अन्वयार्थ – २/फिजीतील भारतीय आणि भारतातील फिजीयन
दुसऱ्या देशात जन्म घेतल्याने त्या देशाचे नागरिकत्व असलेला माणूस भारतीय नागरिकत्व घेतल्यानंतर तरी राष्ट्राची महत्त्वाची अधिकारपदे घेण्यास पात्र असावा काय? या प्रश्नावर चर्चा चालू आहे; एक जवळजवळ सबंध राष्ट्रीय पक्ष केवळ याच मुद्द्यावर उभा राहू पाहतो आहे. जन्म येथला नाही; पण वर्षानुवर्षे भारतात निवास आहे, येथील सार्वजनिक, राजकीय आयुष्यात जनमान्य स्थान आहे अशांनाही देशाचे पंतप्रधानपद मिळू नये असे काही, त्या पदावर आपला हक्क आहे असे मानणारे, सांगत राहतात. राष्ट्र हा एक भौगोलिक स्थावर मालमत्तेचा तुकडा आहे अशी संकुचित कल्पना केली, की मग अशा प्रकारचे गुंतागुंतीचे प्रश्न तयार होतात. आज जेथे पाकिस्तानचा झेंडा फडकत आहे त्या प्रदेशात जन्म झालेले आणि फाळणीच्या काळात निर्वासित म्हणून हिंदुस्थानात आलेले लक्षावधी नागरिक आहेत. त्यांच्यापैकी कोणालाही पंतप्रधान किंवा तत्सम पदावर अधिकार कधीच सांगता येणार नाही? हा प्रश्न केवळ तार्किक नाही. भाजपाचे नेते, पंतप्रधानपदासाठीचे संभाव्य वारसदार श्री. लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म पाकिस्तानी प्रदेशातला. त्यांचा जन्म झाला तेव्हा पाकिस्तान मुळी जन्मालाच आले नव्हते. अर्थातच, ते कधी पाकिस्तानी नागरिक नव्हते. त्यामुळे, त्यांच्याबद्दल असा वाद निर्माण होऊ नये; परंतु पंतप्रधानांच्या खुर्चीवर डोळा ठेवून बसलेला भाजपातील कोणी पुढेमागे असा युक्तिवाद वापरणारच नाही याची खात्री देणे कठीण आहे.
अमेरिकेत निवासी झालेला माझा एक पुतण्या आपल्या बापालाच सांगतो, डॅडी, तुम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाही. राष्ट्राध्यक्षपद मिळवण्यास मी निदान पात्र आहे.
भारतातील कोणी नागरिक दुसऱ्या देशात गेला आणि त्याने काही राजकीय सत्ता मिळवली तर त्यात काही गैरवाजवी घडले असे भारतीयांना वाटत नाही. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या मंत्रिमंडळ-समित्यांत शेती, तंत्रज्ञान, संगणक इत्यादी क्षेत्रांत भारतीय नागरिक महत्त्वाची स्थाने मिळवून आहेत त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी सर्व दृष्टीने राष्ट्राध्यक्ष होण्यास पात्र आहेत; पण स्त्री असल्यामुळे केवळ, त्या कधीकाळी स्वतःच राष्ट्राध्यक्ष बनतील असा विचार करणेही कठीण आहे. अर्थात्, कोणी अनिवासी भारतीय या शतकाततरी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बनेल ही शक्यता नाही; पण कित्येक वर्षांपूर्वी मळ्यांवर मजूर म्हणून कंत्राटाने गेलेले भारतीय नागरिक अनेक देशांत स्थायिक झाले आहेत. त्यांचे वंशज आज मानमरातब, धनसंपत्ती एवढेच नव्हे तर राजकीय सत्ताही बाळगून आहेत. मॉरिशसचा पंतप्रधान भारतीय असण्याचे आता काही फारसे कौतुक राहिलेले नाही. इंडोनेशिया, कंबोडिया हे देश तर, कदाचित् पुरातन हिंदू संस्कृतीचे उगमस्थान. तेथील राजकारणाच्या प्रकाशझोतात येणाऱ्या व्यक्तींची नावे संस्कृतप्रचुर आणि अनेकदा ओळखी ओळखीची वाटतात.
फिजी बेटातही भारतीय मुळाचे पंतप्रधान झाले ते सहजासहजी नाही. फिजी बेटसमूहातील बहुसंख्य प्रजा तद्देशीय आदिवासींची. साम्राज्यवादाच्या सुवर्णस्पर्शाने ही बेटे आधुनिक युगात प्रवेश करती झाली. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याशी असलेल्या व्यापारी संबंधांनी बऱ्यापैकी सुबत्ता आली. या व्यापाराची सारी सूत्रे मूळचे भारतीय असलेल्या व्यापारी समाजाकडे. अशा या परिस्थितीत, राजकारण मोठे ताणतणावाचे असणार हे उघड आहे. दोन विभक्त जमातींच्या राष्ट्राला एकसंध कसे राखावे हा प्रश्न गांधी-जीनांना सोडवता आला नाही, तो महासागरात विखुरलेल्या बेटांच्या या समूहराष्ट्राने सोडवून दाखविला. अल्पसंख्य जमातीचे श्री. चौधरी पंतप्रधान म्हणून निवडून आले, हे तेथील खऱ्याखुऱ्या लोकशाहीचे प्रमाणपत्रच आहे.
या सगळ्या ऐतिहासिक कामगिरीला डाग लावला तो आदिवासी समाजातील, व्यापारउदीमात प्रवेश करून भरभराट साधण्याच्या प्रयत्नांत अयशस्वी झालेल्या एका माणसाने. पाचपंचवीस बंदूकधारी माणसांना घेऊन जॉर्ज स्पाईट लोकसभागृहातच घुसला आणि पंतप्रधान चौधरी यांच्यासकट अनेक महत्त्वाचे नेते त्याने ओलीस धरले. मोठा घटनात्मक पेचप्रसंग तयार झाला. त्याच्या बातम्यांनी वर्तमानपत्रांचे रकाने आणि दूरदर्शनची वार्तापत्रे भरून वाहत होती.
आतंकवाद्यांचा प्रश्न भारताला काही अनोखा नाही. एकट्यादुकट्या व्यक्तींचे खून करणे, गाववस्त्यांवर हल्ले करून मुडदे पाडणे, प्रवासी गाड्या थांबवून निवडक प्रवाशांना खाली उतरवून त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करणे हे प्रकार अनेक भागांत- पंजाब, आसाम, कश्मीर इत्यादी – दैनंदिन घडत असतात. पण, कोणी खासगी सेना, हत्यारे घेऊन पंतप्रधानांवरच ताबा मिळवेल, त्यांना ओलीस ठेवून देशाची घटनाच बदलण्याचा खेळ खेळू शकेल हे काही संभाव्य दिसत नाही. फिजीसंबंधीच्या बातम्या पाहताना, ऐकताना सर्वांच्या मनात प्रश्न उभा राहत असे, या देशातील लष्कर काय करते आहे? फिजीमधील समस्या तेथील परंपरेप्रमाणे सुटू पाहत आहे; पण, असले अचरट प्रकार हिंदुस्थानात घडूच शकणार नाहीत असे ज्यांना वाटत होते त्यांना मात्र वीरप्पन-राजकुमार प्रकरणाने सपशेल तोंडघशी पाडले आहे.
वीरप्पन हा चंदनाची तस्करी करणारा प्रख्यात दरोडेखोर. तामिळनाडू आणि कर्नाटक यांच्या सरहद्दीवरील शेकडो एकर घनदाट जंगल हा त्याच्या अधिसत्तेचा प्रदेश. कित्येक वर्षे झाली, तामिळनाडू आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या सरकारांनी कोट्यवधी रुपये खर्च केले; पण, वीरप्पन त्यांच्या हाती लागू शकलेला नाही. वीरप्पन श्रीलंकेतील तामिळी वाघांना सामील आहे असे कर्नाटकात सर्रास मानले जाते. त्याचा शेकडो चौरस मैलांचा जंगलप्रदेश तामीळी वाघांकरिता लपण्याचे, विश्रांतीचे, प्रशिक्षणाचे स्थान आहे. श्रीलंकेला यादवी युद्ध जिंकायचे असेल तर वीरप्पनच्या जंगलप्रदेशावर त्यांना बॉम्बहल्ला करावा लागेल.
राजीव गांधी यांच्या खुनाच्या कारस्थानात असलेले अनेकजण या जंगलात आश्रय घेऊन आहेत असे बंगलोरच्या रस्त्यांत उघड बोलले जात असतानासुद्धा कोणत्याही पोलिसदलाची तेथे धाड घालण्याची हिंमत झाली नाही. वीरप्पन म्हणजे काही व्यापारउदीमात दिवाळखोरीला आलेला जॉर्ज स्पाईट नव्हे. राजकुमार हा काही मुख्यमंत्री नाही; पंतप्रधानतर नाहीच नाही. पण, कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांतील सिनेरसिकांच्या हृदयांचा तो बादशहा आहे. दक्षिणेतील नटनट्यांची लोकप्रियता हा काहीएक अजबच प्रकार आहे. महाराष्ट्रात दादा कोंडकेच काय, निळू फुलेदेखील महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल अशी कल्पना करणे कठीणच; मग चंद्रकांत आणि अशोक सराफ यांची गोष्ट दूरच राहिली; पण, दक्षिणेत हे सहज शक्य होते. एन. टी. रामाराव तेलगू सम्मानची घोषणा करून नऊ महिन्यांच्या अवधीत मुख्यमंत्री झाले. जयललिता अगदी अलीकडेपर्यन्त दिल्लीचे सरकार पाडण्याची ताकद आणि हिंमत ठेवून होती. तेव्हा राजकुमार यांना राजकीय महत्त्वाकांक्षा नसली तरच आश्चर्य. गेली काही वर्षे मधूनमधून, राजकुमार राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या झळकतात; कधी तो काँग्रेसमध्ये जाणार अशी आवई उठते, तर कधी तो स्वतःच नवीन पक्ष स्थापन करणार असे बोलले जाते.
एन. टी. रामारावप्रमाणे राजकुमारच्या सिनेमांच्या कथा आणि त्याच्या भूमिका यांना सामाजिक, राजकीय संदर्भ असतात. निपाणीच्या शेतकरी आंदोलनावर आधारलेल्या एका चित्रपटात त्याने नायकाची भूमिका केली. तो चित्रपट खूप गाजला; त्याला राज्य शासनाचे पारितोषिकही मिळाले. वीरप्पनच्या कथेवर आधारित त्याचा एक अत्यंत गाजलेला चित्रपट आहे. त्यात राजकुमारने चंदनतस्कराचा बीमोड करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. कथेच्या शेवटी चंदनतस्कर आणि पोलिस इन्स्पेक्टर राजकुमार हे एकाच आईच्या पोटी जन्मलेले सख्खे भाऊ असल्याचे त्यांची आई सांगते. प्रत्यक्षात घडत असलेले नाट्य या चित्रकथेला अगदी समांतर आहे. राजकुमार यांचे निवासस्थान या जंगलाच्या सरहद्दीवर आहे. एरव्ही ही गोष्ट वीरप्पन आणि राजकुमार या दोघांनाही मोठी सोयीची ठरत असली पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत राज्य शासनाची तलवार डोक्यावर सतत टांगती राहण्यापेक्षा राज्य शासन आपल्या म्हणण्याबाहेर नसावे अशी इच्छा वीरप्पनचीही असणार. हे साधावे कसे? या देशात मुख्यमंत्र्यांना पळवून नेऊन ओलीस ठेवणे दुरापास्त आहे. त्यांना ओलीस ठेवले तरी त्यातून राजकीय सत्ता हाताशी येणे शक्य नाही. म्हणजे, सगळे डाव फिजीतील जॉर्ज स्पाईटचेच, फक्त डावपेच वेगळे.
फारूख अब्दुल्लासाहेबांनी स्वायत्ततेची घोषणा केली; त्याला तुरंत प्रतिसाद मिळाला तो आसामबरोबर तामिळनाडू व पंजाब या राज्यांतून. करुणानिधींच्या पक्षाच्या अलीकडच्या अधिवेशनात स्वतंत्र तामिळनाडूची भाषा बोलली गेली; तामीळ वाघ नेता प्रभाकरन याचा उदो उदो झाला. तामीळ वाघांबद्दल अनेक तामीळ नागरिकांच्या मनात प्रचंड अभिमान आणि आपुलकी आहे. राजकुमारांच्या या अपहरणाचे नाटक या सर्व घडामोडी लक्षात ठेवून पाहिले पाहिजे.
वीरप्पनने केलेल्या मागण्या मोठ्या बोलक्या आहेत.५० कोटींची खंडणी आणि गुन्हेगारी खटल्यातून सरसकट माफी या मागण्या त्याने मांडाव्यात यात काही आश्चर्य नाही; पण शेतीमालाला भाव, शेतमजुरांची मजुरी, तामीळ भाषेचे स्थान आणि कर्नाटकातील तामीळ जनतेला मिळणारी वागणूक यासंबंधीच्या मागण्या पाहता हा सारा उघडउघड राजकीय खेळ असावा असे दिसते. तामीळ वाघ, वीरप्पन आणि राजकुमार या त्रिकुटाचे हेतू अजून स्पष्ट नाहीत; पण, त्यांनी रचलेले हे नाटक फिजीतील भारतीय-आदिवासी खेळीपेक्षा फारसे वेगळे नाही.
दि. ९/८/२०००
■ ■