हैदराबाद विमोचन आणि विसर्जन/कुरुंद्यात स्वातंत्र्य आले
कुरुंदा माझे परंपरागत राहते गाव. निजाम हैदराबादमधील परभणी जिल्ह्यात ते आहे. यंदा आपण स्वातंत्र्याचा रौप्यमहोत्सव साजरा करीत आहो. त्यावेळी सगळ्या जुन्या आठवणी उजळून निघणे स्वाभाविक आहे. संस्थानाच्या बाहेर राहणाऱ्या जनतेला स्वातंत्र्य १५ ऑगस्टला मिळाले. आमच्यासाठी मुक्ततेचा हा क्षण तेरा महिन्यानंतर सप्टेंबर १७ ला पोलिस अॅक्शनमुळे आला. माझ्या गावाला जेव्हा ही आनंदाची बातमी कळली तेव्हा मी हैदराबादला होतो. पण नंतर जेव्हा मी कुरुंद्याला आलो तेव्हा माहिती विचारून घेतला त्या आधारेच पुढचे वर्णन लिहिले आहे. दोन स्वातंत्र्यातील भावनेचा आणि जाणिवेचा फरक मात्र विचारात घेतला पाहिजे. भारतीय जनतेसाठी स्वातंत्र्याचा क्षण अतीव दुःखाचा आणि निराशेचा होता. देशाची फाळणी झालेली होती, निर्वासितांचे लोंढे येत होते. जातीय दंगली चालू होत्या. हे दृश्य मोठे सुखद नव्हते. अंतःकरणात शोक, मनावर ताण आणि चेहऱ्यावर ओढून ताणून आणलेले हसू असे स्वातंत्र्याचे स्वागत करणे भाग होते. आमच्यासाठी सारे भोगून, पाहून, सहन झालेले होते. अत्याचार हेच आमच्यासमोर नित्य जीवन होते. स्वातंत्र्य ही सर्व दुःखांची समाप्ती होती. आनंद मनात मावणेच शक्य नव्हते. स्वातंत्र्य ही आमच्यासाठी याची देही याची डोळा सुखाची पर्वणी होती. आनंदाने नाचा हे कुणाला सांगण्याची गरजच नव्हती. आम्ही शतकांच्या अंधारातून लख्ख प्रकाशात येत होतो.
भारतीय स्वातंत्र्याची घोषणा जूनमध्ये झाली. त्यापूर्वी काही दिवस इंग्रजी राज्य समाप्त झाल्यानंतर आपण स्वतंत्र होणार आहो ही घोषणा हैदराबादचे निजाम मीर उस्मान अली खाँ ह्यांनी केलेली होती. त्यांच्या दृष्टीने हे कृत्य नुसते न्याय्य नव्हते तर स्वाभाविकही होते. मोगलांचे सेनापती व सुभेदार म्हणून पहिले निजाम दक्षिणेत आले व त्यांनी स्वतंत्र राज्य निर्माण केले. इंग्रजांचे मांडलिकत्व स्वीकारण्यापूर्वी निजाम स्वतंत्रच होता. इंग्रज गेल्यानंतर जसा भारत स्वतंत्र होईल तसा निजाम स्वतंत्र होईल. जनतेच्या संमतीने मध्य युगात हे राज्य निर्माण झाले नव्हते. तो मुसलमानांचा विजित प्रदेश होता. तेव्हा, आताही स्वतंत्र राहण्यासाठी जनतेच्या संमतीची गरज नव्हती. हैदराबाद संस्थानचा हा पृथक राष्ट्रवाद मोठ्या प्रयत्नाने निजामाने जोपासलेला होता. सुमारे एक कोटी साठ लक्ष लोकसंख्या असणारे हे भारतातील सर्वांत मोठे संस्थान होते. त्याचे स्वतःचे स्वतंत्र पोस्ट होते, तार व्यवस्था होती. स्वतंत्र रेल्वे, स्वतंत्र नाणीव्यवस्था होती. परदेशात जाता-येताना जसे नाक्यावर सामान तपासले जाते तशी व्यवस्था होती. I.C.S. प्रमाणे H.C.S.ही स्वतंत्र नोकरशाही होती. स्वतंत्र छोटीशी फौज होती (१२ हजारांची). सर्व भारतभर मुसलमानांची संघटना मुस्लीम लीग होती. पण हैदराबादसाठी स्वतंत्र इत्तेहादुल मुसलमीन ही संघटना होती. रहीमत अली यांनी १९३४ साली जेव्हा प्रथम पाकिस्तानची भूमिका मांडली त्यात उस्मानीस्थानची स्वतंत्र व्यवस्था होती. तेव्हा स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र म्हणून अस्तित्वात येणे ही निजामासाठी स्वाभाविक गोष्ट होती.
जे संस्थान सर्व बाजूंनी वेढलेले-भारताने-आहे ते स्वतंत्र राहणार कसे, असे फालतू प्रश्न विचारण्यात अर्थ नव्हता. ते मुसलमानांचे राष्ट्र होते. ८७ टक्के प्रजा हिंदू असली आणि मुस्लिम साडेदहा टक्के असली म्हणून काय झाले? हिंदूप्रजा सगळी घाबरलेली व निःशस्त्र होती. सुमारे सोळा लक्ष मुसलमान सर्व जीवनावर प्रभुत्व ठेवून होते. फौजेत आणि पोलिसांत त्यांचे प्रमाण ९५ टक्के होते. कनिष्ठ नोकऱ्यांत ते ७५ टक्के होते. वरिष्ठ नोकऱ्यांत प्रमाण ९८ टक्के असे. राज्यभाषा उर्दू होती. इस्लाम हा राज्याचा अधिकृत धर्म होता. त्यामुळे मोहरमची बारा दिवस सुटी असे, रमजानचा महिना अर्धा दिवस शाळा असे. सुटी रविवारी नसून शुक्रवारी होती. आणि महिने इराणी अजूर-दय-वहमन असे चालत. शिवाय मुसलमानांत अरब व रोहिले सशस्त्र होते. ते सावकारीसह गुंडगिरी करीत. सामान्य मुसलमान सशस्त्रच होता. त्यामुळे एक कोटी चाळीस लक्ष हिंदूंना दाबून ठेवणे निजामाला कठीण वाटत नसे. हैदराबादमधील सर्व हिंदू जमीनदार, जहागीरदार, वतनदार निजामी राजवट टिकावी या मताचे होते. मुसलमानांचे तर ते राष्ट्रच होते. पारशी, खिश्चन ह्यांची संख्या नगण्य असली तरी ते निजामाचे पाठीराखे होते. दलित समाजाची स्वतंत्र संघटना होती. तिचे नेते बी. एस. व्यंकटराव व शामसुंदर होते. त्यांना अत्याचारापासून बचाव होण्याचा एकच मार्ग दिसत होता. तो म्हणजे हैदराबादच्या स्वातंत्र्याला मान्यता देणे.
त्यावेळी कम्युनिस्टांनी अजून भारतीय स्वातंत्र्याला मान्यता दिलेली नव्हती. त्यांचीही हैदराबादच्या स्वातंत्र्याला सुप्त मान्यता होती. कम्युनिस्टांनी अधिकृतरीत्या हैदराबादच्या स्वातंत्र्याला मान्यता फेब्रुवारी १९४८ मध्ये दिली. अशी सगळी तयारी झालेली होती. फक्त पहिल्या निजामाने आपल्या मुलाला केलेल्या उपदेशाचे मनन शेवटच्या निजामाने केलेले दिसत नाही. पहिले निजाम उलमुल्क आसफजहा आपल्या मुलाला सांगतात की, दक्षिणेतील जानवेधारी (ब्राह्मण) हे अतिशय घातक आहेत. त्यांना मारावे. हा प्रदेश मराठ्यांचा आहे. त्यांच्याशी वैर करू नये. ह्या मराठ्यांना नष्ट करणे औरंगजेबाला जमले नाही तर ते तुला जमेल असे समजू नकोस. मुस्लिम अत्याचारांनी सर्व हिंदू प्रजेला एकत्र येऊन लढणेच भाग पडले. म्हणजे ब्राह्मण-मराठे एक झाले, पहिल्या निजामाने सांगितले होते त्याप्रमाणे हे घडले की निजामाचा शेवट आला.
हैदराबाद राज्यात अतिजहाल, जहाल, मध्यममार्गी, मवाळ असे गट राजकारणात पडूच शकत नसत. तो दोन जहालांचाच झगडा होता. निजाम, कासीम रझवी आणि मुसलमान यांना पूर्ण स्वातंत्र्य हवे होते. त्यासाठी वाटेल त्या अत्याचारांची त्यांची तयारी होती. गरज पडली तर एक कोटी चाळीस लक्ष हिंदूंची आपण संपूर्ण कत्तल करू अशी कासीम रझवीची जाहीर घोषणा होती; व त्याने शंभरदा तिचा उच्चार केला होता. ह्या जागेपासून खाली येण्यास ते तयार नव्हते. हे संस्थान संपूर्णपणे नष्ट झाल्याशिवाय भारतीय स्वातंत्र्याला पूर्णता नाही. जनतेची मुक्तता नाही. अत्याचारी, प्रतिगामी, पिसाट जातीयवादाचा शेवट नाही, म्हणून हे संस्थान नष्टच झाले पाहिजे. त्यासाठी शस्त्राचा जमेल तो वापर करू. अंतर्गत सशस्त्र यादवीची तयारी ठेवू अशी हिंदूंची भूमिका होती. नाव जरी स्टेट काँग्रेस असले, ध्येय जरी धर्मातीत लोकशाही असले तरी शेवटी ती होती हिंदूंची संघटना (भारतीय काँग्रेसप्रमाणे). ह्या चळवळीचे नेते पू. स्वामी रामानंद तीर्थ होते. निजामाविरोधी सरदार पटेल, कासीम रझवी विरोधी स्वामीजी असा हा प्राणांतिक संघर्ष होता. त्यात मवाळांना जागा नव्हती, तडजोडीची शक्यता नव्हती.
हैदराबादचा हा स्वातंत्र्यलढा ७ ऑगस्ट १९४७ ला सुरू झाला. हा दिवस कुरुंद्यात अगदी शांतपणे गेला. कुरुंदा हे एक मोठयापैकी खेडे होते. पाच-सहा मारवाडी व्यापारी, २५-३० ब्राह्मणांची घरे, सर्व मिळून पाच हजार लोकसंख्या हे या मौज्याचे स्वरूप होते. मुसलमानांची लोकसंख्या खूपच मोठी म्हणजे हजारभर होती. सर्व अस्पृश्यांची मिळून लोकसंख्या सातशेच्या आसपास होती. उरलेली तीन-साडेतीन हजार लोकसंख्या मराठे, धनगर आणि लिंगायत, तेली, सुतार, लोहार अशी होती. सारे मराठे ह्या गावात ‘महानुभाव' ह्या आत्यंतिक अहिंसावादी पंथाचे होते. पण ते मनाने लढण्यास तयार होते. कुरुंदा हे काँग्रेसचेही बळकट केंद्र होते. रजाकारांचेही बलवान केंद्र होते. तरीही सात ऑगस्ट मोठ्या शांततेत गेला. कारण खेडेगावी कुणी सत्याग्रह करायचा नाही असा निर्णय घेण्यात आला होता. सत्याग्रही अहिंसक असतो. त्याने जाहीररीत्या कायदा तोडावा, शांतपणे अटक करून घ्यावी हे सारे तत्त्वज्ञान खेड्यात पाळले जाणे कठीण होते. रजाकारांना कायदेशीर वागणे मान्यच नव्हते. त्यांच्या गुंडगिरीकडे पोलिस दुर्लक्ष करीत.
म्हणून असे ठरले की, सत्याग्रहींची नावे गुप्तपणे ठरवावी. दर आठवड्यास एक तुकडी याप्रमाणे त्यांनी गुप्तपणे जिल्ह्याचे ठिकाणी परभणी येथे जावे, तेथे सत्याग्रह करावा. परभणीलाच तुरुंग होता. सत्याग्रहींना अटक केली की कोर्टापुढे नेत. त्यांना शिक्षा होई. तिथून तुरुंगात नेत. अशा प्रकारे सुमारे शंभर सत्याग्रही गावातून परभणीस गेले. त्यांनी शांतपणे सत्याग्रह केला. शहराच्या ठिकाणी कायदेशीरपणाचा निदान देखावा असे. एक निर्णय असा होता की, जे भूमिगत सशस्त्र चळवळीत भाग घेऊ इच्छितात त्या साऱ्यांनी एके दिवशी गाव सोडावे. गावापासून डोंगर जवळ होता. रात्री आठ वाजता निघावे. डोंगरावर दहा साडेदहापर्यंत पोचावे व तिथेच मुक्काम करावा. डोंगरा-डोंगराने थेट निजामी हट्टीच्या बाहेर चार दोन दिवसात जाता येई. मार्गावर असलेल्या जवळच्या खेड्यांना बातमी असली म्हणजे ते स्वयंपाक करून ठेवीत. दिवस पावसाचे होते, म्हणून कार्यकर्त्यांना अन्नपाण्याचा फार अडचण नव्हती.
सामान्यत्वे शंभर माणसे असली की चार-दोन घरभेदे त्यात असतातच. पण मुसलमानांच्या उर्मटपणाने व अत्याचाराने लोकमत क्षुब्धच इतके झाले होते की हिंमतवान माणसे प्रतिकाराला उभी होती. इतर मध्यम लोक चोरून मदत करीत. भित्री मंडळी सतत अधिकाऱ्यांच्या खुशामती करीत, लाचारपणे त्यांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करीत. पण कुणी बातम्या शासनाला पुरवीत नसे. ग्रामीण भागात हा एकोपा फार मोठा होता. सतत खुशामत करीत जगणाऱ्यांनाही भूमिगत कार्यकर्ते भेटत. ही भित्री माणसे कार्यकर्त्यांना कळवळून उपदेश करीत, पण शासनाला कळवीत नसत की अमका अमुक ठिकाणी लपलेला आहे. स्वतंत्र हैदराबादला जाहीर रीतीने पाठिंबा देणारा अस्पृश्य वर्गही या वागणुकीला अपवाद नव्हता. ते मदत करीत नसत, पण हेरगिरी अगर चुगली करीत नसत. त्याचा परिणाम असा होई की, गावातील तीन हजार माणसांना जे पूर्णपणे माहीत असे त्याची कोणतीही वार्ता मुसलमानांना नसे. जे त्यांच्याकडे चाले ते आम्हाला कळत नसे. जणू एका गावात दोन गावे वसत होती.
एक निर्णय असाही ठरला होता की, ज्याला जेवढे झेपेल तेवढे त्याने करावे. झेपणार नाही तिथे चक्क पाय धरून माफी मागून मोकळे व्हावे. जो हे करील त्याला कुणी निंदायचे नाही, त्याचा तिरस्कार करायचा नाही. मात्र त्याने कार्यकर्त्यांना दगा द्यायचा नाही. दगाबाजांना क्षमा नाही. सर्वत्र वातावरण असेच होते. कुरुंद्यात तर अगदी पक्के वातावरण असे होते. माझे एक चुलते पूर्णपणे ह्या मताचे होते की निजामाचे राज्य बुडणे शक्य नाही, कारण एका मुसलमान साधूचा त्याला तसा आशीर्वाद आहे. म्हणून ही सगळी चळवळ मूर्खपणाची असून तिचे अपयश नक्की आहे. ह्या गाढवपणाशी कोणताही संबंध ठेवण्याची त्यांची इच्छा नव्हती. बहुतेक भूमिगत कार्यकर्ते निर्धास्तपणे त्यांच्या शेतावर जात, रात्री मुक्काम करीत. गावातून जेवण येई. जेवून मग विश्रांती घेऊन इतरत्र जात. ह्या माणसाविषयी कुणालाही कधी दुरावा वाटला नाही. गावचे एक प्रमुख कार्यकर्ते पाटील होते. त्यांनी कायदेभंग केला. पण पोलिसांनी त्यांना कोर्टासमोर उभे करण्याऐवजी त्यांना चौकशीनिमित्त ठेवून घेतले व छळाला आरंभ झाला. पाटील छळापुढे टिकले नाहीत. त्यांनी सरळ माफी मागितली. कोर्टाकडे दयेचा अर्ज केला. न्यायालयाने त्यांची माफी मान्य केली. दीड हजार रुपये दंड केला. पोलिसांनी त्यांच्याकडून हजार दोन हजार रुपये उकळले. पाटील सुटून गावी आले. त्यानंतर दहा महिने त्यांचे रोजचे उठणे, बसणे, जेवणे मुस्लिम अधिकाऱ्यांत असे. ह्या अधिकाऱ्याना प्रसन्न ठेवण्यासाठी महिना दोन-तीनशे रुपये पाटील खर्चीत. पण भूमिगत कार्यकर्ते त्यांच्या मळ्यात जमत, जेवत, विश्रांती घेत. त्यांच्या मळ्यातील घरात हत्यारे लपवीत. पुष्कळदा तिथे आक्षेपार्ह पत्रके सायक्लोस्टाइल होत. पाटलांना हे सर्व माहीत होते, पण त्यांनी कधी दगा दिला नाही. त्यांनी माफी मागितल्याबद्दल कुणी त्यांना दोष दिला नाही.
ही भूमिका त्या चळवळीला भागच होती. सारेच जण हौतात्म्य पत्करू शकत नाहीत. मात्र सचोटीचे पथ्य पाळले जावे. कुरुंद्यात कुणी दगाबाज निघाला नाही. पण शेजारच्या एका खेड्यात निघाला. हा माणूस पोलिसांना बातम्या देतो ही माहिती कार्यकर्त्यांना वरील माफीमागू पाटलांनीच दिली. कार्यकर्त्यांनी त्यांचे घर जाळले. नाक कापून टाकले. गावाने त्याला वाळीत टाकले. हैदराबाद लढ्यातील हा समजूतदारपणा आता मला विलक्षण वाटतो. त्याकाळी मीही कार्यकर्ता होतो. तेव्हा मला हे सारे स्वाभाविक वाटे. आम्ही म्हणतच असू, की जमेल त्याने गोळी खावी, न जमणाऱ्याने पाणी पाजावे. तेही न जमले तर शांतपणे घरच्या घरी डोळे पुसावे. पण शत्रूचा खबऱ्या होऊ नये.
निजामाच्या राज्यात दारूचे उत्पन्न फार मोठे होते. म्हणून शिंदीची झाडे सुरक्षित होती. ती तोडणे गुन्हा होता. ह्या झाडांच्यापासून शिंदी काढणारे काहीजण असत. काहींचे व्यापारी गुत्ते होते. शिंदीच्या झाडात हिंदूंच्यापैकी अनेकांचे हितसंबंध होते. ही झाडे तोडणारे कोण हे सर्वांनाच माहीत असते. बहुतेक वेळी ज्याच्या शेतात झाड असे तो कंदील घेऊन उभाही असे. तोच दुसरे दिवशी ठाण्यावर जाऊन गुन्हा नोंदवी. पंचनामा होई. त्यावर शेजारचे शेतकरी साक्षीदार म्हणून सहीचे अंगठे करीत. पण आम्ही तोडताना कुणाला पाहिले नाही ह्यावर एकमत असे. शिंदीचे मडके अडकवणे, शिंदी काढणे ही कामे बहुतेक गावातील अस्पृश्य करीत. असे मडके अडकवलेले झाड भल्या पहाटे मडके काढून घेतल्यावर तोडीत; पण तो अस्पृश्य कधी कुणाचे नाव सांगीत नसे. उलट, ठाण्यावर जाऊन आपण सरकारचे एकनिष्ठ असल्यामुळे आपले काँग्रेसवाल्यांनी मुद्दाम नुकसान केले असे तो रडत, ओरडत सांगी. कुरुंद्याच्या आसपास मोठे शिंदीवन होते. अशी हजारो झाडे सप्टेंबर, ऑक्टोबर १९४७ ला तोडली गेली.
ऑक्टोबरपर्यंत सत्याग्रह संपलेला होता. भूमिगत कार्यकर्ते गाव सोडून गेले होते. सरहद्दीच्यावर कार्यकर्ते ठाण मांडून होते. मधून मधून ते येत. एखाद्या पोलिस ठाण्यावर हल्ला करून ते ठाणे जाळीत. मधून मधून विजेच्या तारा तोडणे, पाटील पांड्यांची दप्तरे जाळणे असेही प्रयत्न होत. जनतेचा छळ करणारे अत्याचारी मुसलमान प्रमुख ह्यांच्या घरावर मधून मधून हल्ले होत. तालुकाभर अशा कार्यकर्त्यांचेही एक वर्तुळ होते. जे कार्यकर्ते असतील असे शासनाला वाटत नसे अशी ही मंडळी तालुकाभर हिंडत, गुप्त सभा घेत, काय घडत आहे याची माहिती देत, पत्रके वाटीत. सशस्त्र कार्यकर्त्यांना हवी असणारी माहिती गोळा करीत. त्यांच्या कार्यक्रमाची निश्चिती करीत. हे काम करणाऱ्या मंडळींत मी एक होतो.
पंधरा वर्षांचे वय व किरकोळ शरीर असल्यामुळे मी पोरगासोरगाच वाटत होतो. मळके धोतर अगर हाफ पॅन्ट, एक मळके कुडते, डोक्यावरील सर्व केस तासून केलेला गुळगुळीत गोटा व थोडी शेंडी. जवळ एखादे गाठोडे असे. मी तालुकाभर हिंडत होतो. पत्रके तर वाटीत होतोच, पण दारूगोळाही गरजेनुसार इकडून तिकडे पोचवीत होतो. तालुक्यात काही अगदी छोटी गावे असत. दहा-पंधरा घरे. सगळी मिळून लोकसंख्या साठ सत्तर, अशा गावात मुसलमानांचे घरच नसे. ह्या अशा गावांच्यापैकी काही गावे म्हणजे आमचे किल्लेच होते. ह्या गावांवर जवळपास आमचे राज्यच असे. रजाकारांनाही ह्याची जाणीव असे कारण ह्या गावांच्या जवळपास एकटा दुकटा रजाकार गेला तर तो जिवंतही परत येत नसे. पुष्कळदा त्याचे प्रेतही मिळत नसे. ह्या गावांना दारू, गोळ्या पुरवाव्या लागत. माहिती द्यावी-घ्यावी लागे. मी नेहमी राजरस्त्याने चाले. मधून मधून एखादा मुसलमान त्रास देई. अपमान करी. एखाद्या वेळी मुद्दाम कुणी धक्का देई. हे सोडले तर माझे हिंडणे कुणी मनावर घेत नसे. दर पंधरा-वीस दिवसाला होणारी माझी चक्कर हा गावकऱ्यांना दिलासा होता. मी चार-सहा जणांशीच बोले, पण ते गावभर पसरे.
गावात पोलिस ठाणे होते. ह्या ठाण्यावर एक सबइन्स्पेक्टर व कधी सहा, कधी आठ पोलिस असत. भोवतालच्या लहानमोठ्या तीसचाळीस गावांत त्यांचा दरारा असे. ह्या पोलिसांना खरा आधार गावात असणाऱ्या मुसलमानांचा होता. हजाराच्या मुस्लिम लोकसंख्येत सशस्त्र रझाकारच दोनशेच्या आसपास होते. गावचा पोलिस सबइन्स्पेक्टर हुशार, शूर व कडवा जात्यंध होता. त्याचे नाव अब्दुल अजीज. त्याच्या चाणाक्षपणाचा धाक असे. तो इंग्रजी वृत्तपत्र मागवी. उर्दू वर्तमानपत्र येत. त्यांच्याजवळ एक रेडिओ होता. वर उल्लेखिलेल्या पाटलांच्याजवळ एक रेडिओ होता. गावात बाहेरची वर्तमानपत्रे येतच नसत. कारण त्यांच्यावर बंदी होती. उर्दू वर्तमानपत्रे वाचण्याची लोकांची इच्छा नव्हती. गावात एक शाळा चौथीपर्यंत होती. तिथे बहुतेक शिक्षक मुसलमानच होते. गाव रेल्वेपासून दूर होते, मोटार तर नव्हतीच. जवळचे रेल्वे स्टेशन पाच मैलांवर होते. तिथे एक गाडी येई, एक जाई. ह्या गावकऱ्यांना सगळ्या बातम्या कळण्यासाठी माझा मोठा आधार वाटे. आम्ही खरे खोटे अशा बेताने सांगत असू की लोकांचा उत्साह भंग होऊ नये.
एकाएकी जून १९४८ ला ही व्यवस्था कोसळून पडली. जवळ असणारे वापटी हे गाव आमचे ठाणे होते. ह्या छोट्या गावाने रजाकारांचे अनेक हल्ले परतविले होते. पोलिसांनाही परतण्यास त्यांनी भाग पाडले होते. हे गाव ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात अनेकजण जखमी, काहीजण ठार झाले होते. पण जून महिन्यात असा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतला की हे गाव रिकामे करून सर्वांनी बायकामुलांसह सरहद्दीबाहेर यावे. असेच एक दुसरे छोटे गाव वाडी होते. तेही रिकामे करण्यात आले. कुरुंद्यापासून फक्त तीन मैलांवर असणाऱ्या ह्या गावावर तीन वेळा हल्ले झाले. रझाकारांपैकी सहा जण ठार, अनेक जण जखमी झाले. पण हे लोकसंख्या ४७ असणारे गाव लढत होते. ही गावे रिकामी करण्याचा निर्णय विशिष्ट कारणामुळे घेण्यात आला होता. हैदराबादच्या सरहद्दीवर क्रमाने भारतीय फौजा जमा होत होत्या. हा वेढा क्रमाने आवळला गेल्यानंतर संस्थानात अत्याचारांना ऊत येणार हे नक्की होते. ह्या छोट्या गावांना ह्यापुढे मदत पोचविणे कठीण होते. त्यांना वाऱ्यावर सोडण्यापेक्षा गावे रिकामी करणे योग्य होते.
पावसाळ्याच्या तोंडावर शेते, घरे सोडून, जनावरे जंगलात सोडून बायकामुलांसह अनिश्चित काळापर्यंत निर्वासित होणे ही दुःखाची बाब ह्या गावांनी मोठ्या धैर्याने पार पाडली. दिवसेंदिवस सरहद्दीवरील रझाकारांचा धुमाकूळ वाढत होता. सरहद्दीच्या आत दोन तीन मैल शिरून रझाकार लुटालूट करीत. आम्ही कितीही प्रयत्न केला तरी निजामी राजवट उलथून टाकणं आमच्या आटोक्यात नव्हतेच ते काम भारतीय फौजांनाच करणे भाग होते. भारत सरकारने सैनिकी हस्तक्षेप करीपर्यंत जनतेचे मनोधैर्य व लढा टिकविण्याचे काम स्टेट काँग्रेस करीत होता. सरहद्दीवर सेना जमू लागताच आमच्या कार्याचा एक भाग पूर्ण झालेला होता. सरहद्दीवरील निजामी ठाण्यावर हल्ले करणे आणि हल्लेखोर रझाकारांना पिटाळून लावणे हे नवे काम स्वीकारल्यावरोवर आतील ठाणी सोडून देणे भाग होते. त्याप्रमाणे गावे सोडून दिली.
त्याचवेळी आमचा एक कार्यकर्ता सुदाम पकडला गेला. त्याला पकडून कुरुंद्याला आणण्यात आले व कुरुंदा ठाण्यात त्याचा छळ सुरू झाला. ह्या छळाच्या वेळी गावचे पाटील पुष्कळदा उपस्थित असत. आणि निष्कारण छळ सहन करण्यापेक्षा नावे सांग व जीव वाचव म्हणून उपदेश करीत. त्या छळाच्या काळात सुदाम कधी हे म्हणाला नाही, की पाटील तुमच्या मळ्यात आमचे केंद्र आहे व तुम्हीच आम्हाला जेवण पुरवता. त्याने त्याच पाटलाकरवी आम्हाला पळण्याचे निरोप केले व सर्व व्यवस्था लागल्यानंतर, आम्ही फरार झाल्यानंतर आमची नावे सांगितली. त्यामुळे माहिती मिळणारी सगळी यंत्रणाच कोसळली. मी हैदराबादला फरार झालो. तिथेच पोलिस अॅक्शनपर्यंत किरकोळ कामे करीत होतो. निघण्यापूर्वी गावकरी मंडळीना मी हे तपशिलाने समजावून सांगितले की, आता निजाम व रजाकारांचा घडा भरला आहे. सरहद्दीवर भारतीय फौजा जमू लागल्या आहेत. ह्यानंतर क्रमाने वेढा पक्का होत जाईल आणि नंतर भारतीय फौजा हैदराबादेत शिरतील आणि ह्या अत्याचारांचा शेवट होईल. आता तुम्ही फक्त वाट पाहा. काही करू नका. शासनाच्या आज्ञा निमूटपणे पाळा, धीर सोडू नका.
जुलैपासून मौजे कुरुंदा जगापासून जवळपास तुटल्यातच जमा होते. पावसाळा असल्यामुळे गावकऱ्यांचे बाहेर जाणे येणे मंदावलेलेच होते. गावातून बाहेर पडण्याचे तीन मार्ग होते. त्यावर एक पोलिस व दहा पंधरा रझाकार ह्यांचे टाणे असे. गावात येणारा व गावातून जाणारा ह्यांची ते कसून तपासणी करीत. त्यामुळे होता होईतो लोक बाहेर गावी जाण्याचे टाळीत. चिखलाचे प्रमाण जास्त असल्यामुळे पावसाळा संपेपर्यंत गाड्या चालणे शक्यच नव्हते. गावात संस्थानाबाहेरचे मराठी वर्तमानपत्र येतच नसे. आमची यंत्रणा संपल्यामुळे स्टेट काँग्रेसची बातमीपत्रे येईनात. कार्यकर्ते सरहद्दीवर अडकले होते तेही इतक्या आत येत नव्हते. अमीनसाहेबांनी (सब इन्स्पेक्टर पोलिस) सर्व टपाल तपासून मगच देण्यास आरंभ केला. ह्या बेकायदेशीर सेन्सॉरमुळे राजकीय बातमी कळणेच कठीण झाले. कुणालाही कशाची जाणीव नाही. त्यामुळे साऱ्या हालचाली थंड झाल्या असे वातावरण निर्माण होई. हे वातावरण निराश करणारे होते.
जुलैनंतर क्रमाने जनतेत निराशा वाढत गेली. बाहेर काय घडत आहे ह्याबाबत अमीनसाहेब प्रमुख गावकऱ्यांना सायंकाळी बोलावून घेऊन माहिती सांगत. गावात रेडिओ दोनच होते. सर्वांना बातम्या कळणे सोयीचे व्हावे म्हणून पाटलांचा रेडिओ पोलिस ठाण्यात आणून ठेवला होता. त्यामुळे हैदराबाद रेडिओ सांगेल तेच ऐकायचे. एरवी तरी दुसरे काय ऐकता येणार होते! कारण रेडिओवरील स्टेशने माहीत कुणाला होती? अमीन मात्र शहाणा माणूस होता. परिस्थितीची थोडीफार कल्पना त्याला होती. पण तो सत्य न सांगता हैदराबादचा प्रचारच समजावून सांगे. त्याने भारताचा नकाशा गावकऱ्यांसमोर टांगून ठेवला आणि दोन बाजूने पाकिस्तान व खालून हैदराबाद ह्यामुळे हिंदुस्थानच कसा घेरला गेला आहे हा मुद्दा गावकऱ्यांच्या मनावर ठसविण्याचा त्याने प्रयत्न केला. गावकऱ्यांना हे म्हणणे मुळीच आवडत नव्हते, पटत नव्हते. पण शेवटी त्याला उत्तर काय ? हिंदुस्थानच घेरला गेलेला आहे हे सत्य टाळणार कसे ? त्यातल्या त्यात शहाणा असा एक हिंदू शिक्षक गावात होता. त्याने एक दोन नकाशे काळजीपूर्वक तपासले. काँग्रेसच्या एका पत्रकात भारताचा नकाशा व त्यात हैदराबाद होते. मोठ्या दुःखाने गुरुजींनी लोकांना सांगितले, "बाबांनो, गोष्ट खरी आहे. आपणाला मुसलमानांनी घेरलेले आहे. गावाच्या वाटांवर चौक्या बसवून गाव घेरले तसे भारत घेरलेले आहे." लोक जास्त हताश होऊ लागले.
अमीन अब्दुल अजीज निरनिराळ्या बाबी सांगत असे. तो म्हणे मुंबई आणि मद्रासला जाणाऱ्या सर्व रेल्वे हैदराबादमधून जातात. त्या बंद केल्या की मद्रास दिल्ली पासून तुटले. मनमाडपर्यंत निजामी रेल्वे होतीच. मनमाड जिंकले की दिल्ली आणि मुंबईची ताटातूट. नकाशात ठिकाणे अधिकच जवळजवळ दिसत. मग तर फारच वाईट वाटे. एक आंतरराष्ट्रीय चोर सिडने कॉटन सतत चोरून शस्त्रे आणून हैदराबादला पुरवितो हे गावकऱ्यांना माहीत होते. ही चोरटी शस्त्रे विमानातून येत. हे विमान अडवणे अगर पाडणे भारताला शक्य नसल्यामुळे हैदराबादजवळ हत्यारे कशी गोळा होत आहेत ह्याबाबत भडक वर्णने गावकऱ्यांना अमीनने सांगितली होती. हैदराबाद संस्थानात एकूण वीस लक्ष मुसलमान (खरा आकडा सोळा लक्ष) त्यात दहा लक्ष स्त्रिया. अगदी म्हातारे व मुले सोडली तर पाच लक्षाची मुसलमान फौज हैदराबादेत तयार होऊ शकते. शस्त्रे सिडने कॉटनची. शिवाय आदिवासी, अस्पृश्य ह्यांच्या फौजा आणि ज्या हिंदूना जगण्याची इच्छा आहे त्यांच्या फौजा, अशा संभाव्य फौजांची संख्या सहजच दहा लक्ष होणार. शिवाय निजामाची सून निलोफर बेगम इराणची म्हणून मदतीला येणाऱ्या इराणी, अफगाणी फौजा, पाकिस्तानच्या फौजा आणि भारतातील कोट्यवधी मुसलमान. मग भारताचे काय होणार? गावकऱ्यांना चिंतेचा हाही एक विषय होता.
एक कार्यकर्ता गावात ठाण्यात अडकलेला होता. त्याचा छळ, अपमान रोज डोळ्यांसमोर होई. मधेच बहिर्जी हा जवळच्या गावचा कार्यकर्ता हुतात्मा झाल्याची बातमी आली, कोण जिवंत आहेत, कोण ठार झाले हे नक्की कळत नव्हते. त्याचीही चिंता होतीच.
पण हिंदूंच्यासह मुसलमानही घाबरलेले होतेच. कारण त्यांनाही काही गोष्टी समजत नव्हत्या. पैकी एक न समजणारी गोष्ट काश्मीर होती. तिथली प्रजा मुसलमान. पाकिस्तान तिथे लढत आहे. त्याचा पराभव का व्हावा? पाहता पाहता जुनागढ भारतीय फौजांनी जिंकले, पचविले. त्याबाबत पाकिस्तान काही का करू शकले नाही? हैदराबादला जैसे थे करारावर सह्या का कराव्या लागल्या? हिंदूंच्यामध्ये ज्याप्रमाणे मुसलमानांनी केलेल्या हिंदूंच्या कत्तलीच्या कहाण्या लोकप्रिय होत्या व घबराट निर्माण करीत होत्या, तशाच मुसलमानांच्यामध्ये हिंदूंनी केलेल्या कत्तलींच्या कहाण्या प्रचलित होत्या. मुस्लिम निर्वासितांचे लोंढे हैदराबादेत येत होते. हिंदू बहुसंख्य आहेत. त्यांनी आपल्या कत्तली केल्या तर कसे? या साऱ्या प्रश्नांनी मनातून मुसलमानही हादरलेला, भेदरलेला असे. पण भीती झाकण्यासाठी तो शौर्याचा अभिनय करी. मुसलमानही एकटा दुकटा रात्री हिंडत नसे. ह्या वातावरणात जुलै-ऑगस्ट संपला.
सप्टेंबर उजाडला आणि अमीन साहेबांनी शांतपणे पाटलांच्या चौकीवरील रेडिओ आपल्या घरी नेऊन ठेवला. अमीनने योजना चाणाक्षपणे केलेली होती. पण गावकऱ्यांना ह्याचे फारसे महत्त्व नव्हते. नाहीतरी रेडिओ हैदराबाद ऐकण्याची लोकांना इच्छा नव्हती. भारतीय नेत्यांना ही नभोवाणी शिव्या देई. त्या ऐकवत नव्हत्या, आवडत नव्हत्या. ह्या बातम्यांच्यावर त्यांचा विश्वास नव्हता. परिणामी तेरा सप्टेंबरला पोलिस अॅक्शन सुरू झाले याची माहिती कुणालाच नव्हती. सकाळी पूर्णेहून निघणारी गाडी नेहमीप्रमाणे निघाली ती अंबा स्टेशनवर सकाळी ७.३० ला आली. हे स्टेशन कुरुंद्याहून पाच मैल दूर होते. ही गाडी पुढे निघून गेली आणि नंतर गाड्या सोडू नका अशी आज्ञा पूर्णेला येऊन पोचली ही गाडी सकाळी अकराला हिंगोलीला पोचली. व तिथेच थांबली. दुपारी भारतीय फौजा हिंगोलीला आल्या. त्यांनी ही रेल्वे अडकवून ठेवली. युद्ध सुरू झाल्याची बातमी फक्त अमीनाला होती. त्याचा विश्वास रेडिओ हैदराबादवर होता. हैदराबाद नभोवाणीने युद्धाच्या बातम्या देताना दुपारी घोषित केले की सर्वत्र हैदराबादच्या फौजा निकराने लढत असून कुठे भारतीय फौज मैल दोन मैल आत आहेत, कुठे हैदराबादच्या फौजा मैल दोन मैल भारतीय हद्दीत आहेत. ही बातमी खरी असावी अशी अमीनची मनोमन इच्छा असली तरी खात्री नव्हती. त्याने दुपारच्या गाडीची बातमी आणण्यासाठी एक माणूस अंबा स्टेशनवर पाठविला होता. तो संध्याकाळी परत आला, त्याने गाडी अजून आली नाही ही वार्ता आणली. गावकऱ्यांना वाटले की गाडी कुठे तरी कार्यकर्त्यांनी उडविली, पाडली असावी. ह्या घटनेचा अर्थ अब्दुल अजीज, फक्त एकच माणूस त्या खेड्यात समजू शकत होता.
तेरा सप्टेंबरचा सगळा दिवस असा गेला. चौदा सप्टेंबरला संध्याकाळी अमीनने औरंगाबाद स्टेशन लावले. औरंगाबादवरून भारतीय अधिकारी औरंगाबाद भारतीय सेनेच्या ताब्यात असल्याचे सांगत होते. अंबा स्टेशनवर आजही गाडी नव्हती. चौदाला सायंकाळी अमीनसाहेबांना नक्की खात्री पटली की, भारतीय फौजांचा विजय होत असून सर्वत्र हैदराबादची पिछेहाट होत आहे. हैदराबाद रेडिओ मात्र अजूनही सर्वत्र आपला विजय होत आहे, वाशीम, मनमाड, सोलापूरच्या दिशेने फौजा पुढे सरकत आहेत हे ओरडून सांगत होता. पंधरा सप्टेंबरला सर्व गावांतून पीठ गोळा करण्यात आले. गिरणी सतत चालली. ज्वारी व हरभरा दळणे चालूच होते. हिंदू व मुसलमान यांच्या घरीही सतत जाती चालू होती. काही तरी बिघडले आहे हे सर्वांना कळले, पण काय बिघडले आहे ह्याची कल्पना कुणाला येत नव्हती. सतरा सप्टेंबरला हैदराबादच्या जवळ निजामी फौजा शरणागती देत होत्या. कुरुंद्यात सर्व मुसलमान सैपाक करीत होते. त्यांनी रात्री भाकऱ्या व चटण्या बांधल्या व रात्रीच गाव सोडले. ही मंडळी डोंगराकडे गेली. त्यांनी अठराचा सर्व दिवस व रात्र चिंतेत डोंगरावर काढली.
१८ सप्टेंबरला गावात सर्वत्र सामसूम. गावात एकही मुसलमान स्त्रीपुरुष नव्हता. अमीनसाहेबही नव्हते. आणि साऱ्या गावाला अचानक मरणभय निर्माण झाले. मुसलमान निघून गेले. आता गाव घेरले जाणार, सर्व हिंदूंची कत्तल होणार ही सर्वांची खात्री पटली. पाटलांनी सर्वांना लढण्यास तयार राहण्यास सांगितले. सापडतील ती हत्यारे घेऊन लोक जीव मुठीत धरून मारण्यास, मरण्यास सिद्ध झाले. सारे हैदराबाद तुफान आनंदाने नाचत होते तेव्हा कुरुंदा मरणाच्या भयाने थरथरत होते. १९ ला सकाळी मुसलमान गावात आले. मिळेल त्याला मिठ्या मारून हिंदु-मुस्लिम भाई-भाई म्हणून सांगू लागले. पाय धरून जीव वाचविण्यासाठी विनवू लागले. क्षणभर काय झाले हे कुणाला समजेचना. दुपारी भारतीय फौजा तिरंगी ध्वजासह त्या खेड्यात आल्या आणि लोकांच्या आनंदाला अनावर उधाण आले. आजवर भोगलेल्या अत्याचारांची प्रतिक्रिया सुरू झाली. गावातील लोक मोठेपण, प्रतिष्ठा आणि वय विसरून रस्त्यावर निजामाच्या नावे बोंब मारू लागले व होळीप्रमाणे रस्त्यावर नाचू लागले.
***
(प्रकाशन : ‘सुगंध' दिवाळी अंक १९७२)