E-Book 100 Common Birds in Maharashtra Marathi (2)/'''पक्षीनिरीक्षणाची सुरुवात '''
पक्षीनिरीक्षण हा अतिशय आनंददायक छंद आहे. त्याची सुरुवात करतानाच्या काही मुलभूत गोष्टींचा येथे उहापोह केलेला आहे.
पक्षी निरीक्षण कोठे करावे?
पक्षीनिरीक्षणासाठी जंगलात जावे लागते असे नाही. आपल्या घराजवळ, शहरी बगिच्यात, रहदारीच्या रस्त्यावर सुद्धा पक्षी असतात. अर्थात प्रत्येक ठिकाणी त्यांची विविधता कमी अधिक प्रमाणात असते. त्यामळे आपणास जमेल तसे पक्षीनिरीक्षणास सुरुवात करता येते. खूप दूरच्या ठिकाणी जाणे शक्य नसल्यास आपल्या परिसरातील मोजक्या पक्ष्यांची वर्तणूक अधिक सखोल निरीक्षणे नोंदवून ठेवावीत. त्यामुळे आपल्याला पक्ष्यांच्या जीवनात डोकावून बघता येईल. कुठल्याही गावाच्या, खेड्याच्या बाहेर असलेले माळरान, झुडूपी जंगल, नदी नाले, खाड्या कितीतरी प्रजातीच्या पक्ष्यांचा अधिवास असते. अशा ठिकाणी पक्षीनिरीक्षणाला गेल्यास वेळ सत्कारणी लागतो.
पक्षी निरीक्षणाला कधी जावे?
बहुतेक प्रजातीचे पक्षी (दिवाचार) सकाळी व सायंकाळी जास्त क्रियाशील असतात. त्यामुळे सकाळी व सायंकाळी पक्षी निरीक्षणाला गेल्यास जास्त गतिविधि बघायला मिळते. पक्ष्यांचे गायन, उदा. दयाळ (Oriental Magpie Robin ), नाचण (Fantail), भूकस्तूर (Grounthrush), शामा (Shama), कोकीळ ऐकायचे असतील तर मात्र सूर्योदयापूर्वी इच्छित स्थळी पोचले पाहिजे. काही पक्षी मात्र सायंकाळी व रात्री कार्यशील (निशाचर) असतात, उदा. घुबड, पिंगळा, रातवा, करवानक (Stone-Curlew or Thick-knee). हे पक्षी बघायचे असतील, त्यांचे आवाज ऐकायचे असतील मात्र सायंकाळी अथवा रात्री बाहेर पडायला हवे. हिवाळ्यात आपल्या देशात अनेक प्रजातीचे पक्षी स्थलांतर करून येतात. पावसाळ्यात व उन्हाळ्यात अनेक स्थानिक पक्षी वीण करतात. त्यामुळे तिन्ही ऋतू पक्षी निरीक्षण करायला चांगले असतात.
नोंदी कशा ठेवाव्यातः
पक्षी निरीक्षण कस करायचं ह्यासाठी श्री मारुती चितमपल्ली ह्यांनी पक्षीकोशात सांगितलेले WHICH IS IT हे सूत्र मी थोडाफार बदल करून येथे देतो आहे.
Whereand When: स्थळ आणि तारीख.
H- Habitat: निवासस्थान, म्हणजे नेमका कुठे दिसला ते स्थळ. उदा. जंगल, कुरण, खारफुटी इ.
I- Impression: विश्रांती घेतोय की हालचाल करतोय. पक्षी बघताच तुम्हाला काय वाटले.
C-Comparison and Count: चिमणी, मैना, कावळा, घार, कोंबडी ह्या सामान्य पक्ष्यांशी तुलना करा (आकार). तसेच एकूण किती पक्षी दिसले ते नोंदवा.
H-Habit: सवयी (उदा. शेपटी हलवितो, जमिनीवर धावतो इ.)
I- Identification: विशेष चिन्हे - अंगावरील पट्टे, रेघा, ठिपके नोंदवा.
S-Sound: पक्ष्यांचा आवाज ऐका. शक्यतो शब्दांकित करा (उदा. हुदहुद पक्ष्याचा आवाज हु पो हु-पो-पो' असा लिहिता येतो).
I- Important Details: पाय, बोटे, चोचीचा आकार, रंगाचा तपशील वगैरे.
T- Tail and wings: आकार, लांबी आणि रचनेची वैशिष्टे द्या (उदा. शेपटी खूप लांब, शेपटी अगदीच आखूड, पंख शेपटीपेक्षा लांब, इ.).
पक्षी निरीक्षणाचे साहित्य
पक्षी निरीक्षणाला जाताना स्थानिक पक्ष्यांसंबंधीचे पुस्तक, पेन व नोंदवही सोबत असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण नेमके काय बघितले त्याची ओळख पटवून त्याची टिपणं ठेवणे सोपे जाते. स्थानिक पक्ष्यांसंबंधीचे कुठले पुस्तक घ्यावयाचे ह्याकरिता एखाद्या जाणकार मित्राचा सल्ला घ्यावा.
दुर्बीण
साध्या डोळ्यांनी जरी पक्षी निरीक्षण करता येत असले तरी एक द्विनेत्री अथवा दुर्बीण सोबत असल्यास आपली निरीक्षणे आणखी चांगली होतात. आपल्याला साधारणतः ८x४० अथवा १०x५० वर्धनक्षमतेची (Magnification Power) दुर्बीण पक्षी निरीक्षणाला योग्य असते. ८x४० ह्यामधील पहिला अंक वस्तू आपल्याला आठपट जवळ दिसते हे सांगतो तर ४० हा अंक दुर्बिणीच्या समोरील भिंगाचा व्यास दर्शवितो.
कॅमेरा
पक्षी निरीक्षणाला जाताना कॅमेरा असायलाच हवा असे अजिबात नाही. असल्यास उत्तमच. विकत घेताना आपले आर्थिक बजेट बघून कॅमेरा घ्यावा. कॅमेऱ्यामध्ये आजकाल खूपच
पक्षीनिरीक्षणासाठी लागणारे साहित्य:
विविधता उपलब्ध असून एखादया जाणकार मित्राच्या सल्ल्यानेच कॅमेऱ्याची निवड व खरेदी
करावी. छायाचित्रे काढताना आपण ज्या ठिकाणी पक्षी निरीक्षण केले त्या ठिकाणच्या
अधिवासाची छायाचित्रे जरूर काढावीत.
पक्षी निरीक्षणाला जाताना करावयाचा पोशाख
पक्षी निरीक्षणाला जाताना आपण कुठे जातोय ह्याचा विचार करून तयारी करावी. घनदाट, सदाहरित जंगलात, खारफुटीच्या वनात तसेच झुडूपी जंगलात जायचे असेल तर साधारणतः हिरवे कपडे (फुल पँट व लांब बाह्याचे शर्ट) घालावेत. अशा ठिकाणी तसेच पाणथळीच्या ठिकाणी जाताना डास प्रतीरोधक मलम (Mosquito Repellent Cream) सोबत ठेवावा. वाळवंटात, माळरानावर तसेच पानगळीच्या जंगलात (उन्हाळ्यात) जायचे असेल तर खाकी कपड़े योग्य ठरतात. अशा ठिकाणी त्वचा रक्षक मलम (Sun-screen Lotion) सोबत ठेवावा, तो वापरल्यास त्वचा करपत नाही.
हिरवी अथवा खाकी टोपी (कॅप अथवा हॅट) घातल्यास पक्षी बघताना आणखी फायदे असे की डोळ्यांना उन्हाचा त्रास होत नाही तसेच चेहेच्यावरची त्वचा करपत नाही.
पायात नेहमी शूज घालावेत. त्यामुळे काटया-गोट्यापासून तसेच कीटक व सर्पदंशापासून पायांचे रक्षण होते. घनदाट, सदाहरित जंगलात रक्तपिपासू जळवा (Leech) असतात. अशा ठिकाणी जाताना विशिष्ट प्रकारचे पायमोजे (Leech-proof Socks) मिळतात. ते आवश्य घालावेत.
हे विसरू नका
पक्षी निरीक्षणाला जाताना आपने सर्व सामान पाठीवरच्या बॅगेत (रकसॅॅक) ठेवावे. त्यामुळे आपले दोन्ही हात दुर्बण, कॅमेरा इ. वस्तू सांभाळण्यासाठी मोकळे राहतात. जरी आपल्याला लवकर परत यायचे असले तरीही, नेहमी रकसॅॅकमध्ये काहीतरी खायचे जिन्नस चिवडा, बिस्किटाचा पुडा, चॉकलेट, केक इ.) तसेच पाण्याची भरलेली बाटली ठेवावी.
माझ्या नोंदींचे मी काय करू?
पक्षीनिरीक्षकांना अनेक वर्षे पक्षी निरीक्षण केल्या नंतर माझ्या नोंदींचे मी काय करू?’ हा प्रश्न पडतो. अनेक जण वृत्तपत्रात लेख लिहून आपले निसर्ग ज्ञान समाजापर्यंत, नव्या
पिढीपर्यंत पोचवतात. काही जण संशोधन पत्रिकांमध्ये लिखाण करतात अथवा अगदीच
थोड़के लोक पुस्तक लिहितात. आपल्या नोंदींचा समाजाला, पुढील पिढीला उपयोग करू
द्यावयाचा असेल तर ह्या सर्व नोंदी इंटरनेट वरील ई-बर्ड सारख्या वेबसाईटवर टाकाव्यात.
पुढे चालून ह्या नोंदींचा अभ्यास करून, पक्ष्यांच्या संख्येत होत असलेले बदल तसेच
पर्यावरण बदलाचे पक्ष्यांवर होणारे परिणाम आपल्याला वा पुढील पिढीला जाणून घेता
येतील अन्यथा आपली निरीक्षणे समाजाच्या उपयोगी पडणार नाहीत.
चांगले पक्षीनिरीक्षक होऊ या
आपण पक्षीनिरीक्षणाला जाताना एक चांगले पक्षी निरीक्षक व्हायचा प्रयत्न करू या. राखीव जंगल अथवा अभयारण्यात जात असल्यास रीतसर परवानगी घ्या. प्रवेश शुल्क तसेच कॅमेरा शुल्क भरा. त्यामुळे त्या स्थळाच्या संवर्धनात आपला हातभार लागतो.
पक्षी निरीक्षण करताना गोंगाट, आरडाओरडा करू नका. त्यामळे पक्षी घाबरून उडून जातात. एखादा पक्षी तुम्हाला दिसल्यास इतरांना ओरडून सांगण्याऐवजी इशाराने अथवा शिळ घालून सांगा. शक्यतो उपलब्ध असलेल्या पायवाटेचा उपयोग करा. वाहने पक्ष्यांच्या अधिवासात घुसवून पक्ष्यांचा अधिवास नष्ट करू नका. अनेक पक्षी जमिनीवर घरटी करतात हे लक्षात असू द्या. तेथे प्लास्टिकच्या पेशव्या, बाटल्या फेकू नका (परत येताना दुसऱ्यांनी फेकलेल्या अशा वस्तू आढळल्यास उचलून आणल्यास अति-उत्तम).
एखाद्या पक्ष्याचे घरटे आढळल्यास त्याची छायाचित्रे काढण्याचा अट्टाहास करू नका. घरटी, अंडी तसेच असहाय पिल्लांच्या छायाचित्रांना आता कुठल्याही स्पर्धेत, प्रदर्शनात प्रवेश निषिद्ध आहे. पक्ष्यांच्या घरट्याला, अंडी अथवा पिल्लांना हात लाऊ नका. पक्ष्यांची घरटी काढून आणू नका. ज्या पक्ष्यांवर आपण प्रेम करतो त्यांची वंशवृध्दी झाली तरच ते जगतील. जंगलात शिकार अथवा अवैध वृक्षतोड़ होत असल्याचे तसेच वणवा लावलेला आढळून आल्यास वन विभागाला कळवावे.
एक सच्चा पक्षी निरीक्षक आणि निसर्ग प्रेमी म्हणूनच आपण जंगलात जाऊ या आणि पक्षी निरीक्षणाचा तसेच वनभ्रमणाचा आनंद घेऊ या !