सोमवारची खुलभर दुधाची कहाणी

ऐक परमेश्वरा सोमवारा, तुमची कहाणी.

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. तो मोठा शिवभक्त होता. त्याच्या मनांत आलं आपल्या महादेवाचा गर्भारा दुधानं भरावा. परंतु हें घडेल कसं? अशी त्याला चिंता पडली. प्रधानानं युक्ति सांगितली. दवंडी पिटली, “गांवांतल्या सर्व माणसांनीं आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारीं महादेवाच्या देवळीं पूजेला यावं.” सर्वांना धाक पडला. घरोघरचीं माणसं घाबरून गेलीं. कोणाला कांहीं सुचेनासं झालं. त्याप्रमाणं घरांत कोणीं दूध ठेवलं नाहीं. वासरांना पाजलं नाहीं, मुलांना दिलं नाहीं.सगळे दूध देवळांत नेलं. गांवचं दूध सगळं गर्भार्‍यात पडलं, तरी देवाचा गर्भारा भरला नाहीं.

दुपारी एक चमत्कार झाला. एक म्हातारी बाई होती, तिनं घरचं कामकाज आटपलं, मुलांबाळांनाखाऊं घातलं, लेकिसुनांना न्हाऊं घातलं, गाईवासरांना चारा घातला. त्यांचा आत्मा थंड केला. आपल्या जिवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध व फूल घेतलं, चार तांदुळाचे दाणे घेतले, दोन बेलाचीं पानं घेतलीं, आणि खुलभर दूध घेतलं. बाई देवळांत आली. मनोभावें पूजा केली. थोडं दूध नैवेद्याला ठेवलं. देवाची प्रार्थना केली. ” जय महादेवा, नंदिकेश्वरा, राजानं पुष्कळ दूध तुझ्या गर्भार्‍यात घातलं. तुझ्या गर्भारा भरला नाहीं, माझ्या खुलभर दुधानं भरणार नाही. पण मी आपली भावें भक्तीनं अर्पण करतें.” असं म्हणून राहिलेलं दूध गर्भारीं अर्पण केलं. पूजा घेऊन मागं परतली. इकडे चमत्कार झाला. म्हातारी परतल्यावर गर्भारा भरून गेला. हें गुरवानं पाहिलं, राजाला कळवलं, परंतु त्याचा कांहीं केल्या पत्ता लागेना.

दुसर्‍या सोमवारीं राजानं शिपाई देवळीं बसवले. तरीही शोध लागला नाहीं. चमत्कारही असाच झाला.

पुढं तिसर्‍या सोमवारी राजा बसला. म्हातारीचे वेळेस गर्भारा भरला. राजानं तिचा हात धरला. म्हातारी घाबरून गेली. तिला अभयवचन दिलं. तिनं कारण सांगितलं. “तुझ्या आज्ञेनं काय झालं? वासरांचे, मुलांचे आत्मे तळमळले, मोठ्या माणसांचे हायहाय माथीं आले. हें देवाला आवडत नाहीं, म्हणुन गर्भारा भरत नाहीं.” “याला युक्ति काय करावी?” मुलांवांसरांना दूध पाजावं. घरोघर सगळ्यांनीं आनंद करावा. देवाला भक्तीनं पंचामृती स्नान घालावं. दुधाचा नैवेद्य दाखवावा; म्हणजे देवाचा गर्भारा भरेल. देव संतुष्ट होईल.” म्हातारीला सोडून दिलं. गांवांत दवंडी पिटविली.

चवथ्या सोमवारी राजानं पूजा केली. मुलांबाळांना गाईवासरांना दूध ठेऊन उरलेलं दूध देवाला वाहिलं. हात जोडून प्रार्थना केली. डोळे उघडून पाहातात तों देवाचा गर्भारा भरून आला. राजाला आंनद झाला. म्हातारीला इनाम दिलं. लेकी. सुना घेऊन म्हातारी सुखानं नांदूं लागली. तसं तुम्ही आम्ही नांदूं.

ही साठां उत्तरांची कहाणी, पांचांउत्तरी सुफळ संपूर्ण.

तात्पर्य: जो माणुस आपल्या माणसांचा प्रतिपाळ नीट रीतीनें करून देवाला भजतो, तोच देवाला आवडतो.




हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.