अन्वयार्थ – २/नेपाळमधील शाही शिरकाणाचा इशारा


नेपाळमधील शाही शिरकाणाचा इशारा


 ररोजच्या वर्तमानपत्रांत देशविदेशच्या बातम्या असतात. हिंदुस्थानातील बातम्या म्हणजे पक्षापक्षातील भांडणे, आयाराम गयाराम यांच्या कारवाया, भ्रष्टाचाराची नवनवीन प्रकरणे, पुढाऱ्यांची भाषणे, न्यायालयांचे निकाल आणि लोकांची पिण्याच्या पाण्यासारख्या साध्या गोष्टींबद्दलही होणारी दैना; त्याखेरीज काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या हत्या. टोळीवाल्यांच्या मारामाऱ्या आणि पोलिसांबरोबरच्या त्यांच्या चकमकी, टेंपो-जीपची टक्कर, इतके ठार, इतके जखमी यांत सारे काही येऊन जाते. शहरी सुशिक्षितांकरिता पाहिजे तर क्रिकेट- टेनिसच्या परदेशी स्पर्धा आणि मुंबई शेअर बाजारातील चढउतार यांची थोडी पुरवणी.
 परदेशांतील, म्हणजे प्रामुख्याने इंग्लंड, युरोप आणि अमेरिका इत्यादी देशांतील वर्तमानपत्रांतील बातम्या म्हणजे आर्थिक तेजीमंदी, निवडणुका, लोकसभांतील भाषणे, तेथील पुढाऱ्यांचे गरीब देशांतील दौरे आणि गरीब देशांतील पुढाऱ्यांच्या श्रीमंत देशांतील वाऱ्या; महत्त्वाच्या बातम्या म्हणजे फुटबॉल, बेसबॉल, नट्या आणि पुढारी यांच्या भानगडी.
 बातम्यांच्या ठराविक साच्यातून नेपाळने सगळ्या जगाला हादरवून वेगळे केले. ब्रह्मदेशातील अतिरेक्यांनी पन्नास वर्षापूर्वी सरळ लोकसभेत घुसून पंतप्रधान आँग सॉन यांच्यासहित सारी लोकसभाच गारद करून टाकली. त्यानंतर, हत्याकांडामुळे सारे सरकारच नाहीसे झाल्याची घटना घडली नव्हती. काठमांडूच्या बातम्या वाचल्या की, आपण वर्तमानपत्र वाचतो आहोत का नाथ माधवांची 'वीरधवल' सारखी कादंबरी वाचतो आहोत यांची भ्रांती वाटते.
 नित्यनेमाप्रमाणे आठवड्याच्या पारिवारिक भोजनाकरिता सारे शाही कुटुंब एकत्र येते, त्या सगळ्यांची हत्या होते, हत्यारा स्वतः अभिषिक्त युवराजच
असतो; आईबापांना प्रेयसी पसंत नसल्यामुळे हा सारा आकांत घडला हे काही २००१ सालात घडले असे वाटत नाही. त्यानंतर खुद्द राजपुत्राचाच मृत्यु, त्याच्या चुलत्याचा राज्याभिषेक. या साऱ्या घटना पहाता आपल्या सरहद्दीवर असलेला छोटासा देश काही वेगळ्याच कालखंडात जगत असावा हे स्पष्ट होते.
 नेपाळ हे जगातील एकमेव हिंदू राष्ट्र. त्याला समुद्रकिनारा नाही; वाहतूक, संचार जे काही व्हायचे ते भारताच्या माध्यमातून. भारतीय परंपरेप्रमाणे तेथील राज्यव्यवस्था वर्षानुवर्षे चालत असे; म्हणजे नामधारी राजा व त्यांचा राणा पेशवा. नेपाळ काँग्रेसच्या नेतेमंडळींचे भारतीय काँग्रेसच्या नेते मंडळींशी घनिष्ठ संबंध. लोकसभा, निवडणुका वगैरे नेपाळात आल्या त्या काँग्रेसच्या चळवळीमुळे. राजेशाहीचे तेथे पुनरुत्थान झाले हेही सध्याच्या काळात अद्भूतच म्हटले पाहिजे. एका बाजूने हिमालय आणि दुसऱ्या बाजूला हिंदुस्थान अशा भौगोलिक परिस्थितीतील हे हिंदूराष्ट्र; पण हिंदुस्थानशी संबंध जिव्हाळ्याचे नाहीत. नेपाळातील पुरुष गुरखा, चौकीदार म्हणून किंवा सैन्यात जगभर पसरले आणि नेपाळच्या मुली कोलकता-मुंबईसारख्या शहरांच्या कुंटणखान्यांत. काही किरकोळ उद्योगधंदे चालले ते भारतातील लायसेंन्स्-परमिट राज्याचा फायदा उठविण्याकरिता - तस्करीच्या स्वरूपाचे. गेली कित्येक वर्षे नेपाळी लोकांच्या मनात भारताविषयी एक पक्की अढी बसली आहे.
 हिप्पी लोकांच्या कालखंडात त्यांनी काठमांडूचे तीर्थस्थानच बनविले होते. त्यामुळे साहजिकच तेथे मादक द्रव्यांचा व्यापार आणि सेवन फळफळले. अफगाणिस्तानापासून ते नेपाळपर्यंत साराच प्रदेश मादक द्रव्यांच्या वाहतुकीचा टापू म्हणून ओळखला जाऊ लागला. तामिळ वाघ असोत, तालिबानवाले असोत की खलिस्तानवाले असोत; मादक द्रव्यांची तस्करी करायची म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था ही त्यांच्यासाठी मोठी ब्यादच होते. या तस्करांना प्रस्थापित सरकारी व्यवस्था निष्प्रभ होईल अशी काही कारवाई करीत रहाणे आवश्यकच होते. एखाद्या स्थानिक अहंकाराला गोंजारून स्वतंत्र सार्वभौम राष्ट्राची मागणी करणे हे सगळ्यात सोयीस्कर. नेपाळमध्येही या तस्करांचा धुमाकूळ कित्येक वर्षे चालत आला आहे. भरीस भर म्हणून माओवादी बंडखोरांनीही सशस्त्र उठाव करून तेथील मुलुखाची चांगलीच लांडगेतोड चालविली होती.
 आपल्या परसदारात असलेल्या या देशात काय धुमसते आहे याची पर्वा हिंदुस्थानच्या परराष्ट्रसंबंधांची जबाबदारी शिरावर बाळगणाऱ्यांना नसावी. त्यांच्या
दृष्टीने जग म्हणजे पश्चिमेकडील श्रीमंत देश! आशियातील जवळचे देश तर सोडाच, पण मांडीला मांडी लावून बसलेल्या नेपाळ-भूतानसारख्या देशांशीही आमची जवळीक नाममात्रच.
 नेपाळमध्ये जे घडले ते म्हणजे साऱ्या शाही कुटुंबाचे शिरकाण, दिल्लीच्या परराष्ट्र खात्याला बी.बी.सी.च्या बातम्यांवरूनच कळले. खरे म्हटले तर, नेपाळमध्ये कोणता ना कोणता उत्पात होऊ घातला आहे याची जाणीव नेपाळच्या सरहद्दीवरील चोरट्या व्यापारावरूनच मुत्सद्दयांना यायला पाहिजे होती.
 झाले गेले होऊन गेले; पुढे काय? नेपाळात पुढे काय होईल? साऱ्या हत्याकांडात कोण गुन्हेगार ठरेल? नवे राजे किती दिवस टिकून राहतील? नव्याने कोणत्या प्रकारची सत्ता प्रस्थापित होईल? या उलथापालथीच्या काळात नेपाळमधील भारतविरोधी तत्त्वे चीन आणि पाकिस्तानची मदत घेऊन आपली ठाणी मजबूत करतील काय? थोडक्यात, नेपाळ भारतविरोधी कारवायांचा अड्डा बनेल काय? हे सारे प्रश्न हाताळण्याइतके सामर्थ्य आमच्यात नाही; तेव्हा जे काय होईल ते पहावे, ऐकावे, त्यावर मनोरंजक कथा सांगाव्यात, ऐकाव्यात एवढेच काय ते उरते!
 आजपर्यंत, भारताच्या हितविरोधी म्हणजे औद्योगिकदृष्ट्या प्रगत, सामाजिक, राजकीय संबंधांत उन्नत, धनधान्यांनी समृद्ध आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज राष्ट्र असतील त्यांच्यावर पिचकाऱ्या टाकीत बोलणे हा आमच्याकडील हौशी राजकारण्यांचा आवडता छंद!
 पाकिस्तान हे तसे किरकोळ राष्ट्र; पण चांगल्या विशाल महिलाउंदराची भीती बाळगतात तद्वत् पाकिस्तानविषयीच्या भयगंडाने बहुतेक भारतीयांना ग्रासले आहे. 'सीॲटी'च्या काळात पाकिस्तानच्या मागे दुष्ट साम्राज्यवादी अमेरिका उभी आहे आणि आता केवळ भारताच्या आकसापोटी चीन पाकिस्तानला मदत करीत आहे असे म्हटले, की भयगंडाच्या वावदूकपणावर काहीसे पांघरूण पडते!
 नेपाळी राजघराण्यातील हत्याकांडानंतर एक नवीच समस्या उभी राहिली आहे. सरहद्दीला लागून कोणा सामर्थ्यवान लोकांचे राष्ट्र असावे ही आम्ही चिंतेची बाब मानीत आलो; नेपाळ प्रकरणाने दाखवून दिले की, शेजारी बलदंड राष्ट्र असण्यापेक्षा कमजोर, दुर्बळ, मध्ययुगीन परंपरांचा देश असणे अधिक धोक्याचे ठरू शकते.

दि. १३/६/२००१
■ ■