स्वभाषेची अभिवृद्धी
स्वभाषेची अभिवृद्धि
"मराठी भाषा गरीब आहे व ती जगांतील सुसंस्कृत, सुधारलेल्या व वाढलेल्या भाषांच्या बरोबरीस बसण्यास आज तयार नाहीं, हें जरी खरें असलें तरी, आपली ती भाषा आहे. बरे-वाईट, ग्राह्याग्राह्य वागैरेंसंबंधाचा विचार जरी व्यावहारिक असला, तरी स्वदेश, स्वभाषा व स्वधर्म ह्यांस हा व्यवहाराचा नियम लागू नाही. मराठी ही आमची भाषा आहे. आमचे वाडवडील ती बोलत आले, त्या भाषेतच आमचा जन्म झाला, म्हणून ती चांगली अगर वाईट हा विचार आम्हांस नाहीं. जन्माबरोबर उत्पन्न झालेल्या गोष्टींपैकीं भाषा ही आहे. वरील गोष्टींवरून स्वभाशेबद्दल कळकळ का असावी, ह्याचे उत्तर देणे कठीण नाही.
भाषेची अभिवृद्धि लोकांच्या व राष्ट्राच्या अभिवृद्धिवर अवलंबून असते. भाषा ही कृत्रीम इलाजांनी सुधारत नाही. मंबई इलाख्यातील निम्मे लोक मराठी बोलतात. ह्याखेरीज वऱ्हाड, नागपूर व निजामशाही घेतली तर सर्व हिंदुस्थानांत आज दोन कोटी लोक मराठी बोलणारे आहेत. इतक्यांची ही मराठी भाषा बुडून तिच्या जागीं दुसरी भाषा याने शक्य नाहीं. इंग्रजी भाषा खेडेगांवांत जरी गेली तरी मराठी बुडत नाही, मराठी बोलणाऱ्या दोन कोटि लोकांची उन्नती व्हावी, त्यांस आपले विचार कळवावे असे जर तुम्हांस वाटत असेल तर मराठी भाषा वाढवा. पेशवाईत मराठीस मन होता तो आतां नाहीं. तेव्हां लष्कराची, व्यापाराची भाषा मराठी होती. परंतु देशाच्या राज्यसत्तेच्या स्थित्यंतरामुळें मराठीचें स्थित्यंतर झालें आहे. तेव्हां मराठी भाषेच्या अभिवृद्धिचा विचार करावयाचा त्याबरोबर पालटलेल्या राजकीय स्थितीचाहि विचार केला पाहिजे. हल्लींच्या परिस्थितीच्या मानानेंच मराठीची उन्नती होणार. इंग्रजीची स्थिती मराठीस यावयास वेळ लागेल. आपला अभ्युदय झाला तर मराठीचा अभ्युदय होईल, अशा रीतीनें दोहोंची सांगड आहे. आज आपणांस आपले विचार परकी भाषेंत प्रगट करण्याची संवय झाली आहे. धर्मासबंधानेंहि विचार प्रगट करावयाचे तर ते आपण इंग्रजीतच करतों. मराठी भाषेची पूर्ण वाढ राष्ट्राच्या उन्नतीवर आहे हें जरी खरें, तरी विपन्न स्थितीतही आपण उद्योग केले पाहिजेत. निबंधमालेतील पहिला निबंध 'मराठी भाषेची स्थिती' हा होता. त्याच्या प्रारंभीच्या अवतरणांत संगीतल्याप्रमानें आतांचा विपन्न स्थितीतला उद्योग अधिक श्रेयस्कर आहे, व राष्ट्रास भूषणावह आहे. मराठी भाषेस आज राज्यासनावरून दूर केलें आहे.दरबारांत तिला बंदी आली आहे. विद्यापीठांतून तिले अर्धचंद्र मिळाला आहे व व्यापारांतहि ती नाही. तरीहि अशा ह्या कलांत तिची अभिवृद्धि होईल अशी चिन्हे दिसत आहेत. इंग्रजीची व मराठीची भेट झाली हें एका प्रकारे सुचिन्ह होय. हल्लीच्या परिस्थितीप्रमाणे मराठीस जरी संकुचित व्हावें लागलें तरी ज्ञानाच्या दृष्टीनें तिची वाढ होईल हें खचित. इंग्रजी वाङमय चांगले व त्यानेंच मला सुख होत आहे, दुसऱ्याची मला जरूर नाहीं, अशा समजुतीने मराठीची वाढ होणे शक्य नाहीं. मराठीची वाढ करणें आपल्या हातीं आहे. 'युनिव्हर्सिटीत मराठी नको' असे म्हणणारा मी नाहीं; परंतु 'युनिव्हर्सिटीत एकदां मराठी घेतली म्हणजे गेली म्हणजे आपलें कर्तव्य संपलें' असे मानता येत नाहीं. इतक्याने भाषेची अभिवृद्धि होत नाही. भाषा वाढावयास राष्ट्रांतील सर्व व्यवहार त्याच भाषेंत झाले पाहिजेत. इतर भाषेंतील ज्ञान त्या भाषेत उतरले पाहिजे, व हे काम करण्याबद्दल विद्वानांत उत्कट इच्छा पाहिजे; महाराष्ट्रांतील साधू-संतांनी मराठी भाषा वाढविली. संस्कृतांतील ज्ञान मराठींत आणण्याचें काम त्यांस करावयाचें होते; त्याबरोबरच भाषावृद्धीचें काम झालें. एकमेकांचे विचार एकमेकांस कळविण्याचें साधन भाषा होय. तुम्ही-आम्ही भाषा बोलणारे एकत्र येऊन त्यांचा व्यवहार अधिक झाला पाहिजे. भाषावाढीची इच्छा पाहिजे व भाषेबद्दल कळकळ पाहिजे. नुसत्या भाषांतरानें अगर नाटकांच्या रूपांतराने भाषावृद्धीचे काम भागात नाहीं. अंतःकारनपूर्वक काम झालें पाहिजे. मनांत कळकळ नसतां व वरकांती कितीहि उद्योग केला तरी कांही अर्थ नाहीं. भाषेच्या अभिवृद्धीसाठी यत्न करावयाचे तेव्हां देशांतील लोकांची कळकळ वाढते किंवा नाहीं, हे पाहिलें पाहिजे व तें पहाण्याचे माप निराळें आहे. मासिक-पुस्तकें वगैरेंनी तें समजणार नाहीं. इंग्रजी अमदानींत मराठीच्या गद्य-ग्रंथांची चांगली वाढ झाली आहे.
आजचे सुशिक्षित परकी भाषा बोलत आहेत. मराठींत इंग्रजी शब्द जसेच्या तसे आले तर भाषा वाढेल, पण ज्ञानवृद्धी होणें नाहीं. आईचें पोर दाईच्या दुधावर वाढलें तर तुआस आईची परवा राहत नाहीं. तशी आमची स्थिती होता कामा नये. पण परिस्थिती तशीच आहे व ह्या परिस्थितीस आला घालणें फार प्रयासाचें, दगदगीचें व खटपटीचें आहे. मराठी भाषेच्या अभिवृद्धीस सुशिक्षितांची कळकळ हें मुख्य साधन आहे. भाषांतर करणें अगर ट-ला ट व प-ला प अशा कवितेनें भाषेची अभिवृद्धि नाहीं. भाषेमध्ये जीव पाहिजे असेल तर ती बोलणाऱ्यामध्ये जीव पाहिजे. राष्ट्रांत लोकांच्या मनाची वाढ होते, त्या वेळीं इतिहासकार, कादंबरीकार वगैरे सर्व उत्तम निपजतात.
देशी भाषेंत शिक्षण दिलें पाहिजे हें स्वदेशिनेम समजलें. मराठी हि आपली भाषा आहे, मला ह्या भाषेत काम करणें आहे, ह्या भाषेशिवाय दुसरें साधन नाहीं, अशी प्रत्येकाची भावना झाली तर मराठीची वाढ हां हां म्हणतां होईल. मराठीत ग्रंथसंग्रह वाढविणे, लोकांत वाचनाची अभिवृद्धि होणें, आपल्या बांधवांस मराठीत ज्ञान सांगण्याचा धंदा करणें, ह्या भाषावृद्धीस आवश्यक गोष्टी आहेत. सुशीक्षितवर्गानें इंग्रजीत मिळविलेलें ज्ञान देशी भाषेत द्यावें, हा इंग्रजी शिकण्याचा हेतु आज अजीबात बाजूला राहिलेला आहे. स्वभाषा, स्वदेश, स्वधर्म ह्यासंबंधानें जन्मतःच आम्ही ऋण घेऊन आलों आहों. ते फेडण्याचा यत्न प्रत्येकानें केला पाहिजे. असा यत्न केला नाहीं तर भाषा मृतभाषा होईल. भाषा मेली म्हणजे विचार मेले व जवळ जवळ तो राष्ट्रीय मृत्यूच समाजाला पाहिजे. तरी महाराष्ट्रास मराठी नको असे नाही. एका भाषेच्या सबबीवर स्वभाषा, स्वधर्म व स्वदेश ह्यांस विसरू नका. ग्रंथसंग्रहालय हें वाङमायाचें प्रदर्शन होय. ह्या ग्रंथप्रदर्शनांत खूप प्रदर्शन-वस्तू म्हणजे ग्रंथ हवेत. भाषेंत ग्रंथ अधिक तितकी भाषेची योग्यता अधिक तेव्हां भाषेस योग्यता आणण्याची बुद्धी परमेश्वर सुशीक्षितांस देवो."
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |