E-Book 100 Common Birds in Maharashtra Marathi (2)/'''पक्ष्यांची वर्णने '''


छोटी टिबुकली
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: छोटी टिबुकली.
इंग्रजी नाव: Little Grebe. शास्त्रीय नाव: Tachybaptus ruficollis. लांबी: २३ सेंमी. आकारः पारव्याएवढा. ओळख: आकाराने सर्वात छोटे, बसके, बिना-शेपटीचे बदक. वरील बाजूस गडद तपकिरी, डोके काळपट. गाल, घसा व गळा बदामी. चोचीच्या बाजू पिवळसर. पाण्यात बुडी मारून दूर कुठेतरी अवतरतो. आवाज: खिंकाळल्यासारखा ट्रीरिरीरीरी असा आवाज. धोक्याचा इशारा '‘वीट वीट असा. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवासःबोडी तसेच तलाव. खाद्यः जलचर कीटक, बेडूकमासे, बेडूक, अपृष्ठवंशीय जलचर. इ.


छोटा पाणकावळा
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: छोटा पाणकावळा.

इंग्रजी नाव: Little Cormorant. शास्त्रीय नाव: Phalacrocorax niger. लांबी: ५१ सेंमी.

आकार: कावळ्यापेक्षा मोठा. ओळख: आकाराने सर्वात छोटा पाणकावळा. आयताकार डोके, आखूड पण मजबूत चोच. गळयाची त्वचा काळी (पिवळी नसते). चोच, चेहरा तसेच डोळे काळे. व्याप्ती: रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: सरोवरे, तलाव व खाड्या. खाद्यः मुख्यत्वे मासे.

भारतीय पाणकावळा
(छाया: डॉ. राजू कसंबे)


मराठी नाव: भारतीय पाणकावळा.

इंग्रजी नाव: Indian Cormorant (जुने नाव - Indian Shag). शास्त्रीय नाव: Phalacrocorax fuscicollis. लांबी: ६३ सेंमी. आकार: बदकापेक्षा मोठा. ओळख: मोठ्या पाणकावळ्यापेक्षा लहान. वरील बाजू चमकदार काळी-कांश्य रंगाची. खालील बाजू काळी. कानामागे पांढ-या पिसांचा झुपका. डोळे पाचूप्रमाणे हिरवे. गळ्याची त्वचा पिवळी. व्याप्ती: रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: झिलानी, सरोवरे, तलाव, खाजणीचे प्रदेश व खाड्या. खाद्यः मुख्यत्वे मासे.

गायबगळा
(छाया: वेदांत कसंबे)

मराठी नाव: गायबगळा.

इंग्रजी नाव: Cattle Egret. शास्त्रीय नाव: Bubulcus ibis. लांबी: ५१ सेमी. आकार: गावठी कोंबडीएवढा. ओळख: संपूर्ण पांढरा शुभ्र. पिवळी चोच व गडद पाय. विणीच्या हंगामात डोके, मान व पाठीवर तांबूस-नारिंगी पिसे धारण करतो; पाय लालसर होतात, चोचीच्या व डोळ्यामधील त्वचा लाल होते. बरेचदा गुरांसोबत, त्यांच्या पाठीवर दिसतो. नांगरणी, शेतात नेहेमी दिसतो. चरताना व रात्र थाऱ्याला थव्याने, व्याप्तीः रहिवासी. महाराष्ट्रात सर्वत्र. अधिवास: माळराने, भातखाचरे, तलावांचे काठ, पाट, शहरातील कच-याच्या जागा, जंगलातील मोकळणी. खाद्य: तुडतुडे, बेडूक, रातकिडे, सरडे, गोमाशा, गोचीड, मासे इ.

मोठा बगळा
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: मोठा बगळा.

इंग्रजी नाव: Great Egret. शास्त्रीय नाव: Casmerodius albus. लांबी: ९१ सेंमी. आकार: लांडोरीपेक्षा मोठा. ओळख: मोठा, सडपातळ, पांढराशुभ्र बगळा. पाय काळपट, चोच पिवळी. विणीच्या हंगामात पाय लालसर, चोच काळी होते व पाठीवर सुंदर पिसे धारण करतात. चोच व डोळ्यामधील त्वचा विणीच्या हंगामात निळी होते, इतर वेळेस ती हिरवट असते. जबड्याची काळी रेष डोळ्याच्या मागेपर्यंत जाते. लांब मानेचा इंग्रजी 'S' होतो. व्याप्ती: रहिवासी. महाराष्ट्रात सर्वत्र. अधिवास: दलदलीचे प्रदेश, तलाव, नद्या. खाद्यः मासे, बेडूक

लहान बगळा
(छाया: डॉ. राजू कसंबे)


मराठी नाव: लहान बगळा.

इंग्रजी नाव: Little Egret. शास्त्रीय नाव: Egretta garzetta. लांबी: ६३ सेंमी. आकार: गावठी कोंबडीएवढा. ओळख: सडपातळ आणि छोटा पांढराशुभ्र बगळा. काळी चोच, काळे पाय व पिवळी बोटे (मोजे घातल्यासारखे). चोच व डोळ्यामधील त्वचा विणीच्या हंगामात लालसर होते, इतर वेळेस ती करडी व पिवळी असते. विणीच्या हंगामात पाय लालसर होतात, पाठीवर तसेच छातीवर सुंदर पिसे धारण करतात. व्याप्ती: रहिवासी. महाराष्ट्रात सर्वत्र. अधिवास: तलाव, नद्या, दलदलीचे प्रदेश, भातखाचरे, खाड्या, खाजनीचे प्रदेश, तिवराची बने. गोड्या पाण्याजवळ अधिक आढळतो. खाद्य: किटक, मासे, बेडूक, छोटे सरपटणारे प्राणी इ.

राखी बगळा
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: राखी बगळा.

इंग्रजी नाव: Grey Heron. शास्त्रीय नाव: Ardea cinerea. लांबी: ९८ सेंमी. महाराष्ट्रात सर्वत्र.आकार: लांडोरीपेक्षा मोठा. ओळखः एकंदरीत राखाडी रंगाचा मोठा बगळा. चोच पिवळी, डोके व मान पांढरी आणि काळी शेंडी. पोटावर काळे डाग, उडताना पंखांना पुढील बाजूस पांढरी किनार स्पष्ट दिसते. आवाज: उडताना जोराचा ‘फ्राऽऽऽन्क' असा आवाज. व्याप्तीः रहिवासी तसेच स्थलांतरित. अधिवास: दलदलीचे प्रदेश, खाजणाचे प्रदेश, समुद्रातील खडकाळ बेटे, मोठे तलाव. खाद्यः बेडूक, मासे, इ.

जांभळा बगळा
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: जांभळा बगळा.

इंग्रजी नाव: Purple Heron. शास्त्रीय नाव: Ardea purpurea. लांबी: ९७ सेंमी. महाराष्ट्रात सर्वत्र. आकार: लांडोरीपेक्षा मोठा. ओळख: एकदम सडपातळ शरीरयष्टी, लांब पातळ मान. तुरा व मुकुट निळसर-काळे. डोके व मान बदामी-लालसर. मानेच्या समोरून व बाजूस काळी पट्टी. हनुवटी व कंठ पांढरा. उडताना पंखाखालची जांभळी पिसे दिसतात. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: झिलानी, नद्या व पाणवनस्पती माजलेले तलाव. खाद्यः बेडूक, मासे, कोलंबी, छोटे सर्प इ.

रात्रिंचर ढोकरी
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: रात्रिंचर ढोकरी.

इंग्रजी नाव: Black-crowned Night Heron. शास्त्रीय नाव: Nycticorax nycticorax. लांबी: ५८ सेंमी. आकार: कोंबडीपेक्षा मोठा. ओळख: लठ्ठ शरीर व जाड मान. मुकुट व पाठ काळी, राखाडी पंख. खालील बाजू पांढरट. डोळे लाल. मुखत्वे रात्रिंचर असून दिवसा गर्द झाडीत लपून बसतो. विणीच्या हंगामात दोन पांढ-या शेंड्या उगवतात व पाय लाल होतात. विणीच्या हंगामात मात्र दिवसा बाहेर पडतो. सांजवेळी थोट्या थव्यात उडताना दिसतो. व्याप्तीः रहिवासी. महाराष्ट्रात सर्वत्र, पण निशाचर असल्यामुळे दिसून पडत नाही. अधिवास: तलाव, खाजनीचे व किनारपट्टीचे प्रदेश, खाड्या. खाद्य: खेकडे, मासे, बेडूक, जलचर कीटक

ढोकरी
(छाया: डॉ. राजू कसंबे व इनसेट डॉ. तारिक़ सानी)


मराठी नाव: ढोकरी.

इंग्रजी नाव: Indian Pond Heron. शास्त्रीय नाव: Ardeola grayii. लांबी: ४६ सेंमी. आकार: कोंबडीएवढा. ओळख: मातकट पाठ व पांढरे पंख. डोके, मान व छातीवर रेषा. विणीच्या हंगामात डोके-मान फिक्कट पिवळसर तपकिरी आणि पाठ गडद लालसर-तपकिरी होते, डोळ्याजवळची त्वचा निळी होते, पांढ-या शेंड्या उगवतात. काहींचे पाय लाल होतात. व्याप्तीः रहिवासी. महाराष्ट्रात सर्वत्र. अधिवास: उथळ पाणथळीच्या जागा, ओढे, डबकी, तलाव, भातखाचरे. खाद्यः बेडूक, मासे, छोटे खेकडे, कीटक इ.

रंगीत करकोचा
(छाया: अनिल महाजन व इनसेट छाया: हरिश्चंद्र म्हात्रे)

मराठी नाव: रंगीत करकोचा.

इंग्रजी नाव: Painted Stork. शास्त्रीय नाव: Mycteria leucocephala. लांबी: ९३ सेंमी. आकारः मोराएवढा. ओळख: एकंदरीत पांढरा. छातीवर काळे पट्टे. पंख काळे व त्यावर पांढरे पट्टे. शेपटी काळी. पंखांमध्ये आतली (तृतीयक) पिसे नाजूक गुलाबी. चोच पिवळी, वाकडी व पाय नारिंगी-लाल. सामुहिक वीण. थव्याने आढळतात. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: मोठे तलाव, झीलानी, खाइया. खाद्य: मासे, बेडूक, छोटे सर्प इ.

उघड्या चोचीचा करकोचा
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नावः उघड्या चोचीचा करकोचा.

इंग्रजी नाव: Asian Openbill. शास्त्रीय नाव: Anastomas oscitans. लांबी: ६८ सेंमी. आकार: बदकापेक्षा मोठा. ओळख: हा एक छोटा करकोचा असून एकंदरीत मळकट पांढरा. मळकट चोचीच्या दोन जबड्यांमध्ये अडकित्त्यासारखी फट. शेपटी व पंखाची उड्डाण पिसे काळी (टिप - पांढ-या करकोच्याची शेपटी पांढरी असते). पाय मळकट गुलाबी, पण विणीच्या हंगामात चटक गुलाबी. सामुहिक वीण. थव्याने आढळतात. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: भातखाचरे, उथळ तलाव, सरोवर, झिलानी, खाइया. खाद्यः शंख, शिंपले व जलीय जीव. खाद्यः शिंपल्यातील मृदूशरीरी जीव, गोगलगायी, बेडूक, खेकडे, पाण्यातील कीटक इ.

पांढच्या मानेचा करकोचा
(छाया: नंदकिशोर दुधे)

मराठी नाव: पांढ-या मानेचा करकोचा.

इंग्रजी नाव: Woolly-necked Stork. शास्त्रीय नाव: Ciconia episcopus. लांबी: १०६ सेंमी. आकार: लांडोरीपेक्षा मोठा. ओळख: एकंदरीत काळा व ठळक पांढरी मान. डोक्यावर काळी टोपी. बुड व शेपटी खालून पांढरी. चोच लालसर काळी. पाय फिक्कट लाल. उडताना खालून मान व बुड वगळता संपूर्ण काळा. एकटा, जोडीने वा छोट्या थव्याने. व्याप्ती: रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: झिलानी, ओलिताखालील शेते, नद्या, पाणी साचलेली माळराने. खाद्य: मासे, बेडूक, खेकडे, सरपटणारे प्राणी, मोठे कीटक, गोगलगायी, शिंपल्यातील मृदूशरिरी प्राणी इ.

काळी शराटी
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: काळी शराटी.

इंग्रजी नाव: Black Ibis. शास्त्रीय नाव: Pseudibis papillosa. लांबी: ६८ सेंमी. आकार: कोंबडीएवढा. ओळख: एकंदरीत चमकदार काळा, मोठी खाली वाकलेली काळी चोच. खांद्यावर पांढरा डाग. पंखवीरहित माथ्यावर चटकदार लाल रंगाची टोपी असते. पाय विटकरी लाल रंगाचे. व्याप्ती: रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: झिलानी, नद्या, माळराने, पडीक शेते. खाद्य: ढालकीटक, गांडूळ, बेडूक, विंचू, सरडे, मासे इ.

चमचा
(छाया: हरिश्चंद्र म्हात्रे)

मराठी नाव: चमचा.

इंग्रजी नाव: Eurasian Spoonbill. शास्त्रीय नाव: Platalea leucorodia. लांबी: ६० सेंमी. आकारः बदकाएवढा. ओळख: एकंदरीत पांढराशुभ्र. पाय काळे. चोच लांब व चपटी आणि टोकाकडे पिवळी व चमच्याप्रमाणे. विणीच्या हंगामात डोक्यावर तुरा व छातीवर पिवळा पट्टा येतो. घसा पंखवीरहित नारिंगी. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: दलदलीचे प्रदेश, नद्या व झिलानी, खाद्य: किडे, शंख-शिंपल्यातील मृदूशरीरी जीव, बेडूक, बेडूकमासे, झिंगे इ.

मोठा रोहित
(छाया: नंदकिशोर दुधे)

मराठी नाव: मोठा रोहित.

इंग्रजी नाव: Greater Flamingo. शास्त्रीय नाव: Phoenicopterus roseus. लांबी: १२७- १४५ सेंमी. आकार: लांडोरीपेक्षा मोठा. ओळख: छोट्या रोहित पेक्ष्या थोरला. पाय तसेच मान जास्त लांब. गुलाबी चोचीचे टोक काळे व कमी बाकदार. डोके, मान व शरीर फिक्कट पांढरे-गुलाबी. अल्पवयीन पक्ष्यांचे शरीर, मान व डोके मळकट-राखाडी; चोच राखाडी व टोक काळे. पाण्यात डोके बुडवून उलट्या चोचीने खाद्याचा शोध घेतात. व्याप्तीः स्थलांतरित. गुजराथेत वीण. मुंबई परिसरात हिवाळ्यात आगमन व पावसाच्या आगमनापूर्वी प्रस्थान. औरंगाबाद (जायकवाडी), नाशिक (नांदूर मधमेश्वर, गंगापूर), पुणे (भिगवण), सोलापूर (उजनी) येथे नेहेमी. अमरावती (मालखेड), अकोला, वाशीम (एकबुर्जी), बुलडाणा (लोणार), नागपूरला मोजक्या नोंदी. अधिवास: उथळ खाऱ्या पाणथळ जागा, खाजणं, मिठागरे. गोड्या पाण्याचे तलाव. खाद्य: छोटे कवचधारी प्राणी, अळ्या, कीटकांचे पिलव, पाणवनस्पतींच्या बिया, सेंद्रिय गाळ, शैवाल इ.

छोटा रोहित
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: छोटा रोहित.

इंग्रजी नाव: Lesser Flamingo. शास्त्रीय नाव: Phoenicopterus minor, लांबी: ९० सेंमी. आकार: बदकापेक्षा मोठा. ओळख: मोठ्या रोहितपेक्षा आकाराने बराच लहान, मान व पाय तुलनेत कमी लांब. एकंदरीत गडद गुलाबी पिसारा, चोच गडद काळपट-गुलाबी आणि जास्त बाकदार. चालताना चोच मागे-पुढे फिरवत पाण्यातून सूक्ष्मजीव गाळून घेतो. खोल पाण्यात पोहतो. व्याप्ती: स्थलांतरित. गुजराथेत वीण. मुंबई परिसरात हिवाळ्यात आगमन व पावसाच्या आगमनापूर्वी प्रस्थान. अमरावतीला (मालखेड) एक नोंद. अधिवास: खाजणाचे प्रदेश, मिठागरे, खाच्या पाण्याची सरोवरे. खाद्य: मुख्यत्वे सूक्ष्म एकपेशीय शैवाल वनस्पती.

चक्रवाक
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नावः चक्रवाक.

इंग्रजी नाव: Ruddy Shelduck (जुने नाव: Brahminy Shelduck). शास्त्रीय नाव: Tadorna ferruginea. लांबीः ६१-६७ सेंमी. आकारः बदकापेक्षा मोठा. ओळखः एकंदरीत लालसर नारिंगी, डोके थोडे फिक्कट पांढरट. उडताना पंखांची पुढील बाजू पांढरी, मागील बाजू चमकदार हिरवी आणि प्राथमिक पिसे काळपट दिसतात. शेपटी काळी. नराला कंठ. आवाजः नाकातून काढल्यासारखा *आंग-आंग'. व्याप्तीः स्थलांतरित. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवासः नद्या, तलाव आणि सरोवरे, खाद्यः वनस्पतीचे कोंब, धान्य तसेच छोटे कवचधारी प्राणी, जलचर कीटक, मासे, छोटे सरपटणारे प्राणी.

अइई
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नावः अइई.

इंग्रजी नावः Lesser Whistling Duck (Teal).शास्त्रीय नाव: Dendrocygna javanica. लांबी: ४२ सेंमी. आकार: बदकापेक्षा छोटा. ओळख: डोके व मान राखी तांबूस. मुकुट गडद तपकिरी असून पंखांचा खांदयाकडचा भाग व शेपटीची वरील बाजू चकचकित बदामी असते. अशक्तपणे पंख फडफडवीत उडताना एकसारखे शिळ घालतात. आवाज: उडताना अविश्रांत शिळ घालतात. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवासः भरपूर वनस्पती असलेल्या पाणथळ जागा, उथळ तलाव, बोडी, सरोवरे, भातखाचरे तसेच दलदलीच्या प्रदेशात. खाद्य: मुख्यत्वे शाकाहारी. वनस्पतींचे कोवळे कोंब तसेच धान्य. कधीकधी मासे.

हळदीकुंकू बदक
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: हळदीकुंकू बदक.

इंग्रजी नावः Spot-billed Duck. शास्त्रीय नाव: Anas poecilorhyncha. लांबीः ५८-६३ सेंमी. आकारः बदकाएवढा. ओळखः सर्वांगावर करड्या व गडद तपकिरी रंगाची खवल्यांप्रमाणे नक्षी, पंखांवर चकाकणारा हिरवा पट्टा असून त्याला पांढरी किनार असते.पायांचा रंग नारिंगी-लाल. चोचीचे टोक पिवळे व बुडाशी लाल ठिपका. आवाजः शक्यतो शांत. गावठी बदकाप्रमाणे जोरकस 'क्वॅक क्वॅक'. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवासः दलदली प्रदेश, तलाव, बोडी, सरोवरे. खाद्य: मुख्यत्वे शाकाहारी.

काणूक बदक
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: काणूक बदक.

इंग्रजी नावः Cotton Pigmy-goose (जुने नाव: Cotton Teal). शास्त्रीय नाव: Nettapus coromandelianus. लांबी: ३०-३७ सेंमी. आकारः तित्तीराएवढा. ओळखः नराचे डोके आणि मान पांढरी असून डोक्यावर काळी टोपी असते. वरील बाजू हिरवट काळी असून गळ्यात रुंद काळा पट्टा असतो. उडताना नराच्या पंखावर पांढरा पट्टा स्पष्ट दिसतो. मादीच्या पंखांना मागील बाजूस अरुंद पांढरी किनार असते. अवयस्क पक्षी फिक्कट रंगाचे असून चेहे-यावर डोळ्यातून जाणारी गडद पट्टी असते. अतिशय वेगात उडते. आवाजः उडताना हळुवार खुळखुळणारा आवाज. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र अधिवासः भरपूर पाणवनस्पती असलेले तलाव आणि सरोवरे. खाद्य: मुख्यत्वे शाकाहारी. तसेच छोटे जलचर कीटक, मृदुशरीरी जीव.

मोठी लालसरी
(छायाः डॉ. तारिक़ सानी)

मराठी नावः मोठी लालसरी.

इंग्रजी नाव: Red-crested Pochard. शास्त्रीय नाव: Rhodonessa rufina. लांबीः ५३-५७ सेंमी. आकारः बदकापेक्षा छोटा. ओळखःनराचे डोके चौकोनाकृती असून पिवळसर-नारिंगी असते. चोच लाल, गळा व छाती काळी, वरील बाजू तपकिरी-काळपट आणि पोटाची बाहेरील बाजू पांढरी असते. मादी फिक्कट तपकिरी असून डोक्यावर गडद तपकिरी मुकुट असतो. व्याप्तीः स्थलांतरित. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवासः तलाव, सरोवरे व मोठ्या नद्या. खाद्यः पाणवनस्पतींचे कोंब व मुळे. मृदुशरीरी जीव, कवचधारी जीव, जलकीटक इ.

छोटी लालसरी
(छाया: डॉ. तारिक़ सानी)


मराठी नावः छोटी लालसरी.

इंग्रजी नावः Common Pochard. शास्त्रीय नाव: Aythya ferina. लांबीः ४२-४९ सेंमी. आकारः बदकापेक्षा छोटा, ओळखः प्रजनन काळातील नराचे डोके व मान बदामी-लाल असते. पाठ व पोट चंदेरी करडे असून छाती व पार्श्वभाग काळा असतो. मादीचे डोके व छाती तपकिरी असून, वरील बाजू, पोटाची बाजू फिक्कट राखी तपकिरी असते. गळा व डोळ्यामागे फिक्कट रेष असते. डोळे गडद व काळ्या चोचीवर मध्यभागी आडवा करडा पट्टा असतो. व्याप्तीः स्थलांतरित. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवासः तलाव, सरोवरे व मोठ्या नद्या, खाद्यः मिश्राहारी पण मुख्यत्वे शाकाहारी.

घार
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: घार.

इंग्रजी नाव: Black Kite. शास्त्रीय नाव: Milvus migrans, लांबी: ६१ सेंमी. ओळख: एकंदरीत गडद तांबूस-तपकिरी. उडताना पंख आणि शेपटीची कसरत जास्त करते. खालील बाजुस प्राथमिक पिसांच्या बुडाशी पांढरट चंद्रकोरी. वरील बाजूस मध्यम पिसांच्या आवरणावर निस्तेज पट्टा. शेपटी कमी खोलवर दुभंगलेली. वर्षभर थव्याने राहतात. आवाज: कर्कश शिळ ‘इवी-वीर-र्रर्र. व्याप्ती: रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: महानगरे, शहरे, खेड्यांजवळ. खाद्यः मांसाहारी. मांस विक्रीच्या दुकानाजवळ, कत्तलखान्याजवळ तसेच कच-याच्या ढिगा-यात असलेले मांसाचे, कोंबडीचे तुकडे, मृत जनावरे. तसेच जिवंत बेडूक, पक्ष्यांची पिलं, मासे, उंदीर, सरडे, पंखवाली वाळवी असे काहीही चालते.

कापशी
(छाया: डॉ. राजू कसंबे व इनसेट छाया: वेदांत कसंबे)


मराठी नाव: कापशी.

इंग्रजी नाव: Black-shouldered Kite. शास्त्रीय नाव: Elanus caeruleus. लांबी: ३३ सेंमी. आकार: कावळ्यापेक्षा छोटा. ओळख: आकाराने लहान, वरील बाजू राखाडी, खालील बाजू पांढरी व काळे खांदे. हवेवर अलगद तरंगतो. अनेकदा घोंघावतो (हॉवरिंग). आवाज: हळुवारपणे शिळ घातल्यासारखे आवाज करतो. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: विरळ झाडी असलेली माळराने, शेतीचे प्रदेश, झुडूपी वने. खाद्यः तुडतुडे, नाकतोडे, छोटे उंदीर, सरपटणारे प्राणी इ.

सर्पगरुड
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नावः सर्पगरूड.

इंग्रजी नाव: Crested Serpent Eagle, शास्त्रीय नाव: Spilornis cheela. लांबी: ५६-७४ सेंमी. आकारः घारीएवढा. ओळख: गडद तपकिरी रंगाचा मोठा गरूड. डोक्यावर पांढरे ठिपके असलेला काळा तुरा. खालील बाजू गडद तपकिरी, त्यावर काळे पांढरे ठिपके. पंख व शेपटीच्या खालील बाजूस रूंद काळे-पांढरे पट्टे. परविरहीत पिवळे पाय. आवाज: उडताना जोरकस कर्णमधुर शिळ किंवा कर्कश केकाटल्याचे आवाज. व्याप्ती: रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: जंगल व भरपूर झाडीचे प्रदेश. खाद्य: छोटे प्राणी, बेडूक, साप, सरडे, उंदीर इ.

दलदली हारिण
(छाया: वेदांत कसंबे)

मराठी नाव: दलदली हारिण.

इंग्रजी नाव: Eurasian (Western) Marsh Harrier. शास्त्रीय नाव: Circus aeruginosus. लांबी: ५६ सेंमी. आकार: घारीपेक्षा छोटा. ओळख: इतर हारीणांपेक्षा आकाराने मोठा. नर- एकंदरीत गडद तपकिरी वर्णाचा; डोके, छाती व मान फिक्कट तांबूस. पंख व शेपटीवर करडी पिसे, पंखांची टोके काळी, मादी- एकंदरीत चॉकलेटी तपकिरी वर्ण: टोपी, घसा व पंखांची समोरील बाजू खांद्याजवळ फिक्कट पिवळसर असते. उडताना ही वैशिष्ट्ये दिसून पडतात. व्याप्तीः स्थलांतरित. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: दलदलीचे प्रदेश. तलाव, खाइया. खाद्यः बेडूक, मासे, छोटे पक्षी, छोटे सस्तन प्राणी तसेच मृत प्राणी.

शिक्रा
(छाया: वेदांत कसंबे)

मराठी नाव: शिक्रा.

इंग्रजी नाव: Shikra, शास्त्रीय नाव: Accipiter badius, लांबी: ३०-३४ सेंमी. आकार: कावळ्यापेक्षा छोटा. ओळख: मांड्यांवरील पिसांवर पट्टे नसतात, शेपटीवर अगदी अस्पष्ट पट्टे. नर- वरील बाजूस निळसर-राखाडी, खालील बाजूस पांढ-या वर्णावर पातळ नारिंगी रेषा. घशावर अस्पष्ट राखाडी पट्टी. मादी- वरील बाजूस तपकिरी-करडा वर्ण, घशावर स्पष्ट तपकिरी पट्टी. अल्पवयीन- वरील बाजू खवलेदार गडद तपकिरी. खालील बाजूस भरपूर व स्पष्ट रेषा. भुवई स्पष्ट. घशावर स्पष्ट तपकिरी पट्टी. आवाज: 'टीटू-टीटू' असे जोरकस व कर्कश कोतवालासारखे आवाज. व्याप्ती: रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: विरळ पानगळीची वने, ग्रामीण तसेच शहरी भागातील झाडीचे प्रदेश (बगीचे, शेती इ.). खाद्यः सरडे, छोटे उंदीर, खारी, पक्षी इ. विणीच्या हंगामात कोंबडीची पिलं उचलतो.

सामान्य खरूची (नारझीनक)
(छाया: डॉ. राजू कसंबे व इनसेट छाया: वेदांत कसंबे)


मराठी नाव: सामान्य खरूची (नारझीनक).

इंग्रजी नाव: Common Kestrel, शास्त्रीय नाव: Falco tinnuncus, लांबीः ३६ सेंमी. आकार: पारव्याएवढा. ओळख: नर- नराचे डोके करडे असून डोळ्याखाली मिशीसारखी काळी पट्टी. वरील बाजू तांबूस व त्यावर काळ्या खुणा. करड्या शेपटीच्या टोकाकडे काळा पट्टा. मादी- डोके व खालील बाजू तांबूस असून त्यावर काळ्या रेषा. अरुंद काळी मिशीची पट्टी.तांबूस पाठीवर काळ्या रेषा व ठिपके. तांबूस शेपटीवर काळे पट्टे. आवाज: उंच पट्टीतला की-की-की असा आवाज. व्याप्ती: स्थलांतरित. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: शेतीप्रदेश, पर्वतीय तसेच मैदानी प्रदेशातील गवताळ माळराने, निम-वाळवंटी प्रदेश. खाद्य: छोटे उंदीर, सरडे, तुडतुडे व मोठे कीटक.

सामान्य लावा
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नावः सामान्य लावा.

इंग्रजी नावः Common Quail. शास्त्रीय नावः Coturnix coturnix. लांबीः २० सेंमी. ओळखः पाठ फिक्कट तपकिरी असून त्यावर बाणासारख्या तांबूस रेषा असतात. खालील बाजू पांढरट किरमिजी असते. नराच्या गळ्यावर बरेचदा नांगराच्या आकाराची काळी खुण असते. मादीच्या गळ्यावर ही खुण नसते. आवाज: वारंवार उच्चारलेली 'व्हीट, व्हीट-टीट' अशी मंजुळ शिळ. व्याप्ती: स्थलांतरित संपूर्ण महाराष्ट्र. अधिवासः गवताळ प्रदेश तसेच शेतीप्रदेशात दिसतो. खाद्यः धान्य, गवताच्या बिया, वाळवी इ.

मोर
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नावः मोर (नर), लांडोर (मादी).

इंग्रजी नावः Indian Peafowl. शास्त्रीय नाव: Pavo cristatus. लांबीः नर-१८०-२३० सेंमी. मादी (लांडोर)- ९०-१०० सेंमी. आकार: गावठी कोंबडीपेक्षा मोठा. ओळखः नराचा गळा आणि छाती निळी. डोईवर तुरा. लांब चकाकदार पिसाच्यावर काळा मध्य असलेल्या जांभळ्या-तांबेरी डोळ्यांची आरास. लांडोर नरापेक्षा लहान असून तिला तुरा असतो पण पिसा-याचा अभाव. वरील बाजू एकंदरीत तपकिरी, खालील बाजू तांबूस-पांढरी. आवाज: जोरदार आणि घुमणारा ‘पी-आ' अथवा 'मे-ss आँव'. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवासः आर्द्र तसेच शुष्क पानगळीची वने, शेतीप्रदेश, खेडेगावाच्या पंचक्रोशीत. खाद्य: धान्य, कोवळे कोंब, कीटक, सरडे, छोटे सर्प इ.

सारस क्रौंच
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: सारस क्रौंच.

इंग्रजी नाव: Sarus Crane. शास्त्रीय नाव: Grus antigone. लांबी: १५६ सेंमी. आकार: लांडोरीपेक्षा मोठा. ओळख: सर्वात उंच राखाडी क्रौंच. मानेचा वरचा भाग व डोके पिसेविरहीत लाल. मुकुट राखाडी-हिरवट पिसेविरहीत. लालसर पाय. आवाज: जोरकसपपणे तुतारी वाजविल्यासारखा. उडताना तसेच जमिनीवर. व्याप्तीः रहिवासी. आता केवळ गोंदिया भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यात दिसतो. धुळे व मुंबई परिसरातील फार जुन्या नोंदी. अधिवास: दलदलीचे प्रदेश, झिलानी, बोडी तसेच भातखाचरे. खाद्यः धान्य, गवताचे व धान्याचे कोवळे कोंब, इतर शाकाहारी खाद्य, कीटक, छोटे सरपटणारे प्राणी.

माळढोक (प. महाराष्ट्र), हूम (विदर्भ)
(छाया: गोपाळराव ठोसर)

मराठी नाव: माळढोक (प. महाराष्ट्र), हुम (विदर्भ).

इंग्रजी नाव: Great Indian Bustard. शास्त्रीय नाव: Ardeotis nigriceps. लांबी: नर-१२२ सेंमी. मादी-९२ सेंमी. आकारः लांडोरीपेक्षा मोठा. ओळख: नर दुरून शेळी वाटेल एवढा मोठा. वरील बाजू तपकिरी. डोके, मान व वरील बाजू पांढरी (नर) अथवा राखाडी (मादी). मुकुट व छातीवरील पट्टा काळा. खेडूतांची नेहमी पांढ-या मानेच्या करकोच्यासोबत गफलत होते (याला अनेक ठिकाणी ढोक म्हणतात). आवाज: विणीच्या हंगामात नर ‘हूऽम' असा घुमणारा भुंकल्यासारखा आवाज करतो. व्याप्तीः रहिवासी. सध्या केवळ सोलापूर-नगर (माळढोक अभयारण्य, नान्नज), नाशिक (होसूर, गंगापूर), चंद्रपूर (वरोरा), नागपूर (उमरेड,नागपूर ग्रामीण) या जिल्ह्यातच दिसतो. अधिवास: शुष्क गवताळ प्रदेश, झुडूपी माळराने. कमी उंचीचे पिक असलेल्या शेतात. खाद्यः पिकाचे कोवळे कोंब, धान्य, तुडतुडे, नाकतोडे, इतर कीटक, गोम, सरडे, इ.

पांढऱ्या छातीची पाणकोंबडी
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: पांढ-या छातीची पाणकोंबडी.

इंग्रजी नाव: White-breasted Waterhen. शास्त्रीय नाव: Amaurornis phoenicurus. लांबी: ३२ सेंमी. आकार: तित्तीराएवढा. ओळख: वरील बाजूस गडद राखाडी, चेहेरा व खालची बाजू पांढरी. बुड व शेपटीची खालची बाजू तांबूस. चोच व पाय हिरवट-पिवळे. चोचीच्या बुडाजवळ लाल. आवाज: वेगवेगळे घोगरे इरकावल्याचे आवाज, जसे 'क्वाSSSक, कुऽवाक-कुवाक'. व्याप्ती: रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: तलाव, डबकी, दलदलीचे प्रदेश, भातखाचरे, बेशरमीची झुडुपे. खाद्यः कीटक, कृमी, मृदूशरीरी प्राणी, धान्य, धानाचे तसेच पाणवनस्पतींचे कोवळे कोंब.

जांभळी पाणकोंबडी
(छाया: वेदांत कसंबे)


मराठी नाव: जांभळी पाणकोंबडी.

इंग्रजी नाव: Purple Swamphen (जुने नाव - Purple Moorhen). शास्त्रीय नाव: Porphyric porphyrio. लांबी: ४३ सेंमी. आकार: कोंबडीपेक्षा मोठा. ओळख: मोठी, एकंदरीत जांभळ्या-निळ्या वर्णाची, लाल पाय, पायाची बोटे खूपच लांबोळकी. चोच लाल आणि जड. चोचीवर लाल मांसल शिरस्त्राण. चालताना शेपटीला झटके देते तेव्हा शेपटीखालचा पांढरा वर्ण नजरेत भरतो. आवाज: 'क्विनक्विनक्रक्र' असा जोरदार तसेच 'चक चक' असा हळुवार आवाज करते. व्याप्ती: रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: पानथळीच्या काठावरची वनस्पती (रामबाण इ.). मोठे दलदलीचे प्रदेश. खाद्य: धान आदी पाणवनस्पतींच्या बिया व कोवळे कोंब, तसेच कीटक व मृदूशरीरी प्राणी.

वारकरी
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: वारकरी.

इंग्रजी नाव: Eurasian (Common) Coot. शास्त्रीय नाव: Fulica atra. लांबी: ४२ सेंमी. आकार: गावठी कोंबडीएवढा. ओळख: एकंदरीत मळकट काळा, शेपटी खूप आखूड. पांढरी चोच व माथ्यावरील पांढरे शिरस्त्राण नजरेत भरणारे. पिल्लू राखाडी-तपकिरी आणि गळा व छाती पांढरट. आवाज: उंच पट्टीतला ‘प्यी यी' तसेच एकसारखा केलेला ‘दप दप दप'. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: मोठ्या झिलानी, सरोवरे व तलाव. खाद्य:धानाचे तसेच पाणवनस्पतींचे कोवळे कोंब, कीटक, मृदूशरीरी प्राणी इ.

लांब शेपटीचा कमळपक्षी
(छाया: डॉ. तारिक़ सानी)


मराठी नाव: लांब शेपटीचा कमळपक्षी.

इंग्रजी नाव: Pheasant-tailed Jacana. शास्त्रीय नाव: Hydrophasianus chirugrus. लांबी: ३१ सेंमी. आकारः तित्तीराएवढा (शेपटी वगळता). ओळख: विणीच्या हंगामात एकंदरीत तपकिरी व पांढरा. लांब कोयत्यासारखी तपकिरी शेपटी. मानेच्या मागील बाजूस सोनेरी आवरण. बोटे खूपच लांब. तरंगत्या पानावर अलगद वावरतो. आवाज: विणीच्या हंगामात वेगळे ‘मी SS ऊ' ('पी SS ऊ') व 'मी SS औप' असे आवाज. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: तरंगणाऱ्या भरपूर पाणवनस्पती (शिंगाडा, कमळ, लिली इ.) माजलेल्या झिलानी, बोडी व तलाव. खादयः धानाचे तसेच पाणवनस्पतींचे कोवळे कोंब, पाणकीटक, मृदूशरीरी प्राणी इ.

कांस्यपंखी कमळपक्षी
(छाया: डॉ. तारिक़ सानी)

मराठी नाव: कांस्यपंखी कमळपक्षी.

इंग्रजी नाव: Bronze-winged Jacana. शास्त्रीय नाव: Metopidius indicus. लांबी: ३० सेंमी. आकार: तित्तीराएवढा. ओळख: डोके, मान व छाती चमकदार काळी. पाठ व पंख कांस्यवर्णी. आखूड शेपटी बदामी-लाल. डोळ्यापासून मागे रुंद पांढरी भुवई. बोटे खूपच लांब. तरंगत्या पानावर अलगद वावरतो. आवाज: मंजुळ ‘सिक-सिक-सिक' तसेच घशातून काढलेले आवाज. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: तरंगणाच्या भरपूर पाणवनस्पती (शिंगाडा, कमळ, लिली इ.) माजलेल्या झिलानी, बोडी व तलाव. खाद्य: धानाचे तसेच पाणवनस्पतींचे कोवळे कोंब व मुळ्या, पाणकीटक, मृदूशरीरी प्राणी इ.

टिटवी
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: टिटवी.

इंग्रजी नाव: Red-wattled Lapwing. शास्त्रीय नाव: Vanellus indicus. लांबी: ३३ सेंमी. आकार: तित्तीरापेक्षा मोठा. ओळख: वरील बाजू काश्य, खालील बाजू पांढरी. टोपी व छाती काळी. चोचीवरचे 'वॅटल' अगदी छोटे व लाल. चोच लाल व काळे टोक. खूप सावधान व वटवट करणारा पक्षी. जोडीने अथवा छोट्या थव्याने राहतो. सकाळ, सायंकाळ, व रात्री उदरभरण. आवाज: वासिक 'डीड ही डू इट' अथवा 'डीड-डीड-डीडे' असे आवाज. व्याप्ती: रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: पाण्याजवळ सपाट भूप्रदेशात, शेतात, खाड्यामध्ये. शहरात इमारतींवर सुद्धा घरटे करतो. खाद्यः कृमी, कीटकांचे पिलव, मृदूशरीरी प्राणी इ.

माळटिटवी
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: माळटिटवी.

'इंग्रजी नाव: Yellow-wattled Lapwing. शास्त्रीय नाव: Vanellus malabaricus. लांबी: २७ सेंमी. आकार: तित्तीरापेक्षा छोटा. 'ओळख: वरील बाजूस रेतीसारखा तपकिरी, पोट पांढरे. काळी टोपी. चोचीवर व खाली लटकणारे मांसल पिवळे ‘वॅटल'. जोडीने वा छोट्या थव्याने राहते. आवाज: 'टीSSS ईट' तसेच 'ट्वीट- ट्वीट- ट्वीट'. व्याप्ती: रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: उजाड माळराने, गवताळ प्रदेश, उजाड शेते. कोरड्या प्रदेशात. खाद्यः कृमी, कीटकांचे पिलव, मृदूशरीरी प्राणी इ.

शेकाट्या
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: शेकाट्या.

इंग्रजी नाव: Black-winged Stilt. शास्त्रीय नाव: Himantopus himantopus. लांबी: २५ सेंमी. आकार: तित्तीरापेक्षा छोटा. ओळख: एकंदरीत कृष्ण-धवल वर्ण. शरीर पांढरे, पंख व डोके काळे. खूप लांब, पातळ, चटकदार लाल पाय. काळी पातळ चोच. थव्यात राहतो. आवाज: 'चेक-चेक-चेक’ व किकीकीकी” असे आवाज. व्याप्तीः रहिवासी, संपूर्ण महाराष्ट्र. उन्हाळ्यात तलावाकाठी वीण. अधिवास: झिलानी, खाजणीचे प्रदेश, मिठागरे व तलाव. खाद्य: चिखल व उथळ पाण्यातील कृमी, मृदूशरीरी प्राणी, किटक.

पारवा
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: पारवा.

इंग्रजी सामान्य नाव: Blue Rock Pigeon. शास्त्रीय नाव: Columba livia. लांबी: ३३ सेंमी. आकार: ओळख: एकंदरीत करड्या रंगाचा. करड्या शेपटीच्या टोकाला काळा पट्टा, पंखांवर दोन रूंद काळे पट्टे. शहरी पारव्यांच्या (Feral Pigeon) रंगात व रचनेत विविधता आढळते. आवाज: 'गुटर-गुड़, गुटर-गुS' असा घुमणारा आवाज करतात. व्याप्तीः रहिवासी, संपूर्ण महाराष्ट्र. अधिवासः रानटी पक्षी पर्वतीय कडा-कपारींमध्ये घरटी करतात. शहरी पारवे इमारतींमध्ये घरटी करतात. खाद्यः कडधान्य, धान्य, शेंगदाणे.

छोटा तपकिरी होला
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: छोटा तपकिरी होला.

इंग्रजी सामान्य नाव: Laughing Dove (जुने नाव - Little Brown Dove). शास्त्रीय नाव: Streptopelia senegalensis. लांबी: २७ सेंमी. आकार: मैनेपेक्षा मोठा. ओळखः छोटा सडपातळ आणि लांब शेपूट असलेला होला. खालील बाजू व डोके तपकिरी-गुलाबी. वरील बाजू एकसमान. छातीच्या वरच्या बाजूवर काळ्या ठिपक्यांचा पट. आवाज: मृदू असा ‘कुS- रूS-S' अथवा 'कृ-डू- डू- डू- डू'. व्याप्ती: रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवासः झुडूपी डोंगराळ भाग, कोरडवाहू शेती तसेच मनुष्य वस्तीत दिसतो. खाद्य: जमिनीवर वेचलेले धान्य व बिया.

ठिपकेदार होला
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: ठिपकेदार होला.

इंग्रजी सामान्य नाव: Spotted Dove. शास्त्रीय नाव: Streptopelia sinensis. लांबी: ३० सेंमी. आकार: पारव्यापेक्षा छोटा. ओळख: वरील बाजूवर गुलाबी-पिवळसर खवल्याप्रमाणे रचना. मानेच्या बाजूवर मोठे काळ्या पांढ-या ठिपक्यांचे पट. मान व छाती लालसर गुलाबी. पृष्ठभाग व शेपूट गडद करडा तपकिरी. शेपटीची बाहेरील पिसे बुडाकडे काळी, टोकाकडे पांढरी. आवाज: मृदू शोकाकुल ‘कूकूक -क्रूकूऽ... क्रूऽ-क्रू-क्रूS'. व्याप्तीः रहिवासी, संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: खुली जंगले, शेतीप्रदेश तसेच मनुष्यवस्तीत दिसतो. खाद्यः जमिनीवर वेचलेले धान्य व बिया.

लाल पंखी होला
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: लाल पंखी होला.

इंग्रजी सामान्य नाव: Red Collared Dove. शास्त्रीय नाव: Streptopela tranquebarica. लांबी: २३ सेंमी. आकार: मैंनेएवढा. ओळख: नराचे डोके निळसर-करडे, वरील बाजू गुलाबी-लालसर व खालील बाजू गुलाबी असते. मानेवर अर्धवट काळी गळपट्टी. मादीची वरील बाजू गडद उदी-तपकिरी, खालील बाजू गडद पिवळसर-करडी असून बुड पांढरे असते. आकाराने लहान व आखूड शेपूट. आवाज: कर्कश वारंवार केलेला ‘ग्रु-गुरर-गु'. व्याप्ती: रहिवासी, संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: विरळ झाडीचे प्रदेश, माळरान. खाद्यः जमिनीवर वेचलेले धान्य व बिया.

कंठवाला होला
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: कंठवाला होला.

इंग्रजी सामान्य नाव: Eurasian Collared Dove (Ring Dove). शास्त्रीय नाव: Streptopelia decaocto. लांबी: ३२ सेंमी. आकार: मैनेएवढा. ओळख: एकंदरीत करडा तपकिरी रंग. अर्धवट गळपट्टी काळी. शेपटीची बाहेरील व पंखांची आतील पिसे पांढरी. आवाज: वारंवार केलेला ‘कुकू...कुक'. व्याप्ती: रहिवासी, संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: कोरडे खुले प्रदेश, वनराया तसेच शेतीप्रदेश. खाद्य: जमिनीवर वेचलेले धान्य व बिया.

पिवळ्या पायाची हरोळी
(छाया: डॉ. तारिक सानी)

मराठी नाव: पिवळ्या पायाची हरोळी.

इंग्रजी सामान्य नाव: Yellow-footed Green-Pigeon (जुने नाव- (Yellow-legged Green-Pigeon). शास्त्रीय नाव: Treron phoenicopterus. लांबी: ३३ सेंमी. आकार: पारव्याएवढा. ओळख: आकारानी मोठी हरोळी. करडी टोपी आणि कपाळ हिरवट पिवळे. रूंद हिरवट पिवळी गळपट्टी. वरील बाजू करडी-हिरवी. खांद्यावर फिक्कट जांभळा छप्पा. शेपटीचे बुड पिवळसर. पाय व बोटे पिवळी. वृक्षनिवासी. आवाज: मंजुळ शिळ घातल्याप्रमाणे कुंजन. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: पानझडीचे जंगल, ग्रामीण भाग आणि शेती प्रदेश. वडा-पिंपळाच्या झाडांवर थव्याने दिसतो. खाद्यः फलाहारी. वडा-पिंपळाची रसाळ फळे विशेष प्रिय तसेच इतर छोटी फळे.

करण पोपट
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: करण पोपट.

इंग्रजी सामान्य नाव: Alexandrine Parakeet. शास्त्रीय नाव: Psittacula eupatria. लांबी: ५३ सेंमी. आकार: पारव्यापेक्षा मोठा. ओळख: हा आकाराने खूप मोठा हिरवा पोपट असून खांद्यावर चटकदार लाल रंगाचा छप्पा असतो. नराच्या हनुवटीवर काळा पट्टा असून गळ्यात गुलाबी आणि निळसर गळपट्टी असते. मादी व पिल्लांमध्ये ह्याचा अभाव. कलकल करीत थव्याने उडण्याची सवय. चोच मोठी व लालबुंद. आवाज: कंठवाल्या पोपटाच्या तुलनेत मोठ्याने केलेला कर्कश, घोगरा ‘किया' अथवा 'की-आह'. व्याप्तीः रहिवासी, संपूर्ण महाराष्ट्र. मुंबईत सुध्दा शिरकाव. अधिवास: गर्द झाडीचे प्रदेश तसेच पानझडीची वने. खाद्यः फळबागा, ज्वारी तसेच मक्याच्या कणसावर ताव मारतो.

कंठवाला पोपट
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: कंठवाला पोपट.

इंग्रजी सामान्य नाव: Rose-ringed Parakeet. शास्त्रीय नाव: Psittacula krameri. लांबी: ४२ सेंमी. आकार: मैंनेपेक्षा मोठा, ओळख: करण पोपटापेक्षा आकाराने छोटा हिरवा पोपट. ह्याच्या खांद्यावर लाल रंगाच्या छप्प्याचा अभाव. नराच्या हनुवटीवर काळी पट्टी असून गळ्यात गुलाबी गळपट्टी असते. मादी व पिल्लांमध्ये याचा अभाव. मादी पूर्णतः हिरवी. चोच छोटी व लालबुंद. कलकल करीत थव्याने उडतात. रात्री प्रचंड संख्येत एकत्रित थाऱ्यास येतात. आवाज: मोठा व कमी कर्कश ‘की-आक्’, व्याप्तीः रहिवासी, संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: पानझडीचे जंगल, झाडीचे प्रदेश, शेतीप्रदेश आणि बगीचे. खाद्यः फळबागा, ज्वारी तसेच मक्याच्या कणसावर ताव मारतो. फळे, धान्य, फुलांमधील मकरंद.

टोई पोपट
(छाया: नंदकिशोर दुधे)

मराठी नाव: टोई पोपट.

इंग्रजी सामान्य नाव: Plum-headed Parakeet. शास्त्रीय नाव: Psittacula Cyanocephala. लांबी: ३६ सेंमी. आकार: मैंनेपेक्षा छोटा. ओळख: नराचे डोके निळसर लाल असते. वरची चोच पिवळी. शेपटी निळसर हिरवी व टोक पांढरे. काळी गळपट्टी. मादीचे डोके करडे असून गळा व छातीचा वरचा भाग पिवळा असतो. शेपटीचे टोक पांढरे. थव्याने वेगात उडतात. आवाज: कर्कश टुई-टुई-टुई” असा घुमणारा आवाज. व्याप्तीः रहिवासी, संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: जंगल आणि दाट झाडीचे प्रदेश. खाद्यः फळबागा, ज्वारी तसेच मक्याच्या कणसावर ताव मारतो. फळे, धान्य, फुलांमधील मकरंद.

कोकीळ
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नावः कोकीळ

इंग्रजी नाव: Asian Koel. शास्त्रीय नाव: Eudynamys scolopacea. लांबी: ४३ सेंमी. आकारः कावळ्याएवढा. ओळख: नर चकाकदार काळा असून सर्वांगावर हिरवट झळाळी असते. चोच फिक्कट हिरवी. मादी वरील बाजूस गडद तपकिरी असून त्यावर पांढरे ठिपके आणि रेषा असतात. खालील बाजू पांढरी असून त्यावर गडद तपकिरी पट्टे असतात. दोहोंचे डोळे चटकदार लाल असतात. आवाज नर - मोठ्याने केलेला उंचावत जाऊन अचानक थांबणारा ‘कुऊ..ऊ...कुऊ' आवाज करतो. शेवटी आवाज कर्कश होतो. मादी केवळ 'किककिककिक' केकाटते. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवासः खुले जंगल, शेतीप्रदेश, शहरी बचे वीण: परभृत. मादी कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते. खाद्यः छोटी-मोठी रसाळ फळे. वडा-पिंपळाची फळे (figs), पपई विशेष प्रिय. कीटक व सुरवंट.

पावशा
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: पावशा.

इंग्रजी नाव: Common Hawk Cuckoo (जुने नाव - Brainfever Bird). शास्त्रीय नाव: Hierococcyx varius. लांबी: ३४ सेंमी. आकार: पारव्याएवढा. ओळख: वरील बाजूस एकसारखा करडा. छाती तांबूस असून त्यावर कुठल्याही खुणांचा अभाव. पांढ-या पोटावर पातळ गडद तपकिरी पट्टे. शेपटीवर अनेक पट्टे, टोकाला तांबूस पट्टा. एकंदरीत शिक्रा पक्ष्यासारखा भासतो. आवाज: 'पेर्ते व्हा' ‘पेर्ते व्हा' ('पाऊस आला' किंवा 'पी-कहा' असं ऐकायला येतं) किंवा 'ब्रेनफिवर’ ‘ब्रेनफिवर' असा आवाज. म्हणून पूर्वी ‘ब्रेनफिवर बर्ड' असे नाव होते. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: झुडूपी जंगले व शेती प्रदेश. खाद्यः अस्वलअळ्या, कीटक, छोटी फळे तसेच वडा-पिंपळाची रसाळ फळे.

चातक
(छाया: डॉ. तारिक़ सानी)

मराठी नाव: चातक

इंग्रजी नाव: Pied Cuckoo (जुने नाव - Pied Crested Cuckoo). शास्त्रीय नाव:' Clamator jacobinus. लांबी: ३३ सेंमी. आकार: मैनेएवढा. ओळख: ठळक तुरा असलेला काळा पांढरा पक्षी. वरील बाजू काळी. प्राथमिक पिसांवर पांढरा पट्टा. शेपटीच्या पिसांची टोके पांढरी. पिल्लाचा रंग मळकट तपकिरी, खालील बाजू राखाडी. आवाज: 'पियू-पियू...पी-पी-पियू' असा मधुर आवाज. व्याप्ती: पावसाळ्यात स्थलांतर करून येतो. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: जंगल, झाडीचे प्रदेश, अर्ध-वाळवंटी प्रदेश. वीणः परभृत. सातभाई आदि पक्ष्यांच्या घरट्यात अंडी घालतो. खाद्यः तुडतुडे, अस्वलअळ्या, कीटक व कधीकधी छोटी फळे. कधीकधी जमिनीवर उतरून कच-यात खाद्य हुसकतो.

भारद्वाज
(छाया: अल्केश ठाकरे)

मराठी नाव: भारद्वाज,

इंग्रजी नाव: Greater Coucal. शास्त्रीय नाव: Centropus sinensis. लांबी: ४८ सेंमी. आकार: कावळ्यापेक्षा मोठा. ओळख: भारद्वाजाचे संपूर्ण शरीर चकाकदार निळसर हिरवे असून पंख चटकदार बदामी रंगाचे असतात. चेहेरा काळसर तपकिरी असून डोळे गुंजीप्रमाणे लाल असतात. जमिनीवर चालतो व झुडूपांमध्ये भटकतो. आवाज: 'कुप- कुप-कुप-कुप' असा घुमणारा व वाढत जाणारा आवाज करतो. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवासः खुले जंगल, घनदाट झुडूपी प्रदेश, माळराने तसेच बगीचे. खाद्यः सुरवंट, मोठे कीटक, गोगलगायी, सरडे, छोटे उंदीर, पक्ष्यांची अंडी इ.

गव्हाणी घुबड
(छाया: डॉ. गजानन वाघ)

मराठी नाव: गव्हाणी घुबड.

इंग्रजी नाव: Ban Owl. शास्त्रीय नाव: Tyto alba. लांबी: ३६ सेंमी. आकारः कावळ्यापेक्षा छोटा. ओळख: स्वच्छ पांढरा चपटा चेहेरा, काळे डोळे. वरील बाजू पिवळसर-सोनेरी आणि करडी व त्यावर काळ्या व पांढ-या आल्या. खालील बाजू पांढरी ते सोनेरी असून त्यावर काळे ठिपके. हे निशाचर असून दिवसा जुन्या इमारती व झाडाच्या ढोलीत विश्रांती करतात. आवाज: विविध प्रकारचे चित्कार (जसे स्क्रीच.. स्क्रीच') व फिस्कारण्याचे आवाज. व्याप्ती: रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: जंगल, शेतीप्रदेश तसेच शहरांमध्ये. खाद्यः मुख्यत्वे उंदीर हे खाद्य असल्यामुळे अतिशय उपयुक्त पक्षी.

जंगली पिंगळा
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: जंगली पिंगळा.

इंग्रजी नाव: Jungle Owlet. शास्त्रीय नाव: Glaucidium radiatum. लांबी: २० सेंमी. आकार: साळुकीएवढा. ओळख: सर्वांगावर तांबूस-तपकिरी पट्टे असलेला पिंगळा. पंखांवर तांबूस पट्टे, पण पाठीवरील पट्टे मात्र फिक्कट पिवळसर. निशाचर. आवाज: जोरकसपणे केलेला ‘काओ... काओ... काओ' आणि मागाहून ‘काओ-कुक...काओ-कुक' असा वारंवार केलेला. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: खुल्या जंगलामध्ये. खाद्यः मुख्यत्वे कीटक, कधीकधी सरडे, छोटे उंदीर.

पिंगळा
(छाया: नंदकिशोर दुधे)

मराठी नाव: पिंगळा.

इंग्रजी नाव: Spotted Owlet. शास्त्रीय नाव: Athene brama. लांबी: २१ सेंमी. आकारः साळुकीएवढा. ओळख: ह्याच्या पंखांवर, पाठीवर तसेच मुकुटावर पांढरे ठिपके असतात. खालील बाजू मळकट असून त्यावर तपकिरी ठिपके असतात. चेहेरेपट्टी फिक्कट असून मागील बाजूस फिक्कट गळपट्टी असते. पहाटे, सायंकाळी तसेच रात्री क्रियाशील असतो. आवाज: किंचाळल्याप्रमाणे कर्कश चिरुर-चिरुर-चिरुर' आणि लगेच केलेला ‘चिवक-चिवक-चिवक', व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: शेतीप्रदेश, गावखेड्याजवळ तसेच जंगलात. खाद्यः मुख्यत्वे कीटक, कधीकधी छोटे पक्षी, छोटे उंदीर, सरडे, इ. 1

रान पिंगळा
(डावीकडचे छाया: अल्केश ठाकरे, उजवीकडचे छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: रान पिंगळा.

इंग्रजी नाव: Forest Owlet. शास्त्रीय नाव: Heteroglaux blewriti. लांबी: २३ सेंमी. आकारः साळुकीएवढा. ओळख: एकंदरीत गडद करडा-तपकिरी पिंगळा असून मुकुट व पाठीवर अगदीच अस्पष्ट ठिपके असतात. मानेच्या मागील बाजूस गळपट्टीचा अभाव. पंख आणि शेपटीवर रूंद तपकिरी-काळपट आणि पांढरे पट्टे. छाती गडद तपकिरी असून छातीच्या वरील भागावर रूंद पांढरे पट्टे असतात. पोटाकडील भाग मात्र स्वच्छ पांढरा असतो. नर, मादी व पिल्लांमध्ये बरीच विविधता आढळते. दिवसा क्रियाशील. आवाज: स्पष्ट मंजुळ कोकिळेप्रमाणे ‘वूऊऊ- वूऊऊ' तसेच 'शुक-शुक' केल्याप्रमाणे ‘श्री...श्री...' असा आवाज काढतात. व्याप्ती: सातपुड्यातील मेळघाट, नरनाळा, वान, यावल, तोरणमाळ अभयारण्यात नोंद. तानसामध्ये सुद्धा आढळतो. अधिवास: सागवान बहुल पानझडीचे जंगल. खाद्य: मुख्यत्वे कीटक, कधीकधी छोटे पक्षी, छोटे उंदीर, सरडे, इ.

गाव पाकोळी
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: गाव पाकोळी.

इंग्रजी नाव: Little Swift (जुने नाव - House Swift). शास्त्रीय नाव: Apus affinis. लांबी: १५ सेंमी. आकार: चिमणीएवढा. ओळख: ही पाकोळी छोटी, जाडजूड व काळसर असून पांढरा गळा व पांढरा पार्श्वभाग हिची ओळख पटवीतो. शेपटीचे टोक किंचित दुभंगलेले, जवळपास चौकोनी असते. कलकल करीत थव्याने उडण्याची सवय. आवाज: जलद आणि कर्कश ‘सिक-सिक-सिक-सिक' वारंवार आवाज करतो. व्याप्ती: रहिवासी, संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: उंच कडा, जुन्या व भग्न इमारती, गाव व शहरे. खाद्य: उडणारे कीटक.

नीळकंठ
(छाया: वेदांत कसंबे)

मराठी नाव: नीळकंठ.

इंग्रजी नाव: Indian Roller. शास्त्रीय नाव: Coracias benghalensis. लांबी: ३३ सेंमी. आकारः पारव्याएवढा. ओळख: बसलेला असताना दिसून न पडणारा पंखांचा व शेपटीचा सुरेख हिरवट-नीळा रंग उडताना दिसून पडतो. मान व खालची बाजू तांबूस-तपकिरी असून गळा व कानावर पांढ-या रेषा असतात. विणीच्या हंगामात सुंदर हवाई कसरती करतो. आवाज: 'पॅक चॅक बॅक' असा कर्कश आवाज तसेच किंचाळल्यासारखे अनेक आवाज. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: खुले जंगल, माळराने, शेतीप्रदेश, तसेच बगीच्यांमध्ये. खाद्यः शेतातील किटकांवर ताव मारतो. शेतीसाठी उपयुक्त पक्षी. बेडूक, सरडे, विंचू इ. सुध्दा खातो.

कवड्या ढिवर
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: कवड्या ढिवर.

इंग्रजी नाव: Pied Kingfisher. शास्त्रीय नाव: Ceryle rudis. लांबी: ३९ सेंमी. आकार: साळुकीपेक्षा मोठा. ओळख: हा काळा पांढरा ढिवर असून वरील बाजू, डोके तसेच शेपटी काळ्या-पांढ-या पट्यांची नक्षी असते. ठळक पांढरी भुवई असते. नराच्या गळ्यात छातीवर दोन तर मादीच्या छातीवर एक काळा पट्टा असतो. आवाज: किणकिणनारा स्पष्ट ‘चीक चीक' असा आवाज. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: संथ वाहणा-या नद्या, तळी, ओढे, खाड्या, माळरानावरील डबकी. खाद्य: मासे, बेडूकमासे, बेडूक तसेच जलीय कीटक.

सामान्य ढिवर
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: सामान्य ढिवर.

इंग्रजी नाव: Common Kingfisher (जुने नाव- Common Kingfisher). शास्त्रीय नाव: Alcedo atthis. लांबी: १६ सेंमी. आकार: चिमणीपेक्षा मोठा. ओळख: वरील बाजू चटकदार हिरवट-निळी असून खालची बाजू फिक्कट नारिंगी असते. उडताना पाठ ते शेपटीच्या मध्यातून जाणारी चकाकदार निळी रेषा दिसते. कानावरची पिसे नारिंगी असतात. शेपटी आखूड. आवाज: उंच पट्टीतला कर्कश 'ची ची' तसेच वारंवार केलेला 'चिट-ईट-ईट', व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: गोड्या पाण्याचे तलाव, खारफुटीची जंगले, आणि समुद्रकिनारे. खाद्य: छोटे मासे, बेडूकमासे, तसेच जलीय कीटक.

पांढऱ्या छातीचा ढिवर
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: पांढऱ्या छातीचा ढिवर.

इंग्रजी नाव: White-throated Kingfisher. शास्त्रीय नाव: Halcyon smyrnensis. लांबी: २८ सेंमी. आकारः साळुकीपेक्षा मोठा. ओळख: चोच लाल, डोके व खालील बाजू चॉकलेटी तपकिरी असते. वरील बाजू हिरवट-निळी असते. गळा आणि छाती पांढरी असते. आवाज: जोरकसपणे केलेला हसल्याप्रमाणे 'किलीलीली'. त्यामुळेच हिंदीत 'किलकिला' हे नाव पडले आहे. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: तलाव, सरोवरे, खाड्या तसेच ‘किंगफिशर' असूनही पाण्यापासून दूर शेतीप्रदेश, बगीचे, जंगलाच्या कडेला, शहरात आढळतो. खाद्यः मासे, बेडूकमासे, सरडे, तुडतुडे, तसेच इतर कीटक. शेतात कीटक नियंत्रणाचे कार्य करतो.

हुदहुद
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: हुदहुद.

इंग्रजी नाव: Common Hoopoe. शास्त्रीय नाव: Upupa epops. लांबी: ३१ सेंमी. आकार: साळुंकीपेक्षा मोठा. ओळख: मुख्यत्वे तांबूस-नारिंगी रंगाचा. पंख व शेपटी काळे-पांढरे व पट्टेदार असते. डोक्यावर पंख्याप्रमाणे तुरा असतो. चोच लांब व बाकदार असते. आवाज: वारंवार केलेला 'हु-पो’ ‘पुप-पुप-पुप'. व्याप्तीः रहिवासी, संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: खुली माळराने, शेतीप्रदेश, बगीचे तसेच ग्रामीण भाग. खाद्यः कीटक, कीटकांचे पिलव तसेच अळ्या. शेतीउपयोगी पक्षी.

वेडा राघू
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: वेडा राघू.

इंग्रजी नाव: Green Bee-eater (जुने नाव - Small Bee-eater). शास्त्रीय नाव: Merops orientalis. लांबी: १६-१८ सेंमी. आकार: चिमणीपेक्षा मोठा. ओळख: एकंदरीत हिरवा, शेपटीची मध्यपिसे लांब. घसा नीळा किंवा हिरवा आणि गळ्यात काळा कंठ. याची दोन रूपे असून एकाचा (M.O. beludschicus) घसा निळा, मुकुट व मान हिरवी असून त्यावर किंचित सोनेरी झळाळी असते. दुसन्याचा घसा हिरवा, गाल निळे असून मुकुट, मान व पाठीचा वरचा भाग चकाकदार तांबूस असतो (M. O. ferrugeiceps). आवाज: घशातून काढलेला किणकिणनारा ‘ट्री-ट्री-ट्री'. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: माळराने, किनारपट्टीचा प्रदेश, गायरान तसेच अर्ध वाळवंटी प्रदेश. खाद्य: उडणारे कीटक, विशेषकरून मधमाशा, गांधीलमाशा, चतुर (Dragonfly), सुई (Damselfly) व फुलपाखरे.

निळ्या शेपटीचा राघू
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: निळ्या शेपटीचा राघू.

इंग्रजी नाव: Blue-tailed Bee-eater. शास्त्रीय नाव: Merops philippinus. लांबी: २३-२६ सेंमी. आकारः बुलबुलपेक्षा मोठा. ओळख: एकंदरीत तांबूस छटा असलेला हिरवा राघू. गळा बदामी असून हा रंग कानापर्यंत. पार्श्वभाग व शेपटी निळी. भुवईजवळ अगदी थोडका निळा रंग. थव्याने राहतो. आवाज: इतर राघूप्रमाणे किणकिणनारा 'बिरीरिक बिरीरिक'. व्याप्तीः देशांतर्गत स्थलांतर करणारा. विदर्भात वीण, प. महाराष्ट्रात हिवाळी तर इतरत्र प्रवासी पाहुणा. विदर्भात मोठ्या नद्यांकिनारी (तापी, वर्धा, कन्हान) सामुहिक वीण. अधिवास: नद्यांजवळ खुल्या प्रदेशात, तलाव, सरोवरे. खाद्यः उडणारे कीटक, विशेषकरून चतुर (Dragonfly), मधमाशा, फुलपाखरे, गांधीलमाशा, सुई (Damselfly) इ.

भारतीय राखी धनेश
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नावः भारतीय राखी धनेश.

इंग्रजी नाव: Indian Grey Hornbill. शास्त्रीय नाव: Ocyceros birostris. लांबी: ५० सेंमी. आकार: घारीएवढा. ओळख: ह्याच्या चोचीवरचे शिंग ठळक, टोकदार व काळपट रंगाचे असते. चोचीच्या बुडाकडे काळा रंग असतो तर टोकाकडे नरामध्ये पांढरा व मादीमध्ये किरमिजी रंग असतो. उड्डाण पिसांचे तसेच शेपटीच्या पिसांचे टोक पांढरे असते. मादीचे शिंग आकाराने थोडे लहान असून टोकाकडे बोथट असते. नराच्या डोळ्याभोवतीची त्वचा काळी असते तर मादीच्या डोळ्याभोवतीची त्वचा लालसर-नारिंगी असते. पिल्लाच्या चोचीवर शिंग नसते. आवाज: मोठ्याने केलेला घारीसारखा ‘कियाSS' 'ची-ऊव' तसेच जलद ‘पी-पी-पी-पीपीपीठ'. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: पानझडीची वने, शेतीजवळची जंगले, तसेच भरपूर फळझाडे असलेल्या शहरी भागात. खाद्यः मुख्यत्वे फलाहारी, विशेष करून वडा-पिंपळाची (figs) रसाळ फळे, कीटक तसेच छोटे प्राणी (सरडे, गोगलगायी इ.).

तांबट
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नावः तांबट,

इंग्रजी नाव: Coppersmith Barbet. शास्त्रीय नाव: Megalaima haemacephala. लांबी: १७ सेंमी. आकार: चिमणीपेक्षा मोठा. ओळख: मुख्यत्वे हिरवा. कपाळावर व गळ्यावर लाल छप्पे असतात. घसा तसेच डोळ्याभोवती चटकदार पिवळे वर्तुळ. पाय चटकदार लाल. आवाज: मोठ्याने वारंवार केलेला, भांडे ठोकल्याप्रमाणे 'टुक-टुक-ट्रक' असा असतो. आवाज कुठून येतो हे कळत नाही. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवासः शुष्क तसेच आर्द्र पानगळीचे प्रदेश, शहरांमध्ये. खाद्यः मुख्यत्वे फलाहारी, विशेष करून वडा-पिंपळाची (figs) रसाळ फळे, इतर फळे. फुलांमधील मधुरस, तसेच पंखवाली वाळवी.

डोंबारी चंडोल
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: डोंबारी चंडोल.

इंग्रजी नाव: Ashy-crowned Sparrow-lark (Ashy-crowned Finch-lark). शास्त्रीय नाव: Eremopteryx griseus. लांबी: १३ सेंमी. आकार: चिमणीपेक्षा छोटा. ओळख: वरील बाजूस मातकट-तपकिरी, बसका चंडोल. चोच जाड, तुरा नाही. मुकुट राखाडी. डोळ्यामधून जाणारी काळी पट्टी. चोचीपासून बुडापर्यंत खालील बाजू काळी. दिसायला एकंदरीत नर चिमण्यासारखा तर मादी चिमणी सारखी. आवाज: विणीच्या हंगामात सुंदर हवाई कसरती करीत बासरीसारखे शेवटी लांब ‘व्हीची' ने संपणारे स्वर आळवतो. सुरुवातीला तीसेक मीटर उंची गाठून पंख बंद करून खाली झेपावतो, मध्येच पंख पसरवून फडफडत आणखी थोडी उंची गाठतो. पुन्हा झेप, पुन्हा उंची असे दोनतीनदा झाल्यावर एखाद्या उंचवट्यावर वा खडकावर विसावतो. व्याप्ती: रहिवासी. सह्याद्री सोडून संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: पडीक शेतजमिनी, खुले झुडूपी प्रदेश, निम्न-वाळवंटी प्रदेश, खुली खडकाळ माळराने. खाद्य: रानटी वनस्पती तसेच गवताच्या बिया. कीटक.

तारवाली भिंगरी
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: तारवाली भिंगरी.

इंग्रजी नाव: Wire-tailed Swallow. शास्त्रीय नाव: Hirundo smithi. लांबी: १४ सेंमी. आकार: चिमणीएवढा. ओळख: वरील बाजूस चकाकदार निळा, डोक्यावर बदामी टोपी. खालील बाजू पांढरी शुभ्र. शेपटीची दोन धाग्यासारखी लांब पिसे ओळख पटवितात. आवाज: ‘चीर्रिक-वीट' 'चीट-चीट' तसेच 'चिचीप-चिचीप' असे आवाज. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: शेतीप्रदेश, खुली माळराने, पाण्याजवळ, जसे पाट, नद्या, तलाव, इ. तसेच उन्हाळ्यात भातखाचरे. खाद्यः कीटकभक्षी. उडणारे कीटक हवेत मटकावतो.

माळ भिंगरी
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: माळ भिंगरी.

इंग्रजी नाव: Barn Swallow (जुने नाव - Common Swallow). शास्त्रीय नाव: Hirundo rustica. लांबी: १८ सेंमी. आकार: चिमणीएवढा. ओळख: छाती तसेच वरील बाजूस चकाकदार निळा. कपाळ व गळा चटक लाल. खालील बाजू पांढरी. शेपटीची दोन पिसे धाग्याप्रमाणे लांब. हिवाळ्यात प्रचंड संख्येत विद्युत तारांवर थवे जमतात. आवाज: स्पष्ट ‘वीट-वीट' तसेच 'व्हीट-व्हीट', व्याप्ती: स्थलांतरित. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: खुली माळराने, शेतीप्रदेश, तलाव तसेच नद्यांजवळ. खाद्य: कीटकभक्षी. उडणारे कीटक हवेत मटकावतो.

कवड्या परीट
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नावः कवड्या परीट.

इंग्रजी नाव: White-browed Wagtail (जुने नाव: Large Pied Wagtail). शास्त्रीय नाव: Motacilla maderaspatensis. लांबीः २१ सेंमी. आकारः बुलबुल एवढा. ओळखः सर्वात मोठा काळा-पांढरा परीट. वरील बाजू, डोके, गळा, छाती व शेपटी काळी. छातीखालील बाजू पांढरी. पांढरी स्पष्ट भुवई. पंखावर रुंद पांढरा पट्टा. आवाज: जोरकस चीज-जॅट्' असा आवाज. विणीच्या हंगामात दयाळ पक्ष्यासारखे विविध मधुर आवाज काढतो तसेच शिळ घालतो. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवासः नद्या, तलाव, सरोवरे, पाटबंधारे आदींच्या काठावर. शहरात तसेच खेड्यात. खाद्य: छोटे कीटक, कोळी तसेच छोटे अपृष्ठवंशीय प्राणी.

शिपाई बुलबुल
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: शिपाई बुलबुल.

इंग्रजी नाव: Red-whiskered Bulbul. शास्त्रीय नाव: Pycnonotus jocosis. लांबी: २० सेंमी. आकार: साळुकीपेक्षा छोटा. ओळख: वरील बाजूस तपकिरी. डोके व त्यावर टोकदार काळा तुरा. खालील बाजू व गाल पांढरे. डोळ्यामागे लाल कल्ले. बुड लाल. अवयस्क पक्ष्यांना लाल कल्ले नसतात व बुड फिक्कट नारिंगी असते. आवाज: बडबड्या स्वभावाचा. गाताना ‘पेटीग्रीव-किक पेटीग्रीव' असे स्पष्ट बोल. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: खुले जंगल, झुडूपी वने, बगीचे, खेड्यांजवळ तसेच शेतीप्रदेशात. लालबुड्या बुलबुलपेक्षा जास्त घनदाट झाडीच्या प्रदेशात. खाद्यः कीटक, छोटी फळे, वडा-पिंपळाची रसाळ फळे, फुलातील मकरंद.

लालबुड्या बुलबुल
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: लालबुड्या बुलबुल.

इंग्रजी नाव: Red-vented Bulbul. शास्त्रीय नाव: Pycnonotus cafer. लांबी: २० सेंमी. आकार: साळुंकीपेक्षा छोटा. ओळख: डोके व गळा काळा. डोक्यावर तुरा असल्याप्रमाणे उंचवटा. पाठ व छाती तपकिरी व त्यावर खवले. बुड लाल. काळसर शेपटीच्या पिसांना काळे टोक. आवाज: बडबड्या स्वभावाचा. 'बी-केअर-फुल' तसेच 'बी-क्विक-क्विक' असे बोल. संकटकाळी 'पीप-पीप' असा एकसारखा आवाज. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: शेतीप्रदेश, झुडूपी प्रदेश, मानवी वस्तीत, बगीचे, विरळ जंगल. खाद्य: कीटक, छोटी फळे, वडा-पिंपळाची रसाळ फळे, फुलातील मकरंद.

उदी पाठीचा खाटिक
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नावः उदी पाठीचा खाटिक.

इंग्रजी नाव: Bay-backed Shrike. शास्त्रीय नाव: Lanius vittatus. लांबी: १८ सेंमी. आकारः बुलबुलपेक्षा छोटा. ओळख: आकाराने छोटा खाटिक. पाठ बदामी रंगाची, खालील पाठ पांढरी, काळ्या पंखांवर ठळक पांढरा पट्टा. चेह-यावरचा काळा बुरखा मुकुटापर्यंत. काळ्या शेपटीची बाहेरील पिसे पांढरी. आवाज: आवाज कर्कश बडबड केल्यासारखा. गातो तेव्हा इतर पक्ष्यांचा आवाजांची मधुर स्वरात नक्कल करतो. व्याप्तीः रहिवासी. महाराष्ट्रात सर्वत्र. अधिवास: कोरड्या प्रदेशातील खुले झुडूपी प्रदेश, झुडूपी वने, शेतीप्रदेश. खाद्यः तुडतुडे, इतर मोठे कीटक, सरडे इ.

तांबूस पाठीचा खाटिक
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: तांबूस पाठीचा खाटिक.

इंग्रजी नाव: Long-tailed Shrike (जुने नाव: Rufous-backed Shrike). शास्त्रीय नाव: Lanius schach, लांबी: २५ सेंमी. आकार: बुलबुलपेक्षा मोठा. ओळख: लांब शेपटी, पाठ तसेच छाती व पोटाची बाजू तांबूस-तपकिरी. मुकुट व वरची पाठ करडी. पंख काळपट व त्यावर छोटा पांढरा डाग. शेपटी काळी. आवाज: आवाज कर्कश रागावल्यासारखा. गातो तेव्हा इतर पक्ष्यांचा आवाजांची मधुर स्वरात नक्कल करतो; स्वतःशीच बडबड केल्यासारखी. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: खुले झाडीचे प्रदेश तसेच शेतीप्रदेश. खाद्य: नाकतोडे, इतर मोठे कीटक, सरडे, छोटे सस्तन प्राणी इ. अर्धवट खाल्लेली शिकार काट्यात लटकवून ठेवायची सवय, म्हणून 'खाटिक' हे नाव.

दयाळ
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: दयाळ.

इंग्रजी नाव: Oriental Magpie-Robin. शास्त्रीय नाव: Copsychus saularis. लांबी: २० सेंमी. आकार: बुलबुल एवढा. ओळख: नराची वरील बाजू, डोके व छाती निळी (दिसते मात्र काळी). पंखावर रूंद पांढरा पट्टा. पोट व बुड पांढरे. मादी अशीच पण वरील बाजू व छाती निळ्याऐवजी काळपट असते. दोहोंनाही शेपूट उभी करण्याची सवय. आवाज: मोक्याच्या ठिकाणावरून जोरकसपणे स्पष्ट व मधुर गीत आळवतो. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: कोरडे तसेच आर्द्र पानगळीचे जंगल, दुय्यम वन, तसेच मानवी वस्तीत. खाद्यः कीटक तसेच फुलातील मकरंद (काटेसावर व पांगारा विशेष प्रिय). छोट्या झुडुपावर अथवा भिंतीवर बसून अचानक झेप घेऊन जमिनीवरचा कीटक पकडतो.

चीरक
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: चीरक.

इंग्रजी नाव: Indian Robin. शास्त्रीय नाव: Saxicoloides fulicatus. लांबी: १६ सेंमी. आकारः चिमणी एवढा. ओळख: नर चकाकदार काळा व पंखावर पांढरा मोठा स्पष्ट पट्टा. पोट व बुड बदामी. मादी वरील बाजूस तपकिरी, कानावरील पिसे तांबूस. पंखावर पांढरा पट्टा नसतो. खालील बाजू करडी-तपकिरी व बुड बदामी. दोहोंनाही शेपूट उभी करण्याची सवय. आवाज: उंच पट्टीतला चिरका आवाज. व्याप्ती: रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: कोरड्या खडकाळ भागातील झुडूपांमध्ये, शेतीप्रदेशात तसेच ग्रामीण भागात. खाद्यः कीटक व त्यांची अंडी, कोळी इ.

तपकिरी गप्पीदास
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: तपकिरी गप्पीदास.

इंग्रजी नाव: Indian Chat (जुने नाव - Brown Rock Chat). शास्त्रीय नाव: Cercomela fusca. लांबी: १७ सेंमी. आकार: चिमणीपेक्षा मोठा. ओळख: नर मादी दिसायला सारखे. वरील बाजूस एकसमान तपकिरी, खालील बाजूस तांबूस-तपकिरी. पंख गडद व शेपूट काळपट. आवाज: झुकून केलेला शिळ घातल्या सारखा ‘चीS' असा आवाज. विणीच्या हंगामात कस्तूरासारखा मंजुळ गातो. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: खडकाळ टेकड्या, खदानी, पडक्या, भग्न इमारती, शहरातील पडके अथवा शांत वाडे. खाद्यः जमिनीवर पकडलेले कीटक,

राखी सातभाई
(छाया: अनिल महाजन)

मराठी नाव: राखी सातभाई.

इंग्रजी नाव: Large Grey Babbler, शास्त्रीय नाव: Turdoides malcolmi. लांबी: २८ सेंमी. आकार: साळुंकीपेक्षा मोठा. ओळख: एकंदरीत राखाडी-तपकिरी. वरील पाठीवर गडद तपकिरी खुणा. कपाळावर फिक्कट राखी रेषा. गळा व छातीवर फिक्कट गुलाबी-करडा. डोळा व चोचीच्या मध्ये करडी रेषा. बुबुळे पिवळी. फिक्कट चोच, पाय तपकिरी-करडे. एखाद्या इझनभर सातभाईंचा थवा असतो. आवाज: थव्यातील अनेक पक्षी एकाचवेळेस भांडल्यासारखा एकसारखा ‘कय-कय-कय' असा गलका करतात. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवासः खुली कोरडी झुडुपे, शेतीप्रदेश, बगीचे. घनदाट जंगल टाळतो. खाद्यः किडे-कीटक, झुरळ, कोळी, कीटकांचे पिलव, वडा-पिंपळाची रसाळ फळे, धान्य, फुलातील मकरंद.

जंगली सातभाई
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: जंगली सातभाई.

इंग्रजी नाव: Jungle Babbler. शास्त्रीय नाव: Turdoides striata. लांबी: २५ सेंमी. आकारः साळुंकीपेक्षा मोठा. ओळख: मातकट तपकिरी वर्ण. डोळे पांढरे. चोच व पाय पिवळसर. पुठ्ठा पिवळसर व शेपटी तांबूस-तपकिरी. गळा करडा, छातीवर तपकिरी रेषा, पोट किरमिजी-तपकिरी. आवाज: कर्कश 'के-के-के.' व्याप्ती: रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: शेतीप्रदेश, पानगळीचे जंगल, बगीचे. खाद्यः जमिनीवरील पालापाचोळा हुसकत किडे-कीटक, झुरळ, कोळी, कीटकांचे पिलव शोधतात. वडा-पिंपळाची रसाळ फळे, धान्य, फुलातील मकरंद.

पिवळ्या डोळ्यांचा सातभाई
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: पिवळ्या डोळ्यांचा सातभाई.

इंग्रजी नाव: Yellow-eyed Babbler. शास्त्रीय नाव: Chrysomma sinensis. लांबी: १८ सेंमी. आकार: बुलबुल पेक्षा छोटा. ओळख: वरील बाजूस लालसर-तपकिरी व पंख बदामी. चोच जड व काळी. छाती, गळा, भुवई आणि डोळे व चोचीमध्ये पांढरा. पोट व खालील बाजू पिवळसर-तपकिरी. बुबुळ पिवळे व त्याभोवती नारिंगी कडे. आवाज: गाताना विविध मधुर स्वर उच्चारतो. 'ट्री-रिट-री-री-री' अशी सुरुवात करून ‘टुवे-ट्वाह' असा शेवट. व्याप्ती: रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: उंच गवताळ प्रदेश. झुडूपी प्रदेश, काटेरी वने, वेळूची बने तसेच शेतीप्रदेश. खाद्यः कोळी, कीटक, छोटी फळे तसेच फुलातील मकरंद.

राखी वटवट्या
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: राखी वटवट्या.

इंग्रजी नाव: Ashy Prinia (जुने नाव: Ashy Wren Warbler). शास्त्रीय नाव: Prinia socialis. लांबी: १३ सेंमी. आकार: चिमणीपेक्षा छोटा. ओळख: मुकुट व कानावरील पिसे मातकट-राखाडी. विणीच्या हंगामात वरील पाठ मातकट राखाडी. विणीच्या हंगामाबाहेर वरील बाजू तांबूस-तपकिरी. खालील बाजू नारिंगी-पिवळसर. अर्धवट पांढरी भुवई (कधी कधी अभाव). डोळे लाल. शेपटीला टोके पांढरी व टोकापुर्वी काळा पट्टा. आवाज: वारंवार केलेला जोरकस ‘जिम्मी-जिम्मी-जिम्मी', तसेच धारदार 'टी-टी-टी'. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: उंच गवताळ प्रदेश, झुडुपे. खुली दुय्यम उपज, तसेच वेळूच्या बनात. खाद्यः कीटक, सुरवंट.

शिंपी
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नावः शिंपी.

इंग्रजी नाव: Common Tailorbird. शास्त्रीय नाव: Orthotomus sutorius. लांबी: १३ सेंमी. आकार: चिमणीपेक्षा छोटा. ओळख: वरील बाजू हिरवट, खालील बाजू फिक्कट पिवळसर ते पांढरट, माथा व मुकुट तांबूस. अल्पशी वाकलेली चोच. विणीच्या हंगामात नराच्या शेपटीची मधली पिसे जास्त लांब. आवाज: मोठ्याने वारंवार केलेला ‘टोविट-टोविट-टोविट-' वा 'प्रेटी-प्रेटी-प्रेटी' तसेच 'पिचिक-पिचिक-पिचिक'. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: बगीच्यातील झुडुपे, शहरी भागात, शेतीच्या धुव्यावर तसेच जंगलाच्या कडेला. खाद्य: कीटक, त्यांची अंडी, पिलव तसेच फुलातील मकरंद (पळस, काटेसावर, पांगारा).

कवडी रामगंगा
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: कवडी रामगंगा.

इंग्रजी नाव: Cinereous Tit (जुने नाव: Great Tit). शास्त्रीय नाव: Parus major. लांबी: १३ सेंमी. आकार: चिमणीपेक्षा छोटा. ओळख: वरील बाजूस करडा. पांढरे गाल वगळता संपूर्ण डोके काळे, मानेच्या मागील बाजूस पांढरट भाग. काळ्या गळ्याची पट्टी पोटावरून बुडापर्यंत पोचते. शेपटी काळपट, बाहेरील पिसे मात्र पांढरी. तृतीयक पिसांना राखाडी किनार. आवाज: विविध आवाज काढतो. स्पष्ट मधुर शिळ; ‘वीटर-वीटर-वीटर', 'व्रिट-ची-ची' तसेच 'सी त्सी त्सी' इत्यादी आवाज काढतो. व्याप्ती: रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: जंगल आणि भरपूर झाडीचे प्रदेश. खाद्यः कीटक, त्यांची अंडी, पिल्लं, फुलांच्या कळ्या, फळे, शेंगा तसेच बिया.

जांभळा सूर्यपक्षी
(छाया: नंदकिशोर दुधे)

मराठी नाव: जांभळा सूर्यपक्षी.

इंग्रजी नाव: Purple Sunbird. शास्त्रीय नाव: Cinnyris asiaticus. लांबीः १० सेंमी. आकारः चिमणीपेक्षा छोटा. ओळख: नर- वरील बाजू चकाकदार जांभळी. पोट व बुड काळे. मादी- वरील बाजूस एकसमान हिरवट व खालील बाजूस एकसमान पिवळी. अस्पष्ट भुवई. ग्रहणावस्थेतील (अवयस्क) नर (Eclipse Male) मादीसारखा दिसतो पण गळ्यापासून पोटाकडे काळी पट्टी असते. आवाज: 'झी' असा तसेच ‘स्वीइ' असे आवाज. व्याप्ती: रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: पानगळीची खुली वने, शहरी बगीच्यांमध्ये. खाद्य: कीटक, कोळी तसेच फुलातील मकरंद.

जांभळ्या पाठीचा सूर्यपक्षी
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: जांभळ्या पाठीचा सूर्यपक्षी.

इंग्रजी नाव: Purple-rumped Sunbird. शास्त्रीय नाव: Leptocoma zeylonica. लांबी: १० सेंमी. आकार: चिमणीपेक्षा छोटा. ओळख: नर- मुकुट चकाकदार हिरवा, लालसर-विटकरी वरील पाठ, तसेच गळा व खालील पाठ चकाकदार जांभळी. मादी- वरील बाजूस राखाडी तपकिरी, गळा राखाडी, छाती व पोट चटकदार पिवळे. आवाज: 'सी-सी' तसेच 'चीट् चीट् असे उंच पट्टीतले आवाज. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: झुडूपी प्रदेश, दुय्यम उपज, कोरडवाहू शेती तसेच शहरी बगीचे. खाद्य: कीटक, कोळी तसेच फुलातील मकरंद.

लाल मनोली (मुनिया)
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नावः लाल मनोली (मुनिया).

इंग्रजी नाव: Red Avadavat. (जुने नाव: Red Munia). शास्त्रीय नाव: Amandava amandava. लांबी: १० सेंमी. आकारः चिमणी पेक्षा छोटा. ओळखः विणीच्या हंगामातील नर लाल असून सर्वांगावर पांढरे ठिपके. इतर हंगामातील नर तसेच मादीची वरील बाजू राखाडी-तपकिरी असते व खालील बाजू पिवळसर-पांढरी. चोच व मागील पाठ लाल. पंखांवर पांढऱ्या ठिपक्यांच्या दोन रांगा. आवाज: अशक्त असा पण उंच पट्टीतला ‘टीई' असा. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवासः उंच गवताचे आर्द्र प्रदेश, गवत (रामबाण) माजलेल्या दलदली, उसाचे मळे, तसेच शेताचे धुरे खाद्य: गवत तसेच इतर धान्याच्या बिया.

ठीपकेवाली मनोली (मुनिया)
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नावः ठीपकेवाली मनोली (मुनिया).

इंग्रजी नाव: Scaly-breasted Munia (जुने नाव: Spotted Munia). शास्त्रीय नाव: Lonchura punctulata. लांबीः १० सेंमी. आकारः चिमणी पेक्षा छोटा. ओळखः चेहेरा, वरील छाती, व गळा तपकिरी-बदामी. खालील बाजू पांढरी व त्यावर काळे खवले. अवयस्क पक्ष्यांची वरील बाजू एकसमान तपकिरी व खालील बाजू फिक्कट पिवळसर. पोट पांढरट. आवाजः वारंवार केलेला ‘टीट-टी’ ‘टीट-टी' तसेच 'कीट-टी' कीट-टी' असे आवाज. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवासः खुले दुय्यम वन, झुडुपे तसेच शेतीप्रदेश. खाद्यः गवत तसेच इतर धान्याच्या बिया. क्वचित पंखवाली वाळवी.

काळ्या डोक्याची मनोली (मुनिया)
(छाया: वेदांत कसंबे)

मराठी नावः काळ्या डोक्याची मनोली (मुनिया).

इंग्रजी नाव: Black-headed Munia (जुने नाव: Tricoloured Munia). शास्त्रीय नाव: Lonchura malacca. लांबीः ११.५ सेंमी. आकारः चिमणी पेक्षा छोटा. ओळखः डोके व छाती काळी. वरील बाजू तांबूस-तपकिरी, पोटाचा मधला भाग व शेपटीची खालची पिसे काळी. उर्वरित पोट पांढरे. अवयस्क पक्ष्याची वरील बाजू एकसमान तपकिरी व खालील बाजू पिवळसर ते पांढरी. आवाज: अशक्त असा 'पीक्ट' आणि उडताना 'चीप' असा. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवासः उंच गवत असलेले दलदलीचे प्रदेश अथवा वेळूची बने. खाद्य: गवत तसेच इतर धान्याच्या बिया.

चिमणी
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नावः चिमणी.

इंग्रजी नाव: House Sparrow. शास्त्रीय नाव: Passer domesticus. लांबी: १५ सेंमी. ओळखः नर-मुकुट करडा, कंठ व डोळ्याभोवतीची त्वचा काळी. मुकुटाच्या बाजू तसेच मानेची मागील बाजू बदामी. वरील पाठ तांबूस-बदामी व त्यावर काळ्या रेषा. गाल पांढरे. तांबूस पंखावर पांढरा पट्टा. मागील पाठ राखाडी-तपकिरी, शेपटी गडद तपकिरी. मादी- भुवई फिक्कट पिवळसर. डोके वगळता वरील बाजूस राखाडी-तपकिरी व त्यावर पिंगट आणि गडद तपकिरी रेषा. आवाजः रटाळ "चीप” असा. नर मोठ्याने 'त्सी सी सी' असे गातो. व्याप्तीःरहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवासः मानवी वस्तीत तसेच शेतात. रात्री एखाद्या हिरव्या झाडाच्या पनोऱ्यात मोठ्या संख्येत थाऱ्याला येतात. खाद्यः शेतातील तसेच बाजारातील धान्य, छोटे कीटक, फुलांच्या कळ्या, पाकळ्या, फुलातील मकरंद तसेच खरकटे.

रानचिमणी
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नावः रानचिमणी.

इंग्रजी नावः Chestnut-shouldered Petronia (जुने नाव: Yellow-throated Sparrow). शास्त्रीय नावः Petronia xanthocollis. लांबी: १४ सेंमी. आकारः चिमणीपेक्षा छोटा. ओळखः नर-वरील बाजू राखाडी-तपकिरी, पंख व शेपटी गडद. खांद्यावर बदामी डाग व पंखांवर दोन पांढरे पट्टे. खालील बाजू फिक्कट राखाडी-तपकिरी. कंठ पिवळा. मादी- कंठ फिक्कट पिवळा. खांद्यावरचा डाग तांबूस. आवाजः चिमणी सारखा पण जास्त मंजुळ. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवासः खुले शुष्क जंगल, काटेरी झुडूपी जंगल, शेतीप्रदेश. गाव-खेड्याच्या कडेला, पण चिमणीएवढा मात्र मानवी वस्तीत आढळत नाही. खाद्य: उजाड भातखाचरात धान, रस्त्यावर तसेच शेतात धान्य टिपतात. गवताच्या बिया, फुलातील मकरंद, छोटे पतंग तसेच इतर कीटक.

बाया सुगरण
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नावः बाया सुगरण.

इंग्रजी नावः Baya Weaver. शास्त्रीय नाव: Ploceus philippinus. लांबी: १५ सेंमी. आकारः चिमणी एवढा. ओळखः विणीच्या हंगामातील नर- पिवळाधमक मुकुट व एकसमान पिवळी छाती. चेहरा व गळा गडद तपकिरी. वरील पाठीवर पिवळ्या रेषा. इतर काळातील नर, मादी तसेच अवयस्क पक्षी- साधारणतः चिमणीसारखे. खालील बाजू एकसमान फिक्कट पिवळसर. गळ्यावर पिवळ्या रंगाचा अभाव, तसेच गालावर मिशिसारख्या रेषांचा अभाव. आवाजःचिमण्यांची आठवण करून देणारा चिट-चिट-चिट'. विणीच्या हंगामात अनेक नर पंख फडफडवून 'ची-ईऽ' असे सुरात गातात. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: गवताळ प्रदेश, तुरळक झाडे असलेले झुडूपी जंगल, शेतीप्रदेश. खाद्यः उजाड भातखाचरात तसेच शेतात धान-धान्य टिपतात. शेतातील पिकावर (ज्वारी, बाजरी, गहू) ताव मारतात.

साळुंकी
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: साळुंकी.

इंग्रजी नाव: Common Myna. शास्त्रीय नाव: Acridotheres tristis, लांबी: २३ सेंमी. ओळख: एकंदरीत गडद तपकिरी, डोके काळे; पाय, चोच व डोळ्याभोवतीची त्वचा पिवळी. पंखांवर पांढरा डाग. शेपटीचे टोक पांढरे. आवाज: गोंधळ घातल्याप्रमाणे पुन्हा पुन्हा समोर झुकून नुसतीच वायफळ बडबड जसे 'रेडिओ- रेडिओ- रेडिओ', 'किक-किक-किक', 'कोक-कोक-कोक-कोक', 'चूर-चूर्र' इ. संकटकाळी ‘चेक-चेक' असा आवाज. व्याप्ती: रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवासः मनुष्यवस्तीत, शहरात, खेड्यात. खाद्यः मिश्राहारी. फळे, कीटक, खरकटे इ. नांगरामागे धावून गांडूळ, तुडतुडे मिळवतो. गुरांसोबत भटकून किडे-कीटक मटकावतो.

भांगपाडी मैना
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: भांगपाडी मैना.

इंग्रजी नाव: Brahminy Starling. शास्त्रीय नाव: Sturmus (Temenuchus) pagodarum. लांबी: २२ सेंमी. आकार: साळुकीपेक्षा छोटा. ओळख: वरील बाजू करडी-तपकिरी, खालील बाजू पिवळसर-नारिंगी. कपाळ, मुकुट काळे व डोक्यावर लांब काळ्या लटाच्या पिसांचा तुरा. आवाज: वेगवेगळे आवाज काढण्यात पटाईत. एकसारखी बडबड करण्याची सवय, व्याप्ती: रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: खुले पानगळीचे जंगल, झुडूपी जंगल, शेतीप्रदेश तसेच मनुष्य वस्तीत. खाद्यः बऱ्याच अंशी मिश्राहारी. वडा-पिंपळाची फळे, कीटक; गुरांसोबत भटकून किडे-कीटक मटकावतो. क्वचित खरकटेसुध्दा चालते.

कवडी मैना
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: कवडी मैना.

इंग्रजी नाव: Asian Pied Starling. शास्त्रीय नाव: Gracupica contra. लांबी: २३ सेंमी. आकार: साळुंकी एवढा. ओळख: काळ्या-पांढऱ्या रंगाची मैना. डोळ्याभोवतीची त्वचा लालसर-नारिंगी. गाल पांढरे. चोच नारिंगीपिवळी, बुडाजवळ नारिंगी. पंखांवर जाड पांढरा पट्टा. आवाजः उंच पट्टीतले अनेक मधुर आवाज व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण महाराष्ट्र. अधिवास: शेतीप्रदेश, ओलसर तावताळ प्रदेश तसेच मनुष्य वस्तीत. खाद्यः बऱ्याच अंशी मिश्राहारी. वडा-पिंपळाची फळे, कीटक; शेतात, तलावाजवळ गुरांसोबत भटकूल किडे-कीटक मटकावतो. कचऱ्यामधील खरकटेसुध्दा चालते.

हळद्या
(छाया: जे. एम. गर्ग)   (छाया: अक्षय चारेगावकर)

मराठी नाव: हळद्या.

इंग्रजी नाव: Indian Golden Oriole. शास्त्रीय नाव: Oriolus oriolus. लांबी: २५ सेंमी. आकार: साळुंकीपेक्षा मोठा. व्याप्ती: रहिवासी. महाराष्ट्रात सर्वत्र. ओळख: नर सोनेरी पिवळ्या वर्णाचा, पंख व शेपटीवर काळा रंगा. मादी फिकट हिरवट-पिवळसर वर्णाची, पोटावर फिक्कट तपकिरी काड्या. पिल्लू मादिप्रमाणे पण पोटावरील काया गडद तपकिरी व चोच काळपट. नर व मादीची चोच फिक्कट गुलाबी. आवाज: बासरीसारखा कर्णमधुर ‘पीलोलो' वा ‘वीला व्ही-ओहं' तसेच कर्कश 'चीआह. अधिवास: पानगळीची वने, निम्न-सदाहरित वने, राया, शेतीप्रदेश, तसेच शहरातील बगीचे. खाद्यः कीटक, मुख्यत्वे फलाहारी (वड, पिंपळ, इ.) फुलांमधील मकरंद.

कोतवाल
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: कोतवाल.

इंग्रजी नाव: Black Drong0. शास्त्रीय नाव: Dicrurus macrocercus. लांबी: ३९ सेंमी. आकार: बुलबुलपेक्षा मोठा. व्याप्तीः रहिवासी. संपूर्ण हाराष्ट्र. ओळख: सडपातळ शरीरयष्टीचा चकाकदार काळा कुळकुळीत पक्षी. शेपटी आतपर्यंत दुभंगलेली. जीवनी जवळ छोटा पांढरा ठिपका व बुबुळ फिक्कट. अप्रौढ पक्ष्याच्या खालील बाजूस भरपूर पांढरे डाग असू शकतात. आवाज: कर्कश ‘टी-टिऊ' व कर्कश 'चिचे-चिचे-चीचूक' (शिक्र्याची आठवण करून देणारे आवाज). अधिवास: मानवी वस्ती तसेच शेती प्रदेशात. खाद्य: कीटक, तसेच फुलांमधील मकरंद. क्वचित छोटे पक्षी.

कावळा
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: कावळा.

इंग्रजी नाव: House Crow. शास्त्रीय नाव: Corvus splendens. लांबी: ४३ सेंमी. आकारः पारव्यापेक्षा मोठा. व्याप्तीः रहिवासी. महाराष्ट्रात सर्वत्र. ओळख: आपल्या परिचयाचा पक्षी. एकंदरीत दोन-रंगी. मानेची मागील बाजू, मान, छाती राखाडी. उर्वरित शरीर चकाकदार काळे. आवाज: अगदी रुक्ष असा ‘काsssकाsss' आवाज. इतर अनेक रुक्ष आवाज काढतो. अधिवास: मानवी वस्ती व शेतीप्रदेश. खाद्य: मिश्राहारी. पक्ष्यांची अंडी-पिल्लं, मृत प्राणी, खरकटे, धान्य, तुडतुडे, पंखवाली वाळवी इ. खाण्यायोग्य काहीही चालते. निसर्गाचा सफाई कामगार पण इतर पक्ष्यांना नुकसान पोचवतो.

डोमकावळा
(छाया: डॉ. राजू कसंबे)

मराठी नाव: डोमकावळा.

इंग्रजी नाव: Large-billed Crow (जुने नाव - Jungle Crow). शास्त्रीय नाव: Corvus (macrorhynchos) culminatus. लांबी: ४७-५० सेंमी. आकार: कावळ्यापेक्षा मोठा. व्याप्तीः रहिवासी. महाराष्ट्रात सर्वत्र. ओळख: संपूर्ण काळा कुळकुळीत. चोच कावळ्यापेक्षा मजबूत. वरील जबडा बाकदार. आवाज: जोरकस घशातून काढलेला 'क्यार्ह' असा. अधिवास: झाडीचे प्रदेश तसेच गावकुसाबाहेर. शहरात सुद्धा तुरळक दिसतो. खाद्यः मिश्राहारी. पक्ष्यांची अंडी-पिल्लं, छोट्या प्राण्यांची पिलं, मृत प्राणी (वन्यपशूंनी केलेल्या शिकारी शोधण्यात पटाईत), खरकटे इ. खाण्यायोग्य काहीही चालते.