‘चैतन्य’ चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व
शशीताई राजगोपालन
पहिली मराठी आवृत्ती :
५ ऑगस्ट, २०२०
प्रकाशक :
सुरेखा श्रोत्रीय,
चैतन्य संस्था,
राजगुरुनगर, पुणे.
मुख्य कार्यालय :
मोती चौक, राजगुरुनगर,
ता.खेड, जि. पुणे ४१० ५०५.
फोन नं. (०२१३५) २२३१७६, २२६५८०.
महिला प्रशिक्षण व संसाधन केंद्र :
संगम क्लासिक, वाडा रोड, राजगुरुनगर, ता.खेड,
जि. पुणे ४१० ५०५.
फोन नं. (०२१३५) २२६५९३.
ई-मेल : info@chaitanyaindia.org
वेबसाईट : www.chaitanyaindia.org
मुद्रक :
प्रबोध संपदा
१२४८, शुक्रवार पेठ, सुभाषनगर, गल्ली क्र. ५,
पुणे ४११००२
क्र. | तपशील | पान |
---|---|---|
१.
२. ३. ४. ५. ६. ७. ८. ९. १०. |
प्रस्तावना
शशी रेखा राजगोपालन - जीवनक्रम शशीताईंचे बालपण स्वयंसेविकेच्या भूमिकेत स्वावलंबन व सहकाराकडे वाटचाल शशीताईंची गुणवैशिष्ट्ये शशीताईंकडून आर्थिक सहाय्य लाभलेल्या संस्था शशीताई आणि मी शशीताई आणि चैतन्य शशीताईंच्या जीवनातून समजलेल्या गोष्टी |
५
८ १० १२ १४ १८ २७ ३४ ३९ ४५ |
परिशिष्ट १ - स्वनियंत्रण पुस्तिका मालिका | ४६ |
सर्वप्रथम मी माझ्या शाळेची मैत्रीण रितू भार्गव हिच्याबद्दल मला वाटत असलेले ऋण व्यक्त करते. कारण तिनेच मला शशीताईंबद्दल लिहिण्यास प्रोत्साहित केले. माझी दुसरी एक मैत्रीण दीपा अय्यर हिने पुस्तक का लिहावे, कसे लिहावे ह्याची चिंतन प्रक्रिया पुढे नेली.
शशीताईंच्या इच्छापत्रातून चैतन्य संस्थेसोबत ज्या संस्थांना त्यांच्या संपत्तीतील वाटा मिळाला त्या सर्वांनी आवर्जून शशीताईंबद्दल त्यांची मनोगते/आठवणी लिहून पाठवल्या. या संस्था आहेत, १. “एकल नारी महिला संघ', उदयपूरच्या पद्मश्री जिनी श्रीवास्तव, २. सहकार विकास फौंडेशन (सी.डी.एफ.-सहविकास) आंध्र प्रदेशच्या जयाप्रदाताई आणि लक्ष्मण भाऊ, ३. गुरुकुल बोटॅनिकल सँक्च्युअरी सोसायटी, वायनाड, केरळच्या सुप्रभाताई, ४. सेंटर फॉर इंडीजीनस नॉलेज सिस्टीम, (सी.आय.के.एस.) चेन्नईचे डॉ.बाळकृष्ण. या निमित्ताने या सहप्रवासींबरोबर 'चैतन्य'चे नाते पुन्हा घट्ट झाले.
शशीताईंच्या सोबत काम केलेल्या रमाताई, श्यामला नटराजन आणि नंदिता रे यांनी त्यांच्या आठवणी लिहून पाठवल्या. एपिमासने (आंध्रप्रदेश महिला अभिवृद्धी संगम) शशीताईंच्या स्मरणाप्रीत्यर्थ, २२ ऑक्टोबर २०११ रोजी स्वावलंबी सहकारी संस्था ह्या विषयावर घेतलेल्या सभेचा अहवाल पाठवला. अॅक्सेस लाइव्हलीहूड कन्सल्टन्सीचे श्री.जी.व्ही. कृष्णगोपाल, प्रा.आर.श्रीराम, डॉ.संजीव चोप्रा यांनी, शशीताईंवर आणि उष:प्रभा पागे यांनी सुप्रभा शेषन यांच्यावर लिहिलेल्या लेखांचा उपयोग करण्याची परवानगी दिली.
ग्रामीण महिला संघाच्या कार्यकर्ता म्हणून काम करत असलेल्या सुवर्णाताई लोणारी यांनी, महिलांच्या नजरेतून, विशेषतः सोप्या भाषेत, व पदाधिकारी म्हणून काम करत असलेल्या निलोफरताईंनी, पुस्तिकेतील महत्त्वाचे जे मुद्दे पुढे आणले, ते मुद्दाम ठळक अक्षरात दिले आहेत.
स्व. विद्याताई बाळ यांनी प्रोत्साहन दिले तसेच उज्वला मेहंदळेनी संपादन केले. अश्विनीताई बर्वे, वसुधाताई सरदार, शिरीष जोशी आणि डॉ. कविता साळुके, हेरंब कुलकर्णी, विजया चौहान, सुवर्णा लोणारी, नवनाथ लोढे, 'चैतन्य'च्या विश्वस्त, जान्हवी अंधारीया, डॉ. नाना उर्फ एस. व्ही. गोरे, सुवर्णा गोखले, डॉ. अश्विनी घोरपडे, सिमांतिनी खोत, सुबोध कुलकर्णी ह्यांनी दिलेल्या मौलिक सूचनांमुळे ह्या पुस्तिकेच्या गुणवत्तेत भर पडली. रश्मी भुवड /वायंगणकर यांचा हे लेखन पूर्ण करण्यामध्ये, खूपच महत्त्वाचा वाटा आहे. नीलम, तेजश्री ह्यांनी हे लेखन, पुस्तिका स्वरूपात आणण्यासाठी सहकार्य केले. सर्वांचे मनापासून ऋण व्यक्त करते.
"प्रबोध संपदा' यांनी पुस्तकाची संगणकावर सुरेख मांडणी केली. सीआयएसचे सुबोध कुलकर्णी आणि विकिपीडिया संपादक कल्याणी कोतकर यांनी हे पुस्तक विकिमिडिया कॉमन्स या मुक्त ज्ञानस्त्रोतात अपलोड करण्यासाठी सहाय्य केले.या दोघांचेही मन:पूर्वक आभार. रेखाताई श्रोत्रीय, कल्पनाताई पंत आणि इतर 'चैतन्य' विश्वस्तांनी ह्या कामाला सातत्याने अव्यक्त प्रोत्साहन दिले. सर्व कार्यकर्त्यांनी पण ह्या वाटचालीत जो सहभाग दिला त्याबद्दल मी त्यांच्या ऋणातच राहू इच्छिते.
- सुधा कोठारी
कोणत्याही संस्थेच्या वाटचालीमध्ये अनेक ज्ञात अज्ञात लोकांचा, संस्थांचा, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असतो, योगदान असते. एखादी संस्था समजून घेताना संस्थेचा इतिहास समजून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. संस्थेची ध्येये, उद्दिष्टे, मूल्ये ही वेगवेगळ्या व्यक्तींच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदानातून विकसित होत असतात. चैतन्य संस्थेची वाटचाल समजून घेताना संस्थेच्या उभारणीत, विकासात आणि विस्तारात अशा अनेक व्यक्तींचे योगदान आहे. या व्यक्तींनी अंगीकारलेली मूल्ये, विचार व तत्त्वे समजून घेणे हेही महत्वाचे आहे. या व्यक्ती आपल्यासाठी तसेच संस्थेसाठी प्रेरणादायी आणि वाटाड्या असतात. आपण त्यांच्याकडून शिकलेली आणि अंगीकारलेली मूल्ये, विचार आणि तत्त्वे हीच आपली आणि संस्थेची ओळख असते.
चैतन्य संस्थेच्या उभारणीमध्ये, विकासामध्ये आणि विस्तारामध्ये योगदान देणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींना समजून घेण्याची प्रक्रिया म्हणजेच संस्थेची वाटचाल समजून घेणे होय. हे पुस्तक म्हणजे चैतन्य संस्थेची वाटचाल समजून घेण्याच्या प्रक्रियेची सुरुवात आहे. पुढे जाऊन 'चैतन्य' वेगवेगळ्या लोकांच्या नजरेतून समजून घेण्याच्या प्रयत्नांमधला हा एक भाग आहे.
जीवनात आपल्याला अनेक लोकांकडून प्रेरणा मिळते. त्यांच्याकडून आपण शिकत असतो. माझ्या आणि 'चैतन्य'च्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती म्हणजे शशी रेखा राजगोपालन. शशीताईंचे व्यक्तिमत्त्व सर्वांना प्रेरणादायी होते आणि अजुनही आहे. त्यांनी लोकसंस्थांची उभारणी, सहकारी कायद्यात विधायक बदल घडवून आणणे आणि स्वयंसेवी संस्था आत्मनिर्भर होणे या तीन क्षेत्रांत बहुमोल कार्य केले.
बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले या उक्तीला साजेसे असे शशीताईंचे व्यक्तिमत्त्व होते. कोणत्याही कामाची पद्धत कशी बसवावी हे अगदी सहजरीत्या त्यांना जमत असे. त्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या विचार, वाणी आणि कृतीमध्ये एकवाक्यता होती. कोणतेही काम करताना कामाचे पूर्वनियोजन, शिस्तबध्दता, वेळेचे व्यवस्थापन या गोष्टींवर त्यांचा सातत्याने भर होता. कोणतेही काम करताना ते प्रामाणिकपणे करणे, दुसऱ्याचे म्हणणे समजून घेणे ह्याला त्या प्राधान्याक्रम देत. त्यांना सामान्य माणसाबद्दल आत्मीयता, आस्था आणि समतेची भावना असायची जी त्यांच्या प्रत्येक कृतीतून लक्षात यायची. एखादी गोष्ट समजून घेताना वरवर लक्ष न देता ती मुळापर्यंत जाऊन समजून घेणे हा त्यांचा स्वभाव होता.
समाजऋण
समाजाकडून आपल्याला जे काही मिळत असते ते आपण समाजाला परत करावे हा त्यांचा विचार असे. म्हणूनच त्यांनी स्वत:ची संपत्ती समाजाला परत देण्याचे ठरविले. तसे इच्छापत्र त्यांनी २०११ साली तयार केले. चैतन्य संस्थेला पण ह्यातला हिस्सा मिळाला.
उर्जेचा शाश्वत झरा
एखाद्या व्यक्तीने आपले पूर्ण कौशल्य वापरून काम कसे करावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शशीताई. विविध गुणांचा संगम असणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात राहिल्याने आपणही असेच घडत जावे अशी प्रेरणा आपल्याला मिळते.
चैतन्य संस्थेने आयोजित केलेल्या विविध प्रशिक्षणे व क्षमता बांधणी कार्यशाळा तसेच नॅशनल कॉन्फरन्समध्ये त्यांचा सहभाग होता. चैतन्य संस्थेच्या कार्यात त्यांचे योगदान ही आपल्याला मिळालेली मोठी भेट आहे.
अशा अष्टपैलू शशीताईंची ओळख, त्यांचे विचार आपल्या ग्रामीण, आदिवासी महिला, त्यांच्यासोबत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवावेत हीच ही पुस्तिका प्रकाशित करण्यामागची इच्छा आहे. शशीताईंनी आंध्र प्रदेश महिला अभिवृद्धी (एपिमास) संस्थेसोबत ज्या स्व-नियंत्रण मालिकांच्या १८ पुस्तिका तयार केल्या, त्यातील १६ पुस्तिकांचे आपण मराठीत भाषांतर करून घेऊन आपण त्या वापरतो.
शशी राजगोपालन ह्या कोण होत्या? त्यांनी जीवनात काय केले? त्या कशा घडल्या? त्या कशा जगल्या? त्यांच्याकडून आपल्याला काय शिकता येईल ? या प्रश्नांची उत्तरे शोधत असतानाच, त्यांचा प्रेरणादायी जीवनपट आपल्यासमोर मांडण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे.
ह्या पुस्तिकेच्या माध्यमातून शशीताईंच्या संपर्कातील अनेक लोकांना भेटता आले, त्यांनी लिहिलेले लेख वाचता आले, त्यांच्याबद्दल लिहून घेता आले. ह्या निमित्ताने त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती/संस्थाबद्दलची जवळीक आणखी वाढली. (त्यांचा नामनिर्देश स्वतंत्रपणे केला आहे).
पुढच्या पिढीपर्यंत हा वारसा पोहोचवावा, त्यांनी तो पुढे न्यावा हीच माफक अपेक्षा ठेवून या पुस्तिकेची निर्मिती केली आहे.
शशीताई अनेकांच्या नजरेतून पुढे आल्या, आणि त्यांच्याबद्दलचा आदरभाव आणखीनच वाढला. त्यांच्या जीवनात त्यांनी आपला ठसा अनेकांच्या आयुष्यावर प्रभावीपणे उमटवला ही गोष्ट त्यांच्या आंतरिक शक्तीची ग्वाही देते.
डॉ. सुधा कोठारी
२. शशी रेखा राजगोपालन - जीवनक्रम
संपादन१९७० :- बी.एस्.सी. (गणित) - कलकत्ता विद्यापीठ
१९७०-७५ :- सर्विस सिव्हील इंटरनॅशनल (एस.सी.आय.) संस्थेतर्फे स्वयंसेवक म्हणून विविध छावण्यांमध्ये काम (भारत व भारताबाहेर)
१९७५-९८ :- सहाय्यक संचालिका, सहकार विकास फौंडेशन, हैद्राबाद (समाख्या म्हणून ओळखली जायची) आणि त्याचे प्रवर्तक बहुउद्देशीय सहकारसंघ, हैद्राबाद.
१९९९-२०११ :- ब्रह्मप्रकाश समिती सदस्य, नियोजन आयोग; बिहार, पंजाब, कर्नाटक, जम्मू कश्मीर, ओरिसा या राज्यात सोसायटी कायदा आणण्यासाठीच्या समितीत सदस्य म्हणून निमंत्रित
- आंतरराष्ट्रीय मजूर संघाने (ILO) सहकारसंबंधी १२७ क्रमांकाच्या शिफारशीचा (विकसनशील देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासामध्ये सहकारी संस्थांची भूमिका) आढावा घेण्यासाठी नेमलेल्या तज्ञसमितीत सदस्य
- संचालक :- नाबार्ड, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया.
- अध्यक्ष :- नाबार्ड ऑडीट कमिटी.
१९९९ पासून सल्लागार म्हणून स्वतंत्रपणे काम केले. त्यांच्या सेवा पुढील संस्थांनी घेतल्या. हिवोस, सर दोराबजी टाटा टस्ट, आंतरराष्ट्रीय मजूर संघटना, जुल्स आणि पॉल अमेली लेगर फौंडेशन (कॅनडा), फोर्ड फौंडेशन, केअर-कॅश, साउथ इंडिया एड्स एक्शन प्रोग्रा, एपीमास, युनिडो, एकल नारी संघ, वेलगू आणि एन.डी.डी.बी. (आणंद)
त्यांनी ह्या कालावधीत संस्थांसोबत विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या घेतल्या, त्यांना सल्ला व प्रशिक्षण दिले. खालील मुद्द्यांवर त्यांनी विशेष योगदान दिले -
१. भविष्यवेध घेण्यासाठी संस्थांना सहाय्य करणे.
२. स्वयंसेवी संस्थांच्या विकासनासाठी सहाय्य करणे (काही कालावधीसाठी त्यांना वारंवार भेटी देणे, त्यांच्या संस्थात्मक नितीसंदर्भात मसुदा तयार करणे, भविष्यवेध शास्त्रावर आधारीत सुलभ सराव पाठांची आखणी करणे).
३. स्वयंसेवी संस्थांनी प्रवृत्त केलेल्या सहकारी संस्था, बचतगट संघांना सभासदांची मालकी आणि नियंत्रण वाढविण्यासाठी आवश्यक अशी पुनर्रचना करण्यासाठी मदत करणे, त्यांचे व्यवस्थापन आणि कारभाराची गुणवत्ता वाढवण्यासाठी सहाय्य करणे
४. हिशोब, व्यवसायविकास, आर्थिक व्यवस्थापन, विस्तारकार्य, सहकारी संस्थांना प्रेरित करणे, सहकारी कायदे, बचतगट संघांना मजबूत करणे या विषयांवरील प्रशिक्षण
५. संस्थात्मक पातळीवर आणि कामांमध्ये लिंगभाव संवेदनशीलता येण्यासाठी कार्यशाळा घेणे आणि या संदर्भात अभ्यासाची आखणी करणे.
६. सहकारी कायदा आणि त्याच्या प्रभावाचा अभ्यास करणे.
७. प्रकल्पाची आखणी करणे तसेच प्रकल्प किंवा संस्थांचे मूल्यमापन किंवा आढावा घेणे.
८. विकासात्मक प्रकल्पांमध्ये सहभागी असलेल्या सहकारी संस्था, नागरीसंस्थांचा मुक्त सहकारी धोरणाला प्रतिसाद याचा अभ्यास
९. बचत व कर्ज सहकारी संस्था या विषयांवरील पुस्तकांचे मसुदे तपासणे
शशी रेखा राजगोपालन असे त्यांचे पूर्ण नाव. ताईंचा जन्म २१ जुलै १९५१ रोजी तामिळनाडूतील मदुराई येथे झाला. कलकत्ता विद्यापीठातून त्यांनी गणित विषयात बी.एस्.सी.ची पदवी घेतली. ताईंना इंग्रजी, हिंदी, तेलुगु आणि तमिळ भाषा अवगत होत्या. सफेद स्टार्च केलेला युनिफॉर्म, पायात कडक पॉलिश केलेले बूट, अशा वेशात तिला स्वतःला पाहायला आवडायचे. ती शाळेत जाताना कोणाची मदत न घेता शाळेत जायची. शशी प्रत्येक बारीकसारीक गोष्ट लक्षपूर्वक करत असे. स्वावलंबी आणि सडेतोड बोलण्यासाठी ती सर्वांना परिचित होती. शशीताईंच्या बालपणामध्ये रमताना, त्यांच्या काकू, वल्लीताई शेषन (वय ८६) लिहितात. “शशी, माझा नवरा शेषनच्या मोठ्या भावाची मुलगी आहे. आमचे मोठे कुटुंब होते. आमच्या कुटुंबात एकूण सहा भाऊ व तीन बहिणी. त्यांचे कुटुंब पुरोगामी विचारांचे होते. ६० वर्षांपूर्वी शशीताईच्या आजी, सर्व तरुण सुनांना पाळीच्या वेळी बाहेर बसण्याची गरज नाही असे सांगत.' प्रथा बदलण्याबद्दल त्यांचा एवढा आग्रह होता. अशा कुटुंबात शशीताई वाढल्या.
शशीताईंच्या मोठ्या भगिनी सबीताने शशीताईंबद्दल लिहिले होते- “आम्ही दोघी एकसारख्या दिसत असल्यामुळे बऱ्याचदा एकीच्या ऐवजी दुसरी समजली जायचो. आमची अदलाबदल व्हायची. वयाच्या ११ व्या वर्षी ती तर स्वावलंबी झाली होती. बरीच स्टायलिश, देखणी आणि लोकप्रिय. कुटुंबासाठी सर्व खरेदी तीच करे. शाळेत ती खेळांमध्ये कणर्धार होती. ती आंतरशालेय कार्यक्रमांत सहभागी होऊन बक्षिसे मिळवत असे." कौटुंबिक मूल्यांचा पगडा
शशीताईंच्या जीवनावर त्यांच्या कुटुंबातील मूल्यांचा पगडा दिसून येतो. शशीताईंनी स्वतः कुटुंबातील मूल्यांविषयी लिहिले आहे.
त्या लिहितात, “आम्ही लहान असताना कोणाचीही अवास्तव स्तुती केली तर आप्पा रागवायचे. कोणाचे कौतुक करण्यास त्यांची हरकत नसायची, परंतु एखाद्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवणे त्यांना आवडत नसे. आम्ही शाळेत चमकलो नाही तर आईला खूप वाईट वाटे.
आम्ही आजोबा (आईचे वडील) आणि माझे वडील यांच्या अवतीभवती फिरत असू. आम्हाला आईवडिलांनी कधी असे सांगितले नाही की, उद्या तुमची लग्नं व्हायची आहेत, त्यामुळे तुम्ही असे वागायला हवे, किंवा असे वागायचे नाही. आम्हाला त्यांचे असे सांगणे असे की 'तुम्हाला एक दिवस तुमच्या पायावर उभे राहायचे आहे,' आणि त्यासाठी स्वत:ची तयारी तुम्ही स्वतःच करायची आहे.' आप्पा अभिमानाने सांगायचे की, 'त्यांच्या मुली स्वत:च्या पायावर उभ्या आहेत. त्यामुळे कोणाला हुंडा देण्याची गरज नाही' आणि झालेही तसेच. त्यांच्या तीनही मुलींची लग्नं अशा व्यक्तींशी झाली, ज्याना हुंडा घेणे योग्य वाटले नाही आणि त्यांच्या मुलानेही तसेच लग्न केले.
त्यांना खोटे बोलणे नापसंत होते. तुम्ही काही चुकीचे केले, (जसे शाळेला उगीचच दांडी मारली) तर तुम्ही त्याची जबाबदारी स्वीकारायला हवी. त्यासाठी तुम्हाला घरून सुट्टीसाठी पत्र मिळणार नाही. कपड्यांवर आणि चांगले दिसण्यासाठी खर्च करणे या गोष्टी आप्पांना न सुटणाऱ्या कोड्यासारख्या वाटत!"
शशीताई १९७० साली, 'सर्विस सिव्हील इंटरनॅशनल (एस.सी.आय.)' या शांततेसाठी कायर्रत असणाऱ्या संस्थेमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी झाल्या. या कामाचा त्यांच्या पुढच्या आयुष्यात, विविध मुद्यांवर भूमिका घेण्यासंदर्भात मोठा प्रभाव दिसून येतो.
शशीताईंनी त्यांच्या स्वयंसेवी कामाची सुरुवात स्वयंसेवक म्हणून केली. त्यांनी स्वत:ची जडणघडण स्वयंसेवक म्हणून करताना रोजंदारीइतकी मजुरी घेऊन स्वत:ची गुजराण केली.
त्या सांगतात “ह्या सर्विस सिव्हील इंटरनॅशनल संस्थेशी जेव्हा जोडले गेले, त्यावेळेस बहुदा सेवेच्या विचारांनीच मला घेरले होते. मी पूर्ण वेळ स्वयंसेवक म्हणून या समाजासाठी कार्य करतेय. तेव्हा त्यांच्यासारखंच राहायचंय आणि रोजंदारीच्या मिळणाऱ्या मजुरीवरच गुजराण करायची असा माझा विश्वास होता. माझं सगळ्यात पहिलं काम म्हणाल तर दिल्लीमधल्या शाहदरा येथील कुष्ठरोग वस्तीत मी केलेले कार्य आणि त्यानंतर जवळजवळ पुढची पाच वर्ष मी भारतातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध संस्थाबरोबर काम करत राहिले. समाजातील वंचित घटकांबरोबर काम करण्यामुळे माझी त्यांच्या आयुष्याबद्दलची समज वाढली. ते माझे शेजारी, सगेसोयरे होते. त्यामुळे त्यांच्यासारख्याच प्रश्नाला मलाही सामोरं जावं लागायचं. अगदी सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या वापरापासून ते वीज आणि पाणी पुरवठा नसतानाही राहणं या सगळ्या गोष्टी मी अनुभवल्या. हे करताना माझ्या हेही लक्षात आलं की बऱ्याचदा महिन्याच्या अखेरीला मजुरी करणाऱ्या मजुरासारखे, जेवणासाठीसुद्धा पैसे शिल्लक राहायचे नाहीत. साखरेसारखी आपल्या रोजच्या वापरातली वस्तूसुद्धा, तेव्हा चैनीची वाटायची. परिणामतः मी लोकांचा, त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि कोणत्याही परिस्थितीत तग धरून राहणाऱ्या त्यांच्या जीवनशैलीचा आदर करायला शिकले. याचा परिणाम म्हणून मी स्वतःला कोणापेक्षाही वरचढ, किंवा अनाहूत हितचिंतक होण्यापासून थांबवू शकले."
________________
कृष्णगोपाल यांनी एका मुलाखतीदरम्यान शशीताईंना विचारले, “या तीस वर्षात तुम्ही स्वयंसेवक ते विकासतज्ञ असा प्रवास केला. तुमच्या मते अजूनही विकास क्षेत्रात स्वयंसेवी कामासाठी जागा आहे का?" त्यावर शशीताईंनी उत्तर दिले, “नक्कीच. मी तर असं म्हणेन आज तुम्ही मला विकासतज्ञ म्हणून पाहता, त्याची मुळे त्या काळी केलेल्या स्वयंसेविकेमध्ये आहेत. मला असं वाटतं की महाविद्यालयीन युवकांना वंचित समाजात काम करायला आणि प्रत्यक्षात त्यांच्यासोबत राहून त्यांना आपले शेजार स्वीकारण्याची संधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. तुमच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात तुम्ही फक्त लाभार्थी असता. तुम्ही दाता किंवा कर्तासुद्धा नसता. तुम्ही तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येकाकडून काहीना काही घेत असता. या दिवसांमध्ये जर तुम्ही गरिबांकडून मदत घ्यायला शिकलात, तर तुम्ही त्यांना समानतेच्या भूमिकेतून स्वीकारू शकता कारण तुम्ही परस्परावलंबी असता. समाजाच्या दोन्ही घटकांमध्ये देवाणघेवाण होणं, हे फार महत्वाचं असतं.
आपण ज्या समाजासाठी काम करतोय, त्यांच्या सोबत जगणं, शिकायला हवं. समान आर्थिक परिस्थितीमध्ये राहण्याचा अनुभव, परस्परावलंबनासंबंधी तुमचा दृष्टिकोन बदलण्यासाठी उपयोगी ठरतो.
तुम्ही जेव्हा स्वयंसेवक म्हणून या क्षेत्रात प्रवेश करता तेव्हा तुमच्यामध्ये एक खुमखुमी असते, की आम्ही एका रात्रीत हे जग बदलू शकतो. तशी ती विकासतज्ञांमध्येही असते. एकूणच या क्षेत्रात बघितलं तर अहंकार असतोच.
विकासतज्ञांच्या बाबतीत म्हणाल, तर तिथे माणुसकीला वाव कमी असतो आणि त्यातही तुम्ही जर या कामासाठी मानधन घेत असाल तर अगदीच कमी. स्वयंसेवकाच्या बाबतीत तसं होत नाही. तिथे तुम्हाला मानधन मिळत नसल्यानं तुमचं साधं राहणीमान तुम्हाला नम्र ठेवायला मदत करतं. मला असं अजिबात म्हणायचं नाही की या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मानधन मिळायला नको. पण माणुसकी जपणं महत्त्वाचं आहे आणि ही माणुसकी जपायला किंवा आपल्यातला अहंभाव कमी करायला स्वयंसेवकांना ही संधी नक्कीच जास्त प्रमाणावर असते."
आपण शशीताईंचे स्वयंसेवी कामाचे काही अनुभव पाहिले. त्यानंतर १९७५ ते १९७७ दरम्यान त्यांनी हैदराबाद येथील H.A.S.S.S. (Hyderabad Archdiocese Social Service Society) संस्थेसोबत माता-बालक आरोग्य केंद्राच्या एका प्रकल्पाच्या प्रमुख म्हणून काम केले. त्याअंतर्गत त्यांनी आंध्र प्रदेशांतील चार जिल्ह्यांमध्ये ७,००० गर्भवती माता आणि महिलांना आरोग्य-शिक्षण व सेवा देण्याचे बहुमोल काम केले. ह्या प्रकल्पाला कोणतेही अनुदान नव्हते. तरीही त्या प्रकल्पाच्या टीमने सेवा विकसित करून उपलब्ध करून दिल्या. त्याचा सर्व खर्च केंद्रावर येणाऱ्या महिला करत. कोणतेही काम स्वावलंबी पद्धतीने चालविण्यासाठी सेवा घेणाऱ्यांनी योग्य खर्च दिला पाहिजे हा त्यांचा सुरुवातीपासून आग्रह होता.
शशीताई सहकारी क्षेत्रात कशा आल्यात हे सांगतात, स्वयंसेवी क्षेत्रातील सात वर्षांच्या कामाचा मी जेव्हा विचार केला तेव्हा मला अगदीच निरुपयोगी असल्यासारखं वाटायला लागलं. कारण माझ्या सात वर्षाच्या कामाचा फक्त मला फायदा झाला होता. मी जरी परिस्थिती बदलासाठी काम करत होते तरी त्या भागातली राजकीय सत्ता तसेच सामाजिक आणि आर्थिक रचना सुद्धा तशीच होती. त्यामध्ये कुठलेच लक्षणीय बदल घडले नाहीत. मी हे काम सोडून रुळलेल्या वाटेने जाण्याचा विचार करत असतानाच मी श्री. रामा रेड्डी अध्यक्ष, सहविकास (CDF) हैद्राबाद यांना भेटले. त्यांनी मला सांगितले की सहकारी संस्था या राजकीय, आर्थिक, सामाजिक बदल घडवू शकतात. तू सात वर्ष या क्षेत्रात काम केलं आहेस, तर अजून एक वर्ष काम करायला काहीच हरकत नाही. आणि वर्षाच्या शेवटी तुला असं वाटलं की सहकारामार्फत काही बदल घडू शकत नाहीत तर तू या क्षेत्रातून बाहेर पडायला मोकळी आहेस.
१९७८ साली मी जेव्हा सहकारी संस्थांमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा मला आश्चर्य वाटलं की सहकाराची थोडीशी प्रगती सुद्धा लोकांना अस्वस्थ करते, खास करून गावातील पुढारी, सहकार खात्याचे अधिकारी आणि ज्येष्ठ राजकीय नेत्यांना. त्यामुळे मला पटले की यशस्वी सहकारी संस्था मूलगामी परिवर्तन घडवू शकते, सद्यस्थितीत बदल घडवून आणू शकते. म्हणूनच मी २१ वर्ष या क्षेत्रात पूर्ण वेळ काम करू शकले. औद्योगिक क्षेत्रात तुमच्या यशाचे श्रेय तुम्हीच घेऊ शकता. पण सहकारी क्षेत्रात चांगले बदल घडण्यासाठी बरेच लोक जबाबदार असतात. म्हणूनच तुमच्या अपयशाची जबाबदारी सर्वस्वी तुमची असली तरी तुमच्या यशाचे मानकरी तुम्ही एकटे नसता. तुमच्या यशात अनेक लोक सहभागी असतात. जेव्हा मी वारांगल आणि करीमनगरमधल्या ग्रामीण महिला व पुरुषांसाठी काम करत होते तेव्हा आमच्या सहकारी संस्थेमधल्या महिलांची पारदर्शक आणि रास्त मार्गाने काम करण्याची इच्छाशक्ती मला प्रेरित करायची. मला व्यवस्थापन क्षेत्रातील कौशल्य चांगलं अवगत होतं. लोकशाही नियंत्रित व्यवसायांचं नियंत्रण आणि व्यवस्थापनातही पारदर्शकता महत्त्वाची असते. अशी पारदर्शकता जपण्याचे काम करणाऱ्या अनेक सहकाऱ्यांनी मला व गटाला ऊर्जा दिली.
आम्ही सुरू केलेल्या सहकारी संस्था या कायदेशीर आणि टिकावू आहेत ही वस्तुस्थिती मला खूप आनंद देऊन जाते. एकीकडे आम्ही उभ्या केलेल्या संस्थांची बांधणी जशी मजबूत होती तसेच आमची कायदेशीर बाजूसुद्धा मजबूत होती. फक्त आपले म्हणणे मांडणं म्हणजे वकिली असे नाही, तर आपल्याला हव्या असलेल्या तरतुदी आणि धोरणात्मक बदल घडवून आणणे म्हणजे वकिली. अशाप्रकारे योग्य बदल घडवून आणणे यावरच आमचे लक्ष केंद्रित राहिले. समांतर सहकार कायद्याची अनेक राज्यांमध्ये झालेली अंमलबजावणी आमच्यासाठी फारच उत्साहवर्धक होती. सतत कार्यक्षम राहण्यासाठी तुमच्या आजूबाजूला त्याच प्रकारची किंवा तुमच्याहून अधिक क्षमतेची लोक असायला हवीत, नाही तर तुम्हाला आव्हानं मिळत नाहीत आणि लवकरच तुम्ही स्थिरावता.
सी.डी.एफ. ही छोट्या विश्वस्त मंडळाकडून चालवली जाणारी एक संस्था आहे. तिचे प्रमुख काम आहे, सहकारी संस्थेला पोषक वातावरण तयार करणे ज्यामुळे सोसायट्या विकसित होऊन भरभराटीस चालना मिळेल. व्यावसायिक तत्त्वावर त्या चालतील आणि त्यांच्यावर सभासदांची मालकी आणि नियंत्रण असेल. सभासदांच्या फायद्यासाठीच त्या काम करतील अशा सहकारी संस्था निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण तयार करणे हे सी. डी. एफ. चे काम होते. या संस्थेची तीन प्रमुख कामे म्हणजे :अ. सहकार कायद्यात बदल घडवून आणणे.
ब. सहकार क्षेत्रातील अवित्तीय व्यवसाय वाढीसाठीच्या फिरत्या निधीचे व्यवस्थापन.
क. नवीन प्रकारच्या सहकारी संस्थांचे आरेखन आणि रचना विकसित करणे.'
हा फिरता निधी सी.डी.एफ.ने उत्पादक सोसायटींना शेती उत्पादन, विक्री व्यवस्थापन विकिसित करण्यासाठी उपलब्ध करून दिला. त्याच्यावर मिळणाऱ्या व्याजामुळे सी.डी.एफ.चे ७५% खर्च निघत. हा फिरता निधी उत्पादन विक्री व्यवस्था वाढवण्यासाठी आणि नवीन प्रयोग करण्यासाठी वापरला जायचा. शशीताईंनी संचालिका म्हणून जेव्हा सी.डी.एफ.सोडले तेव्हा ३२,००० महिला, १०६ प्राथमिक सहकारी संस्था व सहा संघ संलग्न होत्या. तसेच १९,००० पुरुष, ६५ प्रायमरी सहकारी सोसायटी, पाच संघ संलग्न होत्या. सर्व संस्था, आर्थिकदृष्टया आणि व्यवसाय कौशल्याच्या दृष्टीने पूर्ण स्वावलंबी आणि सक्षम होत्या.
सध्या देशभरात दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान, (DAY-NRLM) दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान (DAY-NULM) अंतर्गत विकसित होणाऱ्या सर्व संघांनी हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. इतर देशात घेतलेल्या सहभागाबाबत शशीताई लिहितात, "MCA, सी.डी.एफ.चे काम करताना मला युनायटेड किंगडम येथील सहकारी संस्थांचा अभ्यास करण्यासाठी प्लुन्केट फौडेशनतर्फे शिष्यवृत्ती देऊन बोलवण्यात आले. कॅनडाच्या सहकारी युनियनतर्फे भारतातील सहकारी संस्था या विषयाची मांडणी करण्यासाठी मला बोलावले. तसेच वॉशिंग्टनमध्ये व्हिक्टोरिया विद्यापीठ, कॅनडा, आय.आय.एम. बंगळूरू, नाबार्ड अशा विविध संस्थांनी अभ्यासक्रमाची मांडणी करण्यासाठी मला कार्यशाळांमध्ये बोलवले. थायलंड, दक्षिण आफ्रिका, यु.एस.ए., यु.के., पाकिस्तान, नेपाळ, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया अशा विविध देशांतूनही मला निमंत्रित करण्यात आले."
शशीताईंचे सहकार क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. त्यांनी बचत आणि पत सहकारी संस्था उभ्या केल्या, त्या आत्मनिर्भर व स्वावलंबी होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सक्षम केल्या. या सहकारी संस्था लोकांच्या मालकीच्या असाव्यात, त्यात कोणताही राजकीय हस्तक्षेप असू नये यासाठीचे को-ओपरेटिव्ह डेव्हलपमेंट फौंडेशन सहविकास (CDF) आणि मुच्युअल एडेड को-ओपरेटिव्ह सोसायटीज (MACS) कायद्याच्या अंमलबजावणीतील त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
त्या २१ वर्षे सहकारी क्षेत्रात कशा टिकल्या, त्याचे श्रेय कोणाला द्याल असे विचारल्यावर त्या म्हणतात, “कदाचित माझ्यामधला ‘माणूस घडवता येतो' या संदर्भात असलेला अहंकार किंवा तुम्ही धमक म्हणा यामुळेच मी इतकी वर्ष यशस्वी काम करू शकले.'
शशीताईंना भेटलेल्या विविध व्यक्तींना त्यांच्यात जाणवलेले गुण, आपल्याला समजून घेणे प्रेरणादायी ठरेल. ह्यात त्यांना जवळून ओळखणाऱ्या जयाप्रदाताई, बाळकृष्ण, श्यामला आणि नंदिताताईंची मनोगते एकत्रित केली आहेत.
सहविकासाच्या (CDF) अध्यक्षा, जयाप्रदाजी शशीताईंबद्दल लिहितात, “शशीताईंची आणि माझी पहिली भेट २२ फेब्रुवारी १९९३ रोजी मकदुम पूरम, ध्यानसंगममध्ये झाली. शशीताई खूपच वक्तशीर होत्या. वक्तशीर राहून व्यक्ती आणि संस्था कार्यक्षम होतात, हा त्यांचा दृढ विश्वास होता. वेळेवर येणाऱ्याचा त्या आदर करत.
एकदा नकलागट येथे सकाळी १०.०० वा. मिटिंग होती. मी तेथे १० मिनिटे उशिरा पोहोचले. शशीताईंनी मिटिंग थांबवली आणि हजर असलेल्या सर्व महिलांना अगदी विधवांसकट सगळ्यांना कुंकू लावायला मला सांगितले. त्यांनी सांगितले की प्रत्येकाने कोणत्याही कामासाठी ठरलेल्या वेळेच्या एक मिनिट अगोदर पोचले पाहिजे.
शशीताई नेहमी म्हणत की, प्रशिक्षण कार्यक्रमामुळे व्यक्तीच्या विचार करण्याच्या क्षमता विस्तारतात आणि विविध संकल्पनांची जाणीव निर्माण होते.
आमच्या संघाच्या नोंदणीच्या वेळी हैद्राबादला तीन दिवसांचे प्रशिक्षण झाले. शशीताईंनी आम्हाला १९९५ चा कायदा समजावून सांगितला. झालेल्या संपूर्ण चर्चेचे टिपण करायला सांगितले. सर्व संकल्पना समजतील अशा पद्धतीने ते करवून घेतले.
१९९४ साली आम्ही ठरवलेल्या संमेलनाची तारीख कळवण्यासाठी आम्ही हैद्राबादला गेलो होतो. त्यांनी आम्हाला आमची आर्थिक स्थिती आणि हिशोबपालन यासंबंधी विचारले. हिशोब ठेवण्यामध्ये चुका आहेत. हे समजल्यावर त्यांना राग आला. तेव्हा मी त्यांना सांगितले, पहिले आम्हाला लेखा व्यवहाराचे प्रशिक्षण द्या. आणि दोन महिन्यांतच हे प्रशिक्षण आयोजित केले गेले. या प्रशिक्षणात एका गटाची अध्यक्षा निरक्षर असल्याचे त्यांना कळले, तेव्हा त्यांनी त्या बाईच्या पाया पडून, लिहायला वाचायला शिकण्याची विनंती केली. महिलांना प्रोत्साहन देण्यामध्ये त्यांचा नेहमी पुढाकार असे.”
अभ्यास दौऱ्यांद्वारे व्यक्तींचे कौशल्य आणि क्षमता वाढवता येतात, असा शशीताईंचा विश्वास होता. एकदा त्यांनी मकादापुरम, ध्यानसंगमला भेट दिली. या भेटीत त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाने आणि वक्तृत्वाने मी मोहित झाले. या कालावधीत सहविकास म्हणजेच, CDF ने आम्हाला गुजरात येथील सेवा संस्थेला भेट देण्याची संधी दिली. या सर्व घटनेचा माझ्यावर अत्यंत सकारात्मक परिणाम झाला.
राजकारणापासून अलिप्त
शशीताई राजकारणापासून नेहमी अलिप्त असायच्या. त्या नेहमी म्हणत, की राजकारणाशी कमीत कमी संपर्क असावा. नाही तर गटाच्या एकजुटीवर नकारात्मक परिणाम होतील. पंचायत निवडणुकीच्या वेळी मला निवडणुकीला उभे राहायला सांगितले होते आणि मी ते नाकारले हे त्यावेळी शशीताईंना कळाल्यावर त्यांनी माझे कौतुक केले.
नेतृत्वाची दुसरी फळी
शशीताईंचा विश्वास होता की, कोणत्याही संस्थेमध्ये नेतृत्वाची दुसरी फळी तयार करणे महत्त्वाचे असते. त्यामुळे संस्था चिरकाल टिकतात. सहकार्याने चांगले निर्णय घेतले जातात. त्यांचा आग्रह असे की प्रत्येक माहिती प्रत्येक सभासदांपर्यंत पोहचली पाहिजे.
शशीताईंनी सीडीएफ सोडल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये संचालकपद स्वीकारले. त्यानंतरही त्यांनी सीडीएफला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी सांगितले की कौशल्य फक्त तुम्हाला माहीत असून चालणार नाही. जेव्हा पदाधिकारी आणि सभासदांनाही ते शिकविले जाते तेव्हा त्याचे मोल वाढते.
तसेच त्यांनी मला सांगितले की, विविध मुद्यांवरचे ज्ञान पदाधिकाऱ्यापर्यंत मर्यादित न ठेवता सर्वांपर्यंत पोचवले पाहिजे', असे जयाप्रदाताई लिहितात.
कठीण परिश्रम
कठोर परिश्रमाचे परिणाम नेहमीच सकारात्मक असतात. शशीताईंचा हा विश्वास होता की जे लोक कठोर परिश्रम करतात, ते कोणत्याही व्यक्तिगत किंवा संस्थात्मक क्षेत्रात यशस्वी होतात.
महिला सक्षमीकरण
शशीताई महिलांना नेहमी प्रोत्साहित करत. त्या सांगत की ज्या महिला निर्मिती करतात, त्याच काहीतरी सिद्ध करू शकतात. शशीताईंनी सीडीएफ सोडल्यानंतर मी त्यांना एक पत्र पाठवले. त्यात मी त्यांना लिहिले “तुम्ही आकाशात चमकणाऱ्या चंद्रमासारख्या आहात. आम्ही तुमची देवीसारखी पूजा करतो. तुम्ही आमच्या जीवनातील खऱ्या देवी आहात. तुम्ही आम्हाला स्वयंपाकघरातून बाहेर आणले. आम्हाला एक दर्जा दिलात. हे आम्ही कधीही विसरू शकत नाही.” त्यांना पत्र वाचून आनंद वाटला आणि त्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत.
शशीताई आणि श्री रामा रेड्डी, सहकार चळवळीतील दीपस्तंभच. ह्यांच्या क्षेत्रभेटी दरम्यान, शशीताई त्यांच्या गाडीत आम्हाला सोबत घेऊन जात, त्यांनी महिला व पुरुषांमध्ये कधीही भेदभाव केला नाही. त्या नेहमी म्हणत महिलांमध्ये कोणतेही काम करण्याची क्षमता आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रात तुम्ही पुढे राहा.
शशीताईं नेहमीच महिलांमध्ये धैर्य व हिंमत विकसित करण्यामध्ये अग्रेसर राहिल्या. उदा. सहविकास भवन बांधताना त्यांनी एका महिलेला एका खोलीत रात्रभर एकटी झोपायची व्यवस्था केली. अशा गोष्टींमुळे महिलांची हिंमत वाढते. महिला स्वत:चा वेळ मोकळेपणाने उपयोगात आणू शकतील म्हणून ही व्यवस्था आहे असे त्या म्हणत.
"सभासदांकडून प्रश्न आले तरच आपल्याला गटाचे प्रश्न समजतील.' जेव्हा त्या कोणत्याही महासभेला जात, तेव्हा सभेच्या अगदी मागे त्या सभासदांमध्ये बसत. त्या सभासदांच्या विचार प्रक्रियेचे निरीक्षण करीत, आणि नंतर आमच्या नजरेसमोर आणून देत. कोणताही किचकट प्रश्न असला, तरी तो कसा सोडवायचा याचे मार्गदर्शन करीत. हिशोबातील अचूकता
शशीताईंचा हिशोब अचूक असे. “संस्था चिरकाल टिकण्याच्या दृष्टीने हिशोबामधील अचूकता खूप महत्वाची आहे.” असे त्या नेहमी म्हणत. सर्व हिशोब अद्ययावत आणि काटेकोर असण्यावर त्यांचा आग्रह असे. आम्हाला रु. २,३००/- बँकेचे व्याज मिळाले होते. ते उत्पन्नात न घेता व्याज फंडात जमा करून घेतल्याने हिशोब जुळत नव्हते. जेव्हा शशीताईच्या पुढे मी हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा ती रक्कम इतर उत्पन्नात लिहिली, हिशोब लिहिण्यातली चूक दुरुस्त केली आहे ह्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी महासंघाच्या वार्षिक सभेसाठी वेळ दिला. आम्ही सभेचे आयोजन केले. १९९५ साली गटाच्या नोंदणीनंतर प्रत्येक गटाचे पैसे त्यांना परत करण्यात आले. लेखापरीक्षकाने पैसे प्रत्येक गटात वाटप केले, तेव्हा आमच्या गटात १०,००० ची तूट दिसत होती. जेव्हा आम्हाला ते पैसे भरायला सांगितले तेव्हा आम्ही ते नाकारले. शशीताईच्या समोर हा प्रश्न मांडला गेला तेव्हा त्यांनी आमचे म्हणणे समजून घेतले.
हिशोब तपासले आणि आम्हाला ते समजावून सांगितले. मग आमच्या लक्षात आले की ती खरीच चूक आहे आणि आम्ही ती रक्कम भरण्याचे मान्य केले. शशीताईंनी लगेच गटाच्या नावाने तेवढे कर्ज लिहिले आणि समितीला तो चेक दिला.
रचनात्मक कामाचा मजबूत पाया
समाजपरिवर्तनामध्ये आणि समाजाच्या, सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या विकासात, विशेषत: महिलांच्या विकासामध्ये सहविकास (सी.डी.एफ.चे तिथले स्थानिक नाव) महत्त्वाची भूमिका वठवू शकते. यासाठी पाया मजबूत असेल तरच इमारत मजबूतपणे उभी राहू शकते याची शशीताईंनी जाणीव करून दिली. सहविकास संस्थांच्या उभारणीमुळे, महिलांमध्ये शिस्त, वक्तशीरपणा, आत्मविश्वास, बांधिलकी, इच्छाशक्ती, हिंमत, सातत्य, जिद्द, न्याय ही मूल्ये रुजविली जाऊ शकतात. स्वयंसहाय्य गटांनी प्रतिभावान, सक्षम, तज्ञ आणि कणखर नेतृत्वासोबत काम केले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते.
सहविकासने घातलेल्या पायामुळे आज स्वयंसहाय्य गटाची चळवळ यशस्वी झाली आहे. मूल्यांचा संग्रह
कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तित्व त्यांच्यात असलेल्या गुणामुळे /मूल्यांमुळे उठून दिसते. शशीताई बऱ्याच जणांसाठी एक आदर्श, प्रेरणादायी व्यक्ती होत्या. त्यांच्या काही निकटवर्ती, स्नेही, सहकारी ह्यांनी अनुभवलेले गुण आणि मूल्ये, त्यांच्याच शब्दात.
सी.डी.ए. च्या अध्यक्षा जयाप्रदाजी शशीताईच्या मूल्यांबद्दल सांगतात,
“जर सर्व सद्गुण व मूल्यांना एकत्रित केले आणि त्यांना मानवी रूप दिले तर त्या शशीताई होतील. कोणतीही व्यक्ती संपत्ती मिळवेल पण खूप कमी लोक मूल्याधिष्ठीत जीवन जगू शकतात. आणि असे जगणे सोपे नाही. शशीताई भाग्यवान होत्या. त्या अतिशय अर्थपूर्ण जीवन जगल्या. शशीताईंना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर कर्करोगाने ग्रासले होते. पण तरीसुद्धा, त्यालाही न जुमानता त्यांनी शेवटपर्यंत जे काम केले आणि मृत्युला सामोऱ्या गेल्या.” म्हणून जयाप्रदाताईंनी 'मृत्यूलाही आदेश' (Command over death) दिला असे म्हटले आहे.
उक्ती आणि कृती मधे एकवाक्यता असलीच पाहिजे असे शशीताईंचे ठाम मत होते. आपण ज्या सूचना देतो त्या स्वत: आपण प्रत्यक्षात, अंमलबजावणीत आणल्या पाहिजेत यासाठी त्यांचा आग्रह असे. त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आर.बी.आय.) पदाधिकारी या नात्याने सभेत सहभागी व्हायच्या. त्यांच्या असे जाणवले की, सभा मुख्य कार्यालयात न होता वेगवेगळया ठिकाणी व्हायला पाहिजेत. आर.बी.आय.ने हे म्हणणे ऐकले व त्याची अंमलबजावणी केली. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्या खूप आजारी होत्या. त्यावेळी आर.बी.आय.चे सभास्थळ लांब अंतरावर होते व तिथे पोहोचायला वेळ लागणार होता. परंतु तरीही त्या सभेला पोहोचल्या.
हक्क मिळवण्यासाठी आग्रही
श्रीयुत बाळकृष्ण यांनी यासंदर्भातील एक आठवण सांगितली आहे.
“एकदा असे झाले की, एक बँक शेतकरी गटाचे खाते उघडायला उत्सुक नव्हती. एका ग्रामीण भागातील राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेमध्ये प्रयत्न चालले होते. कोणी सहजपणे खाते उघडू शकत नव्हते. तेव्हा मी खूप हताश होऊन शशीताईना ते सांगितले. त्यांनी लगेचच बँकींग लोकपालांना फोन केला. ऑफिसरने थोड्याच तासांमध्ये त्यांच्या मदतीने कुठल्या शाखेकडून सहकार्य मिळत नाही ते शोधून लगेच त्याचा पाठपुरावा केला. पुन्हा एकदा प्रयत्न केला. शेतकरी गट त्या बँक मॅनेजरकडे गेले आणि त्यांनी हेही सांगितले की हे जर झाले नाही, तर आमचे संचालक, बँकींग लोकपालांकडे जाणार आहेत. ह्या शब्दांनी जादूच केली. हे शब्द ऐकताच एकदम व्यवस्थापकांची बोलण्याची पट्टीच बदलली. ते एकदम साखर तोंडात असल्यासारखे गोड बोलू लागले. आणि खाते लगेच उघडले गेले. आम्हाला हे सहकार्य शशीताईंच्या मार्फत आर.बी.आय.कडून मिळाले नसते, तर आम्ही कदाचित हे कधीच करू शकलो नसतो.
या निमित्ताने आपण बँकांना जाब विचारू शकतो अशी एक व्यवस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कक्षेत आहे असेही लक्षात आले.
सत्य बोलण्याचा आग्रह कायम
सत्तेत असणाऱ्यांसमोरही सत्य बोलले पाहिजे. ग्रामीण, शहरी महिलांच्या बाबतीत आणि त्यांच्या प्रश्नांच्या बाबतीत त्या मोकळेपणाने चर्चा करायच्या. आणि त्या सक्षम कशा होतील हे पाहायच्या. एकदा शाश्वत शेतीसबंधी विचार मंथनची एक बैठक नाबार्डने बोलावली होती. बाळकृष्णांच्या जीवनसाथी विजयालक्ष्मीताईंना शशीताईंनी बोलावले होते. त्या मिटिंगनंतर जेव्हा शशीताईंबरोबर ह्या सभेत काय साध्य झाले यासबंधी चर्चा झाली तेव्हा शशीताईंनी सांगितले, “तुम्ही जे काही सांगितले ते १००% बरोबर होते. आपला संदेश पोहोचविण्यासाठी आपण मृदू व सौम्य स्वरात मांडणी केली तर आपले म्हणणे ऐकले जाईल.'
त्या कधीही कोणत्याही दबावाखाली यायच्या नाहीत, मग हा दबाव सत्तेचा असला तरीही. म्हणूनच त्या नाबार्ड आणि आर.बी.आय.च्या ठिकाणी पदाधिकारी म्हणून काम करू शकल्या. त्यांच्या गाठीशी सहकारातला आणि संस्थांचा अनुभव होता. त्यांची निरीक्षणे त्या पटकन सांगायच्या. जसे की क्षेत्रामधून येणाऱ्या मतांकडेही त्यांचे लक्ष असायचे, कोणाचाही मुद्दा दुर्लक्षित होणार नाही असे त्या बघायच्या. वंचित समाजाबद्दलची आंतरिक जाणीव व समज त्यांना होती. त्यांच्या ताकदीवर त्यांचा विश्वास होता. कोणतेही काम कितीही अवघड असो, कोणताही विषय कितीही अवघड असला तरी त्याची प्रभावी पध्दतीने मांडणी त्या करायच्या. जेव्हा त्या कोणाच्या मताशी असहमत असत, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर काही वेगळेच खट्याळ भाव असायचे.
एखाद्याने स्वत:वर जास्त खर्च करू नये असे त्यांचे ठाम मत होते. याच कारणाने शेवटी त्यांनी स्वत:च्या आजारपणावर खर्चिक उपचार नाकारले. त्या निसगोर्पचाराकडे वळल्या. त्या कोणावर दबावही टाकायच्या नाहीत. 'मोठमोठ्या पदावर सदस्य असलेली इतकी मोठी व्यक्ती सहजपणे सगळयांबरोबर वावरत होती. 'डाऊन टू अर्थ', जमिनीवर पाय असणे म्हणजे काय हे त्यांच्याकडे पाहून कळत असे.'
परिणामकारकता
शशीताईंसोबत सोबत श्यामलाताईनी काम केले. त्या लिहितात- “पहिल्या आठवड्यात असं ठरलं की आपण तीन वर्ष संस्थात्मक व्यवस्था आणि प्रक्रिया मजबूत करता येईल असं काम करावं. प्रत्येकानं एकमेकांवर विश्वास ठेवावा. त्यातून परस्परावलंबन होतं. स्वत:च्या भूमिकांबद्दल जागरूकता आणि उत्साहपूर्ण सौहार्दपूर्ण भावना, एकत्रित काम करण्यास आवश्यक असतात. आम्ही छान प्रवास केला. या प्रवासात खुली चर्चा, खुले वादविवाद आणि आपल्या मुद्यांवर टीका सहन करण्याची तयारी आवश्यक होती. एकदा स्पष्टता आल्यावर प्रत्येकाची बांधिलकी असायची आणि प्रत्येकजण आपली जबाबदारी पार पाडायचे. त्यामुळे वेगवेगळी मतं एकत्र करून समान, आनंददायी कृतीकडे वाटचाल झाली."
उत्तरदायित्व
साऊथ इंडिया एड्स एक्शन प्रोग्राम (एस.आय.ए.ए.पी) च्या कार्यकर्त्यांसाठी शशीताई कडक शिस्तीच्या मास्तर होत्या. जे ठरवलं आहे ते झालंच पाहिजे, असं त्यांचं ठाम मत होतं. त्यामुळे उत्तरदायित्व वाढतं असं त्या म्हणायच्या.
प्रत्येक कार्यकर्त्यासाठी एका कामाला किती वेळ, किती तास लागतील हे त्या ठरवायला सांगत आणि टीम मेंबर्ससोबत चर्चा करून वेळ कमी किंवा जास्त करायला सांगत. त्या खात्री करून घेत की ही चर्चा खुली असावी आणि पुराव्यानिशी मांडणी व्हावी. त्यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली आणि ती म्हणजे मासिक बैठकीमध्ये उपक्रम, तिची आर्थिक बाजू आणि साध्य झालेला उद्देश पाहिले जावे. यापूर्वी आम्ही फक्त कार्यक्रमाच्या दृष्टीने काय कामं केली हे पाहत होतो.
उत्तम काम करणं, उत्तरदायित्व आणि सचोटीसाठी त्या आदर्श होत्या. असं एकही काम नव्हतं की ज्यासाठी त्या तयार नसायच्या. त्यांनी एकदा कामाला सुरुवात केली की त्या पूर्णपणे त्यात असायच्या आणि एखाद्या भेटीचा निरीक्षणासह पूर्ण अहवाल त्यांच्याकडून आला नाही अशी एक पण भेट नसेल.
शशीताईंचे तपशीलांकडे बारीक लक्ष असायचे. त्यांनी अहवालासाठी ' कॅम्ब्रिया फॉन्ट' वापरण्याचा निर्णय घेतला, तो क्षण मला आठवतो. त्या म्हणाल्या की मी हे पाहिलं की वाचायला सोपं काय जातं आणि चांगलं पण दिसतं असे, वेगवेगळे पर्याय वापरून ते बघून मी या फॉन्टची निवड माझ्यासाठी केली. आता माझ्यासाठी पण हाच फॉन्ट ...असं श्यामलाताई लिहितात. शशीताईंना कोणत्याही प्रकारचा अव्यवस्थितपणा, ढिसाळपणा किंवा उशीर चालत नसे. त्यांनी जी अपेक्षा दुसऱ्यांकडून केली, त्यांनी तोच उच्च दर्जा स्वतःसाठी ठेवला.
जर कोणी म्हणाले 'मी या कामासाठी माझे १००% दिले' तर त्या त्यांना त्या प्रश्न करीत- 'तुम्हाला जे साध्य करायचे होते, ते झाले का ? काही कमतरता राहिली असल्यास ती भरून काढण्यासाठी पर्यायी मार्ग शोधले का ?'
कोणाच्याही बाबतीत निर्णय घेताना त्या शिक्षण, उत्पन्न, नोकरी, लिंग ह्याच्या आधारे घेत नसत. सचोटी/इमानदारी, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ह्या त्यांच्या व्यक्तीच्या मोजमाप करण्याच्या कसोट्या असत.
श्यामलाताई म्हणतात की 'मी' स्वतःला फार इमानदार समजत होते. त्यांनी मला दाखवून दिले की, कार्यक्षमतेचा अभाव, वेळेचा अपव्यय, आणि वाजवीपेक्षा जास्त खर्च सहन करणे हे सुद्धा सचोटीला मारक आहे. शशीताई स्वतः संबंधित पूर्ण माहिती द्यायच्या. कधीकधी इतकी माहिती त्या देत असत की आपल्याला आश्चर्य वाटे आणि तसंच रडू पण यायचे. त्यांनी स्वत:ची शक्तीस्थानं कधीही लपवली नाहीत, तसंच स्वतःच्या खोलवर रुजलेल्या असुरक्षिततेची भावनाही दडवली नाही. त्यांच्या कामातून त्या जे शिकत ते त्या नेहमीच सांगत, कधी सांगितलं नाही असं होत नसे. पण त्यांनी कधीच शिकवण्याचा प्रयत्न केला नाही."
एकदा त्यांच्या हॉटेलच्या खोलीत अपरात्री अचानक एक अनोळखी व्यक्ती आली आणि शशीताईंनी लगेच बरोबर असलेल्या सहकाऱ्यांना फोन केला. मध्यरात्री त्यांना मदत हवी होती. नंतर त्यांनी इतक्या रात्री फोन करून सगळ्यांना त्रास दिला म्हणून माफीही मागितली.
शशीताईंमध्ये एक कमतरता होती आणि ती म्हणजे, त्यांच्या आवडीनिवडी खूपच तीव्र होत्या. आणि कोणत्याही व्यक्तीबद्दल मत झाल्यानंतर ते मत बदलायला क्वचितच तयार होत असत. पण तरीही त्यांनी कामावर कधी त्याचा परिणाम होऊ दिला नाही.
शशीताईंनी अनेकांच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावली. आंध्र प्रदेश महिला अभिवृद्धी संघाच्या (एपिमास) रमा लक्ष्मीताई शशीताईंबद्दल म्हणतात, “माझ्यासाठी त्या एक आदर्श व्यक्तिमत्त्व होत्या." एका दारूड्यामुळे रमाताई राजीनामा देणार होत्या, तेव्हा शशीताईंनी त्यांचे विचार बदलले. यावेळी रमाताईंनी निर्धार केला की मी पण शशीताईंसारखी जगीन. कोणामध्ये कोणत्या कमतरता आहेत, आणि त्या दूर करण्यासाठी त्या व्यक्तीला कोणत्या संधी दिल्या पाहिजे हे शशीताईंना चांगले जमत असे. रमाताईंना पुरुषांबरोबर काम करण्याची भीती वाटत असे पण शशीताईंनी ती भीती घालवली.
रमाताईंना त्यांच्याबरोबर जवळजवळ १० वर्ष काम करण्याची संधी मिळाली. स्वनियंत्रण प्रक्रियेचा 'श्रीगणेशा' शशीताईंच्या मार्गदर्शनाखाली झाला.
सभासदांना समजेल अशा भाषेत प्रशिक्षणाचे महत्व, स्वनियंत्रित संस्थांच्या उभारणीतून स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होते हे रमाताई शशीताईंकडून शिकल्या.
मृत्यूपूर्वी शशीताईंनी तयार केलेले इच्छापत्र ही त्यांच्या नि:स्वार्थी आणि समर्पित जीवनाची अखेरची खूण म्हणता येईल. आयुष्यभर ज्याप्रकारे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून परिपूर्ण नियोजन आणि व्यवस्थापन यांचा आदर्श निर्माण केला, त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या इच्छापत्रात दिसून येते. आपली सर्व संपत्ती त्यांनी समाजासाठी काम करणाऱ्या संस्थांना वितरीत करून एकप्रकारे समाजऋण फेडण्याचे एक उदाहरण घालून दिले.
शशीताईंनी आयुष्याच्या शेवटच्या टप्यावर पाठवलेले पत्र -
हे पत्र मी तुम्हाला आज माझ्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या क्षणी लिहित आहे. तुम्हाला माझ्या संपत्तीच्या वाटणीविषयी आणि माझ्या इच्छांविषयी माहिती व्हावी हाच या पत्राचा निव्वळ हेतू आहे. माझ्या मृत्यूसमयी माझ्या घरातील संपती आणि विक्री करार यातील काही टक्के मी गुरुकुल बोटॅनिकल सँक्च्युअरी, चैतन्य, एकल नारी शक्ती संघटना आणि सहविकास यांच्या नावे करत आहे. जर माझ्या नशिबाने मी हेच वेदनादायी आयुष्य इथून पुढे जगले तर अर्थातच या संस्थाना त्या रक्कमेचा लाभ होणार नाही, तसेच या संपत्तीचा मलाही उपयोग नाही, हेही खरंच.
आपल्या समाजात असे बरेच लोक आहेत जे परिस्थितीमुळे त्यांचं आयुष्य पूर्णार्थाने जगू शकत नाहीत. अशा सर्वांना त्यांच्या आवडीनुसार आपलं आयुष्य जगता यावं, याचसाठी मी आजपर्यत झटत आले आणि तुमच्या चौघींच्या संस्थांमध्ये आणि वैयक्तिक आयुष्यातही तुम्ही चौघी हेच काम करत आहात, याचा मला विश्वास आहे. *सुब्बीचे वनवृक्ष संवर्धन कार्य, सुधाचे नारी शक्ती संवर्धन, जिनी आणि जयाप्रदा ह्या दोघी एकत्रितपणे महिला व पुरुष यांच्या विकासासाठी जे कार्य करत आहेत, ते उल्लेखनीय आहे. एका बिगर शासकीय संस्थेतील कार्यकर्ता म्हणून
- शशीताईंनी निवडलेल्या व्यक्ती आणि संस्था
सुब्बी-' सुप्रभा सेशन, गुरुकुल बोटॅनिकल सँक्च्युअरी
सुधा-सुधा कोठारी, चैतन्य
जिनी – जिनी श्रीवास्तव, एकल नारी महिला संघ
जयाप्रदा - सहविकास (सी.डी.एफ.) मी २८ वर्षे केलेल्या कामाचा आणि १२ वर्षापेक्षा थोडा अधिक काळ मी सल्लागार म्हणून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून मला काही कमाई झाली, मला मनापासून असे वाटते की पैसे खरे तर वन्यजीव; स्त्रिया आणि पुरुष; नैसर्गिक स्त्रोत इ. च्या मालकीची आहे. पण पृथ्वीवर असलेल्या या स्त्रोतांना, त्यांच्या मालकीच्या जागेवरून हटवले जात आहे. माझ्या हाती असलेली मर्यादित रक्कम आणि माझ्या मर्यादा लक्षात घेऊन मला असे वाटते की माझ्या मृत्युपत्रात नमूद केल्यानुसार माझ्या मालकीच्या गोष्टींची विक्री करून ती रक्कम या चार संस्थांकडे जावी. या चारही संस्था अशा चार स्त्रियांनी चालवलेल्या आहेत ज्यांची वित्तीय गोष्टींबाबतची सचोटी आणि प्रामाणिकपणा वादातीत आहे. तसेच त्यांची उच्च बौद्धिक निष्ठा आणि त्यांच्या कार्यक्षेत्रात कामाची परिणामकारकता व दिसणारा प्रभाव सर्वश्रुत आहे.
तरी हे पत्र पाठवण्याचे कारण हेच की तुम्ही चौघींनीही तुमचे १२ ए आणि ८० जी प्रमाणपत्र अद्ययावत आहे की नाही हे तपासून घ्यावे, जेणेकरून गरजेनुसार त्याचा उपयोग होईल.
माझ्या मृत्युनंतर माझी बहीण सविता गोपाल तुमच्या संपर्कात असेल. तोपर्यंत ही माहिती तुम्ही गोपनीय ठेवाल अशी आशा व्यक्त करते.
धन्यवाद.
शशी राजगोपालन,
प्लॉट न. १०, सकेल, फेज २, कपरो, हैद्राबाद - ५०० ०६२.
आता आपण चाही व्यक्ती आणि त्यांनी कार्य केलेल्या संस्थांची माहिती घेऊया.
जिनी श्रीवास्तव आणि एकल नारी शक्ती संघटन
जिनी श्रीवास्तव या कॅनडातील एक महिला भारतात चार दशकांपेक्षा जास्त काळ आदिवासी लोकांच्या कल्याणासाठी, निःस्वार्थीपणे काम करत आहेत. खास करून राजस्थानच्या महिलांमध्ये स्वतःच्या हक्कांसाठी लढण्याची ताकद उभी करत आहेत.
मानवी आत्मसन्मानासाठी महिलांमध्ये शिक्षण आणि सक्षमता वाढावी, ह्यासाठी राजस्थानमध्ये त्यांनी एकल नारी शक्ती संघटनेची स्थापना केली. पतीच्या अपघाती निधनानंतर २००३ साली जिनी श्रीवास्तव या स्वतः एकल जीवन जगत होत्या. २००१ च्या जनगणनेप्रमाणे ६२ दशलक्षपेक्षा जास्त महिला, विधवा, घटस्फोटीत किंवा लग्न न केल्याने एकट्या आहेत.
एकल महिलांना समुपदेशन करणे, त्यांची जमीन, त्यांच्या मिळकतीचे हक्क, सरकारी योजनेअंतर्गत असलेल्या हक्क वा सुविधा उपलब्ध करून देणे, जाणीवजागृतीचे कार्यक्रम आयोजित करणे, त्यांच्या प्रश्नांसंदर्भात सहभाग घेणे आणि नेतृत्व करण्यासाठी त्यांना प्रशिक्षित करणे अशी कामे संघटन करीत आहे.
पुढे जिनीताई राष्ट्रीय पातळीवरील एकल नारी संघाच्या अध्यक्ष झाल्या. त्यांनी जमिनीचे हक्क, अन्नसुरक्षा, सामाजिक सुरक्षा, आरोग्याचे विशेषत: कमी उत्पन्न गटातील महिलांना लाभ मिळावा यासाठी काम केले. मासिक बैठकांमध्ये धोरणात्मक मुद्दे, मानवी सन्मानाचे प्रश्न, सरकारी योजनांचा लाभ कसा मिळवावा?, त्यांना मिळालेली जमीन कायम कशी ठेवावी?, होत असलेल्या मानसिक तणावाला सामोरे कसे जावे किंवा शारीरिक लैंगिक अत्याचाराला तोंड कसे द्यावे इ. विषय घेतले.
जिनीताईंनी आयुष्यभर आदिवासी महिलांसाठी आणि एकल महिलांसाठी केलेल्या निरंतर कामाची नोंद घेतली गेली. २००५ साली हजार महिलांची नावे नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित केली गेली होती. त्यामध्ये त्यांचे पण नामांकन झाले होते.
विमेन्स वेब यांनी त्यांच्याबद्दल लिहिले - “आम्हाला त्या का प्रेरणादायी वाटतात, तर त्यांनी भारतातील हजारो महिलांच्या आयुष्यामध्ये आशा आणि मानवता जागी केली.
महिलांविषयक असलेल्या दीर्घकालीन अनिष्ठ रूढी-परंपरांविरूद्ध प्रभावीपणे झगडण्याची ताकद दिली आणि आपले जीवन भौगोलिक सीमा आणि राष्ट्रापलीकडे काम करण्यासाठी स्वतःला वाहन घेतले.”
सुप्रभा शेषन आणि गुरुकुल बोटॅनिकल सँक्च्युअरी
शशीताईंची नात म्हणून सुप्रभाची ओळख करून देता येईल. शशीताईंना तिच्या कामाचे कौतुक होते. सुप्रभाचे काम त्यांच्यावर आलेल्या लेखातून* समजून घेऊ या.
केरळच्या पेरिया या गावालगत 'गुरुकुल वनश्री अभयारण्य' बहरले आहे. निसर्गसंवर्धन आणि निसर्ग शिक्षण या उद्दिष्टांसाठी ही संस्था काम करते. 'गुरुकुल'ची सुरुवात केली ती वोल्फगैंग थेऊरकौफ यांनी १९८१ मध्ये. ते जर्मनीहून भारतात आले
✽ सौजन्य : उषा:प्रभा पागे, निसर्गमैत्री (२७ वे प्रकरण), श्री विद्या प्रकाशन १९८१ च्या पूर्वी श्री. नारायण गुरू या अध्यात्म मार्गातील भारतीय गुरूंच्या शिकवणीकडे ते आकर्षिले गेले आणि भारत ही त्यांनी आपली कर्मभूमी केली. त्यांनी केरळी स्त्रीशी लग्न केले. जमीन विकत घेतली आणि १९८१ मध्ये त्यांनी त्या ५५ एकर जागेवर लहान आश्रम सुरू करून वृक्षसंवर्धनाचे काम, खरं तर 'साधना' सुरू केली. या साधकाला आसपासचे लोक स्वामी म्हणू लागले. या साधनेचे फळ म्हणजे 'गुरुकुल वनश्री अभयारण्य'.
'गुरुकुला'च्या जागेवर या आधी चहाचे मळे होते, ते अर्थातच जंगल तोडून केलेले होते. त्यांनी प्राधान्य दिले ते जंगलाच्या पुनरुज्जीवनाला. पश्चिम घाटातील हजारो प्रकारच्या जाती-प्रजाती त्यांनी इथे लावल्या, आणि जोपासल्या, त्याही बाह्य मदतीशिवाय. अवघ्या १०-१५ वर्षांत तिथे झुडपं, वेली आणि स्थानिक वृक्ष यांची चांगली वाढ झाली. स्थानिक लोक, त्यांची मुले, शालेय मुले यांच्यासाठी निसर्गशिक्षणाची शिबिरेही त्यांनी सुरू केली. नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पती वाढवणे, जोपासणे, जंगलाचे संवर्धन, याच्या जोडीला सेंद्रिय भातशेती, मसाल्याचे पदार्थ उत्पादन, पर्यायी ऊर्जानिर्मिती, शेतीपूरक दुग्ध व्यवसाय, गोबर गॅस प्रकल्प अशी स्वयंपूर्ण व्यवस्था त्यांनी निर्माण केली. त्यांच्या केरळी पत्नीची त्यांना साथ होती. स्थानिक आदिवासींना मदतीला घ्यायचे, कारण आदिवासींमध्ये जंगलाचे, निसर्गाचे ज्ञान परंपरेने आलेले असते.
'गुरुकुल' सुरू झाल्यावर काही वर्षांनी सुप्रभा शेषन गुरुकुल परिवारात सामील झाल्या. त्या संचालक पदावर आहेत; पण तिथल्या सर्व उपक्रमांत त्या सहभागी आहेत. बाग आणि उद्यान, रोपवाटिका, वनश्री संवर्धन, निसर्ग शिबिरातून शिकवणे, आसपासच्या आदिवासींशी संवाद आणि मित्रभाव जोपासणे, ‘गुरुकुल'च्या कामात त्यांची मदत घेणे आणि त्यांचा, त्यांच्या ज्ञानाचा आदर ठेवणे हे सर्व काही गेली २५ वर्षे त्या करीत आहेत. 'जंगलातील शाळा' ही कल्पना इथे साकार झाली आहे. रोजच्या सर्व कामांसाठी स्थानिक स्त्रियांची टीम सुप्रभा शेषन यांनी तयार केली. ही टीम पर्जन्य जंगलाची जोपासना करते. झाडे, प्राणी, कीटक, बुरशी, नेचे, सगळे पर्जन्य जंगलचे रहिवासी. या जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी पाणी हवे. जंगले टिकली तर पाणी मिळणार. सजीव सृष्टीतील सर्व घटकांमध्ये प्रेम आणि जीवनाचा उल्हास भरून राहिलेला आहे. गुरुकुल अभयारण्य पश्चिम घाटातील वनस्पतीसृष्टीला वाहिलेले आहे. अशा राखीव पर्जन्य जंगलाच्या शेजारी ५५ एकरांत हे मानवनिर्मित अभयारण्य आहे. अस्तित्व धोक्यात आलेल्या प्राण्यांचे- पक्ष्यांचे अधिवास जोपासून त्यांचे पुनर्वसन करणे, त्यांचे आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या मानवी समुदायाचे हितसंबंध जपणे, इथली हवा, पाणी जमीन आणि सजीव सृष्टी यांच्यातील परस्परसंबंध दृढ करणे यासाठी गुरुकुल प्रयत्नशील आहे. जमिनीची मशागत आणि जंगलांचे पुनरुज्जीवन याचे हे प्रायोगिक अभिरूप आहे. यासाठी त्यांचे बहुविध कार्यक्रम आहेत. स्थानिक स्त्रियांना उद्यानविद्या देणे, त्यांना काम आणि मोबदला देऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे, जंगलशेती आणि अन्नोत्पादन करणे, निवासी निसर्ग शिबिरे घेऊन निसर्ग संवेदना जागी करणे आणि स्थानिक आदिवासींशी संवाद राखणे. वनशेतीचे उत्पन्न दरवर्षी वाढते आहे. 'गुरुकुल'ची दुध डेअरी आहे, गोबर गॅस आहे. भात आणि मसाल्याचे पदार्थ, फळ, भाजीपाला उत्पादन यामुळे गुरुकुल स्वयंपूर्ण आहे. जंगल पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नामुळे इथे आता दोन हजार विविध जाती-प्रजातींच्या विपुल वनस्पती नांदत आहेत. पक्ष्यांचे गुंजन, कीटकांचा गुंजारव, वाऱ्याचा नाद आणि ओढ्याच्या झुळुझुळीने इथले वातावरण भरलेले आणि भारलेले असते.
'गुरुकुल' सर्व सृष्टीला, पृथ्वी, तिच्यावरील पर्वत, जंगल, नद्या, जमीन, सागर यांना पवित्र मानते. स्थानिक लोकांच्या पारंपरिक ज्ञानाचा आदर ठेवते. 'इंटरनॅशनल युनियन फॉर द कन्झर्व्हेशन ऑफ नेचर' यांच्या जैवविविधतापूर्ण २५ ठिकाणांमध्ये 'गुरुकुल'चा समावेश आहे.
२५ वर्षांपूर्वी सुप्रभा शेषन या ‘गुरुकुल'मध्ये आल्या. त्या तिथे संचालक असल्या तरी सगळ्यांना बरोबर घेऊन काम करतात. इथे लहानमोठा असा भेद नाही. संगीताने नादावून जाणाऱ्या सुप्रभा इथल्या निसर्गनादावर लुब्ध आहेत.
निसर्गप्रणालीऐवजी सुप्रभा ‘जीवसृष्टी समूह' - 'कम्युनिटी' असा शब्द वापरते. “समूहात वाटून घेणे असते, देण्याचे औदार्य असते, उत्साह असतो. लहानथोर असा भेद नसतो. असमानता नसते. इथे आदिवासी आणि अन्य जीवसृष्टीबरोबर जगणं किती आनंदाचे, समृद्ध करणारे असते. असे जगणे जैवविविधतेलाही पोषक असते.
निसर्गसंगतीत जगण्याची एक वेगळी वाट गुरुकुलात आहे हे नक्की.
सुधा कोठारी आणि चैतन्य
चैतन्य संस्था २७ वर्षापासून महिला सक्षमीकरणासाठी काम करणारी समाजसेवी संस्था आहे. महिलांना स्वयंसहाय्य गट व त्यांच्या संघामार्फत महिला आपल्या गरजेनुसार सामाजिक व आर्थिक विकास करू शकतात अशा व्यासपीठ निर्मितीसाठी चालना देते.
चैतन्यने महिला स्वयंसहाय्य गटाच्या माध्यमातून महिलांची एकजूट निर्माण केली. सुरुवातीला गट, विभाग, संघ आणि महासंघ यासारख्या स्वायत्त संस्थांची रचना उभारणी करण्यात महत्वाची भूमिका बजावली.
सत्तावीस वर्षांपूर्वी चैतन्य संस्थेने सात गावे (चास कमान, कानेवाडी, मोहकल, कडथे, वेताळे, देवोशी) आणि १४ गटांपासून सुरू केलेले काम आज महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश मध्ये सतरा जिल्ह्यातील ११६७ गावांमध्ये ४३ संघामार्फत ८,२१६ स्वयंसहाय्य गटातल्या १,१९,६१७ महिलांसोबत काम करत आहे. या सर्व संघांना लागणाऱ्या विविध सेवा आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी एक व्यासपीठ, एक महासंघ म्हणून सारथी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानामध्ये साधन संस्था म्हणून 'चैतन्य'ला मान्यता मिळाली आहे. त्या निमित्ताने छत्तीसगड आणि झारखंडमध्ये क्षमता बांधणीचे कार्य सुरू आहे.
आज स्वयंसहाय्य गट व त्यांचे संघाचे काम महाराष्ट्र मध्ये सुरू करणारी अग्रणी संस्था म्हणून चैतन्यची विशेष ओळख आहे. ग्रामीण महिलांना सक्षम करण्यासाठी आर्थिक, सामाजिक, आरोग्यविषयक सेवा देऊन त्यांच्या क्षमता विकसित करण्याचे कार्य करत आहे. तळागाळातील महिलांपर्यंत पोचून, त्यांना बचतीची सवय लावून त्यांचे राहणीमान उंचाविण्याचा प्रयत्न करत आहे. गरीब, गरजू महिलांना व्यवसाय विकास व कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मार्गदर्शन व सल्लागार म्हणून चैतन्य काम करते.
महिलांवर होणारे कौटुंबिक कलह, अत्याचार यांच्या निराकरणासाठी संस्थेचे समुपदेशन केंद्र आहे. संस्थेने आत्तापर्यंत अंदाजे पाच हजार प्रकरणे हाताळली आहेत.
आरोग्य प्रश्नांवर लोकाधारित नियोजन व देखरेख प्रक्रियाही काही गावात राबवली आहे.
ज्या महिला शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यासाठी सध्या काम सुरु आहे. शिक्षणासोबतच रोजगार, शेतीवर आधारित उद्योजकता विकास यासाठी संस्था प्रयत्न करते. याशिवाय संस्था लोकाधरीत लघु वित्त व्यवस्थापन, बचत गट संघाचे व्यवस्थापन या विषयांवर अल्पमुदतीचे कोर्सेस घेणारे प्रशिक्षण व संशोधन केंद्र म्हणून कार्यरत आहे. संस्था सा-धन, Enable आणि अफार्म ह्या संस्थेची सदस्य आहे.
ह्या संस्थेची सुरुवात डॉ. सुधा कोठारी आणि सुरेखाताई श्रोत्रिय ह्यांनी केली. सुधा कोठारी या सध्या अफार्म (ॲक्शन फॉर ॲग्रिकल्चरल रिन्युअल इन महाराष्ट्र), FWWB (फ्रेंड्स ऑफ वुमन्स वर्ल्ड बँकिंग), ज्ञानप्रबोधिनी इ. मान्यवर संस्थांच्या कार्यकारिणीत सदस्य आहेत. याआधी त्यांनी यशदा, साधन, एपिमास (आंध्र प्रदेश महिला अभिवृध्दी संगम), मायक्रोसेव्ह ह्यांच्या कार्यकारिणीतही कार्य केले आहे. रेखाताई श्रोत्रीय ह्या संस्थापक सदस्य आणि जिल्हा दक्षता समितीच्या सदस्य आहेत. कल्पना पंत ह्या कार्यकारी संचालक आहेत. ह्या सर्व संघांचे सारथी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ हे व्यासपीठ आहे. गटातून तयार झालेल्या अलकाताई मुळूक या संस्थेच्या अध्यक्ष म्हणून व कौशल्याताई थिगळे या प्रमुख कार्यकारिणीच्या व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत.
मी म्हणजे सुधा शारदा कोठारी. चैतन्य संस्था सुरू करणारी एक कार्यकर्ती. शशीताईबरोबर माझी आपुलकी होती. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या कालखंडात त्या कर्करोगाने आजारी होत्या त्यावेळी त्यांनी आम्हाला सगळ्यांना एक पत्र लिहिले.
२७ मार्च २०११ रोजी शशीताईंनी त्यांच्या मैत्रिणींना पाठवलेले पत्र -
माझ्या प्रिय सुधा, श्यामला, जिनी, वसुंधरा, इंदिरा, जयाप्रदा, जमुना, रीना आणि शुभी,
माझ्यासाठी तुमच्यापैकी प्रत्येक जण एक तत्वनिष्ठ, मूल्यनिष्ठ आणि उच्च नैतिक मापदंड समोर ठेवून काम करणाऱ्या असाधारण महिला आहात. उच्च मूल्यांचे अधिष्ठान हे गुणवत्तापूर्ण कामामध्ये व्यक्त होतं. मला तुमच्या प्रत्येकी बरोबर काम करता आले आणि हा मला विशेष अधिकार मिळाला. सुभी, तुझ्या कामातून मला बरेच काही शिकायला मिळाले. तुमच्या सहवासाच्या आठवणी मी हृदयात जपून ठेवलेल्या आहेत.
आज मी माझ्या बहिणीकडे जात आहे. अजून काही दिवस फोनला प्रतिसाद देऊ शकेन.
आपली स्नेहांकित आणि कौतुकाने भरलेली,
शशी
मी त्यांना दिलेले उत्तर -
माझ्या प्रिय शशीताई,
तुम्हाला सांगण्यासाठी माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत. प्रचंड विधायक शक्ती तुमच्या रोमारोमात आहे. तुम्ही मला माझ्या आयुष्याच्या सुरुवातीच्या कालखंडात भेटलात याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श व्यक्ती आहात आणि तुम्ही केलेलं काम माझ्यासाठी खूप प्रेरणादायक आहे, ते कामच माझ्या आयुष्याचा एक ध्यास झाला आहे. मला वाटते की जगात दोन महत्त्वाच्या व मौल्यवान जागा आहेत. कोणाच्या विचारात असणं ही सर्वात छान जागा आणि कुणाच्या प्रार्थनेत असणं ही सर्वात सुरक्षित जागा. आम्ही तुमच्या विचारात आहोत याचा आनंद आहे आणि आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करतो.
आपली स्नेहांकित
सुधा.
शशीताईं मला अशा एका काळामध्ये भेटल्या जेव्हा मी आयुष्यात काय करायचं, कसं करायचं, कसं जगायचं, हे ठरवत होते.
१९८६ साली प्रिया संस्थेतर्फे सिमांतिनी खोत यांनी तेव्हाच्या MCCA (Multipurpose Cooperative and Thrift Cooperative Association) हैदराबाद, येथे एक प्रेरणादायी अभ्यास दौरा आयोजित केला होता. महाराष्ट्रातील विविध संस्थांच्या १७ प्रतिनिधी त्यात सहभागी झाल्या होत्या. त्यात 'चेतना विकास' वर्ध्याच्या सुमनताई बंग, आताच्या 'स्वयम शिक्षा प्रयोगा'च्या संस्थेच्या प्रेमाताई गोपालन, ‘प्रोग्रेसिव फ्रेंड सर्कल, नांदेड' येथून कलावती पाटील आणि मी पण सहभागी होते.
MCCA संस्थांच्या भेटीमुळे सहकार क्षेत्रातील कामांचे एक प्रारूप पाहता आले. MCCA ने नंतर समाख्या संस्थेच्या स्थापनेस प्रोत्साहन दिले. आज सहविकास/ सी. डी एफ. (Cooperative Development Foundation) म्हणून ओळखली जाते.
ग्रामीण भागात काम करायचं हे नक्की ठरलं होतं. काय करायचं, कसं करायचं या शोधात मी होते. एकूण माझ्या कॉलेज जीवनात मी असा विचार केला होता की त्यामध्ये प्रश्न सोडवण्यासाठी उपचारात्मक कामापेक्षा प्रतिबंधात्मक काम करावे. बाहेरच्या मदतीवर अवलंबून न राहता स्थानिक नेतृत्व विकास व स्थानिक सहयोग हे कामाचे केंद्रबिंदू असावेत. मला असंही वाटत होतं की निर्धाराबरोबरच काम असं असलं पाहिजे की, ते निरंतरपणे स्वतःहून चालू शकेल. जेव्हा मी शशीताईंचे सी.डी.एफ.-को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फाऊंडेशन उर्फ सहविकास (समाख्या हे त्यांचे अगोदरचे नाव) मार्फत करत असलेलं काम पाहिलं तेव्हा हे माझ्या सगळ्या निकषांमध्ये बसणारं काम आहे हे जाणवलं.
माझे मार्गदर्शक प्राध्यापक शि. श्री. काळे आणि शशीताईंचे मार्गदर्शक श्री रामा रेड्डी हे दोघे एकमेकांना ओळखत.
रेखाताई श्रोत्रीय आणि मी वारंगल, आंध्र प्रदेश येथील थ्रीफ्ट आणि क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वार्षिक सभेमध्ये सहभागी झालो होतो. तेथे सामाजिक कामाचे प्रत्यक्ष दर्शन घडले. गावातल्या महिला वार्षिक सभेचे संपूर्ण संचलन करत होत्या. सर्व हिशोब पारदर्शकपणे मांडला जात होता. प्रत्येकाच्या हातात वार्षिक अहवालाची प्रत होती. महिलांच्या चेहऱ्यावर उत्साह जाणवत होता. शशीताई स्टेजवर बसलेल्या नव्हत्या. तेलुगु भाषेमध्ये वार्षिक सभा चालली होती. तो प्रत्यक्षदर्शनी अनुभव प्रेरणादायी राहिला.
, त्यामुळे आयुष्यात काय करावं याचं मार्गदर्शन करणारीमूल्यांवर भर देणारी नव्हे तर मूल्यं जगणाऱ्या व्यक्तीबरोबर नातं निर्माण झालं. एखादी आदर्श व्यक्ती कशी असावी, याचा शशीताई याचा जणू वस्तुपाठच.
माझा त्या कालावधीत लग्न करावं की नाही याचा विचार चालू होता. नाही केलं तर काय होईल ? ज्यांनी लग्न केलं नाही यांचे अनुभव काय आहेत ? तेव्हा शशीताईंनी पण लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. शशीताईंना भेटल्यामुळे मला वाटलं अविवाहितपणे जगणं शक्य आहे.
आपण कोणाला आदर्श म्हणतो तेव्हा आपण त्यांच्यातल्या गोष्टी प्रत्यक्षात करण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. याचप्रमाणं मी सतत शशीताईंच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा मी हैदराबादला जात असे, तेव्हा शशीताईंच्या ऑफिसमध्ये त्यांना निश्चित भेटत असे आणि आम्ही दोघीही आपापल्या कामांमध्ये नवीन काय चाललंय ते समजून घेत असू.
शशीताईंची भेट
३० जुलै १९९४ रोजी मी सी.डी.एफ.च्या ऑफिसमध्ये भेट दिली. पध्दतशीरपणे काम चाललेलं होतं ते पाहून मला आनंद वाटला. इनवर्ड, कार्याचा आढावा तक्ता, मिटिंग रिपोर्टिंग सिस्टिम इत्यादी. जिथं एक कार्यक्षम जिवंत व्यक्ती काम करत असते तिथलं कार्यालय पण उत्साहानं सळसळतं.
शशीताईंनी तेव्हा माझं कौतुकही केलं की मी एक चांगली मैत्रीण आहे, तेव्हा मला खूप आनंद वाटला. आपण ज्यांना आदर्श मानतो ती व्यक्ती आपल्याला तिची मैत्रीण म्हणते आणि अशा व्यक्तीकडून कौतुक म्हणजे माझ्यासाठी आणखी उत्साह वाढवणारा प्रसंग होता.
आता एक प्रश्न येऊ शकतो की शशीताईंनी तर सहकार क्षेत्रामार्फत हे काम केलं आणि मी जी सुरुवात केली ती बचत गट / सेल्फ हेल्प ग्रुप / स्वयंसहाय्य समूह माध्यमांतून. हे दोन्ही एकच आहेत का ते वेगळे आहेत ? स्वयंसहाय्य गटामध्ये सहकार्याची मूलभूत तत्त्वे आहेतच. नुसता एक गट हा एक स्वावलंबी रचना होऊ शकत नाही. त्याच्यासाठी त्याला पूरक अशा रचनेची म्हणजे संघाची आवश्यकता असते. तरच या सगळ्या कामावर देखरेख करण, कोणाला नेमण परवडू शकणार आहे, कुठल्याही पद्धतीनं इतर सेवा उपलब्ध करून घ्यायची असेल तर संघटित रचनेचा आकार हा मोठा हवा.
नाबार्डच्या स्वयंसहाय्य गट कार्यक्रमांमध्ये संघ रचनेसंबंधी धोरण असते तर हे काम देशभरात बऱ्याच पटीनं पुढे गेलं असतं. नाबार्डने सहकारी क्षेत्राचा अनुभव घेतला होता, विशेषतः जिथे सरकारी राजकीय हस्तक्षेप होतो आणि या संस्था फारशा चांगल्या पद्धतीने चालत नाहीत म्हणून नाबार्डने पुढाकार घेतला नाही.
प्रदान संस्थेची टीम चैतन्य प्रेरित ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघांना भेट देण्यासाठी आली होती. त्यांना आश्चर्य वाटलं की, प्रत्येक बारीकसारीक गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे. जसं की संघाचं इतिवृत्त होतं आणि ते सगळया गटांपर्यंत पोचलेलं आहे. गटाचं लेखापरीक्षण नियमितपणं केलेलं आहे. पदाधिकारी त्यांची जबाबदारी समजतात. मागे वळून पाहताना माझ्या लक्षात येतं की जेव्हा ह्या कामाची सुरवात झाली, तेव्हा प्रत्येकाचा सहभाग घेणे, गट विभाग, संघाचे नियम करणं हे आग्रहपूर्वक केले जाई. तेव्हा सहा महिने वेळ लागला होता. तेव्हा जाणवले की नक्कीच सी.डी.एफ., शशीताई, रामा रेड्डी यांच्या कामाचा परिणाम व प्रभाव माझ्यावर झाला आहे.
आपण ज्यांना आदर्श मानतो अशा व्यक्तींचा आपल्याला स्नेह मिळणं ही आनंदाची गोष्ट आहे आणि त्याहून अधिक आनंद म्हणजे शशीताईंची मैत्रीण होण्याचे भाग्य मला लाभले. अजून असं वाटतं की शशीताईंना मी खूप कमी ओळखते. त्यामुळे या पुस्तकाच्या निमित्तानं शशीताई अजून जवळ आल्या आणि अजून उमलत, उमगत गेल्या. या पुस्तकाच्या निमित्तानं झालेला आठवणींचा प्रवास माझ्यासाठी एक अनोखा आनंद देणारा आहे.
शशीताई तिच्या आईची खूप काळजी घेत. त्यांनी स्वतःचं घर केलं तेव्हा आईच्या खोलीतून सर्व दिसेल अशी घराची रचना केली होती. आई घरी एकटी असल्यामुळे, शशीताई कुठलाही कार्यक्रम असला तरी घरी रात्री पोहोचण्याचा प्रयत्न करीत असत.
शशीताईंना त्यांचा शेवट माहीत होता का ? मृत्यूच्या अगोदरच त्यांनी सर्व मित्र परिवाराला एकत्र जेवायला बोलावलं. त्यामध्ये मला पण निमंत्रित केलं होतं. ती त्यांची आणि माझी शेवटची भेट. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची बहीण सविताताई यांची भेट घेतली. शशीताईंची सर्व पुस्तके पाहिली. काही मी स्वतः इकडे आणली आणि असं लक्षात आलं की शेवटी शेवटी कबीर आणि मीरा यांची पण पुस्तकं शशीताई वाचत असत.
शशीताई फार प्रेरणादायी वारसा आपल्यासाठी ठेवून गेलेल्या आहेत. विचारांचा, गुणांचा आणि कृतीचा वारसा. प्रत्यक्षात कृती करून दाखवली आहे. चैतन्यदायी कार्यासाठी, मूल्यांवरचा विश्वास, संस्था बांधणीसाठी आवशयक क्षमता बांधणी आणि त्यांची १८ स्वनियंत्रण पुस्तिकांची मालिका आहे. त्याप्रमाणे स्वयंसहाय्य गटाच्या कार्यकर्त्या आणि प्रतिनिधींनी प्रत्यक्षात काम करणं, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांचा वारसा नीट जपणं आणि पुढच्या पिढीला तो सोपवणं, ही आपली जबाबदारी आहे.
शशीताई राजगोपालन या गरीब गरजू लोकांसाठी, विशेषतः महिलांसाठी, त्यांच्या मालकीच्या शाश्वत, आत्मनिर्भर, स्वावलंबी, आर्थिक सेवा देणाऱ्या संस्था विकसित व्हाव्यात, या मताच्या ठाम पुरस्कर्त्या होत्या.
शशीताई म्हणत, आपल्या देशामध्ये स्थावर वा जंगम स्वरूपाची मालमत्ता ही पुरुषांच्या मालकीची असते. दागिन्यांव्यतिरिक्त व्यक्तिगत पातळीवर स्त्रियांच्या मालकीचं महत्त्वाचं असं काही नसतं.
स्रियांनी रचना केलेल्या, त्यांचं व्यवस्थापन असलेल्या, दीर्घकालीन चालणाऱ्या स्रियांच्या मालकीच्या संस्थांची उभारणी स्रियांनी फारशी केलेली नाही. स्थावर जंगम मालमत्ता, त्या अशा संस्थांच्या माध्यमातून धारण करू शकतात. स्वयंसहाय्य गटांमुळे स्रियांना सार्वजनिक व्यवस्थेमध्ये कार्यरत होता येते. म्हणूनच महिलांनी आर्थिक सेवा संस्थांची रचना विकसित केली पाहिजे आणि त्यांचे व्यवस्थापनही स्रियांनीच केलं पाहिजे. तसेच अशा संस्थांना व्यावसायिक दर्जा पण असला पाहिजे.
शशीताईंनी सी.डी.एफ.च्या माध्यमातून सहकारी संस्थांची प्रारूपे विकसित करण्यावर भर दिला. आणि एपिमासच्या माध्यमातून अशा आर्थिक रचना, विशेषतः स्वयंसहाय्य गटाच्या माध्यमातून उभे राहिलेले संघ हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. या संस्थांनी आत्मनिर्भर, स्वावलंबी, शाश्वत राहण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम विकसित केले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा भाग म्हणून स्वयंनियंत्रण प्रशिक्षण पुस्तिकांचीही निर्मिती केली.
शशीताई म्हणत, “कोणत्याही संस्थेमध्ये प्रत्येक पातळीवर, प्रशिक्षणाची नितांत गरज असते. प्रशिक्षक, सुलभकर्ता, पुस्तकपालन करणारा, लेखापाल, अंतर्गत लेखापरीक्षक आणि संस्थाचे संचालक या सर्वाना प्रशिक्षित केले पाहिजे.
स्वयंनियंत्रण प्रक्रिया एक प्रयोग
चैतन्य संस्थासुद्धा संस्थांतर्गत, प्रत्येक पातळीवरील कार्यकर्त्याच्या क्षमता बांधणी आणि प्रशिक्षणासाठी जागरूकतेने प्रयत्न करत असते. एपिमासच्या सहयोगाने विकसित केलेल्या स्वयंनियंत्रण पुस्तिकांचे 'चैतन्य'ने मराठी रूपांतरण करून त्याप्रमाणे काम आपल्या क्षेत्रामध्ये राबविण्याचे प्रयत्न केले, आणि आजही करीत आहे. स्वयंनियंत्रण पुस्तिकांचा उद्देश्यच ‘स्वयंसहाय्य गटातील सभासदांची आर्थिक व सामाजिक प्रगती साधणे' हा आहे. त्यासाठी स्वयंसहाय्य गटातील सभासदांच्या शाश्वत, लोकशाही आधारित कायदेशीर संस्थांची उभारणी करणे हे ओघाने आलेच. या संस्थांची उभारणी करताना काही लक्ष्यकेंद्रित घटकांचे महत्त्व लक्षात ठेवावे लागेल आणि ते म्हणजे
- सर्वांना उपयोगी पडणारी समान नोंद पुस्तके
- सर्वांना उपयोगी पडणारे समान अहवाल
- मान्यताप्राप्त उत्तम सेवा, कामगिरीचे निकष व संस्थात्मक स्वनियंत्रण
- हिशोब लिखाणाची समान पद्धत निश्चिती, तसेच व्यवसाय, व्यवस्थापन आणि धोरणांची कार्यक्षम अंमलबजावणी
- निधी संरक्षणार्थ पद्धतशीर लेखापरीक्षण व सनियंत्रण
- पद्धतशीर निवडणूक
- मूल्याधिष्ठित स्वत:चे कार्यकर्ते
- सातत्याने शिक्षण / जागृती व प्रशिक्षण
- संचालक मंडळ व त्यांचे प्रतिनिधी यांच्या प्राथमिक व संघ स्तरावरील भूमिकांची स्पष्टता
- कायदेशीर पूर्तता
चैतन्यसंस्थेने स्वयंसहाय्य गट व त्यांचे संघ उभारताना वरील घटकांचा विचार प्रकर्षाने केलेला आढळतो. यामुळेच 'चैतन्य'च्या कामाने प्रेरीत होऊन, ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ, खेड येथील वेताळे विभाग, सखी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ, मावळमधील इंदोरी विभाग; यशवर्धिनी ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ; आंबेगाव येथील माळीमळा विभाग, संकल्प ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ; जुन्नर या संघातील सत्याई विभाग या विभागांमध्ये स्वयंनियंत्रण प्रक्रिया राबवली.
स्वयंनियंत्रण प्रक्रिया राबवत असताना चैतन्य संस्थेने खालील टप्पे निश्चित केले.
- स्वयंनियंत्रण पुस्तिकांचे वाचन आणि आर्थिक जाणकारांची निवड
- विभागातील सर्व गटांची सहामाही हिशोब तपासणी.
- गटांची त्यांच्या हिशोबाची गटसभेत मांडणी व गटाच्या आरशाच्या माध्यमातून स्व-मूल्यमापन
- विभागामध्ये सर्व गटांची एकत्रित हिशोब मांडणी व मूल्यमापन
- गटांची व विभागांची वार्षिक सभा
- स्वनियंत्रण प्रक्रियेचे लेखन व दस्तऐवजीकरण
स्वयंनियंत्रण प्रक्रियेतील या प्रयोगाचे विस्तारीकरण आज चैतन्यप्रेरित विविध संघांमध्ये केले गेले आहे.
चैतन्य संस्था, महिलांना स्वयंसहाय्य गट व त्यांच्या संघामार्फत सामाजिक सुरक्षा देते. तसेच ज्या माध्यमातून महिला आपला सामाजिक व आर्थिक विकास गरजेनुसार करू शकतात अशा व्यासपीठ निर्मितीसाठी चालनाही देते.
प्रशिक्षण व क्षमता बांधणी
शशीताईंनी २००९ नंतर चैतन्यबरोबर संघ पदाधिकारी प्रशिक्षणामध्ये सुलभता आणली. लेखापालन या विषयावरील त्यांचे संघ पदाधिकारी सोबतचे प्रशिक्षण अत्यंत उपयोगी आणि कायम आठवणीत राहणारे आहे. या प्रशिक्षणातील प्रशिक्षण साहाय्यक रश्मी म्हणतात,
“शशीताई राजगोपालन यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीपूर्वी मी त्यांच्या कार्याबद्दल अनभिज्ञ होते. चैतन्य संस्थेमध्ये नवोदित स्वयंसहाय्य गट संघ पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घ्यायचे आहे आणि या प्रशिक्षणासाठी 'शशीताई राजगोपालन' नावाच्या कोणीतरी प्रशिक्षक येणार आहेत, एवढंच मला माहीत होतं.
शशीताई आल्या. त्यांच्या पहिल्या भेटीतच मी भारावून गेले. किरकोळ अंगयष्टी, पांढरेशुभ्र बॉयकट असलेले केस, कपाळाला मोठी टिकली, बारीक डिझाईन असलेली कॉटनची कुर्ती, चुडीदार, ओढणी दोन्ही खांद्यांवर व्यवस्थित लावलेली. चेहरा मात्र तेजस्वी, बोलण्यात स्पष्टता आणि ठामपणा. शशीताईंची प्रशिक्षण सहाय्यक म्हणून दोन स्वयंसहाय्य गट संघांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सहा दिवस त्यांच्या सहवासात राहण्याचे भाग्य मला मिळाले."
रश्मीताई पुढे सांगतात, “शशीताई म्हणजे उत्साहाचा मूर्तिमंत झरा. त्यांच्या हालचालींमधली तत्परता, लवचिकता आणि वेग पकडताना खरं तर माझी दमछाकच व्हायची. मग त्या थोडंस रागवायच्या. थोड्या वेळानंतर म्हणायच्या, 'तू कशी काय इतकी शांत राहू शकतेस? तू घरी पण इतकीच शांत असतेस का? मी नाही राहू शकत इतकी शांत.' हे विचारतानाची त्यांची निरागसता मनाला भिडून जायची आणि मग आम्ही दोघीही हसायचो.
शशीताईंच्या वागण्याबोलण्यात एक तेज होते. जगण्याची स्पष्टता हे त्यांच्या तेजाचे कारण असावे असा माझ्यापुरता मी निष्कर्ष काढला."
प्रशिक्षक कसा असावा, याचा धडा आम्हाला शशीताईंकडूनच मिळाला. चैतन्य संस्थेनं घेतलेल्या दोन प्रशिक्षण कार्यक्रमाची तयारी एक महिना आधीपासूनच झाली होती. प्रशिक्षण कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर एक महिना आधीच प्रशिक्षण कार्यक्रमाचं वेळापत्रक, प्रशिक्षण साहित्याची यादी, प्रशिक्षणासाठी घेण्यात येणारे असाईनमेंट (पाठ-प्रात्यक्षिके) सर्व प्रात्यक्षिकांची पूर्वतयारी करण्यात आली. त्यानंतरही शशीताईंच्या एपिमास मधल्या साहाय्यकांनी फोन करून बारीकसारीक सूचना आम्हाला दिल्या. खरं पाहता प्रशिक्षणार्थी हे मराठी होते आणि मुख्य प्रशिक्षक हा इंग्रजी व हिंदीतून शिकवणारा होता. त्यामुळे मनात थोडी धाकधूक होतीच.
प्रशिक्षकाने पूर्वतयारी केली पाहिजे असा शशीताईंचा कटाक्ष असायचा. त्यामुळे प्रशिक्षणाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी सर्व प्रशिक्षण सत्राची, असाईनमेंट (पाठ-प्रात्यक्षिके) आणि साहित्य, दिलेल्या यादीनुसार आहे की नाही हे सर्व पडताळून पाहिलं.
प्रत्यक्ष प्रशिक्षणाला सुरुवात झाली त्यावेळी मात्र प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षक यांच्यातला भाषेतला अडसर कधी दूर झाला हे कळलंच नाही. शशीताईंना मराठी कळत नाही असंही वाटलं नाही पण अल्पशिक्षित प्रशिक्षणार्थीना हिंदी अवघड जातंय असंही वाटलं नाही. शशीताईंनी घेतलेला विषय “स्वयंसाहाय्य गटातील व्यवस्थापन व हिशोब" असा होता. पूर्णत: किचकट व तांत्रिक विषयामध्ये सुध्दा शशीताईंचे प्रत्येक सत्र हे अभ्यासपूर्ण होते. प्रशिक्षणार्थी महिला अल्पशिक्षित होत्या. आमच्यासारख्या वाणिज्य शिकलेल्या विद्यार्थ्यांनाही अवघड वाटणारा हिशोब व हिशोब तपासणी हा विषय त्यांनी अगदी सहजतेनं सोप्या भाषेत समजावून दिला. अकाऊंटिंग आम्हाला खऱ्या अर्थाने त्या दिवशी कळले अशी कबुली द्यायला आम्हाला वावगे वाटत नाही.
एका प्रशिक्षकाकडे शिकवण्याचे विविध मार्ग असायला हवेत. त्यामध्ये काही भौतिक साहित्याचा वापर प्रसंगानुरूप अवलंबायला हवा. गरजेनुसार तो बदलायला हवा. आपण मांडलेले विषय लोकांना कळलेत का याची चाचपणी घेतली पाहिजे, यावर शशीताईंचा विशेष कटाक्ष असायचा. त्यामुळेच प्रत्येक सत्राच्या शेवटी एक अंताक्षरीची फेरी व्हायची. यात एका शब्दात उत्तरे द्या असा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम घेतला जायचा. 'फीडबॅक फॉर्म' या संकल्पनेला छेद देत प्रशिक्षणाचा आढावा घेण्याची ही पद्धत फारच प्रभावी होती.
मतांचा आदर
आपली मतं दुसऱ्यावर न लादता ती सर्वांनुमते मान्य केली गेली पाहिजेत असा त्यांचा आग्रह असायचा. आपली मते मांडून त्यांची तोडमोड करून ती सुधारण्याची संधी घेतली पाहिजे असे त्यांचे म्हणणे असायचे.
खट्याळ मूल
शशीताईंच्यात एखादे खट्याळ मूल लपले आहे की काय असे वाटावे असा हा प्रसंग. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी आम्हा प्रशिक्षण सहाय्यकापैकी कुणाचा तरी वाढदिवस होता. आम्ही सर्वांनी मिळून तो साजरा केला. केक कापला आणि 'हैप्पी बर्थडे टू यू' हे गाणं आमच्याकडून संपलं आणि मग शशीताईंनी गाणं गायला सुरुवात केली 'हैप्पी बर्थडे टू यू, यू कमिंग फ्रॉम झू' मग विविध प्राण्यांची नावं घेऊन शशीताई गाणं म्हणत राहिल्या. गाणं सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत आम्ही फक्त खळखळून हसतच होतो.
अत्यंत कडक, काटेकोर शिक्षिकेतले हे खट्याळ मूल फारच लोभसवाणं होतं एवढं मात्र खरं.
महिला परिषदांमधील शशीताईंचा सहभाग
चैतन्य संस्थेने एनेबल नेटवर्क सोबत स्वयंसहाय्यता गट सदस्यांच्या दोन महिला परिषदांचे आयोजन केले होते. ४ मार्च २०१० रोजी "नॅशनल कॉन्फरन्स ऑन एस.एच.जी. (सेल्फ हेल्प ग्रुप्स) फेडरेशन्स चॅलेन्जेस अँड वे अहेड" आणि २३-२४ फेब्रुवारी २०११ रोजी राज्यस्तरीय स्वयंसहाय्य गट महिला जागर संमेलन संपन्न झाले. शशीताई या दोन्ही परिषदांमध्ये सक्रिय होत्या. (फक्त जागर संमेलनात प्रकृती अस्वाथ्यमुळे प्रत्यक्षात सहभागी होता आले नाही, पण नियोजनात होत्या.)
शाश्वतता, आत्मनिर्भरता, स्वावलंबन, पारदर्शकता ही कोणत्याही संस्थेसाठी आवश्यक मूल्ये आहेत. शशीताई या मूल्यांसाठी आयुष्यभर आग्रही राहिल्या. ही मूल्ये संस्थेसाठीच नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही पायाभूत होती. म्हणूनच वयाच्या सोळाव्या वर्षीपासून त्या स्वतंत्र, आत्मनिर्भर आयुष्य जगल्या. शशीताई दरवर्षी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा लेखाजोखा आपल्या निवडक लोकांसोबत वैयक्तिक अहवालाच्या स्वरूपात मांडत असत. एवढी पारदर्शकता पाळणारे अपवादात्मकच असतात. == १० शशीताईंच्या जीवनातून समजलेल्या गोष्टी ==
* जिव्हाळा, आपलेपणा आणि शिस्तीचा आग्रह एकच व्यक्ती करू शकते
* जीवनातली काही वर्ष तरी वंचितासोबत, वंचितांसारखे राहून त्यांच्याकडून जीवनाला सामोरे जाण्याचे धैर्य शिकणे महत्वाचे आहे
* मला जे मिळाले ते समाजाला परत करावे. ज्यांनी माझे आयुष्य समृद्ध केले, त्याबद्दल ऋणी राहणे
* कोणताही नवीन विषय अभ्यासाने शिकता येतो
* जे काम हाती घेतले ते व्यवस्थित विचारपूर्वक अभ्यासून, पूर्ण ताकदीने वेळेवर पूर्ण करणे
* आपले म्हणणे सोप्या पण प्रभावी भाषेत मांडणे
* कोणतीही संस्था असो ती स्वावलंबी पद्धतीने चालली पाहिजे
* सभासद आणि पदाधिकारी प्रशिक्षण हा प्रभावी स्वयंसहाय्य गट, संघ, सहकारी संस्था चालविण्याचा पाया आहे
* पारदर्शी कारभारासाठी योग्य निर्णयप्रक्रिया, आर्थिक व्यवहाराच्या योग्य नोंदी
* उत्तम कामगिरीसाठी - कामगिरीचे निकष ठरविणे, नियमित व नियोजित आढावा, उत्तम कामगिरी पुरस्कार या गोष्टी गरजेच्या आहेत
शशीताईंनी योगदान दिलेली स्वनियंत्रण पुस्तिका मालिका अत्यंत महत्त्वाची असून आपण त्या पुस्तिकांमधल्या अनुभवसिध्द माहितीचा उपयोग वारंवार आपल्या कामामध्ये केला पाहिजे.
शशीताईंचे योगदान असलेल्या स्वयंसहाय गट आणि त्यांच्या संघामध्ये लवकरात लवकर आत्मनिर्भर आणि शाश्वत होण्याची क्षमता आहे असे दिसून आले आहे. त्यांनी स्वतःची क्षमतावृद्धी करणे, कामकाज पद्धतीत सुधारणा करणे, उत्तरदायित्वामध्ये वाढ तसेच सभासदांच्या फायद्यासाठी आर्थिक, मानसिक तसेच भौतिक संसाधनाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी गट, विभाग, संघ पातळीवर कुशल आणि प्रभावी सभासदत्व नियंत्रण प्रणाली असणे गरजेचे आहे.
संघांनी त्या संदर्भातील गरजा पूर्ण करण्यासाठी आधीपासूनच काही प्रणाली विकसित केलेल्या आहेत. तरीदेखील प्रभावी आणि सुव्यवस्थित नियंत्रण होऊ शकते यासाठी आंध्र प्रदेश महिला अभिवृद्धी संघमने (एपीमास)पुढाकार घेऊन स्वनियंत्रण या विषयावर एक कार्यक्रमाची आखणी केली. या अंतर्गत संघांनी गट आणि संघामध्ये पदाधिकारी सभासदांची स्वनियंत्रण क्षमता वाढ वाढविणे, पुस्तकपालन तसेच देखरेखीवर भर देण्यात आला. त्यासाठी विविध प्रशिक्षण हस्तपुस्तिका तयार करण्यात आल्या.
या सर्व पुस्तिका तयार करण्यामध्ये स्वर्गीय शशीताई राजगोपालन यांचा महत्त्वाचा सहभाग होता. या पुस्तिकांमधील आशयाचे तपशील पुढीलप्रमाणे
१. बचतीचे महत्व
बचत गट चळवळीचा फायदा काय आहे ? कुठे आहे ? बचत का केली पाहिजे, कुठे केली पाहिजे ? किती केली पाहिजे ? तसेच सामुदायिक बचतीचे महत्त्व, त्याची सुरक्षितता, त्याचा गावावर होणारा परिणाम याबद्दल या पुस्तिकेत आपल्याला वाचायला मिळते.
आपण केलेली बचत आपला वर्तमान व भविष्यकाळ उज्ज्वल बनवेल. आपण केलेल्या बचतीत थोडी थोडी वाढ करून त्यातूनच, आपल्या कुटुंबाचा विकास कसा होईल हे ह्या पुस्तिकेत दाखवले आहे. २. कर्जाचे महत्त्व
उत्पन्न प्राप्तीसाठी, मिळकतीसाठी कर्ज, उन्नतीसाठी कर्ज, निधीचे स्त्रोत, व्याजाची आखणी, परतफेड, कर्जाचे धोके कमी करणे आणि निष्कर्ष हे मुद्दे या संदर्भात महत्त्वाचे आहेत. पैसे जबाबदारीने घेतल्यास ते नक्कीच उपयोगास येऊ शकतात. आपली परतफेड करण्याची जेवढी क्षमता आहे त्याच प्रमाणावर कर्ज घेतले पाहिजे.
३. स्वयंसहाय्य गटाचे पुस्तक पालन
ही पुस्तिका मराठीत करण्यात आली नाही. कारण ती माहिती अगोदर प्रसिध्द केली होती.
४. स्वयंसहाय्य गटाच्या खात्याची पुनर्बाधणी
गटाचं लेखापरीक्षण करताना गटाच्या पुस्तकांत कमतरता आहे असे लक्षात आल्यावर ते पूर्ण कसे करावे ह्याचे मार्गदर्शन या पुस्तिकेत आहे. गटाची विविध पुस्तके व नोंदी याची यादी आहे. सभासदांचे बचत तक्ते तयार करणे, कर्ज देणाऱ्या संस्थांच्या नोंदी लक्षात घेणे, बँक कर्ज पासबुक, फिरत्या भांडवलाची नोंद ठेवणे किंवा माहिती मिळवणे, सभासद माहिती फेरपडताळणी करणे, रोख शिल्लक व बँकेतील शिल्लक यांची नोंद घेणे, भागभांडवल बचतीची माहिती घेणे, संघात असलेल्या गटांचे ताळेबंदपत्रक तयार करणे, शेवटच्या महिन्याचे उत्पन्न-खर्च पत्रक तयार करणे, मागील महिन्याचे जमाखर्च पत्रक तयार करणे. ह्या सबंधीची माहिती पुस्तिकेत आहे. त्यानिमित्ताने गटाच्या सभासदांना चांगल्या नोंदी ठेवण्याची जाणीव निर्माण करून देण्याचीही एक संधी असते. तसेच प्रत्येक व्यवहार हा गटाच्या सभेतच व्हायला पाहिजे.
५. स्वयंसहाय्य समूह बाह्य लेखापरीक्षण (ऑडीट)
या पुस्तिकेत हिशोब तपासनीसाची गरज काय आहे, तिची नियुक्ती कशी करावी, तिची योग्यता, हिशोब तपासणीचे काम आणि हिशोब तपासणीचा अहवाल हे प्रमुख मुद्दे दिलेले आहेत. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. देशभरात गटांचे ऑडीट झाले पाहिजे. ह्याचा आग्रह ठेवण्याची गरज आहे.
गाव पातळीवर सी.ए.ने ऑडिट करावे अशी गरज नाही तर सी.ए.च्या मार्गदर्शनाखाली ऑडिट जाणकारांची फळी तयार होऊ शकते. ६. स्वयंसहाय्य गटाचे वार्षिक नियोजन
एखादी कार्यशाळा घेऊन हे पुस्तक गटाचे वार्षिक नियोजन करण्यासाठी उपयुक्त ठरेल.
यामध्ये नियोजन म्हणजे काय? नियोजनाचे महत्त्व, गरज, वार्षिक नियोजन करण्याची पद्धत याचा विचार मांडला आहे. गटासोबतच गरजांवर आधारित नियोजनाचे महत्त्व व फायदा दिलेला आहे.
या पुस्तकामध्ये प्रेरकांसाठी सूचना आहेत, स्वयंसहाय्य गटाचे वार्षिक नियोजन, अंदाजपत्र तयार करणे, वार्षिक नियोजनासाठी महत्त्वाचे निकष आणि त्याचे मूल्यमापन दिलेले आहे
७. स्वयंसहाय्य गटांचा संघ अंतर्गत व बाह्य लेखा परीक्षण
या पुस्तिकेमध्ये स्वयंसहाय्य गटाच्या लेखापरीक्षणाची गरज, बाह्य लेखा परीक्षकाची भूमिका, अंतर्गत लेखा परीक्षण, अंतर्गत लेखा परीक्षकाची पात्रता हे मुद्दे समाविष्ट केले आहेत.
तसेच अंतर्गत लेखा परीक्षाकाचे कार्य, अंतर्गत लेखा परीक्षण प्रक्रिया आणि अंतर्गत हिशोब तपासणी अहवाल, बाह्य लेखा परीक्षणाचा अर्थ, बाह्य परीक्षकाची भूमिका, लेखा परीक्षकाची जबाबदारी, लेखा परीक्षणासाठीची तयारी, इ. बाबत माहिती दिलेली आहे.
९. कामगिरी निकषांप्रमाणे स्वयंसहाय्य संघाचे वार्षिक नियोजन
ह्या पुस्तिकेमध्ये स्वयंसहाय्य संघाचे वार्षिक नियोजन, स्वयंपूर्णतेच्या दिशेने प्रवास सुकर, सहज आणि वेगवान होईल ह्यासाठी कामगिरी निकष दिलेले आहेत. तसेच अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रियापण दिलेली आहे. ह्या पुस्तिकेच्या आधारे कार्यशाळा घेऊन संघाचे नियोजन करता येईल.
१०. स्वयंसहाय्य गट आणि संघातील निवडणूक पद्धती
या पुस्तिकेमध्ये निवडणूकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, स्वयंसहाय्य गटातील निवडणूक, स्वयंसहाय्य गटामध्ये प्रतिनिधी निवडण्याची गरज, प्रतिनिधीचा कार्यकाळ, प्रतिनिधींचे गुण, निवडणुकीची प्रक्रिया विभाग / ग्राम संघ पातळीवर प्रतिनिधी निवडण्याची गरज, (प्रतिनिधीचा कालावधी,) त्यांचे गुण आणि निवडणुकीची प्रक्रिया मांडलेली आहे,
११. उत्तम कामगिरीचा पुरस्कार
गावातील गट, विभाग, संघ पातळीवर काम करण्यासाठी काही मापदंड ठरविणे आणि त्याप्रमाणे सदस्यांनी आदर्श पद्धतीने काम करण्यासाठी हे पुस्तक आहे.
त्याची पद्धत अशी की गावांमध्ये चांगले काम करणाऱ्या गटांना, तालुक्यामध्ये चांगले काम करणारे विभाग, तसेच जिल्ह्यामध्ये चांगले काम करणाऱ्या संघांना पारितोषिक देणे त्यासाठी या पुस्तकामध्ये निवड प्रक्रिया आणि पारितोषिके याविषयी माहिती दिलेली आहे.
१२. आर्थिक पत्रकांची समज
कोणत्याही संस्थेच्या आर्थिक विवरणपत्रांतून आपल्याला त्या संस्थेची माहिती कळते. हे आर्थिक विवरणपत्र अर्थ समजून घेण्यासाठी, विशेषतः आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नियमितपणे नजरेखालून घालत राहिले तर आपल्याला संघाची खरी आर्थिक स्थिती समजणे शक्य होईल. त्यामुळे ज्यावेळी आवश्यकता असेल त्यावेळी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपल्याला कृती करणे शक्य होईल. आपलीही स्थिती अधिक चांगली बनवण्यासाठी आपण नियोजन करू शकतो. या पुस्तकात निधी आणि व्यवहार, ठेवी, व्यापार लेखा पालन, आय आणि खर्च विवरण पत्र ताळेबंदची ओळख आणि प्रश्नोत्तराची स्पर्धा या पुस्तिकेत दिली आहे.
१३. स्वयंसहाय्य गट पातळीवर नफ्याचे व्यवस्थापन
या पुस्तिकेमध्ये स्वयंसहाय्य समूहामध्ये नफा टिकवण्याची गरज, समूहांमध्ये नफ्याची वाटणी केव्हा करावी, लेखा पुस्तकातील नोंदी, एकूण बचत आणि व्याज, एकूण बचत आणि व्याज काढून घेणे या संबंधी नोंदी आहेत. सभासदांच्या भवितव्याच्या सुरक्षित उभारणीसाठी ही फार महत्त्वाची पुस्तिका आहे. १४. स्वयंगटामध्ये व्याज निश्चिती आणि स्थिरीकरण
या पुस्तिकेमध्ये आर्थिक व्यवहारात व्याज कशासाठी, ठेवी किंवा बचतीवर व्याज, कर्जावरील व्याजदर, मासिक समान हप्ते, लेखा पुस्तकांमध्ये व्याजाच्या नोंदी, व्याज गणन तक्त्याची माहिती दिलेली आहे.
१५. स्वयंसहाय्यता समूहपातळीवरील माहिती व्यवस्थापन प्रणाली
आपल्या गटाची दिवसेंदिवस प्रगती होण्यासाठी चांगल्या गोष्टींमध्ये सातत्य ठेवणे आणि काही चुका होत असतील तर याबाबत सभासदांना जागृत करण्यासाठी काही कल्पना या पुस्तकेत मांडल्या आहेत.
या पुस्तकात आर्थिक विवरणपत्रांची समज व आढावा, थकबाकी आढावा आणि व्यवस्थापन, समारोप, निष्कर्ष आणि काही उदाहरणे दिली आहे.
१६. संघ पातळीवरील माहिती व्यवस्थापन प्रणाली
संघ पदाधिकारी म्हणून आपण वेळोवेळी सभासद, गट, विभाग यांच्या प्रगतीचा आढावा घेतला पाहिजे. त्यासाठी माहिती व्यवस्थापन प्रणाली, विभाग पातळीवर गटप्रगती आढावा, गट पातळीवर थकबाकी, विभाग पातळीवर माहिती व्यवस्थापन प्रणाली, संघ पातळीवर माहिती व्यवस्थापन प्रणाली, संघपातळीवरील अहवाल, संघाच्या वाढीची देखरेख इ. मुद्दे या पुस्तिकेत समाविष्ट करण्यात आले आहेत.
या पुस्तिकेतील साधनांचा आधार घेऊन आपण गट, विभाग आणि संघाची प्रगती पाहू शकतो. सुरुवातीला आकडे पाहून गोंधळून जाण्याची शक्यता आहे पण नंतर आपण आकडे पाहून आपल्या संघाची स्थिती ओळखू शकतो. हे ओळखल्यामुळे संघात ज्या काही हिशोबात, व्यवस्थापनात चुका होत असतील तर त्या रोखण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी आपण कार्यवाही करू शकतो आणि आपला गट, विभागणी, संघ दिवसेंदिवस प्रगती करत राहील याची खात्री देऊ शकतो.
१७. स्वयंसहाय्य गट आणि संघ यांचा नमुना वार्षिक अहवाल
या पुस्तिकेत स्वयंसहाय्य गटाचा नमुना वार्षिक अहवाल, संघाचा नमुना वार्षिक अहवाल त्याचे महत्त्व आणि नियामक मंडळ सभेसाठी नमुने, सूचना मांडलेल्या आहेत. वार्षिक अहवाल तयार करण्यासाठी पुढील मुद्दे दिलेले आहेत.
संघ नमुना वार्षिक अहवाल-प्रशासकीय मंडळ/संघ पदाधिकारी, सदस्यत्व, संघातर्फे आयोजित महत्त्वपूर्ण कार्यक्रम, संघाचे लेखा पुस्तकांचे प्रमाणीकरण, मागील वर्षाच्या अंदाजपत्रकाची प्रत्यक्ष आकड्यांची जुळवणी, मागील वर्षाच्या योजनेशी प्रत्यक्ष आकड्यांची जुळवणी, निधी, पुढील वर्षाचे अंदाजपत्रक, पुढील वर्षाचा कृती आराखडा, संघाचे मूल्यमापन, सभासद स्वयंसहाय्य गटाची स्थिती, सभासद विभागांची स्थिती इ. विषयी आणि शेवटी आभार प्रदर्शन.
१८. संघाचे वित्तीय व्यवस्थापन
या पुस्तिकेत निधी संकलन, व्यवस्थापन, निधी संरक्षण, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या जबाबदाऱ्या, पदाधिकारी मानधन, लेखापरीक्षक नेमणूक आणि मानधन, ध्येय धोरण, मालमत्ता व्यवस्थापन हे मुद्दे यात आहेत.
पदाधिकारी म्हणून आपल्याला आपले कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव असली पाहिजे. आपण संघाच्या सभासदांच्या, समाजाच्या हितासाठी काम करू आणि सभासदांप्रती आमचे उत्तरदायित्व असेल. सभासदांनी पदाधिकाऱ्यांवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी काम करणे आवश्यक आहे.
या पुस्तिकेमुळे स्वनियंत्रण माहितीचा प्रचार व प्रसार होईल आणि गट व संघाच्या सभासद तसेच पदाधिकाऱ्यांना त्यांचा उपयोग होईल अशी मनोमन खात्री आहे.
स्वयंनियंत्रण मालिका
संपादन- बचतीचे महत्त्व - रु.३०/-
- कर्जाचे महत्त्व - रु.३५/-
- स्वयंसहाय्य गट पुस्तक पालन - रु.७०/-
- स्वयंसहाय्य गटांच्या खात्याची पुनर्बाधणी - रु.२५/-
- स्वयंसहाय्य गटांच्या बाह्य लेखा परिक्षणासाठीची मार्गदर्शिका व सूची - रु.३०/-
- स्वयंसहाय्य गटाचे वार्षिक नियोजन - रु.३०/-
- स्वयंसहाय्य गट संघ पुस्तक पालन - रु.७०/-
- स्वयंसहाय्य गट संघ अंतर्गत लेखा परिक्षण - रु.३०/-
- स्वयंसहाय्य गट संघ बाह्य लेखा परिक्षण - रु.२५/-
- स्वयंसहाय्य गट आणि संघातील निवडणुक पध्दती - रु.३०/-
- स्वयंसहाय्य गट संघाचे वार्षिक नियोजन - रु.४०/-
- उत्तम कामगिरीचा पुरस्कार - रु.३५/-
- आर्थिक पत्रकांची समज - रु.६०
चैतन्यची इतर प्रकाशने
संपादननवी पहाट व उभरती उमंग (सी.डी) | नियम गटाचे तंत्र बैठकीचे |
नवी दिशा व नई दिशाएँ (सी.डी) | प्रेरणा गीत |
आधार (सी.डी) | गीतमाला भाग १,२,३ व ४ |
भोपळयाची वेल (सी.डी) | स्वयंसहाय्य गट गुणवत्ता आरसा |
स्वयंसिध्द आम्ही (सी.डी) | स्वयंसहाय्य गट गुणवत्ता मापन |
पेरणी भाग १ व २ | आमच्या विकासाची ऐका कहाणी |
बटवा - मासिक पत्र | लोकचळवळीचा वाटसरू |
वसा विकासाचा | स्वयंसहाय्य गट नोंदींचा संच |
बहाना बचत का बदलाव बहनों का | स्वयंसहाय्य गट समज गैरसमज |
संपर्कासाठी:
चैतन्य संस्था, मोती चौक, राजगुरूनगर, ता. खेड, . जि. पुणे ४१०५०५. | दूरध्वनी : (०२१३५) २२३१७६, (०२१३५) २२६५८० |
वेबसाईट :- www.chaitanyaindia.org