अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ व्यवस्थापकीय शिक्षणाचा प्रवास
व्यवस्थापकीय शिक्षणाचा प्रवास
सुरुवातीच्या काळात कोणत्याही व्यवसायाचंं तंत्रज्ञान पित्याकडून मुलाला अशा पध्दतीनं संक्रमित होत असे. मलगा नसेल तर जवळच्या नातेवाईकाला ते दिलं जात असे. आपला व्यवसाय आपल्या घराण्यातच राहावा अशी संकल्पना होती. त्यामुळंं एका घराण्याच्या पिढ्यान् पिढ्या एकच व्यवसाय करीत असत. घर त्या कुटुंबापुरतं एक व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रच असे.
दोनशे वर्षांपूर्वी प्रथम युरोपात उगम पावलेल्या आणि पुढील शंभर वर्षात जगभर पसरलेल्या औद्योगिक क्रांतीमुळंं माणसाला घरातून कारखान्यात नेलं.तंत्रज्ञानाचा विकास झाल्यानं अनेकविध नवे व्यवसाय जन्माला आले. औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात कारखानदारच आपल्या कर्मचारी वर्गाला प्रशिक्षित करीत असत. म्हणजेच प्रत्येक कारखाना हा प्रशिक्षण केंद्र बनला. आजही अनेक कारखाने तसंच संस्थांमधून 'अॅप्रेंटिस’ पध्दती सुरू आहे.
या क्रांतीमुळंं कौटुंबिक रचनेतही आमूलाग्र बदल झाले. पूर्वी भटजीच्या मुलानं
भटजी, वैद्याच्या मुलानं वैद्य, वाण्याच्या मुलानं वाणी, सुताराच्या मुलानं सुतारच व्हावंच अशी पध्दती होती. ती काळाच्या पडद्याआड जाऊन कोणत्याही कुटुंबातल्या मुलानंं आणि मुलीनंसुध्दा आपली आवड, बुध्दी आणि शारीरिक क्षमता यानुसार कोणत्याही व्यवसायाचंं शिक्षण घ्यावं अशी रीत सुरू झाली.
याचे तीन परिणाम झाले. एक, आपला कौटुंबिक व्यवसाय सोडून अनेकांनी नवे व्यवसाय स्वीकारले. दोन, कुटुंब किंवा आपला मालक याखेरीज इतर अनेक ठिकाणाहून तंत्रज्ञान शिकणंं क्रमप्राप्त झालं.तीन,आयुष्यात कोणता व्यवसाय अथवा नोकरी करावी लागेल,याची निश्चित कल्पना अगोदर येत नसल्यानंं अनेक व्यवसायाचंं शिक्षण घेण्याकडंं लोकांचा कल वाढला. म्हणजेच स्वतःला एकाच विषयाशी बांधून घेण्याऐवजी बहुश्रूूत असावंं अशी धारणा बनली.
परिणामी मानवजातीचा चहुमुखी विकास झाला. मानवाच्या वाढत्या कार्यकलापांना नियमबध्द करण्याची आवश्यकता भासू लागली. यातून कायदा व राजसत्ता यांचा जन्म झाला.
राजसत्ता अस्तित्वात आल्यानंतर ती चालवण्याची राजाच्या हाताखाली प्रशासकांची आवश्यकता निर्माण झाली. यातून प्रशासकीय कारभार या नव्या व्यवसायाची निर्मिती झाली. याच व्यवसायाचं पुढंं 'व्यवस्थापन' व्यवसायात रूपांतर झालं.प्रशासन व व्यवस्थापन म्हणजे काही विवक्षित नियमांच्या आधारे इतरांकडून काम करून घेणंं आणि संस्थेची उद्दिष्टे साध्य करणं.
इटलीमध्ये प्रथम प्रशासकीय जागाही वंशपरंपरागत पध्दतीनं दिल्या जात.म्हणजेच कारकुनाच्या मुलाला त्याची जागा दिली जाई. तसेच सरदाराचा मुलगा सरदार होत असे. मात्र,बापाचं प्रशासकीय कौशल्य मुलामध्ये असेलच असं नाही याचा अनुभव आल्यानंतर ही पध्दत रद्द करून पात्रता पाहून कर्मचारी नियुक्ती करण्यात येऊ लागले.
यामुळं सर्वसामान्यांना प्रशासकीय व व्यवस्थापकीय शिक्षण देण्यासाठी वेगळी शिक्षणपध्दती असली पाहिजे याची जाणीव झाली. जगाच्या विविध भागांत अशा तीन पध्दती निर्माण झाल्या.
१. ओटोमान साम्राज्य पध्दत.
२. चिनी साम्राज्य पध्दत.
३. सार्वजनिक प्रशाला.
ओटोमान पध्दती बरीच जुनी आहे. दुसच्या सहस्रकाच्या सुरुवातीला तुर्कांनी युरोपवर आक्रमण करून त्याचा भाग जिंकला. तुर्की राज्यकर्त्यांनी नव्या जिंकलेल्या प्रदेशांतील ख्रिश्चन युवकांना पकडून त्यांना मुस्लिम बनवलं आणि आपली राजधानी इस्तंबूलला नेऊन गुलाम बनवलं. गुलाम म्हणजे हलकी सलकी कामं करणारा वेठबिगार मजूर अशी आपली समजूत आहे, पण ओटोमान पध्दतीत तशी संकल्पना नव्हती. गुलाम हा राजाचा सल्लागारही होत असे. त्याची हुशारी पाहून त्या प्रकारे त्याला प्रशिक्षित केलं जाई आणि त्या-त्या प्रशासकीय किंवा व्यवस्थापकीय कामांवर नियुक्त केलंं जाई.त्यांच्यावर दोन बंधनंं घालण्यात आली. एक, त्यांना अधिकृत विवाह करता येत नसे. त्यामुळं अधिकृत संतती नसे. दोन, गुलामाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची संपत्ती सुलतानाच्या खजिन्यात जमा होई.
ही रीत क्रूर होती. पण त्यातून कमीत कमी भ्रष्टाचार असणारी व वंशपरंपरेचा दबाव नसणारी प्रशासकीय पध्दती निर्माण करण्यात ओटोमान साम्राज्यानं यश मिळवलं. आजच्या काळात गुलाम ही संस्थाच नष्ट झाल्यानं ही पध्दती कालबाह्य झाली आहे.
चिनी पध्दती मात्र मानवतावादी होती. प्रशासकीय कामकाजाच्या प्रशिक्षणासाठी स्पर्धात्मक परीक्षांच्या माध्यमातून युवकांची निवड केली जात असे. अशी पध्दत सुरू करणारं चीन हे पहिलंच राज्य आहे. या परीक्षा चिनी साम्राज्याच्या सर्व प्रांतांच्या
राजधान्यांमध्ये घेतल्या जात. पुढे ब्रिटिशांनी याच पध्दतीचं अनुकरण करून आयसीएस (इंडियन सिव्हिल सर्व्हिस) ची निर्मिती केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यालाच आयएएस (इंडियन अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस) म्हणून ओळखलं जाऊ लागलं. ही पध्दत जगभरात उपयोगात आणली जाते.
सार्वजनिक प्रशाला (पब्लिक स्कूल) पध्दती भारतात ब्रिटिश व्यावसायिक आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांनी सुरू केली. कारखान्यांमधील प्रशासकीय व व्यवस्थापकीय जागांसाठी पात्र कर्मचारी निवडणे व त्यांना प्रशिक्षण देणं याकरिता ही केंद्रे सुरू करण्यात आली. यातील पदवीधरांनाही आयसीएस (इंडियन कोव्हेनेटेड सर्व्हिस) अशी संज्ञा होती. त्यांच्या शैक्षणिक दर्जाची तुलना सरकारी आयएएस पदवीशी केली जात असे.
उद्योग प्रशालांचा उदय :
कुटुंब आणि नोकरीचे ठिकाण याखेरीज व्यवस्थापन प्रशिक्षण ही संकल्पना अमेरिकेत उद्योग प्रशालांच्या माध्यमातून उदयाला आली. या शाळांचा अभ्यासक्रम उद्योगक्षेत्रातील संचालक - अधिकाऱ्यांशी विचारविमर्श करून बनवला जात असे. हे अधिकारी अर्धवेळ शिक्षक म्हणून अशा शाळांमध्ये अध्यापनाचं कामही करीत असत. यामुळं विद्यार्थ्यांचा अधिकाऱ्यांशी शिक्षण सुरु असतानाच संपर्क येत असे. याचा फायदा त्वरित नोकरी मिळविण्यासाठी होई. तसंच औद्योगिक क्षेत्रात होणाऱ्या बदलांप्रमाणं अभ्यासक्रमात बदल करणंही या शाळांना शक्य होई.
सध्याचं युग झपाट्यानं बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचंं आहे. त्यामुळं व्यावसायिक किंवा व्यवस्थापकीय शिक्षण संस्थांनी त्याप्रमाणं आपल्या अभ्यासक्रमांत वेळोवेळी बदल करणं आवश्यक आहे. म्हणूनच त्यांनी सतत औद्योगिक संस्थेच्या संपर्कात राहणं निकडीचं आहे. त्याचप्रमाणं उद्योगांनाही शिक्षण क्षेत्रातील नवे प्रवाह जाणून घेण्यासाठी या संपर्काचा उपयोग होईल. त्यामुळं हा संपर्क व संवाद अधिकाधिक वाढविण्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे.