अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ स्वयंव्यवस्थापन (भाग पहिला)

कविसावं शतक जीवघेण्या स्पर्धेचं आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःला व्यवस्थित 'सांभाळणं' म्हणजेच स्वतःचं 'व्यवस्थापन करणं', स्वतःचा विकास करणं आणि या जगात स्वतःसाठी एक स्थान निर्माण करणं आवश्यक आहे.आपली आर्थिक स्थिती कशीही असली, तरी हे स्वयंव्यवस्थापन आपल्याला शिकावंच लागणार आहे.स्वयंव्यवस्थापन म्हणजे काय आणि ते कसं करावं याचा विचार या व यापुढील काही लेखांत करणार आहोत.

स्वतःची शक्तिस्थानं जाणणं :
 २० व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत स्वतःची शक्तिस्थानं जाणण्याची आवश्यकताच माणसाला वाटत नव्हती. जन्मापासून प्रत्येकाचं समाजातलं स्थान,त्याने करावयची कामं, त्यांच्याबद्दल त्याला मिळणारा मोबदला या गोष्टी परंपरेनेच ठरविल्या जात. शेतकराच्या मुलानं शेतकरी तर सुताराच्या मुलानं सुतार व्हायचं हे विधिलिखिताप्रमाणं निश्चित असे. त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्या मुलीचा विवाहही शेतकऱ्याच्याच मुलाशी तर वैद्याच्या मुलीचा विवाह वैद्याच्याच मुलाशी होत असे. माणसाचं काम करण्याचं पिढीचं करिअर असे.
 विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून या स्थितीत कमालीचा बदल होत आहे. ठराविक व्यक्तींनी ठराविकच व्यवसाय करायचं बंधन उखडलं गेलं आहे. ज्याला ज्यात स्वारस्य आहे आणि ज्याला ते करण्याची संधी आहे,करण्याचं स्वातंत्र्य २० व्या शतकानं मिळवून दिलं आहे. थोडक्यात ‘जो जे वांछील,तो ते लाभो’अशी स्थिती आहे.
 यामुळं व्यक्तिगत प्रगती व विकासाचे मार्ग मोकळे झाले असले तरी, सामाजिक व आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आहे.आपल्याला 'नेमकं' काय करायचं आणि आपल्याला नेमकं काय जमेल याचा ताळमेळ घालणे आणि त्याप्रमाणं करिअरची दिशा ठरवणं,किंवा त्यानुसार करिअर बदलणं हि काळाची गरज बनली आहे.  परिणामी स्वतःची शक्तिस्थानं जाणणं हा स्वयंव्यवस्थापनाचा प्रथम आणि महत्वाचा भाग आहे.दुसऱ्याच्या बऱ्यावाईट गुणांचं परीक्षण करताना त्याच्याबद्दल सांगोपांग माहिती आपण मिळवतो.तिच्या आधारावर त्या व्यक्तीची पारख करतो. तोच प्रयोग आपण स्वतःवर करावयास हवा. या पध्दतीनं दोन तीन वर्षांत आपण स्वतःच्या शक्तिस्थानांबाबत निश्चिंत बनू शकतो. यालाच आत्मपरीक्षण म्हणतात. हे पुढील प्रकारे केले जाऊ शकतं.
१. स्वतःच्या शक्तिस्थानांवर लक्ष केंद्रित करणे:
 प्रत्येकाला स्वतःची अशी एक अंतस्थ ऊर्मी असते. अमुक एक काम करण्याची आपल्याला संधी मिळाली, तर ते चांगल्या प्रकारे करू शकू असा विश्वास मनात वाटत असतो. असं एखादं काम हातात घेऊन स्वतःला पारखण्याची सुरुवात करावी.हे काम आपण कसं केलं, त्याचं फळ काय मिळालं. आपल्याला ते करताना ‘काम केल्याच समाधान' मिळालं का, लोकांच्या दृष्टीनं या कामाची उपयुक्तता किती याचा बारकाईने विचार करावा. अशा पध्दतीनं कामाचे विश्लेषण केल्यास आपली शक्ती आणि मर्यादाही समजून येते.
२.शक्तिस्थानं बळकट करण्याचा प्रयत्न करणे :
 कामाचं विश्लेषण केल्यानंतर आपण कुठं कमी पडलो हे समजून येतं.उणेपणा नंतर हेच किंवा याच पध्दतीनं काम करताना राहू नये याचा प्रयत्न करणे म्हणजेच आपलं शक्तिस्थान बळकट करणं. उदाहरणार्थ, आपल्याला एखादा विषय शिकविण्याची मनापासून आवड आहे. आपण जोडधंदा म्हणून काही विद्यार्थी जमवून त्यांना शिकविण्याचा व्यवसाय सुरू केला. अशा वेळी तो विषय केवळ स्वतःला समजलेला असून भागत नाही.तर तो विद्यार्थ्यांना समजेल अशा पध्दतीनं शिकवणं याला शिक्षकी कौशल्य म्हणतात आणि हेच तुमचं शक्तिस्थान ठरतं. शिकवणी सुरू झाल्यानंतर काही दिवसांत विद्यार्थ्यांच्या ज्ञानात कितपत भर पडली यावरून तुमचं शक्तिस्थान किती मजबूत आहे,याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता. विद्यार्थ्यांच्या व तुमच्या अपेक्षेप्रमाणं त्यांची प्रगती झाली असेल,तर तुमची शिकविण्याची हातोटी योग्य आहे असा निष्कर्ष काढता येतो.
 तथापि, ठराविक मुदतीत ही अपेक्षित पातळी गाठता न आल्यास आपण कुठं कमी पडतो याचा विचार करणं आवश्यक आहे. विषयाच्या ज्ञानात आपण कमी पडत असलो, तर ते वाढविणं आवश्यक आहे.शिकविण्याच्या पध्दतीत त्रुटी असेल तर ती दूर करणंं आवश्यक आहे. अशा तऱ्हेनं सुरुवातीच्या काळात आपल्या कामाचं विश्लेषण करून आपण आपलं शक्तिस्थान अधिक बलवान करू शकतो. विद्यार्थ्यांची परीक्षा शिकवणी सुरू झाल्यापासून साधारण एक वर्षाने असते. त्यामुळं पहिल्या तीन महिन्यांपर्यंत स्वतःवर प्रयोग करण्यासाठी आपल्याला संधी असते. या कालावधीत आपण शिकवण्यात तरबेज झालो की, पुढचे नऊ-दहा महिने विद्यार्थ्यांचा हवा तितका फायदा होऊ शकतो.
 स्वतःचं शक्तिस्थान जाणणं आणि ते बलवान करणं यासाठी योजनाबध्द प्रयनांची गरज असते. आपल शक्तिस्थान एकच असेल किंवा असावं असंही नाही. एकाच व्यक्तीत दोन-तीन कौशल्ये असू शकतात.त्या सर्वांचा विकास अशाच पध्दतीनं करता येतो. कालांतरानं त्यापैकी एकाची निवड करून त्यात करिअर करता येतंं. स्वयंव्यवस्थापनाचा हा एक पैलू झाला. पुढच्या लेखात आणखी काही मुद्यांचा परामर्श घेऊ.