अन्वयार्थ – २/दहावा अवतार- तंत्रज्ञान


दहावा अवतार- तंत्रज्ञान


 २००० सालच्या मे महिन्यात क्रिकेटचे सामने विकण्याखरीदण्याची भानगड प्रकाशात आली; वर्षभर ती गाजली. लहानपणापासून ज्यांना चरित्रनायक चरित्रनायक म्हणून पोरेटोरेसुद्धा मानायची, ते सारे क्रिकेटपटू एकामागोमाग एक भ्रष्ट ठरले. क्रिकेटच्या क्षेत्रातून त्यांची हकालपट्टी झाली. आणि, हे शक्य झाले कारण दिल्लीतील काही ध्येयवादी तरुणांच्या लहानशा गटाने भ्रष्टाचार समूळ निपटून काढण्याचे ठरविले; एखाद्या फिल्मी हिरोप्रमाणे 'ढिश्याँव ढिश्याँव' करून नाही, पिस्तूल घेऊन नाही तर हातात एक छुपा कॅमेरा घेऊन. या कॅमेऱ्याच्या साहाय्याने त्यांनी संबंधित व्यक्तींच्या बोलण्याचे चित्रण केले आणि एवढे 'चक्षुर्वैसत्यम्' झाल्यानंतर मग भ्रष्टाचाराचे भांडे फुटणे अटळच होते.
 त्यानंतर फक्त दहाच महिन्यांत या वादळी गटाने आणखी एक हल्ला चढविला. क्रिकेट खेळाडूंच्या प्रकरणी त्यांची कामगिरी मोठी; पण त्यांनी तो भ्रष्टाचार उजेडात आणल्यानंतर लोकांना धक्का बसला तो आपली एवढी मोठी फसवणूक झाली याचा. क्रिकेटचे सामने म्हणजे हिंदुस्थानातील लोकांचे एक वेड. ज्या खेळाने आपण बेहोश होऊन जातो ते सारे खोटे, बनावट होते याचा तो धक्का होता.
 १३ मार्च २००१ रोजी या वादळी टोळीने हल्ला केला तो भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष बंगारू लक्ष्मण, समता पक्षाच्या अध्यक्षा जया जेटली, संरक्षण मंत्रालयातील बडे अधिकारी आणि प्रत्यक्ष लष्करातील काही मोठे अधिकारी यांच्यावर. लष्करी सामुग्रीच्या खरेदीप्रकरणी या मंडळींनी लाच घेण्याचे मान्य केले. लाच देणारी एक लुटुपुटीची कंपनी तयार करण्यात आली. प्रत्यक्ष लाच स्वीकारण्याचे फीतचित्रण करण्यात आले आणि त्याच्या प्रदर्शनाने दिल्लीत वादळ म्हणजे वादळच उठले.
 आपल्या देशात पवित्र मानावीत अशी आता फारशी स्थाने राहिलेली नाहीत.
पण त्यातल्या त्यात भारतातील जवान आणि लष्कर हे आदराचे विषय आहेत. देशाच्या संरक्षणासाठी सरहद्दीवर लढणारा जवान आणि त्याचे हौतात्म्य याने कोणत्याही भारतीयाचे मन हेलावून जाते. लतादीदींचे 'ऐ मेरे वतन के लोगों' इतकी वर्षे कानावर पडत असूनही अजूनही लोकांच्या डोळ्यांत पाणी उभे करते याचे कारण लोकांची जवानांविषयीची असीम आदराची भावना. जवानाला सरहद्दीवर लढायला पाठविताना त्याला कोणी कमी दर्जाच्या बंदुका, चलनवलनाची साधनसामग्री किंवा खाणेपिणे पुरवत आहे असे कळले तर लोकांचा तिळपापड होतो. जवानाच्या शौर्याचा पाठपुरावा करण्याची ज्यांची जवाबदारी, ती मंडळी साधनसामग्रीचे निर्णय लाच खाऊन करतात हे काही नवीन ब्रह्मज्ञान नाही. निदान बोफोर्स प्रकरणापासून याची सर्वांना जाणीव आहे. पण तरीही दिल्लीतील 'तहलका गटा'ने मोठा धुमाकूळ घातला याचा एक भयानक परिणाम होऊ शकतो. सरहद्दीचे संरक्षण करण्यासाठी इंच इंच जागा लढविण्याची लोकांची इच्छा कमजोर होऊन जाणार आहे.
 जाळ्यात सापडलेले लोक दोषी ठरतील, शिक्षा भोगतील किंवा सुटूनही जातील, सरकार कदाचित् पडेल, कदाचित् टिकूनही राहील. या प्रकरणी काय निष्पन्न होते त्यापेक्षा छुपा कॅमेरा बाळगणाऱ्या मंडळींच्या हाती जी प्रचंड ताकद निर्माण झाली आहे त्याचा खोलात जाऊन विचार करणे आवश्यक झाले आहे.
 जुन्या काळापासून लहान मुलांच्या मनांवर चित्रगुप्ताची भाकडकथा बिंबवली जात असे. देवाच्या दरबारी कोणी चित्रगुप्त नावाचा हिशेबनीस असतो. तो बारकाईने प्रत्येक माणसाची अगदी बरीकसारीक कर्मेही टिपून ठेवतो. माणसाने स्वत:च्या मनाला फसवले तरी तो चित्रगुप्ताला फसवू शकणार नाही. मेल्यानंतर देवाच्या दरबारात उभे राहून चित्रगुप्ताने मांडलेल्या पापपुण्याच्या ताळेबंदासमोर झाडा द्यावा लागतो, ही कल्पना, माझ्या पिढीततरी, लहान मुलांच्या मनावर इतकी ठसलेली होती, की त्यामुळे काही वेळातरी काही अनिष्ट गोष्टी हातून घडण्याचे टळत असे.
 आता देवाचेच कोणाला फारसे भय राहिलेले नाही. मेल्यानंतर पाप्यांना यमदूत काय यातना देतात त्याची चित्रे एखाद्या जुन्या देवळाच्या भिंतीवर पाहून अंगाला थरकाप सुटायचा. आता लहान बाळेसुद्धा असल्या भाकडकथांना भीक घालीत नाहीत. देव नाही, त्याचा दरबार नाही आणि चित्रगुप्तही नाही; तेव्हा देखरेख ठेवणारे कोणीच नाही. लहानपणी आईबाप आणि मोठेपणी पोलिस यांची नजर चुकवून काहीही करायला हरकत नाही अशी 'मनःपूतम् समाचरेत्'
ही सार्वत्रिक धारणा सर्वदूर पसरली. सामान्य माणसाची ही स्थिती तर सत्ताधाऱ्यांचे काय विचारावे? सत्ता म्हणजे भ्रष्टाचार, अनिर्बंध सत्ता म्हणजे अनिर्बंध भ्रष्टाचार हे लॉर्ड ॲक्टनचे वाक्य सर्वमान्यच आहे. हा भ्रष्टाचार करताना सत्तेची सर्व साधने वापरावी. सहकाराचा स्वाहाकार करावा, सरकारही विक्रीस काढावे आणि त्यातून उभा झालेला पैसा वापरून निवडणुका जिंकाव्यात व पुन्हा एकदा सत्ता जिंकावी असे सत्ता आणि मत्ता यांचे दुष्टचक्र गतिमान झाले.
 सत्तासंपत्ती आणि भ्रष्टाचार हे द्वंद्व मोडण्याकरिता समाजवाद्यांनी एक नवीन तत्त्वज्ञान काढले. 'ज्याने त्याने समाजाला आपल्या कुवतीप्रमाणे द्यावे आणि समाजाकडून गरजेपुरतेच घ्यावे' या पायावर सारी समाजव्यवस्था आधारली म्हणजे भ्रष्टाचाराचे नावच राहणार नाही, अशी त्यांची कल्पना; पण ती पूर्णतः फसली. समाजवादाच्या माहेरघरीसुद्धा 'कमीत कमी द्यावे आणि जास्तीत जास्त उकळावे' अशीच समाजरीती रूढ झाली.
 गांधीजींनी हाच प्रश्न सोडविण्यासाठी विश्वस्ताची कल्पना मांडली. सत्तासंपत्ती असलेल्यांनी आपल्याकडे ती केवळ ठेव म्हणून असल्याचे मानावे म्हणजे त्याचा उपभोग स्वार्थासाठी होणार नाही अशी त्यांची कल्पना. गांधीजींचा खटाटोपही व्यर्थ झाला. त्यांचे इतिहासप्रसिद्ध अंत्येवासी भ्रष्टाचारात आकंठ बुडून गेले.
 चित्रगुप्ताची जागा आता स्पर्धा घेईल या आशेवर स्वतंत्रतावादी खुल्या बाजारपेठेचा पुरस्कार करीत होते. स्पर्धेचे जाते देवाच्या गिरणीप्रमाणे पीठ चांगले दळते; पण फार मंद गतीने दळते. खलनायकांच्या पापांचे सर्व घडे भरले म्हणजे त्यांना आपोआप सजा मिळेल असे गृहीत धरले तरी इतका वेळ सारे सोसणे कोणालाही अशक्य होते.
 यातूनच बॉलिवूडच्या चित्रपटांत दिसणारा 'ढिश्याँव ढिश्याँव' नायक उभा राहिला; पण असली स्टंटबाजी सामान्यांना जमणारी नाही आणि त्यातील रक्तपात सदभिरुचीस धरून नाही. मग, सदाचाराचा पाठीराखा कोण? या प्रश्नाने समाजाला ग्रासले.
 सामान्य माणसाचा आधार इतिहासात एकच दिसून येतो. त्याचे जे काही भले झाले ते तंत्रज्ञानामुळे. भारतापुरताच आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या कालखंडाचाच विचार करायचा म्हटले तरी हे स्पष्ट होते. स्वातंत्र्यानंतर भारत अन्नधान्याच्या उत्पादनात स्वावलंबी झाला, गोरगरिब खाऊ लागली याचे कारण कोणी नेहरू नाही, कोणी समाजवादी नियोजन नाही, हा चमत्कार घडला तो संकरित वाणांच्या हरितक्रांतीने.
पूर्वी पुरुष आणि बायाही ऐन तरुण वयात पटापट मरून जायच्या. आता साठसत्तर वर्षे वय झाले तरी मरायचे नाव कुणी घेत नाही. लोक खातातपितात व्यवस्थित त्यामुळे रोगराई कमी झाली; पण, मुख्य श्रेय द्यावे लागेल ते वैद्यक शास्त्रातील नवनवीन शोधांना. विषमज्वर, देवी, कॉलरा हे सारे एके काळचे महाभयानक यमदूत. प्रतिजैविकां (अँटिबायोटिक्स) पुढे सारे निष्प्रभ होऊन संपले.
 भ्रष्ट सत्ताधाऱ्यांनी गांजून गेलेल्या जनतेच्या मदतीला पुन्हा एकदा तंत्रज्ञानच सरसावून पुढे आले आहे. राजकारणात अशा तंत्रज्ञानाचा वापर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी पहिल्यांदा केला आणि बदनामी होऊन, त्यांना राजीनामा द्यावा लागला. सत्ताधाऱ्यांनीच तंत्रज्ञानाचे नवीन हत्यार आपल्या हाती घेणे लोकांना रुचले नाही, पण सामान्य माणसांनी तंत्रज्ञानाचा वापर करून भल्याभल्यांना उघडे पाडावे यातील रोमांचकता लोकांना सहज भावते.
 फ्रैंकफुर्टच्या विमानतळावर एका जागी जेम्स् बाँड पद्धतीच्या साधनांची माहिती मिळते. अंगठीतील कॅमेरा, कोटाच्या बटनातील ध्वनिमुद्रक, भिंतीपलीकडचेसुद्धा स्पष्ट पाहणारे कॅमेरे- सारेच मोठे अद्भूत. या साधनांचा वापर काही सच्छील धाडसी तरूण मंडळी करू लागली तर येत्या काही वर्षात धनदांडगे आणि सत्तदांडगे यांना 'दे माय धरणी ठाय' होऊन जाणार आहे. प्रत्येक नवीन तंत्रज्ञान काही प्रश्न सोडवते आणि काही नवेच प्रश्न तयार करते. दिवाभीत घुबडे वाईट परिणामांचा बागूलबुवा करून तंत्रज्ञानाच्या प्रगतीसच विरोध करू पाहतात; तर आशावादी उद्यमशील त्या दोषांचे निराकरण करण्यासाठी आणखी नव्या तंत्रज्ञानाचा शोध करण्याची कास धरतात. नवीन तंत्रज्ञानाने भ्रष्टाचारी उघड्यावर पडतील; पण त्याबरोबरच सामान्य माणसाच्या जीवनातील खासगी जगण्याचा हक्क छिनावला जाईल काय? आपल्या घरी शांतपणे जीवन कंठणाऱ्या नागरिकांना 'भिंतीपलीकडून कोणी Piping Tom आपल्यावर नजर ठेवून तर नाही ना?' अशी धाकधूक वाटत राहिली तर काय करायचे? या प्रश्नाचे उत्तर पाचदहा वर्षात नव्याने उभे रहाणारे तंत्रज्ञान देईल. तोपर्यंत
 'परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्मसंस्थापनार्थाय'
 नवीन तंत्रज्ञान अवतार घेऊन आले आहे याचा आनंदीआनंदच होणार आहे.

दि. २२/३/२००१
■ ■