हैदराबाद विमोचन आणि विसर्जन/वेड्या राजकारणाचे आभार
१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला हे स्थूलमानाने खरेच आहे. पण देशाच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्याचा उदय वेगवेगळ्या वेळी झाला. ऐन मध्यभागी म्हणजे पोटात ही स्वातंत्र्य तिथी निराळी आहे. जुनागढच्या जनतेसाठी ही तिथी दि. ९ नोव्हेंबर आहे. गोव्यासाठी १९६१ सालातील तिथीचा विचार करावा लागेल. आम्ही जुन्या हैदराबाद संस्थानचे रहिवासी, आमच्यासाठी स्वातंत्र्याचा जन्म दि. १७ सप्टेंबर १९४८ ला होतो. या सुट्या, अलक्षित विभागाची इच्छा एकच होती ती म्हणजे भारतमातेशी एकरूप होऊन जाणे, म्हणून जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा आम्ही गुलामीत होतो. पण स्वातंत्र्याच्या उत्सवात मनाने सहभागी होतो. आणि जेव्हा आम्ही गुलामीतून मोकळे झालो तेव्हा तर आनंदाला उधाण आले होते. पण त्या दिवसाची स्मृती जतन करण्याची इच्छा नव्हती. सर्वांच्या बरोबर आमचाही स्वातंत्र्य दिवस दि. १५ ऑगस्टच राहिला. हैदराबाद शहरातील केशव-मेमोरियल हायस्कूल सोडले तर १७ सप्टेंबरची आठवण आता कुणी काढीत नाही.
आज इतक्या दिवसांनी जेव्हा मी जुन्या स्मृती चाळवून पाहतो तेव्हा काहीसे चमत्कारिक वाटू लागते. त्यावेळच्या ब्रिटिश भारताला स्वातंत्र्यदिन अतिशय दुःखाचा आणि वेदनेचा होता. जड, भारावलेल्या मनाने, मनातले अतीव दुःख दडपून ठेवीत, ओढलेल्या चेहऱ्याने प्रत्येकजण कर्तव्य म्हणून आनंद व्यक्त करीत होता. त्या दिवशी जनतेचे मन उल्हासाने भरलेले नव्हते. देशभर दंगली चालू होत्या. आपली भयाण व्यथा घेऊन लक्षावधी निर्वासितांचे तांडे येत होते. देशाचे तुकडे पडले होते. गांधीजींनी त्या दिवशी नोआखालीत उपवासच केला. सरदार आणि नेहरूंचे मन मोठे प्रसन्न नसणार. आम्ही अतिशय बेभान आणि आनंदित होतो. त्यावेळी मी वयाने लहानच म्हणजे फक्त पंधरा वर्षांचा होतो. मला फाळणीचे दुःख झाल्याचे आठवत नाही. ठिकठिकाणी हैदराबाद संस्थानभर हा दिवस सत्याग्रहाच्या कार्यक्रमाने गजबजलेला होता. ठिकठिकाणी खाजगी बैठकांतून स्वातंत्र्योत्सव साजरा झाला. त्या दिवशी ज्या खाजगी सभेत मी होतो, तेथे कोण बोलले ते आता आठवत नाही. आमचा स्वातंत्र्य लढा दि. ७ ऑगस्टलाच सुरू झालेला होता. म्हणून कुणीही मोठा नेता नव्हता. सारे अनोळखीच होते. पण तो वक्ता जे बोलला त्याचे सूत्र मात्र आठवते.
तो म्हणाला, “देशाची फाळणी झाली हे फार वाईट झाले. पण फाळणीमुळे हैदराबादचे संरक्षण संपले, मित्रहो! दोन-चार वर्षे चिकाटीने लढा व दम धरा. हैदराबाद संस्थानचा मृत्यू जवळ आलेला आहे."
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेते कै. पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांना मी पुढे विचारले होते की, नेमके फाळणीच्या वेळी तुम्हाला काय वाटले होते? स्वामीजी थंडपणे म्हणाले, त्यावेळी पुष्कळच दुःख झाले होते. पण पिकलेले गळू फुटले म्हणजे थोडे हायसे वाटते, तसेही वाटत होते. फाळणी झाली नसती तर आमच्या गुलामीलाच स्वातंत्र्य समजणे नशिबी आले असते; त्याची मला जास्त चिंता होती.
आम्ही कुणी पाकिस्तानवादी वा फाळणीवादी नव्हतो. उच्चस्वराने अखंड भारताचाच जयजयकार आम्ही करीत होतो. आमच्यापैकी मुलांना पाकिस्तान ही कल्पना नुसती अव्यवहार्य वाटत नसे तर मूर्खपणाची वाटे. आमच्यापैकी कुणी पाकिस्तानची शक्यता किंवा इष्टता सांगितली असती तर, त्याला आम्ही देशद्रोहीच म्हटले असते त्यात शंका नाही. आमचे मुसलमान वर्गमित्र आणि शिक्षक कट्टर पाकिस्तानवादी होते. पण मोठ्यांच्या मनात कुठेतरी भुंगा कुरतडीत होता. भारत अखंड राहीला तर मग आपले काय? फक्त एक शिक्षक याला अपवाद होते. त्यांचे नाव अब्दुल वाहब. ते खादीधारी होते. सारी मुसलमान मुले त्यांचा द्वेष करीत. आमच्या मनात त्यांच्याविषयी भक्तियुक्त आदर होता. ते म्हणाले, भारत अखंडच राहिला पाहिजे. त्यातच मुसलमानांचे हित आहे. आणि अखंड भारतात हैदराबादने सामील झाले पाहिजे. त्यात हैदराबादचे हित आहे. वाहबसाहेब मोठे विद्वान नव्हते. किंवा राजकारणाचे तत्त्वचिंतक नव्हते. ते त्यावेळच्या राष्ट्रीय मुसलमानांप्रमाणे जमीयत उल उलेमाची भूमिका सांगत होते.
जून १९४७ उजाडला आणि आम्ही स्टेट काँग्रेसच्या अधिवेशनासाठी स्वयंसेवक म्हणून मैदानावर दाखल झालो. देशाची फाळणी होणार हे भवितव्य सर्वांच्या समोर होते. अधिवेशनाच्या आधी काही दिवस निजामाने आपण स्वतंत्र राहणार असे जाहीर केले होते. सारेच वातावरण समोर लढा दिसत असल्यामुळे उत्तेजित झाले होते. तरुणांच्यासमोर वोलताना बाबासाहेब परांजपे म्हणाले, “देह साडेतीन हाताचा असतो हे काही दिवस विसरा. त्यातले तीनच हात गृहीत धरा. कारण मरणाला सामोरे जावयाचे आहे." प्रत्यक्ष अधिवेशन दि. ११ जूनला सुरू झाले. तेव्हा फाळणीची योजना जाहीर झाली होती. पण अधिवेशनातील लढाऊ भाषणात मला कुठे फाळणीचे दुःख ऐकल्याचे स्मरत नाही. फाळणीच्या आम्ही सारेच विरोधी होतो. पण प्रत्यक्षात फाळणी झाली तेव्हा आम्हाला स्वातंत्र्याची आशा निर्माण झाली. अशक्य गोष्ट शक्य गृहीत धरून बोलायचे तर, मी असे म्हणेन की, भारत स्वतंत्र होताना जर अखंड राहिला तरीही आम्ही स्वातंत्र्योत्सव साजरा केला असता, पण जड मनाने. फाळणीच्या दुःखाने आजही शोक करणाऱ्यांना हे कळत नाही की, अखंड भारतात आम्ही गुलाम राहिलो असतो. महाराष्ट्र कधी अस्तित्वात आला नसता. भारत कधी बलवान झाला नसता.
पृज्य स्वामीजी म्हणत, हा लढा दुहेरी होता, निजाम, हैदराबादमधील मुस्लिम प्रजा, इत्तेहादुल मुसलमिन, रझाकार आणि सारे शासन हे लढा दडपीत नव्हते. ते आपल्या जुनाट अस्तित्वाच्या रक्षणासाठी लढत होते व नैराश्याने पिसाटपणे वागत होते. रझाकारांचे अत्याचार हा नैराश्याचा उद्रेक होता. त्यांचा लढा हा एक वेडा लढा होता. (दे वेअर मॅड इनसेन यू नो) आणि स्वतःविषयी ते म्हणत, जनता शौर्याने लढत होती आणि माझा लढा ‘भित्रा' म्हणत असे. त्याला स्वतःच्या मरणाची भीती नव्हती. रोज माणसे मरत होती. मधून मधून कार्यकर्तेही हौतात्म्य पत्करीत, त्याची क्षिती नव्हती. स्वामीजींना लढ्याच्या अपमृत्यूची भीती वाटे. दूरदर्शीपणाने निजामाने तडजोड केली तर प्रजेची गुलामी अमर झाली असती. भीती निजाम शुद्धीवर येण्याची होती. तडजोडाची तयारी हे आमचे मरण होते. त्याला मी भीत होतो, असे स्वामीजी म्हणत. स्वामीजी म्हणाले सतत तडजोडीचे प्रयत्न चालू होते. निजामाने भारतात विलीन होण्यास मान्यता द्यावी ह्या मोबदल्यात अनेक सवलतीची आश्वासन दिली जात होती. मॉक्टनपासून नवाब अलीयावर जंग ह्यांच्यापर्यंत अनेजकण समजावणी करीत होते. पुरेसे संरक्षण मागून जर निजामाने भारतात विलीन व्हायचे ठरविले असते तर काय झाले असते? थँक गॉड, ही वॉज मॅड इनफ!
गेली कैक वर्षे मी हैदराबादच्या वागणुकीची संगती लावण्याचा प्रयत्न करीत आहे. पण मला ती सापडत नाही. राजकीय नेते एका धोरणाने वागतात. त्यांना कधी यश येते, कधी अपयश येते. पण त्यांच्या वर्तनामागे संगती असते. जीना असे का वागले येथपासून याह्याखानांनी आततायीपणा का केला याची संगती आपण सांगू शकतो. ‘सरप्राईज' कराचीवर न होता जर विशाखापट्टनम्वर झाले असते, अगर तीन डिसेंबरच्या 'प्रिएम्टीव्ह स्ट्राईक'ला यश आले असते तर आंतरराष्ट्रीय शीतयुद्धाच्या विळख्यात बंगाल सापडला असता हे उघड आहे. याह्याखानाची व्यूहरचना चुकली, अंदाज चुकले म्हणू पण त्या वागण्यामागे संगती होती. निजाम व त्यांचे सहकारी यांच्या वागण्यामागची संगतीच सापडू शकत नाही. स्वामीजी त्याला वेडेपणा म्हणत मलाही दुसरे नाव सुचत नाही.
इ. स. १९४५ नंतर सर्वांनाच हे कळून चुकले होते की, ब्रिटिश साम्राज्य मोठ्या वेगाने संपत आहे. आणि स्वातंत्र्य जवळ येत आहे. सर्व तणावांचा विषय भारत अखंड राहणार की, फाळणी होऊन पाकिस्तान अस्तित्वात येणार हा होता. दि. १ मार्च १९४७ च्या काँग्रेसच्या शिफारशींचा अर्थ जनसामान्यांच्या कदाचित ध्यानात आला नसेल, पण मुत्सद्दयांना तो कळलेला होता. या वातावरणात जर निजामाला हैदराबाद संस्थान हे स्वतंत्र, सार्वभौम राष्ट्र करावेसे वाटले तर त्यात नवल नाही. त्रावणकोर, भोपाळ, इंदूर इतकेच काय, पण औंधसारख्या अति लहान संस्थानिकांच्याही मनात स्वातंत्र्याचा विचार जेथे क्षणभर चमकून गेला तिथे निजामाची भूमिका समर्थनीय नसली तरी स्वाभाविक होती. दीड कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या असणारा प्रदेश एका अनियंत्रित सलतनीत ठेवणे व त्यांचे राष्ट्र बनविणे अशक्य वाटण्याचे निजामाला कारण नव्हते. किंबहुना 'उस्मानीस्तान' कल्पनेचा पुकारा १९३४ सालापासन त्या भूमिकेतूनच होत होता. म्हणून दि. ३ जूनच्या घोषणेचे मला आश्चर्य वाटत नाही. या घोषणेद्वारे निजामाने अधिकृतरीत्या आपण स्वतंत्र राहणार आहो हे घोषित केले.
हैदराबादचा प्रश्न दि. १५ ऑगस्टपूर्वी मिटावा अशी कुणाची कितीही इच्छा असली तरी तो मिटणार नव्हता. हेही सर्वांनी गृहीतच धरलेले होते. दि. १५ ऑगस्ट हा असा दिवस उजाडला की त्या दिवशी इंग्रजी साम्राज्य संपले. भारत व पाकिस्तान ही स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात आली. संस्थानिकांचे इंग्लंडच्या सम्राटाशी असणारे जुने करार संपले. यावेळी जुनागढने आपण पाकिस्तानात जाणार असे घोषित केले. काश्मीरचाही जैसे थे करार पाकिस्तानशी झाला होता. एकटे हैदराबाद मात्र स्वतंत्र होते. तत्त्वतः त्या दिवशी निजाम स्वतंत्र व सार्वभौम होते. हीच परिस्थिती वाटाघाटीचा घोळ घालून नुसती लांबवीत नेली तर हैदराबादचे स्वातंत्र्य केवळ वहिवाटीने स्थापन झाले असते, हे घडविण्याचा सगळा खटाटोप होता. दि. २६ ऑगस्ट १९४७ ला सरदार पटेल म्हणाले हैदराबादेत जनतेचे सार्वमत घ्यावे. जनतेचा निर्णय आम्ही मान्य करू. निजामांनी ही कल्पना फेटाळून लावली. पण स्वामीजीसारख्यांना क्षणभर साशंकता वाटणेही रास्त होते. रझाकारांच्या अत्याचारांनी लोक भयभीत असताना आणि ९० टक्के प्रशासन मुस्लिम असताना सार्वमताचा जुव्वा निजाम खेळले असते तर? बेजबाबदार, विलासी, अत्याचारी राजांना भक्तिभावाने लाखो मते देणारी जनता ज्या देशात आजही आहे, तिथे भारतीय सैन्याच्या ताब्याविना सार्वमत याला अर्थ नसतो. पुढच्या काळात पोर्तुगिजांनी पडद्याआडच्या हालचालीत गोव्याबाबत सार्वमताचा तोडगा सुचविला होता. पण अल्जेरियाच्या अनुभवाने नेहरू सावध झाले होते. त्यांनी ही सूचना फेटाळून लावली असे म्हणतात. सरदारांनीही आपली सूचना फेटाळली जाणार ही खात्री असल्यामुळेच केलेली असावी.
ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात भारत सरकार व हैदराबादच्या वाटाघाटी सुरू झाल्या. दीर्घकाळ चाललेल्या या वाटाघाटींचा मसुदा ऑक्टोबरअखेर मान्य झाला. सर्व संस्थानिकांशी झालेल्या करारात भारतात सामील होण्याची तयारी दर्शवून मग करार झाले होते. हैदराबादच्या बाबतीत अपवाद करण्यात आला होता. भारतात सामील होण्याचे मान्य न करता, आपल्या स्वातंत्र्याच्या भूमिकेशी तडजोड न करता केवळ जैसे थे परिस्थिती ठेवावी असा हा करार होता. परिस्थितीतील तणाव कमी करावा व स्थायी योजनेचा मधल्या काळात विचार व्हावा हीही करारात तरतूद होती. म्हणजे मसुद्यावर स्वाक्षरी करण्यातसुद्धा निजामाने टाळाटाळ केली. करारावर दि. २५ ऑक्टोबरला सह्या व्हाव्यात असे ठरले असतानासुद्धा निजामाने दिनांक पुढे ढकलला. या कृत्याचीही संगती लागू शकते. कारण पाकिस्तानने तसा सल्ला दिला होता. निजामाने असे वागणे म्हणजे शुद्ध फसवणूक होती. पण त्याला संगती होती. भारताने काश्मिरात फौजा पाठविताच निजामाने हा करार मंत्रिमंडळाला मान्य नसल्याचे कळविले. यानंतर वाटाघाटीचे दुसरे पर्व सुरू झाले. वाटाघाटी अंतिमतः फसल्या तर आपण पाकिस्तानशी वाटाघाटी करू अशी धमकीही याच काळात दिली गेली. वाटाघाटीस पुन्हा आरंभ झाला व जैसे थे करारावर दि. २९ नोव्हेंबर १९४७ ला स्वाक्षऱ्या झाल्या.
पाकिस्तान काश्मिरात विजयी होऊ शकत नाही. मंदगतीने का होईना पण पाक सैन्याची पिछेहाटच चालू आहे. पाकिस्तानची सेना भारतीय सेनेला तडाखा हाणू शकत नाही ही खात्री एव्हाना निजामाला पटली होती. कोणत्याही संस्थानाबाबत आपण जनतेची इच्छा प्रमाण मानू. त्या इच्छेला डावलून केलेली कृती आपण मान्य करणार नाही हे वेळोवेळी भारताने सांगितले होते. हे सांगणे म्हणजे केवळ भाषण नव्हते. जुनागढने हा इशारा डावलून पाकिस्तानात जायचे ठरविले. दि. १३ सप्टेंबर १९४७ ला जुनागढचे पाकिस्तानात सामीलीकरण पाकिस्तानने मान्य केले. जुनागढ प्रकरण युनोकडे न्यावे, असा माऊंटबॅटन यांचा सल्ला होता. तो नेहरू-सरदारांनी फेटाळला आणि फौजा पाठवून दि. ९ नोव्हेंबरला जुनागढचा ताबा घेतला. या घटनेमुळे हैदराबादला एक गोष्ट स्पष्ट झाली होती, जर हैदराबादने स्वतंत्र राहण्याचे ठरविलेच अगर पाकिस्तानात जायचे ठरविले तर भारताच्या सेना संस्थानात घुसतील, आणि त्यावेळी पाकिस्तान अगर ब्रिटन साह्य करू शकणार नाही. निजामाची तिसरी आशा भारतीय मुसलमान ही होती. जर वेळ आली तर ते बंड करतील ही शक्यता वरील दोन घटनांच्यामुळे मावळली होती. हा सारा सारासार विचार करूनच निजामाने जैसे थे करारावर स्वाक्षरी केली होती.
जी धडपड त्रावणकोर, भोपाळने करून पाहिली ती हैदराबादने अधिक नेटाने केली. दीर्घकाळ केली इतकेच ह्या वेळपर्यंतच्या घटनांच्यावरून सांगता येईल. नसलेली स्वातंत्र्य निर्माण करण्याचा हा एक फोल प्रयत्न होता असे आपण म्हणू. पण जगण्याला संगती होती. जैसे थे कराराने दोघांनाही उसंत मिळाली होती. मिळाली उसंत स्वतःला बलवान करण्यासाठी वापरावी ही दोघांचीही इच्छा होती अखेर काश्मीर प्रश्नावर नेहरू युनोत गेले. आणि त्या जागतिक संघटनेच्या व्यासपी चर्चासत्राचा आरंभ झाला. हिवाळा संपताच मार्च १९४८ मध्ये पुन्हा लढाईला लागले. यावेळी पाकिस्तानचा प्रतिकार अधिक तीव्र जोरदार होता. पण पाकिस्तानची शक्ती कितीही वापरली तरी त्याचा परिणाम भारताची आगेकूच मंद करण्यात होतो. भारताचा पराभव करता येत नाही हे पुन्हा सिद्ध झाले. जैसे थे करारानंतरच्या काळात पाकिस्तानने हैदराबादला स्पष्टपणे हे कळविले होते की, जर भारताने सेनाबलाचा वापर केला तर, पाकिस्तान भारताचा तीव्र निषेध करील पण सैनिकी साह्यता करू शकणार नाही. पाकिस्तानचे म्हणणे असे होते की, आम्ही जास्तीत जास्त काय करू शकतो? फार तर पाकिस्तान भारताशी युद्ध सुरू करील. ते काश्मीर प्रश्नावर चालूच आहे. पण त्यामुळे हैदराबादचा बचाव होणे शक्य नाही. म्हणून हैदरावादने स्वतःचा विचार स्वतः करणे बरे. हा प्रश्न युनोत न्यावयाचा असेल तर आम्ही संपूर्ण साह्य करू.
ब्रिटनने मॉक्टन व माऊंट बॅटन यांच्या द्वारा तीन बाबी स्पष्ट केल्या होत्या. प्रथम म्हणजे ब्रिटन हैदराबादसाठी हस्तक्षेप करणार नाही, सैनिकी साह्यता सोडाच, पण शस्त्रसाह्यही देणार नाही, जगातील वडी राष्ट्रे याबाबत मध्ये पडणार नाहीत. कारण ब्रिटन भारताला राष्ट्रकुलाबाहेर जाण्यास भाग पाडणार नाही. ब्रिटनकडे असलेले हैदराबादचे पैसेसुद्धा भारत सरकारच्या संमतीविना हैदराबादला वापरता येणार नाहीत. दुसरी बाब म्हणजे ब्रिटन हैदराबादच्या प्रश्नावर तटस्थ राहील. युनोत पाठिंबा देणार नाही. तिसरी सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे भारतासमोर चार-दोन आठवडेही टिकणे हैदराबादला शक्य नाही. आणि भारत सरकार शेवटी सैनिकी कारवाई करील हे नक्की समजावे. याच बाबी मेहदी नबाब जंग, मंजूर यारजंग, अलियावर जंग निजामाला आतून समजावीत होते. असेही म्हणतात की भोपाळच्या नबाबांनी आपला दूत पाठवून निजामाला हा सल्ला दिलेला होता की, भारताकडून मिळणाऱ्या सवलती तात्काळ स्वीकारा, नाहीतर भविष्य वाईट आहे. तरीही हैदराबाद भारतात सामील होण्यास तयार नव्हते. कासीम रजवी तर रोज मुंबई-मद्रास जिंकून, दिल्लीवर आसफजाही ध्वज फडकविण्याची भाषा बोलत होता. मधून मधून एक कोटी वीस लक्ष हिंदूंची कत्तल करून टाकण्याची भाषाही बोलत होता. कशाच्या जोरावर ही सारी मगरुरी चालली होती; कुणाचा आधार होता, हेच कळत नाही.
एप्रिल १९४८ मध्ये माऊंट बॅटन यांना परतण्याचे वेध लागलेले होते, हैदराबाद प्रश्न अर्धवट ठेवून जाण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यांनी एक शेवटची योजना तयार केली. त्या योजनेप्रमाणे निजामाने भारतात सामील व्हावे. त्यांना अंतर्गत कारभारात पूर्ण स्वायत्तता असावी. क्रमाक्रमाने व टप्प्या-टप्प्याने हैदराबाद राज्यात लोकशाही राजवट यावी असे ठरत आहे. नेहरू-पटेलांनी मोठ्या कष्टाने या योजनेला संमती दिली होती. तुरुंगात स्वामीजींच्या कानावर तपशिलाने ही योजना घालण्यात आली होती. पुढे स्वामीजी मला म्हणाले, या योजनेला कष्टाने संमती देताना आपण स्वातंत्र्याचे प्रेतही थडग्यात पुरून टाकत आहो असे मला वाटत होते. पण माझा निरुपाय होता. आपण जूनमध्ये परतत आहो त्यापूर्वी हैदरावाद प्रश्र जर संपला नाही तर आपल्या मागे भारतीय फौजाच तो प्रश्न सोडवतील. १९४८ सालचा काश्मीरातील ऑक्टोबर सहलीचा काळ येण्यापूर्वी भारतीय सैन्य हैदराबादचा प्रश्न संपवील. त्यानंतर काहीच शिल्लक राहणार नाही. म्हणून मी जाण्यापूर्वी संधी करा असे परोपरीने माऊंटबॅटन सांगत होते. पण निजामाला ते पटले नाही. दि. २१ जून १९४८ ला माऊंटबॅटन परतले आणि वाटाघाटीही बंद झाल्या. हैदराबादभोवती भारतीय फौजा क्रमाने जमत होत्या, ही गंभीर परिस्थिती पाहून निजामाने पुन्हा वाटाघाटीची इच्छा दर्शविली. माऊंटबॅटन योजनेचा विचार करण्यास आपण तयार आहो हेही सुचविले. पण भारतीय प्रतिसाद त्याला मिळाला नाही. माऊंटबॅटन योजनेतील काही तत्त्वे आपण बदलण्यास तयार आहो असेही निजामाने सांगितले. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. चोरटी शस्त्रे आणण्याचे सिडने कॉटनचे प्रयत्न, हैदराबाद प्रश्न युनोकडे नेण्याचा मोईन नवाज जंगाचा प्रयत्न हे खरे म्हणजे मुस्लिम जनतेचे धैर्य टिकविण्याचे प्रयत्न होते.
दि. १३ सप्टेंबरला पोलिस अॅक्शन सुरू झाली. दि. १७ सप्टेंबरला हैदराबादचा पाडाव झाला. मनोधैर्य इतके खचलेले होते की, भारतीय सैन्याला प्रतिकार असा फारसा झालाच नाही. लष्कराने लढणे टाळले. रझाकारही कुठे लढले नाहीत. सेनेला अडविण्यासाठी पूल उडविले नाहीत. शिस्तीत माघारसुद्धा घेतली नाही. वाट फुटेल तिथे लोक पळाले. फौजा समोर येताच शरण आले. आततायी हेकटपणा म्हणावा तर चिवट प्रतिकार नाही. निदान काही काळ तर लपून घातपात करावे, तेही नाही. इतके जर मन कच्चे होते, सामर्थ्य दुबळे होते, तर वेळीच तडतोड करावी हेही नाही. अशी निजामाची व हैदराबादी नेत्यांची वागणूक राहिली. ह्या वागणुकीची संगतीच लागत नाही.
तरीही या वेड्या आणि भेकड नेत्यांचे आम्ही ऋणी आहो. ते थोडे जरी समंजसपणे वागते तर आम्ही गुलामच राहिलो असतो. कायम गुलाम कुणीच राहात नाही हे खरे! पण तीन दशकांची गुलामी तरी तोंड दाबून सहन करणे भाग पडले असते. दुबळ्यांची उर्मट भाषा व अहंता आम्हाला आधार झाली हेच खरे.
***
(प्रकाशन : 'महाराष्ट्र टाइम्स' दि. १५-८-१९७२)