सार्वजनिक सत्य धर्मपुस्तक/पूजा
बळवंत हरी साकवळकर. प्र.--आतां आपल्या निर्माणकर्त्यावर पुष्पें चढवून त्याची पूजा आपण मानवांनी कोणत्या तर्हेनें करावी?
जोतीराव. उ.--या अफाट पोकळींतील अनंत सूर्यमंडळांसह त्यांच्या ग्रहोपग्रहांसहित पृथ्वीवरील पुष्पें वगैरे सर्व सुवासिक पदार्थ जर निर्माणकर्त्यांनी दयादृष्टीनें आपल्या मानवांच्या उपभोगासाठीं उत्पन्न केलीं आहेत, तर त्यांपैकीं कोणता पदार्थ उलटा आपण निर्मीकावर वाहून त्याची पूजा करावी? एकंदर सर्व पदार्थ निर्मीकानें जर उत्पन्न केले आहेत, तर आपल्याजवळ आपलें स्वतःचें काय आहे, तें निर्मीकावर वाहून त्याची पूजा करावी?
बळवंतराव. प्र.--तर मग आतां आपण या पुष्पांचा काय उपयोग करावा?
जोतीराव. उ.--स्वपरिश्रमानें आपल्या कुटुंबाचे पोषण करून रात्रंदिवस जगाच्या कल्याणासाठीं झटणारे--म्हणजे अज्ञानी मानव बांधवांस आपमतलबी व स्वकार्यसाधु लोकांच्या जाळ्यांतून मुक्त करणारे अशा सत्पुरुषांस फुलांच्या माळा करून नित्य ईश्वराच्या नावाने अर्पण कराव्यात, म्हणजे पुष्पांचे सार्थक झाले.
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |