अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापकाचे गुणधर्म

ना सहकार नही उध्दार'हे घोषवाक्य आपल्या चांगल्याच परिचयाचं आहे. सहकारी तत्त्वावर स्थापन करण्यात आलेले उद्योग भारतात अनेक आहेत. पण डॉ. कुरियन यांनी नावारूपाला आणलेला ‘अमूल दुग्ध उद्योगा'ने हे घोषवाक्य खऱ्या अर्थाने सार्थ ठरविलंं आहे. ‘अमूल उद्योग' गुजरातच्या आणंद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कायापालटाला कारणीभूत ठरला आणि या उद्योगाच्या यशाला कारणीभूत ठरलं ते कुरियन यांचं समर्पित व्यवस्थापन. या लेखात आपण कुरियन यांच्याविषयी माहिती करून घेणार आहोत.‘व्यवस्थापन’ क्षेत्रात भरीव कामगिरी करून स्वतःचा ठसा मार्गदर्शक ठरू शकते.

 काही दशकांपूर्वी अमूल'च्या पशुखाद्य कारखान्याचे उद्घाटन करण्यासाठी दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आले होते.अमूलचा परिसर आणि या उद्योगामुळंं या भागात घडलेलं आमूलाग्र परिवर्तन पाहून ते अक्षरशः थक्क झाले.कुरियन यांच्याशी विचारविमर्ष करून त्यांनी या यशाचं रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कुरियनही त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलले.मात्र तरीही शास्त्रीजींच समाधान झाल नाही.शंका राहूनच गेल्या.
 शास्त्रीजी त्यांना म्हणाले, “आपल्या कामगिरीबद्दल रात्रभर विचार करूनही मला या परिवर्तनाच कोड उलगडलंं नाही.मी इथल्या मातीकडंं पहिलंं.ती आमच्या पवित्र गंगा नदीच्या खोऱ्यातील मातीइतकी सुपीक निश्चितच नाही. इथलं हवामान थंडीत खूपच थंड आणि उन्हाळ्यात उष्ण असतंं,पण भारतात सर्वत्र हीच परिस्थिती आहे.इथंं पाऊस ३० इंच पडतो. भारतात इतरत्रही साधारण इतकाच पाऊस पडतो. निदान इथली जमीन गवताळ असेल आणि गायी-म्हशी खुशीनं दिवसभर हिरवंगार गवत चरत असतील असं मला वाटल होतं. पण बाकीच्या भारताप्रमाणं इथंही केवळ पावसाळ्यातच हिरवळ असते. या भागातील म्हशी चांगल्या धष्टपुष्ट आहेत म्हणावे तर तसंही नाही. आपण रागावू नका, पण लहानपणी मी माझ्या घरी यापेक्षा चांगल्या म्हशी पाहिल्या आहेत. शेतकरी नेहमीच चांगला असतो. इथलाही तसाच आहे, पण तो पंजाबी शेतकऱ्यांंइतका कष्टाळू नाही आणि असं असूनही आपण आणंदचा कायापालट केलात. हे कसं शक्य झालं मी समजू शकलो नाही."
 डॉ. कुरियन उत्तरले, “उर्वरित भारत आणि आणंद यांच्यातील सर्व साम्य स्थळं आपण अचूक हेरलीत,पण एक महत्त्वाचा फरक आपल्या नजरेतून निसटला आणि या फरकातच आपल्या शंकेचं समाधान दडलं आहे. इथला हा अमूल उद्योग शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे. तिचं व्यवस्थापन शेतकऱ्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सांभाळतात. त्यांनी आपला उद्योग चालविण्यासाठी माझी निवड केली आहे. मी सरकारनियुक्त अधिकारी नव्हे, मला शेतकऱ्यांनी नेमलं आहे. मी त्यांचं समाधान केलं नाही तर मला माझं काम गमवावं लागेल. बदली करून घेण्याचा पर्यायही माझ्यासमोर नाही. मला सरळ घरीच बसावं लागेल. या दुग्धशालेचा प्रशासकीय व्यवस्थापक या नात्यानं शेतकऱ्यांचा विश्वास कमावण्याची आणि तो टिकविण्याची जबाबदारी माझी आहे. येथील शेतकऱ्यांची उपजीविका या दुग्धशालेला दूध पुरवून चालते. त्यामळं त्यांनी अधिकाधिक दूध उत्पादन करावं ही जबाबदारी मला स्वीकारावी लागते. ते माझ्याकडं येतात आणि म्हणतात, ‘माझी म्हैस दोन लिटर दूध देते, ती तीन लिटर कशी देईल ते सांगा.' यातून प्रेरणा घेऊन आम्ही हा पशुखाद्य कारखाना काढला. कारण जनावरांना चांगला खुराक मिळाला तर ती अधिक दूध देतील. याखेरीज म्हशींच्या कृत्रिम गर्भधारणेसाठी लागणारं तंत्रज्ञान, आणि दूध उत्पादन वाढीसाठी लागणाऱ्या इतर सर्व सेवा इथं शेतकऱ्यांनी नियुक्त केलेले कर्मचारीच पुरवितात. सरकारी कर्मचारी नव्हेत. त्यामुळं हा उद्योग शेतकऱ्यांशी एकनिष्ठ आहे. त्यांच्या समस्यांबाबत संवेदनशील आहे. त्यांच्या मागण्यांना त्वरित प्रतिसाद देण्याची त्यांची तयारी आहे. त्यामुळेचं आणंद आज न्यूझीलंड, डेन्मार्क, हॉलंड येथील दुग्धशालांच्या तोडीस तोड कामगिरी करीत आहे. असं भारतात इतरत्र दिसतं का?"
 आता मात्र शास्त्रीजी खरंच निरुतर झाले. त्यांनी कुरियन यांना राष्ट्रीय दुग्धशाला विकास महामंडळाचं अध्यक्षपद देऊ केलं. त्यांनी पद स्वीकारण्याची तयारीही दर्शिवली, पण दोन अटी घातल्या. एक आपण सरकारकडून मानधन स्वीकारणार नाही, पण शेतकऱ्यांनी नियुक्त केलेले व्यवस्थापक म्हणून कार्यरत राहू. दोन, महामंडळाचे मुख्यालय आणंद इथे असलं पाहिजे. दिल्लीत नाही. ते पुढे म्हणाले, “दिल्लीतील लोक इतर बऱ्याच गोष्टींंचा विचार करतात, पण शेतकऱ्यांचा विचार करावयाला त्यांना वेळ मिळत नाही. आणंदमध्ये आम्ही केवळ शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करतो, इतर गोष्टींचा नाही. त्यामुळं मी आणंद सोडणार नाही. तुम्हाला माझी सेवा हवी असेल तर महामंडळ येथे येऊ द्या."
 आपल्या कर्तव्याला वाहून घेतलेल्या व्यवस्थापकाचे गुणधर्म कोणते असले पाहिजेत, हे कुरियन यांच्या उत्तरावरून आपल्याला समजून येईल. ते गुणधर्म म्हणजे, ध्येयनिष्ठा (सेन्स ऑफ मिशन) कृतिशीलता (सेन्स ऑफ अॅक्शन)
विश्वासूपणा (सेन्स ऑफ लॉयल्टी).

ध्येयनिष्ठा : प्रत्येक संस्थेची निश्चित ध्येये असतात. त्यांची पूर्तता करणं हे संस्थेच्या प्रत्येक व्यवस्थापकाचं आद्य कर्तव्य आहे. यासाठी कुरियन यांच्याप्रमाणं निःस्वार्थ मनोवृत्तीनं कार्य करणं आवश्यक आहे. आणंद इथल्या शेतकऱ्यांच्या हितरक्षणासाठी त्यांनी दिल्लीतील राजेशाही पद न स्वीकारण्याचा निर्धार दाखविला.

 संस्थेच्या ध्येयांची पूर्ती करण्यासाठी ती नेमकी कोणती आहेत, हे समजून घेणं आवश्यक असतं. कुरियन यांना एकानं विचारले, ‘अमूल'चं ध्येय कोणतं? ते म्हणाले, केवळ दूध व दुधाचे पदार्थ उत्पादन हे आमचं साध्य नाही. ते केवळ एक साधन आहे. त्याचा उपयोग करून गरीब शेतकच्यांचं आर्थिक उत्थान करणं हे मूळ ध्येय आहे. म्हणजेच व्यवस्थापकानं संस्थेची ध्येयधोरणं आणि उद्दिष्ट यांचा वरवर पाठपुरावा करून भागत नाही, तर त्या ध्येयापाठीमागचं ध्येय कोणतं याचा शोध घेऊन त्याची जाणीवपूर्वक पाठराखण करावी लागते. यालाच ध्येयनिष्ठा म्हणतात.

कृतिशीलता : योग्य वेळी अचूक कृती करणं हा यशस्वी व्यवस्थापकाचा एक महत्वाचा गुणधर्म आहे. याखेरीज ध्येयपूर्ती योग्य पध्दतीनं होत नाही. याचं उदाहरण कुरियन म्हणतात, शेतकऱ्याची म्हैस विण्याच्या परिस्थितीला आलेली असते. पण वीत सुरळीत होत नाही. रेडकू आडवं आलेलं असतं. खेड्यांमधून हे नेहमीच घडतं. अशा वेळी त्वरित पशुवैद्यकीय मदत मिळाली नाही तर म्हैस मरण्याची शक्यता असते. म्हैस मरणं म्हणजे शेतकरी व आमची संस्था अशा दोघांचंही नुकसान म्हणजेच ध्येयपूर्तीच्या मार्गात अडथळा. तो उद्भवू नये म्हणून आम्ही खेडोपाडी रेडिओ टेलिफोन सेट्स वितरित केले आहेत. त्यावरून संदेश मिळाला की, त्वरित मदत पोहचविली जाते. याचा अर्थ असा की, संभाव्य अडचणींचा व अडथळ्यांचा अगोदरच अंदाज घेऊन खबरदारीची उपाययोजना करून ठेवणं व्यवस्थापकाचं कर्तव्य आहे. त्यामुळं योग्य वेळी योग्य कृती करणं सोपं जातं.

विश्वासूपणा :
 कुरियन यांची शेतकरीनिष्ठा कौतुकास्पद होती. ते म्हणत, ‘शेतकरी मूर्ख नाही. परंपरेनं चालत आलेलं ज्ञान त्याच्यापाशी खूप आहे. आपल्या मालाला सुनिश्चित बाजारपेठ आहे, अशी त्याची खात्री पटली की, तो अधिकाधिक उत्पादन करतो.’ या प्रवृत्तीमुळं शेतकऱ्यांच्या विश्वास त्यांनी कमावला. ‘अमूल’ मटकावू पाहणारे राजकारणी आणि नोकरशहा यांच्याशी सामना करण्याचं बळ त्यांना शेतकऱ्यांच्या पाठबळामुळं प्राप्त झालं. त्यामुळंच ‘अमूल'चा ध्वज आजही दिमाखात आणि डौलानं फडकत राहिला आहे.