हिंदुसमाज संघटना आणि विघटना/स्वराज्य आणि स्वधर्म
फार प्राचीन काळापासून हिंदुसमाजात समता आणि विषमता, संघटना आणि विघटना, गुणनिष्ठा आणि जन्मनिष्ठा, बुद्धिनिष्ठा आणि शब्दप्रामाण्य असे दोन विचारप्रवा चालू असून त्यांतील दुसऱ्या समाजघातकी प्रवाहाचा जोर इसवी सनाच्या दहाव्या-अकराव्या शतकापासून वाढत गेला आणि त्यामुळे या समाजाचा अधःपात झाला, हा विचार गेल्या चार प्रकरणांत सविस्तर मांडला. या काळाच्या सुमाराला नव्या स्वतंत्र स्मृती निर्माण होण्याचे बंद झाले; आणि जुन्या स्मृतींवर टीका करणारे, अनेक स्मृतींचे सारार्थ काढून त्यावरून नवीन धर्मशास्त्र बनविणारे असे धर्मशास्त्रकार उदयास आले. या धर्मशास्त्रकारांना निबंधकार व त्यांच्या ग्रंथांना निबंध असे नाव रूढ झालेले आहे. या निबंधकारांपैकी मेधातिथी, विद्यारण्य, यांसारखे काही अपवाद वजा जाता, बहुतेक शब्दप्रामाण्यवादी, अंध, समाजपरिस्थिती पाहून, स्वतंत्र चिंतन करून निर्णय करण्याची ऐपत नसलेले, समाजाच्या उत्कर्षापकर्षाची कारणमीमांसा करण्यास असमर्थ आणि प्रतिगामी, अविवेकी व मूढ असेच होते. त्यामुळे हिंदुधर्मशास्त्राला उत्तरोत्तर समाजघातक व विकृत रूप येत गेले; व त्याचाच परिणाम होऊन हिंदुसमाज रसातळाला गेला. इसवी सनाच्या आठव्या शतकात सिंध प्रांत मुस्लीमांच्या ताब्यात गेला तो कायमचा आणि दहाव्या शतकात पंजाब परतंत्र झाला तोही तसाच. तेव्हापासून आजच्या क्षणापर्यंत अखिल भारत, त्याच्या सर्व प्रांतांसह, पूर्ण स्वतंत्र असा केव्हाही झाला नाही. अखिल भरतखंडाला स्वातंत्र्यसूर्याचे दर्शन झाले, पारतंत्र्याचा अंधार त्याच्या कोणत्याही भूभागात नाही, असा दिव्य क्षण या हजार-बाराशे वर्षांत एकदाही उगवला नाही. हे दुर्घटित आपण आपल्या समाजाच्या संघटना विघटनेचा विचार करताना नित्य ध्यानी वागविले पाहिजे. या काळात रजपूत, विजयनगर, मराठे व शीख यांनी आक्रमणांचा निकराने प्रतिकार करून, त्यांचे बव्हंशी निर्दाळण करून, या भूमीला स्वातंत्र्यसूर्याचे दर्शन मधून मधून घडविले. या पुढील प्रकरणात प्रामुख्याने त्यांच्याच कर्तृत्वाची मीमांसा करावयाची आहे. त्यांच्या कर्तृत्वामागे कोणते धर्मशास्त्र होते, समाजधारणेचे कोणते तत्त्व होते, समाजसंघटनेचे काही नवीन तत्त्व त्यांनी शोधिले होते काय, त्यांना यश आले ते कशामुळे आणि शेवटी तेही पारतंत्र्यात बुडाले ते कशामुळे याची चिकित्सा करून हिंदुसमाजाच्या भावी उत्कर्षासाठी काही मार्ग आपल्याला शोधावयाचा आहे; उपाय- चिंतन करावयाचे आहे. पण तसे करताना वर सांगितलेल्या अविवेकी व हीन धर्मशास्त्रामुळे हिंदुसमाज अधःपाताच्या कोणत्या पातळीला गेला होता तेही आपण पाहून ठेविले पाहिजे. त्यावाचून आपल्यावरील भयानक संकटाची कल्पना आपल्याला येणार नाही; आपण ज्या व्याधींनी ग्रस्त झालो आहो त्यांचे स्वरूप नीट आकळणार नाही आणि अंतर्मुख होऊन उपायचिंतन करता येणार नाही. म्हणून प्रथम पारतंत्र्याच्या या प्रदीर्घ घोर अंधःकारयुगाचे स्वरूप आपण पाहू. नंतर या युगात वर निर्देशिलेल्या चार राष्ट्रांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी जे प्रयत्न केले त्यांच्या यशापयशाची चिकित्सा करू आणि मग उपायचिंतन करू.
जीवनशक्ती नाही :
वर सांगितलेच आहे की आठव्या शतकात सिंध व दहाव्या शतकात पंजाब हे प्रांत हिंदूंच्या हातून गेले ते कायमचे. आजही ते पूर्णपणे आपल्या ताब्यात आलेले नाहीत. आणि पुढे कधी काळी येण्याची आशाही उरलेली नाही. वास्तविक येथे बलुचिस्थान व अफगाणिस्थान यांचाही निर्देश केला पाहिजे. कारण हे दोन्ही प्रांत आठव्या नवव्या शतकापर्यंत हिंदू राजसत्तेखाली होते. तेथील प्रजाही बव्हंशी हिंदू होती. दिल्लीला मुस्लीम सत्ता स्थापन करणारा महंमद घोरी याचा आजा हा हिंदू होता आणि ज्या घोर परगण्यातून तो आला तेथे हिंदूंचीच वसती होती. पण हे प्रांत आपले होते याची स्मृतीही भारताला नाही, इतके ते आपल्याला व आपण त्यांना पारखे झालो आहो. अकराव्या शतकाच्या प्रारंभी महंमद गझनीच्या स्वाऱ्या सुरू झाल्या. पुढील तीस वर्षांत त्याने सतरा स्वाऱ्या केल्या, पण एकाही स्वारीत त्याचा पराभव झाला नाही. काही ठिकाणी त्याला प्रतिकार झाला, कडवा प्रतिकार झाला, पण काही ठिकाणी तोही झाला नाही. राजे व सेनापती पळूनच गेले. या स्वाऱ्यांत त्याने शेकडो देवळे फोडली, हजारांनी कत्तली केल्या व दशसहस्त्रांनी हिंदूंचे धर्मांतर केले. कत्तलीत बाल, वृद्ध, स्त्रिया यांनाही त्याने वगळले नाही. हजारो स्त्रियांना त्याने दासी करून परदेशांत नेऊन विकले. हिंदूंचा जो जो म्हणून मानबिंदू होता तो त्याने पायपोसाने मोजला. पण तरीही हिंदू त्याचा यशस्वी प्रतिकार करू शकले नाहीत. हिंदूंची जीवनशक्ती किती क्षीण झाली होती हे यावरून दिसून येते. स्वातंत्र्याचे, आपल्या भूमीचे, आपल्या धर्माचे, आपल्या स्त्रियांचे, संसाराचे रक्षण करण्याचे सामर्थ्य हे जीवनशक्तीचे पहिले लक्षण होय. ते शक-यवन- कुशाण- हूण यांच्या आक्रमणांच्या वेळी जसे दिसून आले तसे या वेळी दिसले नाही.
अंध धर्मशास्त्र :
यानंतर वास्तविक हिंदूंना दीडशे वर्षांचा दीर्घ अवसर मिळाला होता. गझनीचे राज्य महंमदानंतर अगदी विस्कळित, विघटित व दुबळे झाले होते. त्या काळी पंजाब सहज मुक्त करता आला असता; इतकेच नव्हे तर गझनीची सत्ताही बुडविता आली असती. पण त्यासाठी सावधता, साक्षेप यांची आवश्यकता असते. झालेल्या घटनांची कार्यकारणमीमांसा करून तीवरून काही निर्णय करण्याची शक्ती अंगी असावी लागते. आगामी संकटांची आधी जाण ठेवून त्यांच्या प्रतिकाराची सिद्धता करावी लागते. पण हिंदूंनी यातले काहीच केले नाही. बाहेरच्या जगात, भारताच्या सरहद्दीबाहेर काय चालले आहे, आपल्याला निर्दाळून गेलेला शत्रू कोण होता, त्याचे बलाबल कशात आहे, तेथून पुन्हा आक्रमण येण्याची शक्यता कितपत आहे, याची जी विवंचना, ती हिंदूंनी केलीच नाही. सर्व जगाच्या हालचालींचे, निदान सरहद्दीजवळच्या देशांतल्या घडामोडींचे ज्ञान मिळविणे हे जीवनशक्तीचे दुसरे लक्षण होय. पण परदेशगमनाचा निषेध, म्लेच्छ सहवासाचा निषेध, ही हिंदूंच्या धर्मशास्त्रातली लाडकी कलमे त्याच्या आड आली. आणि महंमद घोरीची आक्रमणे ११७६ साली म्हणजे सुमारे दीडशे वर्षांनी सुरू झाली तरी महंमद गझनीच्या वेळेपेक्षा भारतातील राजांच्या मनोवृत्तीत, बेसावधतेत व प्रतिकारशक्तीत कसलाही फरक पडला नव्हता. धर्मशास्त्रकार परिस्थिती पाहून धर्मशास्त्र रचीत नव्हते आणि राजसत्ताधारी डोळसपणे अवलोकन करून अनुभवाने राजनीतिशास्त्र व युद्धशास्त्र संवर्धित करीत नव्हते. महंमद घोरीच्या स्वाऱ्या सुरू झाल्या. तीन स्वाऱ्यांत त्याचा जय झाला. चवथ्या स्वारीत पृथ्वीराजाने त्याचा निःसंदेह पराभव केला व त्याला जीवदान देऊन सोडून दिले. यानंतर तरी त्याने व रजपूत राजांनी सावध रहावे ! पण उलट पृथ्वीराज विलासात दंग होऊन राहिला व आपल्याच प्रधान सरदारांवर अत्याचार करू लागला. तेव्हा त्याच सरदारांनी शिहाबुद्दिन महंमद घोरीकडे जाऊन त्याला बोलावून आणले. तरीही ठाणेश्वरच्या लढाईत अनेक रजपूत राजे व सरदार घोरीशी सामना करण्यास एकत्र झाले होते. मधल्या काळात मुस्लीमांचे युद्धशास्त्र, त्यांची कपटनीती, त्यांचा धार्मिक कडवेपणा हे सर्व जाणून त्यांवर मात करण्याची सिद्धता हिंदूंनी केली असती तर अजूनही जय मिळाला असता. पण दीडशे वर्षांपूर्वी महंमद गझनीशी लढताना हिंदूंची जी युद्धनीती होती तीच याही वेळी होती. अर्थातच रजपुतांची वाताहत झाली आणि भारताचे भवितव्य ठरून गेले. यानंतर घोरीने पाचची स्वारी करून कनोज घेतले. तोपर्यंत तेथला राजा जयचंद राठोड तमाशा पहात बसला होता. पृथ्वीराजाशी त्याचे वैर होते, म्हणून तो त्याच्या साह्यार्थ गेला नाही, हे ठीक. पण हेच संकट आपल्यावर येणार हे जाणून त्याने स्वतंत्रपणे तयारी करावयास हवी होती. पण ही बुद्धी व शक्ती हिंदूंत राहिली नव्हती. त्यामुळे कनोज पडले. ते लुटून महंमद लगोलग काशीवर गेला व तेथील सर्व मूर्ती नाहीशा करून त्याने त्यांवर मशिदी उभारल्या व अपरंपार लूट जमा करून नेली. येथून पुढे हिंदूंच्या राजसत्तेबरोबरच त्यांच्या मंदिरांचे, मूर्तीचे व स्त्रियांचे भवितव्य ठरून गेले- परकीय आक्रमणापुढे बळी जाणे ! मुस्लीम राज्याचा पाया आता भारतात घातला गेला होता. ते या तीहींचे कडवे शत्रू होते. आणि या तिहींनाही त्यांचे संरक्षण करण्यास समर्थ असे मित्र कोणी नव्हते. 'धर्म एव हतो हन्ति, धर्मो रक्षति रक्षितः ।' हे वचन प्रसिद्ध आहे. मूर्ती, मंदिरे हा हिंदूंचा धर्म. त्याचे रक्षण करण्यास हिंदू असमर्थ ठरले. तो हत झाला व त्यामुळेच हिंदूंचा नाश झाला. काशीला हिंदूंनी प्रतिकारही केला नाही !
पडण्यास योग्य :
दिल्ली, अजमीर, कनोज, काशी यांचा उच्छेद झाल्यावर मुस्लीम सत्तेचा पाया हिंदुस्थानात घातला गेला आणि पुढच्या उण्यापुऱ्या चाळीस वर्षांत सर्व उत्तर हिंदुस्थान स्वातंत्र्याला मुकला. चिं. वि. वैद्य लिहितात, 'पुढील पंचवीस वर्षांत उत्तर हिंदुस्थानातील राजघराणी आश्चर्यकारक झपाट्याने पडली. पण यात आश्रर्य काय ? उत्तर हिंदुस्थान या वेळी पडण्यासच योग्य झाले होते.' इतर राज्ये जिंकण्याचे काम शिहाबुद्दिनच्या कुतुबुद्दिन ऐबक व शमसुद्दिन अल्तमश या सेनापतींनी केले. हे दोघेही प्रथम गुलाम होते. पण अंगच्या गुणांनी सेनापती आणि सुलतान झाले. शिहाबुद्दिन याने कुतुबुद्दिन ऐबक यास आपली कन्या देऊन जावईही केले. ऐबकने याचप्रमाणे अल्तमशला आपला जावई केले. गुलामी त्यांच्या उत्कर्षाच्या आड आली नाही. या काळात हिंदुसमाजात हे कधीही घडले नसते. कारण येथले लोक चातुर्वर्ण्याचे अभिमानी होते ! १९९७ साली कुतुबुद्दिन याने गुजराथवर स्वारी केली. अबूच्या पायथ्याशी एका घाटावर हिंदू सेना खडी होती. मुस्लीमांनी जरा भ्यालेसे दाखवून माघार घेतली व नित्याप्रमाणे हिंदू फसून पुढे आल्यावर ते उलटले. लढाई होऊन वीस हजार हिंदू मारले गेले. नंतर एकदोन वर्षांत मुस्लीमांनी पाटण व अनहिलवाड जिंकून गुजराथचा विध्वंस केला (११९९). इ. स. १२०२ साली ऐबकने कलिंजरचा विख्यात किल्ला घेतला. तेथली देवळे पाहून त्यांच्या मशिदी केल्या आणि पन्नास हजार लोक गुलाम म्हणून नेले. त्याच साली बखत्यार खिलजी या सरदाराने बंगाल व बिहार हे प्रांत जिंकले, विक्रमशील या विद्यापीठाची राखरांगोळी केली, तेथले सर्व बौद्ध ग्रंथ जाळून टाकले व हजारो बौद्ध भिक्षूंची कत्तल केली. कुतुबुद्दीनने यासाठी त्याचा मोठा सन्मान केला. कुतुबुद्दिनानंतर अल्तमश सुलतान झाला. त्याने रणथंबोर व ग्वाल्हेर हे किल्ले घेतले. त्या वेळी ग्वाल्हेरमधील स्त्रियांनी जोहार केला ! इ. स. १२३४ साली अल्तमशने विदिशेवर स्वारी करून त्या पुरातन नगरीचा व तेथील देवालयांचा नायनाट केला. आणि तेथून उज्जनीवर चालून जाऊन त्याने महाकाळाचे प्रसिद्ध देवालय फोडले आणि विक्रमादित्याची मूर्तीही तोडून टाकली.
स्थितप्रज्ञ हिंदू राजे :
अल्तमशनंतर जवळ जवळ तीस वर्षे म्हणजे १२६६ मध्ये बल्बन सुलतान होईपर्यंत पुन्हा हिंदूना अवसर मिळाला होता. कारण या काळात दिल्लीचे सुलतान अगदी दुबळे होते व राजसत्ता विस्कळित झाली होती; पण पुनरुत्थान करण्याचे सामर्थ्यं हिंदूच्या ठायी राहिलेच नव्हते. विंध्याच्या दक्षिणेस दावण गिरीचे यादव, हळेबीडचे होयसळ यादव, मदुरेचे पांड्य, आणि वरंगळचे काकतीय यांची विशाल राज्ये होती. त्यांना तर तीनशे वर्षे अवसर मिळाला होता. पण ते सावध झाले नाहीत. उत्तर हिंदुस्थानात मुस्लीमांकडून होणारे अत्याचार, त्या कत्तली, ते बलात्कार, ती जाळपोळ, तो विध्वंस हे सर्व ते हिंदु सम्राट स्थितप्रज्ञाच्या वृत्तीने पहात बसले होते. १२९४ साली अल्लाउद्दिन खिलजीने देवगिरीच्या यादवांचा नाश केला. त्यानंतर दहा वर्षे तो दक्षिणेत उतरला नाही. म्हणजे दक्षिणेत आक्रमण आल्यावरही पुन्हा दहा वर्षांचा अवधी मिळाला होता. पण तीनशे वर्षांत ज्यांना तयारी करता आली नाही त्यांना दहा वर्षांत काय साधणार ? दहा वर्षांनी अल्लाउद्दिनचा सेनापती मलिक काफूर याच्या स्वाऱ्या सुरू झाल्या. आणि पुढील पंधरा वर्षांत वर निर्देशिलेली सर्व राज्ये विध्वंसून तो रामेश्वरला पोचला आणि तेथे त्याने एक मशीद उभारली. हा काफूर प्रथम एक अस्पृश्य हिंदू होता. त्या वेळी त्याला सूर्यचंद्र वंशांतल्या राजांच्या सैन्यात शिपाई म्हणून सुद्धा प्रवेश मिळाला नसता. पण मुसलमान होताच त्याने या वंशांतल्या राजांची साम्राज्ये सहज लीलेने विलयाला नेली. आणि पुढे तर तो दिल्लीचा कर्ताकरविता झाला. तो सुलतानही झाला असता पण तेवढ्यात त्याचा खून झाला. दुसरा एक पूर्वीचा अस्पृश्य, खुश्रूखान, हा तर प्रत्यक्ष दिल्लीचा सुलतान झालाच. हिंदू असताना हे दोघेही अंत्यज एवढ्या मोठ्या पदाला चढू शकले नसते. पण हे पाहूनही हिंदूंची जन्मसिद्ध जातिव्यवस्था व त्यांचे ते सनातन चातुर्वर्ण्य जागे झाले नाही अंत्यज हे जन्मोजन्मी अस्पृश्यतेच्या नरकात राहिले पाहिजेत असे हिंदुधर्मशास्त्र आहे. त्यांनी मुस्लीम होऊन आपला उत्कर्ष साधावा. मग त्यांच्यापुढे हिंदुराजे, हिंदु शास्त्री व हिंदुधर्मशास्त्रही नमेल. पण हिंदू असताना उत्कर्ष साधण्याची संधी त्यांना मिळणार नाही ! असल्या अधम, हीन धर्मशास्त्रामुळे समाजाचा नाश न झाला तरच नवल !
अल्लाउद्दिनाने १२९७ साली गुजराथ प्रांत जिंकला. ऐबकने तो जिंकल्यावर लगेच पुन्हा तो स्वतंत्र झाला होता. आता मात्र त्याला दीर्घ काल पारतंत्र्य आले. १३०३ साली अल्लाउद्दिनाने चितोडचा विध्वंस केला. त्या वेळी राणी पद्मिनीसह १५००० रजपूत स्त्रियांनी जोहार केला. १३२० पर्यंत मलिक काफूरने दक्षिणची सर्व राज्ये बुडविली. आणि १६३९ साली शहा मीर या मुसलमान सरदाराने काश्मीरचे हिंदुराज्य बुडविले. अशा रीतीने सिंध, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, बंगाल, बिहार, गुजराथ, माळवा, मेवाड, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगण, केरळ, अशा सर्व हिंदुराज्यांचा मुसलमानांनी विध्वंस केला व तेथे मुस्लीम सत्ता स्थापन केली. या सत्तेचा काहीच प्रतिकार झाला नसता तर इजिप्त, इराण, जावा, सुमात्रा यांप्रमाणेच आज हिंदुस्थान सर्वच्या सर्व इस्लामधर्मी झाला असता. पण तसा तो झाला नाही. याचे कारण, राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र व पंजाब या राष्ट्रांनी नष्ट झालेली हिंदूंची जीवनशक्ती पुन्हा जिवंत केली व आक्रमणाचा प्रतिकार करून शेवटी भारतातून मुस्लीम सत्तेची पाळेमुळे खणून काढली, हेच होय.
मुस्लीमांचे सामर्थ्य :
या चार प्रदेशांत हिंदूंनी जे पुनरुत्थान केले ते कोणत्या मार्गाने केले ते आता पहावयाचे आहे. पण ते पहात असताना आपण मुस्लीमांचे सामर्थ्य काय होते ते पाहिले पाहिजे. कारण या सामर्थ्याचा नाश करूनच हिंदूंना हे पुनरुत्थान साधावयाचे होते. एक गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे की अखिल भारतावर मुस्लीमांचे एकछत्री साम्राज्य असे कधीही नव्हते. अल्लाउद्दिन खिलजी व महंमद तघलख यांच्या काळी सर्व मिळून दहा-पाच वर्षेच काय ते असे साम्राज्य असले तर असेल. बाकी प्रारंभापासून अकबरच्या उद्यापर्यंत मुस्लीम साम्राज्यसत्ता अशी भारतात केव्हाही नव्हती. मुस्लीमांनी भारतातील सर्व प्रवेश जिंकले हे खरें पण सिंध, काश्मीर, बंगाल, बिहार, गुजराथ, महाराष्ट्र येथले सुलतान बहुधा स्वतंत्रच असत. त्यांच्या व दिल्लीच्या सुलतानांच्या नित्य लढाया चालत. त्यांची आपसांतही नित्य युद्धे होत. वारसाच्या लढाया दिल्लीच्या तख्तासाठी होत तशाच या प्रदेशांतही होत असत. अकबरापासून म्हणजे १५६० पासून औरंगजेब अखेर इ. स. १७०७ पर्यंत मुस्लीम साम्राज्यसत्तेला थोडे स्थैर्य होते. त्या वेळीही अखिल भारतावर त्यांचे साम्राज्य नव्हतेच. दक्षिणेत मोगलांची सत्ता कधीच प्रस्थापित झाली नाही. त्यांचे साम्राज्य उत्तरेतच होते. आणि तेहि वारशाची दरपिढीला होणारी युद्धे, अयोध्या, बंगाल येथील सुभेदारांची बंडे यांनी खिळखिळे झालेले, असेच होते. याशिवाय शिया व सुनी असे भेद मुस्लीमांत होतेच आणि ते एकमेकांत घनघोर युद्धे व्हावीत इतके तीव्र होते. वंश दृष्टीने पाहिले तरी त्यांच्यांत अनेक भेदभाव होते. अरब, अफगाण, इराणी, तुर्क, मंगोल, शिद्दी व बाटलेले हिंदी-मुसलमान या वांशिक भेदांना, अनेक वेळा अत्यंत उग्र रूप येऊन एका वंशाने दुसऱ्याच्या कत्तली कराव्या येथपर्यंत अनेक वेळा मजल गेलेली होती. हे सर्व इतिवृत्त ध्यानात घेतले म्हणजे असे म्हणावे लागते की, भारतावरील मुस्लीम आक्रमणाचा इतिहास हा मुस्लीमांच्या कर्तृत्वाचा नसून हिंदूंच्या नादानीचा, अधःपाताचा आहे. हे आक्रमण पाच-सहाशे वर्षांत केव्हाही, कोणत्याही क्षणी हिंदूंना भारी होते असे नाही. मुस्लीमामुस्लीमांत पाहिले तर कोणीही यावे आणि कोठल्याही प्रांतातल्या आणि दिल्लीच्याही सत्तेचा धुरळा करावा अशी स्थिती बहुधा सर्व काळी होती. असे असून हिंदूंना हे पाच सहा शतके साधले नाही, ही गोष्ट अत्यंत उद्वेगजनक वाटते. या समाजाच्या सामर्थ्याला कोठे तरी अत्यंत घातक अशी कीड लागलेली असली पाहिजे, हाच त्याचा अर्थ आहे.
तुलना :
इ. स. १३४६ साली हसन गंगू बहामनी याने दक्षिणेत कुलबर्गा येथे स्वतंत्र राज्य स्थापन केले. त्याआधी देवगिरीस यादवांचे राज्य होते. एकदा पराभव होऊन दिल्लीचे मांडलिकत्व नशिबी आल्यावर यादवांनी दिल्लीचे जू झुगारून देण्याचा सारखा प्रयत्न चालविला होता. रामदेवराव, शंकरदेव व हरपाळदेव यांनी यासाठी दोन पिढ्या धडपड चालविली होती. पण त्यांना यश आले. नाही. ते सर्व प्राणास मुकले. उलट हसन गंगू बहामनी याला, दिल्लीचे जू झुगारावे, असे वाटताच झुरळ उडवून द्यावे, तसे त्याने ते उडवून दिले. आणि बहामनी राज्ये नष्ट करण्यासाठी अनेकवार स्वाऱ्या करूनही तीनशे वर्षे दिल्लीकरांना यश आले नाही. उत्तरेतली व दक्षिणेतली हिंदुराज्ये दिल्लीच्या सुल्तानांनी पाचपंचवीस वर्षांत सहज लीलया बुडविली. काही काही राज्ये त्यांनी एकेका वर्षांत व काही तर दोन-चार महिन्यांत नष्ट केली. जे दक्षिणेतील बहामनी राज्याचे, तेच बंगाल, गुजराथ, माळवा, सिंध येथील मुस्लीम राज्यांचे. दिल्लीच्या सत्तेशी झगडा करून दोनदोनशे वर्षे तेथील सुलतानांनी आपली राज्ये टिकविली होती. याचे कारण हेच की दिल्लीच्या सत्तेतच तसा दम नव्हता. नादान, विलासी सुलतान, सरदारांचे सेनापतींचे हेवेदावे, वर सांगितलेले पंथभेद, वारशाची युद्धे यांनी ती सत्ता नेहमी जर्जर, विकल झालेली असे. पण असे असूनही हिंदूंना तिचे निर्दाळण करता आले नाही. दुदैव असे की त्यांनी अठराव्या शतकापर्यंत तसा प्रयत्नही केला नाही. हे पाहून हिंदूंच्या जीवनशक्तीचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन फार बारकाईने विचार केला पाहिजे असे वाटते.
आकांक्षाच मेल्या :
हा विचार करू लागताच अनेक प्रश्न मनात उभे राहतात. अरबस्तानातून सिंधवर प्रथम आक्रमण आले, आणि त्यानंतर राजस्थानवर अनेक आक्रमणे झाली. ती सर्व रजपुतांनी परतवून लावली. पण प्रश्न असा येतो की, या टोळधाडी कायमच्या नष्ट करण्यासाठी राजपुतांनी अरबस्तानावर का स्वारी केली नाही ? महंमद गझनी, महंमद घोरी यांनी लागोपाठ भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या. पण या सत्ता मुळातच उखडून टाकण्याच्या हेतूने हिंदी राजांनी गझनी, कंदाहार, खुरासान या परगण्यांवर का स्वाऱ्या केल्या नाहीत ? ही दिग्विजयी वृत्ती पूर्वी हिंदूंत होती. ती आता समूळ नष्ट का झाली ? तेराव्या शतकाच्या आरंभी मुस्लीम सत्तेचा पाया भारतात घातला गेला. आणि लगेच सर्व भारत जिंकण्याच्या आकांक्षा मुस्लीमांत निर्माण झाल्या. सिंधपासून बंगालपर्यंतचा सर्व उत्तर हिंदुस्थान त्यांनी पंचवीस वर्षात आक्रमिला आणि पुढील शतकात रामेश्वरपर्यंत जाऊन तेथे त्यांनी मशीद उभारली. अशा आकांक्षा प्रांतोप्रांती स्वतंत्र झालेल्या प्रत्येक मुस्लीम सत्तेच्या ठायी होत्या. पण अकराव्या आणि बाराव्या शतकात भारतात जी अनेक हिंदू राज्ये होती त्यांतल्या एकानेही अशी आसेतुहिमाचल भरारी का मारली नाही ? मनात शल्य असे उभे राहते की अनेक रजपूत सरदारांनी राजा भगवानदास, मानसिंग, मिर्झाराजे जयसिंग, जसवंतसिंग यांनी— मुस्लीमांच्या साम्राज्याच्या प्रसारासाठी अखिल भारतभर आणि मध्य आशियापर्यंतही दिग्विजय केले. पण हम्मीर, कुंभराणा संगराणा यांनी हिंदूंचे साम्राज्य वाढविण्यासाठी राजस्थानबाहेर कधीच पाऊल टाकले नाही ! या घटनांची संगती कशी लावावयाची ?
रजपूत, विजयनगर, मराठे व शीख यांनी मुस्लीम आक्रमणाच्या प्रतिकारार्थ जे प्रयत्न केले त्यांचा इतिहास पाहून त्याची थोडी मीमांसा आपल्याला करावयाची आहे. तसे करताना वरील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करू.
रजपूत :
आठव्या शतकात सिंधवर अरबांनी आक्रमण केले. तो प्रांत त्या वेळी अतिशय थोडक्या अवधीत बळी पडला. तेव्हा तेथून पुढे सरकून कासीमने मुलतानही घेतले. अरबांनी पश्चिमेस जिब्राल्टर, स्पेनपर्यंत विजय मिळविले होते. तसेच विजय हिंदुस्थानातही मिळविण्याची त्यांची आकांक्षा होती. त्यामुळे सिंधमधून ते राजस्थानवर आक्रमण करू पहात होते. पण बाप्पारावळ हा एक थोर पुरुष या वेळी उदयास आला व त्याने मेवाडमध्ये चितोडास राज्यस्थापना करून अरबांच्या आक्रमणास पायबंद घातला. पुढल्या शतकात खलिफा अलमामूनच्या सैन्याला मेवाडचा राजा दुसरा खुम्माण याने अनेकवेळा खडे चारल्याचे मागे सांगितलेच आहे. असे प्रचंड तडाखे बसल्यामुळे अरबांनी राजस्थानवर फिरून आक्रमण केले नाही. अकराव्या शतकात महंमद गझनीच्या स्वाऱ्या भारतावर झाल्या. पण तो राजस्थानात कधी शिरला नाही. त्यामुळे मेवाडशी त्याचा सामना झाला नाही. तेराव्या शतकात शिहाबुद्दिन घोरीने दिल्लीला राज्य प्रस्थापित केले आणि उत्तर हिंदुस्थानातील बहुतेक राज्ये त्याने व पुढील सुलतानांनी नष्ट केली. पण त्या वेळीही मेवाडवर त्यांची मात्रा चालली नाही. शमसुद्दिन अल्तमश याने मेवाडवर स्वारी केली होती. पण त्या वेळचा राजा जैत्रसिंह याने त्याचा पुरा मोड केला. हीच परंपरा तेराव्या शतकाच्या अखेरपर्यंत टिकवून मेवाडच्या शूर रजपुतांनी आपले स्वातंत्र्य अबाधित राखले. इ. स. १३०३ मध्ये अल्लाउद्दिन याने चितोडवर स्वारी केली. त्या वेळी राणा रत्नसिंह व लक्ष्मणसिंह यांनी प्रतिकाराची पराकाष्ठा केली. पण रणांगणात ते मारले गेले व पद्मिनीसह रजपूत स्त्रियांनी जोहार केला. त्यानंतर चितोड सर्व जाळून टाकून सुलतानाने मेवाडचे राज्य नष्ट करून टाकले. पण लवकरच चक्रवर्ती हम्मीर याचा उदय झाला व त्याने मेवाडच्या गदीची पुन्हा प्रस्थापना केली. त्यानंतर क्षेत्रसिंह, मोकल, कुंभ व महाराणा संग यांसारखे भीम- पराक्रमी पुरुष चितोडच्या गादीवर आले व आपल्या शौर्यधैर्याने त्यांनी स्वधर्माचे व स्वातंत्र्याचे रक्षण केले. गुजराथ, माळवा येथील सुलतान या वेळी स्वतंत्र झाले होते. त्यांच्याशी या राजांच्या नित्य लढाया चालत. कधी ते एक होऊनही चितोडवर हल्ला करीत. पण तरीही चितोड अभंग राहिले. पण यानंतर बाबराचा उदय झाला. त्याने सर्व मुस्लीम सामर्थ्याची संघटना केली. त्या वेळी रजपुतांचे बल असे संघटित होऊ शकले नाही आणि महाराणा संग याचा खानवाच्या (फत्तेपूर शिक्री) लढाईत पराभव होऊन मेवाडचे स्वातंत्र्य संपुष्टात आले.
बाप्पारावळापासून राणा संगापर्यंत जवळ जवळ आठशे वर्षे मुस्लीम आक्रमणाचा जो राजपुतांनी प्रतिकार केला त्यासाठी भारतवर्ष त्यांचा कायमचा ऋणी राहील. रजपुतांचे हे कार्य इतके असामान्य आहे की, भारताच्या इतिहासात त्याची स्मृती अमर होऊन राहील यात शंका नाही. बाप्पारावळ व खुम्मण यांनी आपल्या शौर्याचे पहाड मध्ये उभे केले नसते तर आठव्या नवव्या शतकात अरबांच्या आक्रमणाची लाट सर्व उत्तर हिंदुस्थानात पसरली असती. त्या घोर आपत्तीतून भारताला वाचविण्याचे श्रेय सर्वस्वी रजपुतांचेच आहे.
रजपुतांच्या श्रेयाचा असा विचार केल्यानंतर त्याच्या मर्यादांचाही विचार केला पाहिजे. आणि हिंदुसमाजाच्या संघटनक्षमतेविषयी यावरून काही निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
एकछत्र नाही :
भारतातील हिंदुबलाच्या संघटनेचा विचार करू लागताच पहिली गोष्ट ध्यानात येते ती ही की, रजपुतांना अखिल राजस्थानचे एकछत्री राज्य करणे कधीही शक्य झाले नाही ! मेवाड, जयपूर, जोधपूर, अजमीर, बिकानेर इत्यादी रजपूत राज्ये स्वतंत्र होती. प्रसंगी ती मेवाडच्या नेतृत्वाखाली एक होत असली तरी त्यांच्या आपसात नित्य लढाया चालू असत. दक्षिणेत विजयनगरच्या नेत्यांनी तुंगभद्रेच्या दक्षिणेच्या आंध्र, तामीळनाड, केरळ व कर्नाटक येवढ्या प्रदेशांचे एकछत्री राज्य स्थापून ते २००-२५० वर्षे यशस्वी रीतीने चालविले होते. त्यामुळे तो सर्व भूप्रदेश मुस्लीमांच्या अत्याचारांपासून दीर्घकाळ अबाधित राहिला. रजपुतांनी याच प्रकारे निदान सर्व राजस्थान एकछत्री केले असते तर जयपुर, जोधपूर, इ. संस्थानांचे स्वातंत्र्य, तेथील स्त्रियांचे शील व पावित्र्य यांचे त्यांना रक्षण करता आले असते. इतकेच नव्हे तर सिंध, गुजराथ, माळवा, या प्रदेशांतील मुस्लीम सत्ता नष्ट करून शेवटी दिल्लीच्या सुलतानीलाही शह देता आला असता. महाराणा कुंभ, महाराणा संग, महाराणा प्रतापसिंह यांच्या पराक्रमांचे इतिहास वाचले म्हणजे यात अशक्य काहीच नव्हते असे दिसते. विजयनगरने वर सांगितलेल्या चार प्रदेशांचे स्वातंत्र्य व शील रक्षिले आणि मधून मधून विजापूर, नगर, गोवळकोंडा यांवरही आक्रमण करून ती राज्ये खिळखिळी करून टाकली. हे सर्व यश एकछत्री सत्तेचे आहे. रजपुतांना हे जमले नाही. यात त्यांना यश आले नाही. ते का आले नाही?
प्रसिद्ध इतिहासकार ईश्वरी प्रसाद यांनी रजपुतांच्या शौर्याचे व त्यांच्या उणीवांचेही वर्णन केले आहे. "रजपूत जन्मतःच लढवय्या असे. शरणागतीपेक्षा प्राणदान त्याला श्रेयस्कर वाटे. पण त्याचे हे शौर्य, हे बल संघटित होणे दुरापास्त होते. कारण त्यांच्यात भिन्न भिन्न जमाती व कुले असून प्रत्येक जमातीला आपल्या वांशिक थोरवीचा अतिरिक्त अभिमान असे. या जमातीत नित्यस्पर्धा व कलह चालत व त्यांमुळे रजपुतांचे ऐक्य दुष्कर होऊन बसले होते. शिवाय तेथे जातिभेदाची भावना पराकाष्ठेची तीव्र होती. त्यामुळे खालच्या जातीतील पुरुष थोर पदाला चढणे अशक्य होते. अर्थातच खालच्या जातीतील लोकांच्या कर्तृत्वाला समाज मुकत असे. जाती व कुल यांच्या अंध अभिमानामुळे गुण व कार्यक्षमता यांची फार हानी होऊन मुस्लीमांचा पहिला तडाखा बसताच; सर्व राजपुती भारत पायासकट हादरला." –(मिडीव्हल इंडिया, पृ. १३२) पुस्तकाच्या प्रस्तावनेतही त्यांनी हेच विचार मांडले आहेत. मानापमानाच्या कल्पनांमुळे रजपूत आंधळे झाले होते. त्यामुळे विघटना हेच त्यांचे लक्षण होऊन बसले. रजपूत एवढे महापराक्रमी पण सर्व रजपूत जमाती व लोक दृढपणे एकछत्रात आणणारा सम्राट राजस्थानात केव्हाच झाला नाही !
अंध मानापमानाच्या भावनांमुळे, कुलश्रेष्ठतेच्या विपरीत कल्पनेमुळे रजपूत हे राष्ट्रसंघटना वा साम्राज्य संघटना करू शकले नाहीत. त्या सर्वांना धर्माभिमान होता. पण आपला कुलाभिमान धर्मसंघटनेत विलीन करण्यास त्यांची तयारी नव्हती. त्यामुळे शेवटी प्रत्येक कुलाला आपल्या मुली मोगलांना द्याव्या लागल्या व मोगलांचे दास व्हावे लागले आणि तो धर्माभिमान निष्फल ठरला. म्हणजे कुलाभिमानही गेला व धर्माभिमानही गेला !
स्वराज्य व स्वधर्म :
पण धर्माभिमान याचा अर्थ आपण स्पष्ट केला पाहिजे. अनेक इतिहासकारांनी जयपूर, जोधपूर या संस्थानांतील राजे भगवानदास, मानसिंह, मिर्झाराजे जयसिंह, जसवंतसिंह, बिकारनेचा रायसिंह, हाडावतीचा रावभोज यांचे, ते सर्व स्वधर्माचे अभिमानी होते, हिंदुधर्मावर त्यांची अपार निष्ठा होती, असे वर्णन केले आहे. यांच्यापैकी बहुतेकांनी आपल्या घराण्यातील कन्या मोगलांस दिल्या होत्या व मोगल साम्राज्याचा विस्तार करण्यात आपले शक्तिसर्वस्व वेचले होते. वर सांगितलेच आहे की, रजपुतांनी राजस्थानाबाहेर राज्यसाम्राज्यविस्तारासाठी कधीच पाऊल टाकले नाही. पण टाकले नाही ते हिंदुराज्यविस्तारासाठी! मुस्लीम साम्राज्यासाठी ते मध्य आशियापासून तंजावरापर्यंत आणि सिंधपासून बंगाल बिहारपर्यंत सेना घेऊन दौडत होते. महाराणा प्रतापसिंह यांचे स्वातंत्र्य- संपादनाचे प्रयत्न यांनीच विफल केले. शिवछत्रपतींवर तो प्रसंग यांनीच आणला होता. मिर्झाराजा जयसिंह म्हणत असे की, दिल्लीचे नशीब माझ्या हाती आहे. मी दिल्लीचे केव्हाही चूर्ण करू शकेन. आणि त्याचे सेनासामर्थ्य व सेना-नायकत्वाचे गुण पाहता, ते अक्षरशः खरे होते असे दिसते. त्याच्याजवळ बावीस हजार रजपूत घोडेस्वार असत. गझनीच्या महंमदाजवळ पंधरा हजारच घोडेस्वार होते. त्याचा पूर्वज मानसिंह याच्याजवळ वीस हजार कडवी रजपूत सेना होती. पण ती घेऊन तो अकबराच्या सेवेस नेहमी सज्ज असे.
अंगी सेनानायकाचे विपुल गुण आहेत, प्रचंड सेना हाताशी आहेत, स्वधर्माचा अभिमानही आहे; तरी हे सर्व रजपूत वीर बादशहाच्या सेवेत राहून हिंदुराज्ये बुडविण्याच्या व मुस्लीम राज्यविस्ताराच्या उद्योगात गुंतलेले असत. याचा अर्थ असा की स्वराज्य व स्वधर्म यांचा काही संबंध असतो हे त्यांच्या स्वप्नातही नव्हते. व्रतेवैकल्ये, तीर्थयात्रा, उपास, गोब्राह्मणपूजन, दानधर्म, पूजा अभिषेक यांचा आचार केला की आपण स्वधर्मांचे पालन केले असे त्यांना वाटत होते. आणि ही श्रद्धा अजूनही हिंदुसमाजात दृढमूल आहे. हिंदुधर्माला व्यक्तिधर्माचे स्वरूप कसे आले होते, हे यावरून स्पष्ट होते. धर्म हा समाजाच्या धारणेसाठी, अभ्युदयासाठी, संघटनेसाठी असतो हा प्राचीन विचारच हळूहळू या भूमीतून नाहीसा झाला आणि या समाजाला संघटनतत्त्वच राहिले नाही. राष्ट्रभावना शक-यवन- हूणांच्या आक्रमणाच्या काळी बऱ्याच प्रमाणात होती. तिचा पुढे लोप झाला. आणि धर्माला व्यक्तिनिष्ठ रूप आले. मोक्ष ही कमालीची व्यक्तिनिष्ठ कल्पना आहे. तिला समाजनिष्ठ करण्याचा गीतेतील भागवतधर्माचा प्रयत्न होता. पण टिळकांनी गीतारहस्यात म्हटल्याप्रमाणे, भागवतधर्मही पुढे निवृत्तिप्रधान म्हणजे व्यक्तिनिष्ठ झाला. व्रतेवैकल्ये, उपासतापास, तीर्थयात्रा यांचा तर समाजनिष्ठेशी केव्हाच संबंध नव्हता. यामुळेच स्वराज्य व स्वधर्म यांचा संबंध तुटला व मानसिंग, जयसिंह हे स्वराज्यशत्रू स्वधर्मनिष्ठ ठरू लागले.
ब्रह्मक्षत्र :
स्वधर्म व स्वराज्य यांचा संगम म्हणजेच प्राचीन काळचा ब्रह्मक्षत्रसंयोग होय. ब्राह्मण व क्षत्रिय यांनी जर सहकार्य केले तर, अग्नी वने जाळतो, तसे ते शत्रूला जाळून टाकतील, (वन, १८५, २५) ब्राह्मण क्षत्रियाचे सामर्थ्य वाढवितो व क्षत्रियामुळे ब्राह्मणाचा उत्कर्ष होतो, (शांति, ७३, ३२) अशा तऱ्हेची अनेक वचने महाभारतात आहेत. समाजाच्या उत्कर्षासाठी स्वधर्म व स्वराज्य यांची सांगड अविभाज्य असली पाहिजे, असाच त्यांचा अर्थ आहे. धर्माचा विचार करतानाही, राजधर्मात सर्व धर्म समाविष्ट होतात, असा पितामह भीष्मांचा अभिप्राय होता. ते म्हणतात, 'ज्याप्रमाणे एकट्या हत्तीच्या पावलात इतर सर्व प्राण्यांच्या पावलांचा समावेश होतो त्याप्रमाणे एका राजधर्मात इतर सर्व धर्मांचा अंतर्भाव होतो.' (शांति, ६३, २५) राजधर्मविहीन व्रतेवैकल्ये, उपासतापास, तीर्थयात्रा यांना प्राचीन ऋषी धर्म म्हणण्यास सिद्धच नव्हते. याचाच अर्वाचीन भाषेत अर्थ असा की जो स्वातंत्र्यद्रोही असतो तो स्वधर्मनिष्ठ असणेच शक्य नाही. त्याच्या सोमवार- एकादश्यांना व प्रयाग- काशीच्या वाऱ्यांना काडीमात्र अर्थ नाही. हे सर्व राजे स्वतःला क्षत्रिय म्हणवीत असत. महाभारतकारांच्या मते क्षत्रियाचा धर्म कोणता? क्षत्रियाला शत्रूच्या नाशावाचून दुसरा धर्म नाही. (उद्योग- २१-४३) युद्धात जय मिळवणे हाच क्षत्रियाचा व्यवसाय होय. (सभा, ५५,७) राज्य जिंकण्याच्या कामी कोणी अडथळा करील तर त्याचा वध करणे हा क्षात्रधर्म होय. (शांति १२,१०,७) असे क्षात्रधर्माचे स्पष्टीकरण त्यांनी केले आहे. पण मानसिंग, जसवंत सिंह हे शत्रूचे दास्य पतकरूनही स्वतःला श्रेष्ठ क्षत्रिय म्हणवीत! अत्यंत विपरीत गोष्ट अशी की चितोडच्या महाराण्यांपुढे नमण्यात किंवा शिवछत्रपतींच्या सेवेत त्यांना कुलाभिमान गेला असे वाटत असे, अपमान वाटत असे. पण वंशपरंपरा मोंगलांची गुलामी पतकरण्यात वा त्यांना कन्या देण्यात, कुलाभिमान दुखविला असे वाटत नसे. स्वराज्य व स्वधर्म यांची फारकत झाल्याचे हे लक्षण होय. असा धर्म समाजसंघटना करण्यास सर्वस्वी अयोग्य ठरतो. याच काळात मुस्लीमांनी अनेक वेळा 'धर्म' हे संघटनतत्त्व मानले होते. बाबर व संग यांचे खानव्याला युद्ध झाले त्यात प्रथम बाबराची सेना वीस हजारच होती. पण संगाने पूर्वी पराभूत करून सोडून दिलेले सर्व मुस्लीम त्याला मिळाले व ती सेना लाखावर गेली.
स्वराज्यद्रोही तो धर्मद्रोही :
डॉ. एस् दत्त यांनी संग व बाबर यांच्या सेनांचे पुढीलप्रमाणे वर्णन केले आहे : बाबराजवळ १५००० च सैन्य होते. पण मरू किंवा मारू अशा त्वेषाने ते पेटले होते. आणि ते दृढ व संघटित असे होते. उलट संगाच्या सैन्यात दृढनिष्ठा व संघटना या दोहींचा अभाव होता. संगाच्या सैन्यात हिंदू होते तसेच मुसलमानही होते. पण मुस्लीमांच्या चित्तात अफगाण साम्राजाच्या आकांक्षा होत्या. त्यामुळे ते मनापासून लढलेच नाहीत. तरी त्यांनी संगाचा पक्ष घेतल्यामुळे बाबर त्यांना धर्मभ्रष्ट म्हणतो. (त्याच्या मनात स्वराज्य व स्वधर्म यांची फारकत झालेली नव्हती हे यावरून स्पष्ट आहे.) शिवाय संगाच्या सैन्यात जे हिंदू होते ते केवळ जुलमाचा रामराम म्हणून आले होते. कारण संगाचे आधिपत्य व श्रेष्ठत्व त्यांना मनातून सहन होत नव्हते. लढाई संपताच भिन्न रजपूत जमाती सरळ आपापल्या देशी निघून गेल्या. बलाढ्य अशा संगाच्या जोखडाखालून बरे सुटलो, असे जणू त्यांना वाटले. (हिस्टरी ॲण्ड कल्चर ऑफ दि इंडियन पीपल- संपादक डॉ. मुनशी, खंड ६ वा, पृ. ३४६) डॉ. दत्त म्हतात की, संग हा रजपुतांच्या भिन्न जमातीत राष्ट्रैक्याची जोपासना करू शकला नाही. म्हणून हे अपयश आले. हे तर खरेच आहे. 'रजपूत तेवढा मेळवावा' असा महामंत्र त्यांना कोणीच दिला नव्हता. आणि ही भावना एकाएकी उद्भवणे कठिणच असते. पण धर्मांवर तर सगळ्यांचे प्रम होते ना? निष्ठा, भक्ती, अभिमान ही होती ना? होय. हे सर्व होते. पण धर्म म्हणजे काय हेच त्यांना माहीत नव्हते. हे एक संघटनतत्त्व आहे, त्याचा स्वातंत्र्याशी संबंध आहे, इतर अभिमान व मानापमान त्या निष्ठेत विलीन केले पाहिजेत, असे त्यांना कोणी शिकविलेच नव्हते. त्यावेळचे धर्मशास्त्रज्ञ व त्यांचे धर्मशास्त्र केवळ व्यक्तिधर्माला वाहिलेले होते, समाजधर्म ते जाणीतच नव्हते. अशा धर्मशास्त्रापायी विघटनेवाचून दुसरे काय होणार ?
मॅझिनीचे राजकीय तत्त्वज्ञान विशद करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्याच्या चरित्राच्या प्रस्तावनेत म्हटले आहे की, राजकारणाला धर्म आहे व धर्माला राजकारण आहे, हे महत्-सत्य, हे कालदेशाबाधित सत्य ओळखून प्रत्येकाने परमेश्वरी कर्तव्य म्हणून स्वातंत्र्यलढ्यासाठी सिद्ध झाले पाहिजे. कारण व्यक्तीच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या व मनुष्यजातीच्या सर्व प्रकारच्या उन्नतीचे मुख्य साधन राजकीय स्वातंत्र्य हे आहे. म्हणून त्याचे संपादन व संरक्षण करणे हे प्रत्येक व्यक्तीचे प्रथम कर्तव्य होय. ती परमेश्वराची आज्ञाच आहे. राजधर्म सर्व धर्मांत श्रेष्ठ असे म्हणण्यात पितामह भीष्मांचा जो अभिप्राय आहे तोच मॅझिनीच्या मनात होता, असे यावरून दिसते. पण निवृत्ती, व्रत- वैकल्ये, केवलभक्ती, जातिभेद, चातुर्वर्ण्य, पंथभेद या हिंदुधर्मशास्त्रातील घातक तत्त्वांमुळे राजधर्माचा हिंदूंना विसर पडला व ते परकीय आक्रमणास बळी पडले, आणि त्यामुळे अंती त्यांचा धर्मही गेला व स्वातंत्र्यही गेले. लक्षावधी लोकांना मुस्लीमांनी सक्तीने बाटविले, लक्षावधी स्त्रियांवर बलात्कार केले, त्यांना दासी म्हणून परदेशात विकले व आपल्या जनानखान्यात घातले. सहस्रावधी मंदिरांचा व मूर्तीचा विध्वंस केला व शेकडो धर्मग्रंथ, धर्मपीठे व धर्मप्रवक्ते यांना जाळून टाकले. स्वराज्य व स्वधर्म यांचा अभेद हिंदूंनी जाणला नाही त्याचे हे प्रायश्चित्त आहे. अजूनही त्याच भ्रांतीमुळे तशीच फळे ते भोगीत आहेत. आत्मा आणि परमात्मा यांचा अभेद यांचे ऐक्य, त्यांनी जाणले नसते तरी फारसे बिघडले नसते. अद्वैत तत्त्वज्ञानाची उपासना त्यांनी केली नसती तरी धर्महानी झाली नसती. पण स्वराज्य व स्वधर्म यांचे अद्वैत येथील शास्त्रज्ञांनी जाणून ते लोकमानसात दृढमूल करावयास हवे होते. पण त्यांनी नेमके उलट केले. जीवशिवांच्या अभेदावार सर्व शक्ती खर्च केली आणि स्वराज्य- स्वधर्माच्या अद्वैताची संपूर्ण उपेक्षा केली. म्हणूनच हिंदुधर्म हा संघटनतत्त्व होऊ शकला नाही. आणि त्यामुळे हिंदुसमाज छिन्नभिन्न झाला. तो समाजच राहिला नाही.
वैयक्तिक कर्तृत्व :
महंमद घोरी, कुतुबुद्दिन ऐबक, अल्तमश, बल्बन, अल्लाउद्दिन खिलजी, बाबर, यांच्याशी वैयक्तिक दृष्टीने तुलना करता पृथ्वीराज चव्हाण, चक्रवर्ती हम्मीर, राणा कुंभ, राणा संग हे रजपूत महावीर लवमात्र कमी नव्हते. आणि त्याग, चारित्र्य, प्रजाहितदक्षता या गुणांत तर ते शतपटीने श्रेष्ठ होते. अकबर हा मुस्लीमांतील मोठा बादशहा. त्याच्याशी तुलना केली तर महाराणा प्रतापसिंह हे कर्तृत्वाच्या दृष्टीने मुळीच कमी नव्हते. पण अकबर हा सर्व उत्तर हिंदुस्थानचा बादशहा झाला व राणाजींना आयुष्यभर प्राणांतिक झगडा करूनही शेवटी चितोड घेता आला नाही ! याचे कारण हिंदुसमाज किंवा नुसते रजपूत सुद्धा राणाजींच्या पाठीशी नव्हते, नव्हे तेच अकबराचे सेनापती होऊन राणाजींच्या व हिंदुसमाजाच्या नाशास प्रवृत्त झाले होते, आणि तरीही हिंदुधर्मशास्त्र त्यांना भ्रष्ट म्हणत नव्हते, हे होय. उलट अकबराच्या मागे, हिंदूंशी प्रसंग असला म्हणजे तरी, सर्व मुस्लीम समाज उभा असे. म्हणजे तुलनेने पाहता मुस्लीम समाज हा समाज होता. त्यामुळेच वैयक्तिक कर्तृत्वात राणाजींच्या पेक्षा विशेष आधिक्य नसूनही अकबर सुलतान होऊ शकला. मायभूमीचे स्वातंत्र्य हे धर्माच्या प्रगतीचे एक लक्षण होय असे हिंदुधर्मशास्त्राने मानले असते, स्वातंत्र्य व धर्म यांत अद्वैत मानले असते तर या भूमीत कलियुग आलेच नसते.
विजयनगर :
विजयनगरच्या संस्थापकांनी व नेत्यांनी मात्र हे अद्वैत पुरेपूर जाणले होते. मुस्लीमांचे आक्रमण हे हिंदुधर्मावरील भयानक संकट आहे हे तर त्यांनी ओळखलेच; पण त्याबरोबर या धर्माच्या रक्षणासाठी स्वराज्याखेरीज अन्य उपाय नाही हे महान सत्य त्यांनी ध्रुवासारखे सतत दृष्टीसमोर ठेविले होते. त्यामुळे त्यांना समाजसंघटना कशी करता आली व त्या घोर आपत्तीपासून हिंदुसमाजाचे कसे रक्षण करता आले ते आता पाहावयाचे आहे.
हिंदू पंडितांचे उद्योग :
विजयनगरच्या साम्राज्याची स्थापना इ. स. १३३६ साली झाली. वर सांगितलेच आहे की तेराव्या शतकाच्या अखेरपर्यंत मुस्लीमांनी उत्तर हिंदुस्थान जिंकले असले तरी दक्षिणेत त्यांचा प्रवेश झाला नव्हता. पण चौदाव्या शतकाच्या प्रारंभी तसा प्रवेश होताच अवघ्या १५-२० वर्षात देवगिरी यादव, द्वारसमुद्र- होयसळ यादव, वरंगळ- काकतीय व मदुरा- पांड्य या चारही बलाढ्य साम्राज्यांचा त्यांनी विध्वंस करून टाकला. डॉ. एस्. कृष्णस्वामी अय्यंगार म्हणतात की 'मुबारिक खिलजीने देवगिरीचा नाश करून तेथे लष्करी तळ केला हे दक्षिणेतील सत्तांचे डोळे उघडण्यास पुरेसे अंजन होते. वास्तविक हेही अंजन हवे होते असे नाही.' त्यांचा भावार्थ असा की, उत्तर हिंदुस्थानातील मुस्लीम आक्रमण, अत्याचार व त्यांच्या साम्राज्याची स्थापना या घटनांवरून दाक्षिणात्य सत्तांना मुस्लीम आक्रमणाचे स्वरूप व त्याचा अर्थ पूर्वीच कळावयास हवा होता. पण या काळात ते अशक्य होते. कोणत्याही घटनेचा अर्थ आकळण्याची ऐपतच त्या वेळी हिंदुसमाजधुरीणांत राहिली नव्हती. आत्मा व परमात्मा यांत पूर्ण अद्वैत आहे की विशिष्ट अद्वैत आहे, एकादशीसारख्या उपवासाला तांबडा भोपळा चालेल की दुध्या, अनंतव्रताताला लाडू चालतील की घीवर, स्नानसंध्या तीन वेळा करावी की दोन वेळा, गंध आडवे लावावे की उभे, अस्पृश्यांचा वारा अंगावर आला तर कोणते प्रायश्चित्त घ्यावे, सावली पडली तर कोणते आणि प्रत्यक्ष स्पर्श झाला तर कोणते, जेवताना अंगावर एक वस्त्र असावे की दोन, पाय ओले असावेत की कोरडे, मुलीचे लग्न आठव्या वर्षी करावे की सव्वा आठव्या वर्षी, यांपैकी कोणत्या वयामुळे उभयकुलांचा उद्धार होईल, या व असल्या गहन व समाज जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या समस्या सोडविण्यात येथल्या धर्मशास्त्रज्ञांची बुद्धी चोवीस तास गुंतलेली असल्यामुळे, मंदिरविध्वंस, स्त्रियांवरील अत्याचार, पारतंत्र्य असल्या क्षुल्लक प्रश्नांचे अर्थ आकळून घेण्यास त्यांना वेळच नव्हता ! काही संन्यासी, संत यांना वरील गहन समस्यांत रस वाटत नव्हता. पण त्यांना इहलोकीच्या कोणत्याच वस्तूविषयी गृह, वित्त, धन, दारा, सुत, स्वराज्य, साम्राज्य, शत्रू, मित्र, यांपैकी कशाविषयीही- रस नव्हता. त्यामुळे अल्लाउद्दिन आणि रामदेवराव यांत त्यांना भेद वाटत नव्हता. इतर काही बुद्धिमंतांनी आपली दृष्टी साहित्याकडे वळवून एका उपमेत ऐशी प्रकार कसे होतात हे सांगण्यात, नाटकातील नायिकांचे नवऱ्याच्या सहवासात राहणारी, जिचा नवरा प्रवासास गेला आहे अशी, जिच्यावर रमणाचे प्रेम आहे अशी, नाही अशी, असे भेद ठरविण्यात आणि यांत पुन्हा नवबाला, प्रौढा, गतवयस्का या दृष्टीने प्रत्येक प्रकाराचे आणखी भेद कसे करता येतील हे पाहण्यात आपली सर्व प्रज्ञा गुंतविलेली होती. मिळून काय, राजकारणाविषयी स्वराज्य, स्वातंत्र्य यांविषयी सर्वं उदासीन होते. त्यामुळे उत्तर हिंदुस्थान गेला, चितोडही पडले, देवगिरीचे साम्राज्य कोसळून पडले तरी दक्षिणेत कोणाचे डोळे उघडले नाहीत.
आणि राजांचे :
देवगिरीच्या रामचंद्ररावाचा पहिला पराभव १२९६ मध्ये झाला. त्यानंतर त्याने नियमित खंडणी दिली नाही म्हणून मालिक काफूरने वारी करून त्याला कैद करून दिल्लीला नेले (१३०४). आगामी आपत्तीची कल्पना येण्यास हे पुरेसे होते; पण १३०९ मध्ये मलिक काफूर वरंगळवर चालून आला तरी त्याला तोंड देण्याची कसलीच तयारी तेथे नव्हती. रामचंद्ररावाने या वेळी दक्षिणेतील इतर राज्ये बुडविण्यास मनोभावे साह्य केले. यात आपण धर्मद्रोह करीत आहो असे त्याला मुळीच वाटले नाही. अर्थातच वरंगळच्या प्रतापरुद्राचा पराभव झाला आणि प्रचंड लूट वेऊन काफूर परत गेला. १३११ मध्ये तो पुन्हा दक्षिणेत आला. आता द्वारसमुद्राच्या वीर बल्लाळावर त्याला धाड घालावयाची होती. वीर बल्लाळ हा रामचंद्ररावाचा जुना वैरी. तेव्हा ही संधी साधून त्याने काफूरबरोबर साह्यार्थ परशुरामदेव या सुभेदाराला विपुल फौजफाटा देऊन पाठविले. उत्तरेतून ही काळलाट येत असताना, द्वारसमुद्रावर ती थडकण्याची वेळ आली तरी वीर बल्लाळ राजधानीत नव्हता. तो कोठे गेला होता ? मदुरेच्या पांड्य राज्यावरील हक्काविषयी सुंदर पांड्य व वीर पांड्य हे आपसात झगडत होते. त्यांनाही या वेळी आपण भांडू नये असा विवेक सुचला नाही. आणि वीर बल्लाळालाही, या भांडणाचा फायदा उठविण्याची ही वेळ नव्हे, हे ध्यानात आले नाही. वरून तो काळ चालून येत असताना वीर बल्लाळ पांड्यांवर स्वारी करून त्यांचा मुलूख घशात घालण्याच्या उद्योगात गढून गेला होता. अर्थात तो राजधानीत- द्वारसमुद्रास- परत आला तेव्हा रामचंद्रराव व प्रतापरुद्र यांच्याच मार्गाने जाण्यावाचून आपल्याला गत्यंतर नाही हे ध्यानी येऊन त्याने शरणागती पत्करली. त्यानंतर पांड्यांची घटका भरली. त्यांनी गनिमी काव्याने दऱ्याखोऱ्यातून बराच तीव्र प्रतिकार केला. त्यामुळे काफूरच्या सैन्याची बरीच दुर्दशाही झाली. पण अंती विजय त्याचाच झाला. त्याने देवगिरी, वरंगळ, द्वारसमुद्र यांच्या प्रमाणेच पांड्यांची राजधानी मदुरा जाळून टाकली आणि तेथून थेट रामेश्वरला जाऊन तेथे त्याने मशीद बांधली.
यानंतरही सात वर्षे गेली. १३१८ मध्ये मुबारिक खिलजी पुन्हा देवगिरीवर चालून आला. पण तरीही हरपाळदेवाची तयारी नव्हती. त्याचा पराभव करून त्याला मुबारिकने जिवंत सोलून मारले. तेथून मुबारिक वरंगळला गेला. तेथे प्रतापरुद्राचीही तीच स्थिती होती. हिंदू एक तर पूर्ण बेसावध असत किंवा सावध असूनही त्यांचे कर्तृत्व शून्य झाल्यामुळे त्यांना राज्य, लष्कर, यांची संघटना करता येत नव्हती. परिस्थितीचे ज्ञान करून घ्यावे, स्वपरबलाबल जाणावे, उपायचिंतन करावे हे सामर्थ्यच त्यांच्या ठायीचे नष्ट झाले होते. या वेळी प्रतापरुद्राचा पराभव झाला; पण त्यामुळे त्याला काही उमज पडला, असे नाही. १३२१ साली ग्यासुद्दीन तघलखाने आपला मुलगा जौनाखान याच्या आधिपत्याखाली वरंगळवर फिरून फौज धाडिली तेव्हा प्रतापरुद्र काय करीत होता ? आर. सी. मजुमदार म्हणतात, 'दिल्लीला बंडाळ्या माजलेल्या ऐकून त्याने सुलतानी जू झुगारून दिले; खंडणी देण्याचे नाकारले आणि वारंवार येणाऱ्या सुलतानी आक्रमणापासून स्वधर्म, स्वदेश, यांचे रक्षण करण्यासाठी हिंदूंची संयुक्त आघाडी निर्माण करण्याऐवजी त्याने लष्करी स्वाऱ्या करून भोवतालची राज्ये जिंकण्याचा उद्योग आरंभिला ! राजनैतिक विद्या व शहाणपण कसले ते त्याला मुळीच नव्हते. त्यामुळे मुस्लीम आक्रमणाचे स्वरूप त्याला कळले तरी नसावे किंवा कळूनही तो बेसावध राहिला असावा.' -(हिस्टरी ॲण्ड कल्चर ऑफ इंडियन पीपल; संपादक : डॉ. मुनशी.- खंड ६ वा, पृ. ५३)
अधोगामी धर्म :
१२९४ पासून १३३६ पर्यंत म्हणजे विजयनगरची स्थापना होईपर्यंत सतत चाळीस वर्षे दिल्लीचे सुलतान दक्षिणेवर स्वाऱ्या करीत होते. त्यात त्यांचा एकदाही पराभव झाला नाही. एकाद्-दुसऱ्या स्वारीतील जयापजय हा योगायोग मानता येईल. पण या चाळीस वर्षांत त्यांच्या वीस तरी स्वाऱ्या झाल्या असतील. शिवाय हिंदूंची भिन्न राज्ये होती. यादव, होयसळ, पांड्य व काकतीय असे चार हिंदू राजवंश होते. पण एकही या मुस्लीम आक्रमणाचा प्रतिकार करू शकला नाही. दोन स्वाऱ्यांमध्ये कधी तीन, कधी चार, तर कधी दहा वर्षांचासुद्धा अवधी गेलेला आहे. म्हणजे हिंदूंना उसंतच मिळाली नाही असे नाही. मुसलमान सेनापती एकच एक सतत येत होता आणि तो असामान्य होता, असेही नाही. अल्लाउद्दिन खिलजी, मलिक काफूर, खुश्रूखान, मुबारिक शहा, जौनाखान, महंमद तघलख, जलालुद्दिन असे अनेक मुस्लीम सेनापती या स्वाऱ्या घेऊन येत होते. ते सर्वच्या सर्व हिंदुराज्ये बुडविण्यात यशस्वी व्हावे आणि दोन-दोनशे वर्षे स्थायी झालेल्या सूर्यचंद्रवंशीय हिंदु साम्राज्यांना त्यांचा प्रतिकार करता येऊ नये याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच होतो, हिंदुसमाजात जीवनशक्ती राहिलीच नव्हती. त्यांचा धर्म, म्हणजेच अर्वाचीन भाषेत त्यांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान, अत्यंत विकृत, अत्यंत हीन व अधोगामी झाले होते. हे विकृत तत्त्वज्ञान, हा अधोगामी घातक धर्म कोणता याचे विवरण मागल्या प्रकरणात विस्तरशः केले आहे. या प्रकरणातही प्रारंभी त्याचा सारार्थ सांगितला आहे. जन्मनिष्ठ चातुर्वर्ण्य, जातिभेद, अस्पृश्यता, तज्जन्य विषमता, अंधरूढीचे प्राबल्य, देश- कालपरिस्थिती पाहून चिंतन करण्याची असमर्थता, धर्माची अपरिवर्तनीयता, त्यातील कर्मकांड, संन्यास, निवृत्ती, परलोकनिष्ठा, शब्दप्रामाण्य, राजधर्माची उपेक्षा, स्वराज्य व स्वधर्म यांची फारकत हीच त्या अधोगामी, हीन, अमंगळ धर्माची लक्षणे होत. अशा या धर्मामुळे हिंदुसमाजाचा नाश झाला हे मुस्लीम आक्रमणाचा जो थोडा इतिहास वर दिला आहे, त्यावरून कोणाच्याही ध्यानात येईल, आणि मग विजयनगर, मराठे व शीख यांच्या यशाचे स्वरूप पाहता त्यांच्या धुरीणांनी धर्मशास्त्रात काही अंशी तरी क्रान्ती केली असली पाहिजे, त्यावाचून त्यांना यश मिळणे सर्वथा असंभवनीय होते, असा विचार मनात येऊन त्या धर्मक्रान्तीचे स्वरूप काय हे जाणून घेण्यास मन उत्सुक होईल. विजयनगरच्या धुरीणांनी धर्मक्रान्ती केली होती हे अगदी निर्विवाद होय. यादव, होयसळ, पांड्य व काकतीय यांना मुळीच यश आले नाही आणि विजयनगरला एक प्रचंड साम्राज्य स्थापून अडीच-तीनशे वर्षे यशस्वी प्रतिकार करून तुंगभद्रेच्या खालच्या प्रदेशात हिंदुधर्म व हिंदू संस्कृती यांचे रक्षण करता आले याचे श्रेय त्या धर्मक्रान्तीलाच आहे हे आता सर्वमान्य झाले आहे.
विजयनगर- धर्मक्रान्ती :
धर्मक्रान्तीवाचून समाज उत्कर्ष होणार नाही अशी विजयनगरच्या धर्मधुरीणांच्या बुद्धीची निश्चिती झाली होती याचे पहिले गमक म्हणजे त्यांनी पतितशुद्धीच्या रूढीचे केलेले पुनरुज्जीवन हे होय. देवलस्मृतीने, मुस्लीमांनी सक्तीने ज्यांचे धर्मांतर केले त्यांची शुद्धी करावी, असे शास्त्र आठव्या शतकात सांगितले होते. पण नंतरच्या काळात, कलिवर्ज्याचा कर्ता आणि इतर स्मृतिकार व निबंधकार या अंध, मृढ व अविवेकी धर्मशास्त्रज्ञांनी देवलांचे ते शास्त्र त्याज्य ठरविले होते. पण विद्यारण्य तथा माधवाचार्य हे जे चौदाव्या शतकातील धर्मद्रष्टे थोर पुरुष यांना शुद्धिबंदी किती घातक आहे हे ध्यानात येऊन त्यांनी हरिहर आणि बुक्क या इस्लामला सक्तीने बळी पडलेल्या थोर सरदारांना शुद्ध करून परत स्वधर्मात घेतले.
विद्यारण्य :
कांपिली हे त्या काळी एक स्वतंत्र राज्य होते. धारवाड, बेल्लारी, रायचूर हे परगणे त्यात समाविष्ट होते. त्या राज्यावर मुस्लीमांची धाड आली त्या वेळी तेथील राजा कांपिलीदेव रणांगणी पडला. त्याच्या सर्व पुत्रांना व सरदारांना महंमद तघलख याने कैद करून सक्तीने बाटविले. हरिहर आणि बुक्क हे विजयनगरचे संस्थापक हे कांपिलीदेवाचेच सरदार होते. त्यांना दिल्लीला नेऊन सुलतानाने नंतर कांपिली राज्याच्या बंदोबस्तासाठी आपले सेनापती- सुभेदार म्हणून परत पाठविले. हे दोघे वरंगळचे सरदार होते असे कोणी म्हणतात. पण इस्लामचा स्वीकार करून ते सुलतानाचे सुभेदार म्हणून परत दक्षिणेत आले होते याविषयी फारसा वाद नाही. (डॉ. मुनशी, उक्तग्रंथ, पृ. ६२, ७७, २७१) धर्मांतर झाले तरी हरिहर व बुक्क यांना इस्लामविषयी मुळीच प्रेम नव्हते. त्यांच्या अंतःकरणात हिंदू धर्माविषयी अजून दृढ भक्ती होती. पण तरीही त्यांना विद्यारण्यासारखा स्वतंत्र प्रज्ञेचा धर्मवेत्ता पुरुष भेटला नसता तर त्यांचा नाइलाज होऊन इतर अनेक धर्मांतरित पराक्रमी पुरुषांप्रमाणे त्यांनी कांपिलीस किंवा अन्यत्र आपल्या मुस्लीमवंशाची गादी स्थापिली असती. पण सुदैवाने त्यांना विद्यारण्य भेटले. त्यांनी त्यांना स्वधर्मात परत येण्याचा उपदेश केला आणि शुद्धीची जबाबदारी स्वतःच्या शिरी घेऊन, त्यांचे गुरू शृंगेरीपीठाचे शंकराचार्य विद्यातीर्थ याची संमतीही मिळविली. राजसत्तेप्रमाणेच धर्मसत्तेचे आहे. तिच्या पीठावर अधूनमधून जरी एखादा प्रज्ञावंत पुरुष आला तरी तो समाजाच्या प्रगतीला अत्यंत वेगाने चालना देतो. आद्य शंकराचार्यांनंतर विद्यातीर्थांपर्यंत अनेक शंकराचार्य त्या गादीवर आले असतील, पण त्यांत द्रष्टा असा कोणीच नव्हता. नाही तर आपल्या कालभेदी दृष्टीने इस्लामी आक्रमणाचे स्वरूप जाणून त्याने आधीच उठावणी केली असती. पण तसे घडले नाही. उत्तर हिंदुस्थानातील अनर्थ दक्षिणेत कोणी आकळलाच नाही. सुदैव एवढेच की तो अनर्थ दक्षिणेत कोसळल्याबरोबर त्याचे स्वरूप जाणून त्याच्या प्रतिकारासाठी फार मोठे धर्मपरिवर्तन घडविणे अवश्य आहे हे जाणून ते घडविण्यास उद्युक्त होणारे विद्यारण्य- विद्यातीर्थ यांसारखे थोर पुरुष येथे निर्माण झाले. ते न होते तर हरिहर व बुक्क स्वधर्मात परत आले नसते. आणि मग हिंदुधर्माच्या पुनरुत्थानाची आशा कितपत धरता आली असती याचा प्रत्येकाने स्वतःशीच विचार करावा. विजयनगरच्या साम्राज्याची स्थापनाच असंभवनीय झाली असती. आणि मग मराठ्यांचा उदय होण्याचा काल येईपर्यंत सर्व हिंदुस्थान इस्लाममय झाला असता. पण विद्यारण्यांनी मोठे धैर्य दाखवून त्या बंधूंचे परिवर्तन केले म्हणून ते अशुभ टळले. त्या वेळी जनतेच्या मनावर रूढ अंध धर्मशास्त्राचेच संस्कार होते. त्यामुळे लोकांचा शुद्धीला विरोध होता. पण विद्यारण्यांनी जरा चतुराई लढवून असे जाहीर केले की, हरिहर स्वतः राजा न होता साक्षात भगवान विरूपाक्षच राज्य करणार आहेत. आणि हरिहर त्याचे प्रतिनिधी म्हणून कारभार पाहणार आहेत. प्रारंभी राजमुद्राही देवाच्या नावाचीच करण्यात आली आणि अशारीतीने लोकांचा विरोध वितळविण्यात आला.
व्यक्तिगत व राष्ट्रीय आकांक्षा :
अनागोंदीस हरिहराने राज्य स्थापन केले आणि विजयनगर या राजधानीचा पायाही घातला. अर्थात त्याला सुखाने कोणीच राज्य करू देणार नव्हते. दिल्लीचे सुलतान हे तर त्याचे शत्रू होतेच, पण कापय नायक व होयसळ राजा वीर बल्लाळ या हिंदूंनीही परिस्थिती ओळखून त्याच्याशी सहकार्य करावयाचे, ते न करता त्याच्याशी शत्रुभावच धरला. कारण त्यांनाही सम्राटपदाची महत्त्वाकांक्षा होती. त्या मागल्या काळात हिंदुराजनीतिशास्त्राने घटनात्मक अशी कोणतीच राज्यव्यवस्था निर्माण केलेली नव्हती. किंबहुना ब्रिटिश येथे येईपर्यंत घटनाबद्ध संस्था अशी भारतात नव्हतीच. त्यामुळे समाजाचे सर्व भवितव्य व्यक्तीवर अवलंबून असे आणि धर्म हे संघटनतत्त्व नसल्यामुळे साम्राज्याकांक्षा असलेल्या दोन हिंदू पराक्रमी पुरुषांनी आपसात लढून निर्णय करण्याखेरीज गत्यंतरच नव्हते. वीर बल्लाळ व हरिहर यांची प्रत्यक्ष लढाई झाली नाही. पण महंमद तघलखाने मदुरेस स्थापन केलेल्या मुस्लीम राज्याचा सुभेदार जलालुद्दिन यांशी बल्लाळाने एकट्याने लढा द्यावयाचे ठरविले. आणि त्याने तहाच्या वाटाघाटीच्या मिषाने त्यास बोलावून तेथे दग्याने ठार मारले. अशा रीतीने बल्लाळाला सम्राटपद तर नाहीच मिळाले, तर हिंदूंची एक मोठी शक्ती मात्र वाया गेली. आणि मदुरेची मुस्लीम सत्ता नष्ट करण्यास विजयनगरला दीर्घकाळ लागला. हरिहरानंतर बुक्क गादीवर आला. त्याच्या कारकीर्दीत १३७० साली त्याचा मुलगा कंपन याने मदुरेवर स्वारी करून सुलतानास ठार मारले. वीर बल्लाळाने काळ जाणला असता, हरिहराशी सहकार्य केले असते, तर हे कार्य २८ वर्षांपूर्वीच झाले असते. तेवढ्या अवधीत मदुरेच्या सुलतानाने अनेक मंदिरे फोडली होती, स्त्रियांवर आत्याचार केले होते, आणि हजारो लोकांची कत्तल केली होती. मदुरा म्हणजे केवळ नरक झाला होता. व्यक्तिगत आकांक्षा जोपर्यंत समष्टीच्या आकांक्षात विलीन करण्यास हिंदू शिकत नाहीत तोपर्यंत त्यांचा हा नरकवास चुकावयाचा नाही. आत्मा परमात्म्यात विलीन करावा, भक्ताने ईश्वरेच्छेत आपल्या इच्छा विसर्जित कराव्या, शिष्याने गुरुभक्तीत लोपावे, ही शिकवण हिंदुधर्म देतो. पण हे सर्व परमार्थात ! ऐहिक उन्नतीसाठी, समाजाच्या दृढीकरणासाठी, संघटनेसाठी हे आत्मविसर्जन उपदेशावे याची चिंता हिंदुधर्मशास्त्रज्ञांनी कधी केली नाही.
राजधर्माचे पुनरुज्जीवन :
महाभारताने हे तत्त्वज्ञान प्रसारिले होते. त्यानंतर अनेक शतके त्याचा लोप झाला होता. माधवाचार्यांनी आता त्याचे पुनरुज्जीवन करावयाचे ठरविले. आणि महाभारताच्याच भाषेत बोलावयाचे म्हणजे ब्रह्म व क्षत्र यांचा संयोग घडवून आणला. त्यांचे गुरू शृंगेरीचे शंकराचार्य, विद्यातीर्थ (यांचे नाव विद्याशंकर असेही दिले आहे.) यांनी दक्षिणेत आठ पीठे स्थापन करून प्रत्येक ठिकाणी एका थोर संन्याशाची नियुक्ती केली. विद्यारण्य या सर्वाचे प्रमुख होते. (विद्यारण्य, माधव व सायण हे सर्व एक की भिन्न हा प्रश्न वादग्रस्त आहे. विद्यारण्य व माधव एकच आणि सायण त्यांचे बंधू असेही कोणी मानतात.) हरिहर आणि बुक्क यांना स्वधर्मात घेतल्यानंतर त्यांनी त्या पीठांच्या द्वारे स्वधर्मरक्षणासाठी स्वराज्याची स्थापना केली पाहिजे हा संदेश तुंगभद्रेच्या दक्षिणेस रामेश्वरापर्यंत जनतेत प्रसृत करण्याची व्यवस्था केली आणि सर्व जनशक्ती त्यांच्या मागे उभी केली. विद्यारण्य स्वतः या साम्राज्याचे मंत्रीही झाले. स्वराज्य व स्वधर्म यांचा असा संयोग झाल्यामुळेच, पूर्वी इतरांना जे यश आले नाही, ते विजयनगरच्या धुरीणांना अल्पावधीत प्राप्त झाले. (विद्यारण्यांच्या कार्याची माहिती- विजयनगर कमेमोरेशन व्हॉल्यूम- या ग्रंथात एस्. श्रीकांतय यांनी आपल्या लेखात दिली आहे. पृ. १६१ ते १६८.) ए. रामराव, असि. डायरेक्टर ऑफ आर्किऑलजी, म्हैसूर, यांनीही वरील ग्रंथातील आपल्या लेखात हेच मत मांडले आहे. ते म्हणतात, 'मुस्लीमांच्या आक्रमणापासून हिंदुधर्माचे रक्षण व्हावे ही तीव्र इच्छा दक्षिणेतील हिंदूंच्या सर्व जातींत निर्माण झाली होती. आणि तिच्यातूनच विजयनगर साम्राज्याचा उदय झाला. त्या वेळी स्वराज्य हाच स्वधर्मरक्षणाचा उपाय होय ही सर्वांची निश्चिती झाली होती. हे स्वराज्य विघटक शक्तींचा नाश करून आक्रमणास तोंड देण्यास आणि त्याचबरोबर या भूमीतील धार्मिक, सामाजिक, विद्याविषयक व आर्थिक अशा सर्व परंपरांचे व संस्थांचे रक्षण करण्यास समर्थ असले पाहिजे अशी हिंदुमात्राची आकांक्षा होती. स्वधर्म व स्वराज्य यांच्या अभेदाविषयीच्या अशाच कल्पनांनी शिवाजी व त्याचे अनुयायी प्रेरित झाले होते व मराठी साम्राज्याच्या उभारणीमागे हीच प्रेरणा होती असे आपणांस दिसते.'- (हिंदुइझम् अंडर विजयनगर किंग्ज, पृ. ३९)
याच ग्रंथातील 'विजयनगरच्या इतिहासातील एक महत्त्वाचे प्रकरण' या आपल्या लेखात वेंकटेशम पंतलु यांनीही विजयनगरच्या यशाची अशीच मीमांसा केली आहे. ते म्हणतात, 'विजयनगरच्या साम्राज्याचा उदय व ऱ्हास या योगायोगाच्या गोष्टी नाहीत. मुस्लीम आक्रमणामुळे हिंदूंचे स्वातंत्र्यच नव्हे तर धर्म व एकंदर संस्कृती यांचाही उच्छेद होण्याची वेळ आली होती. अशा वेळी विद्यारण्यस्वामींचा उदय झाला. त्यांनी येथील अध्यात्मविद्या व राजविद्या यांचे पुनरुज्जीवन केले. यासाठी त्यांनी शृंगेरीच्या मठात नवजीवन निर्माण करून कर्नाटकात एकंदर आठ पीठांची स्थापना केली. यांचाच दक्षिणेतील राज्यांना दीपस्तंभासारखा उपयोग झाला. स्वामींनी स्वतः पंपा (हंपी) येथे विरूपाक्ष पीठ स्थापन करून हरिहर व बुक्क यांना साम्राज्यस्थापनेच्या कार्यात तेथूनच सर्व साह्य केले.' -(उक्तग्रंथ, पृ. २७२)
बुद्धिप्रामाण्य :
विद्यारण्य तथा माधवाचार्य यांनी घडविलेल्या धार्मिक क्रान्तीचे स्वरूप आता काहीसे स्पष्ट होईल असे वाटते. शुद्धिबंदीची अत्यंत घातक रूढी त्यांनी नष्ट केली; आणि स्वधर्माला इहाभिमुख बनवून शृंगेरीच्या पीठाकडूनच जनतेच्या मनावरील निवृत्तिवादाचे, राजकीय उदासीनतेचे कश्मल झाडून टाकले. हे सर्व त्यांना करता आले, करण्याचे धैर्य झाले याचे कारण म्हणजे देशकाल- परिस्थिती पाहूनच धर्मनिर्णय करणे अवश्य असते असा त्यांचा बुद्धिनिश्चय झाला होता हे होय. यापूर्वीच्या काळात मीमांसादर्शनाने शब्दप्रामाण्याची म्हणजे वेदप्रामाण्याची घातक कल्पना रूढ करून धर्म हा अदृष्टप्रधान असतो असा सिद्धान्त मांडला होता. धर्माचरणाची फले सर्व परलोकात मिळतात, ती मिळाली की नाही हे ठरविण्याचे सामर्थ्य मानवी बुद्धीला नाही, ती बरी- वाईट फले सर्व अदृष्टच असतात, तेव्हा फलांवरून, परिणामांवरून धर्माज्ञा योग्य की अयोग्य हे सांगणे अशक्यच आहे; म्हणून वेदाज्ञा शिरसावंद्य मानून त्यांच्या युक्तायुक्ततेचा विचार न करता, परिस्थितीचा विचार न करता, त्यांप्रमाणे आचरण करणे हेच श्रेयस्कर होय, असे मत मीमांसापंथाने मांडले. मीमांसा पंथाचा सर्वात मोठा पुरस्कर्ता कुमारिल भट्ट हा सातव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेला. तेव्हापासून त्याच्या वेदप्रामाण्याची व अदृष्टप्रधान धर्माची मगरमिठी हळूहळू हिंदुसमाजाच्या मानेला बसत गेली व पुढे त्या तत्त्वांचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत जाऊन हिंदुसमाज अंध व मूढ झाला. आपले आचरण योग्य की अयोग्य हे पारखून घेण्याची त्याची दृष्टीच नाहीशी झाली. असा समाज विघटित होऊन परकी आक्रमणास बळी न पडला तरच नवल ! माधवाचार्यांनी आपल्या वेदभाष्यात बुद्धिप्रामाण्याचा पुरस्कार केला आहे. आणि स्वतः विचार करून धर्मनिर्णय करण्याचे महत्त्व सांगितले आहे. [या ग्रंथातील ४ थ्या प्रकरणात प्राचीन काळी देशकालपरिस्थिती पाहून धर्मनिर्णय करण्याची पद्धती कशी होती ते दाखविलेच आहे. ज्यांना अधिक जिज्ञासा आहे त्यांनी तर्कतीर्थ रघुनाथशास्त्री कोकजे यांचा 'धर्मस्वरूप निर्णय' हा बहुमोल ग्रंथ पहावा. प्रकरण १२ व १३. माधवाचार्याचे मत- पृ. २५५.] माधवाचार्यांनी मीमांसकांची समन्वयपद्धतीही वेदप्रामाण्याप्रमाणेच त्याज्य ठरविली आहे. मीमांसकांचा असा एक विपरीत सिद्धान्त आहे की सर्व स्मृतींचा अर्थ एकच आहे ! त्यांच्यात कोणत्याही प्रश्नाविषयी मतभेद नाही. वरवर दिसायला मतभेद दिसतात. पण तो भ्रम होय. म्हणून टीकाकारांनी अगदी परस्परविरोधी वचनांचाही समन्वय करून दाखविला पाहिजे. म्हणजे भिन्न स्मृतींतील वचनांचा एकच अर्थ लावला पाहिजे. मीमांसकांची ही समन्वयपद्धती म्हणजे शुद्ध रानटीपणा आहे. हजारो वर्षांवर विखुरलेल्या, भिन्न प्रांतांतील, भिन्न स्मृतिकारांचे प्रत्येक सामाजिक व धार्मिक प्रश्नाविषयी तंतोतंत एकच मत असेल, असे मानणे म्हणजे मानवी बुद्धीचे दिवाळे जाहीर करण्यासारखेच आहे. पण उत्तरकालीन हिंदुधर्मशास्त्रकारांनी ती पद्धत स्वीकारून तसे दिवाळे जाहीर केले म्हणूनच या समाजाचा नाश झाला. माधवाचार्यांनी 'ही पद्धत कपोलकल्पित आहे, निर्मूल आहे व तिचे प्रवर्तन करणारे मन्दमती आहेत' असे म्हणून, 'आम्ही तिचा स्वीकार करणार नाही' असे स्पष्ट म्हटले आहे. (उक्तग्रंथ पृ. १८४-५) वेदप्रामाण्य, अदृष्टप्रधान धर्म व समन्वयपद्धती या अत्यंत घातक तत्वांचा निषेध करून माधवाचार्यांनी ती त्याज्य ठरविली ही त्यांची फार मोठी सेवा होय. ही तत्त्वे समाजाला अपकर्षकारक आहेत असे सांगण्याचे धैर्य त्यांनी दाखविले, त्यामुळेच मोठे धर्मपरिवर्तन होऊन विजयनगर साम्राज्याचा पाया दृढ झाला. त्यांनी हरिहर व बुक्क यांना स्वधर्मात परत घेतले नसते आणि स्वराज्य व स्वधर्म यांचे अद्वैत समाजमनावर बिंबवून निवृत्तिवादाची जळमटे झाडून टाकली नसती तर ते कदापि शक्य झाले नसते.
राजर्षी बुक्क :
विद्यारण्यासारखा द्रष्टा सर्वज्ञ पुरुष या काळात हिंदूंना गुरू म्हणून लाभला हे जसे भाग्य तसेच हरिहर आणि बुक्क हे धर्मवेत्ते राजपुरुष विजयनगरला संस्थापक म्हणून लाभले हेही भाग्यच होय. सम्राट बुक्क हे तर राजर्षीच होते. त्यांनी राजपदावर येताच अखिल वेदविद्येचा संग्रह व संशोधन करण्याचे ठरवून त्यासाठी विद्यारण्यांच्या नेतृत्वाखाली एक पीठच स्थापन केले आणि देशातील सर्व विद्वान पंडितांना त्या पीठात एकत्र जमवून वेदग्रंथांवर नवी भाष्ये लिहिण्याचा आदेश दिला. दुसरेही एक महत्त्वाचे कार्य राजर्षी बुक्क यांनी केले. ते म्हणजे शैव, वैष्णव, जैन या ग्रंथांतील वैमनस्य नष्ट करून हिंदुधर्मातील विघटक वृत्तींना आळा घातला हे होय. याच्या आधीच्या काळात हे पंथभेद किती विकोपाला गेले होते, ज्या पुराणांनी सर्व देवतांचे ऐक्य प्रतिपादिले होते त्यांनीच पुढे त्यांत कसे भेद माजविले होते, हे मागल्या प्रकरणाच्या अखेरीस दाखविलेच आहे. या भेदामुळे हिंदुधर्माचे ऐक्य अगदी भंगले होते. पण सम्राट बुक्क यांनी या दुष्ट प्रवृत्तींना आळा घालून धर्माला पुन्हा संघटित रूप दिले. जैन व वैष्णव यांच्यांत कलह उद्भवला तेव्हा बुक्क यांनी घोषणा केली की, 'जैनदर्शन व वैष्णवदर्शन यांत काहीही भेद नाही. वैष्णवांकडून जैनांना काही लाभहानी झाली तर ती वैष्णवांचीच लाभहानी आहे असे वैष्णवांनी मानावे. आणि जैनांनीही खात्री बाळगावी की त्यांचे रक्षण करण्याचे व्रत वैष्णव यावच्चंद्र दिवाकरौ पाळतील.' (एपिग्राफिका कर्नाटिका II. १३६, शिलालेख १३६८ इ.) परकी प्रवाशांनीही विजयनगर सम्राटांच्या सहिष्णु वृत्तीची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. बार्बोसा म्हणतो, 'सम्राटांनी सर्वांना इतके स्वातंत्र्य दिलेले होते की, कोणीही वाटेल तेथे मुक्तसंचार करीत असे व आपल्या मताप्रमाणे उपासना करीत असे. अमका मनुष्य ख्रिश्चन आहे की ज्यू की मुस्लीम का अन्य कोणी याची कोणी चौकशीही करीत नसे. सर्वत्र सहिष्णुता व समता यांचे अधिराज्य होते.- (विजयनगर एंपायर, फादर हेरास व व्ही. के. भांडारकर; विजय. कमोव्हॉ, पृ. ३४).
विजयनगरच्या सम्राटांनी विद्येप्रमाणेच लष्करी यंत्रणाही अत्यंत कार्यक्षम ठेवण्याची दक्षता बाळगिली होती. म्हणूनच त्यांना राजर्षी ही पदवी शोभते. हरिहर व बुक्क यांच्या संगनवंशात १४८५ च्या सुमारास अत्यंत भ्याड, दुबळे व व्यसनी वारस निर्माण झाले. तेव्हा सालुव नरसिंह या सेनापतीने त्यांना बाजूस सारून स्वतः सत्तारोहण केले. इतिहासकार याबद्दल त्यांना मुळीच दोष देत नाहीत. त्यांनी हे हिंदुधर्माच्या रक्षणासाठीच केले, असे म्हणून ते या कृत्याचे- या अपहाराचे- समर्थनच करतात. या सालुव नरसिंहाने राज्यातील शांतताप्रिय, भाविक शेतकऱ्यांना क्षात्रधर्माची दीक्षा देऊन मुस्लीमांशी तितक्याच वीरश्रीने लढण्यास शिकविले. ही या राजांची फार मोठी समयज्ञता होय. त्यांनी हे जाणले की मुसलमानांत प्रत्येक मुसलमान युद्धोन्मुख असतो. आणि धर्मांधतेने तो पिसाट झाल्यामुळे त्याचा त्वेष दुपटीने वाढलेला असतो. उलट हिंदू हा शांत, निष्पाप, सहिष्णु व म्हणून मंद व दुबळा झालेला असतो. हे जाणूनच त्यांनी सर्व जनतेला- शेतकऱ्यांनासुद्धा- युद्धप्रवण करून त्यांच्या ठायी मर्दानी बाणा रुजविला. सालुवाप्रमाणे वीर नरसिंहानेही हेच धोरण ठेविले होते. प्रजेत लप्करी बाणा चेतविण्यासाठी त्याने हरतऱ्हेचे प्रयत्न केले. जातिभेदनिरपेक्ष सैन्यात सर्वांची भरती केली आणि भ्याडपणा ही सर्वात लज्जास्पद गोष्ट ठरवून मरणमारणाच्या संग्रामास त्यांना तयार केले. या चैतन्य प्रेरणेमुळेच सर्व जनता विजयनगरच्या ध्वजाखाली गोळा होऊन मुस्लीमांशी लढण्यास सिद्ध झाली.- (डॉ. सुनशी, खंड ६ वा, पृ. ३०२, ३०८)
कृष्णदेवरायांच्या कारकीर्दीत विजयनगरच्या वैभवाचा कळस झाला. (१५०९- १५३०.) हे सम्राट महापराक्रमी असून विद्या, कला, शास्त्रे यांचे भोक्ते होते. कृष्णा व तुंगभद्रा या दुआबातील प्रदेश तर त्यांनी आपल्या अधिराज्याखाली आणलाच पण अनेक वेळा विजापूर, गुलबर्गा या बहामनी राजधान्यांवर आक्रमण करून त्यांनी त्या मुस्लीम सत्ता खिळखिळ्या करून टाकल्या. लष्करी यंत्र अत्यंत सुसज्ज व कार्यक्षम ठेवण्याची त्यांनी अखंड दक्षता बाळगली होती. अरब व्यापाऱ्यांकडून अस्सल पैदाशीचे घोडे व कारीगर हत्यारे यांची फार मोठ्या प्रमाणावर ते नित्य खरेदी करीत. लष्करी शिक्षणासाठी त्यांनी शाळाही स्थापन केल्या होत्या. कारण त्यांनी ओळखले होते की मुस्लीम आक्रमण हे प्रामुख्याने लष्करी आक्रमण होते. लूटमार, दरोडेखोरी, कपटनीती, जाळपोळ, कत्तल हेच त्यांचे मुख्य बळ होते. अशा आक्रमणाला त्याच भाषेत उत्तर दिल्याखेरीज हिंदूंचा निभाव लागणार नाही हे पक्के जाणून त्यांनी त्याच राजनीतीचा निःशंकपणे अवलंब केला होता. रजपुतांनी हे फारसे जाणले नाही. खरे म्हणजे मुस्लीम आक्रमणाचे खरे स्वरूप रजपुतांना कधी आकळलेच नाही. अंध, पिसाट धर्मश्रद्धा व लूटमारीची विद्या हे ज्यांचे बळ अशा जमातीशी उदार, उदात्त तत्त्वाने वागण्यात आत्मघात आहे, हा उमज त्यांना पडलाच नाही. म्हणून स्त्रियांचा जोहार व पुरुषांचे हौतात्म्य हेच त्यांनी भूषण मानिले, पण त्याचे फल काय ? तर स्त्रिया मोगलांच्या जनानखान्यात गेल्या व पुरुष त्यांचे दास झाले. विजयनगरच्या सम्राटांनी रजपुताचे अविवेकी, आत्मघातकी उदार धोरण, त्यांची ती सात्त्विक राजनीती व ते निष्फळ, विचारहीन हौतात्म्य यांचा कधीच अवलंब केला नाही. त्यांनी नित्य चाणक्यनीतीचाच आश्रय केला. त्यामुळेच दक्षिण हिंदुस्थान मुस्लीमवर्चस्वापासून अबाधित राखण्यात ते यशस्वी झाले. या सर्वच दृष्टींनी सम्राट कृष्णदेवराय यांची कारकीर्द अत्यत वैभवशाली झाली.
कृष्णदेवरायानंतर अच्युतराय व सदाशिवराय हे दोन अगदी नाकर्ते राजे झाले. सदाशिवरायाच्या कारकीर्दीतच सर्व सत्ता रामराजाच्या हाती गेली. हा राजा अतिशय कर्ता आणि पराक्रमी असून बहामनी राज्याच्या भिन्न शाखांवर आक्रमण करून त्यांना खच्ची करून टाकण्याचे विजयनगरचे कार्य त्याने अखंड चालू ठेविले होते. त्यांचेही आपापसांत नित्य झगडे व लढाया चालू असत व ते सुलतान एकमेकांविरुद्ध रामराजाची मदत नेहमी घेत असत. १५५७ साली आदिलशहा व कुतुबशहा यांनी राजारामाच्या मदतीने अहमदनगरच्या निजामशाहीवर हल्ला केला व ते राज्य अगदी बेचिराख करून टाकले. त्या वेळी, फिरिस्ता या इतिहासकाराच्या म्हणण्याप्रमाणे, रामराजाच्या हिंदू लष्कराने अनेक मशिदी उध्वस्त केल्या, मुस्लीम स्त्रियांची विटंबना केली व कुराणाचाही अवमान केला. आणि यांतूनच राक्षसतागडीचा संग्राम उद्भवून विजयनगरच्या साम्राज्याला प्राणांतिक तडाखा बसला. वास्तविक हिंदूंवर असे अत्याचार मुसलमान प्रत्येक स्वारीत करीत असत. महंमद कासीम, महंमद गझनी, महंमद घोरी, ऐबक, अल्तमश, काफूर, तघलख यांच्या स्वाऱ्यांचे हे स्वरूप ठरलेलेच होते. पण याची पराकाष्ठेची चीड येऊन त्याचा बदला घेण्यासाठी व मुस्लीम सत्तेचे निर्मूलन करण्यासाठी भिन्न रजपूत राज्यांनी कधी अवश्य ते ऐक्य केले नाही. बहामनी सुलतानांनी या वेळी ते घडविले हाच मुस्लीम व हिंदू यांतील फरक. आधीच्या चाळीस पन्नास वर्षात विजापूर, गोवळकोंडा व अहमदनगर या शाह्यांत अगदी हाडवैर माजून राहिले होते. त्यामुळे कृष्णदेवराय व रामराजा यांनी त्यांच्यावर अनेकदा आक्रमणे करून त्यांना झोडपून झोडपून हैराण करून टाकले होते. आणि या शेवटच्या निजामशाहीवरील स्वारीने तर बहामनी सत्ता नष्ट होण्याचाच समय प्राप्त झाला होता. पण त्यामुळेच त्यांच्यांतील विवेक जागृत झाला. ही विजयनगरची सत्ता अशीच वाढू दिली तर दक्षिण निर्यवन होईल हे भवितव्य त्यांना दिसू लागले व त्यांनी आपसातील वैरे विसरून, एकमेकांशी सोयरसंबंध जोडून, विजयनगरविरुद्ध एक बलाढ्य फळी उभारली व त्या साम्राज्यावर चाल करून राक्षसतागडी येथे रामराजाच्या सैन्याचा संपूर्ण विध्वंस करून त्या साम्राज्याला कायमचे विकलांग करून टाकले.
कोणत्याही समाजाच्या जीवनशक्तीची हीच कसोटी आहे. कोठले तरी संघटनतत्त्व त्याने अवलंबिले पाहिजे आणि त्या निष्ठेपुढे इतर सर्व निष्ठा, सर्व अभिमान, सर्व मानापमान, सर्व वैमनस्ये, सर्व भेदभाव गौण लेखण्याची शिकवण मनाला दिली पाहिजे. ज्या समाजाला, ज्या प्रमाणात, हे साधते त्या प्रमाणात तो समाज जगण्यात, स्वातंत्र्य टिकविण्यात व आपल्या मानबिंदूचे रक्षण करण्यात यशस्वी होतो. राजस्थानातील जयपूर, जोधपूर, बुंदी, कोटा, अजमीर येथील हिंदुराजांनी अशी संघटनातत्त्वनिष्ठा कधीही दाखविली नाही. त्यामुळे राजस्थानचे एकछत्र कधीही झाले नाही. विजयनगरने धर्मतत्त्वावर संघटन करण्यात दीर्घकाल यश मिळविले. त्यामुळे हिंदुसंस्कृतीचे रक्षण करण्यात त्या साम्राज्याला अपूर्व यश मिळाले. पण तालिकोटनंतर दक्षिणेतल्या लोकांची ही निष्ठा ढळली. या घोर संग्रामाने विजयनगरचा पाया हादरला हे खरे. पण त्याचा संपूर्ण नाश झाला नव्हता. पुढे पाऊणशे वर्षे ते साम्राज्य बऱ्या स्थितीत टिकून होते. पण बहामनी मुस्लीम सत्ता त्या वेळी एक झाल्या तशा फिरून अनेक वेळा होऊन त्यांनी या हिंदुसत्तेचा संपूर्ण नाश केला. तरी दक्षिणेतल्या हिंदुसत्ता मात्र तशा कधीच एक झाल्या नाहीत. त्यामुळे अखेरी यवनांनीच साधली.
तुंगभद्रेच्या दक्षिणेस विजयनगरचे साम्राज्य दीर्घ काल अबाधित असे होते. पण कृष्णा- तुंगभद्रेच्या दुआबात कोंडविडू येथे रेड्डी आणि राचकोंडा येथे वेलमा या हिंदुसत्ता होत्या. आणि पलीकडे ओरिसामध्ये गजपती यांची हिंदुसत्ता तर पुष्कळच प्रबळ होती. पण हिंदुसत्ता या आपल्या शत्रू आहेत, ही भावना मुस्लीमांत जागृत ठेवण्याचे जसे प्रयत्न होत, तसे प्रयत्न या हिंदुसत्तांनी केव्हाही केले नाहीत. गजपती, रेड्डी व वेलमा यांचे आपसांत नित्य कलह तर चालतच, पण अनेक वेळा त्या सत्ता बहामनी सुलतानांशी सख्य करून त्यांना विजयनगर- विरुद्ध साह्य करीत. मुस्लीमही अनेक वेळा मुस्लीमांविरुद्ध हिंदूंचे साह्य घेत. पण मधुनमधून तरी त्यांचा कडवा हिंदुद्वेष जागृत होऊन ते सर्व मिळून हिंदु- धर्मीयांविरुद्ध उभे ठाकत. बाबर आणि संग यांच्या संग्रामात हेच घडले. आयत्या वेळी संगाकडचे मुस्लीम सरदार त्याला दगा देऊन बाबराला मिळाले. सिंधवरील कासीमच्या आक्रमणाच्या वेळी हेच घडले. मोका बसय्या या हिंदू अधिकाऱ्याने कासीमला सर्वतोपरी साह्य केले. त्याचा भाऊ रासिल यानेही असाच स्वामिद्रोह व धर्मद्रोह केला. पण दाहराकडचा मुसलमान सरदार अलाफी याने मात्र कासीमविरुद्ध लढण्याचे नाकारले. राक्षसतागडीच्या लढाईत याचीच पुनरावृत्ती घडली. अहमदनगर, विजापूर व गोवळकोंडा हे सुलतान तर एक झालेच. पण शिवाय रामराजाकडच्या मुस्लीम सरदारांनीही त्याला आयत्या वेळी दगा दिला. त्यामुळे ऐन धुमश्चक्रीच्या वेळी विजयनगरच्या सेनेतील दीड लाख फौज उलटली व तिने हिंदू फौजेचा संहार केला. अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेत्र यांच्या सैन्यांत शेकडो रजपूत अधिकारी होते. त्या सेनेचे सेनापतीही अनेक वेळा मानसिंग, जयसिंग हे हिंदु रजपूत होते. पण त्यांनी मुस्लीम स्वामी व मुस्लीम धर्म यांशी असा द्रोह कधीही केला नाही. आयत्या वेळी उलट्न हिंदुराजाला मिळण्याचे व स्वधर्मनिष्ठा प्रगट करण्याचे पातक त्यांनी कधीही केले नाही !
विजयनगरच्या पाडावासाठी दोन-तीन मुस्लीम सत्ता, काही काळ तरी एक झाल्या; तशा, त्या हिंदुराज्यांच्या संरक्षणासाठी, दक्षिणेतल्या वर सांगितलेल्या हिंदुसत्ता का एक झाल्या नाहीत ? ओरिसाचे गजपती, कोंडविड्डूचे रेड्डी व राचकोंडाचे वेलमा हे या वेळी विजयनगरला मिळाले असते तर या हिंदुसत्तेचा विनाश टळला असता. किंवा याआधीच आपसातील वैरे विसरून, अभिमान बाजूला ठेवून या सर्व सत्तांनी बहामनी शाह्यांना घेरले असते तर नर्मदेच्या दक्षिणेकडच्या मुस्लीम सत्तेचा समूळ नाश झाला असता. पण हिंदूंची धर्मभावना इतक्या व्यापक प्रमाणावर कधीच संघटना करू शकली नाही. भारताबाहेरच्या मुस्लीमांनाही पाचारण करून, त्यांच्याशी ऐक्य करून भारतातील हिंदुसत्ता नष्ट कराव्या, हे धोरण प्रारंभापासून आजपर्यंत मुस्लीमांनी अनेक वेळा अवलंबिलेले आहे. पण अखिल भारतातल्या नव्हे- केवळ उत्तरेतल्या किंवा केवळ दक्षिणेतल्या हिंदुसत्ता संघटित कराव्या आणि मुस्लीमांविरुद्ध एकसंध फळी उभी करावी हे हिंदूंना कधी साधले नाही. धर्म या संघटना तत्त्वाला इतके श्रेष्ठस्थान त्यांनी कधीही दिले नाही. त्यासाठी कोणताही त्याग करण्यास तयार व्हावे असा उत्कट आवेश, असा तीव्र ध्येयवाद हिंदुधर्मधुरीण आपल्या समाजात कधीच निर्माण करू शकले नाहीत.
तालीकोटच्या- राक्षसतागडीच्या लढाईत विजयनगरच्या साम्राज्याचा पाया निखळला हे खरे. पण त्या वेळी त्याचा सर्वनाश झाला हा रूढ समज खरा नाही, हे वर सांगितलेच आहे. त्यानंतर जवळ जवळ पाऊणशे वर्षे हे साम्राज्य बऱ्या स्थितीत टिकून होते. एवढेच नव्हे तर मुस्लीमांच्या आक्रमणाचा प्रतिकार करण्याचे आपले जन्मप्राप्त कार्यही ते काही अंशी करीत होते. रामराजाचा भाऊ तिरुमल याने १५७० मध्ये आपणास राज्याभिषेक करवून घेतला. त्याला श्रीरंग, राम व वेंकट असे तीन पुत्र होते. पैकी वेंकटाने तीस वर्षे राज्य करून विजयनगरची बरीच प्रतिष्ठा परत मिळविली. त्याच्या कारकीर्दीच्या अखेरीस म्हैसूर येथे ओडियार या घराण्याचे स्वतंत्र राज्य स्थापन झाले. दोन वर्षांनी १६१४ साली वेंकटचा मृत्यू झाल्यावर वारशाच्या लढाया उद्भवल्या आणि या संधीचा फायदा घेऊन आदिलशहाने कर्नूलचा प्रांत काबीज केला. या साठ-सत्तर वर्षांच्या काळात विजापूर व गोवळकोंडा यांच्या स्वाऱ्या चालूच होत्या. १६४२ च्या सुमारास वरील दोन शाह्यांनी पुन्हा एक होऊन विजयनगरचा संपूर्ण नाश करण्याचे ठरविले. या वेळी त्यांना दिल्लीपती शहाजहान याचाही पाठिंबा मिळाला. त्याने विजयनगरचे अवशिष्ट साम्राज्य त्या दोघांनी आपसात वाटून घेण्यास मान्यता दिली. अशा रीतीने हिंदुसत्तेचा नाश करण्यास पुन्हा तीन मुस्लीम सत्ता एकत्र झाल्या. या प्रसंगी हिंदूंनी काय केले ? राजा श्रीरंग याने तंजावर, जींजी, मदुरा व म्हैसूर येथील नायकांना संघटित होण्याची विनंती केली, पण त्यांना ती मान्य झाली नाही. ते तटस्थच राहिले. मग मीरजुम्ला, मुस्ताफाखान व शहाजी भोसले या विजापूरच्या सरदारांनी एकेकाचा पराभव करून १६५२ मध्ये विजयनगरच्या साम्राज्याचा समूळ उच्छेद केला. दक्षिणेतील हिंदूराज्ये बुडविण्याचे फार मोठे श्रेय शहाजी राजे भोसले यांना आहे, हे इतिहासाला माहीत आहे. शहाजी राजे हे मोंगल, विजापूर, अहमदनगर यांच्या सेवेत होते. कधी विजापुरशी फितुरी करून ते मोगलांना मिळत, कधी अहमदनगरच्या निजामशहाला मिळत. पण या सर्वांना सोडून दक्षिणेतल्या हिंदुसत्तांना ते कधीही मिळाले नाहीत. इतकेच काय त्यांचा पुत्र पराक्रमी झाला, त्याला १६६० सालापर्यंत यशही घवघवीत मिळाले, तरी त्या वेळी विजापूरची सेवा सोडून ते आपल्या पुत्रालाही मिळाले नाहीत ! आपल्या प्रचंड सरंजामानिशी ते त्या वेळी छत्रपतींना सामील झाले असते तर दक्षिणेच्या सर्व शाह्या त्याच वेळी नामशेष झाल्या असत्या. हे त्यांचेच असे नाही. राजा भगवानदास, मानसिंग जयसिंग, सवाई जयसिंग, लखूजी जाधव, मुरार जगदेव, जगदेवराव पवार, आक्कणा, मादण्णा या थोर सरदारांनी मुस्लीम राज्यविस्तारासाठी जे पराक्रम केले त्याच्या शतांश जरी हिंदुराज्य स्थापनेसाठी केले असते तरी भारतात मुस्लीम सत्ता नामशेष झाली असती. हे सरदार हिंदू होते. पण स्वधर्मनिष्ठेत स्वातंत्र्य निष्ठेचा अंतर्भाव होतो हे त्यांना मान्य नव्हते. त्यांच्या धर्मनिष्ठेपेक्षा त्यांची मुस्लीमस्वामिनिष्ठा शतपटींनी जास्त उत्कट होती. याचा अर्थच असा की 'हिंदुधर्म' या संज्ञेला हिंदुधर्मशास्त्रकरांनी अत्यंत विकृत असा अर्थ प्राप्त करून दिला होता. व्रते, उद्यापने, प्रायश्चित्ते यांना त्यांत महत्त्व होते. जात संभाळण्याला, अस्पृश्यांना न शिवण्याला, शुद्धिबंदीला त्यात महत्त्व होते. पण स्वातंत्र्याला नव्हते ! मूर्तिपूजेत हिंदु धर्म होता. मूर्तिरक्षणात तो नव्हता. परदेशगमन त्याला निषिद्ध होते, परदास्य नव्हते. मुस्लीमांना राजे मानण्यास हिंदुधर्मशास्त्रकार तयार होते, पण हिंदुराजे त्यांना मान्य नव्हते. कारण त्यांच्या मते ते क्षत्रिय नव्हते ! असो.
रजपूत व विजयनगर यांच्या उत्कर्षापकर्षाचा येथवर विचार केला. हा इतिहास म्हणजे हिंदुसमाजाच्या संघटनविघटनेचाच इतिहास आहे. मेवाड व विजयनगर या दोन सत्तांनी दीर्घकाळपर्यंत मुस्लीम आक्रमणांशी लढा केला व हिंदुधर्म व हिंदुसंस्कृती यांचे रक्षण केले हे खरे. पण दोन्ही सत्ता शेवटी मुस्लीमांनीच बुडविल्या हेही खरे आहे. मुस्लीमांत वंशभेद, पंथभेद, प्रांतभेद अतिशय होते. वारशाची युद्धे त्यांच्यात दर पिढीस चालत. मध्यवर्ती सत्तेपासून फुटून निघणे हे तर नित्याचेच होते. असे असूनही दोन्ही वेळा अखेरी त्यांनीच मारली आणि हिंदुसत्ता नामशेष केल्या. असे का झाले याचेच विवेचन वर केले आहे. राष्ट्रीय भावना हिंदूंच्या ठायी नव्हती पण तशी ती मुस्लीमांतही नव्हती. पण धर्म हे तत्त्व मुस्लीमांनी अनेक वेळा श्रेष्ठ मानले. स्वराज्य व स्वधर्म यांचे ते अद्वैत मानीत. हिंदूंच्या बाजूने मुस्लीमांशी लढणाऱ्याला ते धर्मभ्रष्ट समजत. अशी तीव्र व उत्कट धर्मनिष्ठा अखिल हिंदुसमाजात कधीच निर्माण झाली नाही. विद्यारण्य, हरिहर, बुक्क यांनी काही काळ ती निर्माण केली होती. तिच्या बळावर हिंदूंनी तीनशे वर्षे मुस्लीमांचा प्रतिकार केला व दक्षिणेचे रक्षण केले यासाठी हिंदुसमाज, हिंदुधर्म व हिंदुसंस्कृती त्यांची कायमची ऋणी राहील यात शंकाच नाही. पण ही मानवंदना दिल्यानंतर हिंदूंच्या जीवशक्तीविषयी पुन्हा विचार करू लागताच तिच्यातील वैगुण्ये मनापुढे उभी राहतातच. विजयनगरने तीनशे वर्षे लढा दिला हे कौतुकास्पद आहे. पण त्या सत्तेचाही नाश करून तिच्याच जन्माच्या वेळी स्थापन झालेली बहामनी सत्ता अनेक शाह्यांत दुभंगलेली असूनही आणि दिल्लीच्या मोगल बादशाहीचे वारंवार प्राणघातक हल्ले होत असूनही विजयनगर नंतर आणखी शंभर वर्षे टिकून राहिली हे आपण विसरता कामा नये. राजस्थान एकछत्र कधी झाले नव्हते; पण विजयनगरने तुंगभद्रेच्या दक्षिणेस अखंड एकछत्र टिकवून धरण्यात अपूर्व यश मिळविले होते. पण मरणमारणाच्या दीर्घकालीन संग्रामात शेवटी या सत्तेला हार खावी लागली. अखिल भारतातून मुस्लीम सत्तेची पाळेमुळे खणून काढण्यात तिला यश आले नाही. ते यश मराठ्यांना आले. तेव्हा विजयनगर कोठे कमी पडले व मराठे या कार्यात यशस्वी का झाले याची कारणमीमांसा आपण केली पाहिजे. पुढच्या प्रकरणात तो प्रयत्न करावयाचा आहे.
५
स्वराज्य आणि स्वधर्म

§