हैदराबाद विमोचन आणि विसर्जन/एक राजकारणी संन्यासी - स्वामीजी






५.
एक राजकारणी संन्यासी - स्वामीजी

 २२ जानेवारी १९७२ ला तीन वाजता पू. स्वामी रामानंद तीर्थ ह्यांच्या निधनाने एक कृतार्थ जीवनाचा पूर्ण विराम झालेला आहे. सुदृढ प्रकृती हे स्वामीजींचे वैशिष्ट्य कधीच नव्हते. आणि गेले तीन महिने तर ते अंथरुणाला खिळूनच होते. पण मानवी शौर्याचा उगम बळकट शरीरापेक्षा बळकट मनावर जास्त अवलंबून असतो. स्वामीजी मनाने नेहमीच निर्भय आणि स्वभावतः निर्लेप होते. तीन-चार दिवसांपूर्वीच त्यांनी औषधांचा, तज्ज्ञ डॉक्टरांचा आणि सुसज्ज रुग्णालयाचा धैर्याने शेवटचा निरोप घेतला. जर शरीर साथ देणारच नसेल तर इतरांच्यावर ‘निष्कारण ओझे' म्हणून जगण्याची त्यांची इच्छा नव्हती. वीर पुरुषाप्रमाणे जाणीवपूर्वक मृत्यूला सामोरे जाऊन त्यांनी स्वतःच्या निःस्पृहतला साजेल अशा गतीची प्राप्ती करून घेतली. राजकारण कधी कृतज्ञ नसते. तसे महाराष्ट्राचेही राजकारण कृतज्ञ नाही. पण कृतज्ञता हा मानवी मनाचा विशेष आहे. राजकारणाच्या स्वार्थी रंगाने सर्वांचीच मने रंगलेली नसतात. त्या साऱ्यांना स्वामीजी आपल्या मुक्ततेची शुभ देवता होते ही गोष्ट कधी विसरता येणार नाही. स्वामीजींच्या प्रसन्न, कृतार्थ आणि निरिच्छ व्यक्तिमत्त्वाने ज्या हजारो, लाखोंच्या जीवनात कर्तृत्वाने अंगार फुलविले त्यांना ही कृश मूर्ती आज कायमची नजरेपुढून मालवली आहे याची हळहळ वाटल्याविना राहणार नाही. स्वामीजी मान्यतेच्या शिखरावर असताना कधी अहंकारी व उर्मट झाल्याची आठवण कुणी सांगू शकणार नाही. देव्हाऱ्यातून दूर फेकले गेल्यानंतर जो कुढेपणा, किरविरेपणा देवमूर्तीत निर्माण होतो तोही त्यांच्या ठिकाणी कुणी पाहिली नाही. ती एक समर्पित ओंजळ होती आणि समर्पणाच्या बेभान अवस्थेतच तृप्त होती. कुणाला काही मागण्याची ज्यांना क्षुद्र बुद्धी नसते त्यांना हक्काचे काही हिरावले गेल्याचा विषादही नसणे स्वाभाविकच होते.

 एक दिवस कोणतीही अपेक्षा न करता जीवनसर्वस्व पणाला लावण्याचे ठरवून एक तरुण मुलगा उस्मानाबाद जिल्ह्यात हिप्परगा या शाळेत येऊन, शिक्षक म्हणून दाखल झाला. त्याचे नाव व्यंकटेश खेडगीकर. आपण हैदराबादच्या संस्थानी जनतेच्या भाग्याचे विधाते आहोत ह्याची जाणीव त्यावेळी त्यांना अगर इतर कुणाला असण्याची शक्यता नव्हती. एक ध्येयवादी तरुण शिक्षक, एक गांधी-टिळकांचा अनुयायी असणारा तरुण यापलीकडे त्यांना कुणी ओळखीत नव्हते. शिक्षण-संशोधन वैचारिक सेवेची साधने निर्माण करणे व वैचारिक कार्याबद्दल आस्था बाळगणे ही स्वामीजींची कायमची प्रवृत्ती होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा हा अखंड धागा जीवनाच्या आतापर्यंत अतूट होता. स्वामीजींचे सगळे विचार कुणाला पटतील असे नव्हते. चारित्र्यवान ध्येयवादी मनाने केलेला विचार नेहमीच ‘सत्यदर्शक' असेल अशी हमी कोणी द्यावी? पण विचारांच्या विषयीची आस्था मात्र प्रामाणिक होती.

 पण त्यांचा योग राजकीय नेते होण्याचा होता. ज्या हैदराबाद संस्थानात शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक सगळ्याच प्रकारचे मागासलेपण होते तेथील कार्य अनेक बाजूंनी व अनेक पटींनी अवघड आणि किचकट होते. हैदराबाद संस्थान हे एक मुस्लिम संस्थान असल्यामुळे त्यावेळच्या राजकारणात ते अवघड जागेचे दुखणे होते. कोणतीही राजकीय मागणी असली तरी तिच्यावर हिंदू जातीयवादाचा शिक्का मारणे सोपे होते व बाहेरून अशा वेळी समर्थन प्राप्त होण कठीण असे. संस्थानी राजवटीत वीस लक्ष मुसलमानांचे हितसंबंध गुंतलेले असल्यामुळे आक्रमक जातीयवादाच्या चौरस वातावरणात अत्याचार सहन करीतच काम करणे भाग होते. आणि दीर्घकाळच्या मागासलेपणामुळे बहुसंख्य जनता इतकी प्रतिकारशून्य झाली होती, की त्यांना लढ्याची कल्पनाच सहन होत नसे. अशा त्या वातावरणात चारित्र्य, धैर्य आणि बलिदानाची सिद्धता हेच राजकारणाचे आधार होते. अशा राजकारणाचा नेता फक्त संन्यासीच होऊ शकतो तसा तो झाला! आपला संसार मोडण्याची गरज न भासलेल्या ह्या कृश, कषाय-वस्त्र-धाऱ्यावर कोट्यवधींच्या संसाराची नवी मांडामांड करण्याचे ऐतिहासिक कर्तव्य येऊन पडले होते. या लढ्यात विजयी झाल्याशिवाय जातीयवादाचा गंड कोसळणार नव्हता. भारत सलग होणार नव्हता व लोकशाहीलाही भवितव्य नव्हते. हा लढा देण्याचे भाग्य स्वामीजींना लाभले. हैदराबाद संस्थान भारतात विलीन झालेले व शेवटी समाप्त, नामशेष झाल्याचे पाहाण्याचा योगही त्यांना आला. शेवटी हैदराबाद संस्थान दफन झाल्याविना महाराष्ट्रही शक्य नव्हता. आंध्रही शक्य नव्हता. भाषावार प्रांतरचनाच शक्य नव्हती. ज्या दिवशी हैदराबाद संपले त्या दिवशी स्वामीजींचे जीवितकार्य संपले. जीवन कृतार्थ झाले. यानंतर त्यांना त्यांच्याच शब्दात सांगायचे तर "सद्भावना प्रसाराविना दुसरा छंद उरला नाही". सर्वोदयाकडे ते याच नजरेने पाहत असत.

 हैदराबाद लढ्याचे नेते म्हणून ते मुसलमानांचे लाडके असू शकत नव्हते. नेहरूनिष्ठ समाजवादी म्हणून सरदार गट त्यांच्यावर रुष्ट होता. हैदराबाद विभाजनाच्या आग्रहामुळे त्यांच्यावर पुढे नेहरूही नाराजच होते. भोगवादी राजकारणात स्वामीजींचे पुण्य आपल्या स्वार्थावरील झूल होऊ शकत नाही हे कळल्यावर अनुयायी फारच जवळ टिकू शकले नाहीत. स्वामीजींनी तसा प्रयत्नही केला नाही. शेवट ती समर्पणांजली होती. तिला स्वतःच्या विसर्जनाची ओढ होती. स्वार्थाच्या सोयी पाहणे त्यांना कसे शक्य असणार? आपण काय आहो ही पक्की खात्री असल्यामुळेच बहुधा ते नित्य तृप्त होते.

***

(प्रकाशन : दैनिक प्रजावाणी, २५-१-१९७२)