स्वरांत/एका गांधारीच्या डायरीतली काही पाने
< स्वरांत
एका गांधारीच्या डायरीतली काही पाने
३-५-७१
स्वतःची विलक्षण घृणा येते. मी पदवीधर आहे; पण माझ्यात नि माझ्या आजीत कोणता फरक पडला? आजीही दहा ठिकाणी दाखविली गेली असेल. मग सौदा... आणि शेवटी वंशासाठी दिवा लावणं वगैरे...
मनातले विचार मनातच रिचवावे लागतात. सुंदर असते तर हा पिंजरा तोडून भरार होण्याची ताकद मनाला मिळाली असती. श्यामल कर्णीकनं आईबापाच्या नाकावर टिचून पंजाब्याशी लग्न केलंय. तिच्या आईला कायस्थपणाचा केवढा अभिमान ! रूप नडतं आमचं. शेवटी याच रस्त्यानं मार्गी लागायची आमची गाडी.
८-५-७१
तो सोन्यासारख्या झळझळीत रंगाचा, मी अशी सावळी तुळस. उभार बांधा नि दाट रेशमी केस. हीच जमेची बाजू.
बरं झालं. आजी मोकळी झाली.
भावाच्या संसारात ती नि मी अडचणच आहोत.
२५-५-७१
दाखवून घेण्यातल्या साऱ्या यातना आता विझून गेल्या आहेत. दहा दिवसांनी लग्न. हे. दहा दिवस युगासारखेच भासताहेत. माझं घर ! माझ्या एकटीचं... फक्त माझंच असलेलं एक नवं धन !
माझ्या स्वप्नांना प्राण देणारे फक्त माझे अनंत !
नावगाव सगळं पुसून नवं रूप घेणारेय मी. राखेतून नव्या क्षितिजाकडे झेपावणाऱ्या फिनिक्स पक्षाचे पंख मला फुटणार आहेत.
मी सुंदर होणारेय्...
६-६-७१
१८-७-७१
खूप बोलावसं वाटतं... विचारावसं वाटतं; पण त्यांचे ओठ सदा मिटलेले. स्वभावच असावा तसा.
पुरुष खूप अधीर असतात म्हणे! मिनी... शमी काहीबाही सांगायच्या. अनंत कसे इतके शांत ?
वेगवान वादळं दौडत यावीत आणि त्यात केव्हा वाहून जावं ते उमजूच नये... असा अनुभव, पण वादळं आलीच नाहीत.
चंद्रज्योतीची फुलं. उंच... उंच उडावीत नि ऐन क्षणी विझून जावीत तसे अनुभव !
शेजारी अनंत शांत झोपलेले. मी जागीच. धुमसत्या राखेसारखी.
२५-८-७१
मी आज विचारलं, 'माझ्यासारखी काळी मैना कशी पसंत केलीत ?' ते गोडसं हसले नि म्हणाले, 'कुणापाशी तरी रूप असलं म्हणजे झालं ! आणि तुझं मन हवंय मला. रूप फार लवकर हरवतं...'
खूप... खूप सुखावले मी. माझ्या मनात आलं, हे गोर देखण रूप, भरदार छाती, दाट कुरळे केस... हे सगळं माझं आहे...
फक्त माझं... !!
२९-९-७१
काल हट्टच धरला, सिनेमाला जाऊ म्हणून. मुष्किलीनं तयार झाले.
अलिशान सिनेमागृह. पायाखाली मखमली रुजामा. चौबाजूंनी आरसे. पुढे हे नि मागे मी. मी दिमाखानं चालतेय. इतक्यात समोरून एक देखणा, रुबाबदार तरुण आला. नि मागं होती एक तेलकट रंगाची मुलगी. माझा सगळा दिमाख गळून पडला तरीही मन सावरून बसले. मध्यंतरात कुणीसं हाका मारीत होतं. यांनी वळून पाहिलं. एक जाडगेली बाई होती... खूप गोरी. सपिटाच्या लगद्यासारखी. ओठाला जास्वंदी रंग, मोठा हेअर डू !
'हाय अनंत हाय अनंत !! ' करीत, हातावर चापट्या मारीत ती बोलत होती.
मध्यतंर संपलं.
...मूल गेलेल्या जयाची भकास मुद्रा...
'अनंतचा मूड गेला असावा. ते उठून बाहेर. मीही मागोमाग. मग थेट घरीच. कालपासून बोलेनासेच झालेत.
३-१२-७१
काय खुळी आहे मी ! गेल्या सहा महिन्यांत नवऱ्याच्या नोकरीची सुद्धा चौकशी केली नाही मी. दादांनी मुलगा पसंत केला. मी माळ घातली. फक्त डिग्री कानांनी ऐकून घेतली.
आधी ओळख शरीराची; मग मनाची.
घरात सोफा आहे. प्रेशर कूकर आहे. शिवाय फ्रायपॅन, मिक्सी, टोस्टर ... सगळं काही आहे. सोनेरी फेममध्ये दिमाखणारी डिग्री बैठकीत आहे. मी तरी कशाला कराव्यात नसत्या चौकशा !
तरी पण आज विचारणार आहे.
१४-१-७२
आज संक्रांत. मी आणि उमानं जाऊन सुंदर साडी . आणलीय आज. पहिल्या संक्रांतीला काळी चंद्रकळा नेसून स्वागत करायचं असतं नवऱ्याचं. मी पांढरीशुभ्र साडी आणलीय. वर हलके काळे बुंदके. साडी नेसून केव्हाची वाट बघतेय. बारा वाजून गेलेत; पण अजून पत्ता नाही !
कधी कधी मन खूप उदासतं, आता या क्षणीही... मी पदवीधर आहे. सुशिक्षित आहे.
गांधारीसारखे डोळे बांधून जगता येईल मला ?...
४-३-७२
पूर्वीच आलीय, 'ही'ब्लू नाभील.' मध्ये रिसेप्शनिस्ट आहे.
भुरे ... सोनेरी केस. मोठे डोळे. काहीसा सावळा तरीही तकतकीत रंग. किती गोड दिसते.!
बटाटेवडे नि हैद्राबादी आलं-लसणीचं झणझणीत लोणचं दिलंन् तिला. अधाशासारखं खाल्लंन लोणचं. म्हणाली,
'माझ्या हॉटेल-मॅनेजरनं हे लोणचं खाल्लं तर धावत येशील तुला न्यायला !'
सुरैना असतानाच आज अचानक अनंत आले. केवढे दचकले आणि बाहेरच्या बाहेर पुन्हा सटकले.
काय 'गूढ ' आहे अुकलतं नाही. मी खोलखोल रुततेय . असं सारखं वाटत राहतं.
दादांनी लग्न करून दिलं. जबाबदारी संपवून टाकली. आईला भेटावंसं वाटतंय.
मनातला गुंता आता सोसवत नाही.
९-३-७३
पण ...
'केव्हा येऊ ? ' विचारलं तर म्हणाले, 'केव्हाही ये. तुझ्या सोयीनं'.
खूप दिवस राहायचं ठरवून आले होते.
इथं आले तर किती परकं वाटतंय !
माझ्या अस्तित्वाच्या खुणा जणू पुसून गेल्या आहेत या घरच्या ... ज्या घरात वयाची पंचवीस वर्षे घोलक्लीं, ते घर अवघ्या एक वर्षात इतकं दूर जावं ?
फक्त आई मन गुंतवते.
परवा निश्चित केलं मनानी.
अनंत कसेही असोत; कुणीही असोत. त्यांनी मला माझं .दिलंय घर. हक्काचं घर ...
१५-६-७३
पूर्ण रात्र मी जागीच ....
मन आणि शरीर, दोहोत कर्तसवरतं असतं मन. मनानं दिलेले संकेत शरीरानं पाळायचे. मन, शरीर यांचं वेगळेपण कधी जाणवलंच नव्हतं आजवर.
पण काल शरीराचं वेगळं ... बंडखोर अस्तित्व जाणवलं मला. रक्त कापरागत चरचरत जळत होतं. हातही निर्लज्ज. यांना जागे करणारे.
गाढ झोपेतून अनंत चाळवले.
'ओह ऽऽ नो, रेणू ! मी खूप थकलोय. लेट मी स्लीप. नो एनर्जी ॲट ऑल ...
माझं मन थाड्कन् जाग्यावर आलं.
शरीराची घृणा वाटली स्वतःच्या.
कोण ही रेणू ?
... तिला तृप्त करू पाहताना थकलेले अनंत कोण ?
१७-६-७३
काल आईचं पत्र आलंय. दमा उठलाय तिचा. तिला बोलवावसं वाटतं, पण दुसऱ्या क्षणी मनात येतं - दुरूनच, ठीक आहे. कुणी येऊ नये नि कुठं जाऊ नये, आपल्या जखमा आपण झाकूनपाकून सोसाव्यात.
२५-७-७३
कधी कुणाच्या जवळ होते मी?
कित्येक तासांत संभाषण नाही. शब्दांचं अस्तित्व संपून गेलंय ... अनंत केविलवाणेपणानं इकडेतिकडे करतात.
त्यांची ती नजर पाहिली की मन पेटून उठतं. सगळ ढोंग आहे. घरातून निघून जायला पाय ओढताहेत.
कुठं जाऊ पण ? कुणाच्या घरी ? हातातल्या अगदी भेंडोळ्याला फक्त कागदाचीच किंमत आहे.
याउबंरठ्यापलीकडे काय आहे माझं ?
२६-७-७३
एका घरात राहून पोस्टानं पत्र पाठवण्याची वेळ यावी ?
दुर्गा,
तुला प्रिय म्हणण्याचा अधिकार लग्नापूर्वीच मी गमावला आहे. डिग्रीचं भेंडोळं घेऊन या महानगरीत आलो. साथीला होती स्वप्नांची आरास. प्रत्येक नकारासोबत विझत जाणारी.
डिग्री नाही, तर माझं देखणं रूप कामाला आलं.
एका अलिशान हॉटेलात रिसेप्शनिस्टची नोकरी. सुंदर कपडे ... खळाळतं जीवन. दिमाखदार नट्या. मलईदार बायका; बड्या उद्योगपतींच्या. नेहेमी यायच्या. त्यांना कंपनी द्यायची. पहिल्यांदा नुस्ती कंपनी. पुढेपुढे त्या मागतील ते.
एक क्षण असा आला, तिथून मागची वाट तुटली होती. मग मॅनेजर सांगेल तिला खास संगत द्यायची. तिला तृप्त करायचं.
माझा कोवळा दुधाळ रंग ... दणकट बांधा नि गाभुळे हळवे डोळे अनेकजणींना हवेसे वाटायचे.
खूप पैसा मिळायचा. कधीतरी घरी जायचो. दादावहिनींचा हळूवार संसार पाहून पैसा खुपायला लागायचा. आपण संपलो असल्याची जाणीव चिरत जायची.
खरं तर लग्न करायला नको होतं ...
लग्न ... तो एक खुळा सूड होता. दादा - वहिनींच्या संसारावर उगवलेला. तू नकळत बळी गेलीस. कुरूप बाईला मन नसतं असा माझा निखालस समज तो खोटा ठरला. तुझं कोवळं मन मला दिसायचं नि ते हवंसंही वाटायचं. तू माझ्या संसारात स्वत:ला मुरवून घेत होतीस. तुझं ते विर्घळणं पाहून मी हादरून जात होतो.
तुझं अस्तित्व मला माझ्या पापांची दहशत घालीत होतं.
मी हा असा आहे.
नकळत जाळ्यात सापडलेला असहाय किडा. या जाळ्याचे रसतंतू इतके जिवंत आहेत की सजीव सुटून येणं कठीण. तरीही शपथपूर्वक सांगतो, माझं मन तुझ्यात गुंतलंय. माझं अपवित्र शरीर ... पण तृप्त घरकुलाचं स्वप्न तू मला क्षणभर का होईना, देऊ केलं होतंस.
तुझ्या निष्ठेनं भाजून निघतोय मी.
तू कुठंही जाऊ शकतेस. तुझ्या यातना पाहवत नाहीत. कपाटात पैसे आहेत. तुला उपयोगी पडतील ... ...
अनंत
* *