अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/संकटाचे संधीत रूपांतर करा

गच्या लेखात आपण नोकरीवर टांगती तलवार असणाऱ्या सुधीरची कथा पाहिली.सध्याच्या औद्योगिक मंदीच्या काळात त्याच्यासारखे व्यवस्थापकच नव्हे तर चतुर्थ श्रेणी कामगारांपर्यंत सर्वांवरच नोकरीच्या असुरक्षिततेचं संकट कोसळलं आहे. सरकारी तसंच खासगी उद्योगांची वाढ व विकास थंडावल्याने नव्या नोकऱ्या निर्माण करणं तर सोडाच, पण असलेला कर्मचारी वर्ग राखणेही त्यांना कठीण होत आहे.

 यावर उपाय म्हणून अनेक कंपन्यांनी स्वेच्छानिवृत्ती योजना लागू केल्या. त्यामुळे अनेक कर्मचारी ठराविक वय गाठण्याअगोदरच निवृत्त झाले आहेत, किंवा होणार आहेत. म्हणजेच आज समाजात नोकरी गमावण्याची वेळ आलेल्या, नोकरी प्रत्यक्षात गमावलेल्या व स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्या अशा तीन प्रकारच्या व्यक्ती आहेत. पण त्यांच्यासमोर समस्या एकच आहे ती म्हणजे ‘पुढे काय करायचे?’
 या सर्वांना आर्थिक विवंचनेबरोबरच रिकामपणाची समस्या भेडसावू लागते.जीवन व्यर्थ चालले आहे,अशी भावना वाढीस लागून नैराश्य येते. मानसिक अस्वास्थ्य निर्माण होण्याची शक्यता असते. अशा परीस्थितीत जीवन अर्थपूर्ण बनविण्यासाठी खास प्रयत्नांची आवश्यकता आहे.
अर्थपूर्ण जीवनाचे तीन महत्वाचे पैलू आहेत.
 १. कार्यमग्नता
२. लक्ष्य
३. जीवनमूल्ये
कार्यमग्नता:
 व्यवस्थापन गुरु पीटर ड्रकर यांनी म्हटल्याप्रमाणे २० वे शतक उद्योगधंद्यांच्या विकासाचं शतक होतं.त्याकाळी माणसाचं कार्यमग्न आयुष्य ३० ते ३५ वर्षाचं तर काम देणाच्या संस्थेचं आयुष्य १०० वर्षांहून अधिक मानले जात होते. त्यामुळे एखाद्या संस्थेत एकदा चिकटलं की निवृत्त होऊनच बाहेर पडायचं हे ठरलेलं असे. परिणाम कर्मचारी वर्गाची मानसिकताही तशीच बनली व अजूनही ती बच्याच प्रमाणात तशीच कायम आहे.
 २० व्या शतकाच्या अखेरीस आणि २१ व्या शतकाच्या सुरुवातीला ही बदलली आहे. तंत्रज्ञानात सतत होणारे बदल व गतिमान जीवन यामुळे काम देणान्या संस्थेचं आयुष्यमान ३० ते ३५ वर्षीच टिकून राहील असं गृहीत धरले जात. मात्र माणसाचं काम करण्याच आयुष्य ५० ते ६० वर्षाचे आहे. याचाच अर्थ एकाच संस्थेत जीवनभर काम करणंं ही संकल्पना मोडीत निघाली आहे. त्यामुळेच नोकरी सुटल्यानंतर काय हा प्रश्न कळीचा बनला आहे.
 माणसाला दिवसभर काहीना काही काम असेल तर त्याला बरं वाटतं. नोकरीत असताना हे आपोआप होतं. मात्र नोकरी सुटल्यानंतर रिकामा वेळ खायला उठतो. यावेळी स्वतःच पुढाकार घेऊन कार्यमग्न राहणंं आवश्यक आहे.
लक्ष्य किंवा उद्दिष्ट :
 नोकरीत ठराविक काम नेमून दिलेलं असल्याने ते पूर्ण करणे हे उद्दिष्ट असतं, पण नंतर असं कोणतेही लक्ष्य समोर नसल्याने दिशाहीन वाटू लागतं.
जीवनमूल्ये:
 ही दोन प्रकारची आहेत. नैतिक व भौतिक यापैकी भौतिक मूल्यांचा विचार या लेखात प्रामुख्याने केला आहे.निवृत्त होण्यापूर्वी माणसाचे जीवन मुख्यतः तीन भौतिक मूल्यांभोवती फिरत असतं. ती म्हणजे पैसा, प्रतिष्ठा व अधिकार. नोकरी गमावल्यानंतर त्यांना उतरती कळा लागते. दरमहा मिळत असणारे ठराविक उत्पन्न बंद होत. त्यापाठोपाठ प्रतिष्ठा व अधिकारही नाहीसा होतो. उत्पन्नाचं नवं साधन लवकर हाती न लागल्यास शिल्लक पेशावर गुजराण करण्याची पाळी येते.
 थोडक्यात, असलेलं काम वा नोकरी गमवावी लागल्याने
१. आर्थिक विवंचना
२. प्रतिष्ठा व अधिकाराचा लोप
३. रिकामपण व त्यातून निर्माण होणारे मानसिक अस्वास्थ्य
४. असुरक्षितता
५. नैराश्य
ही संकटं उभी राहतात.
 यावर काही उपाय आहे का? अवश्य आहे. मात्र सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की, नोकरी सुटल्यावर कराव्या लागणाच्या उपाययोजनांची पूर्वतयारी नोकरी चालू असतानाच करून ठेवणे आवश्यक आहे.ज्यांची नोकरी अजून गेलेली नाही पण ती टिकून राहीलच असं खात्रीपूर्वक सांगता येत नाही, अशा सुधीरसारख्या तरुणांच्या बाबतीत ही बाब महत्त्वाची आहे.
 नोकरीत असतानाची तीन जीवनमूल्ये आपण वर पाहिली. नोकरी गेल्यानंतरच्या काळात पुढील तीन जीवनमूल्यांचा आधार घेतल्यास या संकटावर मात तर करता येतेच, शिवाय बच्याच वेळा नोकरीपेक्षाही जास्त फायदा होण्याची शक्यता असते. ही मूल्ये म्हणजे -
१. सृजनशीलता क्रिएटिव्हिटी)
२. स्वायत्तता (ऑटॉनॉमी)
३. निष्ठा (इंटिग्रिटी)
 प्रत्येक माणसात जन्मत: कमी अधिक प्रमाणात हे तीन गुण असतातच. त्यांना आपण जितक्या अधिक प्रमाणात जागे करू तितके ते कठीण परिस्थितीत आपल्या मदतीला धावतात. नोकरीत असताना आवडत असो वा नसो आपल्याला ठराविकच काम करावं लागतं. त्यात दिवसाचा बराच वेळ जात असल्याने आपल्यातील इतर कलागुणांना न्याय देणे शक्य होत नाही. कित्येकदा असे कलागुण किंवा नवनिर्मिती करण्याची क्षमता आपल्यात आहेयाचीही आपल्याला जाणीव नसते. नोकरी सुरू असताना वेळात वेळ काढून हे गुण जागते ठेवल्यास कठीण काळी जिवाभावाच्या मित्राप्रमाणे ते साहाय्याला येतात. नोकरी सुटल्यानंतरही उपलब्ध वेळेचा उपयोग अशा सृप्त कला-कौशल्यांचा विकास करण्यासाठी करता येतो. सृजनशील व्यक्तींसाठी नोकरी सुटणं हे संकट नसून संधी असते.
 नोकरीत असताना आपल्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर बंधनं येतात.मनाप्रमाणे जीवन जगणे शक्य नसते, पण नंतरच्या काळात हे स्वातंत्र्य आपण उपभोगू शकतो. निष्ठेबाबतही असंच आहे. नोकरीमध्ये निष्ठा आपल्यावरची जबाबदारी, आपली संस्था व सहकारी यांना वाहिलेली असते. निवृत्तीनंतरच्या काळात हीच निष्ठा स्वतःच्या विकासासाठी उपयोगात आणता येते.
 हा थोडासा तत्त्वज्ञानाचा भाग झाला. आता प्रत्यक्षात नोकरीला पर्याय म्हणून कोणते मार्ग चोखाळता येतात, ते पाहू.
कन्सल्टन्सी:
 नोकरी सुटल्यानंंतरच्या काळात अर्थार्जन, कार्यमग्नता व प्रतिष्ठा यासाठी 'कन्सल्टन्सी' हा व्यवसाय बरेच जण पत्करतात. नोकरीत असताना जे काम आपण करीत होतो त्याबाबत इतरांना सल्ला देणं, असं काम करणाच्या व्यक्तींना अगर कंपन्यांना साहाय्य करणं असं या व्यवसायाचं स्वरूप आहे. ज्यांना आपल्या विषयाचं सखोल व 'प्रॅॅक्टीकल' आहे व समाजाबरोबर सुसंवाद साधण्याचे कौशल्य ज्यांच्याजवळ आहेे. त्यांच्यासाठी मार्ग उत्तम आहे. मात्र ,आपण या विषयात ज्ञानी असून योग्य सल्ला देऊ शकता अशी आपली 'इमेज' समाजात असणं आवश्यक आहे. ही इमेज बनविण्यासाठी साधारण पाच वर्षांचा कालावधी लागू शकतो.
शिक्षण किंवा प्रशिक्षण:
 आज कोणत्याही क्षेत्रात तंत्रज्ञानाला असाधारण महत्त्व प्राप्त झाल्याने त्याचं प्रशिक्षण ही आवश्यक बाब आहे. तेव्हा नोकरी सुटल्यानंतर आपल्याला असणारं ज्ञान दुसर्याला देणे, त्याला प्रशिक्षित करणे हा व्यवसाय भरभराटीचा ठरू शकतो. तथापि, त्यासाठी नुसतं ज्ञान असून चालत नाही, तर शिकवण्याची कला अवगत असण आवश्यक आहे. ही हातोटी आपण काही वर्षांच्या सरावाने साध्य करू शकता. हा व्यवसाय नोकरीला पर्याय म्हणून लोकप्रिय ठरला आहे.
लेखन:
 आपल्याला माहिती असणाऱ्या विषयांवर वृत्तपत्रे, नियतकालिकं अथवा पुुस्तकांच्या माध्यमातून लेखन करणे हा चांगला पर्याय होऊ शकतो. यासाठी त्या माध्यमाशी अनुरूप अशी लेखनशैली कमवावी लागते. काही जणांना ती उपजत असते, तर काही जण त्यात सरावाने तरबेज होतात. माझ्या माहितीचे ‘प्रॉक्टर अँड गैम्बल' कंपनीचे माजी संचालक गुरुचरण दास यांनी स्वेच्छानिवृत्तीनंतर वृत्तपत्रांतून लेखन सुरू केलं. आज त्यांचा उत्कृष्ट स्तंभलेखक म्हणून नावलौकिक आहे.याखेरीज चित्रकला, गायन, संगीतरचना, फोटोग्राफी संगणकीय ग्राफिक्स, वक्तृत्त्व, अभिनय आदी कलांची जोपासनाही उपयोगी पडू शकतेे. पब्लिक कॉल ऑफिस, ई-मेल सेवा, कुरिअर सेवा, संगणक आधारित सेवा, आदि व्यवसायदेखील सुरू करता येतात. त्यात फार गुंतवणूक लागत नाही.
तात्पर्य:
 करिअरमध्ये केव्हाही बदल करावा लागू शकतो याची जाणीव करिअर चालु असतानाच ठेवणे व पर्यायी व्यवस्थेची तयारी करणे हे आता गरजेचे झालं आहे.नव्या जगाची ती सर्वप्रथम मागणी आहे.तेव्हा असुरक्षिततेला घाबरून न जाता तिचं सुयोग्य नियोजन व व्यवस्थापन करण्याची निकड आहे.संकटाचं संधीत रूपांतर करण यासारखा आनंद दुसरा नाही.