढे छोटा, शक्तिमानांपुढे दुर्बल, हिंसकापुढे भित्रा, आक्रमकांपुढे पलायनवादी ठरत नगण्य होऊन जातो. माझ्या मूल्य व विवेकापेक्षा भोवतालचं साकाळलेलं विश्व विशाल नि माझ्या आवाक्याबाहेरचं आहे, हेही खरं आहे. कधी-कधी तर मला ते अटळ, अमर्त्य नि अपरिवर्तनीय वाटतं; पण तरीही त्या व्यवस्थेपुढे मी दुसरा गाल पुढे करीत नाही. मी गलोरीतून साधा खडाही मारीत नाही. मी व्यवस्थेकडे एक कटाक्ष टाकतो अन् माझं सारं शब्दसामर्थ्य एकवटून विरोध करतो, नोंदवतो." टोकाचा संयम, शिस्त, सभ्यतेस आपल्या समाजजीवनास बुळे समजले जाणे यातच आपल्या पराभवाची कबर खोदलेली असते. ‘प्राप्त काल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा'चा मथितार्थ आपणास केव्हा उमजणार?' 'उष:काल होता होता काळ रात्र झाली, अरे, आयुष्याच्या आता पुन्हा पेटवा मशाली'मधले कवी सुरेश भट काय सांगतात हे आपण समजून घेणार नसू तर आपल्यासारखे दुसरे करंटे कोण ? ‘एकला चलो रे' म्हणणारे कवी रवींद्रनाथ, आचार्य विनोबा भावे काय वेडे होते ? प्रवाहाविरुद्ध पोहचणारा वीर नदीत अपवादानेच दिसतो ना? ‘पेरते व्हा !' चा संदेश काय? बोलके सुधारक नकोत. कार्यकर्ते हवेत. दुस-यावर टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण कराल तर समाजातील दोष लवकर व अधिक
प्रमाणात दूर होतील. काविळीच्या डोळ्यांनी जग पाहू नका. कासवाच्या नजरेने पहा. दूर असाल तरी त्यातून संवेदनाच पाझरते. पिलास ती न देता पोहोचते म्हणे! कान, डोळे, डोके आपलेच असायला हवे. मत पक्के हवे. ते द्यायलाच हवे. प्रकट करण्याचं स्वातंत्र्य व धाडस ठेवा. दुसरे स्वातंत्र्य रोज जन्माला घालण्याचे सामर्थ्य त्यात असतं, यावर विश्वास ठेवा. नुसता विचार नका करू. विचाराला कृतीचं रूप द्या. ब्रह्मज्ञा न सांगू नका, ब्रह्मवाक्य व्यवहार, आचारधर्म बनवा. दुनिया झुकती है, पहले झुकनेवाला चाहिए, झुकानेवाला बाद में पैदा होगा और वह आप ही होंगे।
┅
रेल्वेच्या प्रवासाचं एक दृश्य लहानपणापासून माझ्या मनावर कोरलेलं आहे. रेल्वे झुक झुक करीत पुढे धावत असते आणि दुतर्फा असलेली झाडे, शेतं, घरं, गुरं, रस्ते मागं पळत असतात नि पडतही. काळही असाच असतो. भूतकाळ मागे पडतो अन् वर्तमान नित्य, नवं घेऊन नटून, थटून मिरवीत असतो. त्याच्या हे गावी नसतं की येणारा भविष्यकाळ त्याची सारी नशा, सारा तोरा क्षणात उतरवणार आहे. काळाच्या या विविध रूपांमुळेच खरं तर जग, जगणं, जीवन सुंदर बनतं.
मी जे सांगू, लिह मागतो आहे ना, ते मात्र नव्या पिढीसाठी. माझ्या पिढीनं जन्माला घातलेल्या पिढीसाठी. माझ्या पिढीसाठी म्हणाल तर ही उजळणी होईल किंवा स्मरणरंजन! हवं तर रवंथ म्हणा! नव्या पिढीला रवंथ शब्दच नवा. तो त्यांच्या मोबाईल अॅप्सच्या डिक्शनरीत असेलच असं नाही. खरं तर नसण्याचीच शक्यता जास्त. या रवंथ शब्दावरून आठवलं,आमच्या काळातील किती गोष्टी नव्या पिढीस माहीत असणं शक्यच नाही. किंबहुना ती पिढी जन्माला येण्यापूर्वीच त्या खरं तर गायब झाल्या, काळाच्या पडद्याआड गेल्या. नुसती नावं सांगितली तरी ही पिढी चकित होईल. काटवट, कंदील, उखळ, पाटा, वरवंटा, बाराबंदी, बोरू, दौत, किल्ला, खलबत्ता, फिरकीचा तांब्या, होल्डॉल, सारवट गाडी, छकडा, डांगर, कुळीथ, सातू, वासुदेव, वार लावून शिकणे, इत्यादी इत्यादी. काळ मोठा कठोर असतो नि चपळही!
लिहिणं अन् टाईप करणं
साधी लिहायची गोष्ट घ्या ना. गेल्या पन्नास वर्षांत किती बदल झाला म्हणून सांगू! पूर्वी म्हणे लिहिणा-यालाच कागद, शाई, रंग, बोरू तयार करायला लागायचा! तो काळ काही मी पाहिला, अनुभवला नाही; पण जे अगदी लहानपणी लिहिलं, त्याच्या आठवणी मात्र जशाच्या तशा आहेत.
आमच्या लहानपणी हाती यायची पाटी-पेन्सिल. ती हाती यायचा सर्वांचा दिवस एकच असायचा. तो म्हणजे गुढीपाडवा. त्या दिवशी शाळेत जाणाच्या मुलाचं नाव शाळेत घातलं जायचं. मुलींचं नाव मात्र अपवाद असायचं. वडील भाऊ-बहीण, अगोदर शिकणारी मुलं-मुली नव्या पाटीवर सरस्वती, गुढी, ॐ नम:शिवाय असं काहीतरी लिहून सजवून पाटी हाती द्यायचे. पाटी नवीच असायची. पहिली पेन्सिल अख्खी मिळायची. नंतर तुकडेच नशिबी यायचे. गुढीपाडवा, नागपंचमीला शाळेत पाटीपूजन असायचं. चक्क पाटी, पुस्तकं, वह्या मांडून अख्या शाळेत पूजा मांडली जायची. उघडं पूजेचं पान... मग ते वहीचं असो की पुस्तकाचं; ते फुलं, पानं, हळद, कुंकू, बत्ताशे, तीर्थ शिंपडून चक्क रंगीबेरंगी असे होऊन जायचं की पुढे ते कुणाच्याही बापाला वाचणं अवघड होऊन जायचं. पहिली ते दुसरी, तिसरीचं सारं लिखाण पाटी-पेन्सिलचं . शाळेच्या मधल्या सुट्टीत ... तिला आम्ही चक्क ‘सू ऽऽ ची सुट्टी'च म्हणायचो. त्या सुट्टीत शाळेच्या भिंतीफरशीवर पेन्सिलीला टोकं करायचा सार्वजनिक कार्यक्रम असायचा. फरशा, भिंती पेन्सिलीच्या घाशीनं भरलेल्या असायच्या. शाळेची तपासणी असली की पाट्या कोळशानं घासून गुळगुळीत करण्याची अघोषित स्पर्धाच असायची. चौथीला शिसपेन्सिल, वही, खोडरबर, रेझर हाती यायचं. त्याचंही कारण असायचं. चौथीची परीक्षा केंद्राची असायची. म्हणजे आत्ताच्या भाषेत बोलायचं तर बोर्डाची. केंद्र परीक्षा पास झाली की मुलं पाचवीला. पाचवीत जाणं अनेक अर्थांनी प्रमोशन असायचं. बरीच मुलं केंद्रात गळायची, गचकायची. त्यांची शाळाच सुटायची. पाचवीत शाईनं लिहायला लागायचं. म्हणजे शिसपेन्सिलीची सुट्टी. तिचा उपयोग फक्त भूमिती, भूगोल, विज्ञानाच्या आकृत्या काढण्यासाठीच व्हायचा अन् चित्रकलेत. मुलींसाठी शिवणकला विषय असायचा. कापड बेतायला तिचा उपयोग ठरलेला. तेपण फिकट असेल तर. गडद कापडावर पेन्सिल, खडूच उपयोगी पडायचा. पाचवीत शाई, दौत, टाक, नीब, टिपकागद, पॅड, कंपास, रंगपेटी, ब्रश, फूटपट्टी असा सारा लवाजमा गोळा करायला लागायचा. हे सारं सामान एकाच वेळी पाहण्याचं, घेण्याचे भाग्य फार कमी मुलांच्या नशिबी असायचं. आठवड्याच्या हप्त्यांनी मुलं शाळेचे दप्तर जमवायची. सगळ्यांत मोठी गंमत म्हणजे इंग्रजी, हिंदी या नव्या भाषा, विज्ञानाचा नवा विषय, गणित-भूमितीनं भय
आणि भूत या सा-यांनी पाचवी म्हणजे ऊन-पावसाचा खेळ... कभी खुशी, कभी गम! शाळेत रोज टाक-दौत, टिपकागद घेऊन जावा लागे. सगळ्यांच्या खिशाला व बोटाला शाईचे डाग ठरलेले... रंग गेला तर पैसे परत असे ते
डाग नंबरी, पर्मनंट असायचे. भट्टीशिवाय निघायचे नाहीत. गरीब मुलांना टिपकागद नसायचा. लिहिलेल्या अक्षरांची शाई विस्कटू नये म्हणून चक्क वर्गातील जमिनीवरची माती टिपकागद होऊन जायची. वर्गात फरशा क्वचित. बहुधा सारवलेली जमीन असायची. पाचवीत आणखी एक प्रमोशन असायचं. पहिली-दुसरीची मुलं बस्करावर बसायची. म्हणजे घरूनच बसण्यासाठी सतरंजी, पोत्याचा तुकडा दप्तरातून न्यायचा. तिसरीचौथीला बस्कर जायचं अन् लाकडी पाट यायचे. पाचवीत बेंचवर बसायला मिळायचं म्हणजे सिंहासनावर बसण्याचाच तो आनंद असायचा!
सातवी पास होऊन मुलं मराठी शाळेतून हायस्कूलमध्ये यायची. इथं आलं की टाक-दौत मागं पडायची अन् हाती फाउंटन पेन यायचा. म्हणजे शाई भरून लिहायचा पेन, परीक्षा असली की पेन गरम पाण्याने धुवायची स्पर्धा लागायची. पेन रांद्याचे असायचे. कधी पाणी अधिक गरम असेल तर चक्क वितळून जायचे. ऐन परीक्षेत दुसरा पेन मिळणं कठीण! पेनचा गड्डा कधी कधी घट्ट बसायचा. मग दातांनी किंवा दरवाजाच्या फटीत घालून अलगद काढावा लागे गड्डा; पण ब-याचदा तो चिरला जायचा. त्याला फट पडायची. मग दोरा गुंडाळून गड्डा बसविण्याचा उपद्व्याप असायचा. शिवाय अंगठा व तर्जनी शाई गळून डागाळलेले... जेवताना भात कालवताना निळा व्हायचा.
कॉलेजात जाणं दुर्मीळ; पण लिहिण्यासाठी सुखावह! बॉलपेन हाती यायचं. कित्ता म्हणजे उतरून काढलं जायचं. कार्बन कागद वापरून कॉपी (दुसरी प्रत) नोट्स मिळायच्या. हुशार मुलांचा भाव असायचा. ज्याचं अक्षर वळणदार, त्याचाही भाव मोठ्ठा असायचा.
आता नव्या पिढीचं लिहिणं संपलं अन् हा आनंदही! ती उपजत कीबोर्ड वापरते. नवी मुलं लिहिणार नाहीत. टाईप करणार! म्हणून त्यांचं सारं लिखाण एक टाईप होणार!
दिवेलागण अन् वाचन
लिहिण्याप्रमाणे वाचनही सोपं नव्हतं. एक तर शिक्षणाचा आजच्यासारखा सार्वत्रिक प्रचार नव्हता. मराठी शाळेत असताना १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, २ ऑक्टोबरला प्रभातफेरी असायची... त्यातील एक घोषणा चांगली आठवते. मुला-मुलींना शाळेत पाठवा.' भिंतीवर एक वाक्य सर्वत्र लिहिलेलं असायचं, ‘ज्ञानाचा दिवा, घरोघरी लावा. त्यामुळे आजच्यासारखं वर्तमानपत्र घरोघरी नसायचं. ते असायचं एक तर सार्वजनिक वाचनालयात किंवा
वकील, डॉक्टरांच्या घरी. कमिटी, बँक, व्यापारी पेढीवर ते मिळायचं. सार्वजनिक वाचनालयात एक वर्तमानपत्र एकावेळी चक्क तीन-चार लोक वाचायचे. पुढचं पान एक वाचायचा. त्याच्या मागचं पान दुसरा ... मधलं पान तिसरा. वर्तमानपत्र दोन-तीन पानांचंच असायचं. मासिकं वाचायला तिष्ठत बसावं लागायचं. खासगी ग्रंथालयं नव्हती. होती फिरती वाचनालयं. माणूस घरोघरी पुस्तकं, मासिकं ठरावीक वारी घेऊन यायचा.
रात्री वाचणं दिव्य असायचं. दिवेलागण म्हणजे वाचन बंद अशीच स्थिती. सुरुवातीस घरोघरी म्हणे मशाली, पलिते अडकवलेले असायचे. माझा जन्म दिव्या, कंदिलाच्या काळातला. मी वाचू लागलो ते दिव्यावर. दोन पैशांची वातीची जस्ताची चिमणी बाजारा दिवशीच विकत मिळायची. मग वात विकत आणायची. मग रॉकेल, कधी रॉकेल नसायचं, तर कधी वात. धूर ओकणारी जस्ताची चिमणी सारं घर, कोनाडे काळवंडून टाकायची. तिच्यात वाचणं दिव्य असायचं खरं. एका चिमणीमध्ये व भोवताली सारी वाडी, वस्ती वा वाड्यातील मुलं घेरून मांडीला मांडी लावून वाचत, लिहीत बसायची. वाचायचे म्हणजे डोळे फाडून घेणे असायचे.
मग आले काचेचे दिवे. वातीच्या ज्योतीभोवती काच आल्याने ज्योतीचं वाच्याबरोबर नाचणं, भडकणं, विझणं संपलं अन् प्रकाशाचं कमी-जास्त होणंही ! नियमित, स्थिर प्रकाशात वाचण्याचा आनंद म्हणजे नव्या सुखाचा शोधच होता, हे आजच्या पिढीला सांगूनही कळणार नाही. दिव्याच्या काचेवर काजळी धरून काच काळवंडायची. रोज दिवा लावण्यापूर्वी काच साफ, स्वच्छ करण्याचा दैनंदिन कार्यक्रम ठरलेला; पण त्यात वाचंण म्हणजे श्रीमंती थाट असायचा.
काचेच्या दिव्यांची जागा मग कंदिलानं घेतली. कंदील म्हणजे मोठा काचेचा दिवाच. भरपूर उजेड. शिवाय रात्री प्रवासात, शेतात राखणीला, येता-जाता पायांखाली दिसणं आलं. साप, विंचवावर पाय ठेवणं सुटलं. वाट पायाखाली आली. ठेच, ठेचकाळणं संपलं. रात्रभर लिहिणं, वाचणं शक्य झालं. शिवाय प्रकाश कमी-जास्त करण्याची युक्ती म्हणजे केवढी मोठी सुधारणा, शोध, सोय वाटायची म्हणून सांगू! एखादी बाबूराव अर्नाळकर, ना. सी. फडके, वि. स. खांडेकरांची कादंबरी रात्रीच्या बोलीनं मित्रमैत्रिणीकडून मिळायची. रात्रीत तिचा फडशा पाडायचा. एक्साइटमेंट, थरार... त्याला भुतासारखं वाचन म्हणायचो आम्ही... घोस्ट रीडिंग. त्यात बाबूराव अर्नाळकरांची कादंबरी. त्यातला नायक झुंजार म्हणजे भय, जिज्ञासा, गारुड सर्व एकाच वेळी ... शिवाय भिंतीवर पडलेल्या आपल्याच लांब
सावलीचं भूत व्हायचं केव्हा केव्हा! ते वाचणं म्हणजे अंगात येणंच असायचं. तरुण वयात रंभा, मेनका मासिकं, कोकशास्त्र, बर्म्युडा टॅगल कंदिलात वाचणं म्हणजे खरी आभासी संभोगसमाधी असायची. कूस, मांडी बदलत वाचणं, ताणतणाव शिथिल करणं असायचं. आता यांची जागा मोबाईल क्लिप्स, पोर्नोग्राफी साइटसूनी घेतली आहे खरी... तोही आभासच ! पण अधिक रोमँटिक, लाईट, व्हरायटीची रेलचेल!
कंदील गेले अन् गॅसबत्त्या आल्या. गॅसबत्त्या पेटवणं म्हणजे दिव्य असायचं. त्यांचं लहरी भडकणं म्हणजे चक्कीत जाळ असायचा. ती पेटविणा-याच्या नाकदुन्या काढता काढता नाकी नऊ यायचे! त्यात मेंटल फुगा फुटला की सारं ओंफस व्हायचं. डोळे दिपणारा प्रकाश देणारी गॅसबत्ती प्रखर प्रकाशामुळे वाचायला कमी उपयोगाची ठरली; पण तिनं सभा, लग्नाच्या वराती, मांडव यांची शान वाढविली.
मग आले विजेचे दिवे. बल्बला खेडोपाडी काचेचा गोळा म्हणत. विजेचं घर म्हणजे श्रीमंतीचं लक्षण असा एक काळ होता. रस्त्यावरचे दिवे, रेल्वे स्टेशन, स्टॅड, कमिटी रेल्वे गार्ड सर्वांच्या हाती-माथी रॉकेलचे दिवेच असत. त्या काळात विजेचं आगमन म्हणजे एका रात्रीत झालेली प्रकाशक्रांती, ज्ञानक्रांती ठरली. लख्ख प्रकाश रात्री दिसणं म्हणजे लोकांना रात्री सूर्य उगवल्यासारखं वाटू लागलं. छोटे-छोटे सूर्य रात्री घरोघरी तळपू लागले. आता पोतरलेल्या, सारवलेल्या भिंती माणसांना रंगवाव्याशा वाटू लागल्या. बिछाने धुवावेसे वाटू लागले. भांडी उजळावी वाटू लागली. तो बल्ब नामक काचगोळाही महाग वाटावा अशी घरोघरी गरिबी होती. विजेचा दाब अनियमित झाला की बल्ब जायचा, जळायचा म्हणजे बाद व्हायचा. त्यातलं फिलमेंट... तार जुळवत लोक बल्ब पेटविण्याचा किती प्रयत्न करायचे! नाइलाज झाला तरच नवा बल्ब, तोही १५, २५ वॅटचा. त्यात वाचायची, लिहायची गंमत म्हणजे ज्ञानाचा नवा अवतार. मग त्यावर हंड्या आल्या. प्रकाश आणखी वाढला; पण भाड्याच्या घरात राहणारे अधिक होते. या विजेने भाडी वाढविली. घरमालक म्हणजे वाचनशत्रू असायचा. तो ठरल्या वेळातच वीज सोडायचा. त्याच्या घरी मेनस्विच असायचं. परीक्षेच्या दिवसांत घरमालक कर्दनकाळ वाटायचा. रात्री १० वाजले की तो ब्लॅक आऊट करायचा. मग ठेवणीतील कंदील राखीव खेळाडूसारखा मदतीला यायचा. जुनं ते सोनं वाटायचं.
पुढं ट्यूब आली आणि सोनेरी, पिवळा प्रकाश दुधी, आल्हाददायक झाला; पण ट्यूब लहरी असायची. तिची वीजपेट म्हणजे लपंडाव होता;
पण तिच्यातलं वाचन सुखकर खरं. खरं वाचावं, लिहावं असं वाटलं ते टेबललॅम्पमुळे. कॉलेजच्या जीवनात टेबललॅम्प आले आणि शिक्षणास तपस्या करून गेले. टेबल, खुर्ची व लँम्प म्हणजे आधुनिक शिक्षण, वाचन, लेखन होऊन गेलं. गरीबघरी बल्बवर कागद लावून घरगुती टेबल लॅम्प बनविले जात. त्या प्रतिकूल परिस्थितीत लेखन, वाचनाची जिद्द म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होणं वाटायचं. ते तर रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून वाचीत. आत्ताच्या पिढीत एलईडी लॅम्प आले; पण लेखन, वाचनाची ती समाधी, तपस्या, जिद्द अपवादाने दिसते. सुखासीनता समाधीविरोधी असते तशी संघर्षविरोधीही ! परिस्थितीचा काच, ओढग्रस्तता माणसास कष्टी, काटकसरी, काटक बनविते. हॅलोजननी डोळे दिपतात, दिव्यांनी ज्ञानाचा दिवा घरोघरी लागतो.
सावध ऐकणं
‘सावध ऐका पुढल्या हाका' नावाची एक काव्यपंक्ती आहे. लहानपणी कोणत्यातरी कवितेतली ही ओळ अभ्यासलेली... ती अजून माझा पाठलाग करते आहे. हाका घालते... सावध करते... बजावते... बजाऽऽव... सांगते ऐका ऽऽ ऐकणं हा आमच्या पिढीवरचा एक मोठा प्रभावकारी संस्कार होता. घरी आई-वडिलांचं, थोरामोठ्यांचं ऐकायचं म्हणजे ऐकायचंच. घरोघरी मिलिटरीच होती. There is no question why ? But to do and die. असाच सारा माहौल असायचा. शाळेत गुरुजी म्हणतील ती पूर्व दिशा. ‘शिवाजी म्हणतो'चा खेळ ! गुरुजी दैवत होतं. त्यांनी सांगितलेलं कान भरून ऐकायचं. मनात साठवायचं. आयुष्यभर ते ऐकलेलं पुरायचं... पाठलाग करीत राहायचं गुरुर्रब्रह्मा, गुरुर्रविष्णू, गुरदेवो महेश्वरा... डोळे मिटून, हात जोडून म्हटलेला श्लोक... डोळे उघडले प्रौढपणी; पण श्लोक मिटलेलाच राहायचा. ही सारी ऐकण्याची कमाल आणि किमया असायची.
गाणी, भजन, प्रवचन, कीर्तन, भारूड, पोवाडे, हादग्याची गाणी, नागपंचमीची गाणी अन् सिनेमाची पण... सान्यांची गुणगुण प्रत्येकाच्या गळी, मनी-मानसी असायची. लहानपणी मूकपट असायचे. सिनेमाला आवाज नव्हता. सर्व अभिनयातून व्यक्त व्हायचं. म्हणून चॅर्ली चॅप्लिन, लॉरेल हार्डी मोठे कलावंत होते. मग आवाज आला, गती आली व गाणी पण. चित्रपटाच्या रेकॉर्डस - ग्रामोफोनचं केवढं कुतूहल व कौतुक होतं. हँडल, पिन अडकली की गाण्याची फजिती; पण ती गाणीच वाटायची. नूरजहाँ, बेगम अख्तर, नंतर लता मंगेशकर आली. क्लासिकल गाणी एकतारी पाक असायचा. डोळे मिटून ऐकणं म्हणजे मैफल असायची. एस्.
डी. बर्मननी ऐकण्याला नजाकत दिली. किशोरकुमारनी कानांना हसायला शिकवलं, तर लता मंगेशकरनी रडायला (ऐ मेरे वतन के लोगों!)
पूर्वी लाऊड स्पीकर नव्हते. कर्णा घेऊन बोललं जायचं. जाहिरातीसाठी कण्र्याचाच वापर असायचा. ज्याचा आवाज मैदानाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पोहोचायचा तो नेता व्हायचा! उदाहरणार्थ आचार्य अत्रे! गांधीजींना, नेहरूंना लाऊड स्पीकर लागायचा. गावात एकच लाऊड स्पीकर असायचा. त्याचा भाव मोठा. अगोदर स्पीकर ठरवायचा, मग वक्ता! सभेच्या आधी लाऊड स्पीकर ठरवायचे. तेच नाटक, गाणं, तमाशा, मेळा, पोवाडा, कार्यक्रम, व्याख्यानांचं. स्पीकर बॅटरीवर चालत. ते ऐकताना आश्चर्य वाटायचं. आवाज मोठा कसा होतो?
रेडिओ आधी आला, मग टेपरेकॉर्डर ! पण रेडिओनं समाजाला ऐकायची समज व संस्कार दिले. रेडिओने भजन, भारूड, भाषण, सारं ऐकायला शिकवलं, अमीन सयानीला अमर केलं रेडिओने! उलटही म्हणता येईल ! रेडिओची सिग्नेचर ट्यून (रेडिओ सुरू होतानाची ट्यून ), वंदे मातरम्, बातम्या यांनी माझी पिढी ऐकत कानसेन, तानसेन झाली... मधल्या काळातील पिढीनं रेडिओ ऐकणं सोडलं अन् ती मानसेन झाली. आता परत ती एफ.एम.मुळे कानसेन झाली; पण त्यांचे कान एकारलेले झालेत. त्या कानांना अभिजात संगीत कळत नाही. ते शब्द, काव्य, अर्थ हरवून केवळ ताल, नाद, संगीत, ऐकते, डोलते, नाचते. गाणं म्हणजे विचार असतो हे संपलं. मोबाईलधारक पिढी स्वत:चंच ऐकते. त्यामुळे आत्ममग्न! आत्मरत ! बसमध्ये शेजारी डॉ. अब्दुल कलाम, अण्णा हजारे, लता मंगेशकर बसलेल्या असल्या तरी ते त्यांच्या गावी नसते. अशी आत्ममग्नता घाण्याच्या बैलाची!
थेट, नेट, इंटरनेट
असं असलं तरी या मोबाईल, मोटर, इंटरनेट, जनरेशनचं मला मोठं अग्रुप आहे खरं. लहानपणी आम्ही बाल हनुमानाची एक कथा ऐकायचो. तो हनुमान म्हणे जन्मल्या-जन्मल्या सूर्य गिळायला निघाला होता. ती हनुमान उडी घेऊनच नवी पिढी जन्मते. जन्मत:च ती कॉम्प्युटर सॅव्ही असते. छोटी-छोटी बालवाडीत जाणारी मुलं, प्ले ग्रुपमध्ये जाण्यापूर्वी डिजिटल लिटरेट असावीत असा त्यांचा व्यवहार. घरातली नातवंडं मी पाहतो. मोबाईल ते न शिकविता सफाईदारपणे हाताळतात. टी.व्ही.चा रिमोट, चॅनल्सची माहिती त्यांना आपोआप कळते. व्हिडीओ गेम्स ती स्वत:च शिकतात. तेच कॉम्प्युटरचं. या पिढीचं वर्णन मी थेट पिढी' असं
करतो. त्यांचं बोलणं, वागणं, विचार करणं सारं थेट असतं. काळानं त्यांना न शिकता शिकण्याचं वरदान, ग्रेट भेट दिली आहे.
माझ्या मुलांचीही ... त्यांच्या पिढीची म्हणा हवं तर, एक गोष्ट लक्षात
आहे. आमची पिढी थेट काहीच शिकली नाही. साधी सायकलही आम्ही १० पैसे तासाने घेऊन शिकलो. त्या तासातही तीन-चार भागीदार असंत. साठ मिनिटं भागिले पार्टनर - त्यावर किती फे-या, वेळ ठरायची - पंक्चर झाली की भुर्दंड बसायचा. या साच्या दिव्यातही गंमत असायची. तीच गोष्ट स्कूटरची. ती विकत घ्यायची ठरल्यावर मोकळ्या मैदानात मित्रानी ती चालवायला शिकवली. मग लायसेन्सचे सोपस्कार. आधी लर्निंग. पर्मनंटच्या वेळी इंग्रजी ८ आकाराची फेरी काढता यायचं टेन्शन असायचं. आर.टी.ओ.ची भीती वाटायची. चारचाकी घेतली तर चक्क ड्रायव्हिंग स्कूलमध्ये नाव घालून इमानेइतबारे शिकलो अन् मग गाडी घेऊन रस्त्यावर आलो. या उलट मुलांची स्थिती. लूना, स्कूटर, मोटार ते न शिकता थेट चालवतात कसे याचेच मला राहन-राहन आश्चर्य वाटते. मी विचार करतो तेव्हा लक्षात येते की, या थेट पिढीस कोणतीच गोष्ट शिकायला नेट लावायला लागत नाही. आमच्या तरुणपणी साधा क्रिकेट, फुटबॉल, हॉकी खेळ पण आम्ही नेट लावून शिकलो. हा पिढीतील क्षमता, कौशल्याचा फरक की उपजत कौशल्याची घडण यावर एकदा संशोधन व्हायलाच हवे.
नव्या पिढीस उपजत समृद्धी मिळाल्याचा हेवाभाव ईष्र्या, असूया माझ्या मनी अजिबात नाही. असेलच तर छोटी तक्रार. एवढा मोठा फूटबोर्ड मिळाल्यावर त्यांची हनुमान उडी सूर्य गिळण्याची का नाही? ती असायला हवी. संगणक तंत्रज्ञानाने काळ, काम, वेग यांचं आमच्या काळातलं त्रैराशिक खोटं ठरवलं. खरं सांगायचं तर संपुष्टात आणलं. त्यामुळे जीवनात गोष्टी कष्टसाध्य असतात हे तत्त्वज्ञानच झूठ ठरवलं. कट, पेस्ट, फॉरवर्ड, कॉपी, क्लिक, मेल, फेसबुकचं त्यांचं जग. माझ्या मित्राच्या मुलाने इंटरनेटवर मैत्री करीत हाँगकाँगची मैत्रीण पत्नी म्हणून न पाहता, भेटता घरी आणली तेव्हा माझ्या मनातला माझ्या पिढीचा सारा अहंकार गळून पडला अन् लक्षात आलं. या पिढीनं काही हरवलं असेल, गमावलं असेल; पण कमावलंही तेवढंच, त्यांना जे गवसलं, सहज उपजत त्याचं अप्रूप नि कौतुकही मोठं वाटतं अन् लक्षात येतं, काळाला दोन खिसे असतात. एक फाटका असतो, दुसरा धड. फाटक्या खिशातून कालबाह्य हरवत राहतं. धड खिशात गवसलेलं, उपयुक्त साठत राहतं. काळ चूझी खराच!
┅
भारत सरकारने स्वामी विवेकानंदांच्या शतकोत्तर सुवर्णजयंतीचे औचित्य साधून काही दिवसांपूर्वीच ‘राष्ट्रीय युवा धोरण - २०१४' जाहीर केले आहे. सरकारी पातळीवर त्याचा फारसा प्रचार, प्रसार न झाल्यामुळे ते युवकांपर्यंत पोहोचलेले नाही. माध्यमांनीही त्यांची फारशी दखल घेतलेली लक्षात आलेली नाही, म्हणून हा लेखप्रपंच.
नव्या धोरणानुसार १५ ते २९ वयोगटातील मुला-मुलींना ‘युवा' (young) समजण्यात आले आहे. 'युनो'ने १५ ते २४ वर्षे हा वयोगट युवा मानला असला तरी भारताने वरील वयोगट स्वीकारण्याची अनेक कारणे आहेत. पूर्वीच्या (२00३) युवा धोरणात युवा वर्ष १३ ते ३५ मानण्यात आले होते, ते कोणत्याच निकषांवर समर्थनीय नव्हते. विद्यमान वयनिश्चितीमागे वैधानिक व वास्तविक व्यवहारी तर्क, तथ्य आढळून येते. बालमजुरांचे वय १४ मानण्यात आले आहे. त्याआतील मुलांना मजूर बनविण्यावर प्रतिबंध आहे. सन २00९ साली मंजूर झालेला सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षण कायद्यात ६ ते १४ वयोगट स्वीकृत आहे. बाल न्याय अधिनियम २०१४ च्या नव्या प्रस्तावित दुरुस्तीनुसार ही १६ पुढील मुले युवक मानण्यात येणार आहेत. युवकांतील वाढते शिक्षणमान, नोकरीत स्थिरस्थावर होण्यास लागणारा काळ, विवाहाचे वाढत जाणारे वय अशा अनेकांगांनी पाहिले तर नव्या धोरणातील १५ ते २९ वयोगट हा 'युवा' मानणे मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, समाजवास्तव या सर्वाधारे कालसंगत व सयुक्तिक ठरते.
भारतीय युवकांची १५ ते २९ वर्षे वयोगटातील संख्या एकूण भारतीय लोकसंख्येच्या २७.५टक्के भरते. म्हणजे भारताची एक चतुर्थांश लोकसंख्या । युवकांची आहे. सन २०२० पर्यंत युवकसंख्या १.३ सहस्रलक्ष (Billion),
होण्याची शक्यता आहे. याचाच दुसरा अर्थ असा की, तोवर भारतातील ५९२ दशलक्ष, (Million) कार्यक्षम असतील. भारत सरकारतर्फे युवक विकासावर प्रत्यक्षतः ३७00 कोटी रुपये, तर अन्य योजनांतून ५५000 कोटी असे सुमारे ९0,000 कोटी रुपये खर्च करण्यात येत असतात. यात शिक्षण, अन्न, सेवायोजन, आरोग्य, कुटुंब कल्याण, क्रीडा इत्यादींचा
अंतर्भाव असतो. याशिवाय राज्य सरकार, स्वयंसेवा संस्था ही युवक विकासावर मोठा निधी खर्च करीत असतात.
नवीन युवा धोरण-२०१४ ची जी उद्दिष्टे (Objectives) निश्चित करण्यात आली आहेत, त्यांनुसार युवकांतील सर्व क्षमता, कौशल्यांच्या सर्वंकष विकासातून युवा सबलीकरण करण्याचे धोरण आहे. जेणेकरून भारतीय समाजात युवकांना त्यांच्या हक्कांवर आधारित स्थान व सन्मान मिळू शकेल. युवकांचा कार्यशक्तीच्या रूपात विकास करून त्यांना देशाच्या शाश्वत विकासाचे साधन बनविण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. भविष्याची आव्हाने पेलण्याची क्षमता युवकांत निर्माण करण्याच्या उद्दिष्टानुसार भावी युवा पिढी समर्थ व सुदृढ बनेल हे पाहिले जाणार आहे. देशात राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागावी म्हणून युवकांत मूल्यांची रुजवण व समाजकार्यातील त्यांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रशासनाच्या सर्व स्तरांवर युवकांत जबाबदार नागरिकत्वाची भावना कशी विकसित होईल, हे पाहिले जाणार आहे. वंचित, उपेक्षित, युवकांच्या कल्याण व विकासाद्वारे त्यांना समाजाच्या मध्यप्रवाहात आणण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे.
वरील उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी खालील ११ क्षेत्रांत भविष्यकाळात युवक विकासाचा कार्यक्रम अंमलात आणण्याचे धोरण आहे - १) शिक्षण, २) सेवायोजन व कौशल्य विकास, ३) उद्योजकता विकास, ४) आरोग्य व आरोग्यदायी जीवनशैली विकास, ५) क्रीडा, ६) सामाजिक बांधीलकी, ७) समाजकार्य सहभाग, ८) राजकारण व प्रशासनातील सहभाग वाढ, ९) युवक उपक्रम, १0) समावेशन (Inclusion), ११) सामाजिक न्याय. शिक्षणाच्या संदर्भात युवक क्षमता विकासास व गुणवत्ता संवर्धनास प्राधान्य देण्यात येणार आहे. शिवाय कौशल्यविकासावर भर देऊन युवकांमध्ये जीवनभर निरंतर शिकत राहण्याच्या प्रवृत्तिवर्धनाकडे विशेष लक्ष पुरविले जाणार आहे. आज भारतातील ५0टक्के युवक स्वयंरोजगार करतात. नोकरी करणा-या युवकांची संख्या ७0 दशलक्ष आहे. ती १५टक्के भरते. याचा अर्थ उर्वरित ३५ युवक बेकारीला तोंड देत असतात. हे लक्षात घेऊन
रोजगार वाढीकडे लक्ष केंद्रित करण्याचे धोरण निश्चित केले असून तो या धोरणाचा गाभाघटक आहे.
आरोग्य हा सामाजिक सुरक्षेचा महत्त्वाचा घटक असल्याने आरोग्य सुविधा वाढीबरोबर आरोग्यक्षम सवयी युवकांत वाढीस लागाव्यात म्हणून विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. व्यसन, एड्स, हृदयरोग, मधुमेह, क्षय, कर्करोगाचे युवकांतील वाढते प्रमाण हा या धोरणातील चिंतेचा विषय म्हणून अधोरेखित करण्यात आला आहे. त्यानुसार उपचारांबरोबर प्रतिबंधाकडे लक्ष पुरविण्याचे निश्चित केले गेले आहे. क्रीडा क्षेत्र विकास हा समर्थ व सुदृढ युवा पिढी निर्मितीचा कार्यक्रम बनविण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. युवकांत मूल्यनिष्ठा वाढीकडे खास लक्ष पुरविले जाणार आहे. भारतात जात, धर्म, भाषा, वंश, प्रांत, परंपरा, संस्कृतींचे वैविध्य आहे. या पार्श्वभूमीवर युवकांत दया, क्षमा, शांती, अहिंसा असणे आवश्यक नाही तर अनिवार्य झाले आहे. भारतीय घटनेनुसार स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, विज्ञाननिष्ठा यां मूल्यांना असाधारण महत्त्व आहे. शिवाय ते युवकांवर बंधनकारकही आहे, हे लक्षात घेऊन अभ्यास, उपक्रम, इत्यादींची पुनर्रचना करण्याचे धोरण स्वीकृत केले आहे. युवकांची सामाजिक बांधीलकी व त्यांचा समाजसहभाग कसा वाढेल या दृष्टीने विविध उपक्रम, कार्यक्रम भविष्यात योजले जाणार आहेत. प्रशासन व राजकारणातील युवकांची सक्रियता व सहभागावर दिलेला भर या धोरणाचे व्यवच्छेदक असे लक्ष्य आहे. त्यामागे भारताचा वर्तमान लज्जास्पद चेहरा बदलून त्याजागी पारदर्शी प्रशासन व भ्रष्टाचारमुक्त राजकारण तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. हे वर्तमान युवा पिढीपुढील खरे आव्हान असून ती ते कसे पेलते यावरच भारताचे चरित्र उद्या निश्चित होणार आहे. युवाशक्ती सबलीकरणाचे विविध कार्यक्रम ‘युवा धोरण - २०१४ मध्ये सुचविण्यात आले असून त्यांच्या कार्यक्रम अंमलबजावणीवर उद्याच्या भारताचे भविष्य आणि भवितव्य अवलंबून आहे. युवकांचे सामाजिक आणि आर्थिक समावेशन करण्याच्या उद्देशाने वंचित, उपेक्षित युवक विकास, शिक्षणमानाची सरासरी वाढविणे, संस्थाश्रमी, अनाथ, निराधार युवकांचे पुनर्वसन, उद्योजकता विकास, सेवायोजन इत्यादी गोष्टींना या धोरणात दिलेले महत्त्व म्हणजे सामाजिक न्यायाची वंचितांना दिलेली हमीच म्हणायला हवी.
आज केंद्र शासन प्रत्येक युवकामागे रु. २७१० खर्च करते. शिवाय अन्य माध्यमातून ११०० रुपये युवकांवर दरडोई खर्च होत असतो. भविष्यकाळात युवा वर्ग देशविकासाचे केंद्र बनविले जाऊन युवा विकास
हा देशाचा प्राधान्यक्रम बनविण्याचे या धोरणाचे उद्दिष्ट राहणार आहे. विविध खात्यांचे मंत्री युवा संपर्क अभियानाचा भाग म्हणून आपल्या मंत्रालयाच्या माध्यमातून विशेष उपक्रम योजणार आहेत. माहिती व तंत्रज्ञानाचा यासाठी वापर केला जाणार असून भविष्यकाळात मोठ्या प्रमाणात युवा जाणीवजागृती व नेतृत्वविकासाचे कार्यक्रम योजिले जाणार आहेत. कार्यशाळा, चर्चासत्रे, परिषदा इत्यादींबरोबर सोशल नेटवर्किंगचा द्रष्टा वापर करण्याचा केंद्र सरकारचा संकल्प आहे. त्यासाठी युवाविकासार्थ स्वतंत्र संकेतस्थळ, संस्थळ (Portal), ब्लॉग, ट्विटर इत्यादींचा वापर केला जाणार आहे.
एकविसाव्या शतकातील युवकांसमोर जागतिकीरण उदारीकरण, खासगीकरण, उदार अर्थ धोरण, बहुराष्ट्रीय कंपनी विस्तार या सर्वांच्या पार्श्वभूमीवर युवक ‘कर्ता' (Doer) व ‘सक्षम' (Enabler) बनविणे हे आपल्या देशापुढील खरे आव्हान आहे. युरोपमधील देशांत वा प्रगत जगात युवक स्वावलंबी, मिळवते व स्वतंत्र विचारांचे बनताना दिसतात. आपल्याकडील युवकांचे अवलंबित्व नष्ट करणे, त्याला पर्याय देणे, निर्माण करणे ही आता काळाची गरज झाली आहे. त्या अनुषंगाने या धोरणात कूटनीती अवलंबिली जाणार असून, तसे झाल्यास लवकरच आपल्या देशात प्रगल्भ युवा पिढीचे दर्शन होऊ शकेल. यासाठी माहिती तंत्रज्ञान व युवक संघटनांचा द्रष्टा वापर करण्याची शिफारस धोरणात करण्यात आली आहे.
मी तरुण असताना बाबा आमटेंची युवकांची व्याख्या वारंवार ऐकवली जायची. ‘युवक तो, ज्याच्या तरुण खांद्यावर तरुण डोके असते. यातील मथितार्थ इतकाच की, जबाबदारी व ती पेलण्यासाठीच भान ज्या पिढीत असते ती तरुण. युवा पिढीसाठी योजलेले हे धोरण कागदावरचा संकल्प न राहता कृतिकार्यक्रम होईल तर युवकांना 'अच्छे दिन' पाहायला मिळतील व देश संख्येने नव्हे तर कार्यक्षमतेने तरुण होईल.
┅
समाजात दोन प्रकारची माणसे राहतात. १) कुटुंब असलेली, २) कुटुंब नसलेली. कुटुंब असलेली माणसं स्थूल अर्थाने ज्याला आपण 'घर' म्हणतो तिथं राहतात. ती जन्मसंबंधांनी एकमेकांशी जोडलेली असतात. ती रक्तसंबंधांवर आधारित असतात. त्यात नाती असतात. आजी-आजोबा, आई-वडील, भाऊ-बहीण इ. यांचे वर्ग, जात, धर्म, वंश, परंपरागत संबंध विकसित होत असतात. यापेक्षा वेगळी माणसंपण समाजात राहत असतात. हे वेगळेपण समाजानं त्याच्या विवाह, जन्म, जात, धर्म, वंश, स्वरूपसंबंधी नैतिकता, परंपरा, रूढी, संबंध, नाती इ. दृष्टिकोनातून निर्माण केलेलं असतं. उदा. अनाथ, अनौरस, निराधार, बलात्कारित, कुमारी माता, वेश्या, कुष्ठरोगी, देवदासी आणि त्यांची अपत्ये, धरणग्रस्त, युद्धग्रस्त कुटुंब, बंदी बांधव (कैदी), वृद्ध, अपंग, मतिमंद, घटस्फोटित, परित्यत्या, एडस्ग्रस्त, तृतीयपंथी, दत्तक अपत्ये व त्यांचे कुटुंब... किती प्रकार सांगू? यांना रूढ अर्थाने आई, वडील, कुटुंब, घर सारं असतं; पण समाज हा परंपरामान्य संबंधावर उभा असल्याने समाज अमान्यांना नाकारलं जातं. मग ती मुलं, महिला, माणसं... माणसं असूनही संस्थात राहण्याची नामुष्की समाज त्यांच्या माथी मारतो. मग संस्था हेच त्यांचं घर, कुटुंब, नातं होतं व तिथे ती राहतात. असं कुटुंब नसलेल्यांचं एक कुटुंब... वंचितांचं कुटुंब तयार होतं. हेही अनेक प्रकारचे असतं. म्हणजे समाजातील अन्य घरांसारखं स्त्री, पुरुष, मुलं असलेलं. नुसतं मुलांचं, कधी नुसतं मुलींचं. तर कधी मुली, महिला, वृद्धांचं. कधी नुसतं युवकांचं. कधी नुसतं प्रौढांचं. कधी वृद्ध आजी-आजोबांचं, तर कधी चक्क एक दिवसाच्या बाळापासून ते १00 वर्षांच्या आजीआजोबांचंपण. ही कुटुंबे म्हणजे समाजानं नाकारलेल्या, उपेक्षिलेल्यांच्या संस्था होत. अर्भकालय, अनाथाश्रम, महिलाश्रम, रिमांड होम, वृद्धाश्रम, तुरुंग, आधारगृह, खुले तुरुंग, वसतिगृहे इथंही नाती असतात, पण मानलेली.
एक रक्तसंबंधांचा धागा सोडला तर इथं सारं कुटुंबासारखं असतं. जन्म, बारसं, संगोपन, शिक्षण, विवाह, माहेरपण, बाळंतपण, दिवाळसण, सारे सण समारंभ अन् हे सारं कुणाचं कोण नसताना मोठ्या गुण्यागोविंदानं चाललेलं असतं.
माझा जन्म अशा एकात्मिक, संस्थात्मक कुटुंबात झाला. मी अशा संस्थात्मक कुटुंबात राहत मोठा झालो. शिकलो, सवरलो, सावरलोही. पुढे कळत्या वयात अशा संस्थांच्या विकासाचे काम करीत राहिलो. आताही करतो; पण पूर्वीसारखं पूर्णवेळ नाही. त्यामुळे जन्मापासून ते आत्तापर्यंतचा माझा प्रवास कोणीच, काहीच नसलेली एक व्यक्ती ते आत्ता सर्व नाती असलेला व सर्वकाही असलेला समाजमान्य माणूस... असा प्रवास थोड्याफार फरकाने या कुटुंबातील सर्वांचाच राहतो. काळ वेगळा, कारणं वेगळी, संबंध वेगळे; पण हे कुटुंब वर्षानुवर्षे नसलेल्यांना आपलं करून सांभाळतं. मुलगी सुस्थळी द्यावी तसं समाजात प्रत्येकाचं पुनर्वसन कसं होईल, तो समाजाच्या मध्य प्रवाहात सामील होऊन अन्य सर्वसाधारण कुटुंबातील माणसासारखा होऊन संस्थेचा त्यावरील शिक्का पुसून कसा जाईल हे पाहतं. अशा संस्थात्मक कुटुंबांची स्थापना वेगळ्या कारण, गरजांनी झालेली असल्यानं यातील प्रत्येक कुटुंबांचे स्वरूप, कार्यपद्धती, नातेसंबंध वेगवेगळे असतात.
अर्भकालय
इथं एक दिवसाच्या बाळापासून ते पाच वर्षांपर्यंतच्या मुलांचे संगोपन होतं. समाजात कुमारी मातांची मुलं, शिवाय टाकलेली, सोडलेली, हरवलेली मुलं असतात. ती कधी संस्थेत जन्मतात, कधी कुमारी माता आणून देते तर कधी टाकलेली, सापडलेली, हरवलेली मुलं पोलीस आणतात. अशा संस्थांमध्ये त्यांच्या संगोपनाची सर्व व्यवस्था असते. पाळणे, खेळणी, भोजन, दूध, औषधं, कपडालत्ता, मनोरंजनाची साधनं सारं असतं. सांभाळायला दाया, नर्स, डॉक्टर असतात. त्या दाया, नर्स, डॉक्टर त्यांच्या आई, मावशी, काकी, काका, ताई होतात. मुलं-मुली एकमेकांचे भाऊ-बहीण. रक्षाबंधन, भाऊबीज, दिवाळी, दहीहंडी सारं असतं. नसतात फक्त जन्मदाते आईबाबा. ते समाजाने निर्माण केलेल्या नात्यांच्या भिंती व भीतीमुळे भूमिगत असतात, होतात. युरोपात जसं कुमारी मातेस आपल्या बाळाला घेऊन सन्मानाने जगता येतं, त्यासाठी सर्व सुविधा, सवलती, आधार, अर्थबल असतं, तसं आपणाकडेही असायला हवं. नैतिकतेच्या दुराग्रहामुळे आपण आई-मुलाची ताटातूट करतो, हे आपल्या लक्षात येत नाही.
अर्भकालयातली जी मुलं पूर्ण अनाथ, निराधार असतात, त्यांना दत्तक दिलं जाऊन आई, बाबा, घर, नाव, संपत्ती, अधिकार देऊन नागरिक बनण्यास मदत केली जाते. जी मुलं दत्तक जाऊ शकत नाहीत, ज्यांचे आई-बाबा असतात वा दूरचे नातेवाईक असतात; पण जे अशा काही मुलांचा घरी सांभाळ करू शकत नाहीत, अशी मुलं-मुली वर्षांपेक्षा मोठी झाली की वेगळ्या संस्थांत पाठविली जातात. तिथं त्यांचं शिक्षण, संगोपन होत राहतं. व्यसनाधीन पालक, दुभंगलेली कुटुंबे, बंदीजनांची अपत्ये सा-यांचा सांभाळ होत रहातो.
महिला आधारगृह/महिलाश्रम
अठरा वर्षांवरील कुमारी माता, बलात्कारित भगिनी, परित्यक्ता, घटस्फोटिता, वेश्या, देवदासी, घर सोडून पळून, भांडून आलेल्या अशा कितीतरी भगिनींचा सांभाळ करणारं हे माहेर. हो, माहेर! कारण यांना समजून घेऊन, समजावून सांगून त्यांना समाजापासून संरक्षित केलं जातं. यांच्यासाठी समाज असुरक्षित बनलेला असतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कुमारी माता आली तर तिच्या इच्छेनुसार गर्भपात, बाळंतपण होणार असेल तर तोपर्यंतचा सांभाळ, बाळंतपण, नंतर बाळाचं दत्तकीकरण, या मुलींचे नंतर विवाह, माहेरपण, डोहाळे सारं संस्था करीत असते. तिथले अधिकारी, कर्मचारी, काळजीवाहक डोळ्यांत तेल घालून त्यांची काळजी घेत असतात. हे खरं असलं तरी ते आई, वडील, पती, प्रियकर होऊ शकत नाहीत. पर्यायी पालकाची भूमिका संस्था अधिकारी, कर्मचारी बजावत असतात. मुली-महिलांत बहीण, मैत्रीण, मावशी, काकी, मामी इत्यादी नाती आकार घेतात. ती संस्थेत असेपर्यंत राहतात. काहींची नंतरही सांभाळली जातात. अशा संस्थात्मक कुटुंबांचं एक बरं असतं, इथं घरासारखी नाती लादली जात नाहीत, ती लाभतात. इथली नाती ऐच्छिक असतात. इथं सक्तीच्या नात्यांचा धाक, काच नसतो.
बालकाश्रम/बालिकाश्रम
वय वर्षे ६ ते १८ वयोगटातील अनाथ, निराधार मुला-मुलींच्या स्वतंत्र संस्था असतात. काही ठिकाणी (महिलाश्रम) १० वर्षांपर्यंतची मुलं व १८ वर्षांपर्यंतच्या मुलींचा एकत्र सांभाळ होत असायचा. आता माध्यमांच्या विकासामुळे मुलं-मुली लवकर प्रौढ होऊ लागली. त्यांना लवकर समजू लागलं म्हणून ती स्वतंत्र सांभाळली जातात. या वयोगटातील मुला-मुलींच्या सामाजिक प्रश्नांवर, स्वरूपावर आधारित वेगवेगळ्या संस्था
अस्तित्वात आहेत. उदा. निरीक्षणगृह, बालगृह, विशेषगृह, अनुरक्षणगृह इत्यादी निरीक्षणगृहात बालगुन्हेगार व निराधारांचा सांभाळ होतो. यांचा सांभाळ कालावधी तीन ते सहा महिने असतो. बालगृहात मुलं-मुली सज्ञान होईपर्यंत सांभाळली जातात; तर अनुरक्षण गृहात सज्ञान झालेली मुलं-मुली। असतात. निरीक्षणगृहात बंदिस्तपणा असतो. शिक्षण, प्रशिक्षण, संस्कार, समुपदेशन, निवास, भोजन या साच्या सुविधा तिथे असतात. बालगृहात हे सारं खुल्या वातावरणात मिळतं. शिवाय इथला कालावधी दीर्घ असतो. अनुरक्षणगृहात रोजगार, सेवायोजन, विवाह, नोकरी इ. पुनर्वसन केंद्रित सुविधा पुरवून त्यांना स्वावलंबी बनवून समाजाच्या मध्य प्रवाहात सुस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. या सा-या संस्था काही शासन चालवित तर काही स्वयंसेवी संस्था. त्यामुळे अशा संस्थांना कुटुंबाचं येणारं औपचारिक, अनौपचारिक रूप तेथील यंत्रणेवर अवलंबून असतं. ‘आश्रम नावाचे घर', ‘खाली जमीन, वर आकाश', ‘पोरके दिवस’, ‘बिनपटाची चौकट'सारख्या आत्मकथनातून या संस्थांच्या कुटुंब पद्धती, नाती, संबंध इत्यादींबाबत विस्ताराने लिहिलं गेलं आहे. शिवाय अशा संस्थांचे कार्य करणारे कार्यकर्ते होते त्यांचीही आत्मवृत्ते संस्थात्मक एकात्मिक कुटुंबाबाबत बरंच काही सांगून जातात. धोंडो केशव कर्वे यांचे आत्मवृत्त', कमलाबाई देशपांडेचं ‘स्मरण साखळी', विभावरी शिरूरकरांचं ‘कळ्यांचे निःश्वास', पार्वतीबाई आठवलेंचे 'माझी कहाणी', आनंदीबाई कर्वेचं ‘माझे पुराण' अशी मोठी यादी सांगता येईल. रेणू गावसकरांचं ‘आमचा काय गुन्हा'च्या प्रस्तावतेत ती मी विस्ताराने दिली आहे. रेणुताईचं पुस्तकही असंच वाचनीय.
तुरुंग, वसतिगृहसारख्या संस्थाही एकात्मिक संस्थात्मक कुटुंबाचाच हिस्सा असला तरी तिथे कुटुंब भाव तिथल्या औपचारिक व्यवस्थेत फार अल्प असतो.
समाजपरिघाबाहेरील कुटुंबातील नातेसंबंध
समाजातील सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्तींमध्ये एकमेकांबद्दल असलेला आपलेपणा हा व्यक्तिगत संबंधातून तयार होत असतो व तो जन्मभर राहतो. संस्थात्मक कुटुंबातील मानवी संबंध हे त्या व्यक्तीच्या संस्थेतील निवासकालापुरते मर्यादित असल्याने त्यांना एक प्रकारची औपचारिकता तर असतेच; पण शिवाय ते काळाच्या अंगाने क्षणिक, तात्पुरते असतात. अपवादाने इथे संस्थेनंतरच्या काळातही हे संबंध जपले, जोडले जातात; पण ते त्या व्यक्तीवर अवलंबून असते. शिवाय या कुटुंबाचे सारे व्यवहार सामूहिक असतात.
संस्थात्मक, एकात्मिक कुटुंबात व्यक्तिसंबंधांना आत्मीयतेचा स्पर्श असल्याने लाड, कोड-कौतुक, रुसणं, फुगणं होत मुलं वाढतात. तिथं घडणं असतं तसं बिघडणं पण; परंतु संस्था कुटुंबात परिपाठ, शिस्त, वेळापत्रक, नियम असल्याने बिघडण्यास वाव नसतो. तिथं मुलं, मुली लवकर स्वावलंबी, प्रौढ, जबाबदार होतात. खरं तर अकालीच प्रौढत्व येतं त्यांना. आदर, आज्ञाधारकपणा, नियमितता इ. गोष्टी संस्थात्मक रचनेतून व्यक्तीस मिळालेलं वरदान ठरतं.
संस्थात्मक कुटुंब हे खरं धर्मनिरपेक्ष कुटुंब असतं. इथं जात, धर्म, वंश, उच्चनीचता, आपपर भेद यांना वाव नसल्याने थाराच नसतो. ‘सब घोडे १२ टक्के असा प्रघात असल्यानं कुटुंबातला लाडका, दोडका, जवळचा, लांबचा, सख्खा-चुलत असे भेद नसतात. सर्व प्रकारची समानता हे मोठं मानवी मूल्य या कुटुंबात आपसूक आढळतं.
मुली-महिलांच्या संस्थांच्या कुटुंबाचं स्वरूप मातृसत्ताक असतं, तर मुलांच्या संस्थांचं कुटुंब पितृसत्ताक असतं. तुलनेनं मुली, महिलांच्या संस्थात्मक कुटुंबात आस्था, प्रेम, भावुकता, आपलेपणा अधिक प्रमाणात आढळतो.
समाजातील कुटुंबे आकार, संख्येनं छोटी होत निघालीत, तर संस्थात्मक कुटुंबे आकारानं, संख्येनं वाढत आहेत, हे समाज कुटुंबाची दिवाळखोरी सिद्ध करणारं ठरावं.
संस्थात्मक एकात्मिक कुटुंबातून आदर्श नागरिक घडविण्याची प्रक्रिया घडत असल्याने समाज आदर्श, प्रगल्भ, जबाबदार होण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरते.
समाजातील सर्वाधिक वंचित, उपेक्षित, अपंग, वृद्ध, नाकारलेल्यांना स्वीकारून त्यांना सबळ, स्वावलंबी, संस्कारी बनविण्याचे संस्थात्मक कुटुंबांचे कार्य सकारात्मक मानावे लागेल.
नवसमाज निर्माण करणारं कुटुंब
माझ्या अनुभवाच्या आधारे अशी धारणा झाली आहे की, संस्थांचं एकात्मिक कुटुंब हे जागतिकीकरणाने निर्माण होणा-या नव्या संस्कृती व समाजाचं 'रोल मॉडेल' होय. हा एकविसाव्या शतकातील नव्या कुटुंबरचनेचा वस्तुपाठ म्हणूनही या कुटुंबाकडे पाहता येईल. जात, धर्म, वंशांची कोळिष्टके नसलेली ही कुटुंब. नव्या मानव अधिकार संकल्पनेस अभिप्रेत असलेला समाज निर्माण करण्याची क्षमता समाज कुटुंबांपेक्षा संस्था कुटुंबात अधिक
दिसून येते. ही कुटुंबे एकच जात मानतात, ती म्हणजे 'मनुष्य'. यांचा एकच धर्म असतो, ‘मानवधर्म'. नातं एकच असतं, ‘माणुसकी'. त्या दृष्टीने हे कुटुंब पुरोगामीच म्हणावं लागेल. या कुटुंबाच्या तुलनेत समाजातील कुटुंब पारंपरिक ठरतात खरी ! विज्ञाननिष्ठा, समता, बंधुता ही या कुटुंबाची जीवनमूल्ये असतात. संधी देण्यावर, सुधारण्यावर, प्रयोगावर या कुटुंबांचा भर असल्याने इथे ‘सक्सेस स्टोरीज'चा कधी दुष्काळ असत नाही. ‘पॉझिटिव्ह रिझल्टस' अधिक ! येशु ख्रिस्ताचा उदार दृष्टिकोण हे या कुटुंबाचं तत्त्वज्ञान होऊन जातं, ते या कुटुंबाच्या कार्यपद्धतीमुळे. 'लेकरू अज्ञानी होतं, त्याला क्षमा करा' म्हणणारं हे कुटुंब सकारात्मक असतं. निषेधाला नकार व विधीला होकार ही इथली ‘बाय डिफॉल्ट सिस्टीम' असते.
बुद्धाची चरमक्षमा शोधायची तर तुम्हाला याच कुटुंबाचं शरणागत व्हावं लागेल. करुणा व क्रौर्य यांचं अद्वैत या कुटुंबात आढळतं. क्रौर्य समाज करतं. संस्था करुणा देते ! पाप समाज करतो. पुण्य संस्थेच्या पदरी उपजत असतं. पापी माणसांची तुटलेली बेटं म्हणून निर्माण केलेल्या या संस्था ... पण त्या कोणी निर्माण केल्या याचाही विचार नव्या समाजरचनेच्या संदर्भाने व्हायला हवा. संस्थेत राहणारे बळी... त्यांचा काय दोष हेही एकदा संवेदनशीलतेनं समजून घ्यायला हवं. देव, दैव, कर्मफल, पाप-पुण्य, उच्च-नीचता, सवर्ण-अवर्ण, स्त्री-पुरुष अशांना थारा नसलेली ही कुटुंब अनुकरणीय नव्हेत का? इथं स्वार्थ नसतो. 'कर्मण्येधिकारस्ते मा फलेषु कदाचन' अशा निष्काम वृत्तीनं कर्तव्य पार पाडणारी ही कुटुंबं ! कबीर, कर्ण यांचे आदर्श, महात्मा फुले, पंडिता रमाबाई, भारतरत्न धोंडो केशव कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, प्रभृतींनी त्याग, समर्पण, ध्येय इत्यादींतून या कुटुंबांचा पाया रचला. समाजातून सर्व प्रकारची वंचितता हद्दपार करण्याचा विडा उचललेली ही कुटुंबे. यांच्याकडून समाजातील परंपरागत कुटुंबांना बरंच शिकता येण्यासारखं आहे. वर्तमान कुटुंबव्यवस्था, नातेसंबंध इत्यादींबद्दल पुनर्विचार, फेरमांडणी करायची झाल्यास संस्थात्मक, एकात्मिक, वंचित कुटुंबांना समजून घेतल्याशिवाय समाजपरीघ आपणास रुंदावता येणार नाही. संघर्षापेक्षा हे कुटुंब समझौता, समन्वय महत्त्वाचा मानते. कुणी आपल्या वाटेत काटे पसरले तर त्या जागी फुले पसरण्याचा उदारमतवाद ही या कुटुंबाची शिकवण होय. मनुवादाला छेद देत विशुद्ध मानवतावाद जोपासणारी ही कुटुंबं नवसमाज निर्माण करणारी ऊर्जाकेंद्रे होत. स्त्री-पुरुष भेद मिटवून माणुसकीची साद घालणारी ही कुटुंबे अधिक नैतिक, पारदर्शी होत. ज्यांना कुणाला आपलं कुटुंब नव्या शतकाचं, नव्या
विचाराचं, नव्या आदर्शाचं बनवायचं असेल व कुटुंब संकल्पनेची नवी मांडणी करायची असेल त्या सर्वांना संस्थात्मक, एकात्मिक वंचितांची कुटुंबं अनुकरणीय ठरतील, असा अनुभवांती माझा विश्वास आहे.
कुटुंब नसलेल्यांची कुटुंबे (उत्तरार्ध)
वरील सारं विवेचन तुम्हाला वैचारिक, काल्पनिक, आदर्शासाठी केलेली रचना वाटेल म्हणून मी आमच्या संस्थेचंच उदाहरण देतो. आमच्या संस्थेचं हे उदाहरण अपवाद असलं तरी अनुकरणीय वाटतं. मी पुढे मोठा झाल्यावर महाराष्ट्रातील अनाथाश्रम, रिमांड होम, महिलाश्रम, बालगृह चालविणाच्या संस्थांचा अध्यक्ष होतो. त्या काळात मी महाराष्ट्रातील अशा एकूण एक संस्था पहिल्या आहेत. थोड्याफार फरकाने कुटुंबभाव, मानलेली नाती, आप्तसंबंध तेथील लाभार्थ्यांच्या जीवनात संस्थाकाळास तयार होतात व पुढे औपचारिक, अनौपचारिकपणे आयुष्यभर चालत राहतात.
माझा जन्म पंढरपूरच्या वा.बा. नवरंगे बालकाश्रमात सन १९५0 ला झाला. ती संस्था मुंबई प्रार्थना समाजातर्फे चालविली जायची. ती चालविण्यामागे फार मोठा मानवी दृष्टिकोन होता. समाजाने नाकारलेल्यांना स्वीकारायचं नि त्यांना 'माणूस' म्हणून परत समाजात सुस्थापित करायचं. संस्थेत असा कुठेच फलक नव्हता., ‘ही संस्था मातेचं कार्य करते'... पण प्रत्यक्षात ते व्हायचं. त्या संस्थेत कोण नव्हतं ? कुमारी माता, परित्यक्ता, बलात्कारित भगिनी, शिक्षा झालेल्या कैदी भगिनी, त्यांची मुलं, अपंग, मतिमंद, वेडे, अनाथ, निराधार, चुकलेली, सोडलेली, पळून आलेली मुलं, मुली, वृद्धा... कोण नव्हतं असं नाही. एक दिवसाच्या बाळापासून ते १०० वर्षांच्या वृद्धेपर्यंतच्या ३००-३५० मुले, मुली, महिलांचे कुटुंब. एक निपुत्रिक जोडपं होतं. ते सारी संस्था पाहायचं. जव्हेरे नाव. बाबा जव्हेरे नि ताई जव्हेरे, शिपाई, क्लार्क, स्वच्छक, लाकूडतोडा, माळी असा पुरुष स्टाफ; पण ते नोकर नव्हते. संस्थेतच राहायचे. आई-बाबा शिवाय, नाना, काका, अप्पा, मामा अशीच नावे त्यांची. मोठे झाल्यावर त्यांची खरी नावं कळली. हे सारे परत एकाच कुटुंबातील. त्यांच्या पिढ्या काम करायच्या. संस्थेत दवाखाना, शाळा, स्वयंपाकघर, शिवणक्लास, ग्रंथालय, खेळघर, कोठी, बालमंदिर सारं होतं. कुमारी माता यायच्या. सहा-सात महिने राहायच्या. बाळाला जन्म देऊन बाळ ठेवून निघून जायच्या. माझ्या समजेच्या गेल्या पन्नास वर्षांच्या प्रवासात हजारो कुमारी माता आल्या, गेल्या व समाजात पुन्हा संभावित, गर्या होऊन सुखाचं जीवन जगू लागल्या. त्यांची मुलं-मुली रामभरोसे जगायची.
कुमारी आई मुलाला जन्म देऊन लगेच महिन्या दोन महिन्यांत काढता पाय घ्यायची... तिचे आई-वडील समाजभयानं तिला मोकळे करण्यापुरते ठेवायचे... दूधपितं बाळ आईच्या अचानक भूमिगत होण्यानं 'Mother Sick' व्हायचं. आश्रमानं मोठी विलक्षण रचना केलेली होती. आश्रमाच्या शेजारीच कैकाडी गल्ली होती. तिथं बाळंत झालेल्या बायका (Wet Mothers) असायच्या. त्यांना आश्रम मुलांना पाजायसाठी असायचा... मोबदला द्यायचा. शिवाय संस्थेत बाळंत झालेल्या कुमारी मातांना ज्यांना दूध जास्त असायचं ... सिस्टर, नर्सेस त्यांचा पान्हा जिरवण्या, रिचविण्यासाठी पाजायला अन्य मुलं-मुली द्यायच्या. ती बापडी आश्रमाच्या ऋणातून अशी उतराई व्हायची.
आश्रमात पाय घसरलेल्या, सोडलेल्या, चारित्र्याच्या संशयावरून टाकलेल्या परित्यक्ता असायच्या. त्यांना घर, नातेवाईक कायमचेच तुटलेले असायचे. त्यांना घर पारखं झालेलं असायचं. आता आश्रम हेच त्यांचं घर व्हायचं. आयुष्य त्यांना इथंच काढायचं असायचं. अशांना आश्रम स्वयंपाक, नर्सिंग, मुलांचा सांभाळ, स्वच्छता, शिकवणं, शिवणकाम, शुश्रूषा, संगीत, कार्यालयीन अशी कामं द्यायच्या. ती देताना त्यांची आवड, शिक्षण, कल पाहिला जायचा. त्या कामाचा मोबदला (पगार) दिला जायचा. शिवाय त्यांच्या मनाची पोकळी भरून निघावी म्हणून त्यांना मुलं, मुली सांभाळायला द्यायचा. सगळ्यांना नाही पण काहींना आई, मावशी मिळायची. मोठ्या मुलींना लहान मुलं, मुलीकडे विशेष लक्ष द्यायला शिकवलं जायचं. अशातून आई, ताई, माई, भाऊ, बहीण नाती तयार व्हायची.
मुलं मोठी झाली की संस्थेच्या मुंबईच्या बालकाश्रमात पाठवायची. ती दिवाळी, मे महिन्यात परत आश्रमात येत राहायची. पुनर्भेटीतून आईमुलाचं नातं विणलं जायचं. मुली मोठ्या झाल्या की लग्न होऊन सासरी जायच्या; पण माहेरी येत राहायच्या. डोहाळे, बाळंतपण, दिवाळसण सारं होत राहायचं. मुलं मोठी झाली की सांभाळणाच्या आईला आपल्या घरी घेऊन जायची. काही मुलीपण. मग त्या मुलांचं लग्न व्हायचं. त्यांचं घर, नातं तयार व्हायचं. आश्रमातून अशी कितीतरी घरं, कुटुंब, नाती तयार झाली.
आमच्या या परिवाराचं नाव आहे 'स्नेह सहयोग'. नात्याचा धागा प्रेम. कार्य-एकमेकांस मदत करणं, आधार देणं, सुख-दुःखात सहभागी होणं. आता आमच्या कुटुंबात आम्ही आजी-आजोबा झालोत. घरी सुना, नातवंडे आहेत. सुनांमुळे नवी समाज घरं, कुटुंब, नाती जुळून आमची कुटुंबे
आता तुमच्यासारखीच झालीत. घरं, गाडी, घोडे, फ्लॅट, विदेश दौरे सारं सुरू असतं. काही नातवंडे, मुलं, मुली एन. आर. आय. पणमी. माझंच सांगायचं झालं तर महाराष्ट्रात मला कुठल्याही गावी लॉजमध्ये रहावं लागत नाही. विदेशात युरोपात तर सगळ्या देशांत आमची घरं, कुटुंबं आहेत. सगळी कुटुंबं आंतरजातीय, आंतरधर्मीय, आंतरदेशीय, आंतरराष्ट्रीय, बहुभाषी, संस्कृतीबहुल! 'वसुधैवकुटुंब', 'आंतरभारती', 'हे विश्वची माझे घर' तुम्ही घोकता... आम्ही अनुभवतो... जगतो.
┅
आपल्याकडे व्यक्ती बद्दल ब-याच वेळा चुकीच्या समजुती पसरविल्या जात असतात. दत्ता बाळ यांच्याबाबतीत तुम्हाला हे सांगता येईल. दत्ता बाळ हे कोण होते? ते योगी होते की विचारवंत होते? त्यांना धर्म श्रेष्ठ होता की अध्यात्म? ते वैज्ञानिक होते का? असे प्रश्न केव्हातरी आपण माणसाच्या बाबतीत उभे केले पाहिजेत आणि ते उभे केल्यानंतर प्राप्त पुराव्यांच्या आधारे जेव्हा तुम्ही माणसे वाचायला लागता तेव्हा आपले सगळे गैरसमज दूर होतात. तसे दत्ता बाळ यांच्या बाबतीत सांगता येईल. दत्ता बाळ हे पूर्णतः वैज्ञानिक विचार करणारे गृहस्थ होते. जगामध्ये ‘विज्ञान आणि अंधश्रद्धा' यांचा संघर्ष शतकानुशतके सुरू आहे आणि या संघर्षाची, विवादाची सुरुवात माणूस जेव्हा प्रश्न करायला लागला तेव्हापासून झाली.
आज आपण एकोणीसशे, वीसशे शतके मागे टाकून एकविसाव्या शतकात प्रवेश करते झाले आहोत, त्याचे एक तपही उलटलेले आहे. पूर्वी जेव्हा मनुष्य विचार करीत नव्हता, तेव्हा तो कुठेतरी जंगलात, गुहेमध्ये राहायचा. त्या काळी माणसाला निसर्गाचे प्रचंड भय होते. त्याला माहीत नव्हते की, निसर्गामध्ये ज्या उलथापालथी होतात, त्यांचा स्वत:चा असा एक क्रम आहे आणि मनुष्य तो थोपवू शकत नाही. विज्ञानाच्या जोरावर आज माणसाने इतकी शक्ती मिळवली; पण तरीसुद्धा माणसाला हा निसर्गाचा क्रम थांबविता आला नाही. जेव्हा माणसाला स्वत:च्या शक्तीचा परिचय नव्हता, अशा काळात माणसाचे भिणे आणि २०१४ साली माणसाचे भिणे यांत फरक आहे. वनमनुष्य निसर्गाला घाबरायचा. त्याला आकलन नसल्याने तो घाबरायचा. आकलन होऊनसुद्धा मनुष्य घाबरतो तेव्हा विचार करण्यासारखी गोष्ट असते. विज्ञानाचा पदवीधर, शिक्षक, पीएच. डी.धारक माणूस जेव्हा कर्मकांड करायला लागतो तेव्हा मात्र मला जास्त भीती वाटते. भीती वाटण्याचे कारण म्हणजे मनुष्य शिकला की नाही? आणि शिकला तर काय
शिकला? डोक्याचे शिकला की पोटाचे शिकला ? असे प्रश्न वारंवार पडतात. जगामध्ये ‘प्रबोधन' नावाचे जे युग निर्माण झाले, त्याने माणसाला ‘माणूस कोण आहे? हे शिकविले. आपण सगळ्या धर्म व अध्यात्माच्या संस्थापकांचा विचार केला तर या लोकांनी आपापल्या परीने खरं काय नि खोटं काय याचे आकलन करण्याचा प्रयत्न केला. ‘दत्ता बाळ यांनी ‘विज्ञान आणि अध्यात्म' हे एका सूत्राने छान पद्धतीने सांगितले आहे."अध्यात्म म्हणजे व्यक्तीच्या अंगांनी घेतलेला शोघ, तर विज्ञान म्हणजे वस्तुनिष्ठ अंगांनी तटस्थपणे केलेला सत्याचा शोध होय." आज पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही, हे सत्य आहे आणि हे सत्य ज्ञानाचा पराभव करणारं आहे. १९७० साली गारगोटीत शंकर धोंडी पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चाने मला हा परिसर समजावून सांगितला. आपण शिकत असताना नोकरीचे सत्य शोधत असतो. वास्तव बदलले आहे. माझ्या समाज निरीक्षणानुसार गेल्या ३०-४० वर्षांत माणसांत फक्त वरवरचे बदल झाले आहेत. जगामध्ये जे बदल झाले आहेत, ते सगळे बदल जगावेगळ्या माणसांनी केले आहेत.
‘सॉक्रेटिस' नावाच्या मोठ्या विद्वानाने जगामध्ये ज्ञानाची परंपरा निर्माण केली. खरे तर ज्ञानाची परंपरा ग्रीसमधून जन्मास आली. जगातील सगळी वस्तुनिष्ठ ज्ञानाची परंपरा ग्रीक संस्कृतीमधून जन्मास, उदयास आली आहे. सॉक्रेटिसच्या काळात धर्मसत्ता व राजसत्ता या दोन्ही अत्यंत बलवान होत्या. वर्तमानामध्ये भारतातसुद्धा या दोन सत्ता प्रबळ झालेल्या आहेत. सॉक्रेटिसच्या काळात धर्माची, कर्मकांडाची तत्त्वे, नियम होते. या काळात धर्मसत्ता व राजसत्ता मिळून राज्य करीत होत्या. सॉक्रेटिसची घडणच जोपर्यंत मला एखादी गोष्ट पटणार नाही, तोपर्यंत मी ती मान्य करणार नाही.' अशी झाली होती. त्यामुळे सॉक्रेटिसने धर्मसत्ता व राजसत्ता यांना आव्हान दिले. याचे प्रायश्चित्त म्हणून सॉक्रेटिसला विषाचा पेला देऊन ठार मारण्यात आले. सॉक्रेटिसचा दोष कोणता होता तर तो खरे व मनातील बोलत होता. सॉक्रेटिसच्या काळातील बहुसंख्य लोक मनातील काही बोलत नव्हते. आपण कधी स्वत:ला प्रश्न करीत नसल्याने दुस-याला प्रश्न करू शकत नाही. जी माणसं स्वत:वर प्रेम करतात, स्वत:ला समजून घेतात, स्वत:ला प्रश्न विचारतात, ती नेहमी सजग असतात. सॉक्रेटिसने कधीही बुद्धिप्रामाण्याशी प्रतारणा केली नाही. हा आपल्यातील व सॉक्रेटिसमधील मूलभूत फरक आहे.
अॅरिस्टॉटलने ‘जोपर्यंत एखाद्या गोष्टीची मला प्रचिती येणार नाही, तोपर्यंत मी ती स्वीकारणार नाही', असे म्हटले होते गॅलिलिओची सर्वात मोठी क्रांती म्हणजे त्याने जगाची गती बदलली. गॅलिलिओने सगळ्या सृष्टीचे केंद्र पृथ्वी नसून सूर्य आहे हे सांगितले. संपूर्ण सृष्टीत होणारे परिवर्तन हे सूर्याशी निगडित आहे; पण त्या वेळच्या धर्मतत्त्वारनुसार सृष्टीतील बदलाचे केंद्र पृथ्वी होते. गॅलिलिओ धर्माच्या विरुद्ध बोलत होता. गॅलिलिओच्या काळात धर्म उदार झाला होता. त्या वेळच्या धर्मसत्तेने गॅलिलिओने धर्मसत्तेच्या विरोधात भाष्य केल्यामुळे त्याला आजन्म कारावासाची शिक्षा दिली तसेच सर्वांत मोठी शिक्षा म्हणून धर्माच्या प्रार्थना गुडघे टेकून म्हणायला लावल्या. ‘जो वर्तमानाचे सत्य सांगत होता त्याला अशा प्रकारची शिक्षा देण्यात आली. गॅलिलिओने सॉक्रेटिसचा मृत्यू, अॅरिस्टॉटलची उपेक्षा पाहिली होती. मधल्या काळात गॅलिलिओच्या मृत्यूनंतर त्याच्या शिष्यांनी गॅलिलिओचा एवढा प्रचार केला की, त्याचे म्हणणे केवळ ग्रीसमध्ये न थांबता युरोपमध्ये पसरले व युरोपमध्ये प्रबोधन पर्व सुरू झाले. त्या प्रबोधन पर्वाचे नाव 'विज्ञान' होय. युरोपमध्ये चर्चेस आहेत, आशियात मंदिरे आहेत. या दोन्हींमध्ये फरक कोणता असेल तर तो म्हणजे युरोपमधील चर्चेस ओस पडत आहेत, निर्मनुष्य होत आहेत; या उलट आशियातील मंदिरे ओस पडली नाहीत. उलट आशिया खंडामध्ये जसजशी समृद्धी आली तशी मंदिरांची परिस्थिती बदलली. आपण भौतिकदृष्ट्या समृद्ध झालो, पण बौद्धिकदृष्ट्या समृद्ध झालो नाही. वर्तमान समाज जर बौद्धिकदृष्ट्या समृद्ध झाला असता. तर तो युरोपसारखा अंधश्रद्धामुक्त झाला असता. आपण कितीही शिकलो तरी अंधश्रद्धामुक्त। होऊ शकत नाही, याचे कारण म्हणजे आपण उपजीविकेसाठी शिकलो. आपण ज्ञानाशी वाद घालण्यास शिकलो नाही. तुम्ही जे ज्ञान संपादन केले आहे, ते खरे आहे की नाही हे पडताळण्यासाठी एकदा कसोटी घेतली पाहिजे.
विनोबांचा ‘मधुकर' नावाचा एक निबंधसंग्रह आहे. त्यामध्ये त्यांनी ‘कृष्णभक्ती' नावाचा एक निबंध लिहिला आहे. माणसाचे प्रेम चांगल्या गोष्टीवर असते की वाईट गोष्टीवर' हा या निबंधाचा मुख्य विषय आहे. त्यामध्ये विनोबांनी भारतीय समाजाचा अभ्यास करून भारतीय समाज हा ‘कृष्णभक्त समाज आहे, असे विधान केले आहे. आपल्या सगळ्या अंधश्रद्धा ह्या कृष्णकृत्य आहेत. वाईटचीसुद्धा एक नशा असते; म्हणूनच माणसाला वाईटच जास्त आवडते. विनोबांच्या म्हणण्यानुसार माणसं
चांगलं आणि वाईट यांची जेव्हा चर्चा करायला लागतात, तेव्हा तो समाज जागरूक आहे असं म्हणायला काही हरकत नाही. जगामध्ये जी सगळी परिवर्तने झाली, विज्ञानाचा जो विकास झाला, त्याला ‘वादातून विकास हे सूत्र लागू झालेले दिसेल. वाद स्वत:शी व दुस-याशीही घातला पाहिजे. बगल देऊन जाणारे लोक नवा रस्ता निर्माण करीत नाहीत. नवा रस्ता थेट जाणारे लोक निर्माण करतात. मोठी माणसे प्रश्नांच्या पलीकडचे जग नेहमी शोधत असतात. वर्तमानाच्या पलीकडे जाऊन भविष्याचा शोध घेण्याची वृत्ती सॉक्रेटिस, गॅलिलिओ, अॅरिस्टॉटल या व्यक्तींकडे होती.
आशिया खंडातील व युरोप खंडातील लोक वेगवेगळे आहेत. आशिया खंडातील बहसंख्य लोक धार्मिक आहेत. याउलट युरोपातील अल्प लोक धार्मिक आहेत. आपल्या देशात किती प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत? तर अलीकडच्या काळातील अंधश्रद्धा म्हणजे ‘बुवाबाजी'. आपण कधी पारख करून एखाद्या बुवावर, गुरूंवर, महाराजांवर विश्वास ठेवत नाही. भारतातील सगळे आई-वडील, मुहर्त, कुंडली पाहन लग्न करतात. तरीसुद्धा बरेचसे संसार मोडतात. दुसरी अंधश्रद्धा म्हणजे कर्मकांड. जेव्हा मनुष्य स्वत:वरचा विश्वास गमावतो तेव्हा तो दुस-यावर अवलंबून राहतो व कर्मकांडाच्या आहारी जातो. आपण विचार न करता कर्मकांड करायला लागतो. अंधश्रद्धेची सुरुवात प्रथम घरात, कुटुंबात, शाळेत होते. जी माणसे मोह सोडतात, ती स्वतंत्रपणे जगतात. देशाचा, देशसेवेचा विचार हा खरेतर अंधश्रद्धामुक्त होऊन जगण्याचा विचार आहे.
आपल्या घटनेमध्ये प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य, विचार व आचारस्वातंत्र्य तसेच देवपूजेचेही स्वातंत्र्य आहे. अजून आपल्याकडे अमेरिकेतील लोकशाही आलेली नाही. अमेरिकेतील स्वरूपाचा फरक आहे आणि तो म्हणजे ‘व्यक्तिस्वातंत्र्याच्या सार्वजनिक श्रद्धा प्रदर्शनाला बंदी आहे. धर्माभिमान आणि धर्मद्वेष, आस्तिक आणि नास्तिक यांच्यातील सीमारेषा पुसल्या पाहिजेत. माणसाचा सगळ्यात मोठा परिचय काय असेल तर तो म्हणजे तुमचा वाचाव्यवहार व वर्तनव्यवहार दुस-याची उपेक्षा होईल असा असता कामा नये. दुस-यांच्या भावनांचा आदर करा आणि स्वत:च्या विचारांचा प्रसार करा. जात, धर्म, पंथ भेद न मानता माणसांशी माणूस म्हणून वागा. कोणत्याही गोष्टीचा स्वीकार डोळे झाकून न करणे म्हणजे अंधश्रद्धामुक्त जीवन जगणे होय. तुम्ही तुमच्या जीवनात ‘हिंसा' मान्य केली की, कोणत्याही प्राण्याची हत्या ही हत्याच होय. युरोपमध्ये कोणताही वाहनधारक रस्त्याने चालणाच्या माणसाचा प्रथम विचार करतो; कारण रस्त्यावरचा
पहिला अधिकार चालणाच्या माणसाचा असतो. कोणतीही गोष्ट करताना क्षणभर थांबा, विचार करा आणि मगच कृती करा. ग्रहणाचा आणि जीव जीवनाचा काहीच संबंध नाही. तुम्ही निसर्गावर विजय मिळविण्याचा प्रयत्न करा. अग्नी' हा माणसाच्या विकासाचा पहिला वैज्ञानिक शोध होय. अंतर्मनाच्या जोरावर तुम्ही जगा, असे विज्ञान आपल्याला सांगते. अंतर्मन आणि अंतअवाज ही सर्वांत प्रभावी गोष्ट आहे; कारण ती तुमची आहे. आपले मन, मत आणि विचार यांचा फार कमी विचार करतो. चिंता करून आपण एका अर्थाने गुलामीचे जीवन जगत असतो. विज्ञान आपल्याला मानसिक स्वातंत्र्य देते. सर्व भौतिक सुविधांचा पाया विज्ञानच आहे. विकासाचा मार्ग विज्ञान आहे, हे कळल्यानंतर इष्ट काय ? अनिष्ट काय ? यांचा विचार करायला हवा. जेव्हा आपण धर्मसत्ता, राजसत्ता, दैवसत्ता सोडून स्वतंत्र विचार करू, तेव्हाच ख-या अर्थाने नेहरूंचे स्वप्न साकार होईल. विज्ञाननिष्ठा ही एक प्रक्रिया आहे. विज्ञान हा आपला जीवनमार्ग, जीवनशैली झाली पाहिजे. आपण वेगवेगळ्या कारणांनी दैववादातून मुक्त झालेलो नाही. आज आपली स्पर्धा चीनशी आहे; कारण चीनचे लोक सगळ्या कर्मकांडातून बाहेर आलेले आहेत. जगातील सगळे प्रगत देश विज्ञानाच्या जोरावर पुढे आलेले आहेत.
┅
भारतातील ज्येष्ठ नागरिकांचे धोरण ठरविणे, योजना आखणे, सुधारणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे ही सारी कामे भारत सरकारचे सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय करीत असते. या मंत्रालयाने स्वीकृत केलेले धोरण-१९९९ सध्या अमलात आहे. नव्या शतकाची ज्येष्ठ नागरिकांची स्थिती व त्यांच्यापुढील प्रश्न, समस्यांचा विचार करून ज्येष्ठ नागरिकांसंबंधी नवे, सुधारित धोरण अमलात आणण्याच्या इराद्याने डॉ. मनमोहन सिंग सरकारने डॉ. सौ. मोहिनी गिरी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्या समितीने मार्च, २०११ मध्ये राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक धोरण - २०११' चा मसुदा भारत सरकारला सादर केला होता. तत्कालीन शासनाच्या अनास्थेपोटी ते धोरण मंजूर न झाल्याने अमलात येऊ शकलेले नाही. परिणामी भारतातील ज्येष्ठ नागरिकांना ज्या सोई-सुविधा आज उपलब्ध आहेत, त्या नव्वदच्या दशकातील दृष्टिकोनानुसार आणि त्या वेळी निर्धारित आर्थिक निर्देशांकानुसार; याबद्दल लोकसभेच्या स्थायी समितीने आपल्या अहवालात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून आपली ज्येष्ठ नागरिकांप्रती असलेली संवेदना स्पष्ट करताना लिहिले आहे की, "The committee were deeply distressed that even after two years of submission of new draft National Policy on Senior Citizens', the policy was not yet finalized and implemented." सदर समितीने वरील धोरण त्वरित अमलात आणण्याची शिफारस करूनही गेल्या सरकारने काही केले नाही आणि 'अच्छे दिन'चे आश्वासन घेऊन आपले मोदी सरकारला चार वर्षे उलटून गेली तरी हे धोरण अमलात आणावे असे वाटले नाही. यातून शासनाची ज्येष्ठ नागरिकांबद्दल असणारी अनास्थाच स्पष्ट होते. हे चित्र
बदलायचे तर ज्येष्ठ नागरिक संघटित होणे आणि त्यांचे हक्ककेंद्रित संघटन कार्यरत होणे काळाची गरज बनली आहे.
नव्या धोरणातील महत्त्वाच्या गोष्टी
‘राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक धोरण - २०११'च्या प्रस्तावित मसुद्यात खालील बाबींवर भर देण्यात आलेला असल्याने सदर धोरण त्वरित अमलात येणे आवश्यकच नाही तर अनिवार्य आहे -
१. ज्येष्ठ नागरिकांना आणि विशेषत: ज्येष्ठ महिलांना देशाच्या विकासाच्या मध्यप्रवाहात आणणे; त्यासाठी ज्येष्ठ महिला संघटना स्थापनेस प्रोत्साहन देणे.
२. ज्येष्ठ नागरिक जिथे आणि जसे असतील तिथे ज्येष्ठ नागरिकांच्या गृहनिर्माण, सुरक्षा, शुश्रूषा सेवा, उपचार सुविधा, उत्पन्न सुरक्षा, विमा योजना, निवृत्तिवेतनादी योजना पोहोचवून ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुखी, समृद्ध आणि सन्मानित करणे.
३. वरील योजनांचा लाभ देऊनही ज्या ज्येष्ठ नागरिकांना निवास, संरक्षण, काळजींची निकड असेल, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी अंतिम पर्याय म्हणून वृद्धाश्रमांची स्थापना करणे अशा संस्था समाज सहभाग, शासन अनुदान व खासगी स्त्रोतांतून विकसित करणे.
४. “माद्रिद योजना' या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निर्णयानुसार ज्येष्ठ नागरिक योजना, सुविधा या अधिकाधिक सुलभ व लाभार्थी हितकेंद्री करून त्यांची गतिमान अंमलबजावणी करणे.
५. ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्रीय संपत्ती मानून त्यांनी राष्ट्रविकासात दिलेल्या योगदानाचे स्मरण व आदर करीत ग्रामीण व नागरी भागांतील दारिद्र्यरेषेखालील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षा, आरोग्य, निवारा व कल्याणाच्या योजनांची शाश्वती देणे.
६. दीर्घकालीन बचत व पतयोजना नागरी व ग्रामीण दोन्ही स्तरांवर अमलात आणणे.
वरील बाबींचा विचार करता नवे धोरण अमलात आल्यास त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात ग्रामीण भारतास होऊन दारिद्र्यरेषेखालील ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मोठे साहाय्य होईल.
नव्या धोरणातील योजना सुधारणा
१. दारिद्र्यरेषेखालील सर्व ज्येष्ठ नागरिकांना ‘इंदिरा गांधी वृद्ध नागरिक निवृत्तिवेतन योजना लागू करणे व ती मासिक रु. १०००/किमान करणे.
२. वरील योजनेत अत्याधिक वृद्धांचा (Oldest Old) प्राधान्यक्रमाने अंतर्भान करणे.
३. दारिद्र्यरेषेखालील सर्व ज्येष्ठ नागरिकांना ‘नागरी पुरवठा योजना (अन्नपूर्णा)चा लाभ देणे.
४. ज्येष्ठ नागरिकांचा वाढता औषधोपचार खर्च कक्षात घेऊन आयकरात अधिक सूट देण्याचा विचार करणे.
५. आरोग्यासंबंधी विविध राष्ट्रीय योजनांत ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देणे.
६. ८० वर्षांहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची प्राथमिक आरोग्य केंद्रे, ‘आशा' कर्मचारी यांच्या साहाय्याने वर्षातून दोनदा तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध करून देणे.
७. ज्येष्ठांचे त्यांच्या कुटुंबातील संगोपन आणि शुश्रूषा सेवांची शाश्वती निश्चित करणे.
८. ‘राष्ट्रीय स्वास्थ्य बीमा योजना अधिकांपर्यंत पोहोचावी म्हणून विविध निम्न उत्पन्न गटांना सवलत दराने (Subsidy) ती उपलब्ध करून देणे.
९. अल्झायमर, डेमिनिशियासारख्या मनोविकारग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना निदान व उपचार सुविधा उपलब्ध करून देणे.
१०. राष्ट्रीय अंधत्व निवारण योजनेतून नेत्रविकारग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना साहाय्य आणि सुविधा उपलब्ध करून देणे.
११. ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुखी व सुरक्षित करण्याच्या दृष्टीने माहिती व तंत्रज्ञान साधने, सुविधा व नेटवर्ककेंद्रित सोयी निर्माण करणे व पुरविणे.
१२. ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय आरोग्य योजना' (NPHCE) देशातील सर्व जिल्ह्यांना लागू करणे. १३. ज्येष्ठ नागरिक सुविधा विस्तारात खासगी भागीदारी (PPP) योजनांना प्रोत्साहन देणे.
१४. ८० पेक्षा अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विमा योजना लागू करणे.
१५. मरणापासन्न व रोगजर्जर ज्येष्ठ नागरिकांसाठी जिल्हा रुग्णालयात सुविधा निर्माण करणे व भारतीय परंपरेनुरूप वृद्धांची सर्व ती काळजी घेणे.
१६. सर्व विकास व कल्याण योजनांची अंमलबजावणी करताना लिंगभेदविरहित व्यवस्थेची शाश्वती देणे.
१७. ज्येष्ठांची आबाळ हा भारतीय दंडसंहितेनुसार गुन्हा ठरविणे.
१८. पोलीस विभागाकडून ज्येष्ठांना सन्मान, प्राधान्य आणि संरक्षण मिळेल असे निर्देश देणे.
१९. ज्येष्ठ नागरिकांसाठी जीवनरेखा (Helpline) सुरू करणे.
२०. निवासाची गरज प्राथमिक मानून ती देण्याची शाश्वती देणे. (गृहसुविधा)
वरीलपैकी काही योजना सन १९९९ च्या धोरणात होत्या. त्या सुधारित करण्यात आल्या असून, काही नव्या योजनांची भर नव्या धोरणात पडली असल्याने सदर नवे धोरण अविलंब अमलात येणे म्हणजे ज्येष्ठांना नवसंजीवनी प्राप्त होणे ठरणार आहे.
संसदीय स्थायी समितीच्या शिफारशी
वरील बाबींचे महत्त्व लक्षात घेऊन संसदीय स्थायी समितीने आपल्या ३९ व्या वार्षिक अहवालात, जो लोकसंख्येच्या सभापतींना समितीने ४ जानेवारी, २०१४ रोजी सादर केला आहे, त्यात खालील महत्त्वाच्या शिफारशी करण्यात आल्या आहेत -
१. वरील धोरण व योजना केंद्र शासनाने अविलंब स्वीकार करून अमलात आणाव्यात. बाराव्या पंचवार्षिक योजनेत त्यांचा अंतर्भाव व्हावा.
२. ६० ते ७० वर्षे वयातील उत्पादक ज्येष्ठ नागरिक समुदायाचा अनुभव व बौद्धिक क्षमतांचा वापर करण्यात यावा.
३. ज्येष्ठ नागरिक कल्याणासाठी अंदाजपत्रकीय तरतूद पूर्णत: खर्च होईल याबाबत सरकारने दक्ष राहावे व तशी यंत्रणा विकसित करण्यावर भर द्यावा.
४. वृद्धाश्रमांच्या किमान भौतिक सुविधा व अपेक्षित दर्जा निश्चितीबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करून अशा संस्थांत काळजीवाहक कर्मचारी सूत्र ठरविले जावे.
५. ज्येष्ठांच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना यंत्रणेशिवाय थेट घेता यावा म्हणून अर्ज, अनुदान, वितरण, आदी सुविधा संगणकीकृत करणे.
६. ज्येष्ठ नागरिक कल्याणार्थ प्रत्येक राज्यात विभागीय संसाधन विकास व प्रशिक्षण केंद्रे (RRTC) विकसित करण्यात यावीत.
७. राष्ट्रीय वृद्ध आरोग्य व शुश्रूषा योजना (NPHCE) देशातील सर्व जिल्ह्यांना लागू करावी.
८. सध्याची इंदिरा गांधी ज्येष्ठ नागरिक निवृत्तिवेतन योजनेचे अनुदान मासिक किमान १००० रुपये करण्यात यावे (आज ते रु. २००, ६० वर्षांवरीलांसाठी, रु. ५००- ८० वर्षांवरीलांसाठी आहे.)
९. आज ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना रु. २.५ लक्ष आणि ८० वर्षांवरीलांसाठी ५.०० लक्ष आयकर कपात मिळते. ती सूट वारंवार मूल्यमापन करून निर्धारित करण्यात यावी.
१०. युरोपमधील अनेक देशांत वृद्ध कल्याणाच्या अनेक अभिनव योजना अमलात आहेत. त्यांचा अभ्यास करून त्या देशांत राबविण्यात याव्यात.
११. ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न बहुविध जसे आहेत, तसेच हे बहुआयामीपण आहेत. त्यांचा विचार करून योजना, धोरण, अंमलबजावणीत लवचिकता आणणे आवश्यक आहे.
१२. ज्येष्ठ नागरिकप्रश्नी युवक जागृती करणे.
१३. ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न विविध मंत्रालयांतर्गत येतात. त्यात सुसूत्रता यावी म्हणून आंतरमंत्रालय समन्वय यंत्रणेची स्थापना करण्यात यावी. आपल्या देशात कायदे, धोरणे व योजनांचा सुकाळ असला तरी अंमलबजावणी व लाभाथ्यापर्यंत लाभ पोहोचणे यात असणारे जे अंतर आहे ते विषम असल्याने कायदे, योजना कागदी बाण बनून जातात. शासकीय यंत्रणा संवेदनशील व कार्यक्षम नसणे व जबाबदार प्रशासनाचा अभाव ही ज्येष्ठ नागरिक विकास व कल्याणातील खरी तूट व त्रुटी आहे. ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाचे जगणे बहाल करणारे जपान, सिंगापूर, फिनलंड, ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, इंग्लंड आदी देशांपैकी अनेक देश मी पाहिले आहेत. तिथले प्रशासन ज्येष्ठ नागरिकांकडे कृतज्ञतेने वागताना मी अनुभवले आहे. आपणाकडे प्रशासन उपकाराच्या भावनेने वागते. यात उर्मटपणा आहे व कृतघ्नताही ती दूर व्हायची तर भारतीय प्रशासन मानवसेवी व संवेदनशील बनविणे जरुरीचे आहे; तरच वृद्ध सन्मानित व प्रतिष्ठित जिणे जगू शकतील.
◼◼
भारतीय समाजातील दीन, दुबळ्या, दलित, वंचित, अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांबाबत विचार करताना माझ्यापुढे या वर्गाचे दोन गट नेहमी दिसत आले आहेत. एक अल्पसंख्याक गट भारतीय घटनेतील आरक्षणाच्या तरतुदींमुळे विकासाची वाट धरत उन्नत होत आहे. ज्या दुस-या वर्गाला आरक्षणाचा लाभ मिळू शकलेला नाही, असा सामाजिक अल्पसंख्याकाचा वर्ग स्वातंत्र्याच्या गतकालातील प्रवासात उपेक्षेचा बळी ठरत आला आहे. या लेखात प्रामुख्याने दुस-या वर्गाबद्दलचा विचार आहे.
सामाजिक विकासाच्या संदर्भात आपण जेव्हा ‘अल्पसंख्याक' शब्दाचा वापर करतो, तेव्हा बहुधा तो संख्यासूचक वापरण्यात येतो; पण तो स्थिती, संधी, सामर्थ्य, साधने, सुव्यवस्था सूचकही असायला हवा. भारतात ‘अल्पसंख्याक' शब्दाला व्यवहाराने जात, धर्माचे परिमाण लाभले आहे. भारतात दलित, भटके, विमुक्त, आदिवासी, अनाथ, अंध, अपंग, मतिमंद, देवदासी, वेश्या, कुष्ठपीडित, तृतीयपंथी, विकारग्रस्त, विस्थापित, परित्यक्ता, विधवा, वृद्ध, असंघटित मजूर, कुमारी माता, हुंडाबळी, बलात्कारित, बंदीबांधव, दुभंगित कुटुंबे अशा प्रकारचे कितीतरी वंचित, उपेक्षित गट आहेत. पैकी काहींना घटनात्मक तरतुदींमुळे हक्क प्राप्त होऊन त्यांच्या विकासवाटा मोकळ्या झाल्या. असे असले तरी त्यांचे सर्व प्रश्न सुटले, मिटले असे म्हणता येणार नाही; पण विशेषतः दलितेतर वंचितांचा जो समाजवर्ग आहे, त्यांना घटनात्मक तरतुदींद्वारे हक्क व विकास संधी, प्राधान्यता न लाभल्याने शासकीय अंदाजपत्रकातील तरतुदींच्या दयेवरच विकासाची वाट चोखाळावी लागते. कोणत्याही देशात विकासाची परिमाणे
व संधी, योजना या राजकीय इच्छाशक्तीवर अवलंबून असल्याने घटनात्मक तरतुदींच्या परिघाबाहेरील अल्पसंख्याक असंघटित, अराजकीय राहिल्याने ते अदखलपात्रच राहिले आहेत.
‘सामाजिक न्याय' या संकल्पनेचा प्रारंभच मुळी वंचितांच्या मानवाधिकारांना मान्यता देण्याच्या गरजेतून झाला आहे, हे आपणास विसरता येणार नाही. सामाजिक न्यायाची कल्पना जगभर ज्या स्वरूपात अमलात आली आहे, ती जात, धर्म, वंश, वर्ण, भाषा, लिंग, प्रांत, राजकीय विचारप्रणाली यांचा विचार न करता, पूर्वग्रहमुक्त पद्धतीने केवळ ‘वंचितता' या एकमेव निकषावर उभी आहे. तिची व्याख्या पाहताना ते लक्षात आल्यावाचून राहत नाही. "The fair and proper administration of law conforming to the natural law that all persons irrespective of ethnic origin, gender, passions, race, religion etc. are to be treated equally and without prejudice." Aldis 'without prejudice' हा अत्यंत महत्त्वाचा शब्द असून, त्याकडे आपले दुर्लक्ष झाल्याने समाजपरिघाबाहेरील जो वंचित अल्पसंख्याक समाजवर्ग आहे, त्याचे प्रश्न आज ऐरणीवर आले आहेत.
वंचित बालकांचा जो अल्पसंख्याक गट आहे, त्यात अनाथ, निराधार, हरवलेली, रस्त्यांवरील, भिक्षेकरी, बालगुन्हेगार, बालमजूर, स्थलांतरित, उपेक्षित, अनैतिक व्यापारात गुंतलेली, शारीरिक व मानसिक दुर्बल, विकलांग, संकटग्रस्त, वेश्या, कुष्ठपीडित, कैदी यांची अपत्ये, विस्थापित मुले, विकारग्रस्त बालके, निवासी संस्थांतील निराधार मुले, विधिसंघर्षग्रस्त अपत्ये या सर्व संवगांत कमी-अधिक संख्या असली, समाजातील एकूण मुलांच्या संख्येत ही मुले अल्पसंख्याक ठरत, वाटत असली तरी त्यांची संख्या लाखांच्या घरात आहे, हे आपणास विसरून चालणार नाही. त्यांचे प्रश्न जीवअस्तित्व टिकविण्यापासून सुरू होतात. संगोपन, सांभाळ, आहार, आरोग्य, उपचार, शिक्षण, संस्कार, पालकत्व, प्रशिक्षण, नोकरी, विवाह, निवारा, पुनर्वसन इत्यादी त्यांचे प्रश्न जात, धर्माधारित अल्पसंख्याकांपेक्षा गंभीर असून ते प्राधान्यक्रमाने राष्ट्रीय, बनण्याचे आहेत. यातील वंचित मुलींचे प्रश्न म्हणजे ‘रात्रं दिन आम्हा युद्धाचा प्रश्न' असेच आहेत. त्यात कसलीही अतिशयोक्ती नाही. जिज्ञासूंनी या संदर्भात या लेखकाची ‘खाली जमीन, वर आकाश', ‘आत्मस्वर', 'दुःखहरण', 'निराळं जग, निराळी माणसं', 'महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा', ‘वंचित विकास : जग आणि आपण', 'एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न', 'आकाश संवाद' सारखी पुस्तके जरूर वाचावित म्हणजे त्यांना वंचित बालकांच्या प्रश्नांचे वैविध्य, गांभीर्य आणि प्राधान्य लक्षात आल्यावाचून राहणार नाही. महाराष्ट्र शासनाने सन २०१३ साली जे ‘बालधोरण' जाहीर केले आहे, त्यात या वंचित बालकांचे प्रश्न विस्ताराने विशद करून त्यांच्या निराकरणाची निकड अधोरेखित केली आहे. 'साथी' मुंबई, ‘महाराष्ट्र राज्य परिवीक्षा व अनुरक्षण संघटना, पुणे, महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि ‘युनिसेफ' अशा संस्थांनी मिळून परिश्रमपूर्वक तयार केलेला 'Assesment of After Care Homes in Maharashtra' सारखा अहवाल आपल्या वंचित बालकांच्या तोकड्या प्रयत्नाचे सविस्तर इतिवृत्तच होय. झोपडपट्टी व बाल हक्क' हा महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने प्रकाशित केलेला २०१२ चा वृत्तांतही असाच बोलका आहे. गरज आहे जात, धर्मापलिकडे ‘मनुष्य' म्हणून या प्रश्नांकडे पाहण्याची.
अपंगांसाठी आपण ३% आरक्षण मान्य केले असले, सर्वोच्च न्यायालयाने अनुशेष पूर्ततेचे आदेश दिलेले असले, तरी अस्थिव्यंग, मूक, बधीर, अंध, मतिमंद, बहुविकलांग वर्गाचे प्रश्न स्वातंत्र्यानंतर जैसे थे राहणे, त्यांच्या संगोपन, शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसनाच्या अपु-या तरतुदी आणि सुविधा आपल्या बोथट समाज जाणिवेचे जिवंत उदाहरण होय. आपण आजही प्रत्येक पाठ्यपुस्तकाची ब्रेल आवृत्ती बंधनकारक असून प्रकाशित करत नाही. आपणाला डोळस कसे म्हणायचे? सार्वजनिक संस्था, शिक्षण केंद्रे, अपंग सुविधायुक्त नाहीत जिथे प्रवेशच रोखला जातो, तिथे शिक्षण, विकास, संधी हे फार पुढचे प्रश्न बनून जातात.
महिलांना अजून आपण ‘लघवीचा अधिकार' (Right to Pee) देऊ शकलो नाही. कोणत्याही गावा, शहरात पुरुष मुताच्या जागोजागी; स्त्री मुताच्या का नाहीत ? असा प्रश्न आपल्या मनात न येणे हे आपल्या पुरुषी मानसिकतेचे व पुरुषकेंद्री विकासाचे ढळढळीत उदाहरण नाही का? तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे असणे अनिवार्य असून ते आपण कधी पाहिले आहे का? प्रत्येक निराधार वृद्धाची जबाबदारी शासनाची असताना उपेक्षित वृद्ध मनोरुग्ण, विकारग्रस्त बनून रस्त्यांवर जीवन कंठत आहेत. प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात संरक्षित निवारागृहे बांधणे, उभारणे बंधनकारक असून त्यांचे पालन किती नगरपालिकांनी केले आहे? प्रत्येक जिल्ह्यात भिक्षा प्रतिबंधक गृहाची उभारणी अनिवार्य असताना, ती प्रशासकांना माहीत असू नये, याला काय म्हणावे?
हे नि असे अनेक प्रश्न आपणाला मुळात माहीत नसणे हेच आपल्या स्वकेंद्रित मनुष्यसमाजाचे खरे दुखणे आहे. यासाठी समाजजाणिवेचा आपला परीघ रुंद करणे आवश्यकच नाही तर अनिवार्य आहे. 'स्व'च्या पलीकडे जाऊन 'see the world from other side'च्या पुढे 'see te world from his or her side' चा सामाजिक दृष्टिकोन जोवर आपण अंगीकारणार नाही, तोवर समाजपरिघाबाहेरील वंचित ‘अल्पसंख्याक' नसून ते ‘दखलपात्र संख्याक' आहेत, सामाजिक न्यायाचे पहिले हक्कदार तेच आहेत, याची तुम्हाला खात्री पटल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैवाने हा उपेक्षित जनसमुदाय ज्या संस्था, इस्पितळे, उपचार केंद्रे, शिबिरे, छावण्या, वस्त्या इत्यादींत राहतो, तिथे आपली पावले व मने जाणीवपूर्वक व संवेदनशील होऊन वळतील तर या उपेक्षित, बहुसंख्य माणसांचं जीवन समाजपरिघाबाहेरून समाजकेंद्री येईल, ते समाजाच्या मध्यप्रवाहात येऊन मध्यवस्तीत सुस्थापित होतील तो सुदिन! त्याचसाठी असावे आजचे हे राष्ट्रीय चर्चासत्र!! राष्ट्रीय संकल्प!!!
◼◼
‘इंडिया शायनिंग', ‘डिजिटल इंडिया', 'मेक इन इंडिया' सारख्या घोषणा लोभस खन्या. त्या बहुधा भौतिक समृद्धी प्रतिबिंबित करीत असतात. ‘स्मार्ट सिरीज'चं स्वप्नही याच पठडीतलं. कोणताही देश विकासाचीच स्वप्नं पाहणार. त्यात गैर काहीच नाही. प्रश्न आहे, तो सत्यास सामोरं जायचा नि भीषण वास्तव बदलण्याचा. स्वातंत्र्यपूर्व काळापासून सर्व राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान आपणास नवनवी स्वप्नं देत राहिले. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात रामराज्याचं स्वप्न दिलं. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी कृषी, औद्योगिक विकासाचं स्वप्न दिलं. लाल बहाद्दर शास्त्रींनी ‘जय जवान, जय किसान'चा मंत्र दिला. इंदिरा गांधींनी ‘गरिबी हटाओ'ची घोषणा दिली. राजीव गांधींनी ‘संगणक क्रांती'चं स्वप्न दिलं. मनमोहन सिंगांनी ‘जागतिकीकरण' आणलं. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी ‘महासत्ता बनण्याची महत्त्वाकांक्षा जागी केली. असं सर्वांबद्दल सांगता येईल. या सर्व स्वप्नांतून भारत सतत प्रगतिपथावर अग्रेसर राहिला. पण या देशाकडे असलेलं मनुष्यबळ, देशाची निसर्गसंपत्ती, घटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, विज्ञाननिष्ठा ही मूलतत्त्वे या सर्वांचा विचार करता आपली प्रगती कासवाचीच राहिली आहे, हे सिद्ध करण्यास आणखी कोणतं भाष्य करण्याची गरज नाही. या उलट याच विकासकाळात जगातील अन्य छोट्या देशांची प्रगती पाहत असताना, आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. जपान, सिंगापूर, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया, हाँगकाँग पाहत असताना मला हे पदोपदी जाणवायचं. शिवाय अलीकडे भारतीयांचं विदेश जाणं कितीतरी पटींनी वाढलं. भारतातील माणूस विदेशी गेला की तिथल्या माणसांसारखा सुसंस्कृतपणे वागतो. परत भारतात पाऊल ठेवलं की तो भारतीय होतो. मग तो ओळीत घुसतो. कागद-कपटे कुठेही टाकतो. पचकन थुकायला तो घाबरत नाही. लघवीला कोणताही आडोसा त्याला सार्वजनिक भीती घालत नाही. टू व्हीलरवर आख्खं कुटुंब घेऊन जाणारा नि मोपेडवर मालट्रकाचं ओझं घेऊन जाणारा फिरस्ता तुम्हाला फक्त भारतातच आढळणार!
हा साच्या आपल्या नागरी घडणीचा प्रताप व परिणाम होय. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींनी आपणास ‘सफाई’ शिकविली. म्हणून आपण गेली सात शतके दर गांधीजयंतीस म्हणजे २ ऑक्टोबरला ‘सफाई करीत आलो. तरी भारत स्वच्छ झाला नाही म्हणून वर्तमान पंतप्रधानांनी ‘स्वच्छता अभियान' चालविले. शंभर वर्षे आपण केलेली घाण उपसली तरी आपण कच-याचे ढीग हालवू शकलो नाही. घाणीचा गोवर्धन उचलणारा हनुमान, कृष्ण जन्माला यायची वाट पाहत आहोत. गोवर्धन पर्वत उचलण्याच्या कथेच्या चित्रात गुराखी आपल्या काठ्यांचा नि कृष्ण आपल्या करंगळीचा टेकू लावतो असं ते सामूहिक शक्तीचं चित्र माझ्या अजून डोळ्यांसमोर आहे. कच-याचे ढीग का हलले नाहीत असं जर मला विचारलं तर त्याचं उत्तर असं आहे की, कचरा करणारे अनेक आहेत नि कचरा उचलणारा एकच (सफाईगार) आहे. ही विषम परिस्थिती आपल्या घाणीच्या साम्राज्याचं खरं कारण आहे.
या संदर्भात मी फ्रान्सच्या एका शाळेत घेतलेला अनुभव मोठा बोधप्रद वाटत आला आहे. मी एका शाळेस भेट देण्यासाठी गेलो असता, बाई वर्गात शिकवण्याची पूर्वतयारी करण्यासत गुंग होत्या. ती पूर्व तयारी मात्र विचित्र होती. त्या वर्गात ठिकठिकाणी कागद, कपडे, गवत, पानं टाकत होत्या. मी न राहून विचारलं की ही कसली अनोळखी सजावट सुरू आहे? तर त्या म्हणाल्या की मी स्वच्छता शिकवणार आहे. मला या गोष्टीचं राहून-राहून आश्चर्य वाटत राहिलं की त्यांना स्वच्छता शिकवायची म्हणून घाण करावी लागली. आपल्याकडे घाण करावी लागत नाही, ती असतेच. खरी गंमत मला पुढे पाहायला मिळाली. वर्ग सफाई झाल्यावर बाईंनी प्रत्येकाला एक चॉकलेट देऊन खायला सांगितले. वर्गाच्या बाहेर असलेला कचरा टोपलीत चॉकलेटचा कागद टाकायला शिकवलं. हात धुऊन, पुसून आल्यावर त्यांनी दोन स्वच्छतेचं अंतर सांगितलं. नंतर त्यांनी स्वच्छतेची सांगितलेली व्याख्या ऐकूण मी सर्द झालो. त्या म्हणाल्या, ‘घाण न करणे म्हणजे स्वच्छता.' महात्मा गांधी ते नरेंद्र मोदी या स्वच्छता अभियानात तुम्हाला या व्याख्येचं प्रतिबिंब दिसतं का? ते जोवर दिसणार नाही, तोवर भारत स्वच्छ कसा होणार?
आपल्या देशाच्या विकासापुढचा खरा प्रश्न आर्थिक मान उंचावणे नसून जबाबदार नागरिक घडविणे हा आहे. अशी घडण ही राष्ट्राची वैधानिक जबाबदारी असली तरी त्या दृष्टीने आपण आपल्या शिक्षणाची आखणी करीत नाही. भारत हा लोकशाहीप्रधान, समाजवादी, धर्मनिरपेक्ष देश असल्याने या मूल्यांसह नागरिक विकास हे आपल्या देशापुढील खरे आव्हान आहे. ते पेलायचे तर आपले प्रशासन न्याय विभागाप्रमाणे स्वतंत्र व स्वायत्त हवे; पण ज्या पंचायत राज्य व्यवस्थेचा आपण अंगीकार केला आहे, त्यातील वाढत्या लोकप्रतिनिधी अधिकारांमुळे प्रशासन यंत्रणेचा अधिकार संकोच होत आहे, हे आपण लक्षात घेणे आवश्यकच नाही तर अनिवार्य आहे. आपल्याकडे कायदे आणि वायदे उदंड ! कार्यवाही मात्र शून्य ! अशा विषम समाजरचनेतून भारताचे नागरी जीवन उद्ध्वस्त होत आहे.
मध्यंतरी माझे स्मरण ठीक असेल तर 'इंडिया टुडे' या नियतकालिकाने ‘अग्ली इंडियन' विशेषांक काढून आपल्या बेशिस्त, बेजबाबदार नागरी जीवनाचं सचित्र दर्शन घडवलं होतं. आपल्या रोजच्या जीवनात सुजाण नागरी व्यवहार अपवादाने आढळतो. सर्रास दिसणारे प्रसंग आपल्या असंस्कृत घडणीचेच निदर्शक आहेत. ओळीची शिस्त न पाळणे, कुठेही भुंकणे, सार्वजनिक संस्थांतील वीज, पाणी, प्रसाधन सुविधांची निगा, काळजी, सुरक्षा, स्वच्छता न पाळणे, वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणे, लाच देण्या-घेण्यात संकोच न वाटणे, वेळेचे पालन न करणे. लोकप्रतिनिधींचे असभ्य व्यवहार, भाषा व वर्तन, वाहनतळावर गाड्या कशाही लावणे, बस, रेल्वेत बैठकींवर पाय ठेवणे. प्रवासात वृद्ध, अपंग, महिलांची काळजी न घेणे, कर्तव्यपरायणतेचा अभाव व कार्यकसुराची तमा नसणे, कर न भरणे, चुकविण्यावर भर. साहाय्य करण्याची अपवाद वृत्ती, समाजशीलतेचा अभाव, अल्पसंख्याकांचा अनादर. हे मारुतीच्या शेपटीपेक्षा लांबत जाणारं प्रकरण म्हणजे नागरी बेभानतेचा पुरावा.
‘कसा देश महासत्ता होणार ?' 'कुठे नेऊन ठेवला हा देश ?' असे प्रश्न राजकारण्यांना विचारण्यात सदैव पुढे असलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाने अंतर्मुख होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आपल्या उद्ध्वस्त नि बेताल नागरी जीवनाची मुळे आपल्या अनेक प्रश्नांमध्ये घट्ट रुतलेली आहेत. प्राथमिक प्रश्न आहे तो लोकसंख्या नियंत्रणाचा. या आघाडीवर भविष्यकाळात मोठे लोकप्रबोधन व तेही ग्रामीण भारतात अधिक प्रमाणात होणे गरजेचे आहे. मी अनेकदा विदेशांत जाऊन आलो. प्रत्येक वेळी परतल्यावर प्रकर्षाने होणारी जाणीव अशी की, आपण गर्दीत राहतो नि घाणीतही। गर्दीवरून आठवलं म्हणून सांगतो आपल्याकडे रेल्वे, बसने प्रवास करणे
आरक्षणाशिवाय शक्य नाही. तिकिटांचे आरक्षणही तीन महिने अगोदर केले तर प्रवास सुसह्य नि स्वस्त. या आपल्या रेल्वेगाड्या बारा महिने, चोवीस तास दुथडी भरून वाहत असतात. गाड्यांना डबे किती तर किमान बारा व कमाल अठरा. या उलट युरोपचा अनुभव. रेल्वे कुठलीही घ्या, तीन-पाच डब्यांची. केव्हाही जा नि प्रवास करा. ना गर्दी, ना गोंधळ, ना घाण. याचं रहस्य लोकसंख्या नियमित असणं जसं आहे तसंच नागरी घडणीतील देशाची जागरूकता व तत्परताही आहे. सेवा-सुविधांत स्वच्छता, नियमितता, पारदर्शिता या गोष्टींचा तिथे केवळ आग्रह नाही तर आचरणही आहे. शिवाय सुविधांची रेलचेल हेही एक कारण आहे. संख्या, काळ, काम, वेग यांचा तेथील नागरी सुविधा नियोजनात किती विचार केला जातो? मुतारीत पाण्याचा वारेमाप वापर, शेतीला कालव्याने पाणी, बिननळांची पाणीपुरवठा योजना आपणाकडेच. इस्त्रायलला ठिबक सिंचन शेतीत अनिवार्य. जपानमध्ये मुतारीत पाणी काटकसरीसाठी ‘सेंसर' वापर, युरोपमध्ये पाय ठेवला की जिना चालू होतो. जिन्यावर कोणी नसेल तर तो आपोआप बंद होतो. यातून पाणी नि विजेची ते करीत असलेली बचत, काटकसरी वापर यांचे अनुकरण आपण केले पाहिजे; कारण आपणाकडे पाणी, विजेचा मुळातच तुटवडा आहे.
साऱ्या समृद्ध नागरी जीवनाची मदार जर कशावर अवलंबून असेल तर ती कुशल प्रशासनावर (Good Governance). या संदर्भात युरेपियन कमिशनकडून आपणास बरंच शिकता येण्यासारखं आहे. समृद्धी वजा जाता त्यांचे व आपले प्रश्न एका अर्थाने समान आहेत. बहुभाषा, बहुसंस्कृती, बहुवंश, बहुस्तरीय समाज, लोकशाही प्रशासन इत्यादी. पण ते कुशल, तत्पर प्रशासनाचा विचार बहुअंगांनी करतात. शासन, उद्योग, व्यापार, वाहतूक, शिक्षण, अर्थव्यवस्था, प्रांतरचना, कायदे, अंमलबजावणी यंत्रणा यांमध्ये तिथे सतत संवाद, देवघेव, समन्वय यांवर भर दिला जातो. रस्ता करायचा किंवा दुरुस्त करायचा तर एकाच वेळी अभियांत्रिकी, वीज, टेलिफोन, ड्रेनेज, पाणीपुरवठा, नियोजन, नगरपालिका, पोलीस, कार्यरत राहून समन्वयाने ठरलेल्या वेळेत पर्यायी यंत्रणा उभारून काम फत्ते करतात. नागरी कुशल प्रशासन हा जबाबदार नागरिक घडविण्याचा एक महत्त्वाचा घटक होय. युरोपिअन कमिशनसारखं संघटन या दृष्टीने सतत प्रयत्नशील व कार्यतत्पर असतं. आपल्या युरोपिअन युनिअनमधील सर्व देशांत समान कुशल प्रशासनाद्वारे सुजाण व जबाबदार, शिस्तप्रिय नागरिक घडावेत म्हणून ते सर्वांगांनी प्रयत्न करीत असतात. ते समजून घेणं आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं अनुकरण ठरेल.
कुशल प्रशासनाचा व त्याच्या कार्यक्षम अंमलबजावणीच्या दृष्टीने ते समाजबदल सतत टिपत राहन प्रशासन पद्धतीत बदल घडवून आणत असतात. आपण आजही ब्रिटिश आमदानीतील प्रशासन पद्धतीतून मुक्त झालेलो नाही. आर्थिक सुधारणांचा आढावा घेत ते आपल्या योजनांत सुधारणा करीत असतात. समाजाची बदलती बौद्धिक पातळी, कल यांचं ते सतत निरीक्षण करीत बदल टिपत सुधारणांबद्दल आग्रही असतात. आपल्या युनिअनमधील देशात एकवाक्यता यावी, समन्वय यावा म्हणून ते सतत दक्ष असतात. आपले प्रशासन मात्र बदलाला फारसे उत्सुक असत नाही. स्थितिशीलता हा भारतीय प्रशासनाचा स्थायिभाव आहे, का अशी शंका यावी, खात्री व्हावी, असा आपला प्रपंच व व्यवहार असतो.
लोकानुवर्ती प्रशासन हे राष्ट्रानुवर्ती नागरिक घडविण्याचं सशक्त व सक्रिय माध्यम आहे, हे लक्षात घेऊन आपण आपल्या देशातील नागरिक घडणीचा विचार केला पाहिजे. केवळ संस्कार व शिक्षण नागरी घडणीत अपुरे ठरतात, हे गेल्या ७० वर्षांच्या स्वातंत्र्याच्या आपल्या अनुभवातून जर आपण काहीच शिकणार नसू; बदल, सुधारणा करणार नसू तर सुधारणा, विकासाच्या सगळ्या घोषणा वल्गना ठरतील. पालथ्या घड्यावर पाणी
ओतून घट भरत नसतात एवढे जरी शहाणपण आपण स्वीकारले तरी भरपूर प्रगती होईल. सतत, शाश्वत विकासार्थ युरोपीय देश आपले भविष्यातील लक्ष्य निश्चित करतात. त्यानुसार नियोजन, योजन व अंमलबजावणी अशी त्रिसूत्री ते सतत पाळतात. प्रशासन सुधारणांत लोकमताचा आदर ते महत्त्वाचा मानतात. आपल्याकडे लोकांपेक्षा लोकप्रतिनिधींचे ऐकण्याची मनोवृत्ती आहे. आपले लोकप्रतिनिधी प्रभाग, मतदारसंघ केंद्रित विचार करीत असल्याने, शासनही लोकानुनय करणारे निर्णय घेण्यात पटाईत असल्याने इथल्या नागरी विकास व घडणीत प्रशासनाचा वाटा शून्य राहतो. तरुण वर्ग स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रशासनात जाऊ इच्छितो, असे सध्याचे चित्र आहे. यामागचे काही लक्ष्य आहे की प्रलोभन कार्यरत आहे हे तपासले पाहिजे. ते पैसे न देता चांगली नोकरी मिळण्याचे माध्यम म्हणून सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असलेल्या वर्गाला या क्षेत्राचे आकर्षण म्हणून ते मी मान्य करतो; पण हे माध्यम जनसेवेचे साधन म्हणून पाहणारे विरळा दिसतात. सत्ता, संपत्ती, अधिकार, सरंजामी व्यवस्थेचे साधन म्हणून भारतीय प्रशासनाचे तरुण वर्गाचं आकर्षण हा माझ्या चिंता व चिंतनाचा विषय झाला आहे. यातच आपल्या नागरी घडणीची शोकांतिका दडली आहे. आज देशाची गरज निरपेक्ष, कार्यक्षम, पारदर्शी, लोकानुवर्ती
कार्य करणार प्रशासक निर्मिती आहे. त्या दृष्टीने आपल्या प्रशासकीय प्रशिक्षण संस्था कार्य करतील तरच ते शक्य आहे. सिमला, डेहराडून, यशदासारख्या संस्थांना पाचगणीच्या मॉरल रिआर्मामेंट इन्स्टिट्यूटची (एमआरआय) जोड देणे ही आता आपल्या नागरी समाजघडणीची अनिवार्य गरज होऊन बसली आहे.
आपलं प्रशासन व प्रशासन पद्धती हे नागरिकांच्या साहाय्यार्थ उभं केलं आहे की विकासातील तो अटळ व अनुल्लंघनीय अडथळा आहे, याचाही विचार व्हायला हवा. मला कर भरायचा आहे तर तो भरायची पद्धत सुलभ हवी. मला एक परवाना हवा आहे तर तो मला विहित पद्धतीने व निर्धारित वेळेत मिळायला हवा; तर मी कायदा पाळणारा नागरिक बनणार. मला काहीच वैध मार्गाने मिळणार नसेल तर माझी जीवनपद्धती वैध कशी होणार? नागरिक आकाशातून पडत नसतात. ते समाजातून घडतात, हे आपण लक्षात घ्यायला हवं. प्रशासनावरही नागरिकांचा अंकुश हवा. ते नागरिकांना जबाबदार हवे, लोकप्रतिनिधींना नव्हे; तर ती प्रगल्भ लोकशाही.
समाजजीवनात कायदापालनाचा सन्मान होताना दिसत नाही. देवदर्शन चिरीमिरीने, काउंटरच्या आत पाळी मोडून काम, चूक झाली की लाच देऊन सुटका, न्याय विकत घेता येतो अशी भावना, लोकप्रतिनिधींद्वारा गैराचं समर्थन हे आपल्या सुजाण नागरी समाजघडणीचे अटळ अडथळे होत. यांना अमान्यता, निषेध, बहिष्कार अशी शस्त्रे उभारूनच सुधारणा शक्य आहे. अण्णा हजारेंचा पराभव व केजरीवालांचा विजय हा आपल्या नागरी चरित्र व चारित्र्याचा आरसा आहे. मेधा पाटकरना न्यायाची लढाई हरावी लागणं हे न्याय व सत्तेच्या संगनमताची ग्वाही जनतेस वाटावी यात सारं येतं. लोकपाल विधेयक, महिला आरक्षण यांत लोकसभा सदस्यांच्या भूमिका लोकानुवर्ती नसून पक्षीय अभिनिवेशाचा आविष्कार होय. या साच्या छोट्यामोठ्या दुरुस्त्यांबद्दल आपली दक्षता हीच नव्या नागरी घडणीची नवी पायवाट तयार करील. विदेशात 'They are Indian' म्हणून आपली जी उपेक्षा होते, ती आपण गांभीर्याने घेऊन ‘भारतीय माणूस' म्हणून नागरी घडणीचा नवा घाट घालायला हवा. महात्मा गांधींशिवाय या देशातील सुधारणांना दुसरा उपाय व उतारा नाही. आपले आदर्श वल्गनावीर नेते असू शकत नाहीत. देशाचं हृदयपरिवर्तन करणाच्या प्रेषितांच्या प्रतीक्षेतील भारतास उद्याची आस व प्यास आहे हेच खरे!
┅
हसा, हसवा, हसत रहा !
'The human race has only one really effective weapon and that is laughter' असं मार्क ट्वेनचं एक निरीक्षण नोंदविणारं विधान आहे. हे विधान माणसाचं व्यवच्छेदकपण अधोरेखित करतं. हास्य ही मानवी जीवनातील आनंदाची प्रगट अभिव्यक्ती म्हणायला हवी. हास्य, आनंद, हर्षातिरेक, ब्रह्मानंदाचा शरीरी उद्गार म्हणायला हवा. मानवी हास्याच्या अनेक छटा आढळतात. सहज, उत्स्फूर्त, प्रतिक्रियात्मक, प्रतिसादात्मक, रहस्यगर्भ, छद्मी, उपहासात्मक, संकेतात्मक इत्यादी. हास्यात आवेग, नाद, ताल, संगीत, रस, लय सारं भरलेलं असतं. म्हणून ते मोहक, आकर्षक, आल्हाददायी असतं. हास्य हा मानवी वर्तनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणून तो केवळ आविष्कार राहत नाही; तर त्यात उपचार सामर्थ्यही येतं. म्हणून अलीकडच्या काळात रोगोपचार, मानसोपचार जीवनकला म्हणूनही त्याकडे पाहिलं जातं. हास्य व्यक्तिगत असतं तसं ते सामूहिक असतं. त्याचं सामर्थ्य इतकं की ते युद्धाची स्थिती बदलतं. सामन्याची रंगत बदलण्याचं सामर्थ्य त्यात असतं. तसंच दु:खावर फुकर, विषाचा निरास म्हणूनही हास्याचं महत्त्व आहे. हास्य जगण्याची उमेद वाढविणारं उत्प्रेरक आहे. ते कधी लज्जा उत्पन्न करतं, तर कधी तुमची उपजत प्रवृत्ती समूळ बदलून टाकतं. ते कथा, काळ, विचार, विसंगती, टीकेचं माध्यम, साधन बनतं, तर कधी ते जीवनाचं साध्य बनून राहतं. खेद, उपहास, शल्य, सूचक हास्यातून जितकं प्रभावीपण व्यक्त होतं, त्याला पर्यायच नसतो. Million Doller Smile पाहायचं तर निरागस बाळाचं. त्यात किती बळ असतं म्हणून सांगू? ते पाहण्या- अनुभवण्यासाठी सारं आयुष्य पणाला लावताना मी पहिलं आहे आणि आयुष्याच्या अंतापर्यंत त्या सुवर्णक्षणाची प्रतीक्षा करतानाही!
हास्य मानवी मनाचं प्रतिबिंब असतं. हसरा चेहरा, बोलके डोळे, जुलमी नेत्र हे नुसते शब्द वाचले आणि विचार करीत जाल तर हास्य किती गहिरं असतं हे तुमच्या लक्षात आल्यावाचून राहणार नाही. हास्य सार्वकालिक असतं तसं ते सार्वत्रिकही. Laughing Buddha किती जुना! चर्चिल, चॅप्लिन, येल्सीन तितकेच हसविणारे! हास्याची नजाकत असते तसं नुक्कड हास्यही असतंच. हास्य आम असतं आणि खासही! ते संसर्गजन्य असतं हे Laughter show मध्येच लक्षात येतं असं नाही, तर गप्पांच्या फडात आणि मित्रांच्या मैफलीतही लक्षात येतं.
हास्य मानवी भावभावनांचं निदर्शक असतं तसं नियंत्रकही! हास्याच्या परिणामांचा अभ्यास करणारी मानसशास्त्र, शरीरशास्त्र या तर शाखा आहेतच पण केवळ हास्य परिणामांवर उभं आहे Gelotology. मूक, बधिर, अंध, अपंग, मतिमंद साच्यांत हास्य उपजत असतं.
खरं हास्य निरागस, निष्पाप बाळाचं. ते नैसर्गिक खरं ! माणूस वाढतो मुळात हास्याच्या विरोधात. म्हणजे तो जेव्हा जगस्पर्शी, संसर्गी नसतो, जीवनाच्या कोणत्याच छटा, कळांची मोहर त्यावर उठलेली नसते तेव्हा सुरकुतीमुक्त, सुतकमुक्त हास्य बाळाचं बाळ दिवसाकाठी किती वेळा हसतं. म्हणे तीन-चारशे वेळा हो! आणि माणूस (थोराड) फक्त पंधरा, सोळा वेळाच. आता तुमच्या लक्षात येईल की, माणसाचं सारं जगणं हास्यविरोधी असतं असं मी का म्हणतो ते! संस्कार म्हणजे निसर्गनिरोध! मुलांना शिकवलं जातं... फिदी फिदी हसू नये, दात काढून हसू नये, गालातल्या गालात हसावं, मुलीच्या जातीनं चार-चौघांत हसू नये... म्हणजे नैसर्गिक वागू नये. इथेच जीवनातील एक-एक हास्य लकीर माणूस गमावतो व एकेक हस्तरेषा (Life print) कमावतो.
बाळ घर ओलांडू लागलं की त्याला आपण बागूलबुवा दाखवितो. भय माणसात उपजत नसतं. ते मनुष्यनिर्मित असतं. काहीएक प्रमाणात ते अनुभवजन्यही असतं; पण भय हसण्याचा मृत्यू घडविते ... किमानपक्षी आत्महत्या तरी ! भावानुभव ही देण्याची गोष्ट नाही. ती जाणीव आहे. ती घेत, घेत विकसित होते. पोलीस, दाढीवाला, राक्षस, वेडा, कैकेयी, हॅम्लेट, कब्ज़ी ही भयचरित्रे मनुष्यनिर्मित. खुललेली कळी, स्मितहास्य, बोलके, हसरे डोळे निसर्गाचे वरदान! हा फरक एकदा का आपण समजून घेऊ लागलो की हास्याची किंमत कळू लागते. हास्य उपजत असतं. ते उसनं आणता येत नाही. कर्जाऊपण नाही मिळत ते बाजारात. घरचं बेणं विकायचं नि बी. टी. बेणं आणून पेरायचं यात जो अव्यवहार्यपणा आहे
तोच भय नि हास्यफरक आहे. कोणी घर देता का घर' अशी याचना करणारा नटसम्राट घर मागत नव्हता; तो मागत होता हास्य, आनंद आणि जीवन!...
माणूस वयात येऊ लागला की त्याचं प्रकट हास्य लोपू लागतं. लिंगभाव आणि लिंगभान या दोन्ही गोष्टींमुळे नैसर्गिक हास्यास आहोटी लागायला लागते. असं का होतं? मला आठवतं की, माझ्या जीवनात पहिल्या हुरहुरीची, सुरसुरीची झिमझिम सुरू झाली होती. मी कविता लिहू लागलो होतो. पहिल्या एक-दोन कवितांत मी कुठंतरी लिहून गेलोय...
तुझ्या खळीचे हास्य बरसते
मला पाहता विरत असे
हास्य विलोपनाचे गुपित तुजला
खरोखरीच उमजले नव्हते का?
मग मला पाहून थबकलीस का?
मन नावाचं जे अव्यक्त संवेदना आहे ना, ती या डिजिटल युगातील सर्वांत संवेदी स्मरणिका आहे. एकाच वेळी किती भावकल्लोळांचा ऑर्केस्ट्रॉ ते वाजवित असतं नि माणसातला पॉप किती देहबोलीतून व्यक्त होत असतो. पौगंडावस्थेत मुलं-मुली दोन्ही भांबावलेली असतात. दोघांचं हास्य विरतं. युवावस्थेत पुरुष व्यवहारी असतो. तो लवकर खोटं हसायला शिकतो. या खोट्या हसण्याचे बळी म्हणजे प्रेमभंग? त्यात जीवनहास्य कधी कायमचं संपतं, कधी प्रसंगपरत्वे! पण मी तुम्हाला सांगतो, ज्यांना तरुणपणात हास्य गमवावं लागतं ते आयुष्य भर हसणं गमावण्याची ठसठस घेऊन कूस बदलत जगत राहतात. ज्यांना समायोजन (Adjustment) जमते ते परत हसू लागतात; पण ते निसर्गदत्त नसतं, फसवं असतं. त्या हसण्यात मित्रांनो प्रतारणा असते, स्वत:ची नि दुस-यांचीपण! पण ही जगरहाटीच जीवन बनून राहते.
विवाह म्हणजे सुखनिधान अशी व्याख्या केली तर हास्य हीच त्याची कसोटी ठरते. पहिल्यांदाच सासरी जाऊन परतणाच्या मुलीचा चेहरा पाहून सुजाण आई-बाबा मुलगी दिल्याघरी सुखी आहे की नाही ते ठरवितात. मुलीची खुललेली कळी पाहायला आई कोण उत्सुक असते म्हणून सांगू! मध्ये मी माणसाच्या देहबोलीबाबत काही निमित्ताने वाचत, पाहत, चाळत, शोधत होतो; तर वैवाहिक जीवनाची हास्यतासूचक काही चित्रे पाहण्यात आली. अर्थात ती सारी चित्रं शयनकक्षातली होती. त्या चित्रांत प्रेमी
युगुलांची पांघरुणातून बाहेर डोकावणारी केवळ पावलं दाखविण्यात आली होती. चित्र १ - चारी पायांची बोटं छताकडे. (हास्यविलोप). चित्र २ - दोन पायांची बोटे छताकडे तर उर्वरित दोन पायांची बोटे जमिनीकडे (ब्रह्मानंदी टाळी). चित्र ३ - दोन्ही पाय एकमेकांत गुंतलेले... बोटे अस्ताव्यस्त (हास्यद्वंद्व/सफरचंद - खाये तो पछताये, न खाये तो भी!) जीवनातील हास्याची ही तन्हा असते. हास्य कमावतापण येतं. त्याला शहाणपण लागतं. हास्य कधी समायोजनात हाती येतं ते लगेचच. निग्रह, निर्धारातून येणा-या हास्याचा सूर्य उशिरा उगवतो; पण चिरस्थायी असतो. हसच्या चंद्राला डागांचा शाप असतो. ग्रहणांचं ग्रहणही असतं; पण खग्रास होऊ द्यायचं की खंडग्रास ते तुमच्या उपजत, अनुभवजन्य शहाणपणावर अवलंबून असतं.
माणसाच्या जीवनात हास्याचा वसंत दुस-यांदा बहरतो ते बाळाची पावलं घरी उमटली की. बाळाच्या चेह-यावरचं हास्य जपण्यात आपण आपलं हसणं, रुसणं, मुरडणं, मुरका सारं मागे टाकतो. प्रौढत्वी निज शैशवास जपणे' या ओळीचे दोन अर्थ आहेत. तुम्ही प्रौढ झालात तरी बाळाचं बाळपण तुम्हाला जपता आलं पाहिजे आणि तुमचं स्वत:चंही! पण नातवाचं हास्य म्हणजे स्वर्ग! युरोपात आता ते स्वप्न होऊन गेलंय. आपण भारतीय शहाणे. मुलगा-मुलगी अमेरिकेत गेली, ती अमेरिकी झाली तरी भारतीय राहतील म्हणजे सहज हसत राहतील हे पाहतो.
माझं एक निरीक्षण आहे की, माणूस जसजसा भौतिक, वैज्ञानिक, संगणकीय समृद्ध होत जागतिक होत गेला तसं त्यानं माणसातलं उपजत एक-एक गमावलं. माणसाचा सर्वाधिक -हास जर कशाने झाला असेल तर त्यानं गमावलेल्या सहज हास्याने! माणूस घरात आला की सारा ताण, तणाव, श्रम, कष्ट, चिंता विसरतो त्याचं रहस्य, औषध काय तर आत्मीयांच्या चेह-यावर फुललेलं आश्वस्त हास्य! ‘याचसाठी केला होता अट्टहास' असं मनातल्या मनात गुणगुणत माणूस एक एक नाड्या सोडतो त्या केवळ बॅग, कपडे, बुटांच्याच नसतात, तर त्या शरीर, मन, भावनांच्यापण असतात. आश्वासक हास्याचा दिलासा कोणत्याच डॉक्टरच्या दवाखान्यात, हॉटेलात, व्हिटॅमिनच्या गोळीत नसतो अन् कोणत्याच चॅनल, चॅटमध्येही तो कमावता येत नाही.
हास्य अलीकडे उपचार झालाय नि योगही! ‘उपचार' शब्दाचे दोन अर्थ आहेत, एक आहे शिष्टाचार आणि दुसरा आहे इलाज. माणसाच्या समृद्धींनी व्याधी, व्यवधानात भर घातल्याने त्याचं रोजचं जीवन तणावग्रस्त होऊन
गेलंय ! मनोविकार, रोज वाढताहेत. तो उसनं, शिष्टाचाराचं हसत जगतो आहे. बहुधा चित्रपट 'जैत रे जैत' असावा. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शक होते. गाणं, ना.धों. महानोरांचं असतं, ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी...?' कवीला, दिग्दर्शकाला त्या गाण्यातून काय सुचवायचं, काय अभिप्रेत होतं मला माहीत नाही; पण त्या गाण्यातून नेहमीच आनंदाची एक दूर गुंज सतत माझ्या कानांत, मनात हृदयात घुमत राहते. हास्याच्या लकीर लहरीतही मी हे अनुभवत आलो आहे.
पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे, द. मा. मिराजदार, मार्क ट्वेन, हरिशंकर परसाई, काका हाथरसी हे सारे माणसास हसवतात ते कशाच्या जोरावर? तर त्यांना माणसाच्या विसंगतीचं चांगलं भान असतं. माणसानं स्वत:ला रोज आरशात पाहायला हवं. स्वत:शी बोलायला हवं. जी माणसं स्वत:चा विदूषक होऊ देत नाहीत त्यांना हास्यनिधान लाभतं. माणसाच्या हास्याचं नि निसर्गाचं निकटचं नातं आहे. निसर्ग फुला-पानांतून हसतो. माणूस गाला, डोळ्यांतून. डोळ्यात वाच माझ्या गीत भावनांचे' सांगणारा कवी हास्याचा शोधच करीत असतो. निसर्गात फुलणारी फुलं, पाखरं असतात हास्याची कारंजी! फुटबॉल स्टेडियममधला जोश असतो जीवनगाणे!
हास्य तुम्हाला काय नाही देत? तो थकल्यानंतरचा विसावा असतो. तो ताण-तणावांचा विरंगुळा असतो. तो दु:खावरची फुकर असते. ते मनोविकास घडवते. ते भयावर मात करते. हास्य स्वत:बरोबर अन्यांनाही आनंदी करते. आपणासारखे करूनी सोडावे सकळ जन.' मागील समाजभान हास्यात येतं तेव्हा हास्य भूमितीच्या पटीनं वाढतं. जी माणसं हसत नाहीत त्यांचा भरोसा करणं अवघड. तुम्ही नि तुमचं जीवन आश्वासक, विश्वासार्ह, दिलासा देणारं बनवायचं असेल तर हसत रहा. हास्य, क्रोध, वैर, दुजाभाव, विषमता, अन्याय, अत्याचार आणि सर्वांत म्हणजे मानसिक प्रदूषण थोपवते. हसा, हसवा, हसत रहा!
☐☐
आज भारतीय गणराज्य आपल्या गणतंत्रात्मक राजवटीची ६९ वर्षे पूर्ण करीत आहे. गेल्या ६९ वर्षांत या देशाने अनेक पक्षांच्या सरकारांचे प्रशासन अनुभवले आहे. भारतीय राज्यघटना या देशास धर्मनिरपेक्ष मानते. या पार्श्वभूमीवर या देशात बहुविध धर्म, भाषा, संस्कृतींचे स्वातंत्र्य आहे. प्रत्येकास स्वत:ची संस्कृती, धर्म, परंपरा, विचार अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे; परंतु दुस-याच्या जात, धर्म, पंथविषयक धारणेत हस्तक्षेप करण्याचा कोणासही अधिकार पोहोचत नाही. धर्मांतरही इच्छेविरुद्ध व जबदरदस्तीने करता येत नाही. अशा पार्श्वभूमीवर हा देश सहिष्णू, सर्वधर्म समभावी देश ठरतो. विविधतेत एकता, आंतरभारती भाव ही या देशाची खरी ओळख आहे.
गेल्या ६९ वर्षांत या देशाने अनेक असहिष्णू आघात झेलले आहेत. ते कोणा एका पक्षाच्याच कारकिर्दीत झाले असे म्हणता येणार नाही. या देशाच्या ६९ वर्षांच्या प्रजासत्ताक वाटचालीत राजकीय, धार्मिक, जातीय असहिष्णुतेच्या घटना वारंवार घडत आल्या आहेत. त्या त्या वेळी समाजातील सजग बुद्धिवंत, कलाकार, साहित्यिकादिंनी असहिष्णू घटनांचा निषेध नोंदवत केवळ पदव्या, पुरस्कारच परत केलेत असे नव्हे; तर तुरुंगवासही भोगला आहे. त्यामुळे या देशाने परंपरेने तो सहिष्णू असल्याचेच सिद्ध केले आहे.
वर्तमान सरकारच्या कार्यकाळात दादरी घटना, रोहित वेमुलाची आत्महत्या, गोमांसबंदीच्या घटनांचा निषेध व पुरस्कार वापसीमुळे या सरकारच्या वाढत्या सहिष्णुतेकडे लक्ष वेधणे भारतीय सजग सहिष्णू समाजाचे संविधानिक कर्तव्यच आहे. ते पाहता विद्यमान सरकारने सजग राहून आपण कोणा एका धर्मविशेषाचे सरकार नसून घटनात्मक बांधीलकीनुसार आपण
धर्मनिरपेक्ष आहोत, याचा निर्वाळा व ग्वाही स्पष्ट शब्दांत द्यायला हवी व तशी प्रशासनिक प्रतिबद्धता कृतीतून प्रतिबिंबित व्हायला हवी. अशा घटनांत पंतप्रधानांचे मौन वा उशिरा प्रतिक्रिया देणे संशय निर्माण करणारे ठरते.
अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांच्या प्रतिक्रियेनंतर सरकारचे स्पष्टीकरण येण्यापेक्षा देशातील बुद्धिजीवी, कलाकार, साहित्यिकांच्या निषेध व पुरस्कार वापसीची नोंद घेऊन जर सरकारने सहिष्णू असल्याची ग्वाही दिली असती तर ते अधिक विश्वासार्ह ठरले असते.
सलमान रश्दी, एम. एफ. हुसेन, पेरूमल मुरुगन यांचे विस्थापन वा लेखकीय आत्महत्या कोणा एकाच पक्षाच्या कार्यकालातील नाहीत. राजकीय आणीबाणी जाहीर करणारे पक्षही स्वत: सहिष्णू म्हणून घेऊ शकत नाहीत. बाबरी मशीद, शहाबानो खटला अशा प्रसंगीही देशाने जे गैर आहे, त्याचा निषेध नोंदविला आहे.
व्यक्तिशः मला भारतीय गणराज्याचा घटनात्मक बांधील नागरिक म्हणून हा देश सर्व जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत, संस्कृतीच्या समन्वयातून उभारणारा एकात्म देश व्हावा असे वाटते. जगात असे वैविध्य असलेले देश एकात्म राहून विकास करून दाखवीत असतील, तर आपण का नाही त्यांचा आदर्श ठेवायचा?
☐☐
धर्म आणि विश्व एकता
‘मनुष्य हा समाजशील प्राणी आहे' या व्याख्येत माणसाची उपजत समूह वृत्ती दडलेली आहे. समूहात राहणारे प्राणी, पक्षी अस्तित्वभयापोटी जसे समूहात राहतात, तसेच त्यांच्या जीवनाच्या असलेल्या अनेकानेक गरजा केवळ समूह जीवनामुळेच पूर्ण होत असतात. असे दिसून आलेले आहे की, सर्व देशांतील विविध संस्कृतींत पूर्वापर देव, धर्म या कल्पना कोणत्या ना कोणत्या रूपात अस्तित्वात होत्या. माणसाच्या निसर्गदत्त शक्ती, वृत्तीत लौकिक-अलौकिक, आत्मा-परमात्मा, इहलोक-परलोक, देव-दानव, पाप-पुण्य, नैतिक-अनैतिक, आस्तिक-नास्तिक, विज्ञानअध्यात्म, सत्य-असत्य, भ्रम-वास्तव या कल्पनांचा संघर्ष आहे. मनुष्य प्राचीनकाळी झंडीत राहत होता. गुंफेत वस्ती करीत असल्याच्या काळातील चित्र, शिल्पातही देव, धर्मविषयक संकल्पनांचे चित्रण आढळते. असुरक्षिततेपोटी माणूस अलौकिक शक्तीवर, चमत्कारांवर विश्वास ठेवून जगत आला आहे; पण जसजसा तो विकसित होत गेला, स्वावलंबी व स्वप्रज्ञ बनत गेला तसतसा त्याच्यावर असलेला अलौकिकाचा प्रभाव कमी होऊन तो इहवादी, विज्ञानी व बुद्धिवादी बनत गेला, हे नाकारता येणार नाही.
धर्माचा उगम माणसाच्या सश्रद्ध वृत्तीत आहे. धर्माचा मूळ उद्देश माणसास उन्नत करणे हाच असतो. भावना, इच्छा, ज्ञान अशा त्रिविध पद्धतींतून माणसाची घडण होत असते. पूर्वी जेव्हा त्याला स्वभान नव्हतं तेव्हा अलौकिकावर त्याचा विश्वास होता. भय, आश्चर्य, चमत्कार, विलक्षणता, शरणागती यांचं त्याच्यावर गारूड असायचं. यातून धर्मभावना त्याला मुक्ती द्यायची. म्हणजे जीवन पूर्ण, स्थिर, सुरक्षित करायला मदत करायची. त्यासाठी तो विविध कर्मकांडे करायचा; पण कालौघात त्याच्या
लक्षात आलं ते यातलं वैयर्थ. मग तो सदाचार, नैतिकता, पावित्र्याचा उपासक बनला, जो खरा धर्माचरणाचा भाग होय. जगातील सर्व धर्माबाबत आपणास हे पाहता येणं शक्य आहे. गती कमी-अधिक असेल; पण धर्माचा प्रवास अलौकिकाकडून लौकिकाकडे सुरू आहे, हे मात्र निश्चित. शिक्षणाचा, ज्ञान-विज्ञानाचा प्रभाव वाढून माणूस प्रगल्भ व बुद्धिवादी बनत जाईल, तसे धर्मरूप हे अधिक सामाजिक बनत जाईल.
धर्म संकल्पनेचा संबंध संस्कृतीशी असतो. मानववर्तन व व्यवहारातून, क्रिया-कर्मातून धर्मवैविध्य आकाराला येत असते. प्रत्येक धर्माची स्वत:ची अशी आचारविचार पद्धती असते. ती तो धर्म ज्या काळ, प्रदेशात आकारतो, त्यावर अवलंबून असते. धर्मामागे मिथक असतात. ती बहुधा त्या त्या धर्मांच्या प्रमुख ग्रंथांतून समाजमनात स्थिर होतात. त्यातून धर्माचा चेहरा, परंपरा उदयास येते. धर्म हा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जसा असतो, तशी ही एक जीवनशैलीपण असते. धर्मग्रंथ त्या त्या धर्मीय बांधवांसाठी मार्गदर्शक असतात, तसेच बंधनकारकही. त्यामुळे धर्मरूप स्थिर होते व बंदिस्तही. जगात धर्मात वेळोवेळी बदल झालेत; पण त्यांची गती मंद आहे. प्रत्येक धर्माची आपापली आराध्य दैवते असतात. धर्मांची प्रार्थना मंदिरे असतात. त्यातून त्या त्या धर्माच्या पूजाविधी, परंपरा, व्यवहार अस्तित्वात येतात. एका विशिष्ट धर्मीयांत एकात्म भाव दिसतो कारण धर्मातून सामाजिक संघभाव, आपलेपणा निर्माण होतो. माणसांचे जात, धर्म, पंथविषयक समुदाय त्या समाजातील कुटुंबव्यवस्था, विवाह पद्धती, रोटी-बेटी व्यवहार ठरवित असतात. त्यातून नातेसंबंध निर्माण होऊन त्यांचे रूपांतर विशाल एकजिनसी समुदायात होत असतं. धर्माला असलेल्या नैतिक अधिष्ठान व बंधनांमुळे मनुष्यसमाज सदाचारी होण्यास सर्वसाधारण काळात साहाय्यच होते. पण कधी-कधी राजकीय आक्रमणे, स्वधर्म अभिमान यांतून हिंसा घडते; पण असे प्रसंग अपवाद असतात. मानवता धर्म हा सर्व धर्माचा खरा तर मूळ पाया; पण संघर्षाने त्याला गालबोट लागते. जगात अशा पद्धतीने आकारलेल्या धर्मात वैविध्य असणे हे जगाच्या बहुसांस्कृतिकतेचेच लक्षण होय. जगात बौद्ध, मुसलमान, हिंदू, ख्रिश्चन, पारशी, जैन, शिंतो, बहाई, यहदी असे अनेक धर्म आहेत. शिवाय ताओ, झरतुष्ट्र कन्फ्यूशियस इ. तत्त्ववेत्यांनी सांगितलेल्या विचारानुसार व्यवहार करणारे समुदायही आहेत. त्यांच्यात आणि धर्मावलंबी समुदायात साम्य आढळते. प्रत्येक धर्म आपली स्वतंत्र ओळख ठेवण्याची धडपड करीत
असतो. त्यातूनच त्या धर्माचे स्वतंत्र अस्तित्व टिकून राहते. असे असले तरी कालौघात अनेक धर्मात विचारवैभिन्यामुळे विभाजन, पंथ निर्माण झाले आहेत.
धर्माचे मानसिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक रूप असते. मानसिकतेतून श्रद्धा, अश्रद्धा जन्मते. तिचा संबंध बुद्धीशी असतो तसाच हृदयाशीही. प्राथमिक अवस्थेत मनुष्य ऐहिक सुखाच्या मागे असतो. धर्मामुळे ते प्राप्त होते, अशी त्याची धारणा असते. दारिद्र्य व अज्ञानाच्या गर्तेत असलेल्या समाजात ही भावना प्रबळ असते. मनुष्य शिक्षित झाला, भौतिकदृष्ट्या समृद्ध झाला म्हणून तो धार्मिक श्रद्धांतून मुक्त होतो असे म्हणता येणार नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन समजणे व तो अंगीकारणे यांत योजनांचे अंतर असते. त्यामुळे सर्वसाधारण समाजाचा ओढा हा पारंपरिक धर्माचरणाकडेच राहतो. प्रत्येक काळात प्रबोधन करणारे विचारवंत, समाजसुधारक जन्मत असतात. ते आपापल्या परीने धार्मिक, सामाजिक बदल घडवून आणत असतात. म्हणून तर समाज पुरोगामी बनत असतो.
धर्माचा नि राजकारणाचा संबंधही पुरातन म्हणायला हवा. पूर्वी राजे आपल्या राजवटीत विशिष्ट धर्माचा स्वीकार, पुरस्कार करीत. त्यातून त्या धर्म प्रचार-प्रसारास गती येत असे. इस्लाम, बौद्ध, ख्रिश्चन इत्यादी धर्माच्या प्रचार-प्रसारात राजाश्रयाचा मोठा वाटा दिसून येतो. पूर्वीची युद्धे तर धर्मावरून घडत. 'धर्मयुद्ध’ शब्दास जी धार आहे ती धर्माभिमानाचेच प्रतीक होय. धर्मामुळे सत्तांतरे घडल्याची उदाहरणेपण इतिहासात आढळतात.
धर्माचा खरा प्रभाव दिसून येतो, तो माणसाच्या सांस्कृतिक जीवनावर. धर्म भाषा, परंपरा, चालीरीती, रिवाज, खानपान, रोटी-बेटी व्यवहार, नातेसंबंध, पोशाख, कर्मकांड, पूजाविधी, वर्तन-व्यवहार अशा अंगांनी समग्रतः मानवी जीवनास घेरत असतो. त्यातूनच संस्कृतीचा उदय-अस्त होतो. सांस्कृतिक जीवन ज्या देश, प्रांत, काळात उदार राहिले, तिथे धर्मस्वरूपात मोठी स्थित्यंतरे घडून आल्याचे दिसते. कर्मठ धर्माचार हा धर्माचे पारंपरिक रूप टिकवून ठेवतो. पुरोहित, मौलवी, धर्मगुरू हे रूप टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत राहतात, तर समाजसुधारक परिवर्तनांचा प्रयत्न चिकाटीने, प्रसंगी विरोध, रोष पत्करून करीत राहतात.
मनुष्य समाजशील असल्यामुळेच तो घर, समाज, समुदाय, गाव, राज्य, राष्ट्र, विश्व अशा विशालतर समुदायाचा घटक बनून राहत असतो.
समुदाय हे धर्मावलंबी असतात हे खरे; पण एकाच देशात अनेक धर्मसमुदाय वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या गुण्यागोविंदाने राहत आले आहेत. भारत हे त्याचे व्यवच्छेदक रूप होय. 'विभिन्नतेत एकता' हीच भारताची खरी ओळख आहे. भारत देश अस्तित्वात आला, तोच मुळी विभिन्नवंशीय वस्तीतून. भारतात आर्य, अनार्य, हुण, कुशाण, नाग, अफगाण असे अनेक वंश स्थलांतराने आले व स्थिर झाले. त्या सर्वांची आपली संस्कृती होती. मध्यकाळात व त्यानंतर भारतावर आक्रमण करणाच्या अनेक आक्रमांचा तर उद्देशच धर्मप्रचार होता. आज भारतात जे धर्मवैविध्य आढळते त्याची पाळेमुळे इतिहासकालीन स्वाध्यांत आढळतात. मुस्लीम, ख्रिश्चन, धर्म जसे इथे आले तसे इथून हिंदू, बौद्ध धर्म अन्य राष्ट्रांत गेले. धार्मिक देवाणघेवाण हा जगाचा स्थायीभाव आहे.
आजमितीस भारतात हिंदू, इस्लाम, ख्रिश्चन, शीख, पारशी, जैन, बौद्ध इत्यादी धर्म आहेत. घटनेने मान्य केलेल्या २२ भाषा देशात राजभाषा म्हणून प्रशासनात वापरल्या जातात. त्यांच्यात भाषांतराने साहित्यिक आदानप्रदान होत राहते. इथे जातीय वैविध्य आहे. जातीय कर्मठता असली तरी इथे आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना मान्यता आहे. आता तर शासन अशा विवाहांना अनुदान देऊन प्रोत्साहन देत आले आहे. त्यामागे एकात्म भारत घडविण्याचेच स्वप्न आहे. भारतात प्रांतपरत्वे पोशाख, राहणीमान, आहार, मंदिरे, चालीरीती, परंपरा यांचे वैविध्य आहे; पण त्याचे मूळ इथल्या निसर्गवैविध्यात आहे, हे आपणास विसरता येणार नाही. जात, वंश वैविध्य असले तरी सहअस्तित्वाची येथील परंपरा अनुकरणीय आहे. भारतात निसर्गाइतके वैविध्य व सौंदर्य इथल्या वंशीय चेह-यांमध्ये आहे तसे पोशाख, दागिने, आहार, सण-समारंभात आहे. बहुसंख्य हिंदू इथे असले तरी मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, शीख, जैन, बौद्धांना इथे धर्मस्वातंत्र्य आहे. यातूनच देशात एकता टिकून आहे.
भारतातील राष्ट्रीय एकात्मतेचे मूळ इथल्या राज्यघटनेत आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, विज्ञाननिष्ठा इत्यादी मूल्यांवर हा देश उभा आहे. सन १९५३ मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी देशाचा वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट करताना म्हटले होते की, “वैज्ञानिक दृष्टिकोन ही एक विचारप्रक्रिया आहे. ती एक कृती पद्धती आहे, तो एक आचारधर्म होय. हा आचारधर्म सत्यशोधक आहे. विज्ञाननिष्ठा ही एक जीवनशैली होय; आणि खरं सांगायचं तर तो
मानवमुक्तीचा मार्ग आहे. मला असं वाटतं की, धर्म आणि राष्ट्रीय एकात्मता आपणास जर ख-या अर्थाने अमलात आणायची असेल तर नेहरूंचं हे विधान आपलं जीवनध्येय बनायला हवं. भारतासारखा बहुसांस्कृतिक देश एकात्म बनायचा तर धर्म, जात, भाषा, प्रांत, वंश, परंपरांच्या पलीकडे जाऊन मानवधर्मी, भूतदयावादी, अहिंसक, सहिष्णू, समाजच या देशास एकसंध व एकसंघ बनविल.
धर्मतत्त्व हे जर मानव नियंत्रणाचे साधन असेल तर सर्व धर्मात काही समान सदाचार अनुस्यूत आहेत. महात्मा गांधींनी ते शब्दबद्ध करीत असताना म्हटलं होतं की, “कामाशिवाय संपत्ती, विवेकाशिवाय समाधान, चारित्र्याशिवाय ज्ञान, नैतिकतेशिवाय व्यापारउदीम, मानवतेशिवाय विज्ञान, त्यागाशिवाय पूजा आणि तत्त्वाशिवाय राजकारण म्हणजे हिंसा आणि अधर्म होय." सत्य, अहिंसा, दया, प्रेम, करुणा, शांती कोणत्या धर्माने सांगितलेली नाही? आज विश्वसमुदाय अपघाती व प्रासंगिक युद्ध, हिंसा, अत्याचार, असहिष्णुता, जाळपोळ, हत्या, आक्रमण इत्यादींचा निषेध करीत असतो त्याचे मूळ सहअस्तित्वयुक्त बंधुभावी, समानशील विश्वनिर्मितीच्या स्वप्नात आहे. धर्म आज केवळ राष्ट्रीय एकात्मतेचा घटक नसून तो 'वसुधैव कुटुंबकम'चा पाया आहे. वर्ल्ड व्हिलेज'ची आजच्या माहिती व संपर्क युगाची कल्पना तरी काय आहे? भौतिक गतीप्रगतीपलीकडे आपणास बंधुभावयुक्त मनुष्यसमाज घडवायचा आहे. नवा धर्म म्हणजेच जय जगत्!
☐☐
वर्तमान किती बदलून गेलाय म्हणून सांगू ? गेल्या शतकातील पन्नास वर्षे मला आठवतात. टी. व्ही. नव्हता. मोबाईल्स नव्हते. संगणक नव्हता व्यवहारात. सुधारणा, आधुनिकता म्हणजे फोन, रस्ते, आगगाडी, पोस्ट, तार, सिनेमा, रेडिओ. घरोघरी माणसांचं येणं-जाणं, बोलणं, राहणं होतं. मामाचा गाव होता. आजोळ होतं. आईला माहेरची ओढ असायची. पैपाहुण्यांचं कोण आकर्षण! पुस्तकांचे गारुड होतं. मुलं खेळायची. मुली बागडायच्या. तरुण फिरायचे. प्रौढ सपत्निक नाटक, सिनेमाला जात. कुटुंबाच्या कुटुंब प्रवास करायचं. सामुदायिक उत्सव, जत्रा, बाजार यांना महत्त्व होतं. निवडणुकीत गाव, गल्ली एक होती. मृत खांद्यावरूनच जायचा. वरात घोड्यावरूनच निघायची. सनईचे सूर मांगल्याची खुण होती तर सतार शोक व्यक्त करायची. रंगांचं नि मनाचं नातं होतं. हातच्या स्वयंपाकाला चव होती. हॉटेलात जाणं निषेधार्ह मानलं जायचं. वडील माणसांचा आदर होता. शिक्षकांचा आदर्श होता. पोलिसांचं भय होतं.
एकविसावं शतक दहा वर्षे आधीचं उजाडलं ... सुरू झालं. संगणक क्रांतीनं जग बदललं. जागतिकीकरणाची पहाट झाली. इंटरनेट, मोबाईल, वेबसाईट्स, सॉफ्टवेअर्सनी काळ, काम वेगाचं गणित इतिहासजमा करून टाकलं. माणसानं नवा डाव मांडायचं ठरवलं. गेल्या शतकाचं सारं मागं टाकायचं ठरवूनच एकविसावं शतक बहुधा जन्माला आलं. जुने जाऊ द्या मरणालागुनी' त्यानं ठरवूनच टाकलं होतं. पण असं नाही झालं की सगळेच बदल चांगले झाले. विशेषतः मूल्य, संस्कार, संबंध, संवाद, माणुसकी, सामाजिकता धोक्यात आली ती नव्या शतकाच्या नव्या विचारांनी. एंड ऑफ आइडियॉलॉजी', 'वर्ल्ड इज फ्लॅट’, ‘लिटरेचर इज डेड' अशा नकारात्मक विचारधारेतून जो समाज उदयाला आला, त्या समाजाला या नकारात्मक तत्त्वज्ञानाने आत्मरत केले. नार्सिसस होता-होता माणूस एकांडा, एकलकोंडा
झाला. 'मी नि माझं' हेच त्याचं जग बनलं. त्यात नवीन इलेक्ट्रॉनिक साधनांनी विकसित केलेल्या फेसबुक, मेल, चॅट, व्हॉटस्अॅपने त्याला आभासी सामाजिक बनविले. घरबसल्या काही न करता शेरेबाजी करणे यालाच तो सामाजिक संवेदना मानून गुंतत राहिला. त्यामुळे त्याला स्वत:च्या मरणाचा सांगावा कधी कळलाच नाही.
एकविसाव्या शतकाची संस्कृती व जीवनशैली पूर्व शतकापेक्षा कितीतरी अर्थांनी वेगळ्या धाटणीची आहे. वर्तमानकाळाचे ज्येष्ठ तरुण पिढीपेक्षा हे वेगळेपण प्रकर्षाने अनुभवतात. सन १९७० च्या दरम्यान संगणकाच्या सार्वजनिकरणास प्रारंभ झाला. भारतात मात्र त्यास गती आली १९९० च्या दरम्यान, त्यामुळे गेल्या पंचवीस वर्षांतलं जीवन सर्वांसाठीच रोमहर्षक ठरलं. या काळानं माणसाला नवनवी इलेक्ट्रॉनिक साधने देत यंत्रे मोडीत काढली. त्यांची जागा सर्वच क्षेत्रांत संगणक, इलेक्ट्रॉनिक, इंटरनेटसाधित साधनांनी घेतली. रेडिओच्या जागी टी. व्ही. आला. फोनच्या जागी मोबाईल आला. पुस्तकाच्या जागी किंडल आला. गॅसची जागा ग्रिलनी घेतली. वायरकडून वायरलेस होत साधने वायफाय झाली. या सर्वांनी मिळून एक हायफाय संस्कृती जन्माला घातली. वेबचं जग वास्तविकाकडून आभासाकडे वळले. सेल्फी काढत समाज सेल्फिश झाला. माहिती, तंत्रज्ञानातून आलेल्या समृद्धीने माणसाला भौतिक संपन्न बनवले. कृत्रिम बुद्धिमत्ता विकास व संग्रहण, स्मरणाचे काम संगणक, मोबाईल्स करू लागल्याने माणसाला स्वत:चा नाव, पत्ता, नंबर लक्षात ठेवण्याची जरुरी राहिली नाही. तर्क, गणित, पाढे विसरणाच्या माणसाचे गुणगुणणेही संपले व विचार करणेही. नवनवीन उपकरणांच्या वापरातून त्याचे चित्त केंद्रित न होता चंचल तर झालेच; पण एकाच वेळी अनेक कामांत संबंधात, संवादात गुंतलेल्या माणसाचे रोजच्या जीवनातील ताणतणाव वाढले. तो क्रुद्ध, हिंसक, तापट तर बनलाच; पण छोट्या-छोट्या गोष्टीत त्याची प्रतिक्रिया, प्रतिसाद चिडचिडा झाला. संगणक, सिनेमा, व्हिडिओज, क्लिप्स, मेसेज, केबल्स, गेम्समध्ये गुंतलेला मनुष्य गर्तेच्या गुहांमध्ये गुंतून गर्क, गुंग राहत एक प्रकारचा मनोविकारीच बनला म्हटले तर ते वावगे ठरू नये नि अतिशयोक्तही! त्याचं वाचन झडलं, जुने स्वस्थ मनोरंजनाचे मार्ग काळाने इतिहासजमा केले. तो निसर्गाकडून कृत्रिम, आभासी जगाचा भक्त नि भोक्ता बनला. त्याची न संपणारी भूक तिने त्याला चंगळवादी, उपभोगी, मेफ्लाय संस्कृतीचा दास बनविले. स्त्री-पुरुष भेदाच्या भिंती कमी होऊन नर्डस (Nerds) दुःखी, उदास, होणा-या माणसांचं एक नवं निद्रिस्त जग
निर्माण झालं. त्यात तो स्वत:ला निष्क्रिय, निराश अनुभवू लागला आहे.
विसाव्या शतकापर्यंतचे बदल आणि वर्तमानात होणारी परिवर्तने यांत मूलभूत अंतर आहे. आजवरची क्रांती माणसांनी केली. आताचे बदल मानवनिर्मित यंत्रणा, उपकरणे, व्यवस्था, प्रणाली करीत आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे नव्या प्रणालींच्या स्वीकार व वापराबाबत माणसांनी सजगता ठेवायला हवी, तद्वतच जागरूकता दाखवायला हवी. माणसाचा चोखंदळपणा कमी होणे व व्यवस्थेच्या आहारी जाणे वाढते आहे. तो खरा वर्तमानातील चिंता नि चिंतनाचा विषय आहे. नवं एकविसावं शतक नव साधने, संधी, शक्यतांचे आहे खरे; पण संक्रमित पिढीसाठी ते अस्तित्वाच्या संघर्षाचेही ठरत आहे. माणसापुढे या नव्या बदलाने जी जीवनशैली येते आहे, तिचा मुकाबला धर्म युद्धासारखा खरे तर व्हायला हवा; पण तो होताना दिसत नाही.
नव साधनांमुळे पर्यावरणाचा होणारा विनाश माणसाला आत्महत्येकडे घेऊन जात आहे. आज शेतकरी आत्महत्या करतो आहे, उद्या ही वेळ सर्वसामान्यांवर सर्रास येईल; कारण जगात दारिद्य, दुष्काळ वाढतो आहे. मूठभरांच्या हाती मणभर पैसा ही विषमता फैलावते, पसरते आहे. जागतिक लोकसंख्येत वाढतच आहे, कमी नाही. त्यामुळे शाश्वत जीवनशैली स्वीकारणे आवश्यकच नाही तर अनिवार्य झाले आहे. अण्वस्त्रे, जैविक अस्त्रे यांचा वाढता वापर व संकट विध्वंस रुंदावतो आहे. जगण्याची साधने आकुंचित होत असताना मानवी आशा, आकांक्षा, अपेक्षा, गरजांची न संपणारी तहान या जीवनशैलीचा उपजत गुणधर्म आहे. जैवविविधतेच्या हासातून निसर्गसंतुलन बिघडण्याचे परिणाम मानवी जीवनावर प्रखरपणे होत आहेत. स्थलांतर, नागरीकरणाची वाढ, बेकारी ही त्याचीच अपत्ये होत. मानवी जगण्याचा मूलाधार निसर्ग आहे, हे आपणास विसरता येणार नाही. दहशतवादाचे वाढते धोके आपल्या अनैसर्गिक राजकीय स्पर्धेचे अपत्य होय. संपर्कक्रांतीतून जन्मलेल्या नवश्रीमंत पिढी व देशांपुढे नव्या प्रश्नांचा सडा आहे. नवे रोग, मानसिक पोकळी व वैयर्थांनी गांजलेली पिढी (नर्डस) ती समाजात असून तुटक जगात असंपर्क जग अनुभवते आहे. या निद्रिस्त, अमानवी व्यवहाराचे परिणाम समाजजीवनावर भीषणपणे आक्रमण करीत आहेत.
वर्तमान जीवनशैलीपुढचे खरे आव्हान माणसाचे दिवसेंदिवस यंत्रानुवर्ती होणे आहे. माणूस यंत्रघर होतो आहे. वाढत्या यंत्रपसाच्यात माणसाचं मन आणि हात रिकामे होत आहेत. शाळेत असताना एक वाक्य वारंवार
शिकवलं जायचं. 'Empty mind is devil's workshop.' जगच भूतबंगला, ब्रह्मराक्षसाचा वाडा होतो आहे. यंत्रनिर्माते गर्भश्रीमंत होतात व वापरणारे भिकारी असा आजवरचा जागतिक अनुभव आहे. यातून निर्माण होणारा रिकामा वेळ (Leisure) तुम्ही सत्कारणी लावू न शकाल तर तुमची भरती वेड्यांच्याच इस्पितळात. समृद्ध एकटेपण व संपन्न निष्क्रियता यांसारखी नजरकैदेची शिक्षा नाही. जर आपण काही भले करू इच्छित असू तर आपण स्वत:ला प्रश्न करायलाच हवा की मला विधायक, रचनात्मक, परहिताचं काय करता येणं शक्य आहे? 'पेरते व्हा' तसे करते व्हा' हा नवयुगाचा नवा उद्घोष आहे. एकीकडे कौशल्याधिष्ठित मनुष्यबळाची वाढती मागणी
आणि दुसरीकडे शहाण्या-सुरत्या मोठ्या ज्येष्ठ वर्गाच्या अनुभव संपन्नतेची, शहाणपणाची उपेक्षा. शिक्षित म्हणजे उपयोगी हे समीकरण चुकीचे. उत्पादक अशिक्षित असला, अकुशल असला तरी उपयोगी असतो हे विसरता कामा नये. हातांना काम व डोक्याला ताण देता नाही आला तर नाश अटळ!
या साऱ्या बदलाचे जगाबरोबर भारतावर झालेले परिणामही समजून घेण्यासारखे आहेत. भारतात बदलत्या जीवनशैलीमुळे एकटे जीवन कंठणाच्या निराधारांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यातही रुग्ण, वृद्ध आणि स्त्रियांची वाढती संख्या चिंताजनक आहे. समाजजीवनात वाढत्या असंबंधांचेच ते द्योतक आहे. पारंपरिक संयुक्त कुटुंबव्यवस्था जाऊन विभक्त कुटुंबव्यवस्था हे जसं या समस्येचं मूळ आहे, तद्वतच खेड्याकडून शहराकडे जाणारे, न थांबणारे लोंढे हे पण त्याचे एक कारण आहे. कसती शेती उजाड पडते आहे व कामाचे हात रिकामे राहिले आहेत ही वस्तुस्थिती आहे. विशेषतः पुरुष बळाचे नागरीकरण, नोकरीकरण यांतून ही परिस्थिती उद्भवते आहे. घरी व समाजात वरिष्ठांचा एकाधिकार संपून व्यक्तिस्वातंत्र्याने निर्माण झालेल्या स्वायत्ततेतून असंबंद्ध समाज आकारतो आहे. जीवनमूल्यांचा व्हास, नैतिकतेचं भय व अस्तित्व संपणं ही वरवरची कारणे असली तरी माणसाची आत्ममग्नता, स्वार्थ त्याच्या मुळाशी आहे, हे आपणास विसरता येणार नाही. शहरात स्त्रियांचे नोकरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता घरोघरचे बाल्य अनाथ, निराधार बालपण कंठते आहे. त्याचा ताण उभयपक्षी आहे. पालक व पाल्य समानपणे ताणतणावाचे जीवन जगत आहेत. घरोघरी हिंसा नित्याची होते आहे. सुना जीव मुठीत घेऊन जगण्याचे वाढते प्रमाण घरोघरचा असमंजसपणाच नाही का जाहीर करीत? सुशिक्षित, नोकरी करणाच्या स्त्रीवरचा वाढता पुरुषी संशय शिक्षणाने शहाणपण न आल्याचे जसे लक्षण आहे, तसेच ते पुरुषी अहंकार, दर्पाचेही! पुरुषाचे माणूस होणे
जसे महत्त्वाचे तसेच स्त्रीस माणूस म्हणून स्वीकारणे, पचवणेही! हुंडा, जात, धर्म, उच्चनीचता, लिंगभेद अजून भारतीय समाजमानसातून त्यांचे समूळ उच्चाटन होत नाही. राजकीय पक्ष कोत्या स्वार्थामागे आहेत. समाजास प्रगल्भ व्हायचे नाही. तो शिक्षित झाला तरी भ्रामक अहंकार, समजुतींचा शिकार आहे. देव, धर्म, दैव, चमत्कार यांतून तो अजून बाहेर पडत नाही, तोवर त्याचे प्रश्न सुटणार तरी कसे? आपले प्रश्न कोणी प्रेषित सोडवू शकत नाही. अपना हाथ जगन्नाथ' हेच खरे! हातावरच्या रेषा कष्टांनी उठाव्यात, ज्योतिषाचे भाकीत भ्रम, कुंडली म्हणजे अडाणीपणाचा चक्रव्यूह हे भारतीय समाज मानसाने एकदा लख्ख, स्वच्छ, स्पष्ट समजून घेऊन, खूणगाठ बांधून कामाला लागल्याशिवाय संकटमुक्ती नाही. कायद्याचं भय नाही नि मनाचं बंधन नाही, असा स्वैर समाज कोणता माणूसधर्म निर्मिणार?
जोवर घरात माणसाला किंमत मिळणार नाही, तोवर बाहेर समाजात तो कसा प्रतिष्ठित होणार? त्यामुळे समाजबदलाचा प्रारंभ घराघरांतून, माणसांच्या मनामनांतून यायला हवा. नुसते शिक्षण नको, शहाणपण हवे. नुसते कौशल्य नको, जीवनात ते वापरण्याचा समजूतदारपणा हवा. नुसती श्रीमंती नको. मूल्य, संस्कार, संस्कृतीसह समृद्धी म्हणजे माणुसकीचं जगणं. पूर्वी ते खेड्यात होतं. आज ते तिथेही नाही. ही शोकांतिका दूर करायची तर चंगळवादी, भौतिक, उपभोगी वृत्तीचा त्याग करून 'मीच नाही, माझ्यासह सर्व' असा समूहभाव, सहजीवनभावच एकविसाव्या शतकात माणसास सुख, शांती, स्वास्थ्य प्रदान करील. शाश्वत जीवनाचा तोच एक मूलमंत्र आहे आणि महामार्गही!
┅
पासष्टी उलटलेला मी. अजून काया, वाचा, मने मला वय उलटल्याचा विषाद नाही. कारण काय म्हणाल, तर जशी जाण येत गेली, तसे मी स्वत:ला सकारात्मक बनवत गेलो. नातेसंबंध हा माणसाच्या जीवनातील कळीचा मुद्दा असतो. या नात्यांची मोठी गंमत असते. ते सापासारखे असतात. धरले तर चावतात, सोडले तर पळतात. नातेसंबंधांबद्दल लिहिणं मला एकीकडे जोखमीचे वाटते, तर दुसरीकडे जबाबदारीचेपण. नात्यांची वीण रेशमी धाग्यांसारखी नाजूक असते. तिचा पोत मोठा आकर्षक असतो; पण धागा म्हणाल तर कच्चाच! सैल सोडला तर गुंता ठरलेला; ताणला तर त्याचं तुटणं निश्चित. एकदा का धागा तुटला की मग कितीही जोडायचा प्रयत्न करा, मध्ये गाठ राहणार म्हणजे राहणारच ‘‘'रहिमन' धागा प्रेम का, मत तोडो चटकाय। टूटे से फिर ना मिले, मिले गांठ पड जाय।"
समाजात नातेसंबंध म्हणे रक्तसंबंध. जन्म, विवाहातून ते आकारतात. जनन नि जनक कटुंबांचा फेर म्हणजे नातेसंबंध. ते जात, धर्म, कूळ, गोत्र, वंश, घराणे, भावकी किती पदरांनी जोडलेले असतात, नाही का? नाती म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील हळवे कोपरे. लोकांना दिसतात, तशी ती असतातच असे नाही. पण नाते दाखविण्यात माणसाची अहमहमिका असते खरी. खच्या नात्यांचं उत्खनन, उलगडा अवघड असतो. गाडलेल्या संस्कृतीसारखी गुप्त नाती म्हणजे सलगीचा उत्सव! तेरी भी चूप, मेरी भी!! वही, पुस्तकात जपून ठेवलेल्या मोरपिसासारख्या असतात अशा नात्यांच्या आठवणी. आठवणी कडू, गोड, आंबट, तिखट सर्व प्रकारच्या असतात. हसविणा-या, रडविणा-या, अस्वस्थ करणाच्या किती परी तिच्या. नाती सुखावणारी तशी दुखावणारी पण. तळहाताचा फोड पण नि अवघड जागेचं दुखणंही! नात्यांभोवती जिव्हाळ्याचा पिंगा असतो नि कधी-कधी जिव्हारी ठसठससुद्धा. गळामिठी काय अन् (दुस-या क्षणी ‘या जन्मात तोंड बघितलं,
पाऊल ठेवलं तर माझं नाव बदल' असा पवित्रा.) नाती आपोआप मिळतात ना, तेव्हा असा अहंकार आपसूक येतो. तुम्हाला अलगद लाभलेली नाती मला न मिळाल्याचा विषाद बालपणापासून तारुण्यापर्यंत माझा पिच्छा पुरवित राहिला होता. समज आली तशी मी नाती विणत गेलो. आज डोलखुर्चीवर बसून बंगल्याच्या कॉरिडॉरमध्ये वृत्तपत्रे चाळत मी गतायुष्य आठवत राहतो तेव्हा वाटतं, नाती लादलेली नसावीत. असावीत तर जोडलेली, मानलेली, जिवाभावाची! औपचारिक नाती मृगजळ असतं. स्वत:ची नि दुस-याची फसवणूक करणारं आणि खरं तर जीवनाची फसगत करणारंसुद्धा.
मला रक्तसंबंध असे लाभलेच नाहीत. कुमारी मातेच्या पोटी जन्मल्याने जन्म देताच आई अनाथाश्रमातून परागंदा झाली. वडील आधीच विश्वामित्री पवित्रा घेऊन भूमिगत झाले होते. मग हे निश्चित होतं की, आई म्हणणारी कुणाची तर पत्नी झाली असणार नि वडिल कुणाचे तरी पती. त्यांना समाजमान्यता, उजळ त्यांचा माथा. अपत्याने मात्र आयुष्यभर वनवास सोसायचा. याला का नैतिकता म्हणायची? समाज ज्या नैतिक अट्टहासाने मुला-मुलींना अनाथ, अनौरस करतो, यात कसलं समाजस्वास्थ्य? कसला सामाजिक न्याय? जन्मदाती आई मला सोडून गेली नि दुस-या एका परित्यक्त मातेनं मला पोटाशी घेऊन वाढवलं. नाती सापेक्ष असतात. प्रत्येक वेळी जन्मदात्री श्रेष्ठ असते असे नाही. मला सांभाळणारी आई। लाख मोलाची वाटते; कारण पदरी पोलिओग्रस्त गोळा असताना मोठ्या धीरानं तिनं माझा सांभाळ केला. माझ्यासाठी तर ती जर्मन नाटककार बर्टोल्ट ब्रेक्टची माता धीराईच ! (Mother of Courage)
माझा आश्रम चांगलं तीनशे-साडेतीनशे माणसांचं महाकुटुंब होतं. एक दिवसाच्या बाळापासून ते शंभर वर्षांपर्यंतच्या आजीपर्यंत तिथले सगळे समाजाने नाकारलेले होते. अनाथ, अनौरस, चुकलेली, सोडलेली, टाकलेली मुलं, मुली. घराच्या जाचाला कंटाळून पळून आलेल्या मुली, बलात्कारित भगिनी, घरीच फसलेल्या कुमारी माता, पाय घसरलेल्या परत्यक्ता, विधवा, किती प्रकार सांगू?... पण यांना अपराधी करणारे सारे समाजात संभावित म्हणून जगत होते. शिक्षा फक्त आबाल-अबलांनाच ! समाजाने नाकारलेल्या या माणसांनी मग आपसांत मानलेली नाती निर्माण केली. म्हणजे असे की दिवाळीत भाऊबीज आली की, आश्रमातील सर्व मुली मुलांना ओवाळायच्या. रक्षाबंधनाला राख्या बांधायच्या. अशातून संस्थेतील मुलं-मुली एकमेकाची भाऊ-बहीण झाली. मग मोठी बहीण असेल तर ती ताई व्हायची. मोठ्या
भावाला दादा म्हणून हाक मारलं जायचं. असंच स्त्रियांचा माई, आक्का, मावशी, मामी, आजीचा गोफ आपसूक गुंफला जायचा. हे फक्त हाक मारण्यापुरतं नव्हतं. एखाद्या ताईचं लग्न ठरलं तर आश्रमात तिचे केळवण व्हायचं. साखरपुडा व्हायचा. लग्न व्हायचं. सारं अगदी घरच्याप्रमाणे. इतकंच काय, डोहाळजेवण, ओटी भरणं, बारसं सारं व्हायचं.
आश्रमातील मुलं मोठी झाली की मुलांच्या संस्थेत जायची; पण सणसुट्टीला येणं-जाणं राहायचं. यातून नात्याला बळकटी यायची. मी घरोघरी पाहतो. भाऊ एक, नाही तर दोन. मला अगणित, बहिणींचंही तसंच. मी पंढरपूरच्या अनाथाश्रमातून कोल्हापूरच्या रिमांड होममध्ये आलो. इथे मला असंख्य मित्र मिळाले. मला आठवतं, मी पंढरपूरच्या बालकाश्रमात असताना आश्रमाबाहेरच्या शाळेत जाऊ लागलो. शाळेत जाण्यानं मला बाहेरचं जग कळलं. म्हणजे किती छोट्या-छोट्या गोष्टी कळू लागल्या म्हणून सांगू ? गाई, म्हशी दूध देतात ? कोंबड्या अंडे देतात हे कळणं मला 'ज्ञान' होतं. तसंच एक नवं 'ज्ञान' झालं, ते आपण अनाथ आहोत, आपणाला घर नाही, नातेवाईक नाहीत. आपण बाहेरच्या जगापेक्षा वेगळे आहोत. आपलं जग निराळं आहे-ही वेगवेगळ्या प्रसंगांतून, चिडवण्यातून, निरीक्षणातून होणारी जाणीव बालवयातील ‘फ्युचर शॉक्स' होते. वय वाढेल तसे एकटेपण वाढत होते नि नातेसंबंधांची पोकळी रुंदावत होती.
कुमार, किशोरवय ओलांडून मी तारुण्यात पदार्पण केले नि माझी हुरहुर सुरू झाली. मी झुरू लागलो. लक्षात आलं, अनाथांनी प्रेम नसतं करायचं. स्वप्नं नसतात पाहायची. ही स्थिती माझीच नव्हती. माझ्याबरोबरच्या सर्वांची असायची. यातून एक प्रकारचं उसवलेपण, उद्ध्वस्तपण आम्ही अनुभवायचो. मी पदवीधर होऊन शिक्षक झालो. पुढे डॉक्टरेट होऊन प्राध्यापक, प्राचार्यही! जीवनाच्या चढत्या भाजणीत लग्न, मुलं, संसार होत मी सनाथ झालो. पत्नी आश्रमातली असल्याने संसार सुखाचा झाला; पण या काळात मी आमचं आश्रमियांचं जग विकसित होईल असे पाहत राहिलो. ज्या रिमांड होममध्ये होतो, तिथला सचिव झालो. ती संस्था ‘घर बनवली. त्याचा पुरस्कार म्हणून महाराष्ट्रातील सर्व अनाथाश्रम, रिमांड होमचा अध्यक्ष झालो. हे लौकिक यश होतं. मला खरा आनंद होता, तो संस्थांचं मी 'घर' करू शकलो. रिमांड होम्स त्या वेळी कोंडवाडे असायचे. मुलांना ढोरांची वागणूक मिळायची. किती योजना, उपक्रमांतून संस्थांमध्ये माणुसकीचे वारे वाहू दिले. ते अलौकिक आनंदाचे क्षण होते.
कोल्हापुरात मी स्थायिक झालो. तिथे पाच-सहा पंढरपूरच्या आश्रमातील मुली लग्न करून आलेल्या. मी शिकत असतानाच्या काळात त्यांनी आम्हाला मोठा आधार दिला. तो काळ चहा देणारा देव वाटण्याचा होता. अशा काळात सण-समारंभाला या सर्व ताया पुरणपोळी खाऊ घालायच्या. त्या फार मोठ्या श्रीमंत नव्हत्या. आश्रमातील मुलांना काय नि मुलींना काय जी स्थळे मिळतात ती हातावरचं पोट असलेली. टर्नर, फिटर, वेल्डर, मिलिटरी मॅन, मुलांना नॉन-मॅट्रिक मुलगी मिळणं लॉटरी होती. ती मला लागली. मुलांचा विकासाचा परमोत्कर्ष म्हणजे आयटीआय. मुलीचं लग्न होणं हाच उद्धार. आमच्या सर्वांच्याच मी अधिक शिकलो. त्यामुळे मी या सर्वांचा अघोषित कुटुंबप्रमुख झालो. वय लहान, पण जबाबदारी महान. माझी मुलं शाळेत जाऊ लागली तेव्हा आमच्या ताई, दादांची मुलं कॉलेजच्या वयाची होऊ लागली. मला आठवतं, सर्व घरात पहिलं पाटी-पुस्तक मी आणत गेलो. त्याचा परिणाम असा झाला की, सर्व ताई, दादांची मुलं-मुली पदवीधर झाली. पुढे नोक-या, लग्न सर्व पातळ्यांवर विणलेले नातेसंबंध आता मानलेले असले तरी त्याला रक्तसंबंधांपेक्षा मजबुती आलेली मी पाहिली. सर्वांची स्वत:ची घरं, मुला, मुलींना समाजातील स्थळं यातून आम्ही समाजाचे अंग झालो यांचा आज मागे वळून पाहताना कोण आनंद, अभिमान वाटतो? आरक्षण, शिष्यवृत्ती अशी कोणतीच कवचकुंडलं या मुलांना, मुलींना लाभली नाहीत; पण तरी त्यांचं स्वावलंबी, स्वाभिमानी होणं ही मानलेल्या नात्यानं पुढं केलेल्या हाताची किमया होती.
सर्व ताई-दादांची मुलं डॉक्टर, इंजिनिअर, पदवीधर, नोकरदार, कोणी व्यावसायिक प्रत्येकाची कथा म्हणजे नव्या नात्याचा चैतन्य अध्याय. समाजात मी जेव्हा रक्तसंबंधी नातेवाइकांमधील औपचारिक व्यवहार पाहतो, तेव्हा आमच्या मानलेल्या नातेसंबंधातील आपलेपण कितीतरी उजवं वाटतं. मी कॉलेज शिकत असताना मला किरकोळ खर्चासाठी दर महिन्याला दहा रुपये लागायचे. आमच्या आश्रमातील विकासदादा मुंबईत नोकरी करायचा. त्याला पन्नास रुपये मिळायचे. त्या वेळी तो मला दहा रुपयाची मनी ऑर्डर नित्यनियमाने करायचा. उतराई म्हणून मी आमच्या कुटुंबातील किती मुला-मुलींना मदत केली त्यापेक्षा शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य असताना अनेक गरीब विद्यार्थी, विद्यार्थिनींना केलेले साहाय्य मला अधिक महत्त्वाचे वाटते. आप्त-स्वकियांना केलेले साहाय्य आपले कर्तव्य असते; पण आपलं कोणीच नसलेल्यांना केलेली मदत तुमच्या माणूसपणाची कसोटी असते. नातेसंबंध म्हणजे देणं, घेणं, करणं नसतं, ‘होणं' महत्त्वाचं.
आपण असे संबंध वृद्धिंगत करावेत की दुस-या माणसानं आपणाला गृहीत धरावं. ते संबंध मी इतके निरपेक्ष ठेवतो की विचारू नका. म्हणजे असं होतं की, आपण मदतीचा हात दिलेल्या माणसाच्या जीवनात आनंदाचा प्रसंग येतो. अत्यानंदात तो आपल्याला अनवधानाने विसरतो. रक्तसंबंधातील नात्यात मी पाहिलं आहे की, माणसं असा प्रसंग मनात ठेवून सापासारखं डूख धरून राहतात. मी दुर्लक्ष करतो. नातेसंबंधांचं एक असतं. माणसं त्याकडे आपल्या नजरेनं पाहत, जोखत, पाळत राहतात. मनुष्यसंबंधाकडे मी तिस-या परीने पाहतो. तीन परी असतात पाहायच्या. आपल्या नजरेनं पाहणं, संबंधिताच्या नजरेनं पाहणं नि तिहाइताच्या नजरेनं पाहणं. पहिल्या दोन नजरा व्यक्तीसापेक्ष असतात. तिसरी नजर (Third angle) निरपेक्ष (Objective) असते. 'See the world from other side' असं नातेसंबंधांकडे पाहू लागलो की संबंधातील प्रेम, जिव्हाळा, आपलेपणा, आत्मीयता टिकून राहते, सतत वाढत जाते.
मी सामाजिक संस्थांशी जसा दीर्घकाळ संबंधित आहे, तसा हॉस्पिटलांशीही. पन्नास बेडचं सर्वोपचार रुग्णालय अनेक वर्षे चालवलं. आजही अनेक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्सशी जुळून काही सामाजिक कामे करतोय. काय पाहतो? पेशंटला अचानक रोग उद्भवतो. कुटुंब कोसळलेलं असतं. रुग्ण हादरलेला, बिथरलेला असतो. नाते-संबंधींची रुग्णाला पाहायला गर्दी लोटते. पाहायची अहमहमिका असते. सर्व रक्तसंबंधी. फार कमी रक्तसंबंधी कुटुंबीयांना मदतीचा हात देतात. अपवादच असतात ते. बाकी बघे, प्रेक्षक. नातेसंबंधांचं प्रेक्षकीकरण रोज वाढतं आहे. जागतिकीकरणाचा तो अविभाज्य भाग खरा; पण माणसाचं नार्सिसस होणं, आत्मकेंद्रित होणं हे त्याचं खरं कारण वाटतं. नाती किती औपचारिक व्हावीत? माझ्या कॉलनीजवळ एक कुटुंब राहतं. मुलगा, सून, नातवंडे अमेरिकेत. आई-वडील अमेरिकेत जाऊन आले ते मुलांना जेव्हा यांची गरज होती तेव्हा. म्हणजे बाळंतपण, मुलगा-सून प्रवासावर गेलीत तेव्हा घर सांभाळायला. पाहता-पाहता आई-बाबा वृद्ध झाले. मुला-सुनांचं येणं कमी झालं. बाबा अत्यवस्थ असताना मुलगा म्हणायचा तो येऊन गेला. मोलकरणीला एक टेलिफोन नंबर देऊन गेला. बाबांचं काय कमी जास्त झालं तर या नंबरवर फोन कर. ते माझे डॉक्टर मित्र आहेत. ते पुढचं काय ते पाहतील. मुलगा परत अमेरिकेस निघून गेला. पुढच्याच आठवड्यात बाबांचं व्हायचं ते झालं. मोलकरणीनं डॉक्टर मित्राला फोन केला. अॅम्ब्युलन्स आली. बाबांचं पार्थिव घेऊन गेली. मुलानं वडिलांचं हॉस्पिटलला देहदान
केलं होतं. डॉक्टरांची नोकरी एका मेडिकल कॉलेजात होती. कॉलनीला बाबा गेल्याचे मोलकरणीकडून नंतर कळत गेले; ते पण ती मोलकरीण ज्या घरात धुणी-भांडी करीत होती त्याच घरांपर्यंत.
माझ्याबरोबर आश्रमात असलेला नि नंतर आयुष्यभर माझ्यासोबत राहाणारा मानलेला भाऊ आहे. त्याला दुर्धर व्याधी झाल्याचं कळलं. आम्ही सर्वांनी उपचाराचा खर्च केला. बरा झाला. याला आपल्या पैशाचा (फार नसले तरी असलेल्या. कारण मुलं कमी मिळवणारी) खरं तर पेन्शनीचा अहंकार. एकत्र कुटुंब. मुलांना मुलं झाली तरी डाफरत राहायचा. व्याधीत मुलं कर्ज काढून त्याला सांभाळत होती. याचा अहंकार वाढतच गेला आणि व्याधीपण. परत डॉक्टरांकडे. परत उपचार. परत आम्ही सर्वांनी मिळून खर्चाची तोंडमिळवणी केली. बरा होऊन घरी आला तरी याचं डाफरणं सुरूच. उलट वाढलेलंच. मी न राहून त्याला त्याच्या कानात त्याला झालेली व्याधी सांगून टाकली, जी त्याला न सांगता जगवायचं म्हणून आम्ही सर्व सहन करीत होतो; पण तो घरातील सर्वांचं रोजचं जगणं असह्य करीत राहायचा. बायको, मुलं, सुना, नातवंडं, नातेवाईक सर्वांचं. रामबाण उपाय लागू पडला. आता सर्व सुखी आहेत. नातंपण भाबडेपणानं जपत राहिलं की व्याधिग्रस्त होतं. नातं निकोप व्हावं वाटत असेल तर विधी-निषेधाचं भान हवंच. बापालापण प्रसंगी बोलावं, सांगावं नि सोडून द्यावं. बाप म्हणजे काही मुलांच्या भविष्याचा मालक नव्हे. पालकत्व अल्पकालिक असतं. मुलं मोठी झाली की बापानं मित्र व आईनं मैत्रीण व्हावं. मग जगण्याची गंमत सर्वांना येत राहते.
पंढरपूरच्या आश्रमात राजूताई होती. तिला मी तिच्या आयुष्यभराच्या अखंड काळात स्वेटर विणतानाच पाहिलं. आमच्या आश्रमात म्युझियम, सिनेमा, सर्कस पाहायला प्रेक्षक येतात तसे वारकरी येत असत. लहानपणी एक आणा प्रवेश फी होती. नंतर १० नये पैसे झाली. राजूताई पैसे वसूल करीत पेटीत टाकत राहायची. ती किती प्रामाणिक होती तर तिच्या कनवटीला कधी कुणाला दहाचं काय एक, दोन, पाच पैशांचं नाणंही आढळलं नाही. आश्रमानं तिला दोन वरदानं दिली होती. एक होतं आयुष्यभर सांभाळायचं. दुसरं होतं तिचा विणायचा नाद पाहून तिला हवे ते दोरे, सुया, लोकर द्यायचं. ती आयुष्यभर विणत राहिली. ती असेपर्यंत आश्रमातील कुणा मुला-मुलींना थंडी नाही लागली. तिला स्वेटर घातलेलं मात्र कधीच कुणी पाहिलं नाही. तुम्हाला राजूताईइतकं निरपेक्ष नातं विणता आलं का
पहा. मग तुमचा रक्तसंबंधांचा सारा अहंकार, सारी मिजास क्षणात उतरून जाईल.
आश्रमातील आम्हा सर्व मुला-मुलींना काही लोक ‘नासक्या रक्ताची म्हणून हिणवत असायची. आम्ही ते आयुष्यभर लक्षात ठेवलं अन् पाहिलं की आपल्यामुळे कुणाचं, समाजाचं रक्त नासू नये. रक्तसंबंध हा संस्कार आज विषासारखा समाजात द्वेष पसरविताना मी अनुभवतो, तेव्हा अस्वस्थ होतो. ‘गर्व से कहो कि मैं हिंदू हैं, ‘त्या लांड्याची लुंगी धरा’, ‘परप्रांतीयांना हुसकावून लावा’, ‘काफिर को काट डालो’, ‘खळ्ळ खट्याक झाल्याशिवाय साल्यांना अक्कल येत नाही', 'अमूक-तमूक जातीचा वधू-वर मेळावा', ‘फलाण्या जातीची परिषद', 'क्रॉस आडवा करा' अशी वाक्ये मी वर्तमानपत्रात वाचतो तेव्हा लक्षात येते की अरे, हे तर सारं रक्तबीज जिवंत ठेवण्याचाच उपक्रम करताहेत. पूर्वी म्हणे रक्तबीज नावाचा एक राक्षस होता. एक वरदान घेऊन जन्मला होता. त्याच्या रक्ताचा थेंब कोण सांडेल तर त्या थेंबाचा पण रक्तबीज होईल. रक्तबीज अमर आहे. तो रक्तसंबंधातील नात्यांच्या थेंबाथेंबातून त्याला नष्ट करण्याचा एकच उपाय मला दिसतो. माणसानं सर्व प्रकारांच्या अहंकार, अस्मितांच्या कैफातून मुक्त होत माणुसकीचा गोफ गुंफावा. नाही तर नातेसंबंधांचा हा विषारी, विखारी गुंता सुटता सुटणार नाही. रक्तसंबंधांचा रक्तबीज जात, धर्म निरपेक्ष मनुष्य व्यवहाराने मरेल असा उ:शाप घेऊन आपण जगलो तरच खरे जगलो असे म्हणता येईल.
☐☐
भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशाचा विस्तार इतका की तो उपखंड ओळखला जातो. विस्तारामुळे या देशात हवामान, पीकपाणी, वनस्पती, पशु-पक्षी, मानवसंस्कृती, शेतीप्रकार इत्यादींचे वैविध्य आढळते. भूगोल म्हणाल तर देशात पठार, मैदानी, पर्वतीय, वाळवंट असं भूपृष्ठ वैविध्य आढळतं. शेतीचे जिराईत, बागायती, फळबागादी प्रकार आढळतात. शेतीपूरक मेंढपाळ, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय आढळतो. नव्या काळात मिश्रशेती, हरितगृहे, रोपवाटिका, वनशेती, सेंद्रिय शेती दिसते. शेतीस पाणी देण्याच्या पद्धतीत कालवे, पाटाकडून ठिबक आणि फवारणी (स्प्रिंकलर्स) कडे आपला प्रवास आहे. शेतक-याचे दरडोई क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असले तरी देशाच्या एकूण शेती उत्पादनात वाढ होताना दिसते. धान्याची आयात कमी होऊन देश अन्नधान्याचा भविष्योपयोगी साठी करीपर्यंत स्वयंपूर्ण झाला आहे. धरणांकडून नदीजोड प्रकल्पांची स्वप्ने देश पाहू लागला आहे. शेतीमालाला हमीभाव मिळणे, शेतविकासार्थ पीकपाणी कर्ज, विमा, सवलत मिळते आहे. असे असूनही शेतकरी आत्महत्या का करतो, असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे.
शेतकरी आत्महत्या हा देशाचा गहन प्रश्न असला तरी महाराष्ट्रापुरते बोलायचे तर या शतकाचा तो यक्षप्रश्न बनून पुढे आला आहे. साधारणपणे शेतक-यांच्या आत्महत्येचे सत्र शतकारंभी सुरू झाले. गतवर्षी तो आकडा विक्रमी होणे, हे भारतासारख्या शेतीप्रधान देशात चिंता नि चिंतनाचा विषय होणे स्वाभाविक आहे. देश दिवाळी साजरी करीत असताना तरी शेतक-याच्या जीवनाची होळी का होते, याचा विचार करणे आवश्यकच नाही तर अनिवार्य झाले आहे. गेल्या दोन वर्षांतील शेतक-यांच्या आत्महत्यांची आकडेवारी चक्रावून सोडणारी आहे. देशात एकूण पाच राज्ये अशी आहेत की जी शेतकरी आत्महत्याप्रवण मानली जातात. त्यात सन २०१४ साली
ज्या सुमारे पाच हजार शेतकरी आत्महत्या झाल्या, त्यांत महाराष्ट्र अव्वल होता, हे लक्षात घेतले की या समस्येवर महाराष्ट्राने अधिक नि अतिरिक्त जागरूकता, कृतिशीलता (Pro-Activeness) दाखविली पाहिजे याची खूणगाठ पटते. देशातील सन २०१४ ची शेतकरी आत्महत्याप्रवण राज्यांची संख्यावारी पुढीलप्रमाणे होती - १) महाराष्ट्र (२५६८), २) तेलंगणा (८९८), ३) मध्यप्रदेश (८२६), ४) छत्तीसगढ (४४३), ५) कर्नाटक (३२१). भौगोलिक दृष्ट्या पाहिले तर ही सर्व राज्ये उष्ण कटिबंधातील असल्याचे दिसून येते. या प्रांतात ज्या शेतक-यांनी आत्महत्या केल्या, त्यांचा वयोगट पाहिला की, असे लक्षात येते की या आत्महत्यांपैकी ३७१२ आत्महत्या या ३० ते ६0 या प्रौढ वयोगटातील असून त्या एकूण आत्महत्येच्या हे प्रमाण ६६ टक्के भरते. १८ ते ३0 या युवा वयोगटात मात्र १३00 इतक्याच आत्महत्या झाल्या. ते प्रमाण २३ टक्के दिसून येते. त्यामुळे पुढील आत्महत्या टाळायच्या तर युवा शेतक-यांचे मनोबल वाढविणे व प्रौढ शेतक-यांचे प्रबोधन करणे असा दुहेरी कार्यक्रम राबविल्याशिवाय आपणास शेतकरी आत्महत्या नियंत्रित करता येणार नाहीत.
गतवर्षीची (२०१५) शेतकरी आत्महत्या आकडेवारी पाहिली असता ती पूर्ववर्षापेक्षा कमी असली तरी दुर्लक्षिण्यासारखी खचीतच नाही. गतवर्षी महाराष्ट्रात एकूण ३२२८ शेतकरी आत्महत्या झाल्याचे दिसते. त्यात विभागवार वर्गीकरण केले असता लक्षात येते की, हे प्रमाण विदर्भात अधिक आहे. विदर्भात १५४१ तर मराठवाड्यात ११३० शेतकरी आत्महत्या झाल्या. शेतकरी आत्महत्येच्या कारणांचा जो अभ्यास झाला, त्यात असे दिसते की, कारणवैविध्य असले तरी प्रामुख्याने ती कारणे आर्थिक नि सामाजिक आहेत. सन २०१४ च्या शेतकरी आत्महत्यांच्या अभ्यासात खालील कारणनिहाय संख्या हाती येते १) कर्जबाजारीपणा (११६३) २) कौटुंबिक कारणे (११३५) ३) शेतीसंबंधी कारणे (९६९) ४) शेती व्यवसायातील अपयश (७४५) ५) नैसर्गिक आपत्ती (दुष्काळ इ.) (२५0). अधिक शेतकरी आत्महत्या त्या कर्जबाजारीपणामुळे झाल्या असल्यामुळे भविष्यकाळात शेतक-याचा सातबारा कोरा कसा राहील, हे पाहणे गरजेचे दिसते. एक कर्ज भागविण्यासाठी दुसरे कर्ज घेण्याची निर्माण होणारी अनिवार्यता, सहकारी पतसंस्था, बँका, कारखाने यांनी दिलेल्या हप्तेबंदीचे दुष्टचक्र व शासनाच्या निरंतर कर्जमाफीच्या घोषणा या सर्वांचा परिपाक शेतक-यांची निष्क्रियता, परावलंबन वाढविते आहे. दैनिक खर्चात बचत, शेतविकास व पीकखर्चात कपात, उत्पादनाला हमीभाव, बागायती व
जिराईत पिकांच्या मिश्र पद्धती, शेतीपूरक उद्योगांची जोड, तगाई, सवलतीच्या मानसिकतेतून मुक्त होऊन काटकसरी जीवनशैलीतून बचतीभिमुख आर्थिक नियोजन असा फेर धरल्याशिवाय व नवा डाव मांडल्याशिवाय बळिराजा सुखी होणार नाही.
आज स्थिती अशी आहे की, आपली अधिकांश शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम म्हणून पाऊसमान अनियमित होते. परिणामी जिराईत पिके हातची जातात. निरंतर उपशामुळे पाण्याची पातळी घटते आहे. पुनर्भरणाच्या योजनांकडे आजवर आपण लक्ष दिलेले नाही. नदीपात्रे व तळी यांचे गाळ उपसून पाझर रिकामे करणे, पात्र प्रवाही ठेवणे, पाणी जिरविणे, छोटे बंधारे व शेततळी निर्माण करणे, वृक्षलागवड, पाणी देण्याच्या काटकसरी पद्धतींचा अवलंब असे बहुआयामी उपायच जलसाठे समृद्ध करू शकतील. अशा कार्यक्रमांकडे दुष्काळ निवारण म्हणून न पाहता जलसाठावाढीचा शाश्वत व निरंतर उपक्रम म्हणून आपण पाहू लागलो तर कदाचित दुष्काळामुळे वा पाणीपुरवठ्याअभावी होणा-या शेतक-यांच्या आत्महत्या आपण कमी करू शकू.
शेतक-यांच्या निरंतर कर्जबाजारीपणामुळे येणारा मानसिक ताण व नैराश्य यांमुळे होणा-या शेतक-यांच्या आत्महत्या वाचायच्या असतील तर कर्ज घेण्याच्या प्रवृत्ती वा सवयीचा बीमोड करण्याकडे लक्ष केंद्रित करावे लागेल. साधी राहणी, बचत, पीकखर्चात कपात, शेतीक्षेत्र जलप्रवण करणे असे उपाय शेतक-याने स्वत:हून अंगीकारायला हवेत. पारंपरिक मानसिकतेतून होणारे लग्न, जत्रा, मानपान इत्यादी खर्चात बचत त्याला मोठा दिलासा देऊ शकेल, असे वर्तमान खर्चपत्रक सांगते. वर सांगितल्याप्रमाणे जुने सावकार जाऊन नवे सहकारी सावकार आजच्या शेतक-यांपुढे आहेत. या सहकारी संस्थांच्या साखळीने जर भविष्यात शेतकरी कर्जमुक्तीच्या दिशेने कार्य करण्याची पद्धत अवलंबली तर नजीकच्या काळात शेतक-यांना मोठा दिलासा मिळणे शक्य आहे. त्यासाठी शासनाने सहकारी पतसंस्था, साखर कारखाने, सूत गिरण्या, बँका, सवलत योजना, कर्जमाफी पद्धती बचत केंद्री व शेतीच्या स्वयंअर्थशासित पद्धतीकडे तिची दिशा वळविणे ही काळाची गरज आणि आव्हान होय. अशी संस्था लाभकेंद्री पद्धत बदलून शेतकरी वा भागधारक लाभकेंद्री पद्धत आत्मसात करायला हवी. शेतीवर वा शेतक-यांच्या कष्टावर उभ्या संस्था व कारखाने कर्जबाजारी व कर्जबुडवे पद्धतीने चालविणाच्या संचालक, पदाधिका-यांच्या संपत्तीवर टाच आणण्यानेही भविष्यकाळातील शेतक-यांचा सार्वजनिक कर्जबाजारीपणा कमी करणे
शक्य आहे. सन २०१३ च्या शेतकरी कर्ज सर्वेक्षणानुसार भारतातील शेतक-यांच्या कर्जाची दरडोई रक्कम रु. ४७,000 भरते; पण महाराष्ट्रातील शेतक-याचे दरडोई कर्ज मात्र रु. ५७,७00 आहे. हे पाहिले की आपल्या राज्यात शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रभावी कारण लक्षात आल्याशिवाय राहत नाही. दुष्काळ निवारणावर आपण जितके लक्ष केंद्रित करू तितके लक्ष आपण शेतक-यांच्या शाश्वत कर्जमुक्तीकडून शाश्वत आत्महत्या मुक्तीकडेही द्यायला हवे. मी असे का म्हणतो त्याचे एक कारण सांगतो.आपल्याकडे होणा-या शेतक-यांच्या आत्महत्यांची संख्या ही तालेबानी युद्धसंहाराइतकी भयंकर आहे, हे आपण ध्यानी ठेवायला हवे. प्रतिवर्षी उत्पन्नात होणारी घट (नापिकी) हेही शेतक-यांच्या कर्जबाजारीपणाचे प्रमुख कारण आहे.
निरंतर नापिकीचा संबंध नैसर्गिक प्रकोपाशी जितका आहे, तितकाच पीक घेण्याच्या पद्धती व नियोजनाशीही आहे. पीक नियोजनात संशोधन, जागतिक व आर्थिक सर्वेक्षणाचा मोठा वाटा आहे. या कामी पारंपरिक विद्यापीठांचे अर्थ विभाग, कृषी विद्यापीठे व महाविद्यालये यांचे संशोधन व विस्तारकार्य हातात हात घालून काम करतील तर शेतक-याचे दु:ख, दैन्य, दुर्भिक्ष दूर होण्यास मोलाची मदत होईल. या संदर्भात कृषी महाविद्यालयातील पदवीधर शेतकरी होण्याच्या कार्यक्रमाकडे लक्ष पुरवावे लागेल. वर्तमान शेतीतील मनुष्यबळ कमी होणे हा जसा चिंतेचा विषय आहे, तसा उच्चशिक्षित शेतकरी बांधावर कसत असल्याचे स्वप्न आपण जोवर पाहणार नाही, तोवर आपला बळिराजा स्वावलंबी व स्वयंअर्थशासित होणार नाही. कर्ज चक्रव्यूहाचे भेदन जितके महत्त्वाचे तितके पीकनियोजनही जागतिक बाजारपेठेचा अभ्यास इस्रायल, जपान, ब्राझीलसारखे छोटे देश करतात, तर आपण खंडप्राय देशाने त्याला किती प्राधान्य द्यायला हवे. टोमॅटोच्या राशी रस्त्यावर ओतून जाणारा शेतकरी मी पाहतो तेव्हा आपल्या नियोजनाची कमतरता अधिक गडद होते. कांद्याच्या भावाने डोळ्यांत पाणी आणणारा शेतकरी किती वर्षं पहात राहयचे? कापसाचे चुकारे व उसाची बिले ढगाच्या आशेने किती दिवस शेतक-याने प्रतीक्षित करायची? शेतमाल विक्रीतील व्यापारी व खरेदी-विक्री संघाची एकाधिकारी दलाली केव्हा संपणार? या उत्तरावरच शेतक-यांचे आर्थिक स्वावलंबन व समृद्धी अवलंबून आहे.
‘दुष्काळ आवडे सर्वांना' या वाक्यात येथील व्यवस्थेची दिवाळखोरी व बेजबाबदारपणा प्रतिबिंबित आहे. राजकारण्यांना दुष्काळ पर्वणी वाटावा
हे आपण समजू शकतो; पण निरंतर कर्जमाफीमुळे शेतक-यांचा कल दुष्काळाकडे वळणे यातच शेतक-याची खरी शोकांतिका आहे. दुष्काळ कोरडा असो वा ओला; प्रश्न आहे त्यावर मात करण्याची मानसिकता व आपत्ती व्यवस्थापन आपणाकडे हवे तितके सक्षम व मनोबल वाढविणारे नाही, ही वस्तुस्थिती आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एन.डी.आर.एफ.) पूर व अपघातात काम करते. दुष्काळात जेव्हा हे दल शेतक-यांच्या खांद्यास खांदा भिडवेल तेव्हा शेतकरी मनोधैर्याने दुष्काळाचा मुकाबला करण्यास तत्पर होईल. आपले राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छत्रसेना, प्रादेशिक सेना यांचे युवाबल शेतीत पाय ठेवू लागेल व शेतीक्षेत्रधारक स्वत: शेती कसू लागेल तेव्हा शेतीचे पडक्षेत्र कमी होऊन लाभक्षेत्रात वाढ होईल. त्यामुळे शेती उत्पादनाची दरडोई क्षमता व उत्पन्नही वाढेल.
शेतक-यांच्या व्यसनाधीनतेचा मुद्दा नेहमी आत्महत्येसंदर्भात पुढे येतो. शेतकरी आत्महत्येत व्यसनाधीनतेचे प्रमाण १५ टक्के आहे. ते नगण्य नसले तरी त्याचा बाऊ करणे गैर आहे. कोरडवाहू शेतक-यांपेक्षा बागायती भागांत व्यसनाधीनता अधिक दिसते. त्यातही शेतीच्या अपयशामुळे व्यसनाचे प्रमाण अल्प आहे. हेपण लक्षात घ्यायला हवे. कर्जास कंटाळून येणारी व्यसनाधीनता अधिक गंभीर गोष्ट होय. निराशा, नाउमेद व्यसनाधीनतेस कारणीभूत होते आहे. वाड्या, वस्तीवर व रस्त्यांच्या दुतर्फा वाढणारे ढाबे, बीअर बार व एकंदर समाजाची चंगळ संस्कृती हे या व्यसनाधीनतेचे प्रमुख कारण होय.
शेती फायद्याची करणारे पतपुरवठा, पाणीपुरवठा, वीजपुरवठा हे घटक होत. त्यांची हमी ना शाश्वती. मिळण्यातीदेखील आपणास शेतक-यांच्या आत्महत्येवर विजय मिळविता येणे शक्य आहे. जगात जिथे शेती किफायती ठरली त्या इस्त्रायल व जपानसारख्या देशांत झालेले प्रयत्न नि प्रयोग आपणासाठी अनुकरणीय आहेत. आपणाकडे शेतीस जोडणारे पूरक व्यवसाय व प्रक्रिया उद्योग यांच्या समन्वयाचा प्रयत्न होणे गरजेचे आहे. केवळ पिकांवर शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणार नसेल तर पूरक उद्योगातून त्याची आर्थिक स्थिती सुधारेल, अशा उपाययोजना व्हायला हव्यात.
अलीकडे शेतकरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात फळबागा, हरितगृहे, रोपवाटिका, नगदी पिके इत्यादी माध्यमांतून आर्थिकदृष्ट्या संपन्न होतो आहे. त्याचा मुख्य आधार पाणी आणि विज आहे. तरीही या भागात प्रक्रिया उद्योग फारसा फोफावलेला नाही. त्याची जोड मिळेल तर दरडोई उत्पन्नाबरोबर शेतीचे राष्ट्रीय उत्पन्न वाढेल. या प्रक्रिया उद्योगाचा फायदा
कोरडवाहू प्रदेशातील शेतक-यांना आपण भविष्यकज्ञाळात देऊ शकू तर त्या प्रवण क्षेत्रातील शेतकरी आर्थिक सक्षम होतील. उत्पादनाबरोबर विपणन वा विक्रीत शेतक-यांचा सहभाग राहील तर वाढीस समृद्धीची झळाळी येईल व शेतक-यांच्या घरी लक्ष्मी व सरस्वतीची पावले उठायला साहाय्य झाल्याशिवाय राहणार नाही.
शेतक-याची शाश्वत उन्नती व विकास हा शेतक-यांच्या आत्महत्येच्या शाश्वत मुक्तीमुळेच शक्य आहे, हे लक्षात घेऊन कृषी नियोजन, कृषी प्रशासन, कृषी संशोधन, कृषिपूरक उद्योग, कृषी विपणन यांची सांधेजोडच शेतक-यांना आत्महत्येतून सोडवू शकेल. अवकाळाचा फास सुकाळच सैल करील, माफी व सवलतींऐवजी उत्पन्नवाढ व बाजारभाव हमीकेंद्रित कृषी नियोजन महत्त्वाचे आहे. तसेच जमिनचा पोत निरंतर ठेवणे, खत व औषधांचा अतिरेक टाळणे, पीक पालट, बागायती व जिराईत पिकांचे संतुलन अशा सातत्यानेही शेतक-यांना आत्महत्येपासून परावृत्त करता येऊ शकते.
शेतक-यांची पारंपरिक मानसिकतेतून मुक्ती हा शाश्वत उपायांपैकी महत्त्वाचा घटक होय. जात, धर्म, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यांच्या विळख्यातून बळी राजाची मुक्ती म्हणजे त्यास परंपरेचा निरंतर बळी होण्यातून वाचविणे होय. आळस, दैन्य, निराशा, दैवाधीनता या गोष्टी व्यसनाधीनतेइतक्याच गंभीर होत. त्यासाठी शेतक-यांच्या घरी ज्ञानदीप उजळत राहिले पाहिजेत. मुलगा शिक्षित झाला पाहिजे. तो 'साहेब' होण्यापेक्षा ‘प्रगतिशील शेतकरी होणे अधिक महत्त्वाचे. शेतकरी आपली मुलगी शेतक-यास देऊ इच्छित नाही, याचे कारण आर्थिक विपन्नताच आहे. हे चित्र बदलायचे तर शेतीचा कायापालट व शेतक-याचा कायाकल्प घडून यायला हवा, असं मी ‘शिवार संसद'सारख्या शेतकरी आत्महत्या निवारण संस्थेस शुभेच्छा देताना म्हटलं होतं. त्याची पुनरुक्ती करतो. अशा शेतकरी कुटुंबातील युवकांची चळवळच शेतक-यांच्या आत्महत्येच्या शाश्वत मुक्तीची हमी देईल, असा मला विश्वास वाटतो.
☐☐
मला जर कुणी गेल्या नि या शतकातील मोठा एक फरक सांगा असं म्हटलं तर मी क्षणाचीही उसंत न घेता सांगेन की, गेल्या शतकात माणूस गरीब होता; पण त्याच्याकडे गहिवर होता. आज मनुष्य श्रीमंत झाला; पण आपलेपणाचा पाझर आटला. माणूस अप्पलपोटी झाला. माणसाचा कांचनमृग होणं, ययाती होणं ही या शतकाची शोकांतिका आहे नि शापही ! मला माझं बालपण आठवतं. लहानपणी आम्ही सर्वजण शाळेत जात असू. शाळेच्या अवतीभवती काही किराणा दुकानं नव्हती की जावं नि गोळ्या, बिस्किटं, चॉकलेट्स आणावी. मुळात खिशात पैसा असणं हाच कपिलाषष्ठीचा योग असायचा. त्याउपर कुणाकडे भोकाचा पैसा असला की वर्गातील सारी मुलं त्याच्या भोवती छोट्या सुट्टीत घोळका करायची. एका भोकाच्या पैशात दोन लिमलेटच्या म्हणजे मोसंबीच्या फोडीसारख्या आकार नि रंगाच्या गोळ्या मिळायच्या. गोळ्या दोन नि मित्रांचा घोळका नि घोळ मोठा. प्रत्येकाला अख्खी गोळी खायचं स्वप्न असायचं; पण ते स्वप्नातही कधी खरं व्हायचं नाही. शाळेसमोर एक आजीबाई टोपलीत बरण्या घेऊन बसलेली असायची. गोळ्या, बिस्किटे, पेपरमिंटच्या वेगवेगळ्या बरण्या असायच्या. चिमणी बिस्किटं, ढब्बू पेपरमिंट, लिमलेट, चिरमुरे, शेंगदाणे, बोरं, शिंदोळ्या हे आमचं सुट्टीतलं स्वप्न! एकावेळी एक पूर्ण स्वप्न गळ्याखाली उतरलं असं कधी झालं नाही. गोळी सदच्यात धरून दातांनी तोडायची. एकाचे दोन करून दोन मित्रांनी मिळून खायची. मित्रही मोठे जिवाभावाचे. मित्राला सोडून एकटं खाण्याचा संस्कार लहानपणी केव्हाच मनात आला नाही. हा काळ १९५६ ते १९६० चा होता. पंढरपूरला लहानपणी पूर यायचा. कोणीही कुणाकडेही बि-हाड घेऊन राहत असे. बडव्यांच्या घरी मुसलमान कुटुंब त्या कर्मठ काळात राहिलेलं मी पाहिलं आहे. आमचा दस्तगीर असो वा न्हाव्याचा संभाजी, मैत्रीत अंतर नव्हतं.
मैत्रीला जात, धर्माच्या दुराव्याचा नि दुष्टाव्याचा स्पर्श नव्हता. मैत्री उभी होती माणूसपणावर. माणूसपण घरी, दारी सर्वत्र होतं. एकाच गल्लीत सर्व जाती, धर्माची कुटुंबं राहत होती. बेटीव्यवहार नसला तरी रोटीव्यवहार नक्की होता. व्यवहारात पैसा महत्त्वाचा नव्हता. संभाजीने केस कापायला पैसे घेतल्याचे आठवत नाही. उलटपक्षी मी दिलेच नाही म्हणा. संभाजीला पैसे देणं त्याचा अपमान करणं वाटावं इतकी जिगरी दोस्ती. मोठेपणी मी त्याला पुस्तके देत उतराई करीत राहिलो.
ज्याला घर म्हणता येईल असं रूढ घर, कुटुंब, नातेवाईक मला लाभले नाहीत. पंढरपूरच्या आमच्या अनाथाश्रमात अर्भकापासून ते वृद्धांपर्यंत ३००-३५0 मुलं, मुली, महिला होत्या. हा आश्रम एक घरच होता; पण त्या घरात असलेल्या खोल्या-खोल्यांत छोटी कुटुंबं आकारली होती. आश्रमात स्थिर झालेल्या परित्यक्ता असत. त्यांना राहायला खोल्या होत्या; पण त्या मोठ्या खोल्यांची स्थिती धर्मशाळेसारखी असायची. एका खोलीत २०, ३० ,५0 स्त्रीया असायच्या; पण नोकरी करणाच्या स्त्रियांना स्वतंत्र खोल्या होत्या. त्या स्त्रिया आश्रमातीलच. त्यांना अन्न, वस्त्र, कपडा, बिछाना, तेल, साबण सारं आश्रम पुरवायचा; पण काम करतात म्हणून वर पगार भेटायचा. पगार ही मोठी देणगी होती. पगार दोन ते वीस रुपयांपर्यंत असायचा. या नोकरदार परित्यक्ता सांभाळ, शुश्रूषा, शिक्षण, शिवणकाम अशी वेगवेगळी कामे करायच्या. त्या आयुष्यभर आश्रमातच राहणार असायच्या. अनेक कारणांनी परित्यक्ता या आपल्या घर, परिवाराला कायमच्या पारख्या, परागंदा झालेल्या असायच्या. मग त्या आपलं एक कुटुंब तयार करायच्या. ती त्यांची भावनिक गरज असायची. हे त्यांचं आपल्या हरवलेल्या कुटुंबाचं उदात्तीकरण, उन्नयनीकरण (Sublimation) असायचं. रमाबाई व उमाबाई दोन नर्स होत्या. अशिक्षित असून शहाणपण असल्यानं त्या लिहायला, वाचायला शिकल्या. ताप पाहणे, ड्रेसिंग करणे, डिलिव्हरी करणे शिकल्या नि दाईच्या नर्स झाल्या. रमाबाईंना दोन पोटची मुलं, मुली. उमाबाईंना एकच मुलगी; पण पोलिओग्रस्त. दोघींनी मिळून आपल्या खोलीत स्वत:च्या विकास, स्नेहा, ज्योत्स्ना या तीन मुलामुलींशिवाय सुनील, अभय, रतन, अशोक, करुणा, शालिनी, कुसुम, रुक्मिणी, बेबी, चंचला, येसू, लीला सान्यांचा सांभाळ केला. त्या आमच्या आई, मावशी, बाबा नि काकांपेक्षा पुरुषार्थी होत्या. सतरा जणांचं कुटुंब पोसायच्या. इतक्या सा-यांचं रोजचं सारं म्हणजे जेवण, कपडे धुणं, भांडी घासणं, बिछाने, अभ्यास, चहा-पाणी, पुढे लग्न, बाळंतपण, नातवंडांचा
सांभाळ सगळं करणा-या या सबलांना कुणी कधी आदर्श माता पुरस्कार दिला नाही; पण त्यांनी शंभर माणसांचा वटवृक्ष निर्माण केला. १० बाय १० च्या खोलीत आणि पाच-पंचवीस रुपयांच्या मासिक उत्पन्नात त्यांनी आम्हाला अनाथाचं सनाथ केलं त्या माणूसघडणीचं मोल मदर टेरेसच्या ‘नोबेल' नि ‘संतपण' या सर्वांच्यापेक्षा मोठं होतं. उपेक्षित, दुर्लक्षित, भूमिगत, अप्रसिद्ध, निरपेक्ष कार्य यासारखा दुसरा धर्म नाही, तर ते माणुसकीसाठी आजीवन लढलेलं एक धर्मयुद्ध होतं !
या साच्या माणूसघडणीचा माझ्यावर इतका मोठा परिणाम झाला की समज आल्यानंतरच्या काळात हातात हात घेणे, खांद्याला खांदा देणे, एक तीळ सातजणांनी वाटून खाणे अशा जाणिवेतून आम्ही अर्थाअर्थी कोणी एकमेकांचे, जाती, धर्म, रक्ताचे नसतानाही केवळ मानलेल्या नात्याने व आपलेपणाच्या ओढीने एकमेकांचे होत राहिलो. आम्ही सज्ञान झालो तसा संस्थाश्रय संपला. 'तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार' हा साक्षात्कार परिस्थितीने आम्हास नकळत दिला. मग आम्ही भाड्याने एकत्र खोली घेऊन नोकच्या करू लागलो. स्थिर झाल्यावर स्वतंत्र खोलीत राहू लागलो. आमची लग्नं झाली. ती आम्ही आपसांतच केली. तेव्हा बाहेरची सुस्थळं आम्हा आश्रमियांना मिळत नसत. ती एक अदृश्य अस्पृश्यताच होती. माणुसकीच्या कसोटीवर समाज माणूसघाणाच होता. जात, धर्म, वंश, कुल, गोत्र, पदर, परंपरांत तो अडकलेला होता. त्यामुळे आम्ही अजात, निधर्मी, सहिष्णू माणसं झालो हे आजचा समाज पाहता किती मोठं वरदान आपण कष्टपूर्वक साध्य केलं, याचा आनंद नि अभिमान वाटतो.
आमचा आकारलेला हा ‘स्नेह सहयोग परिवार म्हणजे स्वकीय विस्तार होता. त्याचा पाया ‘एकमेकां साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ असा वहिवाटी कुटुंबासारखा होता. मला समज येईल तसा हा परीघ मी रुंदावत गेलो. म्हणजे मी ज्या शाळा, संस्थांत राहून शिकलो, सवरलो, सावरलो तिथं काही कृतज्ञतापूर्वक करायचं ठरवून नोकरीशिवायचा हाती वेळी सत्कारणी लावू लागलो. रिमांड होमसारख्या संस्था 'घर' कशा होतील हे पाहिलं. राज्यात मुलांचीच रिमांड होम्स होती अधिक. निराधार मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात मुलींची बालगृहे सुरू होतील असं पाहिलं. त्यामुळे जात, धर्मापलीकडील आर्थिकदृष्ट्या गरीब मुलींना राहणं, जेवण, शिक्षण मिळत गेलं. आज त्या घरोघरच्या वेठबिगार झाल्या नाहीत याचा आनंद काय वर्णावा? सन १९९० चा एक प्रसंग आठवतो. आमच्या संस्थेस शहरातील अनाथ महिलाश्रम आम्ही जोडला. हजेरीपटावरील मुली
व प्रत्यक्ष आश्रमात असलेल्या मुलींच्या संख्येत तफावत आढळली. कमी असलेल्या मुलींचा शोध घेतला तेव्हा त्या घरोघरी मोलकरीण असल्याचं आढळलं. त्यांपैकी अधिक संस्थाचालक, संचालक मंडळींच्या घरीच आढळल्या. माणूसपणाचं काम करणं तारेवरची कसरत असते. ज्या सहकारी संचालकांच्या घरातून मी मुली आणल्या त्यांचं संस्थेत येणं बंद झालं; पण त्या मुली शिकू लागल्या. आज मला त्या शिक्षिका, नर्स झालेल्या दिसतात तेव्हा लक्षात येतं की ती कसरत करीत असताना किती खस्ता खाव्या लागल्या होत्या; पण तुमची माणूसपणावर अटळ नि अढळ श्रद्धा असेल तर काळाच्या ओघात मळभ विरून जातं. उरतं निरभ्र आकाश! शीतल चांदणं!! या मुलींना मी मुलांच्या हिमतीने आपला संसार गाडा हाकताना मी पाहतो तेव्हा लक्षात येत की, आता लिंगभेदाचा अडसरही दुरावत चालला आहे. कत्र्या मुलांच्या कर्तबगारीने मुलीचं संसार करणं तारेवरच्या कसरतीनंतर भोंज्याला शिवणं... त्याचा आनंद षटकारापेक्षा कमी नसतो. ती ज्याच्या त्याच्या आयुष्याची फटकेबाजीनंतर येणारी आतषबाजीच असते नि शतकपूर्तीची वीरश्रीपण!
संस्थात्मक चौकटीतील काम मी जसं जात, धर्मनिरपेक्ष केलं तसं माझं घरही! पण त्यापेक्षा मला आजमितीला मिळणारा आनंद आणखी वेगळाआहे. माझ्या मनात एक चर्चबेल नेहमी वाजत असते. तिचा ध्वनी घणाघाती नसतो. ती किणकिण वाजणारी घंटी मात्र नित्य निनादत असते. वा-याच्या झुळकीनं नित्य वाजणाच्या छोट्या घंट्यांप्रमाणे ते घंगुरवाळे स्वर मला सतत खुणावत असतात. आज माझ्या माणूसपणाची कसरत एक सार्वजनिक थ्रिलिंग सर्कस होऊन गेलीय! परवा एक अपरिचित रिक्षावाला आला. एक चिट्ठी हाती घेऊन. माझी मुलगी बँकेच्या परीक्षेस बसणार आहे. तिला बँक परीक्षेचं पुस्तक हवंय! मला त्याचं नाव, गाव, पत्ता, फोन नंबर काही माहीत नाही. मी त्याला आणून दिलं ते पुस्तक. दुस-या दिवशी त्याचा फोन. माझा आणखी एक मुलगा आहे. एम. ए. करतोय. त्यालापण पुस्तके हवीत. मी देतो म्हटलं, माझा मित्र शेजारी होता. योगायोगाने तो रिक्षावाला आला तेव्हाही तो होता नि आत्ता हा फोन आला तेव्हाही. मला म्हणाला, ‘तू साधी चौकशीपण करीत नाही.' मी त्याला म्हटलं, “अरे, दुस-याकडे मागणं यात माणूस किती दु:ख आधी पीत असतो, हे तुला माहीत नाही.' जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे!
एकीकडे हे माझ्या परिघातलं जग. या जगाच्या परिघाबाहेर एक औपचारिक माणूसपणाचं जग मी अनुभवतो. त्या जगात सारं जगणं एक
उपचार म्हणून होत असल्याचं मी अनुभवतो. त्यात डोहाळे, ओटी भरणं, बाळंतपण, बारसं, वाढदिवस, परीक्षेतील यश, लग्न, मयत, माती, दिवस, श्राद्ध, सण... सारं कसं एका उपचाराचा भाग म्हणून सुरू असतं. घरी आनंद निधान जगणं सुरू असताना पै-पाहुणे, नातेवाईक, सोयरे, संबंधी, सहकारी यांच्या निमंत्रण, सांगाव्यानंतरचा आपला व्यवहार उत्स्फूर्त सहभागितेचा असत नाही. पूर्वी लोक एकमेकांच्या घरी सुट्टी, सण, प्रवास म्हणून जायचे. आता लॉजमध्ये राहतात. भेटायला जातात. मधल्या काळात गावी आलेल्या पाहुण्याला घरी जेवायचं निमंत्रण असायचं. आता पाहण्याच्या हॉटेलमध्येच डिनरचं बिल शेअर केलं जातं. पूर्वी माणूसपण केअरिंग' होतं. आता ते ‘शेअरिंग' झालंय. माझा एक मित्र एक प्रसंग फार खुलवून सांगतो. आम्हा दोघांचे एक कॉमन फ्रेंड आहेत. त्यांना पाच भाऊ आहेत. सर्व आज निवृत्त
आहेत. (खरं तर सर्व नोकरदार होते. त्यामुळे निवृत्तिवेतनधारक आहेत!) पैकी एका भावाच्या मुलाने घर बांधलं. प्रसंग होता वास्तुशांतीचा. निमंत्रणं सर्व भावांना सपरिवार येण्याचं. मोठ्या भावाचा इतरांना फोन - ‘आपण काय द्यायचं? किती काँट्रिब्युशन काढू या? आता घरच्या कार्यक्रमांनाही लोक वर्गणी काढू लागले. यातील सर्वांची मुले, सुना, नातवंडे विदेशात. सर्व फॉरेन रिटर्न. पण फॉरिनहून रिटर्न झाले की मूळ भारतीय समृद्ध. माणूसपण आज समृद्ध भारतातील उपेक्षित अडगळच काय रद्दी होऊन राहिलं आहे. समृद्धीची रद्दी अशी की कुणाला आपले वृद्ध आई-वडील घरी सोसवत नाहीत. समाजात वृद्ध दाम्पत्ये विजनवासात दिवस काढतात. एकटे किंवा एकटी राहण्याचे प्रमाण वाढत जाणे, माणूसपणाची कसरत न केल्यामुळे आलेले सामाजिक स्थूलपण, बधीरता आणि अंधत्व आहे. आजचं माणूसपण बहुआयामी उपेक्षित होत, 'मी नि माझं'च्या परिघात बंदिस्त होत संवेदनाहीन जिवंत मरण भोगत आहे.
माणसाचं असं नार्सिसस होणं हा नव्या भौतिक संपन्न काळाचा अभिशाप आहे. मी सोशल नेटवर्किंगवरच्या पोस्ट पाहत, वाचीत असतो. लोक स्वत:चे, बायकोचे, नातवाचे फोटो इतरांनी लाईक करावे म्हणून टाकत असतात. लोकांच्या कॉमेंट्स मी वाचीत असतो. त्यांतील फोलपणा कृत्रिमपणा जाणवत राहतो. लोक सतत वरच्या 'व्हर्जन'मध्ये जाण्याचा प्रयत्न करीत असतात. डोंबिवलीतून दादरला येणं त्यांच्या कसरतीचं लक्ष्य असतं. मोबाईल हजारातला असणंकडून हजारोंचा असणं यात त्याची आज इतिकर्तव्यता दिसते. अशा सगळ्या माणूसपणापासून दूर जाण्याच्या कसरतीत कधी तरी एक सुखद क्लिपपण अपवादाने अनुभवायला मिळते. एक
‘आयटी'मधला मल्टिमिलियनीअर वा मल्टिनॅशनलचा सीईओ फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लंचला जात असतो. गेटवर भीक मागणाच्या मुलास आपल्याबरोबर हॉटेलात घेऊन जातो. त्याला भरपूर खायला घालतो. बिल येतं. त्यात आकडे नसतात. असतात अक्षरं. एक सुविचार, ‘आम्ही भुकेलेल्याला खायला घातल्याचे बिल आकारत नसतो.' 'Thanks for humaneterian Intervention.' आज गरज आहे स्वत:साठी जगण्याची जीवघेणी कसरत करीत असताना तुम्ही दुसन्यासाठी काय देता? दुसच्यासाठी कसे जगता?
आज ‘कौन बनेगा करोडपती'चा खेळ रंगात आलेला असताना 'बिग बॉस'च्या घरातून तुम्ही स्वेच्छा एक्झिट घेता का हे महत्त्वाचं. ‘हूक आउट' होईपर्यंत जगायचं की योग्य वेळी ‘रिटायर' व्हायचं. ज्याला आयुष्याचे एंट्री पॉइंट नि ‘एक्झिट टायमिंग' जमते, ती माणसं माणूसपणाच्या कसरतीच्या खेळाचे यशस्वी कलाकार असतात. मग ही कसरत घरातील असो वा समाजातील. 'पैसा झाला मोठा, माणूस छोटा' असं आजचं जग बनलं असताना तुम्ही तुमच्या मनात माणूसकीचा नंदादीप तेवत ठेवाल तर उद्याचं जग यंत्रमानवाचं होणं वाचेल. ते वाचायचे तर देणग्यांचे दीपस्तंभ उभारण्यापेक्षा मदतीचे लक्ष लक्ष दीप बनून रोजच्या जगण्यात तेवत राहाल तर तुमच्या जीवनात रोज त्रिपुरी पौर्णिमेचं चांदणं शीतल, आल्हाददायक आनंदाचा, पारिजातकाचा सुगंधी दरवळ पसरत आसमंताबरोबर आत्मिक अंधकार दूर करीत राहील. ‘तमसो मा ज्योतिर्गमय' म्हणजे ‘दु:खाच्या जागी सुख पेरणे. पेरते व्हा! पेरते व्हा!! पेरते व्हा!!!
☐☐
धोकाग्रस्त बाल्य
बाल्य हे मूलतः धोक्यात जन्मते नि वाढतेही. भारतासारख्या विकसनशील देशात अज्ञान, रूढी, परंपरा, जात, धर्म, अंधश्रद्धा, दारिद्रय यामुळे मुला-मुलींचे जीवन अधिक धोकादायक बनत असते. त्यात भारतातील एकंदर कुटुंबरचना, नातेसंबंध यांमुळे बालक व प्रौढ यांच्यामधील विविध नात्यांतील ताणतणाव, दबाव, जबरदस्ती पाहता बालकांची बालपणातील वाढ म्हणजे तणावग्रस्त आणीबाणीच असते. मुलं म्हणजे मुकी, बिचारी कुणीही हाका! माणसापरास मेंढरं बरी अशी स्थिती. घरी, दारी, शाळा, समाजात वावरणारी, उपेक्षा, अत्याचार सहन करणारी बालके म्हणजे मूक गुलामच. अन्याय, अत्याचार, शोषण, हिंसा, क्रूरता, उपेक्षा किती परींनी मुला-मुलींना सामोरे जावे लागते? या शतकाच्या प्रारंभी ‘युनिसेफ'मार्फत लैंगिक शोषणासंदर्भात प्रकाशित अहवालात (Report on Sexual Exploitataion) मध्ये गुप्त अत्याचारात (Clandenstine Scourge) भारत अव्वल असल्याचे नमूद केलेले वाचताना माझ्यासारख्या संवेदनशील माणसाची मान शरमेने खाली गेल्याशिवाय राहत नाही. भारतातील मुला-मुलींचे शोषण किती प्रकारे होते ? उपेक्षा किती प्रकारे होते, हे पाहण्यासारखे आहे. उपेक्षित बालके (Vulnerable children)
१. हिंसेला बळी पडणारी बालके
२. शस्त्रसंघर्षात पिचणारी मुले-मुली
३. नोंदीशिवाय जन्मलेली अर्भके
४. एडस्सदृश सांसर्गिक रोगग्रस्त अपत्ये
५ बालमजूर / वेठबिगार मुले
६. बालगुन्हेगार
७. बालविवाहिता
८. विधिसंघर्षग्रस्त बालके (कायद्याचे बळी)
९. पालकांअभावी वाढणारी मुले-मुली
१०. लैंगिक अत्याचारपीडित बालके / बालिका
११. लिंग परिवर्तनास बळी पडलेल्या मुली
१२. अमानवी व्यापारातील मुले / मुली
१३. घरगडी / सालदार गुलाम बालके
१४. भिकारी मुले / मुली
१५. अमली पदार्थ व्यापारातील वाहक बालके
१६. मनोरंजनातील बळी मुले-मुली (सर्कस, खेळ, शौकइ.)
१७. अल्पवयीन वेश्या / देवदासी
१८. लैंगिक क्लिप्स / व्हिडिओ / फिल्मनिर्मितीतील बळी बालके
१९. अल्पवयीन आतंकवादी मुले / मुली
२०. अनाथ, अनौरस, चुकलेली, सोडलेली, घरातूनपळालेली,भंगित
कुटुंबग्रस्त अपत्ये, रोग, दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, विकास
योजनाग्रस्त (धरणग्रस्त, सेजग्रस्त इ.) मुले, मुली; शिवाय अंध,
अपंग, मतिमंद, मूक, कर्णबधिर इ.
अदृश्य उपेक्षा
हे नुसते प्रकार पाहू लागलो तरी आपल्याला याची खात्री पटेल की, समाजात सुखी मुले अल्पसंख्यच असतात. आपल्या समाजात बालकांची जी उपेक्षा करणारी, शोषण अत्याचाराची कारणे आहेत व ती पाहता आपण त्यांच्याकडे माणूस, जीव न पाहता जीवघेण्या पद्धतीने त्यांना वाढवतो हे लक्षात येते. विशेषतः ६ वर्षे वयोगटाच्या आतील अर्भक, बालकांचा विचार करताना असे दिसते की, त्यांच्या परावलंबन व असाहाय्यतेमुळे जी एक विशिष्ट स्थिती निर्माण होत असते, ती स्थितीच एक तणावग्रस्त मरणयातना देणारी असते. रोगग्रस्त, अपंग, मतिमंद, बहुविकलांग अपत्ये यांच्या व्यथा वेदनांची तर आपण कल्पनाच करू शकत नाही. अज्ञान, दारिद्यामुळे पालकांचे होणारे दुर्लक्ष केवळ अक्षम्य! मुलांची दिसून न येणारी उपेक्षा तरी किती? भावनिक, मानसिक, शारीरिक इ. मुलगी झाली म्हणून
आईची छाती कोरडी पडते या रूढीग्रस्ततेला काय म्हणणार? किंवा मुलगी झाली या तणावात ते अर्भक आईच्या किती प्रकारच्या अत्याचारांना बळी पडते? मी महिला आधारगृह चालववित असताना बलात्कारित, अत्याचारित महिला सोडा; सर्वसाधारण आईपण मुलगी झाली म्हणून आपल्या अंगाखाली आपल्या पोटच्या गोळ्याला चिरडताना, मारताना मी पाहिले आहे. यात कोणतीही अतिशयोक्ती नाही. मूल आपादग्रस्त असणे (अपंग, मतिमंद इ.) मी समजू शकतो; पण संशयाचा बळी म्हणून जन्मलेल्या मुलांची न दिसणारी उपेक्षा मी पाहतो, अनुभवतो, तेव्हा भारतीय पुरुषी अहंकार व मानसिकतेची कीव करावीशी वाटते.
अमानवी व्यापार (Child trafficaing)
मुला-मुलींचा अमानवी व्यापारात वापर ही जगातील सर्वाधिक गंभीर बालक समस्या होय. यात मुली, तरुणींचा वापर मोठा होतो. बालकांचा व्यावसायिक गैरवापर हा बालक हक्कांचे उल्लंघन, मानव अधिकारांचा संकोच व बालशोषण अशा विविध पद्धतींनी या अत्याचारांकडे पाहिले गेले पाहिजे. शिवाय विविध कायद्यांचे उल्लंघन करणारी घटना म्हणून ते गैर व शिक्षापात्र आहे, हेपण आपण लक्षात घेतले पाहिजे. वाहतूक, स्थानांतरण, देवाणघेवाण, भ्रष्टाचार, गैरवापर असे या अत्याचारांचे वैविध्य आहे. यात मुलांवर होणारी सक्ती, अत्याचार, गुलामीकरण, वेठबिगारी ही अधिक गंभीर स्वरूपाची असते.
सन २००५ च्या राष्ट्रीय अपराध नोंद अहवालानुसार (Nation crime Report) १८ वर्षांखालील मुला-मुलींवरील अत्याचारांची संख्या एकूण अपराधांत ६०टक्के इतकी मोठी आहे. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या गेल्या शतकातील अंतिम दशकात केवळ लैंगिक शोषणास बळी ठरलेल्या बालकांची संख्या ७0,000 होती. यावरून आपल्या देशातील बालक अत्याचार हा देश व समाजासाठी चिंता व चिंतनाचा विषय व्हायला हवा; पण त्यापेक्षा अधिक आपण सर्वांनी प्रतिबंधात्मक उपाय व कृती कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करायला हवे. एका स्वयंसेवी संस्थेच्या अहवालानुसार आशिया खंडात बाललैंगिक शोषण जगात अधिक असून एकूण लैंगिक शोषणात बाललैंगिक शोषण २0टक्के इतके मोठे आहे. लैंगिक व्यापार व शोषणार्थ मुलींची विक्री व त्यांचे स्थानांतरणाचे (एका देशातून दुस-या देशात) प्रमाणही मोठे आहे. अल्पवयीन वेश्यांचे संगोपन व संरक्षण कार्याच्या सन १९८५ ते ९० या काळात या मुलींचे जीवन, दिनक्रम, सवयी मी पाहिल्या, अनुभवल्या आहेत. त्या सवयीच्या इतक्या गुलाम असतात की, व्यवसायाच्या
सामाजिक विकासवेध/१४२
विशिष्ट काळात (सायं. ६ ते रात्री १२) लैंगिक क्रिया न घडणे हेच त्यांना वेडेपिसे करणारे ठरते. शिवाय त्यांचे दिनचक्र. आपली झोप मोडायच्या वेळी रात्री १२ ते २ च्या दरम्यान त्या झोपतात. दुपारी १२ त्यांचा दिवस उजाडतो. बिअर, बिर्याणी हे त्यांचं रोजचं खाणं-पिणं. नटणं, मुरडणं, बसण्याची ठेवण ही स्त्रीसंकोचाच्या बरोबर विरुद्ध. तेच त्यांचं जगण्याचं भांडवल असतं.
बालिकांचे लैंगिक शोषण
भारतात बालिकांच्या लैंगिक शोषणाच्या प्रमाणात निरंतर वाढ हे आपल्या सामाजिक अस्वास्थ्याचे लक्षण म्हणावे लागेल. सन २०१४ साली आपल्या राष्ट्रीय अपराध नोंद अहवालात हे प्रमाण ६५टक्के वाढल्याचे नमूद आहे. भारताच्या मुली व महिलांच्या अनैतिक व्यवहारात ७६टक्के वाढ कशाचे निदर्शक आहे? गेल्या दशकात वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन बालिकांची विक्री व आयात पाहता, हा देश या व्यवसायाचे आगर बनतो
आहे, असे दृश्य आहे. विशेषत: बांगला देश, नेपाळसारख्या सीमावर्ती देशांतून या व्यवसायासाठी मुलींच्या आयातीचे प्रमाण मोठे आहे. वेश्या व्यवसायाबरोबर लैंगिक पर्यटन (Sex Tourism) व लैंगिक चित्रणार्थ (pornography) मुले व मुलींचा वापर व्यवसाय म्हणून वाढतोच आहे. अशी सन २०१४ साली ८०९९ नोंदली केलेली प्रकरणे याची भयावहता लक्षात आणून देतात. त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे -
अ.क्र. वर्ष तपशील/कारणे नोंदणीकृत गुन्ह्यातील संख्या
१ २०१४ अनैतिक व्यापार अधिनियम ३३५१
२ २०१४ मानवी वाहतूक २६०५
३ २०१४ कुंटणखान्यातून सुटका २०२५
४ २०१४ अल्पवयीन बालिका विक्री ००८७
५ २०१४ वेश्या व्यवसायार्थ खरेदी ००१८
६ २०१४ अनैतिक व्यवसायार्थ आयात ००१३
एकूण ८०९९
हे गुन्हे भारतातील सर्व प्रांतंत झाल्याचे दिसून येते. त्यातही तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल व महाराष्ट्र ही राज्ये मानवी व्यापारात आघाडीवर असल्याचे लक्षात येते. दक्षिण भारत देशाचा प्रगत हिस्सा कसा मानायचा असा प्रश्न उभा राहतो. या पाच प्रांतांत देशातील एकूण वेश्या
सामाजिक विकासवेध/१४३
व्यवसायाचा ७0 दिसून येणारा हिस्सा वा गुन्हे पाहता केरळ अपवाद दिसतो. अभ्यासांती लक्षात येते की, तेथील स्त्रिया सुशिक्षित तर आहेतच, पण तेथील मातृसत्ताक कुटुंब व्यवस्था असणे, हेही त्याचे एक कारण असू शकते. तिथे हा व्यवसाय नाही असे नाही; पण प्रमाण अल्प दिसते. जमिला नावाच्या स्त्रीचे मल्याळी आत्मकथन या संदर्भात नोंद घेण्यासारखे आहे. त्याचा मराठी अनुवाद 'मी जमीला' उपलब्ध आहे.
सन २०१३ चा जागतिक गुलामगिरी निर्देशांकात भारताचा क्रमांक अव्वल असणे ही आपणा सर्वांसाठी लज्जास्पद बाब होय. ऑस्ट्रेलियाच्या ‘वॉक फ्री फाउंडेशन'ने प्रकाशित सर्वेक्षणात जगभर अमानवीय व्यापारात गुंतलेल्या बालकांची संख्या तीन कोटी नोंदण्यात आली असून त्यातील निम्मा हिस्सा भारताचा असणे म्हणजे या देशात अजून ‘आधुनिक गुलामगिरी असल्याचाच पुरावा ना? नवी दिल्लीतील शकुरपुरा वस्ती नावाने ओळखल्या जाणाच्या भागात घरकामासाठी मुले, मुली पुरविणा-या ५000 संस्था (Agencies) कार्यरत असणे हे कशाचे लक्षण आहे. या संस्था भारतभर मुले, मुली पुरविण्याचे काम करतात. ही सर्व मुले, मुली भारताच्या ग्रामीण व गरीब कुटुंबांतील असतात. ही ५000 रुपयांना विकत घेतली जातात व ३0,000 रुपयांना विकली जातात. या मुलांना दिवसाकाठी १५-१६ तास काम करावे लागते. त्यांची मजुरी संस्थांना दिली जाते, मुलांना नाही. ही मुले अशा दुष्टचक्रात अडकतात की ते आधुनिक चक्रव्यूहात अडकलेले अभिमन्यूच असतात. चक्रव्यूहात जाता येते, परतीचा मार्ग नसतो. ही मुले अत्याचार सहन करीत मोठी होतात. ती सवयीने घरगडी बनून राहतात. तेच त्यांचं जिणं बनून जातं. कोकणातून मुंबईत जाणारी चाकरमानी मुलं आठवली की हे वास्तव अधिक गडद बनून अस्वस्थ करीत राहतं. न उमललेल्या कळ्यांचे नि:शब्द नि:श्वास तुम्हाला ऐकू यायचे तर तुमच्या मनात या आधुनिक अभिमन्यूंबद्दल अकृत्रिम, सहज साने गुरुजींचा पाझर, उमाळाच हवा! 'श्यामची आई'मध्ये त्यांनी म्हटले होते, कितीतरी निष्पाप कळ्या उमलण्यापूर्वी किडीच खाऊन जातात. सन २०१३ च्या आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने (ILO) सन २०१३ च्या आपल्या अहवालात याची पुष्टी केली आहे. अलीकडेच कैलास सत्यार्थीना बालमजुरी मुक्तीच्या असाधारण समाजकार्याबद्दल नोबेल पारितोषिक देऊन गौरवणं काय किंवा तत्पूर्वी मदर तेरेसाचा वंचित सेवेबद्दल गौरव काय - हे जोवर आपले शल्य बनणार नाही, तोवर येथील बाल्य उपेक्षितच राहणार.
सामाजिक विकासवेध/१४४
मला आठवतं की, सन १९९८-९९ च्या दरम्यान आम्ही ‘ग्लोबल मार्च अगेन्स्ट चाइल्ड लेबर' योजला होता. या मोर्चाचे नेतृत्व कैलास सत्यार्थी करीत होते. महाराष्ट्रात दोनच शहरांत हा मोर्चा आलेला होता. त्यांपैकी एक शहर होतं कोल्हापूर. सुमारे १००-१२५ मुक्त बालमजूर या मोर्चात सामील होते. ते जगातील अनेक देशांमधील होते. “बचपन बचाओ आंदोलन आम्ही काही मित्र महाराष्ट्रात चालवित असू. शासनाचे श्रम अधिकारी ढिम्म हलत नसत. त्यांना या प्रश्नाचं गांभीर्यच असायचं नाही. आज ‘अवनि' ते कार्य करते. दोन दशके उलटून गेली तरी बालकांप्रती, विशेषत: वंचित बालकांबद्दल आपला वार्षिक पुळका बालकदिनीच उफाळून येतो. ‘परत ये रे माझ्या मागल्या, ताक-कण्या चांगल्या' म्हणत आपण मुलांना विसरतो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू बालकांचा उल्लेख 'Father of Nation' असा करीत असायचे. ज्या देशातील बाल्यच उपेक्षित त्या देशातील पालक कसे समृद्ध असणार ? सुजाण पालकांचा देश बालक हक्क जागृत देश असतो, हे आपणास विसरून चालणार नाही.
हा लेख लिहीत असताना उगीच मला माझे बालपण छळत होते. मीपण कधी काळी एक न उमललेली कळी होतो. नि:शब्द नि:श्वास घेऊन जगण्याचा विकल संघर्ष करीत होतो. माझ्यातील उपजत ऊर्जा व वेळोवेळी मला लाभलेलं संस्थात्मक पालकत्व (अनाथाश्रम, रिमांड होम, शाळा, कॉलेज, विद्यापीठ) त्यांनी मला सावरलं, शिकवलं व शहाणं केलं. अशी संधी फारच कमी वंचित मुला-मुलींना लाभते. लाभली जरी संधी तरी, तिचं सोनं करण्याचं उपजत शहाणपण सर्वांत असतं असं नाही; म्हणून समाजात एक प्रकारचं सुजाण सामाजिक आपत्ती निवारण व्यवस्थापन असण्याची गरज आहे. ते आपल्या पोटच्या गोळ्याप्रमाणे वंचित बालकांचा सांभाळ करील. संस्था कोंडवाडे बनत असताना मी हे स्वप्नं पाहतो आहे, याचे भान मला नाही असे नाही; पण स्वप्नं पाहिल्याशिवाय सत्यसृष्टी आकाराला येत नसते, ही खूणगाठ आपण मनात बांधली तरच नि:शब्द नि:श्वास घेणा-या आजच्या कळ्या उमलून उद्याचे जाणीवजागृत पालक बनतील तर उद्या आज बालकांची गुलाम राजधानी असलेला हा देश समृद्ध बाल्य बहाल करणारा स्वर्ग बनायला वेळ लागणार नाही. या, आपण सर्व वंचित बालकांप्रती प्रतिबद्ध होऊ या, सक्रिय राहू या, संवेदनशील बनूया.
सामाजिक विकासवेध/१४५
सामान्यांचे ‘स्मार्ट’ समाजकार्य
काही शब्द उपजत बहुपेडी, बहुआयामी असतात खरे. ‘स्मार्ट’ शब्दाचंच घ्या. हा शब्द सर्वसाधारणपणे ‘सुंदर' नि ‘चतुर' अशा अर्थांनी वापरला जात असला तरी त्याच्या किती अर्थछटा आहेत म्हणून सांगू? ‘स्मार्ट’ शब्दाचा एक अर्थ आहे वेदना, शल्य, ठसठस. त्याचा आणखी एक अर्थ आहे बोचणी. एखादा मनुष्य जिव्हारी बोलला की त्याची टोचणी मनास सतत कुरतडत राहते. ज्या अर्थाने 'स्मार्ट' शब्द सर्रास वापरला जातो, त्या अंगाने त्याचे अनेक अर्थ प्रयोग आढळतात. 'स्मार्ट' म्हणजे तत्पर, उत्साह जिवंतही. क्षमता या अंगानेही तो वापरला जातो. विचार, बुद्धिच्या संदर्भात त्याचा अर्थ चाणाक्ष' असाही संभवतो. हुशार, तजेलदार, बुद्धीमान म्हणूनही तो लोक वापरतात. ‘स्मार्ट’चा आंगिक अर्थ 'देखणा' असा होतो. वागण्याच्या संदर्भात तो चातुर्य अंगाने ओळखला जातो. कृती म्हणून योग्यता, शहाणपण असा वृत्तिपरक बोध हा शब्द देत असतो.
शब्दांचे अर्थ संदर्भाने तयार होतात हे काव्यात जसे खरे असते, तसे ते व्यवहारातही. समाजकार्य, समाजसेवा अशा संदर्भात आपण ‘स्मार्ट शब्द वापरतो तो मात्र ‘नि:स्पृह' या अर्थाने. हा अर्थ कदाचित कुठल्या शब्दकोशात नाही आढळणार; पण तो व्यवहारात मात्र प्रचलित दिसतो. समाज म्हणजे केवळ विशिष्ट जात, धर्म, वंश, वर्ग, लिंग, आदींचा समूह नव्हे. ती एक सबंध व्यवस्था आहे. एका समाजात राहणा-या माणसांचा एकमेकांशी पूरक व हितवर्धक संबंध असतो, तोवर समाज गुण्यागोविंदाने नांदत राहतो. समाजात सबल असतात तसे दुर्बलही. अनाथ, निराधार, दलित, वंचित, उपेक्षित, प्रज्ञाचक्षु, दिव्यांग, गतिमंद सर्वांना त्यांच्या मर्यादा, उणिवांसह स्वीकारून विकासाची संधी देणं, प्रसंगी सुविधांचं झुकतं माप देणं यालाच नव्या काळात सामाजिक न्याय म्हणतात. अशा
सामाजिक विकासवेध/१४६
न्याय, संधीचे कार्य करणे म्हणजे समाजकार्य करणे. अशी संरचना उभारून त्यात निरंतरता, सातत्य आणणे म्हणजे समाजसेवा करणे होय.
महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी धोंडो केशव कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर अशी समाजसुधारक व सेवकांची मोठी फळी व परंपरा आपणाकडे आहे. एकविसाव्या शतकातही आज अनेक समाजसेवक छोटी-मोठी क्षेत्रे निवडून निष्ठेने व नि:स्पृहपणे कार्य करताना दिसतात. काहींना तर विरोधकांच्या गोळ्यांना बळी पडावे लागते. अशांची नवी पिढी नव्या उमेदीने हे कार्य नेटाने पुढे नेताना दिसते. आजच्या माध्यमाच्या युगात काहींना प्रसिद्धी लाभते, काहींना नाही. जी माणसं छोट्या परिघात छोटं काम पण ते प्रसिद्धिपराङ्मुख व नि:स्पृहपणे करतात ते माझ्या लेखी वर्तमानातील खरे ‘स्मार्ट सोशल वर्कर' होत..
प्रसारमाध्यमांच्या झगमगाटात हल्ली ‘सेलेब्रिटी सोशल वर्कर'ही आढळतात. राजकारणात जशी घराणेशाही आढळते, तशी ती हल्ली समाजकारणातही प्रतिबिंबित होऊ लागली आहे. समाजकारणात एकाच घराण्यातील दुसरी, तिसरी पिढी सातत्याने 'त्या' समाजकार्य क्षेत्रात कार्य करताना दिसते, तेव्हा ती अनुकरणीय, स्पृहणीय गोष्ट वाटते. तरी प्रश्न पडतो की अशा संस्था, संगठनांत वर्षानवर्षे अप्रसिद्धपणे कार्य करणारे सर्वसामान्य, त्यागी कार्येकर्ते समाजपटलावर केव्हा येणार? या जिज्ञासेने मी शोध घेताना माझ्या लक्षात येते की, महाराष्ट्रभर कितीतरी छोटे-मोठे कार्यकर्ते स्वत:च्या कुवतीनुसार एखाद्या सेवा, समाज कार्यात वर्षानुवर्षे नि:स्पृह कार्य करीत त्या कार्याप्रती व समाज बांधीलकीच्या संदर्भात आपली निष्ठा निरंतरपणे पणाला लावतात. हे कार्यकर्ते जे कार्य करतात त्याच्या प्रसिद्धीची खटपट नसते. कार्यप्रसार म्हणून प्रसिद्धी जरूर; पण प्रसिद्धीसाठी त्यांचे कार्य नसते. दुसरे असे की हे ‘स्मार्ट सोबर सोशल वर्कर उपजीविकेसाठी त्या कार्यावर अवलंबून असत नाहीत. ते आपला व्यवसाय, नोकरी प्रामाणिकपणे करीत सतत समाजहितकार्यात स्वत:ला गुंतवित राहतात. तो त्यांचा छंद असतो. 'स्वान्त:सुखाय परहितार्थ कार्य' असे सूत्र घेऊन कार्य करणारी ही मंडळी मला महाराष्ट्रभर फिरत असताना वेगवेगळ्या समाजकार्याच्या निमित्ताने वर्षानुवर्षे भेटत आली आहेत. त्यांच्या या स्मार्ट (नि:स्पृह), निरपेक्ष, अप्रसिद्ध समाजकार्य वृत्तीचा हेवा (चांगल्या अर्थाने) वाटत आला आहे. या स्मार्ट सोशल वर्करांची एक कार्यशैली, कार्यसंस्कृती मला नेहमीच भुरळ घालत आली आहे. ती म्हणजे त्यांची सामूहिकव.
सामाजिक विकासवेध/१४७
कार्यपद्धती. 'मीच नाही, माझ्यासह अनेक' असं रिंगण घेऊन ते रंगून कार्य करतात, पदं बदलतात; पण वेळ, पदरमोड ठरलेली. घरचं कार्य' म्हणून लष्कराच्या भाकरी भाजणारी ही स्मार्ट सोशल वर्करची फळी मला उद्याच्या खच्या ‘भारत उदयाचे शिल्पकार' वाटतात..
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती टिकावी, वाढावी म्हणून दरवर्षी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जात असते. कारदगा, बेळगुंदी, सांबरा, आरग, उचगाव, कोडोली अशा अनेक ठिकाणी ही संमेलने वर्षानवर्षे भरत आली आहेत. अशोक तथा बाबा याळगी, महावीर पाटील, दिलीप चव्हाण यांच्यासारखे कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकवर्गणी जमा करून ही संमेलने भरवित असतात. संमेलन गावसंमेलन असते. घरोघरी गुढ्या उभारल्या जातात. दारादारांत रांगोळ्या काढल्या जातात. गावजत्रा समजून माहेरवाशिणी माहेरी येतात. त्या दिवशी चूल बंद असते. गावाशेजारच्या शेता, अमराईत गावजेवण असतं. 'साहित्यिक येती गावा तोचि दिवाळी-दसरा' असा माहौल असतो. संमेलनाध्यक्ष म्हणून निवड केलेल्या साहित्यिकाची बैलगाडीत बसवून मिरवणूक काढली जाते. ग्रंथदिंडीचे आयोजन केले जाते. परिसरातील शाळांतील विद्यार्थी, शिक्षक यांचे हिरिरीने आयोजन करतात. संमेलन अध्यक्ष साहित्यिकाच्या पायांवर घरोघरी पाणी त्यांचे ओतून औक्षण केले जाते. चित्ररथ सजवून मिरवणूक असते. हे सारे कार्य करणारी मंडळी इतके सारे श्रम घेतात ते केवळ 'माय मराठी'साठी. महिनाभर कार्यकर्ते पायांना भिंगरी बांधून फिरत असतात. साहित्यिकांचे उंबरे झिजवित असतात. ते साहित्यिकांचे वाचक, भक्त (फॅन) असतात. हे लिहीत नाही; परंतु त्यांचे वाचन चोखंदळ, चिकित्सक असते. सीमाभागातील या पंचवीस गावांमधून पंचवीस वर्षे होत असलेली ही संमेलनेअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांइतकीच भव्य असतात. अध्यक्षीय भाषण, परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन, ग्रंथप्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम योजलेले असतात. ही कार्यकर्ती मंडळी साहित्यिकांच्या आतिथ्यात कोणतीही कसर ठेवीत नाहीत. एखादं समकालीन पुस्तक निवडून ते सवलतीच्या दरात उपलब्ध करून देतात. प्रकाशकीय सवलत, संमेलन सबसिडी लक्षात घेता ही पुस्तकं निम्म्या किमतीस उपलब्ध होतात. वाचकांच्या घरोघरी आता घरगुती ग्रंथालये
आकारली आहेत. विशेष म्हणजे हे सर्व करणारे संमेलन मंचावर कधीच नसतात. हा असतो यांचा स्मार्टनेस ! संमेलन होताच हिशेब पूर्ण करून प्रत्येक देणगीदार, वर्गणीदार यांना देण्याचा चोख व्यवहार त्यांना दरवर्षी.
.
सामाजिक विकासवेध/१४८
चढत्या भाजणीने वर्गणी देतो. म्हणून ही साहित्य संमेलने दरवर्षी गतवर्षीपेक्षा वाढत्या थाटात साजरी होतात. कर्नाटक सरकार यांना दटावण्याचा प्रयत्न करते; पण मराठी मन, माती, माणूस मनगटातील साच्या ताकदीनिशी मुकाबला करीत माय मराठी जयघोष दुमदुमत ठेवतो.
तिकडे जळगावला खानदेशातील अनाथ, प्रज्ञाचक्षु, दिव्यांग मुलामुलींना आपल्या 'दीपस्तंभ' संस्थेतर्फे 'मनोबल', ‘गुरुकुल', 'संजीवनी'सारख्या छोटेखानी वसतिगृहांतून निवडक विद्याथ्र्यांना दत्तक घेऊन त्यांच्या निवास, भोजन, शिक्षण, प्रशिक्षणाची सोय करणारा यजुर्वेद महाजनसारखा तरुण मला उद्याच्या भारताचा ‘उगवता तारा' वाटतो. तो स्वत: स्पर्धा परीक्षेसाठी पुण्यास जातो. वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही अयशस्वी होतो. ठरवतो, आपण नाही झालो ना, आपल्या अपयशाचे उन्नयन करीत तो शेकडो विद्यार्थी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आयकर अधिकारी करतो. अंध विद्याथ्र्याला कलेक्टर करणे, त्याची आत्मकथा प्रकाशित करणे यातील यजुर्वेदचा उमदेपणा अनुकरणीय! यजुर्वेद समृद्ध घरातला. आपल्या वाट्याला आलेली सारी इस्टेट ‘दीपस्तंभ'ला देऊन निरपेक्षत्व सिद्ध करतो. आज ‘दीपस्तंभ'मध्ये एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षणातून ‘स्मार्ट’ भारत घडविण्याचं ‘स्मार्ट कार्य करणा-या यजुर्वेदच्या ‘दीपस्तंभ'तर्फे शिक्षण क्षेत्रात दुसरी क्रांती वंचितांचा अंत्योदय करते आहे. नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप डेव्हलपमेंट, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, वसतिगृहे, ग्रंथालय, अभ्यासिका,
आत्मविश्वास व प्रेरणा वाचन अभियान, व्याख्याने, कार्यशाळा, मुलाखती, मिशन सक्सेस, प्रकाशन किती कामे सांगू त्याची? घरी आई, पत्नी, मुलगा
आहे. घर-गृहस्थीचा खर्च आहे. गाडी-घोडा आहे. गावोगावी व्याख्याने देतो. येणाच्या मानधनातून जगतो व इतरांना उभारी देत उभे करतो.
जळगावातच आमचे असेच एक समाजाच्या लेखी वेडे ठरलेले प्राचार्य डॉ. सुरेश राणे आहेत. ते तेथील डॉ. बेंडाळे कन्या महाविद्यालयाचे प्रतिथितयश प्राचार्य, कॉलेज नॅक ए' ग्रेडचे. ते सांभाळत ते आपल्या विद्यार्थी सहायक समितीमार्फत कर्मवीर भाऊराव पाटील वसतिगृह चालवितात. वसतिगृह सर्व जाती, धर्माने खुले. निवास, भोजन व्यवस्था उत्तम ग्रंथालय, अभ्यासिका, दवाखाना सर्व सोयी. विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यास करायचा. अट एकच, प्रवेशापेक्षा अधिक मार्क मिळवायचे. पुढच्या वर्षी मागीलपेक्षा अधिक. प्रत्येक माणसाकडून रुपया-रुपया गोळा करतात. त्यांना पहिली देणगी रेल्वे हमालांनी दिली. जळगावच्या सर्व सामाजिक उपक्रमांत हा गृहस्थ दानपेटी घेऊन उभा असतो. लोक त्याला
सामाजिक विकासवेध/१४९
‘डबेवाला', 'पेटीवाला' म्हणून ओळखतात. त्यांच्या पाया पडून दान देतात. प्राचार्य डॉ. राणे गावात ‘जेनेरिक मेडिकल शॉप' आपल्या संस्थेतर्फे चालवितात. गरीब, पेन्शनर्स, मजूर, पाळी लावून रोज २00 रुपयांची औषधे अवघ्या २० रुपयांत मिळवितात. ते त्यांच्या लेखी जीवनदान असते. डॉ. राणे हे काम करतात म्हणून त्यांना संस्थाचालक, डॉक्टर, मेडिकलवाले पाण्यात बघतात. तेही पाण्यात राहून वैर न करता आपले ध्येय घट्ट कवटाळून चिकाटीने ‘स्मार्ट कार्य करतात. त्यांची मूल्यनिष्ठा, चिकाटी, निरपेक्षता हेच त्यांचे बळ. त्यांच्या खिशात ३०० रुपयांचा नोकिया फालतू मोबाईल या माणसाचं अफलातूपण सिद्ध करीत असतो. ते सेलिब्रेटी नाहीत. आहेत ‘डेलिब्रेटी'. त्यांना स्मार्ट सलाम!
नाशिकात श्यामला चव्हाण कायरे गावी जाऊन तेथील आदिवासींचे जीवन बदलण्याची निरंतर धडपड करते. दरवर्षी एकलव्य शिष्यवृत्तीद्वारे आदिवासी, झोपडपट्टीतील गरीब मुले, मुली यांना हजारो रुपयांच्या शिष्यवृत्ती वाटते. तेपण माणसांकडून रुपया-रुपया मिळवित. तिकडे कोपरगावला दत्तात्रय खैरनार, व्यवसायाने सी.ए.. आपल्या क्लायंटस्चे हृदयपरिवर्तन करून गरीब विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी लाखो रुपयांच्या शिष्यवृत्ती देतात. त्यांचे विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर्स झालेत. आता ते प्रतिवर्षी प्रतिदान देऊन उतराई होतात. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील रोज नव्या गावी नव्या युवकांचे प्रबोधन करीत वर्षानुवर्षे फिरताहेत. अमळनेरला साने गुरुजी कर्मभूमी स्मारक उभारण्याची त्यांची अव्याहत धडपड सुरू आहे. राष्ट्र सेवादलामार्फत युवक प्रबोधन शिबिरांची नित्य आयोजने करणारे गोपाळ नेने नावाचे शिक्षक. साधना बालकुमार अंक, युवा अंक लाखांच्या घरात पोहोचवणारे बिनीचे कार्यकर्ते. ऑगस्ट ते नोव्हेंबर हा त्यांचा चतुर्मास'. या चतुर्मासात हा गृहस्थ शाळेची नोकरी इमानेइतबारे सांभाळत प्रत्येक विद्यार्थ्यानं सकस वाचावं म्हणून ‘संस्कार दीप लावू घरोघरी' गुणगुणत कार्यरत असतो.
तिकडे शिरोड्यासारख्या छोट्या गावी रघुवीर मंत्री आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह मराठीस पहिले ज्ञानपीठ पारितोषिक मिळवून देणारे समाजशील साहित्यिक वि. स. खांडेकरांच्या शाळेचे पुनरुज्जीवन करून देखणं स्मृती संग्रहालय उभारतात. का तर खांडेकरांनी आपणास इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश मिळवून दिला होता. त्यांची कृतज्ञ उतराई. तीन कोटींची शाळा, कोटीचं वस्तुसंग्रहालय, कोटीचा दवाखाना... अशी कोटींची उड्डाणे करणारे भाई मंत्री कोकण, गोवा सीमाभागात निरलसपणे आपला उद्योग सांभाळत
सामाजिक विकासवेध/१५०
शाळा, ग्रंथालय, मीठ सत्याग्रह स्मारक, रोटरी क्लब, वेतोबा देवस्थान सान्यांमार्फत समाजहिताचे कार्य, ते शिक्षण, संस्कृती, साहित्य, कला, सेवा असा पाचपदरी गोफ पदरमोड, झोपमोड करीत स्वत:ची पर्वा न करता करताना पाहतो तेव्हा लक्षात येते की, हा लक्ष्मीपुत्र असला तरी ख-या। अर्थाने समाज-सारस्वतच!
इकडे आपल्या कोल्हापुरात मिलिंद यादवसारखा तरुण कलाशिक्षक ‘करि मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते समाजाशी त्याचे' म्हणत ‘चिल्लर पार्टी' ही बाल फिल्म चळवळ चालवितो. वर्षानुवर्षे श्रमिक प्रतिष्ठानच्या अवी पानसरे व्याख्यानमालेचे नेपथ्य देखणं, कलात्मक, शिवाय बोधप्रद होईल म्हणून जिवाचं रान करतो. पदरमोड करून आपला समाजबाप कॉ. गोविंद पानसरेंचं सचित्र चरित्र प्रकाशित करतो. असाच एक हरहुन्नरी कलाशिक्षक सागर बगाडे आपल्या कधीकाळच्या अनाथपणाचं उन्नयन पंढरपूरला वर्षानुवर्षे आपल्या डझनभर तरुण मित्रांना घेऊन जाऊन 'मामाचा गाव' सजवतो. आख्ख्या पंढरपुरातील अनाथ मुले नि वृद्ध जमवून आजी,
आजोबा नि नातवंडांचे गोकुळ निर्माण करतो. नाच, गाणी, कला, संगीत, निसर्ग सर्वांची संगत जोडत दिवाळी भेट, भाऊबीज ओवाळणी देत आपल्या अनेक अनामिक चाहत्यांच्या हृदयाला साद, हात घालत देत राहतो. असे नसते की सारे कार्य समाजातीलच सुजाण करतात. शासनाच्या निबर यंत्रणेतही माणुसकीचे झरे गुप्त गंगेसारखे वाहत राहतात. इंद्रजित देशमुख, संपतराव गायकवाड, विश्वास सुतार, दिनकर पाटील यांच्यासारखे शासकीय अधिकारी यंत्रणेला विधायक, संवेदनशील, समाजशील बनवित शिक्षकांना साद घालतात. त्यातून प्रेरणा, प्रबोधन, नवऊर्जा शिबिर, ग्रंथमहोत्सव, शिक्षक प्रबोधन करीत राहतात. त्यांना हे चांगले माहीत आहे की, शिक्षक जागा, जाणिवेचा राहिला तर विद्यार्थी घडत राहणार. युवराज कदमसारखा। साहित्यप्रेमी ‘वाचते व्हा' म्हणत शाळा, कॉलेज, विद्यापीठात ‘वाचन कट्टे उभारतो व तरुणांना वाचता करतो, वाचवितो. प्रभाकर आरडे ‘शिक्षक समितीच्या माध्यमातून भारतभर पायपीट करून प्राथमिक शिक्षकांचे चित्र, चरित्र, चारित्र्य बदलावे म्हणून स्वत:च्या वृद्ध आजारांची पर्वा न करता आटापिटा करीत राहतात. रमेश नांगरेसारखा साधा तलाठी, सर्कल असलेला तरुण टेबलासमोर येणा-या प्रत्येक गरजूचा कल्पवृक्ष बनतो. आर. वाय. पाटील यांच्यासारखे तरुण मुख्याध्यापक कोल्हापुरातील सर्वांत ज्येष्ठ तरुण' असलेल्या डी. बी. पाटील यांच्या छत्रछायेत जिल्ह्यातील प्रत्येक शाळा शिकवती राहावी म्हणून अनेकानेक उपक्रमांचे फेर, गोफ गुंफत नवा
सामाजिक विकासवेध/१५१
भारत घडावा म्हणून स्मार्ट संघटन करीत राहतात. अशी किती स्मार्ट माणसे मी तुम्हाला सांगू ?
तिकडे आजच्यात सुभाष विभूतेसारखा साधा प्रामाणिक शिक्षक ऋग्वेद मासिक, ऋग्वेद चिल्ड्रन फंड, बालसाहित्य संमेलन असा फेर धरत खेडोपाडी मुलांना अवघ्या दहा रुपयांत अभिजात बालसाहित्य मिळावे म्हणून पुस्तकाचं अक्षर दालन सुरू करतो. गडहिंग्लजला अवधूत पाटील व्यवसायाने पत्रकार; पण गावोगावी नेत्रदान चळवळीचे जाळे विणतो. तनुजा शिपूरकर रोज महिलांचे तंटे मिटवितात. सुशीला यादव मोलकरणींची गा-हाणी रोज वेशीवर टांगत त्यांचे संघटन करतात. स्वाती गोखले ‘सखी फिचर्स'मार्फत महिलांना लिहित्या, बोलत्या करतात.
मला तर सेलेब्रिटी सोशल वर्करापेक्षा हे स्मार्ट डेलिब्रेटी सोशल वर्कर अधिक महत्त्वाचे वाटतात. ते रोज स्वत:पलीकडे काहीतरी करतात. त्यांच्यावर कोणी कॅमे-याची लाईटगन धरत नाहीत. कोणी त्यांच्यावर वर्तमानपत्रांत फिचर लिहीत नाहीत. चॅनेल्सवाले त्यांचे ना बाईट घेतात, ना वृत्तपत्रवाले त्यांना ओपिनियन मेकर मानत त्यांची मते, प्रतिक्रिया छापतात. शासनाच्या लेखी ते ना आदर्श शिक्षक असतात, ना ‘दलितमित्र', त्रिपुरी पौर्णिमेच्या या पणत्या रोज समाज घाट उजळीत राहतात. त्यांच्यावर प्रसिद्धीचे हॅलोजन कधीच डोळे दिपवणारा प्रकाश टाकत नसतात. तरी ते ‘पणती जपून ठेवा, अंधार फार झाला' असे गुणगुणत, रोज नवे समाजस्तंभ उजळत, उभारत स्मार्ट समाज उभारत राहतात. भारतात उद्या मुंबईचे शांघाय झाले किंवा दिल्लीची दुबई झाली तर त्या ‘स्मार्ट सिटी'चे शिल्पकार पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार नाहीत, असतील तर हे स्मार्ट सोशल वर्कर। कारण त्यांनी घरोघरी प्रगल्भ ज्ञानाचे दीप उजळलेत. ते उद्या भ्रष्टाचारी असणार नाहीत. पैसे घेऊन मत देणार नाहीत. देवळा, दरबारात उंबरे झिजवणार नाहीत. ते अपना हाथ जगन्नाथ' म्हणत रोज मुठी आवळून मेहनत करतील. त्यांची छाती निधडी असेल अन् मान ताठ, ते कुणाची चाकरी करण्यापेक्षा घामाची भाकरी खाणे पसंत करतील. उद्याचा भारत आजच्या कुबड आलेल्यांचा देश नसेल. तो असेल स्वप्रज्ञ, स्वावलंबी सूर्य, तारकांचा, ठिणग्या, शलाकांचा; कारण ते या स्मार्ट समाजशिल्पी वर्कर युनिव्हर्सिटीचे स्वाध्याय पदवीधर असतील. स्मार्ट सोशल वर्करच उद्याचा स्मार्ट भारत घडवतील. 'स्टार्ट अप इंडिया', 'मेक इन इंडिया'चे खरे भागीदार निर्मिणारे हे स्मार्ट शिल्पकार.
सामाजिक विकासवेध/१५२
या सर्व स्मार्ट सोशल वर्करची कार्यशैली, जीवनपद्धती, समाजशीलता, मनुष्यसंग्रही वृत्ती, परहितार्थ निरंतर धडपड सारं अनुभवत, पाहत असताना कवी नारायण सुर्वेच्या काव्याच्या किती तरी ओळी कानांत गुंजारव करीत राहतात. ही मंडळी मला समाजाच्या तळपत्या तलवारींपेक्षा कमी धारदार वाटत नाहीत. सांस्कृतिक भिंतींची बंदिस्तता रोज उद्ध्वस्त करीत नवा उदार समाज घडविणारे हे स्मार्ट समाजसेवक मला वंचित समाजास 'देशसंचित' बनविताना दिसतात. विश्वाचं गोकुळ बनविण्याची यांची उमेद दाद देण्यासारखी खरी. लोकसेवकाची भूमिका निरंतर अदा करणारे हे कलंदर कार्यकर्तेच उद्याची सामाजिक कलाकुसर घडवतील, याची मला खात्री आहे. दुज्यांचे भविष्य स्वउत्सर्जन नि विसर्जनाने घडविणारे हे समाजसेवक ‘सत्याचे प्रयोग' परत एकदा करू पाहत आहेत. सामाजिक गदारोळात त्यांचे सूर्यसंक्रमण माध्यमांच्या लेखी भले नसो; त्यांनी आपल्या कार्याचे शिलालेख प्रत्येक गरजूंच्या हृदयात कोरले आहेत. दीडदमडीचे आयुष्य खचीतच नाही त्यांचे! ते उद्याचे मृत्युंजयी अजेय विजेते होत. त्यांच्याच गाव-वस्तीतून उद्याचा सूर्य उगवेल, अशी माझी खूणगाठ भाबडे स्वप्न नाही, असेल तर ते नग्न सत्य! त्यांना प्रसिद्धीच्या ठिगळाची झगमग नको आहे. त्यांचे खुराड्यातील जगच उद्याचे वायरलेस वर्ल्ड साकारेल. वांदेवाडीतील ही मंडळी. त्यांना पोशाखी जग भुलावत नाही. त्यांना माती, मत नि माणूस असे त्रिवेणी कोंदण खुणावते आहे. अनुभव हाच ग्रंथगुरू म्हणत, ते रोज नवी ओवी अनुभवतात, रचतात. माणसातील समर्थ सर्जनात्मा शोधणारी ही नवचेतन पिढी मला जगण्याची उमेद देत उतारवयातही तरुण बनविते. गफलत जुळवणा-यांच्या जगात नोटबदलापेक्षा ‘वोट' बदल त्यांना महत्त्वाचा वाटतो. म्हणून मला उद्याचे जग त्यांचे वाटत राहते. उगीच कुणाच्या पाया पडणारी ही मंडळी नाहीत; पण सलाम ठोकतील तर लक्तरात दडलेल्या महात्म्यांना! धरावेत असे पाय अजून जमिनीवर घट्ट उभे आहेत, ते दिसतात फक्त याच स्मार्ट सम्राटांना! बापाशीपण भांडण्याचे बळ मिळविणार ही पिढी डोळे मिटून ‘नमो नमः' न करता ‘कार्य करा' म्हणून चळवळत राहते. मग त्यांना लाभतो समाजाचा हाऊसफुल्ल सपोर्ट। ‘सूर्यकुलातील लोकांना थांबणे माहीत नाही म्हणून ते गाव-गोसावी बनून रोज नव्या गावी नवा नागरिक घडवत फिरतात, सराईतपणे केलेल्याच्या खाणाखुणा, मागमूस न ठेवण्याचा स्मार्टपणा शिकावा तर यांच्याकडूनच!
सामाजिक विकासवेध/१५३
नातेसंबंधांचे प्रेक्षकीकरण
कधीकाळी जिवाला जीव देणारी माणसं आज आत्मरततेच्या शापानी एकमेकांचे वैरी होताना आपण पाहत आहोत. औद्योगिकीकरणाच्या घोडदौडीत रोज होणारे अपघात माणसाच्या काळजाचे ठोके चुकवेनासे झालेत. मृत्यूनंतर बारा दिवस शोक पाळणारा माणूस तिस-या दिवशी मृतशोक मागे टाकून जगण्याच्या उंदीरशर्यतीत स्वत:ला झोकून देतो आहे. घरातील वृद्ध नातेवाईक अडगळ वाटणे यासारखे अन्य जिवंत क्रौर्य तुम्हास अन्यत्र आढळणार नाही. भाऊबंदकी केवळ गडक-यांच्या नाटकाचा विषय न राहता ती जगण्याच्या चौकात रोज एकमेकांस भिडते आहे. बहीण रक्षाबंधन व भाऊबीजेची ‘गेस्ट' होऊन राहिली आहे. आई-वडील स्थावर जंगम संपत्तीचे हक्काचे हस्तांतरक झाले आहेत. सुनेला तिच्या आगमनाच्या वेळी स्त्रीधन म्हणून लोकलाजेस्तव स्वत:चे दागिने बहाल करणारी सासू सुनेच्या विश्वासाला हरताळ फासत स्वत:च्याच घरी चोरी करताना निढवत आहे. सून एकाच किचन कट्टयावर जेवण रांधवते; पण वाटीभर भाजी सासूस देण्याचे औदार्य दाखवित नाही. शेजारधर्म कर्तव्य न राहता उपचार बनून गेला आहे.
असं का व्हावं नातेसंबंधांचं? असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा लक्षात येते की, हा केवळ जागतिकीकरणाचा शाप राहिलेला नसून ती माणसाची जीवनशैली बनते आहे. याला अनेक कारणे आहेत. एक म्हणजे माणसाची भौतिनेक संपन्नतेची तहान त्याला उसंत देत नाही. तंत्रज्ञानानी माणसाच्या हातात जी विविध यंत्रे, उपकरणे दिली; त्यामुळे तो कधी काळी संवादात आत्मीयता अनुभवायचा. आज तो संदेशापासून रिकामा होतो. दूरदर्शन संच, वाहिन्या त्याला रोज मनोरंजनाचा नवा मेनू दाखवितात. त्यातील आभासी कथांमध्ये तो स्वत:चा विरंगुळा शोधत हरवत आहे. कधीकाळी पुत्रप्राप्तीशिवाय मोक्ष नाही म्हणणारा पिता जिवंतपणी मुक्तीचा अनुभव नार्सिसस होण्याच्या जीवघेण्या जगण्यात घेत रोज दारूच्या प्रत्येक
सामाजिक विकासवेध/१५४
घोटात स्वपातकाचे एक-एक दुःख रिचविण्यात जीवनाची इतिकर्तव्यता मानताना दिसतो आहे. पहिली बेटी तूपरोटी' म्हणणारा मुलीचा बाप तिच्या पाठवणीच्या घोरात आता चपला झिजवत नाही. त्यानं गृहीतच धरलेलं आहे, ती जन्माला आलीय ना, मग जगायला तिनं गेलंच पाहिजे.
नातेसंबंधांचे प्रेक्षकीकरण हा माणसाने कधी काळी सोय म्हणून निर्माण केलेला चक्रव्यूह आज तोच त्याचा शिकार झालाय. बरं, माणूस संवेदनाहीन झालाय का? तर रोज त्याचा संवेदना सूचकांक वाढताना दिसतो आहे. त्याला शेजारच्या शिये, शिरोली गावांचे दु:ख तेवढे वाटत नाही, जेवढे सीरियाचे स्थलांतरितांचे लोंढे त्याला अस्वस्थ, बेचैन करतात. मी त्यांचा, या साच्या विपरितांचा शोध घेऊ लागतो तेव्हा माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी की, माणसाचे विस्तारलेले जग, त्याने त्याच्या जगण्याच्या रोजच्या जाणिवांना बोथट करीत, जगणे यांत्रिक करून टाकले आहे. हा सारा प्रवास फार जुना, पुरातन नाही; अवघा शतकभराचा हा प्रवास !
विसावे शतक उजाडले ते दोन गोष्टी घेऊन. एक साम्राज्यविस्ताराचे वेड नि समाजसुधारणेचा ध्यास. या दोन्ही गोष्टी खरे तर एकमेकांविरुद्ध होत; पण माणसाने त्या एकाच वेळी कवटाळल्या. त्यामुळे बहुधा त्याचा घात झाला असावा. माणूस जेव्हा परस्परविरुद्ध दिशेने जाणाच्या नावांमध्ये आपले दोन पाय ठेवतो तेव्हा जगबुडी अटळ बनते. पहिले महायुद्ध १९१७ ते १९२० च्या दरम्यान झाले. ऑक्टोबर क्रांतीने जगाला समाजवादाचे स्वप्न दिले. हे स्वप्नपण तो दोन पातळ्यांवर जगत राहिला. एक व्यक्तिगत नि दुसरी सामाजिक, व्यक्तिगत पातळीवर माणसाने स्वविसर्जन केले नाही. परिणामी तो विसंगत जगू लागला. सामाजिक जीवन वास्तविक पातळीवर जगायचे तर स्वविसर्जन अटळ असते. तो मोह त्याला सोडता आला नाही. भारतापुरते बोलायचे झाले तर महात्मा गांधी आदर्श म्हणून सामाजिक विचार मान्य; पण व्यक्तिगत जीवन दुस-या गांधी घराण्याचेच त्यास जवळचे वाटत राहिले; कारण ते स्वार्थाच्या अधिष्ठानावर उभे होते. महात्मा गांधींचे वारस समृद्ध झाले; पण त्यांनी मूल्यव्यवहारांची फारकत होऊ दिली नाही. उलटपक्षी ते ती आपली पुण्याई म्हणत जपताना दिसतात. राजमोहन गांधी, अरुण गांधी त्याची उदाहरणे होत. दुसरीकडे राहल गांधी, वरुण गांधीही आपल्यापुढे आहेत. नैतिकता हे जगण्याचे मूल्य आहे. त्याचे एकदा का नाटक सुरू झाले, की मग तुम्ही जनमताचे राजे नाही होऊ शकत. मग तुम्ही गोळीचे बळी ठरला तरी महात्मा गांधींच्या हौतात्म्याचे तुम्ही वारसदार नाही बनू शकत.
सामाजिक विकासवेध/१५५
सुधारणावादी युगाने माणसाचा घरगुती जगण्याचा पैस विस्तारला. जे शिकले ते घरास मुकले. अडाणी माणूस तेवढा शहाणा ठरला. शिक्षण मुळात सुरू झाले तेव्हा ती ज्ञानसाधना होती. माणसास जगण्याची भ्रांत नव्हती. जल, जमीन, जंगल त्याच्या उशाशी होते. हे तीनही ज्याला आपसूक मिळते तो निसर्गसंपन्न जीवन जगत असल्याने तो निश्चीत राहतो व दीर्घजीवी जीवनाचे वरदान त्याला लाभते. मला रवींद्रनाथ टागोरांचे घराणे खुणावते. ते गर्भश्रीमंत होते. नेहरू घराण्याप्रमाणेच; पण त्यांनी निसर्गाशी नाते जोडून ठेवले. ते सर्व भाऊ साहित्य, कला, सांस्कृतीत रमले व विश्वभारतीचे स्वप्न ते जगास देऊ शकले. ज्या घराण्यांनी युरोपची वाट धरली, ती भौतिक संपन्न झाले; पण क्रौंचवधाचा शाप त्यांना मिळाला. इकडे महाराष्ट्रात आपण पाहतो की महात्मा फुले नि सावित्रीबाई फुले यांनी यशवंताला दत्तक घेत जगाचे दु:ख कवटाळले. ते आजही समाजाच्या लेखी वंदनीय, अनुकरणीय राहतात.
जगण्याचे माणसाचे तत्त्वज्ञानही सर्जनात्मक असावे लागते. अफूची बोंडे उगवली की ती फोफावायला वेळ नाही लागत. माणसांनी ठरवायचं असतं की परस, अंगणात काय लावायचं, काय पेरायचं. पेराचं स्वत:चं असे एक चक्र आहेच. ते पावसाच्या चक्रासारखे अटळ असते. अंगणी तुळस पेराल तर प्राणवायू मिळणार, अफू पेराल तर लादेनचे मरण अटळ! म्हणून पेरा तुम्हाला आत्मसात करता आला पाहिजे. सर्जनात्मक मानवतावाद तुम्हास नित्य नव्या विधायक जगाकडे घेऊन जातो. विध्वंसाचे सुरुंग पेराल तर तुम्हीच ज्वालामुखीवर बसलेले, वसलेले रहाता. कोळशाची खाण असते तिथे हिरे असतात, तसे कोळसेही! हिरे काढण्यापुरती कोळशाची खाण उकरता तोवर संयमित उपभोगाची काटकसर तुम्हास दीर्घजीवी जीवनाचा वरदहस्त देत रहाते. पण पृथ्वीच्या पोटाचाच तुम्ही कोतळा उपसू मागाल तर मात्र तुम्ही पोकळ पाताळावरच्या जगण्याच्या अशाश्वत चिंता नि चिंतनातच जगणार! माणसानी जीवनशैली ठरवायची. ‘सुशेगात जगायचे की ‘ससेमरण'. महात्मा होण्याचा कैफच असतो नि मिडास होण्याचापण कैफ ही जाणीवपूर्वक स्वीकृती असते.व्यसन अनवधान असते.
निश्चलनीकरण हा कृष्णव्यवहाराचा रामबाण उपाय होऊ शकत नाही. फकिरीकरण कवटाळायचे डोहाळे पाश्चात्त्य तत्त्वज्ञानी संस्कृतीत फलद्रूप होऊ शकत नाही. त्यासाठीची नि:संगता जन्मायची तर निसर्गाच्या सौंदर्याचं, सहजतेचं तुम्हास आकर्षण हवं! मला हिमालयात फिरताना घनदाट जंगलात सर्व ऋतूंना पराजित करत जगणारा एक योगी भेटला. मी त्याला विचारले
की तुम्ही काय शिकला आहात? क्या पढ़ा आप ने? तर म्हणाला, ‘‘सज्जन, मैं तो निरक्षर हैं। काला अक्षर भैस बराबर! अक्षर भाई को दिया, भैंस लेकर हिमालय कूच किया। सुखी हूँ। मेरी आवश्यकताएँ है नहीं।" न राहवून मी विचारले की, ‘भाई की कोई खोज खबर ?' बोला, मैं स्थावर हो गया हूँ वह जंगम है। बेचैन रहता है। बरस में एक बार आता है मिलने। मैं नहीं जाता। उसके आने पर ही मुझे उसके भाईपन की याद आती है। वह मुझे क्या क्या चीजें लेकर आता है कभी रेडिओ, कभी मोबाईल। यहाँ रेंज ही नहीं। बेकार पड़े रहते है। उसको सुकून मिलता है। मैं भूल जाता हूँ।" हे अंतर आहे गेल्या नि वर्तमान शतकातील, सुखाचा शोध काय? तर गरजा कमी करा. नात्याचा गोफ गुंफता आला तर गुंतू नका, नपेक्षा कुंथू नका.
जगण्याचा कुंथा सर्वांत वाईट. तुम्हाला स्वतंत्र राहता आलं पाहिजे. मी तटस्थ नाही म्हणत; पण जगण्या-जगवण्यातला फरक तुम्हाला कळला पाहिजे. मी रोज काही कामानिमित्त माझ्या स्वयंचलित दुचाकीवरून उपनगरामतून हमनगरात येतो. रोज चांगलं पाच-दहा किलोमीटर अंतर पाच दहा मिनिटांत पार करतो. मी माझ्या वेगावर, आरूढ होण्यावर बेहद्द खूष असतो. दुचाकीच्या आरशात स्वत:लाच न्याहाळत मी स्वत:वरच फिदा असतो. वाटतं जगात माझ्यासारखा सुखी कोणी नाही. ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे?' विचारणाच्या त्या समर्थांना सांगावंसं वाटतं की तो मीच! पण तेवढ्यात कुणाचा तरी हात मला थांबवतो. त्यालाही हमनगरात यायचं असतं; पण यायचं साधन नसतं. वाहनही नाही आणि चलनही! म्हणतो मला मागे बसत, “या नोटांनी वीट आणलाय जगण्याचा. खेड्यात होतो तेच बरं होतं. राहायचं तिथंच जगायचं. इथे रोज जगायला जावे लागते. जगणं म्हणाल तर गुलामीचं. चांगला पदवीधर आहे; पण नोकरीवर जायची वेळ निश्चित; यायची नाही. जगण्याचा काव आलाय!"
मी शांत ऐकत गाडी चालवत असतो. तो वाटेत उतरतो. मी पुढे निघतो; पण मन माझं त्याच्यापाशी रेंगाळत राहतं. तो म्हणत होता, ‘‘माणसं शिकली तेवढी अडाणी होत गेली. तुमच्या पूर्वी दहाजणांना हात केला. कुणी नाही थांबला. तुम्हाला म्हणून हात नाही केला. तरी तुम्ही माझ्या चेह-याचा पसरलेला हात पाहिलात नि थांबलात." मी असा विचार करतो, की कोणत्या त्याच्या देहबोलीचा बोध मला झाला नि मी थांबलो ? मी तुम्हाला सांगू का? देहबोली वगैरे काही नाही. मला एक जगण्याची वाईट खोड आहे. मी काहीच म्हणजे काहीच घेऊन आलो नव्हतो. काहीच नव्हते माझ्याकडे. जात, धर्म, वंश, वर्ण, नाती, पाती, पंथ, पदर काहीच नव्हते.
मी जगत गेलो. जगण्याने मला एक छोटे शहाणपण बहाल केले आहे. जग, स्वतः जग नि जमेल तेवढं दुसन्यास जगवे. पहिल्या वाक्याचा पूर्वार्ध प्रभावी होता. मी रेसचा घोडा होतो. पळायचोच पळायचो. काळाने माझी पावलं थबकवली व अनुभवाने मनाला थांबायला शिकविले. मी आताही जगतोच. पण दुसन्यांसाठी अधिक. त्या माणसासाठी मी थांबलो होतो ना? उपकार म्हणून नाही. जाण म्हणून! माझ्या उपजत अकिंचन असण्याने सकिंचन, सकांचन होऊनही मी माझ्यातला नैसर्गिक माणूस विवेक मरू दिला नाही. म्हणून मी थांबतो, थबकतो नि दुसन्यास हात देतो. जाण काय म्हणाल तर मला कुणीतरी कधी तरी हात दिला होता. मी त्या जाणेवर जगतो. जी माणसं जाण ठेवून जागेपणी जगतात, त्यांचा न कधी कांचनमृग होतो, न कधी मिडास, न कधी शेखचिल्ली, न मुंगेरीलाल! नातं ही गोष्ट लादण्याने येते तेव्हा ती असते ओझे. तुम्ही ती आनंदाने स्वीकाराल तेव्हा त्या जबाबदारीचंही सुख असतं. ती जोखीम मानाल तर मात्र फसगत झाली म्हणून समजा. मग तुमचा प्रेक्षक होऊन जातो. नटसम्राट व्हायचं, प्रेक्षक व्हायचं की दिग्दर्शक. हे ज्याचं त्यांनं ठरवायचं?
आकाश घेऊन कोसळलेल्या स्त्रिया
काही दिवसांपूर्वी मासिक ‘जनस्वास्थ्य' चे संपादक डॉ. अनिल मडके यांचा फोन होता. अर्थातच लेखनासंदर्भात. मी ‘छप्पर हरवलेल्या स्त्रिया' विषयावर लिहावं असं संपादक मंडळास वाटतं असं ते म्हणत होते. मी म्हणालो, विषयात थोडीशी दुरुस्ती करू या. हरवलेल्या ऐवजी ‘कोसळलेल्या' असे शीर्षक करूया. हा बदल मी केवळ विषयाची आकर्षकता। वाढावी म्हणून सुचविलेला नव्हता. मी वंचित स्त्रियांसाठी कार्य सुरू केल्यापासून (सन १९८0) आजवर मी पाहत आलो आहे की, पूर्वी स्त्रीचे छप्पर गेलो, हरवले की एकत्र कुटुंबात कोणीतरी पोटात घेणारे असायचे. आज सारी घरे विभक्त झाली आणि माणसं एकटी. परिणामी स्त्रीचे छप्पर केवळ हरवत नाही तर ते कोसळते नि ती त्याखाली दबलीच नाही तर प्रसंगी गाडली जाते. 'निर्भया'सारखी.
परवा मी स्विझर्लंडबद्दल वाचले. तिथे जगातील अत्युच्च श्रीमंती नांदते आहे. माणसे किती श्रीमंत असावीत? मासिक बारा लाख रुपये मिळविणारे कितीतरी! त्यात विदेशींचा भरणा अधिक. ते एकटे राहतात यात नवल नाही; कारण, ते नोकरीसाठी आलेले असतात. आपली मुले अमेरिकेत जातात तशी; पण स्विझर्लंडचे एतद्देशीय, स्थानिक नागरिक - त्यांचे एकटे राहण्याचे प्रमाणही अधिक. एकटेपणाचा कहर म्हणजे रात्री
आठनंतर दिवे लावायचे नाहीत. मोठ्याने बोलायचे नाही. स्मशानशांतता पसरलेला हा देश मी सन १९९० मध्ये पाहिला, अनुभवला आहे. माणसे मेलेली कळतात अनेक दिवसा, महिन्यांनी. असे आपले होण्याच्या आपण उंबरठ्यावर आहोत. भारताची आर्थिक प्रगती होत आहे आणि माणुसकीचा संवेदना निर्देशांक घसरत आहे. मी मध्यंतरी कुठेतरी लिहिल्याप्रमाणे आपल्या नात्यांचे प्रेक्षकीकरण' झाले आहे. आपली नाती कधीतरी 'गोफ' होता. तो आता न सुटणारा ‘गुंता' होऊ पाहतोय. माणसाचे जगणे अॅडमच्या
सामाजिक विकासवेध/१५९
सफरचंदासारखे होऊन गेलेय. खाये तो पछताये, न खाये तो भी!' या गदारोळात स्त्रीचे जगणे, कधी नव्हे इतके कठीण होऊन गेले आहे. छप्पर कोसळून एकट्या पडलेल्या स्त्रियांची विधिवत एक संघटनाच ‘अवनि' संस्थेमार्फत चालविली जाते. तिचे नावच आहे मुळी ‘एकटी.'
वर्तमान भारतात स्त्रीचे कोसळणे किती पटींनी वाढले आहे म्हणून सांगू! भारतात कधी काळी हिंदू समाजव्यवस्थेत स्त्रीचे प्रश्न हे अशिक्षितता, दुर्लक्षितता, उपेक्षितता अशा स्वरूपाचे होते. ख्रिश्चन मिशनच्यांनी पाहिले की इथल्या स्त्रीला 'माणूस' मानलेच जात नाही. कुमारी माता, विधवा, बालविवाहिता, सती, परित्यक्त्या ही छप्पर कोसळलेल्या स्त्रियांची रूपे होती. आज छप्पर जन्माआधीच कोसळू लागले आहे. स्त्रीजिवाचा शोध घ्यायचा नि गर्भपात करायचा. त्यातूनही स्त्रीजीव जन्माला आला तर त्या जिवाची हरत-हेने उपेक्षा करायची. आहार, आरोग्य, शिक्षण सर्वांगांनी मुलीला दुर्लक्षायचं. ती कामाच्या वयाची झाली की तिला स्वत:च्याच घरी मजुरासारखे राबायला भाग पाडायचे. वयात आली की तिच्यावर बंधने लादायची. तिला नजरबंदीत ठेवायचे. मुलगा असेल तर तो गावाला सोडलेले बोकड नि ही बांधलेली शेळी. तिने गावच्या पुरुषी नजरेला टक्कर देत जगायचे. गर्दी, बाजार, प्रवासात पुरुषांचे कामुक धक्के खायचे. कमरेवरचे चिमटे सोसायचे. घरी, दारी, संसारी फसव्या भूलथापांची बळी व्हायचे. कधी बलात्कारिता, कधी कुमारी माता तर कधी हाताळलेली म्हणून आयुष्यभर मूक मरण अनुभवायचे. लग्न लोक सुखासाठी करतात म्हणून ऐकून करायचे. ‘दिल्या घरी तू सुखी रहा' म्हणून पाठवण केलेल्या पोरीला परतीचा मार्ग नसतो. चक्रव्यूहात एकलव्यच होता, इथल्या दुष्ट चक्रातील न परतू शकलेल्या एकलव्या अगणित ! पुरुष-सिंहाच्या दावणीला बांधलेल्या हरिण-काळीज भगिनी अनिच्छा संभोग, उठता-बसता सासरी टोमणे, मिळावित्या स्त्रीचे खर्च न करण्याचे जगणे, नोकरीच्या ठिकाणची नोकरी सांभाळण्यासाठी म्हणून केलेले न सांगता येणारे सोसलेले आघात, नकळत केलेले समझोते, कधी-कधी पोटच्या पोरांसाठी घेतलेले नमते. पुरुषांच्या घराला एकच छप्पर असते, आमची घरे, दादले, छपरे अनेक! लोकलाजेचे मिरवते कुंकू नि मंगळसूत्र तेवढे एक असते. आता कळते, मंगळसूत्राला दोन वाट्या का असतात? एक आपली अन् दुसरी जगाची. दोन्ही आतून पोकळ का असतात, ते हल्ली उमजू लागलंय. एका वाटीत मी न फोडलेला हंबरडा भरलेला असतो नि दुस-या वाटीत जगरहाटी, ज्याला ओट्यात भरलेले ओटी (पोटीचे) सुख म्हणते ते! दोन्ही वाट्या
सामाजिक विकासवेध/१६०
लाजेच्या लाखेने झाकलेल्या! तेरी भी चूप और मेरी भी!! हे असते ‘मेरा भारत महान'मधील झाशीच्या राणीचे नि माता जिजाऊचेही! जय भवानी जय दुर्गे! जगजननी! जगत रहा, कुढत रहा, पुरुष जिवंत असेपर्यंत!
मी पूर्वी महिला, बालकल्याण कार्यात संलग्न होतो तेव्हा नि आत्ताही छप्पर कोसळलेल्या माता, भगिनींचे उच्छ्वास, उसासे अनुभवत आलो आहे. कोवळ्या कळ्यांचे नि:श्वास, हिरव्या कैच्यांचे कुस्करणे नि पिकलेल्या आंब्यांच्या तुडवलेल्या उद्ध्वस्त आमराया मी इथे, तिथे, सर्वत्र पाहत शरमेने मान खाली टाकून जगतो आहे-
कुमारी मातांच्या मुली सांभाळण्यासाठी म्हणून आम्ही 'वात्सल्य बालसदन' नावांचे एक अर्भकालय, शिशुगृह चालवायचो. तिथे नको असलेल्या मुली जन्मलेल्या असायच्या. आईने मरावी म्हणूनच वाढविलेल्या पूर्वी अनेक दगावायच्या. मग आम्ही जिवाचे रान करून त्यांना जगवायचो. ज्या जगायच्या त्यांचे नवेच प्रश्न. त्या वेळी मुली दत्तक जाणे दुरापास्त. मग ‘सार्क बालिका वर्ष - १९८५'चे निमित्त करून ‘पहिली बेटी, तूप रोटी अभियान चालविले होते. मेगाफोन घेऊन गारगोटी, कोडोली, भोगाव, पेठवडगाव अशा कितीतरी बाजारांत उभारून ‘बच्चे लोक ताली बजाव'चा मदारी खेळ खेळला होता. महिला मंडळांना लक्ष्य करून अनेक सभा केल्या. मुंबई, पुण्यात गाड्यांना स्टिकर्स लावली. आज तीन दशके उलटल्यावर मी पाहतो, लोक मुलीच दत्तक मागू लागलेत. हे होऊ शकते'चा आत्मविश्वास या कामांनी दिला; पण त्याच वेळी मी महिला आधारगृह चालवित असे. एका कुमारी मातेने आपलीच मुलगी आपल्या अंगाखाली चिरडलेली पण मी अनुभवली आहे. समाजमन पारंपरिक, दूषित असले मी तो राक्षस जन्माला घालतो हे केव्हा तरी एकदा आपण समजून घेतले पाहिजे. लीना हसत का नव्हती? कारण गर्भात आईने तिच्यावर इतके अत्याचार केले होते... ते एकदा तिच्या आईच्या तोंडून ‘गुजरे वक्त की दास्तान' म्हणून ऐकलेले शब्द, शब्दप्रयोग अन् उपाय संशोधकाला केवळ लाजवणारे. या स्त्रिया अशा का वागतात तर पुरूषी समाज परंपरेच्या त्या बळी असतात. म्हणून समाज हा प्रागतिक असला पाहिजे. युरोपसारखे फसलेल्या स्त्रीलाही भारतात उजळ माथ्याने जगता, फिरता आले पाहिजे. विश्वामित्र, दुष्यन्त उजळ माथ्याने अपराधी असताना संभावित म्हणून जगतो तर मेनका, शकुंतला कुंतीने का नाही प्रतिष्ठेचे जिणे जगायचे? कुमारसंभवाची शिक्षा अपत्यांना कां ? महाभारतातील गंगा, उर्वशी, सुशोभना, हिडिंबा, सावित्री, गुणकेशी, उलुपी, इंद्राणी (शची), सत्यवती, देवयानी, माधवी, द्रौपदी.
सामाजिक विकासवेध/१६१
मला आजही वेगवेगळ्या रूपांत भेटतात तेव्हा छप्पर कोसळलेल्या स्त्रियांचा वनवास आधुनिक भारतातही कमी झाला नाही, हे प्रकर्षाने लक्षात येते नि गलबलायला होते.
छप्पर कोसळलेल्या स्त्रियांच्या प्रश्नांचा अभ्यास करून मालती बेडेकर (विभावरी शिरूरकर) यांनी सन १९६० च्या दरम्यान एक प्रबंध प्रकाशित केला आहे. तो केंद्र व तत्कालीन सरकारच्या पुढाकाराने नेमलेल्या समितीचा अभ्यास म्हणून त्याचे वास्तविक महत्त्व आहे. अभ्यासकाळातील स्त्रिया (सन १९४१ ते १९६१), त्यांचे जीवन यावर आधारित काही सत्यकथाही मालतीबाईंनी 'केसरी' दिवाळी अंकात सन १९५९ ला प्रकाशित केल्या होत्या. 'घराला मुकलेल्या स्त्रिया' नावाचं ते पुस्तक म्हणजे छप्पर कोसळलेल्या स्त्रियांची शोकगाथाच आहे. सुमारे तीन हजार स्त्रियांचा अभ्यास करून लिहिलेल्या या ग्रंथातून लक्षात येते की छप्पर कोसळण्याची कारणे, परी तरी किती ? नव-याकडून छळ, छळाने घरातून पळालेल्या व नव्या संकटात सापडलेल्या, अनैतिक (?) संकटग्रस्त, (विवाहपूर्व, विवाहोत्तर शरीरसंबंधाने बाधित), कामाच्या ठिकाणी बळी पडलेल्या, निराधारपणामुळे संकटग्रस्त झालेल्या, नव-याने टाकलेल्या, घटस्फोटित, स्वैराचारामुळे फसलेल्या, व्यभिचारी, नवरा परगावी कामाला म्हणून असुरक्षेच्या बळी, नव-याने दुसरे लग्न केल्याने निराधार, जबदस्तीने अपहरण केलेल्या (धाकदपटशा, धमकी, ब्लॅकमेलिंग इ.), वेश्या व्यवसायात विकल्या, फसवल्या गेल्याने गुंतलेल्या इ. मला सांगा, याला कारण असलेल्या पुरुष मानसिकता, पुरुषी समाज परंपरांचा कठोर पंचनामा (संशोधन, सर्वेक्षण, अभ्यास नव्हे!), जाब कधी कुणी विचारून तडीस नेला आहे का? 'निर्भया'चा एक बलात्कार उघडा झाला तर इतका हाहाकार! हे सर्व रामायण... त्यामागच्या रावणांचे दशमुखी दहन करणारी सामाजिक रामलीला आपण करणार आहोत की नाही? वरील कारणांनी स्त्रियांचे परागंदा होणे आजही पदोपदी दिसतेच ना?
असाच केवळ कुमारी मातांच्या प्रश्नांचा अभ्यास सुलोचना देशमुख यांनी सन १९८३ मध्ये केला होता. सन १९९७ मध्ये तो पीएच.डी.चा प्रबंध (तत्कालीन मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद) देशमुख आणि कंपनी या तत्कालीन प्रख्यात प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. त्याचे शीर्षकच आहे ‘कुमारी माता'. सुलोचनाबाई म्हणजे या प्रकाशनाचे मालक रा. ज. देशमुखांच्या सुविद्य पत्नी. त्यांनी कुमारी मातांना फसविणा-या पुरुषांची दिलेली प्रतवारी वाचली तरी आजही छप्पर कोसळविणारे हेच असतात
सामाजिक विकासवेध/१६२
असे लक्षात येते. मेहुणा, पाहुणा, काका, मामा, मावसभाऊ, आत्येभाऊ, चुलतभाऊ, मालक (नोकरी / व्यवसायाचा), शेजारी, नोकर, डॉक्टर, कर्जदार, शिक्षक, इ. मी असे म्हणत नाही की स्त्री पूर्ण निर्दोष; पण स्त्रीस पराधीन करणारी व्यवस्थाच याला जबाबदार नाही का? स्थिती बदलते आहे. छप्पर कोसळलेले पुरुषही मी जाणतो. स्त्रीअत्याचार पीडित पुरुष संघटनाही उदयाला आली आहे, हा भाग वेगळा; पण तो काही मुख्य प्रवाह नाही.
आज आपण ज्या विज्ञान वरदानित माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत, त्या एकविसाव्या शतकातील स्त्री शिक्षित, मिळवती, नेतृत्वधारी, स्वयंसिद्धा झाली हे खरे आहे. ती स्वागतार्ह व अनुकरणीय गोष्ट खरी; पण म्हणून तिचा अन्याय, अत्याचार, शोषणाचा पाठलाग नि वनवास कमी झाला नाही. नवी शिक्षित स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहे. ती संगणक, मोबाईल, इंटरनेट वापरते आहे. सामाजिक संपर्क व संवादाची फेसबुक, व्हॉटस्अॅप, एसएमएस, विटर, ब्लॉग, ई-मेल, चॅटिंग, व्हाईस मेल, व्हिडिओ कॉलिंग सारी साधने पुरुषांच्या बरोबरीने व तोडीस तोड तिच्या हाती आली आहेत. त्यामुळे समानता, सहवास, संपर्क इ. अवकाशातून स्वतंत्र होते आहे. गत शतकातील श्रेष्ठ अमृता प्रीतम नावाच्या पंजाबी कवयित्रीने स्त्रीसाठी दिवाणखाना, शयनगृह नि स्वयंपाकगृह सोडून चौथी खोली' (कमरा) असली पाहिजे असे म्हटले होते. तो तिला संगणक, मोबाईलने दिला आहे. पण इथेपण छप्पर कोसळण्यासारखे आकाश फाटतेच आहे. 'युनो'नी गत दोन वर्षे ‘मुली व महिलांवरील आभासी (Cyber/Vertual) जगाचे अत्याचार (Violence Against Women and Girls (VAWG)) प्रकाशित केला आहे. (२०१५, २०१६) भारतातील स्त्रियांवरील संगणकीय संपर्कातून अत्याचारांवर संशोधन झाले आहे. पुरुष या माध्यमातूनही स्त्रीचं जीवन वेगवेगळ्या प्रकारे उद्ध्वस्त करतो आहे. तरुण मुलींवर या अत्याचारांचे दुष्परिणाम अधिक गंभीर आहेत. वारंवार मिस कॉल्स देऊन हैराण करणे, अश्लील संदेश पाठविणे, बीभत्स (Porn) क्लिप्स पाठविणे, विश्वासाने काढलेले फोटो, संदेश, संवाद (चॅट्स) आदी जगजाहीर करून बदनाम करणे, खोट्यानाट्या कंड्या पिकवून जबरदस्ती करणे (ब्लॅकमेलिंग), भावनिक, मानसिक छळ करण्याचे प्रकार सर्रास आढळतात. नोकरी करणाच्या महिला व मुलींच्या संगणकीय छळाला तर सीमाच नाही. कॉल सेंटर्स, बँक्स, कार्यालये, व्यवसाय इ. ठिकाणी व्यक्तिगत माहितीचे अपहरण (हॅकिंग),
सामाजिक विकासवेध/१६३
कामाचे निमित्त करून लज्जास्पद संवाद करणे, वरिष्ठांकडून प्रलोभनांचा पाऊस (पगारवाढ, पदोन्नती, पदनियुक्ती, बदली), कामावर सतत अनावश्यक लक्ष ठेवून चुका काढून छळत रहाणे (शरणागती साठी), हिडिस नकला करणारी चित्रे इ पाठवणे, पासवर्ड चोरून खासगी अकाऊंट्स (फेसबुक, व्हॉट्सअॅप इ.) मध्ये डोकावणे - हे सर्व प्रकार तिला रोज अंशतः मारत
आहेत. (Slow Dieing) काही महिला व मुली तर या विश्वापासून चार हात दूर राहणेच पसंत करतात. त्यांची ही खबरदारीची कृती त्यांना मागास राखते.
स्त्रियांवर रोज आणि हरघडी कोसळणारं छत, आभाळ फाटलेली जमीन व रोज तुकड्या-तुकड्यांनी मरणे स्त्रीचे जीवन जे खरे तर अथांग सरोवर व्हायचे, ते टिकलीएवढे तळे बनून राहते. हे जेव्हा मी पाहतो तेव्हा का कुणास ठाऊक, मी बालवाडीत असताना आमच्या बाई शिकवित असलेल्या गोष्टी, बडबडगीते मला आठवत राहतात. त्यातील एका गोष्टीत राजाला होते दोन गाढवाचे कान. ते प्रजेला दिसू नयेत म्हणून तो आपले केस लांब ठेवायचा; पण ही गोष्ट त्याचे केस कापणाच्या नाभिकाला मात्र माहीत होती. तो नाभिक सतत अस्वस्थ असायचा. यातून सुटका करायची, हलके व्हायचे म्हणून तो एक दिवस नदीकिनारी जातो. किना-यावरच्या वाळूत खड्डा खणतो. त्यात तोंड घालून आकांताने ओरडतो, ‘राजाला गाढवाचे दोन कान आहेत. झालं. शेजारून जाणारा एक नागरिक ते ऐकतो. राज्यभर बोभाटा होतो. नाभिकाचा शिरच्छेद होतो. स्त्री नेमकी याच शिरच्छेदाच्या जिवंत मरणाच्या भीतीने छातीवर दगड ठेवून कोसळणारे छप्पर पेलत राहते. कधी जखमी हरीण तर कधी शिकार झालेलं ‘कांचनमृग', कधी ‘क्रौंचवध' तर कधी ‘दोन मने' घेऊन कुढत जगणे. त्या बाई एक बडबडगीतही शिकवायच्या. गाण्यात होता भित्रा ससा. त्याला त्या लाल, लुकलुकत्या डोळ्यांतून दिसणारे लाल लाल आकाश कल्पनेनेच कोसळते असे वाटायचे. तो सारखा जिवाच्या आकांताने ‘आकाश पडलं, पळा ऽ ऽ पळा' म्हणत पळत राहायचा नि कस्तुरी मृगा'सारखी त्याची गत व्हायची. जगातील स्त्री नव्या कस्तुरीगंधाच्या शोधात तळहातावर शिर घेऊन लढू पाहते आहे. तिला बळ हवे आहे, ‘माणूस' म्हणून जगता येईल असे. 'Women are also Human' हे पुरुषसत्ताक समाजाने प्रौढ, प्रगल्भपणे समजून घेऊन आपला वर्तन-व्यवहार अधिक स्त्रीदाक्षिण्याचा करायला हवा. 'मर्द को दर्द नहीं होता' असा स्त्रीचा होत जाणारा समज दूर करण्याची जबाबदारी आपलीच आहे. स्त्रीसंरक्षक कायद्यांपेक्षा स्त्रीसंरक्षक पुरुषी
सामाजिक विकासवेध/१६४
आचारधर्म महत्त्वाचा! स्त्रीबद्दल, विशेषतः अविवाहित तरुणी, स्त्रीबाबत म्हटले जाते, 'Behind every women without child is a story' यात मोठा आशय दडलेला आहे. तो समजून घेऊन आपले पुरुषी काया, वाचा, मने वर्तन जबाबदारीचेच हवे. काम (Sex) 'रोग' आहे की राग (Love) हा फरक ज्या दिवशी पुरुषांच्या मनी, मानसी भिनेल तो समस्त स्त्रीजातीचा ‘स्वातंत्र्यदिन' असेल. तिचे छत, छप्पर, आभाळ, आकाश, अवकाश, आभास तिला बहाल करून तो आपण रोज, हरघडी साजरा करूया.
सामाजिक विकासवेध/१६५
ग्रामीण, संघटित वयोश्रेष्ठांच्या सामाजिक समस्या
वर्तमान लोकसंख्या घड्याळानुसार आजची भारताची लोकसंख्या १३४ कोटी आहे. सन २०१६ च्या आकडेवारीनुसार वयोश्रेष्ठांची संख्या सुमारे १२ कोटी आहे. एकूण लोकसंख्येच्या ९ टक्के लोक वयोश्रेष्ठ आहेत. ग्रामीण व शहरी लोकसंख्येचा तुलनात्मक विचार करता शहराच्या तुलनेत ग्रामीण वयोश्रेष्ठ अधिक आहेत. सर्वसाधारणपणे शहरी लोकसंख्येच्या तुलनेने दुप्पट लोकसंख्या ग्रामीण आहे. तीच गोष्ट स्त्री-पुरुष विभाजनाची. निम्मे-निम्मे स्त्री-पुरुष वृद्ध आढळतात. ग्रामीण भागात सर्वसाधारणपणे आठ कोटी वृद्ध आहेत.
भारतीय समाजअभ्यासानुसार भारताच्या ग्रामीण वयोश्रेष्ठांच्या जीवनमानात होणारे बदल गतिमान आहेत. “कसेल त्याची जमीन कायद्यामुळे दरडोई जमीन कमी-कमी होत कधीकाळी एकर हेक्टर शेती धारण करणारा शेतकरी गुंठाधारी बनला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे शेतीवरील संकट नित्य बनत आहे. कधी दुष्काळ, कधी गारपीट, कधी पूर तर कधी अतिवृष्टी यामुळे शेती बेभखोशाची झाली आहे. दरडोई उत्पन्न घटल्याने पूर्वी शेतात राबणारा तरुण शहराकडे धाव घेतो आहे. शेतीला पूरक जोड दिल्याशिवाय जगणे अशक्य झाले आहे. त्यामुळे खेड्यात राहतात ते अशिक्षित प्रौढ व वृद्ध. खेड्यातील कुटुंबरचना, आर्थिक परंपरा लक्षात घेता कर्ता तरुण कुटुंबाचा आर्थिक नियंत्रक होतो. परिणामी ग्रामीण भागातील वयोश्रेष्ठ हे कष्टाला बांधलेले असतात. शेती कसणे, मुले-बाळे सांभाळणे, घर-प्रपंच हाकणे हे त्यांचे काम. त्यांच्या हातात पैसा नसतो. त्यांना आपल्या हक्कांची जाणीव नसल्याने व आर्थिक उलाढालीसाठी नवशिक्षित तरुण पिढीवर वाढते अवलंबन ग्रामीण वयोश्रेष्ठांचे जगणे कठीण बनवत आहे. नवतंत्रज्ञानाने खेड्यातील शिक्षित वयोश्रेष्ठ संगणक निरक्षर राहिल्याने ‘कॅशलेस' धोरणात ते खरे निर्धन झाले आहेत. जनधन योजनेत शून्य शिल्लक खात्यात किमान
सामाजिक विकासवेध/१६६
रक्कम भरण्याची क्षमता नसलेले वयोश्रेष्ठ बहुसंख्य आहेत. शासनाच्या
आर्थिक रोख योजनांचे हक्कदार तरुण पिढी तर वस्तुरूप सवलतीचे धनी वयोश्रेष्ठ अशी सरळ-सरळ आणि सरसकट विभागणी ग्रामीण भागात सर्रास आढळते. अन्नपूर्णा योजनेतील धान्य, रोजगार हमी योजनेची हजेरी, सबसिडीचे बियाणे, खते, गावातील ग्रामीण आरोग्य योजनेचे लाभार्थी असे त्यांच्या सोई-सवलतींचे स्वरूप रोज त्यांना इच्छेविरुद्ध जगण्याच्या आयुष्याकडे गतीने ढकलत आहे. प्रवास सवलत, आरोग्य विमा, निवृत्ती वेतनयांच्या लाभात ग्रामीण व नागरी अंतर डोंगर-दरीचे आहे. श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनासदृश्य आर्थिक लाभ अत्यंत तुटपुंजा असून त्यात ग्रामीण वयोश्रेष्ठांचं भागत नाही, अशी वस्तुस्थिती आहे.
औद्योगीकरण, नागरीकरण, शिक्षण इत्यादी क्षेत्रांत आधुनिकतेचा प्रचार, प्रसार झाल्याने व तंत्रज्ञान खेडोपाडी, वाडीवस्तीपर्यंत पोहोचल्याने ग्रामीण जीवनशैली दिवसेंदिवस शहराप्रमाणे होते आहे. मोबाईल, केबल, टी.व्ही.सारख्या माहिती व तंत्रज्ञान साधनांच्या बरोबरीने दुचाकींचा वाढता वापर, दळणवळण साधनांची रेलचेल यांमुळे ग्रामीण जीवनाच्या शहरीकरणास कमालीची गती प्राप्त झाली आहे. परिणामी प्रत्येक बाबतीत शहरी जीवनाचे अनुकरण व स्पर्धा यांमधून एक नवा प्रश्न ग्रामीण भारतात निर्माण झाला आहे. तो म्हणजे मानवी संबंधांना आलेले यांत्रिक व औपचारिक स्वरूप. पूर्वी खेडे व शहरी जीवनातील व्यवच्छेदकतेचा आधारच मुळी आपलेपणा, अकृत्रिमता, समर्पण, निरपेक्षता इ. मूल्ये होती. जागतिकीकरणाच्या वाढत्या प्रभावामुळे त्या सर्वांना तिलांजली मिळाली. मी व माझे' ही व्यक्तिगतता, आत्मकेंद्रितता. तिचे लोण आता खेड्यांतही साथीच्या रोगाप्रमाणे पसरले आहे. त्यामधून ग्रामीण भागातील वयोश्रेष्ठ आपल्याच घरात अडगळ बनून राहत आहेत. त्यांना खाणे, पिणे, कपडा/लत्ता, औषधे, घरखर्च सर्वांवर ते संपत्तीचे हक्कदार असून अनाथ, निराधाराचे जिणे जगत आहेत. त्याचे एकमेव कारण वयोवर्धन व निष्क्रियता हेच होय. ज्या काळात आधाराची गरज त्याच काळात बरोबर ते निराधाराचे जीवन कंठण्यास बाध्य होत आहेत. 'जिवंत मरण' असं त्यांच्या जगण्याचं वर्णन सार्थ होय. त्यांना सकस, चौरस आहार लाभत नाही. काही वयोश्रेष्ठ तर पथ्य, पाणी न झाल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अर्धपोटीच राहतात, असे दिसून येते. त्यांना वेळच्या वेळी योग्य औषधोपचारही अभावाने व अपवादाने मिळतो. मनोरंजनाची साधने त्यांना उपलब्ध होत नाहीत. त्यांच्या इच्छा-आकांक्षांनुसार प्रवास, भेटी इत्यादी भावनिक भूक भागविली जातेच असे नाही. तीर्थाटन,
सामाजिक विकासवेध/१६७
विरंगुळा, जीवनबदल, जिवाभावांच्या नातलगांना भेटता येणे दुरापास्त झाले आहे.
घरात वयोश्रेष्ठांची काळजी घेणारे मनुष्यबळ पूर्वी एकत्र कुटुंबात उपलब्ध असायचे. विभक्त कुटुंबांचा प्रसार, शहराकडे नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने स्थलांतर यांमुळे भारतातील महानगरांतील वयोश्रेष्ठ व खेड्यांतील वयोश्रेष्ठ यांच्या एकटेपणात, निराधारत्वात समानता येणे हे या देशाच्या समग्रतः नागरीकरणाचे लक्षण होऊ पाहत आहे. खेड्यातील वयोश्रेष्ठांकडे पाहण्याचा कमवत्या व कत्र्या पिढीचा दृष्टिकोन उपेक्षेचा व ओझ्याचा बनतो आहे. त्यामुळे ग्रामीण वयोश्रेष्ठांचे अबोल होणे, एकलकोंडे होणे, मनोरुग्ण होणे वाढते आहे. अपेक्षित सोयी, सुविधा, साधनांच्या अभावी येणारे नैराश्य त्यांचे आयुष्यमान घटवत आहे. वाढती असुरक्षिततेची भावना व उपेक्षेची वाढती जाणीव यातून जीवन वैयर्थ वाढते आहे. जमीनदार असून मजुराचे जीवन जगावे लागण्याच्या जाणिवेने सतत आजारी असणे, कुरकुर, कुरबुरीचे जीवन जगणे वयोश्रेष्ठांना अनिवार्य झाले तरी आता मात्र ते सहनशक्तीच्या पलीकडे गेले आहे. यातून ग्रामीण भागातील वयोश्रेष्ठांना आपण दुय्यम दर्जाचे असल्याची होणारी जाणीव अधिक क्लेशकारी बनली आहे. त्यांच्या अशिक्षित व अल्पशिक्षित असण्यानेही ग्रामीण वयोश्रेष्ठ वर्तमान आधुनिकतेशी जुळवून घेण्यात स्वत:ला असमर्थ अनुभवत आहेत. त्यातून एक प्रकारचे कालबाह्य जीवन ते जगत असल्याची त्यांच्या मनातील अव्यक्त जाणीव त्यांना शल्यकारी व्यक्तीचे जिणे बहाल करीत आहे. विधवा, विधुर स्त्री-पुरुषांचे जगणे अन्यापेक्षा अधिक उपेक्षेचे, वंचित झाले आहे.
सांधेदुखी, पोटाचे विकार, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या वृद्धत्व विकारांवर नियमित उपचार, तपासणी, औषधोपचार, मसाज, आदी सोई प्राथमिक आरोग्य केंद्रात असल्या तरी त्यांतील अनियमितता, तुटवडा, मनुष्यबळ अभाव इ.मुळे सुविधा असून लाभ नसतो, अशी स्थिती आहे. पाल्यांची टाळाटाळ, मेहरबानी हीच उपचार संधी अशी ग्रामीण स्थिती आहे. रुग्णवाहिका
आहेत; पण त्यासाठी अत्यवस्थ होण्याची पूर्वअट त्यांना शहरी आधुनिक उपचार, सुविधांपासून वंचित ठेवत आहे. शहरी महागडे उपचार ग्रामीण वयोश्रेष्ठांच्या आर्थिक आवाक्याबाहेर गेले आहेत. उपचार खर्चाचे आकडेच त्यांचे डोळे पांढरे करण्यास पुरेसे आहेत. काळजी घेण्यासंदर्भात पती-पत्नी एकमेकांवर अवलंबून असण्याचे प्रमाण ४२ टक्के आहे. आपल्या मुला/ सुनेवर अवलंबून असणारे वयोश्रेष्ठ पालक ३५ टक्के आहेत. ५५ टक्के
सामाजिक विकासवेध/१६८
आहे. वैफल्यातून उपचारांकडे दुर्लक्षाचे वाढते प्रमाण (११ टक्के) विचार करायला भाग पाडते.
ग्रामीण भागातील वयोश्रेष्ठांच्या विविध उपेक्षा व वंचिततेचे मूळ त्यांच्या पाल्यांच्या स्थलांतरात आहे. वाढत्या स्थलांतरामुळे वयोश्रेष्ठांचा दुहेरी तोटा होतो. एकतर ग्रामीण पारंपरिक उत्पादनात सतत घट होते. त्यातून शहरी पाल्यावरील अवलंबन दिवसेंदिवस वाढते आहे. ८७ टक्के ग्रामीण परिवारातील मुले-मुली आज स्थलांतरित होत असल्याने तितक्या प्रमाणात ग्रामीण भाग, शेती, मनुष्यबळ इ. कमी होते आहे. त्यातून ग्रामीण वयोश्रेष्ठांचे निष्कांचन होणे भूमितीच्या पटीने द्विगुणित होते आहे. यातून नातवांची पिढी अकाली प्रौढत्व धारण करण्याचा शाप घेऊन जन्माला येत आहे. स्थलांतरण ग्रामीण भागासाठी शाप की वरदान अद्याप ठरले नसले तरी सकृतदर्शनी नागरी लाभाकडेच त्याचा तराजू सध्या झुकलेला आढळतो. ‘बुडत्याचा पाय खोलात' असे सध्याच्या ग्रामीण समाजजीवनाचे चित्र
आहे. स्थलांतरित कुटुंबे - ज्यांचे हातावरचे पोट आहे - अशांची मुले व पालक यांचे जिणे ‘भिक नको पण कुत्रा आवर' अशी आहे. अशी ६३ टक्के कुटुंबे भारतभर पोटासाठी शहराकडे कूच करताना दिसून आली
आहेत. यातूनही ग्रामीण वयोश्रेष्ठांचे विस्थापन वाढत आहे.
उपाय
१. वयोश्रेष्ठांसंबंधीचे विद्यमान धोरण, योजना, सोयी, सवलती या
नोकरदारकेंद्री व नागरी जीवनकेंद्रित आहेत. त्या संघटित क्षेत्रातील
शहरी उद्योग, व्यवसाय, नोकरीकेंद्रित आहेत. त्यात ग्रामीण
वयोश्रेष्ठांचा अल्पांशानेही विचार होत नाही. वयोश्रेष्ठाच्या संघटना,
संघ यांचे उपक्रम, कार्यक्रम, मागण्या या नागरी जीवनकेंद्रितच
राहिल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर
सामाजिक विकासवेध/१६९
२. महिला व बालकल्याण, आरोग्य, सामाजिक न्याय, मानव संसाधन, ग्रामीण विकास, कुटुंब कल्याण इत्यादी शासकीय मंत्रालये यांच्यात ग्रामीण वयोश्रेष्ठात हक्कजाणीव, योजना प्रचार, सुविधा लाभ या संदर्भात समन्वित प्रयत्न करणे आवश्यकच नसून आता ते अनिवार्य करणे काळाची गरज बनली आहे. या मंत्रालयांच्या योजना व
आर्थिक तरतुदींचा सरळ व प्रत्यक्ष लाभ ग्रामीण वयोश्रेष्ठांना मिळावा म्हणून लक्ष्यकेंद्रित क्रियान्वयन कार्यक्रम हाती घेण्यात यावा.
३. वयोश्रेष्ठांसंबंधीच्या हक्कांबद्दल वयोश्रेष्ठांसाठी हक्कजागृती अभियान राबविणे व समांतरपणे तरुण व प्रौढांमध्ये वयोश्रेष्ठांसंबंधी कर्तव्यपूर्तीचे आदरभान जागृत करणे आवश्यक आहे. असे उभयपक्षी व परस्पर समन्वयी प्रयत्न केल्यास ग्रामीण भागातील वयोश्रेष्ठांचे जगणे
सुलभ, सुसह्य व सन्मानाचे होऊ शकेल.
४. वयोश्रेष्ठांच्या संरक्षण, प्रतिबंधन, उन्नयन, सहभागित्व अशा भिन्न
प्रकारच्या योजना, प्रयत्नांतून वयोश्रेष्ठांसंबंधी संवेदन अभियान राबवले गेले तर त्यांच्याबद्दल आज असलेला उपेक्षाभाव व वंचना कमी करणे, त्यांचा -हास करणे शक्य आहे.
५. जपानच्या धर्तीवर नियमित तपासणी, निदान, उपचार यंत्रणा निर्माण करणे. वयोश्रेष्ठांसाठी आहार योजना सुरू करणे. ग्रामीण भागात वयोश्रेष्ठांसाठी उपचार केंद्र, विरंगुळा केंद्र, आहार केंद्र, जेनेरिक औषध दुकाने सुरू करणे. आहार, उपचार, विरंगुळा, पर्यटन इत्यादींसाठी ग्रामीण वयोश्रेष्ठांना मासिक निर्वाह वेतन सुरू करणे आवश्यक आहे. आहार, उपचाराच्या मोफत सोईने ग्रामीण वयोश्रेष्ठांचे जीवनमान उंचावणे व आयुष्यमान वाढविणे गरजेचे आहे.
६. पंचायत राज्य योजनेंतर्गत वयोश्रेष्ठ सुरक्षा योजना सुरू करून त्यांच्या गरजांवर केंद्रित विविध कल्याणकारी व विकास योजनांची पुनर्रचना करण्यात येऊन त्यांची वयोश्रेष्ठ हक्ककेंद्री कार्यवाही करणे.
७. इंदिरा आवास योजना, इंधन पुरवठा, अन्नपूर्णा योजना इ. सर्व
प्रकारच्या लाभ योजनेत वयोश्रेष्ठांना प्राधान्य देणे. ८. वयोश्रेष्ठांसाठी कार्य करणाच्या स्वयंसेवी संस्थांना ग्रामीण भागात कार्य करण्यास प्रोत्साहन देऊन आर्थिक अनुदान देणे.
९. प्राथमिक आरोग्य केंद्रे, स्वस्त धान्य दुकाने, बँक, विमा, दळणवळण, पर्यटन सुविधा वयोश्रेष्ठानुवर्ती करणे.
१०. वयोश्रेष्ठ निवृत्तिवेतन ग्रामीण भागातील प्रत्येकास लाभार्थी बनविणारे करणे.
अशा गोष्टी केंद्र व राज्य सरकारांनी समन्वयाने व प्राधान्याने सामाजिक सुरक्षा व सामाजिक न्याय अशा दोन्ही पद्धतींनी आखून क्रियान्वयन केले तरच वयोश्रेष्ठांचे जीवन सुसह्य व समृद्ध होईल. त्यासाठी प्रसंगी केंद्र व राज्यस्तरावर ग्रामीण वयोश्रेष्ठ संरक्षण व विकास मंत्रालय स्थापन करता आले तर ते जागतिक स्तरावर अनुकरणीय पाऊल ठरेल.
◼◼
वेगवेगळ्या कारणांनी आणि वेगवेगळ्या हेतूनी मी जगातील अनेक देश पाहिले. पैकी युरोप पाहिला तो १९९० मध्ये; म्हणजे त्यालाही पंचवीस वर्षे होऊन गेली. त्या वेळी मी फ्रान्स, इटली, इंग्लंड, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, बेल्जियम, जर्मनी, लक्झेम्बर्ग, व्हॅटिकन या देशांना भेटी दिल्या. मी भेटी देण्याच्या काळात पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनी असे दोन स्वतंत्र देश होते. बर्लिनची भिंत पाडण्यात आली होती व जर्मन एकमेकांना पंचवीस वर्षांच्या ताटातुटीनंतर भेटत होते. पूर्व जर्मनी, जो रशियाच्या अधिपत्याखाली होता, पश्चिम जर्मनीच्या तुलनेने गरीब होता. पूर्व बर्लिनचे नागरिक पश्चिम बर्लिनमध्ये येऊन चॉकलेट्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू मोठ्या प्रमाणावर खरेदी करीत होते. त्यांची दुकाने रस्त्यांवर थाटलेली होती. बर्लिनची भिंत पूर्ण पडलेली नव्हती. माझ्यासारखे पर्यटक छन्नी, हातोडा भाड्याने घेऊन (तिथे त्यावेळी ते मिळत असे) भिंतीचे तुकडे करीत आणि आठवण म्हणून ते घेऊन येत असत. याच काळात मी फ्रान्समध्ये काही दिवस होतो. पॅरिसमध्ये एक संस्था आहे. ‘ला डिफेन्स' (The Defence) ती पॅरिसच्या नगर नियोजनाचे आराखडे तयार करीत होती. त्या संस्थेच्या आवारातही बर्लिनची भिंत पाडल्यानंतरचा एक मोठा अवशेष आणून प्रांगणात ऐतिहासिक आठवण व वारसा म्हणून ठेवण्यात आला होता.
लक्झेम्बर्ग आणि व्हॅटिकन ही तशी दोन शहरे; पण त्यांना राष्ट्राचा दर्जा होता. सन १९९६ मध्ये व नंतर दोन-तीनदा मला सिंगापूरला जाण्याची संधी लाभली. तेही शहर पण राष्ट्र असलेले. या तीनही नगर राष्ट्रांमध्ये माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी की, ही राष्ट्रे शिस्तबद्ध आहेत. कायद्याचे राज्य पदोपदी लक्षात येते. म्हणजे पोलीस, सैनिक दिसतात. ते दक्ष असतात. त्यांच्या असण्याची नागरिक दखल घेतात. आपल्याकडे पोलीस हा कायद्याचा रक्षक, पालक आहे, असे समाजमनावर बिंबलेले दिसत नाही. कायद्याचे भय नि पोलिसांचा आदर आपल्या समाजात दिसत नाही. तो तिथे आढळतो. काय मजाल कोणी वेगमर्यादा ओलांडेल, झेब्रा क्रॉसमध्ये गाडी उभी करील, दुचाकीवर तिघे बसतील. आपणाकडे वाहतूक पोलिसांनी अडवले की शेंबडे पोर पण आधी इन्स्पेक्टर, डी. एस. पी., नगरसेवक, आमदार कुणाला तरी फोन लावून आपण केलेल्या कायदेभंगाच्या दंड व शिक्षेतून सूट, सवलत, माफीचा सर्रास प्रयत्न करते. ज्यांना तो फोन करतो, तो महाभाग पोलिसांचे न ऐकता त्यालाच सुनावत राहतो. कसे येणार आपल्या देशात कायद्याचे राज्य ?
साधी गाडी पार्क करायची म्हटली तरी तिथले नागरिक किती विचार करतात, हे मी अनुभवले आहे. पार्किंगची परवानगी नसलेल्या जागी गाडी पार्क करणे म्हणजे आपण कायदा मोडतो आहोत, या जाणिवेने तिथले नागरिक किती अस्वस्थ, बेचैन असतात, हे मी अनेकदा अनुभवले आहे. नागरी जीवनात शिस्त, स्वच्छता, नियमपालन यांना असाधारण महत्त्व असते. असे पालन करणारा समाज प्रगल्भ मानला जातो. आपण उठताबसता जीवनमूल्यांबाबत बोलतो. आदर्शाच्या गप्पा मारतो; पण प्रत्यक्ष कृती करायचा प्रसंग येतो, तेव्हा मात्र आपण परिस्थितिशरण व्यवहार करतो. स्वच्छता हा आपल्या घरोघरी दिला जाणारा संस्कार, घर, अंगण स्वच्छ असते. मग रस्ते घाण, गटारी भरलेल्या, उकिरडे भरून वाहणारे, सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य असे का व्हावे ? तर आपण रोजच्या जीवनात सार्वजनिक जबाबदारी पाळणे गंभीरपणे घेत नाही, हे त्याचे खरे कारण होय. महात्मा गांधी, सेनापती बापट, साने गुरुजी, गाडगेबाबा आणि अगदी अलीकडे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वजण ‘स्वच्छता अभियान’, ‘सफाई। कार्यक्रम’, ‘श्रमशिबिर' अशा कितीतरी माध्यमांतून स्वच्छता संस्कार रुजवित आलेत. तरी त्याचा परिणाम आपल्यावर होत नाही. आपण सत्तरएक गांधीजयंती सफाईवर समर्पित केल्यापण देशातील दुर्गंधी, उकिरडे, कचरा कोंडाळे कमी होत नाहीत. सार्वजनिक मुताच्या, प्रसाधने साफ असत नाहीत. बस स्टैंड, रेल्वे स्थानक, सार्वजनिक कार्यालये, जिन्यांचे कोपरे म्हणजे किळस केंद्रे. रस्ते अस्वच्छ नि खड्यांनी भरलेले. असे का व्हावे आपले ? मी विचार करतो तेव्हा लक्षात येते की स्वच्छतेची आपली कल्पना म्हणजे केलेली घाण दूर करणे. युरोपमध्ये असलेली स्वच्छतेची मूलभूत संकल्पना आपण भारतीयांनी एकदा समजून घ्यायला हवी.
फ्रान्समध्ये मी मेझ (Metz) गावी आठवडाभर होतो. तिथल्या निवासकाळात मी तेथील अनाथालये, विद्यापीठ, वस्तुसंग्रहालय घरे पाहात फिरत होतो. त्या छोट्या भटकंतीतून मला जे लोकशिक्षण लाभले, ते आपण सर्वांनी वाटून घेतले पाहिजे. मी तिथल्या प्राथमिक शाळेत शाळा सुरू होण्याच्या वेळेस अचानक पोहोचलो होतो. सोबत मेझनिवासी माझी यजमान होती. तिथे मला शाळा पाहायचीय म्हणून मुख्याध्यापकांना समजावले. त्यांनी अनिच्छेनेच परवानगी दिली. त्यांना भीती की आपल्या देशाबद्दल चुकीचा संदेश जगभर पसरायला नको. शाळा पाहत मी एका वर्गात गेलो. त्या वर्गशिक्षिका वर्ग तयार करीत होत्या. ते पाहून मला आश्चर्य वाटले. वर्ग सुरू होण्यापूर्वी अर्धा तास शिक्षक तो तयार करण्यास वेळ देतात. त्यांच्या तयारीकडे मी बारकाईने पाहत होतो. लक्षात आले की त्या इतक्या सुंदर वर्गात सर्वत्र केर, कचरा, कपटे, केसांचे गुंते सर्वत्र पसरवित आहेत. तो कचरापण त्यांनी विचारपूर्वक कष्टाने गोळा केलेला होता. न राहून मी त्या बाईंना विचारले की तुम्ही काय करता आहात ? तर म्हणाल्या की शिकवायची तयारी करते आहे, 'I am preparing my class' जिज्ञासेने मी विचारले की काय शिकविणार आहात ? तर उत्तरली की 'Cleanliness'. स्वच्छता शिकवायला त्या वर्ग घाण करीत होत्या. मला उगीच भारतातील शाळा आठवत होत्या. मी मनातल्या मनात त्यांना सांगत होतो की आमच्याकडे एक तर वर्गाची वा शिकवायची तयारी करावी लागत नाही. एकदा इन्स्पेक्शन किंवा गॅदरिंग, स्वच्छता स्पर्धेला वर्ग सजविला की तो परत काही असा बाका प्रसंग येईपर्यंत आम्ही त्याला हात लावत नाही. दुसरे असे की आमचे शिक्षक शिकवण्यात इतके तरबेज असतात, तयारीचे असतात की त्यांना एकदा डी. एड, बी. एड झाले की परत कशाचीच तयारी करावी लागत नाही.
एव्हाना मुले, मुली एक-एक करीत, जमत वर्ग भरलेला. बाईंनी सर्वांना हातात हात धरून फेर धरायला लावला. त्याही त्या फेरात उभ्या होत्या नि आम्हालाही त्यांना फेरात सामावून घेतले. मग त्यांनी सर्वांच्या हातावर एक एक चॉकलेट ठेवलं. मग खायला सांगितले. सर्वांचे खाऊन झाल्यावर विचारले. चॉकलेट खाऊन काय उरले. सर्वांनी उत्तर दिले रॅपर्स, कागद, वेष्टन इ. एव्हाना काहींनी ते इकडेतिकडे टाकले होते. त्यात आम्ही आघाडीवर होतो. काहींच्या हातात ते अजून होते. बाईंनी विचारले, “याचं काय करणार तुम्ही?' कुणी काय, कुणी काय सांगितले आम्हाला काही समजलं नाही. मग त्यांनी मुलांना समजावलं की 'Raper is the west, dust कुठे टाकायचं? तर डस्टबिन, कचराकुंडीत वर्गात एचरा पेटी, डबा होता. तो आपल्या आख्ख्या शाळेत शोधून मिळायचा नाही. खरी गंमत पुढेच आहे. त्यांनी कचरा कसा तयार होतो, कुठे कुठे होतो, त्याचे प्रकार (ओला, सुका, पुनर्वापर करता येणारा, सजावटीस उपयोगी इ.) पुढे मग त्यांनी स्वच्छतेची जी व्याख्या सांगितली त्या व्याख्येत विदेशातील साच्या स्वच्छतेचे रहस्य सामावलेले होते. बाई म्हणाल्या, ‘कचरा न करणे म्हणजे स्वच्छता. आपल्याकडे केलेली घाण बाहेर, प्रसंगी दुस-याच्या दारात टाकणे, ढकलणे म्हणजे स्वच्छता. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांच्या प्रवासात प्रत्येक गांधी जयंती सफाई कार्यक्रमात खर्ची घालून देश स्वच्छ, सुंदर होऊ न शकण्याचे कारण स्वच्छताविषयक मूळ संकल्पनेत दडलेले आहे.
कोणत्याही देशाच्या नागरी जीवनाचा पाया असतो शिस्त. शिस्त येते नियमपालनातून त्याचे बाळकडू लहानपणीच पाजायचे असते. युरोपातील अनेक देशांत वाहन चालविण्याचे संस्कार, शिस्त शाळेत शिकविली जाते. शाळेत चक्क ‘ट्रैफिक पार्क' असतो. ट्रॅफिक पोलीस शाळेत येऊन ट्रैफिक नियम शिकवितात, कायदे सांगतात. शिक्षेपेक्षा लोकशिक्षणावर भर असतो. अठरा वर्षांच्या आत व दहा वर्षांनंतर रस्त्यावर फक्त सायकलच मुलांना चालविता येते. अठराव्या वर्षांखालील मुला-मुलींनी मोटारसायकल, स्कूटर, मोपेड चालवली तर मालकाला तीन महिने कारावास व एक हजार रुपये दंड अशा शिक्षेची आपणाकडे तरतूद आहे; पण अशी शिक्षा झाल्याचे आपणाकडे अपवाद. कायद्याचे राज्य दोन मार्गानी येते. एक पालनाने व दुसरे अंमलबजावणीने. आपणाकडे दोन्ही आघाड्यांवर अनास्था व उपेक्षेचे साम्राज्य सर्वत्र पसरलेले आढळते. कायदापालनाचे आदर्श लोकप्रतिनिधींनी रूढ करायचे असतात. त्यांच्या ड्रायव्हरने एकदा अनवधानाने सिग्नल तोडला, तर त्यांनी देशाची म्हणजे क्षमा मागितली व दंड करणाच्या ट्रैफिक पोलिसाला गौरविले. आपल्याकडे किरण बेदी नवी दिल्लीत पोलीस अधिकारी असताना त्यांनी ट्रैफिकला शिस्त आणली. त्या काळात त्या गाड्या ओढून नेत म्हणून त्यांना किरण बेदी न म्हणता ‘क्रेन बेदी' म्हटले जायचे. त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींची गाडी कायदाभंग केला म्हणून ओढून नेली. तर लगेच त्यांची बदली तुरुंग अधिकारी म्हणून केली. एका अर्थाने त्यांना तुरुंगातच डांबण्यात आले. कशी येणार आपणाकडे शिस्त, नियमपालनाचे संस्कार?
कोणत्याही देशाचे नागरी चारित्र्य ओळखले जाते ते त्या देशाच्या कार्यसंस्कृतीवरून. मी सन १९९६ मध्ये जपानमध्ये होतो. तिथे लोकांची कामाची शिस्त म्हणण्यापेक्षा कामावरील प्रेम मी पाहिले व अनुभवले आहे. दहा-पंधरा दिवसांच्या आखीव-रेखीव कार्यक्रमात कुठे मला दिरंगाई, गोंधळ, अव्यवस्था दिसली नाही. 'Work is worship' आपण म्हणतो. पूजेसारख्या एकाग्रतेने काम नाही करीत. जपानमध्ये असताना एका बुटाच्या कारखान्यातील संपाबद्दल मी ऐकल्या, वाचल्याने आठवते. संपाच्या काळात त्या बुटाच्या कारखान्यातील कामगारांनी एक अभिनव गोष्ट केली. आपल्या भाषेत त्याला 'गांधीगिरी'च म्हणावे लागेल. बुटाच्या कारखान्यात एकाच वेळी डावे आणि उजवे बूट तयार होत असतात. त्यांनी संपाच्या काळात फक्त डावेच बूट करायचे ठरविले. म्हणजे संप असला तरी पहिले म्हणजे काम करायचे. दुसरे म्हणजे उत्पादन थांबवायचे नाही. उत्पादनात कमी येऊ द्यायची नाही. म्हणजे हजार जोड तयार होत असतील हजार जोडच तयार करायचे; पण निरुपयोगी. दोन हजार डावे बूटच तयार करायचे. नंतर माझ्या काही दिवसांनी वाचनात आलं. तिथल्याच वर्तमानपत्रातून, की त्या संपाने कारखान्याला फायदाच झाला. संपाच्या काळात निरुत्पादक डाव्या बुटाइतके उजवे बूट कामगारांनी अधिक वेळ काम करून भरून काढले. अधिक उत्पादन झाले. पगारवाढ मिळाली व उत्पादनवाढ पण झाली. असं कार्यपूजेचं भान, कर्तव्यनिष्ठा, कार्यपरायणता यायची तर कार्य म्हणजे विकास हे लक्षात यायला हवा. कार्यसंस्कृतीत कार्य चोख, वेळेत, पूर्णत्वयुक्त करणं अपेक्षित असतं. काळ, काम, वेगाचं गणित पाळणं म्हणजे कार्यसंस्कृती. कार्य व उत्पादन गुणवत्ता पूर्ण असणं म्हणजे कर्तव्य बजावणं. आपल्याकडे फक्त सैनिक सीमेवर कर्तव्य बजावतात म्हणून आपला देश स्वतंत्र. सुराज्य जागरूक नागरिकच निर्माण करू शकतात, हे आपण खूणगाठ म्हणून समजून घेतले पाहिजे.
कामात केलेली छोटी चूकही जगाच्या जिव्हारी कशी लागते, ते मी युरोपच्या दौ-यात इटलीला असताना अनुभवले आहे. मी व्हेनिस शहर पाहायला गेलो होतो. जगातील अनेक सुंदर शहरांपैकी एक व्हेनिस, समुद्र, कालवे, रेल्वे जाल तिथे सुंदरता! वारसा जपणारं शहर म्हणून व्हेनिस ओळखलं जातं. आम्ही तिथून रेल्वेने परतणार होतो. रेल्वेला वेळ होता. गाडी फलाटावर लागत होती नि दुसन्या गाडीवर जाऊन आदळली. माझ्या दोन-तीन महिन्यांच्या युरोप प्रवासात पाहिलेला तो पहिलाच अपघात म्हणून मी व माझ्या सहका-यांनी अपघाताचे पटापट फोटो घेतले. ते पाहून लगेच पोलिसांनी आम्हाला घेरले आणि फोटो न काढण्याची विनंती केली. इतकेच काय तर काढलेल्या फोटोचे रिळही मागितले. विचारताना म्हणाले, 'It is insulting as well as disguising'. अपघात पोलिसांना अपमान
सामाजिक विकासवेध/१७६
हे सर्व आकलन म्हणजे आपला सांस्कृतिक व्यवहार होय. जे जे देश मोठे झाले, ज्या संस्कृती विकसित झाल्या, त्या क्रांतीने नसून उत्क्रांतीने. समाज परिवर्तन सामूहिक रूपात प्रत्ययास येत असले तरी व्यक्तिगत सहभाग व प्रतिसाद ही त्याची पूर्वअट असते. तुम्हाला देश, समाज जसा घडवायचा त्याचा आराखडा तुमच्या मनी निश्चित हवा. नियोजन व शिक्षण हे घटक समाजविकासात एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणून ज्या समाजास वापरता येतात, तेच देश अपेक्षित बदल घडवून आणू शकतात. चीन, जपान, कोरियासारखे देश पहा. सिंगापूर, फिनलंडसारखे छोटे देश जे करू शकतात, ते खंडप्राय देशांनी का नाही करून दाखवायचे अशी विधायक, सकारात्मक ऊर्जा नि ईष्र्याच हे करू शकते. त्यासाठी जाज्ज्वल्य देशाभिमान हवा. तो केवळ राज्यगीत, राष्ट्रगीत गाऊन येत नाही. रोजच्या व्यवहारातील तुमचे वागणे, गुणगुणणे यातून ते साकारायला हवे. 'मी' का 'देश' या क्रमावरही तुमचे विकास भविष्य ठरत असते. हक्ककेंद्री नागरी समाज कर्तव्यकेंद्री करणे हे वर्तमान भारतातील शिक्षण व समाज परिवर्तनापुढचे खरे आव्हान आहे. तसेच आपण जात, धर्मनिरपेक्ष समाजव्यवहार रूढ करू शकतो, का यावरही आपल्या विकासाचे फलित अवलंबून आहे. खरे तर विविध संकीर्णता, संकुचितताच आपल्या विकास व आधुनिकतेतील खरा अडथळा आहे. तो दूर करण्यावरच आपले भविष्य आधारलेले असणार आहे.
सामाजिक विकासवेध/१७७
परवा मी मुंबईहून स्लीपर कोचने येत होतो. स्लीपरमध्ये समोरच्या बाजूस वस्तू ठेवण्याचा एक बॉक्स होता. बास्केट म्हणा हवं तर! त्यावर दोन सूचना होत्या. प्रवाशांनी आपल्या जबाबदारीवर वस्तु (मोबाईल, पाकीट इ.) ठेवाव्यात. खाली दुसरी सूचना होती. बॉक्समध्ये पान, तंबाखू, गुटखा खाऊन थुकू नये. जो बॉक्स वा बास्केट वस्तू ठेवण्याची लावला होता, प्रवासी त्याचा वापर त्याचा वापर पीकदाणी (थुकीपात्र) म्हणून करतात, हे त्या सूचनेवरून स्पष्ट होत होते. अनेकदा आपले व्यवहार हे असभ्य व असंस्कृत असतात व त्याचे आपणास काही वाटत नाही. बरे एखाद्याला समजावून सांगावे, तर तो आपल्याला वेड्यातच काढत असतो, असे अनुभवावरून लक्षात येते. हल्ली स्त्रिया स्कूटर चालवू लागल्या ही चांगली गोष्ट आहे. मी असे पाहतो की त्या भगिनीचा मुलगा किंवा मुलगी मागे बसलेली असते. स्कूटर वाहन नियम व गतिशास्त्र लक्षात घेता मागे बसलेल्या बाळाने आईला धरून बसणे व त्याचे किंवा तिचे तोंड आईकडे असणे शास्त्रशुद्ध. मी आगाऊपणा करून स्कूटर थोडी गतीने पुढे नेऊन समजावतो, 'ताई, बाळाला उलटे नका बसवू. ब्रेक लावला तर तोंडावर पडेल बाळ.' ताई म्हणतात, 'नाही, त्याला मजा वाटते. त्याला सवय आहे. याला काय म्हणावे? तरी अजून त्या असं म्हणत नाहीत, तुम्हाला काय करायचंय? मुलगा माझा आहे. शिक्षणाचा संबंध कायदा पालन, रहदारीचे नियम पालन याच्याशी आहे की नाही? शिक्षित व अशिक्षितांत फरक हवा ना? शिवाय शिक्षितांना ‘सुशिक्षित' का म्हणतात, तर घेतलेल्या शिक्षणाचे सकारात्मक, विधायक प्रतिबिंब त्यांच्या रोजच्या छोट्या, छोट्या व्यवहारात पडणे अपेक्षित असते.
किती सरळ गोष्ट असते की, चौकात रहदारी नियंत्रक दिवे असतात. पादचा-यांना रस्ता ओलांडता यावा म्हणून आडव्या पट्टयाचा भाग आरक्षित
असतो. सगळे वाहनधारक त्या पट्यावर आक्रमण करून उभे असतात. पादचारी जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडतो. विदेशात तर माणसाळलेली कुत्रीपण रहदारीचे नियम पाळताना मी पाहिलीत. पादचारी प्रथम' न्यायाने ते आपले वाहन नंतर जाऊ देतात. हॉर्नचे तर विचारू नका. मागून येणारी दुचाकी, मोटार अॅम्ब्युलन्ससारखी हॉर्न वाजवित पुढे जाते. हॉर्न मुळात अपवादाने व आणीबाणीच्या परिस्थितीत वाजवायचा असतो, हे आपणास केव्हा कळणार? बस स्टैंड, रेल्वे स्टेशन, बँक, पेट्रोल पंप इथे ओळीचा साधा नियम पाळणे आपल्या किती जिवावर येते. अगदी नाइलाज झाला तर आपले मन मारून ओळीत उभे राहणे, याला का सभ्यता म्हणायची? रिकामी बस लागली की मी पाहतो. चाळीस बैठकांची बस. वीस लोकांचीच गर्दी; पण पुढे जाण्याची अहमहमिका अशी की जो पहिला जाईल त्याला बहधा मोफत प्रवासाचा पास मिळणार आहे! एस. टी., रेल्वे, बँक, पेट्रोल पंप यांनी अशी योजना जाहीर करून पाहावे, पहिल्या येणा-यास प्रवास मोफत, एक हजाराचा चेक बक्षीस, पाच लिटर पेट्रोल मोफत. आपण भारतीय एकाला पण मोफत बक्षीस मिळवू देणार नाही. टोकाचा संघर्ष होईल. आपण सुसंस्कृत झालोत का नुसता विचार करून पहा. संयम, सभ्यतेचे दुसरे नाव शहाणपण असते.
काही वर्षांपूर्वी रोटरी क्लबची सिनेमा थिएटरमध्ये एक जाहिरात असे. त्यातील वाक्य अजून माझ्या लक्षात आहे, चौकात कुस्ती नको.' इथल्या जयेंद्र पब्लिसिटीने काही वर्षांपूर्वी आपल्या ऑफिससमोर होर्डिंग लावले होते, ‘स्टेशन रोड ओलांडणाच्यासाठी शुभेच्छा!'. हे सर्व आपल्या अव्यवस्था, बेशिस्त, बेफिकिरीचे पंचनामेच नाहीत का? भारतीय पुरुषांचे भर रस्त्यावर लघवीस उभे राहणे यात आपणास काहीच कसे वावगे वाटत नाही ? ‘इंडिया टुडे' या नियतकालिकाने एक विशेषांकच काढला होता. त्याचे शीर्षकच होते मुळी ‘अग्ली इंडियन' (असभ्य भारतीय). त्यात आपल्या वरील साच्या असभ्यपणाची छायाचित्रे होती. ए. टी. एम. मशीन केबीच्यानमध्ये मी चिठ्या/कपटे टाकण्यासाठी कचरा कुंडी (डस्टबिन) असून त्यात निरुपयोगी कागद, कपटे, पावत्या का पडू नये? वापरणारे शिक्षित असतात ना? शाळा, महाविद्यालयांच्या आवारात कचरा का असावा, दिसावा? असे प्रश्न पडण्याचे दिवस येऊन ठेपले आहेत.
सिनेमा थिएटर, उपाहारगृह येथील आपले वर्तन आपण माणसाऐवजी जनावर असल्याचे नाही का सिद्ध करीत? शिट्या, हिडीस टोमणे, बीभत्स हंबरणे हे माणसाचे लक्षण खचीतच नव्हे! थाळी, प्लेटमध्ये अन्न टाकणे,
सामाजिक विकासवेध/१७९
सोडणे भारतात दंडनीय अपराध व्हायला हवा. एकदा नुसता हॉटेलचा कचरा पहा म्हणजे मी असे का म्हणतो, ते तुमच्या लक्षात येईल. रोज शेकडो बॅरल्स अन्न खरकट्याच्या रूपात टाकले जाते. ही मस्तीच नाही का? सगळ्या बस, रेल्वे, विमानांत पाण्याच्या बाटल्या, कुरकुरे, वेफर्स कव्हर्स किती पडलेली असतात? प्रथम दर्जाच्या डब्यात, बिझनेस क्लासमध्येही हे पाहायला मिळते, हे आणखीनच गंभीर. रेल्वेत वातानुकूलित डब्यांतून लांबचा प्रवास करणा-यांसाठी चादर, उशी, नॅपकीन, रग पुरविले जातात. प्रवास संपताना कोणीही चादरी, रगच्या घड्या घालीत नाहीत. (मी सोडून!) कारण घरी ते घालत नसतात, हेच त्याचे कारण. ही सरंजामीच नाही का? स्वावलंबन सार्वजनिक ठिकाणी नको का प्रदर्शित व्हायला? बसच्या प्रवासात मी पाहतो. प्रवासात वाचायचे म्हणून मी वर्तमानपत्र, मासिक घेतलेले असते. सीटवर बसायचा अवकाश की शेजारी ते मागतो. इतकी वाचायची तीव्रता तर विकत का नाही घ्यायचे? कल्पना करू की तो गरीब प्रवासी आहे. घेणारा वाचेपर्यंत तरी नको का थांबायला? गरिबीमुळे युरोपच्या तीन महिन्यांच्या प्रवासात मी वर्तमानपत्रे प्रवासातच वाचायचो. विकत घेणे शक्य नसायचे. तिथे रॅकमध्येच वृत्तपत्रे लोक ठेवून जातात. मी प्रवासी गेल्यानंतर मी घेऊन वाचीत असे.
आपल्याकडे सर्वत्र परवाने लायसेन्सचे राज्य आहे. कुठे नियम पाळून काय मिळते? चिरीमिरी देणे, घेणे आपल्या अंगात इतके मुरले आहे की विचारू नका! शिपाई चिरीमिरी मागतो हे मी समजू शकतो. मंत्री, सचिव, अधिकारीही अपेक्षा करतात याला काय म्हणावे? हेलपाटे घालावे लागण्यासारखा सामान्य माणसाचा दुसरा क्रूर छळ अन् अपमान नाही. सरकारी पाकिटावर लिहिलेले असते, ‘सेवार्थ'. त्याचा अर्थ सत्तर वर्षे उलटली तरी आपल्या आचारात तो उतरत नाही. कार्यालयात हजर कर्मचारी भेटत नाहीत. हालचाल वहीत नोंद नाही. रजा नाही. उपस्थितीत हजर आहे. तरी जागेवरून मात्र गायब? शेजारी विचारले तर माहीत नाही. सगळे डाव्या अस्तनीचे कर्मचारी, उजवा हात सगळ्यांचा खिशात किंवा ड्रॉवर्समध्ये. पी. सी.वर छान सिनेमा, पत्ते, क्रिकेट पाहणे चाललेले असते. तेपण सीसीटीव्ही चालू असून हे विशेष. जाब विचारला की तुमची फाईल गायब. नशीब समजा, अजून ते तुम्हाला गायब करीत नाहीत. खासगी सेवेत होम डिलिव्हरी, सरकारी टपाल, सहा महिने लांब. 'मेक इन इंडिया' हेच का? सब का साथ, सब का हाथ' यालाच बहुधा म्हणत असावेत.
सामाजिक विकासवेध/१८०
कोणताही नियम, कायदा करा; पळवाट शोधायची वृत्ती राष्ट्रद्रोह नाही का? पूर्वीच्या तुलनेने बस, रेल्वे, विमानसेवेत वेळेचे पालन वाढलेले दिसते. मग कार्यालयातील कागदपत्रांचा उरक, कोर्टातील प्रकरणांची निर्गत, पोलीस चौकशीत तत्परता यांतूनच देशाची कार्यक्षमता ठरणार. बांधिल जबाबदारीचे तत्त्व, जबाबदार धरण्यात कसूर न करणे, नियमभंगास शिक्षा, दंड होणारच असा संदेश देणारे प्रशासन असणे आवश्यक. लोकशाही म्हणजे प्रगल्भ आचरण. मनमानी म्हणजे लोकशाही, पंचायत राज्य नव्हे. लोकप्रतिनिधीवर जनतेचा धाक केवळ मतपेटीतून येईल तो पाच वर्षांतून एकदाच लॉटरीसारखा दिसणार. तो रोज लोकसेवक भूमिका बजावतो का? त्याचे धोरण व्यापक आहे का? का तो नुसता मतदारांना जबाबदार. जनतेस जबाबदार लोकप्रतिनिधी का नसावेत?
हे नि असे कितीतरी प्रश्न मला रोज अकारण बेचैन करीत राहतात. कारण माझे रोजचे आचरण या प्रश्नांचे उत्तर असते. ‘सत्य असत्याशी, मन केले ग्वाही नाही मानियले बहुमता ।।' म्हणत मी जगतो, म्हणून लोकादरास
सामाजिक विकासवेध/१८१
इस सड़क पर इस कदर कीचड बिछी है,
हर किसी का पाँव, घुटनों तक सना है।
सांगणारे हिंदी गझलकार दुष्यन्तकुमार आपणास हे सांगायला विसरत नाहीत -
दोस्तों ! अब मंच पर सुविधा नहीं है,
आजकल नेपथ्य में संभावना है।
असे म्हणत ते जणू समजावतात की दर्शनी माध्यमांच्या राजकारणाचा प्रकाशच फक्त डोळे दिपावणारा असतो; पण तुम्हाला तुमचे डोळे उघडावे असे मनस्वी वाटत असेल तर समाजभानयुक्त व्यक्तिगत व्यवहार सातत्यच रामबाण उपाय होय. 'मला काय त्याचे?' असे म्हणण्यातील निरीच्छता म्हणजे गैरव्यवहार व व्यवस्थेचे मूक समर्थनच असते. 'चलता है' म्हणणेही तसेच असते. मी सहन करणार नाही, चालू देणार नाही, मूक भागीदार होणार नाही, निष्क्रिय राहणार नाही. चिमणीच्या चोचीतील पाण्यातही जंगलाचा वणवा विझवायची ताकद असते, ही केवळ कविकल्पना किंवा कल्पनाविलास नाही. उलटपक्षी बदलाची दुर्दम्य बांधीलकी व्यक्त करणारी ती खारीची धडपड असते.
सामाजिक विकासवेध/१८२ पूर्वप्रसिद्धी सूची
१. विकास निर्देशांकावर आधारित सामाजिक न्यायाची गरज
(४ फेब्रुवारी, २०१३ अप्रकाशित)
२. युवक हो, तुम्हाला तरायचंय की तरंगायचंय?
(दै. महाराष्ट्र टाइम्स, कोल्हापूर, २ जून, २०१३)
३. वंचित विकास हीच खरी प्रगती
(दै. महाराष्ट्र टाइम्स, कोल्हापूर, २0 जुलै, २०१३)
४. यंदा कर्तव्य आहे, पण...
(‘यंदा कर्तव्य', दिवाळी अंक, २०१३)
५. नवसमाजनिर्मितीचा ‘सिंगापूर आदर्श' अनुकरणीय
(दै. लोकमत,कोल्हापूर, दिवाळी अंक, २०१३)
मुलं बोलू लागलीत, चला त्यांना ऐकूया (दै. महाराष्ट्र टाइम्स, कोल्हापूर, १४ नोव्हेंबर, २०१३) ‘बाल न्याय विधेयक - २०१४' रोगापेक्षा इलाज भयंकर. (अप्रकाशित) प्रेरक बदलाच्या प्रतीक्षेतील भारतीय स्त्री (जनस्वास्थ्य दिवाळी अंक, २०१४) अंधार झाला हे खरं, तरीपण... (जनस्वास्थ्य दिवाळी अंक, २०१४) हरवलेले... गवसलेले...
| (मेहता ग्रंथजगत, पुणे, दिवाळी अंक, २०१४) ११. । भारतीय युवा धोरण-२०१४ | (युवा, कोल्हापूर, दिवाळी अंक, २०१४)
कुटुंब नसलेल्यांची कुटुंबे (पुरुष स्पंदन, दिवाळी अंक, २०१४) अंधश्रद्धामुक्त जीवनाची गरज (श्री दत्ताबाळ स्मृती व्याख्यान, शिवाजी विद्यापीठ, २०१४) नवे ज्येष्ठ नागरिक धोरण व योजना (मनोहरी मनोयुवा, फेस्कॉम मुखपत्र, जानेवारी, २०१५) दुर्लक्षित अल्पसंख्यांकांचे प्रश्न (अल्पसंख्याकांचे प्रश्न चर्चासत्र, समारोप भाषण, महावीर महाविद्यालय कोल्हापूर, २६ मार्च, २०१५) सुजाण नागरिकांच्या प्रतिक्षेतील भारत (चपराक दिवाळी अंक, पुणे, २०१५)
ॐ
१६.
सामाजिक विकासवेध/१८३ ________________
१७. हसा, हसवा, हसत रहा। (हास्यस्पंदन स्मरणिका, हास्यक्लन कोल्हापूर, २०१५) १८. भारत हे सहिष्णूच राष्ट्र हवे. (दैनिक तरुण भारत, कोल्हापूर, २६ जानेवारी, २०१६) १९. धर्म आणि विश्व एकता (अप्रकाशित) २०. बदलती जीवन शैली व समाज जीवन (डी.वाय.पाटील (आबा) अमृत महोत्सव स्मरणिका पलूस, २६ जून, २०१६) २१. । नातेसंबंध : गोफ की गुंता ? (तनिष्क मासिक, पुणे, दिवाळी अंक,- २०१६) २२. बळीराजाच्या आत्महत्यामुक्तीचा शाश्वत विचार (दै. लोकमत, दिवाळी अंक, कोल्हापूर, २०१६) २३. । पैसा झाला मोठा, माणूस छोटा (पुरुष उवाच, दिवाळी अंक, पुणे, २०१६) २४. । न उमललेल्या कळ्यांचे निःशब्द निःश्वास (ऋग्वेद मासिक, आजार, दिवाळी अंक, २०१६) २५. सामान्यांचे 'स्मार्ट' समाजकार्य (दै. तरुण भारत वर्धापनदिन विशेषांक, २१ डिसेंबर, २०१६) २६. । नातेसंबंधांचे प्रेक्षकीकरण (नवी सनद, नाशिक, जानेवारी, २०१७) २७. । आकाश घेऊन कोसळलेल्या स्त्रिया (जनस्वास्थ्य मासिक, सांगली, मार्च, २०१७) २८. ग्रामीण, असंघटित वयोश्रेष्ठांच्या सामाजिक समस्या (मनोहरी मनोयुवा, मे, २०१७) २९. । जग तसे, आपण असे कसे? (अप्रकाशित) ३0. चोचीतील पाण्यातले विणवा विझवण्याचे सामर्थ्य (अप्रकाशित) सामाजिक विकासवेध/१८४ ________________
डॉ. सुनीलकुमार लवटे : साहित्य संपदा ॐ १. खाली जमीन, वर आकाश (आत्मकथन) मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२00६/पृ. २१0/रु. १८0 सहावी आवृत्ती २. भारतीय साहित्यिक (समीक्षा) मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२00७/पृ. १३८/रु. १४0 तिसरी आवृत्ती ३. सरल्या ऋतूचं वास्तव (काव्यसंग्रह) निर्मिती संवाद, कोल्हापूर/२०१२/पृ.१००/रु.१00/दुसरी आवृत्ती ४. वि. स. खांडेकर चरित्र (चरित्र) | अक्षर दालन, कोल्हापूर/२0१८/पृ.१८६/रु.२५0/तिसरी सुधारित आवृत्ती एकविसाव्या शतकातील शिक्षण (शैक्षणिक लेखसंग्रह) अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७६/रु.२२५/दुसरी सुधारित आवृत्ती ६. कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (व्यक्तीलेखसंग्रह) अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७५/रु.२00/तिसरी आवृत्ती ७. प्रेरक चरित्रे (व्यक्तीलेखसंग्रह) अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.३१/रु.३५/तिसरी आवृत्ती ८. दुःखहरण (वंचित कथासंग्रह) | अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१३0/रु.१७५/दुसरी आवृत्ती निराळं जग, निराळी माणसं (संस्था/व्यक्तिविषयक लेखसंग्रह) अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१४८/रु.२00/दुसरी आवृत्ती १०. शब्द सोन्याचा पिंपळ (साहित्यविषयक लेखसंग्रह) । अक्षर दालन, कोल्हापूर/२0१८/तिसरी सुधारित आवृत्ती ११. आकाश संवाद (भाषण संग्रह) | अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१३३/रु.१५0/दुसरी सुधारित आवृत्ती १२. आत्मस्वर (आत्मकथनात्मक लेख व मुलाखती संग्रह) साकेत प्रकाशन, औरंगाबाद/२०१४/पृ.१६0/रु.१८0/प्रथम आवृत्ती १३. एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (सामाजिक लेखसंग्रह) | अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१९४/रु.२00/दुसरी आवृत्ती १४. समकालीन साहित्यिक (समीक्षा) मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२०१५/पृ.१८६/रु.२००/दुसरी आवृत्ती १५. महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा (सामाजिक लेखसंग्रह) अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७६/रु.२०0/तिसरी आवृत्ती सामाजिक विकासवेध/१८५ ________________
१६. वंचित विकास : जग आणि आपण (सामाजिक लेखसंग्रह) अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.११९/रु.२००/दुसरी आवृत्ती १७. नवे शिक्षण, नवे शिक्षक (शैक्षणिक लेखसंग्रह) | अक्षर दालन, कोल्हापूर/२०१६/पृ.२१२/रु.२२५/दुसरी आवृत्ती १८. भारतीय भाषा व साहित्य (समीक्षा) । साधना प्रकाशन पुणे २0१७/पृ. १८६/रु. २00/दुसरी आवृत्ती १९. मराठी वंचित साहित्य (समीक्षा)। अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.८३ रु.१५० /पहिली आवृत्ती २०. साहित्य आणि संस्कृती (साहित्यिक लेखसंग्रह) अक्षर दालन, कोल्हापूर २0१८/पृ. १९८ रु. ३00 /पहिली आवृत्ती २१. माझे सांगाती (व्यक्तीलेखसंग्रह) अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१३६ रु.१७५ /पहिली आवृत्ती वेचलेली फुले (समीक्षा) अक्षर दालन, कोल्हापूर २0१८/पृ. २२0 रु. ३०० /पहिली आवृत्ती २३. सामाजिक विकासवेध (सामाजिक लेखसंग्रह) अक्षर दालन, कोल्हापूर २0१८/पृ.१८५ रु.२५0 /पहिली आवृत्ती २४. वाचावे असे काही (समीक्षा) | अक्षर दालन, कोल्हापूर २0१८/पृ.१५५/रु.२00/पहिली आवृत्ती २५. प्रशस्ती (प्रस्तावना संग्रह) अक्षर दालन, कोल्हापूर २0१८/पृ.२८२/रु.३७५ /पहिली आवृत्ती २६. जाणिवांची आरास (स्फुट संग्रह) अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१७७/रु.२५0/पहिली आवृत्ती आगामी • भारतीय भाषा (समीक्षा) | भारतीय साहित्य (समीक्षा) भारतीय लिपी (समीक्षा) वाचन (सैद्धान्तिक) * वरील सर्व पुस्तके मिळण्याचे ठिकाण अक्षर दालन सामाजिक विकासवेध/१८६