अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ व्यवस्थापकीय तणाव आणि त्यावरील उपाय
द्योग किंवा व्यापार हे जसं शास्त्र आहे तशी ती एक कलाही आहे.ती प्रत्येकाला साध्य असेल किंवा होईल असं नाही. हे कौशल्य परंपरेने बापाकडून मुलाकडे, मुलाकडून त्याच्या मुलाकडे जातं असंही खात्रीपूर्वक म्हणता येत नाही. तथापि, आपण निर्माण केलेलं औद्योगिक साम्राज्य (मग ते छोटं असो की मोठं) आपल्या पश्चात आपल्या मुलानं चालवावं, त्यात भर घालून ते यथाशक्ती मोठ करावं. त्याचं नियंत्रण आपल्या कुटुंबाबाहेर जाऊ नये अशी प्रत्येकाची इच्छा असतेे. या भावनेपोटीच कुटुंब नियंत्रित उद्योगाचा जन्म होतो.
एखादी कर्तबगार व्यक्ती अंतःप्रेरणा व स्वतःचं अंगभूत कौशल्य यांच्या जोरावर एखाद्या उद्योगाची सरुवात करते. स्वत:च्या अपत्याप्रमाणे त्याचं पालनपोषण आणि विकास करते. त्या व्यक्तीनंतर आपोआपच अशा उद्योगाची मालकी त्या व्यक्तीच्या पुढच्या पिढीकडं जाते.
खासगी उद्योगांमध्ये यशस्वीतेचे प्रमाण बरंच कमी आहे. जर १०० उद्योग सुरू करण्यात आले तर त्यातील ९० पहिल्या तीन वर्षांत बंद पडतात. उरलेल्या १० पैकी ९ रखडत कसेबसे चालविले जातात. तर फक्त एक यशस्वी होतो व योग्य पध्दतीनं विकास पावतो.
असा यशस्वी उद्योग स्थापन करणारी व्यक्ती ही तशीच तयारीची व सक्षम असते. ही सक्षमता निसर्गाची देणगी असून ती एखाद्या व्यक्तीलाच लाभलेली असते. तिच्या पुढच्या पिढीत ती त्याच प्रमाणात उतरेल अशी खात्री देता येत नाही. तरीही वारसाहक्कानेे अशा उद्योगांची मालकी तिच्या पुढच्या पिढ्यांना मिळत जाते.
कुटुंब नियंत्रित उद्योगांना इतिहासकाळी जातीय परिमाणही लाभले होते. इंग्रजांनी आधुनिक उद्योग भारतात आणण्यापूर्वी भारतात उद्योगांना जातिव्यवस्थेचा आधार मिळत असे. म्हणजेच एखादा विवक्षित उद्योग ठराविक जातीनं करायचा असा प्रघात होता. अन्य जातींना तो करण्यास बंदी होती. साहजिकच या जात्याधारित उद्योगांना सुरक्षित बाजारपेठ मिळत असे. त्यामुळे अशा जातीचे लोक पिढ्यानपिढ्या तोच उद्योग किंवा व्यवसाय करून पोट भरीत. आजही याच प्रमाणात ही ठेवण टिकून आहे.
इंग्रजांची सत्ता स्थापन झाल्यानंतर भारताला पाश्चात्य आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचा परीचय झाला. या तंत्रज्ञानावर आधारित उद्योग सरू केले. मानवी शक्तीचा वापर करून उत्पादन बनविण्यापेक्षा यंत्रांच्या साहाय्याने कमी श्रीमंत प्रचंड, प्रमाणात स्वस्त व चांंगल्या दर्जाचं उत्पादन हे इंग्रजी उद्योगांचं वैशिष्ट्य होतं. ती स्वीकारल्यानंतर मूळ भारतीय उद्योगपध्दती मागे पडत जाऊन नवी औद्योगिक घराणी जन्माला आली.
आधुनिक उद्योगांचा अंगीकार केला गेला, तरी ते चालविण्याची व त्यांचे नियंत्रण हस्तांतरित करण्याची पध्दती मात्र जुनीच राहिली. पुुढच्या पिढीची योग्यता असो किंवा नसो अगोदरच्या पिढीतील उद्योगपतींनी उभ्या केलेल्या औद्योगिक साम्राज्याची सूत्रं जन्मसिद्ध हक्कानुसार नव्या पिढीकडे जात राहिली व अजूनही जात आहेत. नव्या पिढीतील सर्वच व्यक्ती नशिबानं मिळालेला हा वारसा चालविण्यास समर्थ नव्हत्या किंवा नाहीत असा त्याचा अर्थ नव्हे. अनेकांना व्यवसायाचे हे बाळकडू लहानपणापासून घरातच मिळाले असल्याने त्यांनी वडिलोपार्जित व्यवसायाची प्रचंड भरभराट केल्याचीही उदाहरणे आहेत. बच्याच औद्योगिक घराण्यांशी संधान बांधण्याची कलाही अवगत करून घेेऊन व्यवसाय टिकविले व वाढविले. गेल्या दशकापर्यंत देशात असलेल्या बंदिस्त अर्थव्यवस्थेमुळे हे शक्य झालं.अशा अर्थव्यवस्थेची सर्व सूत्रे राजकारण्यांच्याच असल्याने त्यांना धरून राहून काही घराण्यांनी आपला विकास साधून घेतल्याचीही उदाहरणे आहेत.
गेल्या सुमारे २० वर्षापासन परिस्थिती झपाट्यानं बदलत आहे.जगभरात मुक्तीचं वारं वाहत आहे. अर्थव्यवस्थाही त्यापासून अलिप्त राहिलेली नाही. आर्थिक सुधारणाचा वेग जसा वाढत आहे, तसे उद्योगांचे जाती व राजकारणी यांच्यावरील अवलंबित्व कमी होत आहे. सांप्रत काळात उद्योगाचं अस्तित्व उद्योजकाची जात किंवा राजकीय लागेबांधे यावर अवलंबून न राहत, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची तयारी,भांडवल उभे करण्याची तयारी, उत्पादनांची गुणवत्ता व किफायतशीरपणा आणि ग्राहकांची पसंती यावर अवलंबून आहे.कारण माणूस हा पूर्वीप्रमाणे केवळ ‘सामाजिक प्राणी न राहता आर्थिक प्राणी’ बनला आहे.
या बदलत्या परिस्थितीची झळ भारतातल्या कुटुंब नियंत्रित उद्योगांना जाणवू लागली आहे. याखेरीस मोठ्या औद्यागील घराण्यामध्ये कालांतराने पडणारी फुट घराण्यांच्या सदस्यांमधले हेवेदावे व्यक्तिगत स्वार्थासाठी एकमेकांचे पाय ओढण्याचा प्रयत्न करणे इत्यादी समस्याही भेडसावत आहेत. पूर्वी अशा उद्योगांमध्ये महत्वाच्या पदांवर स्वतःच्या समाजातील किंवा नात्यातील व्यक्ती नेमल्या जात असत. त्या व्यक्तीही मालकाशी व व्यवसायाशी प्रामाणिक राहत. मात्र, आता हा विश्वास आणि स्वामीनिष्ठा कमी झाली आहे.आयकर, अबकारी कर चुकविण्याच्या आरोपाखाली खटले सुरू असलेले कित्येक उद्योगपती नातेवाईक किंवा आपल्या समाजाच्याच माणसांनी आपल्याला यात अडकवले म्हणून तक्रार करताना दिसतात.म्हणजेच एका बाजूला उद्योगाच्या बदलत्या स्वरूपाचे आव्हान तर दुसर्या बाजूला स्वतःच्याच माणसांकडून धोका होण्याची शक्यता अशा कात्रीत कुटुंब नियंत्रित उद्योग सापडले आहेत. त्यामुळे त्यांचे भवितव्य काळजी करण्यासारखे आहे.
कुटुंब नियंत्रित उद्योगांच्या चालकांनी सरंजामी वृत्ती सोडणे हा या समस्येवरील उपाय आहे.उद्योग माझ्यासाठी नसून मी उद्योगासाठी आहे, याची जाणीव ठेवल्यास हा गुंता काही प्रमाणात सुटू शकतो. व्यवस्थापकीय व इतर उच्च पदांसाठी अधिकाऱ्यांची निवड करताना गुणवत्ता हा एकमेव निकष लावण्याची सवयही त्यांनी लावून घेतली पाहिजे. मी म्हणेन ती पूर्वदिशा असा दुराग्रह न धरता नवे विचार, नव्या संकल्पना समजून घेणे, आपल्या अनिर्बध अधिकाराचं विकेंद्रीकरण करणे, अहंगंड टाळून तज्ज्ञ व अनुभवी जाणकारांचा सल्ला घेणे, त्यांचा योग्य तो मान राखणं (मग त्या 'आपल्यापैकी' नसल्या तरी) इत्यादी हे समस्यांमधून बाहेर पडू शकतील.