हैदराबाद विमोचन आणि विसर्जन/तिसरे व्याख्यान
व्याख्यान तिसरे : हैदराबाद शहरी जे जनतेचे आंदोलन होते त्याच्या वाजू दोन. एक बाजू म्हणजे हैदराबाद संस्थानात असणारी इत्तेहादुल मुसलमीन ही संस्था. या संघटनेचे नेते कासीम रझवी आणि त्यांची भूमिका, आणि या संघटनेकडे असणारे रझाकार या सशस्त्र स्वयंसेवकांचे दल ही एक बाजू झाली. ही बाजू पूर्ण करण्यासाठी आणखी काही बाबी हव्यात. हैदराबाद संस्थानची जी शहाजोग फौज होती तिची संख्या बारा हजार. रझाकारांची जी छुपी फौज होती तीत हे बारा हजार मिसळले की निजामाचे एकूण सैन्य साठ हजारांच्या दरम्यान येते. यातील बारा हजार शास्त्रोक्त शिक्षण झालेले. उरलेले हडेलहप्पी सैनिक. यात पुन्हा संस्थानचे पोलिसदल समाविष्ट नाही. पोलिसाकडे फार मोठी शस्त्रे होती अशातला प्रकार नसला तरी ते हत्यारबंद होतेच. हे हत्यारबंद पोलिस चौदा हजार होते. ही लढ्याच्या आरंभीची व्यवस्था. लढा सुरू झाला तशी रझाकारांची संख्या भराभर वाढत गेली. अठेचाळीसच्या सप्टेंबरपर्यंत ही वाढतच होती. शेवटच्या काळात ती दीड लक्षापर्यंत वाढली होती. यांच्याजवळ तरवारी, कट्यारी, जंबिये, भाले, सुरे, भरावाच्या बंदुका आणि पिस्तुले अशी हत्यारे होती. तरीही यांच्याजवळ मशिनगन, स्टेनगन, ब्रेनगन अशी हत्यारे नव्हती हेही ध्यानात असावे. पण जी हत्यारे होती ती सर्व संस्थानभर अत्याचार करणे आणि भीतीचे वातावरण तयार करणे या कामाला पुरून उरणार होती. अत्याचार करण्यासाठी अशिक्षित सैन्याची आवश्यकता नसते. फक्त अत्याचारांना प्रेरित करणारा नेता हवा असतो. तसा कासिम रझवी होता. याच्या बाजूला सर्व सैन्याचे नेतृत्व ज्यांच्याकडे होते ते एल.इद्रुस हे सरसेनापती होते. त्याच्याच बाजूला इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस दिनयारजंग होते. ही अशी निजामाची संरक्षणयंत्रणा होती. या संरक्षणफळीच्या द्वारे आंदोलन सुरू होण्याच्या आधीपासून जनतेवर अत्याचार चालू होते आणि आंदोलन सुरू झाल्यावर ते वाढत गेले. म्हणून जून सत्तेचाळीसपेक्षा लढा सुरू झाल्यावर ऑगस्ट/सप्टेंबर सत्तेचाळीसमध्ये अत्याचारांचे प्रमाण एकदम फारच वाढले. असे वाढत वाढत अठेचाळीसच्या एप्रिलमध्ये अत्याचारांचा कळस झाल्यावर त्या वेळच्या भारत सरकारने एक श्वेतपत्रिका प्रकाशित केली. यापेक्षा जास्त अत्याचार होणेच शक्य नाही. हैदराबादमध्ये फक्त गुंडांचे आणि अत्याचारांचे राज्यच चालू आहे अशा जाणिवेने हिचे प्रकाशन झालेले आहे. कासिम रझवीच्या रझाकार दलावर कोणतेही कायदेशीर बंधन नव्हते. त्याने केलेल्या अत्याचाराबाबत जनतेची बाजू पाहिली तर निरनिराळ्या जिल्ह्यांत निरनिराळ्या गावी घडलेल्या अत्याचारांची यादी वाचायला तीन दिवसही पुरणार नाहीत. तेव्हा श्वेतपत्रिकेत ज्या अत्याचारांच्या बाबी नोंदलेल्या आहेत, ज्यांची खातरजमा भारत सरकारने स्वतः करून घेतलेली आहे, त्यांच्यापैकीच मी एक-दोन सांगतो. आपल्या परभणी जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यात गुडा नावाचे गाव आहे. एके दिवशी शेकडो रझाकार त्या गावावर चाल करून गेले. त्यांनी सगळे गाव घेरले. त्या गावामध्ये जेवढी माणसे सापडली तेवढी सगळी त्यांनी एका विहिरीत टाकली. नंतर त्यांच्यावर कडबा टाकला आणि तो पेटवून दिला. कडबा पेटला आणि त्याखाली पडलेली सगळी माणसेही मेली. नंतर रझाकारांनी सर्व गाव जाळून टाकले. गावातील चारपाच लोक त्या दिवशी बाहेरगावी गेले होते तेवढे वाचले. बाकी सर्व गाव संपले.
श्वेतपत्रिकेत नोंदलेली दुसरी घटना बिदंर जिल्ह्यातली आहे. या जिल्ह्यातील एक
- ही श्वेतपत्रिका तयार करण्यात हैदराबादेतील Pleaders' Protest Committees सभासद कारणीभूत होते. किंबहुना सरदारांनी जशी सशस्त्र चळवळ सांभाळली तशीच सनदशीर चळवळ देखील सांभाळली.
- संपादक
लोकविलक्षण गोष्ट अहे ती याच्या पुढेच घडली. पुंडलीक पाटलांना लोकांनी घरी नेले व पानसरे वारले हे सांगितले तेव्हा पाटलांच्या आईने त्यांचे तोंड पाहायला नकार दिला. तिने निरोप पाठविला, “पानसरे मेला व तू जिवंत परतलास. मला तुझे तोंड पाहायचे नाही. तूही प्राण का दिले नाहीस?" पुंडलीकराव अनेक महिने हॉस्पिटलमध्ये होते. आईची समजूत पटवून तिला भेटीला नेण्यासाठी पुरते तीन महिने लागले. एवढी या बाईची पानसरेवर निष्ठा होती. असो. पुढे पुंडलिकरावांनी निवडणूक लढविली तीत ते हरले. आणि नंतर एका मोटर अपघातात ते मृत्यू पावले. याच अपघातात जीवनराव बोधनकर जखमी झाले. ते वर्षभराच्या औषधोपचारानंतर मुष्किलीने वाचले. या गोविंदराव पानसऱ्यांंपासून आमच्या लढ्यातील हौतात्म्य चालू होते. अत्याचाराचे पर्व इथूनच चालू होते. किती माणसे गेली त्याची गणती नाही. याच मालेतील शेवटचा अत्याचार म्हणजे शोईबुल्लाखान यांचा बावीस ऑगस्ट अठेचाळीसला हैदराबादेत भर रस्त्यावर झालेला खून.
शोईबुल्लाखान हे मुसलमानांतील अपवाद होते. संस्थानी काँग्रेसबरोबर फारशी मुसलमान मंडळी कोणी नव्हती. पण हे शोईबुल्ला होते. दुसरा एक मोठा मुसलमान नेता म्हणजे सिराजुल हुसेन तिरमिजी. या तिरमिजींना ऐन आंदोलनाआधी शांतपणे मरण्याची संधी लाभली. हे स्वामीजी पेक्षा मोठे होते. त्यांच्या सहकाऱ्यांपैकी होते. जून सत्तेचाळीसला हे आजारी पडून वारले. ज्या जागी आंदोलनाचा ठराव पास झाला त्या जागेचे नाव तिरमिजीनगर असे ठेवलेले होते ते यांच्या स्मरणासाठी. हे तिरमिजी खिलाफतच्या चळवळीमधून गांधींच्याकडे आकृष्ट झाले होते. पुढच्या काळात सातत्याने काँग्रेसबरोबर राहिले होते. ते तेव्हा वारले नसते तर त्यांना शांतपणे मरण्याची संधी लाभली असती असे नाही. त्यांचा खून झाला असता. तिरमिजी यांच्याबरोबर एक पठाण गांधीजींचा भक्त झाला होता. ज्या शोईबुल्लाखानकडे आपण जात आहोतो . पठाणाचा मुलगा. तिरमिजींच्या भोवती असणारे शिया पठाण यांच्यापैकी एक शोईबुल्लाखान ऐन हैदराबाद शहरामध्ये कासिम रझवीच्या मताविरुद्ध एक साप्ताहिक काढीत असे. या साप्ताहिकात निजामाने मूर्खपणा सोडून भारता व्हावे या धोरणाचा पाठपुरावा आणि कासिम रझवीवर कठोर टीका हो कासिम रझवीने एकदा ताकीद दिली की, आमच्या विरुद्ध जी जीभ उच्चार करील ती आम्ही खतम करून टाकू. आमच्या विरुद्ध जे हात लेखणी उचलतील ते आम्ही कापून टाकू. त्याच्या दुसऱ्या दिवशी शोईबुल्लाखान यांनी अग्रलेख लिहिला. त्यात म्हटले की शोईबुल्लाखानाला मृत्यूची भीती दाखविणारा कासिम रझवी हा मूर्ख माणूस असला पाहिजे. शोईबुल्लाखान मृत्यूची तयारी ठेवूनच बसला आहे. त्याला मृत्यूची भीती असती तर तो भूमिगत झाला असता. तो सत्याग्रह करून तुरुंगात गेलेला नाही. भूमिगत झालेला नाही. उघड्यावर बसला आहे. सडकेवर हिंडतो आहे. तो जाणीवपूर्वक मृत्यूला तयार आहे. तेव्हा आपले शौर्य दाखविण्यासाठी रझवीने त्याला मृत्यूची भीती दाखवू नये. शौर्य दाखविण्याची इच्छा असेल तर रझवीने तो जे हैदराबादला बोलतो ते दिल्लीला येऊन बोलण्याची हिम्मत दाखवावी. या अग्रलेखाचा परिणाम असा झाला की कासिम रझवीने आपल्या पित्तूंना सांगितले, “याला ठार मारा". म्हणून रझाकारांनी शोईबुल्लाखानवर भर रस्त्यावर हल्ला करून त्यांचा खून केला. हे शोईबुल्ला आमचे शेवटचे हुतात्मे. पहिले पानसरे. पानसरे यांपासून शोईबुल्लापर्यंत हुतात्म्याची एक मोठी लांबरुंद परंपरा आहे. आपण मरायला तयार नाही असे सांगत असताना ज्यांना रझाकारांनी मारले त्यांनाही आपण शिष्टाचार म्हणून हुतात्मे म्हणतो. मी जी नावे सांगत आहे त्यांनी स्वेच्छेने मागून मृत्यू पत्करला आहे. जे इच्छा नसताना मारले गेले त्यांच्याविषयीही मला आदरच आहे. पण त्यांची नावनिशीवार यादी सांगता येणार नाही.
मुस्लिम लीग हिंदुस्थानच्या राजकारणात होती. जीना लीगचे नेते होते. ते पुरेसे जातीयवादी होते, कर्मठही होते. पण जीनांची जाहीर सभेतील व्याख्याने नेहमी कायद्याच्या चौकटीत बसणारी असत. त्यांच्या धमक्या शर्करावगुंठित छुप्या भाषेत असत. चौपाटीवर उभ्या असलेल्या बेजबाबदार दारुड्या मुसलमानाच्या भाषेत जीना कधी वोलले नाहीत. पण कासिम रझवी आयुष्यभर त्याच भाषेत बोलला. तो गांधींना उद्देशून म्हणाला, “जे बनिये आणि व्यापारी आहेत त्यांना सत्ता सांभाळता येणेच शक्य नाही. त्यांनी आपला कास्टा सांभाळला तरी पुरे." पुढे चालून त्याने असेही सागितले की : “तुम्ही हैदराबादकडे वाकडी नजर करण्याची ताकद दाखविणे बरोबर नाही. तशी नजर तुम्ही केली तर आम्ही संतापल्यावर इकडे घुसू की मद्रास जिंकू, तिकडे घुसू की मुंबईच जिंकू. यानंतर आमच्या फौजा चालत निघतील त्या दिल्लीपर्यंत येतील. दिल्लीच्या किल्ल्यावर आसफजाही झेंडा फडकावणे हे माझ्या जीवनाचे ध्येय आहे." त्याने असेही सांगितले की : “मूर्तिपूजा करणारे, जनावरांची पूजा करणारे, जनावरांचे शेण खाणारे जे हिंदू लोक आहेत त्यांची गणना आम्ही माणसांत करणार नाही. या माणसांची गणना जनावरात करणे आवश्यक आहे." रझवीने जाहीर सभेमध्ये हेही सांगितले होते की "तुम्ही हैदराबादमध्ये यायचा प्रयत्न केला तर आमचे वीस लक्ष मुसलमान (हा आकडा रझवीचा. मुसलमान वीस लक्ष नव्हते.) एक कोटी चाळीस लाख हिंदूंची कत्तल करतील. आणि त्यानंतर रक्ताचा शेवटचा थेंब संपेपर्यंत लढतील. यानंतर कधीकाळी हैदराबाद जिंकून आत आलात तर आतमध्ये प्रेतांच्या ढिगाऱ्याशिवाय काही दिसणार नाही." रझवीने कोणतीही गोष्ट लपवून ठेवलेली नाही. तो जीनाप्रमाणे बॅरिस्टर नव्हता, की चतुरभाषी नव्हता. तो बेजबाबदार बोलण्यासाठीच होता. खरे तर बडबडण्यापलीकडे कासिम रझवीच्या हातात काही नव्हते. मागच्या सगळ्या नाड्या मंत्रिमंडळात असणारे लायकअली (मुख्यमंत्री), त्यांच्या सहकाऱ्यांमधील रऊफ महमद यामीन झुबेरी आणि मोईन नबाब जंग यांच्या हातात होत्या. आणि याखेरीज झैनयार जंग, दीनयार जंग व शेवटी या सर्वांच्या नाड्या धरणारे स्वतः निजाम उस्मान अलीखा बहादुर यांच्या हातात. तेव्हा खरे सूत्रधार निजामच होते. कासिम रझवी हा फक्त बेजबाबदार व्याख्याने देण्यासाठीच होता.
रझवी किती मूर्ख होता याचे एक उत्तम उदाहरण मी सांगतो. रझवी एके दिवशी उठला आणि वल्लभभाई पटेलांच्या भेटीला गेला. रझवी आणि वल्लभभाई यांची ही जी भेट झाली तिची माहिती कन्हैयालाल मुनशी यांनी 'End of an Era' या पुस्तकात नोंदलेली आहे. पण मुन्शी यांनी ही जी माहिती नोंदलेली आहे त्यापेक्षा माझ्याकडे असलेली माहिती वेगळी आहे. मुन्शींनी काय नोंदविले होते ते त्यांच्या पुस्तकात वाचा. माझ्याकडे काय माहिती आहे ती मी आपल्याला सांगतो. ही माहिती कोणत्याही पुस्तकात नोंदविलेली नाही. कार्यकर्त्यांच्याद्वारे आलेली आहे. अधिक स्पष्ट बोलायलाही हरकत नाही. रामानंद तीर्थांना जी माहिती होती ती मी तुम्हाला सांगतो. ती माहिती अशी आहे : कासिम रझवी अचानकच विमानात बसले आणि दिल्लीला जाऊन पोहोचले. एका हॉटेलात जाऊन उतरले. त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात असणारे जोशी नावाचे गृहस्थ होते. हे ते जोशी ते जालन्याचे व्यापारी आणि गुजराथी होते. हे लायकअली मंत्रिमंडळात हिंदूंचे प्रतिनिधी होते. हे दोघे हॉटेलमध्ये उतरले आणि त्यांनी वल्लभभाईना फोन केला. जोशी फोनवर म्हणाले की रझवीचे असे मत आहे की एकदा तुम्हाला ठणठणीतपणे सांगितले पाहिजे की तुम्ही हैदराबादला यायचा प्रयत्न कराल तर फुकट मराल. कारण इकडे आम्ही सगळे हुतात्मे व्हायला बसलो आहोत. कासीम रझवीचे प्रसिद्ध वाक्य असे - 'सरको कफन बांधे मुजाहिद बन बैठे है.' म्हणजे आम्ही प्रेतवस्त्रच डोक्याला गुंडाळून हुतात्मे होण्याकरिता बसलो आहोत.
रझवीचा फोन वल्लभभाईचे सचिव शंकर यांनी घेतला. नंतर त्यांनी रझवीचे म्हणणे वल्लभभाईंच्या कानावर घातले. वल्लभभाईंसंबंधी आपणा सर्वांच्या डोक्यात असलेली प्रतिमा आपण बदलून घ्यायला पाहिजे. वल्लभभाई अतिशय खंबीर, दृढनिश्चयी होते. पण शिष्टाचाराचे सर्व नियम पाळणारे होते. त्यांनी शंकरना सांगितले : शहरात जातीय दंगली चालू आहेत. रझवी हॉटेलमध्ये उतरले आहेत ही बातमी बाहेर फुटली तर फुकट मारले जातील. तरी हत्यारबंद पोलिसांची चिलखती गाडी पाठवा. त्यांना सरकारी अतिथिगृहावर आणा. शाही पाहुणे म्हणून वागवा. दिवस शुक्रवारचा आहे. त्यांना विचारा नमाज पढायला जायचे का? जाणार म्हणाले तर जामा मसजिदमधील दुपारच्या नमाजाला त्यांना हजर ठेवा. त्यांचे जेवणखाण, विश्रांती नीट सांभाळा, मी त्यांना रात्री भेटेन.
त्याप्रमाणे कासिम रझवी हा वल्लभभाईंच्या भेटीला आला. वल्लभभाई दरवाज्यामध्ये रझवीच्या स्वागताला उभे होते. वल्लभभाईंनी रझवीच्या मोटारीचा दरवाजा उघडला आणि त्याला खाली उतरण्याची विनंती केली. रझवी खाली उतरल्याबरोबर बोलू लागला. तेव्हा वल्लभभाई म्हणाले, “तुम्हाला बोलण्यासाठी वेळ मिळेल. आपण आधी शिष्टाचार पुरे करू." वल्लभभाईंच्या बंगल्याच्या एका बाजूला हिरवळ होती तेथे वल्लभभाई त्याला घेऊन गेले. त्यानंतर वल्लभभाई म्हणाले, “ही जागा मोठी प्रेक्षणीय आहे. इथून निसर्गदृश्ये चांगली दिसतात. कधीकाळी आपण दिवसा आलात तर मी ती दाखवीन." मग त्यांनी रझवीच्या बायकामुलांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्याला प्यायला सरबत दिले आणि चांदीचा वर्ख लावलेला एक विडा स्वतःच्या हाताने त्याला दिला. नंतर वल्लभभाई म्हणाले, "ठीक आहे. आता बोला."
रझवी उभा राहिला आणि बोलायला लागला. तेव्हा सरदार पटेल म्हणाले, "तुम्ही बसून बोलू शकता." "मला उभ्याने बोलण्याची सवय आहे. तेव्हा मी बसून बोलत नाही." म्हणून रझवी बोलू लागला. तो एक तासभर व्याख्यान देण्याच्या आवाजात बोलत होता. या बोलण्यात त्याने हिंदुस्थान सरकारला धमक्या दिल्या. त्या सरकारवर टीकास्त्र सोडले. निजामाचे मोठेपण सांगितले. कत्तलीच्या धमक्या दिल्या. हे सारे तासभर चालल्यावर तो खाली बसला. वल्लभभाई त्याचे सर्व व्याख्यान एकही शब्द न उच्चारता ऐकत होते. तो खाली बसल्यावर वल्लभभाई म्हणाले, "तुमचे काय म्हणणे आहे ते मी ऐकले. पण माझ्या मनात काही शंका आहेत त्या विचारतो."
“विचारा".
"तुमच्या म्हणण्यात एक असा मुद्दा आहे की तुम्ही हैदराबादमधील एक कोटी चाळीस लक्ष हिंदूंची कत्तल कराल."
"हो. ती माझी प्रतिज्ञा आहे."
"एक कोटी चाळीस लाख हिंदूंची कत्तल तुम्ही करीत असाल तेव्हा आम्ही काय करू अशी तुमची कल्पना आहे?"
तेव्हा रझवी एकदम घाबरला.
तो म्हणाला, "तुम्ही मला धमकी देत आहा. हे बरोबर नाही. तुम्ही मला हैदराबादला जाऊ दिले पाहिजे."
“उद्याच्या विमानात तुमची जागा राखीव असेल. तुम्हाला विमानात बसवून दिले जाईल. तुम्ही हैदराबादला सुरक्षित उतरावे अशी माझी इच्छा आहे. नंतर तुम्ही निजामाची भेट घ्याल तेव्हा त्यांची मुलेबाळे आणि प्रकृती यांची चौकशी मी केली असे त्यांना सांगा. त्यांचे कल्याण व्हावे अशीच माझी भूमिका आहे. त्यांना माझा निरोप सांगा की हिंदूंच्या कत्तलीचा विचार त्यांच्या डोक्यात येईल तेव्हा ती सुरू झाली तर आम्ही काय करू याचा विचारही त्यांनी करावा. आता या. मला आणखी काही बोलायचे नाही."
रझवी आणि पटेल यांच्या या भेटीची माझी माहिती अशी आहे. कन्हैयालाल मुन्शींनी जी माहिती दिली आहे त्याप्रमाणे रझवी गेला आणि सरदार पटेलांना म्हणाला, “मी तुमचे हृदयपरिवर्तन करायला आलो आहे."
“ज्याचे हृदय विषाने भरलेले आहे त्याला हृदयपरिवर्तनाची गरज असते. मला हृदयपरिवर्तनाची गरज आहे असे मला वाटत नाही."
“माझे अंतःकरण शुद्ध आहे असे पटवून द्यायला मी आलो आहे."
यावर वल्लभभाई पटेल गप्प बसले. शब्दांच्यापेक्षा मौन अत्यंत कडवट कसे करावे याचे वल्लभभाई हे तज्ज्ञ होते. असे मुन्शींचे वर्णन आहे. यापैकी नेमके काय घडले? मी तिथे हजर नव्हतो. मुनशीही हजर नव्हते. माझी माहिती ऐकीव तशीच त्यांचीही ऐकीव. फक्त फरक एवढाच की आमची माहिती स्वामीजींच्याकडून आलेली आहे. आमचा विश्वास स्वामीजींवर आहे. ज्यांचा कन्हैयालाल मुन्शींवर विश्वास असेल त्यांनी तो ठेवायला आमची हरकत नाही.
या सर्व आंदोलनात रझाकारांनी केलेल्या अत्याचारी घटनांची जशी मालिका आहे तसेच आमच्याकडूनही सशस्त्र आंदोलक लढत होते. आमच्या मंडळींनी ठाण्यावर हल्ले केलेले आहे. ठाणी लुटलेली आहेत. सगळ्या तऱ्हेच्या हकिकती आहेत. या हकिकतीसुद्धा मी मोठ्या प्रमाणात सांगू शकेन. पण त्या मी सांगणार नाही. त्यातील एकच हकीकत मी थोडक्यात सांगतो. कारण तिच्याविषयी अनेकांच्या मनात गैरसमज आहेत. मी सांगणार आहे ती घटना उमरी बँकेच्या लुटीची आहे. उमरी बँकेची लूट तीही या लक्ष्यातील एक अशीच लोकविलक्षण घटना आहे. संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्याच्या या जवळजवळ शंभर वर्षांच्या आंदोलनात या घटनेला समांतर दुसरी घटना नाही. ज्या ठिकाणी भारतीय स्वयंसेवकांनी ठाणे अथवा बँक लुटण्याचा प्रयत्न केला त्यातले बहुतेक सगळे प्रयत्न अयशस्वी झाले. कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांना बँकेतला पैसा बाहेर काढावयास अपयश आलेले आहे. चार दोन ठिकाणी हा पैसा ताब्यात घेण्यात त्यांना यश मिळाले. हा ताब्यात आलेला पैसा कधीही सुरक्षित जागी जाऊन पोहोचला नाही. त्याचे काय झाले याचा हिशोब पुढच्या काळात लागलेला नाही. उमरी बँक लूट ही मात्र एक वेगळीच अशी घटना आहे.
आखणीच्या दृष्टीने या लुटीची तयारी दीड वर्ष चाललेली होती. धनजी पुरोहित हे गृहस्थ उमरी बँक लुटण्याच्या कल्पनेचे नीट प्रवर्तक. त्यांच्या सर्व आयुष्याची धुळधाण या लढ्यामध्ये झाली. आठ-दहा लाखांचे स्वतःचे उत्पन्न असणारा हा मारवाडी व्यापारी. त्यांनी महिनोगणती हिशोब ठेवून उमरी बँकेची माहिती जमा केली. बँकेच्या सर्व मॅनेजरांना आपल्या घरी चहापाण्याला नेहमी बोलावून, त्यांच्याशी स्नेहाच्या गप्पा करून पुरोहितांनी सारी गणिते मांडली. कोणत्या काळात उमरी बँकेत जास्तीत जास्त पैसा असतो आणि एका वेळेला रोख रक्कम किती असू शकते, कोणत्या वेळेला ती लुटणे फायद्याचे ठरेल हे सर्व नक्की केले. हे धनजी पुरोहित बँक लुटल्याच्या नंतर लूट घेऊन जाणाऱ्या मंडळींच्या बरोबरच स्वतःचे घरदार सोडून उमरखेडपर्यंत आले. तेथून ते सोलापूरला गेले. त्यापूर्वीच त्यांनी त्यांची इस्टेट विकून सोलापूरच्या बँकेत पैसे जमा करून ठेवलेले होते. ते पैसे काढले आणि कापसाच्या व्यापारास आरंभ केला. त्यात ते बुडाले. दहाबारा लाखांचे उत्पन्न असणारा हा आर्यसमाजी व्यापारी संपूर्ण दरिद्री झाला. नांदेडला पीपल्स कॉलेज स्थापन झाल्यावर हे त्या कॉलेजात स्वयंपाक करणाऱ्यांचा प्रमुख म्हणून वर्ष-सहा महिने होते. तिथून त्यांनी गुजराथेत हॉटेल काढले. परवा स्वातंत्र्य संग्रामाच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही धनजी पुरोहितांना गुजराथेतून उमरीला बोलावून घेतले, त्यांचा सत्कार केला. पण त्यांचे म्हणणे असे की तुम्ही दिलेले पैसे आणि फंड मी घेणार नाही. मी लाखो रुपये कमावणारा आणि कार्यकर्ते जगविणारा माणूस आहे. माझ्या नशिबाने फटका खाल्लेला आहे. मी आता माझ्या खेड्यात माझे हॉटेल चालवत उरलेले आयुष्य काढीन. मला कशाचीही गरज नाही; राजकीय महत्त्वाकांक्षा नाही. तर असा हा थोर माणूस.
नांदेड जिल्ह्यामध्ये लष्करातून नुकतेच निवृत्त झालेले एक गृहस्थ रघुनाथ रांजणीकर. त्यांनी ठरविले की बँक लुटायची हा धनजी पुरोहित यांचा मुद्दा बरोबर आहे. तेव्हा बँक कशी लुटायची याचा संपूर्ण अभ्यास केला पाहिजे. हे लष्करातले विद्वान असल्यामुळे कोणताही हल्ला करायचा असेल तर नियोजन कसे पाहिजे याचे तज्ज्ञ. म्हणून त्यांनी नकाशे डोळ्यांपुढे ठेवले. सडका कुठून कुठे जातात, गाड्या कोठून कोठे जातात; रेल्वे कोठून कोठे जातात; तारा कोठून येतात-जातात याचा तक्ता तयार केला. या साऱ्या घटना चाळीस साली घडणार असून अजून आमचा लढा सुरू झालेला नाही. पण सुरू होईल तेव्हा तो सशस्त्र असणार. सशस्त्र लढा असेल तर त्याला शस्त्रासाठी पैसा लागणार. पैसे लागणार असतील तर उमरी बँक लुटून पैसा घेणार, हे या कार्यकर्त्यांचे मत आहे. या हिशोबात आखणी चालू आहे. त्यामुळे जेव्हा सशस्त्र आंदोलनाला आरंभ झाला तेव्हा उमरी बँक लुटण्याला वरून परवानगी मिळाली. तेव्हा आमच्याजवळ गाड्या केव्हा येतात, जातात; तारा कुठे आहेत, सडका कुठे आहेत, त्या अडविण्यासाठी कुठे झाडे तोडावयाची, बँक लुटल्याची बातमी बारा तासपर्यंत नांदेड अगर निझामाबाद येथे पोचू नये यासाठी काय करायचे याची योजना तयार होती. कारण लुटलेला सगळा पैसा बैलगाडीमध्ये घालून उमरखेडपर्यंत नेणे आवश्यक होते. कुणाजवळ जीप अगर मोटारी नव्हत्या. आनंदाची गोष्ट होती की निजामाच्या फौजेजवळही जीप गाड्या नव्हत्या. कार्यकर्त्यांच्या पाच तुकड्या या कारवाईसाठी नियुक्त झाल्या. एका तुकडीचे नेते आवासाहेब लहानकर (हे पुढे चालून नांदेड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे सभासद (M.L.C.) आणि डोंगरखेडा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष झाले.) दुसऱ्या तुकडीचे नेते साहेबराव वारडकर. (हे कित्येक वर्ष नांदेड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते व सध्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे सभासद आहेत.) तिसऱ्या युनिटचे नेते नागनाथ परांजपे. चौथ्या युनिटचे नेते रघुनाथ रांजणीकर. पाचव्या तुकडीचे नेते अनंत भालेराव. हे तेव्हा सेलूमध्येच शिक्षक होते. या सगळ्या मंडळींनी ठरलेल्या योजनेनुसार संपूर्ण कार्यवाही पार पाडली. सगळे पैसे बैलगाड्यांत भरले आणि उमरखेडला सुरक्षित नेऊन पोचविले. त्या वेळी सतत रेडिओ लावून बसण्याचे काम भगवंतराव गांजवे आणि भुरवरे यांच्याकडे होते. मुद्दा हा होता की पंचनामा झाल्याच्या नंतर इतके पैसे लुटले गेले अशी बातमी आकाशवाणीवर येईल तेवढे पैसे तुम्ही आम्हाला आणून दिले पाहिजेत. मध्ये एकही पैसा आम्ही तुम्हाला खाऊ देणार नाही. हे जे पैसे आपल्याबरोबर या सर्व मंडळींनी नेले ते भगवानराव गांजवे यांच्या हवाली केले. भगवानरावांनी ते सर्व मोजून यांना लेखी पावती दिली. पंचनाम्याच्या नंतर जी बातमी आली तीत अमुक पैसे लुटले गेले असा उल्लेख आहे. गांजवे यांच्याकडे आलेल्या रकमेची बेरीज एवढी आहे. या दोघांत तीनशेतीस रुपयांचा फरक होता. हे तीनशेतीस रुपये काय झाले याचा शोध करता असे सिद्ध झाले की ते चिल्लरच्या रूपात होते. आमच्या मंडळींनी फक्त नोटाच आणल्या होत्या. मग चिल्लरचे काय झाले? बँक उघडल्यावर पंचनामा होण्याच्या आत चिल्लर ज्याच्या नजरेला पडली त्यांनी ती खिशात घातली असणार.
आमच्या मंडळींना बँकेमध्ये सोने असते हे माहीत नव्हते. त्या दिवशी बँकेत दीड हजार तोळे होते. हे तिजोरीत (Vault) होते. आमची मंडळी हे न लुटता आली. कारण ते लुटण्याचा आदेश नव्हता. त्यांना जेवढा आदेश होता तेवढेच त्यांनी लुटले. सारे सोने बँकेत सुरक्षित सापडले. आलेले पैसे होते त्याची मोजणी, मी आता ज्या कॉलेजचा प्राचार्य आहे ते कॉलेज चालविणाऱ्या संस्थेचे सचिव भगवानराव गांजवे यांनी गोधाजीराव मुरवरे, त्यांच्या पत्नी माई मुरवरे आणि त्यांची विधवा बहीण यांच्यासमोर केली. नंतर ते पैसे तिथून उचलून पुण्याच्या मार्गे सोलापूरला नेले. सोलापूरला आमच्या कृतिसमितीचे प्रमुख कार्यालय होते. तेथे फुलचंद गांधी आणि दुसरे साक्षीदार यांच्या साक्षीने ते पैसे दिगंबरराव बिंदू आणि गोविंदराव श्रॉफ यांच्या स्वाधीन मोजून केले व त्याची पावती घेतली. पोलिस कारवाई संपल्याच्या नंतर या सर्व पैशाचा हिशोब पैन् पैपर्यंत आम्ही घेणार असे वल्लभभाईंनी कार्यकर्त्यांना सांगितले होते. त्यामुळे कारवाई संपल्यानंतर पुण्याची एक हिशोबतपासनीस कंपनी बाळ आणि आगळे यांनी काँग्रेसचे त्या वेळचे सरचिटणीस शंकरराव देव यांच्या साक्षीने, हैदराबादमधील श्रीधर नाईक यांच्या बंगल्यात हे हिशोब तपासले आणि प्रत्येक पैचा हिशोब आहे असा दाखला दिला. या दाखल्याच्या प्रती करून ज्यांनी पैसे मोजून दिले त्या भगवानराव गांजवे यांनी एक प्रत, दिगंबरराव बिंदू यांनी एक प्रत व तीन प्रती शंकरराव देव यांनी घेतल्या. त्यातील एक अखिल भारतीय काँग्रेसला दिली. एक सरदार पटेलांना दिली. एक स्वतःपाशी ठेवली. हे प्रामाणिकपणाचे एक महान लोकविलक्षण पर्व आंदोलनात घडले.*
आमच्या सर्वच माणसांचे चारित्र्य आणि निष्ठा या पातळीच्या होत्या असे नाही. कारवाई संपल्यावर आमचे कार्यकर्ते आत आले आणि त्यांनी वेगवेगळ्या मुसलमानांकडून त्यांचा जीव वाचवण्यासाठी पैसे घेतले. यश मिळाल्यावर चारित्र्याची पातळी शिल्लक राहिली नाही. दहा हजार, वीस हजार, पंचवीस हजार असे पैसे घेऊन कार्यकर्त्यांनी चोरांचे जीव वाचविले. ते लोक जेव्हा हे पैसे खर्चु लागले तेव्हा जो तो म्हणू लागला की ही उमरी बँकेची लूट आहे. आंदोलनानंतर अनेक वर्षे, मराठवाड्यातील जो कार्यकर्ता आंदोलनापूर्वी गरीब होता तो जरा चलता फिरता झाला की लोकांनी म्हणावे ही उमरी बँकेची लूट आहे. पण उमरी बँकेचा एक आधलाही कुणाला मिळालेला नाही. आता जी मंडळी सांगतात की उमरी बँक लुटत असताना आपण तिथे हजर होतो, त्यांतील फारच थोडे तिथे होते. जे तिथे होते त्यांना साहेबराव आबासाहेब लहानकर, रघुनाथ रांजणीकर, नागनाथ परांजपे, अनंत भालेराव इत्यादींनी दाखला दिला पाहिजे. इतरांवर कुणी विश्वास ठेवू नये. काशीनाथ शेट्टी आता हयात नाही धनजी पुरोहित गुजराथमध्ये आहेत. इतक्या प्रचंड प्रमाणात लुटीची योजना आखून ती आखलेल्या योजनेप्रमाणे पार पाडणे आणि पैन् पैचा हिशोब चुकता करणे ही घटना
- ही पावती आपल्या साक्षीने व माहितीने झाली व सर्व व्यवहार चोखपणे पूर्ण झाला ही जाहीर घोषणा माजी मजूरमंत्री श्री. र.के.खाडिलकर यांनी हैदराबादेत एक व्याख्यानात १९७२ ला केली होती.
- संपादक
उमरी बँकेतील लुटीचे पैसे आले एकवीस लाख. ही रक्कम आमच्या लढ्याच्या दृष्टीने अत्यंत अपुरी होती. एकटे नांदेडचेच घेतले तर उमरखेड या ठिकाणी दोन हजार कार्यकर्ते होते. या दोन हजार लोकांचे खाणेपिणे, कपडे, इतर गरजा आणि कार्यालय यांचा खर्च गांजवे हे व्यापारी असल्याने त्यांनी नोंदलेला आहे. हा खर्च दरमहा साठ हजारांच्या घरात जातो. एकटे उमरखेड कार्यालय सांभाळण्याचा फेब्रुवारी अट्ठेचाळीस ते सप्टेंबर अठेचाळीसपर्यंतचा खर्च दरमहा साठ हजारांच्या घरात होता. यामध्ये माणसांचे कपडे, अंथरुणे, रहायचे घराचे भाडे, दोन वेळचे जेवण, कार्यालय खर्च, जाण्यायेण्याचा खर्च समाविष्ट आहे. दोन हजार माणसांना माणशी तीस रुपये महिन्याला असे स्थूल प्रमाण पडते. सकाळ-संध्याकाळ भाकरी, आठवड्यातून एक दिवस भात-भाकरी आणि भाजी, पंधरा दिवसांतून एकदा डोक्याला लावायला तेल, पंधरा दिवसांनी एकदा हजामत, एक घोंगडी, पांघरायला एक चादर, एका खोलीत दहा माणसे अशा निकृष्ट जीवनात कार्यकर्ते राहात असत. तरीसुद्धा फक्त एका उमरखेडचा खर्च साठ हजार महिना होता. यात शस्त्रास्त्र खरेदी नाही. त्या खरेदीचा खर्च वेगळा. आमच्याकडे जी शस्त्रे होती ती कोण्या ठिकाणी किती होती याचे आकडे नाहीत. उमरखेड कार्यालयाने किती शस्त्रास्त्रे पोलिस आणि कलेक्टर यांच्या स्वाधीन केली यांचा पंचनामा केलेला आहे. जी अधिकृत वैयक्तिक शस्त्रास्त्रे होती त्यांचा यात समावेश नाही. यामध्येसुद्धा दोनशेपन्नास रायफली होत्या; हातबॉम्ब होते. माझे मधले मामा रामचंद्रराव नांदापूरकर यांनी भारत सरकारला शस्त्रास्त्रे सादर केलेली आहेत. त्यात चौतीसशे हातबॉम्ब होते. आमच्या कार्यकर्त्यांनी जी एकूण शस्त्रे भारत सरकारच्या स्वाधीन केली त्यांची किंमत साठ लक्ष रुपयांहून जास्त आहे. तसेच वर एका शिबिराचा हिशोव सांगितला त्याप्रमाणे कार्यकर्त्यांच्या अनेक शिबिरांचा जो खर्च होईल तो लाखात मोजण्याच्या पलीकडचा आहे. हे सर्व लक्षात घेतले तर एकवीस लाखांनी काहीही भागत नाही हेही आपल्या लक्षात येईल. स.का.पाटील, जयप्रकाश नारायण, द्वारकाप्रसाद मिश्रा यांनी प्रचंड मदत केली. संस्थानी हद्दीतून मदत आली. कार्यकत्यांनी भिक्षा मागून कितीतरी पैसा मिळविला. हा सर्व या प्रचंड भुकेत संपलेला आहे. आंदोलने चालवायला किती अफाट प्रचंड खर्च येतो याची जाणीवही आपणाला नाही. वीस हजार भूमिगत कार्यकर्ते शस्त्रास्त्रानिशी नऊ महिने पोसायचे तर किती खर्च लागतो याचा हिशोब प्रत्येकाने थोडे गणित करून मनाशी करावा.
आता मी जनतेच्या आंदोलनाचा निरोप घेऊन वाटाघाटीकडे वळतो. वाटाघाटीही महत्त्वाच्या आहेत. वाटाघाटीसाठी हैदराबादहून गेलेल्या निजामी शिष्टमंडळाचे अध्यक्ष निजामाचे पंतप्रधान छत्तारीचे नवाब होते आणि जनरल सेक्रेटरी नबाब अलियावर जंग होते. हे त्या वेळी पुढील पदे भूषवीत होते. घटना समितीचे सचिव, कायदे मंडळाचे सचिव, निजामाचे खास सल्लागार, निजामाचे रेसिडेंटच्या दरबारातील खास वकील, निजामाचे व्हाइसरॉयच्या दरबारातील खास वकील इ.इ. असे हे लोकविलक्षण कर्तृत्वाचे गृहस्थ त्या शिष्टमंडळाचे जनरल सेक्रेटरी होते. मोईन नबाबजंग एक सभासद. हिंदूंच्या वतीने पिंगल व्यंकटराम रेड्डी हे सभासद. या वाटाघाटी जून अठरापासून सुरू झाल्या. अठरा जूनलाच आमचा लढ्याचा ठराव, अठरा जूनलाच वाटाघाटीची पहिली फेरी. या वाटाघाटी ज्या चालल्या त्या हैदराबाद भारतात विलीन व्हावे या मुद्द्यावर चालल्या नाहीत तर आम्हाला वऱ्हाड द्या, आम्हाला रायलसीमा द्या, आम्हाला हे द्या आम्हाला ते द्या या मुद्द्यावर चालल्या. या वाटाघाटी फसल्या आहेत हे तीन ऑगस्टला स्पष्ट झाले. तेव्हा माऊंटबॅटन यांनी निर्णय घेतला की हिंदुस्थान स्वतंत्र होईपर्यंत हैदराबादचा प्रश्न सुटू शकत नाही.
एक गोष्ट सांगावयाची राहून गेली. ती जनता आंदोलनाचाच भाग आहे फसलेल्या वाटाघाटी सोडून ती मध्येच सांगतो. आंदोलन सुरू होण्यापूर्वी संस्था काँग्रेसने काही कार्यकर्ते वल्लभभाईंच्या भेटीस पाठविले. जे पुढच्या कृतिसमितीचे अध्यक्ष होणार हे ठरलेले होते ते दिगंबरराव बिंदू यात होते. जे सत्याग्रह करून तुरुंगात जाऊन बसणार असे आधीच ठरलेले होते ते रामानंद तीर्थ यात होते. लढ्यात ठराव पास करण्याच्या आठ-दहा दिवस अगोदर ही मंडळी दिल्लीला जाऊन वल्लभभाईंना भेटली. पुढच्या अधिवेशनात ठराव पास करून आम्ही आंदोलन सुरू करीत आहोत. तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या असे त्यांनी वल्लभभाईना सांगितले. सरदार म्हणाले, मी तुम्हाला आशीर्वाद देणार नाही. याचे कारण असे की तुमचे आंदोलन सुरू झाल्यावर प्रचंड अत्याचार होतील आणि मी तुम्हाला वाचवू शकणार नाही. तुमच्या सर्व जनतेला प्रचंड प्रमाणात अत्याचारांना तोंड द्यावे लागेल. आम्ही येथे बसून खेद व्यक्त करण्यापलीकडे काहीही करू शकणार नाही. ज्या अनुयायांचे संरक्षण मी करू शकत नाही त्यांना लढा सुरू करा असा आशीर्वादही मी देऊ शकत नाही. म्हणून तुमच्या आंदोलनाला माझा आशीर्वाद नाही. यावर बिंदूंनी विचारले, मग तुमचे म्हणणे असे आहे काय की आम्ही आंदोलन सुरूच करू नये? यावर वल्लभभाई म्हणाले, असाही सल्ला मी देऊ शकत नाही. कारण जनतेचे आंदोलनच जर नसेल तर हैदराबाद भारतात कधीच येणार नाही. यासाठी तुम्ही लढा सुरू केलाच पाहिजे, अत्याचार सहन केलेच पाहिजेत. त्यावर बिंदू म्हणाले, आम्ही जाणीवपूर्वक सर्व अत्याचार सहन करायचे ठरविले आहे. तसे आम्ही अत्याचार सहन करतो. पण तुम्ही आम्हाला आशेचा एखादा शब्द तरी द्याल? की आम्ही नुसताच निराशेच्या वातावरणात लढा सुरू करावा? तेव्हा वल्लभभाई म्हणाले, मी जर जिवंत असेन (वल्लभभाई अत्यंत आजारी अवस्थेत होते.) तर मी तुम्हाला एक शब्द देतो. हा लढा एक वर्षभर संपणार नाही. किमान एक वर्ष तुम्हाला अत्याचार सहन करणे भाग आहे. पण हा लढा मी दोन वर्षे शिल्लक राहू देणार नाही. एक वर्ष तुम्हालाच सर्व भोगले पाहिजे. जास्तीत जास्त दोन वर्ष. दोन वर्षांच्या आंत म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणपन्नासच्या आत हा प्रश्न संपला नाही व तोवर मी जिवंत राहिलो तर तो सोडविण्याची हमी मी देतो. पंधरा ऑगस्ट अठेचाळीसपर्यंत हा प्रश्न का सुटणार नाही ते लक्षात घेण्याची जबाबदारी तुमची. आता लढा सुरू करायचा की नाही याचा निर्णय तुम्ही घ्या.
हे ऐकून कार्यकर्ते परत आलेले होते. लढ्याचा जो ठराव स्वामी रामानंद तीर्थांनी मांडलेला आहे त्यावर बोलताना ते म्हणाले आहेत की एखाद्या फेरीमध्ये हा लढा संपेल असे कुणी मानू नये. कमीत कमी वर्षभर हा लढा चालणार आहे. हे लक्षात घेऊन वर्षभर अत्याचार सहन करायला तुम्ही तयार आहात का? तशी तयारी असेल तर मला सांगा. नाहीतर आपण हा ठराव पास करायला नको.
मी बिंदूंना नंतर विचारले होते या सर्वांचा अर्थ काय? वल्लभभाई काय म्हणत होते? बिंदू म्हणाले, त्या वेळेस अर्थ कळला नव्हता. नंतर कळला. मी स्वामीजींनाही विचारले होते त्यांना वल्लभभाईंचे म्हणणे कळले होते का? स्वामीजीही म्हणाले, त्या वेळेस कळले नव्हते, नंतर कळले. त्या वेळेस अर्थ कळला नाही याविषयी तक्रार नाही. पण त्या पुढाऱ्यांना नंतर जो अर्थ कळला तो आपण समजून घेतला पाहिजे. वल्लभभाई असे सुचवीत होते की भारत स्वतंत्र झाल्यावरही लॉर्ड माऊंटबॅटन हेच गव्हर्नर जनरल राहतील आणि अचिनलेक हा इंग्रजच भारताचा सरसेनापती राहील. जोवर गव्हर्नर जनरल आणि सरसेनापती इंग्रज आहे तोवर हैदराबादला सैन्य पाठविता येणार नाही. हे दोघे इंग्रज जायला कमीत कमी एक वर्ष लागेल. ते गेले की गव्हर्नर जनरल भारतीय येईल. सरसेनापती भारतीय येईल. त्यानंतर वर्षाच्या आत हा प्रश्न आम्ही सोडवू. तोवर मात्र अत्याचार सहन करावयाचे. अशी ही सरदारांची भूमिका स्पष्ट व्यवहारवादी होती. आमच्या हातातच सैन्य लौकर आले नाही तर पाठवायचे काय? हैदराबादचा प्रश्न चौदा महिने का चालला हे आता आपल्या लक्षात यावे. माऊंटबॅटनचे मत हैदराबादचा प्रश्न युनोकड़े न्यावा असे होते. निजामाचीही इच्छा हैदराबादचा प्रश्न युनोकडे नेण्याचीच होती. एकदा हा प्रश्न युनोकडे गेला असता तर हैदराबादचे स्वातंत्र्य वहिवाटीतच सिद्ध झाले असते. त्यामुळे सर्वांचा त्याला विरोध होता. आता प्रश्न होता तो हा की पंधरा ऑगस्टपर्यंत हैदराबादचा प्रश्न सुटला नाही तर पुढे काय करावयाचे? त्यामुळे हिंदुस्थान सरकारचे सर्व लोक आतून सचिंत होते. मेननने या सचिंततेचे वर्णन करून ठेवलेले आहे.
याच सुमारास सोळा ऑगस्टला हैदराबाद सरकारचे भारत सरकारला पत्र आले, की आता ब्रिटिश सार्वभौमता संपलेली आहे. नवीन अस्तित्वात आलेले जे भारतीय सरकार आहे त्याला आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो. दीर्घकाल हे सरकार आपल्या प्रजेचे कल्याण करीत राहील अशी आम्ही आशा व्यक्त करतो. हैदराबादही पंधरा ऑगस्टपासून स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आलेले आहे. आमच्या मनात तुमच्याबद्दल व तुमच्या मनात आमच्याबद्दल स्नेह असावा अशी आमची अपेक्षा आहे. दोन स्वतंत्र राष्ट्रे जरी असली तरी आपल्या सरहद्दी एकमेकांत गुंतलेल्या आहेत. म्हणून आपण मित्रत्वाच्या नात्याने शेजारी राहावयास शिकले पाहिजे. म्हणून हिंदुस्थान बरोबर सर्वांगीण मैत्रीचे आणि सहकार्याचे संबंध असावेत अशी आमची इच्छा आहे. त्या दृष्टिने आम्ही वाटाघाटी करायला तयार आहोत.
निजामाचे धोरण असे की वाटाघाटीचे गुऱ्हाळ चालवीत राहावयाचे. वर्ष दोनवर्षे वाटाघाटी मिटत नाहीतच. मग युनोत दोन-चार वर्षे काढावयाची. एवढी वर्षे लोटली तर मध्ये जगातील इतर राष्ट्रांची मान्यता त्याला मिळायला लागते. लष्करी मदत मिळायला लागते. शिवाय तोवर वहिवाटीने स्वातंत्र्य सिद्धही होते. त्यामुळे घाई निजामाला नव्हती, आम्हाला होती. निजाम हा अत्यंत चतुर माणूस. म्हणून स्वातंत्र्योत्तर, काळात पुन्हा वाटाघाटी चालू झाल्या. या वाटाघाटीत स्पष्ट भूमिका घेतली असेल तर ती जवाहरलाल नेहरूंनी. त्यांनी हैदराबाद शिष्टमंडळाला सांगितले, तुमच्या समोर पर्याय दोन. एक, तुम्ही उरलेल्या संस्थानिकांबरोबर भारतात विलीन होऊन जावे. दुसरा, रझाकार संघटनेवर तात्काल बंदी आणावी. संस्थानी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते सोडावेत. कायदा तयार करून प्रौढ मतदानावर आधारलेली निवडणूक घ्यावी. हे जे जनतेने लोकनियुक्त मंत्रिमंडळ येईल त्या मंत्रिमंडळाने हैदराबादचे भवितव्य ठरवावे. ते जे ठरवतील ते आम्ही मान्य करू. तिसरा पर्याय नाही. त्यावर छत्तारीचे नबाव म्हणाले, दोन्ही पर्यायांचा अर्थ हैदराबादने भारतात विलीन झाले पाहिजे हाच आहे. नेहरू म्हणाले, हैदराबाद जर भारतात विलीन झाले नाही तर भारतीय प्रदेशाची सलगताच निर्माण होत नाही. आमच्या प्रादेशिक सलगतेवर आम्ही तडजोड करू ही तुमची अपेक्षाच चुकीची आहे.
सगळ्यात मृदू मनाचे म्हणून विख्यात जे भारतीय नेते, त्यांचे हे मत. नेहरू हे सौम्य बोलण्यासाठीच प्रसिद्ध. अधिकृत वाटाघाटीत सामान्यपणे सरदार पटेल गप्पच राहात. हैदराबादची शिष्टमंडळे कधी खासगी बैठकीत त्यांना भेटली तर ते म्हणत : तुम्ही ही वेळ वाया घालवीत आहात. माऊंटबॅटन वेळ घालवीत आहेत व आमचे मेननही निरर्थक गोष्टी करीत आहेत. माऊंटबॅटनच्या हाती काहीही नाही. तुमच्या हाती काही नाही, माझ्या हाती काही नाही. जवाहरलाल नेहरूंच्या हाती काही नाही. सगळे प्रश्न कासिम रझवीच्या हाती आहेत. ते काही तुमच्या या शिष्टमंडळाचे सभासद नाहीत. त्या माणसाने काही प्रतिज्ञा केलेल्या आहेत. आपला शब्द दिला आहे. काय करायचे ते त्यांचे ठरलेले आहे. शिष्टाचार म्हणून वाटाघाटी करून ते आता काय ते करणार आहेत. अशा प्रकारे वल्लभभाई शिष्टमंडळांना टिंगलीने खाजगीत बोलत. सूचना मेनन, माऊंटबॅटन यांच्याकडून येत. हैदराबादच्या निजामाकडून, अलियावर जंगकडून येत.
वाटाघाटीत अलियावर जंग यांनी एक महत्त्वाचा प्रस्ताव दिला. त्यानंतरच्या काळात मीर लायकअलींनी तोच प्रस्ताव दिला. मुन्शींच्या पुस्तकात माऊंटबॅटन प्रस्ताव म्हणून त्याचा उल्लेख आहे, पण तो मुळात अलियावर जंगचा प्रस्ताव. हा महत्त्वाचा प्रस्ताव मी पुढे तुम्हाला सांगतो. पण या वाटाघाटी हलेचनात. त्यांना कोठे सीमाच नव्हती. यात मधे एकदा असे ठरले की विलीनीकरणाच्या वाटाघाटी (Instrument of Accession) हे शब्द बदलावेत आणि सहकार्याच्या वाटाघाटी (Instrument of Association) हे शब्द वापरावे. हेही भारत सरकारने मान्य केले. पण निजामाचे म्हणणे असे की सहकार्य (Association) या शब्दाने गैरसमज होण्याचा संभव आहे. त्यामुळे जैसे थे (Stand still Agreement) असे शब्द वापरावे. तेही हिंदुस्थान सरकारने मान्य केले. या जैसे थे कराराची कलमे काय असावीत हे ठरले. ऑक्टोबर वीसला हैदराबादचे शिष्टमंडळ सर्व कलमे घेऊन परत आले. पंचवीस ऑक्टोबरला हैदराबाद सरकार आणि दिल्ली येथून एकाच वेळी सह्या केल्या जातील असे ठरले. आणि बावीस ऑक्टोबरला निजामाने माऊंटबॅटनला तार पाठविली. अजून शंकेच्या काही जागा आहेत. वाटाघाटीची एक फेरी अजून झाल्याशिवाय सही करता येत नाही. मेननने त्यांना उत्तर दिले : वाटाघाटी संपल्या असून सहीचा दिवसही ठरला आहे. आता फेरविचार करता येणार नाही असे आमचे मत आहे. तरीही काही बोलावयाचे असेल तर पंतप्रधान छत्तारींना पाठविण्याची तारीख कळवायला निजामाने टाळाटाळ केली. नंतर अठ्ठावीस ऑक्टोबरला निजामाने भारत सरकारला कळविले की वाटाघाटी पुन्हा उघडण्याचे तुम्ही मान्य केल्याशिवाय छत्तारी येणार नाहीत. भारत सरकारने कळविले, मग वाटाघाटी फिसकटल्या असे आम्ही जाहीर करतो. त्यावर निजामाने कळविले तुम्ही असे जाहीर केलेत तर लगेच आमचे शिष्टमंडळ पाकिस्तानशी वाटाघाटी करण्यासाठी जाईल. तेव्हा वाटाघाटी फिसकटल्या असे जाहीर करणे आम्हास संमत नाही. आपणाला वाटेल हा काय तमाशा चालू आहे? वाटाघाटी अशाच चालतात. त्या लक्षात यायला हव्या असतील तर सर्व तारखा लक्षात घ्या. वीस ऑक्टोबर, बावीस ऑक्टोबर, चोवीस ऑक्टोबर, पंचवीस ऑक्टोबर, सव्वीस ऑक्टोबर अशा या क्रमाने चालून तारखा आहेत. चोवीस ऑक्टोबरचे सांगायचे राहिले. या दिवशी सरदार पटेलांनी निजामाला पत्राने कळविले आहे - तुमचे ताजे पत्र पोचले. त्याचा अभ्यास करायला पंधरा दिवस लागतील. तेव्हा वाटाघाटी फिसकटल्या की नाही हे ठरवायलाही पंधरा दिवस लागतील. आपण तूर्त थांबू. बावीस ऑक्टोबरला (सत्तेचाळीस) पाकिस्तानी फौजेने काश्मीरवर हल्ला केला आहे. पाकिस्तान हल्ला करणार याची माहिती निजामाला वीस ऑक्टोबरला नाही. त्यामुळे शिष्टमंडळ वाटाघाटी पूर्ण करून आणि सहीची तारीख ठरवून परतते. पण पाकिस्तानचे सैन्य शिरले हे कळताच निजाम ठरवितो की आता कदाचित पाकिस्तान भारताचा पराभव करील. तर या युद्धाचा निकाल लागण्यापूर्वी भारताशी कोणताच करार न करणे बरे. म्हणून निजामाची चालढकल की वाटाघाटींची संधी द्या. वाटाघाटींना संधी देण्याच्या आत भारताच्या फौजा काश्मीरमध्ये जाऊन पोहोचल्या पाहिजेत, या फौजा पोचल्या आणि श्रीनगरच्या बाहेर पुंच येथे भारत-पाकिस्तानची पहिली लढाई जुंपली. तेव्हा सरदारांनी निजामाला कळविले की आता आम्हाला विचाराला पंधरा दिवस लागतील. याच दरम्यान जुनागढने पाकिस्तानात विलीन व्हायचे ठरविले आहे. पाकिस्तानने ते विलीनीकरण मान्यही केले आहे. त्यामुळे भारत सरकारने पाकिस्तानची लढाई चालू असतानाच जुनागढवर सैन्य पाठवून पोलिस कारवाई करावयाचे ठरविले. सहा नोव्हेंबरला पोलिस कारवाई ठरली. आठ नोव्हेंबरला जुनागढच्या हद्दीवर फौजा उभ्या राहिल्या. नऊ नोव्हेंबरला पोलिस कारवाई संपली. अकरा नोव्हेंबरला काश्मिरात पाकिस्तान सैन्याची पिछेहाट सुरू झाली. पाकिस्तानने भारतीय भूमीवर हल्ला करताच भारताला पाकिस्तान भूमीवर जुनागढला हल्ला करणे साहजिकच झाले. भारताने चाल केली तिथे भारत जिंकले. पाकिस्तानने चाल केली तिथेही भारत जिंकला. तेव्हा मध्य सरकारच्या संस्थान मंत्रालयातून मेनननी कळविले की वाटाघाटी मोडल्या असे जाहीर झाले तर परिणाम अत्यंत गंभीर होतील. तेव्हा काय करता ते कळवा. त्यावर निजामाने अशी चाल केली की; इथल्या दंगलीच्यामुळे मंत्रिमंडळ बदलले आहे. (नबाव ऑफ छत्तारीला घेरणे, त्याच्या मिश्या उपटणे, त्या जाळणे, अलियावर जंगला मारणे अशा घटना झाल्या होत्या.) तेव्हा मागे काय ठरले हे समजून घेण्यासाठी नवे मंडळ दिल्लीला पाठवीत आहे. म्हणून लायकअली यांच्या नेतृत्वाखालील मंडळ गेले. आता आमची समजूत पटली. आम्ही जैसे थे करारावर सही करावयास तयार आहोत म्हणून सह्या करायचे ठरले आणि एकोणतीस नोव्हेंबरला 'जैसे थे' करारावर सह्या झाल्या. या सह्यासुद्धा निजामाने काश्मीरमध्ये पाकिस्तानचा नक्की पराभव होतो आहे हे स्पष्ट झाल्यावर व आपण मस्ती केली तर जुनागढप्रमाणे हैदराबादमध्ये सैन्य येईल ही भीती वाटल्यावरच केल्या. अजूनही त्याने एक व्याप पार पाडला. पाकिस्तानला विचारले, हैदराबादवर हल्ला झाला तर तुम्ही मदत कराल का? पाकिस्तानने अधिकृतरीत्या कळविलेले आहे की आपण तुम्हाला काहीही मदत करू शकणार नाही. पाकिस्तान मदत करणार नाही हे कळल्यावर भारत सरकार जुनागढप्रमाणे सैन्य पाठवील हे कळल्यावर आणि काश्मिरात पाकिस्तानचा पराभव झाल्यावर निजामाने 'जैसे थे' करारावर सह्या केलेल्या आहेत. या सह्या झाल्यावर स्वामीजींना तुरुंगातून सोडण्यात आले. स्वामीजी दिल्लीला गेले. सर्वांना भेटले. परत आले आणि पुन्हा अटकेत पडले. तेव्हा निजामाने नव्या वाटाघाटीचे चक्र प्रवर्तित केले. पुन्हा एकदा तेच. वाटाघाटी, वाटाघाटी. आता त्यांचे म्हणणे म्हणजे दोन स्वतंत्र राष्ट्रांची मैत्री झाली. आता आमचा विदर्भ तुमच्याकडे आहे, तो परत केव्हा द्यायचा याचा विचार सुरू करू. या वाटाघाटी कधी संपत नव्हत्या. संपणाऱ्या नव्हत्या. याच वेळी मुन्शींचा माऊंटबॅटन प्रस्ताव येतो. वस्तुतः हा माऊंटबॅटनचा नसून मुळात अलियावर जंगांचा आहे. हा प्रस्ताव असा : - विदेश, लष्कर, नाणी आणि दळणवळण या चार बाबी हैदराबादने भारतावर सोपवाव्या. हैदराबाद हा यापुढे भारतीय प्रशासनाचा भाग असे समजावे. सार्वभौमता भारताची असावी. भारताने हैदराबादकडे एक प्रांत म्हणून पाहावे. हे कलम पहिले. दुसरे कलम असे : हैदराबादला संपूर्ण अंतर्गत स्वायतत्ता असावी. आणीबाणीखेरीज भारताने हैदराबादच्या अंतर्गत व्यवस्थेत हात घालू नये. हैदराबादच्या मंत्रिमंडळात साठ टक्के हिंदू व चाळीस टक्के मुसलमान असावेत. हे मंत्रिमंडळ दहा वर्षे चालावे. दहा वर्षानंतर ते मंत्रिमंडळ जाऊन दुसरे मंत्रिमंडळ यावे. यात ऐंशी टक्के हिंदू व वीस टक्के मुसलमान असावेत. हेही मंत्रिमंडळ दहा वर्षे चालावे. त्यानंतर लोकसंख्यांच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व यावे. नंतरच भारताचे संविधान हैदराबादमध्ये लागू करावे की नाही हे वाटाघाटी करून ठरवावे. या दरम्यानच्या काळात आर्थिक, सामाजिक रचनेत बदल करण्यात येऊ नये. मुसलमानांचे नोकऱ्यातील प्रमाण दर दहा वर्षांना दहा टक्के कमी करावे. यात एकदम बदल करण्यात येऊ नये. हैदराबादला सर्व जगातील देशांत व्यापारी प्रतिनिधी ठेवण्याचा अधिकार असावा. हे प्रतिनिधी राजकीय कार्य करणार नाहीत. आणि करावयाचे असेल तर भारत सरकारच्या नेतृत्वाखाली करतील आणि हे सर्व हैदराबादमध्ये करावयाचे असल्याने भारत सरकारने हैदराबादच्या सरहद्दी बदलू नयेत.
जर हा अलियावर जंग प्रस्ताव मान्य झाला असता तर संयुक्त महाराष्ट्र नाही, विशाल आंध्र नाही, कर्नाटक नाही, म्हणून देशाची भाषावार प्रांतरचना नाही. भारतीय घटना हैदराबादला लागू नाही, तिथून दहा दहा वर्षे जात जात आज आपण संविधान लागू करावयाचे की नाही याचा विचार करीत बसलो असतो. तोपर्यंत हैदराबादवर मुसलमान जमीनदारांचे वर्चस्व कायम राहते. उर्दू माध्यम शिल्लक राहिले असते. मोहरमला घरेदारे बंद करून आपले मंगल सोहळे चोरासारखे उरकावे लागले असते. हे सारे अलियावर जंग प्रस्तावात होते. या प्रस्तावाला सरदार पटेल आणि नेहरू यांनी शेवटच्या क्षणी अत्यंत दुःखाने मान्यता दिली. पटेलांनी मान्यता द्यावी याचे मेननना अत्यंत आश्चर्य वाटले. मेनन पटेलांना म्हणाले, “जरा थांबा, हा प्रस्ताव निजामच फेटाळील अशी माझी खात्री आहे. तुम्ही जरा गंमत पाहा." माऊंटबॅटन आणि पटेल यांना प्रस्ताव मान्य असल्यामुळे नेहरूंनी त्याच्यावर एक टिपण लिहिले आहे - 'मला हा प्रस्ताव मुळीच मान्य नाही. पण माऊंटबॅटन व सरदार यांना तो मान्य असल्याने मी याला संमती देतो आहे. पण माझी सर्व बुद्धी मी या प्रस्तावातून अंग कसे काढून घ्यावे यासाठी वापरीन.' म्हणजे कुरकुरत का होईना सर्वांची संमती झाली. या संदर्भात सरळ निजामाशी वाटाघाटी केल्या पाहिजेत यासाठी माऊंटबॅटन यांनी आपला निजी सचिव कॅम्बल जॉन्सन याला मार्चच्या पहिल्या आठवड्यात हैदराबादला पाठविले, त्याच्या व निजामाच्या अठेचाळीस मार्चच्या पहिल्या आठवड्यात वाटाघाटी झाल्या. कॅम्बल जॉन्सन यांनी असे स्वच्छ लिहिले आहे की आजही हैदराबादची सर्व सूत्रे निजामाच्या स्वतःच्या हातात आहेत. हे मी आपल्याला मुद्दाम अशासाठी सांगतोय की कन्हैयालाल मुन्शींनी जे सातत्याने सांगितले आहे की एक नोव्हेंबर सत्तेचाळीस नंतर हैदराबादची सूत्रे निजामाच्या हाती नव्हती; जे घडले, त्यासाठी पोलिस कारवाई करावी लागली, त्याचा दोष निजामाच्या माथी मारू नका. त्या बिचाऱ्याचे काही चालत नव्हते. तो हतबल होता, वगैरे वगैरे. ते खरे नाही. हा वकील भारताचा, पण हैदराबादमध्ये बसून निजामाचे हितसंबंध कसे सांभाळता येतील याचा विचार करीत होता. ही आमच्याच वकिलाची देशद्रोही कृती होती. या देशद्रोहीपणाची तपशिलवार सर्व माहिती मी 'पोलिटिकल एजंट' या माझ्या लेखात काही वर्षांपूर्वी दिली आहे. (प्रस्तुत लेख याच पुस्तकात आहे - संपादक) हे मी अशासाठी सांगतोय की, माऊंटबॅटन प्रस्तावाला काँग्रेसने मान्यता दिली असा प्रचार करणारा एक गट काँग्रेसमध्येच होता. त्यात जनार्दनराव देसाई, काशिनाथराव वैद्य, बी. रामकृष्णराव अशी बडी मंडळी होती. ही साठ/चाळीस प्रमाण मान्य असणारी मंडळी. यांनी हा प्रस्ताव आमचे नेते तुरुंगात असताना मान्य केला. नंतर याच्यासाठी वल्लभभाईंवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. हा दबाव एन.गोपाळस्वामी अयंगार यांचे मार्फत या ज्या मंडळीने आणला त्यांत कन्हैयालाल मुन्शीही होते. याला निजामाची मान्यता मिळावी असा प्रयत्न हिंदुस्थान सरकार करीत होते. हिंदुस्थान सरकारची मान्यता मिळवी: असा प्रयत्न अलियावर जंग करीत होते. काँग्रेसची मान्यता मिळावी असा प्रयत्न कन्हैयालाल मुन्शी करीत होते. तोवर धूर्त निजामाने आणखी एक पिल्लू सोडून दिले होते. इथपर्यंत आलोच आहोत तर आपणाला ब्रिटिश कॉमनवेल्थचा सभासद व्हायला मान्यता मिळावी. वा रे वा धूर्त निजाम! म्हणजे हैदराबादला ब्रिटिश कॉमनवेल्थचे सभासदत्वही मिळाले; पाकिस्तान-भारत असे युद्ध झाले तर तटस्थ राहण्याचा अधिकारही मिळाला आणि इंग्लंड व भारत यांचे फाटले व भारत कॉमनवेल्थमून बाहेर पडला तर हैदराबादला भारतातून बाहेर पडण्याचा संभव मिळाला. निजाम हे धाडस करतो कारण त्याला माऊंटबॅटन यांची सहानुभूती मिळणार ही त्याची खात्री; कारण माऊंटबॅटन इंग्रज. याला ब्रिटिश सरकारचीही सहानुभूती असणार, कारण ते सारे इंग्रज. इंग्रजांची सहानुभूती आपल्याच बाजूला राहील याची काळजी निजामाने घेतलेली. म्हणून हैदराबादचा प्रश्न इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये तीन दिवस चर्चिला गेला. हैदराबादचे स्वातंत्र्य जतन करण्याच्या दृष्टीने ब्रिटिश सरकारने पावले टाकावी अशी मागणी विरोधी पक्षाचे नेते चर्चिल यांनी केली. पण ॲटलींनी जे प्रश्न विचारले त्यांना चर्चिलजवळ उत्तर नव्हते. नेहरू हे अतिशय धूर्त राजकारणी व मुत्सद्दी होते हे मी पहिल्या व्याख्यानात सांगितले. स्वातंत्र्याचा कायदा होत असतानाच पंडित नेहरूंनी सर्व सावधगिरी आधीच घेऊन ठेवलेली होती. ती अशी - इंग्रजांचे राज्य संपून भारत आणि पाकिस्तान अशी दोन नवी राष्ट्र निर्माण होत आहेत हे त्यांनी नाकारले. नवे निर्माण होत आहे ते फक्त पाकिस्तान. तेही ब्रिटिश इंडियाचा काही भाग वेगळा होऊन. ब्रिटिश इंडियाची इतर सर्व वारसदारी ज्याच्याकडे येऊन पोहोचते असे भारत हे राष्ट्र पूर्वापार चालते आहे. नेहरूंची ही भूमिका प्रतिगामी मानली गेली. नवीन भारत निर्माण झाला असे नेहरू मानीतच नाहीत. जुन्या ब्रिटिश सरकारच्या पाकिस्तान सोडून उरलेल्या सर्व वारशाचे ' वारसदार जुने भारत आहे, अशी नेहरूंची भूमिका. त्या भूमिकेला चर्चिलने मान्यता दिलेली. कारण इंग्लंडच्या प्रथेप्रमाणे नवा कायदा बनताना विरोधी पक्षनेत्याचा सल्ला घेतला जात असे. तिथे आजच्या भारतासारखे नाही. इथल्या आजच्या पंतप्रधान स्वतःच्या मंत्रिमंडळालाही न विचारता कामे करतात, तिथे विरोधी पक्षाचे काय? इंग्लंडमध्ये विरोधी पक्षनेत्याला विचारले जाते. चर्चिलला विचारले गेले होते व त्याने संमती दिली होती. ॲटलीने चर्चिलला विचारले, जुन्या ब्रिटिश सरकारचे सर्व संस्थानांवर संपूर्ण सार्वभौमत्व होते. ते अधिकार कायद्याने नव्या भारत सरकारच्या स्वाधीन झालेले आहेत, हे आपण नाकारता काय? जुन्या ब्रिटिश इंडियाच्या व्हाइसरॉयला, राजाला पदच्युत करण्याचे, संस्थान खालसा करण्याचे अधिकार होते हे तुम्ही नाकारता काय? संस्थानात फौजा नेण्याचे अधिकार ब्रिटिश सरकारला होते, हेही तुम्ही नाकारता काय? शस्त्रे घ्यावयाची असतील तर ती कोणत्याही राष्ट्राचे निजामाशी संबंध भारत सरकारच्या मर्जीने व त्याच्या मार्फतच राहावे लागतील. भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्याचा हा जो भाग पंडित नेहरूंनी अट्टाहासाने घडवून घेतला त्यावर तुमच्या आमच्या सह्या आहेत हे ॲटलीने चर्चिलला पटविले. अशा अवस्थेत आपला हैदराबादशी आता संबंध नाही असे ॲटलीने म्हटल्यावर चर्चिलकडे उत्तर नव्हते. निजाम, चर्चिल आणि उपद्व्यापी जग यांच्यावर नेहरूंनी आधीच मात करून ठेवलेली होती. चर्चिलकडे उत्तर नसल्याने ‘सरकार हटवादी आहे' असे म्हणून त्याने सभात्याग केला. त्यानंतर हैदराबादचा प्रश्न ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कधीच निघाला नाही.
पंडित नेहरूंनी हे जे उद्योग मुत्सद्दीपणाने आणि दूरदर्शीपणाने गुपचूप केले आहेत, त्यामुळे जगातील कोणत्याही राष्ट्राला हैदराबादला सैन्य/शस्त्रे पाठविणे अधिकृतपणे शक्य नाही. ते भारत सरकारच्या व्दारेच पाठविली जाऊ शकतात. इंग्लंडमधून निजामाला मदत जात नाही हे पाहण्याची जबाबदारीच ब्रिटिश सरकारची होती. दुसऱ्या कोणत्या मार्गाने जर हैदराबादमध्ये शस्त्रास्त्रे जाणार असतील तर तेही हाणून पाडणे हेही काम ब्रिटिश सरकारवर आलेले होते. त्यामुळे इंग्लंड अडकून पडले. चर्चिलला सभात्यागाने प्रतिष्ठा सांभाळावी लागली. तुर्कस्तान, इराण, सौदी अरेबिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, पोर्तुगाल, झेकोस्लोव्हाकिया इतक्या देशांमध्ये निजामाने शस्त्रास्त्रांची मागणी केली. पण ती शस्त्रास्त्रे हैदराबादला पोचायला अधिकृत मार्गच नव्हता. हा पंडित नेहरूंचा शहाणपणा.
सामान्यत्वे आपली पद्धत अशी आहे की, ज्यांनी आपल्या देशार्थ जीवन घालविले त्यांना स्वातंत्र्याविषयी आस्था नाही असे आपण मानतो व ज्याचा आपला स्वातंत्र्याशी काही संबंध नाही त्यांचा स्वातंत्र्यावर हक्क जास्त आहे असे आपण मानतो. ज्यांनी राजकारणासाठी बुद्धीचा यज्ञ केला त्यांना बुद्धीच नाही असे आपण घरबसल्या म्हणतो. पंडित नेहरू अशा अनधिकारी टीकेचे अनेकदा बळी झाले आहेत. अशी टीका करण्यापूर्वी त्यांनी किती सुबुद्ध दूरदर्शीपणाने हा प्रश्न सांभाळला होता याचा अभ्यास आपण केला तर बरे.
नेहरूंनी काळजी घेतली होती म्हणून निजामाला चोरट्या मार्गाने शस्त्रे आयात करावी लागली. झेकोस्लोव्हाकियाने पोर्तुगालला शस्त्रे दिली. पोर्तुगालने ती आपली भूमी गोवा इथे उतरवून घेतली. गोव्यातून ती शस्त्रे विमानाने हैदराबादला चोरून पोचविण्याचे काम प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय तस्कर सिडने कॉटन याने केले. विमानातून जातील अशीच हत्यारे निजाम आणू शकला. तोफा, रणगाडे, रणगाडेविरोधी तोफा, विमान विरोधी तोफा अशी अवजड हत्यारे निजामाला मिळू शकली नाहीत. ती अधिकृतरीत्या आणायला परवानगी नव्हती. चोरून आणता येत नव्हती म्हणून निजामाची कोंडी झाली. या अवस्थेमध्ये एकवीस मार्च अठेचाळीसला शेवटी माऊंटबॅटन गेले. राजगोपालाचारी गव्हर्नर जनरल झाले. त्याच्या पुढच्या आठवड्यात अचिनलेक गेले व जनरल करिअप्पा हे भारताचे सरसेनापती झाले. हे सरसेनापती झाल्याबरोबर पुढच्याच आठवड्यात हैदराबादभोवती प्रचंड आर्थिक कोंडी उभारण्यात आली. हैदराबादचे नाणे हे हिंदुस्थानात व आंतरराष्ट्रीय बाजारात बेकायदा करण्यात आले. निजामाचे म्हणणे पडले की त्याच्या नाण्याला जगभर मान्यता असल्याने ते बेकायदा ठरविण्याचा अधिकार भारत सरकारला नाही. भारत सरकारचे म्हणणे की हैदराबाद हे एक संस्थान असल्यामुळे त्याचे हिंदुस्थानबाहेरचे सर्वच संबंध नियंत्रित करण्याचे संपूर्ण अधिकार भारत सरकारला आहेत. हैदराबादचे वीस कोटी रुपये स्वीस बँकेत होते. ते त्याने पाकिस्तानला मदत म्हणून देऊ केले होते. भारत सरकारने स्वित्झर्लंडला कळविले की त्यातला अधेलाही जर पाकिस्तानला गेला तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय करारांचा भंग केला म्हणून राष्ट्रसंघापुढे खेचू. स्वित्झर्लंडच्या भूमिकेला जी राष्ट्र पाठिंबा देतील त्या सर्वांशी व्यापारी संबंध तोडू. इंग्लंडने या भूमिकेत आम्हाला पाठिंबा दिला नाही तर ब्रिटिश राष्ट्रकुलातून बाहेर पडू. त्यामुळे इंग्लंडने स्वित्झर्लंडला सांगितले की यातली एकही पै पाकिस्तानला स्वित्झर्लंडने वर्ग केली तर ते स्वित्झर्लंडचे कृत्य इंग्लंड व भारत विरोधी शत्रुत्वाचे कृत्य मानले जाईल. क्लेमंट ॲटलीला असे सांगण्यात आले की, संस्थानला विदेश संबंध जोडता येणार नाहीत हा तुमचा करार आहे. आम्ही त्याचे वारस आहो. तुमचाच करार तुम्ही मोडला तर भारतात जे तीनशेपंचेचाळीस कोटी ब्रिटिश भांडवल आहे त्याचे आम्ही राष्ट्रीयीकरण करून टाकू. त्याचा कोणताही मोबदला देणार नाही. इंग्लंडसमोर प्रश्न असा की हिंदुस्थानला राष्ट्रकुलाबाहेर जाऊ द्यायचे, स्वतःचे तीनशेपंचेचाळीस कोटी रुपये बुडवायचे, हे कशाकरिता? निजामाचे वीस कोटी रुपये पाकिस्तानला मिळावे म्हणून. सांगितला आहे कोणी हा अव्यापारेषु व्यापार? हे नेहरूंचे शहाणपण, निजाम, पाकिस्तान, ॲटली चर्चिल, इंग्लंड, स्वित्झर्लंड आणि सारे जग यांना अंगठा चोखत बसविणारे. आणि आपण घराच्या पागोळीला बसून टीका करणार की नेहरूंना अक्कल नाही.
हिंदुस्थान सरकारचे हे सगळे उद्योग चालू होते. पण अजून सैन्य पाठविता येत नव्हते, कारण अजून माऊंटबॅटन होता. तो जाताच नाकेबंदी सुरू झाली. इथवर आपण पूर्वीच आलो होतो. नाकेबंदी होताच निजामाला परिस्थितीच्या गांभीर्याची कल्पना आली. त्याचे डोळे उघडले. त्याने भारत सरकारला लिहिले : माऊंटबॅटन प्रस्तावाला माऊंटबॅटन, नेहरू आणि वल्लभभाई यांनी संमती दिलेली होतीच. करार करण्याचे ठरलेलेच होते. आम्ही तयारच होतो. काही किरकोळ मुद्दे स्पष्ट व्हायचे राहिले होते. एवढ्या प्रदीर्घ वाटाघाटीनंतर किरकोळ मुद्द्यासाठी करार अडकणे बरे नाही. तेव्हा आमचे शिष्टमंडळ वाटाघाटी करायला तयार आहे. आम्ही देवाणघेवाण करायला तयार आहोत. यावर वल्लभभाईंनी निजामाला कळविले : माऊंटबॅटन प्रस्ताव आता इंग्लंडला निघून गेला आहे. बिनशर्त भारतात विलीनीकरण एवढेच आता बाकी आहे. वल्लभभाईंचे प्रसिद्ध वाक्य असे आहे : Mountbatten proposal has been sent in March to England. What remains now is unconditional accession to India. हे उत्तर वल्लभभाई जाहीर बोललेले नाहीत. ते लेखी कळविले आहे. पण ते कळविण्यापूर्वी त्यांनी नेहरूंची संमती घेतली होती असे दिसते. कारण एप्रिल महिन्यामध्ये काँग्रेसचे अधिवेशन मुंबईला भरले होते. या अधिवेशनात बोलताना नेहरूंनी लष्करी कारवाईचा पहिला सूतोवाच केला. हा सूतोवाच वल्लभभाईंनी केलेला नाही. नेहरूंनी केलेला आहे. या अधिवेशनात नेहरूंनी जाहीर रीतीने सांगितले : आम्ही शांततावादी आहोत. सर्व प्रश्न शांततेने सुटावे असा आमचा प्रयत्न राहिलेला आहे. याहीपुढे सर्व प्रश्न शांततेने सुटतील याचा आम्ही प्रयत्न करू. पण वाटाघाटी आणि वाट पाहणे याला मर्यादा आहेत. हैदराबादला स्वतंत्र होण्याची संधी कधीही मिळणार नाही. हैदराबादने भारतात विलीन झालेच पाहिजे. बिनशर्त. कारण हैदराबाद हे अखेर एक संस्थान आहे. प्रश्न वाटाघाटीने आणि शांततेने सुटावा या आमच्या इच्छेबाबत काही मंडळींच्या मनात गैरसमज दिसतो. ते विचारतात प्रश्न वाटाघाटींनी सुटलाच नाही, तर पुढे काय? या सर्वांनी हे लक्षात ठेवावे, लष्करी कारवाईची शक्यता आम्ही नाकारलेली नाही. नेहरू मुंबईत बोलले. त्याच्या पुढच्या आठवड्यात पटेलांनी दिल्लीत जाहीर केले की आता शहाणपणा लवकर शिकणे निजामाच्या हिताचे आहे. नाहीतर माझे हे जाहीर आश्वासन आहे की, हैदराबाद जुनागडच्या मार्गे जाईल. मे महिन्यात त्यांनी अंतिम इशारा दिलेला आहे : 'जैसे थे' कराराचे भंग इतके आहेत की त्याचे परिणाम गंभीर होतील. आता निजाम वाटाघाटीचे वेगवेगळे प्रस्ताव मांडीत आहे. पण आता वाटाघाटीला कोणीही तयार नाही. या अवस्थेमध्येच नानज प्रकरण घडलेले आहे. हे नानज प्रकरण काय आहे? हे नानज प्रकरण असे - काही गावे अशी होती की ती निजामाच्या मालकीची होती पण भारताच्या सरहद्दीत होती. सर्व बाजूने भारतीय प्रदेशाने वेढलेली होती. या उलट काही गावे भारताच्या मालकीची पण निजामाच्या हद्दीने वेढलेली होती. आणि हे सगळे सरहद्दीच्या प्रदेशात इकडे एखादा मैल - तिकडे एखादा मैल असे होते. यातील जी गावे निजामाची पण भारताच्या हद्दीत होती ती भारत सरकारने ताब्यात घेतली. प्रादेशिक सलगतेसाठी ही ताब्यात घेण्याचा आपणास अधिकार आहे असे जाहीर केले. त्यावर निजाम सरकारने असे जाहीर केले की आमच्या हद्दीत असणारे भारताचे नानज गाव आम्ही ताब्यात घेत आहोत. असे जाहीर झाल्यावर रझाकार तिथे जाऊन बसले. लगेच भारतीय सैन्याची एक तुकडी नानजवर चालन गेली. सव्वीस रझाकार ठार झाले. बाकीचे पळून गेले. भारताने नानज ताब्यात घेतले आणि असे जाहीर केले की नानज तर आम्ही ताब्यात घेतलेच आहे पण मध्ये जो दोन मैलांचा निजामाचा प्रदेश आहे तोही आम्ही ताब्यात घेतलेला आहे. तो सोडण्याचा आमचा इरादा नाही. जे आमचे प्रदेश आहेत ते आमच्याच ताब्यात आहेत पर तुमचे प्रदेश आहेत तेही ताब्यात घेण्याचा आमचा हक्क आहे. कारण आम्ही सार्वभौम आहोत. हे हैदराबादला कळवले मे/जून महिन्याच्या संधिकाली. त्यावर कासिम रझवी म्हणाला, नानजवर हैदराबादच्या लष्कराने ताबा बसविला पाहिजे. सेनापती एल. इद्रुस यांनी सांगितले हैदराबादचे लष्कर नानजवर स्वारी करणार नाही. हिंदुस्थानने जो प्रदेश ताब्यात घेतला तो घेऊ द्या. मी त्या लढ्यात पडणार नाही. कारण भारताशी लढण्याइतके सैन्य आपल्यापाशी नाही. तेव्हा निजामाने विनंती केली की हा प्रश्न राष्ट्रसंघात नेऊ द्यावा. भारताने उत्तर दिले, तुम्हाला राष्ट्रसंघात जाऊ दिले जाणार नाही. पाकिस्तान म्हणाले, हैदराबादचा प्रश्न राष्ट्रसंघात न्यायला आम्ही तयार आहोत. पोर्तुगाल, फ्रान्सनी सांगितले की आम्ही राष्ट्रसंघात हैदराबादला पाठिंबा द्यायला तयार आहोत. त्या वेळी प्रश्न राष्ट्रसंघात चर्चेला घ्यावा की नाही यासाठी तेरा मतांचा पाठिंबा लागत असे. समजा हैदराबादला एवढा पाठिंबा मिळाला तर अशा अवस्थेत भारताची भूमिका काय? वल्लभभाईंनी सांगितले, निरनिराळे जमीनदार त्यांच्या जमीनदारीचे उच्चाटन करताच राष्ट्रसंघात जातो असे म्हणू लागले आहेत. भारत कोणत्याही जमीनदाराला राष्ट्रसंघात जाण्याची परवानगी देणार नाही. निजाम हा एक मोठा जमीनदार असेच आम्ही मानतो, संस्थानिक मानतच नाही. या वेळी हे उघडच झाले की लष्करी कारवाई होणार. त्याचबरोबर हैदराबादहून तारांनी सुरुवात झाली की, इकडे सर्व शांतता आहे. शेवटच्या महिन्यात ज्या तारा गेल्या त्यांत दहा हजार तारा हिंदूंच्या आहेत. शेवटी निजामाला अंतिमोत्तर देण्यात आले की, चोवीस तासांच्या आत तुम्ही अमुक गोष्ट करा, नाहीतर भारतीय फौजा संस्थानात घुसतील.
तेरा सप्टेंबर अठेचाळीसला भारतीय फौजा हैदराबादच्या सरहद्दीत घुसल्या.
हैदराबाद संपू नये, निजाम संपू नये, शरणागती झाल्याच्या नंतर नव्या शांततेच्या वातावरणात भारत आणि निजाम यांच्या वाटाघाटी विलीनीकरणासाठी सुरू व्हाव्या अशी कन्हैयालाल मुन्शींची इच्छा होती. या दृष्टीने त्यांनी पावले टाकायला सुरूवात केली तेव्हा त्यांना बडतर्फ करून परत घेतले. मुन्शींनी त्यांच्या पुस्तकात मूळ तारच उद्धृत केलेली आहे. त्यात मुन्शींना पुढील आज्ञा आहेत : यापुढे आपण कोणत्याच चर्चा करू नयेत. कोणत्याही रीतीने आश्वासने देऊ नयेत. तुमचे काम संपले आहे. तुम्ही गप्प बसावे. शरणागतीचा समारंभ लष्करी आहे. त्याला तुम्ही हजर राहता कामा नये. तुमची प्रकृती बरी नसल्यामुळे तुम्हाला दिल्लीला नेण्यासाठी विमान येत आहे, इत्यादी. ही तार जवाहरलाल नेहरूंची आहे. या तारेचा अर्थ स्पष्टच आहे.
आणखी नेहरूंची एक तार स्वामीजींना आहे, ती अशी : तुम्ही तुरुंगातून सुटलात, अभिनंदन, माझ्याशी चर्चा केल्याशिवाय कोणत्याही प्रश्नावर मत देऊ नये. फक्त लोकांना शांततेचा विचार समजावून सांगावा.
हा जो मुद्दा आहे तो असा. पोलिसी कारवाईत हैदराबाद संपले. यापुढे हैदराबाद नाही. निजाम नाही. मंत्रिमंडळ नाही, वाटाघाटी नाहीत. नव्या वाटाघाटी नाहीत ही नाजूक बाब, सर्वांच्या लक्षात येईल असे नाही. कोणीतरी पटकन असे म्हणेल की निजाम सरकारने जे उपद्व्याप केले, त्याचे गंभीर परिणाम त्याने भोगले. आता निजाम सरकार लौकरच भारतात विलीन होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. म्हणजे विलीन व्हायचे अजून शिल्लक राहिले आहे. असेही स्वयंशहाणे असतात.कारण मुन्शींनी रेडिओवर बोलण्यासाठी जे भाषण निजामाला लिहून दिले त्यात लिहिले आहे की, भारताच्या फौजा या मित्रराष्ट्राच्या फौजा असल्यामुळे आम्ही त्याचे स्वागत करतो. लौकरच शांततेच्या वातावरणात भारत आणि हैदराबाद यांचे चिरंतन संबंध कसे होतील याच्या वाटाघाटी चालू होतील. या दृष्टीने मी जुन्या मंत्रिमंडळाचा राजीनामा स्वीकारून नवे मंत्रिमंडळ प्रिन्स ऑफ बेरार याच्या पंतप्रधानत्वाखाली जाहीर करीत आहे. इत्यादी.
या मंत्रिमंडळात मुसलमान सदस्य कोण घ्यावेत असा सल्ला निजामाने मुन्शींना विचारला. त्यांनी तो दिलाही. एक सेनापती एल.इद्रूस. दुसरे होशियारजंग. तिसरे अबुल हसन सैयदअली. हे अली का? तर सज्जन आणि संयमशील आहेत म्हणून. कोण हे अली? तर इत्तेहादुल मुसलमीनच्या अध्यक्षपदावरून निजामाने बहादुर यारजंग यांना दूर केल्यावर व कासिम रझवीच्या आधी हे त्या संस्थेचे अध्यक्ष होते. कन्हैयालाल मुन्शींनी आपले प्रतिनिधी म्हणून मंत्रिमंडळात सुचविले ते हे. असो. मुन्शींची राजकारणी पात्रता आणि निष्ठा याविषयी एवढे पुरे. त्यांना बडतर्फ करावे लागले यात सारे आले.
आता या मुन्शींनी जे पुस्तक लिहिले आहे त्यात अनेक आरोप आहेत. त्याच्या विश्वासार्हतेविषयी पाहू. हे आरोप म्हणजे पुस्तकाचा ‘सुरस' भाग आहे. मुन्शी म्हणतात जनता बी.रामकृष्णराव यांच्याबरोबर होती. हे खोटे आहे. मुन्शी म्हणतात स्वामीजींची लोकप्रियता घसरली होती. हे त्याहून साफ खोटे आहे. मुन्शी म्हणतात, स्वामीजींनी अहिंसक लढ्याचे आश्वासन पटेलांना दिले होते. हे धादांत असत्य आहे. मुन्शी म्हणतात हिंसक लढे काँग्रेसला बदनाम करण्यासाठी आत शिरलेले कम्युनिस्ट करीत होते. ही शुद्ध थाप आहे. मुन्शींनी त्यांचा इतिहास बहुधा निजामाच्या गोटातच जमा केला असावा.
भारतामध्ये ज्या सशस्त्र आंदोलनाची जबाबदारी संस्थानी काँग्रेसने जाहीरपणे आपली म्हटली असा एकमेव लढा हैदराबादचा आहे. या सशस्त्र लढ्याला स्वामी रामानद तीर्थानी गांधींची संमती मिळविली होती. गांधींनी हे सांगितले होते : इतर सर्व लोक अत्याचारापुढे भेकडासारखे पळून जात असताना तुम्ही अहिंसेने लढलात आणि हौतात्म्य पत्करले तर ते मला आवडेल. पण हातात शस्त्र घेऊन तुम्ही ते न्यायासाठी वापरलेत तर तीही गोष्ट उचित आणि रास्त कारणासाठी होती असे मी मानीन. कन्हैयालाल मुन्शी काय सांगतात त्या प्रश्नाला यापुढे मुळीच किंमत नाही. इथवर मी ठळक ठळक बाबी सांगत आलो. सर्व आंदोलनाचा तपशीलवार जमीनदाराला इतिहास यापेक्षा फार मोठा आहे. तो सर्व लिहावयाचा तर सात-आठशे पानांचा ग्रंथच लिहावा लागेल. तो लिहिला जाईल तेव्हा जावो. पण त्यातला ठळक भाग तरी आपल्यापुढे मांडणे आवश्यक आहे असे मला वाटते. मी तो यथाशक्ति मांडला आहे. महत्त्वाचा असाही पुष्कळ भाग अनुल्लेखित राहिला. कारण वेळ नाही. जो राहिला तो भाग महत्त्वाचा नाही असे मी मानत नाही; तुम्ही मानू नये. या व्याख्यानामुळे काहीजणांना तरी जुना काळ स्मरला असावा. त्या काळची जी मंडळी, केवळ अंधारच समोर दिसत असताना बलिदानासाठी लढ्यात उतरली होती त्यामध्येच आमचे भांगडियाजी होते. त्यांच्या स्मृतीस वंदन करून मी इथे थांबतो.
***