सोमवारची फसकीची कहाणी

ऐका महादेवा, तुमची कहाणी.

आटपाट नगर होतं. त्यांत एक गरीब सवाशीन बाई रहात असे. तिनं आपलं श्रावणास आला म्हणजे काय करावं? आपलं दर सोमवारीं पहाटेस उठावं, स्नानं करावं, पूजा घ्यावी, एक उपडा, दुसरा उताणा, पसाभर तांदूळ घ्यावे व महादेवाच्या देवळीं जाऊन मनोभावें पूजा करावी. नंतर प्रार्थनेच्या वेळीं, ‘जय महादेवा; घे फसकी व दे लक्ष्मी’ असं म्हणून महादेवाच्या मस्तकीं तांदूळ अर्पण करावे.

उरले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावं. असं चारी सोमवारीं तिनं केलं. शंकर तिला प्रसन्न झाला. दिवसेंदिवस ती श्रीमंत झाली. मनामध्ये समाधान पावली.

पुढं उद्यापनाचे वेळीं तिनं देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठवली, काशीविश्वेश्वराला रुपया पाठवला आणि व्रताची समाप्ती केली. शंकरांनीं तिला निरोप पाठविला . “अजून तुला नंदीच्या सेवेचं फळ मिळालं नाहीं. माझ्या सेवेचं तर अद्याप देणंच आहे.” पुढं शंकरांनीं तिला अपार देणं दिलं.

तर जसा तिला विश्वेश्वर प्रसन्न झाला, तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.