अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ जागतिक दर्जाच्या संस्थांची वैशिष्ट्ये

पली संस्था जागतिक दर्जाची व्हावी अशी प्रत्येक संस्था चालकाची महत्वाकांक्षा असते. त्यासाठी आपापल्या परीनं त्याचे प्रयत्नही सुरू असतात.पण जागतिक दर्जा म्हणजे नेमकं काय, हे नेमकं उमजल्याखेरीज त्यादृष्टीनं वेगवान प्रयत्न करता येणार नाहीत. म्हणून प्रस्तुत लेखात जागतिक दर्जाच्या संस्थेच काही लक्षणं सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.

 संस्थेच्या उत्तमत्वाचे तीन पैलू असतात.
 १. नफा
 २. विकास किंवा वाढ
 ३. मानव विकास
 यापैकी नफा आणि वाढ यांच्याबद्दल माहिती संस्थेच्या ताळेबंदावर नजर टाकली असता समजते. मात्र, मानव विकासासंबंधी संस्थेची कामगिरी कशी आहे, याची पडताळणी करणं गुंतागुंतीचं आहे.याकरिता पुढील संकल्पना समजून घ्याव्या लागतात.
 १. संस्थेची शिक्षण क्षमता.
 २. स्वतःतच बदल घडवून आणण्याची क्षमता.
वरील दोन्ही मुद्दे एकमेकांशी संलग्नच आहेत.
 सतत काही तरी नवं शिकत राहणं हा अनेकांचा स्वभाव असतो. असे लोक कोणत्याही परिस्थितीसत टिकाव धरण्यास सक्षम असतात. संस्थांबाबतही हे तत्व लागू पडतं. शिक्षण म्हणजे केवळ कुणाकडून तरी मिळविलेलं ज्ञान असं नसून स्वतःच्या चुकांतून मिळणारा अनुभवही बरंच काही शिकवून जातो. किंबहुना अनुभवांतून मिळालेलं ३िक्षणच महत्त्वाचं मानलं जातंं.याबाबत मला माहिती असलेला एक प्रसंग सांगतो.
 एका यशस्वी व्यवस्थापकाला विचारण्यात आलं,
 'आपल्या यशाचं रहस्य काय?'
 तो म्हणाला,'चांगले निर्णय.'
 ‘चांगले निर्णय आपण कसे घेता?’
 'माझ्या अनुभवाच्या आधारावर.'
 'आपल्याला अनुभव कसा मिळाला?’
 'वाईट निर्णयातून.'
 याचा अर्थ एवढाा की, अनुभवांतून मिळणाऱ्या शिक्षणातून माणूस बदलत जातो. हा बदल केवळ संख्यात्मक नाही,तर गुणात्मकही असावा लागतो. संस्थांच्या बाबत बोलायचं तर तो केवळ प्रक्रिया पध्दतीत किंवा कार्यपध्दतीत नव्हे तर उत्पादनांमध्ये, केवळ संस्थेच्या विस्तारात नव्हे, तर संरचनेत, केवळ व्यक्तीमध्ये नव्हे तर व्यावसायिक संबंधामध्ये आणि संस्थेच्या केवळ स्थानांमध्ये नव्हे तर संस्कृतीमध्ये व्हावा लागतो.
 हे बदल घडविण्यासाठी प्रयोगाक्षम वृत्ती असावी लागते. नवी उत्पादनं तयार करणं, नवे ग्राहक शोधणं, उत्पादन क्षमता वाढविणं, नवंं संशोधन इत्यादी सर्व क्षेत्रांमध्ये या प्रयोगक्षम वृत्तीचं प्रतिबिंब पडलं पाहिजे.विशेषतः संशोधनावर अधिक भर दिला गेला पाहिजे. अमेरिका,युरोप येथील संस्थांचा पसारा सर्व जगभर विस्तारला, तो मुख्यतः संशोधनावर भर दिल्यानेच. याउलट भारतीय कंपन्यांची वाढ संशोधनावर भर न देता केवळ उत्पादनवाढीवर भर दिल्यानं खुंटली.
 यश मिळविण्यासाठी प्रयोग करणं आवश्यक आहे. प्रयोग करताना अपयशाला तोंड देण्याची तयारीही असणं आवश्यक आहे. हजार प्रयोग केले जातात तेव्हा त्यातील एक यशस्वी ठरतो आणि अशा शंभर यशस्वी प्रयोगांपैकी एक व्यापारी दृष्टिनं यशस्वी होतो.त्यामुळे प्रयोगात अनेक अपयशं आली तरी तो न थांबवणं आवश्यक आहे. इथंच संस्थेच्या प्रयोगाक्षम वृत्तीची कसोटी लागते आणि अशी शिक्षणक्षम संस्थाच जागतिक दर्जाची समजली जातेे.
बदल घडवून आणण्याची क्षमता :
 काम करीत असलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांमध्ये दोन गुण असतात.
 १. योगदान क्षमता : म्हणजे संस्थेच्या कामगिरीतील कर्मचाऱ्याचा व्यक्तिगत वाटा.
 २. बदल घडवून आणण्याची क्षमता : म्हणजे नवी कामं शिकण्याची कर्मचाऱ्याची क्षमता. ही क्षमता असणारे कर्मचारी संस्थेच्या विविध विभागांमध्ये किंवा विविध संस्थांमध्ये काम करू शकतात. नवी कामंं शिकण्याची त्यांची तयारी असते.
 व्यक्तीची किंवा संस्थेची स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता पुढील तीन बाबींवर अवलंबून असते.
 १. शिक्षण सातत्य
 २. क्षमता विस्तार
 ३. प्रतिमा संवर्धन
शिक्षण सातत्य :
 सतत प्रयोग करीत राहणंं, नव्या संकल्पना राबवणं हा काही संस्थांचा स्थायीभाव असतो. अशा संस्थेचा प्रत्येक कर्मचारीही याच भावनेनं भारलेला असतो. प्रत्येक कर्मचाऱ्याला वाचन, चिंतन, पठण, श्रवण, चर्चा करण्यास अशा संस्था प्रोत्साहन देतात. हि चर्चा किंवा वाचन केवळ कर्मचार्याच्या सध्याच्या कामासंबंधीच असायला हवं असं नाही. उलट त्याचा थेट संबंध नसलेल्या कामांबाबतही माहिती घेण्यास अशी संस्था कर्मचाऱ्याला उद्युक्त करते. काम करण्याच्या कौशल्याबरोबरच कर्मचाऱ्याच्या अंत:प्रेरणेचा विकासही व्हावा असे प्रयत्न केले जातात. आपण काय करीत आहोत आणि का याची जाणीव त्याला सतत राहील अशी त्याची मानसिक जडणघडण बनविली जाते.त्याचबरोबर भविष्यकालीन परिस्थिती कशी असेल याचा विचार करणारी दूरदृष्टीही त्याच्यात निर्माण व्हावी असे प्रयत्न संस्थेमार्फत केले जातात.
क्षमता विस्तार :
 आपलं काम बरं की आपण बरं अशी वृत्ती एकेकाळी सर्वात चांगला गुण मानली जात होती. मात्र सध्याच्या काळात आपल्या कामाच्या मर्यादेपलीकडे जाऊन अभ्यास व विचार करणंं महत्वाचंं मानलंं जाऊ लागलं आहे.कर्मचाऱ्याने केवळ साचेबधद विचार न करता चतुरस्र बनण्याचा प्रयत्न करावा असा प्रयत्न संस्थाही करू लागल्या आहेत.त्यामुळे कंपनीतला एखादा उत्पादन सुपरवायझर मेन्टेनन्स,कामगार विषयक कायदे,खरेदी विभागातलं कामकाज इत्यादींची माहिती घेतानाही आढळतो.जागतिक दर्जाच्या संस्था अशा चौफेर कामगिरीला प्रोत्साहन देतात.
प्रतिमा संवर्धन :
 जागतिक दर्जाची कंपनी केवळ फायदा आणि विस्तार यातच गुंतून पडत नाही, तर आपली विशिष्ट प्रतिमा बनविण्याकडे आणि तिचं संरक्षण करण्याकडे लक्ष पुरविते. आपली खास वैशिष्ट्ये लोकांपर्यंत पोहोचावीत यासाठी चर्चासत्रं, सभा, अधिवेशनं इत्यादी कार्यक्रमांत भाग घेण्यास आपल्या कर्मचाऱ्यांना उद्युक्त करते. अशा कार्यक्रमांमध्ये कर्मचाऱ्यांना अन्य कंपन्यांमधील आपल्या जोडीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याची संधी मिळते. त्यामुळे आपण किती खोल पाण्यात आहोत याची जाणीव त्यांना होते. आपल्या मर्यादा तसेच शक्तिंस्थानं यांची जाणीव होते.याचा त्यांच्या कागीरीवर निश्चितच सुपरिणाम होतो.
सारांश:
 केवळ उत्पादन वाढ किंवा विस्तार यामुळे कोणतीही संस्था जागतिक दर्जाची बनू शकत नाही. तर ज्या संस्थेत प्रयोगक्षम वृत्ती, प्रतिमा संवर्धन, व्यावसायिक संस्कृती, मनुष्यबळ विकास, शिक्षणक्षमता, गुणवत्ता या गुणांना अधिक प्राधान्य दिलं जातं, अशा संस्था जागतिक दर्जाच्या समजल्या जातात.
 उदाहरणच द्यायचं झालं तर हिंदुस्थान लिव्हरचं देता येईल. या कंपनीचा उल्लेख नुकत्याच 'बिझनेस वर्ल्ड'मध्ये प्रसिध्द झालेल्या एका लेखात 'मुख्य अधिकाऱ्यांची शाळा' असा केला आहे. कारण गेल्या ३६ वर्षात या कंपनीमध्ये ‘तयार' झालेले १९२ व्यवस्थापक या किंवा अन्य कंपन्यांमध्ये संचालक अथवा व्यवस्थापकीय संचालक झाले आहेत.मनुष्यबळ विकास क्षेत्रात एक संस्था काय करू शकते याचा हा एक आदर्श आहे.