अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/संवाद साधण्याची कला

णत्याही व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे यश पुढील तीन बाबींवर अवलंबून असते.(१)शिकविण्याची शैली,(२)शिकविण्याचे मुद्दे,(३)प्रशिक्षणार्थींची आकलनशक्ती.

१.शिकविण्याची पध्दती किंवा शैली :
 चांगला शिक्षक, चांगला व्यवस्थापक व चांगला राजकारणी यांच्यात एक समान गुण असावा लागतो. तो म्हणजे प्रभावीपणे संवाद साधण्याची कला. शिक्षकाचं यश केवळ त्याच्या ज्ञानावर किंवा बुध्दीवर अवलंबून नसतं. आपलं ज्ञान तो विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचवितो आणि त्यांच्या बुध्दीला चालना कशी देतो, यावर ते अवलंबून आहे. प्रचंड ज्ञान असणारे विद्वान चांगलं 'शिकवू' शकत नाहीत हा अनुभव बऱ्याचदा येतो.
 एका प्रसिध्द प्राध्यापकांचं शिकवणं ऐकण्यासाठी इतर वर्गातली मुलेही आपला तास चुकवून असत. आपल्या लोकप्रियतेचे रहस्य काय असं त्यांना विचारले असता ते म्हणाले, “मी शिकविताना विषय विद्यार्थ्यांच्या कानापर्यंत नव्हे तर मनापर्यंत पोहचवितो. पुढील काम विद्यार्थी स्वतःच करतात.
 याचा अर्थ असा की, विद्यार्थ्यांच्या मनात विषयाबद्दल प्रेम निर्माण करतो तो

आदर्श शिक्षक. कारण जे मनात शिरत नाही, त्याबद्दल प्रेम निर्माण होत नाही आणि

प्रेम निर्माण झाल्याशिवाय ते ‘आपले’ व्हावं असं वाटत नाही. तेव्हा विद्यार्थ्याला विषय ‘आपला' वाटावा अशी शिकविण्याची शैली विकसित करणं आवश्यक आहे. व्यवस्थापन प्रशिक्षकांची हे तत्त्व अंगीकारले पाहिजे.
 काही शिक्षक एखाद दुसऱ्या विद्यार्थ्याला चांगलं शिकवू शकतात. पण एकाच वेळी चाळीस पन्नास विद्यार्थ्यांसमोर त्यांचा रंग उडून जातो. विशेषत: विविध वयाच्या आणि विभिन्न शैक्षणिक पात्रता असणाऱ्या मोठ्या विद्यार्थी गटाला एकच विषय सलग अनेक तास शिकविण्याची वेळ आली की, विद्वज्जड व तज्ज्ञ शिक्षकांचीही भंबेरी उडते. कारण शिकवणं आणि व्यक्तीशी संवाद साधणं यात मूलभूत फरक आहे.प्रशिक्षकाने तो लक्षात घेतला पाहिजे.
 प्रशिक्षणार्थाशी प्रशिक्षकांचे संबंध हा एक देखील कळीचा मुद्दा आहे. याबाबत क्रिकेटचं उदाहरण घेता येईल. एखादा विश्वविक्रमी महान फलंदाज किंवा गोलंदाज यशस्वी कप्तान होऊ शकतोच असं नाही. कारण व्यक्तिगत कामगिरी आणि यशस्वी कप्तानी यासाठी भिन्न गुणांची आवश्यकता आहे. एकाच व्यक्तीत ते असू शकतील असं सांगता येणार नाही.
 सचिनसारखा भीमपराक्रम गाजवणारा दिग्गज खेळाडू यशस्वी कप्तान होऊ शकला नाही. क्रिकेटचे समीक्षक म्हणतात की, त्याच्याइतक्याच महान कामगिरीची अपेक्षा त्याने संघातील इतर खेळाडूंकडून ठेवली, पण प्रत्येक खेळाडू त्याच्याइतका महान असू शकत नाही. त्यामुळे खेळाडूंवर दडपण आलं. परिणामी संघाची कामगिरी उंचावू शकली नाही.
 संघाचा कप्तान हा एकापरीने संघाचा शिक्षकच असतो. कारण आपल्या खेळाडूंकडून मैदानात ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे यथायोग्य कामगिरी करून घेण्याची जबाबदारी त्याची असते. ती तो जितक्या अचूकपणे पार पाडील तितकं यश संघाच्या पदरात पडते. यासाठी संघातील खेळाडूंशी त्याचे संबंध आत्मीयतेचे असावे लागतात.
 प्रशिक्षकाच्या बाबतही असेच आहे. तो नुसता ज्ञानी असून भागत नाही. तर विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे कार्यप्रवण बनवणं, त्यांची कुवत वाढविण्याचा प्रयत्न करणं आणि सर्व विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण करणं हा देखील शिक्षकी'चाच एक भाग आहे. थोडक्यात, स्वतःच्या महानतेचं दडपण विद्यार्थ्यांवर येऊ न देता, विद्यार्थ्यांच्या पातळीपर्यंत पोचून त्यांची पातळी उंचावण्याचा प्रयत्न करणं यात शिक्षकाचं खरं कौशल्य दिसून येतं. केवळ उंटावरून शेळ्या हाकण्याची पध्दती यशस्वी ठरत नाही.  व्यवस्थापन प्रशिक्षकाच्या संदर्भात तर ही बाब फारच महत्त्वाची आहे. कारण कोणत्याही क्षेत्राचं व्यवस्थापन हा एक सांघिक खेळच आहे. याही खेळात महान खेळाडूंच्या जिवावर सामने जिंकले जाऊ शकत नाहीत तर व्यवस्थापनातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीने त्याची जबाबदारी पार पाडावी लागते. तरच लक्ष्याचा पाठपुरावा यशस्वीपणे करता येतो.
 याचमुळे व्यवस्थापन प्रशिक्षकाला प्रशिक्षणार्थींमध्ये सांघिक भावना निर्माण होईल, अशा पध्दतीने कार्यक्रम आखावा लागतो. तो प्रशिक्षणार्थींना भावण्यासाठी त्यांच्याबरोबर परिणामकारक संवाद साधावा लागतो.
 संवाद साधण्याची ही कला कष्टसाध्य आहे. ती दुसऱ्याचं अनुकरण करून साध्य होत नाही. एखाद्या प्रशिक्षकांची कार्यशाळा घेण्याची शैली आवडली की, इतर अनेक प्रशिक्षक त्याच शैलीचे अनुकरण करू लागतात. पण ज्याचं आपण अनुकरण करतो त्याचे व्यक्तिमत्त्व, विषयाची जाण, बौध्दिक क्षमता आपल्याहून भिन्न असते. त्यामुळे अशी कॉपी करणे यशस्वी ठरत नाही, याचे भान प्रशिक्षकाला असावयास हवं. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या अंगभूत गुणांचा व वैशिष्ट्यांचा विचार करून स्वतःची शैली विकसित व ती लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
शिकविण्याचे मुद्दे :
 शिकविण्याच्या शैलीप्रमाणेच नेमकं काय शिकवायचं याचा प्रशिक्षकाला सांगोपांग विचार करून कार्यक्रम ठरवावा लागतो. शाळेतील शिक्षक व व्यवस्थापन प्रशिक्षक यासंदर्भात मोठा फरक आहे. शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षकाने काय शिकवायचं ते ठरलेलं असतं. इच्छा असूनही तो त्यात बदल करू शकत नाही. त्याच्यासमोर केवळ कसं शिकवायचं हाच प्रश्न असतो.
 व्यवस्थापन प्रशिक्षकाला मात्र काय शिकवायचं आणि कसं यावर समान लक्ष पुरवावं लागते. कारण विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या संस्थांकडून त्याला प्रशिक्षणासाठी बोलावणं येऊ शकतं. त्यांच्या आवश्यकता वेगवेगळ्या असतात. त्या जाणून घेऊन आपल्या कार्यक्रमात ऐन वेळी बदल करावे लागतात.
 शिकविण्याच्या मुद्यांबाबतही ख्यातनाम प्रशिक्षकांची कॉपी करण्याचा मोह नवोदित प्रशिक्षकांना अनावर होतो. अनेक प्रशिक्षक साचेबध्द पध्दतीचे खेळ, नाट्यसंवाद, इत्यादी माध्यमांमधून शिकविणं पसंत करतात. पण कित्येक संस्थांमधून कर्मचाऱ्यांनी अशा अनेक कार्यशाळांना उपस्थिती लावलेली असते. त्यांना हे खेळ,संवाद इत्यादी अगोदरच माहिती असण्याची शक्यता असते. मग असे कार्यक्रम कंटाळवाणे होतात.
 प्रत्येक शिक्षकाने स्वतःचं ‘स्टडी मटेरियल’ तयार करून त्याआधारे कार्यक्रम देणं श्रेयस्कर आहे. दुसऱ्याचं स्टडी मटेरियल वापरण्यांचा मोह टाळला पाहिजे. दुसऱ्याचं मटेरियल वापरण्यातील महत्त्वाचा तोटा हा की, त्यासंबंधी कुणी प्रश्न विचारला की, परिस्थिती अवघड होते.
प्रशिक्षणार्थाीची आकलनशक्ती :
 कोणत्याही व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाला हजर असणाऱ्या प्रशिक्षणार्थींमध्ये सर्वसाधारणपणे पुढील प्रकारे प्रशिक्षणार्थी असतात.
 १) शिकणारे प्रशिक्षणार्थाी : यांचे प्रमाण साधारणतः २५ टक्के असतं. ते कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकतात. त्यांना शिकण्याची इच्छा असते व हौस असते.ते प्रशिक्षकाला सहकार्य करतात. शंका विचारतात. अशा प्रशिक्षणार्थाींना शिकविणं तुलनेनं सहज असतं.
 २) शंकेखोर प्रशिक्षणार्थी : यांचेही प्रमाण २५ टक्केच असतं. त्यांची नावं प्रशिक्षणार्थींच्या यादीत असतात म्हणून ते आलेले असतात. त्यांना कार्यक्रमात खास रस नसतो. मुद्दाम शंका विचारून प्रशिक्षकाला भंडावून सोडणं, खोचक शेरेबाजी करणं यात ते पराक्रम मानतात. अशांची संख्या जास्त असेल व त्यांना हाताळण्याची हातोटी प्रशिक्षकाकडे नसेल तर कार्यक्रमाचा `फियास्को’ होऊ शकतो.
 ३) स्थितप्रज्ञ प्रशिक्षणार्थाी : सुमारे ५० टक्के प्रशिक्षणार्थाी न्यूट्रल म्हणावेत असे असतात. त्यांना शिकण्यात अधिक उत्साह नसला तरी प्रशिक्षकाला देण्याचीही वृत्ती नसते. प्रशिक्षकाची शैली प्रभावी असेल व शिकविण्याचे मुद्दे मनाला भिडणारे असतील तर हे प्रशिक्षणार्थाी कार्यक्रमात रस घेतात. असे विद्यार्थी समाधानी दिसले तर कार्यक्रम यशस्वी झाला असं समजण्यास काही हरकत नाही.
{{gap}]या सर्व पार्श्वभूमीवर प्रशिक्षकाला आपलं धोरण ठरवायचं असतं. व्यवस्थापन प्रशिक्षण हा एकपात्री नाट्यप्रयोगच असतो. प्रशिक्षण कार्यक्रमाचं यश उदाहरण देऊन विषय त्यांच्या मनावर बिंबविण्याची क्षमता, विविध प्रयोग व साधनांचा उपयोग करून प्रशिक्षणार्थींना कार्यक्रमात गुंतवून ठेवण्याची क्षमता यावर अवलंबून असतं. अर्थात या बाबी आत्मसात करणं सोपं नसतं. प्रशिक्षणाच्या या व्यवसायात अनेक जणांचा वावर असला तरी फार थोडे प्रशिक्षक दीर्घकाळपर्यंत टिकून राहतात. ९० टक्क्यांचा कारभार पहिल्या ३ वर्षांतच आटोपतो. ९ टक्के १० वर्षांपर्यंत टिकाव धरतात. तर केवळ १ टक्का ‘दीर्घायुषी' होतात.