अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/'शास्त्र'भ्रष्टाचाराचे
मानवाच्या इतिहासात सुमारे १० हजार वर्षांपूर्वी असं वैचारिक ‘समुद्रमंथन' झालं होतं. त्यातून शेती आणि पशुपालन या व्यवसायांची रत्ने बाहेर पडली होती. संपत्ती, मालमत्ता व मालकी हक्क या संकल्पना बाहेर पडल्या होत्या. आहार, निद्रा, भय व मैथुन या चार गोष्टींखेरीज इतर विचार न करणारा व सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत याच विवंचनेत असणाऱ्या मानवाला सुस्थिर बनविण्याची आणि त्याची चहूअंगानी प्रगती करण्याची
क्षमता या रत्नांमध्ये होती. पण, त्याबरोबरच अतिजहाल विषही बाहेर पडलं होतं, ते
म्हणजे भ्रष्टाचाराचं! मात्र देव-दानवांच्या समुद्रमंथनातून निघालेल्या विषाला शंकराचा
'उतारा’ मिळाला तसा या भ्रष्टाचाराच्या विषाला मिळाला नाही. त्यामुळे गेल्या १०
सहस्रकांमध्ये हे विष मानवात चांगलं भिनलं आहे.
मानवाने विकसित केलेल्या राजकारणापासून उद्योग-व्यवसायापर्यंत आणि शिक्षणापासून
समाजसेवेपर्यंत सर्व क्षेत्रांत त्याचा सुखनैव संचार होत आहे. याची पाळेमुळे इतकी
मजबूत आहेत की, ते नाहीसे करण्याची भाषा केव्हाच संपली आहे. आता केवळ
त्याला पायबंद घालून नियंत्रणाखाली ठेवण्याची भाषा होत आहे आणि तसंही कित्येकदा
शक्य होत नाही.
याबाबत एक गमतीशीर प्रसंग आठवतो. दोन वेळा देशाचे कार्यकारी पंतप्रधानपद
सांभाळलेले थोर गांधीवादी गुलझारीलाल नंदा प्रथम केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री झाले.
तेव्हा त्यांनी पाच वर्षांत भ्रष्टाचार खतम करण्याची घोषणा केली होती. मात्र दोन वर्षात
त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून कोणत्याही मंत्र्याने भ्रष्टाचार
पूर्णपणे नाहीसा करण्याची भाषा केलेली नाही.
तर असा हा भ्रष्टाचार सर्वांच्याच गळ्यात अडकलेलं हाडूक बनला आहे. ते
गिळताही येत नाही आणि थुंकताही येत नाही.
'भ्रष्टाचारामुळे देशाची नासाडी होत आहे. ही कीड नाहीशी झालीच पाहिजे.
भ्रष्टाचार्यांना फासावर लटकविल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही' असे जवळपास
प्रत्येकजण संधी मिळेल तेव्हा बेंबीच्या देठापासून ओरडत असतो. मात्र, संधी मिळाल्यास
स्वतः वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्यास मागेपुढे पाहत नसतो. तेव्हा जाहीररीत्या
कोणालाही नको असणारा, पण खासगीत हवाहवासा वाटणारा हा भ्रष्टाचार अनादिकाळापासून
होत आला आहे आणि अनंत काळपर्यंत चालत राहण्याची शक्यता आहे.
'पाण्यातील मासा पाणी कधी पितो, ते पाण्याखेरीज कुणालाही कळत नाही.
तसंच सरकारी अधिकारी भ्रष्टाचार कधी आणि कसा करतो हे इतरांना समजू शकत
नाही' असं दोन हजार वर्षांपूर्वी आर्य चाणक्याने म्हणून ठेवलं आहे. भ्रष्टाचाराला
'सुसंस्कृत' मानवाच्या इतिहासाइतकाच जुना इतिहास आहे हे यावरून स्पष्ट होते.
एखाद्या डेरेदार रसरशीत वृक्षाला बांडगूळ लागावं किंवा गाईच्या भरल्या कासेला गोचीड चिकटावं, तसा समृध्द व संपन्न मानवी संस्कृतीला भ्रष्टाचार बिलगून आहे.काबाडकष्ट करून कुटुंब पोसणाऱ्या आदर्श पत्नीच्या पैशावर दारू ढोसणारा आणि वर तिलाच मारहाण करणारा पती असंही भ्रष्टाचाराचं वर्णन करता येईल. तो सुधारत नाही आणि ती त्याला सोडत नाही. असा हा संसार गेली दहा हजार वर्षे अखंड सुरू सुरू आहे.
तथापि, बांडगूळ, गोचीड किंवा व्यसनी पती नाहीसे करता आले नाहीत, तरी
त्यांना वेळीच वेसण घालणं आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्याकडून होणारं शोषण
तुमचा नाश होईपर्यंत थांबणार नाही. भ्रष्टाचाराचंही तसेच आहे.
भ्रष्टाचाराचे शास्त्र :
सर्व संस्थांमध्ये कमी अधिक प्रमाणात भ्रष्टाचार चालतोच. उद्योग - व्यवसाय
क्षेत्रांत त्याचं अधिष्ठान अधिक भक्कम आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी त्याचं
शास्त्र समजून घेणं आवश्यक आहे.
भ्रष्टाचाराची सुरुवात मुख्यतः सत्ताधीश व ज्याच्यावर सत्ता गाजविली जाते, अशी
व्यक्ती यांच्यातील परस्पर संबंधांमधून होते. आपण सरकारी कार्यालयांत काही कामासाठी
जाता. काम लवकर होणं आपल्या दृष्टीने आवश्यक असतं. सरकारी अधिकारी ही
अडचण ओळखतो. 'रेट' ठरतो. देवाण-घेवाण होते. आपलं काम होतं. त्याचंही होतं.
दोघेही ‘विन विन’ सिच्युएशनमध्ये असल्याने कुणाचीच तक्रार नसते. थोडक्यात,
आपली गरज आणि त्याचा अधिकार यांच्यातील ‘अनैतिक संबंधा'तून अशा भ्रष्टाचाराचा
जन्म होतो.
नको इतकी बंधने व कठोर कायदे यातूनही भ्रष्टाचाराचा उगम होतो. जेव्हा भाडे
नियंत्रण कायदा पूर्णपणे भाडेकरुंच्या बाजूने होता, तेव्हा न्यायालयात जाऊन २०-२०
वर्षे भांडूनही मालकांना न्याय मिळत नसे. अशा वेळी गुंडांकरवी भाडेकरूला काढण्याचा
मार्ग ताकदवान मालक वापरत होते. म्हणजेच भ्रष्टाचाराचा अवलंब करीत होते.
भाडेनियंत्रण कायद्यात योग्य त्या सुधारणा झाल्यानंतर हे प्रकार बऱ्याच प्रमाणात थांबले
आहेत.
साधनसंपत्तीची कमतरता हे देखील भ्रष्टाचाराचे एक निर्मितीस्थान आहे. उदाहरणार्थ,
नोकरीच्या केवळ दहा जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी दोन हजार अर्ज आले आहेत.
अगदी योग्यतेचा विचार प्रथम केला तरी या दोन हजारांमधून त्या नोकऱ्यांसाठी योग्य
असे समान गणवत्तेचे ५० उमेदवार तरी सापडू शकतात. मग त्यापैकी जो पैसे देईल,
त्याला नोकरी मिळण्याची शक्यता जास्त असते. सर्व ५० जण पैसे देण्यास तयार
असतील तर तो जास्त देईल त्याचा नंबर लागतो. सर्वत्र असं होतं असं नाही, पण ही
शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.
पूर्वी रेल्वे, विमाने यांची संख्या कमी होती. तिकिटे मिळविण्यासाठी वरकड पैसे द्यावे लागत. नंतर या साधनांची संख्या वाढली. अधिक जागा उपलब्ध झाल्याखेरीज संगणकीकरणासारखं तंत्रज्ञान उपलब्ध झालं. यामुळे भ्रष्टाचाराच्या मार्गाने तिकिटं मिळविण्याचा प्रकार कमी झाला.
सध्याच्या खासगीकरण व जागतिकीकरणाच्या युगात स्पर्धा व तंत्रज्ञान विकास यामुळे साधनसंपत्तीची कमतरता कमी झाली आहे. त्यामुळे,वस्तूंची मुबलकता वाढली असून त्या प्रमाणात भ्रष्टाचाराला आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भ्रष्टाचाराची मुख्यत: तीन साधने आहेत. १) पैसा, २) शारीरिक संबंध, ३) भीती.
बहुतेक भ्रष्टाचार पैशाच्या माध्यमातूनच होतो. कारण यात धोका कमी असल्याची भावना असते. काही वेळा लैंगिक वासनाकांडातून भ्रष्टाचार होतो. तर समाजकंटक व गुंड प्रवृत्तीचे लोक दहशतीच्या जोरावर आपल्याला हवी ती कामे करून घेतात.
भ्रष्टाचार आणि व्यक्ती :
सर्व दोषांप्रमाणे भ्रष्टाचाराचं निवासस्थान माणसाचं मन हेच आहे. पैसा, भौतिक सुख यांचा अनावर मोह आणि भय त्याला यासाठी उद्युक्त करतात. भल्याभल्यांना या मोहाचं दडपण आवरत नाही. एखादी व्यक्ती किती भ्रष्टाचारी वा प्रामाणिक आहे हे तिच्या नैतिक पातळीवर तसंच संस्कारांवर ठरत असते.
दोन पिढ्यांपूवीं माणूस 'सामाजिक प्राणी’ म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे स्वतःची अबू व प्रतिष्ठा यांना समाजाच्या भीतीने का असेना पण जपत होता. त्याचं व्यक्तिगत जीवन 'लोक काय म्हणतील' या सूत्रांवर बव्हंशी अवलंबून होतं. त्यामुळे भ्रष्टाचारावर काही प्रमाणात तरी स्वयंनियंत्रण होतं. आज माणूस ‘आर्थिक प्राणी' झाला आहे आणि ‘आर्थिक यश' सर्वात महत्वाचं मानलं जाऊ लागलं आहे. माणसाच्या कला, गुण इतकेच नही तर नैतिकतासुध्दा पैशाच्या परिमाणात मोजली जाऊ लागली आहे परिणामी, भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलं आहे.
माणसाची द्विधा मनःस्थिती :
प्रत्येक जण मनापासून भ्रष्टाचारी असतोच असं नाही, पण परिस्थिती काही वेळा
त्याला मार्ग बदलण्यास भाग पाडते.
यशाचे दोन त्रिकोण आहेत. एक पैसा, सत्ता व प्रतिष्ठा या बाजूंनी बनणारा तर दुसरा निर्मितीक्षमता, स्वातंत्र्य व प्रामाणिकता यांनी बनणारा. बहुतेकांनी या दोन्हींचा अनुभव घेतलेला असतो. पण कित्येकदा परिस्थितीमुळे माणसाला प्रामाणिकपणाची चौकट सोडून भ्रष्टाचाराकडे वळावं लागतं. प्रामाणिक माणूस भ्रष्टाचारी झाल्याची उदाहरणं असंख्य आहेत, पण भ्रष्टाचार्याला उपरती येऊन तो प्रामाणिक झाल्याची उदाहरणं हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या चौकटीची ताकद वाढत आहे. अशा स्थितीत अनेकांची मनःस्थिती द्विधा बनते.