साहित्यातील जीवनभाष्य/स्त्री जीवनभाष्य
माझी साळुंकी आपली नोकरी जाणार हे कळताच क्रॉगस्टॅड चिडून गेला. नोराला त्याने कर्ज दिले होते. त्यामुळेच टोरवॉल्डचे प्राण वाचले होते. आणि तो टोरवाल्डच आता त्याला काढून टाकणार होता. तेव्हा या बाबतीत नोराला भेटावे, असे त्याने ठरविले. पण तो साधा वशिला लावण्यासाठी आला नव्हता. नोराचा कर्ज फेडीचा कारभार अगदी गुप्तपणे चालला होता. त्यातले एक अक्षर जरी टोरबॉल्ड हेल्मर याला कळले असते तरी त्याने अनर्थ केला असता. स्त्रीच्या बाबतीत त्याचे विचार अगदी कर्मठ सनातन होते. आपल्या नकळत आपल्या बायकोने कर्ज काढले होते, आणि पुढे ते फेडण्यासाठी आपल्या नकळत कष्टाची कामे केली होती, ती लपविण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारे खोटेनाटे सांगितले होते. हे सर्व त्याला कळले असते तर त्याने नोराला हाकलूनच दिले असते. एकदा कॉगस्टॅड त्याच्या. घरातून बाहेर पडताना त्याला दिसला. त्याने नोराला विचारले. तिने आपल्याला माहीत नाही, असे सांगितले, पण तिच्याकडेच तो आला होता. ते उघडकीस येतांच टोरवॉल्डने सौम्यपणे, पण मोठ्या गंभीरपणे, नोराला नीती अनीतीचे पाठ दिले होते. तो तिला माझी कोकिळा, माझी साळुंकी, माझी मंजुळा अशा लाडक्या नावाने हाका मारीत असे. त्याचे तिच्यावर प्रेमही होते; पण त्याला मर्यादा होत्या. कर्जासारखा पुरुषी व्यवहार नोराने केला आणि त्यासाठी आपल्याशी ती खोटे बोलली, हे त्याला सहन झाले नसते. म्हणून त्याला एक अक्षरही कळू न देण्याची खबरदारी नोराने घेतली होती. क्रॉगस्टॅडला नोराचे हे मर्म माहीत होते. त्याचा फायदा तो घेणार होता. आपली नोकरी गेली. तर टोरवाल्डला आपण तो सर्व व्यवहार सांगू, अशी धमकी तो देत होता.
एवढाही हक्क नाही ? पण एवढ्याने भागत नव्हते. तो व्यवहार उघडकीस - येण्याने दुसरा एक अनर्थ ओढवणार होता. कर्जखतावर वडिलांची सही करताना नोराने एक गफलत करून ठेविली होती. तिचे वडील २९ सप्टेंबरला वारले होते. आणि तिने त्यांची सही ३ ऑक्टोबरला केली होती. नोरा ही भोळी, निरागस, निष्पाप स्त्री होती. आपण हे कृत्य पतीचे प्राण वाचविण्यासाठी करीत आहो तेव्हा यात पाप मुळीच नाही, असे तिला वाटत होते. एवढेच नव्हे तर हे कृत्य कायद्याच्या विरुद्ध आहे हेच तिला पटत नव्हते. आपल्या पतीला व पित्याला वाचविण्याचा अधिकार स्त्रीला नाही की काय ? कायदा तसा असणे शक्यच नाही, असे तिचे मत होते. आणि क्रॉगस्टॅडने सही मधली गफलत तिच्या ध्यानी आणून दिली तेव्हा तिने निर्भयपणें 'मी स्वतःच वडिलांची सही केली आहे,' असे त्याला सांगितले. 'ही तुमची कबुली तुम्हाला फार घातक आहे,' असे तो सांगू लागला. पण नोराला. ते पटेचना. कायदा असा असणे शक्य नाही. हेच तिचे म्हणणे.
नोराची ही व्यक्तिरेखा निर्मून इब्सेनने जुन्या काळच्या निष्पाप निरागस स्त्रीचे अत्यंत लोभस चित्र जगाला दाखविले आहे. आणि त्याचबरोबर कायदा, व्यवहार यांचे जग आणि सद्भावना, निर्व्याजवृत्ती, यांचे जग ही दोन जगे किती भिन्न आहेत हेही दाखविले आहे. नोरा दुसऱ्या जगात रहात होती. त्यामुळे क्रॉगस्टॅडचा नाइलाज झाला. हे सर्व प्रकरण मी हेल्मर यांना सांगणार आणि ते कर्जखतही त्यांना दाखविणार मग माझी नोकरी कशी जातें ते पाहतो, अशी धमकी देऊन तो निघून गेला.
पती रक्षण कर्ता ? तो गेल्यावर मात्र नोरा अस्वस्थ झाली. जग आपण समजतो तसे नाही, असे तिला वाटू लागले. यातून काही तरी अनर्थ होणार, अशी भीती तिला वाटू लागली. क्रॉगस्टँडला काढू नका, असे ती पतीला विनवू लागली.- आणि तो मोठा वाईट मनुष्य आहे, वर्तमानपत्रातून तुमची उगीचच निंदा नालस्ती, करील, असे कारण. सांगू लागली. याला भिऊन आपला निर्णय बदलावा, असे नोराने आपल्याला सांगावे. यात टोरवॉल्डला अपमान वाटला. या भानडीत तू पडू नको, हा तुमचा बायकांचा विषय नाही असे सांगून त्याने तिला गप्प केले, त्यानंतर आपली मैत्रीण लिंडा हिला नोराने सर्व हकीकत सांगितली तोंपर्यंत कॉगस्टँड याने टपालाच्या पेटीत सर्वप्रकरणाचे पत्र आणून टाकले होतें. हेल्मर घरी येतात ते पत्र त्याच्या हाती पडणार आणि मग आग लागणार हे नोराच्या ध्यानी आले त्यापूर्वीच घरांतून निघून जावे, जीव द्यावा असे तिला वाटू लागले, 'तू खोटे बोललीस, माझी फसवणूक केलीस, खोटी सही करून माझ्या नावाला काळिमा लावलास' असे आरोप पती आपल्यावर करणार, हे तिच्या ध्यानी आले. तरी तिला मनातून एक आशा वाटत होती. आपल्या पत्नीने, आपल्या लाडक्या नोराने, आपल्या कोकिळेने, आपल्या साळुंकीने हे सर्व आपल्यासाठी केले, आपण रोगमुक्त व्हावे, आपले प्राण वाचावे यासाठी केले, तिचा दुसरा तिसरा कसलाहिं हेतू यात नव्हता. हे जाणन टोखॉल्ड ही सर्व जबाबदारी धैर्याने स्वतःवर घेईल, आपले रक्षण करील, आपल्याला पाठिशी घालील, असे तिला वाटत होते. पण लिंडाला ते पटले नाही. तिने आपल्या मैत्रिणीला या पेचातून मुक्त करण्यासाठी एक निराळीच युक्ती योजिली.
आत्मनस्तु कामाय ! पुरुषाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा केवळ स्वार्थी आहे. 'न वा अरे जायायाः कामाय जाया प्रिया भवति, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवती।' 'पत्नीसाठी पत्नी प्रिय नसून स्वतःसाठी ती प्रिय असते' हेच प्राकृत अर्थाने कसे खरे आहे, पुरुषाचे ते एक खेळणे कसे आहे, घरकुलात मांडलेली ती बाहुली आहे, असे पुरुषाला कसे वाटते हे सर्व नोराची मैत्रीण लिंडा हिने योजलेल्या युक्तीतून जो प्रसंग उद्भवला त्यामुळे अगदी स्पष्ट झाले. इब्सेनचे नाट्य रचनेचे पराकाष्ठेचे कौशल्य या ठिकाणी प्रगट झाले आहे.
पूर्ववयात लिंडाचे क्रॉगस्टॅडवर प्रेम होते. त्याचा विवाहही ठरला होता. पण आई व दोन भाऊ यांचा भार तिच्यावर होता. म्हणून क्रॉगस्टॅडला नकार देऊन तिने एका श्रीमंत माणसाशी लग्न केले, पुढे तो गृहस्थही वारला. पण त्या अवधीत लिंडाची आई गेली होती आणि भावांनाही नोकऱ्या लागल्या होत्या. तेव्हा ते गाव सोडून ती परत आली होती आणि नोकरीच्या शोधात होती. आणि आता तिला नोकरी मिळणार होती ती क्रॉगस्टँडची नोकरी गेल्यामुळे ! म्हणजे पुन्हा दुसऱ्याने नियतीने लिंडाला क्रॉस्ट्रॅडच्या घातास प्रवृत्त केले होते. पण लिंडाने आता निराळा विचार केला, क्रॉगस्टॅडकडे ती गेली व आपण लग्न करून संसार मांडू असे बोलणे तिने केले. तोही एकाकी जीवनाला कंटाळा होता. म्हणून त्याला ते मानवले आणि या नव्या नात्याच्या आधारे हेल्मरला पाठविलेले पत्र त्याने परत घ्यावे, असे त्याला विनविण्यास ती त्याच्याकडे गेली. पण तो गावाला गेला होता. त्यामुळे पत्र परत घेणे नमले नाही.
टोरवॉल्ड हेल्मर याच्या हाती ते पत्र पडताच तो आगदी पिसाट होऊन गेला. आणि नोराला वाटेल ते बोलू लागला. "मला ही शंका येतच होती. तुझ्या वडिलांचीच तू मुलगी. धर्म, नीती त्यांना काही माहीतच नव्हते. तशीच तू झालीस यात नवल कसले ? माझ्या सर्व कीर्तीला तू काळीमा लावलास. हे सर्व माझ्यासाठी केलेस म्हणतेस. पण असल्या सबबी मला सांगू नकोस. एक शब्द बोलू नकोस. लोक काय म्हणतील ? माझ्याच सांगण्यावरून तू खोटी सही केलीस, आणि आता मी नामानिराळा होत आहे. असेच ते म्हणणार. माझे सर्व भवितव्य तू काळे केलेस. मी तुझ्यावर परकाष्ठेचे प्रेम केले. पण तू त्याची अशी फेड केलीस. पण आता हे निस्तरले पाहिजे. सर्व मिटविले पाहिजे. बाहेरच्या जगाला यातले काही कळता कामा नये. मी तुला येथे राहू देईन. पण मुलांशी तुझा संबंध येता कामा नये. त्यांचे संगोपन करण्याची तुझी लायकी नाही."
भ्रम निरास टोरबॉल्डचे हे बोलणे ऐकत असताना नोराच्या मनात फार मोठे परिवर्तन घडत होते. आतापर्यंत ती खरोखरच एक बाहुली होती. आता ती एक प्रौढ स्त्री होऊ लागली. या प्रकरणाला प्रारंभ झाला तेव्हाच या परिवर्तनाला प्रारंभ झाला होता. आता तिचे तिला ते स्पष्ट होऊ लागले. तिच्या मनात होत असलेली ही उलथापालथ इब्सेनने विलक्षण कौशल्याने व्यक्त केली आहे, टोरवॉल्डचा तो भडिमार चालू असता एरवी ती रडली असती, त्याच्या पाया पडली असती, तिनें त्याची करूणा भाकली असती. पण तसें ती काही करीत नाही. थंडपणे, अलिप्तपणे शांतपणे ती होय, नाही, असे आहे, हे खरे आहे, अशी उत्तरें देते. पण तेवढ्यामुळे तिचा केवढा भ्रमनिरास झाला आहे, पतीचे एक खेळणे या पलीकडे आपल्याला कशी किंमत नव्हती हे ध्यानी येऊन तिला केवढ्या वेदना होत आहेत, त्याच्यासाठी, त्याच्या सुखासाठी, त्याच्या स्वार्थासाठी, त्याच्या प्रतिष्ठेसाठी त्याला आपण प्रिय होतो. आपल्यासाठी नव्हे हे तिला कसे आढळले. हे नाटक नुसते वाचतांना सुद्धा, ध्यानी येते. मग रंगभूमीवर ते किती स्पष्ट होत असेल याची सहज कल्पना येईल. खरे नाट्य ते हेच.
टोरबॉल्ड नोराला ती कटु विखारी वाणी ऐकवत असताना एक माणूस. आत आला व त्याने क्रॅगस्टॅडचे पत्र त्याला दिले. क्रॅगस्टॅडने मूळचे कर्जखतच परत केले होते. व आपल्याला यासंबंधात पुढे काही करावयाचे नाही असे लिहिले होते. लिंडाने हे सर्व घडविले होते. आपले एकाकी भणंग जीवन संपून आपल्याला जरा सुखाचे दिवस येणार म्हणून क्रॅगस्टॅडला आनंद झाला होता. व त्याने लिंडाचे म्हणणे मान्य करून नोराच्या सहीचा दस्त रद्द करून तो परत केला होता. तो पाहून टोरबॉल्डला अगदीं हर्ष झाला. आपली प्रतिष्ठा वाचली, आता आपल्या किर्तीला काळे लागत नाही, हें ध्यानी येऊन त्याने आपले बोलणे एकदम फिरविले, तो म्हणाला "नोरा, देवानेच साकडे निवारले. आता काळजीचे कारण नाही. आता भीती नाही. मी तुला अगदी पूर्णपणे क्षमा करतो. तू केलेस ते माझ्यासाठी, माझ्यावरील प्रेमामुळेच केलेस, हे मी जाणतो. प्रत्येक स्त्रीने असेच केले पाहिजे. तुला व्यवहार कळला नाही हे खरे. पण त्यात काय आहे ? मी बोललो ते विसरून जा. मी तुला क्षमा केली आहे. आपला संसार आता सुखाचा होईल."
जगाचे ज्ञान हवे पण नोराने आता ते घर सोडण्याचा निश्चय केला होता. तिने तसे टोरवॉल्डला स्पष्टपणे सांगितले तेव्हा त्याला धक्काच बसला. हे काय आहे, निघून जाण्याचे कारण काय, हे त्याला कळेचना. नोरा म्हणाली, एका क्षणापूर्वी मुलांना वाढविण्यास मी नालायक होते. आता लायक कशी झाले ? तुमच्यावरचे संकट टळले तेव्हा तुम्ही बोलणे फिरविले. माझ्यावर संकट होते तेव्हा तुम्ही आपल्यावर जबाबदारी घ्याल, असे मला वाटले होते. पण तुम्हांला मी तुमच्या सुखासाठी हवी होते. माझे काय होईल, याची तुम्हाला परवा नव्हती. आपले हे घर नव्हते, संसार नव्हता मी तुमची पत्नी नव्हते. एक बाहुली होते. आठ वर्षे तुम्हीं माझ्याशी खेळलात. मी मोठी झाले नाही. आता मला प्रौढ व्हावयाचे आहे. जग समजावून घ्यावयाचे आहे. या जगात कायदा असा आहे की स्त्रीला आपल्या पतीचे प्राण वाचविण्याचा हक्क नाही. आपल्या पित्याचे मन अंतकाळी दुखवू नये, हा हक्क नाही. माझा याच्यावर विश्वास बसत नाही. पण त्या जगाचे ज्ञान मला करून घेतले पाहिजे. मी मुलांना वाढविण्यास खरेच लायक नाही ! कारण मीच एक लहान मूल आहे. तुम्हीच मला वाढू दिले नाही. पण आता मला स्वतःचे शिक्षण करावयाचे आहे. येथे राहून ते होणार नाही. मी एक कोकिळा साळुंकीच राहीन. म्हणून मी येथे राहू शकत नाही. माझे तुमच्यावर प्रेम नाही. तुमचेही माझ्यावर नाही. मग परक्या पुरुषाबरोबर रात्री मी कशी राहणार ?'
टोरवॉल्ड हे ऐकून अगदी गांगरून गेला. नोराच्या म्हणण्यात काही तथ्यांश आहे असे क्षणभर त्याला वाटले. तो तिच्या विनवण्या करू लागला. शेवटी त्याने विचारले, 'नोरा तू पुन्हा कधीच परत येणार नाहीस काय ?' ती म्हणाली, 'तुमच्यात आमूलाग्र परिवर्तन झाले, आणि आपले सहजीवन म्हणजे खराखुरा विवाह झाला तर मी अवश्य परत येईन.' इब्सेनचे हे नाटक म्हणजे 'न वा अरे जायायाः कामाय जाया प्रिया भवति, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवति' या सिद्धान्ताला दिलेले मूर्त रूप होय.
२ विषम नीती इंग्लिश कादंबरीकार थॉमस हार्डी याने अशाच एका स्त्रीच्या जीवनाची कहाणी सांगितली आहे. स्त्री आणि पुरूष यांच्या बाबतीत समाज नीतिनिकष कसे भिन्न मानतो, ते त्याला दाखवायचे आहे. स्त्रीजीवनाच्या दुसऱ्या एका अंगाचे हे दर्शन आहे. पुरूष स्त्रीला एक खेळणे कसे मानतो हे इब्सेनने दाखविले आहे. आणि अत्यंत उदारमतवादी पुरुषसुद्धा वैवाहिक नीतीचा प्रश्न येताच अत्यंत विषम नीतीचा पुरस्कर्ता कसा होतो ते हार्डीला दाखवावयाचे आहे. 'टेस डरबरव्हिलिस' या कादंबरीत त्याने ते एंजल क्लेअर ही रेखा काढून दाखविले आहे. नोरा आणि टेस या आयुष्याच्या प्रारंभी जुन्या जगातल्या अश्राप, निरागस भोळ्या मुली होत्या. नोरा उत्तर काळात अगदी बदलली. तिच्यात फार मोठे परिवर्तन होऊन ती नव्या युगात आली. टेसमध्ये हे परिवर्तन झाले नाही. स्त्रीपुरुष विषमतीबद्दल ती तक्रार करीत नाही. एंजलवरचे तिचे प्रेम, तिची निष्ठा, तिची भक्ती अगदी आर्य पतिव्रते प्रमाणेच आहे. म्हणूनच कादंबरीला 'टेस' असे नाव देऊन हार्डीने 'एक निष्पाप स्त्री' असे दुसरे उप-नाव दिले आहे.
कुमारी माता बेसेक्स परगण्यातील मॅरलॉट या खेड्यात राहणारी टेस ही एका खेडुताची साधी भोळी, तरुण कन्या. जॉन डर्बीफील्ड हा तिचा बाप जरा भ्रमिष्टच आहे. घरी दारिद्र्य आहे, अन्नान्नदशा आहे, कसलीही प्रतिष्ठा नाही. पण आपण इतिहासांत गाजलेल्या डर्बीफील्ड या मोठया सरदार घराण्यातलेच आहोत, असे त्याच्या मनाने घेतले आहे. आणि त्या जगातून भोवतालच्या दरिद्री जगात उतरण्यास तो मुळीच तयार नाही. टेसची आई जोन ही तितकी झपाटली नाही, पण तिच्या डोक्यात भ्रमण तेच आहे. त्यामुळेच तेथून काही मैलांवर राहणाऱ्या डरबरव्हिल नावाच्या एका श्रीमंत बाईच्या घरी तिने टेसला आग्रहाने पाठविली. टेसच्या हे मनात नव्हते. ती जाण्यास नाखूष होती. पण आईचा अतीच आग्रह झाला. म्हणून ती तिकडे गेली. आणि त्यामुळे त्या बाईचा मुलगा अलेक् यांच्या जाळ्यात सापडली. अलेक हा चंगीभंगी, मवाली असा, जुन्या श्रीमंत सरदार घराण्यातल्या वारसा सारखाच, बहकलेला तरुण होता. त्याने टेसला फसविले, रानात नेले ब तिच्यावर बलात्कार केला. आणि टेस कुमारी माता झाली. तिचे मूल लवकरच गेले. आणि अशा स्थितीत त्याच खेड्यात राहणे टेसला बरे वाटेना. म्हणून टॉलबोथे या दूरच्या एका गावी एक गोशाळा होती. तेथे नोकरीसाठी ती गेली. तेथेच एंजल क्लेअर या उदारमतवादी तरुणाची व तिची गाठ पडली.
माझी योग्यता नाही एंजल हा एका धर्मगुरुचा मुलगा. त्याचे थोरले भाऊ केंब्रिजला शिक्षण घेऊन नंतर धर्मगुरूच झाले होते. पण एंजलला धर्मगुरू व्हावयाचे नव्हते. त्याला शेतकरी व्हावयाचे होते. त्यासाठी प्रत्यक्ष अनुभव हवा म्हणून तो या गोशाळेत येऊन राहिला होता. टेस ही अतिशय देखणी होती. तिची शरीरयष्टी सुदृढ होती. आणि विनय, लज्जा, कामसूपणा हे स्त्रीचे सहज गुणही तिच्या ठायी असल्यामुळे प्रथमपासूनच एंजलचे मन तिच्यावर जडले. हळूहळू दोघांची मने जमत चालली. एंजल आपले प्रेम व्यक्त करू लागला. टेसच्या मनातही प्रेमोद्भव झाला. पण आपण कलंकिता आहोत, या जाणिवेने ती त्याच्यापासून दूर-दूरच राहू लागली. एंजलने तिला मागणी घातली तेव्हा तिने नकार दिला आणि तो कारण विचारू लागला तेव्हा ते सांगता येणार नाही असे ती म्हणाली. पण एंजल तेवढयावर तिला सोडण्यास तयार नव्हता. 'मी तुमच्या योग्यतेची नाही, तुम्ही शहरी, शिकलेले सुसंस्कृत आणि मी एक खेडवळ मुलगी' अशी कारणे ती सांगू लागली ती त्याला अगदीच पटेनात. तो म्हणाला, 'मला अशीच बायको हवी आहे. मी मोठा मळा. घेणार आहे. मला शेतकरी व्हावयाचे आहे. तुझ्यासारखी बायको मला मिळाली तर मी भाग्यच समजेन 'तरीही टेस होकार देईना. ती आता अतिशय प्रेमविव्हल झाली होती. पण तिला भीती वाटत होती. मागून आपले पूर्वचरित्र समजून सर्वनाश होण्यापेक्षा आजच नकार द्यावा हे बरे, असे तिला वाटत होते. पण हळूहळू तिचे मन तिच्या कह्यात राहीनासे झाले. क्लेअरसारखा तरूण आपल्याला पति म्हणून लाभतो आहे; आपण पुर्ववृत्त सांगितले तर आपला नाद सोडील व मग आपले जीवित निःसार होईल, याच्या यातनाही तिला असह्य होऊ लागल्या. आणि क्लेअरचा आग्रह तर वाढतच चालला होता. तेव्हा एक दिवस तिने सोक्षमोक्ष करण्याचे ठरविले. त्याला सर्व हकीकत सांगून टाकण्याचा तिने निर्धार केला. पण प्रत्यक्ष भेटीत तिचा निर्धार टिकला नाही आणि प्रेमाच्या लाटेत सापडून ती त्याला होकार देऊन बसली. पण घरी आल्यावर तिचे मन तिला खाऊ लागले. म्हणून मग तिने एका पत्रात आपले सर्व पूर्ववृत्त लिहून ते पत्र त्याच्या खोलीत टाकून दिले. आणि त्याची प्रतिक्रिया काय होते, ते ती निरखू लागली. पण तीन चार दिवस झाले तरी तो काहीच म्हणेना. उलट लग्नाची तयारी त्याने जारीने चालविली. तो खरेदीही सर्व करू लागला. तेव्हा आपले पत्र त्याला मिळाले नसावे, अशी टेसला शंका आली म्हणून तो नसताना ती त्याच्या खोलीत गेली तेव्हा पत्र सतरंजीच्या खाली तसेच पडलेले. तिला आढळले.
दोघेही कलंकित टेसच्या मनात आले की, देवाच्या मनातच आपले लग्न घडावे, असे दिसते आहे. तेव्हा आपण आता जिकीर करू नये. असे ठरवून तिने ते पत्र फाडून टाकले. तरीही राहवले नाही. म्हणून पुढच्या तीन चार दिवसात एंजलला एकीकडे गाठून, 'मला तुमच्यापाशी एक कबुली जबाब द्यावयाचा आहे' असे ती म्हणालीच. पण एंजलने ते मानले नाही. तो म्हणाला, 'आता आपण ते सर्व लग्न झाल्यावर पाहू. मलाही कबुली जबाब द्यावयाचा आहे. तेव्हा तू काळजी करू नकोस. लग्नानंतर आपल्याला पुष्कळ वेळ आहे.' एंजललाही कबुलीजबाब द्यावयाचा आहे हे ऐकून टेसचे मन जरा निश्चित झाले. आपण आधी सांगितले नाही यामुळे फारसे बिघडणार नाही, असे वाटून ती निष्पाप रमणी स्वस्थचिन्त झाली.
प्रायश्चित्त फक्त स्त्रीला लग्न झाले आणि एका लांबच्या मळ्यावरील मित्रांच्या रिकाम्या बंगल्यात ती दोघे मधुचंद्रासाठी गेली. एकमेकांवरील प्रेमाने दोघेही वेडी झालेली होती. स्वर्ग त्यांना ठेंगणा झाला होता. त्यांच्या सुखाला कसलीच सीमा राहिली नव्हती. टेसची रूपसंपदा, गुणसंपदा यांमुळे एंजल अगदी वेडा होऊन गेला होता. 'देवा, या मुलीचे मन यत्किंचितही दुखविण्याचे पाप माझ्या हातून होऊ देऊ नको.' अशी तो मनातल्या मनात प्रार्थना करीत होता. वडिलांनी भेट म्हणून पाठविलेले रत्नजडित दागिनें तो तिला स्वतः घालू लागला. त्या अलंकारांनी तर ती एखाद्या अप्सरेसारखी दिसू लागली. मग त्यांचा सुखसंवाद सुरू झाला आणि त्यातच एंजलला कबुली जबाबाची आठवण झाली. आणि तो टेसला काही सांगू लागला. तो म्हणाला, 'मी हे तुला लग्नापूर्वीच सांगायला हवे होते. पण मग तू मला दुरावशील अशी भीती वाटली. म्हणून नंतर सांगावे, असे मी ठरविले. त्यासाठी तू मला क्षमा करशील की नाही. पण करशील असं वाटतं.'
'एवढं काय त्यात. शंका कसली त्यात' टेसने आश्वासन दिलं. 'शंका नाही, खात्रीच आहे. पण...ते जाऊ दे एकदा सांगून टाकतो.' असे म्हणून, पूर्वी एकदा मन अत्यंत विषण्ण, उद्विग्न झाले असताना एका स्त्रीच्या सहवासात आपण दोन दिवस स्वैराचारात घालविल्याचे त्याने तिला सांगितले आणि पुन्हा एकदा क्षमायाचना केली. टेसने प्रेमभराने त्याचा हात हातात घेऊन शद्वाविनाच त्याला उत्तर दिले.
'तर मग आता हा विषय आपण मनातून काढून टाकू. आजच्या आनंदाच्या प्रसंगी तसले काही नकोच.'
'एंजल, एंजल, आता मीही सांगून टाकते. आता तुम्ही मला क्षमा कराल, यात मला शंका वाटत नाही. मलाही कबुली जबाब द्यायचा आहे असं मी पूर्वी तुम्हाला म्हटलंच होते. आठवतं ना ?"
'हो हो. नक्कीच आठवते. टाक सांगून एकदा.'
टेसने सर्व पुर्ववृत्त मोकळ्या मनाने सांगितले, अलेक डरबरव्हिलने केलेला अत्याचार, त्यापासून झालेले मूल, त्याचा मृत्यू... सर्व सर्व ! एंजलने कबुलीजबाब दिला होता. त्यामुळे तिला धीर आला होता. आपल्यासारखाच तोही कलंकित आहे, तेव्हा आपल्याप्रमाणेच तोही उदार मनाने आपल्याला क्षमा करील व प्रेमाने जवळ घेऊन त्याची साक्ष पटवील अशी तिची खात्री होती. पण पुरुष होता व ती स्त्री होती !
तिचे पूर्ववृत्त ऐकता ऐकता तो अगदी थंड होऊ लागले. त्याचे गाढ प्रेम ढासळू लागले. मन शुष्क होऊ लागले. दृष्टी शून्य होऊ लागली.
'टेस काय सांगते आहेस तू हे ? तू शुद्धीवर आहेस ना? असं होतं तर तू मला पूर्वीच का नाही ते सांगितलस ?, पण हो, तू सांगत होतीस. मीच तुला नको म्हटलं. खर आहे, खर आहे !'
टेसला धक्काच बसला. तिचा विश्वासच बसेना ! पण त्याच्या मुद्रेवरून तिला सर्व कळून चुकले. तिचा घसा कोरडा पडला. ओढत्या आवाजाने ती म्हणाली, मला क्षमा नाही का करणार तुम्ही ? हाच प्रकार असून मी नाही क्षमा केली ! तशीच मला...!
'टेस, हे क्षमेच्या पलीकडचं आहे. मी जिच्याशी लग्न केल ती तू नव्हेस. असल्या अपराधाला क्षमा ! हे कसं शक्य आहे?'
'का बरं असं ?' टेस कळवळून म्हणाली, 'तुमचं माझ्यावर प्रेम आहे, मग तुमच्याच्याने असं बोलवतं तरी कसं ! तुम्ही कसेही असलात तरी तुमच्यावरचं माझं प्रेम अभंग आहे. तुमचं प्रेम असं नाही का ?'
'पुन्हा तुला सांगतो. मी जिच्यावर प्रेम केलं ती तू नव्हेस !'
अशा रीतीने पहिल्याच रात्री एंजल आणि टेस याचा संसार संपला आणि तिचा त्याग करून एंजल ब्राझीलला निघून गेला. कादंबरीच्या या विभागाचे नाव 'प्रायश्चित्त तेवढे स्त्रीला' असे हार्डीने दिले आहे.
विषम नीतीचे, स्त्री जीवनातल्या त्या कटू अन्यायाचे, त्या घोर सामाजिक अन्यायाचे दर्शन हार्डीने कसे घडविले, ते येथे स्पष्टपणे दिसले. त्या दृष्टीने कथाभाग तेथे संपला आहे. पण या कादंबरीच्या उत्तरार्धावरून साहित्यातील जीवन भाष्यासंबंधीचा एक महत्त्वाचा विचार मनात येतो. तो विशद करण्यासाठी उत्तरार्धाचाही येथे विचार करावयाचा आहे.
क्लेअर निघून गेल्यावर टेसने दुसऱ्या एका मळ्यावर नोकरी धरली. ही नोकरी फार कष्टाची होती, मालक फार कजाग होता. त्यामुळे तिचे फार हाल होऊ लागले. तरी तिची पतीवरील भक्ती कमी झालो नाही. तिच्या मैत्रिणी याविषयी बोलताना क्लेअरला दोष देत. पण टेस त्याचा पक्ष घेऊन त्यांना मोडून काढीत असे. तिने स्वतःचे केस असे विचित्र कापून घेतले की, ती विरूप दिसू लागली. पण ते तिने हेतुतःच केले होते. ती म्हणे, 'एंजल इथे नाहीत, मग रूप करावयाचे काय ? त्यांचे माझ्यावर प्रेम नाही पण माझे त्यांच्यावरचे प्रेम रतिमात्र कमी झालेले नाही.' तिच्या हातातली अंगठी पाहून तिच्या पतीची लोक चवकशी करीत. मग बोलण्याला अप्रिय वळण लागे. टेसला ते सहन होत नसे. म्हणून तिने अंगठी हातातून काढून गळ्यातल्या साखळीत अडकवून ठेविली.
नियतीचा खळ ती असे दिवस कंठीत असताना अलेक डरबरव्हिल हा तिला भेटला. त्यानेच तिच्यावर अत्याचार केला होता. आणि तोच तिच्या सर्व नाशाला कारण झाला होता. पण आता तो धर्मगुरु झाला होता. व गावोगाव पुराण सांगत, प्रवचने करीत हिंडत होता. अशा भ्रमंतीतच त्याची टेसशी गाठ पडली. तिचे कष्ट पाहून तिच्याविषयी त्याला सहानुभूती वाटू लागली. आता त्याच्या मनात थोडे परिवर्तन झाले होते. त्यामुळे आपल्यामुळे टेसचा संसार मोडला कळताच, त्याला फार दुःख झाले. तसे त्याने टेसजवळ बोलूनही दाखविले, तिची क्षमा मागितली व भरपाई म्हणून तुला वाटेल ते साह्य करण्यास मी तयार आहे असे तिला सांगितले, पण टेस त्याच्या वाऱ्यालाही उभी राहिली नाही. तो एंजलवर थोडी टीका करू लागताच तिने त्याला हाकलून दिले, व पुन्हा माझ्याकडे येऊ नको, असे बजावले. पण त्याने ते मानले नाही. तो वरचेवर तिच्याकडे येऊ लागला व तिच्याबद्दल अत्यंत प्रेम व सहानुभूती दाखवू लागला. आणि दोनचार भेटीनंतर त्याने तिला लग्नाची मागणीही घातली. टेस तेव्हा फारच संतापली. तो निघून गेला. पण आता टेसची परिस्थिती हळूहळू बिकट होऊ लागली. तिची नोकरी गेली. म्हणून ती माहेरी परत गेली. तेथे तिचे वडील आजारी होते आणि थोड्याच दिवसात ते वारले. त्याबरोबर माहेरचा तिचा आधारही संपला. अशा स्थितीत तिला भीती वाटू लागली की, एखादेवेळी आपण अलेकची मागणी मान्य करू. म्हणून तिने एंजलला अत्यंत आर्जवाचे एक पत्र लिहिले. तुमचा राग अजून गेला नाही का ? मी फार मोठ्या संकटात आहे. तुम्ही परत या व मला घेऊन जा. तुमची पत्नी म्हणून तुम्हाला मी नको असले तर तुमची दासी म्हणून मी रहायला तयार आहे. पण तुम्ही या. नाहीतर काय होईल हे माझे मलाच सांगता येत नाही.'... आणि दैवदुर्विलासाने तसेच झाले. वडील वारले तेव्हा घर गहाण होते. सावकाराने तगादा लावून डरबरव्हिल कुटुंबाला बाहेर काढले. अन्यत्र जागा पहावयाची तर आता गावातले लोक टेसच्या भ्रष्टतेवर उघड टीका करू लागले. तेव्हा आपण घरी आल्यामुळे आईला व भावंडांना उघड्यावर पडावे लागणार, हे भवितव्य टेसला दिसू लागले. अशा स्थितीत अलेकच्या खेपा चालूच होत्या. त्याचे प्रिया धनही चालू होते. 'माझ्या घरात तुम्ही सर्व रहा,' असेही तो म्हणाला. तेव्हा टेसचे मन डळमळू लागले. आणि आज इतक्या दिवसांनी तिला एंजलचा राग आला. इतके दिवस तिने त्याला कधी दोष दिला नव्हता. 'मीच तुमच्या योग्यतेची नव्हते, मला प्रायश्चित्त मिळाले ते योग्यच झाले' असे ती म्हणत असे. आता मात्र तिचा धीर सुटला. आणि आपल्यावर एंजलने घोर अन्याय केला आहे असे तिला वाटू लागले. तिने त्याला तसे पत्रही लिहिले. 'एंजल तुम्ही निष्ठुर आहा. क्रूर आहा. मी जाणून बुजून पाप केले नव्हते, हे तुम्हाला माहीत होते. तरी तुम्ही मला टाकले, हे अगदी अक्षम्य आहे. मी तुम्हाला आता विसरून जाईन. तुम्ही केलेला अन्याय अगदी असह्य आहे.'
मन असे फिरल्यामुळे आणि आई व भावंडे यांना अलेककडे आसरा मिळेल हे दिसल्यामुळे आणि एंजल परत येण्याची आशा समूळ नष्ट झाल्यामुळे, टेसने शेवटी अलेकची मागणी मान्य केली, ती त्याची झाली.
आणि चारपाच दिवसातच एंजल परत आला. त्याला पूर्ण पाश्चात्ताप झाला होता. तिकडे शेतीत त्याला मुळीच यश आले नव्हते. आणि आपण टेसवर भयंकर अन्याय केला आहे, अशी रुखरुख लागल्यामुळे त्याची भरपाई करण्यासाठी, पुन्हा संसार मांडून तिला सुख देण्यासाठी तो परत आला होता. त्यावेळी अलेकसह टेस एका शहरातल्या हॉटेलात रहायला गेली होती. तिचा पत्ता काढीत काढीत एक दिवस एंजल तिच्यापुढे येऊन उभा राहिला ! तिने पुन्हा लग्न केले आहे हे त्याला माहीत नव्हते. त्यामुळे, 'मला क्षमा कर, आपण पुन्हा संसार मांडू. माझ्यावर राग धरू नको' असे तिला विनवू लागला. पण वस्तुस्थिती टेसच्या कडून समजताच अत्यंत निराश होऊन तो निघून गेला.
पण तो गेल्यावर टेसच्या मनातील पतिभक्ती पहिल्याप्रमाणे पुन्हा उचंबळून आली व तिला अलेकचा पराकाष्ठेचा संताप आला. ती लग्नाला तयार नव्हती; पण 'एंजल परत येणे शक्य नाही, तू त्याचा नाद सोडून दे,' असे अलेकने परोपरीने सांगून तिचे मन वळविले होते. तेव्हा आपल्याला खोटे सांगून या चांडाळाने पुन्हा आपला सर्वनाश केला असे मनात येऊन ती भडकून गेली. पिसाट झाली. अलेक अजून निजला होता. त्या खोलीत ती त्वरेने गेली. चीड, संताप, उद्वेग, यांनी तिचे भान हरपले होते. त्या भरात तिने तेथला सुरा उचलला व घावावर घाव घालून अलेकचा खून केला आणि एंजल गेला त्या दिशेने ती धावत गेली.
एंजलला तिने सर्व हकीकत सांगितली तेव्हा तो स्तंभितच झाला. पण त्या क्षणी त्याने सर्व मनाआड केले व प्रेमभराने तिला त्याने जवळ घेतले. मग तसेच ते दोघे भटकत गेले. कधी एखाद्या खानावळीत, कधी एखाद्या जुन्या पडक्या घरात, कधी चर्चच्या आवारात त्यांनी चार पाच दिवस काढले. आपल्याला पकडण्यास पोलीस येतील हे टेसला माहितच होते. पण एंजलचे प्रेम परत मिळाले, यांतच ती संतुष्ट होती. त्या दिव्य प्रेमाचा एक क्षण तिला पुरे होता. तो तिला लाख मोलाचा वाटत होता. आणि त्याच स्थितीत मरण यावे, असे तिला वाटत होते. कारण तिला वाटे, न जाणो पुन्हा काही कारण होऊन एंजल आपल्याला टाकील. म्हणून मरण आले तर बरेच असे ती म्हणे. आणि ते अटळच होते. पाच दिवसांनी पोलिसांनी तिचा माग काढलाच. त्यांना पाहताच एंजलचा निरोप घेऊन ती त्यांच्या स्वाधीनं झाली.
सत्याचा आधार नाही हार्डीने या कथेचा हा जो विचित्र शेवट केला आहे त्यावर पुष्कळ टीका झाली आहे. अनेक टीकाकारांना या कथेचा उत्तरभाग अवास्तव वाटतो. एंजलला पश्चात्ताप झाला होता व तो परत आलाही होता. टेसने इतके दिवस धीर धरला तसा आणखी सात आठ दिवस धरला असता तर तिचे पतीशी सुखाने मीलन झाले असते. व मध्यंतरीचे वर्ष दीडवर्ष पुढे पूर्ण विस्मृतीत जाऊन त्यांचा संसार सुखाचा झाला असता. पण हार्डीने तसे होऊ दिले नाही. तीन चार दिवसाच्या चुकामुकीने तो सुयोग हुकला आणि टेसचा अत्यंत भयानक शेवट झाला, असे त्याने दाखविले आहे. आतां कोणी असे म्हणेल की यात अवास्तव काय आहे ? दुर्दैवाने असे कधी कधी घडते. थोडक्यात चुकामूक होऊन अनेक वेळा लोकांच्या सर्व आयुष्याचा सत्यनाश होतो. तेव्हा हार्डीने यात विचित्र असे काय केले आहे ? हे म्हणणे खरे आहे. कधी कधी असे घडते, यात शंका नाही. तेव्हा हार्डीने केलेला जो टेसच्या कथानकाचा शेवट त्यावर आक्षेप घेता येणार नाही. हार्डीने या एकाच कथेचा असा शेवट घडविला असे असते तर त्यावर कोणी आक्षेप घेतला नसता. पण हार्डीने त्याचे तत्त्वज्ञान बनविले आहे, त्याचे हे जीवनाचे भाष्यच आहे. आणि ते मात्र आक्षेपार्ह आहे. कारण ते अवास्तव आहे.
हार्डीचे तत्त्वज्ञानच असे आहे की, दैव आणि मनुष्य या झगड्यात दैव ही अत्यंत क्रूर, निर्दय, आत्मशून्य, हृदयहीन, पण तितकीच समर्थ अशी शक्ती आहे आणि माणूस हा तिच्या हातातले एक खेळणे आहे. मांजर उंदराचा खेळ करते तसा दैव माणसाचा खेळ करीत असते. आणि त्याला त्यात मौज वाटेनाशी झाली की ते शेवटी माणसाला चिरडून फेकून देते. हार्डीने अनेक कादंबऱ्या लिहिल्या; पण त्या सर्वांत या एकाच सिद्धान्ता अन्वये त्याने त्यातील व्यक्तिरेखांची भवितव्ये घडवून टाकली आहेत. माणूस कधी दैवावर मात करतो, दैव दुष्टयोग आणते तसे कधी सुयोगही आणते हे त्याला मान्यच नाही. पण जीवनात, प्रत्यक्ष संसारात हे सर्व प्रकार नित्य घडत असतात. त्यामुळे हार्डीचे हे जे तत्त्वज्ञान आहे त्याला सत्याचा आधार नाही.
ठरीव साचा डेव्हिड सेसिल या इंग्लिश टीकाकाराने 'हार्डी दि नॉव्हेलिस्ट' या नावाचा टीकात्मक ग्रंथ लिहिला आहे. हार्डीच्या कादंबरी कलेविषयी, त्याच्या प्रतिभेविषयी सेसिलला फार आदर आहे. पण त्याच्या तत्त्वज्ञानावर त्याने परखड टीका केली आहे. तो म्हणतो, 'जीवनाविषयीचा हार्डीचा हा जो दृष्टिकोन त्यामुळे हार्डीच्या कादंबरीचा एक ठरीव साचा होऊन बसला. दैव व मानव यांचे कायमचे द्वंद्व आणि त्या द्वंद्वात मनुष्याचा अंती निश्चित पराभव, असा हा साचा आहे. आणि हेच त्याचे जीवनाचे भाष्य आहे. त्याने प्रेम वर्णिले आहे ते असेच. प्रेम ही एक आंधळी व दुर्दम अशी शक्ती असून हार्डीच्या सर्व रेखा तिनेच प्रेरित झालेल्या असतात. आणि या आंधळ्या शक्तीने प्रेमी व्यक्तीचा अंती सर्वनाश व्हावयाचा हेही जवळ जवळ ठरलेले आहे. हार्डीच्या सर्व साहित्याच्या पाठीशी हा अंधसिद्धान्त, हे ब्रह्मवाक्य कायमचे दिसते. 'विश्वशक्ती ही क्रूर, हृदयशून्य आहे' या सिद्धान्ताच्या चौकटीत तो प्रत्येक कथा ठोकून बसवितो. त्यामुळे त्याचे कथानक पुष्कळ वेळा प्रतीतीशून्य होतं. याचे सर्वात विदारक उदाहरण म्हणजे 'टेस' हे होय. अलेकचे परिवर्तन त्याने इतके आकस्मिक दाखविले आहे की, त्यावर विश्वासच बसत नाही. हे मुद्दाम जमविले आहे असे वाटते. दर ठिकाणी हार्डी असेच करतो. संभाव्यतेचा तो लवमात्र विचार करीत नाही.'ज्यूड' चा अंत त्याने असाच घडविला आहे. त्याला एक गोष्ट दाखवावयाची आहे की माणूस हा दैवाचा बळी असतो. आणि ते दाखविण्यासाठी तो कथानकाला वाटेल ते वळण देतो, वाटेल ते पिरगळे मारतो. लेखक स्वतःच्या दृष्टिकोनातूनच साहित्यात जग रंगवितो हे खरे. पण त्याचे जग व सत्य जग यांचा समन्वय झाला नाही तर साहित्यात वास्तवता येत नाही. आणि मग वाचकांच्या मनावरची कथेची पकड निसटू लागते. टेसच्या बाबतीत असे फार झाले आहे.
निकष हार्डी हा जीवनाचा चांगला भाष्यकार आहे असे मला वाटत नाही. मानवी जीवन हे कोठल्या तरी एका चवकटीत बसवता येईल, असे ज्याला वाटते त्याला ते जीवन कळले आहे, असे म्हणता येत नाही. दैव नावाच्या एका क्रूर शक्तीच्या हातचे मनुष्य हे एक खेळणे आहे, असे शेक्सपीयरनेही म्हटले आहे. पण ते जीवनाच्या एका अंगाचे दर्शन झाले. आपल्या अनेक नाटकातून जीवनांची सर्व अंगोपांगे शेक्सपीयरने दाखविली आहेत. म्हणून तो महाकवी झाला. हार्डीला ती पदवी कधीच देता येणार नाही. डेव्हिड सेसिल याने हार्डीच्या कादंबऱ्यातील आणखीही वैगुण्ये दाखविली आहेत. समाजातील वरच्या पातळीवरची माणसे, श्रेष्ठ दर्जाच्या व्यक्ती त्याच्या कादंबऱ्यात येतच नाहीत. अगदी सामान्य पातळीवरचा, जीवनक्रमच फक्त तो रंगवितो. त्यामुळे शिल्लक राहिलेले जगच फार मोठे आहे. शिवाय गुंतागुंतीची मिश्र मनोरचना तो उकलू लागला की नक्कीच गोंधळ करतो. ती शक्ती त्याच्या लेखणीला नाही. म्हणजे एकंदरीत पाहता हार्डीने निर्मिलेले विश्व फार लहान आहे, संकुचित आहे, त्याच्या साहित्यात खऱ्या अमर्याद विश्वाचे दर्शन घडतच नाही. तरीही 'टेस' कादंबरीचा या प्रबंधात समावेश केला त्याचे कारण असे की, स्त्रीपुरुष विषमनीती हे जे सामाजिक जीवनाचे जे एक महत्त्वाचे सूत्र त्याचे उत्तम दर्शन प्रारंभीच्या भागात त्याने घडविले आहे. त्याचबरोबर थोर जीवन भाष्याचा एक महत्त्वाचा निकष सांगता यावा, त्याविषयी चर्चा करावी हाही एक हेतू त्यात होताच.
३ भारतीय स्त्री हरिभाऊंनी आपल्या 'पण लक्षात कोण घेतो' व 'मी' या कादंबऱ्यांत महाराष्ट्रतल्या ब्राह्मण स्त्रीच्या जीवनाचे वर्णन केले आहे. हरिभाऊंच्या सर्व सामाजिक कादंबऱ्यांचा हाच विषय आहे. पण साहित्य कलेच्या व जीवन भाष्याच्या दृष्टीने या दोन कादंबऱ्या विशेष महत्त्वाच्या आहेत हे महाराष्ट्रात सर्वमान्य झाले आहे. त्यामुळे येथे त्याच दोन कादंबऱ्यांची निवड केली आहे. इब्सेनचे 'डॉल्स हाऊस' व हार्डीची 'टेस' या ललितकृतीत पाश्चात्य समाजातील गेल्या शतकातल्या स्त्रीच्या जीवनाचे दर्शन घडते. तेथेही गेल्या शतकात स्त्री ही पराधीन होती, तिचे जिणे एखाद्या बाहुलीसारखे होते, पुरुषांच्या सुखासाठीच तिचा जन्म, तिला स्वतंत्र अस्तित्व नाही, अशा समजुती रूढ होत्या व पुरुषांची वागणूकही तशीच होती. स्त्री पुरुषांच्या विषयीची नीती पराकाष्ठेची भिन्न होती. शीलभ्रष्ट, व्यभिचारी पुरुष हा सहीसलामत मोकळा सुटणे व स्त्रीला मात्र अनिच्छेने घडलेल्या पातकाबद्दलही घोर प्रायश्चित्त भोगावे लागणे हा प्रकार नित्याचाच होता. असे असूनही युरोपीय स्त्रीकडून भारताकडे वळलो व महाराष्ट्रीय स्त्रीचे जीवन पाहू लागलो म्हणजे युरोपातली विषमता तेथला अन्याय, तेथल्या क्रूर रुढी, तेथला छळवादी सनातन समाज आणि या सर्वामुळे स्त्रीला सोसाव्या लागणाऱ्या यातना या भारतीय स्त्रीच्या यातनांच्या तुलनेने काहीच नव्हेत असे वाटू लागते. नोरा ही, 'माझ्या जीवनाचा मला स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे,' असे शांतपणे पतीला सांगून घरातून बाहेर पडते. आणि तिने असे करू नये अशा, तिचा पती तिच्या विनवण्या करतो. भारतात असे दृश्य केव्हाच दिसले नसते. अगोदर संकट टळून पतीने, आपला राग गेला, असे सांगितल्यावर भारतातली स्त्री आनंदाने घरात राहिली असती. घर सोडून जाण्याचा विचार तिच्या स्वप्नातही आला नसता. नोराचा गृहत्याग हा केवळ तात्विक भूमिकेने केलेला होता. अशी तात्विक भूमिका घेण्याइतकी उंची भारतीय स्त्रीला गेल्या शतकात आलेलीच नव्हती. भाऊरावांची बहीण ताई हिने पतीचे घर सोडले होते. पण ते केवळ यातना असह्य झाल्या म्हणून. पतीचा सुनीमच तिचा धनी होऊ लागला म्हणून. पतीच्या वेश्यांची सेवा तिला करावी लागत होती, आणि ती न केल्यास मार खावा लागत होता म्हणून नोराच्या व ताईच्या भूमिकेत जमीन अस्मानाचे अंतर आहे. हार्डीची टेस ही परित्यक्ता होती. पण महाराष्ट्रातली ब्राह्मण परित्यक्ता व ती इंग्लिश परित्यक्ता यांची कोठल्याच दृष्टीने तुलना होणे शक्य नाही. टेस ही कोठेही जाऊन नोकरी करीत होती. आपले भवितव्य ठरविण्याचे स्वातंत्र्य तिला होते. आणि तिच्या मैत्रिणी तिला वाटेल ते साह्य करण्यास तयार होत्या आणि ती कलंकित, भ्रष्ट असूनही तिच्या पतीने तिचा शेवटी स्वीकार केला होता. गेल्या शतकात महाराष्ट्रात हे घडणे अशक्य होते. आणि आजही जवळजवळ अशक्यच आहे. हे सर्व मनात येऊन भारतीय स्त्रीचे जीवन गेल्या शतकातल्या युरोपीय स्त्रीच्या जीवनापेक्षा शतपटीने, अनंतपटीने जास्त दुःसह होते, यातनामय होते याविषयी शंका रहात नाही. याच जीवनाचे हरिभाऊंनी वर्णन केले आहे.
सुख केव्हा लागेल ? यमूची मैत्रिण दुर्गी हिला जीवन असह्य झाले होते. नवरा उनाड होता. त्याने शाळा कधीच सोडून दिली होती. दोन पैसे मिळवण्याचीही अक्कल त्याला नव्हती. दोन वेळा जेवायला मात्र तो हक्काने घरी येत असे. आईला वाटेल ते बोलत असे आणि दुर्गाला मारझोड करीत असे. त्यातच तिला दिवस गेलेले. दोन वेळच्या अन्नालाही ती महाग झाली होती. बाळंतपणासाठी आईने तिला माहेरी आणली होती. पण ते तिच्या नवऱ्याला आवडले नव्हते. ती माणसे आपल्या श्रीमंतीचा गर्व दाखवितात, असे त्याला वाटत होते. म्हणून तो रोज तिच्या माहेरी जाऊन अद्वातद्वा बोलत असे, भांडत असे. 'तू घरी चल इथे माहेरी राहायचं नाही, यांचं मला तोंड पाहायचं नाही,' हाच त्याचा घोशा. एक दिवस तर तो तिला ओढीत नेऊ लागला. आणि तिच्या आईने जरा जोरात विरोध केला तेव्हा तो शिव्या देत निघून गेला. यामुळे दुर्गी कंटाळून गेली होती. यमू तिला धीराचे दोन शब्द सांगू लागली तेव्हा अत्यंत उद्वेगाने ती म्हणाली, "यमे, तुला सांगू मला केव्हा सुख लागेल ते ? हे बघ, एक मी तरी मेले पाहिजे, नाहीतर तिकडे तरी काही बरं वाईट झालं पाहिजे. त्याच्याखेरीज काही या हालांतून सुटका नाही. मी या बाळंतपणात मेले तर बरी, नाहीतर काहीना काही तरी आपल्या जिवाला करून घेईन."
यमूला तिचे ते शब्द भयंकर वाटले. पण थोडावेळाने ती मनात म्हणाली, 'आजपर्यंतच्या छळाने अगदी त्रासलेली, जाचाने गांजलेली, दुःखाने भाजलेली, शिव्यांनी डागलेली अशी ती मुलगी संतापाच्या भरात तसे बोलली तर त्यात नवल काय ? सध्याच्या यातनापेक्षा वैधव्याच्या नरक यातना बऱ्या वाटाव्या अशीच तिची स्थिती होती.'
सुटले मी ! यमुनेचे सासरे शंकर मामंजी यांची बायको उमाबाई ही अशीच गांजलेली स्त्री होती. नवऱ्याच्या शिव्याशापांना साऱ्या जन्मात तिला प्रत्त्युत्तर करता आले नव्हते. ते शक्यच नव्हते. पण ते मरताना तिने केले. अर्धवट बेशुद्धीतच ती म्हणाली, 'एक जन्म होते तुमच्या पदरी. सुटले बरं आता. खुशाल असा.' शंकर मामंजी हा नरपशूच होता. आजारीपणामुळे नुसते पूजेचे करायला उशीर झाला तरी तो तिच्या अंगावर धावून जात असे. वाटेल तशा शिव्या देत असे. मुलांना बोलायचाही तिला अधिकार नव्हता. तिला उलटून बोलायला तो मुलांना चिथावून देत असे. त्यामुळे ती पोरटीही तिला वाटेल ते बोलत. बाहेरख्यालीपणा त्याचा नित्याचाच होता. पण एकदा त्या बाईला त्याने घरी आणून बायकोला तिची बडदास्त ठेवायला लावले.
यमू म्हणते, "त्या शब्दात उमासासूबाईनी आपल्या सर्व आयुष्याच्या अनुभवाचे सार कोंडून ठेविले होते. मला वाटते. असे शब्द उच्चारले जावोत न जात, परंतु असा विचार किती तरी स्त्रियांच्या मनात येत असेल. त्यातून उमा सासूबाईच्या स्थितीसारख्या स्थितीत असणाऱ्या स्त्रियांना तर मरणे म्हणजे यातनांतून असे वाटत असेल यात शंकाच नाही."
गुरांचा बाजार यमू सात आठ वर्षाची झाली तेव्हा तिला पहायला येण्यास सुरवात झाली. यमूने स्वतःच या पाहण्याचे वर्णन केले आहे. चालायला सांगतात, श्रावायला सांगतात, तोंड उघडून जीभ पाहतात. हे सर्व प्रकार सांगून ती म्हणते, 'गुरांच्या बाजारात कसाई लोक मेंढरी बकरी घेतात त्यावेळी त्यांची कशी परीक्षा करतात ते मला ठाऊक नाही. पण मी जे ऐकले आहे त्यावरून मला वाटते की; आम्हा मुलींना पहायला येणारी मंडळी आमची जी परीक्षा करतात ती अगदी त्याच मासल्याची असली पाहिजे. अंतर एवढेच की त्या गुरांना कळत नसते आणि आम्हा मुलांना कळत असते.' दुर्गाला पतीच्या हातचा नेहमी मार खावा लागे. ते ऐकून यमूच्या पोटात घस्त होई. आपल्याही कपाळी हेच येणार काय ? लग्न होऊन ती सासरी गेली होती पण अजून तिचा पतीशी ओळख झाली नव्हती. तरी तिला असे वाटे की, आपल्या नशिबी बहुधा तसे दुःख नाही. दुरून होणाऱ्या दर्शनावरून तिने हा अदमास बांधला होता. पण या सुखद अदमासाविषयी लिहितानाही तिने स्त्रीजीवनाविषयी किती कडवटपणे लिहिले आहे पहा. ती म्हणते, 'असे म्हणण्याचे कारण मला सांगता येणार नाही. त्याला आमच्या जन्मास येऊन आमच्या स्थितीतच असले पाहिजे. पाळीव जनावराला आपल्या धन्याच्या मर्जीच्या निरनिराळ्या अवस्था जशा उपजत बुद्धीनेच समजतात त्याचप्रमाणे आमची स्थिती आहे. जसे एखाद्यास एखादे कुत्रे बाळगायचे असले म्हणजे तो लहानपणीच पिल्लू घरात आणून ठेवतो तशी हुबेहूब आमची स्थिती आहे. कुत्र्याला मायेने तरी वागवितात येथे त्यावाचून सारे ठीक असते. अमुक आपला धनी म्हणून त्याच्या पुढे पुढे करण्यास व त्याची मर्जी संभाळण्यास शिकविले जाते, तसेच आम्हाला शिकविले जाते.
पती ? एकंदर पतीविषयी अशी धारणा असल्यामुळे व दुर्गाचे उदाहरण डोळ्यासमोर असल्यामुळे, एका चमत्कारिक प्रसंगी यमुनेला आपले पती रघुनाथराव आपल्याला मारण्यासाठीच आले आहेत असेच वाटले. घरात तिची काही चूक नसताना एक दिवस तिला फार बोलणी बसली. त्या जुन्या काळच्या पद्धतीप्रमाणे तिच्या आईबापांचाही उद्धार झाला. त्यामुळे एका अंधाऱ्या खोलीत जाऊन ती रडत बसली होती. रघुनाथरावांनी ते पाहिले. तिची काही चूक नाही हे त्यांना माहीत होते. म्हणून कोणाला नकळत ते तिची समजूत घालावी, दोन गोड शब्द बोलून तिला धीर द्यावा, या बुद्धीने त्या खोलीत गेले. पण त्यांना पाहताच ती अतिशय घाबरून गेली व 'मला मारू नका' म्हणून, केविलवाण्या स्वरातः त्यांना विनवू लागली.
वैधव्य हिंदुसंस्कृती आणि तिची ती विवाहसंस्था यावर यापेक्षा कडवट टीका ती काय असणार ! प्रत्यक्ष विवेचन करून हरिभाऊंनी स्त्रीजीवनावर भाष्य केलेच आहे. पण अशा प्रसंगांतून त्याचे अत्यंत उद्बोधक दर्शन घडविले आहे. यमुनेला वैधव्य आल्यानंतर तिची जी स्थिती झाली व तिच्यावर जे विपरीत प्रसंग आले त्यांचे जे हरिभाऊंनी वर्णन केले आहे ते म्हणजे आगरकरांनी 'हिंदुधर्म हा अत्यंत बीभत्स, अमंगल, ओंगळ आहे' अशी जी टीका केली आहे. तिला दिलेले मूर्त रूपच होय. विधवा झालेली स्त्री म्हणजे करुणमूर्तीच होय. दया, सहानुभूती, आपुलकी, प्रेम, स्नेह यांनी तिचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करणं हाच खरा धर्म होय. तशी तत्त्वे हिंदुधर्मात सांगितलेलीही आहेत. पण अत्यंज, शूद्र, स्त्रिया यांचा संबंध आला की, हा धर्म रानटाहून रानटी, क्रूराहून क्रूर, असा होतो. दया, क्षमा, शांती, सर्वाभूती एक आत्मा ही तत्त्वे तो जाणीत नाही, माणुसकीची त्याला आठवण रहात नाही, औदार्य, उदात्तता, करूणा हे शब्दही त्याला सहन होत नाहीत. यमुनेने एके ठिकाणी म्हटले आहे की, 'आम्ही गरीब गाई, कसायाच्या हाती दिल्या. तरी काय करणार ?' पण राक्षसी रूढीच्या वर्चस्वाखाली असलेल्या यमुनेच्या आप्त स्त्रीपुरुषांनी, सनातन धर्ममार्तडानी कसाई बरे, असे म्हणण्याची पाळी आणली. रघुनाथराव जाऊन चार दिवस झाले नाहीत तो शंकरमामंजीनी त्यांच्या पेट्या ट्रंका उघडून घरातले दागिने तर गडप केलेच पण 'तू जनरीतीप्रमाणे सगळ करून घे' (वपन करून घे) असाही भुंगा तिच्या मागे लावला. 'जिवंतपणी त्याच्याकडून पापं करविलीस तेवढी थोडी नाही झाली ? आमच्या कुळाला डाग लावू नको अशा डागण्या तो नरपशू त्या स्थितीतही तिला देऊ लागला. पण विधवा स्त्रीला डागण्या देण्यास नरपशूच लागतो असे नाही. त्यावेळी सर्वच नरपशू झालेले असतात. स्त्रियाही यावेळी पुरुषांच्या मागे रहात नाहीत. 'माझे पुढले चरित्र म्हणजे नरक यातनापेक्षाही जास्त अशा यातना आहेत,' असे यमुना म्हणाली ते यामुळेच. सर्वांनी विशेषतः बायकांनी तिला असे शब्द ऐकविले की, तिच्या काळजाला घरे पडावी. 'बायको आहे की नाही टवळी, तो कुठली मरायला ? अहो, पाप, पाप ते काही दूर आहे का ? हेच पाप !' यमुना सासरी गेली तेव्हा ती रडतच होती. तेव्हा बनुवन्सं म्हणाल्या, 'हे ग काय हे, आमच्या भरल्या घरात तीन्ही सांजा रडतेस काय अवदसे सारखी ? तुझं कपाळ फुटलं म्हणून आमच्या घरात का त्रास?' यमुनेची सासू दुःखामुळे अंथरूण धरूनच होती. तिने पाणी मागितले ते यमुनेने दिले. तेव्हा भयंकर गहजब झाला. वपन न केलेल्या बाईच्या हातचे पाणी एका सोवळ्या बाईच्या मुखात ! आजे सासूबाई कडाडल्या, 'डोक्यावर ठेवलेल्या भाराचं एकदा निसंतान कर अन मग आमच्या घरात कारभार कर. अवदसेनं नुसता उच्छाद मांडला आहे.' म्हातारपणामुळे माणसांचें मन मृदु होते, त्याला चटकन कणव येते, असे म्हणतात. पण हिंदुधर्माला हे मंजूर नाही. स्त्रियांच्याही बाबतीत नाही. यमुनेची आजेसासू, मामेसासू इतर शेजारपाजारच्या बाया दया, कणव, मृदुता हा शब्दच त्यांच्या कोशात नव्हता. कारण यमुना विधवा झाली होती आणि तिने वपन केले नव्हते.
अधर्म शंकर मामंजीनी शेवटी जबरदस्तीने ते धर्मकृत्य घडवून आणले व कुळाचा कलंक नाहीसा केला. त्यांची बायको वारली होती. तेव्हा म्हातारपणी त्यांनी तेराचदा वर्षाच्या एका मुलींशी लग्न केले. आता तिचे गर्भाधान व्हावयाचे होते. पण त्याच्या घराण्यातली एक विधवा वपनाशिवाय राहिली होती. म्हणून ब्राह्मण त्या धर्म कृत्याला येईनात. शंकर मामंजी बाहेरख्याली होते, एकदा घरातही त्यांनी एक बाई आणली होती. पण त्यामुळे या घरावर बहिष्कार टाकावा, असे ब्राह्मणांना कधीच वाटले नव्हते. पण त्या घरातली एक सून वपनाशिवाय राहिली होती, हा अधर्म त्यांना फार भयंकर वाटत होता. तरी यमुना माहेरी होती. त्या घरात नव्हती. पण कोठेही असली तरी तो कुळाला कलंकच होता. त्यामुळे ब्राह्मणानी शंकर मामंजीच्या घरावर बहिष्कार टाकला. तेव्हा यमुनेला सासरी बोलावून फसवून एका खोलीत नेऊन जबरदस्तीने शंकरमामंजींनी न्हाव्याकडून तिला सोवळी करून टाकली. अर्थातच या पुण्यवान कृत्यामुळे ते घर, ते कुळ पावन झाले, ब्राह्मण धावत आले.
नवे संस्कार 'मी' कादंबरीतील भाऊरावांची बहीण ताई हिची स्थिती प्रारंभी यमुनेसारखीच होती. यमुनेला एकदा आपल्याला म्हाताऱ्याला देणार अशी नुसती भीती वाटली होती. ताईला म्हाताऱ्याला दिलीच होती. त्याच प्रसंगी असहायपणे ती भावाला म्हणाली होती की, 'बाबारे आम्ही घरात बांधलेली मुकी जनावरे ! कोणी मारलं मार खाल्ला पाहिजे. जा म्हटलं गेलं पाहिजे, नको म्हटलं थबकलं पाहिजे.' तिचे त्या म्हाताऱ्याशी लग्न लागले त्याचे वर्णन, 'भटांच्या शुभ-मंगलसावधानच्या गजरात आमच्या ताईचे बलिदान झाले,' असे भाऊने म्हणजे हरिभाऊंनी केले आहे. ताईचा नवरा जुन्या सरदार घराण्यातला होता. तो म्हातारा होता. बाजारबसव्यांना घरी आणून ताईला त्याची सेवा करायला लावीत होता. त्यामुळे एरवी असहाय, दीन, अशा स्त्रियाप्रमाणेच, दुर्गा, शंकरमामंजीची बायको उमाबाई यांच्याप्रमाणेच, तिचेही चरित्र व्हावयाचे. पण तिच्या या चरित्रात इतर स्त्रियांपेक्षा एक निराळा घटक निर्माण झाला होता. त्या नित्याच्या रसायनात एक निराळे द्रव्य येऊन पडले होते. त्यामुळे तिचे चरित्र अगदी निराळे झाले. सामान्य महाराष्ट्रीय ब्राह्मण स्त्रीच्यापेक्षा अगदी निराळ्या चाकोरीतून तिचा जीवनरथ चालू लागला. हा निराळा घटक कोणता ? तोच हरिभाऊंच्या कादंबरीचा विषय आहे. तेच त्यांचे प्रतिपाद्य आहे.
जागृत स्त्री ताईच्या ठायी थोडा, अगदी थोडा व्यक्तित्वाचा उदय झाला होता. तिच्या शेजारी राहणाऱ्या शिवरामपंत नावाच्या एका विचारी, सुशिक्षित, उदार अशा गृहस्थाचा सहवास तिच्या भावाप्रमाणेच तिला लाभला होता. शिवरामपंत हे आगरकरांच्या सुधारक पंथातले होते. आणि त्या काळी जे भयंकर पाप मानले गेले होते ते कृत्य आपली मुलगी सुंदरी हिला शिक्षण देण्याचे ते करीत होती. सुंदरीच्या मैत्रीमुळे ताई त्यांच्याकडे जाऊ लागली, लिहावाचायला शिकली आणि त्यांच्या तोंडून नित्य निघणाऱ्या उद्गारांतून काही नवे विचार तिच्या कानावरून गेले. ती मुळात अतिशय बुद्धिमान होती, आईचा करारी स्वभाव तिच्यातही उतरला होता, तिचा भाऊही शिवरामपंताचा शिष्य झाल्यामुळे त्याच्याकडूनही काही क्रांतिकारक मते तिने ऐकली होती त्यामुळे प्रारंभी जरी ती गरीब गाय होती, तिच्या आईने अट्टाहासाने तिला कसायाला दिली होती. तरी मानेवर सुरी पडायची वेळ आली तेव्हा दावे ताडकन तोडून निघून जाण्याचे बळ व धैर्य तिच्या ठायी निर्माण झाले. नव्या विचाराने स्त्री थोडी जागृत होते व तिला असे बळ येते हेच हरिभाऊंना दाखवावयाचे आहे. हेच त्यांचे स्त्रीजीवनावरचे भाष्य आहे.
व्यक्तित्व स्वतंत्रविचार करण्याचे सामर्थ्यं बुद्धिप्रामाण्य हे मानवाच्या सर्व सामर्थ्याचं उगमस्थान आहे. ब्रिटिश येथे येण्यापूर्वीच्या हजार वर्षाच्या काळात धार्मिक, सामाजिक व राजकीय शृंखलांनी, सावरकरांनी सांगितलेल्या सप्त शृंखलांनी भारतात त्यांचा संपूर्ण कोंडमारा झाला होता. येथले पुरूषही व्यक्तित्व शून्य, पराधीन दुबळे, धैर्यहीन असे झाले होते. मग स्त्रिया तशा झाल्या असल्यास नवल नाही. पाश्चात्य विचारांनी, बुद्धिप्रामाण्यवादी भौतिक विद्येने येथल्या समाजात सुशिक्षित वर्गात ते व्यक्तित्व जागे होऊ लागले व क्रमाने त्या विद्येचे संस्कार स्त्रियांवरही होऊन त्यांचीही मनःक्रान्ती होऊ लागली. हरिभाऊंच्या कादंबऱ्या म्हणजे या क्रान्तीचा चित्रपट आहे. या परिवर्तनाच्या लहान मोठया, स्पष्ट अस्पष्ट सर्व छटा त्यांनी मोठया कुशलतेने आपल्या साहित्यात दाखविल्या आहेत.
स्वतः सिद्धता नको यमूचे आजोबा आजारी होते. तिची आजी औषधपाणी करीत होती. पण औषधे फेकून देऊन ते गमतीने म्हणत 'हिला वाटतं, मी मरायला टेकलो आहे. स्वतः सिद्ध व्हायला पाहिजे वाटतं तुला एकदा! पण हे बघ, मी मरायचा नाही न् तुला स्वतः सिद्ध होऊ द्यायचा नाही ! तुमच्या डोळ्यांदेखत एकदा माझा शेवट होऊ द्या. दुसरी काही इच्छा नाही.' हे संभाषण काहीशा विनोदाने चालले होते. पण त्यातील भावार्थ स्पष्ट आहे. नवरा आहे तोपर्यंत स्त्री स्वतः सिद्ध होणे शक्य नाही, मागून वाटले तर तिने व्हावे. पण स्त्रीला स्वतःलाच ती इच्छा नाही, स्वतः सिद्ध होण्याची तिची इच्छा आहे असे म्हणणे हा तिला स्वतःवर गहजब वाटतो.
व्यक्तित्व दुःसह यमुना मुंबईस रहावयास गेली. तेथे विष्णुपंत-लक्ष्मीबाई आणि नानासाहेब- यशोदाबाई अशी दोन जोडपी होती. रघुनाथराव व ते सर्व लोक रात्री जेवणे झाल्यावर एकत्र गप्पा मारीत बसत. यमू तेथे गेल्यावर तिला हे कळले आणि उद्या आपल्यालाही तेथे जावे लागणार, हे ध्यानात आले. तेव्हा तिच्या पोटात धस्स झाले. बायका पुरुष एकत्र बसतात आणि मोकळ्या मनाने गप्पा मारतात, ही कल्पनाच तिला चमत्कारिक वाटत होती. रात्रभर तिला झोप आली नाही. नंतर सभेला जाणे, तेथे बोलणे या प्रत्येक वेळच्या तिच्या मनःस्थितीचे हरिभाऊंनी अत्यंत बारकाईने वर्णन केले आहे. सनातन वृत्तीच्या माणसाला स्त्रीचे व्यक्तित्व किती दुःसह होते ते. शंकर मामंजच्या एतदविषयक पत्रावरून स्पष्ट होते. यमुना सभेला गेली यात त्याच्या मनाला मोठा डंख कोणता झाला ? इतके दिवस ही मुलगी म्हणजे शंकररावांची सून असे लोक ओळखीत. आता शंकररावांना हे यमुनेचे सासरे असे लोक ओळखणार ! त्या सनातन पुरुषाच्या पुरुषत्वावर हा केवढा आघात होता.
निर्भय उत्तर ! यमुना मुंबईला दोन तीन महिने राहिल्यावर सुटीत पुण्याला परत जायची वेळ आली. तेव्हा मुंबईच्या तिच्या वागण्यावर सासरी खूप टीका होणार हे ठरलेलेच होते. यमुना लिहावाचायला शिकली होती. सभेला जात होती. त्यामुळे पुष्कळच धीट झाली होती. पण त्या धीटपणाचे लक्षण काय ते पहा. 'पुण्याला घरी गेल्यावर वेडीवाकडी बोलणी ऐकावी लागतील तेव्हा तू काय करशील ?' असे रघुनाथरावानी विचारले तेव्हा ती म्हणाली, "मी साफ सांगेन, माझ्याकडे काय आहे? जसं सांगितलं तस केले. आम्हांला काय बायकांना ! पदरी पड्डू ते सांगतील तसं वागायच. असं करा असं केलं. तसं नको नाही केलं. आमचा त्यात काही दोष नाही, अस मी साफ सांगेन तितकी वेळ आली, तर मी भ्यायची नाही." 'मला तसं वाटलं म्हणून मी केलं,' असं मी सांगेन असं ती म्हणाली नाही. इकडून सांगितलं. तसं केलं, हे तिच्या मते अगदी निर्भय उत्तर होते. प्रत्यक्षात तेही तिच्याकडून देववले नाही. कारण सासरी भडिमारच तसा भयंकर होता. पण 'इकडून सांगितलं तसं केलं' हे जे तिने ठरविलेले उत्तर तेही तिच्या मानसिक परिवर्तनाचे द्योतकच होते. कारण तेही धैर्य त्या काळी एखाद्या स्त्रीला झाले असते असे नाही, मात्र 'मी' कादंबरीतील ताईच्या अंगी ते धैर्य होते. तिच्यावर प्रसंगच तसा होता. तिचा नवराच तिचा शत्रू होता. पण अशाही स्थितीत जुन्याकाळी स्त्रीला आपण स्वतंत्रपणे काही निराळे करावे धैर्य येणे शक्य नव्हते. शिवरामपंताच्या सहवासात तिच्या मनावर जे नवे संस्कार झाले होते त्यामुळे तिच्या ठायी ते धैर्य आले होते.
कणखर मन दादासाहेबांच्या घरी राहणे असह्य झाले तेव्हा ती माहेरी निघून आली. तेव्हां कारभाऱ्यांना घेऊन दादासाहेब तिला परत न्यायला आले व ते दोघे अनन्वित बोलून वाटेल त्या धमक्या देऊ लागले. तेव्हा अत्यंत संतापून जाऊन ताई म्हणाली, 'येत नाही, येत नाही. जिथपर्यंत हा मांग घरात आहे आणि ती अवदसा घरात आहे तो पर्यंत त्या घरात मी पाऊल घालायची नाही. कोण माझं काय करतं आहे ते मी पहाते.' ताईवर पुढे असेच प्रसंग आले. तिचे वडील येऊन अद्वातद्वा बोलून तिला सासरी परत जाण्यास सांगू लागले. तेव्हां, 'आता ब्रह्मदेव आला तरी कोणाचं ऐकायची नाही. लोक मला वेस्वा म्हणोत, उठून गेली म्हणोत.' असा तिने आपला कृत निश्चयं प्रगट केला. शिवरामपंतांची मुलगी सुंदरी हिच्या बरोबर ती मिशनच्या शाळेतही जाऊ लागली. त्यामुळे वाटेतल्या टवाळांनी व सासरच्या कारभाऱ्यांनी अत्यंत मर्म भेदक अशी दुरुत्तरे तिला ऐकांवली. पण तिने आपला निश्चय सोडला नाही. त्या दोघींना पाहून बायका तर वाटेल ते बोलत. सुंदरी मोठी झाली तरी शिवराम पंतांनी तिचें लग्न केले नव्हते. हे तर त्याकाळी महापातक होते. त्यामुळे त्या दोघी दिसल्या की, बायका पोरीबाळींना ओरडून सांगत 'बाजूला व्हा. विटाळ होईल तुम्हाला. एकीनं नवरा सोडला आहे, दुसरीनं केलाच नाही. तेव्हां दूर रहा आपल्या रिकामा विटाळ करून घेऊन चोळ्या परकर धुवायला नकोत.'
ताई यमूच्या एक पायरी पुढे होती. रघुनाथरावांच्या सहवासाने व थोड्याशा शिक्षणाने यमू धीट झाली होती. पण नवे विचार मान्य होणे आणि मुंबईला स्वतंत्र पणे रहात असताना त्यांचा थोडा आचार करणे या पलीकडे ती जाऊ शकत नव्हती. पुण्याला सासरी तसे काही आचरण करण्याचे किंवा नवे विचार बोलून दाखवण्याचे धैर्य तिला नव्हते. मुंबईला जो तिने धीटपणा दाखविला तो सुद्धा 'इकडुन सांगितले म्हणून केले' या स्वरूपाचा होता. त्या मानाने ताई बरीच स्वतः सिद्ध झाली होती. तिने नवे संस्कार स्वतः तर पचविलेच. पण त्याचा समाजात प्रसार करावा ही ही हिंमत तिच्या ठायी आली होती. मिशनरी बायका परोपकारात आपले आयुष्य घालवितात, कोणास काही शिकवितात, कोणाला औषधपाणी देतात, कोणाची शुश्रूषा करितात त्याप्रमाणे आपण करावे अशी तिची वसुंदरीची इच्छा होती. आणि त्याप्रमाणे त्या दोघींनी काम सुरूही केले होते. आरंभी अर्थातच त्यांना फार विरोध झाला, पण हळूहळू त्यांच्या विषयी लोकांचे मत निवळू लागले व काम सुकर होऊ लागले.
विवाहावाचून ? स्त्रिया लिहू वाचू लागल्या, सभेला जाऊ लागल्या तर त्याला समाजाचा एवढा विरोध का असावा ? एकतर त्यामुळे स्त्री स्वतंत्र होईल, स्वतः सिद्ध होईल, पुरुषाच्या नियंत्रणात राहणार नाही, अशी लोकांना भीती वाटत होती. पण तेवढेच कारण नव्हते. यामुळे बहकून जाऊन स्त्री अनाचारी होईल, तिला कसले ताळतंत्रच राहणार नाही, असा लोकांच्या व त्यांच्या अप्तांच्या मनात धसका होता. शिवरामपंतांनी सुंदरीला अविवाहित ठेवावयाची असे ठरविले होते. 'तेव्हा त्यांच्या अगदी जवळच्या मित्राने सुद्धा त्या विचाराचा निषेध केला. 'यामुळे उद्या तिचे वाकडे पाऊल पडले तर त्याला जबाबदार कोण ?' असे तो म्हणाला. त्यावर शिवरामपंत म्हणाले 'अहो बाल वयात लग्न होऊन मुलीला पुष्कळ वेळा वर्ष दोन वर्षांतच वैधव्य येते. त्यानंतर मग तिचे वाकडे पाऊल पडू नये म्हणून समाजाने काय चिंता वाहिली आहे ? त्या स्थितीत जशी ती नीट राहते तशी या स्थितीतही राहील.' अर्थात त्यावेळी हे कोणाला पटणे शक्य नव्हते. भाऊ आणि ताई यांच्या आजीला तर यांहून ही भयंकर शंका आली होती. सासर सोडून ताई माहेरी भाऊकडे येऊन राहिली होती. तेव्हा आता ही आपली नात ख्रिस्ती होणार आणि साहेबाशी लग्न करणार असेच आजीच्या मनाने घेतले. आणि भाऊकडे येऊन तीनचार दिवस ताईला माझ्याकडे मी घेऊन जाणार म्हणून धरणे धरून बसली होती. अनेक स्त्रियांची अशीच समजूत होती. समाजाच्या या विचारसरणींचे, या भीतीचे, असल्या शंकाकुशंकांचे हरीभाऊंनी उत्तमदर्शन घडविले आहे. आणि ताई, सुंदरी यांचा सहवास घडून या सुधारक स्त्रियांच्या आचरणात वावगे असे काही नाही, असे ज्या थोड्या स्त्रियांना ध्यानात आले त्यांचे उद्गार देऊन हरिभाऊंनी आपला सुधारकांविषयीचा अभिप्राय व्यक्त केला आहे.
'एवढी मोठी घोडी झाली, तिचं नाही लगीन, आणि तिला तुम्ही शिकवता ? मी तर ऐकलं आहे की, तिच्या बापाच्या मनातून तिला साहेबाला द्यायची आहे.' 'अग, अग मेले काय हे बोलतेस ? तुझ्या जिभेला काही हाड ? तिनं एक लगीन केलं नाही. एवढंच काय असेल ते पण ती म्हणजे एक पतिव्रता आहे बरं. काय तिचे एकेक गुण सांगू तुला ! अगदी सारं आयुष्य दुसऱ्यावर उपकार करण्यात, दुसऱ्याचं हित करण्यात घालवायचं, असा तिचा निश्चय आहे.'
हरिभाऊंनी 'मी' कादंबरी १८९६ साली लिहिली. त्याआधी पन्नास पाऊणशे वर्षे अमेरिकेतील स्त्रीची स्थिती फारशी निराळी नव्हती. मतदानाचा हक्क तर तिला नव्हताच पण मनुष्यत्वाचाही हक्क तिला नव्हता. कायद्याने ती पुरुषाची दासी होती. तिची मुलावर सत्ता नव्हती, धनावर सत्ता नव्हती, ज्ञानावर नव्हती. मारझोड तिच्या कपाळी नित्याची होती. १८५४ च्या सुमारास सुसन अँथनी, अर्नस्टाइन रोज व एलिझा बेथ स्टॅटन यांनी स्त्रीविमोचनाची चळवळ सुरू केली त्यावेळी 'या बायका पठाणी आहेत, हाडळी आहेत, पाखंडी आहेत' असा त्यांच्यावर भडिमार झाला. त्या सभेत बोलू लागल्या तेव्हा एका संपादकांनी लिहिले की, 'अँथनीबाईचे भाषण चांगले झाले, पण माझी बायको किंवा मुलगी अशी सभेत उभी राहून भाषण करु लागली तर त्यापेक्षा ती मेलेली मला पुरवेल.' घरी सुद्धा स्त्रीचा आवाज बाहेर ऐकु येणे हे असभ्यपणाचे लक्षण मानले जाई. मग सभेची गोष्ट कशाला? सुंदरी व ताई या शाळेत जाऊ लागल्या, पुढे काही नवे विचार बोलू लागल्या त्यावेळी त्यांच्यावर येथे जो भडिमार झाला म्हणून हरिभाऊंनी वर्णिले आहे त्यापेक्षा किती तरी अधिक भडिमार ३०/३५ वर्षापूर्वी अमेरिकेत चळवळ्या स्त्रियांच्या समान हक्काचा अर्ज न्यूयॉर्क विधान सभेपुढे आला तेव्हा बर्नेट नावाचे सभासद संतापून म्हणाले, 'स्त्री' ही पुरुषाच्या बरोबरीची आहे हा विचार किती भयंकर आहे, पापमय आहे. लांछनास्पद आहे. याची तुम्हांला कल्पना आहे काय ? परमेश्वराने स्त्री पुरुषाची दासी म्हणून योजिली आहे. स्त्रिया असे वागू लागल्या तर स्त्रीला घरात कैदेत ठेवण्याशिवाय दुसरा उपाय नाही. एरवी पुरुषांना तोंड दाखवायला जागाच राहणार नाही. 'स्त्रियांना सम देखावे असे म्हणता. अन उद्या विधान सभेत भाषण करीत असतानाच तिला वेणा सुरू झाल्या किंवा एखादे ऑपरेशन करताना ती स्वतःच बाळंतीण झाली तर काय करावयाचे ?' अशीही चेष्टा अनेकांनी केली.
हे जे पुरुषांचे स्त्रीविषयीचे ग्रह, त्यामुळे दृढमूल झालेल्या ज्या रूढी, त्यामुळे स्त्रियांना आलेली पराधीनता, या सर्वांचे हरिभाऊंनी या कादंबऱ्यांत यमुना, ताई दुर्गी, उमाबाई, इ. व्यक्तिरेखा निर्मून चित्रण केले आहे. आणि जागोजाग अनेक प्रसंगांनी स्त्री जीवनाचे दर्शन घडवून रघुनाथराव, शिवरामपंत, भाऊ, यमुना, ताई यांच्या तोंडून त्या जीवनावर भाष्य केले आहे. या दोन कादंबऱ्यांना मराठीत जे अमर स्थान प्राप्त झाले आहे ते यामुळेच होय.
दलित, पतित लोक व स्त्रिया यांच्या जीवनावरचे भाष्य आपण पाहिले, आता मानवी जीवनाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या अंगावरील भाष्य पहावयाचे आहे. ते अंग म्हणजे मानवी मनातील 'संघर्ष' हे होय.
४ स्त्री जी व न भा ष्य