अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/माध्यम बर्ग व समाजाचे 'व्ययस्थापन'
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे।।
असंं भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत म्हटलंं आहे. ‘सज्जनांचं संरक्षण, दुष्टांचं निर्दालन आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी मी वारंवार अवतार घेतो’ असा याचा अर्थ.
हा श्लोक वरवर पाहता आध्यात्मिक आहे.भगवान श्रीकृष्ण खरोखर होता का? असला तर 'भगवान' होता का? आणि 'अवतार' वगैरे पुराणातील ‘वांगी' खरी मानणं आजच्या एकविसाव्या शतकात वेडपटपणाचं नाही का? अशा मौलिक शंका संशयात्मे विचारतील. पण या श्लोकात एक सखोल सामाजिक आणि ‘व्यवस्थापकीय’ आशय दडला आहे. तो लक्षात घेतला तर त्याचं महत्व आणि सत्यत्व दोन्ही पटण्यास हरकत नाही.कारण या श्लोकात 'क्रांती'ची व्याख्या सांगितली आहे.
जसं उद्योग-व्यवसायाचं व्यवस्थापन करावं लागतं तसं 'समाज’ या संस्थेचंही व्यवस्थापन करणं आवश्यक असतं, ते कुणी,कसं आणि का करायचं याचा वेध घेणं हे या व या पुढच्या लेखाचं उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीनं हा श्लोक व त्यातील क्रांतीची व्याख्या महत्त्वाची आहे.
एखाद्या समाजात सज्जनांना किती मान मिळतो, त्याची पाठराखण कशी केली जाते आणि सामजिक उतरंडीत त्यांचं स्थान कोणतं यावर त्या समाजाची स्थिरता, प्रगती आणि सांस्कृतिक दर्जा अवलंबून असतो. थोडक्यात समाजाचं 'व्यवस्थापन' सज्जनांच्या हाती असेल, तर त्या समाजाची वाटचाल सकारात्मक दिशेने होत असते. या उलट जो समाज दुष्टांना आवर घालण्याची आणि शासन करण्याची क्षमता गमावून बसला आहे त्याचं भवितव्य अंधःकारमय असतं.
म्हणूनच ज्या वेळी समाजाची सूत्रंं अपप्रवृत्तींच्या हाती जातात,तेव्हा त्याचंं उत्थान करण्यासाठी म्हणजेच क्रांती किंवा परिवर्तन घडविण्यासाठी एक शक्ती जागृत व्हावी लागते. ही शक्ती काही वेळा एखाद्या व्यक्तीच्या स्वरूपात, तर काही वेळा संस्थेच्या किंवा समूहाच्या रूपानंं जागी होऊ शकते. त्यानंतर समाजाला ऊर्जितावस्था प्राप्त होते.
सज्जनांच्या हातात समाजाचं व्यवस्थापन पुन्हा सोपविण्यासाठी या शक्ताकडून बौध्दिक व वैचारिक पायावर आधारलेलं परिवर्तन घडवून आणलं जातं. त्यालाच क्रांती म्हणतात. क्रांती सशस्त्र आणि निःशस्त्र अशा दोन मार्गांनी होते. उदाहरणार्थ, छत्रपती शिवाजी महाराजांनी जुलमी मोगली राजवटीविरुध्द घडविलेलं परिवर्तन सशस्र होतं तर गांधीजींनी इंग्रजांविरुध्द घडविलेलं परिवर्तन निःशस्त्र होते. मात्र, या दोन्ही क्रांत्यांना प्रबळ असं वैचारिक अधिष्ठान होतं आणि त्यांचा उद्देश सज्जनांचं संवर्धन व दुष्टांचं निर्मूलन हाच होता. थोडक्यात, वर दिलेल्या श्लोकाचा अर्थ लक्षात घेतला तर हे दोघेही 'अवतारी' पुरुषच होते असं म्हणावयास काही हरकत नाही.
शिवाजी आणि गांधीजी यांच्यात आणखी एक समान दुवा आहे. तो म्हणजे, ही दोघेही युगपुरुष मध्यमवर्गीय घराण्यात जन्माला आलेले होते. शिवाजी महाराजांचा जन्म राजघराण्यात झाला असला तरी, ज्या मोगली आणि विजापुरी राजवटीविरुद्ध त्यांनी क्रांती घडविली, त्यांचं वैभव, सामर्थ्य आणि दरारा पाहता त्यांच्यासमोर शिवाजी जन्म राजघराण्यात झाला असला तरी, ज्या मोगली आणि विजापुरी राजवटीविरद्ध महाराज ‘मध्यमवर्गीयच होते असं म्हणावं लागेल.
केवळ ही दोन उदाहरणेच नव्हेत, तर दहा हजार वर्षांपूर्वी मानव पृथ्वीवर स्थिरस्थावर होत असल्याच्या कालखंडापासून ते थेट आजपर्यंत इतिहासाच्या प्रत्येक वळणावर क्रांती घडविण्याचं हे 'अवतारकार्य' मध्यमवर्गानंं 'वारंवार' पार पाडलेलं दिसून येतं. म्हणून म्हटलं जातं की,ज्या समाजातला मध्यमवर्ग संवेदशील, जागृत आणि जबाबदारीने वागणारा असतो, तो समाज तत्परतेनं विकसित होतो. वरील श्लोकात 'संभवामि युगे युगे' असं म्हंटल आहे, त्यातील 'मी'म्हणजेच हा मध्यमवर्ग.
जबाबदारी मध्यमवर्गावरच का?
कोणताही समाज श्रीमंत, मध्यमवर्गीय व गरीब अशा तीन विभागांत वाटला गेलेला असतो. यापैकी श्रीमंत हे तृप्त असतात.त्यामुळे त्यांना क्रांती किंवा परिवर्तन नकोच असते. गरिबाला परिवर्तनाची आवश्यकता असते. पण रोजच्या भाकरीची समस्याच त्याला डोईजड झालेली असल्यानं जो तो देव असं समजण्यावाचून लागणारी त्याला गत्यंतर नसतं. परिवर्तनासाठी आवश्यक असणारा कालावधी आणि त्याला लागणारी उर्जा निर्माण करण्याची त्याची क्षमता नसते.या दोन्ही समाजघटकांनच्या मधलं स्थानं मध्यमवर्गाचं असतं. तो श्रीमंताइतका तृप्तही नसतो आणि गरिबाइतका कंगालही नसतो. साहजिकच क्रांतिकारक बदलांची त्याला आवश्यकता असते, त्याच्या या क्षमतेला संवेदनशीलतेची जोड मिळाली की, अपेक्षित परिवर्तन घडून येतं.
अनेक क्रांत्यांचा जन्मदाता असणारा हा मध्यमवर्ग हजारो वर्षांपूर्वीच जन्माला आला आहे. प्रारंभीच्या काळात मानवानं शेती आणि पशुपालनाची कला संपादन केली. त्यानंतर मालक व सेवक अशा दोन घटकांत समाजाची विभागणी झाली. मालकांची मालमत्ता आणि सुखलोलुपता वाढू लागली. तशी मालमत्तेची देखभाल करण्यासाठी सेवकांहून वरच्या पण मालकांपेक्षा खालच्या वर्गाची आवश्यकता निर्माण झाली. तेथे मध्यमवर्ग जन्माला आला. तो त्याचा पहिला ‘अवतार'.
या अवतारात त्यानं विविध प्रयोग करून पारंपरिक शेती व पशुसंगोपन यात तांत्रिक प्रगती केली. याच सुमारास मध्यमवर्गात दोन गट पडले. एक गट मालकांची हांजी हांजी करून स्वतःच्या तुंबड्या भरण्यात दंग राहिला. सेवकवर्गाची पिळवणूक करण्यात मालकाला मदत करणं, कित्येदा मालकाच्या नावानं स्वतःच त्यांचं शोषण करणं आणि भरपेट फायदा करून घेणं हेच त्याचं ध्येय बनलं. कार्ल मार्क्सनं या वर्गाला ‘बुर्झ्वा’असं नाव दिलं आहे.
दुसरा गट मात्र स्वतंत्र बाण्याचा होता. त्यानं कुणा एकाच्या आज्ञेत राहण्यापेक्षा स्वतःची वेगळी प्रतिभा विकसित केली. कृषिउपयोगी साधनं, वनस्पती व खनिजांपासून औषधं, धातूकाम, वस्त्र विणणं, चामड्याच्या वस्तू बनवणं इत्यादी तंत्रज्ञान विकसित केलं. पुराणात ज्या चौसष्ट कला व चौदा विद्यांचा उल्लेख आहे त्यांची निर्मिती व जोपासना याच गटानं केली. मीमांसाशास्त्र, न्यायशास्त्र अशा सामाजिक संस्थांची निर्मिती केली. ज्यांना या भौतिक बाबींमध्ये रस नव्हता, त्यांनी तत्त्वज्ञान, अध्यात्म, धर्म इत्यादींची निर्मिती करून त्याद्वारे विश्वाचं कोडं समजून घेण्याची जिज्ञासा जागृत केली.
मधल्या कालखंडात राजसत्ता या संकल्पनेचा उदय झाला. त्यामुळं तर या गटाच्या प्रतिभेलां अस्मान ठेंगणं झालं. भूमीच्या प्रचंड तुकड्याला ‘राष्ट्र' असं संबोधलं जाऊ लागलं. त्यांच्या सीमा ठरल्या. राजसत्ता चालविण्यासाठी ‘सुशिक्षित’कर्मचारी वर्गाची आवश्यकता जाणवू लागली. राजाचा दरबार, प्रशासन, सैन्य आदी विविध क्षेत्रं या वर्गासाठी खुली झाली. स्वतःच्या बौध्दिक क्षमतेनं या वर्गानं राजसत्ता मजबूत केली तर राजसत्तेच्या या पाठिंंब्यानं हा वर्ग स्वतः मजबूत झाला. याच काळात कित्येक गरिबांचं मध्यमवर्गीयांमध्ये रूपांतर झालं. मध्यमवर्गीयांची संख्या वाढू लागली. हे महान क्रांतीकार्यच होतं. या कार्यामुळे माणसाचं पशुत्व संपून त्याचं माणूसपण आकाराला येऊ लागलं. धर्म, विज्ञान, कला, नीती आणि त्यांच्या मिलाफातून निर्माण होणारी संस्कृती यांनी मानवाची चहुमुखी विकास केला. ही क्रांती जवळजवळ तीन हजार वर्षे
अव्याहतपणे सुरू होती.
धर्मशास्त्र व तत्त्वज्ञानाचे निर्माते विविध ऋषीमुनी, आयुर्वेदाचे जन्मदाते सुश्रुत व चरक, बाण, कालिदासासारखे नाटककार, आर्यभटासारखा (कदाचित जगातला पहिला) खगोलशास्त्रज्ञ, भास्कराचार्यासारखा गणिती, शंकराचार्यांसारखा तत्त्ववेत्ता, रामायण-महाभारतासारखा अप्रतिम काव्यात्म इतिहास लिहिणारे वाल्मिकी व व्यास व इतर असंख्य असामान्य व्यक्तिमत्त्वं आणि त्यांच्या कामगिरीचा रसिकतेने आस्वाद घेणारे इतर, हे सर्व त्या काळाचा विचार करता ‘मध्यमवर्गीय'च होते हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. एकंदर त्या वेळचा मध्यमवर्ग जिवंत, सळसळता , प्रवाही, सृजनशील व विजिगिषु वृत्तीचा होता हे इतिहासावर नजर टाकली असता कळून येतं. त्यानंतरही विविध वेळी त्या-त्या कालमानाला आवश्यक अशी क्रांती याच मध्यमवर्गाच्या अवतारांनी घडविली आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या विशेषत: भारतातल्या मध्यमवर्गाचा 'अवतार' कसा आहे, लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या श्लोकातला जो ‘मी’ आहे, तो बनण्याचीक्षमता त्याच्यात आहे का? हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यासंबंधी पुढच्या लेखात.