स्वरांत/तुझीयामाझ्यामध्ये पहाट झाली सेतू
< स्वरांत
तुझियामाझ्यामध्ये पहाटच झाली सेतू
दगडी भिंतीवरून झेपावणाऱ्या बोगनवेलीच्या बटबटीत झुबक्यासारखे. रंगीत, तरीही निर्विकार. त्या सुरांसारखीच तीही. ती त्याच्या शेजारी बसलीय. हातात आईस्क्रीम प्लेट. चमचा- चमचा चाटत बसताना वेळ जरा बरा जातो. एरवी जिकडे तिकडे उडताहेत कारंजी, तेलकट नि ओशट शब्दांची.
'... रोशन इज लकी ... नवरा रीअली फक्कड हं!'
'देसाईसाहेब, जावई झकास मिळवलात'
'मिसेस् देसाई, रोशा इतकी गोड दिसतेय. पोतंभर मिरच्या ओवाळून टाका तिच्यावरून.'
'रोशन, नवरा क्यूऽऽट हं ! पण त्याच्या टोकदार मिशा सांभाळ बाई !
या शब्दांच्या पाठीमागे आणखीनही खूपसे शब्द. ध्वनिविहीन. मनाच्या कंसातले.
( अगदी बेत्ताचाय नाही जावई ? देसाई दर दोन वर्षांनी स्टेटस् ला जातात. नि रोशाचा नवरा इथेच एम. एस्. झालाय. शी! )
(नुसताच स्मार्ट नि गोमटा. घरी तर काहीसुद्धा नाही म्हणे.)
(बाकी रोशानं आई-बापांनी दिलेला नवरा पत्करलान.. हे काय कमी?)
वगैरे वगैरे ...
पपा डॉ. संचेतींना घेऊन डायस जवळ येताहेत.
' मीट माय डॉटर मिसेस् रोशन देसाई. ओ. नो. सॉरी मिसेस शिर्के ... मिसेस रोशन अजिस शिर्के ... हे डॉ. अजित शिर्के.'
पपा बोलताना नको तिथे अडखळलेले असतात. ते अडखळणं तिला पुनः पुन्हा आठवावंसं वाटतं. मनाला छान वाटतं.
तो शेजारी सावरून बसलाय.
तिला त्याची दया येते. बिच्चारा! केव्हाचा एकटा एकटा बसलाय अन् तेही अवघडून.
'बोअर झालात ? सुटात उकडत असेल नाही?'
तो दचकून तिच्याकडे पाहतो.
ती खूप गोड दिसतेय.
'अं हं. आज बोअर होऊन कसं चालेल ?'
तो खुलून बोलतो नि जरा ऐसपैस बसतो.
त्याची किंचित् लालस नजर. ती एका एकी अंग चोरून घेते. तिचं अंग चोरणं त्याच्याही लक्षात आलं असावं. तो पुन्हा अवघडून बसतो.
नि मग पुन्हा दोघेही चमचा... चमचा आईस्क्रीम चाटीत बसतात.
○ ○ ○
'सगळ्यांच्या देखत खोलीत येण्याचा फार्स मला पसंत नाही. अन् टॉलरेबल फॉर मी ... ॲटलीस्ट ! उद्या सकाळी माथेरानला निघायचं आहेच ...'
तिच्या शब्दांचे ताठपण त्याला जाणवते. तो मंदसा हसतो, त्याचे दात चिमणे चिमणे आहेत. मध्ये हलक्याशा फटी.. तपकिरी डोळे. निवळलेल्या पाण्यासारखे संथ नि शांत. या क्षणी तिला त्याचे डोळे आवडतात. पण डोळयांबरोबर थोडंच आयुष्य काढायचंय?
'रोशन. तिसऱ्या मजल्यावरची सोळा नंबरची रूम बुक केलीय. तुला सोडायला येतो आम्ही...'
मैत्रिणींना बहुधा माँनी पाठवलं असावं.
'आज खूप गप्पा मारूयात आपण इथेच, तुमच्याजवळ झोपते बाई मी. कुणास ठाऊक पुन्हा कधी असं मनमुक्त जीवन मिळेल की नाही...' तिचा हट्ट.
तो सोळा नंबरमध्ये एकटाच. तिला मैत्रिणींशी गप्पा मारण्यातही इंटरेस्ट येत नाही. कसली तरी अनामिक भीती मनातून झिरपत राहते. ती डोळे मिटून गप्प पडून राहते.
'रोशा थकलीय. मालव बाई दिवा. पडलं पार एकदाचं लग्नं.'
मग काळाभोर अंधार. वर मिणमिणता जांभळा दिवा.
आज माँ नि पपांना शांत झोप लागली असेल.
० ० ०
रोशन: बेअब्रूच्या शक्यतेची टांगती तलवार.
बापाच्या डनलॉप स्टेटसवर केव्हाही कोसळू पाहणारी !
रोशन देसाई : धगधगत्या अग्निफुलांचा रेशमी बहर. वर्गातला सोहन अगरवाल. त्याच्याबरोबर भटकायला आवडायचं. खूप इंटलिजंट नि मुख्य म्हणजे पोरोंसमोर लाळ घोटत न बोलणारा. तपकिरी गाभुळी नजर रोखीत तो बोलायला लागला की क्षणभर श्वास धकधकायचा. कधी कधी बाहीचं बटण चावीत वेड्यासारखा निःशब्द बसून राहायचा. मग रोशा खट्याळपणे म्हणायची, 'चल वाबा रूपालीत तुला खाऊ घालते. बटणाला का ताप देतोस ? '
... यूथ सेंटरचा सतीश धवन. तुफान ॲग्रेसिव्ह. विचार करायला वेळच द्यायचा नाही. नेहमी कोणती ना कोणती इन्विटेशन्स घेऊन हा हजर असायचा- रोशन जॉईंट सेक्रेटरी म्हणजे जायलाच हवं.
'रोशा, ती ब्लू एलिफंटा पँट नि नेव्ही ब्लू झब्बा घाल. मी पण ब्लू चेक जर्सी घालतो.' असला आगाऊपणाही तो करी. पण कंपनी म्हणून बरा. शिवाय खूप हार्डवर्कर. पण ...
मनाच्या खोलात तसा कुणी शिरलाच नाही, ज्याच्यावर अवघं आभाळ उधळून मोकळं व्हावं.
सतीशची लाल स्कूटर दारात उभी राहिली की पपा अस्वस्थ व्हायचे. एक दिवस त्यांनी तिला बजावून सांगितलं,
'तू नाटकात काम कर - भन्नाट ड्रायव्हिंग कर. थोडीफार पोरांबरोबर फीरही. लाईफ एंजॉय करायला मी अटकाव करणार नाही. पण देशमुखी रक्ताचा माझा अभिमान ... तुला माहिताय. तू एकुलती एक मुलगी आहेस माझी. कोणत्याही परजातीच्या मुलाशी तू लग्न केलेलं क्षणभरही खपवून घेणार नाही मी...मला वाद नकोय.'
तरीही तिने आवाज पुढे रेटला होता.
'तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर खुशाल शिक्षण बंद करून टाका. मी मुलांबरोबर हिंडते पण नुसतं हिंडण्यासाठी नाही. कोणत्या ना कोणत्या कामाच्या संदर्भात. तुम्ही मला मोकळीक देता त्याचा दुरुपयोग होतोय, असं जर वाटत असेल तर माझ्या कुंवारपणाला तरी काय अर्थ आहे ? तुम्ही सांगाल त्याच्याशी ... तुमच्या जातीच्या कोणत्याही मुलाशी लग्न, करायला तयार आहे मी.'
बोलता बोलता तिचे डोळे डबडबून आले होते. पपांनी पुन्हा कधीही हा विषय काढला नव्हता. नवनवीन कपडे, नवीन पुस्तकं यांचा वर्षाव मात्र वाढला होता. दोन दिवसांतच ती सावरली होती. पपांना हवं असलेलं वचन तिनं दिलेलं होतं. आता ती मुक्तपणे जगायला मोकळी होती.
कधी युवक बिरादरीचा नितीन, कधी बाल आनंद मेळाव्याचा योगेश शहा ... सतत ती कुणा ना कुणाबरोबर दिसायची. आन्तरभारती; क्लब; लिओ असोसिएशनच्या भन्नाट पाटर्या ... कधी सहली. तऱ्हेतऱ्हेच्या साड्या ... तऱ्हेतऱ्हेचे दागिने ... असं तुफान वेगानं धावणारं लहरतं जीवन. तरीही ती निर्धाराने एका जागी पाय रोवून उभी असायची. एम. ए. पास झाली नि दुसऱ्याच दिवशी पपांनी एक जण घरी आणलान्. एक डॉक्टर. M. B. F. R. C. S. अशी लांबलचक डिग्री लावणारा. स्टेटसमध्ये सेटल होऊन तिथेच राहणारा. उंचापुरा नि नको तितका घारा. माँनी सांगितलेला साज घालून रोशा त्याच्यासमोर उभी राहिली.
' आय हेट इंडियन कल्चर. किती भयान घाण आहे या देशातं नि किती अंधश्रद्धा. तुम्हाला अमेरिकन फॅशन्स चार दिवसांत शिकवीन मी. ... डोन्ट मिस् अंडरस्टॅड मी. तसा मी अगदी कोरा आहे हैं.' त्याचं ओघळणारं हसणं.
'मी माझ्या बायकोला साडी मुळीच नेसू देणार नाही. आय मीन तुम्हाला. युवर फॉर्म इज मोअर सुटेबल फॉर ...'
तिला त्याचं बोलणं भयानक असह्य झालं. अंगभर पांघरलेलं खानदानीपण फेकून ती तडाड् तडकली.
'डू यू बिलीव्ह इन कास्ट सिस्टीम ? एखाद्या अमेरिकन 'मेड ' बरोबर का केलं नाही लग्न ? एका भारतीय पोरीचा छळवाद कुणासाठी मांडणार तुम्ही ? आईबापांसाठी ?'
मग पपांची धुसफूस. पपांच्या स्टेटसला शोभेसा खानदानी मुलगा नाकारल्याचा डंख. नंतर पुन्हा दुसरा मुलगा. हा अँबेसेडर मागणारा. त्याची मागणी ऐकून ती मनोमन तडफडली.
'पपा, केवळ तुम्हाला वचन दिलंय म्हणून जातीतला मुलगा पत्करीन मी. पण जीवनाविषयीच्या माझ्याही काही कल्पना आहेत, त्यांना मुरड घालणं परवडणारं नाही मला. हुंडा घेणारा मुलगा नकोय मला. लग्नही रजिस्टर व्हायला हवं. स्टेटस् चे घोळदार फुगे माझ्या मनात नाहीत. गरीव पण शिकलेला, स्वावलंबी नवरा चालेल मला.'
त्यानंतर पपांशी बोलणं खुंटलं होतं. माँ बोलायचा प्रयत्न करायची. माँ निव्वळ बाहुली. तिची कधी कधी कीव यायची नि कधी खूप रागही.
आठ दिवसांपूर्वी हा डॉक्टर सांगून आला, हुंडा न मागणारा. रोशननं त्याला पुसटसं पाहिलंय. तो कोण असेल, कसा असेल, याचा विचारच करायचा नाही, असं ठरवलं आहे. बळी जाताना निर्विकार मनानं जायचं. मरण आलं की चांगदेव म्हणे आत्मा ब्रह्मांडाच्या खुंटीला टांगून ठेवायचा. मनही तसंच दूर टांगता येतं. मग उरतात शरीराचे भोग.
० ० ०
माँनी सामान भरून ठेवलंय. ती त्यातल्या खूपशा साड्या उचकटून बाहेर काढून टाकते. चार सहा हलक्या-फुलक्या साड्या छोट्याशा बॅगमध्ये भरून बाहेरच्या हॉलमध्ये येते.पपा टाईम्स वाचताहेत. तोंडात चिरूट. चिरुटाच्या वर चढणाऱ्या धुरांच्या रेषा. समोर त्यांचा जावई अवघडून बसलाय. पपांचा चेहरा...मन उघड्या पेपरनी झाकलेलं. घनघोर पावसात भिजलेलं चिमणं पिल्लू वळचणीच्या टोकाशी घाबरंघुबरं बसावं तसा तो. तिचा नवरा. अजित शिर्के. त्याच्याही हातात कुठलंसं मासिक, त्याची नजर तिच्यावर पडते. तो अंधुकसा हसतो. तीही हसते.
'चहा घेणार थोडा? दहीभात खाऊन निघू या. साडेनऊच्या एक्सप्रेसचं रिझर्वेशन आहे. गेट रेडी.'
तिचा आवाज ऐकून पपा वर्तमानपत्र दूर करतात.
'अरे तुम्ही लोक आज माथेरानला पळणार नाही का? ओ. के. ओके! बाबूला म्हणावं गाडी काढ बाहेर आणि कालचे हार चढव म्हणावं तिच्यावर.'
बोलता बोलता खिशातून पाकीट काढीत त्यातल्या पाच हिरव्या नोटा पपा टेबलावर ठेवतात.
'रोशा बेटा, एन्जॉय करा. हे दिवस पुन्हा कधीच हाती लागत नाहीत. खूप मजा करा. खूप...!! बी हॅपी-माय गर्ल.'
बहुधा पपांचा आवाज हल्लक झाला असावा.
तिला त्या नोटा खुपतात.
'सॉरी! पपा, हनीमूनसाठी निघालोय आम्ही. नि पैसे कशाला हवेत? शिवाय अजित रिकाम्या खिशाने थोडेच आले असणार?'
ती झटक्यात आत निघून जाते.
पपा पुन्हा डोळ्यांवर पेपर ओढून बसतात.
० ० ०
मंद मंद पुढे सरकणारी गाडी. चढतीचा रस्ता. ती खिडकीतून केव्हाची बाहेर बघतेय.
तो शेजारी.
थोडासा दूर...तो तिच्याजवळ सरकतो.
ती दचकून एकदम मागे सरकते. डोंगरावरून कोसळणारं चंदेरी पाणी थेट डब्यातून आत झिरमिरतं. त्या पाण्याचे थेंब तिच्या केसांवर चमकताहेत. ओला ओला आरसपानी चेहरा. खूप जवळ असणारा.
त्याच्या नसांतून रक्ताची प्रचंड लाट उसळून धडपडत जाते. हात शिवशिवतात. ती त्याच्याकडे पाहते. तो एकटक बघतोय. ती पुन्हा सावरून बसते. खिडकीला लगटून.
तो उठतो नि दुसऱ्या टोकाच्या खिडकीतून बाहेर बघत बसतो. काळ्याशार करवंदांनी तुडुंब भरलेला हिरवा द्रोण घेतो. तिच्यासमोर धरतो. चार करवंदं ती मुकाट्याने उचलते . नि पुन्हा खिडकीबाहेर नजर लावते. बाहेर तरणाताठा निसर्ग. काळ्याभोर कातळातून झिरपणाऱ्या चंद्रवेली.
हिरवे झुलते मनोरे. वर निळाभोर तलाव नि पहाटेसारखी ओली हवा. अंगावरची शाल ती अंगभर घट्ट आवळून घेते. शालीचा कोमट स्पर्श जाणवतो नि मग पुन्हा डोळयांसमोर उभा राहतो तो. तिचा नवरा. अजित शिर्के.
कसा वागेल तो?
दिवसा...
रात्री...
त्याच्या नितांत निकटपणाची उलटीपालटी चित्रं तिच्या मनासमोर उभी-आडवी नाचून जातात. त्याची विलक्षण किळस येते. दू ऽऽऽ र पळून जावंसं वाटतं. विषानं माखलेली धारदार नजर ती त्याच्याकडे फेकते.
...बाहीचं बटण तोंडानं चावीत तो कुठं तरी उगाच बघतोय. तिला जाणवतं, त्याच्या मिशा खूप कोवळ्या आहेत. पीळ देऊन पिळदार केलेल्या मिशीवरून तिची नजर हळूच ओठांना पाहून घेते. लालबुंद ओठ. छोटेसेच. दुधाच्या सायीचा थर अजून ओठांवर पसरलाय.
एक कोवळी लहर अंगभर सरसरून जाते. ती भानावर येते. तिला स्वत:चाच खूप राग येतो. नि ती पुन्हा नजर खिडकीबाहेर काढते.
० ० ०
गाडी थांबलेली.माथेरानचं झाडांनी वेढलेलं स्टेशन. हॉटेलवाल्यांची झुंबड. तो निर्विकारपणे वर आभाळाकडे पाहात उभा.
'कुठल्या हॉटेलमध्ये उतरायचं? सांगा ना!'
'अं ?' तो दचकून तिच्याकडे पाहतो. 'मी काय सांग? तुमच्या मागे येईन. यायलाच हवं' त्याच्या स्वरात अलिप्तता. तो बहुधा आतून रागावलाय. जाम वैतागलाय. तिला खुद्कन हसायला होतं.
'अंह, तुम्ही नवरा आहात. तुम्ही निर्णय घ्यायचा. मी येईन तुमच्या मागे.'
'ठीक' म्हणत तो पुढे चालायला लागतो. मागे तीही झुलत झुलत चालत राहते.
...'गिरिविहार' मधली उंच डोंगरावरची खोली, अंधारी रात्र, आत दोन कॉटस्. एकमेकांना जोडलेल्या. वरती बॉम्बे डॉइंगच्या फुलपाखरी चादरी. शेजारी राजवर्खी सुरई... निळागुलाबी नक्षीचा पेला. ती वॉश घेऊन बाहेर येते. त्याने दोन्ही कॉटस् दोन भिंतीना लावलेल्या आहेत. मध्ये भलं मोठं अंतर. आरामात सिगारेट ओढीत तो वाचतोय. तिची चाहूल लागते नि तो उठून बसतो.
'सिगारेट ओढलेली चालेल ना तुम्हाला? रूमचं दार बंद करायला हवं पण खिडकी उघडी ठेवलीय मी. हॅव ए रेस्ट. काही हेल्प लागली तर सांगा. मी जरा वाचत पडतो ...'
'मी ... मला काही सांगायचंय.' तिचे अडखळते शब्द.
'बोला ना ... भय वाटतं माझं? ' तो तिच्यावर नजर रोखीत विचारतो.
'अं ... ? ' ती सैरभैर. हरवलेली. काहीतरी अवघड सांगायचंय पण शब्द हरवलेले.
'रात्र झालीय. प्रत्येक स्त्रीला पहिल्या रात्री पतीला जे द्यावं लागतं ते मी द्यायला तयार आहे. पण मी खरं सांगू? ... हा व्यवहार फक्त दोन शरिरांचाच राहतो. ज्याच्यावर मी प्रेम करते, अशा तरुणाला तनमन द्यायला खूप आवडलं असतं मला ... ! अजून तरी माझं प्रेम तुमच्यावर बसलेलं नाही. तुम्ही खूप सरळ आहात. साधे आहात, पण अजून हवे हवेसे वाटणारे नाही. माझी खात्री आहे. कधीतरी मला तुम्ही हवेसे वाटाल. मी खरंच प्रयत्न करीन पण तो पर्यंत तुम्हाला उपाशी ठेवण्याचं पातक मी करणार नाही I Promicse you. मी तुम्हाला को-ऑपरेशन देण्याचा नक्की. प्रयत्न करीन...'
तिला बोलताना खूप धाप लागलीय. ती सुरईतलं पाणी पेल्यात ओतते नि गटागट पिऊन टाकते नि पदराने कपाळा वरचा घाम टिपून घेते. तो मिशीतल्या मिशीत हसतो. आणि बोलू लागतो,
'रोशन, तुझं माझ्यावर जेव्हा प्रेम बसेल ना तेव्हा सांग. तोवर थांबायची माझी तयारी आहे ... शरीराचे अघोरी खेळ मलाही नको आहेत ... I hate it. मी तुझ्याबरोबर आहे. निर्धास्तपणे झोप ...'
तो पुन्हा डोळ्यांसमोर पुस्तक धरतो. खूप वेळ ती जागीच. तो ही पुस्तक वाचतोय. कधीतरी झोप लागलेली.
आकाशमोगरीच्या फुलांचा घनदाट गंध श्वासातून धुसमटतो. ती जागी होते. पहाटेचा अंधुक चंदेरी प्रकाश खिडकीतून आत आला आहे. अंगावरची साडी सारखी करीत ती खिडकीत येते. बुचाची उंच उंच झाडं पांढऱ्या घोसांनी लगडली आहेत. खाली टवटवीत फुलांचा दाट गालिचा सांडलाय. त्या मादक गंधाच्या लाटा श्वासातून थेट रक्तात मिसळून जातात. ती धावत बाहेर येते नि ताजी फुलं वेचून खोलीत आणते.
समोर तो गाढ झोपलाय. मिटलेल्या पापण्यांची दाट झालर. गव्हाळ रंग, पिळदार मिशा ... तो शांत झोपलाय. अगदी शांत, नितांत शांत. ती हळूच त्याच्या कॉटवर बसते. त्याचं भोळं रुपडं तिला खूप हवंसं वाटतं. हलक्या हातांनी ती त्याच्या अंगावर शाल घालते नि फुलं त्याच्या नाकाशी धरीत त्याच्या डोळ्यांवर ओठ टेकते. आणि त्याच्या कानात सांगत राहते,
'अजित प्लीज ... माझं तुझ्यावर प्रेम बसलंय. चक्क प्रेम ! या फुलाच्या दाट गंधासारखं. आत्ता या क्षणी. शप्पथ......'
* *