अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/स्वतःच्या कंपनीला 'ओळखा'
चालू नोकरी जाण्याची शक्यता असलेल्या व्यवस्थापकाने ती बदलण्याचा विचार काळजीपूर्वक व पध्दतशीर केला पाहिजे. कोणत्याही प्रसंगांला तोंड देण्याची सुरुवात काही वर्ष अगोदरपासूनच करावयास हवी. वर्षातून एकदा तरी आपल्या स्थितीचं समालोचन केलं पाहिजे. समालोचन म्हणजे टीकात्मक पध्दतीने पाहणं, गुणदोषांचा अभ्यास करणं. याच्या तीन पायच्या आहेत.
१. आपल्या कंपनीचं समालोचन
२. आपल्या भोवतीच्या परिस्थितीचं समालोचन
३. आपल्या कामाचं समालोचन
कंपनीचं समालोचन:
आपण योग्य कंपनीसाठी काम करीत आहोत का? हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. ‘योग्य कंपनी’ची व्याख्या करणं सोपं नाही. पण अयोग्य कंपनी कोणती हे ओळखणं सोपं आहे. कंपनीच्या गुणदोषांचा अभ्यास केल्यास आपण योग्य कंपनीसाठी काम करत आहोत की अयोग्य यांचा अचूक अंदाज येतो. मग काम सोडण्यासाठी दीर्घकालीन योजना बनविणं शक्य होतं. अयोग्य कंपनी ओळखण्यासाठी पुढील 'टीप्स' मार्गदर्शक ठरतील.
१. मर्यादित आयुष्य असणाऱ्या कंपन्या :
बऱ्याच कंपन्या कुत्र्याच्या छत्रीसारख्या उगवतात आणि सीझन संपला की तशाच गळून पडतात. सुरुवातीच्या काळात आकर्षक पगार, अनुभव व सुविधांचं गाजर धरून बुध्दिमान व्यवस्थापक मिळविलेले असतात. मात्र कंपनी स्थापन करण्याचा संचालकांचा उद्देश एकदा का पूर्ण झाला की, ते कंपनीकडं आणि कर्मचारी वर्गाकडं दुर्लक्ष करतात. परिणाम व्हायचा तोच होतो. अल्पावधीतच कंपनी बंद पडते आणि तिच्यावर भाकरी अवलंबून असणारे कर्मचारी उघड्यावर पडतात. अनेक उद्योगांना सरकार बऱ्याच सवलती देते. केवळ त्यांचा लाभ उठविण्यासाठी त्या स्थापन केल्या जातात. आणि नंतर ‘आजारी' पाडल्या जातात.
काही कंपन्या फसवणुकीच्या उद्देशानं सुरू केलेल्या नसतात. त्यांचं आयुष्य अल्प असतं. उदाहरणार्थ बांधकाम कंपन्या, विवक्षित प्रकल्प पूर्ण झाला की कंपनी बंद केली जाते. काही वेळा प्रकल्प पूर्ण करण्यास लागलेला विलंब किंवा नवी कंत्राटं मिळणं यामुळं कंपनी अपेक्षेपेक्षा अधिक काळ चालते. त्यामुळं ती कायमची चालत राहणार असा कर्मचाऱ्यांचा गैरसमज होण्याची शक्यता असते. म्हणून कर्मचारी व व्यवस्थापकांनी आपल्या कंपनीचं खरं स्वरूप, तिचा उद्देश, तिचा भविष्यकाळ यांचा अभ्यास केला पाहिजे. कंपनीची उलाढाल, कंत्राटं, हिशोब, ऑडिट अहवाल इत्यादी पाहावयास हवेत. त्यानंतर अशा कंपनीमध्ये किती काळ काम करायचं, केव्हा सोडायचं आणि पर्यायी व्यवस्था कशी करायची याचा निर्णय घेणं सुलभ होतं.
२. मुळातच कमजोर कंपन्या :
वरून दिसायला सुंदर पण आतून रोगट असणाऱ्या व्यक्तीसारखी अशा कंपन्यांची अवस्था असते. सध्यापुरता तिचा कारभार व्यवस्थित चाललेला दिसतो. पण प्रतिकार शक्ती कमी असते. थोडासा धक्का बसला किंवा बाह्य परिस्थितीत काही बदल झाला तर तो त्या सहन करू शकत नाहीत. त्यांची उत्पादनं किंवा आर्थिक स्थिती यांच्यात मुळातच काही तरी दोष असतो. जाहिराबाजीचा मेक-अप चढवून तो काही काळ लपवता येतो, पण खरी स्थिती समोर येण्यास वेळ लागत नाही. उदाहरणार्थ, एकाच मोठ्या कंपनीला माल पुरविणारी छोटी कंपनी. ती पूर्णपणे मोठ्या कंपनीच्या कृपेवर अवलंबून असते. तिची मागणी थांबली की, छोटी कंपनी बंद पडते.
आर्थिक तंगीत असणाऱ्या कंपन्याही थोड्याशा झटक्यानं बंद पडू शकतात.
३. कालबाह्य नेतृत्व असणाऱ्या कंपन्या :
कित्येक कंपन्या एखाद्या परंपरागत वस्तूचे उत्पादन करत असतात. संचालक नव्या संकल्पना राबविण्यास तयार नसतात. मालाला सुरक्षित बाजारपेठ असल्याने ती टिकून असते. मात्र, आणखी कंपन्यांना तीच वस्तू तयार करण्याचा परवाना मिळाला व स्पर्धा वाढली की अशा कंपन्या टिकू शकत नाहीत.
४. पक्षपाती विचारसरणीच्या कंपन्या :
व्यक्तींप्रमाणेच कंपनीचीही विवक्षित विचारसरणी असू शकते आणि कित्येकदा ती पक्षपाती असू शकते. काही कंपन्या हे उघडपणानंं मान्य करतात, तर काही लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. केवळ ब्रिटिश चार्टर्ड अकाउंटन्टस् सक्षम असतात अशा समजुतीने माझ्या माहितीतील एक कंपनी त्यांनाच अर्थविभागाचं प्रमुखपद देत असे. तसंच अभियांत्रिकी विभागात पदोन्नती मिळविण्यासाठी अमेरिकेतील पदवी अनिवार्य असे. त्यामुळं अन्य देशांतील चार्टर्ड अकाऊंटन्ट किंवा अभियंते कितीही कर्तबगार असले तरी त्यांना उच्च पदांवर काम करण्याची संधी मिळणं दुरापास्त होतं.
अयोग्य पध्दतीनं कार्य करणाऱ्या कंपन्यांची विभागणी सर्वसाधारणानं या चार गटांत होऊ शकते. म्हणूनच नोकरी पत्करण्यापूर्वी किंवा सोडण्यापूर्वी आपली कंपनी नेमकी कोणत्या प्रकारात मोडते आणि तीत आपला भविष्यकाळ कसा असेल याचा विचार व्यवस्थापकानं करावयास हवा. त्यासाठी कंपनीचं अध्ययन करायला हवं. बाहेरचा माणूस आपल्या कंपनीकडं जशा पध्दतीनं पाहील आणि मत बनवेल, तसा दृष्टिकोन ठेवल्यास निर्णय घेणंं सोपं होतं. सभोवतालचंं वातावरण व आपलं काम यांचंं समालोचन कसं करायचं ते पुढील लेखात पाहू.