अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/स्वयंव्यवस्थापन ( भाग तिसरा)
'मी रोज सकाळी उठल्यानंतर आरशात पाहून दाढी करतो, तेव्हा मला माझं प्रतिबिंब दिसतं. वेश्यांच्या दलालाचं नव्हे’ असं तडफदार उत्तर देऊन राजदूतानंं सम्राटाची मागणी नाकारली. सूर्य न मावळणाऱ्या साम्राज्याच्या सम्राटाचा चेहरा खर्रकन् उतरला. पुढं व्हायचं तेच झालं. राजदूताला त्याच्या तत्वनिष्ठेची शिक्षा भोगावी लागली. राजीनामा द्यावा लागला. त्याचं संभाव्य राजकीय भवितव्य उद्ध्वस्त झालं. हे असंच होणार याची त्यालाही कल्पना होती. तरीही त्यानं तत्त्वांशी तडजोड केली नाही.
स्वत:चं व्यवस्थापन उत्तम व्हावं अशी इच्छा बाळगणाऱ्या कुणालाही या राजदूताचा आदर्श ठेवावा लागेल. कोणता आदर्श आपण स्वतःसमोर ठेवू इच्छितो, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. हा प्रश्न केवळ नीतिमत्तेशी संबंधित नाही कारण तिचे नियम सर्वांना सारखेच असतात. हा आत्मसन्मानाचा प्रश्न आहे. मनाच्या आरशात पाहताना आपलं कोणत्या प्रकारचे प्रतिबिंब आपल्याला दिसावं हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. ही 'मिरर टेस्ट' स्वयंव्यवस्थापनाच्या संदर्भात महत्त्वाची आहे. आपला 'पिंड' कोणता याची जाणीव या चाचणीद्वारे करून घेता येते.
एखाद्या संस्थेतील नीतिमूल्यं अन्य संस्थेतील नीतिमूल्यांपेक्षा वेगळी किंवा पूर्णपणे विरुध्दही असू शकतात. तसंच एका परिस्थितीत नैतिक वाटणारी बाब दुसऱ्या परिस्थितीत अनैतिक ठरू शकते. कारण नीतिमूल्यांची निश्चित अशी व्याख्या सांगता
येत नाही ही व्यक्तिसापेक्ष असतात. अशा स्थितीत कोणतंही काम स्वीकारताना अथवा कोणत्याही संस्थेत काम करताना तेथील नीतिमूल्यं आपल्या तत्त्वांशी जुळतात का हे पाहणं आणि त्यानंतर जबाबदारी स्वीकारणं श्रेयस्कर आहे. जी मूल्यं आपल्याला मानवत नाहीत, त्यांचा मारून मुटकून स्वीकार केल्यानंतर निराशा पदरी पडू शकते. त्यामुळं स्वयंव्यवस्थापन करताना ही खबरदारी घ्यावी. केवळ पैसा किंवा मानसन्मानाच्या मागं लागून तत्त्वांशी तडजोड करणं अंतिमतः लाभदायक ठरेल का? याचा विचार स्वत:च्या सद्सदविवेकबुध्दीशी प्रामाणिक राहून करावा.
'पेशा'ची जाणीव
पिंड आणि पेशा यांचा जवळचा संबंध आहे. नेमका कोणता पेशा स्वीकारावा याची लहानपणापासून जाणीव फार थोड्या लोकांना होते. कलाकार, गणितज्ज्ञ, इत्यादींना आपला 'कल' कशाकडंं आहे याची जाणीव फार लवकर होते. इंजिनिअर, डॉक्टर झालेल्यांनी माध्यमिक शिक्षण घेत असतानाच आपण काय व्हायचं ते ठरविलेलं असतं. पण कित्येकांना आपण कोणता पेशा स्वीकारावा याची जाणीव वेळ टळून गेल्यावर होते. आणि तोपर्यंत बहुतेकांचा मार्ग 'चुकलेला’ असतो. त्यामुळेच करत असलेल्या व्यवसायात समाधानी असणाऱ्यांची संख्या कमी असते. यात सर्वसामान्य बुद्धिमत्तेचे आणि कुशाग्र बुध्दीचे अशा दोन्ही गटांतील लोकांचा समावेश आहे. म्हणूनच, आपली शक्तिस्थानं कोणती, आपली कामगिरी कशी आहे आणि आपला आदर्श कोणता या तीन प्रश्नांची उत्तरं महत्त्वपूर्ण ठरतात. ती लवकरात लवकर शोधण्याचा प्रयत्न केल्यास ‘पेशा’ चुकण्याची शक्यता कमी असते.
स्वतःचा पिंड, आदर्श आणि पेशा ओळखण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे, आपण काय करू शकत नाही, याची जाणीव करून घेणं व त्याप्रमाणं निर्णय घेणं. उदाहरणार्थ मोठ्या संस्थांमध्ये काम करणंं जमत नाही, याची समज असल्यास अशा ठिकाणी काम करण्याचा मोह टाळला पाहिजे. तसंच आपण निर्णय घेण्याचंं काम चांगलं करू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर तशा स्वरूपाची कामं न स्वीकरणं योग्य ठरेल.
वरील प्रश्नांची उत्तरं आपल्याला एखादी संधी स्वीकारायची की नाही हे ठरविण्याच्या कामी मदत करू शकतात. तसंच काम स्वीकारल्यानंतर ते कशा प्रकारे पार पाडायचं याचं मार्गदर्शनही करू शकतात. ‘मी हे काम करू शकेन आणि अशाच पध्दतीनं आणि विवक्षित वेळेत करू शकेन’ हा आत्मविश्वास निर्माण होतो हे काम माझ्यावर सोपविल्यानंतर आपण या परिणामांची अपेक्षा करू शकाल असं आपण काम देणाऱ्याला सांगू शकतो.
करिअर कधीही अगोदर योजना आखून आणि साचेबध्द रीतीनं फुलवता येत नाही. आपण जसजशा संधी स्वीकारत जातो, तसा त्याला आकार येत जातो. ज्यांना आपली शक्तिस्थानं माहीत आहेत, त्यांची कार्यपध्दती सुनिश्चित आहे व ज्यांचे आदर्श पक्के आहेत अशा व्यक्तीच योग्य संधी मिळवू शकतात व यशस्वी होतात. या तीन मुद्यांच्या आधारावर सर्वसामान्य माणसाचं रूपांतरही असामान्य व्यक्तिमत्त्वात होऊ शकतं.
त्यामुळं स्वयंव्यवस्थापन करताना आपली शक्तिस्थानं, कार्यपध्दती आणि आदर्श याबाबतच्या आपल्या संकल्पना दृढ असावयास हव्यात. त्या अस्थिर किंवा सतत बदलत्या असू नयेत. या संकल्पनांना परिश्रमांची जोड देण्याची तयारी असल्यास अजोड असं यश आपल्या पदरी पडेल.
याखेरीज आपली योगदान क्षमता (कॉन्ट्रिब्युशन व्हॅल्यू) आणि समूहाचा एक भाग म्हणून कार्य करण्याची तयारी या मुद्यांनाही स्वयंव्यवस्थापनात फार मोठं स्थान आहे. त्या बद्दल पुढच्या लेखात पाहू या.