हिदुस्थानातील पाऊस व झाडे/हिंदुस्थान देशाच्या स्वाभाविक अवश्यकता


भाग २ रा.
---------------
हिंदुस्तान देशच्या स्वाभाविक अवश्यकता

 मागील भागांत सांगितल्याप्रमाणे हिंदुस्तान देशाचे हवामान असल्याकारणाने ह्या देशांतील लोकांस विशेष अवश्यकता कसकशाची आहे, हे पाहिले पाहिजे. मुख्यतः थंडी, पाऊस व पाण्याचा संचय ह्या तीन गोष्टी पाहिजे आहेत. ह्यांचे विवरण यथानुक्रमें करूं.

थंडी.

 पूर्वी सांगितलेच आहे की, हा देश अर्धा उष्ण कटिबंधांत व अर्धा समशीतोष्ण कटिबंधांत आहे. समशीतोष्ण कटिबंधाचे एकंदर ४३ अंश आहेत. ह्यांपैकी फक्त १२ अगर १२ / अंश काय ते हिंदुस्तानांत आहेत, व हेही अंश उष्ण कटिबंधाचे लगतचे असल्यामुळे केवळ समशीतोष्ण देशांतील हवा एथे नसून उष्ण कटिबंधापेक्षा थोडीशी मात्र कमी उष्णता आहे. ह्या देशांत सरासरी वार्षिक उष्णतेचें मान ६२ अंशापासून ८२ अंशापर्यंत असते. उन्हाळ्यामध्ये कित्येक ठिकाणी तर उष्णतेचे मान १२५ अंशापर्यंत असते. इतकी उष्णता खरोखर फार दुस्सह होय.

 अतिशय उष्णता मनुष्याचे शारीरिक व मानसिक वाढीस अ
१८

पायकारक होते. उष्ण हवेतील लोकांचे आयुष्यही कमी होते. कारण, एथे, मनुष्यास प्रौढत्व लौकर प्राप्त होते व वार्धक्यही लौकर येते. उष्ण देशामधील मुली १०।१२ वर्षांच्या वयाच्या झाल्या असतां प्रौढ दशेस येतात, व अल्पवयी पुरुषांची लग्ने करण्याची चाल असल्यामुळे संतति सशक्त होण्याचा संभव कमी असतो. फ्रान्स, इंग्लंड वगैरे थंड देशांतील लोकांमध्ये बायका सरासरी २० वर्षांच्या वयाच्या होत तों, व पुरुष सरासरी २२ वर्षांचे वयाचे होत तों प्रौढ दशेस येत नाहींत. आपल्या सुद्धा देशांत उत्तर हिंदुस्तानापेक्षां मद्रासेकडे जास्त उष्णता असल्यामुळे तिकडील बायकांस प्रौढत्व लौकर प्राप्त होते. उत्तर हिंदुस्तानांत थंडी विशेष असल्यामुळे तिकडील बायका १५ अगर १६ वर्षांच्या वयाच्या होत तों प्रौढ होत नाहींत. ह्याचप्रमाणे मानसिक वाढीचीही गोष्ट आहे. आफ्रिकाखंडामधून विषुववृत्त जाते, म्हणून तेथील हवा फार उष्ण असल्याकारणाने लोक खुजट, काळे, कुरूप व अगदी रानटी स्थितीत असलेले आढळतात; त्या खंडांत कांहीच सुधारणा झालेली आढळत नाहीं; लोकांच्या मानसिक शक्ती- मध्येही सुधारणा नाहीं. तीच फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, युनायटेड- स्टेट्स वगैरे समशीतोष्ण कटिबंधाचे देशांतील लोकांची स्थिति पहा; तेथील लोक अंगाने सशक्त, उंच, सुस्वरूप असे आढळतात. ह्या देशांमध्ये हरएक प्रकारची सुधारणा शिखरास जाऊन पोहोंचली आहे. लोकांची मानसिक शक्तिही अतिशय वृद्धिंगत झाली

आहे. फार लांब कशाला ? आपला हा हिंदुस्तान देशच पहा, वर
१९


सांगितल्याप्रमाणे उत्तरेपेक्षां दक्षिणेकडे उष्णता जास्त असल्यामुळे मद्रास इलाख्यांतील लोक पाहिले तर काळे, ठेंगणे, थोडे कुरूप व हरएक प्रकारच्या सुधारणेमध्यें व मानसिक शक्तीमध्ये मागसलेले आहेत. परंतु बंगाल, वायव्येकडील प्रांत, पंजाब वगैरे उत्तरेकडील प्रांतांकडे पहा; पुरभय्ये, पंजाबी, वगैरे लोक अंगाने सदृढ व उंच असे आहेत. अर्वाचीन काळी बंगाल देश सुधारणेमध्ये व विद्येमध्ये पुढे आहे. प्राचीन काळीं प्रसिद्धीस आलेलीं व सुधारणे- च्या शिखरास पोहोंचलीं होतीं अशी राज्ये म्हणजे गोकुळ, वृंदा- वन, अयोध्या, दिल्ली वगैरे सर्व उत्तर हिंदुस्तानांत होऊन गेली. मोठमोठे विद्वान् ऋषि व त्यांचे शिष्यवर्ग हेही उत्तर हिंदुस्तानां- तच होऊन गेले. सारांश असा की, मनुष्यास राहण्यास अति योग्य ठिकाण म्हटलें म्हणजे समशीतोष्ण कटिबंध होय. व ह्यांतही उत्तम स्थान म्हटलें म्हणजे वरील कटिबंधाचा मध्यप्रदेश होय. उष्ण कटिबंधाच्या लगतचाही भाग फार चांगला नाहीं, व शीत कटिबंधाच्याही लगतचा भाग फार चांगला नाहीं.

 शिवाय, अतिशय थंडीही मनुष्यमात्रास हितावह नाहीं. युरोप- खंडाचे उत्तरेकडील देश नॉर्वे, स्वीडन, ल्यापलँड, रशियाचा उत्तर भाग वगैरे ठिकाणची हवा अतिशय थंड असल्यामुळे तेथील लोक खुजट व कुरूप आहेत. त्यांच्या मानसिक शक्तिही वृद्धिंगत झालेल्या नाहींत. ही स्थिति हिमालय पर्वतावर उच्च स्थानीं जी

लोकवस्ती आहे तीमध्येही आढळते. 
२०

 उष्ण हवेपासून दुसरेही अनेक अहितावह परिणाम घडून येतात. उष्ण देशांत शारीरिक व मानसिक मेहनत फार करवत नाहीं. थोडीशी मेहनत केली की, मनुष्य थकतो व त्यास स्वस्थ पडून रहावेसे वाटते. थंड देशांत मनुष्यास पुष्कळ काम करवते व थकवा लौकर येत नाहीं. जर्मनींत कित्येक लोक १२ अगर १४ तासपर्यंत अभ्यास करतात. तिकडील लोकांचे सुधारणेमध्ये पुढे पाऊल पडण्याचे हे एक कारण आहे. सारांश, मनुष्यास अतिशय थंडीही हितावह नाही व अतिशय उष्णताही हितावह नाहीं. परंतु आपल्या देशांत उष्णतेचे मान तर फार जरब आहे; म्हणून उष्णता जेणेकरून कमी होईल असे उपाय आपणांस अवश्य योजिले पाहिजेत. ह्याचे प्रत्यंतर पाहण्यास आपणांस उष्ण देश व शीत देश घेण्याचीही फारशी जरूरी नाहीं. एकाच ठिकाणचे उन्हाळ्यामधील व हिंवाळ्यामधील स्थिति अशीच आढळून येईल. ही गोष्ट आपले अनुभवास नित्य येते कीं, उन्हाळ्यापेक्षां थंडीचे दिवस आपणांस विशेष प्रिय असतात. ह्या दिवसांत अन्नपचन किती चांगले होते व अन्नास रुचि किती चांगली लागते ! पुष्कळ मेहनत केली तरी थकवा येत नाहीं. ह्याच दिवसांमध्यें तालीमबाज लोक खाऊनपिऊन व मेहनत करून तयार होतात; व उन्हाळा लागतांच फाल्गुनमासी शिमग्याचे सणांत कुस्त्या करतात. हिंवाळ्यात मेहनत करण्यास उल्हास वाटतो, व अंगामध्ये ताकद जास्त असते. उन्हाळ्यामध्ये अन्नास रुचि नसते; हवेच्या उष्णतेमुळे

मनुष्याच्या अंगांतील पाणी घर्मरूपाने पुष्कळ निघून जात 
२१

असल्यामुळे तहान जास्त लागते व त्या मानाने अन्न कमी खपते; थोडी मेहनत केली कीं, थकवा येऊन हुश्श करीत पडावे लागते; उष्णतेमुळे रात्री झोप चांगली येत नाही व त्यामुळे जिवास आराम न वाटून दुसरे दिवशी सकाळी मनास वाटावी तशी हुशारी वाटत नाहीं. अशा दिवसांमध्ये आपणांस थंड पदार्थांची व थंड हवेची किती अवश्यकता वाटते ! एकाद्या थंड राईमध्ये अगर बागेमध्ये अथवा एकाद्या दाट छायेच्या वृक्षाखाली बसले असतां किती आराम वाटतो ! ह्यावरून थंडीची अवश्यकता आपणांस फार आहे हे उघड होते.

पाऊस

 बहुतेक सर्व थंड देशांमध्ये बारा महिने पाऊस पडत असतो, व पावसाचे सरासरीचें वर्षाचे मान जरी ३० पासून ४० *इंचांपेक्षा जास्त नसते, तरी अवर्षण पडेल ही भीति नसते. उष्ण देशामध्यें

-----

 *अमुक इंच पाऊस पडणे म्हणजे काय ते एथे सांगितले पाहिजे. अमुक ठिकाणी १ इंच पाऊस पडला याचा अर्थ इतकाच की, त्या ठिकाणी पावसाचे पडलेले पाणी वाहून गेलें नाहीं, किंवा जमिनीत जिरलें नाहीं, अथवा दुसऱ्या कोणत्याही रीतीनें नाहींसे झाले नाही, तर त्या ठिकाणी सर्व जागेवर एक इंच खोलीचे ( उंचीचें ) पाणी सांचून राहते असे समजावे. तसेच, ३० इंच पाऊस पडणे म्हणजे, वर सांगितल्याप्रमाणे कोणत्याही रीतीने पाणी नाहीसे झाले नाही, तर त्या ठिकाणी ३० इंच खोलीचे पाणी साचून राहणे हे होय. पाऊस किती इंच पडला, हें

मोजण्याचे यंत्र असते त्यास " पर्जन्यमापकयंत्र " म्हणतात. 
२२

पाऊस नियमित काळीं नियमित दिवसपर्यंत मात्र पडतो. हा वर्षीतून तीन चार महिनेपावेतों पराकाष्ठा असतो, व सर्व पिके ह्या नियमित काळीं मात्र व्हावयाची असतात; म्हणून पाऊस नियमित वेळीं चांगला पडला तर मात्र पिके चांगली होण्याचा संभव असतो. कित्येक देशांमध्ये कोणतेही पीक पावसावर बिलकूलं अवलंबून नसते. नद्यांना पूर येऊन त्या योगाने नदीकाठच्या जमिनी भिजल्या म्हणजे पिके होतात; व कांहीं ठिकाणीं नद्यांना कालवे काढलेले असून त्या कालव्यांच्या पाण्यावर पिके होतात. आफ्रिका खंडामध्ये मिसर देशांत नील नदीला पूर येऊन त्या पुराच्या पाण्यानेच पिके होतात, व धान्य विपुल होते. अशा ठिकाणी लोकांस पावसाची अगदीं जरूर नसते व दुष्काळ पडण्याची भीति नसते. आपल्या ह्या देशामध्ये सिंध प्रांताची अशी स्थिति आहे. सिंधु नदास पूर येऊन त्या पाण्याच्या योगाने नदीकाठच्या जमिनी पिकतात; शिवाय ह्या नदाचे मोठमोठे कालवे काढले आहेत, त्यांच्याही पाण्याने पुष्कळ जमीन पिकते. एथे पराकाष्ठा ७ किंवा ८ इंच पाऊस वर्षांतून पडतो तरी दुष्काळ म्हणून कधीं पडत नाहीं; कारण, पिके पावसावर अवलंबून मुळीच नसतात. पाऊस पडो अगर न पडो, नदीला पूर आला की झाला सुकाळ ! अशी स्थिति सर्व देशभर असती तर किती चांगले झाले असते ! नाही म्हणावयाला पंजाबमध्ये कित्येक ठिकाणीं यमुना व गंगा ह्या नद्यांचे कालवे काढिले आहेत; त्या प्रदेशांत मात्र दुष्काळ पडण्याची भीति

उरली नाही. परंतु, हा प्रदेश ह्या अफाट देशाच्या मानाने पाहि
२३

ला तर कांहींच नाहीं. बहुतेक सर्व देश पावसावर अवलंबून आहे. मग तो पाऊसच पुरेसा न पडला तर लोकांची काय स्थिति होते हें सांगणे नलगे. तशांत, इंग्लंड वगैरे देशासारखी तरी आमची स्थिति आहे काय ? इंग्लंडांत शेतकीवर उपजीवन करणारे लोक फारच थोडे. कारण, लोकवस्तीच्या मानाने जमीनही थोडी व तीही इतकी सुपीक नाहीं. बहुतेक लोकांचा चरितार्थ कलाकौशल्याचे पदार्थ तयार करण्यावर व व्यापारावर चालत आहे. तिकडील लोकांस धान्याचा पुरवठा इतर देशांतून होतो. तिकडे जमिनीच्या पिकाचे महत्त्व फारसें नाहीं; म्हणून पाऊस पडला नाहीं ह्या कारणाकरितां लोकांस खावयास अन्न मिळत नाहीं असे तेथे कधींही होत नाहीं. आमच्या देशांत शेकडा ९५ मनुष्ये शेतकीवर उपजीवन करून राहणारी आहेत; कलाकौशल्य व व्यापार ह्यांस उत्तरोत्तर उतरती कळा लागत चालली आहे; लोकांत त्राण बिलकूल उरलें नाहीं. एक वर्ष पाऊस न पडला तर हाहाकार होऊन जातो. सन १८७७ सालीं जो मोठा दुष्काळ पडला त्याचे तरी कारण हेच. इंग्लंड देशाप्रमाणे ह्या देशाची स्थिति असती, म्हणजे लोकांचे उपजीवन शेतकीशिवाय इतर धंद्यांवर अवलंबून असते, तर लाखों लोक प्राणांस कां मुकते ? ह्याप्रमाणे हिंदुस्तानामध्ये जे जे दुष्काळ पडले ते ते सर्व पावसाच्या अभावामुळेच. नाहीं म्हणावयास अमेरिकेमध्ये सन १८६१ ते १८६५ पावेतों लढाई चालली होती, त्या सालीं हिंदुस्तानांत जी महर्गता झाली,

तिचे मात्र कारण निराळे होते. इंग्लंड देशाला कापसाचा पुरवठा 
२४

काय तो मुख्यत्वेकरून हिंदुस्तानांतून व अमेरिकेंतून होतो. अमेरिकेंत लढाई चालली होती त्यामुळे तिकडून इंग्लंडास कापूस जाण्याचे बंद पडले व एकंदर कापूस हिंदुस्तानांतून न्यावा लागला. ह्यामुळे कापसास इतकी तेजी आली कीं, जो तो आपल्या जमिनीमध्ये धान्य पिकवावयाचे सोडून देऊन कापूस पिकवू लागला; अर्थातच धान्य कमी पिकू लागून महर्गता झाली. पाऊस पडूनही महागाई झाल्याचे हे एक उदाहरण सांपडेल. हिंदुस्तानचे नशीब उघडून दर वर्षी कापसास अशीच तेजी येत गेली असती, तर पुढे धान्य महाग झाले नसते; लोकांजवळ पैसा पुष्कळ होऊन इतर देशांतून धान्य आणविण्यास अडचणं पडली नसती; व व्यापारास उत्तेजन मिळून इतर देशचे लोकही इकडे धान्य घेऊन येऊ लागले असते; परंतु ही स्थिति अपवादक होय. पाऊस चांगला पडला म्हणजे दुष्काळ पडण्याची भीति मुळीच नाहीं, ही नेहमींची साधारण स्थिति. मुख्यतः पाऊस पुरेसा पडला पाहिजे. म्हणून जे उपाय पाऊस पडण्यास साधनीभूत होतील ते उपाय योजण्याविषयी आपण सतत झटले पाहिजे.

पाण्याचा संचय.

 आतां, तिसरी अवश्यकता जी पाण्याचा संचय तिजबद्दल विचार करूं. वर सांगितलेच आहे कीं, उष्ण देशामध्ये पाऊस नियमित काळीं मात्र पडतो. आपल्या इकडे वर्षातून चार पांच महिने

पाऊस पडतो; बाकीच्या दिवसांत पावसाचा थेंब सुद्धां सहसा 
२५
दृष्टीस पडावयाचा नाहीं. ह्या कालांत जे पाणी जमिनीवर पडेल

त्यावरच वर्षभर निर्वाह व्हावयाचा; नद्या, ओढे, ओहोळ, विहिरी तलाव यांस ह्या पाण्यापासून पुरवठा व्हावयाचा; व ह्याच पाण्याने मनुष्यांस, जनावरांस, झाडांस वगैरे पाणी मिळावयाचे. पाण्यावांचून मनुष्यांस व जनावरांस दोन चार दिवस सुद्धां राहतां यावयाचें नाहीं. उष्ण देशामध्ये मनुष्यांस व जनावरांस प्यावयासही पाणी पुष्कळ लागते.

 पुष्कळ वेळां असे होते की, मुंबई इलाख्यांतील नगर, सोलापूर, विजापूर वगैरे जिल्ह्यांत पाण्याचा दुष्काळ पडतो, म्हणजे गुदस्त सालीं पाऊस चांगला पडल्यामुळे लोकांजवळ धान्याचा व गुरांकरितां चाऱ्याचा सांठा चांगला असूनही चालू साली पाऊस चांगला न पडल्यामुळे पाण्याचा पुरवठा कमी पडतो, व लोकांस आपले घरदार सोडून देशोधडीस जावे लागते. थोडेबहुत पाणी असेपावेतों मनुष्ये कसा तरी टिकाव धरून राहतात. अशा वेळी जनावरांस पाणी न मिळाल्यामुळे ती हळू हळू मरावयास लागतात; व पावसाने अखेरपर्यंत अशीच अवकृपा केली म्हणजे शेवटीं मनुष्यांसही देश सोडून जावे लागते. अशा रीतीने जनावरांची नासाडी झाली म्हणजे मग पुढे पाऊस पडूनही सर्व जमीन लागवड होत नाहीं; जी जमीन लागवड होते तिची मेहनतही चांगली होत नाहीं. लोकही जे निकृष्ट दशेस आलेले असतात ते पुढे पाऊस

चांगला पडत गेला तरी लौकर सुधारत नाहींत. एकपक्षी 
२६

पाहिले तर धान्याचा दुष्काळ पडलेला बरा, परंतु पाण्याचा दुष्काळ नको. गाड्या, आगगाड्या, आगबोटी वगैरे वाहनांच्या साधनाने धान्य इतर ठिकाणांहून आणण्यासारखे असते; परंतु पाणी तसे आणतां येण्याची मुष्कील आहे.

 ह्याप्रमाणे मनुष्यें व गुरे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात इतकेच नव्हे, परंतु ह्या सांठलेल्या पाण्यावर शेतकीही पुष्कळ अंशीं अवलंबून असते. सकृद्दर्शनीं असे वाटते की, बागाईत जमिनीस पावसाची अवश्यकता नाहीं; ह्यांस नद्या, नाले, तलाव आणि विहिरी ह्यांचे पाट व कालवे ह्यांपासून पुरेसे पाणी मिळाले म्हणजे झाले. परंतु जिराईत जमिनीच्या मानाने पाहिले असतां बागाईत जमीन प्रथमतः अगदी थोडी आहे. आतां, दुष्काळाचे प्रसंगी अशा जमिनीपासून थोडाबहुत तरी धान्याचा पुरवठा होतो ही गोष्ट निराळी. पण विहिरीनाल्यांसच जर पाणी पुरेसे नाही तर बागाईत तरी होणार कोठून ! आपल्या दयाळू सरकाराने हल्ली कांहीं प्रांतांमधून मोठमोठे कालवे काढलेले आहेत, व आणखी काढण्याचे काम सुरू आहे. माजी अमलांतही अशा प्रकारचे कालवे काढलेले आहेत, व त्यांपासून हजारों एकर जमीन भिजत आहे. कांहीं कांहीं ठिकाणी तर दुष्काळ पडण्याची भीति सुद्धा उरली नाही ही गोष्ट खरी; परंतु मूलतः ज्या नद्यांपासून हे कालवे

काढलेले आहेत त्यांसच जर पाण्याचा पुरवठा चांगला न झाला 
२७

तर त्यांपासून फारसा फायदा होण्याचा संभव *नाहीं. ह्यावरून उघड होते की, पाऊस पुष्कळ पडण्यापेक्षां पडलेल्या पावसाचे पाणी वाहून जाऊ न देतां ते सांठवून ठेवण्याकरितां तजविजी योजणे हे अत्यवश्यक आहे.

--------------------










-----

 *बेळगांव जिल्ह्यापैकीं गोकाकच्या कालव्याची अशाच प्रकारची स्थिति झाली आहे. कांहीं दिवसपावेतों ह्या कालव्याचे पाणी जमीन पिकविण्याकरितां सरकार लोकांस देऊ लागले होते. परंतु, पुढे कालव्याचे कांहीं पाणी एका गिरणीस द्यावे लागल्यामुळे कालव्यामध्ये पाणी अपुरे

होऊन तो निरुपयोगी झाल्यासारखा आहे.