साहित्यिक:श्रीब्रह्मचैतन्य महाराज

श्रीब्रह्मचैतन्य महाराज
(१८४५–१९१३)

    जीवन संपादन

    एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धांत जे विख्यात महाराष्ट्रीय संत होऊन गेले त्यांच्यापैकीं श्रीब्रह्मचैतन्य तथा गोंदवलेकर महाराज हे एक होत. त्यांचा जन्म माघ शुद्ध द्वादशी शके १७६६ (इ.स. १८४५) या दिवशी गोंदवले बुद्रुक या गांवी झाला. हे गांव सातारा जिल्ह्यांतील माण तालुक्यांत असून ते सातारा-पंढरपूर रस्त्यावर सातार्‍यापासून चाळीस मैलांवर आहे. त्यांचे घराण्यांत विठ्ठलभक्ति व पंढरीची वारी असून पूर्वज सदाचार संपन्न व लौकिकवान होते. ते घरी थोडी शेती करून कुलकर्णीपणाचें काम करीत. श्रीमहाराजांचे मूळ नांव गणेश रावजी घुगरदरे. स्मरणशक्ति, चलाख बुद्धि, पुढारीपणा, निर्भय वृत्ति, एकांतप्रियता, रामनामाची आवड ह्या गोष्टी श्रीमहाराजांमध्यें लहानपणापासूनच होत्या. ते नऊ वर्षांचे असतांना गुरु शोधार्थ घर सोडून गेले. पण त्यांच्या वडिलांनी ते कोल्हापुरास आहेत असे कळल्यावर त्यांनी श्रीमहाराजांना घरी परत आणले. त्यांचे वयाच्या अकराव्या वर्षीं लग्न करण्यांत आले, परंतु त्यांचे प्रपंचांत चित्त रमेना, आणि ते लवकरच गुरुशोधार्थ पुन्हां घर सोडून निघून गेले. त्यांनी तत्कालीन प्रसिद्ध व अप्रसिद्ध अशा सत्पुरुषांच्या भेटी भेतल्या. पण त्यांच्या मनाचें समाधान झाले नाही. ते विशेषतः उत्तर भारतात गुरुशोधार्थ हिंडले. शेवटी श्रीरामदासस्वामींच्या परंपरेंतील एक थोर सत्पुरुष श्रीरामकृष्ण यांनी श्रीमहाराजांना दर्शन दिले आणि त्यांना नांदेड जवळील येहळेगांव या गावी श्रीतुकारामचैतन्य यांचेकडे जाण्याचा आदेश दिला.

    या आदेशानुसार श्रीमहाराज श्रीतुकामाईंकडे गेले. तेथे नऊ महिने राहून त्यांनी एकनिष्ठेनें गुरुसेवा केली, आणि ते देहबुद्धिविरहित व पूर्ण ज्ञानी झाले. श्रीतुकामाईंनी त्यांचे 'ब्रह्मचैतन्य' असे नांव ठेवलें, आणि गृहस्थाश्रमी राहून लोकांना भक्तिमार्गाला लावण्याची आज्ञा केली.

    सद्‍गुरूंच्या आज्ञेप्रमाणे श्रीमहाराजांनी हजारों लोकांना रामभक्तीला लावलें. त्यांचे शिष्य-प्रशिष्य विशेषतः मध्यमवर्गीय असून ते महाराष्ट्र व कर्नाटकांत बहुसंख्य असून उत्तर हिंदुस्थानांतही आहेत. त्यांची प्रथम पत्‍नी वारल्यानंतर त्यांनी जन्मांध मुलीशी लग्न केलें. त्यांनी आपल्या घरीं आणि इतरत्र अनेक ठिकाणीं श्रीराममंदिरांची स्थापना करून उपासनेची केंद्रें निर्माण केली.

    त्यांनी असंख्य लोकांना व्यसनें, दुराचरण, दुरभिमान, संसारचिंता यांपासून सोडविले. कौटुंबिक कलह मिटवून अनेकांचे संसार सुखाचे केले. यासाठी त्यांनी व्यक्तिगत उपदेश, प्रवचन, भजन, कीर्तन यांचा उपयोग केला. त्यांचा लोकसंग्रह फार मोठा होता. त्यांनी गोरगरीबांना आधार दिला. दुष्काळग्रस्तांना काम पुरवून अन्न दिले. गोरक्षण, अन्नदान, भावी काळांत मार्गदर्शक ठरतील असे उद्योग, वैदिक अनुष्ठानें, नामजप, भजनसप्ताह, तीर्थयात्रा करून प्रापंचिकांना परमार्थाला लावलें. आधुनिक सुशिक्षितांमधील अश्रद्धा घालवून त्यांच्यामध्येंही धर्माबद्दल व भक्तीबद्दल आदर उत्पन्न केला. अशा रीतीनें लोकांमध्ये धर्मजागृति केली. नामस्मरण हें सर्वश्रेष्ठ साधन आहे असें त्यांनी कळकळीनें व बुद्धीला पटेल अशा रीतीनें सांगितलें. वासनारहित झालेल्या त्यांच्याकडून अनेक चमत्कार घडले हें जरी खरें, तथापि पापी लोकांना त्यांनी सन्मार्गाला लावलें हा त्यांचा सर्वांत मोठा चमत्कार म्हणता येईल. लोकांना नामस्मरणाच्या मार्गाला लावून प्रपंच व परमार्थ यांचे मधुर मीलन कसें करावें हें शिकविण्यासाठीं त्यांनी आमरण खटाटोप केला, आणि मार्गशीर्ष वद्य दशमी शके १८३५ (२२ डिसेंबर १९१३) या दिवशीं गोंदवलें मुक्कामी त्यांनी देह ठेवला.

     
    समाधिमंदिर, गोंदवले

    शिष्यपरिवार संपादन

    श्रीब्रह्मचैतन्य महाराजांचा शिष्यपरिवार सर्वदूर पसरलेला आहे. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे -

    श्रीमहाराजांच्या प्रवचनांमधील काही बोधवचने संपादन

    • व्यवहारदृष्टया माझ्यामध्ये एकच दोष आहे की, मला कुणाचे दु:ख पाहवत नाही. माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरे काही सापडायचे नाही. माझ्यातले प्रेम काढले तर मग 'मी' नाहीच ! मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे. माझ्याकडे येणाऱ्या माणसाला माहेरी आल्याप्रमाणे वाटले पाहिजे; तो परत जातांना त्याच्या डोळ्यात पाणी आले पाहिजे.
    • दुसर्‍याला आपला आधार वाटला पाहिजे. मी असून काहीच होत नाही; ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात. पण आपण असण्यात एक आधार आहे असे इतरांना वाटावे. माझे आता किती दिवस आहेत कुणास ठाऊक! मी पुढे असो वा नसो, मी जे सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटीही सांगतो: तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका.
    • प्रेम ही भगवंताची वस्तू आहे. प्रेम करायला आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी. सर्वांशी अत्यंत प्रेमाने, निष्कपट प्रेमाने वागावे. आपले बोलणे अगदी गोड असावे. आपल्या वागण्या मध्ये, नव्हे पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे. प्रेम करायला गरीबी आड येत नाही, किंवा श्रींमंती असेल तर फार द्यावे लागत नाही. नाम हे प्रेम स्वरुप आहे,आणि खरा प्रेमाचा व्यवहार म्हणजे देणे-घेणे होय. म्हणून, नाम घेतले की, भगवंताचे प्रेम येईलच.
    • आनंद पाहायला आपल्याला दुसरे कुठे जावे लागते का ? नाही. जो स्वतःच आनंदरूप आहे त्याने आपण होऊन 'मी दु:खी आहे' असे मानून घेतले आहे.
    • ज्यांना व्याप आहे ते लोक रडतात, आणि ज्यांना व्याप नाही तेही लोक रडतात; मग सुख कशात आहे ? पैसा सुख देतो का? पैसा मिळवणे कठीण, मिळाला तरी तो कायम राहील का त्याची शाश्वती नाही. पैशाप्रमाणेच इतर सर्व वस्तूंची गोष्ट आहे. सर्वसुखी असा प्रपंचात कोण आहे ? प्रत्येकाचे काही ना काही तरी गाऱ्हाणे आहेच. प्रत्येकाला आशा वाटते की मी उद्या आजच्यापेक्षा सुखी होईल. तो कधी पूर्ण सुखी होत नाही, त्याचे गाऱ्हाणे कधी संपत नाही.
    • मनुष्याची शांती बिघडायला जगामध्ये दोनच कारणे आहेत. एक म्हणजे आपल्याला हवे ते न येणे, आणि दुसरे म्हणजे आपल्याला नको ते येणे. या दोन्हीपैकी आपल्या हातामध्ये एकही नाही; मग आपण दु:ख का करावे? भगवंताच्या नामाची एकदा गोडी लागली ना, की सर्व काही साधते. नाम अभिमानाचा नाश करते.नामाने हवे-नको-पणाची बुद्धी होत नाही. साधुसंतांनी आवर्जून सांगितलेले हेच नाम तुम्ही सतत घेऊन समाधानाचा शाश्वत ठेवा मिळवा.
    • जगाची आशा, आसक्ती, सोडल्याशिवाय परमेश्वराला आपली हाक कशी पोहोचेल? ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्याच गोष्टीची आपल्याला नड लागते. आपल्याला देवाची नड लागली आहे का? देवाचे प्रेम लागायला त्याच्या अखंड सहवासात राह्ण्याची अत्यंत जरुरी आहे; आणि हा सहवास जर कशाने साधत असेल तर तो एक त्याचे नाम घेतल्यानेच साधेल. भगवंताचे नाम घेऊन त्याचे प्रेम मिळवा, हेच माझे सांगणे.
    • ज्याच्यामध्ये भगवंताची आठवण राहील, तो विवेक समजून आचरणात आणा. प्रपंच उत्तम करा, पण त्याच्या अधीन होऊ नका. अधीन होणे हे पाप आहे, प्रपंच करणे हे पाप नाही. शक्य तितके धर्माचे पालन करा; नीती प्राणाबरोबर सांभाळा; आणि प्राण गेला तरी नामाची धुगधुगी राहू द्या, इतके नाम तुम्ही सांभाळा.
    • आपले ध्येय काय असावे हे ठरविण्याची बुद्धी माणसाला आहे, ती खालच्या प्राण्यांना नाही. हाच माणसांत आणि त्या प्राण्यात फरक आहे. प्राण्यांना प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात, त्याचप्रमाणे माणसालादेखील आलेले भोग भोगावे लागतात. पण भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो मागेपुढे सोयीने भोग भोगू शकतो.
    • दुसरे काही एक न करता सतत निश्चयाने नामात राहण्याऱ्या माणसाला संतांची भेट झाली की ते त्याचे कल्याण करतात.
    • ज्याप्रमाणे एकच ठिणगी सबंध कापसाचा नाश करायला समर्थ असते, त्याप्रमाणे भगवंताचे नाम सर्व पापांचा नाश करायला समर्थ असते.
    • खरे सांगतो मी, मनुष्याने जन्माला येऊन एकच करावे: आपण नामात रहावे, आणि दुसऱ्यास नामास लावावे. संसारात न्युन पडू देऊ नये आणि भगवंताला विसरु नये.
    • आपल्या बाळाला दु:ख व्हावे असे माऊलीला कधी वाटेल का ? आपण तिला मनापासून हाकच मारीत नाही. भगवंताचे नाम मनापासून घेतच नाही; इथेच आपले सर्व चुकते. तेव्हा गोंदवल्यास आल्यासारखे, रामाजवळ जाऊन आता तुम्ही एकच मागा, 'रामा, तुझे प्रेम आम्हाला दे.' तुम्ही मागाल ते तो तुम्हाला खात्रीने देईल यावर विश्वास ठेवा. तो त्याच्यासाठीच इथे उभा आहे. रामाची भक्ती करण्याने, आपला संसार आपली कल्पनाही होणार नाही इतका सुखाचा होईल. कोणत्याही परिस्थितीत नामाला सोडू नका. भगवंताच्या नामानेच त्याचा सहवास घडेल आणि त्याचे प्रेम उत्पन्न होईल.
    • भगवत्प्राप्तीसाठी एक सुलभ उपाय आहे: भगवंताशी आपले नाते जोडावे, कोणते तरी नाते लावावे. भगवंत हा माझा स्वामी आहे, मी त्याचा सेवक आहे; तो माता, मी लेकरू; तो पिता, मी पुत्र; तो पती, मी पत्नी; तो पुत्र, मी आई; तो सूत्रधार, मी बाहुले; असे काही नाते लावावे. मुलगा दत्तक घेतल्यावर मग त्याच्याशी पुत्रप्रेम लावतो की नाही? लग्न होण्यापूर्वी कोण नवरा आणि कोण बायको? पण लग्न होताच ते नाते लावतो, आणि सहवासाने प्रेम वाढवतो. प्रेम केल्याने प्रेम वाढते. तसे भगवंताविषयीचे प्रेम कोणचे तरी नाते लावून वाढवावे. किंबहुना तो स्वभावच व्हावा, म्हणजे भगवत्प्राप्ती सुलभ होते.

    हाचि सुबोध श्रीगुरूंचा संपादन

    कै. के. वि. बेलसरे यांनी सांगितलेला श्रीमहाराजांचा ‘निरोप’

    हाचि सुबोध श्रीगुरूंचा
    नाम सदा बोलावे, गावे भावे, जनांसि सांगावे ।
    हाचि सुबोध श्रीगुरुंचा, नामापरते न सत्य मानावे ॥१॥
    
    नामात रंगुनीया व्यवहारी सर्व भोग सेवावे ।
    हाचि सुबोध श्रीगुरुंचा, भोगासंगे कुठे न गुंतावे ॥२॥
    
    आंनदात असावे, आळस भय द्वेष दूर त्यागावे ।
    हाचि सुबोध श्रीगुरुंचा, अनुसंधाना कधी न चुकवावे ॥३॥
    
    गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्वलोकप्रिय व्हावे ।
    हाचि सुबोध श्रीगुरुंचा, भक्तीने रघुपतीस आळवावे ॥४॥
    
    स्वांतर शुद्ध असावे, कपटाचरणा कधी न वश व्हावे ।
    हाचि सुबोध श्रीगुरुंचा, मन कोणाचे कधी न दुखवावे ॥५॥
    
    ’माझा राम सखा, मी रामाचा दास’ नित्य बोलावे ।
    हाचि सुबोध श्रीगुरुंचा, रामपाशी अनन्य वागावे ॥६॥
    
    यत्न कसून करिन मी, यश दे, रामा, न दे तुझी सत्ता ।
    हाचि सुबोध श्रीगुरुंचा, मानावा राम सर्वथा कर्ता ॥७॥
    
    आचार संयमाने युक्त असा नीतिधर्म पाळावा ।
    हाचि सुबोध श्रीगुरुंचा, खेळाएसा प्रपंच मानावा ॥८॥
    
    दाता राम सुखाचा, संसारा मान तू प्रभूसेवा ।
    हाचि सुबोध श्रीगुरुंचा, संतोषा सर्वादा मनी ठेवा ॥९॥
    
    स्वार्थ खरा साधा रे, नित्य तुम्ही नामगायनी जागा ।
    हाचि सुबोध श्रीगुरुंचा, मीपण जाळोनिया जगी वागा ॥१०॥
    
    अभिमान शत्रु मोठा सर्वाना जाचतो सुखाशेने ।
    हाचि सुबोध श्रीगुरुंचा, मारावा तो समूळ नामाने ॥११॥
    
    राज्याधिकार, किंवा जावो समस्त धन मान ।
    हाचि सुबोध श्रीगुरुंचा, भंगावे ना कदा समाधान ॥१२॥
    
    प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगामाजी ।
    हाचि सुबोध श्रीगुरुंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची ॥१३॥
    
    

    श्रीक्षेत्र गोंदवले संपादन

    गोंदवले हे गाव सातारा-पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून सुमारे ६४ किमी अंतरावर आहे. श्रीब्रह्मचैतन्य महाराजांचा जन्म, वास्तव्य व देहावसान गोंदवले येथे झाले. तेथे त्यांची समाधी, निवासस्थान, त्यांनी स्थापन केलेले थोरले व धाकटे राममंदिर, दत्तमंदिर, शनिमंदिर या वास्तू आहेत.
    साचा:हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय



    कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
    अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.