अन्वयार्थ – २/ग्रामोद्धारक - शबनम ते संगणक


ग्रामोद्धारक- शबनम ते संगणक


 तेवीस वर्षापूर्वी मी परदेशातून परत आलो. भारतात परतल्यावर काय करायचे याचा कच्चा आराखडातरी ठरलेला होता. समजून उमजून कोरडवाहू जमिनीच्या शोधात निघालो. जगभरच्या गरीब देशांच्या गरीबीचा उगम शेतीत असल्याचे वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यात जाणवले होते. राजधानीचे शहर सारे झकपक; श्रीमंत देशांच्या राजधान्यांच्या तुलनेत फारसे कुठे कमी नाही. पण तेवढे शहर सोडून पंचवीसतीस मैल बाहेर गेले की डोळ्यासमोर येणाऱ्या खेड्यांची भणंगता शतकानुशतके लवमात्रही बदललेली नसते हे लक्षात आले होते.
 परदेशांत असताना पाण्याची आणि बिगरपाण्याची शेती यांत काही मोठा फरक जाणवला नव्हता. भारतात परतल्यावर मात्र बागायती आणि कोरडवाहू म्हणजे जमीनअस्मानाचा फरक असल्याचे प्रवाद जागोजागी, क्षणाक्षणाला कानावर आदळू लागले. बागायतदार म्हणजे ऊसशेतकरी म्हणजे माजलेला, धनदांडगा अशी शहरवस्तीत सगळ्यांची खातरजमा झालेली. गरिबीचे मूळ कारण शोधून काढायला निघालेला मी धनदांडग्या शेतीत जाऊन काय करणार, कपाळ सार्वत्रिक प्रवादाचा माझ्यावर परिणाम झाला आणि शेतीच्या प्रयोगासाठी जमीन घ्यायची ती कोरडवाहूच, असा मी आग्रह धरला.
 त्या काळी रावसाहेब शेंबेकर म्हणजे मोठी मातब्बर बागायतदार आसामी समजली जात असे. कोठूनतरी कर्णोपकर्णी त्यांच्या कानावर बातमी गेली की, स्वित्झर्लंडमधून परत आलेला कोणी वेडा पीर शेतीच्या प्रयोगासाठी कोरडवाहू जमिनीच्या शोधात आहे. भला माणूस आपणहून मला पुण्यात भेटायला आला. बागायती शेतीतूनसुद्धा गरीबीच निघते असे तहेतऱ्हेने ते मला पटवून देऊ लागले. पहिला प्रयोग म्हणून तरी मी बागायतीच शेती करून पहावी, त्यासाठी
जमीन विकत घेण्यात पैसे हकनाक घालवू नयेत असा त्यांनी प्रेमळ सल्ला दिला. एवढेच नव्हे तर, त्यांनी आपल्याकडील जमिनीचा एक तुकडा बिन मोबदल्याचा देऊ केला.
 मी मनात म्हटले, 'बागायतदार मोठा लबाड दिसतो आहे. मी कोरडवाहू शेतीचा अभ्यास केला तर निघणारे निष्कर्ष धनाढ्य बागायतदारांना न सोसणारे निघतील म्हणून सारी कारवाई चालली आहे.' शक्य तितक्या सौजन्याने शेंबेकर रावसाहेबांना काढून लावले. आंबेठाणच्या कोरडवाहू कातळात पाणी शोधण्याच्या आणि शेती फुलवण्याच्या कामात लागून गेलो. शेंबेकरांच्या मनात किती सच्चाई आणि कळकळ होती ते कळायला दहा वर्षे लागली. त्यांचा तेवढा एक अपवाद सोडला तर शेतीच्या प्रयोगात सल्ला देण्याचा किंवा मी काय करतो आहे ते समजून घेण्याचा उपद्व्याप करणारे कोणीच आले नाहीत.
 सल्लागारांचा लोंढा कोसळला तो तीनचार वर्षांनी; चाकणचे कांदा आंदोलन झाले आणि शेतीमालाच्या अपुऱ्या भावाचा, आता भक्कम झालेला सिद्धांत मी जाहीररित्या मांडू लागलो तेव्हा.
 त्या काळी गावोगाव ग्रामोद्धारकांची पेवे फुटली होती. कुणी डॉक्टर, फादर डेमियनच्या थाटात, शहरात चालणारी प्रक्टिस सोडून गावांत वैद्यकीय सेवा देत होते. वैद्यकीबरोबर साहजिकच थोडी नाट्यकलोपासना आणि पुष्कळसे राजकारण. डॉ. राजनीकांत आरोळ्यांना मेगॅसेसे पारितोषक मिळाले तेव्हापासून तर त्यांच्या मागोमाग आपलाच नंबर अशा थाटात ही मंडळी वावरायची. कोणी गावोगावी गोबर गॅसच्या टाक्या बांधून त्या एककलमी कार्यक्रमातूनच गावातील ऊर्जेचा आणि गरिबीचा, दोन्ही प्रश्न हमखास सुटणार असल्याचे आकांताने सांगत असत. कोणी, सुबाभूळ हाच कल्पतरु असल्याचा जणू 'डायरेक्ट' वरून साक्षात्कार झाल्यासारखा, विश्वासाने सुबाभळीच्या बिया लोकांना विकत होते. कोणी सुधारित चूल काढून त्यामुळेच साऱ्या शेतकऱ्यांचे कल्याण होणार आहे असे मांडत आपले आश्रम थाटून बसले होते.
 कोणी गावकऱ्यांना संडास देण्याचे व्रत घेतले होते कोणी शोषखड्डयांचा प्रचार करीत होते. गावाच्या परिसरात पडणारे पाणी साठवून, वापरून शेती सुधारण्याचे काम म्हैसाळचे देवल करीत होते. अशा मंडळींची जत्रा झाली ती अण्णा हजाऱ्यांना मान्यता मिळाल्यानंतर. या सर्वांविषयी मी थोड्या उपहासाच्या सुरात लिहीत आहे. खरे म्हटले तर ते योग्य नाही. आपापल्या मगदुराप्रमाणे त्यांनी गावच्या हरपलेल्या लक्ष्मीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; काही रुटूखुटू
काम करून काही लाभदायक परिणाम दाखवूनही दिले होते. त्यांच्या कार्यक्रमामुळे अगदीच कोणाचे काहीच कल्याण झाले नाही असे म्हणता येणार नाही.
 या साऱ्या मंडळींचा इंग्रजीतील रेप्लिकेशन (Replication) हा शब्द मोठा आवडता असे. 'आपण दोनचार घरट्यांपुरते काम केले; असेच अजून पाचपन्नास कार्यकर्ते भेटले तर साऱ्या गावाचे भले होऊन जाईल; आणि आपल्यासारखे कळकळीचे व व्यवस्थापनकुशल लाख, दोन लाख कार्यकर्ते मिळाले की साऱ्या हिंदुस्थानच्या गरिबीचा प्रश्नच संपून जाईल.' अशी त्यांची धारणा होती. विश्वाचे कोडे गवसल्याचा कांगावा करणारे बाबा चेहऱ्यावर ज्या प्रकारचा धीरगंभीर भाव बाळगतात त्याच कोटीतील यांचा चेहरा. कोणाला न सुटलेले गरीबीचे कोडे आपण सोडवल्याची धुंदी त्यांच्या शब्दाशब्दात जाणवे.
 शेतकरी संघटनेची लाट साऱ्या महाराष्ट्रात पसरली आणि पोरेटोरेदेखील, ग्रामोद्धाराचे कंकण हाती बांधलेल्या महात्म्यांना गरिबीच्या अंकगणितातील प्रश्न टाकू लागले. एक एक करीत ही सारी मंडळी मागे हटली, कोणाला त्यांची फारशी आठवणही अलीकडे होत नाही.
 ग्रामोद्धारकांची ही उज्ज्वल परंपरा संपली, की काय असा प्रश्न पडू लागला आणि गेल्या आठवड्यात एकदम लक्षात आले, की ही जमात संपलेली नाही, जमिनीत खोल मुळे रुजवून बसलेली आहे. काळाच्या ओघाबरोबर त्यांचा जुना 'सर्वोदयी थाट' संपला आहे आणि नेहरूशर्ट, पायजमा व शबनम कालबाह्य झाले आहेत. कार्यक्रम सर्वोदयी तोंडवळ्याचे राहिलेले नाहीत. आधुनिकातील आधुनिक तंत्रज्ञाने या जमातीने आता हाताळायला सुरुवात केली आहे आणि त्यातूनच पुन्हा साऱ्या गावच्या गरिबीच्या दैत्याचा नायनाट करण्यासाठी पृथ्वीतलावर आपण संप्रती नवा अवतार धारण केला असल्याच्या थाटात ग्रामोद्धारकांची ही नवी पिढी पोसते आहे.
 शहरांत गणकयंत्रे आता घरोघरी झाली आहेत. अगदी शाळकरी मुलेसुद्धा त्यांना रस वाटणारी काही 'जानकारी' इंटरनेटवर मिळते काय हे शोधत तासच्या तास घालवतात.
 याउलट, खेडेगावात टेलिव्हिजन पोहोचला तरी कॉम्प्युटर फारसा पोहोचलेला नाही. तालुक्याच्या किंवा बाजारपेठेच्या गावात तो येऊन थांबला आहे. जेथे वीज नाही आणि टेलिफोनची तार आपल्या लहरीप्रमाणे काम करते तेथे काँम्प्युटरने जावे कसे?
 एका सज्जन गृहस्थांची गाठ पडली. परदेशात अनेक वर्षे काम करून,
धंद्याव्यवसायात बऱ्यापैकी पैसा कमवून गृहस्थ हिंदुस्थानात आले होते. 'गावागावांत कॉम्प्युटर न्यावा, शेतकऱ्यांचे हात इंटरनेटपर्यंत पोहोचवावेत; त्यातून त्यांना शेतीमालाची बाजारपेठ, वधु-वर संशोधन आणि तलाठ्याच्या कचेरीत होणाऱ्या कारभाराचा काही अंदाज आला तर त्यामुळे तरुणांचा आत्मविश्वास वाढेल, तरुणींचा त्याहूनही वाढेल आणि साऱ्या गावावरची अवकळा दूर होईल.' असे हे सद्गृहस्थ मोठ्या आत्मविश्वासाने अमेरिकी उच्चारातील फर्ड्या इंग्रजीत सांगत होते. त्यांनी आग्रह केला, त्यांच्या प्रयोगाखाली आलेली दोनतीन गावे पहायला यावे अशा आग्रहाला मी बळी पडलो. एके दिवशी सकाळी आगगाडीने त्यांच्या गावाकडे निघालो. माझ्या जागेवर बसताच साहेबांनी गुळगुळीत कागदांच्या, आकर्षक रंगीबेरंगी छपाईच्या एका साप्ताहिकाचे काही अंक माझ्यापुढे ठेवले. मुखपृष्ठावरच दूरदर्शनवरील मालिकेत चालून गेल्या असत्या अशा दोनतीन मुलींचा छान फोटो होता. गावातील कोणी शेवंता, शोभा, कल्पना असावी तसेच चेहरे, फारसा काही फरक नाही. फक्त एकीने डोक्यावर कौंटी घातली होती; दुसरीने जीन्स पँट आणि शर्ट. ग्रामउद्धारक उत्साहाने सांगत होते. 'ही कॅथी. ही लिली वगैरे वगैरे. फार चांगले काम करतात तिघी; पण या प्रसिद्धीने त्यांच्या डोक्यात वारं न शिरो म्हणजे झाले!' हे म्हणताना, 'आपल्याला स्वतःला अफाट प्रसिद्धी मिळाली असली तरी आपणमात्र डोक्यात वारे शिरू दिलेले नाही' याचा मात्र बऱ्यापैकी दर्प जाणवला.
 गावात येताच, सगळीकडे हमखास दिसणारी PowerPoint माहितीपत्रके हाती ठेवण्यात आली. एका सभागृहात नेण्यात आले. कार्यालयाची बांधणी महागडी असूनही साधी दिसावी असा आटोकाट प्रयत्न केल्याचे जाणवत होते. पुन्हा एकदा Power Pointच्या सहाय्याने Retro-Projecter वापरून ग्रामविकासाबद्दलच्या संस्थेच्या आद्य कुलगुरूंच्या विचारांविषयी माहिती सांगण्यात आली. गावात गणकयंत्र येताच सारे कसे आमूलाग्र पालटून जाईल याचे रसभरित पण गद्य वर्णन. हा सगळा सोपस्कार आटोपल्यावर पहिले इंटरनेट केंद्र पहायला गेलो. दोनचार मुलेमुली तेथे बसली होती; कॉम्प्युटरवर काही खेळ खेळत होती. आम्ही आल्यावर चपापून उठून बसली. संस्थेने तयार केलेले पोर्टल आम्हाला दाखविण्याची आज्ञा झाली. 'पण, साहेब, डिश चालू नाही.' ग्रामोद्धारकांचा चेहरा पहाण्यासारखा झाला. 'हे सरकारी धोरणामुळे सारे होते आहे.' उद्धारकांनी सांगायला सुरुवात केली. 'डिशचा कारभार पहाणाऱ्या कंपनीकडे सरकारने १०० कोटी रुपये अनामत म्हणून मागितले होते. कोठून द्यावे त्यांनी?' म्हणजे,
डिश चालू नाही हा काही आजचा प्रकार नाही; निदान दोनचार महिनेतरी इंटरनेट बंद असणार.
 दुसऱ्या केंद्रावर गेलो. तेथे डिश नव्हती, टेलिफोनच्या तारेवर इंटरनेट चालवायचे होते; पण टेलिफोनही बंदच, टेलिफोनच्या तारांची ही सदाच अशी अवस्था.', उद्धारक म्हणाले. पहाता पहाता एका केंद्रावर भगीरथ प्रयत्नांनी उघडल्या गेलेल्या इंटरनेटवर आलेली माहिती पाहिली. बाजारपेठेचे भाव तीन दिवसांचे जुने होते. 'ही गोष्ट आमच्या लक्षात आली आहे,' महात्मा म्हणाले, 'सध्या ही माहिती टेलिफोनवरून घेतो आणि इथेच भरून टाकतो, आता पुढे बोलण्यात काहीच अर्थ राहिला नव्हता.
 परतीच्या वाटेवर महात्म्याने आपण केवढे त्याग करून, पैसा खर्चुन, झीज सोसून हे काम केले याचे वर्णन केले. 'थोड्या अडचणी आहेत; कोणत्याही कामात सुरुवातीला अडचणी असणारच. तेवढ्या किरकोळ दोन-तीन बाबी नीट केल्या की आमच्या प्रयोगाने मोठा चमत्कारच घडणार आहे! पहालच तुम्ही!' महात्मा पुढे म्हणाले, 'तुमच्या मंत्रालयाच्या NGOच्या यादीत तेवढे आमच्या संस्थेचे नाव घालून टाका म्हणजे काम करण्यास आम्हाला मोठा उत्साह वाटेल.'
 कोण्या एके काळी गांधीजींच्या शब्दाखातर गावांत जाऊन, अत्यंत साधी रहाणी ठेवून जमेल तितकी गावाची सेवा गाजावाजा न करता आयुष्यभर केलेली एक पिढी होऊन गेली तिचे हे वारसदार! काही लोकांना उद्धारकत्वाची चटक लागते; त्यांच्या हातून उद्धार करून घेण्याची कोणाला गरज वाटते किंवा नाही, उद्धाराच्या कार्यातून कोणाचे काही भले होण्याची शक्यता आहे किंवा नाही याला काही महत्त्व नाही. आम्हाला 'उद्धारक' व्हायचे आहे तेव्हा जगाने आमचे कोडकौतुक पुरवलेच पाहिजे असा या आजच्या गावउद्धारकांचा आग्रह आहे.
 गावे बिचारी खचत आहेत. कर्जबाजारी झालेले शेतकरी विष पिऊन जीव देत आहेत. अशा गावांत कॉम्प्युटरची स्थापना करून 'गावची लक्ष्मी' परत आणण्याचा हा कार्यक्रम म्हणजे पार कळा गेलेल्या म्हातारीला, पु. ल. देशपांड्यांच्या शब्दांत, 'सिगरेट पाकिटातील चांदी लावून शोभा आणण्याचा' प्रकार आहे.
 शोषखड्डे आणि बिनधुराच्या चुली यांच्याऐवजी उद्धारकांच्या हाती गणकयंत्र आले एवढीतरी गरीबी हटलीच की नाही?

दि. २०/६/२००१
■ ■